मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ““सांज संभ्रम !” ” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

??

सांज संभ्रम ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

 

 रोज गंभीर लिहितो… म्हणून आता हे थोडे हलके फुलके !

रात्र दिवसाच्या हातावर टाळी देऊन अंधाराच्या आणखीन नजीक येत असते. तसेच काहीसे पहाटे सुद्धा होत असते. रात्र निवृत्ती घेऊन निजावयास निघायच्या तयारीत असते जणू!

दिवसा झोपी जाण्याचा अपराध आणि तो सुद्धा दिवस सायंकाळशी मैत्र साधत असल्याच्या वेळी, जो करील तो आयुष्यात एकदा तरी ह्या चकव्यात सपडतोच.

आपल्याला आज अगदी पहाटे उजडण्याच्या वेळी कशी जाग आली याच्या विचारात माणूस पडतो… आणि दिवस उगवायचा जागी रात्र आणखीन गडद होत जाते! मग लोकांनी सांगितल्यावर समजते… तुम्ही दुपारी उशिरा झोपी गेला होतात… आणि सायंकाळी अंधार पडण्याच्या सुमारास जागे झाला आहात!

असा अनुभव किती तरी जणांना आलेला असेल ना?

त्यादिवशी शनिवार होता. अर्धा दिवस शाळा. साडेतीन चारच्या सुमारास घरी आलो, थोडे खाल्ले आणि बिछान्यावर सहज अंग टाकले… डोळा लागला!

रविवारी सकाळी साडे सहा वाजता वर्गशिक्षक आणि क्रीडा शिक्षकही असलेल्या शिक्षकांनी त्यांच्या घराजवळ असलेल्या छोट्या मैदानावर शारीरिक शिक्षणाच्या परीक्षेस बोलावले होते! ते शिक्षक अगदी एकवचनी. जे म्हणतील ते करून दाखवायचे म्हणजे दाखवायचे! गैर हजर राहाल तर सहामाहीत नापास.. असे त्यांनी सांगून ठेवले होते! (त्यावेळी काही पोरं गैरहजर ऐवजी गयहजर म्हणत…. त्यांची तर हे शिक्षक अजिबात गय करीत नसत!)

आणि नापास म्हणजे चक्क नापास.. आणि असे अपराध पुन्हा केले की एक वर्ष पुन्हा त्याच तुकडीत दिवस काढावे लागणार याची निश्चिती!

त्यामुळे मुलं नापास होत नाहीत तर शिक्षक त्यांना नापास करतात… असा (गैर) समज मनात पक्का झाला होता!

बरं… ते शिकवीत असलेल्या विषयाचा तसा पास नापासशी अजिबात संबंध नव्हता हो! पण त्यांच्या विषयात नापास होणे सोडा, पण एखादी कविता पाठ न करण्याचा अपराधही कधी कुणी केलेला… मेरे स्मरण में नहीं!

कल यह कविता मुखोदगत कर के आना! असा शुद्ध हिंदीत त्यांनी दिलेला आदेश सर्वच विद्यार्थी पाळत ! अन्यथा विद्यार्थ्याच्या मुखाची गत काही धड रहात नसे! याला मराठीत पाठ करणे असे म्हणतात. म्हणून आमच्या पाठी सुद्धा हे शिक्षक हिशेबात धरायचे! त्यांच्या हिंदी विषयाने आमची पाठ सोडली नाही. पण आमच्या त्या तुकडीतील विद्यार्थी राष्ट्रभाषेत उत्तम बोलत.

तसेच…. हमारे जमाने में अध्यापक वर्ग से कोई बहस करते नहीं थे… उलट शिक्षकांनी शिक्षा केली असे घरी समजल्यास घरी पुन्हा त्याची पुनरावृत्ती होई! 

तर त्या दिवशी मी सायंकाळी सहा वीस वाजता जागा झालो… दहा मिनिटांत सरांच्या घरी पोहोचणे केवळ अशक्य होते… वर्ष वाया जाणार हे निश्चित! त्यावेळेस रडणे एवढं एकच जमणार होतं. मग.. आईने ‘आपल्याला वेळेत जागे केले नाही’ असा आरोप करायला सुद्धा धजावलो… ! त्यावर आई स्मित हास्य करत राहिली!

घराबाहेर आलो… अंधार होता. पण लोक घराकडे परतत होते… पिंपळाच्या झाडावर कावळे जमा झाले होते… आणि शांत होते!

सहा वीस नंतर उजेड वाढायला पाहिजे होता… पण अंधार वाढू लागला. आणि मग खात्री पटली… रात तो अभी बाकी है मेरे दोस्त !

रविवारी सकाळी पावणे सहा वाजता मी शारीरिक शिक्षणाच्या परीक्षेस तयारीनिशी उपस्थित होतो !

कृपया उपरोक्त विषय पर आधारित दस से पंधरह वाक्यों में निबंध लिख कर लायें ! 

आपके भी कुछ ऐसे अनुभव होंगे तो जरूर लिखियेगा !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘तीन म्हणजे एक नव्हे …’ लेखक : प्रा. हरी नरके  ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘तीन म्हणजे एक नव्हे …’ लेखक : प्रा. हरी नरके  ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर

स्व विंदा करंदीकर

Vinda Karandikar memorial in Chetana college | चेतना महाविद्यालयात विंदांचे राष्ट्रीय स्मारक | Loksatta

श्रेष्ठ कविवर्य स्व गोविंद विनायक करंदीकर ख्यातनाम ‘विंदा करंदीकर’

(जन्म – २३ ऑगस्ट १९१८ – मृत्यू – १४ मार्च २०१०)

मुंबईतील एक नामवंत संस्था. साहित्यिकांना मोठमोठे पुरस्कार देऊन त्या अकादमीतर्फे सन्मानित केले जाई. एक श्रीमंत सिंधी गृहस्थ त्या अकादमीचे प्रमुख होते. ते विविध वाङ्मयीन उपक्रमही चालवीत असत. त्याकाळात अकादमीचा मोठाच बोलबाला होता.

श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर यांना घरातले आणि जवळचे लोक भाऊ म्हणत. भाऊ कडवे कोकणी होते. प्रतिभावंत, प्रखर तत्वनिष्ठ आणि स्पष्टवक्ता.

एकदा भाऊंचा फोन आला. म्हणाले, ” हरी, एक कार्यक्रम आलाय. त्यांना आपण तिघे हवे आहोत. दयाशी (पवार) मी बोललोय तो येतो म्हणालाय. तूही वेळ काढ. प्रत्येकी एक हजार रूपये आणि एकेक नारळ असं मानधन देणार आहेत. जाण्यायेण्याचं भाडं आणि चहा देणार आहेत. ठीकाय ना? “

मी ताबडतोब होकार दिला. भाऊ आणि दयाकाका या दिग्गजांच्यासोबत कार्यक्रम म्हणजे धमाल.

कार्यक्रम एका मोठ्या हॉटेलमध्ये होता. कार्यक्रम झकास झाला. खूप रंगला. भाऊ दिलेला नारळसुद्धा वाजवून बघायचे. पाणी कमी असेल तर दुसरा आणा असं स्पष्ट सांगायचे. कोकणी बाणा.

भाऊंनी संयोजकांना स्टेजवर बोलावले, म्हणाले, ” चला, व्यवहाराचे उरकून टाका. “

संयोजक आत गेले आणि त्यांनी तीन बंद पाकीटे आणून आम्हा तिघांना दिली. भाऊंनी पाकीट उघडून तिथेच पैसे मोजले. पाकीटात ७०० रूपये होते. भाऊंनी संयोजकांना बोलावले, ” मालक, अहो, यात तीनशे रूपये कमी आहेत. आपले प्रत्येकी एक हजार ठरले होते. “

आम्हा दोघांना भाऊ म्हणाले, “अरे, तुमचीही पाकीटे उघडून बघा. व्यवहार म्हणजे व्यवहार, त्यात संकोच कसला?”

पण दयाकाका म्हणाले, “भाऊंचं ठिकय. मोठा माणूसय. आपण असं स्टेजवर कसं पाकीट उघडून बघायचं ना?”

संयोजकांनी भाऊंना तीनशे रूपये आणून दिले. म्हणाले, ” माफ करा, कार्यालयातील मंडळींनी पाकीटं भरताना चुकून कमी रक्कम भरली. “

आम्ही निघालो. टॅक्सीत बसल्यावर आम्ही दोघांनी आमची मानधनाची पाकिटं उघडून बघितली.

दयाकाकांच्या पाकीटात २०० रूपये होते आणि माझ्या पाकिटात शंभर. म्हणजे तिघांना प्रत्येकी एक हजार देण्याऐवजी तिघांना मिळून एक हजार दिलेले. भाऊ तडकले. भाऊंनी टॅक्सी थांबवली. संयोजकांना बोलावलं आणि त्यांना झापलं. ठरल्याप्रमाणं मानधन दिलेलं नाही. दिलेला शब्द तुम्ही पाळलेला नाही. तत्व म्हणजे तत्व, काय समजले? तिघांना प्रत्येकी एक हजार ठरले होते. तुम्ही तिघांना मिळून एक हजार दिलेत. तीन म्हणजे एक नव्हे. आत्ताच्या आत्ता पूर्तता करा… आणि हो, दरम्यान तुमच्या चुकीमुळे टॅक्सीचा खोळंबा झाल्याने तिच्या भाड्यापोटी पंचवीस रूपये अधिकचे द्या टॅक्सीवाल्याला. काय समजले? “

भाऊंचा सात्विक संताप उफाळून आला होता. संयोजकांनी उरलेले पैसे आणून दिले, परत ते कार्यालयातील लोकांनी पाकीटं भरताना घोळ केला वगैरे सांगायला लागले. भाऊ म्हणाले, ” तसं असेल तर कार्यालयातील लोकं बदला किंवा किमान तीन वेगवेगळ्या नविन सबबी शोधून ठेवा. “

एके दिवशी भाऊंचा फोन आला. त्यांना मंत्रालयात यायचे होते. किल्लारीच्या भूकंपग्रस्तांच्या निधीला मुख्यमंत्री फंडाला त्यांना छोटीशी देणगी द्यायची होती. त्यांच्या दोन अटी होत्या. ही देणगी गुप्त राहायला हवी. तिचा गवगवा व्हायला नको. बातमीदारांना कळता कामा नये.

त्यांना सी. एम. ना किंवा अन्य कुणालाही भेटायचे नव्हते, फक्त देणगीचा चेक देऊन ते परत जाणार होते.

मी भाऊंच्या मंत्रालय प्रवेशिकेची व्यवस्था केली. भाऊ बांद्र्यावरून बसने आले. आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयात गेलो. भाऊंनी चेक दिला. पावती घेतली. भाऊंचे नाव ऎकून तो अधिकारी चमकला. त्याने भाऊंना खुर्ची दिली. चहा मागवतो म्हणाला. भाऊ म्हणाले, ” धन्यवाद. पण मला जरा घाई आहे. तुम्ही मुद्दाम बोलावलंत तर चहाला मी परत कधी तरी नक्की येईन. आत्ता नको. एकतर ही माझी चहाची वेळ नाही आणि मी हरीकडून असं ऎकलंय की मंत्रालयातला चहा अत्यंत मचूळ असतो. मला आज माझ्या जिभेची चव बिघडवून घ्यायची नाही. पण विचारल्याबद्दल धन्यवाद. आज मी माझ्या कामासाठी आलोय. चहाला नाही. जत्रेत पाहुणा ओढून काढू नका.”

अधिकार्‍याने भाऊंना दिलेली पावती पंख्याच्या वार्‍याने उडाली. मी ती उचलून भाऊंना दिली, तेव्हा माझी नजर रकमेच्या आकड्यावर पडली. भाऊंनी पाच लाख रूपयांची देणगी दिलेली होती. ही म्हणे छोटीशी देणगी. जे भाऊ नारळसुद्धा वाजवून घ्यायचे ते पाच लाखाची देणगी भूकंपग्रस्तांना मदत म्हणून कोणताही गाजावाजा न करता देऊन गेले.

आम्ही मंत्रालयाबाहेर आलो. भाऊ बसला उभे राहिले. बसला वेळ होता. मी म्हटलं, ” भाऊ, इथल्या टपरीवरील चहा फक्कड असतो. घेऊया का एकेक कटींग?”

भाऊ म्हणाले, “असं म्हणतोस? ही माझ्या चहाची वेळ नाही. पण चल घेऊया. मात्र एका अटीवर, मी तुझ्यापेक्षा वयानं मोठा असल्यानं पैसे मात्र मी देणार हो. “

भाऊंकडे किश्यांचा अफलातून खजिना असायचा. ते आपल्या तिरकस शैलीत तो सांगताना अगदी हरवून जायचे. अनेकांची फिरकी घेण्यात ते पटाईत होते. त्यातून ते स्वत:लाही वगळायचे नाहीत. मजा म्हणजे ते आपले किस्से सांगताना आपण कसे गंडलो, आपली कशी फजिती झाली किंवा आपल्याला शेरास सव्वाशेर कसे भेटले हेही सांगायचे. ते त्यात आरपार हरवून जायचे. त्यांनी सांगितलेला हा त्यांच्याच फजितीचा एक प्रसंग…..

विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट तिघा कवींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम त्या काळात फार गाजत होता. कार्यक्रमाची व्यवस्था बघण्याची जबाबदारी फिरती असायची. एकदा अकलुजच्या साखर कारखान्याचे निमंत्रण आले. चेअरमन शंकरराव मोहिते पाटील तमाशाचे शौकीन. कुणीतरी म्हणाले, ‘काव्यवाचन ठेवू या’. ते लगेच तयार झाले.

स्वत: एम. डी. आले होते निमंत्रण घेऊन मुंबईला. त्यांना दारातच थांबवून व्यवस्थापक कविवर्य वसंत बापटांनी त्यांच्या हातात २७ अटींचा कागद सोपवला.

पुढच्या वेळी येताना फोन करून, वेळ घेऊनच यायला बजावले.

लेखी नियमांप्रमाणे अ‍ॅडव्हान्सची रक्कम द्यायला फोन करून, वेळ घेऊन एम. डी. भेटायला आले.

परत कविवर्य बापटांनी त्यांना दारातूनच कटवले. तसे बापट अतिशय सोशल होते. पण दोन वेळा एम. डी. शी ते कळत नकळत असं वागून गेले. कदाचित त्यांच्या मनात काही नसेलही. पण एमडी रागावले. बापट स्वभावाने ओलावा असलेले. पण….

एम. डीं. नी हा अनुभव चेअरमनना सांगितला. चेअरमन मोहिते पाटील म्हणजे नामांकित पण बेरकी राजकारणी होते. त्यांनी २७ नियमांचा कसून अभ्यास केला. नियमाप्रमाणे कवींना रेल्वेची फर्स्ट क्लासची तिकीटं पाठविण्यात आली. कवींना कुर्डुवाडी स्टेशनवर घ्यायला मर्सिडीज गाडी पाठविण्यात आली.

राहण्या-जेवणाची व्यवस्था ठरल्याप्रमाणे उत्तम करण्यात आली होती. प्रत्येक अटीचे काटेकोर पालन केलेले.

कार्यक्रमाला तिन्ही कविवर्य सभागृहात पोचले तर तिकडे सभागृह संपूर्ण मोकळे. स्टेजवर फक्त एम. डी. आणि चेयरमन दोघेच.

कवीवर्यांनी श्रोत्यांची चौकशी केली. तेव्हा चेअरमन म्हणाले, ” तुमच्या २७ अटींमध्ये कार्यक्रमाला श्रोते हवेत अशी अटच नाही. आता तुम्हाला या रिकाम्या सभागृहापुढेच कविता वाचाव्या लागतील. “

…… स्वत:ची चूक बापटांच्या लक्षात आली. पण ती कबूल करायला तेव्हा ते तयार नव्हते. भाऊ पुढे झाले. ते चेअरमनना म्हणाले, ” मुदलात आमच्या माणसाकडून काहीतरी आगळीक झाली असणार. आम्ही कवी जरा विक्षिप्त असतो. मी स्वत: तुमची क्षमा मागतो. “

चेअरमन म्हणाले, “अहो, आमचा माणूस ४०० किलोमीटरवरून तुम्हाला फोन करून तुमची वेळ घेऊन अ‍ॅडव्हान्सची रक्कम द्यायला येतो. तुम्ही त्याला साधं घरातही घेत नाही. पाणीही विचारीत नाही. एव्हढा माणूसघाणेपणा ?”

….. व्यवस्थापकांच्या वतीने भाऊंनी चूक झाल्याचे मान्य केले. सपशेल माफी मागितली.

चेअरमननी एमडींना शेजारच्या सभागृहात पिटाळले. तिकडे लावण्यांचा फड रंगलेला होता. एमडींनी स्टेजवर जाऊन घोषणा केली, ” मंडळी, शेजारच्या सभागृहात एक सांस्कृतिक प्रोग्रॅम होणार आहे. आपण सर्वांनी तिकडे जायचेय. चेअरमनसाहेबांचा तसा निरोप आहे. तो कार्यक्रम झाला की हा कार्यक्रम पुन्हा पुढे सुरू होईल. तर आता जरा सांस्कृतिक चेंज. “

५ मिनिटात सभागृह खचाखच भरले. तीन कवींचा काव्यवाचनाचा कार्यक्रम इतका रंगला की लोक लावण्यांचा कार्यक्रम विसरले.

त्यानंतर कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मात्र बापट यांच्याकडून भाऊंनी स्वत:कडे घेतली. भाऊ म्हणायचे, “ हरी, राजकारणी लोक महाहुषार असतात. शहाण्याने त्यांच्याशी पंगा घेऊ नये. कसा धडा शिकवतील सांगता येणार नाही !” 

लेखक : प्रा. हरी नरके

प्रस्तती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वलयांकितांच्या सहवासात – भाग २ – लेखक: डॉ. नितीन आरेकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

 ***** पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन *****

☆ वलयांकितांच्या सहवासात – भाग २ – लेखक: डॉ. नितीन आरेकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

उस्ताद झाकीरजींची आणखी एक छान गोष्ट आहे. जगभर भ्रमंती करणारा हा महान कलावंत जवळचं अंतर लोकल ट्रेनने किंवा रेल्वेने कापतो. कल्याण, डोंबिवलीला जर कार्यक्रम असेल तर त्याचा रवीकाकाला फोन येतो व त्याला तो सांगतो, अमक्या दिवशी कार्यक्रम आहे, मला तू रेल्वेने घेऊन जा. मग रवीकाकाचा एक रेल्वेतला मित्र, व रवीकाकाचं शेपूट असल्यासारखा मी त्याला घ्यायला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जातो आणि ट्रेनने घेऊन गंतव्य स्थळी पोहोचवतो. त्याला स्टेशनवर बघून अनेकांचा विश्वास बसत नाही. पण, तो अगदी सहजपणे स्टेशनवर असणारे हमाल, तिकिट कलेक्टर, प्रवाशांच्यात मिसळतो, प्रत्येकाला हवे तितके फोटो काढू देतो. आता तो एक काळजी घेतो, बाहेर कुठेही काहीही खात नाही. त्याचा पिण्याच्या पाण्याचा एक ठराविक ब्रँड आहे, तेच पाणी तो पितो, ते मिळालं नाही तर तो पाणी पिणार नाही.

त्याची आणखी एक सवय आहे, त्याचा कार्यक्रम जिथं असेल तिथं, तो कार्यक्रमाच्या काही तास आधी जातो. मला आठवतंय, माझ्या मावसभावानं संतोष जोशी, त्याचे पार्टनर्स प्रियांका साठे आणि अभिजित सावंत यांनी झाकीर हुसेन आणि शंकर महादेवन यांचा ठाण्यात एक कार्यक्रम आयोजित केला होता. मी सुरुवातीपासून त्यांच्याबरोबर होतो. शंकर महादेवनने झाकीरजी कधी येणार आहेत, याची विचारणा केली आणि त्याप्रमाणे तो झाकीरकाका त्या कार्यक्रमाला पोहोचण्याच्या काही मिनिटे आधी तिथं पोहोचला.

डोंबिवलीला एम्. आय्. डी. सी. मैदानात झाकीरकाकाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. आम्ही त्याला ट्रेनने घेऊन आलो. कल्याण स्टेशनवर उतरल्यावर आयोजकांनी मोटारीनं डोंबिवलीला नेलं. कार्यक्रम रात्री साडे-सात आठच्या दरम्यान सुरू होणार होता. आम्ही मैदानात साडेपाचच्या सुमारास पोहोचलो. तिथं गेल्या गेल्या झाकीरकाकानं तबल्याचं व विविध तालवाद्यांचं त्याच्याकडचं भांडार उघडलं. मोटारीतून स्वत:च्या तबल्याचं कीट त्यानं स्वत: उचललं आणि थेट स्टेजवर गेला. ध्वनिव्यवस्था ज्यांच्याकडे होती, त्यांनी त्याच्याबरोबर अनेक कार्यक्रम केलेले असल्याने त्यांनी सर्व तयारी ठेवलेली होती. नंतर दीड तासभर झाकीरकाका स्वत:ची वाद्ये लावत होता, ती आधी स्वत:ला कशी ऐकू येत आहेत ते तपासून घेत होता. स्पीकरवरून मैदानाच्या सर्व कोपर्‍यांत त्यांचा आवाज कसा पोहोचतो आहे याची चाचपणी करत होता. मध्येच मला म्हणाला, “बॉबी, उस कोने में जाकर सुन ले कैसे सुनाई देता है. ” नंतर दुसर्‍या कोपर्‍यात त्यानं मला पाठवलं. मला त्यातलं काय कपाळ कळणार होतं? पण त्याची परफेक्शनची धडपड केवढी होती!!

आमच्या कॉलेजमध्ये प्राचार्य दिनेश पंजवानी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गौरव दिवस हा एक कार्यक्रम सुरू केला. पहिल्या वर्षी आम्ही रवींद्र जैन यांना बोलावलं. दुसर्‍या वर्षी बावीस जानेवारी २००२ रोजी ते व मी बोलत होतो, तेव्हा त्यांना मी विचारलं की, ‘आपण यावर्षीचा गौरव पुरस्कार उस्ताद झाकीर हुसेन यांना देऊ या का?’ सरांनी माझ्याकडे आश्चर्यानं बघितलं व विचारलं, “तू जानता है उनको? एवढ्या थोड्या अवधीत ते येतील का?” मी आत्मविश्वासानं, “हो, मी ओळखतो आणि तो येईल. ” सर थोडे वैतागले, “अरे, इतने बडे आदमी को तू अरे तुरे क्या करता है? अकल नहीं है. ” मी सरांना म्हणालो, “तो माझ्या काकाचा मित्र आहे. ” सुदैवानं झाकीरकाकानं गौरव पुरस्कार स्वीकारायचं ठरवलं. पण तो म्हणाला, “२६ जानेवारीला मी परदेशात आहे. २ फेब्रुवारी चालेल का ते बघ. ” तो रविवार होता. सरांना विचारलं, “सर उत्तेजित झाले. म्हणाले, बिल्कूल चालेल. मध्ये पाचसहा दिवस होते आम्ही झाकीरजींच्या आगमनानिमित्त एक सुंदरसा कार्यक्रम आखला. बदलापूरच्या अंध मुलांच्या शाळेचा एक छोटेखानी कार्यक्रम आणि आमच्या मुलांचा शास्त्रीय गायन-वादनाचा कार्यक्रम आम्ही ठेवला. आमच्या विवेक भागवतने छान तबला वाजवला. तो जेमतेम सेकंड ईयरचा विद्यार्थी. कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा मी या सगळ्या पोरांना घेऊन प्राचार्यांच्या कार्यालयात गेलो, तेव्हा हा जागतिक कीर्तिचा पद्मभूषण तबलानवाज विवेकला बघून म्हणाला, “अरे, आओ उस्ताद आओ. ” विवेकला त्यांनी प्रेमानं जवळ घेतलं, पाठीवर थाप मारली, “कोणाकडे शिकतोस” असं विचारल्यावर त्यानं पैठणकरांकडे शिकतो असं म्हटल्यावर त्यानं पटकन विचारलं, “त्यांच्याकडे थेट तिरखवांसाहेबांचा तबला आहे, ते त्यांचे डायरेक्ट शिष्य आहेत. ” पैठणकरबुवांची व त्याची मी गाठ घालून दिली, तेव्हा त्यानं त्यांचे हात जवळ घेऊन कपाळावर लावले. आमच्या सचिन मुळ्येची आई कांचन मुळ्ये, ह्या पं. गजाननबुवा जोशी यांची कन्या. मी त्यांची ओळख करून दिल्यावर झाकीरकाकानं त्यांना खाली वाकून नमस्कार केला. पं. गजाननबुवांनी अब्बाजींना म्हणजे उस्ताद अल्लारखांसाहेबांना त्यांच्या मुंबईतील प्रारंभीच्या काळात जी मदत केली होती, ती जाणून घेऊन त्याने तो नमस्कार केला. हे सर्व मला माहिती असण्याचं काही कारण नव्हतं, झाकीरकाकानं सर्वांसमोर ही वस्तुस्थिती सांगितली तेव्हा ते कळलं. याच कार्यक्रमाच्या वेळी एक अविस्मरणीय घटना घडली. झाकीरकाकाचा सत्कार झाला, त्या सत्काराला उत्तर द्यायला तो जेव्हा उभा राहिला तेव्हा समोर असलेले तीन साडेतीन हजार विद्यार्थी अगदी शांत बसले होते. आमचं कॉलेज उल्हासनगर स्टेशनच्या अगदी समोर आहे. कॉलेजच्या पुढच्या मैदानात कार्यक्रम सुरू होता. झाकीरकाका बोलायला जेव्हा उठला, तेव्हा अशी शांतता पसरली की आम्हाला रेल्वे स्टेशनवरची उद्घोषणा ऐकू यायला लागली. तो बोलायला प्रारंभ करणार तोच दूरवरच्या मशिदीतून अज़ान ऐकू येऊ लागला. झाकीरकाका स्टेजवर शांत उभा राहिला. स्टेज शांत, श्रोते शांत, आसमंत शांत आणि दूरवर ईश्वराची केली जाणारी आर्त आळवणी. सार्‍यांचा श्वास एक झाला होता. अजान संपला आणि झाकीरकाकानं बोलण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घेतला, तो श्वास संवेदनशील माईकनं पकडला, त्याचा आवाज सर्वदूर पसरला. समोरून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. हे लिहितानाही माझ्या अंगावर काटा फुलतो आहे. साडे तीन हजार तरुण मनं आणि त्या मनांवर नकळत अधिराज्य करणारा एक महान कलावंत यांच्यातलं ते अद्वैत अद्भूत असंच होतं.

मी रवीकाकाबरोबर झाकीरकाकाच्या घरी अधून मधून जात असे. अम्मीच्या निधनानंतर आमचं जाणं येणं जरासं कमी झालं. एकदा अब्बाजींच्या बरसीच्या पूर्वी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही नेपीअन सी रोडवर त्याच्या घरी गेलो होतो. झाकीरकाका जेवायला ज्या टेबलावर बसायचा त्याच्या खुर्चीच्या मागच्या भिंतीवर लता मंगेशकरांनी सही करून दिलेला फोटो लावलेला होता. (आता घराचं रिनोव्हेशन झालंय) त्याखाली अब्बाजी, अम्मी आणि तरुण हसर्‍या चेहर्‍याचा झाकीर असा एक छान फोटो होता, त्याच्या खाली झाकीरकाकाच्या खांद्यावर हात टाकलेला पु. ल. देशपांडे यांचा फोटो होता. मी त्याला प्रश्न विचारला, “अब्बाजी आणि अम्मीबरोबरचा फोटो लावलाय हे कळलं. पण लता मंगेशकरांचा आणि पु. लं. बरोबरचा फोटो का?” तो उत्तरला, “लताजी तर साक्षात सरस्वतीचं रूप आहेत आणि पु. लं. सारखा रसिक आणि कलाकार कुठेही सापडणार नाही. ” मला अचानक आठवण झाली, आमच्या कर्जत गावात वनश्री ज्ञानदीप मंडळ होतं. त्यांनी पु. ल. देशपांडे व सुनीता देशपांडे यांच्या आरती प्रभूंची कविता या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आरती प्रभू त्यांच्या अत्यंत विपन्नावस्थेच्या काळात कर्जतला कावसजीशेट काटपटपिटीया यांच्या चाळीत अक्षरश: आठ बाय दहाच्या खोलीत राहात होते. कार्यक्रम झाला व नंतर दुसर्‍या दिवशी पु. ल. व सुनीताबाई आमच्या घरी जेवायला आले. त्यानंतर दोन तीन दिवसांनी त्यांचं माझ्या काकांना- मनोहर आरेकर यांना एक पत्र आलं. त्यात त्यांनी कर्जतच्या एकूण संयोजनाबद्दल आभार मानले आणि नंतर त्यात लिहिलं की, ‘कालच बालगंधर्वला झाकीरचा तबला ऐकला आणि त्यानंतर असं वाटलं की झाकीर जे वाद्य वाजवतो तो तबला. ‘ मी ती आठवण झाकीरकाकाला सांगितली. त्यानं मला पु. लं. चं वाक्य इंग्रजीत भाषांतरित करायला सांगितलं. मी म्हणालो, “P. L. says Zakir is the definition of Tabla. ” त्यानं पुन्हा एकदा ते वाक्य माझ्याकडून म्हणून घेतलं. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते. तो कधीही त्याच्या भावनांचं प्रदर्शन करत नाही. त्या क्षणी तसं घडलं खरं.

कित्येकदा मला असं वाटतं, उद्या म्हातारा झाल्यावर माझ्या नातवंडांना या गोष्टी सांगत असेन, नातवंडं तोंडात बोटं घालून त्या गोष्टी ऐकत असतील. नंतर म्हणतील, “आजोबा. किती थापा मारता. ” मग मी हसेन, आणि मनातल्या मनात म्हणेन, “बाळांनो, खरं आहे. पृथ्वीवर गंधर्व येऊन गेले यावर सामान्यांचा विश्वास बसत नाही. ज्यांचं भाग्य होतं त्यांना ते गंधर्व पाहता आले. मी भाग्यवान आहे, मी या गंधर्वाला पाहिलं. “

समाप्त

लेखक : डॉ. नितीन आरेकर

nitinarekar@gmail. com

Tel:+91 880 555 0088

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जशी समजली तशी… भाग – १ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

स्वपरिचय  

शिक्षण- M Sc. (Mathematics)

कार्यक्षेत्र – गृहिणी

परिचय – संत साहित्य-भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, गाथा, आत्माराम, अमृतानुभव, एकनाथी भागवत इ. अभ्यास सुरू आहे. त्यासंबंधी लिखाण  सुरू आहे. स्त्री संतांविषयी लिहिले आहे. काही कविता व ललित लेख लिहिले आहेत.

☆ गीता आणि मोह ☆ सौ शालिनी जोशी ☆

मोह ही एक मानसिक अवस्था आहे. ते एक आवरण आहे. ज्यामुळे खऱ्या ज्ञानाला माणूस दुरावतो. हा मोह माणसाच्या विकासाच्या आड येतो. त्याचा परिणाम माणसाच्या ज्ञान, विचार आणि आचरणावर होतो. सारासार विवेक दूर होतो. मन भ्रमित होते. योग्य-अयोग्य कळत नाही.

हा मोह तीन प्रकारच्या असू शकतो. १) वस्तूचा २) सत्ता संपत्तीचा किंवा ३) व्यक्तीचा. कारणे कोणतीही असली तरी माणूस कर्तव्यमूठ होतो. आणि परिणाम त्याला स्वतःला व इतरांनाही त्रासदायक होतो. गीतेचा जन्म ही मोहातूनच झाला आहे. मोह निवारण हा गीतेचा हेतू आहे. ते गुरुच करू शकतो.

धृतराष्ट्राला झालेला पुत्र मोह. जो गीतेच्या पहिल्या श्लोकातूनच व्यक्त होतो. ‘मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय।’ माझी मुले आणि पांडूची मुले काय करीत आहेत? माझी मुले आणि पांडव असा भेद त्याच्या ठिकाणी स्पष्ट दिसतो. बाह्यदृष्टीने अंध असणारा धृतराष्ट्र पुत्र प्रेमामुळे अंतःचक्षुनेही अंध झाला आहे. सारासार विचार विसरला आहे. योग्यता नसतानाही आपल्या पुत्राला राज्य मिळावे अशी त्याची इच्छा आहे. या पुत्रमोहाने आपल्या पुत्रांच्या यशासाठी कोणताही भलाबुरा मार्ग आचारण्याला त्याची ना नव्हती. म्हणून पांडवाना त्यांचे हक्काचे राज्य न देण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध केला नाही. पण हा पुत्र मोहच पुढे कौरवांच्या नाशाला कारण झाला.

दुर्योधनाला झालेला सत्तेचा मोह. सत्तेसाठी दुर्योधन कायमच पांडवाना पाण्यात पाहत आला. त्याच्या या अहंकाराचे पोषण शकुनी मामा कडून कायमच झाले. पांडवाना वनवास, विजनवास, द्रौपदी वस्त्रहरण अशी संकटांची मालिकाच भोगावी लागली. सत्तेच्या मोहापायी पांडवांना त्यांच्या वाट्याचे राज्य द्यायला दुर्योधनाने नकार दिला. उलट ‘सुईच्या अग्रावर राहील एवढीही जमीन देणार नाही’ असे उर्मटपणे सांगितले. विदूर व श्रीकृष्ण यांच्या सांगण्याचा उपयोग झाला नाही. धर्माधर्माचा त्याला विसर पडला होता. ‘जानामि धर्मं न मे प्रवृत्तिः। जानामि अधर्मं न मे निवृत्तिः।’ असे तो कबूल करतो. असा हा मोहाचा परिणाम माणसाला विचारहीन बनवितो. आपलेच करणे बरोबर असेच त्याला वाटते. कोणाचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत माणूस नसतो. दुर्योधनाचा मोह हा अहंकारातून, सत्तालालसेतून, पांडवांच्या द्वेषातून निर्माण झाला होता. म्हणून आपले हक्काचे राज्य मिळवण्यासाठी पांडवाना कौरवांबरोबर युद्ध करावे लागले. ते धर्मयुद्ध होते. अधर्माविरुद्धचे होते.

महापराक्रमी अर्जुन सुद्धा मोहात अडकला. ‘सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेsअच्युत’ असे भगवंतांना सांगणारा अर्जुन समोर युद्धभूमीवर आप्तस्वकियांना व गुरुजनांना पाहून धर्मसंमुढ झाला. त्यांच्या विषयी करुणा निर्माण झाली. ‘ भ्रमतीव च मे मनः’ (१/३०) तो भ्रमित झाला. गांडीव गळून पडले. शरीराला कापरे भरले. क्षत्रिय धर्माचे आचरण कठीण झाले. या मोहाचे सामर्थ्य इतके जबरदस्त होते की, तो संन्यासाच्या गोष्टी करू लागला. स्वजनांना मारण्याचे पाप करण्यापेक्षा युद्ध न करण्याचा पळपुटेपणा त्याला योग्य वाटू लागला. युद्धाचा परिणाम कुलक्षयापर्यंत पोहोचला. ज्ञानेश्वर अर्जुनाच्या या स्वजनासक्तीचे वर्णन महामोह असे करतात. ‘तैसा तो धनुर्धर महामोहे। आकळीला। ।'(ज्ञा१/१९०) अर्जुनाचा पराक्रम, स्वधर्मनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा सर्व स्वजन मोहाने झाकले गेले. उलट तो श्रीकृष्णाला आपण कसे योग्य आहोत ते ऐकवू लागला. शेवटी धर्मसंमूढ झालेल्या त्याने श्रीकृष्णाचे शिष्यत्व पत्करले. त्याला शरण गेला. ‘शिष्यस्तेsहं शाधि मां त्वां प्रपन्नम्।’ (गी२/७). मोह दूर करण्याचे काम गुरुच करू शकतो. तेव्हा कृष्णाने गीतोपदेश केला. उपदेश करताना ते म्हणतात,

यदा ते मोहकलिलं बुध्दिर्व्यतितरिष्यति।

सदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च।

(गी२/५२)

जेव्हा तुझी बुद्धी हे मोहरूपी मालीन्य पार करून जाईल तेव्हाच या सर्व विचारातून तू विरक्त होशील. म्हणून मोह दूर करणे हे गीतेचे प्रयोजन ठरते. सगळी गीता सांगून झाल्यावर अठराव्या अध्यायात भगवंत अर्जुनाला विचारतात, ‘अर्जुना, तुझा मोह गेला की नाही?’ यावर अर्जुनाचे उत्तर फार सुरेख आहे. 

नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान्मयाच्युत।

स्थितोsस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव।।

(गी. १८/७३)

भगवंतांनी अर्जुनाचा मोह दूर केला. तो संशय मुक्त झाला. श्रीकृष्णाच्या बोलण्याप्रमाणे करायला तयार झाल्या. तशी कबुली त्याने दिली. मोहनिरसन हे गीतेचे फलित प्राप्त झाले. नातेवाईकांच्या विषयीच्या ममतेतून, करुणेतून अचानक निर्माण झालेल्या मोहाचे निरसन झाले. तो युद्धाला तयार झाला. अज्ञानाने नाही तर पूर्ण ज्ञान होऊन, स्वतःच्या इच्छेने. येथे कोणतीही बळजबरी नाही. अंधश्रद्धा नाही.

अर्जुनाला मोहाचे दुष्परिणाम सांगणारे पंधरा-वीस श्लोक तरी गीतेत आहेत. वेळोवेळी प्रसंगानुरुप ते सांगून अर्जुनाला मोह किती हानी कारक आहे आणि मोहातून बाहेर पडणे कसे श्रेयस्कर आहे हे भगवंतांनी अर्जुनाला पटवून दिले. आणि शेवटी अर्जुन जेव्हा युद्ध करायला तयार झाला तेव्हा भगवंतांची खात्री झाली की गीतोपदेशाचे सार्थक झाले.

अशाप्रकारे जग हे मोहाने बाधित झालेले आहे. रामायणात अगदी सीतेलाही कांचनमृगाचा मोह आवरला नाही. हा व्यक्तिगत पातळीवरचा आणि शुल्लक गोष्टीसाठी, तरीही तो तिला टाळता आला नाही. म्हणून राम रावण युद्ध झाले. तर अर्जुनाला स्वजनासक्ती रूप मोह झाला पण तो भगवंतांना टाळता आला. दूर करता आला. म्हणून महाभारताचे युद्ध झाले. दोन्हीत दुष्ट शक्तींचा पराभव आहे. पण दोघांच्या मुळाशी मोहच आहे.

 आपण तर सामान्य माणसं आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्पर्धा आहे, संघर्ष आहे, हेवेदावे मत्सर आहे. त्यातून अनेक मोहाचे प्रसंग येत असतात. त्यातूनच आपण आपल्याला सांभाळले पाहिजे. अर्जुनाला सावरणारा तो भगवंत आपल्याही हृदयात आहे याची जाण ठेवून त्याचे स्मरण करून विवेकाने अविवेकावर मात करावी. स्वतःचा तोल धळू देऊ नये. नेहमी सावध असावे. हेच अर्जुनाच्या उदाहरणांनी सर्व समाजाला भगवंतांना सांगायचे आहे. शेवटी आपण सारे अर्जुन आहोत.

मोहाविषयी सांगणारे गीतेतील श्लोक क्रमांक

२/६३, ४/३५, ५/२०, ६/३८, ७/१३, ७/२०, ७/२५, १५/५, १५/१९, १६/१६, १७/१३, १८/७, १८/२५, १४/२२……

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तिची अबोल शिकवण… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

??

तिची अबोल शिकवण ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

मुलगी सासरी येते तेव्हा एका डोळ्यांत आसूं व दुसर्‍या डोळ्यांत हासूं घेऊनच येते. एका डोळ्यांत माहेर दूर करावे लागल्याचे दुःख तर दुसर्‍या डोळ्यांत नवीन स्वप्न असतात. वियोगाचेच दुःख असले तरी आपण सासरी येतांनाच्या भावना वेगळ्या व मुलगी सासरी पाठवतांनाच्या भावना वेगळ्या असतात.

माझी लेक सासरी गेली व थोड्याच दिवसात मुलगा परदेशात शिकायला गेला त्यावेळी आमचं घरटं खर्‍या अर्थाने रिकाम झालं. मला तर काहीही करण्याचा उत्साह वाटेनासा झाला होता. जगणं जणू काही थांबलं आहे असंच वाटायला लागलं होतं. अगदी अंथरूणच धरलं होत मी.

असं असलं तरी कामं तर करावीच लागत होती. एकदा मला माझ्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून बुलबुल पक्षाचं घरटं दिसलं. पक्षाचं इवलंस पिल्लू सतत चोच उघडं ठेवून होतं. पक्षीण दिवसभर त्याला भरवायची. हळूहळू ते मोठं झालं. मला रोजच ते बघायचा नादच लागला होता.

त्या पिल्लाला पंख फुटले आणि पक्षिणीने त्या पिल्लाला उडायला शिकवलं व ते घरट्याबाहेर निघालं. ती स्वतः उंच उडवून दाखवून पिल्लाला आणखी उंच उडायला शिकवत होती. ही प्रक्रिया बघतांना मला एक लक्षात आलं; ते पिल्लू अगदी छोटं होतं तरी एकदा घरट्यातून निघाल्यावर परत घरट्यात गेलं नाही. पक्षिणीचं भक्ष्य शोधायला व उडायला शिकवणं अव्याहत चालू होतं. मांजरापासून व इतरांपासून ती रक्षणही व्यवस्थित करत होती.

थोड्या दिवसांनी पंखात पुरेसं बळ आल्यावर पिल्लाचं रक्षण करण्याची तिची जबाबदारी संपली. पिल्लूही स्वतंत्रपणे उडून गेलं व पक्षीणही स्वतःचं नवीन जीवन जगायला स्वतंत्र झाली. दोघांनीही आपलं स्वतंत्र विश्व उभारलेलं असणार होतं.

माझ्याही डोक्यात एकदम उजेड पडला. त्या पाखरांची अबोल शिकवण मला खूप काही शिकवून गेली. मलाही उमगलं; पंख फुटलेल्या आपल्या पाखरांना झेप घेऊ देणच योग्य आहे. आपल्यालाही आपले पुन्हा नवीन विश्व उभारता येते. समाजात; समाजकार्य करण्यासाठी अथवा मन रमवण्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत.

खरंच ते छोटसं पाखरूं मला खूप मोठी जीवनदृष्टी देऊन गेलं. त्यानी मला नव्यानी जगायला शिकवलं. मग माझ्याही जीवनात मी नव्यानी रंग भरायला सुरवात केली.

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डेनिस डिडेरोट इफेक्ट — ☆ माहिती संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ डेनिस डिडेरोट इफेक्ट — ☆ माहिती संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

— डेनिस डिडेरोट  —

रशियात डेनिस डिडेरोट नावाचा एक अभ्यासू वाचक होता. इ. स. 1765 मध्ये त्याचे वय जवळ पास 52 वर्ष होते. त्याने खूप ग्रंथ वाचले होते. त्याचे स्वत:चे मोठे ग्रंथालय होते. त्याचे संपूर्ण आयुष्य वाचनात; पण गरिबीत गेले. मुलीच्या लग्नासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. इतका तो गरीब होता. त्या वेळी रशियाची राणी कँथरीनला डेनिस डिडरोटच्या गरीबीबद्दल कळले. तिने डिडेरोटला त्याच्याकडील लायब्ररी विकत घेण्यासाठी 1000 GBP, म्हणजेच 50 हजार डॉलर्स म्हणजे; आजचे जवळपास साडेतीन कोटी रुपये डिडरोटला देऊ केले. डेनिस डिडरोटने मान्य केले व त्याने आपले ग्रंथालय विकून टाकले.

डेनिस डिडेरोट एका दिवसांत खूप श्रीमंत झाला. त्याने त्या पैशातून लगेच ‘स्कार्लेट रॉब’; म्हणजे एक उच्च प्रतीचा व महाग असा पोषाख खरेदी केला. हा सदरा वापरत असतांना त्याला वाटले की; आपण उच्च प्रतीचा पोषाख घालतोय; पण आपल्या घरात मात्र तशा उच्चप्रतीच्या वस्तू नाहीत. मग त्याने हळूहळू घरातल्या वस्तू बदलल्या. किचन रूममधल्या वस्तू बदलल्या. फर्निचर बदलले. सगळं काही नवं नवं. आता त्याचं संपूर्ण घर आणि पोषाख दोन्ही ही शोभून दिसत होते. परंतु हे सगळं केल्याने तो पुन्हा कंगाल झाला आणि कर्ज ही वाढत गेले. मोठ्या दु:खाने डेनिस डिडरोटने हे सहन केले आणि मग त्याने हे सगळे अनुभव आपल्या एका निबंधांत लिहून ठेवले. यालाच मानस शास्त्रातील ‘डिडरोट इफेक्ट’ (Diderot Effect) म्हणतात.

भारतातले मोठे उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स, डेव्हलपर्स पुढारी सुद्धा; या ‘इफेक्ट’चा छुप्या पद्धतीने अवलंब करतात. याचे निरीक्षण आपण स्वत: बद्धल करून पहाण्यास हरकत नाही. कसे?

समजा आपण महागडे कपडे घेतले; तर त्याला मॅचिंग घड्याळ, पेन, बूट, गाडी…. इ. घेणार.

घरात मोठा टी. व्ही. आणला की चांगला टेबल, फर्निचर, HD वाहिन्या सुरु करणार. घराला नवा रंग लावला की त्याला मॅचिंग पडदे लावून सजावट करणार.

समजा आपण पन्नास हजार रूपयांचा मोबाईल घेतला; तरी आपल्याला आणखी काहीतरी कमी आहे असे वाटते. मग अजून 600 रुपयांचा गोरील्ला ग्लास लावणार. दर महिन्याला 500 रुपयांचे कव्हर बदलणार. शंभर रुपयांचा हेडफोन चालला असता; पण अडीच तीन हजाराचा हेडफोन घेणार. कारण या मोबाईलला स्वस्त शोभून दिसत नाही. हे सर्व कशासाठी? इतरांवर इंप्रेशन मारण्यासाठी. यालाच म्हणतात ‘डिडेरोट इफेक्ट’ 

थोडक्यात सांगायचे तर; एक नवीन वस्तू विकत घेतली की; तिच्यामुळे दुसऱ्या वस्तूंचा दर्जा आपोआपच कमी होतो; आणि तो वाढविण्यासाठी आपण आणखी जास्त खर्च करीत जातो.

सर्वच उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स या ‘इफेक्ट’चा छुप्या पद्धतीने वापर करतात.

एक laptop विकत घेतांना त्यासोबत हजार दोन हजाराचा antivirus टाकून देतो. हजार बाराशेचं कव्हर घेतो; ज्याचा क्वचितच वापर केला जातो. कुंडी वा फुलझाड विकत घेतलं की; सोबत शे दोनशे रुपयाचे खत माथी मारलं जातं. लग्न समारंभात तर या प्रदर्शनाची चढा ओढ लागलेली दिसून येते. अशी असंख्य उदाहरणे आहेत.

आपण एक वस्तू घ्यायला गेलो की; दुसऱ्या वस्तू आपोआपच घेतो; गरज नसली तरी. अशा पद्धतीने आपण एक एक वस्तू घेऊन अनेक अनावश्यक किंवा फारशा महत्वाच्या नसणाऱ्या वस्तू घेत असतो; आणि ते आपणास कळत सुद्धा नाही. यालाच ‘spiraling consumption’ म्हणतात. म्हणजे; एका वस्तूमुळे दुसऱ्या वस्तूची गरज वाटणे आणि ती विकत घेणे. हाच तो ‘डिडेरोट इफेक्ट’ (Diderot Effect) होय. ही सामान्य मानवी प्रवृत्ती (human tendency) आहे.

या प्रवृत्तीचे परिणाम भयानक होत असतात; पण ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. आपण नकळतपणे अनावश्यक खर्च करत जातो. काही लोकांच्या हे लक्षात येतं; तर काहींच्या लक्षात खूप उशिरा लक्षात येतं पण अनेकांच्या हे लक्षातच येत नाही. म्हणून ते खूप खर्च करीत असतात.

माणसाला खर्च करताना भीती वाटत नाही; पण नंतर हिशोब लागत नाही; तेव्हा त्याचा त्रास होतो. म्हणून कोणतीही वस्तू खरेदी करताना; या वस्तूची मला कितपत गरज आहे? असा स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारावा. विचार करून त्याचं उत्तर जर होय आलं तरच ती वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा. असा निर्णय घेतल्यावर त्या वस्तूचा दर्जा आणि किंमत वाजवी आहे कां? याचा विचार करून मिळेल त्या किंमतीत न घेता ती वाजवी किंमतीत घेण्याचा प्रयत्न करावा.

दुकानदार एक वस्तू समोर ठेवतो; लगेच तो दुसरी वस्तू दाखवून संभ्रम निर्माण करतो. तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की; ती वस्तू कितीही चांगली असली; तरी तिचा आपल्या उपयोगितेशी व आनंदाशी काही संबंध नसतो. तो आनंद क्षणिक असतो. कालांतराने तो आनंद ही संपतो आणि पैसे ही जातात. म्हणून या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे. पण त्यासाठी स्वतःच प्रयत्न करावा लागतो.

संदर्भ : ‘ डिडेरोट इफेक्ट ‘ 

(Diderot Effect – – Understanding the ‘Diderot Effect’ and how to overcome it ? )

संकलन व प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी 

रत्नागिरी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वलयांकितांच्या सहवासात – भाग १ – लेखक: डॉ. नितीन आरेकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

 ***** पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन *****

☆ वलयांकितांच्या सहवासात – भाग १ – लेखक: डॉ. नितीन आरेकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

मला आठवतं तेव्हापासून त्याला मी, झाकीरकाका असं म्हणत आलोय. कारण तो माझ्या सगळ्यात धाकट्या काकाचा- रवीकाकाचा खास दोस्त. त्याला पहिल्यांदा पाहिला तो वयाच्या तिसर्‍या वर्षी. १९६९ साली. संध्याकाळी डेक्कन क्वीननं रवीकाका व अरुणकाका मुळे त्याला घेऊन आमच्याकडे कर्जतला आले होते. आमचा ८० वर्षांचा जुना वाडा होता. ते तिघं अचानक आले होते. पण आजीनं त्याला वाड्याच्या बाहेर उभं केलं. त्याच्यावरून भाकरतुकडा ओवाळून टाकला, पायावर दूध-पाणी घातलं आणि मग त्याला आत येऊन दिलं होतं. आमच्या बाजारपेठेच्या नाकावर कामतांचं वड्याचं दुकान होतं. रवीकाकाला त्यानं सांगितलं, “यार कर्जतका वडापाव खिलाओ. ” रवीकाकानं कामतांच्या हॉटेलातला वडापाव मागवला आणि त्यानं चवीनं वडा-पाव व सोबत तिखट मिर्ची खाल्ली. मला आठवतं त्याप्रमाणे, झाकीरकाका नंतर घरभर फिरला, मागे विहिरीवर गेला.

विहिरीचं पाणी स्वत: शेंदून काढलं, त्यानं हातपाय धुतले. गोठ्यातल्या म्हशीचं ताजं दूध मधुकाकांनी काढलेलं, त्यांच्यासमोर हातात ग्लास धरून उभा राहिला व थेट तसंच ते दूध प्यायलं. त्यावेळी मला ह्या साध्या गोष्टींचं महत्त्व कळलं नव्हतं. पण आज या लेखाच्या निमित्तानं आठवणींचा गोफ उलगडत असताना, त्यावेळपर्यंत आंतरराष्ट्रीय कीर्ति मिळवलेल्या त्या माणसाचं साधंपण सर्वप्रथम लक्षात आलं.

त्या संध्याकाळी झाकीरकाका कोपर्‍यावरच्या मारुतीकाका मगर यांच्या दुकानात दाढी करायला गेला. तिथं त्याला कळलं की मारुतीकाका हे भजनी आहेत. तो लगेच त्यांना म्हणाला, “रातको रवी के यहाँ आ जाना. हम लोग बजानेवाले है. ” त्या रात्री रवीकाका, अरूणकाका त्याला घेऊन जवळच असलेल्या प्रभा आत्याच्या घरी गेले. तिच्या घरच्या दिवाणखान्यात हे सारी रात्र गाणं बजावणं करत बसले होते. नंतर कधी तरी आठवणी जागवताना रवीकाका म्हणाला त्या रात्री प्रभाआत्याच्या घरी गजाननबुवा पाटील, लीलाताई दिवाडकर, प्रभा आत्या, कल्पनाआत्या कुलकर्णी (हिचं नुकतंच निधन झालं) असे सारे गायले, शांताराम जाधव हार्मोनियमवर होते, मारुतीकाका टाळ घेऊन साथीला होते. त्या दिवशी गजाननबुवांची गायकी ऐकून झाकीरकाका त्यांना म्हणाला होता, “आप तो भजन के गोपीकृष्ण हो” बाकी सारी मंडळी हौशी होती. पण, झाकीरकाकाला तो कोणाबरोबर तबला वाजवतो, यात फारसा रस नव्हता. तो तबल्याचा आनंद घेत होता. दुसर्‍या दिवशी सकाळी डेक्कन एक्स्प्रेसने तो सवाई गंधर्व सोहळ्यात तबला सोलो सादर करायला गेला. तो त्याचा सवाई गंधर्व सोहळ्यामधला पहिला कार्यक्रम होता.

त्यानंतर झाकीरकाका कर्जतला रवीकाकाच्या सांगण्यावरून १९७१, ७२, ७३ आणि नंतर बेडेकरांच्याकडे पाडव्याच्या निमित्ताने संगीत सोहळा असे, तेव्हा १९७५ साली आला. त्या प्रत्येक वेळी त्याच्यातला साधेपणा मनात घर करून गेला. कोणताही झब्बा पायजमा घालायचा आणि तबला वाजवायचा. कपड्यांपेक्षा त्याचं संगीताकडे अधिक लक्ष असायचं. आणि तो इतका देखणा आहे की त्याला काहीही साजून दिसतं.

झाकीरकाकाची एक सवय आहे. तो तुमची ओळख झाल्यानंतर व नंतर जवळचा परिचय झाल्यानंतर तुम्हाला एखादं टोपणनाव देतो. मला लहानपणापासून ज्या टोपणनावानं सारे हाक मारत तेच टोपणनाव तो आजही वापरतो. त्याच्याशी परका माणूस जरी बोलला तरी त्या व्यक्तीला तो परकेपणाची जाणीव कधी करून देत नाही.

त्याने मराठीत मुलाखती दिल्या पण शब्दांकन दिलं नाही. ‘ऋतुरंग’च्या अरुण शेवते यांनी मला सांगितलं की २००३ च्या दिवाळी अंकासाठी तुम्ही उस्तादजींच्या जडणघडणीविषयी त्यांची मुलाखत घ्या व तिचं शब्दांकन करता येईल का ते बघा. माझं ते पहिलं शब्दांकन असणार होतं. मी रवीकाकाला सांगितलं, निर्मला बाछानी म्हणून झाकीरकाकाच्या सचिव आहेत, त्यांना सांगितलं आणि झाकीरकाका मुलाखतीला तयार झाला. शब्दांकनकार होण्यासाठी मला पहिला आशीर्वाद मिळाला तो उस्ताद झाकीर हुसेन यांचा.

१९८७ च्या सुमारास दर रविवारी दुपारी सिद्धार्थ बसूचा एक ‘क्वीझ टाईम’ नावाचा शो असायचा. त्या क्वीझ शोमध्ये झाकीरकाका एकदा गेस्ट म्हणून गेला. मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो. त्या शो मध्ये सिद्धार्थ बसूने त्याला प्रश्न विचारला, “तू जगभर फिरलास. आता तुला भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती यातला कोणता भेद सांगता येईल. ” त्यानं दिलेलं उत्तर आजही काळजावर कोरलं गेलं आहे. तो म्हणाला, “मी जेव्हा पाश्चिमात्य संगीतकारांना भेटतो, तेव्हा त्यांना हस्तांदोलन करून हॅलो माईक, हॅलो मार्क असं म्हणतो. पण जेव्हा मी पं. रवी शंकरजी, पं. शिवकुमार शर्माजी, पं. हरिप्रसाद चौरसिया, अशा दिग्गजांना भेटतो, तेव्हा त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करतो. दुसर्‍या बरोबरीच्या वयाच्या लोकांना भेटतो, तेव्हा दोन्ही हात जोडून ते जोडलेले हात हृदयाशी नेतो व मान झुकवून नमस्कार करतो आणि वयानं लहान असलेल्यांना हृदयाशी धरतो. ही माझी भारतीय संस्कृती आहे, ज्येष्ठांना मान देणारी आणि कनिष्ठांविषयी प्रेम व्यक्त करणारी. ” मला याचा अनुभव आहे.

तीन वर्षांपूर्वी अब्बाजींच्या, उस्ताद अल्लारखांसाहेबांच्या, बरसीला पद्मविभूषण बेगम परवीन सुलताना यांचं गाणं त्यानं आयोजित केलं होतं. त्यावेळी पहाटे पहाटे मी व रवीकाका षण्मुखानंद सभागृहात पोहोचलो होतो. परवीनजींचं गाणं सुरू व्हायचं होतं. त्यापूर्वी ड्रेसिंगरूममध्ये बरेच जण जमले होते. परवीनदीदी सोफ्यावर बसल्या होत्या. त्यांच्या बाजूला अन्य ज्येष्ठ संगीततज्ज्ञ बसले होते. पहिला कार्यक्रम सुरू करून देऊन झाकीरकाका त्या ड्रेसिंगरूममध्ये आला, आणि परवीनदीदींच्या जवळ खाली जमिनीवर जाजम अंथरलं होतं त्यावर बसला. त्याला कोणी तरी बाजूच्या खुर्चीवर बसायचा आग्रह केला. तेव्हा तो हळूवारपणे म्हणाला, “परवीनजी ज्येष्ठ आहेत, त्यांच्याबाजूला बसणं योग्य होणार नाही. ” नंतर आम्ही उस्ताद आमीरखांसाहेबांच्या बरसीला एन्. सी. पी. ए. ला गेलो होतो. त्या दिवशी झाकीरकाका हा नवोदित उमद्या अशा सारंगीवादकाबरोबर- दिलशादखांबरोबर वाजवणार होता. कार्यक्रमाच्या सूत्रानुसार आधी दिलशादखां येणार आणि नंतर उस्ताद झाकीर हुसेन येणार असं होतं. मी व रवीकाका विंगेत होतो. उस्तादजींनी निवेदकाला क्रम बदलायला सांगितला आणि म्हणाले, “मी आधी स्टेजवर येतो व मी दिलशादला इंट्रोड्यूस करतो. ” त्याच्या नावाचा पुकारा झाल्यानंतर, रंगमंचावर पाऊल ठेवण्यापूर्वी त्यानं त्याच्या चपला बाहेर काढून ठेवल्या. मग रंगमंचावर शिरला. सर्व रसिकांना नम्रपणे कमरेतून वाकून नमस्कार केला आणि मग त्याने दिलशादखांबद्दल छानसं वक्तव्य केलं, ‘आज मी त्याच्याबरोबर पहिल्यांदा वाजवणार आहे’ असं सांगून मग श्रोत्यांना टाळ्यांच्या गजरात दिलशादखांचं स्वागत करावं अशी विनंती केली. एखाद्या ज्येष्ठाने नवोदिताचा इतका मोठा सन्मान कधी केला नसेल.

तो मूल्ये जपणारा माणूस आहे. ‘लोकसत्ते’तील माझी शब्दांकनं लोकांना आवडत होती. एका मोठ्या उद्योजकाला ती फार आवडली. त्यांच्या पत्नीनं मला शोधून काढलं. मला फोन करून त्यांच्या पतीचं आत्मकथन लिहिण्याची विनंती त्यांनी केली. मी फारसा तयार नव्हतो. त्याचं एक कारण म्हणजे ते अफाट श्रीमंत असले तरी त्यांचा व्यवसाय हा तंबाखूशी निगडित होता. मला कोणतीही व्यसनं नाहीत, मी व्यसनांना स्पर्शही केलेला नाही. मी प्राध्यापक आहे. त्यामुळे ते मला योग्य वाटत नव्हतं. पण माझे वडील म्हणाले, ‘एक वेगळं जीवन समजून घेता येईल. ‘ त्या उद्योगपतींचं जीवन खरोखरच समजून घेण्याजोगं होतं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानशिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यांनी मला विचारलं, “या रक्तदान शिबिराला झाकीरजी भेट देऊ शकतील का?” विचाराल का? अब्बाजींची बरसी जवळ आली होती. आम्ही आदल्या दिवशी झाकीरकाकाकडे गेलो. मी झाकीरकाकाला विनंती केली, “अशा अशा कार्यक्रमाला तू येशील का?” त्यानं माझ्याकडे रोखून पाहिलं व पुढच्या क्षणी म्हणाला, “नहीं, मैं नहीं आऊंगा, पहले लोगों का खून चूसो बाद में खून भी लो।इस भारत में मैं दो सेलिब्रिटीज को जानता हूँ जिन्होंने आजतक किसी इंटॉक्सिकेशन से रिलेटेड कोई काम नहीं किया। एक बहोत बडा है जिसका नाम सचिन तेंडुलकर है और दुसरा बहोत छोटा है जिसका नाम झाकीर हुसेन है. ” मी अर्थातच त्या व्यक्तीचं आत्मकथन शब्दांकित केलं नाही.

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : डॉ. नितीन आरेकर

nitinarekar@gmail. com

Tel:+91 880 555 0088

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “ भुरूभुरू पाऊस, गरमागरम काॅफी आणि तो…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “ भुरूभुरू पाऊस, गरमागरम काॅफी आणि तो…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

तसंही तुझ्या बोलण्याला धरबंध काही असतो का…

घटकेत एक बोलतोस तर घटकेत दुसरचं सांगतोस..

वर सांगतोस मी काय म्हणतोय ते समजतंय का तुला…

मी एकशे ऐंशी कोनात फक्त मान वळवते.. आणि तुला विचारते याचा अर्थ समजलाच असेल की तुला… तुला माझा राग येतो… नि म्हणतो हि काय चेष्टा आहे.. साधं हो कि नाही हे सांगताही येऊ नये तुला.. माणसानं समजावं तरी काय?..

कळलं की नाही कळलं…

अगदी हेच हेच होतं माझं तू जेव्हा घटकेत कधी हे तर पुढच्या घटकेत कधी ते… कसं समजून घ्यावं रे माणसानं… जेव्हा दोन अगदी विरुद्ध टोकाच्या गोष्टी एकाच वाक्यात येतात तेव्हा… मग इतकाच समज होतो माझा तुझाच काहीतरी गोंधळ उडालाय आणि त्यात तू पुरता अडकलायस… तुझं तुला तरी नीट कळलं आहे कि नाही कुणास ठाऊक…. आडातच नाही तर….

आताचीच गोष्ट घे… बाहेर पावसाच्या हलक्या हलक्या सरी पडत आहे… आणि आपण दोघे कोपऱ्यावरच्या कॅफेच्या व्हरांड्यात गरम गरम काॅफीचा मग हाती धरून… टी. एलिएडसच्या कवितेवर बोलत बसलोय… नव्हे नव्हे मी बोलतेय आणि तू ऐकतोस आहेस… निदान तसं तुझे कान माझ्याकडे आहेत म्हणून मला तसं वाटतं… आणि तुझे डोळे मात्र बाहेर पडणाऱ्या पावसावर खिळलेत… माझ्या नजरेतून ते काही सुटलेलं नसतं… पण यावरची गंमत म्हणजे तुझं मनं… ते तर काॅफी, कॅफे, मी आणि तो पाऊस या सगळ्याची क्षणभरच दखल घेतं नि पसार झालेलं असतं… अगदी तुझ्याही नकळत आणि मला ते जाणवतं तुझ्या बोलण्यावरून… तू बोलत जातोस…

… खरंच आता या पावसात मनसोक्त भिजावं अगदी मनमुराद.. वयं विसरून तु आणि मी.. किती मजा येईल… आता पावसाची एक सर आपल्या टेबलकडे वळते आणि तू बोलतोस अशात एक कोवळं उन पडावं.. श्रावणमासा सारखं… उन पावसाचा खेळ इंद्रधनुष्यात बघायला मिळावा… पाऊस थबकतो आणि काळ्या ढगाच्या रघाआडून सूर्य आळसावून डोकं बाहेर काढत आपले डोळे किलंकिले करत किरणांची उघडझाप करू लागतो… पावसाच्या सरीत मी अल्लड नवतरुणी सारखी लाजेने चूर चूर होऊन इंद्रधनू सारखी गोरी मोरी तुला दिसते तेव्हा.. तू पुढे बोलतोस अशा वेळी एक वाऱ्याची थंडगार झुळूक यावी आणि तिने या पावसाच्या सरी वर सरी पडत राहणाऱ्या या नव तरुणीच्या अंग कांती वर हलकासा शिरशिरीचा काटा फुलून यावा… तो तिच्या अंगोपांगाला लपटलेला पदर देखिल वाऱ्याच्या झुळकेवर थरथरत पसरून जावा… अगदी ते तसेच चित्र उभं राहतं तुझ्या नजरेसमोर आणि तू बोलतोस… यावेळी मग हातात असावा काॅफीचा मग… सोबत असावी कवितावेडी मैत्रीण.. टी. एलिएडसची कविता वाचत… इतकं रोमॅन्टिक वातावरणात असेल तर… तारूण्यचा बहर कधीच संपू नये असं का बरं वाटणार नाही… कारण तेच तर रसिक असतं मन… अक्षर, अमर्यादित असल्यासारखे…. बाकी सगळ्यांना मर्यादा असतात.. पाऊस, वारा, ऊन, तन.. सगळं सगळं कधी तरी थांबतच असतं….

तू असाच वाहत वाहत जात असतोस.. आणि मी तुला म्हणते

तसंही तुझ्या बोलण्याला धरबंध काही असतो का…

घटकेत एक बोलतोस तर घटकेत दुसरचं सांगतोस..

वर सांगतोस मी काय म्हणतोय ते समजतंय का तुला…

आणि मी वेडी कवीता तुझ्या बोलण्याच्या मतितार्थाला शब्दांच्या जंजाळात अडकवू पाहते… काही बोलले शब्द हाती सापडतात तर काही तसेच बरेचसे सटकतात… मी फक्त तेव्हा

मी एकशे ऐंशी कोनात फक्त मान वळवते.. आणि.. आणि….

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राजधानी दिल्ली… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

राजधानी दिल्ली ☆ सौ कल्याणी केळकर बापट

आपला संपूर्ण भारत हा त्याच्या वैविध्यपू्ण वैशिष्ट्यांनी समृध्द आहे. संपूर्ण भारतातील वेगवेगळा प्रांत हा त्याच्या निरनिराळ्या उपलब्धते मुळे प्रसिद्धीस पावलेला आहे. ह्यामध्ये त्या त्या प्रांताची वैशिष्ट्ये हा तो प्रांत किती समृद्ध आहे हे दर्शवून देतात. ह्यामध्ये त्या भागाला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य, पोषक हवामान, खानपान आणि राहणीमानातील समृध्दी ह्यांचा समावेश असतो.

ह्या प्रांतापैकीच एक प्रांत बंगाल. बंगालचे नाव घेताच डोळ्यांसमोर उभा राहतो तेथील नवरात्र उत्सव, लाभलेला सागरकिनारा, त्यामुळे मत्स्यप्रेमी मंडळींचा तृप्त होणारा जठराग्नी, ओल्या नारळाच्या भरपूर वापरामुळे तेथील ललनांना लाभणार विपुल केशसंभार, माशांच्या सेवनाने लाभलेले सुंदर डोळे, आणि ह्याचा परिपाक म्हणजे मिष्टान्न प्रेमीची तृप्ती करणारा तो पाकात बुडलेला भलामोठा रसगुल्ला, बायकांचा विक पॉइंट असणाऱ्या कलकत्ता साड्या, आणि अजुन बरेच काहीतरी.

आता हे कलकत्ता वर्णन अजुन एका गोष्टीची आठवण करून देतं ती म्हणजे ब्रिटिश काळात भारताची राजधानी ही पण कलकत्ताच होती. आजच्या तारखेला म्हणजे 12 डिसेंबर 1911 साली भारताची राजधानी कलकत्ता ऐवजी दिल्ली करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. मात्र त्याची कागदोपत्री अंमलबजवणी नंतर झाली.

भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीचा पाया तत्कालीन सम्राट जॉर्ज पाचवा यांच्या द्वारे रचण्यात आला. दिल्लीला भारताची राजधानी करण्याचा प्रस्ताव 1911 च्या दिल्ली दरबार कार्यक्रमात ठेवण्यात आला होता. शहराची वास्तुकला आणि नियोजन दोन ब्रिटिश आर्किटेक्ट सर हर्बर्ट बेकर आणि सर एडविन लुटियन यांच्याद्वारे बनविण्यात आली आहे. 13 फेब्रुवारी 1931 रोजी व्हाईसरॉय लॉर्ड इर्विन यांनी दिल्लीचे देशाची राजधानी म्हणून उद्घाटन केले. तेव्हापासून नवी दिल्ली सरकारचे केंद्र बनली आणि देश चालविण्यासाठी आवश्यक सर्व शाखा दिल्लीमध्ये आहेत.

भारताची राजधानी दिल्ली होण्यापूर्वी 1911 पर्यंत कोलकत्ता ही देशाची राजधानी होती. तसेच दिल्ली यापूर्वी भारतावर राज्य केलेल्या अनेक साम्राज्यांचे आर्थिक आणि राजकीय केंद्र होते. यापैकी काही उत्तम उदाहरणे म्हणजे दिल्ली सल्तनत मधील मुघलांच्या कारकीर्दीची. ब्रिटिश भारतात आल्यानंतर बर्‍याच गोष्टी बदलल्या. 1900 च्या सुरुवातीच्या काळात ब्रिटीश प्रशासनाने भारतीय साम्राज्याची राजधानी कलकत्ताहून दिल्लीला हलविण्याचा विचार केला.

राजधानी हलवण्यामागील मुख्य कारण म्हणजे दिल्लीचे स्थान. कोलकत्ता हे देशाच्या पूर्वेकडील किनारपट्टी भागात होते, तर दिल्ली उत्तरेकडील भागात होती. ब्रिटीश सरकारच्या म्हणण्यानुसार, दिल्लीहून राज्य करणे सोपे आणि सोयीचे होते.

हा प्रस्ताव ब्रिटीश राजांनी मान्य केला आणि त्यानंतर 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली दरबार दरम्यान तत्कालीन शासक जॉर्ज पंचम यांनी क्वीन मेरी बरोबर जाहीर केले की कोलकाता येथून भारताची राजधानी दिल्लीत हलविण्यात येईल. या घोषणेबरोबरच किंग्जवे कॅम्पच्या कोरोनेशन पार्कचे शिलान्यासही करण्यात आले. ते व्हायसरॉय यांचे निवासस्थान होते.

15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने राजधानी म्हणून दुसऱ्या शहराचा विचारही केला नाही. कारण, तोपर्यंत नवी दिल्लीचा विस्तार अनेक पटीने झाला होता वेगाने विकास होत होता. स्वातंत्र्यानंतर, दिल्ली नवीन राष्ट्राची राजधानी बनली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तीचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आणि दिल्ली आता देशाची राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी बनली आहे.

तसही भारताची राजधानी कलकत्त्या हून दिल्ली ला हलविण्यामागे अजुन एक प्रमुख कारण म्हणजे बंगालच्या फाळणी नंतर कलकत्त्यातील राजकीय, सामाजिक वातावरण एकदम ढवळून निघाले होते, प्रचंड अस्थिरता आली होती.

चिरायू भारताच्या दृष्टीने राजधानी हलविण्याचा निर्णय एकदम मोलाचा ठरला ह्यात तिळमात्रही शंका नाही.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१२ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१२ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

बाळसेदार पुणे..

रोज सकाळी सुस्नात होऊन, तुळशीपुढे दिवा लावून, सुबकशी रांगोळी काढून, हातात हळदी कुंकवाची कुयरी सावरत सुवासिनी, श्री जोगेश्वरी दर्शन घेऊन मगच स्वयंपाकाला पदर बांधायच्या. वारांप्रमाणे वेळ काढून एखादी उत्साही गृहिणी समोरच्या बोळातून बेलबागेकडे प्रस्थान ठेवायची. आमच्या हातात आईच्या पदराचे टोक असायचं. आई भगवान विष्णूच दर्शन घ्यायला सभा मंडपात शिरली की आईच्या पदराचं टोक सोडून आमचा मोर्चा मोराकडे वळायचा. खिडकीवजा जागेत दोन मोर पिसारा फुलवित दिमाखात फिरायचे. आम्ही मोरपिसांचे मोहक रंग आणि पिसाऱ्यावरची पिसं मोजत असतांना मोर आपला पिसांचा पसारा आवरता घ्यायचा. आणि मग मनांत खट्टू होऊन आम्ही मागे वळायचो.

तर काय ! आनंदाने आणि सुगंधाने वेडच लागायचं. पानोपान फुलांनी डंवरलेल्या झाडांनी, बकुळीचा सडा शिंपलेला असायचा. अगदी ‘अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशिल दो कराने, ‘अशी स्थिती व्हायची आमची. इवल्याश्या मोहक फुलांचा गजरा मग लांब सडक वेणीवर रुळायचा. अलगद पावलं टाकली तरी नाजूक फुलं पायाखाली चिरडली जायची. नाजूक फुलांना आपण दुखावलं तर नाही ना?असं बालमनात यायचं. बिच्चारी फुलं ! रडता रडता हसून म्हणायची, “अगं चुकून तू आमच्यावर पाय दिलास, तरी मी तुझ्या पायांना सुगंधचं देईन हो !

देवळाच्या पायरीवर बसलेल्या आईला आम्ही विचारलं, ” आई इथे मोर आहेत म्हणून या देवळाला मोरबाग का नाही गं म्हणत? बेलबाग काय नाव दिलंय. ? आई बेलबागेचं गुपित सांगायची, ” हे भगवान श्री विष्णूंचं मंदिर आहे. इथे पूर्वी बेलाचं बन होतं. फडणवीसांचं आहे हे मंदिर. इथे शंकराची पिंड असून खंडोबाचे नवरात्र पेशवे काळातही साजरं व्हायचं. तुळशीबागेत पूर्वी खूप तुळशी म्हणून ती तुळशीबाग. हल्लीचं एरंडवणा पार्क आहे ना ! तिथे खूप म्हणजे खूपच एरंडाची झाड होती अगदी सूर्यकिरणांनाही जमिनीवर प्रवेश नव्हता. एरंडबन म्हणून त्याचं नाव.. अपभ्रंश होऊन पडलं एरंडवणा पार्क. रस्त्याने येतानाही नावांची गंमत सांगून आई आम्हाला हसवायची. प्रवचन कीर्तन असेल तर ते ऐकायला ति. नानांबरोबर

(माझे वडील आम्ही पंत सचिव पिछाडीने रामेश्वर चौकातून, बाहुलीच्या हौदा कडून, भाऊ महाराज बोळ ओलांडून, गणपती चौकातून नू. म. वि. हायस्कूलवरून श्री जोगेश्वरीकडे यायचो. ऐकून दमलात ना पण चालताना आम्ही काही दमत नव्हतो बरं का ! 

गुरुवारी प्रसादासाठी हमखास, घोडक्यांची सातारी कंदी पेढ्याची पुडी घेतली जायची. तिथल्याच ‘काका कुवा’ मेन्शन ह्या विचित्र नावांनी आम्ही बुचकळ्यात पडायचो. वाटेत गणपती चौकाकडून घरी येताना शितळादेवीचा छोटासा पार लागायचा. कधीकधी बाळाला देवीपुढे ठेवून एखादी बाळंतीण बारावीची पूजा करताना दिसायची. तेला तुपानी मॉलिश केलेल्या न्हाऊनमाखून सतेज झालेल्या बाळंतपणाला माहेरी आलेल्या माझ्या बहिणी, बाळांना, माझ्या भाच्यांना देवीच्या ओटीत घालून बाराविची पूजा करायच्या, तेव्हां त्या अगदी तुकतुकीत छान दिसायच्या. नवलाईची गोष्ट म्हणजे घरी मऊशार गुबगुबीत गादीवर दुपट्यात गुंडाळलेली, पाळण्यात घातल्यावर किंचाळून किंचाळून रडणारी आमची भाचरं सितळा देवीच्या पायाशी, नुसत्या पातळ दुपट्यावर इतकी शांत कशी काय झोपतात? नवलच होतं बाई! कदाचित सितळा आईचा आशीर्वादाचा हात त्यांच्या अंगावरून फिरत असावा. गोवर कांजीण्यांची साथ आली की नंतर उतारा म्हणून दहिभाताच्या सितळा देवी पुढे मुदी वर मुदी पडायचा. तिथली व्यवस्था बघणाऱ्या आजी अगदी गोल गरगरीत होत्या. इतक्या की त्यांना उठता बसता मुश्किल व्हायचं, एकीनी आगाऊपणा करून त्यांना विचारलं होतं “आजी हा सगळा दहीभात तुम्ही खाता का? आयांनी हाताला काढलेला चिमटा आणि वटारलेले डोळे पाहून आम्ही तिथून पळ काढायचो ‘आगाऊ ते बालपण ‘ दुसरं काय ! 

पाराच्या शेजारी वि. वि. बोकील हे प्रसिद्ध लेखक राह्यचे. त्यांच्याकडे बघतांना आमच्या डोळ्यात कमालीचा आदर आणि कुतूहल असायचं. त्यांच्या मुलीला चंचलाला आम्ही पुन्हा पुन्हा नवलाईने विचारत होतो “, ए तुझे बाबा ग्रेट आहेत गं, एवढं सगळं कधी लिहितात ? दिवसा की रात्री? शाई पेननी, की बोरुनी? ( बांबू पासून टोकदार केलेल लाकडी पेनच म्हणावं लागेल त्याला) एवढं सगळं कसं बाई सुचतं तुझ्या बाबांना? साधा पेपर लिहिताना मानपाठ एक होते आमची. शेवटी शेवटी तर कोंबडीचे पाय बदकाला आणि बदकाचे पाय कोंबडीला असे अक्षर वाचताना सर चरफडत गोल गोल भोपळा देतात. ” कारण पेपर लिहिताना अक्षरांचा कशाचा कशाला मेळच नसायचा, त्यामुळे सतत लिहिणारे वि. वि. बोकील आम्हाला जगातले एकमेव महान लेखक वाटायचे.

आमची भाचे कंपनी मोठी होत होती. विश्रामबागवाड्याजवळच्या सेवासदनच्या भिंतीवर( हल्लीच चितळे बंधू दुकान, )सध्या इथली मिठाई, करंजी, समोसे, वडा खाऊन गिऱ्हाईक गोलमटोल होतात, पण तेव्हां त्या भिंतीवर किती तरी दिवस डोंगरे बालामृतची गुटगुटीत बाळाची जाहिरात झळकली होती. ती जाहिरात बघून प्रत्येक आईला वाटायचं माझं बाळ अगदी अस्स अस्सच व्हायला हवं ग बाई, ‘.. मग काय मोहिमेवर निघाल्यासारखी डोंगरे बालामृतची बघता बघता भरपूर खरेदी व्हायची. सगळी बाळं गोंडस, गोपाळकृष्ण दिसायची. आणि मग काय ! सगळं पुणचं बाळसेदार व्हायचं.

बरं का मंडळी म्हणूनच त्यावेळची पिढी अजूनही भक्कम आहे. आणि हो हेच आहे त्या पिढीच्या आरोग्याचे गमक. जोडीला गाईच्या दुधातून पाजलेली जायफळ मायफळ मुरडशिंग हळकुंड इत्यादी नैसर्गिक संपत्तीची अगदी मोजून वेढे दिलेली बाळगुटी असायचीच. मग ते गोजिरवाणं गोंडस पुणं आणखीनच बाळसेदार दिसायचं.

– क्रमशः भाग १२.

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares