श्री विश्वास विष्णु देशपांडे
विविधा
☆ स्वदेशीचा जादू… भाग – ६ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
समृद्ध प्राचीन वारसा – ग्रामीण उद्योग
सोपानराव मुलांना आपल्या गावात फेरफटका मारून आणत होते. श्यामराव आणि श्यामलाताई सोबत होत्याच. रामू लोहाराचे काम पाहून ते खाली उतरत असताना श्यामराव गमतीने पिंकी आणि राजेशला म्हणाले, ‘ हे लोहाराचे काम पाहताना मला लहानपणी शिकलेल्या दोन म्हणी आठवल्या बरं का ? ‘
‘श्यामराव, आम्हाला पण जरा कळू द्या की तुम्हाला काय आठवलं ते ? हसत हसत सोपानराव म्हणाले.
‘अरे श्याम, आपल्या वर्गाला त्या भागवत बाई मराठी शिकवायच्या, त्या आठवतात का ? ‘
‘व्हय की. चांगल्या लक्षात हायेत त्या. मला शुद्धलेखन चुकले म्हणून त्यांनी दररोज दहा ओळी शुद्धलेखन लिहून आणायला सांगितलं होतं. आणि नाही लिहून आणलं तर त्या शिक्षा करायच्या. ‘
‘पण सोपान अजूनही भागवत बाई भेटल्या तर तुला शुद्धलेखनावरून शिक्षा करतील बरं ! ‘ श्यामरावांनी असं म्हणताच हास्याचा स्फोट झाला. सगळेच त्यात सामील झाले.
‘हां, तर मला आठवल्या त्या म्हणी त्यांनी सांगितलेल्या. भागवत बाई म्हणायच्या, ‘ संस्कार आणि परिस्थिती माणसाला घडवते. मुशीत जसे सोने उजळून निघते, तसाच परिस्थितीमुळे माणूस. रामू लोहाराच्या भट्टीत लोखंड जसं तावून सुलाखून निघालं. ‘ श्यामराव म्हणाले.
अरे वा, एकदम बरोबर. ‘ सोपानराव म्हणाले. आणि दुसरी म्हण कोणती आठवली बाबा तुला ? ‘
‘अरे सोपान, आपण कधी सोनाराकडे गेलो तर तो आपल्या छोट्याशा हातोडीचे फटके दागिने घडवताना मारताना आपल्याला दिसतो. पण आता पाहिले ना रामू लोहाराकडे. त्याच्याकडे मोठा घण आहे. सोनाराच्या हातोडीचे शंभर फटके आणि याचा एकच दणका बरोबर नाही का ? म्हणून सौ सुनार की और एक लोहार की ही म्हण आठवली. ‘
‘बरोबर आहे मित्रा ‘ सोपानराव म्हणाले.
‘बाबा, आम्हीही या म्हणी ऐकल्या होत्या पण त्याचा अर्थ आम्हाला आता स्पष्ट झाला. ‘ पिंकी म्हणाली.
सगळे रामूच्या ओट्यावरून खाली उतरले आणि पुढे निघाले. काही अंतरावर एक मुलगा आणि एक मुलगी हातात एक फिरकी आणि आकडा घेऊन एक लांबच लांब दोरी फिरवत होते. ती मुलं साधारणपणे राजेश आणि पिंकीच्याच वयाची होती.
राजेश म्हणाला, ‘ बाबा, ही मुलं काही खेळ खेळताहेत का ? ‘
सोपानरावांना हसू आले, ‘ अरे पोरांनो, हा खेळ नाही. त्यांना बिचाऱ्यांना आपलं पोट भरण्यासाठी हा उद्योग करावा लागतो. ही मुलं दोर तयार करत आहेत. दोरी, दोरखंड असं ते तयार करतात. मग त्यांचे आईवडील शेजारच्या गावांमध्ये ज्या दिवशी आठवडे बाजार असेल त्या दिवशी विक्रीसाठी घेऊन जातात. फार मेहनत आणि चिकाटी आहे त्यामागे. ‘
‘अच्छा काका. म्हणजे अशा प्रकारे दोर तयार करतात तर ! आम्ही कधी पाहिले नव्हते. कशापासून बनवतात ते दोर ? ‘ पिंकीनं विचारलं.
‘तसं तर अनेक वस्तूंपासून दोर तयार करतात. म्हणजे गवत, ताग, कपाशी, लव्हाळे, काथ्या यासारख्या वस्तू वापरल्या जातात. पण आमच्या इथे जवळच मोठं जंगल आहे शिवाय शेती आहे. शेतीच्या बांधावर आणि जंगलात घायपात नावाची वनस्पती उगवते. तिच्यापासून दोर करतात. घायपातला घायाळ, केकती अशी पण नावं आहेत. पण आता या बिचाऱ्यांचा व्यवसाय कमी झाला आहे. लोक त्यांच्याजवळून दोर विकत घेण्यापेक्षा शहरातील दुकानांमध्ये जाऊन माल विकत घेणे पसंत करतात. त्यामुळे असे दोरखंड तयार करणारे कारागीर आता ग्रामीण भागात फार कमी आहेत. ‘
‘काका, किती छान आणि नवीन माहिती मिळाली आम्हाला !’ राजेश म्हणाला.
‘चला, आता आपण जरा दुसरीकडे जाऊ. मी येथील कुंभार आळीत तुम्हाला नेतो. ‘ सोपानकाका म्हणाले. जवळच्या एका बोळातून ते सगळे मग कुंभार आळीत शिरले. त्या आळीत तीनचार कुंभारांची घरे होती. काही घरांच्या बाहेर माठ रचून ठेवले होते. काही ठिकाणी पाणी भरण्याचे मोठे रांजण होते. कुठे कुठे मातीच्या चुली दिसत होत्या. विविध प्रकारची मातीची भांडी होती. पोळ्यासाठी लागतील म्हणून मातीचे बैल तयार करून त्यांना रंग देणे काही ठिकाणी सुरु होते. एका ठिकाणी एक कुंभार बाबा एका चाकावर झाडांसाठी लागणाऱ्या मातीच्या कुंड्या तयार करताना दिसत होते. ‘
‘रामराम हरिभाऊ. पाहुण्यांना घेऊन आलो तुमच्याकडे. ‘ सोपानराव कुंभार बाबाना म्हणाले.
‘या की मग. पाव्हणं कुठलं म्हणायचं ? हरिभाऊ म्हणाले.
‘हरिभाऊ, हा माझा बालमित्र श्याम. या वहिनी आणि ही त्यांची मुलं पिंकी आणि राजेश. शहरातून आलेत आपला गाव पाहायला. ‘ सोपानराव म्हणाले. ‘ या मुलांना जरा तुमच्या कामाची माहिती सांगा. ‘
आपल्याला कोणीतरी काही विचारते आहे याचा आनंद होऊन हरिभाऊंची कळी खुलली. ते मोठ्या उत्साहाने सांगू लागले.
‘ बाळांनो, या कामासाठी आम्ही लई पारखून माती आणतो बरं का ! नदीकाठची किंवा तलावाकाठची माती लागते. त्या मातीला गाळून, वाळवून मग तिच्यात लीद, गवत, शेण, राख, धान्याची फोलपटे यासारख्या गोष्टी मिसळतो. मग ती चांगल्या प्रकारे मुरू देतो. त्यानंतर तिचे गोळे बनवून मग त्याच्या वस्तू घडवतो. हे चाक, यावर आम्ही वस्तुंना आकार देतो. आता तुम्ही ते पाहताच आहात. त्याशिवाय हा एक दगड आहे. त्याला आम्ही गंडा किंवा गुंडा म्हणतो. त्यामुळे वस्तूला गुळगुळीत आकार येतो. ही एक लाकडी थोपटणी, तिला आम्ही चोपणी म्हणतो. वस्तू तयार करताना तिला बाहेरून आम्ही याच्याने थोपटतो. तयार झालेल्या वस्तू आम्ही ज्या भट्टीत भाजतो, तिला आवा म्हणतात. ‘
‘ पोरांनो, आता आमचा धंदा पूर्वीसारखा राहिला नाही. मातीच्या वस्तू लोक कमी विकत घेतात. पण तुम्हाला म्हणून सांगतो. पूर्वी स्वयंपाकासाठी मातीचीच भांडी वापरली जायची. गोरगरिबांच्या घरात स्वयंपाक त्यांच्यावर व्हायचा. पण आता स्टील, अल्युमिनियम यांची भांडी आली. लोकं तीच घेत्यात पण आरोग्यासाठी मातीचीच भांडी चांगली. त्यात पोषक घटक बी असत्यात आन स्वयंपाकाला लई ब्येस चव येते बघा. आणि चुलीवरच्या जेवणाची टेस्ट बी लई न्यारी असतीया. ‘ हरिभाऊ उत्साहाने बोलत होते. बोलता बोलता एकीकडे त्यांचे कामही सुरु होते.
त्यांच्या हातातील ती कला पाहून राजेश आणि पिंकीला आश्चर्य वाटले. ती दोघेही बराच वेळ त्याचं निरीक्षण करत उभी राहिली. ‘ एकाच प्रकारच्या मातीतून माठ, रांजण, कुंड्या, पणत्या, चुली आदी वस्तू घडत होत्या. ओल्या मातीला हवा तसा आकार देता येतो. त्यातून काय निर्माण करायचे ते आपण ठरवायचे असते. मग भट्टीत भाजली की ती पक्की होतात. मानवी जीवनाला सुद्धा या गोष्टी किती चपखल लागू पडतात, नाही ? ‘ असे विचार श्यामरावांच्या मनात येऊन गेले. श्यामलाताई मनातल्या मनात ‘ फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार ‘ हे गाणं गुणगुणत होत्या. या विश्वाची निर्मिती करणारा परमेश्वरही जणू एक कुंभारच ! तो तर किती वेगवेगळ्या प्रकारे या जगाला आकार देतो, किती वेगवेगळ्या प्रकारचा निसर्ग, माणसे, प्राणी निर्माण करतो. असे विचार त्यांच्या मनात तरळून गेले.
पुढे गेल्यानंतर एका गल्लीत सुतार लोकांनी लाकडापासून केलेल्या काही वस्तू मुलांना बघायला मिळाल्या. अशा प्रकारे खेडेगावातील लोकांचे उद्योग प्रत्यक्ष कसे चालतात ते मुलांना बघायला मिळाले. मुले या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्याने बेहद्द खुश होती. आता संध्याकाळ झाली होती. सूर्यनारायण निरोप घेण्याच्या तयारीत होते. श्यामराव सोपानला म्हणाले, ‘ सोपानराव, आता आम्हाला निघण्याची परवानगी द्या. मुले पण थकली आहेत. घरी जाऊन विश्रांती घेऊ. ‘
परवानगी नाही अजिबात. आपण आता घरी जाऊ. निर्मलानं तुमच्यासाठी मस्तपैकी जेवण तयार केलं असणार. तुमी आता मस्त जेवण करायचं. खूप दिवसांनी आलायसा. रातभर ऱ्हावा. रातीला मस्तपैकी गप्पा मारू. आराम करायचा अन मंग सकाळी न्याहारी करून निघायचं. त्याबिगर मी सोडणार नाही तुम्हाला. ‘ सोपानराव म्हणाले.
श्यामराव हसले. ‘ तू असा सोडणार थोडाच आहेस बाबा आम्हाला. चला रे बाळांनो, आज सोपानकाकांकडे जेवण अन मुक्काम. ‘ राजेश आणि पिंकीनं आनंदाने टाळ्या वाजवल्या आणि सगळे सोपानरावांच्या घरी गेले.
©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे
चाळीसगाव.
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈