१९४२ – महात्मा गांधींनी इंग्रजांना ‘ छोडो भारत ‘ चा इशारा दिला होता. वणव्यासारखा हा इशारा सा-या हिंदुस्थानभर पसरला. गणपत शिंदे तेव्हा एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता. तालुक्याच्या गावी एका राष्ट्रीय नेत्याची सभा ऐकून, त्याच क्षणी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन, त्याने स्वतःला
स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले. घरदार सोडून रात्रंदिवस तो हेच काम करत राहिला. स्वातंत्र्य मिळाले तो दिवस तर त्याच्या दृष्टीने परमोच्च होता. तालुक्याच्या अनेक सरकारी कार्यालयांवरून इंग्रजी ध्वज उतरवून तिरंगा फडकावण्यात त्याला कोण आनंद झाला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचे सुराज्य करण्याच्या पंडित नेहरूंच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्याने खेडोपाड्यात जाऊन निरक्षर प्रौढांना विनामोबदला शिकवण्याचे काम हाती घेतले. त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्याच्याबरोबरीने स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेले बरेच लोक सत्तेत सहभागी झाले होते. गणपतने स्वातंत्र्यसैनिक म्हणून ताम्रपट आणि पेन्शनही स्वीकारली नाही. ” मी स्वातंत्र्य चळवळीत असं काही मिळवायला भाग घेतला नव्हता ” ही त्याची भूमिका होती. आयुष्याच्या अखेरीस तो खूप थकला होता. नोकरी त्याने पूर्वीच सोडली होती. स्वातंत्र्य चळवळीत आणि नंतरही त्याने घराकडे लक्ष दिले नव्हते. गावाकडची शेती त्याच्या धाकट्या भावाने स्वतःच्या नावावर करून घेतली होती. त्याच्या फकीरी वृत्तीला कंटाळून त्याची बायकोही माहेरी निघून गेली होती. “तत्व“ म्हणून असं निरलस जीवन जगलेला गणपत व्यवहारात मात्र नापास झाला होता.
☆ फक्त एक ‘इव्हेंट’…..अनामिक ☆ प्रस्तुति – सुश्री उषा आपटे ☆
अष्टमीचा अर्धचंद्र विलक्षण सौंदर्यानं लकाकत होता … समुद्राच्या लाटा त्याला भेटायला अधीर झालेल्या … आणि तशात पांढऱ्या शुभ्र वाळूवर प्रकाशाचा एक मोठा झोत पडला … तेज:पुंज पुष्पक विमान वाळूवर अलगद उतरलं … आणि दरवाजा उघडला. तसा इवलासा कान्हा धावत बाहेर आला … पाठोपाठ पेंद्या आणि बाकीचे बालगोपाल उतरले …
कान्हा वळला आणि उत्साहात म्हणाला … “ सखे हो … आज किमान दहा हंड्या फोडायच्या बरं .. दही .. दूध .. लोणी .. सगळी चंगळ करून टाकायची …” पेंद्या पुढे आला आणि कान्हाच्या डोईवरचं उत्साहानं थरथरणारं मोरपीस सरळ करत म्हणाला .. “आधी वाटणी ठरवायची कान्हा …” कान्हाला काही कळेना … तो म्हणाला ..
“ माझ्या हातचा दहीभाताचा घास मोत्यांच्या घासापेक्षा मौल्यवान मानणारी तुम्ही मंडळी .. अचानक ..”
पेंद्या म्हणाला …” काळ बदलला .. कान्हा … आता हंड्या दह्याच्या नाही .. रुपयांच्या लागतात. लाखांत बोली लागते .. मग आम्ही दहीभाताच्या घासावर समाधान कसं मानायचं ? “ कान्हा समजुतीच्या स्वरात म्हणाला .. “ मग काय हवं तुम्हाला .. ?” पेंद्यानं एकवार बाकीच्या बालगोपालांकडे पाहिलं … नि म्हणाला …” बक्षिसात सारखा वाटा … सेलिब्रिटी बरोबर फोटो .. स्टेजवर एन्ट्री … मिडियासमोर बाईटची संधी … आणि अपघाती विमा …” कान्हाला आता हसू आवरेना. तो थेट पुष्पक विमानाच्या दिशेनं चालायला लागला … पेंद्या गोंधळला … म्हणाला … “ इतकं टोकाचं का वागतोयस … ? काहीतरी सुवर्णमध्य काढू हवं तर … काही मागण्या कमी जास्त करून .. “
कान्हा वळला … हसला. पेंद्याजवळ आला .. खांद्यावर हात ठेवून ममत्वानं म्हणाला .. “ प्रयोजनच संपलंय रे सगळं … ! पेंद्या .. मला घरात दूध दही मिळत नव्हतं म्हणून हंड्या फोडायचो का रे मी .. ? एकत्र या … मनोरा बांधा आणि ध्येय साध्य करा … इतका साधा सरळ विचार … पण ते चार हात एकमेकांच्या खांद्यावर ठेवण्यामागे माणसं जोडण्याची प्रेरणा होती … मुठभर दहीभात घासाघासाने खाण्यात अर्धी भाकरी प्रेमानं वाटून घेण्याची दीक्षा होती .. तेव्हा कान्हा हाच सेलिब्रिटी होता … त्याचा सहवास ही मोक्षाची संधी होती आणि कान्हाची बासरी ऐकायला मिळणं ही बक्षिसाची सर्वोच्च कल्पना होती … अपघात होईल अशी साधी कल्पनाही कधी मनाला शिवायची नाही .. कारण साक्षात शिव सोबत असताना जीवाची भिती कसली … ? पण आता तुझ्या बोलण्यातून जाणवलं .. आता तो विश्वास संपलाय … एकत्र येण्याची उमेद संपलीय … थर वाढले … पण श्रद्धा संपलीय … माझा जन्म हा आता सोहळा न रहाता फक्त एक “ इव्हेंट “ बनलाय … आता इथे न आलेलंच उत्तम .. “ आणि त्यानं विमानात पहिलं पाऊल ठेवलं सुद्धा … पेंद्याला एव्हाना चूक कळली होती … तो घाईनं म्हणाला .. “ पण कान्हा …”
कान्हा शांत स्वरात म्हणाला .. “ अष्टमी येत राहील … पण त्यात कान्हा नसेल … आणि काळजी करू नकोस … कॉर्पोरेट विश्वात रमलेली माझी भक्त मंडळी कान्हाशिवाय हा सण असाच साजरा करत रहातील ..” असं म्हणून तो आत गेला सुद्धा … क्षणात आतून बासरीचे करुण स्वर ऐकू येऊ लागले आणि पेंद्यासह बालगोपाल मंडळी जड पावलांनी विमानाच्या दिशेने चालायला लागली..
लेखक : अनामिक
संग्राहिका : उषा आपटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सॉरी, सॉरी, मंडळी, माफ करा मला ! आपण म्हणाल यात माफी मागण्या सारखं तुम्ही काय केलंय, म्हणून माफी मागताय ? सांगतो, सांगतो मंडळी. त्याचं काय आहे, मला खरं तर “जादू तेरी नजर” या, मतकरींच्या एका नाटकाच्या नावाने आजच्या लेखाची सुरवात करायची होती. पण वरच्या गाण्याच्या ओळींची “जादू” आज इतक्यावर्षांनी देखील, माझ्यासकट तमाम रसिकांवर त्या गाण्यातील शब्दांचे असं काही गारुड करून बसली आहे, की त्याची पुढची ओळ माझ्या हातून आपोआपच लिहिली गेली हे मी मान्य करतो आणि त्यासाठी मी तुमची माफी मागितली मंडळी ! चला, म्हणजे एका अर्थाने लेखाच्या सुरवातीलाच, एखाद्या गाण्याची अनेक तपानंतर सुद्धा आपल्यावर कशी “जादू” शिल्लक असते, हा एक मुद्दा निकालात निघाला ! अर्थात ते गाणं त्यातील शब्दांमुळे, संगीतामुळे, का ते ज्या कलाकारांवर चित्रित झालं आहे त्यांच्यामुळे, कां अजून कोणत्या गोष्टींमुळे रसिकांच्या मनावर आज तागायत जादू करून आहे हा वादाचा विषय होऊ शकतो, यात वादच नाही मंडळी. असं जरी असलं, तरी त्या गाण्याच्या जादूची मोहिनी आजच्या घडीपर्यंत टिकून आहे, हे आपण या लेखाद्वारे मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारची शब्दांची जादू न करता सुद्धा मान्य कराल ! असो !
मंडळी, आपली माफी मागितल्या मागितल्या, मला एका गोष्टीची मनांत मात्र नक्की खात्री वाटत्ये आणि ती म्हणजे, आपण सुद्धा वरील गाण्याची पाहिली ओळ वाचताच, लगेच दुसरी ओळ मनांत नक्कीच गुणगुणली असेल, हॊ का नाही ? खरं सांगा ! बघा, मी जादूगार नसलो तरी “माझ्या” वाचकांच्या मनांत नक्की काय चाललं असेल ते ओळखण्या इतका मनकवडा जादूगार नक्कीच झालोय, असं लगेच माझं मीच म्हणून घेतो. दुसरं असं, की माझ्या मनावर अजून जरी जुन्या अनेकानेक अजरामर हिंदी गाण्यांची कितीही जादू असली आणि हिंदी आपली राष्ट्रभाषा असली तरी, राष्ट्रभाषेत लेख लिहिण्याइतकी काही त्या भाषेची माझ्यावर जादू झालेली नाही, हे मी मान्य करतो ! त्यामुळे आता या वयात अंगात नसलेली एखादी कला, कोणा जादूगाराच्या जादूने अंगी बाणेल, मग मी आपल्या राष्ट्र भाषेत एखादा लेख लिहीन यावर माझा 101% विश्वास नाही ! पण हां, स्टेजवरचे जादूचे प्रयोग पहात असतांना, हे सगळं खोटं आहे हे मनांला ठामपणे माहित असतांना देखील, माझे डोळे (चष्मा लावून सुद्धा) मात्र त्यावर विश्वास ठेवतात हे मात्र तितकंच खरं. म्हणजे असं बघा, रिकाम्या नळकांड्यातून फुलांचा गुच्छ काढणे, तर कधी पांढरे धोप कबुतर ! तर कधी टेबलावर झोपलेल्या माणसाच्या शरीरारचे तीन तुकडे करणे, ते परत जोडणे, असे नाना खेळ करून तो जादूगार लोकांचे मनोरंजन करत असतो. मला असं वाटतं की “जादू” या शब्दातच एक प्रकारची अशी “जादू” आहे जी सानथोरांना तो खेळ बघताना, अक्षरशः देहभान विसरायला लावून खिळवून ठेवते. एवढच नाही, तर ज्या व्यक्तीला जादूगाराने एखाद्या खेळात आपल्या इंद्रजालाने वश केले आहे, त्या व्यक्तीला तर ती इतकी कह्यात ठेवते, की त्या जादूगाराने “आज्ञा” करताच, ती व्यक्ती सफरचंद समजून, कच्चा बटाटा पण साऱ्या प्रेक्षकांसमोर मिटक्या मारीत आनंदाने खाते, हे आपण सुद्धा कधीतरी बघितलं असेल !
या दुनियेत जादूचा उगम कधी झाला, जगात पाहिली जादू कोणी, कोणाला आणि कोठे दाखवली असे साधे सोपे प्रश्न घेवून, त्या प्रश्नांची मी उत्तर देईन अशी अपेक्षा हा लेख वाचतांना कोणा वाचकाने कृपया ठेवू नये. कारण त्याची उत्तर द्यायला सध्याच्या विज्ञानयुगातला जागतिक कीर्तीचा “गुगल” नामक विश्व विख्यात जादूगार आपल्या खिशातच तर आहे मंडळी ! पण हां, माझ्या आयुष्यात मी पाहिलेल्या पाहिल्या दोन जादू कोणत्या या प्रश्नाचं उत्तर मात्र मी तुम्हांला नक्कीच सांगू शकतो. किंबहुना मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेल्या दोन जादू, आपल्या पैकी माझ्या पिढीतील लोकांनी पाहिलेल्या त्यांच्या आयुष्यातल्या सुद्धा त्यांनी पाहिलेल्या पहिल्या दोन जादू असू शकतात, (आधीच वाक्य वाचून तुम्हांला थोडं गोंधळायला झालं असेल, तर बहुतेक तो माझ्या लिखाणावर झालेला आजच्या विषयाचा परिणाम असू शकतो) यावर माझा ठाम विश्वास आहे !
मंडळी, त्यातील पाहिली जादू म्हणजे, आपल्या दादाने किंवा ताईने मुठीत राहणारी लहान वस्तू उजव्या हाताने दूर फेकल्याचा अभिनय करून, ती वस्तू आपण सांगताच आपल्याला लगेच दाखवणे आणि दुसरी जादू म्हणजे डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने कापणे ! काय, बरोबर नां मंडळी ?
लहानपणी डेव्हिड कॉपरफिल्ड नामक एका विदेशी जादूगाराचे एका पेक्षा एक विलक्षण जादूच्या प्रयोगाचे विडिओ बघून डोळे आणि डोकं अक्षरशः गरगरायला लागायचं ! त्याच पाण्यावर चालणं काय, हवेत उडणं काय किंवा नायगाऱ्याच्या प्रचंड धबधब्यात पिंपात बसून उडी मारून परत काठावर प्रकट होणं काय ! बापरे, ते त्याचे सारे जादूचे खेळ आज नुसते आठवले तरी अंगावर काटा येतो मंडळी !
आपल्या देशातसुद्धा तसे अनेक छोटे मोठे जादूगार होऊन गेले, पण डेव्हिडशी तुलना करायची झाल्यास, पी सी सरकार, सिनियर आणि पी सी सरकार, ज्युनियर ही कलकत्याच्या पिता पुत्रांची नांव या संदर्भात प्रकर्षाने लगेच आठवतात.
माझे जन्मापासूनचे आजतागायतचे आयुष्य शहरात गेल्यामुळे, “काळी जादू” किंवा “चेटुक” या विषयात एखाद्या “गाववाल्याचे” जेवढे “ज्ञान” (का अज्ञान ?) आहे, त्याच्या ते 0.001% सुद्धा नाही. त्यामुळे या विषयावर मी काही बोलणे अथवा लिहिणे, हा या विषयात स्वतःला तज्ञ समजणाऱ्या एखाद्या “गाववाल्याचा” अपमान होऊ शकतो. म्हणून उगाच त्या तथाकथीत जादूच्या उप शाखेला कोणत्याही तऱ्हेनं स्पर्श नं केलेलाच बरा. शिवाय माझा हा लेख अशा एखाद्या तज्ञ गाववाल्याने “चुकून” वाचलाच, तर त्याला आलेल्या रागापोटी तो माझ्यावर एखादं “लिंबू” फिरवायचा ! उगाच नको ती रिस्क आता या वयात कशाला घ्या ?
मंडळी, शेवटी एकच सांगतो, माझा सुद्धा जादूवर विश्वास आहे. पण ती जादू करणारा सर्वशक्तिमान जादूगार हा वर बसलेला आहे, असं माझं मत आहे ! आपल्या आयुष्यात वेळोवेळी निरनिराळे खेळ करून “तो” आपल्याला दाखवत असतो ! त्यातील त्याच्या कुठल्या खेळाला आपण टाळी वाजवायची, कुठला खेळ दाखवल्या बद्दल त्याचे मनापासून आभार मानायचे किंवा कुठल्या खेळातून काय बोध घेवून पुढे जायचं, हे ज्याचं त्यानं ठरवायचे !
तर अशा त्या सर्व शक्तिमान जादूगाराने आपल्याला दाखवलेल्या नानाविध खेळांचे वेळोवेळी अन्वयार्थ लावायची शक्ती, तो जादूगारच आपल्या सगळ्यांना देवो हीच सदिच्छा!
☆ चकवा… लेखक अज्ञात☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆
माझे वडील नोकरीच्या सुरुवातीच्या काळात उमरेडला राहत असत. त्याकाळी एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या. त्यामुळे ऑफिसची कॅश कुठे देण्यासाठी ते स्वतःच जात असत. रात्रीची वेळ. त्यांना ज्या भागात जायचे होते तिकडे जाण्यासाठी त्यांना थोडा जंगलाचा भाग पार करायचा होता. वाटेत काय झाले हे त्यांना आठवत नाही,पण ते त्यांच्या रोजच्या वाटेवर जवळपास ३-४ तास फिरत होते. तिथल्या तिथेच गोल गोल चकरा मारत होते. थोड्या वेळाने एक बैलगाडीवाला जवळून गेला आणि त्याने ‘हटकले’ तेव्हा त्यांना जाणवलं, की काहीतरी विपरित घडतंय. त्या बैलगाडीवाल्याच्या आधाराने ते रस्ता नीट पार करू शकले. तो ‘चकवा’ आम्हाला आजही आठवतो आणि असं वाटतं की आम्हीच तो अनुभव घेतला म्हणून.
आता हा चकवा काय प्रकार आहे हे सांगण्यापलीकडचे. कोणाचा त्यावर विश्वास बसेल, कोणाचा नाही. मी तरी माझ्या आयुष्यात ह्याचा अनुभव घेतला नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलण्याचा मला अधिकार नाही. पण आज घरासाठी महिन्याचे वाणसामान खरेदी करायला गेले होते आणि एका चकव्यात मी पण अडकले…
खरेदीचा चकवा :आकर्षक पद्धतीने मांडलेल्या गोष्टी, त्यामुळे मन नकळत आकर्षित होतं. माझी ट्रॉली कधी भरली आणि कधी ओसंडून वाहू लागली हे कळलंच नाही.आधी वाणसामान आणि मग कपडे दिसले. मग काय महिन्याच्या खरेदीत ते पण सहज ट्रॉलीत जाऊन बसले. सरकार ओरडतेय प्लास्टिक नका वापरू म्हणून… पण तरीही त्यांची आकर्षक मांडणी भुरळ पाडून गेली. मग तेही थोडी जागा करून माझ्या ट्रॉलीत सहज विसावले. काच विभागाच्या वाटेत ट्रॉलीला एक धक्का लागला, थोडं सामान बाहेर आलं आणि मी भानावर आले. माझा बैलगाडीवाला मला सापडला. बिलिंग काउंटरवर जाण्याआधी शांतपणे बसले आणि अक्षरशः दहा मिनिटांत मला नको असलेले सामान बाहेर काढले आणि मी चकव्यातून बाहेर आले.
मोबाईल हा दुसरा चकवा : एकच मेसेज वाचून बाजूला ठेवला जाणारा फोन आपसूक तीन-तीन, चार-चार तास हाताला चिटकून बसतो. फेसबुक आणि व्हाट्सअपचा चकवा तर सगळ्यात वाईट. ह्यात त्याहून वाईट म्हणजे आपले बैलगाडीवाले आपल्या आसपास असतात, जसे की आपली आई, वडील, बायको, नवरा, भावंडं, मित्र… ते हटकतात आपल्याला… पण तरीही आपण ह्याठिकाणी त्या बैलगाडीवाल्याचाच राग-राग करतो आणि परत चकव्यात स्वखुशीने अडकतो.
झोप हा तिसरा चकवा :पाच मिनिटं म्हणून झोपतो, ते तासभर कधी उलटतो हे कळतच नाही. इथेही बैलगाडी आहे हो, ‘गजर’ ! पण आपण त्याला सहज दुर्लक्षित करतो आणि देतो ताणून. दुपारची झोप पण अशीच वैरी. चुकून जरी अंथरुणाला टेकलात, की गेलाच चकव्यात म्हणून समजा.
टीव्ही… चा चकवा : इथे तर काय मेजवानीच असते. १५०-२०० च्या वर चॅनेल्सचा चकवा. इथे नाही का आवडत, तर बदल चॅनेल. इथे मन नाही का रमत, मग दाब बटण आणि मार उडी दुसऱ्या चॅनेलवर. एकेक सिनेमा कमीत कमी ४-५ दा तर अगदी सहज पाहतो आपण… आणि मग काय गेले ३-४ तास ! …. चकवाय स्वाहा!
Sale: हा तर सगळ्यात फसवा चकवा. अश्या अश्या गोष्टी आपण विकत घेतो, ज्याची काडीचीही गरज नसते. ५०० रुपयांच्या बचतीसाठी आपण सहज ४-५ हजार खर्चून बसतो आणि अश्या गोष्टी घेऊन येतो ज्याशिवाय आपलं पुढच्या ४-५ वर्षे तरी किमान अडलं नसतं. घे कपडे, घे चपला, घे पर्सेस, भरा ब्यागा आणि उडव पैसे.
क्रेडिट कार्ड : हा तर आत्ताच्या जगातला ‘चकव्याचा’ सगळ्यांत वाह्यात प्रकार. केवळ आणि केवळ आपल्या खिश्यातून आत्ता पैसे खर्च होणार नाहीत ह्या पायी आपण इतकं सहज हे वापरतो आणि पुढच्या महिन्याच्या पहिल्या तारखेला त्याचे बिल भरतो. म्हणजे पगार आल्याच्या दुसऱ्याच दिवशी एक तारखेची वाट बघतो. महिना घालवतो आणि परत आत्ता कॅश नाही म्हणून क्रेडिट कार्ड वापरतो.
हॉटेलिंगचा चकवा : हा चकवा नसून मला तर चक्रव्यूह वाटतो हल्ली. घरी करायचा कंटाळा आला म्हणून बाहेर खायचं, की घरचं खायचा कंटाळा आला की बाहेरचं खायचं ? स्टार्टर्स आवडतात म्हणून बाहेर खायचं, का भाज्यांची व्हरायटी म्हणून बाहेर खायचं ? उगाच च्याऊ-माऊ म्हणून बाहेर खायचं, का कॉफी प्यायला बाहेर जायचं ? …. आणि असं बरंच काही. हल्ली दुसऱ्याला जेवायला बोलावलं की पण बाहेर जातो आपण… म्हणजे तो त्याचा जाऊ शकत नाही का काय ? पण चढाओढ …. ज्याला त्याला दुसऱ्याला दाखवण्यासाठी काहीतरी हवं आहे.
हा चकवा तर आपल्या संस्कृतीला, मानव जातीला घातक ठरतो आहे. किती ती जीवघेणी स्पर्धा? अगदी शब्दशः अर्थ आहे, जीवच घेते आहे ही स्पर्धा… कधी पालकांचा, कधी मुलांचा, कधी आईवडिलांचा, कधी भावा-बहिणींचा आणि ही न संपणारी यादी.
विचार केल्यावर जाणवतंय, माझे बाबा त्या चकव्यातून अगदी ३-४ तासांतच बाहेर आले, पण आपलं काय ?
ह्या सगळ्या चकव्यांतून आपण कधी बाहेर येणार?
फक्त एकच फरक आहे, इथे बाहेरचा बैलगाडीवाला चालतच नाही…
इथे चकव्यात अडकणारे पण आपण, आणि हटकणारे पण आपणच. किती जखमा होऊ द्यायच्या आणि मग बाहेर पडायचे, किंवा किती गोष्टी गमवायच्या, हे आपल्यालाच ठरवावे लागेल.
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ Sonam Wangchuk & his solar tent… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
‘थ्री इंडियट्स’ या सिनेमात दाखवलेले, आणि प्रत्यक्षातही तशाच प्रकारचे काम करण्यात सतत मग्न असलेले – खरेखुरे व्यक्तिमत्व – म्हणजे श्री.सोनम वांगचूक !!
गोठवणाऱ्या प्रचंड थंडीतही सतत कार्यदक्ष असणाऱ्या आपल्या सैनिकांना ऊब मिळावी या हेतूने, वरील फोटोमध्ये दिसणारे हे सोलर टेन्ट श्री. वांगचूक यांनी बनवले आहेत..
— थंडी -14° असली तरी या टेन्टमधील तापमान +15° पर्यंत असणार आहे.
— आणि या टेन्टचे वजन फक्त 30 किलो असून, एकावेळी एकूण १० जवान यामध्ये आराम करू शकणार आहेत…
सलाम या कलाकृतीला आणि तिची निर्मिती करणाऱ्या श्री. सोनम् वांगचूक यांना !!!! .
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘ओला’ पेक्षा कोरडंच जळणारे… अंबर कर्वे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर☆
पुण्यातली सार्वजनिक वाहतूक बेकार आहे, म्हणून एवढी वर्षे पुण्यातले रिक्षावाले मुजोरी करतायत. कालच एक पोस्ट वाचली – फेसबुक आणि whatsapp वर. ह्या लोकांचे नखरे आहेत म्हणून उबेर, ओलाचा व्यवसाय सुरु झालाय. अगदी तंतोतंत खरंय. मी तर म्हणतो रिक्षा, टॅक्सीवाल्यांची ही मुजोरी जशी वाढत जाईल त्या प्रमाणात उबेर, ओला ह्यांचा व्यवसाय वाढत जाणारे.
उबेर, ओला कॅबच्या बुकिंगमधला कन्व्हिनियन्स, त्यांची सर्व्हिस, त्यांचा USP आहे. जेवढ्या पैश्यात कुठल्याही अवस्थेच्या गाडीतून हे रिक्षावाले नखरे करून उपकार केल्यासारखे पॅसेंजरना घेऊन जातात, तेवढ्याच पैशात हे ओला’वाले त्यांना एसी लावून गाडीतून पाहिजे तिथे नेतात. जेवढे त्यांच्या मीटरवर दिसतात त्याच पैशांचा आपल्याला मेसेज येतो. तेवढे पैसे कॅश, कार्डनी दिले की विषय संपला. फक्त ‘पीक अवर्सना’ हे लोक जास्त चार्ज करतात. ज्या लोकांना त्या वेळाची किंमत असते, ते जास्त पैसे देऊन जातात.
ओला काय किंवा उबेर काय, ह्यातले ड्रायव्हरही रिक्षावाल्यायेवढीच हातावर पोट असलेलीच लोकं आहेत. त्यातल्या बहुतेकांनी त्यांच्या स्वतःच्या गाड्या भाडेकरारावर ह्या कंपन्यांना दिलेल्या आहेत. त्यांच्या गाड्या फोडून ह्या कंपन्यांना काही एक फरक पडत नाही. रिक्षावाले त्या बिचा-या गाडीवाल्याच्याच गाडीचं नुकसान करतायत आणि एका गरीबाचाच रोजगार बुडवतायत. ह्याच्यामुळे लोकांच्या वेळेला भाडे न नाकारणाऱ्या, पैश्यांच्या सापडलेल्या थैल्या प्रामाणिकपणे परत करणाऱ्या सामान्य, प्रामाणिक रिक्षावाल्यांबद्दल ज्यांना आपुलकी वाटते, अश्या माझ्यासारख्या असंख्य लोकांची सहानुभूती हे समस्त रिक्षावाले गमावून बसतायत. आयुष्यभर विरोधाला म्हणून विरोध करणाऱ्या नेत्यांच्या नादी लागून दुर्दैवानी एक दिवस ह्या रिक्षावाल्यांचंच भवितव्य अंधारात येणारे, हे ह्यांना कोणीतरी समजावून सांगायची गरज आहे. ओल्याबरोबर सुकंही जळतं म्हणतात. इथे ‘ओला’ न जळता फक्त कोरडंच जळणारे, हे लक्षात घ्या.
स्वतःची मुजोरी टिकवायला म्हणून दुस-याचा धंदा बंद पाडायचे दिवस गेले आता. तसा विचारच करायचा झाला तर रिक्षा आल्यावर टांगेवाल्यांनी किती दिवस संप केला होता? किती रिक्षा फोडल्या होत्या? एक्प्रेस वे झाला, लोकं गाड्यांनी जास्ती जायला लागले, म्हणून रेल्वेवाल्यांनी संप केला होता का?
रिक्षावाल्यांनो, काळाची पावले ओळखा, कुठलेही भाडे न नाकारता, दिवसाच्या कुठल्याही भाड्याला दीडपट वगैरे चार्ज न घेता, इमानदारीत रिक्षा चालवून दिवसाला ९००-१००० रुपये कमावणारा रिक्षावालाही माहित्ये मला. अशी सर्व्हिस दिलीत तर लोक आपणहून कोप-यावरच्या स्टँडवरची रिक्षा पकडून जाणे पसंत करतील. तुम्हाला एकही दगड उचलायची वेळ येणार नाही.
साधारण ९६-९७ साली रिक्षावाल्यांनी बेमुदत संप पुकारल्यावर (बहुतेक ग्राहक पंचायतीनी) पुण्यात ‘लिफ्ट पंचायत’ हा उपक्रम सुरु केला होता. एकटे जाणाऱ्या प्रत्येकांनी हात दाखवेल त्याला आपल्या गाडीत लिफ्ट द्यावी, अशी साधी आणि मोफत कल्पना होती. पुण्यातल्या लोकांनी मुजोरी रोखायला ती चकटफू आयडिया डोक्यावर उचलून धरली. ती एवढी यशस्वी झाली की, माझ्या आठवणीत पुढची २-३ वर्षं तरी कुठल्याही मागणीसाठी पुण्यात रिक्षावाल्यांचा संप झाला नाही.
— आज गरज आहे, अश्याच किंवा अगदी ह्याच उपक्रमाची. मी माझ्यापासून आजच सुरुवात करतोय. हात दाखवेल त्याला, शक्य असेल तिथपर्यंत, गाडीत लिफ्ट देण्याची. बघू, ही मुजोरी टिकते, का सामान्य नागरिकाची ताकद भारी पडते ते?
बंद_संप_ह्यावरच_बंदी_आणा
लेखक : अंबर कर्वे
संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
वाचनक्षेत्र हे एक अथांग सागरासारखे अफलातून क्षेत्र आहे. ह्या वाचनातून आपल्याला कितीतरी विविध क्षेत्रातील माहिती मिळते,कधी ज्ञानात भर पडते,तर कधी भावनेला वाट मिळते, कधी खळखळून हसावसं वाटत तर कधी छान गंभीर विचारांच्या डोहात डुंबायला मिळतं. कधी कधी वाचल्यावर जाणवतं की हे खरंच छान लिहीलयं किंवा अरेच्चा आपल्याच मनातील शब्द तंतोतंत कागदावर उतरलेयं जणू.
हे वाचन करतांना काही गोष्टी आधी माहीत असलेल्या परंतु वेगळ्या शब्दांत मांडलेल्या असतात तर काहींच्या बाबतीत आपण संपूर्ण अनभिज्ञ होतो हे जाणवतं. असेच काही शब्द वाचनात येतात, हे शब्द फक्त आपण ऐकले असतात परंतु ह्याची माहिती म्हणाल तर शुन्य. मग कुतूहल जागं होतं आणि माहिती शोध मोहीम सुरू होते.काल असाच “सार्क संघटना” हा शब्द वाचनात आला.
कुठल्याही संघटना तयार होतांना त्या काहीतरी भरीव कामगिरी, चांगले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बनवितात. अशीच एक संघटना म्हणजे सार्क संघटना ,जिच्या निर्मितीची तारीख होती 8 डिसेंबर 1985.
दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना (South Asian Association for Regional Cooperation असं त्या संपूर्ण संघटनेचे नाव. त्या नावाचं संक्षिप्त रुप म्हणजे सार्क (SAARC); ही दक्षिण आशिया खंडातील 8 देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना आहे. अमेरिका व चीन खालोखाल सार्क सदस्य राष्ट्रांची एकत्रित अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असून जगातील लोकसंख्येच्या 21 टक्के लोक सार्क क्षेत्रामध्ये राहतात. भारत हा सार्कमधील सर्वात बलाढ्य देश आहे हे उल्लेखनीय. 6 जानेवारी 2006 रोजी सार्क सदस्य राष्ट्रांनी प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराची निर्मिती केली.
सार्क संघटनेची कल्पना 1950 मध्ये मूळ धरू लागली. 1970 च्या सुमारास भारत, बांगलादेश,भूतान, मालदिव, पाकिस्तान,नेपाळ श्रीलंका आणि अफगाणिस्तान या देशांना एकत्रितपणे व्यापार व सहकार करण्याच्या दृष्टीने एका संस्थेची आवश्यकता भासल्याने ह्याची संकल्पना अस्तित्वात येण्याच्या दृष्टीने जोर धरु लागली. दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती करण्याच्या उद्देशाने तसेच सांस्कृतिक विकास व विकसनशील देशाबरोबर सहकार्य करण्यासाठी सार्क संघटना एकत्रित ऊभी राहिली.
लोकसंख्या, संसाधने, लष्करी सामथ्र्य, आर्थिक आणि तंत्रज्ञानात्मक विकास, भौगोलिक स्थान या सर्व बाबींचा ऊहापोह आणि उपाययोजना ह्याबद्दल ही संघटना कार्य करते. सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रांत परस्परांच्या सहकार्याची अपेक्षा ह्यामध्ये व्यक्त करण्यात आली. तसेच महिलांचे प्रश्न व त्यांच्या शिष्यवृत्त्या, अभ्यासवृत्त्या, आर्थिक सहकार्य, महिला आणि मुले यांच्या भवितव्याचा तसेच दहशतवाद व स्त्रियांचे लैंगिक शोषण यांच्याबद्दल ठोस तजवीज ह्यामध्ये केल्या जाते.
खरंच अशा अनेक संघटना विविध कार्य करीत असतात पण आपल्याला त्याबद्दल फारच कमी माहिती असते हे ही खरे.
☆ A N G A A R… आणि एक नवीन देश निर्माण झाला… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
३ डिसेंबर १९७१ रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्धाला तोंड फुटले…
त्यावेळी पूर्व आणि पश्चिम (आजचा बांग्लादेश) पाकिस्तानच्या समुद्री वाटा संपूर्ण तोडण्याची (complete naval blockade) महत्वाची जबाबदारी भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आली.
पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख सडेतोड उत्तर देण्यासाठी नौदलाच्या इतिहासातील घातक आणि धाडसी हल्ला करण्यास भारतीय नौदल सज्ज झाले.
यासाठी गरज होती योग्य वेळ साधून अचानक हल्ला करण्याची, कारण हल्ला होणार होता तो थेट पाकिस्तानच्या कराची बंदरावर ! कराची बंदर हे पाकच्या नौदलाचे व संपूर्ण व्यापाराचे प्रमुख बंदर. येथूनच पाकिस्तानला अमेरिका व ब्रिटन या देशांकडून युद्धासाठी मदत मिळत असे व पूर्व पाकिस्तानला पाठवली जात असे. असे हे कराची बंदरच नष्ट करून पाकचा कणाच मोडण्याचं ठरलं.
ह्या मोहिमेला नाव देण्यात आले “Operation Trident“.
यासाठी भारतीय नौदलाने निवड केली ती आकाराने छोट्या, तेज व चपळ अशा क्षेपणास्त्रवाहू Osa-class missile boat जहाजांची –
१) INS Nipat, २) INS Veer, ३) INS Nirghat, ४) INS Vinash, ५) INS Nashak, ६) INS Vidyut, ७) INS Vijeta, ८) INS Nirbhik
ह्या जहाजांची मर्यादा बघता ही जहाजे कराची बंदराच्या दक्षिण दिशेला दुसऱ्या जहाजांनी ओढून (TOE) नेण्याचे ठरले. तिथून पुढे हल्ला करून ती सर्व जहाजे तीन दिशांना जाणार होती. नुकतेच रशियाहून प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या, उत्तम अस्खलित रशियन भाषा बोलणाऱ्या अधिकारी वर्गाची निवड करण्यात आली. मोहिमेदरम्यान आपल्या सर्व जहाजांना रेडिओ वापरण्यास मनाई होती. गरज भासल्यास संभाषण हे रशियन भाषेतूनच करावे, जेणेकरून पाकला ह्या मोहिमेचा पत्ता लागणार नाही आणि रशियन नौदल समजून तो कोणतीही हालचाल करणार नाही, ह्या साठीचा हा डाव होता.
पहिला हल्ला :– ४ डिसेंबर १९७१ च्या रात्री ही सर्व जहाजं सौराष्ट्रच्या किनाऱ्याजवळून कराचीच्या दिशेने निघाली. कराचीजवळ येताच रडार पिंग करू लागले. त्यांना काही पाकिस्तानी जहाजं तिथे गस्त घालताना आढळली.
सुमारे १०.४५ ला INS Nirghat ला हल्ला करण्याचे आदेश मिळाले. तात्काळ पहिलं क्षेपणास्त्र सुटलं आणि जाऊन पाकिस्तानी जहाजावर धडकलं. ते जहाज होतं Battle-class Destroyer PNS Khaibar.– PNS Khaibar ने बुडता बुडता पाकिस्तानी नौदलाला रेडिओ संदेश पाठवला, “enemy aircraft attack-number one boiler hit – ship sunk…” (PNS Khaibar ला त्यांच्यावर हल्ला कुठून कसा झाला हेही समजलं नव्हतं.)
सुमारे ११.२० वाजता कराचीपासून अवघ्या ३२ मैलांवर असलेल्या INS Veer ला अजून एक जहाज दिसलं, ते होतं PNS Muhafiz (Adjutant-class mine-sweeper) — INS Veerने क्षणाचाही विलंब न करता २ क्षेपणास्त्रे PNS Muhafiz च्या दिशेने सोडली. पुढची ७० मिनिटं Muhafiz जळत होतं.
दरम्यान INS Nipat च्या अवघ्या २६ मैलावर एक जहाज टप्प्यात आलं, ते होतं venus challenger – पाकिस्तानसाठी दारुगोळा आणि हत्यारं आणतानाच नेमकं सापडलं. INS Nipat ने त्या जहाजाला तळ दाखवला.
त्याच पाठोपाठ पाकिस्तानी PNS ShahJahan (British C class destroyer) यावर हल्ला केला.
PNS ShahJahan बुडालं नाही, पण अगदीच निकामी झालं आणि INS Nipat तडक कराचीच्या दिशेने वेगात निघालं आणि अवघ्या १४ मैलांवरून कराची बंदराच्या मुख्य मार्गाच्या दिशेने क्षेपणास्त्र सोडलं. —
(जगातील युद्धाच्या इतिहासात कोणत्याही नौदलाने जहाजावरून जहाजावर मारा करण्यासाठी असलेल्या क्षेपणास्त्राचा उपयोग जमिनीवरील लक्ष्य भेदण्यासाठी आजपर्यंत केलेला नाही. भारतीय नौदलाने ते यशस्वीरित्या करून दाखवलं.) सुमारे ११.५९ वा.कराची बंदरातील भल्या मोठ्या तेलाच्या टाक्यांना त्यांनी लक्ष्य बनवलं. एक टाकी फुटताच इतर टाक्या फुटू लागल्या. संपूर्ण कराची हादरलं. मध्यरात्री भरदिवसासारखा उजेड पसरला. कराची बंदर धडधडून पेटत होतं.)
— आणि भारतीय नौदल मुख्यालयाला पहिला रेडिओ संदेश पाठवण्यात आला —-A N G A A R..
हा कोड होता दिलेली कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा !
दुसऱ्या दिवशी ५ डिसेंबर रोजी भारतीय वायुसेनेने उरलंसुरलं कराची ठोकून काढलं.
८ डिसेंबरच्या रात्री पुन्हा एकदा भारतीय नौदलाच्या फक्त तीन जहाजांनी Operation Pythonच्या अंतर्गत कराचीवर हल्ला चढवला. ह्या सततच्या हल्ल्यांमुळे अर्धं पाकिस्तानी नौदल रसातळाला गेलं आणि बरंचसं निकामी झालं. उरलेलं पूर्णपणे हादरून गेलं होतं.
अश्या ह्या भारतीय नौदलाच्या कामगिरीसाठी आणि ह्या विजयासाठी ‘ ४ डिसेंबर हा भारतीय नौसेना दिवस ‘ म्हणून साजरा होतो आणि ज्या जहाजांच्या ताफ्याने हा हल्ला केला, त्यांना तेव्हापासून नौदलात killer squadron संबोधलं जाऊ लागलं.
पुढे १६ डिसेंबर १९७१ ला पाकिस्तानने संपूर्ण शरणागती पत्करली आणि —-
आणि एक नवीन ‘बांग्ला देश’ निर्माण झाला…
भारतीय नौदलाच्या या अतुलनीय कामगिरीला विनम्र अभिवादन…! जय हिंद !!!
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आज २० डिसेंबर —- आज संत श्री गाडगे महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ …….
☆ वंदन दीपस्तंभाला … ☆
बाबांचा संवाद होता ,
संवेदना गोठलेल्या कुष्ठरोग्यांशी ;
भारतवर्षातल्या प्रकांडज्ञानी,
संविधाननिर्मात्या बाबांशी |
पोटतिडीक होती,
वंचितांच्या शिक्षणाची;
विषमतेच्या चिखलात रुतलेल्या –
माणसाच्या उत्थानाची |
घेतला ध्यास ग्रामस्वच्छतेचा
आणि माणसांच्या मनांच्या
आंतरबाह्य स्वच्छतेचा;
बाबा दीपस्तंभ अवघ्या मानवतेचा !!!
— संत श्री. गाडगे महाराजांना माझी ही शब्दरूपी श्रद्धांजली. त्यांचे कार्य आठवून त्यांच्याबद्दलची आणखी काही महत्वपूर्ण माहिती वाचकांना द्यावी असे अगदी आतून वाटले. म्हणून हा एक छोटासा लेख प्रपंच —
गाडगेबाबा हे भारतीय समाजाला पडलेलं सोनेरी स्वप्न आहे.समाजातील उपेक्षित, वंचित, आदिवासी, स्त्रिया, खेडूत आणि वेगवेगळया स्वरूपाच्या संवेदना गोठून गेलेल्यांच्या प्रबोधनाबरोबरच, त्यांच्यातील आत्मविश्वास जागवून त्यांना स्वयंनिर्भर बनवण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. १८७३ ते १९५६ हा त्यांचा जीवनकाळ होता. लहानपणी वडिलांचे छत्र हरवल्यावर त्यांनी जो समाज पाहिला, त्या निरीक्षणातून नकळत मिळालेल्या प्रेरणेतून त्यांनी पुढे, सामाजिक विषमता आणि अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध संघर्ष, हे सारे बदलण्यासाठी स्वतःशी साधलेला आत्मसंवाद, कीर्तनाच्या स्वरूपात जनसंवाद आणि इतर कितीतरी कार्यातून, कोणत्याही चॅनेलच्या मदतीशिवाय समाजात नैतिक मूल्यांची केलेली प्रतिष्ठापना—- अशी जी खूप मोठी,अवघड आणि महत्वपूर्ण कामे केली, त्यात त्यांचे संवाद कौशल्य त्यांना फार उपयोगी पडले होते. त्यांचे हे कौशल्य म्हणजे एक “अभिनव संवाद सिद्धांत” समजला जातो.
गाडगेबाबांनी पुढील माध्यमांतून आपली अभिनव संवाद कौशल्ये लोकांना दाखवून दिली—
कीर्तन – अतिशय साधे,काळजाला भिडणारे आणि लोकांच्या हिताची भाषा सांगणारे शब्द त्यांनी कीर्तनातून पेरले.
पत्रव्यवहार – शाळेचा उंबरठाही न चढलेले गाडगेबाबा आपले विचार इतरांना सांगून त्यांच्याकडून पत्रे लिहून घेत. सामाजिक विषमता, पैसा आणि इतर साधनांची उधळपट्टी थांबवा, माणसाला देवपण देऊ नका, असे संदेश ते आपल्या पत्रांतून देत.
समाजकार्याचे संस्थाकरण आणि समाज कार्य करणाऱ्या व्यक्ती यांना सहकार्य – सामाजिक, शैक्षणिक तसेच समाजहिताची कामे करणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्थांना त्यांनी सर्व प्रकारचे सहकार्य करून त्यांना स्वयंपूर्ण केले.
गाडगेबाबांचा संदेश आणि त्यांचे मिशनरी कार्य – गाडगेबाबांच्या शब्दांतील रोकडा धर्म त्यांच्या मानवतावादी सामाजिक कार्याचे दर्शन घडवतो. बाबांचे अतुलनीय कार्य पाहून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘त्यांचे हे कार्य मिशनरी वृत्तीचे आहे’ असा निर्वाळा दिला होता.
नियतकालिकातून केलेले कार्य – ‘जनता जनार्दन’ या नियतकालिकातून गाडगेबाबांच्या सामाजिक कार्याचे दर्शन ठायी ठायी दिसते.
अशा संवादाचे अनेक पुस्तकी सिद्धांत आहेत. गाडगेबाबांनी विकसित केलेला ‘ नैतिक मूल्यांचा प्रसार ‘ हा त्यापेक्षा श्रेष्ठ वाटतो.
संदर्भ —
१) श्री.संत गाडगे महाराज- इरगोंडा पाटील.
२) श्री.संत गाडगे बाबा – प्रबोधनकार के.सी.ठाकरे.
३) श्री.गाडगे महाराज- गोपाल नीलकंठ दांडेकर.
४) लोकशिक्षक गाडगेबाबा – डाॅ.रामचंद्र देखणे.
५) श्री.देवकी नंदन गोपाला- गो.नी.दांडेकर.
६) श्री.गाडगे महाराज गौरव ग्रंथ- संपादक- प्राचार्य रा.तु .भगत.
७) गाडगेमहाराजांची पत्रे – इरगोंडा पाटील.
श्री. गाडगे महाराजांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी श्रद्धापूर्वक विनम्र अभिवादन.🙏🏻
चं म त ग ! 🎁 रिटर्न गिफ्ट ! 🎁☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
“गुडमॉर्निंग पंत !”
“हां, सुप्रभात.”
“हे काय, आज तुमचा मूड नेहमी सारखा दिसत नाही.”
“हो, आहे खरा आज थोडा त्रासलेला.”
“मला कारण सांगितलं पंत, तर तुम्हाला पण थोडं हलक हलक वाटेल आणि त्यावर काहीतरी… “
“तुला कधी, सरकारी किंवा कुठल्या ऑफिस मध्ये ‘लाल फितीचा’ त्रास झालाय ?”
“लाल फित म्हणजे…. “
“अरे, म्हणजे कुठचेही सरकारी काम, तू त्या ऑफिसला गेला आहेस आणि लगेच…. “
“काहीतरीच काय पंत, साध्या रेशन कार्डावरचा पत्ता…. “
“बदलायला पण दहा दहा खेपा माराव्या लागतात, बरोबर ना ?”
“आता कसं बोललात पंत !”
“अरे त्यालाच तर… “
“कळलं, कळलं, पण तुम्हाला कुठे आला हा लाल फितीचा अनुभव?”
“अरे त्याच काय झालं, मोनो रेल सध्या तोट्यात चालली आहे, म्हणून आता कमी गर्दीच्या वेळात त्याचा एखादा रेक…. “
“बारस, वाढदिवस, लग्न, कोणाची साठी, पंच्यातरी, असे समारंभ साजरा करायला भाड्याने देणार आहेत, ही बातमी कालच वाचली, पण त्याच काय ? तुम्हाला पण एखादा रेक भाड्याने…. “
“हवा होता म्हणून गेलो होतो चौकशी करायला तर… “
“पंत तुम्हाला कशाला…… “
“अरे माझ्यासाठी नाही, नातवाच बारस करणार होतो, मोनोच्या रेक मध्ये. कुणी विमानातून उड्या मारून हवेत हार घालून लग्न करतात, कुणी क्रूझवर मुंज ! म्हटलं आपण पण जरा वेगळ्या पद्धतीने नातवाचे बारसे करूया, म्हणून चौकशी करायला गेलो तर… “
“तर काय, उपलब्ध नाही म्हणाले का रेक ?”
“हो ना, म्हटलं कालच तर तुम्ही रेक भाड्याने देणार असं जाहीर केलेत आणि आज लगेच बुकिंग फुल्ल कसं काय ?”
“मग काय म्हणाला तिथला माणूस ?”
“तो म्हणाला, चारीच्या चारी रेक राजकीय पक्षांनी बुक केले आहेत म्हणून.”
“ते कशा साठी ?”
“अरे ज्या दिवशी मला बारशाला रेक पाहिजे होता त्याच दिवशी त्या सर्व पक्षांची कसली तरी मिटिंग आहे.”
“पंत, पण त्यांना चारही रेक कशाला पाहिजेत, एकात पण मिटिंग….. “
“होऊ शकते, पण सध्या तीन पक्षाच सरकार आहे ना म्हणून…. “
“मग तीन रेक पुरे की, चौथा तुम्ही बुक …. “
“करू शकत नाही, कारण ज्या अपक्षांनी बाहेरून सरकारला पाठिंबा दिला आहे त्यांची वेगळी मिटिंग चौथ्या…. “
“कळलं, म्हणजे तुम्हाला आता एखादा छोटा हॉल घेण्या शिवाय….. “
“पर्याय नाही खरा.”
“तुम्ही काळजी करू नका पंत, आपल्या अहमद सेलर चाळींचे सभागृह द्यायची जबाबदारी माझी !”
“मला ठाऊकच होत, तू मला या बाबतीत मदत…. “
“झालंच तुमचं काम समजा पंत, तुम्ही निश्चिन्त असा. पण मला एक वेगळाच प्रश्न पडलाय… “
“आता कसला प्रश्न?”
“ती तुम्ही आपल्या चाळीच्या गच्ची मधे कसली पोती….. “
“ती होय, अरे ती ‘बीटाची’ पोती आहेत, म्हणजे असं बघ…. “
“पंत आपण ज्या ‘बीटाची’ कोशिंबीर वगैरे करतो किंवा सॅलेड मध्ये….. “
“वापरतो तीच ही, अगदी बरोबर ओळखलस.”
“हो पण एव्हढी पोती भरून बिटाचं तुम्ही…… “
“सांगतो, सांगतो. अरे मोनो रेल मध्ये बारसे केले असते तर जवळच्याच लोकांना बोलवावे लागले असते, मग बाकीचे चाळकरी नाराज होणार…. “
“म्हणून त्यांना शांत करायला तुम्ही काय बिट…… “
“काहीतरी बोलू नकोस, अरे तेव्हढी….. “
“पंत, पण तुम्ही एव्हढी पोती भर भरून ‘बिट’ आणल्येत ना, की ती सगळी आपल्या आठ चाळींना…..
“पुरावित याच हिशोबानेच आणली आहेत बरं !”
“काय सांगता काय पंत, तुम्ही खरच आठी चाळींना….. “
“अरे नीट ऐकून तर घे, तू मगाशी मोनो भाड्याने देणार, ही बातमी वाचलीस म्हणालास ना, मग तशीच दुसरी एक बातमी तुझ्या नजरेतून सुटलेली दिसत्ये.”
“ती कुठची ?”
“अरे RBI चे ‘बिटकॉइन’ बद्दलचे अपील दिल्ली हायकोर्टाने फेटाळले, ती बातमी.”
“असं, म्हणजे आता ‘बिटकॉइन’ या आभासी चलनाला भारतात पण मान्यता….. “
“मिळाली आहे आणि बारशाच्या रिटर्न गिफ्ट मध्ये मला खरे ‘बिटकॉइन’ देण या जन्मीच काय पण पुढचे सात जन्म पण शक्य नाही, म्हणून मी बारशाचे रिटर्न गिफ्ट म्हणून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला त्या सगळ्या बीटांची कॉइन पाडून ती वाटायचा माझा विचार पक्का झाला आहे.”
“खरच धन्य, धन्य आहे तुमची पंत !”
“आहे ना धन्य, मग तुझ्यासाठी बारशाच्या दिवशी एक एक्सट्रा कॉइन आठवणीने घेऊन जा, मला बारशाला हॉल मिळवून देणार आहेस ना, त्या बद्दल !”