मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३० ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३० ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

वाचन

व्यक्तीच्या जडणघडणीत जसा सभोवतालच्या, आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर भेटणार्‍या अनेक माणसांचा प्रभाव असतो तसाच निसर्गाचा, झाडाझुडुपांचा आणि वाचनात आलेल्या पुस्तकांचाही फार मोठा वाटा असतो. नुकताच वाचक दिन साजरा झाला. त्या निमीत्ताने आज मुद्दाम लिहावसं वाटतंय कारण माझ्या आयुष्यात वाचनसंस्कृतीला अपार महत्व आहे. माझ्या मते तर माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक वाचलेली पुस्तके आणि दोन, भेटलेली माणसे.

वाचन हे चांगलं व्यसन आहे. ज्यामुळे माणसाचे मानसिक आरोग्य निरामय होऊ शकतं. ज्या व्यक्तीला वाचनाची आवड असते त्या व्यक्तीचे आयुष्य कधीही कंटाळवाणे होऊ शकत नाही. वेळ कसा घालवावा हा प्रश्न पडत नाही. एकटेपणा जाणवत नाही. कारण पुस्तक हा असा मित्र आहे की जो आपली संगत कधीही सोडत नाही. आपल्या सुखदुःखात तो, त्याच आनंदी, मार्गदर्शक चेहऱ्याने, कळत नकळत सतत आपल्या सोबत असतो.

एका इंग्रजी लेखकाने म्हटले आहे की,

“BOOKS ARE OUR COMPANIONS. THEY ELEVATE OUR SOULS. ENLIGHT OUR IDEAS AND ENABLE US TO THE GATES OF HEAVEN”

कल्पनाशक्ती, ज्ञान आणि शब्दसंग्रह उन्नत करण्याचं एकमेव माध्यम म्हणजे वाचन. कारण पुस्तके ही माहिती आणि ज्ञानाचा समृद्ध स्त्रोत आहेत.

वयानुसार आपल्या वाचनाच्या आवडीनिवडी बदलत जातात. लहानपणी चांदोबा, गोट्या, फास्टर फेणे, जातक कथा, बिरबलच्या कथा वाचण्यात रमलं. कुमार वयात, तारुण्यात, नाथ माधव, खांडेकर, फडके यांच्या स्वप्नाळू साहसी, शृंगारिक, वातावरणात आकंठ बुडालो. शांताबाई, तांबे, बालकवी, इंदिरा संत, विंदा, पाडगावकर यांनी तर कवितेच्या प्रांगणात मनाभोवती विचारांचे, संस्कारांचे एक सुंदर रिंगणच आखलं. धारप, मतकरी यांच्या गूढकथांनी तर जीवनापलिकडच्या अफाट, अकल्पित वातावरणात नेऊन सोडलं. ह. ना आपटे यांच्या “पण लक्षात कोण घेतो.. ” या कादंबरीने तर वैचारिक दृष्टिकोनच रुंदावला. त्यांची यमी आजही डोक्यातून जात नाही. श्रीमान योगी, ययाती, छावा, शिकस्त, पानीपत या कादंबऱ्यांनी इतिहासातला विचार शिकवला. आणि पु. लं. बद्दल तर काय बोलावं? त्या कोट्याधीशाने तर आमच्या मरगळलेल्या जीवनात हास्याची अनंत कारंजी उसळवली. जीवन कसं जगावं हे शिकवलं. विसंगतीतून विनोदाची जाण दिली. व्यक्ती आणि वल्लीच्या माध्यमातून त्यांनी माणसं वाचायला शिकवलं. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृती चित्रे …कितीही वेळा वाचा प्रत्येक वेळी निराळा संस्कार घडवतात. ही यादी अफाट आहे, न संपणारी आहे. यात अनेक आवडते परदेशी लेखकही आहेत. साॅमरसेट माॅम, अँटन चेकाव, हँन्स अँडरसन, बर्नाड शाॅ, पर्ल बक, डॅफ्ने डी माॉरीअर, जेफ्री आर्चर, रॉबीन कुक.. असे कितीतरी. ही सारी मंडळी मनाच्या गाभाऱ्यात चिरतरुण आहेत कारण त्यांच्या लेखनाने आपली वाचन संस्कृती, अभिरुची, अभिव्यक्ती तर विस्तारलीच पण जगण्याला एक सकारात्मक दिशा मिळाली. त्यांनी आशावादही दिला, एक प्रेरणा दिली.

वाचनाने आमचे जीवन समृद्ध केले, निरोगी केले, आनंदी केले. , कसे? हे बघा असे.

विंदा म्हणतात,

“वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे

रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे…”

कुसुमाग्रज म्हणतात,

“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा…”

शेक्सपियर म्हणतात,

” प्रेम सर्वांवर करा, विश्वास थोड्यांवर ठेवा, पण द्वेष मात्र कोणाचाच करू नका. “

किंवा, ” सुंदर फुले हळुवारपणे उमलत असतात तर गवत झपाट्याने उगवते. ” 

साने गुरुजींनी सांगितले,

“खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.. “

हे सारंच विचारांचं धन आहे. अनमोल आहे! अनंत, अफाट आहे आणि हे असं धन आहे की, जगण्याच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही स्वतःसाठी वापरा, दुसऱ्यांना द्या ते कमी होत नाही. वैचारिक धनासाठी डेबिट हे प्रमाणच नाही. ते सदैव तुमच्या क्रेडिट बॅलन्स मध्येच राहतं. आणि फक्त आणि फक्त ते वाचनातूनच उपलब्ध असतं. म्हणूनच म्हणतात “वाचाल तर वाचाल”

वाचनाचे अनेक प्रकार असू शकतात. अध्यात्मिक ग्रंथ वाचन, चरित्रात्मक वाचन, कविता, ललित, कथा, कादंबरी, रहस्यमय, गूढ, भयकारी, साहसी, अद्भुत, शृंगारिक, विनोदी, नाट्य, लोकवाङमय, प्रवास, संगीत, अगदी पाकशास्त्र सुद्धा. अशा अनेक साहित्याच्या शाखा आहेत. आता तर डिजिटल वाङमयही भरपूर आहे. ज्याने त्याने आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसार, आवडीनुसार स्वभावानुसार, वाचावे. पण वाचावे. नित्य वाचावे.

वाचन हे माणसाला नक्कीच घडवतं. प्रेरणा देतं. कल्पक, सावध, जागरुक बनवतं. केसरी आणि मराठा वाचून अनेक क्रांतीकारी निर्माण झाले. सावरकरांच्या कविता वाचताना आजही राष्ट्रभावना धारदार बनते.

वाचन आणि कुठलीही आवड अथवा छंद याचं एक अदृश्य नातं आहे. जसं आपण एखादं झाड वाढावं म्हणून खत घालतो आणि मग ते झाड बहरतं. तसेच वाचनाच्या खाद्याने आवडही बहरते. ती अधिक फुलते. चारी अंगानी ती समृद्ध होत जाते. आवडीला आणि पर्यायाने व्यक्तीमत्वाला आकार येतो.

मात्र जशा नाण्याला दोन बाजू असतात तशाच वाचनालाही आहेत. संगत माणसाला घडवते नाहीतर बिघडवते. वाचनातून अशी काही धोक्याची वळणं जीवनाला विळखा घालू शकतात. पण हे व्यक्तीसापेक्ष आहे. ज्याचे त्यांनी ठरवावे काय वाचावे. या नीरक्षीरतेची रेषा जर वाचकाला ओलांडता आली तर मात्र तो स्वतःची आणि इतरांची जीवनसमृद्धी घडवू शकतो.

कित्येक वेळा जाहिराती, रस्त्यावरच्या पाट्या, भिंतीवर लिहिलेले सुविचार, पानटपरीवरचे लेखन, ट्रकवर लिहिलेली वाक्येही तुम्हाला काहीबाही शिकवतातच. आणि वाचनाची आवड असणारा हे सारं सहजपणे वाचत असतो. आणि या विखुरलेल्या ज्ञानाची फुलेही परडीत गोळा करतो.

मला वयाची पंचाहत्तरी ओलांडली तरी बालवाङमय वाचायला आवडते. मी आजही परी कथेत रमते. रापुन्झेल, सिंड्रेला, हिमगौरी मला मैत्रीणी वाटतात. हळुच विचार डोकावतो, माझ्यासारख्या त्या मात्र वृद्ध होणार नाहीत. त्यापेक्षा त्या आहेत म्हणून माझेही शैशव अबाधित आहे. आजही मी बोधकथेत गुंतते.

भाकरी का करपली? घोडा का अडला? चाक का गंजले?…. या प्रश्नांना बिरबलाने एकच उत्तर दिले ” न फिरविल्याने “.. हे वैचारिक चातुर्य बालसाहित्य वाचनातून मला आजही मिळतं.

” तुपात पडली माशी चांदोबा राहिला उपाशी ” – – या ओळीतला गोडवा माझ्या कष्टी मनाला आजही हसवतो.

बालवयात वाचलेल्या अनेक कविता नवे आशय घेऊन आता उतरतात. आणि पुन्हा पुन्हा मनाला घडवतात.

॥उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले । डोळे तरी मिटलेले अजूनही॥… आज या ओळी मला जीवनाचा नवा अर्थ सांगतात. त्या झोपलेल्या चिऊताईत मला जणू काही मीच दिसते. कुणीतरी मलाच नव्याने जगाकडे, बदलत्या काळाकडे पहाण्याची दृष्टी देते.

वाचनाचा हा प्रवास न संपणारा आहे. शेवटचा श्वास हेच त्याचे अंतिम स्थानक असणार आहे. बाकी सगळं तुम्ही ठेवून जाणार आहात इथेच. कारण ते भौतिक आहे. पण वाचन हे आधिभौतिक आहे. पारलौकिक आहे. हे धन ही समृद्धी, हे विचारांचे माणिक—मोती तुमच्या बरोबर येणार, कारण ते तुमच्या आत्म्याचा भाग आहे…

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘विस्मृतीतील मोती…. स्क्वाड्रन लीडर देवय्या!!…’ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘विस्मृतीतील मोती…. स्क्वाड्रन लीडर देवय्या!!’ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

‘६ सप्टेंबर हा दिवस पाकिस्तानचा संरक्षण दिवस ‘ म्हणून साजरा केला जातो. म्हणजे पाकिस्तानसाठी या दिवसाचं महत्व किती असेल याची कल्पना करा! आणि ते तसं होतंच! 

कारण त्याच दिवशी संध्याकाळी पाकिस्तानने आपल्या पठाणकोट, आदमपूर आणि हलवारा या हवाईदलाच्या तीन तळांवर अकस्मात हल्ले केले होते. महत्वाची बाब म्हणजे तेव्हा अधिकृतपणे युद्ध सुरू झाल्याची घोषणा होणे बाकी होते! अर्थात ऑगस्ट महिन्यापासूनच सीमेवर चकमकी चालू होत्या. आपल्या छाम्ब क्षेत्रात पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात रणगाडे घुसविले होते. त्यामुळे छाम्ब क्षेत्रावर दबाव आला होता. हा दबाव कमी करण्यासाठी आपल्या हवाईदलाने ६ सप्टेंबरला सकाळी लाहोरवर बॉम्ब वर्षाव केला होता. त्याला फारसा विरोध झाला नव्हता, कदाचित म्हणून आपण थोडे बेसावध असू.

तर या तीन ठिकाणांपैकी आदमपूर आणि हलवारा या दोन तळांवर आपल्या हवाईदलाच्या गस्त आणि प्रखर प्रतिकारामुळे आलेली पाकिस्तानची विमाने फारसे नुकसान करू शकली नाहीत. मात्र पठाणकोटवर झालेला हल्ला एवढा अनपेक्षित आणि अकस्मात होता की आपल्या हवाईदलाला प्रतिकार करायलाही उसंत मिळाली नाही! तेथील तळावर असलेली आपली दहा विमाने जागेवरच नष्ट झाली!! पाकिस्तानच्या दृष्टीने हा विजय किती मोठा असेल याची आपण कल्पना करू शकतो! 

त्या वेळची पाकिस्तान आणि भारताची विमानदलांची तौलनिक स्थिती काय होती.. तर आपल्याकडे नॅट, हंटर, व्हॅम्पायर्स, कॅनबेरा, माईस्टर्स, आणि मिग २१ अशी त्या काळी सुद्धा जवळपास कालबाह्य झालेली विमाने होती!! तर पाकिस्तानकडे होती एफ १०४ स्टार फायटर्स.. त्या काळची जगातील सर्वोत्तम फायटर् विमाने.. जी अमेरिकेने त्यांना जवळ जवळ फुकट दिली होती. त्या शिवाय एफ ८६ सॅबरजेट, बी ५७ कॅनबेरा बॉम्बर, एच ४३, एस ए १६, सी १३० अशी हवाई क्षेत्रातील सर्वात बलाढ्य आणि आपल्या विमानांच्या तुलनेत चौपट वेगवान विमाने!! 

आपल्या वायुदलाला ही वस्तुस्थिती माहीत नव्हती काय?? नक्कीच माहीत होती. त्यांनी आपल्यापाशीही अशी वेगवान विमाने असावीत म्हणून तात्कालीन सरकारकडे शेकडो वेळा मागणी केली होती. पण आपल्या सरकारचे ‘शांती’ हे ब्रीदवाक्य होते. युद्ध या शब्दाचा त्यांना प्रचंड तिटकारा होता. त्यातच चीनकडून प्रचंड पराभव झाल्याने सरकारमधील श्रेष्ठी आधीच खचले होते. त्यात हवाईदलाची ही मागणी म्हणजे पुन्हा युद्ध.. आणि युद्ध करण्याच्या मानसिकतेत सरकार नव्हते. सबब आहे त्या तुटपुंज्या साधनांनी लढणे तिन्ही दलांना क्रमप्राप्त होते.. याची अपरिहार्य परिणती आपल्या सैन्याचे, वायुदल, नौदलाचे प्रचंड प्रमाणात नाहक शिरकाण होण्यात होणार, हे नक्की होते! सर्व सेनादलांचे प्रमुख यांना ही गोष्ट स्पष्ट दिसत होती.. पण प्राणपणाने लढणे एवढेच त्यांच्या हातात होते…!!

तर सहा तारखेच्या त्या जबरदस्त अपमानाचा बदला घेण्याचे त्याच रात्री ठरले. या वेळी नशीब म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र मान. यशवंतराव चव्हाणसाहेब हे केंद्रात संरक्षणमंत्री होते. त्यांनी तात्काळ प्रतिकाराचे आदेश दिले.

आता पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाणार हे नक्की होते. अर्थात पाकिस्तानला हे अपेक्षित असणार हे लक्षात घेऊन सीमेवरच्या हवाई तळांवर हल्ले न करता पाकच्या आत खोलवर.. जिथे एफ १०४ स्टार फायटर्सचा मुख्य तळ होता, त्या सरगोधा या अति महत्वाच्या तळावर घाव घालण्याचे नक्की झाले. या हल्ल्याची कमान आदमपूर येथील हवाई तळाने स्वीकारली.

आणि सात तारखेला पहाटे आपल्या आठ विमानांनी उड्डाण केले. सुरुवातीला बारा विमाने पाठविण्याचे ठरले होते, पण ऐन वेळी फक्त आठ विमाने या मोहिमेसाठी निवडली गेली. सूडाच्या आगीने धुमसत असलेल्या आपल्या आठही वैमानिकांनी प्रचंड त्वेषाने शक्य तेवढ्या वेगाने जात सरगोधा हवाईतळ गाठला. सर्व पाकिस्तानी तळ गाफील होता. पाकिस्तानच्या एवढ्या आत असलेल्या आणि अति वेगवान अशा बारा एफ १०४ स्टार फायटर्सचा तळ असलेल्या जागी आपल्या पठाणकोटवरच्या विजयी हल्ल्याच्या फक्त बारा तासांच्या आत भारतीय विमानदल धडक मारेल हे पाकिस्तानी विमानदलाच्या स्वप्नातही आले नसेल आणि रात्रीच्या विजयाच्या आनंदात युद्धातील विजयाचे स्वप्न पहाणाऱ्या त्या पाकी तळावर वीज कोसळावी, तसा आपल्या आदमपूर येथील वीर वैमानिकांनी भयानक हल्ला चढवला. त्यांची ११ – एफ १०४ स्टार फायटर्स विमाने उभ्या जागी अल्लाला प्यारी झाली. संपूर्ण तळ जवळपास नष्ट झाला. मात्र तशाही स्थितीत एक एफ १०४ स्टार फायटर आकाशात उडाले. तोपर्यंत आपली विमाने परतीच्या प्रवासाला लागली होती. पण एफ १०४ स्टार फायटरचा वेग एवढा प्रचंड होता की, त्याने आपल्या विमानांना जवळ जवळ गाठलेच.. त्या पाकी विमानात अत्याधुनिक मिसाईल्स होती. जर त्याला अडविले नसते तर आपल्या सर्व विमानांचा विनाश ठरलेला होता!!

पण अडवणार तरी कसे.. त्या विमानाचा वेग आपल्यापेक्षा चौपट.. शिवाय मिसाईल्स..

आणि अशा वेळी त्या विमानाला अंगावर घेतले ते आपल्या एका असामान्य शूर वीराने.. श्री. अजामदा बोपय्या देवय्या हे त्या शूर वैमानिकाचे नाव..

या असामान्य शूर वीराने आपले विमान सरळ त्या अजस्त्र एफ् १०४ स्टार फायटरच्या अंगावर घातले! सरळ समोरासमोर धडकवले! याची परिणती काय होणार, हे देवय्यांना पुरेपूर माहीत होते.. तरीही भारतमातेच्या या सुपुत्राने आपल्या हवाईदलासाठी अत्यन्त बहुमूल्य असलेल्या उरलेल्या सात विमानांसाठी आणि त्या पेक्षाही बहुमोल असलेल्या आपल्या वैमानिकांसाठी आपल्या प्राणाची या यज्ञात आहुती देण्याचे ठरविले होते. इतर कोणत्याही प्रकारे ते विमान पाडणे, त्या वेळी शक्य नव्हते.. आणि सरळ आपल्या अंगावर धावून येत असलेल्या या मृत्यूला पाहून त्या पाकी विमानाच्या वैमानिकाने पॅराशूटमधून सरळ खाली उडी मारली! स्क्वाड्रन लीडर देवय्या आपले विमान घेऊन सरळ त्या विमानावर वेगाने आदळले!! त्याही परिस्थितीत त्यांच्या चेहेऱ्यावर विजयाची स्मितरेषा नक्की चमकली असेल, याची मला पूर्ण खात्री आहे..

आपल्या परतलेल्या सातही वैमानिकांना युद्ध समाप्तीनंतर वीर चक्राने सन्मानित करण्यात आले. परंतु स्क्वाड्रन लीडर देवय्या यांचा काहीच ठाव ठिकाणा लागत नव्हता. त्यांना बहुधा अपघात होऊन त्यांचे विमान पाकिस्तानात पडले किंवा पाडले गेले असावे आणि त्यांना युद्धकैदी बनविले गेले असावे, असे भारतातील वायुदलाच्या क्षेत्रात समजले जात होते.

परंतु जवळपास बावीस वर्षांनी एका पुस्तकामुळे देवय्यांचा हा पराक्रम उजेडात आला. ब्रिटिश लेखक जॉन फ्रिकर यांना पाकिस्तानने १९६५च्या युद्धाचा अभ्यास करण्यासाठी बोलाविले, तेव्हा त्यांनी केलेल्या संशोधनात सत्य उलगडले. आपल्यामागून आपला पाठलाग होतोय आणि जर हा संभाव्य हल्ला आपण रोखला नाही तर आपला सर्वांचा विनाश आहे हे ओळखून ते मागे फिरले आणि त्यांनी ते अजस्त्र एफ १०४ स्टार फायटर अंगावर घेतले! याला विमानयुद्धाच्या भाषेत ‘बुल फाईट’ म्हणतात. आणि यात आपल्या चिरकूट विमानाने एफ १०४ पाडले.. हे प्रचंड आश्चर्य!! हा आश्चर्याचा धक्का हे विमान बनविणाऱ्या त्या लॉकहिड मार्टिन कंपनीलाही बसला. त्यांनी या घटनेचा समग्र अभ्यास केला आणि आपल्या विमानात नंतर सुधारणा केल्या! 

स्क्वाड्रन लीडर देवय्या यांचा हा भीमपराक्रम समजायला आपल्याला बावीस वर्षे लागली. मात्र आपल्या सरकारने त्या नंतर त्यांना तेवीस वर्षानंतर ‘मरणोत्तर महावीर चक्र’ देऊन त्यांचा उचित सन्मान केला. महावीर चक्र हा युद्ध काळातील परमवीर चक्राच्या खालोखालचा सन्मान आहे!! देशाच्या इतिहासात मरणोत्तर महावीर चक्र प्राप्त करणारे एकमेव नाव आहे – – 

– – स्क्वाड्रन लीडर देवय्या!! 

ही आहे कहाणी स्क्वाड्रन लीडर देवय्या या शूर सैनिकाची! भारतमातेच्या या थोर सुपुत्राची.

आज ही कहाणी ज्ञात होण्याचे कारण म्हणजे श्री. अक्षयकुमार यांचा आजच पाहिलेला ‘स्काय फोर्स’ हा अप्रतिम चित्रपट.. संपूर्ण चित्रपटभर आपला ऊर अभिमानाने भरून येतो. तर कधी देवय्याजी आणि त्यांच्या सोबत्यांच्या कहाणीने डोळ्यांतून अखंड अश्रू वाहतात. त्या वेळच्या सैन्यदलांच्या अवस्थेने मन विषण्ण होते. आपल्या सरकारच्या बेफिकीरीमुळे आपल्या सैनिकांच्या निष्कारण होणाऱ्या मृत्यूंमुळे मन हळहळते..

तर मंडळी, एकदा चित्रपटगृहात जाऊन हा देशप्रेमाचा.. स्क्वाड्रन लीडर देवय्या या शूर सैनिकाची, भारतमातेच्या या थोर सुपुत्राची कहाणी सांगणारा हा चित्रपट जरूर पहा.. !! 

लेखक : श्री सुनील कुळकर्णी

तळे, पुणे

लेखक : श्री विनीत वर्तक ( माहिती स्त्रोत :- गुगल, नासा )

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “बायको वाल्या कोळ्याची…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “बायको वाल्या कोळ्याची…” – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

बायको कशी असावी ?

बायको असावी तर, वाल्या कोळयाच्या बायकोसारखी…

वाचायला जर विचित्र वाटतंय ना ?पणआज तिचीच गरज आहे.

 रामायण न वाचलेला किंवा टीव्हीवर रामायण न पाहिलेला, निदान रामायण या ग्रंथाचे नाव माहिती नसलेला माणूस, या भारतात तरी अपवादानेच असावा. रामायण, म्हटले की, आम्हां भारतीयांचा ऊर केवढा भरून येतो.

रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात, पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात… !

 

 ‘पुत्र असावा तर, प्रभुरामासारखा’!

 ‘पती असावा तर, मर्यादापुरूषोत्तम श्रीरामासारखा !’,

भाऊ असावा तर, लक्ष्मणासारखा !’,

 ‘पत्नी असावी तर, सीतेसारखी !’

 ‘भक्ति व शक्ति असावी तर, ती हनुमंतासारखी!’

 

सहजच माझ्या मनात एका प्रश्नाने घर केले, ‘बायको कशी असावी?’

 

 मी तो प्रश्न आजपर्यंत बऱ्याच जणांना विचारला, खूप साऱ्या जणांनी त्याचे उत्तर त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांचे दिले. अगदी रामायण महाभारतात असलेल्या आदर्श स्त्रिया ते अगदी आताच्या आघाडीवर असलेल्या अभिनेत्रीचे! खरं तर या सर्व दाखल्यापूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला हवा.

तो म्हणजे,

‘बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी !’

कारण तीच खरी रामायणकर्त्याची ‘कर्ती ‘ आहे !हे दुर्लक्षित सत्य कायमच दुर्लक्षितच राहिले आहे.

 

रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषीच्या जडणघडणीसंबधी, अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो.

 

वाल्या कोळी वाटसरूंना जंगलात

अडवून, प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून, त्यांची लूट करुन चरितार्थ चालवायचा.

एकदा नारदमुनींनाच वाल्याने अडवले. तेव्हा नारदमुनींनी त्याचे तिथल्या तिथे बौद्धिक घेतले!

 

“अरे मूर्खा हे पापकर्म कशासाठी करतोस ?”असे विचारल्यावर, “माझ्या बायको-पोरांसाठी!”

 असं सांगितल्यावर, नारदमुनी त्याला म्हणतात, “जा. तुझ्या बायकोला विचारुन ये, ते तुझ्या पापात सहभागी आहेत काय?”

“तुम्ही इथेच थांबा, मी विचारून येतो, ” असे म्हणत, वाल्या पळतच घरी येतो. दारावर धाडकन् लाथ मारून घरात घुसतो. बायकोमुलं घाबरतात.

वाल्या बायकोला धमकावून विचारतो. “बोल. तू माझ्या पापात सहभागी आहेस की, नाही?”

 

 आता असा विचार करा! शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला, खांद्यावर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रूरकर्मा, दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर, एक अशिक्षित, अडाणी, परावलंबी स्त्री दुसरं काय उत्तर देणार?

 

पण नाही. त्या तडफदार आदिमाया शक्तीने, क्षणाचाही विचार न करता, “नाही, मी तुमच्या पापात सहभागी नाही!”असे सडेतोडपणे सांगितले.

 

नंतर तीच घटना वाल्या कोळ्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी ठरली.

 

गरीबबापड्या बायकोच्या अनपेक्षित तडफदार उत्तराने वाल्या कोळ्याचे डोळे खाडकन् उघडतात.

तो नारदमुनीची क्षमायाचना करतो. नारदमुनी त्याला दीक्षा देतात. तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्या कोळ्याचा वाल्मिकीऋषी होऊन रामायण हे महाकाव्य रचतो.

 

ही सरळसाधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो. पण, एक साधी शंका कुणाच्याही मनात का येत नाही? की,

समजा, वाल्या कोळ्याच्या बायकोने, ‘व्हयं.. आम्ही आहोतच की, तुमच्यासंगं !’ असं सर्वसाधारण, सोईचं उत्तर दिलं असतं तर?

 

नारदाचं काही खरं नव्हतंच.

पण, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन, त्याने रामायण तरी कसे काय रचले असते?

अशी रास्त शंका घेता येऊ शकते !

 

पापाचा पैसा कमावणाऱ्या पती -परमेश्वराला, उंबऱ्यातच अडवून ते पाप घरात घ्यायला, त्या पापात सहभागी व्हायला, आजच्या ‘सुसंस्कृत भारतीय गृहिणी’ नकार देतील तर, बोकाळलेला भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल.. !

 

फक्त त्यांनी वाल्याच्या बायकोचा आदर्श मात्र अंगीकारला पाहिजे.

असे घडल्यास भारत भ्रष्टाचारमुक्त होऊन जागतिक महासत्तेच्या दिशेने निश्चित वाटचाल करेल !

पुन्हा एकदा आपल्या भारत ‘भू’ वर निश्चितच रामराज्य अवतरेल व अनेक वाल्या कोळी वाल्मिकी मुनींमध्ये रूपांतरित झालेले पाहण्याचे भाग्य आपणांस लाभेल… यात शंकाच नाही…!

  ☆

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भूक आणि मी… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ भूक आणि मी… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

दोन अक्षरी शब्द ज्यात सर्व विश्व व विश्वाचे गुपित दडले आहे. विश्व जसे अनादि अनंत आहे तशीच भूक पण अनादी अनंत आहे. किंबहुना जशी विश्वनिर्मिती झाली तशी भूक पण निर्माण झाली. मनुष्य, पशु पक्षी चर अचर ह्या जीव वैविध्यपूर्ण सृष्टीत भूक ही अशी गोष्ट आहे की त्यासाठीच सर्व जग राहाटी चालू होती, आहे, आणि राहील हे त्रिकालाबाधित सत्य आहे. जो जो प्राणी जन्माला आला तो तो जन्मजात भूक घेऊन आला. भूक आहे म्हणूनच सर्व काही आहे भुकेसाठीचा संघर्ष अबाधित चालू आहे.

“काय आहे ही भूक”. भूक ही अनेक प्रकारची आहेच, सरळधोटपणे जीवन जगताना जी ऊर्जा हवी ती शरीराला पुरवणारे अन्नघटक, पोटात घेऊन त्याचे रूपांतर शरीर अवयवात, शरीरवाढीसाठी करणे म्हणजेच शरीर पोषण करणे. आम्ही म्हणतो भूक पोटात लागते पण मित्रांनो भूक ही सर्व शरीररसरक्तादि अवयवांची भूक ही पोटातील अवयव, ज्याला आपण अन्नाशय किंवा आमाशय पुरवत असते.

सर्व प्राणीमात्रादी अन्नप्रकार हे वेगवेगळ्या पद्धतीने असले तरी सगळ्यांचं काम एकच भूक शमवणे व आपले अस्तित्व कायम राखणे, जीवित राहणे. जीवन जगण्याचा केलेला आटापिटा हा भुकेसाठीच असतो.

॥ अन्नपूर्णा ॥ 

।। अन्नपूर्णे सदा पूर्णे 

शंकर प्राण वल्लभे

ज्ञान वैराग्य सिद्धर्थम 

भिक्षां देहीच पार्वती ।।

वरील श्लोकात शंकराचार्य काय म्हणतात बघा… अन्नपूर्णा म्हणजेच साक्षात पार्वती. चक्क महादेवसुध्दा पार्वतीकडे भिक्षा मागतात. कुठल्या प्रकारची तर ज्ञान मिळण्यासाठी व वैराग्य प्राप्तीसाठी भिक्षा मागतात. भिक्षा म्हणजे भीक मागणे.

भीक कशासाठी तर पोट भरण्यासाठी नव्हे तर ज्ञान” व ज्ञानेश्वर” मिळवण्यासाठी. याचाच अर्थ मित्रानो भूक म्हणजेच मोह आहे, हा मोह साक्षात पार्वती आहे, तिच्याकडे. शरीरवाढीसाठीची भिक्षा भूक शमविण्यासाठी मागितली आहे.

किती प्रकारची भूक आहे.

शरीरासाठी आवश्यक अन्न!

14 विद्येसाठीची भूक !

64 कलेची भूक ही ! ज्ञानप्राप्तीसाठीची आहे

वैराग्य भूक ही सर्व आयुष्यातील टप्पे पार झाल्यावरची आहे.

भूक ही कलेसाठी,

भूक शरीर शय्यासुखासाठी’:

भूक शरीर रक्षणासाठी,

भूक ही ज्ञान, मिळविण्यासाठी

शेवटी भूक वैराग्य ! प्राप्तीसाठी 

म्हणजेच चारीही आश्रम मिळण्यासाठी आहे.

भूक मारणे म्हणजे उपवास. उपवास म्हणजेच अग्नी प्रदीप्त… अग्नी प्रदीप्त म्हणजेच सत्वगुण.. सत्वगुण म्हणजेच प्रकाश… प्रकाश म्हणजेच ज्ञान प्राप्ती…

बघा मित्रांनो आपण एवढया सगळ्या गोष्टी कुणाकडे मागतो आहोत तर अन्नपूर्णा म्हणजेच पार्वती म्हणजेच प्रकृती म्हणजेच स्त्री कडे. ह्या एवढया गोष्टी स्त्री म्हणजेच मोहाकडे आपण मागतो याचाच अर्थ भोगाकडून वैराग्याकडे !

मग मित्रांनो हाच निसर्गदत्त सिद्धांत आहे. हाच सिध्दांत ओशो रजनीश यांनी वेगळ्या पद्धतीने सांगितला. संभोगातून समाधीकडे…

पण पण पण

मित्रांनो असंही आहे की जे जन्मतः वैरागी आहेत ते कसे तर ते अवधुतच असतात. त्यांचा ज्ञान परिसीमा ही सत्वगुण प्रकाशितच असते, त्यांना भूक तहान इतर गोष्टीची आवश्यकता नसतेच. ते अवलिया असतात. सामान्य जनांनाच कैक प्रकारची भूक असते किंबहूना भूक आहे म्हणूनच जगातील इतर व्यवहार चालत असतात. ! लौकिक व अलौकिक भूक हेच खरे दोन प्रकार म्हणता येतील. सांख्य ह्या दर्शनशास्त्र प्रकारात काही सिध्दांत मांडले ते अभ्यासनीय आहेत.

भूक अनेक प्रकारची आहे हे खरंच, सर्व प्रकारची भूक ही जीवनात असणे यालाच तर आयुष्य म्हणतात, ज्ञानाचा सम्यक उपयोग करून भूक भागवणे हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.

कोणती भूक ज्यास्त हाताळावी हे ज्यांनी त्यांनीच ठरवावे.

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आठवणींचा पट…” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आठवणींचा पट…” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

नवीन वर्षाचा पहिला महिना…

एक वर्ष आणखी सरलं…

जन्मल्यापासूनचा आयुष्य पट कधी कधी आपोआप समोर ठाकतो.

मनात असो का नसो…. ! 

आयुष्यात केलेल्या भल्या बुऱ्या गोष्टी, नाठाळपणा, अवखळपणा, अजाणतेपणे केलेल्या अनेक चुका आठवतात….

कधी हसू येतं… कधी रडायला होतं… ! 

सारं काही पुस्तकात मांडलंय…

पण पुस्तकाने तरी माझ्या किती गोष्टी झेलायच्या आणि सहन करायच्या ? 

मला आठवतं, मी लहान होतो….

अंगात भरपूर “कळा” होत्या, पण एकही “कला” नाही… ! 

शाळेत गॅदरिंग असायचं…

माझ्या शाळेतली मुलं मुली याप्रसंगी विविध गुणांचे प्रदर्शन करायची…

यावेळी गॅदरिंग चा फायदा घेऊन मी सुद्धा “गुन” उधळायचो… ! 

गॅदरिंग च्या शेवटच्या दिवशी, बक्षीस समारंभ असायचा….. स्टेजवर खुर्च्या लावण्याची तयारी सुरू असायची… त्यात प्रमुख वक्ते, कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांच्या खुर्च्या असायच्या.

जमिनीवर उकिडवे बसावे….

तसा मी चप्पल घालून या खुर्च्यांवर बसायचो… आणि काम करणाऱ्या बिचाऱ्या माझ्याच वयाच्या मुलांच्या चुका काढत राहायचो.

एकदा मुख्याध्यापकांनी हे पाहिलं, काही न बोलता त्यांनी हातातल्या पट्टीने मला फोडून काढलं.

तरीही, स्स हा…. स्स… म्हणत मी सरांना विचारलं होतं, सर नुस्ता खुर्चीत बसलो होतो, इतकं का मारताय ? 

‘नालायका, तुला माहित आहे का ? या खुर्च्या कोणाच्या आहेत ?’ 

‘हा सर, आपल्या शाळेच्या आहेत, म्हणून तर बसलो ना… ‘

‘कळली तुझी अक्कल बावळटा, आपले आजचे प्रमुख वक्ते, कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आणि आपल्या महाराष्ट्राचे वैभव जे आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत…

या खुर्च्या त्यांच्यासाठी मांडल्या आहेत… ‘

‘हा मं… ते यायच्या आधी मी बसलो तं काय झालं मं… ‘ मी तक्रारीच्या सुरात, पायाच्या अंगठ्याने जमीन टोकरत बोललो….

सोबत माझं स्स… हा… चालूच होतं.

त्यांना माझा धीटपणा आवडला ? 

की माझी निरागसता ?

माहित नाही….

परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचा राग निवळला…

ते मला म्हणाले बाळा, ‘प्रत्येक खुर्ची ही खुर्चीच असते… पण त्यावर कोण बसतो; यावर त्या खुर्चीची किंमत ठरते. ‘

‘खुडचीची किंमत काय आसंल सर… ?’ माझा भाबडा मध्यमवर्गीय प्रश्न.

आभाळाकडे पहात ते म्हणाले, ‘आपलं आयुष्य जो दुसऱ्यासाठी खर्ची घालतो, त्या प्रत्येकाला अशा खुर्च्या सन्मानाने मिळतात बाळा… याची किंमत पैशात नाही रे… ‘

‘मला पण पायजे अशी खुडची’ जेवताना मीठ मागावं, तितक्या सहजतेने सरांना मी बोलून गेलो.

‘तुझे एकूण गुण पाहता, हि खुर्ची तुझ्या नशिबात नाही… या खुर्चीत तुला बसायचं असेल तर अंगात काहीतरी पात्रता निर्माण कर… लायक हो… नालायका… !’

हे शब्द आहेत साताऱ्यामधल्या माझ्या शाळेचे, माझ्या वेळेचे मुख्याध्यापक सर यांचे… !

माझ्या याच शाळेने आणि माजी विद्यार्थ्यांनी मला पाच वर्षांपूर्वी जीवन गौरव पुरस्कार दिला….

शाळा तीच… प्रांगण तेच… स्टेज तेच…

मी बदललो होतो… ! 

मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले होते.

मी अट घातली होती, कार्यक्रमाला आदरणीय मुख्याध्यापक सरच हवेत…

स्टेजवर मी सन्माननीय म्हणून लिहिलेल्या खुर्चीवर आखडून बसलो होतो… पण यावेळी पाय खुर्चीवर नाही, जमिनीवर होते…

संयोजकांना मी विनंती केली होती, जे काही मला द्याल ते मुख्याध्यापक सरांच्या हातूनच मला द्यावं…. ! 

सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं.

माझ्या विनंतीनुसार, मुख्याध्यापक सरांनी मला ते मानपत्र दिलं…

सरांच्या पायावर डोकं ठेवून मी त्यांना म्हणालो, ‘सर मला ओळखलं का ?’

त्यांनी चष्मा वर खाली करून मला ओळखण्याचा प्रयत्न केला… पण नाही… ! 

मी सर्वसामान्य माणूस….

किती विद्यार्थी त्यांच्या हातून गेले असतील… ? 

ते मला इतक्या वर्षानंतर कसं ओळखतील ? आणि मी तरी असे काय दिवे लावले होते त्यांनी मला ओळखायला ? 

देवाला तरी सगळ्याच लोकांचे चेहरे कुठे आठवत असतात… ???

मग मी त्यांना शाळेतल्या दोन-चार आठवणी सांगितल्या…

आत्ता सरांना आठवले….

‘अरे गधड्या… नालायका… मूर्खा… बावळटा… तुच आहेस होय तो DOCTOR FOR BEGGARS?’

मी खाली मान घालून हो म्हणालो… ! 

यावर अत्यानंदाने त्यांनी मला मिठी मारली… ‘

यानंतर सरांचे वृद्ध डोळे चकमक चकमक…. चकाकत होते… ! 

कष्टाने वाढवलेल्या, जगवलेल्या झाडाला पहिलं फळ येतं, तेव्हा शेतकरी ज्या कौतुकाने त्या झाडाकडे बघेल… त्याच नजरेने सर माझ्याकडे बघत होते.

‘मी तुझ्या कामात काय मदत करू ? मी तुला आता काय देऊ ?

ती वृद्ध माऊली, इकडे तिकडे पहात, जुन्या सफारीच्या खिशात भांबावून उगीचच इकडे तिकडे हात घालत बोलली… ‘

जुन्या सफारीची विण उसवली होती…

हे माझ्या नजरेतून सुटलं नाही…

मी खिशात जाणारे त्यांचे दोन्ही हात पकडून बोललो… ‘सर, काही द्यायचं असेल तर हातावर एक छडी द्या… माझी तितकीच पात्रता आणि लायकी आहे सर…. ‘ 

यावर लहान मुलासारखे ओठ मुडपून त्यांनी हसण्याचा प्रयत्न केला…

तो हसण्याचा प्रयत्न होता की रडू आवरण्याचा… ? मला कळलं नाही… ! 

ते म्हणाले… ‘गधड्या…. नालायका… मला वाटलं आता तरी तू सुधारला असशील…

पण तू अजून सुधारला नाहीस रे…. ‘ असं म्हणत माझ्या नावाच्या खुर्चीवर सरांनी मला हाताला धरून बसवलं…. ! 

आता ओठ मुडपून, हसणं आवरण्याची आणि रडणं सावरण्याची माझी कसरत सुरू झाली…

जाताना कानात म्हणाले, ‘आता या खुर्चीवर मांडी घालून किंवा पाय वर ठेवून बसलास तरी चालेल, मी तुला ओरडणार नाही… हि खुर्ची तु कमावली आहेस बाळा… ‘ 

यानंतर ते स्टेजच्या मागे निघून गेले….

यानंतर माझ्या कौतुकाची भाषणांवर भाषणे झाली….

मला यातलं काहीही ऐकू आलं नाही….

मला फक्त ऐकू आले…. ते माझ्या मास्तरचे हुंदके… !!!

———+++++++++———–++++++++

साताऱ्यात त्यावेळी खूप साहित्य संमेलनं व्हायची…

आम्ही दोन चार मित्र या संमेलनाला जायचो…

व्हीआयपी लोकांसाठी तिथे एक कॉर्नर केला होता… त्यावेळी एसी नव्हते, पण कुलर होते…

वर्गात उकडतंय, म्हणून या कुलरचं वारं घेण्यासाठी आम्ही येत होतो, अन्यथा साहित्यातलं आम्हाला काय ढेकळं कळतंय… ? 

निर्लज्जपणे आम्ही खुर्च्यांवर पाय ठेवून कुलरचं वारं घेत बसायचो…

संयोजक मंडळी येऊन मग आम्हाला कुत्रं हाकलल्यागत हाकलून द्यायचे…

——++++++—+++++——+++–+++

एखाद्या कार्यक्रमात पहिल्या तीन रांगा व्हीआयपी साठी असतात… आम्ही पोरं पहिल्या रांगेमध्ये बसायचो… इथूनही संयोजक आम्हाला कानाला धरून उठवायचे… ! 

मागून शब्द कानावर पडायचे… लायकी आहे का तुमची पहिल्या रांगेत बसायची ? 

या सर्व जुन्या बाबी मी अजून विसरलो नाही.

आज किती वेळा मी प्रमुख पाहुणा झालो असेन, अध्यक्ष झालो असेन, वक्ता झालो असेन… पण त्या खुर्चीत बसलो की अजूनही मला भीती वाटते…

मुख्याध्यापक सर येतील पट्टी घेऊन….

आज कित्येक मोठ्या मोठ्या साहित्यिकांमध्ये, अनेक मोठ्या मोठ्या लोकांमध्ये उठबस होते… व्हीआयपी लाउंज मध्ये बसवलं जातं… पण आजही भीती वाटते आपल्याला इथून कोणी उठ म्हटलं तर… ? 

हाताला धरून आज पहिल्या रांगेमध्ये बसवलं जातं…. तरीही माझ्या नजरेत धाकधूक असते… आपल्याला इथून कोणी उठवलं तर… ?

पूर्वी एखाद्या कार्यक्रमांमध्ये माईक चालू असायचा….

कोणाचं लक्ष नाही असं पाहून, मी माईक हातात घ्यायचो… उं… ऐं… खर्र… खिस्स…. फीस्स… असे आवाज काढून बघायचो… माइक वर आपला आवाज कसा येतो ते बघायचो… मीच गालातल्या गालात हसायचो.

तेवढ्यात पाठीमागून शाळेतल्या शिक्षिका यायच्या, आणि पट्टीचे फटके मारून स्टेजवरून खाली उतरवायच्या.

– क्रमशः भाग पहिला

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘श्रीमत् दासबोध – रामबाण औषधांचे परिपूर्ण दालन’ – लेखक : श्री वीरेंद्र ताटके ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

श्रीमत् दासबोध – रामबाण औषधांचे परिपूर्ण दालन’ – लेखक : श्री वीरेंद्र ताटके ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

औषधाच्या दुकानात हजारो औषधे असतात. त्यापैकी प्रत्येक औषध गुणकारी असतं पण प्रत्येक औषध प्रत्येकाला उपयोगी असेलच असं नाही. आपल्याला कोणता त्रास होता आहे त्याप्रमाणे आपल्याला औषध घ्यावे लागते.

समर्थ रामदास स्वामी रचित श्रीमत दासबोध हे असंच एक ‘रामबाण’ औषधाचे दालन आहे. आपल्याला झालेल्या भवरोगांवर इथे औषधे मिळतात.

या औषधाच्या दालनात औषधांचे वीस विभाग आहेत ( या विभागांना ‘दशक’ म्हटले जाते ) तर प्रत्येक विभागात प्रत्येकी दहा उपविभाग आहेत ( या उपविभागांना ‘समास’ म्हणतात ). यातील प्रत्येक औषध हे अत्यंत गुणकारी आहे. पण आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक औषध लगेचच लागू पडेल असे नाही.

मात्र सध्याच्या काळात सर्व वयोगटात हमखास आढळणाऱ्या काही आजारांवर पुढील रामबाण औषधे या दालनात मिळतात. इच्छुकांनी त्याचा उपयोग करून घ्यावा.

१ ) आजाराचे लक्षण – छोट्याछोट्या गोष्टींचा गर्व होणे

औषध – मूर्ख लक्षण 

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक दुसरा समास पहिला 

२ ) आजाराचे लक्षण – तुटपुंज्या ज्ञानाचा आणि हुशारीचा अभिमान वाटणे 

औषध – पढतमूर्ख लक्षण 

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक दुसरा समास क्रमांक दहा

३ ) आजाराचे लक्षण – आपल्या कुटुंबाचा गर्व वाटणे 

औषध – स्वगुणपरीक्षा 

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक तिसरा समास क्र. दोन ते पाच 

४ ) आजाराचे लक्षण – स्वतःला अमर समजणे 

औषध – मृत्यूनिरूपण 

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक तिसरा समास क्रमांक नऊ 

५ ) आजाराचे लक्षण – स्वतःविषयी अज्ञान

औषध – बद्धलक्षण 

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक पाचवा समास क्रमांक सात.

६ )आजाराचे लक्षण – अत्यंत स्वार्थीपणा 

औषध – निस्पृहलक्षण

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक करावा समास क्रमांक दहा 

७ ) आजाराचे लक्षण – आयुष्यात प्रगती कशी करावी हे न कळणे 

औषध – सर्वज्ञसंग निरूपण

औषध मिळण्याचे ठिकाण – दशकअठरावा समास दुसरा 

८ ) आजाराचे लक्षण – करंटेपणा 

औषध – करंटपरीक्षा निरूपण

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक अठरावा समास क्रमांक पाच

९ ) आजाराचे लक्षण – आधुनिक जगात कसे वागावे न कळणे

औषध – दशक नववा

औषध मिळण्याचे ठिकाण – संपूर्ण दशक नववा ( समास क्रमांक एक ते दहा ) 

१० ) ग्रंथाची संक्षिप्त माहिती मिळण्याचे ठिकाण : 

दशक पहिला समास पहिला 

हे सर्व करत असताना ‘ तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे ‘ ही प्रार्थना समर्थांना करावीच, जेणेकरून “मला दासबोध कळला “ असा गर्व होऊन त्यातील औषधांचा ‘ साईड इफेक्ट’ होत नाही.

लेखक : श्री वीरेंद्र ताटके

पुणे फोन ९२२५५११६७४

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ धुंद वाऱ्या… ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

डॉ. निशिकांत श्रोत्री

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ धुंद वाऱ्या… ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

स्मृतीरंजन संगीत रचनेचे

साधारणपणे १९८६ च्या दरम्यानची घटना असावी. दूरदर्शनवर शब्दांच्या पलीकडले या कार्यक्रमात विनय देवरुखकर यांनी संगीतबद्ध केलेल्या काही गीतांचा कार्यक्रम होता. पुढे काही दिवसांनी त्यातील एका गीताच्या बाबतीत काही समस्या निर्माण झाल्यामुळे ते गीत विनय वापरू शकत नव्हता; तथापि त्याला त्या गीताला दिलेली संगीत रचना अतिशय आवडली होती. म्हणून त्याने मला त्याच चालीवर एक नवीन गीत लिहून द्यायचे आवाहन केले. त्या चालीतून प्रेमवेड्या प्रेयसीची आर्तता जाणवत होती. नकळतच क्षणार्धात माझ्याकडून पुढील ‘धुंद वाऱ्या’ हे गीत प्रसवले गेले.

 ☆ धुंद वाऱ्या ☆

धुंद वाऱ्या थांब येथे दूर तू जाऊ नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||ध्रु||

गुपित जपले मन्मनी जे ते उगा पसरू नको

लाजरीचा रंग गाली तू नभ देऊ नको

दाटले माझ्या मनी साऱ्या जगा सांगू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||१||

 *

भाव माझे तूच नेता मी सख्या सांगू कशी

शीळ होता बोल माझे मी मुकी राहू कशी

भाववेडी स्वप्नगंधी छेड तू काढू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||२||

 *

अंतरी दाटून माझ्या तू तुला विसरून जा

विरून येथे तूच माझे स्वप्नही होऊन जा

आण माझ्या प्रीतिची रे अंतरी मोडू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||३||

हे गीत माझ्या मनाची पिल्ले या काव्यसंग्रहात समाविष्ट होते. अत्यंत गुणी गायक आणि संगीतकार चंद्रशेखर गाडगीळ याच्या वाचण्यात हे गीत आले. त्याला ते इतके आवडले की त्याने ते सूरबद्ध केले आणि मला घरी बोलावून ते ऐकविले. ती स्वररचना माझ्या अगदी हृदयात जाऊन पोहोचली.

पुढे आकाशवाणीवर हेच गीत जानेवारी महिन्याच्या स्वरचित्रे साठी निवडले गेले आणि त्याला स्वरबद्ध करण्यासाठी विलास आडकर यांच्याकडे ते सोपविले गेले. अतिशय सुरेल आणि भावपूर्ण अशा चालीत त्यांनी ते माधुरी सुतवणे यांच्याकडून गाऊन घेतले. खूप गाजले हे गीत.

तरीही या गीताची चंद्रशेखर गाडगीळ याने दिलेली चाल माझ्या मनातून जात नव्हती. एवढी उत्कृष्ट स्वररचना अशीच वाया जावी हे मनाला पटत नव्हते. अशा घालमेलीतच पुलाखालून बरेच पाणी गेले. अखेरीस, साधारण पंधरा वर्षांनंतर चंद्रशेखर गाडगीळ याच्या स्वररचनेवर मी आणखी एक गीत लिहायचे ठरवले.

गीत लिहून झाले आणि आकाशवाणीवर माझ्या काही गीतांना स्वरबद्ध केल्यानंतर माझ्या खूप जवळ आलेले आकाशवाणीचे आणि एकेकाळी ‘प्रभात’ फिल्म कंपनीत असलेले ज्येष्ठ संगीतकार सुरेश देवळे घरी आले. आल्या आल्या त्यांनी विचारले, ‘डॉक्टर, एखादे नवीन गीत?’

नुकतीच प्रसविलेले गीत मी त्यांना वाचून दाखविले:

☆ चांदण्याच्या राजसा रे ☆

 *

चांदण्याच्या राजसा रे वाकुल्या दावू नको

प्रीत सजता आज माझी दृष्ट तू लावू नको ||ध्रु||

मन्मथाने धुंद केले कुच मनी मी बावरी

स्पर्श ओठांनाच होता हरवले मी अंतरी

भान जाता हरपुनीया जग तू आणू नको

प्रीत सजता आज माझी दृष्ट तू लावू नको ||१||

रोम रोमा जागवी तो स्पर्श मी विसरू कशी

चिंब झालेल्या मनाची प्रीत मी लपवू कशी

प्रेमवेडी आर्त होता संयमा शिकवू नको

प्रीत सजता आज माझी दृष्ट तू लावू नको ||२||

रात्र सजवीता अनंगे लाजुनी राहू कशी

धुंद झाला देह माझा अंतरी वेडीपिशी

आज माझ्या राजसाची पापणी लववू नको

प्रीत सजता आज माझी दृष्ट तू लावू नको ||३||

‘छान आहे डॉक्टर, द्या मला; मी याला चाल देणार आहे, ’ त्यांनी माझ्या हातातून गीताचा कागद ओढूनच घेतला.

मी त्यांना ते गीत रचण्यामागील माझी भूमिका सांगितली, ‘चंद्रशेखरच्या चालीसाठी रचले आहे मी हे गीत. ’

‘त्याकरता तुम्ही आणखी एक गीत बनवा हो, ’ देवळे काही मागे हटायला तयार नव्हते.

अखेरीस चाल देण्यासाठी ते गीत ते घेऊन गेलेच. पुढे त्यांनी ते गीत आकाशवाणीवर गाऊन देखील घेतले.

मला मात्र स्वस्थ वाटेना. चंद्रशेखरची चाल काही मला स्वस्थ बसू देईना. दुसऱ्याच दिवशी मी पुन्हा हातात लेखणी घेतली नी त्या स्वररचनेच्या मीटरमध्ये नव्याने गीत रचले:

रात्र तू विझवू नको

 *

पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रा क्षितिजावरी उतरू नको

अंतरी बेभान मी रे रात्र तू विझवू नको ||ध्रु||

चांदण्याने आज तुझिया रंग मी भरले इथे

उर्मीच्या मम कुंचल्याने प्रेम हे साकारले

धुंदिचा बेरंग माझ्या करुनिया जाऊ नको

अंतरी बेभान मी रे रात्र तू विझवू नको ||१||

 *

आर्त झालेल्या मनातुन सूर हे धुंदावले

छेदुनीया मुग्धतेला अंबरी झेपावले

प्रेम भरलेल्या सुरांना बेसुरी गाऊ नको

अंतरी बेभान मी रे रात्र तू विझवू नको ||२||

फुलविली मी मुग्ध कलिका रात्र सजवीली नभी

भान हरुनी रातराणी गंध दरवळते जगी

फुलून येता मन्मनी तिज निर्दळी बनवू नको

अंतरी बेभान मी रे रात्र तू विझवू नको ||३||

आणि आता जगदीश कुलकर्णी यांनी या गीतावर उत्कृष्ट स्वरसाज चढविला आहे.

मी आता मात्र विचार करतोय, माझ्या ज्येष्ठ स्नेही आणि मार्गदर्शिका कै. संजीवनी मराठे यांच्या ‘नकळता निघून जा’ या गीताला जर चार संगीत दिग्दर्शकांनी स्वरसाज चढवला आहे तर माझ्या गीतांना देखील तसे झाले तर बिघडले कोठे? उलट हा तर माझा मानच आहे.

तरीही मला चंद्रशेखर गाडगीळची स्वररचना वाया नाही जाऊ द्यायची. बघू कोणच्या स्वररचनेचा कोणत्या गीतासाठी कसा योग येतो आहे ते!

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नदी… ☆ सुश्री मानसी चिटणीस ☆

सुश्री मानसी विजय चिटणीस

? विविधा ?

☆ “नदी…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस

समुद्र तहान थोडीच भागवतो? त्यासाठी हवी असते नदी.. मग ती कोणतीही असो.. प्रत्येक तहानेचं उत्तर नदीकडे असतं.. जोवर ती आटत नाही किंवा संपून जात नाही.. आपल्या प्रवाहात येणार्‍या प्रत्येकाला भिजवत, त्याची तहान भागवत नदी वाहत राहते. स्वत:चे तट, चौकटीत सांभाळते. आपल्यातील अमृताचा झरा ती रिकामा करते वर्षानुवर्ष, येणार्‍या पुढच्या प्रत्येक पिढीसाठी. हे नदीचे दायीत्व आहे की तिच्याकडे येणार्‍या प्रत्येकाला तिथे तृप्त करावे, सांभाळावे, प्रसंगी पोटात घ्यावे. पण नदीही आटते कधीकधी. पोटातले सारे विकार, भावना, साल यांचा गाळ साठत जातो. क्षणांचे थरावर थर साचत जातात आणि वाहती नदी साचायला लागते जागोजागी. तिची निर्मळता, स्वच्छता, शुचिता संपायला लागते आणि मग नदीचे डबके होते. या भावना तरी कशा असतात? सगळीकडून सारख्या वाहणार्‍या. असलाच तर थोडाफार किंचितसा इकडचा, तिकडचा फरक असेल कदाचित. या भावना काळसापेक्ष असतात बर्‍याचदा. काळ बदलेल तशा बदलतात. नदीही प्रवाह बदलतेच की पण तिचा प्रवाह बदलण्याची क्रिया खूप संथ होते. एखाद्या संसारात मुरत गेलेली बाई जशी कालांतराने शांत होते तशीच नदी खोल खोल होत जाते नाहीतर मग किनार्‍यांच्या चौकटी मोडते.

नदीलाही हवाच की पाण्याचा पुरवठा सतत प्रवाही राहण्यासाठी. नदी आटायला लागली की आपण पात्र खोल करतो. नदीचे झरे मोकळे करतो नदीला प्रवाहित करण्यासाठी.. आपल्या मनाचंही असचं असतं थोडफार. तुझं आहे तुजपाशी असं असताना आपण शोधत राहतो बाह्यजगात.. मग वाटत राहातं.. आधी होतं तेच चांगलं होतं

‘वक़्त बीतने के बाद अक्सर ये अहसास होता है…

कि, जो छूट गया वो लम्हा ज्यादा बेहतर था…. ‘

दुःख माणसाला जगण्याची सवौत्तम अनुभूती देतं, फक्त ते.. प्रवाहित करता यायला हवं. मला नेहमी वाटत बायका या नदीसारख्या असतात. कधी अल्लड झर्‍यासारख्या गात सुटलेल्या, कधी भावनांच्या दरीत स्वत:ला झोकून देणार्‍या धबधब्यासारख्या, साचलेल्या डोहासारख्या गहन आणि गूढ. कधी तारुण्याच्या अवखळ काठावर ; पाणी भरायला आलेल्या तरुणीसारख्या किंवा मग वेगाबौंड होत रस्त्यातले सारे खाच-खळगे पार करणार्‍या, वाटेतल्या दगड-धोंड्यांना स्वत:च्या प्रवाहासोबत वाहून नेणार्‍या, प्रसंगी रौद्ररूप धारण करून आपलं अस्तित्व दाखवणार्‍या, आसपासच्या परिसराला तृप्त करून… त्या हिरवाईला स्वतःच्या अंगावर दागिन्यांसारखे मिरवणार्‍या‍ या परिपक्व बाया कायम नदीसारख्याचं दिसतात मला..

अनेक कथा-कहाण्या स्वत:सोबत जगताना नदी, आपलेच काठ रुंदावत जाते. स्वत:च्या विचारांच्या कक्षा वाढाव्यात तशी आपली सारी निर्मळता काठांनी जपत राहते. एखाद्या युगाची पापनाशिनी होवून उद्धारत राहते पिढ्या न पिढ्या. नदी सामावून घेते तिच्याजवळ येणार्‍या प्रत्येकाला जशी आई आपले तान्हुले कुशीत घेते. किंवा मिठीत घेते तिच्यावर प्रेम करणार्‍याला प्रत्येकाला, तिच्या आसर्‍याला आलेल्या प्रत्येकाला. बाया पण तशाच तर असतात. जरी भावनांनी कोरड्या झाल्या तरी मधूनच त्यांना मायेचे उमाळे फुटतात आणि त्या वाहू लागतात अविरत. अशावेळी जाणवतो तो त्यांच्यातला मायेचा अथांग समुद्र. प्रत्येक बाई आपल्यात समुद्राचा उणापुरा एक तरी अंश जपतेच. बायका आणि नदी सारख्याच असतात सर्वार्थाने. आपल्यातले प्रवाहीपण जपताना दोघीही.. जिवंत रहात, खळाळत जगताना आपल्यातला समुद्र काही मरू देत नाहीत.

अशावेळी जिथे नदी समुद्राला जावून मिळते तिथे तिचा, तिच्या वाहण्याचा अंत होतो हे माहिती असूनही ती कोणत्या ओढीने समुद्राकडे धावते ? हे न उमजणारे कोडे आहे. का आहे हे नदीचे संपूर्ण समर्पण? नव्या जन्माच्या ओढीने की संपून जाणार्‍या प्रवाहाला जपण्यासाठी? काहीही असो ती जीवन संपवते हे निश्चित. हेच तर… आहेही आणि नाहीही… मनात रुजलेला क्षण सांभाळायचा, वाढवायचा, फुलवायचा आणि तो सरला की कृष्णार्पणमस्तू म्हणून पुढच्या क्षणाचं स्वागत करायचं. इतकं सोपं असतं जगणं? नदी होणं? आणि बाई ही होणं? 

 

© सुश्री मानसी विजय चिटणीस

केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ महाकुंभ : भक्त, सेवक आणि साधना… लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

💥 मनमंजुषेतून 💥

☆ महाकुंभ : भक्त, सेवक आणि साधना… लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

प्रयागराज येथील महाकुंभ सोहळ्यात तीन दिवस घालवल्यानंतर, तिथल्या त्रिवेणी संगमावर लोटलेला मानवतेचा महासागर पाहिल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे महाकुंभ प्रामुख्याने फक्त दोनच प्रकारच्या लोकांचा आहे, भाविकांचा आणि सेवकांचा! 

खरे भाविक, जे कुणीही न बोलावता श्रद्धेने भरलेले हृदय घेऊन प्रयागराजला येतात मिळेल त्या वाहनाने, प्रसंगी आपली सामानाची गाठोडी डोक्यावर ठेवून मैलोनमैल चालत येतात ते भाविक, जे संगम स्नानासाठी तासचे तास शांतपणे वाट पाहतात, जे गंगाजल भरण्यासाठी आठ दहा मोठे कॅन घेऊन येतात आणि ते भरलेले, जड कॅन मोठ्या कष्टाने वाहून त्यांच्या त्यांच्या गावी नेतात, त्यांच्या स्वतःसाठी नव्हे, तर नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, सुहृदांना देण्यासाठी. जे रात्री झोपायला खोली मिळाली नाही तर शांतपणे पथारी पसरून नदीच्या काठावर वाळवंटात झोपतात, कसल्याच सुविधा नसल्या तरी ते तक्रार करत नाहीत.

पवित्र संगमात स्नान करताना त्यांच्या मिटलेल्या डोळ्यातून आपसूक पाणी वाहते. गंगेच्या थंडगार प्रवाहाच्या कुशीत ते अश्या निःशंकपणे शिरतात जणू त्यांना पूर्ण खात्री असते की त्या क्षणी गंगामाई त्यांना आपल्या निळसर सावळ्या प्रवाहात अशी अलगद सामावून घेईल जशी एक आई आपल्या बाळाला गर्भात सांभाळते. पाण्यात डुबकी घेऊन जेव्हां ते वर येतात तेव्हा त्यांच्या चेहेऱ्यावरची तृप्तीच सांगत असते की त्यांना पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या आत्म्यावर साचलेल्या कर्मरूपी धुळीची पुटे त्या स्नानाने वाहून गेली आहेत. गुडघाभर पाण्यात उभे राहून जेव्हा ते सूर्याला अर्घ्य देतात तेव्हां सोनेरी उन्हाने झळाळून निघालेल्या त्यांच्या चेहेऱ्यावरचे संपूर्ण समर्पण भाव पाहण्यासारखे असतात. कुंभ खऱ्या अर्थाने त्यांचा असतो.

परमार्थ निकेतनच्या साध्वी भगवती सरस्वती यांनी म्हटल्याप्रमाणे, खरे भक्त हे फक्त आस्थेसाठी, भक्तीसाठी येतात. त्यांचे पूर्वजही कधीकाळी असेच आले असतील प्रयागला, इथल्याच मऊ वाळूत उभे राहून त्यांनी असेच सूर्योदय पहिले असतील. इथल्याच थंडगार पाण्यात असेच स्नान करताना त्या लोकांनी ज्या प्राचीन मंत्रांचा उच्चार केला होता, त्याच मंत्रांचे, त्याच भाषेतले उच्चार त्यांचे वंशज आजही करतात. गंगेचा शांत, प्रेमळ प्रवाह मात्र तेव्हाही असाच अविरत वाहात होता, आजही तसाच वाहात आहे. बाहेरच्या जगाला महाकुंभ म्हणजे काय हे माहिती नव्हते तेव्हांही हे सच्चे भाविक संगमस्नानासाठी प्रयागला येत होते आणि भविष्यात जग महाकुंभ विसरले तरीही ते इथे येतच राहतील. कारण हा महाकुंभ त्यांच्या भक्तीचा महाकुंभ आहे.

मानवतेचा महासागर हे कुंभमेळ्याचे वर्णन काही आजचे नाहीये. ह्युएन त्संग (Xuanzang) हा प्रसिद्ध चीनी बौद्ध भिक्षू सातव्या शतकात भारतात आला होता. त्याने Great Tang Records on the Western Regions या प्रवासवृत्तांतात भारतातील अनेक ठिकाणांचे, संस्कृतीचे आणि धार्मिक परंपरांचे वर्णन केले आहे. कनौजचा सम्राट हर्षवर्धन याच्या राज्यकाळात प्रयागराज येथे भरलेल्या कुंभमेळ्याचे वर्णन करताना तो म्हणतो की या मेळ्यात हजारो लोक भारताच्या वेगवेगळ्या भागांतून एकत्र आले होते ज्यात हिंदू साधू तर होतेच, पण जैन मुनि, बौद्ध भिक्षू, विद्वान आणि सामान्य नागरिकही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. मेळ्यात धार्मिक प्रवचने, ग्रंथांचे वाचन, आणि विद्वानांचे वादविवाद (शास्त्रार्थ) चालत असत. लोक येथे मानसिक शांती आणि चित्तशुद्धीसाठी येत असत असे ह्युएन त्संग म्हणतो, जे आजही खरे आहे. वरची आवरणे, पेहनावा जरी बदलला असला तरी कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची आतली भक्ती तीच आहे आणि म्हणूनच महाकुंभ सर्वप्रथम त्यांचाच आहे.

महाकुंभ त्यांचाही आहे, जे इथे काही देण्यासाठी येतात, घेण्यासाठी नाही.

१५, ००० सफाई कर्मचारी, जे दिवसातून चार वेळा नदीकाठ झाडून इथल्या लाखो पाऊलखुणा मिटवून टाकतात, नव्या दिवसाची सुरुवात नव्या पावलांच्या खुणांनी व्हावी म्हणून. १२५, ००० पोलिस, जे प्रयागमध्ये जमलेल्या मानवतेच्या महासागराच्या लाटा अंगावर झेलण्याचे अवघड काम करतात, कधी मार्गदर्शन करतात, कधी संरक्षण देतात, तर कधी शांतता आणि शिस्त राखण्यासाठी ओरडतातही. बचाव पथकातील हजारो स्वयंसेवक, जे नेहमी दक्ष असतात, त्यांच्या कौशल्याची कधीच गरज पडू नये अशी त्यांची आशा असते, पण दुर्दैवाने अशी गरज पडलीच तर ते त्यासाठी सदैव सज्ज असतात. इथल्या ५५० शटल बसचे चालक, जे अखंड फेऱ्या मारून यात्रेकरूंना संगमापर्यंत पोहोचवतात. अनेक मठ, मंदिर, धार्मिक संस्थांचे स्वयंसेवक जे उपाशी लोकांसाठी रात्रंदिवस खपून जेवण बनवतात. थकलेल्या यात्रेकरूंच्या पायांना मालिश करणारे सेवाभावी लोक, धार्मिक संस्थांच्या दवाखान्यांत सेवा देणारे डॉक्टर, पडद्याआड असलेले अदृश्य सरकारी अधिकारी जे अठरा अठरा तास काम करून इथली व्यवस्था सांभाळण्याचे आपले कर्तव्य बजावतात. कुंभ जितका भाविकांचा आहे तितकाच त्यांचाही आहे. सेवकांचा. जे निरपेक्ष भावनेने सेवा देतात त्यांचाही आणि जे कर्तव्य म्हणून सेवा देतात त्यांचाही.

बाकी आपण बहुतेक सारे – कुतूहलापोटी आलेलो असतो. महाकुंभाचा थक्क करणारा आवाका पाहून आपण भारावून जातो. इथली मैलोनमैल पसरलेली तंबूंची नगरे, अशक्यप्राय वाटणाऱ्या ठिकाणी बांधलेली स्वच्छतागृहे, आकाशात घिरट्या घालणारे ड्रोन, नदीकाठी उभारलेली तात्पुरती शहरे, रस्ते, हेलिपॅड वगैरे सुविधा पाहून आपण अचंबित होतो, आपण स्नानही करतो, कदाचित आपल्यापैकी काही जणांना गंगेच्या पाण्याच्या स्पर्शाने भक्तीचा परिसस्पर्शही होतो.

पण मुळात आपण न निखळ श्रद्धावान भक्त असतो, ना निःस्वार्थ सेवा देणारे सेवक.

आपण आहोत घटकाभर थबकून इतिहासाच्या खिडकीतून कुतूहलाने ह्या श्रद्धा आणि भक्तीच्या सोहळ्याकडे डोकावून पाहणारे प्रवासी. आपण उद्या इथून निघून गेल्यावरही महाकुंभ सुरूच राहील, गंगेच्या प्रवाहात छोटा खडा फेकल्यावर उठणारा क्षणिक तरंग आहोत आपण फक्त.

महाकुंभ फक्त एक ‘इव्हेंट’ नाही, तर तो भारताच्या नाडीचा दर बारा वर्षांनी निनादणारा एक ठोका आहे, जो खऱ्या भक्तांना आपसूक ऐकू येतो आणि सेवाभावनेने कार्य करणाऱ्या लोकांना आवाहन करतो.

होय, तुम्ही, मी, आपण बहुतेक जण केवळ पर्यटक आहोत. कुंभ खरा फक्त अश्याच लोकांचा आहे, जे एकतर पूर्ण श्रद्धेने भक्ती करतात किंवा संपूर्ण समर्पण भावाने सेवा देतात!

लेखिका : सुश्री शेफाली वैद्य

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संवेदनाशून्य सजीवांच्या फौजा… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? मनमंजुषेतून ?

☆ संवेदनाशून्य सजीवांच्या फौजा… ☆  श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

२५ जानेवारीची संध्याकाळ. आधीच शनिवार-रविवार आणि त्यात पुन्हा राष्ट्रीय सुट्टी आलेली. आजूबाजूची सगळी शोरुम्स आणि मॉल्स गर्दीनं खचाखच भरुन वाहत होते. कुणाला तरी भेटायला गेलो होतो आणि तिथं आम्हाला बराच वेळ लागला, म्हणून जवळच्या एका मॉलमध्ये आम्ही पोट भरण्यासाठी गेलो. पण तिथल्या कॅफेटेरियाचे दर बघून आमचे डोळेच पांढरे व्हायची वेळ आली. पंधरा-वीस स्टॉल्स होते खरे. पण किंमती अवाढव्य होत्या. ८० रुपयांची पाणीपुरी, २०० रुपयांचं सँडविच, १८० रुपयांपासून पुढे सुरु होणारी चाट हे खिशापेक्षा मनालाच परवडत नव्हतं.

मी त्यांना म्हटलं, “जाऊ द्या. आपण टपरीवर चहा घेऊ. ” 

ते म्हणाले, “जीबीएस कसा भडकला आहे, बघतोयस ना. उघड्यावरचं काही नको रे बाबा. ” आम्हीं पंधरा वीस मिनिटं तिथं होतो आणि शेवटी काहीही न खाता पिता तिथून निघालो. पण त्या मॉल मध्ये जे दृश्य होतं, ते बघून मला धक्का बसला.

तरुण मुलामुलींची तर गर्दी होतीच, शिवाय शेकड्यांनी परिवारसुध्दा होते. तिथं पाणीसुद्धा विकत घेऊन प्यावं लागत होतं. चार-पाच जणांचं बिल एक हजाराच्या वर सहजच जात असेल. कितीतरी लहान लहान मुलं त्या कॅफेटेरिया मध्ये जंक फूड मनसोक्त खात होती. कॉलेजवयीन मुलामुलींच्या जोड्या होत्या. ५०० रुपयाचं सिझलर घेऊन टेबलावर गप्पा मारत बसलेलं एक युगुल दहा मिनिटांनी ती डिश तिथंच तशीच टाकून उठून निघून गेलं. कितीतरी लोक खाणं अर्धवट टाकून उठून निघून जात होते. छोले भटुरे मागवलेल्या एका ग्रुपनं तर निम्मे भटुरे तसेच टाकले. विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या सुद्धा अर्धवट टाकून निघून गेलेले लोक मी बघत होतो.

बरं, असला “टाकून माजण्याचा” मस्तवालपणा करणारी जी जनता होती, ती काही मर्सिडीज क्लास नव्हती. सगळेच्या सगळे मध्यमवर्गीयच होते. “पेट्रोल २५ पैशांनी महागले अन् जनतेचे कंबरडे मोडले” किंवा “कोथिंबीर कडाडली, लोकांनी खायचं काय?” असले मथळे लिहिणाऱ्यांनी मॉलमधले हे मध्यमवर्गीय बघितलेले असतात का? असा प्रश्न मला पडला.

मेसचे डबे लावून जेवणाऱ्या मुलांचं आणि मुलींचं मी अनेकदा निरीक्षण केलंय. आठवड्यातून तीनदा तरी डब्यातलं अन्न जसंच्या तसं कचऱ्यात गेलेलं असतं. घराघरांतून गोळा केला जाणारा ओला कचरा तुम्ही अवश्य पहा. चांगल्या प्रतीचं ब्रँडेड अन्न कचऱ्यात फेकून दिलेलं तुम्हाला दिसेल. हॉटेलमध्ये सँडविचच्या डिशमध्ये कोबी किसून डेकोरेट करुन सर्व्ह करतात. तो कच्चा कोबी कितीजण खातात? मोठमोठ्या कॉफी शॉप्स मध्ये मी पाहतो, मला फार वाईट वाटतं. पाचशे-सातशे रुपये किंमतीची कॉफी अर्धवट टाकून लोक निघून जातात. पाचशे रुपयांतले तीनशे रुपये आपण कचऱ्यात ओतले, याचं त्यांना भानही नसतं आणि त्याचं त्यांना वाईटही वाटत नाही.

एकदा सोलापूरहून पुण्याला येत असताना एका प्रसिद्ध हॉटेल मध्ये आम्ही ब्रेक घेतला. शेजारच्या टेबलावर सात आठ जण बसले होते. आठ जणांनी आठ वेगवेगळ्या भाज्या मागवल्या. इतके स्टार्टर्स, इतक्या डिशेस.. टेबल अख्खं भरलं होतं. पण खाल्लं किती? जितकं मागवलं होतं त्यातलं निम्मंसुद्धा नाही.. ! बिल भरुन माणसं निघूनही गेली.

याला आपण नेमकं काय नाव द्यावं? ‘महागाई किती वाढलीय’ असं ओरडणारी अगदी साधी साधी माणसंसुद्धा वडापाव घेताना पाच सात मिरच्या घेतात आणि त्यातली एखादीच खाऊन बाकीच्या चक्क कचऱ्यात टाकतात.. ! पराक्रम दाखवण्याच्या नादात एकस्ट्रा तिखट मिसळ मागवतात आणि चार घासातच त्यांचा धीर गळून पडतो. अन्न वाया.. ! सँडविचची हिरवी चटणी जास्तीची घेतात आणि टाकून देतात.. ! एखाद्या सँडविचवाल्याची किलोभर हिरवी चटणी दररोज सहजच उकिरड्यावर जात असेल..

गुरुवारी – शनिवारी देवळाबाहेर हात पसरुन बसलेली माणसं सुद्धा आता रुपया-दोन रुपयांचं नाणं, पार्ले बिस्कीट पुडा, एखादा वडापाव असलं काही दिलं तरी तोंड वेंगाडतात. त्यांना दहा रुपयांचं नाणं हवं असतं. ताजी पोळी-भाजी दिली तरी टाकून देणारे सुद्धा भिकारी मी पाहिलेत. मग भीक मागण्यामागची त्यांची नेमकी भावना तरी काय? आपल्याला आपल्या पात्रतेनुसार किंवा पात्रतेपेक्षा कितीतरी अधिक पटींनी मिळतंय, याची जाणीव इथेही दिसत नाही.

न कमावणारे, कमी कमावणारे, भरपूर कमावणारे, आपकमाईवाले, बापकमाईवाले सगळे सगळे या एकाच बोटीत बसलेले आहेत. काहीजणांची ही वृत्तीच आहे आणि काहीजणांना आपलं काहीतरी चुकतंय याची लांबलांबपर्यंत जाणीवच नाही. आणि दुसरं कुणी ह्यांना ही जाणीव करुन द्यायला तयार नाही.

महिन्यातले पंधरा दिवस मेसचा अख्खा डबा कचऱ्यात टाकणारे विद्यार्थी आणि मुलांच्या हट्टापायी भारंभार पदार्थ मागवून त्यातलं निम्म्याहून जास्त अन्न टाकणारे सुशिक्षित पालक दोघेही समाजाचे दोषी नाहीत का ? 

महागाई वाढल्याचं ढोंग करणारी माणसं त्यांची जीवनशैली जराही बदलायला तयार नाहीत. बापकमाईवर घेतलेला ब्रँडेड कपडा जास्तीत जास्त चार पाच वेळा घालून कपाटात कोंबणारे अन् पुढच्या महिन्यात पुन्हा नवे कपडे घेणारे विद्यार्थी त्यांच्या आयुष्याचा नेमका कसा विचार करत असतील? त्यांचे आईवडील त्यांना दर महिन्याला पैसै पाठवताना काय विचार करत असतील? कॉलेजच्या ऑफिसात फी माफीचे अर्ज करुन घेणारी मुलं मला जेव्हां त्यांच्या परमप्रिय मैत्रिणीसोबत फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये दीडशे रुपयांचा उत्तप्पा खाताना दिसतात, तेव्हां त्यांची गरिबी नेमकी कोणती? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण कॉलेजची फी खोटं कारण दाखवून माफ करुन घेऊन हॉटेलात एकावेळी पाचशे रुपयांची नोट खर्च करणं हे प्रामाणिक माणसाचं लक्षण नाही.

आमच्या आजूबाजूच्या परिसरात रात्री बारा वाजता पंधरा वीस बुलेट बाइक्स मोठाला आवाज करत गेल्या आणि अर्धा तास हवेत तीन चार हजार रुपयांची फटाक्यांची आतषबाजी होत राहिली की, आपण ओळखावं – आज कुठल्यातरी बेरोजगार दिवट्याचा वाढदिवस आहे आणि चार घरी धुणीभांडी करुन घराचा गाडा ओढणाऱ्या आपल्या आईच्या कमाईवर फुकट मजा मारणारं पोरगं आज एक वर्षानं मोठं झालं आहे. . ! रेशनचं अन्न आणून जगणाऱ्या घरच्या पोरांचे वाढदिवस रात्री बारा वाजता भर रस्त्यावर दोन-दोन केक आणून कसे होतात? सर्वच स्तरांमध्ये माणसांच्या जगण्याच्या व्याख्या बदलतायत आणि त्या अमिबासारख्या आकार उकार बदलत चालल्या आहेत, हे स्पष्ट दिसतं. याचा विचार कुणी एकट्यानं नव्हे तर, संपूर्ण समाजव्यवस्थेनं केला पाहिजे आणि तो अत्यंत गंभीरपणे केला पाहिजे.

लोकांच्या खिशात पैसा उदंड झालाय? जास्तीचे पर्याय सहज उपलब्ध झालेत? मोकळीक अन् स्वातंत्र्य वाढलंय? की माणसाला कशाचीच किंमत राहिली नाहीय? जाणिवांचं श्राद्ध घालून कुठल्याशा पोकळ धुंदीत वागण्याची ही रित समाजातल्या सर्वच स्तरांमध्ये जाणवण्याइतपत वाढतेय, हे प्रगतीचं अन् शहाणपणाचं लक्षण मानणाऱ्यांपैकी मी तरी नाही.

खरोखरचं सुजाण पालकत्व आणि आपण सुजाण पालक होण्यासाठी करत असलेला अनाठायी खर्च या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत का? संवेदनाशून्य सजीवांच्या फौजा निर्माण करुन आपण काय मिळवतो आहोत, याचा हिशोब कधीतरी कुणीतरी लावला पाहिजे की नको? 

नादारीचा मुखवटा घालून आतून काजू-बदामावर ताव मारणं हे माणसांच्या खोटारडेपणाचं स्वच्छ लक्षण आहे.

© श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ,

 संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares