मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ऐका गोष्ट बाराची… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

ऐका गोष्ट बाराची… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

12/12/12/12/12

बारा हा जुन्या लोकांचा प्रिय अंक…

— मोजण्यासाठी द्वादशमान पध्दती…१२ची

— फूट म्हणजे १२ इंच

— एक डझन म्हणजे १२ नग.

— वर्षाचे महिने १२,

— नवग्रहांच्या राशी १२

— गुरू,शनी, मंगळ हानिकारक समजले जातात….१२ वे

— तप….१२ वर्षाचे,

— गुरुगृही अध्ययन….१२ वर्षे

— घड्याळात आकडे…..१२,

— दिवसाचे तास …..१२,

— रात्रीचे तास …..१२ ,

— मध्यरात्र म्हणजे रात्रीचे..१२

— मध्यान्ह म्हणजे दुपारचे..१२

— एकादी गोष्ट तुटली फुटली म्हणजे तिचे वाजले….१२

— सकाळच्या बाजारात उरला सुरला माल १२ च्या भावात काढतात..

— पूर्वी मुलीचा विवाह १२ व्या वर्षी करत..

— इंग्लंडमध्ये १२ पेन्सचा १ शिलिंग

— बाळाचे नामकरण १२ व्या दिवशी केले जाते

— मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांचे..

— बलुतेदार,बारभाई,बारावाटा…सगळे १२,

— बेरकी माणूस म्हणजे १२ गावचं पाणी प्यायलेला

— तसेच कोणाचेही न ऐकणारी रगेल व रंगेल व्यक्तीला १२ चा आहे असे म्हणतात.

— ज्योतिर्लिंग…..१२ आहेत,

— कृष्ण जन्म….रात्री १२

— राम जन्म दुपारी…१२ ,

— मराठी भाषेत स्वर…१२ —- त्याला म्हणतात…बाराखडी

— १२ गावचा मुखीया,

— जमिनीचा उतारा ७/१२चा

— इंजिनिअरींग, मेडीकल, किंवा ईतर कोर्सेससाठी १२ वी नंतर प्रवेश 

— खायापिया कुछ नही , गिलास फोडा बाराना

— बारडोलीचा सत्याग्रह 

— पळून गेला ——पो’बारा’

—- पुन्हा पुन्हा ——-दो’बारा’

— एक गाव, भानगडी १२ 

— लग्न वऱ्हाडी ——— ‘बारा’ती

— काही लोकांच्या तोंडावर नेहमीच वाजलेले असतात ते पण १२. 

आणि

— सर्वात महत्त्वाचे…

— MH12 अर्थात ……पुणे

———- अशी आहे ही १२ चीं किमया….

— असे भन्नाट शोध फक्त आणि फक्त पुणेकर लावू शकतात–

— कोणालाच दोष देऊन उपयोग नाही….. 

कारण — महिनाच  “बाराचा” आहे… 

 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वयंपाक_बुद्धिमत्ता (उगीच विचारांची भेळ) – सुश्री केतकी ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ स्वयंपाक_बुद्धिमत्ता (उगीच विचारांची भेळ) – सुश्री केतकी ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

भारतातल्या घराघरात जे सकाळ-दुपार-संध्याकाळ, सोमवार ते रविवार, रोज-रोज, वर्षानुवर्ष केलं जाणारं पोळी – भाजी – वरण – भात – कोशिंबीर – चटणी – उसळ वगैरे वगैरे, आणि लाडू – चिवडे – मिठाया – पक्वान्न वगैरे वगैरे घडत असतं ते करणाऱ्या बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का? 

एकदा काही कारणाने माझ्यावर एका ३० वर्षाच्या हुषार, शिकलेल्या, स्मार्ट आणि चुणचुणीत बाईला स्वयंपाक शिकवायची वेळ आली. मीही हो म्हटलं पटकन. तिचं वय बघता तिला थोडं तरी काहीतरी येत असेल, थोडी काही समज असेल, असा एक सहज गैरसमज मी करून घेतला आणि धक्क्यावर धक्के बसायला लागले. 

स्वयंपाक = कागदावर लिहिलेली एक रेसिपी असा तिचा आणि (मी कितीतरी वर्षं स्वयंपाक करत असून) माझा पण समज होता. 

मग झाली मजा सुरू—- 

– फोडणीला तेल किती घेऊ, मोहरी किती, हिंग किती, हळद किती? तेल तापले ते कसं ओळखायचं?

– गॅस किती मोठा, किती लहान, केव्हा कमी – जास्त करायचा, पदार्थ उलथन्याने किती हलवायचा, उलथनं की डाव,   का झारा? कढई का पातेलं? 

– पदार्थ शिजला हे कसं ओळखायचं?

– एका वेळी ४ पदार्थ करायचे असतील तर ते कमीत कमी वेळात व्हावे म्हणून काय आणि कसं करायचं?

– ते करत असताना पुढच्या खाण्याच्या वेळी करायच्या पदार्थाचं नियोजन कसं करायचं?

– प्रत्येक पदार्थाबरोबर वाढणारा ओट्यावरचा पसारा, खरकटं, चिकटपणा— आवरता कसा घ्यायचा?

– दूध तापत असताना, कुकर शिजत असताना, तेल गरम होत असताना, आपलाच चहा थोडा गार होत असताना लागणाऱ्या वेळेचा परफेक्ट अंदाज घेत, बाजूला चार भांडी घासणे, एखादी भाजी चिरणे, एखादी यादी करणे, एखाद्या झोपलेल्या माणसाला प्रेमाने उठवणे (किंवा गदागदा हलवून येणे)– हा वेळेचा हिशोब कसा करायचा?

– मीठ, तिखट, साखर किती घालायचं?

– पोळी/चपाती/फुलका/पुरी काहीही करत असताना कणकेच्या गोळ्याचा आकार, आणि लाटल्यानंतर त्याचा होणारा आकार आणि जाडी — याची सांगड कशी घालायची?

– उरलेल्या अन्नाचं काय करायचं?

– वातावरण/ऋतू बघून कुठला पदार्थ किती वेळ चांगला राहील याचा अंदाज कसा बांधायचा?

किती गोष्टी असतात स्वयंपाक म्हटलं की?

मग लक्षात आलं की आपल्याला फक्त स्वयंपाक नाही, तर स्वयंपाकघराचं नियोजन ही शिकवायला लागणार आहे.  आणि ते काही दिवसांमध्ये शिकवणं जवळजवळ अशक्य आहे. आणि त्याला लागणारी बुद्धिमत्ता बहुतेक या हुशार आणि चुणचुणीत मुलीकडे नाहीच आहे. 

बुद्धिमत्ता, हुशारी याचबरोबर स्वयंपाकघरात लागत असतो तो महत्त्वाचा गुण म्हणजे—’ involvement’ . उगीच पाट्या टाकून स्वयंपाक होत नसतो, स्वयंपाकघर चालत नसतं. 

तिला काही रेसिपी लिहून दिल्या, काही व्हिडिओ पाठवले, काही पुस्तकं सुचवली आणि विषय संपवला.

गणित आणि विज्ञान या माणसाने शब्दात आणि आकड्यात बांधलेल्या गोष्टींना समजून घेऊन त्यात तरबेज होणाऱ्यांना हुषार म्हणणारी आपण माणसं, पण प्रसंगी पूर्ण अशिक्षित असून स्वयंपाकघर हा भयंकर क्लिष्ट विषय उत्तम हाताळणाऱ्या बायका पुरुषांच्या हुषारीला दाद किती वेळा देतो? निसर्गाने दिलेली अंगभूत हुषारी आपल्याकडून इतकं काही उत्तम करून घेत असते, पण आपण डिग्री, मार्क, इंग्लिश येणे, असली मोजमापं लावून तिच्याकडे पूर्ण कानाडोळा करत असतो. 

एखादा दिवस आपण केलेल्या आपल्याच घरातल्या स्वयंपाकाकडे तटस्थपणे बघावं आणि आपण खरंच किती हुशार आहोत याची स्वतःला जाणीव करून द्यावी. किंवा आपण स्वयंपाक करत नसू तर जरा डोळसपणे त्या स्वयंपाकघरात होणाऱ्या प्रचंड complicated गोष्टींकडे बघावं, दिवसात किमान तीन वेळा मिळणाऱ्या ताज्या आणि चविष्ट अन्नाकडे या दृष्टिकोनातून बघावं आणि त्याचं मोल ओळखावं. 

खाण्यापूर्वी एकदा रोज—  निसर्गाने आपल्या घराला सढळहस्ते दिलेल्या या बुद्धिमत्तेचे आभार मानावेत.

लेखिका :  सुश्री केतकी

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाची अफाट शक्ती ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाची अफाट शक्ती ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

‘लुईस हे ‘ या एक अमेरिकन महिला होत्या. त्यांच्या पूर्वायुष्यात वयाच्या ५-१५ वर्षांपर्यंत त्यांच्यावर भरपूर शारीरिक अत्याचार झाले. यामुळे त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच इतका नकारात्मक होता की, हे संपूर्ण जगच वाईट आहे. सर्व पुरुष हे घाणेरडेच असतात व मी जगायला लायक नाही. 

ख्रिश्चॅनिटीनुसार त्या ‘नन’ होतात व त्यांच्या धर्मातील आध्यात्मिक पुस्तके वाचत. पुढे वयाच्या ४० व्या वर्षी त्यांना कॅन्सर होतो. जेव्हा त्यांच्या हे लक्षात येते की, ज्यांनी हे कृत्य करायचं ते करून निघूनही गेले; त्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही. त्रास (कॅन्सर) कोणाला झालाय तर मला. कारण इतकी वर्षं त्या सर्वांबद्दलच्या सर्व नकारात्मक भावना (राग, द्वेष, घृणा) मी धरून ठेवल्या आहेत. जर मला यातून बाहेर पडायचे असेल तर त्या सर्वांना माफ करणे खूप गरजेचे आहे. बरं ज्यांनी ते कृत्य केलं, ते माफ करण्यासारखं होतं का? तर आपल्या दृष्टीने नक्कीच नाही. पण ‘लुईस हे’ यांनी मनाची स्वच्छता केली. 

त्या सर्व व्यक्तींविषयी मनात असलेला सर्व राग बाहेर काढून त्यांनी सर्वांना मनापासून माफ केले व कोणतेही ऑपरेशन (शस्त्रक्रिया) न करता त्या पूर्णपणे बऱ्या  झाल्या. पुढे ९० व्या वर्षापर्यंत जगभर लेक्चर देत फिरत होत्या.

त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिले आहे ‘ यू कॅन हील युवर लाईफ ’. त्या पुस्तकाच्या शेवटच्या काही पृष्ठांमध्ये तर त्यांनी एक तक्ता दिला आहे, ज्यामध्ये पहिल्या स्तंभामध्ये आजार, दुसऱ्या स्तंभामध्ये त्यामागील नकारात्मक भावना व तिसऱ्या स्तंभामध्ये कशाप्रकारे सकारात्मक विचार करा म्हणजे तो आजार बरा होईल असे दिले आहे. अगदी सर्दी खोकल्यापासून कॅन्सरपर्यंत सर्व आजारांच्या मागच्या नकारात्मक भावनांचा त्यामध्ये समावेश आहे. हा तक्ता आपल्या मनाची स्वच्छता करायला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

दुसरे उदाहरण ‘ ब्रँडन बेज ’ यांचे. त्यांना स्वत:ला फुटबॉलच्या आकाराचा ट्युमर पोटामध्ये होता.  बऱ्याच दिवसांपासून पोट सुटल्यासारखं वाटतंय म्हणून रूटिन चेकअपसाठी सोनोग्राफी केली, तेव्हा एवढा मोठा ट्युमर डॉक्टरांना दिसला. त्यांच्या गायनॅकॉलॉजिस्ट (स्त्री रोग तज्ज्ञ) तर उडाल्याच. त्या म्हणाल्या, लगेच अ‍ॅडमिट होऊन उद्याच्या उद्या ऑपरेशन करून काढून टाकू. पण ब्रँडन बेज यांना मन, भावना व शरीराच्या संबंधांविषयी चांगली माहिती असल्याने त्या म्हणाल्या, ” मला एक महिन्याची मुदत द्या. समजा काही उपयोग नाही झाला तर ऑपरेशन करा.”

एक महिनाभर त्यांनी स्वत:च्या मनाची स्वच्छता केली व जुन्या अनावश्यक आठवणी खणून बाहेर काढल्या व टाकून दिल्या. त्याच्याशी निगडित लोकांना माफ केलं. महिनाभराने सोनोग्राफीत ट्युमरचा आकार निम्म्याने कमी झाला व पुढील तीन महिन्यांत सोनोग्राफी नॉर्मल आली. इतरांनाही याचा उपयोग व्हावा यासाठी त्यांनी ‘ The Journey ‘ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. तसेच ही पद्धत शिकवणारा तीन दिवसांचा कोर्सही सुरू केला आहे. त्या कोर्सचा अनेकांना खूपच उपयोग झाला.

तसेच आपल्या देशातील डॉ. दीपक चोप्रा हे एक प्रख्यात एन्डोक्रायनॉलॉजिस्ट आहेत व अमेरिकेतील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये प्रमुख पदावर होते. ते म्हणायचे की, मी अगदी मनापासून कॅन्सरच्या गाठी मुळापासून कापतो, So ideally it should not recur. खरं म्हणजे ते पुन्हा होता कामा नये. पण तरीही recurrence का बरं होतो? 

जेव्हा त्यांनी याचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या हे लक्षात आले की, जेव्हा आपल्याला एखादी जखम होते, तेव्हा मलम लावलं तर ती जखम लवकर बरी होते. पण समजा नाही लावलं तरीही ती जखम बरी होतेच. कोण बरं ही जखम बरी करतं? तर आपलंच शरीर.—- जखमेच्या शेजारील mother cells पासून daughter cells तयार होतात व जखम भरून येते. सर्वसाधारणपणे आईचे जसे संस्कार, मानसिकता असेल तशीच मुलीची होते. आपल्या नकारात्मक भावना वेगवेगळ्या पेशींमध्ये साठवल्या जातात. त्यामुळे ट्युमर कापला तरी तिथे जी जखम होते, ती बरी करण्याचं काम तिथल्या mother cells करतात. —- पण त्यामध्ये जर नकारात्मक भावना साठवल्या असतील तर नवीन पेशी परत तशाच तयार होणार. त्यामुळे वर-वर फांद्या छाटून उपयोग नाही, तर झाड मुळापासून काढायला हवं. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी medical practice बंद केली व आता ते पूर्णपणे cellular healing वर काम करतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला मनाची स्वच्छता करायला शिकवतात.

त्यामुळे जर आपण सर्वांनी स्वत:साठी रोजची १५ मिनिटे काढली व मनाची स्वच्छता केली, तर आपण कमीत कमी आजारी पडू. बरं मनाची स्वच्छता करताना एखाद्या दिवशी खूपच छान व हलके वाटते. पण दुसऱ्या दिवशी परत काहीतर घटना घडतात आणि ‘ ये रे माझ्या मागल्या ’ प्रमाणे मनात नकारात्मक विचार यायला लागतात. 

दारुड्या माणसाला तुम्ही कितीही समजवा की दारू पिणे वाईट आहे व त्याला ते पटते सुद्धा. पण दारूचे दुकान दिसल्यावर पाय बरोबर तिकडे वळतात. त्याचप्रमाणे आपण अगदी ठरवतो सुद्धा की, फक्त सकारात्मकच विचार करायचे. पण एक ठिणगी पुरेशी होते की, लगेच नकारात्मक विचारांची शृंखला सुरू होते. पण हे अगदी नैसर्गिक आहे. ज्याप्रमाणे घरातील धूळ रोज साफ करावी लागते, त्याचप्रमाणे मनाची स्वच्छताही रोज करणे आवश्यक आहे.

प्रयोग म्हणून करून तर पहा. मी जोपर्यंत स्वत: कोणती गोष्ट करून अनुभवून पहात नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्हीही ठेवू नका. पण एकदा तुम्हाला अनुभव आला की, मला खात्री आहे की, रोज ज्याप्रमाणे आपण सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना दात घासायला, अंघोळ करायला, हातपाय धुवायला विसरत नाही, त्याप्रमाणे एकदा तुम्हाला मनाची स्वच्छता करण्याची सवय लागली की, तुम्ही कधीच ही सवय सोडणार नाही.

सर्वांना निरामय आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा !

आपण सर्व आरोग्यदायी जीवन जगत इतरांना प्रेरित कराल ही अभिलाषा !

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆  आयुष्य कुणी जास्त जाणलं?… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? वाचताना वेचलेले ?

☆ आयुष्य कुणी जास्त जाणलं?… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला….. त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही.

तो एवढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील महाग झालेत. गेली कित्येक वर्षे तो रडलेला नाही.

एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला —- खिशात दमडीदेखील नाही आणि फिरायला बाहेर पडतो.

त्याची नजर त्या भिकाऱ्याकडे – आणि त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते. त्या भिकाऱ्याच्या बाजूला एक पाटी, आणि दोन-तीन खडू पडलेले.

— हा लेखक त्या भिकाऱ्याकडे जातो आणि म्हणतो, ” मित्रा, मी एक लेखक आहे, ज्याच्याकडे एक पै देखील 

नाही. पण माझ्याकडे कला आहे. माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे. ती मी तुला देऊ शकतो. तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का? “

” साहेब” भिकारी म्हणतो, ” माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही. मी एक गरीब आंधळा भिकारी. तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं ते करा.”

— तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघून जातो.

— त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की, एकदम जाणाऱ्या – येणाऱ्यापैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्या पुढ्यात पैसे टाकू लागलाय. 

— थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते. तो भिकारी बेचैन होतो. नाण्यांची रास वाढतच जाते. तो एवढा अस्वस्थ होतो की पैसे टाकणाऱ्यांपैकी एकाचा हात पकडतो आणि म्हणतो, ” साहेब, माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल. मी एक गरीब आंधळा भिकारी आहे. मला कृपा करुन जर या पाटीवर काय लिहीलंय ते वाचून दाखवलेत तर फार उपकार होतील हो.”

— तो माणूस पाटी उचलतो आणि वाचायला लागतो—-

— “ वसंत ऋतू म्हणजे बहरलेली सृष्टी — आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी.”

— भिका-याच्या गालावरुन अश्रू ओघळायला लागतात.

——– आयुष्य कुणी जास्त जाणलं?—–

या ओळी लिहिणाऱ्या लेखकानं?—- त्या ओळी वाचून पैसे टाकणाऱ्या लोकांनी?— की इतक्या वर्षांनी रडणा-या त्या भिका-यानं?—–

 

तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल…

पण जर तुमची वाणी गोड असेल, तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल…

 

माणसाला बोलायला शिकण्यास (किमान) २ वर्ष लागतात…

पण ” काय बोलावे? ” हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते…

 

— ओढ म्हणजे काय? – हे जीव लावल्याशिवाय कळत नाही…

— प्रेम म्हणजे काय? – हे स्वतः केल्याशिवाय कळत नाही…

— विरह म्हणजे काय? – हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही…

— जिंकण म्हणजे काय?–  हे हरल्याशिवाय कळत नाही…

— दुःख म्हणजे काय?– हे अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही…

— सुख म्हणजे काय?– हे दुसऱ्याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही…

— समाधान म्हणजे काय? – हे आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही…

— मैत्री म्हणजे काय?– हे ती केल्याशिवाय कळत नाही…

—आपली माणस कोण? – हे संकटांशिवाय कळत नाही…

— सत्य म्हणजे काय? –  हे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही…

— उत्तर म्हणजे काय?–  हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…

— जबाबदारी म्हणजे काय?– हे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…

आणि…. 

— काळ म्हणजे काय? –हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही…

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “बंध नात्यांचे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “बंध नात्यांचे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काल सुट्टीचा दिवस. एक सुट्टी सुद्धा खूपसारा शीण घालवते. त्याच त्याच रुटीनला जरा मन कंटाळलं असतं त्यात ह्या बदलाने खूप सकारात्मक फरक पडतो.

काल रविवार. त्यामुळे घरी मस्त आरामात साग्रसंगीत स्वयंपाक,गप्पा गोष्टी करीत जेवणाचा घेतलेला आनंद काही ओरच असतो. खेळीमेळीच्या वातावरणात जेवणं सुरू असतांना “अहो आई” सहज बोलल्या आपण तीस वर्षे झालीत ,एकत्र,एकविचाराने,आनंदाने एकाच छताखाली राहातो आहे,भांडण तर सोडाच आपल्यात कधी साधी कुरबुर पण नाही, ह्याचं काय कारण असावं बरं? कारण सासूसुन हे नात जरा जास्तच नाजूक असतं म्हणून विचारलं.

त्यांच्या प्रश्नाने विचारात पडले आणि कारण शोधतांना दोन तीन प्रमुख कारणं सापडली,एक म्हणजे दोघीही ह्या सुमधुर संबंधाचं क्रेडीट हे एकमेकींना देतो, आपापली कर्तव्य दोघीही चोख बजावित असल्याने एकमेकींना स्वतः पेक्षाही काकणभर जास्त विश्वास दुसरीवर वाटतो,आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या नात्यात “ईगो”ला अजिबात स्थान देत नाही. अर्थातच ह्या वरील गोष्टींच दोघींकडूनही तंतोतंत पालन होतं.

आम्ही दोघीही एकमेकांनी वेळ हा देतोच, कितीही व्यस्त दिनचर्या असली तरी रात्री झोपायच्या आधी कमीत कमी दोघीही आजचा दिवस कसा गेला हे परस्परांना सांगतो.

कुठल्याही नात्यामध्ये परस्परांना दिलेला वेळ  हा नातं पक्क करायला काँक्रीट चे काम करतो. ह्यावरून गुलजारजींच्या मला आवडत असलेल्या ओळी आठवल्या त्या पुढीलप्रमाणे,

“मुझसे समय लेकर भी मत आना,हाँ अपना समय साथ लाना,फिर दोनो समय को जोड बनाएँगे एक झुला ।।। खरचं किती आशयपूर्ण आहेत नं ह्या ओळी,किती गहरा अर्थ दडलायं नं ह्यात. दोन व्यक्तींच्या नात्यात परस्परांना दिलेले सर्वोत्तम गिफ्ट म्हणजे परस्परांना दिलेला वेळ. मग ते नातं मुला-पालकांच असो, सासू सुनेचं असो,नवराबायकोचं असो वा प्रियकरप्रेयसीचं. भावंड,मैत्री ह्या नात्यांमध्ये तर खरी लज्जत वेळ देऊन संवाद, वादविवाद ह्यामध्ये असते.

जर परस्परांशी बोलायला वेगवेगळे विषय असतील, बोलतांना वेळेचं भान सुद्धा राहात नसेल,परस्परांशी शेअर केलेली लहानात लहान गोष्ट ही दोन्ही नात्यात खूप महत्त्वाची वाटत असेल,मनात आलेला विचार पटकन कोणाला सांगायचा तर परस्परांशी बेझिझक बोलावेसे वाटत असेल तर समजून जावं आपलं नातं मुरलेल्या मोरब्यांसारखे झालेयं.वर्षानुवर्षे. टिकणारं,तरीही अजिबात गोडी तसूभरही कमी न होऊ देणारं.परंतु जर कुठे तरी संवादच खुंटत असतील, बोलायला काही विषयच सुचत नसतील तर कुठेतरी, काहीतरी,कुणाचंतरी  हमखास चुकतयं हे समजावं.

व्यक्तींमधील दुरावा, बेबनावं ह्याचं खूप महत्त्वाचं एक कारणं म्हणजे  स्व मध्ये ठासून भरलेला “ईगो”. ह्या ईगोमुळेच “पहले आप, पहले आप “करीत सुखासामाधानाची स्टेशन्स भराभर निघून जातात. दुराव्याचं दुसरं कारण म्हणजे “कायम दुसऱ्या कडूनच अपेक्षा आणि कधीकधी तर त्या अवास्तव सुद्धा. आपण आपल्या व्यक्तीच्या बाबतीत खूप जास्त पझेसिव्ह असतो.एकच व्यक्ती ही विविध लोकांशी वेगवेगळ्या नात्यांनी बांधल्या गेलेली असते.प्रत्येक व्यक्ती ही संपूर्णतः भिन्न मतांची, विचारांची,आवडींची असते तेव्हा समोरील व्यक्ती ही आपल्याच मतांनी,आवडींनी कशी बरे चालेल ?

असो हे सगळे विचार मला निरनिराळ्या नात्यांनी जोडल्या गेलेल्या माझ्याच व्यक्तींनी शिकविले. ही माझी सगळी जोडली गेलेली नाती , काही प्रत्यक्ष तर काही फोनने  संवाद साधून त्यासाठी आपला स्वतः चा बहुमोल वेळ खर्चून ह्या नात्यांमधील प्रेम,जिव्हाळा, गोडी अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी पुढाकार घेतात हे पण खरेच. ह्या संपर्काने,बहुमोल वेळ देउन साधलेल्या सुसंवादाने विचारांच्या आदानप्रदानातून कित्येक अडचणींमधून परस्परांना योग्य दिशा,वाट मिळवून देतो आणि मग हे नात्यांचे बंध अधिकच दृढ आपोआप होतात.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घाई करताना… –– सौ.विदुला जोगळेकर ☆ संग्राहिका – सुश्री आनंदी केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ घाई करताना… – सौ.विदुला जोगळेकर ☆ संग्राहिका – सुश्री आनंदी केळकर  

फार घाई होते हल्ली… प्रत्येक क्षणावर कशाची तरी मोहर उमटलीच पाहिजे म्हणून घाई… क्षण फुकट वाया गेला म्हणून… लगेच गळे काढायची पण घाई…माझ्याजवळ काही आलंय की जे अजून मलाही नीट नाही उमगलंय…ते पटकन जगाला दाखवायची घाई….जगापर्यंत ते पोहचलंय की नाही हे आजमावायची घाई…पोहचलं असेल तर त्याचे निकष जाणून घ्यायची घाई….गर्भातल्या श्वासांना डोळे भरुन बघायची घाई….व्हेंटिलेटरवरच्या श्वासांना निरोप द्यायची घाई….मुखातून पडलेला शब्द अवकाशात विरायच्या आधी पकडायची घाई…विचारांना अविचाराने बाजूला सारायची घाई….

नजरेत दृश्य येताक्षणी कँमेऱ्यात बंद करायची घाई…विचाराचा कोंब फुटता क्षणी, कृतीत उतरायची घाई…

फळाफुलांना हंगामाआधी पिकवण्याची घाई….बोन्सायच्या टोपीखाली निसर्ग दडवायची घाई….

मे मधला गोडवा जानेवारीतच चाखायची घाई….बोबड्या बोलांना इंग्रजीत ठासून बसवायची घाई…!….  चिमखड्या आवाजांना लता/किशोर व्हायची घाई….. बालांना किशोर व्हायची घाई…किशोरांना यौवनाची चव चाखायची घाई तर….. काल उंबरा ओलांडून आलेल्या मुलीला सगळे अधिकार हातात घ्यायची घाई….तिन्हीसांजेच्या परवच्याला नृत्य/लावणीची घाई… दिवसभराच्या बुलेटिनला जगाच्या घडामोडी कानावर ओतायची घाई… प्रसंग टेकताक्षणी शुभेच्छा द्यायची घाई… श्वास थांबताक्षणी श्रद्धांजली वाहायची सुद्धा घाई…! …. मुक्कामाला पोहचायची घाई….कामावरुन निघायची घाई… सिग्नल संपायची घाई….पेट्रोल/डिझेलच्या रांगेतली अस्वस्थ घाई…सगळंच पटकन उरकायची घाई…आणि स्वातंत्र्यावर थिरकायची घाई… आठ दिवसांत वजन कमी करायची घाई… महिनाभरात वजन वाढवायची देखील घाई….! पाच मिनिटात गोरं व्हायची घाई… पंधरा मिनिटात केस लांब व्हायची घाई… एक मिनिटात वेदना शमवायची घाई… एनर्जी ड्रिंक पिऊन वडीलधाऱ्यांना दमवायची घाई……. 

साऱ्या या घाईघाईने जीव बिचारा दमून जाई… .. भवतालचा काळ/निसर्ग गालात हसत राही…. 

.. मिश्कीलपणे माणसाच्या बुद्धीला सलामी देई…!!!

घाईघाईने मारलेल्या उड्या

कमी कर रे माणसा थोड्या

बुद्धीपेक्षाही आहे काळ मोठा

कधीतरी जाण वेड्या…

लेखिका : सौ विदुला जोगळेकर

संग्राहिका : सुश्री आनंदी केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फुगलेलं आणि रुसलेलं दार… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ फुगलेलं आणि रुसलेलं दार… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

एक होती “ही” आणि एक होती “ती”.

दोघी समवयस्क आणि अनेक वर्ष शेजारी-शेजारी…. म्हणजे तशी “ही” राहायची पहिल्या मजल्यावर आणि “ती” दुसऱ्या. पण शेजारधर्म मात्र कायमच होता. कधी काही लागलं की हक्कानी सांगायच्या एकमेकांना. 

दोन्ही घरचा एक तरी डबा किंवा वाटी कायम दुसऱ्या घरी असायचीच. 

एके दिवशी “ही” च्या ह्यांना पावसामुळे किराणा आणायला जमलं नव्हतं. मग काय ?? “ही” गेली वाटी घेऊन साखर आणायला “ती” च्या कडे. “ती”नी सुद्धा “ही” चं हसत स्वागत केलं आणि दिली लगेच साखर…… 

“ही” चपला घालत थोडी आडोशाला काय गेली तशी “ती” जोरात पुटपुटली. “ रोजचाच ताप झालाय हा .. कटकट नुसती !!” … असं म्हणत वैतागून “धाडकन” दार लावलं जोरात.  “ही” ला ऐकू गेलंच .. बहुतेक ऐकू जाण्यासाठीच जोरात बोलली होती “ती”.

मग “ही” ची पण जरा सटकलीच. तणतणत वरती आपल्या घरी आली. “ एक वाटी साखर काय मागितली तर 

इतकं ?? जसं काही इस्टेट मागितली “ती” ची !!”…. असे ताशेरे झोडत “ही” नी दुप्पट जोरात आपलं दार लावलं. 

इतकंss  की खाली “ती” ला मुद्दाम ऐकू जावं. 

तेव्हापासून कानाला खडा…. “ही” आणि “ती” यांचं संभाषणच बंद. 

“ती”ला कळलंच नाही नेमकं काय झालंय. म्हणून एक-दोनदा गेली बोलायला. पण “ही” ढुंकुन सुद्धा बघायची नाही “ती”च्याकडे…… ‘ दोस्ती मे दरार… ‘

काहीच दिवसात बिल्डिंगला पालिकेकडून धोकादायकची पाटी लागली.  मग सगळेच वेगवेगळ्या दिशांना पांगले. 

दोघींचा काहीच संबंध आणि संपर्क उरला नाही. काळ लोटला .. वयं वाढली. 

जवळ एक आध्यात्मिक शिबिर होतं चार दिवसांचं. दोघींनीही तिथे नाव नोंदवलं होतं. योगायोगाने दोघींचीही राहायची व्यवस्था एकाच खोलीत. पण खूप गप्पा माराव्या असं वाटत असलं तरीही मनात दुरावा होताच अजून. 

पण “जुनं सगळं सोडून नव्याने संवाद साधा” अशी शिबिरातली शिकवण. म्हणून शेवटच्या दिवशी बोलल्या एकदाच्या…..  

“ही” ची तणतण मागील पानावरून पुढे.. 

“ काय गं ?? xxxxxxxx .. इस्टेट मागितली होती का ?”.. वगैरे वगैरे.

“ का गं ? असं का विचारतेस ??” 

“ मग रोजची कटकट म्हणत इतक्या जोरात तोंडावर दार आपटलंस ते माझ्या ? 

“ती” नी डोक्याला हात लावला.

“ बाप रे !! म्हणून बोलत नव्हतीस होय इतके वर्ष ??”  अगंss  ते मी तुला नाहीss  त्या दाराला म्हणत होते आमच्या !! आठवतंय ना,  पावसाळा होता तेव्हा ?? कसलं फुगलं होतं ते “दार”.. लावताना नाकी नऊ यायचे अगदी !! त्याला 

रोजचा ताप म्हणाले होते ss !! ”

“ अय्याss हो का?? .. हो बरोबर .. आमचं पण दार खूप फुगलं होतं तेव्हा. “ 

……. दोघींचा “रुसवा” कारण दाराचा “फुगवा” … एवढंच कारण फक्त… 

तेव्हा लक्षात ठेवा “ पावसाळ्यात दारं फुगतात ”. कुणी तुमच्या समोर असं धाडकन दार लावलं तर गैरसमज नसावा. 

बिल्डिंगमध्ये दारांचा असा जोरात आवाज येऊ शकतो…..  “ नवरा बायकोचं भांडण झालं असेल ” असे निष्कर्ष लगेच काढू नका. 

आणि हो ss  ……  

आपण सगळ्यांनीच “ मनाची दारं ” मात्र फुगण्यापासून वाचवूया…. किलकिली तरी ठेवूया निदान….. 

चांगले विचार आत यायला आणि वाईट बाहेर घालवायला. 

सरतेशेवटी सगळ्यात महत्वाचं… 

कधीही काही वाटलं तर आडपडदा न ठेवता लगेच बोलूया एकमेकांशी. बरेचदा कारण क्षुल्लक असतं पण आपण उगाच गंभीर समजतो. 

— बघितलं ना ss  “ही आणि ती”च्या चांगल्या मैत्रीची कितीतरी वर्ष वाया गेली. 

— आणि कारण काय तर “ घराचं फुगलेलं ” आणि “ मनाचं रुसलेलं ” ..  “दार”. 

संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ फुटबॉल विश्वचषक 2022… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

फुटबॉल विश्वचषक 2022… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

किलियन एम्बापे यास,

मानाचा मुजरा.तो अंतिम सामना विश्वचषक जेते पदासाठी तु आणि तुझ्या संघाकडून खेळला गेला त्याला तोड नाही.. प्रतिपक्षाच्या संघाकडून दोन गोल करून जे नैतिक दडपण आणले गेले , आणि हे ही तितकेच खरे आहे कि जो संघ असे गोल करतो तोच या सामन्याचा जेता दावेदार ठरतो हा इतिहास आहे, आणि हे ही तितकेच खरे आहे कि आजवरचे झालेले अंतीम सामने हे उभय पक्षात एकांगी झाले होते.. खरी लढत, त्या खेळातला तो शेवटच्या क्षणापर्यंतचा थरार फार क्वचितच अनुभवायला मिळाला होता. त्यावेळी बडे बडे दिग्गज नामांकित खेळाडूंचा कस लागणारी खेळीचं उत्कंठेचे समाधानही म्हणावं तसं लाभलं नाही.. अटीतटीच्या लढती झाल्या असतील पण आजच्या या लढतीचा अविस्मरणीय थरारची नोंद इतिहासात प्रथमच होईल.. दडपण आणि स्पर्धेतला खेळ यांचाच मिलाप कायम मैदानावर असतो त्यात अंतीम सामना आणि तोही विश्वचषकाचा असेल तर खेळाडू, तिथे जमलेले खेळाचे चाहते, जगभरातले चाहते इ्. इ. चें काळजाचे ठोके क्षणा क्षणाला वाढवत नेणारा तो माहोल असतो. असं सारं काही या अनुभवाची शिदोरी तुमच्या जवळ होती ती कालच्या खेळात अटीतटीच्या लढतीत दाखवून दिलीत.. कुठल्याही प्रकारची त्या खेळाची गोलाची आकडेवारीत, जी सर्वांना विदीत आहे, त्या तपशिलात न जाता, त्याचा थरार आणि थरारक खेळाचं कौतुक तुझं आणि तुझ्या संघाचं करावं तितकचं थोडं आहे.. जिंकणं हाच ध्यास तिथं दोन्ही बाजूला दिसत होता…मानवी प्रयत्नाला दैव देखिल साथ देते याची प्रचिती सुद्धा पदोपदी जाणवत होती.. नव्हे नव्हे ते दैव सुद्धा काही काळ स्वताला हरवून त्या खेळाचा थरार बघण्यात मश्गुल झाले असावे असेच वाटत होते.. इतका सुंदर तोडीसतोड खेळ, त्यातील पदलालित्य, गती, आवेग, शह, काटशाह, ऐनवेळेस बदल केलेली चाल, प्रतिचाल, गोलाचं लक्ष्य, ॲटक डिफेन्स, अश्या अगणित गोष्टींवर त्या वेगवान हालचालीत भानं ठेवून शांत डोक्यानं खेळायचं हे येरागबाळयाचं काम नाही..म्हणून तर अख्ख जगं या खेळानं खुळावले आहे..महासागराला देखिल मागे टाकले जाईल त्याहून कितीतरी प्रचंड चाहत्यांची संख्या हि जगभरात आहे आणि तिला ओहोटी हा शब्दच ठाऊक नाही.. इतकंच नाही तर राष्ट्रप्रमुख सुद्धा या खेळाचे चाहते, प्रेमी असावेत, आपल्या देशातील खेळाडूंचा खेळ पाहण्यास आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्यक्ष हजर असतात, हरलो तरी पाठीवर हात फिरवतात,उमेद देतात,हे पाहून देशभिभानाने उर भरून येतो.. मी देशाचा आहे आणि मी देशा करता खेळतो तेव्हा केवळ नि केवळ खेळावरच ध्यानकेंदीत झालेलं असतं.. अर्थात खेळ आहे तिथं हार जीत हि असायचीच, वेळेची मर्यादेची चौकट आणि जेता ठरवण्याचा निकषाचे पालन करुन विजेता हा ठरविला जातो..म्हणून काही जो जीता वही सिकंदर असा पूर्वापार प्रघात असला तरी हारणारा हा काही लेचापेचा नसतो.. हेच तुझ्या खेळातून तू दाखवून दिलेस.. भले त्या क्षणी तुझ्या मनात सामना हरल्याचं शल्य मनात टोचत असेल पण म्हणून तू दिलेली अखेर पर्यंतची लढत कमी मोलाची ठरत नाही.. सरतेशेवटी हा खेळ आहे.. एखादी खेळातील चुकचं सगळा खेळाचं पारडंचं बदलून टाकण्यास कारणीभूत होते. तो क्षण आपला नसतो..आपल्या हातात काहीही उरलेलं नसतं आणि शल्य मनात टोचत राहतं.. समजूती चे कोरडे सोपस्काराने मन शांत होत नाही, निवळत नाही.. अगदी खेळ संपल्यावर चाहत्यांकडून नि राष्ट्राध्यक्षांकडून सुद्धा मैदानावर येऊन पाठीवरून हात फिरवून सांगितले तरीही.. तुझा शांत आणि निराश चेहरा हेच दाखवत होता..

किलियन, मला या खेळातलं ओ कि ठो काही कळत नाही पण का कुणास ठाऊक तो गोल झालेला जेव्हा दिसतो तेव्हा मी पण आनंदाने टाळया वाजवतो.. फक्त विश्वचषकाचे सामने कधी कधी पाहतो.. आणि या खरा खेळयातील थराराचा अनुभव घेतो.. जे त्याच्या खेळाचं कौतुक होतचं होतं पण तितक्याच तोलामोलाच्या प्रतिस्पर्धीचं कौतुक मला करावसं वाटतं.. मला प्रत्यक्षात तुझ्या पाठीवर थाप दयायला आनंद वाटला असता पण ते अशक्य असल्याने या पत्राद्वारे ती थाप तुला पोहचवतं आहे…

.. सातत्यपूर्ण सराव, खेळा प्रती देशाभिमान, उंचावलेला आत्मविश्वास, नि सांघिक डेडीकशन या सर्व गुणात्मक गोष्टीनी परिपूर्ण असलेला खेळाडूच अशी देदीप्यमान कामगिरी करू शकतो हेच दोन्ही बाजूच्या संघानी जगाला दाखवून दिले आहे… एका रात्रीत चमकते सितारे जन्माला येणाऱ्या माझ्या देशाला तूम्ही आदर्श घालून दिला आहे.. आम्हाला पचनी कधी पडेल तो सुदिन कधी उगवतोय याची वाट पाहत आहे..कारण मी जिथं राहतो तिथं क्रिकेट आणि राजकारण हाच देशाचा प्रमुख सर्वव्यापी खेळ आहे.. आणि बाकी सारे त्यापुढे तुच्छ आहे.. हाच तुझ्यात आणि माझ्यातला मोठा फरक आहे.. असो.

यदाकदाचित मी फ्रान्सला आलो तर मी निश्चित तुझी भेट घेईन पण ते जरा अवघडच आहे.. पुढचा फुटबॉल विश्व चषकावर तुझंच नाव कोरलेलं बघायला मिळेल हि सदिच्छा करुन हे पत्र पूर्ण करतो..

तुझा एक चाहता

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “माझ्या आठवणीतले गदिमा” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “माझ्या आठवणीतले गदिमा” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एक अद्भुत, मनभावन आविष्कार म्हणजे रामायण. अगदी वाचन शिकायच्या सुद्धा आधी हे अद्भुत रामायण कळलं ते दोन व्यक्तींमुळे एक म्हणजे “गीत रामायणा” चे रचयिता ग.दि. माडगूळकर आणि दुसरे म्हणजे ही गीत सुस्वर आवाजात गाऊन आम्हाला झोपाळ्यावर झुलवणारे माझे बाबा. माझ्या बाबांचा आवाज खूप गोड आहे आणि अगदी मोजकीच आवडीची गीतं ते गातात त्यातीलच एक “गीत रामायणा”मधील गाणी. अर्थात बाबांना ऐकलं फक्त आणि फक्त घरच्यांनीच आणि खास करुन आम्ही, त्यांच्या मुलांनी. ते बाहेर कुठेही,कधीच गात नाहीत. पण खर सांगायचं तर लहानपणी रामायण, ऐकलं,समजलं आणि आवडलं ते फक्त आणि फक्त गदिमांमुळे आणि बाबांमुळेच. ग.दि.माडगूळकर ह्यांना  “गदिमा” ह्या संक्षिप्त नावाच्या रुपात लोक ओळखायचे.

Best Bhojpuri Video Song - Residence w

स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’

माडगूळकर म्हणजे एका चांगल्या अर्थाने सर्वगुणसंपन्न व्यक्ती. ते कवी,गीतकार, लेखक असून त्यांनी विविध अंगी  साहित्यिक क्षेत्रात अनमोल योगदान दिलयं.आज त्यांचा स्मृतीदिन.त्यांना विनम्र अभिवादन.

गदिमा भावकवीही होते. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. त्यांनी लिहिलेली बालगीते आणि भक्तीगीते आजही फार लोकप्रिय आहेत. शिर्डीच्या साई बाबांची काकड आरती ही माडगूळकरांनी लिहिलेली आहे, या आरतीला सी. रामचंद्र यांनी अतिशय उत्तम चाल लावली आहे. या काकडआरती साठी गदिमांनी ‘रामगुलाम’ हे टोपणनाव घेतलं होतं.पेशवाईवर त्यांनी गंगाकाठी नावाने काव्य कथा लिहिली आहे. गदिमांनी अथर्वशिर्षाच मराठीत भाषांतर केले.

ग दि माडगूळकर यांनी ‘भूमिकन्या सीता”  या नाटकातील पदेसुद्धा लिहिली होती. ‘मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी’, ‘मानसी राजहंस पोहतो’,’सुखद या सौख्याहुनी वनवास ‘ ही त्यातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध गाणी.

कित्येक आपल्याला खूप आवडत असलेली गाणी आपण कायमं ऐकतो आणि गुणगुणतो पण बरेचदा आपल्याला मिहीती सुद्धा नसतं ह्या गीतांचे रचयिते कोण ?

गदिमांची आपण कायम आवडीने ऐकतं आलो ती बालगीतं पुढीलप्रमाणे,” नाचरे मोरा आंब्याच्या वनात,नाच रे मोरा नाच”, “झुक झुक झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया,”बाळा जो जो रे,बाळा जो जो रे,”गोरी गोरीपान, फुलासारखी छान, दादा, मला एक वहिनी आण”,”चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का?”, तसेच त्यांची लोकप्रिय भक्तिगीते पुढीलप्रमाणे,

“कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम, भाबड्या या भक्तासाठी, देव करी काम ! “,”दैवजात दुःखे भरता.. दोष ना कुणाचा पराधीन आहे.. जगती पुत्र मानवाचा “, “इंद्रायणी काठी देवाची आळंदी “,”वेदांनाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा “,”विठ्ठला तू वेडा कुंभार “,. याबरोबरच त्यांची देशभक्तीपर गीतं ही मनाचा ठाव घेतात ती पुढीलप्रमाणे,”हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे”,

“माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू जिंकू किंवा मरू ,”वेदमंत्राहून आम्हां वंद्य वंदे मातरम्”

त्यांचे चित्रपटक्षेत्रात ही तेवढेच महत्त्वाचे योगदान आहे, त्यांची ह्या क्षेत्रातील काही लोकप्रिय गीतं पुढीलप्रमाणे,”बुगडी माझी सांडली ग… जाता साताऱ्याला,”सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला”,”एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे”,”उद्धवा, अजब तुझे सरकार”,”या चिमण्यांनो परत फिरा रे”,फड सांभाळ तुऱ्याला ग आला तुझ्या उसाला लागंल कोल्हा”,”अपराध माझा असा काय झाला का रे दुरावा ,का रे अबोला” आणि अशी कित्येक लोकप्रिय गीतं गदिमांनी त्यांच्या कारकिर्दीत १५७ पटकथा आणि २००० गाणी लिहिली. त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटांसाठी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. लिखाणासोबत त्यांनी काही चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला.

गदिमा स्वातंत्राच्या चळवळीत देखील अग्रभागी होते. याच काळात त्यांची यशवंतराव चव्हाण यांच्याशी चांगली ओळख झाली. त्या वेळी त्यांनी जे काही काव्य रचलं ते “शाहीर बो-या भगवान”ह्या टोपणनावाने. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना १९६२ मध्ये गदिमांची राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर आमदार म्हणून करण्यात आली होती.

भारत सरकारने १९६९ मध्ये गदिमांना पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.१९५७ मध्ये गदिमांना संगीत नाटक अकादमीचा उत्कृष्ट नाट्य लेखक पुरस्कार मिळाला. तसेच १९५७ मध्ये संगीत नाटक अकादमी चा उत्कृष्ट नाट्य लेखक पुरस्कार ,१९६९ मध्ये ग्वाल्हेर येथीलअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.१९७१ मध्ये विष्णुदास भावे सुवर्णपदकाचे मानकरी हे झालेत.१९७३ मध्ये यवतमाळला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ह्यांनी भुषविले.त्यांच्या बऱ्याच गाण्यांना व चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले आहेत.

खरोखरच ह्यांच्या सारख्या अनेक साहित्यिक  कलावंतानी आपल्यासाठी आनंद फुलविणारी किती अनमोल संपत्ती ठेवलेली आहे हे बघून नतमस्तक व्हायला होतं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अभ्यासक्रमातील बदल आणि माझं ‘बाल’ पण ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ अभ्यासक्रमातील बदल आणि माझं ‘बाल’ पण ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆ 

नातवाचा अभ्यास घेताना मला हे बदल फार जाणवले, विशेषतः ‘अक्षरबदल’ !  शेंडीवाला ‘श’ शेंडी कापून थेट मुंडक्याने रेषेला चिकटवला. लयदार ‘ल’च्या हाती काठी देऊन टाकली. नातू म्हणाला, ‘ शाळेत असंच शिकवलंय.’ आता नवीन प्रचलित पद्धती आपल्याला माहीत नसतात, त्यामुळे मी गप्प बसले. पण अशा वेळी मी त्याला आवर्जून आपल्या वेळी शाळेत काय शिकवलं, हे सांगत रहाते. पण मजा अशी आहे की, हे बदल कोण, केव्हा, कशासाठी करतं, हेच मुळी कळत नाही. जाग येते तीही कित्येक पिढ्या यात भरडल्या गेल्या की.   

— माझ्या आठवणीत माझ्या शैक्षणिक कालात (१९५६ – १९६६) घनघोर बदल झाले. माझे अर्धेअधिक शिक्षण जुन्या पद्धतीने झालेले — म्हणजे —

इंग्लिश भाषेचा समावेश, जो आठवीपासून अभ्यासक्रमात असे, तो पाचवीपासून सुरू झाला. तोवर आम्ही सहावीत सरकलो होतो, मग आम्ही त्या एका वर्षात पाचवी, सहावी अशा दोन पुस्तकात दबलो.

शुद्धलेखन – तेव्हा आठवतंय, शुद्धलेखन घालताना शिक्षिका किती जाणीवपूर्वक उच्चार करायच्या, त्यामुळे कळायचं तरी. (कां, कांहीं, आंत, नाहीं, जेंव्हा, तेंव्हा, कीर्ति, मूर्ति इ.) ह्या अनुस्वारांचा उद्देश त्यावेळी बालबुद्धीला उमगला नाही आणि कळवण्यास अत्यंत खेद होतो की अजूनही कळला नाहीये.                                                                   

नवीन पद्धतीत किती तरी अनुस्वार गायब झाले, (ते बाकी बरीक झाले.) -हस्व – दीर्घ बदलले.                                                          

पण आता संगणकावर काही जोडाक्षरे टंकित केली की चमत्कार होतो – उदा. अद् भुत – आता  ‘भ’ द’च्या पायाला लोंबकळतो – अद्भुत / उद् घाटन – यातही तसेच – ‘द’च्या पायाशी ‘घ’ – उद्घाटन.

विचार करा – ‘अब्द’, जो उच्चारतांना ‘ब’चा उच्चार ‘द’च्या आधी आणि अर्धा होतो – अ+ब्+द या पद्धतीने बघायला गेल्यास अ+द्+भु+त अशी उकल करता येते. पण या नवीन टंकपद्धतीने मात्र हा अद्भुत – अ+भ्+दु+त असा वाचला जाईल. तेच ‘उद्घाटना’चे – उ+घ्+दा+ट+न. वा+ङ्+म+य – या नवीन पद्धतीत वाङ्मय – ‘म’चा उच्चार पूर्ण करायचा की ‘ङ्’चा? अशी आपल्या जोडाक्षरांची तोडफोड अपेक्षित आहे का?  

‘र’ हे अक्षर अर्धं होऊन विविध प्रकारे जोडाक्षरांत येते. उदा. – अर्धा, रात्र, व्रण, तऱ्हा, कृपा इ. यातील आडवा होऊन जोडला जाणारा ‘रफार’ टंकलिपीत गायब झाला – आता असा ‘र’ जोडायचा तर गो+र्+हा असं टंकित केलं की तो ‘गो-हा’ न दिसता ‘गोर्हा’ असा दिसतो. मग चेहेरा होतो गोर्हामोर्हा!

दशमान पद्धती आणि नाणी – दशमान पद्धत सोपी होती, पण आपण या ‘बदला’च्या (transit period) तडाख्यात (की चरकात?) सापडलो होतो – डझन, औंस, पौंड, इंच, फूट, मैल यांची सांगड कि.मी., सें.मी., किलोग्रॅम वगैरेशी झगडून जमवली. (अजूनही इंच, फूट, डझन सोप्पं वाटतं.) माझी उंची मला फूट-इंचात सांगता येते. पण सें. मी. म्हटलं की झालीच गडबड. फळं डझनाच्या भावात असत, ती वजनावर मिळू लागली. चोवीस रूपयात डझनभर मिळणारे चिक्कू चोवीस रूपये किलो घेताना सहाच मिळू लागले.  (एवढेच बसतात वजनात?) नाण्यांनी तर घोळसलंच. पैसे, आणे, रूपये हे आबदार वाटायचे, नाण्यांना वजनही चांगलं असे. कमी किंमतीचा पैसा तांब्याचा, आणि तरी चांगला ढब्बू असायचा, किंवा भोकाचा ! भोकाची नाणी गोफात बांधून ठेवता यायची. (भोकाचे पैसे वापरून लोकरीच्या बाळमोज्याचे छोटे गुंडे करता यायचे.) नाणी – आणा, चवली, पावली, अधेली (अशी गोंडस नावे असली तरी) वजनदार असत. रूपया तर ठणठणीत – त्याला ‘बंदा’ म्हणावा असाच ! सुरुवातीला रूपया चांदीचा होता – त्यातून ब्रिटिश राजवटीतील रूपये तर कलदार चांदीचे – राजा छाप, राणी छाप असे होते. हे चलनातून बाद केल्यावर ते दागिन्यांच्या पेटीत गेले. मग दिवाळीत ओवाळणीपुरते बाहेर येत, परत कडीकुलपात !

नवी नाणी चिल्लर दिसत – एक पैसा – गोल, तांब्याचा – आकार नखावर मावेल एवढा ! पुढे तर तो ॲल्युमिनिअमचा चौकोनी झाला. एक आणा म्हणजे सहा नवे पैसे. दोन आणे म्हणजे बारा नवे पैसे. तीन आण्यांचा भाव एका नव्या पैशाने वधारला – म्हणजे एकोणीस नवे पैसे झाला. का? तर दशमानात एक रूपया = शंभर नवे पैसे, तर त्याचे चार भाग पंचवीस नवे पैसे म्हणजे जुने चार आणे – आता पंचवीसला चाराचा भाग समान कसा बसणार? तीन आण्याच्या पदरात एक नवा पैसा टाकून केली जुळवाजुळव ! त्यातून दोन, तीन, पाच, दहा, वीस पैसे नक्षीदार, पण (जनभाषेत) ती आलमिनची  नाणी, वजनाला हलकी – पुढे पुढे ती लमाण्यांच्या पोशाखावर जडवलेली दिसू लागली.

पावलीचं, अधेलीचं रूपांतर पंचवीस पैसे आणि पन्नास पैशात झालं आणि त्यांचे चेहरे पडेल दिसू लागले.

त्यातल्या त्यात रूपया जरा बरा म्हणायचा, तर अलिकडे तोही पन्नास पैशाच्या आकारात गेला आणि त्याचा रुबाबच  संपला. पाच आणि दहा रूपयाची नाणी अजून तरी अंग धरून आहेत.  

पण काय आहे, शिक्षणातील या  बदलांनी बालमनात घातलेले उटपटांग गोंधळ, ‘ बाल ‘ पांढरे झाले तरी अजून ठिय्या मारून आहेत, त्याचं काय करावं बरं????…. 

© सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares