मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पोच पावती… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ पोच पावती… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

मागे एकदा पोस्टात गेलो असताना एक आजोबा स्टाफला विचारत होते, ” ह्याची पोचपावती मिळेल ना ?”

बरेचदा मीही हिला सांगतो ‘ acknowledgment म्हणून जपून ठेव ग !!! ‘

नेहमीप्रमाणेच तो शब्द माझ्या मनात फिरू लागला आणि बोटं लिहू लागली…… 

….. पोचपावती ही आपल्या व्यवहारात जितकी महत्वाची, तितकीच आयुष्यातही का असू नये ?? 

ही पोचपावती म्हणजे प्रत्येक वेळी कौतुक असाच अर्थ नसावा.

कधीतरी एखाद्या गोष्टीची घेतलेली दखल किंवा म्हणतात ना ‘ appreciation ‘असू शकतं.

ह्या पोचपावतीचे माझ्या आयुष्यातील उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आई- अप्पा. 

घरात कोणताही एकत्र कार्यक्रम होवो किंवा एखादा नवीन पदार्थ केला, कोणतीही चांगली कृती केली की सुनांना ते तसं आवर्जून सांगतात, “ छान झाला बरं का आजचा कार्यक्रम. ” आणि मग त्यांच्या ह्या शब्दांनी कार्यक्रमामुळे झालेली दमणूक एकदम निघून जाते आणि पुन्हा पुढचा कार्यक्रम करायला अजून उत्साह येतो !

पोचपावती तुमच्या आयुष्यात मोठी जादूची कांडी फिरवते. एखाद्याला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचं appreciation देऊन बघा.. अगदी मनापासून… बघा त्याच्या चेहऱ्यावर कसं हसू फुलतं. 

आमच्या घरकामवालीला गजरे, फुलं घालून यायची फार आवड ! कधी त्या मोठा गजरा घालून आल्या कामाला, की हिच्या तोंडून उस्फूर्तपणे येत ” प्रमिला काय मस्त दिसते आहेस. चल एक फोटो काढते तुझा !” ह्यानेसुद्धा खूप खुश होतात त्या. लहानांपासून मोठ्यांपर्यन्त आणि अगदी लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींसाठी ही पोचपावती खूप मोठा परिणाम करून जाते आणि छान आठवण मनात ठेवून जाते…… एखादं मोठं प्रोजेक्ट complete केल्यावर बॉसने त्याची घेतलेली दखल असो, की वर्गात ” छान निबंध लिहिलास हो ” असं म्हणून बाईंची मिळालेली शाबासकी असो, हिने खपून केलेल्या पदार्थाची घरातल्यानी केलेली स्तुती असो की, कधीतरी नवीन साडी नेसल्यावर हिला न बोलता दिलेली दाद असो. 

ह्या पोचपावती साठी माणूस फक्त जवळचाच हवा असंही काही नाही. कधीतरी आपल्याच दुकानदारालाही म्हणावं 

” काका तांदूळ चांगले होते हं तुमच्या कडून घेतलेले. “

सामान्य माणसांपासून अगदी कलाकारांपर्यन्त ह्या पोचपावतीची गरज असतेच, आणि ही दखल घ्यायला आणि द्यायलाही वयाचं बंधन नसावं कधीच.…. काही काही नाती ही पोचपावती पलीकडची असतात, पण तरीही अधूनमधून ह्याचा शिडकावा नात्यात नक्की आनंद देऊन जातो ..! 

बरेचदा सततच घेतली जाणारी दखल काही खरी वाटत नाही …..  तसं करूही नये.  

… कारण पोचपावती जितकी उत्स्फूर्त, तितकीच जास्त खरी !! 

पोच पावती फक्त शब्दातूनच नाही तर कधी डोळ्यातून, कधी कृतीतून, तर कधी स्पर्शातूनही व्यक्त व्हावी. जसं जसं ज्याच्याशी नातं, तशी तशी ती पोचवावी … कधी योग्य आदर ठेवून, कधी गळा मिठी मारून, कधी अगदी ” च्यामारी भारीच काम केलंस तू भावड्या “, अशी वेगळ्या भाषेतूनही यावी. 

माणूस जितका दिलखुलास तितकीच ही दाद उत्स्फूर्त. 

महत्वाचं म्हणजे ती स्वीकारणाराही तितकाच..  ह्या मुलांच्या भाषेत cool dude ..  हवा. 

ह्या पोच पावतीने काम करायला दुप्पट ऊर्जा मिळते, उत्साह मिळतो, नातं घट्ट व्हायला एक छोटासा धागा मिळतो…

….. आणि तसं म्हणाल तर ह्यासाठी फारसं काही लागत नाही….  लागतं फक्त मोकळं आणि स्वच्छ मन … !!!

तर मग होऊन जाऊ द्यात एखादी झकास, दिलखुलास दाद !!!

लेखिका — अज्ञात 

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तपोवनातील बोधिवृक्षाचा कुलवृत्तान्त… श्री प्रदीप गबाले ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

तपोवनातील बोधिवृक्षाचा कुलवृत्तान्त श्री प्रदीप गबाले ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी  ☆

पाण्याच्या खजिन्याकडून कळंबा गावाकडे जाताना प्रथम कळंबा फिल्टर हाऊसचा थोडासा चढ लागतो. हा चढ चढून पुढे गेलो की, दूरवर उजव्या हाताला असणारा गर्द झाडीचा एक हिरवा ठिपका आपलं लक्ष वेधून घेतो. कळंबा आयटीआयपर्यंत आल्यानंतर मात्र या गर्द ठिपक्याचे रूपांतर भल्या मोठ्या वृक्षाच्या पसाऱ्यात झालेले असते. हा हिरवागार वटवृक्ष ही तपोवन जवळ आल्याची खूण असते.

तपोवन आणि वृक्षारोपण यांचं फार जुनं नातं आहे. विद्यापीठ शाळेला भेट देणाऱ्या नामांकित पाहुण्यांना तपोवनात नेऊन त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून, त्यांची स्मृती जपण्याची आगळी वेगळी परंपरा विद्यापीठाचे एक संस्थापक दीक्षित गुरुजी यांनी सुरू केली. यासाठी तपोवन आश्रमात राहणारे विद्यार्थी आणि स्वतः दीक्षित गुरुजी ४  फूट लांब, ४ फूट रुंद आणि 3 फूट खोलीचा खड्डा स्वतः कष्ट करून खणत असत. त्यामध्ये चांगली माती भरून नंतर वृक्षारोपण केले जाई. तपोवनात आतापर्यंत संत श्री मेहेर बाबा, संत श्री केसकर महाराज, संत तुकडोजी महाराज, डॉ. अरुंडेल, भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. वळे, जपानमधील भारतीय राजदूत मो. ज्ञा. शहाणे, तेंडोलकर वकील, लोहिया शेठजी, प्रभाकरपंत कोरगावकर, रावबहादूर सर रघुनाथराव सबनीस, लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात, चित्रपटतपस्वी भालजी पेंढारकर, नाना धर्माधिकारी , लेफ्टनंट जनरल नागेश, भारताचे माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई , प्रसिद्ध दिग्दर्शक यशवंत पेठकर, नॉर्वेच्या विदुषी सुमतीबाई, डॉ. रा.शं. किबे, दादा धर्माधिकारी, कु. विमलाताई ठकार, वि.म. परांजपे, नाना गबाळे तसेच अनेक नामवंत लेखकानी वृक्षारोपण केले आहे.  

या सर्व नामवंतामध्ये विद्यापीठ सोसायटीचेे पहिले अध्यक्ष डॉ. जॉर्ज एस. अरुंडेल यांचे नाव महत्त्वाचे आहे. २९ नोव्हेंबर १९२८ रोजी डॉ. जॉर्ज एस्.अरुंडेल हे तपोवनात आले होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी, भारतीय भरतनाट्यम या नृत्यप्रकाराला जागतिक पातळीवर नेणाऱ्या प्रसिद्ध नृत्यांगना, डॉ. रुक्मिणीदेवी अरुंडेल याही होत्या.   डॉक्टर अरुंंडेल हे त्यावेळी होमरूल चळवळीच्या प्रणेत्या डॉ.ॲनी बेझंट यांचे सहायक म्हणून काम करत होते. तपोवन आश्रमाची उभारणी ज्या थिऑसॉफीच्या (विश्वबंधुत्व) तत्त्वावर झाली होती, त्या थिऑसाॅफीचे जागतिक मुख्यालय मद्रास (चेन्नई ) येथील अड्यार या ठिकाणी आहे. या अड्यारच्या केंद्रात असणाऱ्या अतिशय प्राचीन वटवृक्षाचे एक रोपटे डॉ.ॲनी बेझंट यांनी तपोवनात लावण्यासाठी म्हणूून पाठवले.  डॉ. जॉर्ज अरुंडेल हे वटवृक्षाचे रोपटे घेऊन स्वत: तपोवनात आले. दीक्षित गुरुजींनी डॉ. जॉर्ज अरुंडेल यांच्या हस्तेच हे वटवृक्षाचे रोप लावून घेतले. तो शुभ दिवस होता २९ नोव्हेंबर १९२८. ‘ बोधिवृक्ष ‘ असे या वटवृक्षाचे नामकरण करण्यात आले. या बोधिवृक्षाचे रोपटे मद्रासच्या ज्या थिऑसॉफी केंद्रातून तपोवनात आणले गेले त्या केंद्रात तो मूळ वृक्ष आजही आहे. अड्यार नदी मद्रासला ज्या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळते, त्या ठिकाणी हा भारतातील सर्वात वयोवृद्ध वृक्ष आजही डौलात आणि ताठ मानेने उभा आहे. त्याचे आयुष्यमान सुमारे ४५० वर्षाचे असावे असा तज्ज्ञांचा अंदाज असून, हा वृक्ष केवळ भारतातीलच नव्हे तर कदाचित जगातील सर्वात पुरातन वृक्ष असण्याची शक्यता आहे. या झाडाच्या पारंब्या जेथे जेथे जमिनीवर टेकल्या आहेत तेथे तेथे जणू दुसरा बुंधाच तयार झालेला आहे. असे हजारो बुंधे तयार झाल्यामुळे झाडाचा मूळ बुंधा कोणता हे ओळखता येत नाही. याच्या फांद्यांचा पसारा ६२००० चौरस फुटापर्यंत पसरलेला असून झाडाच्या फांद्या जमिनीपासून चाळीस फूट उंचीवर आहेत. एकेका फांदीचे वजन 30 टनापेक्षा जास्त भरेल असा अंदाज आहे. समुद्रकिनारी बहुतेक नारळ – पोफळीची झाडे वाढतात. पण हा वटवृक्ष त्याला अपवाद आहे.  झाडाचे जतन व्हावे म्हणून या झाडाभोवती एका विस्तीर्ण उद्यानाची निर्मिती करण्यात आलेली असून अड्यार नदीकाठच्या या उद्यानाचा पसारा २६० एकर इतका विस्तीर्ण आहे. या उद्यानाचे नाव ‘ हडलस्टोन गार्डन ‘ असे असून या बागेत इतरही शेकडो दुर्मिळ वृक्ष आहेत. वटवृक्षाच्या शीतल छायेतून चालताना आपणास अंतर्मनातील शांततेचा अनुभव येतो. या बागेत दरवर्षी हजारो स्थलांतरित पक्षी येतात. त्यामुळे पक्षी निरीक्षकांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे .अनेक प्राण्यांचेही वास्तव्य येथे आहे. या ठिकाणी अहिंसा धर्माचं पालन तंतोतंत केलं जातं. अहिंसा म्हणजे केवळ प्राणी, झाडे यांची हत्या न करणे असा नसून, आपल्या एखाद्या शब्दानेही कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची जास्तीत जास्त काळजी घेणे. विचाराने, आचाराने आणि उच्चारानेही कोणाचे मन दुखावले जाणार नाही हे पाहणे म्हणजेच विश्वबंधुत्व. विश्वबंधुत्वाचा अर्थ केवळ मानवजातीपुरता मर्यादित नसून हे बंधुत्वाचं नातं मानवाबरोबरच वृक्ष, प्राणी आणि इतर जीवांशीही जोडले जाते. म्हणूनच तेथे वृक्ष किंवा एखादी फांदी तोडण्यासही मनाई आहे. अड्यार येथील अशा पवित्र वटवृक्षाचे रोप जागतिक थिऑसाॅफी फेडरेशनचे माजी अध्यक्ष आणि विद्यापीठ सोसायटीचे पहिले अध्यक्ष डॉ. जॉर्ज एस. अरुंडेल यांनी स्वतः आणून, स्वतःच्या शुभहस्ते तपोवनात लावले आहे. तपोवन हे खऱ्या अर्थाने ‘तपोवन’ आहे याची साक्ष हा बोधिवृक्ष आजही देत आहे. 

आज तपोवनातील बोधिवृक्षाचाही सुमारे अर्धा एकर परिसरात विस्तार झाला आहे. या वृक्षावर सकाळी विविध पक्षांचा किलबिलाट आपल्याला ऐकावयास मिळतो. विशेषत: हिरव्यागार पानांच्या देठांमधून लालचुटुक,  गोलाकार फळांनी हा वटवृक्ष  बहरला की त्याचे सौंदर्य वेगळेच असते. ही लालचुटुक फळं खाण्यासाठी साळुंकी, तांबट पक्षी,  कावळे ,कोकीळ, बुलबुल, मैना, यासारख्या पक्षांची जणू स्पर्धाच लागते. या झाडावर घार आणि कावळे यांची शेकडो घरटी आहेत. आपली मान गर्रकन फिरवणारे शेकडो पिंगळे या वडाच्या ढोलीमध्ये  लपलेले असतात. आता झाडाच्या मोठमोठ्या पारंब्या जमिनीपर्यंत पोहोचल्या असून त्याचे रूपांतर जणू दुसऱ्या बुंध्यामध्ये होऊ लागले आहे. तपोवनाच्या शेजारी असणाऱ्या कलानिकेतनच्या मुलांना हा विशाल वटवृक्ष जणू नेहमी साद घालत असतो. ही कलाकार  मुले या डेरेदार वृक्षाचे पेंटिंग करताना स्वतःला विसरून जाताना दिसतात. तपोवनात असलेल्या शाळेतील विद्यार्थी, तसेच जवळ असणाऱ्या आयटीआय चे विद्यार्थी दुपारच्या वेळी या वटवृक्षाच्या सावलीत निवांतपणे अभ्यास करताना दिसतात. तपोवनाचे संस्थापक पूज्य दीक्षित गुरुजींनी एक सुंदर बाग या वटवृक्षाच्या सभोवती तयार केली होती, परंतु काळाच्या ओघात ती बाग आता नाहीशी झाली आहे. पण गुरुजींनी या वृक्षाभोवती बांधलेला मोठमोठ्या घडीव दगडांचा पार अजूनही सुस्थितीत आहे. वटवृक्षाचा पसारा आता खूप लांबूनही पाहायला मिळतो. सेेवा, स्वाध्याय, स्वावलंबन आणि साधी राहणी या तपोवन आश्रमाच्या चतु:सूत्री  बरोबरच अहिंसा आणि विश्वबंधुत्वाचे संस्कार दीक्षित गुरुजींनी, या बोधिवृक्षाच्या साक्षीने  तपोवनातील आश्रमीय विद्यार्थ्यांवर केले .सध्या 93 वर्षाचे आयुष्यमान असणारा तपोवनातील हा बोधिवृक्ष लवकरच शतायुषी होईल.

लेखक – श्री प्रदीप गबाले (तपोवनवासी)

निवृत्त मुख्याध्यापक, विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर.

9766747884

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दोन हिरे… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? वाचताना वेचलेले ?

☆ दोन हिरे… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

एका व्यापाऱ्याला बाजारात एक भव्य उंट विकत घ्यायचा होता. आणि एक उंट निवडल्यानंतर त्या उंटाची किंमत ठरवण्यासाठी उंट विक्रेता व व्यापारी यांच्यात बोलणी सुरू झाली. व्यापारी आणि उंट विक्रेत्यामध्ये करार झाला आणि शेवटी त्या व्यापाऱ्याने उंट विकत घेऊन घरी नेला !

घरी पोहोचल्यावर व्यापाऱ्याने आपल्या नोकराला उंटाचा काजवा (खोगीर) काढण्यासाठी बोलावले..!  काजव्याच्या खाली सेवकास एक लहान मखमली पिशवी सापडली, ज्यामुळे उघडकीस आले की ते मौल्यवान हिरे व रत्नांनी परिपूर्ण आहेत  ..! सेवक ओरडला, ” मालक , तुम्ही  एक उंट विकत घेतला, परंतु त्या बरोबर काय विनामूल्य आले आहे ते पहा !”

व्यापारी देखील आश्चर्यचकित झाला, त्याने आपल्या नोकरांच्या हातात हिरे पाहिले. ते सूर्यप्रकाशामध्ये आणखीच चमकत होते.

व्यापारी म्हणाले:  “मी उंट खरेदी केला आहे, हिरे नव्हे, मी ते त्वरित परत करावे !” 

नोकर मनात विचार करत होता, ” माझा मालक किती मूर्ख आहे….!”

तो म्हणाला:  ” मालक यात काय आहे हे कुणालाही कळणार नाही !”  तथापि, व्यापाऱ्याने त्याचे ऐकले नाही आणि ताबडतोब बाजारपेठेत पोचले आणि मखमलीची पिशवी त्या दुकानदाराला परत केली. 

उंट विक्रेता खूप खूष झाला, म्हणाला, ” मी विसरलो होतो की मी माझे मौल्यवान हिरे मी काजव्याखाली लपवले होते.  आता आपण बक्षीस म्हणून कोणताही एक हिरा निवडा!” 

व्यापारी म्हणाला,  ” मी उंटासाठी योग्य किंमत दिली आहे, म्हणून मला कोणत्याही भेटवस्तू आणि बक्षिसाची आवश्यकता नाही !”  जितका व्यापारी नकार देत होता, तितकाच उंट विकणारा आग्रह धरत होता….!

शेवटी, व्यापारी हसला आणि म्हणाला: “ खरं तर मी थैली परत आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी दोन मौल्यवान हिरे आधीच माझ्याकडे ठेवले होते. “ या कबुलीजबाबानंतर, उंट विक्रेता खूप चिडला आणि त्याने थैली रिकामी केली आणि त्यातील हिरे मोजले !

—  पण जेव्हा त्याला लक्षात आले की त्याचे सर्व हिरे जसेच्या तसे आहेत अन एकही हिरा कमी झालेला नाही, तेव्हा तो म्हणाला, “ हे माझे सर्व हिरे आहेत, तर मग तुम्ही ठेवलेले दोन सर्वात मौल्यवान हिरे कोणते ? “

 व्यापारी म्हणाला…. ” माझा प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान….!”

 विक्रेता मूक होता !

—  ज्याच्याकडे हे दोन हिरे आहेत, ‘ स्वाभिमान अन् प्रामाणिकपणा ‘, तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे….!

आपले हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते, तेथून महाभारताची सुरुवात होते

आणि….

जेव्हा आपले हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते, तेथून रामायणाची सुरुवात होते !!*……

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “संत निवृत्तीनाथ…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “संत  निवृत्तीनाथ…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एखादी व्यक्ती घडते तेव्हा ती घडतांना अनेक नानाविध गोष्टींचा, व्यक्तीमत्वांचा तिच्यावर कळत नकळत प्रभाव पडतो आणि मग तिच्या व्यक्तीमत्वाची जडणघडण होते. ह्यालाच आपण संस्कार असही म्हणतो. ह्यामधूनच त्या व्यक्तीचे कर्तृत्व बहरते,तिचा विकास होतो आणि काही वेळा तिच्याकडून अतुलनीय कामगिरी घडून एक अद्भुत, अद्वितीय व्यक्तिमत्त्व आकारास येतं आणि पुढे वर्षानुवर्षे आपण कित्येक पिढ्यानपिढ्या त्या व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो.

ह्याचप्रकारे आपल्यासगळ्यांच्या माऊली म्हणवल्या गेलेल्या अद्वितीय अविष्कार म्हणून घडलेल्या ज्ञानेश्वर माऊलींना घडविण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या निवृत्तीनाथांची आज प्रकर्षाने आठवण होते. संपूर्ण वारकरी मंडळींची साक्षात माऊली असलेल्या ज्ञानोबांना घडविण्याची किमया वा ताकद ही निवृत्तीनाथां कडे होती. माणसाच्या जडणघडणीत अनेक गोष्टींचा सहभाग असतो.त्यात जर ती व्यक्ती आपल्या सगळ्यांसाठी आदर्श व्यक्ती असेल तर आपण नकळत तीला घडविणा-या गोष्टींचा अभ्यास करतो.त्या गोष्टी लक्षात आल्यावर आपापल्या परीने त्याचे अनुकरण करायचा प्रयत्न करतो. अशा अनेक श्रध्दास्थानी आदरणीय व्यक्तींपैकी प्रामुख्याने निवृत्तीनाथांचे नाव अ्ग्रक्रमी राहील. नुकतीच  निवृत्तीनाथांची जयंती झाली.त्यांना कोटी कोटी प्रणाम.

भारतभूमी ही अनेक संताच्या सहवासाने पावन झाल्यामुळे खूप पवित्र, वैविध्यपूर्ण आणि संस्कृती ने परिपूर्ण झालेली आहे.अनेक संत,महात्मे येथे जन्मले आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना घडविले सुद्धा.त्यांच्या शिकवणी पैकी काही अंश जरी आपल्या कडून आचरणात आणल्या गेले तर जीवन धन्य होईल.

निवृत्तीनाथांचं अवघं 23 वर्षांचं आयुर्मान. पण ह्या अवघ्या 23 वर्षात अख्ख ब्रम्हांडाचं ज्ञान त्यांनी जगाला दिलं. त्यांची सगळ्यात मोठी कामगिरी म्हणजे त्यांनी आपल्या ज्ञानोबारायांना घडविलं,वाढविलं. ज्ञानेश्वर माऊलींचे पालक,थोरले बंधू,गुरू, मार्गदर्शक, असं सर्व काही म्हणजे निवृत्तीनाथ जणू.त्यांनी आपलं मोठेपणं,वडीलपणं ह्या लहान भावंडांना आदर्श घडवून सार्थक केलं.

निवृत्तीनाथ,ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताई ह्या भावंडांमध्ये निवृत्तीनाथ हे सगळ्यात थोरले.जणू ह्या कुटूंबाचे पालकच.आईवडीलां- च्या पश्चात पालकांच्या जबाबदारीची भुमिका  निवृत्तीनाथांच्या वाट्याला आली.

भागवत संप्रदायाचे आद्यपीठ ज्ञानेश्वर माऊलींचे सकलतीर्थ,विश्वकल्याणासाठी पसायदानातील श्री विश्वेश्वरावो,आद्यगुरू, आदिनाथ ह्या उपाध्या लागलेल्या निवृत्तीनाथां च्या शिकवणींची आज परत ह्या निमीत्ताने मनोमन उजळणी होते.आईवडीलांबरोबर निवृत्तीनाथ एका जंगलात गेले होते.तेव्हा एका वाघाने त्यांना उचलून एका गुहेत नेले.त्या गुहेत त्यांना एका तेजःपुंज साधूने बहुमोल ज्ञान दिले. हेच ते त्यांचे गुरू, नाथपंथातील गहिनीनाथ होत अशी आख्यायिका आहे.

निवृत्तीनाथांनी एक हरीपाठ व तिनचारशे अभंग रचले आहेत.त्यांनी ज्ञानेश्वरांना सामान्य लोकांना समजेल, उमजेल अशा भाषेत गीता लिहावयास सांगितली, तीच ही भावार्थ दिपीका ज्ञानेश्वरी होय.

ज्ञानेश्वर, सोपानदेव ह्यांनी समाधी घेतल्यानंतर मुक्ताबाईंनी अन्नपाणी त्यागून देह ठेवला.त्यानंतरच निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला. खरचं ज्ञानेश्वर माऊलींसारख्या व्यक्ती घडविणारे निवृत्तीनाथ अलौकिक शक्ती चे प्रतीक. त्यांना परत एकदा कोटीकोटी प्रणाम

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाट… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ वाट… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

‘ वाट ’ या शब्दाचे अनेक अर्थ आहेत.  पण वाट पहाणे आहे म्हणून माणसाचे चालणे आहे ……. 

झोपेत दिवस उगवायची वाट ,

अंधारातून चालताना प्रकाशाची वाट ,

दुःखात सुखाची वाट ,

आजारपणात बरे होण्याची वाट ,

दूर गेलेले जवळ येण्याची वाट , 

पक्ष्यांच्या पिलांना चारा घेऊन येणाऱ्या मातेची वाट पाहावी लागते  ,

चातकाला पावसाची वाट  , 

चकोराला चांदण्यांची वाट ,

तप्त धरतीला चिंब होण्याची वाट ,

शेतकऱ्याला  पीक कापणीची  वाट ,

गरिबाला श्रीमंत होण्याची वाट ,

परिक्षार्थीला पास होण्याची वाट …

वाट पाहण्याने मनाचा संयम वाढतो, चालण्याला गती मिळते, ऊर्जा मिळते, अन ज्याची वाट पाहतो ती 

मिळाल्यानंतरचा अवर्णनीय अक्षय आनंदही ! 

— पण ज्याची वाट पाहतोय ते वेळेत मात्र भेटायला हवे…,..  नाहीतर  वाट पहाणे संपून वाटच हरवते ….

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वीर भाई कोतवाल… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

 

? इंद्रधनुष्य ?

☆ वीर भाई कोतवाल… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

कोतवाल म्हटलं की सर्वसामान्यपणे आपल्याला आठवते दादरची प्लाझासमोरील मोक्याची कोतवाल गार्डन –  गावकी – भावकी किंवा गावाकडील मंडळींचे हमखास भेटीचे ठिकाण ! पण हा टुमदार बगीचा ज्यांचे नांवे आहे हे कोतवाल कोण याबाबत फारशी माहिती कोणालाच नसते आणि ती जाणून घेण्याचे कुतुहलही नसते !

विठ्ठल लक्ष्मण कोतवाल – जन्म ०१ डिसेंबर १९१२ – माथेरान 

नाभिक समाजात जन्मलेल्या या होतकरू तल्लख तरुणाने आपले एल एल बी शिक्षण पूर्ण करत वकिली क्षेत्रात प्रवेश केला ! नंतर ते स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय झाले. सशस्र क्रांतीसाठी त्यांनी बंडखोर तरुणांची फौज उभी केली ! ब्रिटीशांचे संदेशवहन उध्वस्त करण्यासाठी डोंगरांवरील वीजवाहक मनोरे पाडून टाकले ! आदिवासी शेतकरी बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला ! ब्रिटीशांना सळो की पळो करुन सोडले ! मुरबाडमधील सिध्दगड परिसरातील जंगलखोर्‍यात लपून स्वातंत्र्यलढा देणारे हे भाई कोतवाल, ०२ जानेवारी १९४३ रोजी ब्रिटीशांशी लढताना देशासाठी शहीद झाले , हुतात्मा झाले ! 

वीर कोतवाल यांचा यावर्षीचा ८० वा बलिदान दिवस आहे !

काही वर्षापूर्वी शहीद भाई कोतवाल या नांवाने चित्रपटही आला होता ॥

वीर भाई कोतवाल यांना विनम्र अभिवादन

तेथे कर माझे जुळती-

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुख म्हणजे नक्की काय असतं ! ☆ संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

🌼 सुख म्हणजे नक्की काय असतं ! 🌼 संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

सोलापूर इथल्या एका संस्थेने माझं दोन दिवसांचं मोटीवेशनल शिबिर आयोजीत केलं होतं. 

विविध वयोगटांतले आणि विविध व्यवसायातले शिबिरार्थी उत्साहाने सामील झाले होते.  

शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा विषय होता आनंदाने कसं जगावं?  

मी साऱ्या शिबिरार्थींना एक कॉमन प्रश्न विचारला आणि नोटपॅडमधल्या कागदावर आपापलं उत्तर लिहून द्यायला सांगितलं. प्रश्न अगदी साधा होता,

सुख म्हणजे काय?—–

उत्तरं अगदी भन्नाट होती.

कोणी लिहिले,

निरोगी दीर्घायुष्य म्हणजे सुख. 

एकाने लिहिलं, घरात पत्नीने तोंड बंद ठेवणं म्हणजे सुख. 

एक उत्तर होतं, सकाळी उठल्यावर पोट साफ होणं म्हणजे सुख. 

एकाचं उत्तर होतं, म्हातारपणी मुलं आधाराला जवळपास असणं म्हणजे सुख. 

कुणाचं उत्तर होतं, भरपूर पैसा गाठीशी असणं म्हणजे सुख. 

तर कुणी लिहीलं होतं की शरीर धडधाकट असणं म्हणजे सुख. 

सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या.

साऱ्या शंभर शिबिरार्थींच्या सुखाच्या कल्पना जेव्हा मी एकत्र केल्या तेव्हा लक्षात आलं, प्रत्येकजण कोणत्या तरी एका बाबतीत दु:खी आहे—- म्हणजे कुणाची बायको भांडखोर आहे, 

कुणाला बद्धकोष्ठाचा त्रास आहे, 

कुणाची मुलं त्यांच्यापासून दूर आहेत…. 

आणि ती उणीव त्या प्रत्येकाला टोचते आहे.

— म्हणजे उरलेल्या नव्व्याणव टक्के बाबतीत तो सुखी आहे. म्हणजेच काय तर प्रत्येकजण नव्व्याणव टक्के सुखी आहे आणि फक्त एक टक्का दु:खी आहे. 

हे केवळ एक टक्का दु:ख आपण चघळत बसतोय आणि उरलेल्या ९९% सुखाकडे दुर्लक्ष करतोय. आहे की नाही गंमत. 

— मी जेव्हा त्या साऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली तेव्हा सारेच चकीत झाले.

हीच तर सुखाची गंमत आहे. आपण सुखात असतो.  पण आपण सुखात आहोत हेच आपल्याला माहित नसतं.

जेव्हा काही कारणामुळे त्या गोष्टीची आपल्या आयुष्यात उणीव निर्माण होते तेव्हा आपल्याला कळतं, अरे… एवढा वेळ आपण सुखात होतो.

लहान असताना वाटतं, लहानपण म्हणजे परावलंबित्व. केव्हा एकदा मोठे होतोय आणि स्वत:च्या पायावर उभे रहातोय. मोठं झाल्यावर वाटतं, किती टेन्शन रे बाबा.

—  प्रत्येक गोष्टीत टेन्शन. 

— जागा शोधायचं टेन्शन. 

— कर्जाचे हप्ते भरायचं टेन्शन. 

— ऑफीसमध्ये साहेबांना तोंड द्यायचं टेन्शन.

त्यापेक्षा बालपण किती सुखाचं होतं. 

गृह्स्थाश्रमात प्रवेश केल्यावर वाटतं,  संसारसंगे बहु कष्टलो मी ! केव्हा एकदा मुलं मोठी होतायत आणि या जबाबदाऱ्यांतून मोकळा होतोय.

मुलं मोठी  होतात तेव्हा आपण वृद्ध झालेलॊ असतो. आणि गात्रं कुरकुर करू लागतात. तेव्हा वाटतं, अरे तो बहराचा काळ किती सुखाचा होता.

माझे एक ज्येष्ठ मित्र रवीन्द्र परळकर अलीकडे बऱ्याच दिवसांनी मला भेटले. शिळोप्याच्या गप्पा झाल्या. म्हटलं,

“थोडे वाळलेले दिसताय. बरं नव्हतं की काय?”

तर ते म्हणाले, “ प्रोस्टेट्च्या त्रासाने आजारी होतो.  काय झालं,  एक दिवस रात्री लघवी कोंडली. प्रोस्टेट ग्लॅंड वाढल्यामुळे त्याचा भार ब्लॅडरवर आला होता आणि लघवीलाच होईना. ओटीपोटावर भार असह्य झाला. मी वेदनांनी गडाबडा लोळू लागलो. अख्खी रात्र पेनकीलर घेऊन काढली. दुसऱ्या दिवशी फॅमिली डॉक्टरना घरी बोलवलं तर ते म्हणाले युरॉलॉजिस्टकडे घेऊन जा. युरॉलॉजिस्टकडे जाऊन ॲडमिट व्हायला दुपारचे अकरा वाजत आलेले. म्हणजे गेले पंधरा सोळा तास मला लघवीला झालं नव्हतं. वेदना असह्य होत होत्या. ब्लॅडर फुगून पोटातच फुटायची भीती निर्माण झाली होती. शेवटी एकदाचं मला ॲडमिट करुन घेण्यात आलं. आणि ब्लॅडर पंक्चर करुन सर्व युरीन बाहेर काढण्यात आली. त्या क्षणी माझ्या मनात विचार आला — आपल्याला दिवसातून वेळेवर लघवीला होणं ही सुद्धा किती सुखाची गोष्ट आहे.”

परळकरांचं उदाहरण हे सुखाच्या शोधात दु:खी असलेल्या प्रत्येकाचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. 

— हातपाय धडधाकट आहेत. दोन घास पोटात जातायत हे सुख नव्हे काय? 

— परमात्मा मेहेरबान होऊन पावसा पाण्यापासून रक्षण करतोय हे सुख नव्हे काय?  

— घराबाहेर पडल्यावर मागे एक वाट पहाणारं दार आहे हे सुख नव्हे काय? 

 ’एका लग्नाची गोष्ट’ या प्रशांत दामलेंच्या नाटकातलं गाणं मला आठ्वतय,,

मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं

काय पुण्य असतं की ते, घरबसल्या मिळतं

मित्र हो, जाणिवांच्या खिडक्या सताड उघड्या ठेऊन विचार कराल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही खूप सुखी आहात. 

चला तर मग, सगळ्या तक्रारी उडवून लावा, सारी निराशा झटकून टाका, आणि  आनंदाने जगू लागा.

संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सुखाची किल्ली…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “सुखाची किल्ली…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

बरेचदा मनात विचार येतो, माणसाला नेमकं काय हवं असतं ? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधायला जाणं म्हणजे ते समुद्रातील पाणबुडे वा गोताखोर लोकं समुद्राचा तळ ढुंढाळायचा प्रयत्न करतात, तसं काहीसं वाटलं. सुख, आनंद ह्या संकल्पना व्यक्तीसापेक्ष बदलत जातात. तरीही ढोबळमानाने सुखी होण्यासाठी काही बेसिक गोष्टींना अग्रक्रमाने स्थान मिळतं.

ह्या बेसिक गोष्टींपैकी पहिलं स्थान आपलं आणि कुटूंबियांच आरोग्य.”सर सलामत तो पगडी पचास” ह्या म्हणीनुसार आपलं निरामय आरोग्य आपल्याला खूपसारं मनस्वास्थ्य देतं. आपल्या वा आजुबाजुच्या अनुभवाने आपल्या लक्षात येतं आपला प्रत्येक अवयव हा तितकाच महत्त्वाचा असतो. आपल्याला जेव्हा एखाद्या अवयवाला ईजा होते तेव्हा नेमकं आपल्या मनात हटकून येतं,दुसरा कुठलाही अवयव एकवेळ परवडला पण ह्या अवयवाचं दुखणं नको रे बाबा.

दुसरं स्थान आपलं मानसिक आरोग्याचं. काही कारणाने आपली मनस्थिती जर ताळ्यावर नसेल तर त्याक्षणी प्रकर्षाने जाणवतं. एकवेळ शारिरीक आजारपण असलं तर दिसतं तरी पण काळजी,विवंचना ह्याने हरवलेलं मनस्वास्थ्य मात्र दाखवताही येत नाही अन लपवताही येत नाही.

तिसरी अवघडलेली अवस्था म्हणजे आर्थिक विवंचना. ह्या स्थितीतील व्यक्तींना वाटतं आरोग्यावर पैशाने इलाज तरी करता येतो. फक्त पैसा,सुबत्ता हवी मग काळजी आसपास ही फिरकतही नाही.

वस्तुस्थिती अशी असते की आपल्याला ह्या कुठल्याही प्रकारची चिंता नसली वा व्यक्ती जवळ जबरीची सहनशीलता असली तरी हा भवसागर तारुन जायला मदतच होते.

म्हणूनच संतांनी म्हंटलच आहे “सदा सर्व सुखी असा कोण आहे ?” . त्यामुळे सुखी होण्याची किल्ली ही आपलीच आपल्याजवळ असते हे खरं

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तरुणाईला पत्र… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ तरुणाईला पत्र… ☆ सौ राधिका भांडारकर

प्रिय तरुणाई,

 नमस्कार !

समस्त युवा पिढीस प्रातिनिधिक स्वरूपात, म्हणून प्रिय तरुणाई.  या व्यासपीठावरून तुमच्याशी काही संवाद साधण्यापूर्वी मी तुमचे चेहरे न्याहाळत आहे.  खूप त्रासलेले, कंटाळलेले, आणि आता काय डोस प्यायला  मिळणार या विचाराने वैतागलेलेच दिसत आहेत मला. रीती-परंपरा, संस्कृती, आदर्श, इतिहास, हे शब्द ऐकून तुमचे कान किटलेले आहेत हे मला कळतंय. तेही साहजिकच आहे. माझ्यासारखे बुजुर्ग तुम्हाला सांगून सांगून काय सांगणार? असेच ना?

पण होल्ड ऑन —

मी मात्र अशी एक बुजुर्ग आहे की, ” काय हे, आमच्या वेळी नव्हतं बाई असं! ” हे न म्हणता तुमच्याशी संवाद साधू इच्छिणारी आहे. ” तुमच्यात मलाही घ्या की ” अशी विनंती करणार आहे.

एखादा ढग धरतीवर बसून जातो आणि संपतो. मात्र मागे हिरवळ ठेवून जातो. मी ना तो संपलेला ढग आहे आणि तुम्ही वर्तमानातील हिरवळ आहात. मी भूतकाळ आणि तुम्ही वर्तमान काळ आहात. गतकाळातच रमण्यापेक्षा मला वर्तमानकाळाबरोबर जोडायला आवडेल. एक साकव बांधायला आवडेल. 

साक्षी भावाने जेव्हा मी तुमच्या जीवनाकडे पाहते, तेव्हा मला तुम्ही काळाच्या खूप पुढे गेलेले दिसत आहात. खूप प्रगत आणि विकसित भासता.  आज याक्षणी मी शिक्षित असूनही तुमच्या तांत्रिक, यांत्रिक जीवनाकडे पाहताना मला फार निरक्षर असल्यासारखं वाटतं आहे.  त्या क्षणी तुम्ही माझे गुरु बनता आणि मी शिष्य होते. हे बदललेलं नातं मला मनापासून आवडतं. आणि जेव्हा मी हे नातं स्वीकारते तेव्हा माझ्या वार्धक्यात तारुण्याचे दवबिंदू झिरपतात आणि मला जगण्याचा आनंद देतात. 

बी पॉझिटिव्ह…  से येस टू लाइफ… हा नवा मंत्र मला मिळतो.

हो युवकांनो !  भाषेचा खूप अभिमान आहे मला.  पण तरीही तुमची टपोरी, व्हाट्सअप भाषा मला आवडूनच जाते. कूल. चिल, ड्युड, ब्रो, सिस.. चुकारपणे मीही हे शब्द हळूच उच्चारूनही बघते बरं का !

 परवा संतापलेल्या माझ्या नवऱ्याला मी सहज म्हटलं, ” अरे! चील! ” त्या क्षणी त्याचा राग बटन बंद केल्यावर दिवे बंद व्हावेत तसा विझूनच गेला की !

तुमची धावपळ, पळापळ, स्पर्धा, इर्षा, ‘आय अॅम  द बेस्ट’ व्हायची महत्त्वाकांक्षा, इतकंच नव्हे, तर तुमचे नैराश्य जीवनाविषयीचा पलायनवाद,आत्महत्या, स्वमग्नता हेही मी धडधडत्या काळजांनी बघतेच  रे ! मनात येतेही.. 

” थांबवा रे यांना, वाचवा रे यांना !” .. एक झपकीच मारावीशी वाटते मला त्यावेळी तुम्हाला. पण मग थांबते क्षणभर.  हा लोंढा आहे. उसळेल, आपटेल, फुटेल, पण येईल किनाऱ्यावर. आमच्या वेळचं, तुमच्या वेळचं ही तुलना येथे कामाची नाही. त्यामुळे दरी निर्माण होईल. अंतर वाढेल. त्यापेक्षा मला तुमचा फक्त हात धरायचाय् किंवा तुमच्या पाठीमागून यायचंय.

” जा ! पुढे पुढे जा ! आमच्यापेक्षा चार पावलं पुढेच राहा ! कारण तुम्ही पुढच्या पिढीचे प्रतिनिधी आहात. पण वाटलंच कधी तर पहा की मागे वळून. तुमच्यासाठी माझ्या हातातही एक मिणमिणती पणती आहे. दिलाच  तर प्रकाशच देईल ती, हा विश्वास ठेवा. एवढेच. बाकी मस्त जगा. मस्त रहा. जीवनाचा चौफेर अनुभव घ्या.”

तुमचेच, तुमच्यातलेच,

एक पांढरे पीस. 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पुण्याई… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ पुण्याई… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

आपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असते. ती असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. जोपर्यंत बिभीषण लंकेमध्ये राहत होते तोपर्यंत रावणाने पाप केले तरी बिभीषणाच्या पुण्याईने रावण सुखी होता. परंतु जेव्हा बिभीषणासारख्या भक्ताला लाथ मारली व लंकेमधून निघून जाण्यास सांगितले, तेव्हापासून रावणाचा   विनाश होण्यास  सुरूवात झाली आणि शेवटी  रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर मागे रडायला कुणीही वाचले नाही ! 

अशाच प्रकारे हस्तिनापूरमध्ये जो पर्यंत विदूरासारखे भक्त रहात होते तोपर्यंत कौरवांना सुखच सुख मिळाले. पण जेव्हा कौरवांनी विदूरांचा अपमान करून त्यांना राजसभेतून जाण्यास सांगितले तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला सांगितले की ‘ काका! आपण तीर्थयात्रेला जावे ‘. जसे विदुराने हस्तिनापूर सोडले, तसे कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेले, आणि  कौरवांच्यामागे कोणीही वारस राहिले नाही !! 

याचप्रकारे आपल्या कुटुंबात अथवा मित्र परिवारात जोपर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो, तोपर्यंत  आपण व आपल्या घरात आनंदी आनंद असतो. विचार करा ! एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पीडा निघून जाते आणि आपणास चांगले दिवस येऊ लागतात, पण अशी व्यक्ति जेव्हा आपला त्याग करते तेव्हापासून आपली ओहोटी सुरु होते. म्हणून भगवंतांच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका. लक्षात ठेवा, आपण जे कमावून खातो ते कुणाच्या तरी पुण्याईने  मिळत असते. यासाठी नेहमी आनंदी रहा व आपल्या परिवारात कोणी भक्त भक्ती करत असेल तर त्याचा अपमान करू नका, तर सन्मान करा. व त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. माहित नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईने चालते. आई-वडिल, वयोवृद्ध, मित्र व अतिथींचा नेहमी सन्मान करा व सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे देवाची भक्ती करत जीवन जगत रहा !!  सोबत काही घेऊन आलो नाही व  जातांना या संसारातून काही घेऊन जायचे नाही हे कायम लक्षात ठेवा..!!

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares