= प्रेमाचं हे प्रतिक आहे। तुझ्या- माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही, राहणार नाही व राहू नये हे सांगण्यासाठी !
६) लग्नात सप्तपदी माहीत आहे का कशासाठी???
= तुमच्या सुख-दु:खात मी आता सोबत आहे. सात पावलं ही केवळ मर्यादा आहे, हे सांगण्यासाठी !
७) लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी?
= तांदळाची अक्षता याच्या साठी की तांदळाचे बीज लावताना आपण एका जागी लावतो.ते थोडे मोठे झाले की मग त्याची लावणी वेगळ्या जागी करतो. तसेच मुलींचे बालपण माहेरी असते, त्या जिथे मोठ्या होतात तिथून त्यांना दुसऱ्या जागी जावे लागते. तिथेच त्यांचा वंश वाढतो, याची आठवण रहावी म्हणून लग्नात तांदळाच्या अक्षता टाकतात *
पण हे शास्त्र बऱ्याच लोकांना माहीत नाही.
संग्रहिका : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(ॲनिमल फार्म ” आणि ” 1984 ” या दोन प्रसिद्ध साहित्य कृतीनी विसाव्या शतकात खपाचा उच्चांक गाठला होता. राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेवरील अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. जॉर्ज ऑरवेलला केवळ 46 वर्षांचे इतके अल्प आयुष्य लाभले . 21 जानेवारी 1950 मध्ये लंडनमध्ये त्याचे निधन झाले.)
“ॲनिमल फार्म ” ही नुसती परिकथा किंव्हा मनोरंजनात्मक कादंबरी नसून तत्कालीन साम्यवादी व्यवस्थेवरील टीका, रशियामध्ये घडलेली बोलशेविक क्रांती ,आणि स्टॅलीनने केलेला सामान्यांचा विश्वासघात, आणि जुलूम केलेल्याचे ते रूपक आहे .शतकातील राजकीय उपहासात्मक आणि कलात्मक रितीने, प्रथमच लिहिलेल्या साहित्य प्रकारातील सर्वाधिक
प्रसिद्ध कादंबरी ! त्याने एका निबंधात म्हटले आहे,” मी जेव्हा लिहायला बसतो , तेव्हा माझ्यासमोर जे असत्य असते, ते मला लिखाणातून उघड करायचे असते “. आणि त्याने त्याप्रमाणे बोल्शेविक क्रांतीची भ्रामक बाजू उघडकीस आणली.
“Friends of fatherless, fountain of happiness —– – – – -like the sun in the sky. Comrade Nepoleon. झेंड्याचा रंगही बदलला .सगळं पहाताना प्राण्यांचा गोंधळ व्हायला लागला. पवन चक्की चा दगड ओढताना बॉक्सर जखमी झाला.
अत्यंत स्वाभिमानाने प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या बॉक्सरला “दवाखान्यात नेतो”असं खोटं सांगून कसायाकडे पाठवलं जातं .बेंजामिन गाढवाला सगळं कळत होत. पण गप्प बसून तो सगळं पाहत होता इतर प्राणी खवळले .” नेपोलियन महान आहे असं शेवटी बॉक्सर बोलला, आणि त्याला वीर मरण आले ” असं स्क्विलर ने सांगून सर्वांचा राग शांत केला.
हळूहळू डुकरे (बोलशेविक) पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांसारखे वागायला लागतात. सर्वसामान्यांना काहीच कळत नाही . जी तात्विक मू ल्ये दाखवून सत्तेवर आले , ती मूल्ये बदलून, पूर्वीचे आणि आत्ताचे सत्ताधारी मॅनोर फार्म वर गप्पा मारत असतात. सगळे प्राणी खिडकीतून पाहतात . त्यांना प्राणी आणि माणसात काहीच फरक कळत नाही. सर्वसामान्यांना गप्प बसण्या वाचून मार्ग नसतो. येथे कादंबरीचा शेवट होतो.
पहिली गोष्ट आहे चार चाकी गाडी चालवण्याच्या परवान्याची (लायसन्स) परीक्षा देणाऱ्या एका तरुणीची.
परीक्षक तिला विचारतात, “मी आज तुम्हाला परत तोच प्रश्न विचारतो – समजा तुम्ही एका अरुंद गल्लीतून गाडी चालवत आहात, गल्लीच्या दोन्ही बाजूला लागूनच इमारती आहेत, गाडीव्यतिरीक्त एकच माणूस जाऊ शकेल एवढीच जेमतेम जागा शिल्लक आहे आणि समोर रस्त्याच्या एका कडेला तुमचा नवरा आहे आणि दुसऱ्या साईडला तुमचा भाऊ आहे, तर तुम्ही काय माराल ? What will you hit ?”
गेल्या दोन परीक्षांत याच परीक्षकांनी तिला हाच प्रश्न विचारला होता, दोन्ही वेळा तिने “नवरा” असं उत्तर दिलं होतं आणि तिला नापास केले गेले होते. आज तिनं पवित्रा बदलला आणि ती म्हणाली, “मी विचार बदलला आहे. मी भावावर गाडी घालेन. I will hit him.”
ती आशेने परीक्षकांकडे पहात होती आणि परीक्षकांनी बोलायला सुरुवात केली …
दुसरी कथा आहे एका कारकीर्द समुपदेशकाची – करीअर कौन्सेलरची. संघ व्यवस्थापन – टीम मॅनेजमेंट शिकवण्यासाठी, त्याने आलेल्या सर्व प्रशिक्षार्थींच्या एका हातात प्रत्येकी एक छान टम्म फुगवलेला फुगा दिला आणि दुसऱ्या हातात एक टोकदार टाचणी.
समुपदेशक सांगत होते, सर्व प्रशिक्षार्थी कान देऊन ऐकत होते, “एक छोटीशी स्पर्धा आहे – दोन मिनिटांपर्यंत ज्याच्या हातातला फुगा फुगलेला राहील तो जिंकला.
and your time starts now !”
समुपदेशकांनी एवढं म्हटलं मात्र, इतका वेळ पूर्ण शांत असलेला तो हॉल, वीरश्रीयुक्त आरोळ्यांनी दुमदुमून गेला. जो तो दुसऱ्याचा फुगा फोडण्याच्या आणि स्वतःचा वाचवण्याच्या प्रयत्नांत मश्गूल होऊन गेला.
दोन मिनिटे संपली तेव्हा फक्त तिघा जणांच्या हातातले फुगे शाबूत होते, आता यातील कोणाचा पहिला क्रमांक येणार हे जाणण्यासाठी सर्व उत्सुक होते, आणि समुपदेशकांनी बोलायला सुरुवात केली …
तिसरी कथा आहे मानसशास्त्रात (psychology) पदवी अभ्यासक्रम शिकणाऱ्या धनश्रीची. सध्या, महाविद्यालयीन अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, ती न्यायवैद्यक मानसशास्त्र (forensic psychology) या विषयाचा एक online course करत होती.
आजची त्यांची नेमून दिलेली कामगिरी assignment दिलचस्प होती – तुम्हाला एक खून करायला सांगितला तर तुम्ही तो कसा कराल याचं एका मिनिटात उत्तर द्यायचे होते.
मग कोणी, ज्याचा खून करायचा आहे त्याला गाडीतून ढकलून दिले, किंवा त्याचा कडेलोट केला. काहींनी चालत्या रेल्वेसमोर कोणाला ढकललं, काहींनी गोळ्या घातल्या, काहींनी सुरा खुपसून कोथळा काढला. धनश्रीने झोपलेल्या माणसाच्या नाकावर क्लोरोफॉर्मचा बोळा दाबून त्याला बेशुद्ध केलं आणि मग त्याचा प्राण जाईपर्यंत त्याच्या नाकातोंडावर उशी दाबून धरली.
कोणी सगळ्यात जास्त सराईतपणे खून केला हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक होते आणि कोर्स इंस्ट्रक्टरने बोलायला सुरुवात केली …
संयम राखत ड्रायव्हिंग परीक्षक सांगत होते, “मॅडम, थोडा कॉमन सेन्स वापरा हो. तुम्ही ब्रेक मारा, hit the breaks. नवऱ्याच्या आणि भावाच्या जीवावर का उठताय ?”
कारकीर्द समुपदेशक सांगत होते, “दोन मिनिटांपर्यंत फुगा फुगलेला राहील, तो जिंकला, असं सांगितलं होतं. दुसऱ्याचे फुगे फोडा असं कुठं म्हटलं होतं ? तुम्ही कोणीच एकमेकांचे फुगे फोडले नसतेत, तर सगळेच जिंकला असतात.”
फोरेन्सिक कोर्सच्या इंस्ट्रक्टरने सांगितलं, “कोणी कसा खून केला हे महत्त्वाचं नाही. प्रश्न हा आहे की तुम्ही कोणीच साधं विचारलंही नाही की मी हा खून का करू ? कोणी असं म्हटलं नाही की मी सैन्यात जाईन आणि शत्रूला मारेन.”
सध्याच्या या स्पर्धात्मक युगात, आपण जिंकायचं म्हणजे समोरच्याला हरवायचं अशी आपली विचारप्रक्रिया झाली आहे.
स्वतःच्या प्रगतीसाठी आपण आपल्या कुटुंबीयांचा – आप्तस्वकीयांचाही बळी घ्यायला किंवा द्यायला तयार आहोत, आपल्याच सहकाऱ्यांना पायदळी तुडवून आपला झेंडा उंच ठेवण्यात आपल्याला काहीच वावगं वाटत नाही, कोणतेही कारण न जाणता आपण समोरच्याला आयुष्यातून उठवायलाही तयार आहोत.
आपली ही तामसी विचारप्रक्रिया बदलायला हवी, नाही का ? शेकडो वर्षांपूर्वीच ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्यासाठी प्रार्थना केली आहे – आपली दुष्ट बुद्धी नाहीशी होवो, आपले सत्कर्म वाढो, आणि आपण एकमेकांचे शुभचिंतक होवो.
भारतातील पहिल्या स्त्री डॉक्टर हा मान निश्चितच डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा आहे .दुर्दैवाने डॉक्टर आनंदीबाई जोशी भारतात परतल्यावर आजारी पडल्या व मृत्यू पावल्या .भारतातील पहिली व्यावसायिक स्त्री डॉक्टर म्हणून डॉक्टर रखमाबाईंची इतिहासात नोंद आहे.
रखमाबाईंचा जन्म २२ नोव्हेंबर १८६४ रोजी झाला. रखमाबाईंच्या जन्मानंतर अल्पावधीतच त्यांचे वडील जनार्दन सावे यांचा काविळीने मृत्यू झाला . रखमाबाईंचे आजोबा हरिश्चंद्र चौधरी हे बांधकाम कंत्राटदार होते. आधुनिक विचारांचे असल्यामुळे, समाजविरोधात जाऊन त्यांनी रखमाबाईंच्या आईचा म्हणजे जयंतीबाईंचा पुनर्विवाह केला. सापत्य विधवेचा विधुरासोबत पुनर्विवाह हा त्या काळातील एक धाडसी निर्णय होता. जयंतीबाईंचे दुसरे पती म्हणजे डॉक्टर सखाराम अर्जुन राऊत. डॉक्टर सखाराम अर्जुन हे जे.जे. हॉस्पिटलमध्ये असिस्टंट सर्जन होते. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांच्या घराण्यावर सत्यशोधक विचारांचा पगडा होता. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या रखमाबाईंनी डॉक्टर सखाराम अर्जुन या आपल्या दुसऱ्या पित्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले.
जयंतीबाईंच्या आग्रहामुळे रखमाबाईंचा विवाह अकराव्या वर्षी दादाजी नावाच्या एका नात्यातील मुलाशी करून दिला. विवाहानंतरही रखमाबाई माहेरी राहून शिकत होत्या. त्यांचे विचार प्रगल्भ होत होते.
दादाजींनी सन १८८४ मध्ये, रखमाबाई या लग्न होऊनही नांदायला येत नाहीत यासाठी बॉम्बे हायकोर्टात न्यायमूर्ती पिन्हे यांच्यासमोर कायदेशीर फिर्याद दाखल केली होती. सुशिक्षित, सुसंस्कृत, तडफदार रखमाबाईंनी न्यायमूर्ती पिन्हे यांच्यासमोर स्पष्ट निवेदन केले .त्या म्हणाल्या, ‘अजाणत्या वयात, माझी संमती न घेता हे लग्न लावण्यात आले आहे. अशिक्षीत ,सतत आजारी असलेला, स्वतःचे उत्पन्न नसलेला, मामावर अवलंबून असलेला असा हा पती माझे पालन पोषण करण्यास असमर्थ आहे. त्याच्याविषयी मला जवळीक वाटत नाही. नवरा म्हणून त्याला स्वीकारणे मला मान्य नाही.’
सर्व बाजूंनी सारासार विचार करून न्यायमूर्ती पिन्हे यांनी रखमाबाईंच्या बाजूने निर्णय दिला. ‘बालवयात लग्न झालेली मुलगी आता सज्ञान झाली आहे. निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात आली आहे. चांगले आणि वाईट याची जाणीव झालेल्या स्त्रीला नवऱ्याकडे पाठविण्याची सक्ती करणे रानटीपणाचे ठरेल असे मला वाटते.’ असे मत त्यांनी व्यक्त केले.
या निकालामुळे रखमाबाई आणि न्यायमूर्ती पिन्हे यांच्यावर टीकेची झोड उठली. हा निकाल आमच्या हिंदू धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे. समाजजीवनास घातक आहे. लग्नासाठी हिंदू लोकांना स्त्रियांची संमती आवश्यक नाही. अशी जहरी टीका स्वतःला समाज सुधारक म्हणविणाऱ्या अनेकांनी केली. खटल्याचा निकाल रखमाबाईंच्या बाजूने लागल्याने अस्वस्थ झालेल्या दादाजींनी या निकालाच्या फेर सुनावणीसाठी अपील केले. त्यांना धर्ममार्तंडांची साथ होती. शिवाय दादाजींना रखमाबाईंच्या नावे असलेल्या पंचवीस हजार रुपयांचा लोभ होता.
रखमाबाईंना साथ देण्यासाठी पंडिता रमाबाई व इतर अनेक विचारवंत, समाजसुधारक यांच्या पुढाकाराने ‘हिंदू लेडी संरक्षण समिती’ची स्थापना करण्यात आली. रखमाबाईंनी टाईम्स ऑफ इंडियामध्ये ‘हिंदू लेडी’ या नावाने पत्रे लिहून हिंदू धर्मातील अमानुष चालीरीतींवर घणाघात केला. बालविवाह, सतीची पद्धत, स्त्रियांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक यावर लेख लिहिले. पती मेल्यानंतर स्त्रीने सती जावे असे म्हणणारा समाज, पत्नी मेल्यावर पुरुषांना पत्नीसोबत ‘सता’ म्हणून का पाठवत नाही? असे त्यांनी लिहिले. हा प्रश्न धर्ममार्तंडांच्या जिव्हारी झोंबला .मृत्यू पावलेल्या पत्नीच्या तेराव्याच्या आधीच दुसरे लग्न करून मोकळे होणारे पुरुष यांना एक न्याय आणि स्त्रियांना वेगळा न्याय असे का? स्त्रीला जाचक ठरणारे हे कायदे कोणी केले? असा चौफेर हल्ला त्यांनी समाजावर, पुरुषी व्यवस्थेवर केला. हा शंभर वर्षांपूर्वीचा कालखंड आहे हे लक्षात घेतले म्हणजे रखमाबाईंनी दिलेल्या लढ्याचे महत्त्व लक्षात येते.
इंग्रजांना येथील धर्म, कायदे यांना धक्का लावायचा नव्हता. ते मतलबी, व्यापारीवृत्तीचे होते. त्यांनी राजकीय स्वार्थ साधला. अपिलीय खटल्यात न्यायमूर्ती फॅरन यांनी, ‘रखमाबाईंनी एक महिन्याच्या आत पतीच्या घरी नांदायला जावे नाही तर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगावी’ असा रखमाबाईंच्या विरोधात निकाल दिला. रखमाबाईंनी या अन्यायकारक निकालाला निक्षून नकार दिला आणि तुरुंगवास भोगण्याची तयारी दाखविली.
दादाजी व त्यांचे मामा यांच्या उलट तपासणीत, दादाजी हे कुठल्याही प्रकारे रखमाबाईंसाठी योग्य नाहीत हे कोर्टाच्या लक्षात आले. तेव्हा दादाजींनी रखमाबाईंना तडजोड करण्याची विनंती केली. दादाजींनी रखमाबाईंवरचा हक्क सोडावा आणि रखमाबाईंनी दादाजींना दोन हजार रुपये द्यावेत अशी तडजोड झाली. तसेही दादाजींना रखमाबाईंच्या संपत्तीमध्येच स्वारस्य होते. तडजोडीनंतर दादाजींनी लगेच दुसरे लग्न केले. हा खटला १८८७ मध्ये संपुष्टात आला.
नको असलेल्या विवाहातून रखमाबाई मुक्त झाल्या त्यावेळी त्या फक्त २२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावरील खटल्याच्या वेळी डॉक्टर एडिथ पिची आणि फिप्सन पिची यांनी रखमाबाईंना शेवटपर्यंत साथ दिली होती. डॉक्टर एडिथ १८८३ मध्ये मुंबईला कामा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून रुजू झाल्या होत्या. डॉक्टर सखाराम अर्जुन यांच्या त्या सहकारी होत्या. त्यांचे पती फिप्सन स्त्रियांच्या आरोग्यासाठी स्थापन केलेल्या डफरीन फंडाचे सचिव होते .या पती-पत्नींच्या प्रयत्नामुळे डफरीन फंडातून रखमाबाईंना आर्थिक मदत मिळाली. याच पती-पत्नीने रखमाबाईंना इंग्लंडमध्ये राहण्यासाठी मॅक्लेरन दांपत्याचे पालकत्व मिळवून दिले. रखमाबाई १८८९ मध्ये वैद्यकशास्त्राच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेल्या.१८९४ मध्ये प्रसूती शास्त्र व शस्त्रक्रिया या परीक्षेत ऑनर्स पदवी मिळवून सन्मानाने भारतात परतल्या.
काही दिवस कामा हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून काम केल्यावर त्या सुरत इथे गेल्या. त्यावेळी सुरतमध्ये प्लेग व दुष्काळ यांनी थैमान घातले होते. या प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी रात्रंदिवस काम केले. तेथील स्त्रियांची मागास स्थिती सुधारण्यासाठी, बाळंतपणात होणारे मृत्यू रोखण्यासाठी रखमाबाईंनी खूप प्रयत्न केले .स्त्री शिक्षणासाठी ‘वनिता आश्रम’ ची स्थापना केली. १९१७ मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी राजकोट येथील जनाना हॉस्पिटलची जबाबदारी स्वीकारली. सौराष्ट्र व कच्छ प्रांताच्या त्या पहिल्या महिला प्रमुख डॉक्टर होत्या. त्यांनी भारतात रेडक्रॉस सोसायटीची स्थापना केली. आजन्म अविवाहित राहिल्या. महायुद्धाच्या काळात जखमी सैनिकांची शुश्रुषा केली.
रखमाबाईंच्या सुरत सेवेबद्दल शासनाने ‘कैसर ए हिंद ‘अशी पदवी त्यांना दिली. रेड क्रॉस सोसायटीने पदक देऊन त्यांचा सन्मान केला. वयाच्या ९१ व्या वर्षापर्यंत त्या कार्यरत होत्या.२५ डिसेंबर १९५५ रोजी त्या देवत्वात विलीन झाल्या.
प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणूस म्हणून स्वतःचे अधिकार मिळविण्यासाठी कसा संघर्ष करायचा याचे उत्तम उदाहरण रखमाबाईंनी घालून दिले. आज २१ व्या शतकातही स्त्रीबद्दलचा दृष्टिकोन फारसा बदललेला नाही फक्त त्याची तीव्रता कमी झाली आहे. स्त्रीभ्रूण हत्या, स्त्रियांवरील अत्याचार, स्त्री-पुरुष असमानता या गोष्टी साऱ्या जगभर आहेत. समाज रुढी म्हणून किंवा आर्थिक परिस्थितीमुळे आपल्याकडे अजूनही बालविवाह होतातच. शंभराहून अधिक वर्षांपूर्वीच्या त्या कठीण काळात, नको असलेल्या बालविवाहाचे संकट रखमाबाईंनी निग्रहाने परतवून लावले .रखमाबाईंचा एकाकी लढा हा निश्चितच प्रेरणादायी, स्फूर्तीदायी आहे. रखमाबाईंनी इतिहास घडविला. त्यांना विनम्र प्रणाम.👏
कितीतरी लेखक दारिद्र्यातून जात असताना, लोकांची टीका सहन करत, करत एक दर्जेदार सिद्ध लेखक म्हणून नावारूपाला येतात. अशा अनेकांपैकी जॉर्ज ऑरवेल याचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
जॉर्ज ऑरवेलचे मूळ नाव एरिक आर्थर ब्लेयर. 25 जून 1903 मध्ये, भारतात बंगालमध्ये मोतीहरी येथे त्याचा जन्म झाला. त्याचे वडील सिविल सर्विसेस मध्ये नोकरी करीत होते .1907 साली त्यांचे कुटुंब इंग्लंडला गेले. 1911 मध्ये ससेक्स मधील बोर्डिंग स्कूलमध्ये आणि नंतर इंग्लंडमध्ये इटन येथे ( 1917 ते 21) स्कॉलरशिप मिळवून शिक्षण घेतले तेथे त्यांना अल्डस हक्सले हे शिक्षक लाभले. आणि तेथूनच त्यांचे लेखनाला सुरुवात झाली कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी वेगवेगळ्या मॅगझिन्स मध्ये लेखन करायला सुरुवात केली त्यांची पहिली कविता “awake young men of england “. हे लिहिली तेव्हा तो फक्त अकरा वर्षाचा होता. 1922 मध्ये बर्मा मध्ये भारतीय इंपिरियल पोलीस दलात डिस्ट्रिक्ट सुपरीटेंडंट म्हणून पाच वर्षे नोकरी केली. त्या काळात त्याला 650 पाउंड इतका चांगला पगार होता. पण त्याचे मन नोकरीत रमेना. वडिलांचा विरोध पत्करूनही त्याने ती नोकरी सोडली .आणि लेखक होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन वर्षे त्याला खूपच दारिद्र्यावस्थेत काढावी लागली. इंग्लंडला आल्यानंतर त्याने प्रसिद्ध लेखकांचा अभ्यास केला. आणि आपले लेखन विकसित करायला सुरुवात केली. उदारमतवादी आणि समाजवादी विचारांच्या संपर्कात तो आला. आणि तेथेच त्याच्या राजनैतिक विचारांना सुरुवात झाली. इंग्लंडला परत येण्यापूर्वी तो पॅरिस मध्ये दोन वर्षे राहिला होता. 1933 मध्ये त्याचे पहिले पुस्तक ” डाऊन अँड आऊट इन पॅरिस अंड लंडन ” मध्ये त्याने आपले अनुभव लिहिले. आणि या प्रकाशानापूर्वीच त्याने आपल्या नावात बदल करून, जॉर्ज ऑरवेल या टोपण नावाने लेखन करायला सुरुवात केली. इंग्लंडला परत येण्यापूर्वी तो पॅरिसमध्ये दोन वर्षे राहिला होता .तेथे खाजगी शिक्षक, शाळा शिक्षक, पुस्तकाच्या दुकानात काम करत होता .1936 मध्ये त्याला लंके शायर आणि आणि याँर्कशायर मधील बेरोजगारी असलेल्या भागांना भेट देण्यासाठी नियुक्त केले. आणि तेथील गरीबीवर त्यांनी पुस्तक लिहिले.( The road to vighan pear 1937.) 1936 साली तो रिपब्लिकन पक्षासाठी लढण्यासाठी स्पेनला गेला . तेथे तो जखमी झाला .नंतर तो पूर्ण तंदुरुस्त झालाच नाही . दुसऱ्या महायुद्धा दरम्यान त्याने होमगार्ड मध्येही काम केले .1941 ते 43 मध्ये बी. बी .सी .साठी प्रचाराचे काम केले. पुढे 1943 साली “ट्रिब्यून”, या साप्ताहिकाचे संपादक झाले .रशियन राज्यक्रांतीवरील उपरोध प्रचूर रूपक, अनेक टीकात्मक लेखसंग्रह , स्पेन मधील यादवी युद्धाचे अनुभव आणि कादंबऱ्या असे बरेच लिखाण झाले. त्याने लिखाणात कल्पनाधारीत, तत्वनिष्ठ पत्रकारिता, समीक्षा, काव्य असे अनेक लेखन प्रकार हाताळले.
17 ऑगस्ट 1945 साली , इंग्लंडमध्ये आणि एक वर्षानंतर अमेरिकेत , त्याची ” ॲनिमल फार्म ” ही (रुपक )कादंबरी प्रकाशित झाली. 1949 मधे एक दीड वर्ष खर्च करून “1984” हे कादंबरी प्रकाशित झाली .या दोन कादंबऱ्यांनी सर्वत्र खळबळ उडवून दिली. जर्मनीचा पाडाव झाला .आणि स्टॅलिनने रशियाला वाचवले. त्याविरुद्ध लिहिण्याची कोणाची ताकद नव्हती .सरकार आणि व्यवस्थेचा भीतीचा पगडा, विचारांची घुसमट त्याने प्रकट केली आहे. ” ॲनिमल फार्म ” हे एक भाष्य आहे. संपूर्ण कादंबरी रशियन राज्यक्रांतीचे हुबेहूब रूपक आहे. झारशाही विरुद्ध होणारे रशियन बंड उत्तमरीत्या साकार केले आहे .त्याचा एकाधिकारशाहीला विरोध होता. आणि सामाजिक विषमतेबद्दल प्रचंड चिड होती .लोकशाहीशी संलग्न असलेल्या समाजवादावर त्याचा विश्वास होता. एका शेतातली प्राण्यांची राजनीतिक कथा ,पण स्टॅलिनच्या राज्यक्रांती, जनतेचा विश्वासघात ,स्वार्थीपणा यावर ही रूपकात्मक कादंबरी आहे . स्टॅलीनचा
तो टीकाकार होता. ब्रिटिश बुद्धिजीवींनी, स्टॅलीनचा उच्च आदर केलेला त्याला पटला नव्हता . त्याचे लेखन तत्त्वज्ञान हे सत्या.चा शोध घेण्याची संबंधित होते. मार्क्सवाद्यांना त्याचे लेखन पटले नाही .या कादंबरीवर त्यांनी आक्रमण केले. आणि अनेक दिवस या कादंबरीवर बंदी आली. दोन कादंबऱ्यांनी त्याला जागतिक कीर्ती मिळवून दिली. 1995 मध्ये त्याला w. H. Smith अँड penguin बुक्स ऑफ द सेंचुरी पुरस्कार मिळाला.1950 पर्यंत इंग्लंड मध्ये 25 हजार 500 आणि अमेरिकेत पाच लाख 90 हजार प्रति होत्या. या आकडेवारीवरून या पुस्तकाचे यश लक्षात येते. टाईम मॅगेझिनने इंग्रजीतील सर्वोत्कृष्ट कादंबऱ्यांपैकी एक म्हणून ती निवडली. सर्व युरोपियन भाषा, पर्शियन, आइसलैंडिक, तेलगू भाषांमध्ये या कादंबरीचे भाषांतर झाले आहे. ” ॲनिमल फार्म ” आणि ” 1984 ” या दोन प्रसिद्ध साहित्य कृतीनी विसाव्या शतकात खपाचा उच्चांक गाठला होता. राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेवरील अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. जॉर्ज ऑरवेलला केवळ 46 वर्षांचे इतके अल्प आयुष्य लाभले . 21 जानेवारी 1950 मध्ये लंडनमध्ये त्याचे निधन झाले.
☆ जमणार का तुम्हाला असा चातुर्मास? ☆ सुश्री सुनिता जोशी ☆
एक सहज सुचलेली संकल्पना. १५ दिवसात चातुर्मास चालू होत आहे. आणि आजच दैनिक सकाळ मध्ये वाचनात आले की चातुर्मासातील आरोग्य जपण्यासाठी दिलेला एक उपाय. आणि तो म्हणजे मौन पाळणे किंवा कमी बोलणे. पावसाळ्यात अग्नी मंद झालेला असतो आणि मुख्य म्हणजे चैतन्य मंदावले की ताकद कमी झालेली असते. हा खरा आरोग्याचा नियम आहे. म्हणजे आजकालच्या काळात जेवढे कामासाठी आवश्यक आहे असे बोलणे. तर मुख्य मुद्दा हा आहे की मौन पाळणे. या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज आहे ती म्हणजे सध्याच्या राजकारणातील वायफळ बडबड करणा-या नेत्यांना. खास करून महाराष्ट्रातील राजकारणी लोकांना.
खरं बघायला गेलं तर आपण निवडून दिलेला नेता किंवा विरोधी नेता हा त्या त्या भागातील लोकांचे प्रश्न, तेथील समस्या, त्या भागातील विकास या सगळ्याशी निगडीत असला पाहिजे. दिवस रात्र त्याच्या मनात माझ्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून दिलेल्या मताची किंमत हवी, जाणीव हवी, मदतीची म्हणजे योग्य सहकार्याची हमी असावी. परंतु कोणताही नेत्याला सध्या याचे काहीही पडलेले नाही. फक्त आणि फक्त तोंड उघडायचे आणि तोंडाला येईल ते बोलायचे. म्हणजे आपण काय बोलतो आहोत याचा विचारच नाही. खूप काही अभ्यास करता येण्याजोगे, काम करता येण्याजोग्या गोष्टी राजकारणी लोकांना करता येण्यासारख्या आहेत. पण त्या सोडून आपण प्रश्नाला उत्तर देत आपली बाजू मांडायची आणि पुन्हा दुस-याला प्रश्न विचारायचा. पुन्हा त्याने त्याचे उत्तर द्यायचे आणि परत प्रश्न. अरे काय चालू आहे हे?
तुम्ही फक्त जनतेला बांधील असले पाहिजे उत्तरे द्यायला आणि जनतेनेही त्यांना तसेच प्रश्न विचारले पाहिजेत. पण असो. सध्या आपला मुद्दा आहे तो मौनाचा. खरच आजचे गलिच्छ राजकारण टि.व्ही. चालू केला की– याने त्याला असे म्हंटले, त्याने त्याला असे म्हंटले हे ऐकवत नाही, पहावत नाही. मिडियालाही हेच हवे आहे. दिवसभर ब्रेकींग न्यूज म्हणून तेच दाखवत बसायचे आणि गैरसमज वाढवायचे. कोणताच पाचपोच उरलेला नाही. कोणतीच अभ्यासपूर्ण कृती नाही. विकासाची कोणतीच दिशा नाही आणि जनतेचे भले कुणालाच पचत नाही. अशी सगळी अवस्था झाली आहे. काय आदर्श ठेवणार आहोत आपण पुढच्या पिढीसाठी याची भिती वाटते आहे.
म्हणून माझी विठुरायाच्या चरणी आषाढी एकादशी निमित्त एकच प्रार्थना आहे की या बडबड करणा-या राजकारण्यांना निदान चातुर्मासातील चार महिने तरी मौन पाळायची बुध्दी दे. त्यामुळे मिडीयावालेही मौन पाळतील आणि आमच्यासारख्या आशेने त्यांच्या कडे पहाणा-या जनतेला थोडे दिवस तरी विकासाचे, सुखाचे येऊ देत.
☆ “जीवनाचे नवनीत पुरवणारा कृष्ण…” ☆ श्री संभाजी बबन गायके☆
जीवनाचे नवनीत पुरवणारा कृष्ण…
…अर्थात एका भारतीय जवानाचा पराक्रम !
सोळा जूनच्या दुपारच्या तीनचा सुमार. पंजाबातील भाक्रा-नांगल CANALच्या पाटातून अतिशय वेगाने पाणी वाहात होते. या पाटाच्या दोन्ही बाजुंनी लोकांची, वाहनांची ये जा सुरू होती.
पतियाला येथील सैन्य रुग्णालयाची एक मोटार आवश्यक अन्नधान्य घेउन शहरातून रुग्णालयाकडे येत होती. या मोटारीत नवनीत कृष्णा नावाचे सैनिकी जवान मागील आसनावर बसलेले होते.
नवनीत यांना या पाटाच्या कडेला शेकडो लोकांचा जमाव उभा राहून आरडाओरडा करताना दिसला. नवनीत यांनी चालकाला गाडी थांबवायला सांगितली आणि ते खाली उतरले.
एक तरुणी पाण्यात वाहून चाललेली आहे हे वाक्य कानावर पडताच नवनीत यांच्यातील भारतीय सैनिक कर्तव्यासाठी पुढे सरसावला. कारण बघ्यांच्या गर्दीतून कुणीही पुढे होत नव्हते, काहीजण मोबाईल चित्रीकरण करण्यात दंग होते. पाण्यात पडलेली तरुणी जीव वाचवण्यासाठी आकांत करीत होती.
नवनीत यांनी पाटाच्या कडेने वेगाने धावायला सुरुवात केली. पाण्याचा वेग त्या तरूणीला पुढे पुढे घेउन जात होता. नवनीत यांनी वेगाने धावत सुमारे शंभर मीटर्स अंतर कापले आणि अंगावरील पूर्ण गणवेशासह त्या पाण्यात सूर मारला.
पाण्यात बुडत असलेली व्यक्ती वाचवायाला आलेल्याला माणसाला जीवाच्या भीतीने मिठी मारण्याची शक्यता अधिक असते. या प्रयत्नात बुडणारा आणि वाचवणारा असे दोघेही बुडण्याची दाट शक्यता असते.
नवनीत यांनी आपले सारे कौशल्य पणाला लावून तिचे केस पकडले… तिच्यापासून सुरक्षित अंतर ठेवून, एका हाताने पाणी कापत कापत पाटाचा जवळचा किनारा गाठला.
बघ्यांची गर्दी आता मात्र मदत करण्याच्या भानावर आली होती. कुणी तरी एक मोठा दोरखंड पाण्यात फेकला. त्यामुळे नवनीत यांचे काम काहीसे सोपे झाले. काठावर पोहोचताच लोकांनी त्या तरूणीला वर ओढून घेतले…नवनीत मागाहून वर आले.
नाकातोंडात पाणी गेल्याने त्या तरूणीचा जीव धोक्यात होता. जवान नवनीत यांनी त्यांना भारतीय सैन्य सेवेत मिळालेले प्रशिक्षण उपयोगात आणले. त्या तरूणीला सीपीआर Cardio Pulmonary Resucitation दिला. त्यामुळे तिच्या जीवावरचे संकट टाळले.
नवनीत थोडेसे सावरले, कपडे चिंब भिजलेले. त्यांनी त्या तरुणीचे नावही विचारले नाही, त्याची काही गरजही नव्हती. The mission was over and successful!
काम झाल्यावर सैनिक पुन्हा बराकीकडे निघतात …जणू काही झालेच नाही अशा सहज आविर्भावात नवनीत आपल्या वाहनात बसून आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यासाठी फिल्ड हॉस्पिटल मध्ये परतले.
ऐनवेळी एका सैनिकाने स्वतःच्या हिंमतीवर हाती घेतलेल्या Rescue Operation च्या अगदी शेवटच्या काही क्षणांचे कुणीतरी चित्रीकरण करण्यात यश मिळवले होते. हे चित्रीकरण अल्पावधीत viral झाले. तेंव्हा कुठे नवनीत यांचा पराक्रम सर्वांना माहीत झाला.
अर्थात भारतात सर्वांनाच अशा गोष्टी समजतात, असे नाही. यथावकाश भारतीय सैन्यास ही माहिती मिळाली आणि सैन्याच्या महान परंपरेनुसार भारताच्या लष्कर प्रमुख साहेबांनी, चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल पांडे साहेबांनी या शूर शिपायास आपल्या कार्यालयात सन्मानपूर्वक बोलावून घेतले. गौरव चिन्ह देऊन त्याचा यथोचित गौरव केला.
नवनीत कृष्णा यांचे शौर्य, नि;स्वार्थ सेवा हे गुण कदर करण्यासारखेच आहेत. सेनेच्या सर्व विभागाच्या सर्व सैनिकांना आणि कर्मचाऱ्यांनाही आवश्यक ते सैनिकी प्रशिक्षण दिले जातेच.
सैनिक फक्त सीमेवरच नव्हे तर देशात जिथे जिथे गरज पडेल तिथे पराक्रम गाजवण्यास, प्रसंगी प्राणांची बाजीही लावण्यास सज्ज असतात…. संधी मिळताच सैनिक आपले कर्तव्य बजावून अलगद बाजूला होतात…. A soldier is never off-duty असे म्हणतात ते खरेच आहे.
नवनीत कृष्णा यांच्या पालकांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये नवनीत यांना शिकवले आणि सैन्यात प्रवेश करण्याच्या योग्यतेचे बनवले. नवनीत याबद्दल आपल्या पालकांविषयी अत्यंत कृतज्ञ आहेत.
नवनीत हे अत्यंत चपळ, धाडसी, काटक, आज्ञाधारक सैनिक असून अत्यंत उत्तम वाहनचालकही आहेत असे त्यांचे अधिकारी मोठ्या कौतुकाने सांगतात.
नवनीत हे मूळचे तामिळनाडू येथील रहिवासी आहेत. आपणा सर्वांना अशा या धाडसी जवानाचे कौतुक आहेच व रहायलाही हवे.
🇮🇳 जयहिंद. जय भारत. 🇮🇳
जय हिंद की सेना.
(माहिती आणि छायाचित्र इंटरनेटच्या सौजन्याने ! पाकिस्तानला शरण आणणाऱ्या भारतीय सैन्याचे छायाचित्र या सत्कार प्रसंगी घेतलेल्या छायाचित्रात मागे दिसते आहे. असे पराक्रम करणाऱ्या सैन्याचा सामान्य सैनिक हा भक्कम कणा असतात. त्यांचे यथोचित कौतुक व्हावे !)
माणूस जन्माला यायच्या आधी पासून साठा त्याच्याशी निगडीत आहे. मुलं जन्माला यायच्या आधी पासूनच आई त्याच्या साठी कपड्यांचा साठा करते. जन्मानंतर जसे वय वाढते आपण वेगवेगळ्या गोष्टीचा साठा करत जातो.
लहानपणी रेल्वेची तिकिटे, शंख शिंपले, बाटल्यांची झाकणे, रंगीत कागद, टरफले, काचांचे तुकडे अश्या विविध गोष्टी आपण साठवतो.
जसे वय वाढते साठवण्याचे प्रकार बदलत जातात.
शाळेत जायला लागलो की झाडाची पाने, वर्तमान पत्रातील व मासिकातील आवडीची कात्रणे, रंगीत सागरगोटे, स्टिकर्स, पत्ते, खोडरबर, पेन्सिली अश्या अनेक गोषटींबाबत आवड निर्माण होते.
तरुणपणी सौंदर्य सामुग्रिंचा साठा, कानातली, बांगड्या, टिकल्या, अत्तर, रुमाल, काही आवडत्या व्यक्ती चे फोटो, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, चपला व पुस्तकांचा आपण साठा करत असतो.
मधल्या वयात ह्यात आणखी बदल आढळतो जसे की सासरी गेलेल्या मुलीकडे नवीन कपडे, दागिने, भांडी, पर्स सारेच नवे नवे आणि हवे हवे असे असते.
पन्नाशीच्या आसपास हा साठा अजून बदलतो. पूर्वी बायका धान्याचा साठा करायच्या, तळणीच्या पदार्थांचा साठा नाहीतर मसाल्यांचा साठा करायच्या. स्वयंपाक घरात डब्यात पैस्यांचा साठा असायचा.
पन्नाशीच्या बायकांचा तर साड्या, दागिने, घरातील भांडी ह्यांचा साठा आपोआप झालेलाच असतो. त्यात अजून नाविन्य पूर्ण वस्तूंचा भर पडतो. पुरुषांच्या बाबतीत जसे की कपडे, चपला, पुस्तके, पेन व पाकिटं ह्या वस्तूंचा साठा आढळतो.
जसे जसे वय वाढते तसे तर आपण आपल्याकडचा साठा कमी करायला पाहिजे पण तो वाढतच जातो मग तो पैश्याचा असो नाहीतर आणखी काही.
वृद्ध व्यक्ती औषधांचा साठा करतात. त्यातील काही पुस्तकांचा, छायाचित्रांचा तर काही वर्तमान पत्राच्या कात्रणांचासंग्रह करतात. काहिंकडे पिशव्या, टॉवेल आणि पैष्यांचा साठा असतो.
नवीन पिढीला वस्तु साठवायला आवडत नाही. ते जुन्या वस्तू काढून नव्या घेत असतात. म्हणजे जुना साठा संपतो आणि नवीन वस्तूंचा साठा सुरू होतो.
असा सर्व गोष्टींचा साठा करत एक दिवस जेव्हा आपल्याला हे जग सोडून जायची वेळ येते तेव्हा आपण आयुष्यभर जपलेल्या ह्या वस्तू दुसऱ्यांसाठी निरुपयोगी ठरतात.
कधी कधी विचार येतो माणसाला सर्व वस्तू वर घेवून जाता आले असते तर त्याने किती वस्तु साठवल्या असत्या.
खरं तर आपण चांगल्या विचारांचा, कृतींचा आणि आरोग्याचा साठा केला तर आपण आपले आयुष्य अधिक सुखकारक रित्या जगू शकू……
☆ “इच्छामरण…” – भाग-२ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
( फार मोठी चूक करत होतो मी–आणि त्यासाठी त्या सगळ्या थोर पुरुषश्रेष्ठांची अगदी मनापासून क्षमा मागतो मी ताई…) -इथून पुढे.
‘ पण मग, धर्माचा आधार न घेताही, आपल्याला असणा-या असाध्य, असह्य अशा शारिरीक व्याधींपासून सुटका करणारा दुसरा कोणताच मार्ग शिल्लक नाही म्हणून कुणी मरणाची इच्छा केली तर त्यात फार काही वावगे आहे असे नाही, असे माझे म्हणणे आहे. ’
‘ अर्थात् अशा इच्छामरणासाठी काही अटी असाव्यात, जसे की, त्या व्यक्तीला खरोखरच दुर्धर असा आजार आहे, जो औषधोपचारांना दाद देत नाही आहे, आणि कधीच देणार नाहीये, पुरेसा काळ त्या व्यक्तीवर योग्य ते व जास्तीत जास्त शक्य ते सर्व उपचार करून झालेले आहेत आणि आता केवळ मरणाची वाट पहात सहनशक्ती पणाला लावणे एवढेच करण्यासारखे आहे. या सर्व गोष्टी पडताळून पाहून त्यांची खातरजमा करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची अधिकृत समिती सरकारने स्थापन केलेली असावी, ज्यांनी अशा व्यक्तीच्या प्रकृतीची त्रयस्थपणे पूर्ण तपासणी करून, आजारपणाच्या दुर्धरतेबद्दल खात्रीपूर्वक दुजोरा दिलेला असावा. आजारी माणसाने पूर्ण शुद्धीवर असतांना, त्रयस्थ साक्षीदारांसमोर आपली मरणेच्छा आपणहून मनापासून जाहीर केलेली असावी. किंवा आजारी माणूस पूर्ण बेशुध्दावस्थेत बराच काळपर्यंत असेल, आणि त्यातून बाहेर येऊन तो काही बोलेल याची डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अजिबात शक्यता नसेल, तर त्याच्या अगदी निकटच्या अशा मुला-माणसांनीही केवळ त्या व्यक्तीवरील प्रेमापोटी याबाबत विचार करण्यास हरकत नसावी. पण त्यांच्या या विचारामागे कोणतेही आथिक किंवा इतर व्यवहार गुंतलेले नाहीत याची स्वतंत्रपणे, अगदी व अधिकृतपणे शहानिशा करण्याची तजवीज कायद्याने केलेली असावी.’
‘ सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इच्छामरणाला परवानगी देण्यापूर्वी, ज्याला मरायचे आहे, त्याचीच फक्त तशी इच्छा आहे, इतर कोणाचीही नाही, याची पूर्ण खात्री करून घेणे सर्वात जास्त आवश्यक आहे. अर्थात् मरणासन्न अवस्थेत नेऊन पोहोचविणा-या ‘असाध्य’ शारीरिक व्याधीतून सुटण्यासाठीच केवळ ‘इच्छामरण’ हा पर्याय मान्य करता येण्याजोगा आहे. म्हणजेच कोणत्याही कारणामुळे आलेल्या मानसिक वैफल्यातून केलेल्या आत्महत्येला कधीही इच्छामरण म्हणता येणार नाही हे सर्वप्रथम स्पष्ट असावे…‘
बोलता बोलता हा भाऊ जरा थांबल्यावर दुसरा भाऊ लगेच बोलायला लागला. पहिल्याचे बोलणे एकदम खोडून काढत तो म्हणाला की …. ‘ कारण कोणतेही असले आणि कितीही नियमांमध्ये व अटींमध्ये बसत असले, तरी इच्छामरण म्हणजे शेवटी आत्महत्याच, जी अजिबात समर्थनीय नाही. जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी माणसाच्या हातात नाहीत. जन्माबद्दल तर काही प्रश्नच नाही, पण मृत्यूसुध्दा माणसाने असा ठरवून मागून घेणे, जरी शक्य असले तरी, अजिबात बरोबर नाही. कारण जन्माला येतांना जेवढ्या श्वासांची शिदोरी त्याने बरोबर आणली होती तेवढे श्वास घेऊन झाल्याशिवाय मरणे म्हणजे आत्म्याला अगदी ठरवून अतृप्त भरकटत ठेवण्यासारखे आहे. जे भोग भोगण्यासाठी हा जन्म मिळाला आहे, ते सर्व भोगल्याशिवाय मरण येऊच नये. ईश्वरी इच्छा नसतांना, स्वत:च्या इच्छेने मरण यावे यासाठी प्रयत्न करणे हे मोठे पापच आहे. म्हणून कुणालाही इच्छामरणाची मुभा नसावी. मरणासन्न असणा-या आजा-यालाही मरणाचा योग येईपर्यंत मरणयातना सोसण्याचा भोग भोगायलाच हवा, आणि हो, त्याची सेवा करणा-यांनीही, अशी सेवा करणे हा त्यांचा भोग आहे असे समजून शांतपणे सेवा करीत रहावे. इच्छामरण हा विचारही नको. ’
दोन सख्ख्या भावांच्या या दोन टोकाच्या विचारांवर विचार करता करता माझे मन मात्र तिसरीकडेच भरकटत होते. आपल्या आजूबाजूचे आजकालचे भीषण वास्तव पहाता, सर्व जीवनावश्यक वस्तूंमधली सर्वात स्वस्त व सहजपणे उपलब्ध होणारी वस्तू म्हणजे ‘माणसाचा जीव’…. असे माझ्यासारख्या सर्वांनाच जाणवत असेल. कितीही काळजीपूर्वक आणि पूर्ण सुरक्षित वाटणारी कायदेशीर तरतूद करून, सर्वसमावेशक अटी घालून, इच्छामरणाला अधिकृत परवानगी जरी दिली, तरी, हे नियम पाळले असे भासवण्यासाठी आवश्यक तो भ्रष्टाचार करून, एखाद्या व्यक्तीने इच्छामरण स्वीकारले असल्याचा देखावा निर्माण करून, आपल्या स्वार्थासाठी त्याला जिवे मारायचे आणि स्वत:च छाती पिटत त्याची अंत्ययात्रा काढायची, अशी नवीच कायदेशीर पळवाट तर गुंडांना मिळणार नाही ना, हीच भीती माझ्या मनात सर्वप्रथम आली. आणि इच्छामरणाला परवानगी म्हणजे एखाद्या असहाय्य जीवाला आपल्या असाध्य दुखण्याच्या यातनांमधून सोडविण्याची मुभा, एवढाच अर्थ न रहाता, ‘ नको असणा-या कोणालाही खात्रीशीर ‘संपविण्याचा’ कायदेसंमत राजमार्ग ‘ असा त्याचा सोयीस्कर वापर होण्याचा फार मोठा धोका त्यात आहे हे मला प्रकर्षाने जाणवून गेले. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ म्हणतात ते असं ! पण तरीही, माझ्या आईसारखी प्रकृतीची अवस्था असणा-यांना, माणुसकीच्या नात्याने, निव्वळ प्रेमापोटी – दयेपोटी इच्छामरणाची परवानगी असायला हवी हा विचार आधी वाटला तेवढा क्रूरपणाचा नाही, या विचाराकडे मात्र माझे मन नकळतच झुकू लागले होते.
आईबद्दल हा असा विचार मनात येताच, बोलणे तिथेच थांबवून मी झटकन् उठून खोलीकडे निघाले, तर नर्स आम्हाला बोलवायलाच येत होती. डॉक्टर आधीच आईजवळ पोहोचले होते. आम्हाला पाहताच डॉक्टरांनी नजरेनेच आम्हाला सत्य सांगितले. आमची आई आम्हाला कायमची सोडून गेली होती. तिच्या मरणेच्छेवर आम्ही विचारांचा खल करत बसलो होतो, पण देवाने मात्र तिची ती मनापासूनची इच्छा अखेर पूर्ण केली होती.
मनाच्या त्या अतीव दु:खी आणि हतबल अवस्थेतही मला प्रकर्षाने वाटून गेले की खरंच, मुलांना कधीही कोणताही त्रास व्हायला नको यासाठी आयुष्यभर दक्ष असणा-या आईने, आत्ताही ती काळजी घेतली होती. डॉक्टरांनी आमच्यासमोर टाकलेला जीवघेणा पेच, आम्ही त्यात अडकून गेलोय् हे पाहून, तिनेच नेहेमीसारखा सहजपणे सोडवून टाकला होता. आता आम्हाला करण्यासारखे काहीच उरले नव्हते…….
… तरीही मनात एका प्रश्नाचा भुंगा फिरायला लागलाच होता…… आईच्या मृत्यूला ‘ नैसर्गिक मृत्यू ‘ म्हणायचे, की …. तिच्या अंतर्मनात ठामपणे घर करून राहिलेल्या मरणाच्या विचाराचा विजय झाल्याने आलेले हे प्रामाणिक आणि अगदी मनापासूनचे “ इच्छामरण “ म्हणायचे हा ?????
– समाप्त –
प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈