मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी व्हायोला हाउसिंग सोसायटी बोलतेय… ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

??

☆ मी व्हायोला हाउसिंग सोसायटी बोलतेय… ☆ सौ. विद्या पराडकर ☆

माननीय महापौर,

महानगरपालिका… 

स.न.वि.वि.

को.हा.सोसायटीच्या प्रगतीकरता व विकासासाठी आपण जे निरनिराळे उपक्रम राबवता, मार्गदर्शन करता, प्रोत्साहन देता त्याकरता प्रथम मी आमच्या सोसायटी तर्फे आभार मानते.

प्रस्तुतच्या उपक्रमात आपण निरनिराळ्या सोसायट्यांची  स्पर्धा आयोजित केली त्यानिमित्त, मी व्हायोला सोसायटी, माझी ओळख व वैशिष्ट्ये, या परिसरातील माझे स्थान याविषयी माहिती सांगणार आहे.

मुंबई पुणे महामार्गाला लागून जो सर्व्हिस रोड आहे त्याला लागुनच माई मंगेशकर हॉस्पिटल पासूनची चौथी जी टोलेजंग इमारत आहे, ती माझीच बरे. माझ्या कपाळावर ठसठशीत कुंकू वापरल्याचे असणारे माझे नाव झळकते आहे. त्यामुळे माझे कपाळ उठून दिसत आहे. मी उंच असल्यामुळे खूप दूरपर्यंत दिसू शकते. मुख्य प्रवेश दारापाशी मी सर्व लोकांचे स्वागत करण्याकरता मोठ्या आनंदाने हात जोडून उभी असते.

… ‌माझा जन्म १९९८साली झाला. पण माझे नामकरण २०००साली झाले. तेव्हापासून या भागाचे प्रमुख आकर्षण व भूषण म्हणून माझी ओळख आहे

प्रवेश दारातून आत आल्यावर उजवीकडे छोटे लॉन आपले स्वागत करते. विविध वृक्षांनी हे लॉन वेढलेले आहे. निरनिराळे विविध रंगी पक्षी येथे मंजूळ गाणी गात असतात. रात्रीच्या वेळी रंगीबेरंगी दिव्यांची आरास खूप छान दिसते. झाडांना विविध आकारांनी सजविले आहे. सकाळी लोक हिंडायला येतात. संध्याकाळी बच्चे कंपनी हुंदडत असते. जाणाऱ्या येणाऱ्याची चहल पहल असते. मी हर्षाने न्हात असते.

मी माझ्या आठ विंग मध्ये विभागली आहे. एकूण १७० सदनिका आहेत. प्रथम दर्शनी एच विंग ३बी.एच.के दिमाखात उभे आहे. त्याच्या बाजूला २बी एच.के विराजमान आहे. व त्यानंतर १बी.एच.के.आहे. या सर्व सदनिका अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त आहेत .प्रत्येक इमारतीच्यामध्ये एक छोटासा साजिरा,गोजिरा बगिचा आहे. दोन्ही इमारतींची शान वाढविण्याचे काम हा बगिचा करतो. येथेच झेंडा वंदन व इतर राष्ट्रीय कार्यक्रम होत असतात.

ई. इमारतीजवळ वनश्रीने नटलेला एक सुरेख व सुबक स्विमिंग पूल आहे. निळेशार पाणी त्यात खुलुन दिसते. विशेषतः उन्हाळ्यात रसिकांची गर्दी उसळते. लहानापासून तो मोठ्यापर्यंत जलतरण करण्याकरता उत्सुक असतात.

माझ्या लोकांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी जीमची व्यवस्था केली गेली आहे. लहान मुलांसाठी स्वतंत्र playground ची व्यवस्था केली आहे. लहान मुले नाचत बागडताना पाहिले की मी आनंदाने बेभान ‌होते.

निरनिराळे उपक्रम येथे राबविले जातात. जसे वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, स्वच्छता मोहीम ‌इत्यादि.माझे सर्व रहिवासी गुण्यागोविंदाने राहतात. ‘United we all, divided we fall ‘ हे तत्व त्यांना माहित आहे. माझा कारभार सुव्यवस्थित होण्यासाठी सक्षम कार्यकारी मंडळ योजले आहे. मी विविधतेने नटलेली असले तरी एकतेच्या धाग्यात गुंफलेली आहे.

साहेब, मी आतापर्यंत खूप बोलले. मला वाटतं की स्पधेर्च्या दृष्टीने ही माहिती पुरेशी आहे. असेच नवनवीन स्पर्धा वे उपक्रम घेत जावे, व आम्हाला  संधी देत जावे  ही विनंती.

– एक स्पर्धक

व्हायोला को.हा.सो.

©  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रैवन पक्षी… ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? इंद्रधनुष्य ?

☆ रैवन पक्षी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

एक पक्षी गरुडाला चोच मारण्याचा प्रयत्न करतो, तो म्हणजे रैवन पक्षी..

हा गरुडाच्या पाठीवर बसून मानेवर / गळ्यावर आपल्या चोचीने प्रहार करत असतो. परंतु गरुड ह्याच्या क्रियेला एकदाही प्रत्युत्तर देत नाही की, रैवन बरोबर झटापटी देखील करत नाही, म्हणजेच गरुड रैवनच्या कृतीकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असतो. गरुड स्वतःचा वेळ आणि ऊर्जा रैवन बरोबरच्या लढाईत वाया घालवत नाही. गरुड स्वतःचे पंख  उघडून हवेत उंच उंच उडत राहतो. गरुड जसजसे उंच जातो तसतसे रैवनला श्वास घेण्यास त्रास होतो आणि शेवटी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रैवन स्वतःहून खाली पडतो. 

म्हणूनच कधीकधी सर्वच लढायांना उत्तर देण्याची गरज नाही. लोकांचे युक्तिवाद, फालतूचे प्रश्न किंवा त्यांनी केलेल्या टीकेवर उत्तर देण्याची काही एक गरज नाही.

 

मित्रहो.,

आपली प्रतिमा उंचवा.

समाज उपयोगी काम करीत राहा.

समोरचे स्वतःहून खाली पडतील…

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ~ मानसिक डाएट ~ ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ~ मानसिक डाएट ~ ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

ही कन्सेप्ट जरा नवीन आहे,पण ती तुम्ही समजून घ्याल, ही खात्री आहे.

 

“तुमच्या मनातल्या विचारांचा प्रचंड प्रभाव तुमच्या शरीरावर असतो.”  मनाला सुद्धा डाएटिंगची तेवढीच गरज आहे का?बघू या.

मी बोलतोय ते एका टेस्टी आयुष्याची चव घेण्याकरता केलेल्या डाएट बद्दल..

 

स्वतःचं अवघं आयुष्य बदलून टाकायची ताकद आपल्या विचारांमधे असते.

मग त्यांना चांगलं हेल्दी ठेवायची जबाबदारी आपलीच असते.

तर मानसिक डाएट म्हणजे काय करायचं?

तर आपले विचार अधिकाधिक फिल्टर्ड कसे रहातील ह्याचा प्रयत्न करायचा.

 

तेलकट-तूपकट म्हणजे फडतूस-निगेटिव्ह विचार आपण करणार नाही.

 

अति-गोड म्हणजेच स्वत:च्या आनंदात दुसऱ्याला विसरुन जाणारे विचार आपण जवळ येऊ देणार नाही.

 

दररोज एकातरी व्यक्तीला  आपण एक छान स्माईल देऊन खूश करु.

 

दुसर्‍यांच्या पर्सनल आयुष्यात डोकावून मजा घ्यायला लावणारे कुचके-नासके विचार फेकून देऊ.

 

आठवड्यातुन एकदा तरी साध्या विचारांची खिचडी-कढी खाऊ.

 

या अशा मूल्यशिक्षणाबरोबरच महत्त्वाचं आहे, ते स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक ओळखून स्वत:ला “रीझनेबल” बनवणं,

दुसर्‍यांच्या मतांना आदर देणं, दुसर्‍यांना वेळ देणं, संवाद चालू ठेवणं,

मनाचं वातावरण नेहमी हलकं फुलकं ठेवणं,

एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव ठेवणं आणि बरंच काही.

 

या सगळ्यातला समतोल हरवला ना,

की आपल्या नात्यांना अपंगत्व येणारच

आणि मग नीट डायग्नोसिसच झालं नाही,

म्हणून मनाला कायमची बेडरेस्ट पण मिळू शकते.

 

माणूस आहे,

मनपण थकतं हो कधीकधी,

त्याला इंस्टंट एनर्जी मिळते, ती फक्त एक कप काॅन्फिडन्सच्या चहाने.वाह ताज !!!

 

सगळ्यात महत्त्वाचं

की,आपल्या डाएटचे साईड इफेक्ट्स खूप मस्त असतात.

 

लोक प्रेमातपण पडू शकतात तुमच्या.

तुमच्या चेहर्‍यावरचा ताण कमी होतो,

तुम्ही यंग वाटू लागता, टेन्शन्स कमी होतात, लाईफ पाॅपकाॅर्नइतकं हलकं होतं.

वास्तविक, मन ओके असेल

तरच लाईफ ओके असतं, नाही का?

 

असं ह्या डाएटचं व्रत

हे आजच्या सॅन्डव्हिच जीवनशैली मध्ये एक संजीवनी देईल हे नक्की.

 

साध्या आणि ताज्या विचारांचं सॅलड आपली नक्की काळजी घेईल.

 

शाकाहारी विचार लंबी ऊम्र देऊन जातील.

बदल हा नेहमीच चांगला असतो.

 

असा मानसिक डाएट एकदा करुन बघायला काय हरकत आहे ना ?

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पुस्तके जपा-आयुष्य जपा ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

श्री उमेश सूर्यवंशी

परिचय  

उमेश मुरलीधर सूर्यवंशी, कोल्हापूर.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अंधश्रद्धा निर्मूलन समिती याच्या मार्फत होणा-या सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रिय सहभाग.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रचे तीन वर्षे सहसंपादक म्हणून काम केले आहे. वाचकांचा पत्रव्यवहार या सदरातून 500 हून अधिक पत्रे प्रकाशित. सोशल मिडियावर विविध विषयांवरील 22लेखमाला प्रसिद्ध. तसेच विविध विषयांवरील व्याख्याने देऊन समाज प्रबोधन चालू आहे.

राजर्षी, निर्भय, बाईपण, विचार शलाका, एकटा ही पुस्तके प्रकाशित.

? विविधा ?

☆ पुस्तके जपा-आयुष्य जपा ☆ श्री उमेश सूर्यवंशी 

शब्दांच्या महाजालात खूप काही गहिरे अर्थ दडलेले असतात. त्या अर्थाचा पायपोस देखील आपल्या जीवनात अथवा वर्तनात घडत नाही ही शोकांतिका आहे. शब्दाच्या अर्थाची जाणीव झाली तरच तो शब्दार्थ व्यवहारात उमटवण्याची ऊर्मी मनांत जागू शकते. हे शब्द एकत्रित व व्यवस्थित एका दिशेने बांधून एका ठराविक चौकटीत तयार होते ते असते ” पुस्तक “. मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा असा शब्द आहे ..पुस्तक .

पुस्तक ….बहुतांशी हातात आयुष्यात एकदा तरी कोणते ना कोणते पुस्तक पडलेले असते. भले ते अभ्यासक्रम असणारे पुस्तक असेल अथवा एखादे रद्दीत टाकलेले किंवा अडगळीत पडलेले पुस्तक असेल. अभ्यासक्रम मधील पुस्तक जितके महत्त्वाचे असते तितकेच रद्दी अथवा अडगळीत पडलेले पुस्तक दुर्मिळ असू शकते. त्या पुस्तक नावाच्या घटकाची मुल्यता ठरते ती त्यामधील आशयावर. तो आशय ज्यांना समजतो त्यांना पुस्तक समजले . पुस्तक वाचण्याची क्रिया ही केवळ आनंददायी नसते तर ज्ञानदायी असते. आनंद + ज्ञान ….म्हणजे पुस्तक . केवळ अभ्यासक्रमातील पुस्तकात रमलेली व्यक्ती भले जीवनात भौतिकदृष्ट्या यशस्वी होईल देखील पण अवांतर पुस्तकाचे वाचन नसेल तर त्या यशस्वी व्यक्तीच्या माणूस बनण्याची प्रक्रिया नक्कीच थांबली आहे असे निखालस समजावे. मनुष्य व प्राणी यांच्यामध्ये काही मुलभूत फरक आहेत. मनुष्य पुस्तक वाचू शकतो, आनंद घेऊ शकतो, वेगवेगळ्या ज्ञानकक्षा कवेत घेऊ शकतो. प्राण्यांना हे शक्य नसते. याचकरीता ” पुस्तके वाचतो तोच मनुष्य ” अशी व्याख्या करणे अतिशयोक्ती ठरु नये. पुस्तकांचे जग हे सर्वाधिक विश्वासाचे जग आहे….त्या जगात आयुष्य शोधता आले पाहिजे .

पुस्तके नसतीत तर ?…केवळ या कल्पनेनेच मानवी जीवनातील रसहिनतेची, अज्ञानपणाची जाणीव तयार होते. पुस्तक हाती धरणे जितके महत्त्वाचे असते तितकेच महत्त्वाचे ते पुस्तक समजून घेऊन आपल्या मेंदूमध्ये त्या पुस्तकीय जाणीवा विकसित करत राहणे अत्यावश्यक असते. “वाचाल तर वाचाल ” या वाक्याचा अर्थ तसाच घ्यावा . “पुस्तके जपा…आयुष्य जपा ” हा सुसंस्कृत मानवी जीवनाचा नवा मंत्र आहे.

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पर्यटनाच्या निमित्ताने… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

??

☆ पर्यटनाच्या निमित्ताने… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

२०१८च्या जून महिन्यात मी बाली इथं एका परिषदेत भाग घेण्यासाठी, तर त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्या एका परिषदेत सहभागी होण्यासाठी माॅरिशसला गेलो होतो. परिषदांमध्ये सहभागी होऊन मी माझे रिसर्च पेपर सादर केले. परिषदांच्या कामकाजानंतर दोन्ही देशांत साधारणत: एक एक आठवडा मुक्काम झाला. आयोजकांनी तिथल्या विविध सामाजिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील  अनेक संस्थांना आमच्या भेटी घडवून आणल्या. भरपूर साईट सिईंगही केले.निसर्गरम्य समुद्रकिनारे, रंगीबेरंगी मनमोहक फुलांच्या बागा,श्रममहात्म्याने विकास पावलेले समाज,सामाजिक सौदार्ह आणि शांतता असं  बरंच काही चांगलं पाहिलं..आपल्याकडं ज्या नाहीत, त्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबी पाहून भारावून जायला नक्कीच झालं. रहाण्याची व्यवस्था, खाणंपिणं, प्रवास हेही नियोजनबद्ध आणि सुरेख होतं.

माझी मुलगी  इंग्लंडला एका नावाजलेल्या हाॅस्पीटलमध्ये डाॅक्टर आहे. तिच्याकडं जायचं खूप दिवस चाललं होतं. पण माझ्या नोकरीच्या  काळात ते शक्यच झालं नाही. त्यात मधले काही दिवस कोरोनामुळे जमलंच नाही. जगभर सगळीकडंच सारं ठप्प झालं होतं. सप्टेंबर २०२१ ला मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून प्राध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालो.आणि  पत्नीबरोबर  इंग्लंडला जायचं आम्ही ठरवलं. त्यात अनेक अडचणीही आल्या. सेवानिवृत्त होऊनदेखील बरेच दिवस पेन्शन आणि इतर आर्थिक बाबी मिळण्यास खूपच उशीर झाला. अनेक शारीरिक व्याधींनी मी त्रासून गेलो. तशाही अवस्थेत अनेक संबंधित ऑफिसांत जाऊन मी पायपीट करत होतो. “तुम्ही लवकर या” असा मुलीचा  लकडा चालूच होता.आम्हा दोघांचे पासपोर्ट हातात आले. इंग्लंडचा व्हिसा कित्येक दिवस झाले तरी मिळाला नाही. दिवसांमागून दिवस जात होते. इंग्लंडला जायचं नियोजन धूसर दिसत चाललं. रशिया- युक्रेन युद्धामुळं हा वेळ लागतो,असं सांगितलं गेलं. जाण्याची जय्यत तयारी करून आम्ही व्हिसाची वाट पहात बसलो.

असाच एक दिवस सायंकाळी मोबाईलवर मेसेज आला की,आम्हा दोघांचे पासपोर्ट तयार असून ते घेऊन जावेत. इंग्लंडला जायचा मुहूर्त एकदाचा मिळाला.

मुलीशी  फोनवरून बोलून जाण्याची आणि परत भारतात येण्याचीही तारीख ठरवली. व्हिसा मिळायला उशीर झाल्यामुळे फक्त दोन महिने तिच्याकडं रहाता येणं शक्य होतं. विमानाची तिकिटं तिनंच काढली.  १९ जूनला आम्ही मुंबईहून डायरेक्ट विमानाने इंग्लंडच्या हिथ्रो विमानतळावर पोहचलो. तेव्हा तिथं सायंकाळ झाली होती.

विमानतळावरून बॅगा घेऊन बाहेर आलो. हा सिझन तिथं तर उन्हाळ्याचा होता. पण तिथली थंडी सहन होत नव्हती. बाहेर रिमझिम पाऊसही पडत होता. जर्किन आणि कानटोपी चढवून छत्रीही उघडली. एका टॅक्सीनं आम्ही  लंडनच्या जवळ असलेल्या मुलीच्या फ्लॅटवर पोहोचलो.  पुस्तकांतून,  चित्रपटांतून दाखवलं जातं तसं जाताना अनुभवलं. खड्डे नसलेले सुबक रस्त्यावरून जाताना इतस्तत: सगळीकडं जाणवेल इतकी स्वच्छता होती. सगळं काही आखीव रेखीव होतं. रस्त्यावरून अनेक वाहने भरधाव वेगाने जात होती. पण तीही ट्रॅफिकचे नियम पाळून. आमच्या वास्तव्यात इंग्लंडमधील लंडन, केंब्रिज अशा अनेक शहरांत आम्ही जाऊन बरंच पाहिलं. लहानपणापासून मला  क्रिकेटची खूप आवड. गावी  मी खूप क्रिकेट खेळलो होतो. मला आठवतं एकदा तीन गावांची क्रिकेटची टुरनामेन्ट होती. त्यात मी सलग तीन विकेट घेऊन हॅटट्रिक केली होती.

लंडनमधील लाॅर्डसच्या ग्राऊंडला ‘क्रिकेटची पंढरी ‘म्हणतात. ते पहाण्याची संधी मला मिळाली. ते मला सोनेरी स्वप्नच वाटलं .या क्षणांना मी कवितेत गुंफले — 

पाहिलं मी लाॅर्डसचं  मैदान…

विस्तीर्ण रस्त्यांच्या महिरपींनी नटलेलं,

इंद्रधनु स्वप्नांसारखं, परिकथेतील सुंदर,

पाहिलं मी लाॅर्डसचं मैदान—

कपिलदेवसोबतच अनेक भारतीयांच्या तसबीरींनी आणि

विक्रमगाथांनी इथल्या ड्रेसिंगरूम सजल्या होत्या, 

सचिनचे प्रेरक शब्द तिथली एक भिंत अभिमानाने मिरवत होती,

१९८३ मधल्या भारताच्या विश्वविजयाचा प्रुडेनशीयल चषक 

तिथल्या म्युझियममध्ये पाहिला, आणि … 

बघता बघता लाॅर्डसचं मैदान शतपटींनी उजळून निघालं…

आपल्याकडं जत्रेत जसे पाळणे असतात तसाच एक अतिविशाल पाळणा थेम्स नदीकाठावर आहे.त्यातून लंडनमधील अनेक गोष्टी दाखवल्या जातात. त्याला ‘लंडन आय ‘म्हणतात. या लंडन आयमधून अनेक   सुंदर सुंदर बाबी आम्हाला दाखवल्या. नंतर पायी चालत लंडनमधून जाताना, लंडन आयमधून  जे दिसलं नव्हतं, त्या ब-याच बाबी पहायला मिळाल्या. हेही मी शब्दात मांडलय — 

दर्शन…

अतिभव्य पाळण्यावरच्या लंडन आयनं,

लंडनचं मनोहारी दर्शन मला दिलं ,

आकाशातल्या सूर्यकिरणांनी

चमचमणारे पाणी मला दाखवलं,

भव्य ब्रिटिश संसदेचे आणि युरोपातल्या अतिऊंच इमारतीचे 

दर्शन मला घडवलं,

जगाला भूषणावह अनेक विक्रमांच्या साक्ष असलेल्या टोलेजंग  इमारती दाखवल्या ,

त्या इमारतींच्या भवतालच्या पाचूंच्या बागांतून उमललेली रंगीबेरंगी फुलं दाखवली,

टाॅवर ब्रिजसकट अनेक सुंदर पूल दाखवले,

निखळ आनंदाने हसणारी, खिदळणारी माणसं दाखवली;

लंडनच्या रस्त्यावरून जाताना पाहिलं,

ठिकठिकाणी बोकाळलेले जुगारांचे बाजार,

खाऊन पिऊन झाल्यावर त्याचे रिकामे कागद रस्त्याच्या कडेला फेकून देणारी माणसं,

येणा-या जाणा-यांना गुलाबाची फुलं देऊन पैसे उकळणाऱ्या बायका

आणि– 

“हेल्प मी,गाॅड मे ब्लेस यू ” या पाटीआड डोकं खुपसून बसलेला मळलेल्या  कपड्यातला एक याचक— 

जगावर राज्य केलेल्या इंग्लंडमधील स्वच्छता, टापटीप, निटनेटकेपणा हे जितके भावले, त्याचबरोबर तिथल्या  समाजातील औपचारिकता मला मानवी जीवनातील कोरडेपणा जाणवून गेली. आपल्या समाजात अनेक उणिवा आहेत. त्या स्वीकारूनही इंग्लंडमधील  कुटुंबसंस्था ही मला चिंतेची बाब वाटली.आपल्या आणि इंग्लंडमधल्या समाजरचनेची तुलना करता आपल्याकडं सगळं आबादीआबाद आहे असं मला म्हणायचं नाही. तरीपण एक सांगावसं वाटतं….. आपल्याकडं प्रबोधन आणि परिवर्तनाच्या अनेक चळवळी   झाल्यात. अनेक कारणावरून त्या अनेकदा खंडितही झाल्या. या अधिक गतिमान केल्या तर — आपल्याकडील न्यूनता नक्कीच कमी होईल.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जुनी लोकं हुशार होती की नाही हेच कळत नाही..!!!…डाॅ.किरण कल्याणकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ जुनी लोकं हुशार होती की नाही हेच कळत नाही..!!!…डाॅ.किरण कल्याणकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

हैदराबाद मधील शास्त्रज्ञाने शोधले की केळीच्या बुंध्यातील किंवा केळीच्या कमळातील, पानातील, जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्यानंतर कॅन्सर वाढवणारी ग्रंथी स्लो किंवा हळू हळू निष्क्रिय होत जाते ….

त्यामुळे जुनी लोक केळीच्या पानावर जेवण घ्यायचे, कारण गरम भात किंवा इतर पदार्थ त्यावर टाकले की तो चिकट द्रव त्या अन्नातून पोटात जायचा …

पण आज उलट झालंय.. प्लास्टिक व थर्मोकोलमुळे महाभयानक परिस्थिती ओढवत आहे, नाल्या जॅम होऊन पूर येत आहे…

शहरी भागात खेडोपाडी लग्नात प्लास्टिक कोटिंग पत्रावळी, द्रोण, मग त्यात गरम पदार्थ टाकल्याने ते पोटात अन्नाद्वारे जाऊन कॅन्सर वाढवत आहेत… कृपया वेळ आली आहे, 

“जुनं ते सोनं ” आहे, हे प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून  सिद्ध झाले आहे ..

केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक तत्व अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असतात.

– केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ-फोडं अशा समस्या दूर होतात.

– केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स एंटीऑक्सीडेंट आढळतात. केळीच्या पानावर जेवण केल्यास हे एंटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे एंटीऑक्सीडेंट त्वचेला दीर्घ काळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात.

– त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात.   

सगळ्याच भारतीय परंपरा टाकाऊ नसतात. किंबहुना भारतीय परंपरांमागे असलेला निसर्गाचा आणि मानवी आरोग्याचा सूक्ष्म विचार पाहून शास्त्रज्ञही वेगळ्या दृष्टीकोनातून त्यांकडे पाहू लागले आहेत. भारतीय संस्कृती ही मुळातच निसर्गपूजक आहे. निसर्गपूजेतून निसर्गरक्षणाचा विचार त्यामागे आहे. आपल्या संस्कृतीत सूर्य, वारा, पाऊस अशा निसर्गातील शक्तींनाच देव मानून त्यांची पूजा केली जाते. भारतीय संस्कृती ही निसर्गाचं ‘दोहन’ करायला शिकवते; ’शोषण’ नव्हे. उदा. आपण गाईचं दूध तेवढं काढून घेतो, पण गाईला मारून टाकत नाही. गाईलाच मारून टाकणं हे झालं ‘शोषण’ आणि गाय जिवंत ठेवून दूध, गोमुत्र आणि शेण आपल्या उपयोगासाठी घेणं म्हणज़े ‘दोहन’. अशाप्रकारे निसर्गातील संसाधनांचा उपभोग घेताना त्यांची पुनर्भरण क्षमता अबाधित ठेवणं हे भारतीय परंपरांचं मूलतत्व आहे. गंमत अशी की, या परंपरा लोक केवळ परंपरा म्हणून वा धार्मिक भावनेने पाळत होते. त्यामागचं शास्त्र उमगलेलं नव्हतं. आज आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे शास्त्रीय कसोट्यांवर या परंपरांची उपयुक्तता पडताळून पाहणं आणि आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत त्यांचं महत्व पटवून देणं शक्य झालं आहे. शिवाय, उपयुक्त परंपरा आणि निरूपयोगी परंपरा कोणत्या ते ओळखणंही शक्य झालं आहे. ‘केवळ परंपरा म्हणून नव्हे तर अमुक एक गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त आहे म्हणून ती करावी’ हा एक नवा विज्ञानवादी दृष्टीकोनही मिळाला आहे.

केळीच्या पानावर जेवणं ही अशीच एक निसर्गाचा आणि आरोग्याचा सूक्ष्म विचार असणारी भारतीय परंपरा आहे. केळीच्या पानाची आरोग्यदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या असलेली उपयुक्तता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध झालेली आहे. मोठा आकार, लवचिकता, तंतुमयपणा आणि सहज उपलब्धता या वैशिष्ट्यांमुळे जेवायला ताटाऐवजी केळीचं पान घेण्याची परंपरा जवळजवळ संपूर्ण भारतात, विशेषत: दक्षिण भारतात वर्षानुवर्षं असलेली आढळते. काही अन्नपदार्थ शिजवताना भांड्याच्या तळाशी केळीचं पान घालण्याची पद्धतही होती, ज्यामुळे अन्नपदार्थाला एक मंद सुवास येतो. शिवाय तळाशी केळीचं पान घातल्यामुळे पदार्थ खाली लागून करपण्याचा धोकाही टळतो. अळुवडीसारखे पदार्थ केळीच्या पानात गुंडाळून शिजवतात. अनेक ठिकाणी वेष्टन म्हणूनही केळीच्या पानाचा उपयोग करतात. केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत फक्त भारतातच नव्हे तर इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, फिलीपिन्स, मेक्सिको, मध्य अमेरिका या देशांमध्येही आढळते.

केळीच्या पानावर जेवण्याचे शरीराला होणारे फायदे आधुनिक विज्ञानाने सिद्ध झाले आहेत. केळीच्या पानात पॉलिफेनॉल नावाचा घटक असतो, जो नैसर्गिक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो आणि रोगप्रतिकारक्षमता वाढवतो. जेवण जेवून झालं की पान गुरांना घातलं जातं. ते गुरांचंही अतिशय आवडीचं अन्न आहे. म्हणजे निसर्गाकडून वस्तू घेऊन उपयोग झाल्यावर ती निसर्गालाच परत द्यायची. यामुळे भांडी घासायचे श्रमही वाचतात, पाणीही वाचतं आणि भांडी घासायला साबण न वापरल्यामुळे घरगुती सांडपाण्याचं उत्सर्जनही कमी होतं. हल्ली कुठलाही घरगुती वा सार्वजनिक कार्यक्रम असल्यास सर्रास प्लास्टीकच्या वा थर्माकोलच्या डिश खाण्यासाठी वापरल्या जातात. खाऊन झाल्यावर या डिश कचर्‍यात फेकून दिल्या जातात. यामुळे किती कचरा वाढतो? केळीचं पान हा याला एक चांगला पर्याय आहे. ते सहज विघटनशील असल्यामुळे पर्यावरणपूरक आहे. खेडेगावांमध्ये केळीची पानं घरच्या घरीच उपलब्ध होतात. शहरामध्ये ती विकत घ्यावी लागतात, पण उपलब्ध असतात. शहराच्या आजूबाजूच्या केळी बागायती करणार्‍या शेतकर्‍यांना केळ्यांबरोबरच केळीची पानं विकणं हे एक चांगलं उदरनिर्वाहाचं साधन होऊ शकतं. मुंबईत दादर आणि इतर काही रेल्वे स्टेशनांच्या बाहेर दहा रुपयांना चार वगैरे अशा किमतीत केळीची पानं मिळतात. त्यामुळे ती ‘महाग’ नक्कीच नाहीत. घरगुती कार्यक्रमासाठी प्लास्टीक डिश वापरण्यापेक्षा केळीची पानं वापरण्यात अशक्य काहीच नाही.

केरळमध्ये जेवणासाठी  व जेवण पॅकींगसाठी केळीच्या पानांचा वापर सुरू पण झाला आहे ..

पण आपण कधी सुधारणा करणार ? वेळ कुणासाठी थांबत नाही..

लेखक : डॉ कल्याणकर किरण, M.D. (Ayu.)

आयुर्वेदिक कॅन्सर तज्ञ, -स्वायु कॅन्सर केयर सेंटर 

-श्री विश्व गणेश आयुर्वेद पंचकर्म, खारघर, नवी मुंबई. 

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मोफत मिळणारी औषधे… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ मोफत मिळणारी औषधे… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

 मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध नसलेल्या औषधांचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत का?

व्यायाम हे औषध आहे.

सकाळ/संध्याकाळ चालणे हे औषध आहे.

उपवास हे औषध आहे.

कुटुंबासोबत जेवण हे औषध आहे.

हसणे आणि विनोद हे देखील औषध आहे.

गाढ झोप हे औषध आहे.

सर्वांशी मिळून वागणे हे औषध आहे.

आनंदी राहण्याचा निर्णय हे औषध आहे.

मनातील सकारात्मकता हे औषध आहे.

सर्वांचे भले हे औषध आहे

कधी कधी मौन हे औषध असते.

प्रेम हे औषध आहे.

मन:शांती हे औषध आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सर्व औषधे पूर्णपणे मोफत आहेत

आणि सर्व एकाच ठिकाणी कुठे मिळवायचे?

प्रत्येक चांगला मित्र हे एक परिपूर्ण मेडिकल स्टोअर आहे.

निरोगी रहा आणि आनंदी रहा

दिवसाचा आनंद घ्या

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बाल्य आणि पाटीपेन्सिल ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बाल्य आणि पाटीपेन्सिल ☆ सौ. अमृता देशपांडे 

1950 ते 1970 च्या दोन दशकात जन्म घेतलेले माझ्याशी सहमत होतील. वयाच्या पाचव्या वर्षी शाळेत प्रवेश केलेली ही पिढी.

पाचव्या वर्षी पर्यंतचे लालनपालन आजी-आजोबा,  काका काकू, आत्या,  आईबाबा,  मोठी भावंडे यांच्या सहवासात होत असे. आजोळचे मातुल लोक तर खूपच लाड करायचे. तिथे रागावणे, डोळे मोठे करणे हे नसायचेच. फक्तच कौतुक आणि लाड. चारच दिवस आलेली माहेरवाशीण आणि नातवंडे आजोळच्या घराचा परमानंद होता.

लालन म्हणजे लाड आणि पालन म्हणजे पाळणे. पाच वर्षांपर्यंत घरात भरपूर लाड असायचे. मुख्य म्हणजे लवकर उठण्याची सक्ती नसे. घरातले सगळेच खाऊ द्यायला, गोंजारायला,  सतत आसपास असत.

आज्जीनं दिलेला लाडू, आईनं दिलेल्या गूळ-शेंगा,  काकानं आणलेला ऊस, बाबांनी आणलेला सुका मेवा अशा खाऊच्या लाडाकोडातलं श्रीमंत बालपण!

आजोबांची काठी,  आत्याची पर्स,  काकांच्या चपला, बाबांच्या स्कूटरच्या किल्ल्या असे ऐवज लपवणे ही त्यावेळेस आवडती खोड होती. त्यावेळी त्यांच्या मूडप्रमाणे मारही भरपूर खावा लागे.

घरची मुले कुठे आणि काय खेळाहेत,  कशानं खेळत आहेत यावर घरातल्यांचं बारीक लक्ष असे. हेच पालन! अशा प्रेमळ शिस्तीच्या  लालनपालनात आयुष्याचा पाया भक्कम व्हायचा. घराबद्दल, घरातल्या माणसांबद्दल प्रेम, आपुलकी, ओढ आणि सुरक्षितता वाटण्याचं कारण हा भक्कम पायाच आहे.

पाच वर्षांनंतर गुढीपाडव्याला पाटीपूजन केले जायचे.  नवीन वर्षाच्या सुरुवातीला शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली जायची. पाटी आणि पेन्सिल या दोन वस्तू मुलांच्या हाती सोपविल्या जायच्या.

मुलांना एक प्रकारची जबाबदारीची जाणीव करून दिली जायची. त्यावेळी पाटीपेन्सिल हे आयुष्यातलं पहिलं साधन. पुढे वही-पेन, फळा-खडू, हे तिचे वारसदार.

पाटीवर पेन्सिलीने सरस्वती काढायची. एक एक अशा अकरा आकड्यांची.  देवासमोर पाटीपूजन करायचं. मग ती मुलांच्या स्वाधीन केली जायची. मार्च-एप्रिल मध्ये गुढीपाडवा येतो, महिनाभर पाटी जपून ठेवली जायची. कधीतरी दुपारी हळूच पाटीवर सूर्य, फूल, चांदोबा ,  झाड अशी चित्रे काढायचा प्रयत्न चालू असायचा.

जून मध्ये शाळा सुरू होते.  एका हातात डबा ( कडीचा स्टीलचा डबा)

आणि दुस-या हातात पाटी. खिशात पेन्सिलीचा तुकडा.  नवा कोरा शाळेचा ड्रेस. तो मापानं मोठाच शिवलेला, दोन वर्षांची बेगमी.  

अगदी सुरवातीला मण्यांची पाटी म्हणजे पाटीच्या अर्ध्या भागात दहा तारा , प्रत्येक तारेवर दहा, नऊ, आठ, सात असे एक पर्यंत रंगीत मणी ओवलेले.( आठवले का?) त्या मण्यांच्या मदतीने गणिताच्या दुनियेत पाऊल टाकलं.

त्यानंतर मणी नसलेली पाटी. तीही दोन आकारात उपलब्ध होती..लहान आणि मोठी. आम्हाला दुसरीच्या वर्गात लहान पाटी आणि तिसरी, चौथीला मोठी पाटी दिली गेली. आणखीही एक पाटी मिळायची, डबल पाटी.

म्हणजे दोन पाट्या जोडपट्टी लावून एकत्र केलेल्या असत. पेन्सिलीनं लिहिलेलं पुसलं जाऊ नये, म्हणून दोन्ही बाजूला पुठ्ठे ठेवले जायचे.

एक अख्खी पेन्सिल शाळेत पोचेपर्यंत अख्खी असायची, लिहायला सुरुवात केली कि, तुकडे कधी व्हायचे ते कळतच नव्हते. मग ते तुकडे लिहून संपेपर्यंत नवी मिळायची नाही. त्यावेळी एकमेकांना पेन्सिलीचे तुकडे देऊन  मदत करण्यात खूप आनंद वाटायचा.

पेन्सिलीचा षटकोनी आकार इतका योग्य कि चिमुकल्या बोटांतली शक्ती गरजेपुरतीच लागेल, इतका विचार करून निर्मात्यांनी तयार केली असे.

अंगठा, तर्जनी आणि मधले बोट या त्रयींची पेन्सिलीशी दोस्ती झाली की पाटीवर अक्षरे व अंक डौलदारपणे उतरत. या तीन बोटांचा संबंध थेट मेंदूशी होऊन तिथल्या पेशी तरतरीत होऊन अपेक्षित परिणाम पाटीवर दिसे. अॅक्युप्रेशर हा शब्द खूप नंतर कळला. त्यावेळच्या शिक्षण तज्ञांनी इतक्या लहान वयाच्या मुलांच्या शारिरीक व मानसिक क्षमतेचा सर्वांगाने विचार करून ही पद्धत आचरली असणार.

पाटी सांभाळणे म्हणजे लिहिलेले पुसले जाणार नाही  आणि पाटी फुटणार नाही याची काळजी घेणे,  पेन्सिलीचे तुकडे सांभाळणे ही जबाबदारी पाच ते नऊ वर्षाच्या बालकांवर होती .

पाटीवर लिहिल्याने अक्षर वळणदार आणि टपोरे होते, हे मात्र खरं!!

चौथीतून पाचव्या इयत्तेत गेल्यावर पाटी पेन्सिल चा निरोप घेऊन वही पेन यांची ओळख होत असे.

त्या बालवयातलं बालगीत ” शाळा सुटली पाटी फुटली,  आई मला भूक लागली ” हे गाणं प्रत्येक बालकाच्या मनातलं होतं.

कालानुरूप ते बालवयही मागे पडले,  त्याबरोबरच पाटीपेन्सिल ही कालबाह्य झाली.

इतका मोठा बदल होईल, अशी कल्पना ही कुणी केली नसेल.

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माती भिडली आभाळा… भाग-2 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

?मनमंजुषेतून ?

☆ माती भिडली आभाळा… भाग-2 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे

(म्हणून मला शांताबाईंच्या ‘ अजब सोहळा, माती भिडली आभाळा ‘ या गाण्याच्या ओळी आठवल्या. इथून पुढे…)  

तो खांब तरी किती भाग्यवान म्हणायचा ! अखिल विश्वाला वंदनीय असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचा आधार घेतला. तो त्यांच्या स्पर्शानं पावन झाला. आपली कठोरता त्यानं त्यागली आणि माऊलींच्या व्यक्तिमत्वातली शीतलता, पावित्र्य धारण केलं. महाराष्ट्र ही संतांची भूमी. इथल्या मातीचा कण न कण त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. इथल्या शिळा सुद्धा पवित्र आहेत. उगीच नाही गोविंदाग्रजांनी …. 

मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा 

प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा 

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा 

नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा 

…असे सुंदर महाराष्ट्राचे वर्णन केले ! इथले दगडही पावन आहेत. हा खांब तर एवढा पवित्र की पुढे त्याच्याभोवती मंदिर उभारले गेले. एरव्ही मंदिरात खांब असतात, पण खांबासाठी मंदिर उभारले जावे हा ही एक ‘ अजब सोहळा ‘. त्याचं कारणच तसं आहे. ज्या ज्ञानेश्वरांची पाठ समाधीस्थानीही जमिनीला टेकली नाही, त्याची पाठ या खांबाला टेकली. प्रख्यात लेखिका दुर्गा भागवत आपल्या ‘ पैस ‘ या पुस्तकात त्याबद्दल बोलताना म्हणतात, ‘ ख्रिस्ती धर्म जसा जगभर पसरला, तसा वारकरी पंथ पसरला असता,तर ख्रिस्ताच्या क्रुसाप्रमाणे हा स्तंभही जगभर गेला असता. पण बरे झाले तसे नाही झाले ते. तो इथेच राहिला. वारकऱ्यांना त्याचे दर्शन घ्यायला इथेच यावे लागते. ‘ ज्ञानेश्वरी इथे सांगितली गेली म्हणून वारकरी संप्रदायाचे हे आद्य पीठ आहे. 

पण माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर साधारणपणे तेरा ते एकोणिसाव्या शतकापर्यंत हे अत्यंत पवित्र असे स्थान विपन्नावस्थेत होते. संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेले हे स्थान ! या स्थानाची लोकांना विस्मृती झाली होती. या स्थानाला उर्जितावस्थेत आणण्यासाठी एखाद्या समर्पित त्यागी साधकाची आवश्यकता होती. आज हे स्थान आपल्याला आपल्याला ऐश्वर्यसंपन्न भासते त्यामागे वारकरी संप्रदायाचे महान उपासक वै. सोनोपंत दांडेकर मामांचे शिष्य ह.भ.प. बन्सी महाराज तांबे यांचे मोठे योगदान आहे. 

पैठणहून आळंदीला जाताना ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताबाईंनी या ठिकाणी काही दिवस मुक्काम केला. असे म्हणतात की पैठणला ज्या रेड्याकडून ज्ञानेश्वर माऊलींनी वेद वदवून घेतले, तो रेडा देखील या ठिकाणी त्यांच्या सोबत होता. इथेच निवृत्तीनाथांनी ज्ञानोबा माऊलींना ज्ञानेश्वरी लिहिण्याची आज्ञा दिली. इथेच त्यांना तसे का वाटावं ? तर या स्थानाचा महिमाच तसा होता. या ठिकाणी साक्षात श्री विष्णूंनी मोहिनीरूपात दहा दिवस निवास केला होता. त्यांनी निवास केला म्हणून हे ‘ नेवासे ‘ असे म्हटले जाते. त्या मोहिनीराजांचं सुंदर हेमाडपंती मंदिर इथे आहे. 

समुद्रमंथनातून जेव्हा चौदा रत्ने बाहेर पडली, तेव्हा त्यात अमृताचा कलश हाती घेऊन धन्वंतरी प्रकट झाले. अमृत हे अमरत्व प्रदान करणारे होते. म्हणून देव आणि दानव यांच्यात अमृत वाटपावरून भांडणे सुरु झाली. त्यात भगवान विष्णूंनी मोहिनीरूप धारण करून देवांना अमृत आणि दानवांना सुरा म्हणजे मदिरा वाटप केली. हे राहू आणि केतूच्या लक्षात आले. राहू अमृत प्राशन करण्यासाठी आपले रूप बदलून देवांमध्ये जाऊन बसला. श्री विष्णूंच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राच्या साहाय्याने राहूचा शिरच्छेद केला. त्याचे शीर उडून ज्या ठिकाणी पडले त्या गावाला राहुरी असे नाव प्राप्त झाले. तर त्याचा देह म्हणजे काया ज्या ठिकाणी पडली, ते कायगाव म्हणून प्रसिद्ध झाले अशी दंतकथा आहे. 

तात्पर्य हे इतके पवित्र ठिकाण आहे. इथे एकदा श्री विष्णूंनी अमृत वाटप केले. दुसऱ्यांदा ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपात साऱ्या जगाला अमृत प्रदान केले. ज्ञानेश्वरी म्हणजे मराठी सारस्वताचे सौभाग्यलेणे. काव्य आणि तत्वज्ञान यांचा सुरेख संगम. यानंतर त्याठिकाणी अमृतासमान अनुभव देणारा अमृतानुभव हा ग्रंथ ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिला. ज्या प्रवरा नदीच्या काठावर हे तीर्थक्षेत्र वसले आहे, त्या प्रवरेला ‘ अमृतवाहिनी ‘ असे संबोधले जाते. येथून जवळच गोदावरी आणि प्रवरेचा संगम आहे. या संगमावर देवगड हे पवित्र स्थान आहे. जवळच शनी शिंगणापूर आहे. असा हा रम्य आणि पवित्र परिसर. या पवित्र, शांत आणि रम्य स्थळी खरोखरच वेळ काढून जायलाच हवं. 

– समाप्त –

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा.)

 ©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बोका तांदूळ… लेखक श्री किशोर देसाई ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

(न शिजवलेला बोका तांदूळ व  शिजवलेला भात)

? इंद्रधनुष्य ?

☆ बोका तांदूळ… लेखक श्री किशोर देसाई ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

थंड पाण्यात शिजणारा आसामचा बोका तांदूळ

भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्यातही तांदूळ हे मुख्य पीक आहे. महाराष्ट्राचा आंबेमोहोर, अजरा घनसाळ तांदूळ, कोकणातील लाल उकडा तांदूळ, उत्तर प्रदेशाचा कालानमक तांदूळ, बासमती तांदूळ, पश्चिम बंगालचा गोविंदभोग, तुलाईपंजी, मणिपूरचा चकहाओ, केरळचा हट्टा तांदूळ, पोक्कली तांदूळ, वायनाडचा गंधकसाला, जीराकसाला, तसाच आसामचा करणी तांदूळ आणि बोका तांदूळ….  हे सगळे भारतीय सरकार द्वारे GI  (Geographical Identification) मानांकनप्राप्त तांदूळ आहेत.

हे जरी खरे असले तरी आसामच्या बोका तांदळाची गोष्ट काही औरच आहे आणि म्हणूनच त्यांचे वेगळेपण उठून दिसते. सर्वात प्रथम म्हणजे बोका तांदूळ शिजवण्यासाठी काहीही म़ेहनत लागत नाही. आग नाही, लाकडे नाही, उकळते पाणी नाही, की गॅससुध्दा लागत नाही. तर आसामचा हा सुवासिक असणारा जगप्रसिद्ध बोका तांदूळ चक्क साध्या थंड पाण्यात शिजतो. थंड पाण्यात साधारण एक तासभर ठेवला की खाण्यास भात तयार होतो. आहे की नाही जगावेगळी गंमत ! तर असा हा जादुई बोका तांदूळ आहे. जगात ‘मॅजिक राईस’ म्हणून ओळखला जातो.

आसामच्या बोका तांदळाची लागवड –

आसाममध्ये खरीप हंगामात म्हणजे जून महिन्यात बोका भाताची पेरणी केली जाते.. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पीक तयार होते. बोका तांदूळ किंवा बोका चाळ आसामच्या डोंगराळ आदिवासी भागात घेतले जाते. या भातामध्ये 10.73% फायबर आणि 6.8% प्रोटीन असते. याशिवाय बोका तांदळात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. बोका तांदूळ शेतात पिकायला साधारण साडेचार ते पाच महिने लागतात. तोपर्यंत त्यांची फार काळजी घ्यावी लागते.

बोका तांदूळ प्रामुख्याने आसाममध्ये डोंगराळ भागात पिकवला जातो. या भाताला इथली माती आणि हवामान यातून एक वेगळी चव आणि वेगळा सुगंध असतो. बोका तांदळाची लागवड आसाममधील कोक्राझार, बारपेटा, नलबारी, बक्सा, धुबरी, दररंग, कामरूप येथे केली जाते.  

बोका तांदूळाचे एकरी उत्पादन — बोका तांदळाचे इतर तांदळाच्या तुलनेत एकरी उत्पादन तसे कमीच आहे. एक एकर जमिनीवर साधारण 8 ते 10 क्विंटल तांदूळ पिकतो.

बोका तांदळापासून बनणारे पदार्थ — बोका तांदूळ – बोका चोले आणि ओरिझा सॅटिवा म्हणून देखील ओळखला जातो. आसाममधील बोका तांदळापासून जोलपान, पिठात राईस केक असे अनेक प्रकारचे पारंपारिक पदार्थ बनवले जातात. शिवाय बोका तांदूळ – दही, गूळ, दूध, साखर किंवा इतर खाद्यपदार्थांसोबत दिला जातो.

बोका तांदूळाचा ऐतिहासिक संदर्भ –

बोका तांदूळ हा अहोम सैनिक रेशन म्हणून वापरत असत. इतिहासाची पाने उलटली तर बोका तांदळाचा स्वतःचा एक सुवर्ण इतिहास आहे. या भाताने किती युद्धे जिंकायला मदत केली माहीत नाही. ही कथा १७ व्या शतकातील आहे, जेव्हा अहोम सैनिक मुघल सैन्यापासून देशाचे रक्षण करण्यासाठी बोका तांदूळ खात असत. हा तांदूळ रेशन म्हणून युद्धात नेण्यात आला, ज्याला शिजवण्याची गरज नव्हती, कारण साध्या थंड पाण्यात तासभर टाकला की खायला भात तयार. हा बोका तांदूळ जगात फक्त भारतातील आसाम राज्यातील डोंगराळ भागातच तयार होतो. बोका तांदळाचा अनेक हजार वर्षांचा इतिहास आहे, जो थेट आसामशी संबंधित आहे. हेच कारण आहे की भारत सरकारने आसाममध्ये पिकवल्या जाणार्‍या या भाताला GI टॅग देखील दिला आहे. बोका तांदूळाची लागवड पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रायोगिक तत्त्वावर केली जात आहे. किसान टाकच्या ताज्या अहवालानुसार उत्तर प्रदेशातील शेतकरीही बोका तांदळाच्या लागवडीत खूप रस घेत आहेत. रायबरेली जिल्ह्यातील उंचाहार येथील शेतकरी रामगोपाल चंदेल यांनीही बोका भात पिकवून नवा विक्रम केला आहे.

तर मित्रांनो फार शोध घेऊन आपल्या स्थानिक बाजारात जर कुठे आसामचा हा बोका तांदूळ मिळाला तर अवश्य आस्वाद घ्या.

लेखक – श्री किशोर देसाई

[email protected]

संग्राहक – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares