मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शुद्ध अंतःकरण… ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ शुद्ध अंतःकरण… ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

एकदा स्वामी विवेकानंद बोटीने प्रवास करण्यासाठी बोटीत चढले. बोट सुटायला अजून अवकाश होता, तोच त्यांना त्यांच्या गुरू रामकृष्णांचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू आला. ते विवेकानंदाना सांगत होते की “तू लगेच खाली उतर. ह्या बोटीने जावू नकोस .”

गुरूचीच आज्ञा ती, विवेकानंद लगेच खाली उतरले आणि बोट सुटली. त्यांना समजेना,गुरूजींनी त्यांना कां उतरवलं त्या बोटीतून? पुढे जाऊन ती बोट त्या प्रवासात बुडाली व सर्व प्रवाशांचा अंत झाला. विवेकानंदाना अतिशय वाईट वाटले. प्रवास संपवून ते जेव्हा रामकृष्णाना परत भेटले तेव्हा ते म्हणाले, “गुरुजी, तुम्ही मला वेळीच सावध करून माझे प्राण वाचवलेत खरे, पण ते इतर प्रवासीही माणसंच होती की. तुम्ही तर विश्वरूप आहात.

मग तेच प्रेम सर्व प्रवासी व तो बोटवाला ह्यांच्या बाबतीत का नाही दाखवलेत…?   का नाही त्याना हाक मारलीत…?    का नाही त्यांना सावध केलंत आणि वाचवलंत… ? “

रामकृष्ण म्हणाले,  “अरे मी असं करीन का..?   तेही माझेच होते. मी त्यांना पण ओरडून सांगत होतो, पण त्यांना माझा आवाज ऐकू आला नाही. ते आपल्या अहंकारात मदमस्त होते. तुझं अंत:करण शुद्ध आहे, म्हणून तुला माझा आवाज ऐकू आला.’ “

परमेश्वर काय किंवा सद्गुरू काय, आपल्या हृदयातच असतात. ते सतत आपल्याला योग्य काय, अयोग्य काय सांगत असतात. पण आपण आपल्याच मस्तीत एवढे दंग असतो, ह्या विषयवस्तूंच्या संसारात एवढे व्यस्त असतो, की त्यांचा आवाज ऐकूच येत नाही व मग त्याची बरीवाईट फळंही भोगावीच लागतात.

आपल्या अंत:करणशुद्धीसाठीच तर सेवा, सत्संग व साधना असते.

हे ऐकताच विवेकानंदांनी रामकृष्णांना साष्टांग प्रणाम केला.

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वैचारिक स्वावलंबन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “वैचारिक स्वावलंबन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

लोकरंग च्या पुरवणी मधील एक खूप मस्त आणि मुख्य म्हणजे खरोखरीच विचारात पाडणारा लेख शनिवारी  चतुरंग ह्या पुरवणीत वाचनात आला. हा लेख “वळणबिंदू” ह्या सदराखाली डॉ. अंजली जोशी लिखीत “वैचारिक स्वावलंबन” ह्या नावाचा.  विशेषतः पालकत्वाची सुरुवात होतांना पासून हातपाय थकल्यावर देखील तेवढ्याच सुरसुरीनं पालकत्व निभावणा-या पालकांसाठी तर खास भेटच.

“स्पून फिडींग” ,पाल्याची अतिरिक्त टोकाच्या भूमिकेतून घेतलेली काळजी पाल्यांना कुठलाही अवयव बाद न होता कसे पंगू करुन सोडते हे परखड सत्य ह्या लेखातून चटकन उमगतं, आणि मग खोलवर विचार केल्यानंतर त्यातील दाहकता जाणवते.

खरोखरीच मुलं ह्या जगातल्या तलावात पोहोचतांना त्यांना बुडू नये म्हणून पालकत्वाचं रबरी टायर न चुकता बांधून द्या व लांबून काठावरुन त्यांच्याकडे काळजीपूर्वक बघतांना त्यांचे त्यांना पोहू द्या, कधी गटांगळ्या खाऊ द्या, अगदी काही वेळा थोडं नाकातोंडात पाणी जावून जीव घाबरु द्या, पण हे होऊ  देतांना एक गोष्ट नक्की …. आपला पाल्य हा तावूनसुलाखून, अनुभव गाठीशी बांधून पैलतीर हा यशस्वीपणे गाठणारच, आणि मग तो विजयाचा आनंद  तुम्हाला आणि तुमच्या पाल्यांना कितीतरी पट सुखं देऊन सुवर्णक्षणांची अनुभूती देऊन जातो. 

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे – प्रसंगी अपत्यांच्या कुबड्या बनण्यापेक्षा त्याच्या मनाला उभारी देणारी संजीवनी पुरवा.

मी तर सांगेन हा लेख नीट विचारपूर्वक वाचल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने स्वतःच स्वतः ला प्रश्न विचारायचा की … ड्रेस कुठल्या रंगाचा घालू ह्या अगदी साध्या प्रश्नापासून, ते लग्नासाठी आपल्याला नेमका जोडीदार कसा हवायं ह्या गहन प्रश्नापर्यंत, आपण आपल्या मनाने, स्वतंत्र विचारशक्तीने किती निर्णय घेतलेत ? त्यापैकी किती निर्णय तडीस नेलेत ? ह्या तडीस नेलेल्या आपल्या स्वतंत्र मतांमुळे, किंवा तडीस न नेता केवळ दुसऱ्यांच्या ओंजळीने कायम पाणी प्यायल्यामुळे, आपले नेमके नुकसान झाले की फायदा झाला ? .. आणि तो नेमका किती झाला ? …..  ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर आपल्याला नेमक्या वस्तुस्थितीची जाणीव होईल आणि मग अभ्यास वा विचारांनी बनवलेली स्वतंत्र स्वमतं, स्वकृती किती महत्त्वाची असते आणि ती आपल्या जीवनात किती चांगला आमुलाग्र बदल करते हे पण कळून येईल. 

तेव्हा डॉ अंजली जोशी ह्यांचा चतुरंग पुरवणीमधील “वैचारिक स्वावलंबन” हा लेख तुम्हाला मिळाला तर जरूर स्वतः आधी वाचा आणि मग आपल्या पाल्यांना पण वाचायला सांगा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जीवनसे भरी तेरी आंखे !” —☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? मनमंजुषेतून ?

☆ “जीवनसे भरी तेरी आंखे !—  ☆ श्री संभाजी बबन गायके 

तुझ्या डोळ्यांत पाहू जाता !

जीवनाची उत्पत्तीच पाण्यातून झाली असल्यानं पाण्याला जीवन म्हणणं तसं सयुक्तिकच ! वारि, नीर, तोय,सलिल,अंबु,उदक,जल ह्या अन्य नावांनीही तृषातृप्ती करणारं हे द्रव जेंव्हा डोळ्यांतून स्रवणा-या अश्रूंचं आवरण घेऊन वाहू लागतं तेव्हाच पाण्याचा आणि जीवनाचा अर्थ खोल आहे, याची जाणिव होऊ लागते.

तुझ्या डोळ्यांतलं पाणी म्हणजे जीवनच जणू. या जीवनाच्या ओलाव्यानेच तर तुझी नेत्रकमळं सदोदित ओली दिसतात…पापण्यांवरचे दंवबिंदु मोत्यांसारखे चमकत असतात सकाळच्या कोवळ्या उन्हांच्या तिरीपेत. माझ्या जगण्याचा डोह आता मरणासन्न आहे….तप्त सूर्य या डोहातले शेवटचे थेंब शोषून घ्यायचा कंटाळा करतोय बहुदा. त्याला काही एकच डोह शुष्क करायाचा आहे थोडाच! जगभरातले सर्व सागर,सर्व जलाशय त्याच्याच तर धाकात जगत असतात.

का जगावं असा यक्षप्रश्न सतत शिल्लक पाण्याच्या अंतरंगात ठिपकत असतो सारखा…तेव्हा जगण्याला उभारी तरी का म्हणून यावी? पण तुझे हे डोळे….जगण्याचा किनारा सोडून दूर जाऊ देत नाहीत .

सागराला तसं काय कमी आहे गं? सर्व खळाळत्या नद्या त्याच्याच तर बाहुपाशात विसावतात अखेरीस….येताना मातीला धावती आलिंगनं देत आलेल्या असल्या तरी. त्यांचे सुगंधी श्वास तर त्याच्याच अंगणात भरती-ओहोटीचा फेर धरून नाचत असतात की. किना-यावर येण्याचं नुसतं नाटक…त्यांना परत त्याच्याच कडे जायचं असतं हे काय कुणाला ठाऊक नाही होय? पण हा सागरही तुझ्या रूपाच्या रसाची आस बाळगून असतो…..म्हणूनच तर पुनवेला दोन पावलं पुढं येत असतो….न चुकता. आणि रुसून माघारीही जातो कोस दोन कोस !

तुझं रूप रंग-रेषांच्या क्षितिजावर मावत नाही, आकारांचे बांध तुझ्या रुपाला अडवून ठेऊ शकत नाही…तुझं हुबहू चित्र कोण कसं आणि कधी काढू शकेल, देव जाणे ! आणि तुझ्या वर्णनासाठीचे शब्द, त्यांना बद्ध करणारे छंद-वृत्त कवींना सुचावेत तरी कसे? तुझं रूप शब्दांना, चित्रांना कायमच अनोळखी राहून जातं…त्यांचा शोध सतत सुरू असला तरी.

काळजाला जागं ठेवणारे श्वास आणि त्याची आवर्तनं आहेस तू . तू आहेस म्हणून हृदय धडधडतं आहे त्याच्या अधीर वेगानं आणि तुझ्या रुपाच्या आवेगानं. तू  म्हणजेच जगणं, तू म्हणजेच जगत राहणं…अविरतपणे.

तुझ्या श्वासांच्या सुगंधाला मधुबनाचं कोंदण लाभलंय…आणि तुझे बाहुपाश…पाश नव्हेत कमलदलेच जणू. त्यातून स्वतंत्र होण्याचा विचारही मनाला शिवत नाही. अपार पसरलेल्या नभात तुझा मुखचंद्र म्हणजे किरणांची पखरणच जणू. या किरणांच्या उजेडात जीवनाचा अंधार विलुप्त होऊन जावा ! हिरव्यागर्द हिरवळीतून तुझी पावलं एखाद्या हरिणीच्या वेगाशी लीलया स्पर्धा करतील अशी नाजूक आणि तितकीच चपळ. तू गोड गोजि-या हरिणांच्या सोबत चार पावलं जरी चाललीस तरी त्यांच्यातलीच एक दिसशील…..गोड !

आयुष्याच्या धकाधकीत काळजाला पडलेल्या चिरा तशाच राहतात…ठसठसत. या जखमांना टाके घालणं म्हणजे आणखी वेदना पदरात पाडून घेण्यासारखं…दुखणारं. पण तुझ्या पदराचा एक धागाही पुरेसा होईल हे जीवनवस्त्र पुन्हा होतं त्या रूपात पाहण्यासाठी….तुझ्या डोळ्यांतील जीवन पाहून का नाही कुणाला पुन्हा जीवनाच्या सावलीत विसावा घ्यावासा वाटणार? हे तर हवेहवेसे वाटणारे बांधलेपणच ! जोपर्यंत तुझ्या डोळ्यांतल्या जीवनाचा निर्झर खळाळत राहील…तोवर माझं आयुष्य वहात राहील…तृप्ततेच्या आभाळाखाली !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आपली आडनाव पडली तरी कशी? – भाग-2 ☆ प्रा. डॉ. सतीश कदम ☆

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ आपली आडनाव पडली तरी कशी? – भाग-2 ☆ प्रा. डॉ. सतीश कदम ☆

(पूर्वीपासून आतापर्यंत सर्व इतिहास…) 

इतर सेवेबरोबरच धार्मिक सेवा करण्याकरिताही इनाम देण्यात आले. गावात गुरव आणि मस्जिदीकरिता मौलवींना वतन मिळाले. पूजाअर्चा आणि भाकित वर्तविण्याकरिता जोशी वृत्ती आली. त्यातून ग्रामजोशी, कुडबुडे जोशी हे प्रकार आले. गावचा आणखी एक महत्त्वाचा वतनदार म्हणजे महार वतन, ज्याला हाडकी हाडोळा’ म्हटले गेले. कोतवाल, जागल्या व येसकर ही गावकामे महाराकडे होती. गावच्या संरक्षणाची जबाबदारी महार आणि मांग अशा दोन्ही समाजाकडे असली तरी सरकारकडून वतन मिळाले फक्त महारांनाच. छत्रपती शिवरायांनी तर आपल्या नातलगाला वगळून वाई गावचे वतन एका महाराला दिल्याची नोंद सापडते.

गाव वाढला की व्यापार वाढला आणि त्यातून गावात स्वतंत्र पेठ हा भाग निर्माण झाला. या पेठेची व्यवस्था लावण्याकरिता शेटे आणि महाजन हे वतनदार आले. त्यांच्याकडे बाजारपेठेशी निगडित सर्व व्यवस्था आली. प्राचीन काळी गाव हा स्वयंपूर्ण घटक होता. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे करण्याकरिता आलुतेदार आणि बलुतेदार आले. पारंपरिक कामगार म्हणजे आलुतेदार. ज्यामध्ये जंगम, गोंधळी, कोळी, सुतार, सोनार, शिंपी, माळी, गोसावी, तांबोळी, घडशी, तेली, वेसकर यांचा समावेश होता. तर बलुतेदार म्हणजे मोबदला घेऊन सेवा देणारे. यात जोशी, भाट, गुरव, सुतार, लोहार, कुंभार, मुलाणी, न्हावी, परीट, मांग व चांभार. गावची शेती व त्याला एक मानून त्या शेतीचे म्हणजे गायीचे वाटेकरी म्हणजे आलुते-बलुते आले. त्यांच्या दर्जानुसार त्यांना पहिली कास, दुसरी कास, तिसरी कास याप्रमाणे मोबदला मिळायचा. अर्थात त्यांचा मोबदला धान्याच्या स्वरूपात होता. एका नांगरामागे दोन पाचुंदे, तीन पाचुंदे बलुतेदारांना खळ्यावरच द्यावे लागायचे. अर्थात गरिबांना त्याची स्वत:च रास करावी लागायची. आताचे सरकार थेट धान्यच देते. चलनवापर नगण्य होता. परंतु तेही सोन्या-चांदीचे असल्याने त्याची पारख करण्याकरिता सोनार घेण्यात आला. त्याला पोतदार म्हटले गेले.

दहा पाटलांवर अर्थात गावावर एक देशमुख आला. देश आणि मुलुख आणि मुख म्हणजे प्रमुख अर्थातच त्याला ‘हेड ऑफ द डिस्ट्रिक्ट’ म्हटले गेले. अनेक गावचा परगणा तयार व्हायचा. त्याचा अधिकारी म्हणजे देशमुख. नवीन वसाहत वसविणे, मुलकी आणि लष्करी व्यवस्था लावणे, पाटलांकडील महसूल सरकारमध्ये जमा करण्याचे काम करावे लागे. याचबरोबर आपल्या परगण्यात वसूल आणि शांतता अशा दोहोंची जबाबदारी पाटलांवर होती. शिवाय राजाला गरज पडल्यास ससैन्य त्याच्यासोबत स्वारीवर जावे लागे. त्यामुळे संरक्षणातून व उत्पन्नातून पाटलांचे वाडे तर देशमुखांच्या गढ्या निर्माण झाल्या. नोंद ठेवण्याकरिता देशपांडे पद निर्माण झाले. देशपांडेच्या हाताखाली मोहरीर म्हणजे मदतनीस असायचा. त्यांना इतरही अधिकारी मदतीला आले. वतनदारीची पद्धत प्राचीन असली तरी १६१४ ला निजामशाहीचा प्रधान मलिक अंबरने यात सुसूत्रता आणून महसुलाचे अधिकार गावांना दिल्याने खेडी स्वयंपूर्ण झाली. परंतु वतनदारांचा वरचढपणा वाढला. कान्होजी जेधे, बाजी पासलकर, कोयाजी बांदल यासारखी सर्व मंडळी आदिलशहाची जहागिरदार असूनही स्वराज्यासाठी त्यांनी वतनावर पाणी सोडले. शिवरायांनी देशमुखीला वठणीवर आणताच अनेकजण त्यांच्या विरोधात गेले. पुढे छत्रपती राजारामांनी परत वतनदारी सुरू केली तेव्हा स्वातंत्र्यलढ्याला जोर आला.

देशमुख, देशपांडेच्या हक्कांना रुसूम आणि भिकणे म्हटले जायचे. यांना मदतीसाठी णीस म्हणजे कारकून अर्थातच चिट (स्टेनो), फड (मुख्य कार्यालय) ही विविध पदे निर्माण झाली. कर्नाटकात याला नाडगावुडा किंवा नाडकर्णी म्हणतात. एकूण उत्पन्नाच्या वसुलीतून देशमुखांना २० टक्के तर पाटलांना १० टक्के वाटा असायचा. पाटील आणि देशमुख वरवर स्वयंपूर्ण दिसत असले तरी सरकारी अधिकारी मामलेदाराची तपासणी करताना त्यांना कसरत करावी लागायची. परंतु एकदा त्याला खुश केले की, ही मंडळी राजाच. छत्रपती शिवरायांनी या वतनदारावर विसंबून न राहता कमाविसदार, महालकरी, सुभेदार असे स्वतंत्र अधिकारी नेमून राज्याची व्यवस्था लावली.

पुढे इंग्रजांनी १८७४ ला बलुतेदारी, १८७९ ला रयतवारी बंद केली तर स्वातंत्र्यानंतर १९५५ ला एका कायद्यानुसार संपूर्ण वतनदारीच संपुष्टात आली. वाडे, गढ्या, हक्क, मानमरातब जाऊन वतनदार रोजंदारीवर आले. परंतु पाटील, कुलकर्णी अथवा अशा सर्वच वतनदारांनी आपले मूळ आडनाव तेच का ठेवले समजत नाही . 

हा आडनावाचा महिमा भारतातच नाही तर जपानमध्येही सापडतो. त्यानुसार तानाका (शेतीच्या मध्यभागी असणारा), यामादा (डोंगरावर शेती करणारा), हायाशी (जंगलातला ) अशी आडनावे आहेत. 

असा हा वतनातून आडनावाचा महिमा मोठा आहे हेच खरे.

– समाप्त – 

© प्रा. डॉ. सतीश कदम

इतिहास संशोधक,व्याख्याते

मो.क्र.9422650044 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दृष्टीकोन… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ दृष्टिकोन… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

तिच्या लग्नाला पंचवीस वर्षे होऊन गेली. न्याहारीकरता एक दिवस तिने शिरा केला. शिरा करता करता तिच्या मनात विचार आला, ‘‘गेल्या पंचवीस वर्षांत आपण सर्वांना गरम गरम शिरा दिला आणि स्वतः मात्र खरवडीसह उरलेला शिराच खाल्ला. आज गरम गरम शिरा आपण घ्यायचा आणि उरलेला शिरा व खरवड नवऱ्याला द्यायची.’’ कारण तिला खरवड मुळीच आवडत नसे. शिरा खाता खाता नवरा तिला म्हणाला, ‘‘आज खरा आनंद येतोय. लहानपणापासून खरवड मला खूप आवडते. आम्ही त्याकरता भांडायचो. पण, खरवड नेहमी तूच घ्यायची. तुलाही आवडत असल्यामुळे मी कधी मागितली नाही.’’

बायकोच्या डोळ्यांत नकळत पाणी आले. प्रसंग खूपच साधा. आपण आपल्या दृष्टिकोनातून विचार करत असतो.पण, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते.एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा, विचार करण्याचा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असतो…

अनेकदा तो आपल्या अनुभवामुळे, विशिष्ट परिस्थितीमुळे बनलेला असतो… त्यावर माणसे ठाम असतात… खरे तर त्यात बदल करण्याची गरज असते… विभिन्न दृष्टिकोनातून पाहायला शिकले पाहिजे… म्हणजे मग तो विकसित होतो… जाणिवा व्यापक आणि समृद्ध होतात… ‘माणूस समजणे सोपे जाते…दृष्टिकोन म्हणजे नकाशा.

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वहीचे एक पान…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “वहीचे एक पान…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

काही शब्द लक्षात राहतात. ते कायम एकमेकांच्या सोबतच असतात. किंवा त्याच पध्दतीने ते म्हटले, वाचले, किंवा लिहिले जातात. जसे दिल, दोस्ती, दुनियादारी. किंवा अन्न, वस्त्र, निवारा. सत्यम, शिवम, सुंदरम्. तन, मन, धन. तसेच वही म्हटले की पुस्तक, आणि शाळा हे शब्द आपोआप डोळ्यासमोर येतात.

आपल्या शाळेतील ती पाच सहा वर्षे म्हणजे माझ्या आयुष्यातील लक्षात राहण्याचा वेधक आणि वेचक काळ.

पुस्तक हे आपल्याला शिकवते. ते आपलं जरी असलं तरी आपण शिकण्यासाठी दुसऱ्याने मेहनत घेऊन ते तयार केलेलं असतं.

पण वही ही आपली असते. या वहित दोन प्रकार असतात. एक प्रत्यक्षात असते. आणि दुसरी असते पण दिसत नाही.               

आपण काय शिकलो हे  वहीत उतरवतो. शाळेच्या वह्या यात प्रश्नोत्तराच्या, गणिताच्या, निबंधाच्या या पुढल्या वर्षी जवळपास रद्दीतच जात असत. 

पण अदृश्य वही जी अद्याप माझ्या स्मरणात आहे. आणि त्यातले अक्षर अन् अक्षर, शब्द, आणि ओळ आजही मी न अडखळता वाचु शकतो. किंवा आज तो माझा विरंगुळा आहे. माझा आनंद आहे. आणि बऱ्याच प्रमाणात माझी संपत्ती. अशी वही म्हणजे मित्रपरिवाराची वही. हि वही रद्दीत जाणे शक्यच नाही. उलट जसजशी ती जुनी होते, तसतसे तिचे मुल्य वाढत जाते. ती जीर्ण होईल पण टाकाऊ होणार नाही हा विश्वास आहे.

कोणतीही गोष्ट उतरवण्यासाठी ती अगोदर मनात असणे गरजेचे असते. मनात असलेल्या गोष्टीत आपलेपणाचा ओलावा असतो. तर नसलेल्या गोष्टी उतरवायचा प्रयत्न केल्यास त्यात कोरडेपणा असतो. आणि अशी माझी मित्रपरिवाराची वही ज्यात फक्त आपलेपणा आणि ओलावा असल्याने कायम ताजी टवटवीत जाणवते.                    

हि वही चाळतांना एक वेगळाच चाळा मनाला लागतो. हाच चाळा म्हणजे आपण सोबत एकत्र घालवलेले दिवस आठवणे.  

माझ्या या अदृश्य वहित प्रश्न नाहीत, तर आठवणींची साठवण आहे. गणिते नाहीत, तर पडलेली गणिते सोडवण्याची पद्धत आहे. शुद्धलेखनाच्या चुका नाहीत, तर चुकू नये म्हणून मैत्रीचा सल्ला आणि विश्वास देणारे आहेत. धीर देणारे आणि मदत करणारे हात आहेत. थोडक्यात जिथे उत्तर, सल्ला, विश्वास, आणि हात असतो त्यालाच आपण साथ म्हणतो. म्हणून यात आठवणींची साठवण आहे.

हे दिवस आठवले की अनेक गमती,जमती. राग, रुसवे. कट्टी, बट्टी. पास, नापास. हुशार, मठ्ठ. अभ्यास, मस्ती. अशा शब्दांच्या जोड्या तोंडातून बाहेर पडतात.

आपल्यासारखी पायी, किंवा क्वचित सायकलवर एकत्र शाळेत जायची मजा हि आजच्या स्कुलबस मध्ये कदाचित नसावी.

बऱ्याचदा मला काय मिळाले? किंवा मी काय मिळवले? असा प्रश्न पडतो. हाच प्रश्न उलट विचारला मी काय आणि कोणामुळे मिळवले? तर त्याचं उत्तर एकच आहे. ते उत्तर म्हणजे शाळा.

शाळा म्हणजे अनेक खोल्या असणारी भव्य इमारत नव्हे. तर माणूस घडवणारे मंदिर असते. यात शिक्षक नावाचा पुजारी असतो. विद्यार्थी नावाचा भक्त. आचार, विचार, आणि संस्कार यांचा प्रसाद,तर सदाचार आणि प्रामाणिक पणा यांचे तिर्थ असते. बुद्धी, शक्ती, विश्वास, आणि सामर्थ्य देणाऱ्या देवतांची पुजा होते.

असे हे माझ्या वहिचे एक पान आहे जे भगिरथ शाळा आणि १९८१ च्या १० वीच्या वर्गमित्र आणि शिक्षकांमुळेच लक्षात आहे, आणि राहिलं…

(१० वी चा वर्गमित्र ::: शाळेतील मित्रांचे झालेले गेट टुगेदर या नंतर २०२२ मध्ये लिहीलेले…) 

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पसारा…लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

☆ पसारा…लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

शेजारणीने आवाज दिला म्हणून बायको कुकर लावून शेजारी गेली …. 

.. म्हणाली ३ शिट्या झाल्या की बंद करा गॅस .. वर टाकीतही पाणी भरतंय, लक्ष असू द्या .. मोटर बंद करा वेळेत …  मी म्हटलं हो ..

इतक्यात नळाला पाणी आलं .. लगेच धावत जाऊन बादली नळाखाली धरली धावताना शेंगदाण्याचा डबा उपडी झाला .. शेंगदाणे जमा करीतच होतो, इतक्यात कुकरची पहिली शिटी झाली .. अचानक झाली त्यामुळे दचकलोच .. 

झटकन मागे गेल्यामुळे दळून आणलेल्या पिठाची पिशवी कलंडली , आणि त्या सांडलेल्या पीठात कोथिंबीर, टोमॅटो, लिंबू, भाज्या, गोऱ्यापान झाल्या .. 

काय करावं ? सुचेना ….  

परत नळाखाली भरत असलेल्या बादलीची आठवण झाली. लगबगीने बादलीकडे गेलो तर अजून बादली भरली नव्हती … 

पुन्हा शिटी झाली … पटकन गॅस बंद केला. नंतर लक्षात आलं …  दुसरीच शिटी होती ती .. 

लाईटरने गॅस पेटवायला भीती वाटते .. मग माचीस घेतली .. १, २, ३ श्या ! माचीस काड्या फुकट गेल्या .. मग काय आधी कंटाळा केला ते केलं .. पंखा बंद केला … गॅस पेटवला .. 

आता सांडलेले पीठ उचलू, की पसरलेले शेंगदाणे भरू.. बादली भरत आली ते पाहू.. की वर पाण्याची टाकी किती भरली ते पाहू .. 

…. मी हैराण …काय करावं ? सुचेना 

आवाजावरून लक्षात आलं .. पाणी वाहून जातंय .. बादली भरून सांडत होती .. 

भरलेली बादली काढून दुसरी लावतोय .. तोच तिसरी शिटी झाली .. 

तसं धावत येऊन पंखा लावला .. मनात म्हटलं माझं डोकं फिरलंय नक्कीच .. 

सगळं सोडून आधी गॅस काढला .. इतक्यात पाणी वाहून जातंय असा आवाज .. वरची टाकी ओव्हर फ्लो … मोटर बंद केली …. 

पण या नादात पंखा जरा उशिराच बंद केला .. 

वाऱ्याने पीठ चांगलंच पसरलं, त्यात माझे ओले पाय … लादी चिकट.. बाप रे .. 

व्हायचा तो पसारा झालाच .. आता बायको ओरडणार, हे मनात आलं तोवर  बायको ही आलीच दारात.. काय करावं ? सुचेना 

झाला पसारा पाहून आता ही मला झापणार .. म्हणेल “ काय हो, किती हा पसारा ?”

पण ती मात्र एकच म्हणाली.. “ अहो, तुम्ही या बाहेर. मी आवरते सगळं. तुम्ही तुमचं काम करा.” 

एक टप्पा बॉल सारखा .. मी तडक किचनमधून हॉल मध्ये .. पण ह्या उडीत ही ओट्यावरची तेलाची बाटली कलंडलीच .. मी पुन्हा किचनमध्ये प्रवेश करणार तोच.. 

बायको पुन्हा त्याच स्वरात .. “राहू दे मी आवरते.”

मी सोफ्यावर शांत … चिडीचूप काय करणार ..?

…. पसारा का होतो याचे उत्तर मिळाले होते ना …….. 

(किती तो पसारा असं बायकोला कितीतरी वेळा ठणकावून विचारून नवरेशाही गाजवणाऱ्या त्या सर्व नवरोबांसाठी) 

लेखक – अज्ञात 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आपली आडनाव पडली तरी कशी? – भाग-1 ☆ प्रा. डॉ. सतीश कदम ☆

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ आपली आडनाव पडली तरी कशी? – भाग-1 ☆ प्रा. डॉ. सतीश कदम ☆

(पूर्वीपासून आतापर्यंत सर्व इतिहास…) 

माणूस वस्त्याच्या रूपाने एकत्रित येऊन स्थिर झाला. त्यातून वाड्या, गावे यांची निर्मिती झाली. त्यातून गावगाड्याची निर्मिती झाली. या गावगाड्याकरिता प्रमुखाची गरज निर्माण झाली. त्यातून विविध पदांची निर्मिती झाली. पुढे माणूस स्थिर स्थावर झाल्यावर नोंद ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अशा रीतीने गावापासून राज्यापर्यंत एक शाश्वत यंत्रणा झाली. त्याला वतनदार, जहागीरदार, जमीनदार, बलुतेदार या संज्ञा प्राप्त झाल्या.

प्राचीन काळापासून एखाद्या प्रदेशाची रचना गाव, तर्फ, महाल, सरकारते राजा याप्रमाणे सुरू झाली. या प्रत्येक घटकाचा कारभार करण्याकरिता विविध पदांची निर्मिती झाली. त्या घटकानुसार या पदाला पाटील, कुलकर्णी, चौगुला, देशमुख, देशपांडे, शेटे, महाजन या पदांची निर्मिती झाली. सदरील पदांचे महत्त्व एवढे वाढले की, वतनदारांनी त्याला आडनाव म्हणून स्वीकारले, ही पदे वंशपरंपरागत असल्याने वतनदाराच्या मोठ्या मुलास ते मिळत होते. इतर वारसांना यात कुठलाही वाटा नसला तरी केवळ प्रतिष्ठा म्हणून अगदी सर्वांनीच पाटील, देशमुख, कुलकर्णी यांसारख्या वतनांची नावे आपल्या आडनावात घेतली.

वतनदार हे राजा आणि जनता यामधील दुवा असून वतन हा मूळचा अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ होतो- वर्तन, स्वदेश, जन्मभूमी. कारभा-यांना गावाकरिता किंवा देशाकरिता करत असलेल्या कर्तव्याबद्दल त्या व्यक्तीला उपजीविकेकरिता वंशपरंपरेने चालणारे उत्पन्न म्हणजे वतन होय. ते धारण करणाराला वतनदार म्हटले गेले. यासोबत इनामदार, जहागिरदार, मनसबदार, सरंजामदार हे एकाच संकल्पनेत मोडतात. महाराष्ट्रातील वतनदारांचा दर्जा आणि त्यांना करावी लागणारी कर्तव्ये पुढीलप्रमाणे-

पाटील : पट्टकील या शब्दापासून पाटील शब्द वापरात आला. गावचा कारभार करण्याकरिता एका वतनदाराची नेमणूक केल्यानंतर तो गावकीच्या नोंदी कापसाने विणलेल्या पट्ट्या (जाड कापडा)वर घेऊन तो पट्टा एका वेळूच्या नळीत जपून ठेवत. या नळकांड्याला पट्टकील म्हणत. त्यानुसार महाराष्ट्रात पाटील शब्दाची निर्मिती झाली. गावातील महसुली आणि फौजदारी अशा दोन्हीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पाटलावर असून एकप्रकारे तो गावचा राजाच निर्माण झाला. त्यामुळे गावक-यांनी व बलुतेदारांनी आपल्या सेवा पाटलाला मोफत द्यायच्या होत्या.जमिनीच्या नोंदीव्यतिरिक्त इतर कामे तो तोंडाने करून घेई एवढी त्याच्या शब्दाला किंमत होती. त्यातून ‘तोंडपाटीलकी’ हा शब्द आला. कर्नाटकात पाटलाला नाईक, गौडा किंवा बुधवंत तर गुजरातेत मुखी आणि अगेवान म्हणतात. पुढे काम वाढल्याने पाटलाची दोन पदे आली. 

१) पोलिस पाटील 

२) मुलकी पाटील. 

गावातील लग्नसमारंभ असो की कुठलाही सण पाटलाचा मान पहिला असायचा. पोलिस, न्यायाधीश अशा सर्वच भूमिकांत पाटलाचे महत्त्व होते. त्यामुळे पाटलाकडून कायद्याची पायमल्ली होऊ लागली. रांझे गावचा भिकाजी गुरव हा पाटील होता. पाटलाला मदत करण्यासाठी चौगुला, कुलकर्णी, नायकवाडी(जासूद), कोतवाल, हवालदार, शेतसनदी (गाव लष्कर) यांच्यासह बारा बलुतेदार होते. त्यामुळे पाटलाचे महत्त्व एवढे वाढले की त्याची भावकीसुद्धा पाटील आडनाव म्हणून स्वीकारायला लागली. पुढे अधिकार गेले तरी नावातील जादू कायम राहिली. त्यामुळे म्हटले गेले… उतरंडीला नसेना दाणा, पण दादल्या असावा पाटील राणा. 

चौगुला म्हणजे पाटलाचा मदतनीस. धान्याची कोठारे व इतर सर्व कामे करणारा ग्राम अधिकारी. गावचा कारभार चावडीवरून चालायचा. चारचौघे जमण्याचे ठिकाण म्हणजे चावडी. सरकारी चाकरीमुळे पाटील किंवा बलुतेदार अशा सर्वांनाच इनाम मिळाले. इनामात दोन प्रकार होते. एक सनदी (राजाने दिलेले) आणि दुसरे म्हणजे गावनिसबत (गावच्या जमिनीतून दिलेले). मुस्लिम राजवटीत यालाच जहागिर शब्द आला. साहजिकच सुरुवातीला मराठा जातीकडे असणारी पाटीलकी पुढे ज्या गावात ज्या समाजाची संख्या जास्त त्यांच्याकडे गेली. त्याच्या अधिकारामुळे पाटील नावाला वलय आल्याने नगर परिसरानंतर अनेकजण स्वत:हून आडनावासह पुढे पाटील लावतात. पाटील नाव कुणी का लावेना पण रांझ्याच्या पाटलासारखा नको तर कर्मवीरांसारखा असावा हीच जनतेची अपेक्षा.

गाव पातळीवर पाटलाला मदत करणारा व गावचे रेकॉर्ड लिहिणारा एक महत्त्वाचा अधिकारी म्हणजे कुलकर्णी, कुल आणि करण या शब्दापासून कुलकर्णी शब्द आला. कुल म्हणजे जमिनीचा मूळ भाग आणि करण म्हणजे लेखनवृत्ती – त्यानुसार कुळवार लिखाण करणारा तो कुलकर्णी. काही भागात याला पटवारी, पांड्याही म्हणतात. प्राचीन काळी कुलकर्णी हा ब्राह्मण समाजाचा असायचा. परंतु पुढे इतरही उच्च जातीत कुलकर्णी पद आले. पाटलाप्रमाणे याला पण गावातील सर्व मानमरातब व बलुतेदाराकडून सर्व सेवा मोफत मिळत. कुलकर्ण्यांच्या जागेवरच आता ग्रामसेवक आणि तलाठी आले.

–क्रमशः भाग पहिला. 

© प्रा. डॉ. सतीश कदम

इतिहास संशोधक,व्याख्याते

मो.क्र.9422650044 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बोलणं… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ बोलणं… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

‘बोलण्याची शक्ती’ हे निसर्गाने फक्त मानवालाच दिलेलं वरदान आहे. आपल्या इच्छा, भावना, विचार, गरजा व्यक्त करण्याचे ते एक साधन आहे. तुम्ही बोलायला सुरुवात केली की, तुम्ही कसे आहात याचा परिचय होतो. तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातला खरेपणा, प्रामाणिकपणा, समोरच्याबद्दल आदर, आपुलकी सारं काही बोलण्यातून कळतं. आपली नाती, व्यवसाय, सामाजिक व्यवहार या बोलण्यावरच अवलंबून आहेत!  हे इतके महत्त्वाचे असूनही आपण ते अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न करत नाही.

‘आहे हे असं आहे’,

‘माझा आवाजच मोठा आहे’,

‘मला अशीच सवय आहे’

असं म्हणत आपण स्वतःचं समर्थन करतो.

बोलणं शिकावं लागतं आयुष्यभर.

‘कौन बनेगा करोडपती’ मी फक्त अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकण्यासाठी पाहिले आहे. शब्दोच्चार, आवाजाचा चढ – उतार शिकायचं असेल तर हा आवाज अभ्यासायलाच हवा. आवाजाची, बोलण्याची साधना, तपस्या म्हणजे अमिताभ बच्चन! काही शब्द त्यांच्या तोंडून ऐकले, की मग तसा उच्चार दुसरं कोणी करू शकत नाही, हे हळूहळू कळत जातं.

शब्द जगलेला माणूस तो शब्द उच्चारतो, त्यावेळेस शब्दांचा उच्चार ज्या ताकदीने येतो, त्यावरून त्याचा खरेपणा ओळखता येतो.

बोलण्याचा आवाज हा आतून येतो!  माणसाच्या चेतनेला स्पर्श करून, त्यामुळे शेवटी माणूस म्हणून आपण जितके घडत जातो, तितका आवाजही सुंदर होत जातो.

आशाताईंचं बोलणं गाण्याइतकंच सुश्राव्य आहे. जगण्याची लढाई हसत लढलेल्या शक्तीची ती अभिव्यक्ती आहे.

एक प्रयोग केला होता.,

सुंदर शब्दांची यादी वाचणं. प्रामाणिक, सत्य, अद्भुत, शक्ती… अशा सकारात्मक शब्दांची यादी लिहायची आणि वेळ मिळेल तशी मोठ्याने वाचायची. वाढवत जायचे हे शब्द. हळूहळू आपल्या बोलण्यात ते शब्द येऊ लागतात. बोलणं चांगलं होतंच, पण सवयीने या विरुद्ध काही ऐकावंसं वाटत नाही, इतका अभिरुचीचा दर्जा वाढत जातो! संगत बदलते.

आयुष्य बदलून टाकणारी ही शब्दांची साधना आहे. शब्द जसे असतील, तशा घटना, तशा व्यक्ती आपण आकर्षित करत असतो. मग शब्द बदलून आयुष्य बदलता येईल, हेही तितकंच खरं!

सावकाश बोलणं, स्पष्ट बोलणं, शक्यतो हळू बोलणं या सवयी मुद्दाम लावून घ्याव्या लागतात.

वाचनाने विचार स्पष्ट, मुद्देसूद होतात. नेमकं मोजकं बोलता येतं. कविता वाचत शब्द समजून घेता घेता बोलण्याची लय सुधारते. बोलण्यातला रुक्षपणा जातो आणि हृदयाशी संवाद साधण्याची कला साध्य होते. यासाठी वाचन, काव्यवाचन महत्त्वाचं ठरतं .

कानात प्राण आणून ऐकावं अशी माणसं या जगात आहेत! फक्त शोधता – ऐकता आली पाहिजेत.

या बोलण्यातली सर्वांत टाळायची गोष्ट, म्हणजे पाल्हाळ लावणे, संथ लयीत, समोरच्या व्यक्तीच्या सहनशक्तीची परीक्षा घेत रटाळ बोलणे. वेळ ही संपत्ती  असेल, तर अशा लोकांना वेळचोर का म्हणू नये?

फोन, मोबाईलवर बोलण्याचे नियम हा तर एक स्वतंत्र विषय होऊ शकेल.

आपल्या माणसांशी बोलण्याने ताण हलका होतो.

बोलणं म्हणजे निव्वळ शब्द थोडेच असतात? न बोलता शांत सोबतही बोलणंच असतं.

वेळात वेळ काढून घराघरात संवाद झाले पाहिजेत. माणसामाणसातले अंतर बोलण्यानेच दूर होऊ शकते.  मनातले गैरसमज बोलून दूर करता येतात; पण त्याआधी कसं बोलायचं, ते या जगाच्या शाळेत शिकावंच लागतं.

बाकी हा जगण्याचा प्रवास अवघड आहे. शेजारी कोणी बोलणारं मिळालं, की प्रवास सोपा होतो.

तात्पर्य :  ज्याच्या वाचेमध्ये माधुर्य व गोडवा आहे, जो सदैव संयमित व विनयशील बोलतो, दुनिया त्याच्या प्रेमात पडते व अशा व्यक्तीस  अशक्य गोष्टी शक्य होतात..

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वप्न… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ स्वप्न… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

स्वप्न नुसता शब्द जरी वाचला तरी कितीतरी विचार मनात रुंजी घालायला लागतात. कारण प्रत्येकाचे काही ना काही स्वप्न असतेच आणि ते कोणी बोलून दाखवले नाही तरी ते पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड सुरू असते. 

स्वप्नांची सुरुवात जन्मल्यापासूनच होते. लहानपणी पाळण्यात बाळ झोपलेले असताना झोपेत बाळ गोड हसते किंवा झोपेतच दचकून एकदम रडायला लागते तेव्हा आजी किंवा घरातील मोठ्या व्यक्ती म्हणतात स्वप्न पाहिलं असेल. सटवाई बाळांना स्वप्न दाखवते. 

नंतर मुल जसजसे मोठमोठे होऊ लागते तसतशी त्याची स्वप्ने पण बदलत जातात. आणि शक्यतो बदललेली स्वप्ने ही त्या त्या काळानुरूप त्याला योग्य वाटतील अशी असतात आणि लहान वयातील स्वप्ने बहुतांशी पूर्ण झालेली असतात म्हणून मग त्या आत्मविश्वासाने मोठी स्वप्ने पाहिली जातात.

अब्दुलजी कलाम यांनी म्हटलय छोटी स्वप्ने पाहणे हा अपराध आहे. स्वप्ने मोठी पहा त्याचा पाठपुरावा करा आपोआप ती पूर्ण होतील.

या बाबत ते असेही म्हणतात की स्वप्ने अशी नसावीत की जी झोपेत पाहिली जातात स्वप्ने अशी असावीत की जी झोपूच देत नाहीत. 

साधारणपणे मुली ज्या असतात त्या बहुतांशी आपल्या सुखी संसाराचे असे एकच स्वप्न पहातात. त्यासाठी त्या झटत असतात. आणि अगदी १००% नाही तरी काही अंशी त्या त्यामधे यशस्वी होतात. पण मुलांची स्वप्ने मात्र वेगवेगळी असतात.

पण नेमके स्वप्न म्हणजे काय? तर स्वप्न म्हणजे ध्येय म्हणता येईल. जे गाठण्यासाठी ज्याची त्याची धडपड चालू असते. हीच गोष्ट त्याच्या जगण्याचे कारण बनते .लहानपणी आई वडिल किंवा मोठे सांगतात ते पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे वाटून पाहिलेले स्वप्न नंतर महत्व पटल्यावर चांगला अभ्यास करण्याचे स्वप्न नंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या नोकरीचे स्वप्न नंतर आपले संसार करण्याचे स्वप्न आणि मग संसारतील व्यक्तींना सुख देण्याचे स्वप्न या स्वप्नचक्रात माणूस अडकलेला असतो.

काहीजण कला जोपासण्याचे त्यात नाव कमावण्याचे स्वप्न पाहतात . किंवा काही जण वेगळे काही करून दाखवण्याच्या ईर्षेने पेटलेले दिसतात. 

पण म्हणून सगळ्यांनाच महत्व प्राप्त होत नाही. स्वप्ने जी इतरांपेक्षा वेगळी असतात त्यात इतरांचेही हित सामावलेले असते जे सोपे नसते हे सगळ्यांना माहित असते पण असे स्वप्न जेव्हा कोणी पाहतो आणि ते पूर्ण करतो तेव्हा त्याचे नाव झालेले आपण पाहतो.

तर अशी ही स्वप्ने. पण यातूनही स्वप्नाचा खरा अर्थ समजत नाहीच. आपल्याला आश्चर्य वाटेल  पण स्वप्नाचा आणि अध्यात्माचा जवळचा संबंध आहे. 

कसा? अध्यात्म सांगते मी पणा सोडा. सगळे चांगले होईल. तसेच हे स्वप्न••• स्व पणा नसलेल••• पहा एखादे स्वप्न पूर्ण करणारा स्वत:ची तहान भूक विसरून किंवा बाकीचे जग विसरून अर्जूनाच्या लक्ष्याप्रमाणे फक्त स्वप्नाच्या पाठीमागे असतात. यामधे कुठेही स्व पणा अर्थात मी पण पर्यायाने अहं नसतो म्हणून ते स्वप्न.

सगळ्यांची स्वप्ने ही मी पणाशी निगडीत असतात म्हणून त्याला महत्व प्राप्त होत नाही. पण मोठी स्वप्ने ज्यामधे इतरांचेही हित सामावलेले असते अशी स्वप्ने पाहणारी माणसे वेगळीच असतात त्यामुळे अशी स्वप्ने पाहणार्‍याचे नाव होते आणि त्याचे अप्रुप वाटू लागते.

म्हणूनच चला ‘मी’पणा सोडून देऊ. सर्व समावेशकतेचे स्वप्न पाहू आणि घर शहर देश नव्हे सर्व जग सुखी करण्याचे स्वप्न पाहू

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares