मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ||•• क्रिकेटचे असेही भक्त ••|| … श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

||•• क्रिकेटचे असेही भक्त ••|| श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆

क्रिकेटचे असे भक्त अनेक आहेत. दहा, बारा वर्षांपूर्वी मी एक समारंभ आयोजित केला  होता, तो समारंभ होता सुनील गावस्कर आणि विश्वनाथ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्ताने. त्यांचा सत्कार अमिताभ बच्चन ह्यांनी केला होता .. त्यावेळी अमिताभ बच्चन आल्यानंतर काही क्रिकेटपटू आणि अमिताभ बच्चन ह्यांना मी एका हॉलमध्ये नेऊन बसवलं होतं. तिथे चंदू बोर्डे आणि चंदू पाटणकर हे दोन क्रिकेटपटू सुद्धा होते. बोर्डे आणि पाटणकरांनी पाहिलं की समोर अमिताभ बच्चन आहे. त्यांची इच्छा झाली की अमिताभ बच्चनला जाऊन भेटावं. म्हणून हे दोघंजण गेले आणि चंदू बोर्डेनी अमिताभ बच्चनला हात पुढे करून सांगितलं, ‘ नमस्ते ..!! मी चंदू बोर्डे ..!! ‘ 

अमिताभ बच्चन दिलखुलास हसले, आणि चंदू बोर्डेना म्हणाले की, ‘ तुम्ही तुमचं नाव कशाला सांगता ..?? मी तुम्हाला तुमचीच एक आठवण सांगतो. तुम्हाला आठवतं का की, तुम्ही १९५८ साली दिल्लीला वेस्टीइंडिज विरुद्ध  शतक ठोकलं होतं ..?? ‘ 

बोर्डे म्हणाले की, ‘ हो. मला चांगलंच आठवतंय ..!!’ 

अमिताभ पुढे म्हणाला .. ‘ तुम्हाला हे ही आठवतंय का, की त्यावेळेला काही मंडळींनी तुम्हाला खांद्यावरून उचलून पॅव्हेलियनमध्ये नेलं होतं ..?? ‘ 

बोर्डे म्हणाले .. ‘ हो. आठवतं ..! !’ 

आणि मग अमिताभ बच्चनने त्यांना सांगितलं की, ‘ त्यातला एक खांदा माझा होता ..!! ‘ 

अमिताभने हे म्हटल्यावर चंदू पाटणकर, मी, बोर्डे, खरं तर आम्ही तिथे जे होतो, ते सर्वच शहारलो ..!! 

नंतर आणखीन एक गोष्ट आम्हाला कळली की, चंदू बोर्डेना उचलणारा तिथे आणखी एक तरुण होता, जो गोरा गोमटा होता. जो अमिताभ बच्चनचा मित्र होता. त्याचं नाव होतं राजीव गांधी ..!! 

गंमत पहा या दोन मित्रांपैकी एक ‘ वन मॅन फिल्म इंडस्ट्री ‘ झाला, आणि दुसरा देशाचा पंतप्रधान ..!! 

चंदू बोर्डे ह्यांनी १९६४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध दसऱ्याला भारताला एका छोट्या पण अफलातून खेळीने जिंकून दिलं. अत्यंत मोक्याच्या वेळेला त्यांनी अप्रतिम अशी आक्रमक फलंदाजी केली. त्यावेळेला स्टेडियममधली अनेक मंडळी स्तिमित झाली. त्यांना हर्षवायू झाला. आणि त्या आनंदाच्या भरात चंदू बोर्डेना खांद्यावरून पॅव्हेलियनमध्ये कोणी नेलं असेल ..?? 

त्या माणसाचं नाव होतं राज कपूर ..!! 

लेखक : – श्री द्वारकानाथ संझगिरी

संग्राहक : श्री सुनीत मुळे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ दावा परमार्थ… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – श्री श्रीकांत पुंडलिक ☆

डॉ निशिकांत श्रोत्री

? काव्यानंद ?

☆ दावा परमार्थ… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – श्री श्रीकांत पुंडलिक ☆

☆ दावा परमार्थ… डॉ निशिकांत श्रोत्री ☆

तुमच्या पायी आलो मजला दावा परमार्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ   ||ध्रु||

 

जीवन सारे व्यतीत केले मानव सेवेत

नव्हती कसली जाण काय आहे अध्यात्म

परउपकार न मजला ठावे अथवा ना स्वार्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ    ||१||

 

दारी आले त्यांच्या ठायी तुम्हांस देखियले

नाही आले त्यांच्यातुनिया तुम्हांस जाणीले

तुम्हाविना ना काहीच भासे जीवनात अर्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ    ||२||

 

जाणीव आता पैलतिराची शिरी असो हात

नाही कसली आंस असो द्या तुमचीच साथ

कृपा असावी उजळावे हो जीवन न हो व्यर्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ    ॥३॥

©️ डॉ. निशिकांत श्रोत्री, ९८९०११७७५४

☆ दावा परमार्थ – डाॅ. निशिकान्त श्रोत्री यांच्या कवितेचा रसास्वाद – श्री श्रीकांत पुंडलिक ☆

कविवर्य डॉ निशिकांत यांची ही एक भावपूर्ण कविता आहे. ही कविता म्हणजे कविवर्यानी आपल्या आयुष्याकडे वळून बघताना केलेले आत्मपरीक्षण आहे.जणू काही आयुष्याचा लेखाजोखाच मांडला आहे.

माणसाचं जीवनच प्रश्नमय आहे. जन्मल्याबरोबर माणसाला प्रश्न पडतो, “कोsहं?” या प्रश्नापासून सुरू झालेलं आयुष्य ‘”सोहं” या उत्तराप्रत येईपर्यंत अनेक प्रश्नांनी भारलेलं असतं. आणि माणूस त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. या जीवन प्रवासात पुष्कळ वेळा आत्मकेंद्री बनत जातो आणि तो फक्त स्वतःपुरता जगायला लागतो. मी, माझं कुटुंब, माझा उदरनिर्वाह, माझी समृद्धी याचा विचार करताना स्वार्थ काय परमार्थ काय या संबंधी तो विचार देखील करत नाही. पण जो ज्ञानी मनुष्य असतो तो मात्र या सर्व क्रियाकलापापासून अलिप्त होत स्वार्थ, परमार्थ, जीवन याचा, साकल्याने विचार करितो. प्रस्तुत  कविता म्हणजे याच विचाराचं भावपूर्ण प्रकटीकरण आहे.

कविवर्य आपल्या कवितेच्या पहिल्या कडव्यात अतिशय नम्रपणे, त्याच्या जीवनाचं अधिष्ठान असलेल्या सद्गुरू स्वामी समर्थाच्या चरणी लीन होतात आणि त्यांना आपल्या आयुष्यात केलेल्या जीवन प्रवासाची माहिती देतात.

कविवर्य स्वतः आयुःशल्य विज्ञान  स्नातक आहेत. त्यांना शारीरिक व्याधी आणि त्यातून सुटकेचा मार्ग माहिती आहे. या ज्ञानाच्या आधारे त्यांनी अनेकांना व्याधीमुक्त केलेलं आहे. त्यात त्यानी कुठलाही स्वार्थ जोपासला नाही. त्यामुळे स्वतच्याही नकळत कविवर्य अध्यात्मच जगले आहेत.

दुसऱ्या  कडव्यामध्ये कवींनी आपल्या कामागची प्रेरणा स्पष्ट केली आहे. कवींचा व्यवसाय जरी वैद्यकीचा असला तरी त्यामागची प्रेरणा मात्र, “शिव भावे जीव सेवा” हीच होती.  जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये कवींनी आपल्या आराध्य देवतेलाच पाहिले. व्यवसाय आणि जीवनातील यशाचं श्रेय मात्र विनम्रपणे कवी  स्वामी समर्थाना देतात.

मी कर्ता म्हणशी तेणे तू कष्टी होसी।

परा कर्ता म्हणस। तेणे तू पावसी। यश कीर्ती प्रताप॥”

ही समर्थ रासमदास स्वामी याची उक्ती कवी आचरणात आणतात. स्वामी समर्थाविना जीवन निरर्थक आहे हीच भावना या कडव्यात कवींनी मांडली आहे.

तिसऱ्या कडव्यात मात्र कविवर्याची भावना मात्र व्याकुळ झाली आहे. “संध्या छाया भिवविती हृदया” अशी भावना या कडव्यातून व्यक्त होते आहे. व्यासाच्या या वळणावर फक्त स्वामी समर्थाची साथ असावी आणि जीवन उजळून निघावे हीच भावना प्रकट होते आहे. आयुष्य हेच स्वामी समर्थाची पूजा, आणि आता उत्तरपूजा सुरू झाली आहे

न्यूनं संपुर्णतांयाती सद्यो वंदेतमच्युतं

ही कविता वाचत असताना शब्दांचा साधेपणा, प्रासादिकता, यामुळे कवितेमध्ये अंगभूत नादमाधुर्य निर्माण झाले आहे. कवितेतील आर्तता थेट  जगद्गुरू संत तुकारामाच्या, “तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता” या भावनेशी नाते सांगणारी आहे.

© श्री श्रीकांत पुंडलिक

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तुळस… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? विविधा ?

☆ तुळस… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

तुलसी श्रीसखी शिवे । पापहारिणी पुण्यदे |

नमो नारायणप्रिये ! नमस्ते नारदनुते ! नमो नारायणप्रिये ||

प्रत्यक्ष श्रीकृष्णांची सखी असणाऱ्या, पवित्र, पापांचे हरण करणाऱ्या, पुण्य प्रदान करणाऱ्या, नारदाकडून स्तुती केल्या गेलेल्या, नारायणाला प्रिय असलेल्या तुळशीला प्रणाम असो—- सकाळी स्नानानंतर तुळशीला पाणी देऊन प्रदक्षिणा घालण्याचे वेळी हा श्लोक म्हणण्याची प्रथा आहे. तुळशीत असलेल्या अनेक गुणांमुळे तिच्या सानिध्यात राहण्याने मिळणाऱ्या फायद्यामध्येच या प्रथेचे मूळ असावे.

तुलसी यस्य भवने प्रत्यहं परिपूज्यते | तद् गृहं नोपसर्पंति कदाचित् यमकिंकरा: ||

—-स्कंद पुराणात असा श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या घरात नेहमी तुळशीची पूजा केली जाते त्या घरातील सदस्य कमी आजारी पडतात. तुळशीची पाने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतात. तिच्या मंजिरी विष्णूला अर्पण केल्या तर मोक्ष मिळतो.

….. एका कीर्तनकाराने तिची कथा सांगितली होती ती अशी…… 

….. एका गावात तुळशी नावाची एक काळी सावळी मुलगी रहात होती. तिची आई लहानपणीच वारली. सावत्र आई तिला खूप त्रास द्यायची. म्हणायची, ” तू इतकी काळी. तुझे लग्नच होणार नाही.” तुळशी मोठी झाली आणि तिने एक दिवस आईला उत्तर दिले ,” पंढरपूरचा विठुराया माझ्यापेक्षा काळा आहे. तो करेल माझ्याशी लग्न.” 

आई म्हणाली, ” जा मग त्याच्याकडेच. नाहीतरी तू भूमीला भार आणि खायला कहार आहेस.” तुळशी देखील रागारागाने घराच्या बाहेर पडली. पंढरपूरला आली. तिथल्या बायका तिला चिडवू लागल्या. ” अग, त्याचे रुक्मिणीशी लग्न झाले आहे, तो तुझ्याशी कसा लग्न करेल? नुसता भुईला भार आहेस.” तुळशी रात्रंदिवस विठ्ठलाचे नामस्मरण करत राहिली. तिने अन्न पाणी सोडले. विठुराया काही तिच्याकडे आला नाही. तिने भूमातेला वंदन केले व आर्त विनवणी केली. ” आता माझ्याने सहन होत नाही. तू मला तुझ्या उदरात घे.” आणि खरोखरच भूमाता दुभंगली. तुळशी विठ्ठल विठ्ठल करत गडप होऊ लागली. इकडे विठुरायाला ते समजले. तो धावत धावत त्या  ठिकाणी आला. पण उशीर झाला होता. तुळशी गडप व्हायला लागली होती. त्याने तिचे फक्त केस दिसले तेवढे घट्ट धरून ठेवले. पण  तुळशी गडप झाली. आणि विठोबाच्या हातात फक्त तिचे केस राहिले. त्याने मूठ उघडली आणि त्याच्या डोळ्यांतले अश्रू त्या केसांवर पडले. त्याच्या मंजिऱ्या झाल्या. विठोबाने त्या आपल्या हृदयाशी धरल्या आणि तेथील जमिनीवर पेरल्या. तिथे एक झाड उगवले .त्याला सगळे तुळशी म्हणून लागले. रखुमाईला ते समजले. इकडे विठोबा सारखे तुळशी तुळशी म्हणून उदास होत होता. रखुमाईला राग आला. ती म्हणाली सारखं तुळशी तुळशी करताय. घ्या तिला गळ्यात बांधून. आणि विठोबाने देखील तुळशीचा हार तयार केला आणि आपल्या गळ्यात घातला. तेव्हापासून ती त्याच्या हृदयापाशी रहात आहे…

तुळस अंगणात लावल्यावर दुष्ट शक्ती घरात येत नाहीत. तिच्या बुंध्याभोवतीची काळी माती विषारी माशी, किडा वगैरे चावल्यावर लावली तर उपयोग होतो. मधमाशीने दंश केल्यास त्या जागी तुळशीतील माती लावतात. आराम पडतो. किडा, मुंगी, डास चावल्यास पानांचा रस दंशाचे जागी लावतात. आग थांबते. तिचे खोड, मूळ, फुले आणि मंजिरी अँटिबायोटिक म्हणून वापरतात. ताप आला, घसा खवखवू लागला तर तिची पाने चघळावी. चेहऱ्यावर डाग असतील तर तुळशीचा लेप लावावा. पाण्यात तुळशीची पाने टाकली तर पाणी आपोआप शुद्ध होते. फुफ्फुसे हृदय व रक्ताभिसरणाशी संबंधित असलेली अनेक औषधे तुळशीचा रस व मधाच्या अनुपानासोबत देतात. तुळशीचा रस मधाबरोबर दिला तर सर्दी पडसे नाहीसे होते. तिच्या पानांचा रस लहान मुलांना दिला तर त्यांचा खोकला बरा होतो व टॉनिकप्रमाणे उपयोग होतो. नायटा झाल्यास तिच्या पानांचा रस लावतात. तिचे बी पाण्यात पाच-सहा तास भिजवून, दूध साखर घालून खाल्ल्यास अंगातली उष्णता कमी होते.

….. देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य होते. पण देवाला वाहिलेल्या तुळशीचे निर्माल्य होत नाही. तिची पाने, फांद्या झाडापासून तोडल्या तरी तिच्यातील प्राणशक्ती जिवंत असते. तुळशीमध्ये वनस्पतीज सोने असते. धातू रूपातील सुवर्णापेक्षा वनस्पतीज सोने जास्त प्रभावी असते.

….. तुळशीला इंग्रजीत बासिल म्हणतात. हिंदीत विश्व पूजिता ,विश्व पावन, भारवी, पावनी, त्रिदशमंजिरी, पत्रपुष्पा, अमृता, श्रीमंजरी, बहुमंजरी, वृंदा ,वैष्णवी, अशी अनेक नावे आहेत. विठोबाच्या गळ्यातील तुळशीला वैजयंती म्हणतात.

….. तुळशीवरून काही वाक्प्रचार देखील आपण वापरत असतो.

१) तुळशी उचलणे म्हणजे शपथ घेणे.

२) तुळशी उपटून भांग लावणे म्हणजे चांगल्या माणसाला काढून वाईट माणसाची संगत धरणे

३) तुळशीच्या मुळात कांदा लावावा लागणे म्हणजे चांगले हेतू साध्य करण्यासाठी वाईट साधनांचा  उपयोग करण्याविषयीची सबब सांगणे.

४) तुळशीत भांग उगवणे म्हणजे चांगल्या माणसांच्या समुदायात चुकून एखादा वाईट माणूस आढळणे.

५) तुळशीत भांग व भांगेत तुळस उगवणे म्हणजे चांगल्या आणि वाईट गोष्टी एकाच ठिकाणी असणे.

६) तुळशीपत्र कानात घालून बसणे म्हणजे ऐकले न ऐकलेसे करून स्वस्थ बसणे.

७) घरादारावर तुळशीपत्र ठेवणे म्हणजे घरादाराचा त्याग करणे.

—–तिचा विवाह केल्यास कन्यादानाचे महत्त्व प्राप्त होते. विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होतात. तुळस हे लक्ष्मीचे रूप आहे. 

महाप्रसाद जननी

सर्व सौभाग्यवर्धिनी

आधिव्याधी हरा नित्यं

तुलसी त्वं नमोऽस्तुते ||

 

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दोन चित्रे – लेखक -अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ दोन चित्रे – लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

आईने तिच्यासाठी शब्दकोडे, चित्रकोडे यांचे पुस्तक आणले होते. आधी ती हरखून गेली. तिनं मग ते पुस्तक उघडले. पहिलाच खेळ होता– मांजराला माश्याकडे मार्ग दाखवा. तिनं पेन्सिलीने रेघांची वेटोळी ओलांडून क्षणात ते कोडं ओलांडलं. पुढचा खेळ होता योग्य जोड्या जुळवा– तिनं क्षणार्धात मोची आणि चप्पल, शिंपी आणि सदरा, डॉक्टर आणि औषध, सुतार आणि कपाट, असं सगळं जुळवलं. 

आई कौतुकाने ते बघत होती. पुढ़च्या शब्दखेळाला ती थबकली – थोडीशी हिरमुसली. तिनं ते पुस्तक बाजूला ठेवले. आई ते बघत होती. 

” काय झालं बाळा, तुला नाही आवडलं का पुस्तक.” 

“तसं नाही आई, मला तो पुढला चित्रखेळ नाही आवडला. ‘ दोन चित्रातील फरक ओळखा.’ –आई मला दोन चित्रातला फरक नाही ओळखता येत.”

आई म्हणाली, “अगं सोपाय. बघ ह्या चित्रात चेंडू लाल रंगाचा आहे, त्या चित्रात हिरवा. ह्या झाडावर पक्षी बसलेला आहे, त्या झाडावर नाहीये.” 

“आई मला फरक ओळखायला नाही आवडत. उलट दोन्ही चित्रात साम्य किती आहेत. ह्या मुलाकडाची बॅट आणि त्या मुलाकडची बॅट सारखी आहे. दोघांची टोपी सारखी आहे. दोन्ही मैदानावर गवत आहे, सुंदर हिरवे गार. दोन्ही चित्रात खूप खूप सुंदर, सारखी झाडं आहेत. दोन्हीकडे सूर्य सारखाच हसतोय. दोन्ही ढग सारखेच सुंदर आहेत. दोन्ही चित्रात इतकी अधिक साम्य असतांना, आपण जे थोडेसे फरक आहेत ते का शोधत बसतो.” 

आई एकदम चमकली— किती सहज सोपं तत्वज्ञान आहे हे. आपण आपला पूर्ण वेळ चित्रातला फरक शोधण्यात  घालवतो, पण हे करतांना आपण दोन चित्रातली साम्य– जी चित्रातल्या फरकांपेक्षा अधिक आहेत, ती लक्षात घेत नाही.

मुलांच्या बाबतीत सुद्धा अगदी हेच करतो. ‘ ती समोरची मुलगी आपल्या मुलीपेक्षा अधिक उंच आहे. वर्गातल्या बाजूचा मुलगा गणितात अधिक हुशार आहे, ती दुसरी मुलगी माझ्या मुलीपेक्षा छान गाते.’ —- आपण केवळ आणि केवळ फरकच शोधत बसतो आणि साम्यस्थळे अगदी आणि अगदी विसरून जातो.

आईने तो चित्रखेळ पुन्हा उघडला. त्यावर ‘ दोन चित्रातील फरक ओळखा ‘ मधील ‘फरक’ हा शब्द खोडून त्या जागी ‘साम्य’ हा शब्द लिहिला. आता तो खेळ ‘ दोन चित्रातील साम्य ओळखा ‘ असा गोमटा झाला होता. मुलीने हसुन तो खेळ सोडवायला घेतला. आईने मुलीला जवळ घेतले. 

दोन्ही चित्रे आता एक होऊन त्यातील फरक मिटला होता. आता त्यात राहिले होते ते फक्त आणि फक्त साम्य—आणि अमर्याद पॉझिटिव्हिटी.

लेखक – अनामिक.

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवाळी : एक आठवण ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

परिचय

शिक्षण- एम.ए.,एम.एस.डब्ल्यू.,डी.एल.एल.अॅन्ड एल.डब्ल्यू, एम.फिल ,पी.एच.डी.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातून प्राध्यापक पदावरून सेवानिवृत्त . कार्यकाळात अध्यापन, संशोधन व क्षेत्रकार्य केले.

प्रकाशित लेखन-

– कवितासंग्रह- हिरवी चाहूल, प्राजक्त, प्राजक्ताची चाहूल.

– पुस्तके- असंघटित कामगार, राजाज्ञा(छ.रा.शाहू महाराजांचे आदेश, आज्ञापत्रे इ.) ,साक्षरता खेळ,जोतीसंवाद, केल्याने होत आहे रे,महान महात्मा फुले.

इतर- क्रांतिरत्न

क्रांतिरत्न (इंग्रजी आवृत्तीत लेखन- आगामी),सूर्याच्या लेकी महाग्रंथात लेखन (आगामी).

याशिवाय विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांतून, दिवाळी अंकातून सतत लेखन. आकाशवाणी,दूरदर्शन व विविध वाहिन्यांवरून मुलाखती आणि विविध विषयांवर कार्यक्रम.

शैक्षणिक कार्याबरोबरच अध्यासनाच्या वेबसाईटची निर्मिती केली.

विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागात(पूर्वीचा प्रौढ, निरंतर शिक्षण आणि विस्तार विभाग) पुढील डाॅक्युमेटरीजचे संहितालेखन केले –

– विस्कळीत, disrupted, यशोगाथा प्रौढ शिक्षणाची,हा धन्य महात्मा झाला.

अनेक वृत्तपत्रे, नियतकालिकांतून विविध विषयांवर सतत लेखन.

सदस्यत्व-

– Indian Adult Education Association, New Delhi.

– Indian University Association for Continuing Education, New Delhi.

– Asian Network for Comparative Adult Education.

– Pune University Teachers Association,

Savitribai Phule Pune University, Pune.

-Dr.Babasheb Ambedkear Teachers Organization, University of Pune, Pune.

– Paragon (Organization of Teachers) .

– Vishwa Marathi Parishad,Pune.

– Mahatma Phule Samta Pratishthan .

– Kavyanand Pratishthan, Pune .

बाली व माॅरिशस येथे आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदांत सहभाग व पेपर सादरीकरण.

विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांत सतत सहभाग.

??

☆ दिवाळी : एक आठवण ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

पुणे विद्यापीठात प्रौढ शिक्षण प्रकल्प अधिकारी म्हणून मी नोकरीला लागलो. तेव्हा पुणे,अहमदनगर, नाशिक,  जळगाव आणि धुळे जिल्ह्य़ातील  काॅलेजं विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात होती. ऑफिसबरोबरच भरपूर फिल्ड वर्कचं आमचं काम होतं. महिन्यातून दहा- पंधरा दिवस आम्ही बाहेरगावी जात असू. काॅलेजमध्ये गेल्यावर विद्यार्थ्यांपुढे भाषण, प्राध्यापकांशी चर्चा, प्रौढ शिक्षणातील संघटनांबरोबर बैठक, असा दिवसभरातील व्यग्र कार्यक्रम. नंतर 

दुपारचं जेवण. थोडीशी विश्रांती झाल्यावर दूरवर कुठंतरी  गावात प्रौढ शिक्षण केंद्र पहायला जायचा कार्यक्रम असायचा.

असाच एकदा एका काॅलेजला गेलो होतो. नुकतीच दिवाळी संपली होती. हवेत गारठा होता. सायंकाळी काॅलेजच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रम अधिकारी प्राध्यापकांसोबत दूरवरच्या खेड्यातल्या एका प्रौढ शिक्षण केंद्रावर आम्ही पोहोचलो. ते महिलांचे प्रौढ शिक्षण केंद्र होते.घरातील जेवणं, भांडी धुण्याची कामं आटोपून केंद्रात महिला यायला वेळ होता. तोपर्यंत  प्राध्यापकांबरोबर गप्पा मारत बसलो. महिला आल्यावर प्राध्यापकाने माझी ओळख करून देऊन माझे स्वागत केले. 

“ पुण्याहून आलेले  हे साहेब तुम्हाला आता मार्गदर्शन करतील “– असं सांगून ते बसले. हाताची घडी घालून महिला 

मी काय बोलतो हे कान देऊन ऐकू लागल्या. ” मार्गदर्शन वगैरे नाही.आपण सगळेजण गप्पा मारू ” असं सांगून मी  ते टेन्स वातावरण हलकं केलं.

” हे बघा,नुकतीच दिवाळी संपली आहे.कुणी कुणी काय काय केलं हे सांगा. सगळ्यांनी बोलायचं बरं का “.

” आम्ही लाडू,करंज्या, शंकरपाळया केल्या, मुलांनी फटाके वाजवले,आकाशकंदील लावले इ.इ.” हे असं सगळं मला अपेक्षित होतं.—–पण महिलांनी दिलेली उत्तरं ऐकून मी बधिर झालो. काय काय म्हणाल्या महिला ?—-

” सायेब, आम्ही गावातल्या आमक्या तमक्याच्या वावरात कामाला गेलो वतो. पोरांना शाळेच्या सुट्ट्या होत्या. त्यांना

  पन घिवून गेलो वतो .”

” आवं सायेब,  आमाला कुनीच नौतं बोलौलं. घरीच वतो या दिवाळीला “.

”  पोरांचा आजा कवापासून आजारीच हाये. वरल्या आळीतल्या रामू पवाराकडून गंडा बांदून घेत्ला या दिवाळीत.     पण नौरात्राच्या चौथ्या माळेला म्हतारा ग्याला “.

खरं तर मी यांना मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा होती. मात्र झालं उलटंच. या महिलांनीच मला स्वतंत्र भारतातील करूण वास्तव शिकवलं. कुठल्याच पुस्तकात मी हे वाचलं नव्हतं.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ.

ईमेल- sks.satish@gmail.com
मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रिय वास्तू पुरुषास ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रिय वास्तू पुरुषास ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

साष्टांग नमस्कार विनंती विशेष.

झालं असं की, एकजण घरी आले होते. ते बोलता बोलता म्हणाले ” वास्तू प्रसन्न आहे हं तुमची ” – आणि तुझी प्रथमच प्रकर्षाने आठवण झाली. तुझी वास्तुशांती करून, काही वस्तु जमिनीत पुरून, जेवणावळी केल्या, की तुला विसरूनच जातो रे आम्ही… मग उरतं ते फक्त  घर… तुझ्या खंबीर पाठिंब्याकडे अगदी पूर्ण कानाडोळा केला जातो !!—-  अगदी अपराधी वाटलं… मग काय तुझ्याशी पत्र संवाद करण्याचं ठरवलं..‌. म्हणून आज हे पत्र !

तुझ्याविषयी विचार करताना कितीतरी गोष्टी प्रथमच लक्षात आल्या… जिथे तू प्रसन्नपणे वावरतोस ते घरकुल खरंच सोडवत नाही…

घरात बसून कंटाळा येतो म्हणून प्रवासाला म्हणजे पर्यटनाला गेलो, तर चार दिवस मजेत जातात. पण नव्याची नवलाई संपते आणि घराची ओढ लागते…

आजारपणात डॉक्टर म्हणतात–” आराम पडावा म्हणून ऍडमिट करा “– पण तुझ्या कुशीत परतल्याशिवाय कोणाच्याही प्रकृतीला आराम पडत नाही हेच खरं… !

तुझ्या निवाऱ्यातच अपरिमित सुख आहे —

अंगणातील छोटीशी रांगोळी स्वागत करते, 

दारावरचं तोरण हसतमुखाने सामोरं येतं, 

तर उंबरा म्हणतो ‘ थांब लिंबलोण उतरू दे…’

 बैठकीत विश्वास मिळतो, तर माजघरात आपुलकी !

स्वयंपाकघरातील प्रेम तर दुधाच्या मायेनं ऊतू जातं !

तुझ्या आतल्या देव्हाऱ्यात बसलेली मूर्ती मनातील भीती पळवून लावते,

—–खरंच वास्तुदेवते या सगळ्यामुळे तुझी ओढ लागते.

तुझी शिकवण तरी किती बहुअंगी —

खिडकी म्हणते ‘ दूरवर बघायला शिक,’ 

दार म्हणतं ‘ येणाऱ्याचं खुल्या मनाने स्वागत कर,’

भिंती म्हणतात ‘ मलाही कान आहेत परनिंदा करू नकोस,’ 

छत म्हणतं ‘ माझ्यासारखा उंचीवर येऊन विचार कर,’ 

जमीन म्हणते ‘ कितीही मोठा झालास तरी पाय माझ्यावरच असू देत ‘ 

तर बाहेरचं  कौलारू छप्पर सांगतं ‘ स्नेहाच्या पंखाखाली सगळ्यांना असं काही शाकारून घे, की बाहेरची शोभा आतून दिसेल आणि कुणालाही ऊन, वारा, पाऊस लागणार नाही ! ‘

इतकंच नाही तर तू घरातील मुंग्या, झुरळं, पाली, कोळी,  यांचाही आश्रयदाता आहेस. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्थाही तूच तर बघतोस आणि निसर्गाच्या अन्नसाखळीला हातभार लावतोस… 

— इतकं मोठं मन आमचंही व्हावं असा आशीर्वाद आम्हाला दे…

तुझ्या वाटणीसाठी दोन भाऊ कोर्टात जातात आणि वकिलांची घरं उभी रहातात याचं खरंच वाईट वाटतं…

एकत्र कुटुंब पद्धतीकडून एकल कुटुंब पद्धतीकडे वेगाने निघालोय आम्ही…….  पण तरीही शेवटी ‘ घर देता का कोणी घर ‘ ही नटसम्राटाची घरघर काही संपली नाही रे ! कारण जिथे तुझ्या प्रसन्नतेच्या खाणाखुणा नाहीत ते घर नसतं… ते बांधकाम असतं रे… विटा-मातीचं.

वास्तू देवते, पूर्वी आई-आजी सांगायची…’ नेहमी शुभ बोलावं म्हणजे आपल्या बोलण्याला वास्तूपुरूष नेहमी तथास्तु म्हणत असतो ‘ —– मग आज इतकंच म्हणतो की —

” तुला वस्तू समजून विकायचा अट्टहास कमी होऊन, तुझ्या वास्तूत वर्षातून काही क्षण तरी सगळी भावंडं, मित्रमैत्रिणी, सगेसोयरे, आप्तेष्टं एकत्र वास्तव्यास येऊ दे…”

—” आणि या माझ्या मागण्याला तू तथास्तु असं म्हणच… हा माझा आग्रह आहे.” 

 ll वास्तूदेवताभ्यो नम: ll 

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…3 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…3 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

द्रौपदी

महाभारतातील एक महत्वपूर्ण पात्र म्हणजे द्रौपदी! वास्तविक संपूर्ण महाभारताचा विचार करता कथेची नायिका द्रौपदी व नायक श्रीकृष्ण आहे असे म्हणावे लागेल.

द्रौपदीच्या चरित्राचा अभ्यास करताना असे लक्षात येते की तिच्या स्वभावाचे अनेक चांगले- वाईट कंगोरे होते. स्वयंवराचा ‛पण’ अर्जुनाने जिंकला असला तरी कुंतीच्या सांगण्यावरून ती पाचही पांडवांचा पती म्हणून स्वीकार करते. यातून तिच्यातील आज्ञाधारक सून जाणवते. पण ज्यावेळी पांडवांवर संकट येते आणि कोणताही निर्णय घेण्यास ते असमर्थ ठरत त्यावेळी योग्य सल्ला द्यायचे काम तीच खंबीरपणे करत असे. प्रसंगी त्यांच्या चुका दाखवण्यातही ती मागेपुढे पाहत नसे. द्युतात हरल्यावर पांडवांना जेव्हा वनवासात जावे लागले तेव्हाही तिने त्यांच्या मनात प्रतिशोधाची ज्योत सतत जागी ठेवण्याचा प्रयत्न केला. एका प्रसंगात ती युधिष्ठिराला म्हणते,“ पूर्वी सकाळी ज्या सुंदर भूपाळी आणि वाद्यवादनाने तुम्हाला जाग येत असे तेच तुम्ही सर्व राजे आता सकाळच्या कोल्हेकुईने जागे होता. जिथे तुम्ही पंचपक्वान्नांचा आस्वाद घेत होता तेच तुम्ही आता कंदमुळांवर गुजराण करत आहात. ज्या भीमाच्या गदेच्या प्रहाराची सर्वाना भीती वाटते तो भीम जंगलातील झाडांवर कुऱ्हाडीचा प्रहार करून लाकडे गोळा करत आहे….” अशाप्रकारे आपल्या कर्तव्याची आपल्या पतींना जाणीव करून देणारी ती कर्तव्यदक्ष आणि महत्वाकांक्षी स्त्री वाटते.

आजच्या काळातही अजूनही स्त्री- पुरुष यांच्या मैत्रीच्या निखळ नात्यावर फारसा विश्वास ठेवला जात नाही. पण त्या काळात द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांची मैत्री अनोखी होती. त्यांच्यात खऱ्या अर्थाने सखा, भाऊ आणि सवंगड्याचे नाते होते. म्हणूनच तिला ‛कृष्णा’ या नावानेही ओळखले जात असे. ज्यावेळी भर दरबारात तिला डावावर लावण्यात आले आणि तिला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा तिला केवळ कृष्णाचीच आठवण झाली. तिने स्वतःच्या रक्षणासाठी कृष्णाचा धावा करताना म्हटले,“ माझा कोणी पती नाही, माझा कोणी पुत्र नाही, माझा कोणी पिता नाही. हे मधुसूदन, तुझे माझे तर कोणतेच नाते नाही. पण तू माझा सच्चा मित्र- सखा आहेस. म्हणून तू माझे रक्षण करावेस.” असे म्हणून तिने केवळ त्यांच्यातील मैत्रभावनेलाच हात घातला नाही तर त्याला आपल्या कर्तव्याचीही जाणीव करून दिली. इतकेच नव्हे तर त्याचवेळी कुरुवंशातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींना दूषण देण्यासही ती कचरली नाही. वास्तविक द्रोणाचार्य, कृपाचार्य, धृतराष्ट्र यांनी ही सर्व विपरीत घटना घडत असताना ते थांबवणे गरजेचे होते. त्यामुळे अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि आपला अधिकार हक्काने मागणारी द्रौपदी निश्चितच सर्व स्त्रियांसाठी आदर्श ठरावी.

जोपर्यंत तिच्या या अपमानाचा बदला घेतला जात नाही तोपर्यंत तिने आपले केस मोकळे सोडले होते. दुर्योधनाच्या रक्तानेच वेणी बांधण्याची तिने प्रतिज्ञा केली होती. आणि जोपर्यंत तिचे ते मोकळे केस दिसत होते तोपर्यंत तिच्या पतींना तिच्या अपमानाचा आणि त्याचा बदला घेण्याचा विसर पडू नये हीच तिची त्यामागची भावना असावी. यातून तिच्यामधील निश्चयी आणि तितकीच आपल्या मताशी ठाम असणारी स्त्री दिसून येते.

जितकी ती प्रसंगी कठोर होत असे तितकीच ती मनाने कोमल होती. जयद्रथ म्हणजे खरे तर तिच्या नणंदेचा पती! पण तो तिचे अपहरण करतो आणि नंतर त्याच्या या अपराधासाठी त्याला ठार मारण्याची युधिष्ठिराकडे मागणी होत असताना ती आपल्या नणंदेला वैधव्य प्राप्त होऊ नये म्हणून सर्वाना त्यापासून परावृत्त करते. मात्र जयद्रथाला आपल्या या दुष्कृत्याची सतत जाणीव राहावी म्हणून त्याचा चेहरा विद्रुप करण्याची आज्ञा देते.

ती पाच पतींची पत्नी असली तरी वारंवार असे जाणवत राहते की ती भीमावर मनापासून प्रेम करत होती. कारण ज्या ज्या वेळी तिच्यावर संकट आले त्या त्या वेळी तो पती म्हणून तिच्या पाठीशी उभा राहिला. वस्त्रहरणाच्या वेळी पण त्याने एकट्यानेच त्याविरुद्ध आवाज उठवला होता. त्यामुळे जेव्हा द्रौपदीचा अंतिम काळ आला त्यावेळी ती भीमाला म्हणाली,“ जर पुन्हा जन्म मिळालाच तर तुझीच पत्नी व्हायला मला आवडेल.” द्रौपदीमधील ही प्रेमिका मनाला मोहवून जाते.

अशी ही महाभारताची नायिका असणारी द्रौपदी अनेक आयामातून संस्कृत साहित्यात भेटत जाते. काहीजणांच्या मते केवळ द्रौपदीच्या अहंकारी स्वभावाने आणि रागामुळे संपूर्ण महाभारत घडले. पण माझ्या मते या संपूर्ण कथेत द्रौपदीवर जितका अन्याय झालेला दिसतो तितका इतर कोणत्याही स्त्रीवर झालेला दिसत नाही. राजघराण्यातील असूनही संपूर्ण जीवन संघर्ष आणि दुःखात गेले. मुले असूनही मातृत्व नीट उपभोगता आले नाही. सौंदर्यवती असूनही नेहमीच पाच पतींमध्ये विभागली गेली. ज्याच्यावर तिचे खऱ्या अर्थाने प्रेम होते त्याला पूर्णपणे समर्पित होऊ शकत नव्हती. आणि या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही ती तितकीच खंबीर होती. पण तरीही शेवटी ती एक सामान्य स्त्री होती. म्हणूनच काही वेळा प्रेम, ईर्षा, राग या सहज भावना तिच्यात उफाळून येत असाव्यात. त्यामुळे हे सामान्यत्वच उराशी बाळगून तिने आपले असामान्यत्व सिद्ध केले होते असेच म्हणावे लागेल.

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पँपरींग… लेखिका – सुश्री शितल ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ पँपरींग… लेखिका – सुश्री शितल ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ ☆

खरंतर या इंग्लिश शब्दाला मराठीत खूप छान अर्थ आहेत—- लाड , कोड,  कौतुक , जपणूक,  सांभाळणे , गोंजारणे ……अर्थातच या सगळ्या क्रिया किंवा इतिकर्तव्य ही आपल्या आसपास असणाऱ्या लोकांनी एकमेकांसोबत करायची असतात. आपले कुटुंबिय किंवा आपले वडिलधारे लोक आपलं कौतुक करत असताना आपण लहानपणापासून पहात आलोय. तद्वतच आपणही आपल्या जवळच्या लोकांचं यथायोग्य कौतुक आणि लाड करतोच.  

कौतुक आणि लाड हे समोरच्याने केले की त्याचा गोडवा वाढतो. 

पण …पण…पण  धावत्या जगाबरोबर आत्मकेंद्रित होत चाललेली माणसं, संकुचित आणि इर्षेखोर मनं , कामाच्या व्यापाच्या नावाखाली मी भोवती आखून घेतलेली नेणीवेची आवर्तनं, यांच्या वावटळात या पॅंपरिंगचाचा अक्षऱश: पाचोळा होतोय … मी आणि माझं काम हे सगळ्यात मोठं, दुसरा माझ्यापेक्षा मोठा होऊच नये ही भावना, किंवा मी माझ्या व्यापातून इतरांना वेळ देऊच शकत नाही, आता ज्याने त्याने स्वावलंबी व्हावं ही जाणीवेची धग, नात्यांच्या आणि भावभावनांच्या बंधांना एकटेपणाचे चटके देत राहतीय ..

बाहेरचे, परके, नातेवाईक वगैरे ठीक आहे. पण कधी कधी आपल्या घरच्या रक्ताच्या नात्यांकडूनही असाच अनुभव तरळून जातो, आणि मग येते एक विषण्णता, वैराग्य, किंवा चीड आणि क्रोध. 

पण खरं सांगायचं तर हे सगळं आता इतकं पुढं गेलंय ना, की आपण ठरवलं तरीही यात बदल करु शकत नाही. सोशल लाईफ , सोशल मीडिया आणि सोशल एडिक्शनच्या तिकडीवर सोशल अवेयरनेसचं मात्र वाटोळं होत चाललंय .. 

मी , माझा , माझं , मला , या ‘ म ‘ च्या आवर्तनात गुरफटलेला प्रत्येक माणूस समोरच्यापासून दूर आणि मग्रूर होत चाललाय. यात सगळेच आले– अगदी तुम्ही आणि मी सुद्धा ….. 

पण हे झालं समोरच्यासाठी. जेव्हा अशा पॅंपरींगची गरज मला स्वत:ला असते तेव्हा काय करावं बरं … आली का पंचाईत– म्हणजे दुसऱ्यासाठी विणलेल्या जाळ्यात आता आपणही अडकणार तर ?—–   आज आता मला कुणाच्या तरी खंबीर खांद्याची, कुरवाळणाऱ्या हातांची आणि मायेच्या कुशीची गरज आहे, पण कुणीच नाहीये सोबत किंवा  ते कुणी करत नाहीये ….

अशा वेळी तडक उठावं– मस्त आवडीचे कपडे घालावे– मोठा प्लान असेल तर बॅगच भरावी —–

आणि कर्तव्य, जाणीवा, व्याप,  जबाबदारीची  सगळी लक्तरं आपल्याच अंगणातल्या झाडाखाली ठेवून … सरळ स्टार्टर मारावा आणि आपल्या आवडीच्या ठिकाणी जाऊन बसावं —- अगदी एकटं —-डोंगराच्या कड्यावर , नदीच्या काठावर , मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा निर्जन बेटावर — आपल्याला आवडेल अशा ठिकाणी जावं , आपल्याला आवडतं  ते खावं , आपल्याला आवडतं ते संगीत लावावं, आवडेल तसं हसावं, आवडेल तसं रडावं , आवडेल तसं बागडावं, आवडेल ते……ते सगळं करावं —– 

—–उघड्या माळावर बसून आपणच आपल्या कौतुकाचं एक छानसं भाषण करावं— आपणच त्यावर टाळ्या वाजवाव्या— आपल्याला आवडती फुलं आपणच गिफ्ट करावी—- रोमॅंटिक साँग लावून अगदी मध्यरात्री वाईनच्या ग्लाससोबत सोलो डान्स करावा —- आपणच आरशात बघून आपल्यालाच कॉम्प्लीमेंट द्यावी —-  आपणच आपल्या फोटोला करकचून मिठी मारावी —- खळखळून हसावं, देखणं दिसावं, आणि स्वत:च्या मिठीत स्वत:च विसावावं …….. मस्त समुद्रावर जावून त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याची खोली मोजावी – आव्हान द्यावं सागराला — चल  मोजून पाहू कोण जास्त गहिरं आहे – तुझं अंतरंग, की मी — माझ्या मनाचे तरंग. 

—– मस्त मनसोक्त वागावं, मनसोक्त जगावं आणि दुःख, तणाव, व्याप, एकटेपणाची खेटरं भिरकावून द्यावीत खोल दरीत आणि शांत झोपी जावं ………  

—– कारण सकाळी उठायचं असतं— पुन्हा  एकदा  त्याच आपमतलबी जगाशी सामना करायला —- नव्या उमेदीने आणि नव्या ताकदीने ——

लेखिका : सुश्री शितल

प्रस्तुती : सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तो कल्याण करी — तो मुरारी वनचरी — तो रामकृष्णहरी…  सौ.प्रिया श्रीनिवास जोग ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ तो कल्याण करी — तो मुरारी वनचरी — तो रामकृष्णहरी…  सौ.प्रिया श्रीनिवास जोग ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

आज गर्भरेशमी लाल रंगाचा शालू सीतामाईंच्या अंगावर अगदी खुलून दिसत होता. साक्षात लक्ष्मीचे तेज, तिचे ऐश्वर्य त्यांच्या मुखावर विलसत होते. पण कधी आपल्या रुपाचा त्यांना गर्व नाही झाला. अत्यंत सालस अन् सोज्ज्वळ अशी ती सीतामाई ! दाशरथी रामाची जनकनंदिनी सीता ! 

खरंतर देवळात आवळी पूजनाची चाललेली तयारी पाहून सीतामाई खुलल्या होत्या. वनवासातले भोग भोगून त्या मानवी जीवन खूप जवळून समजल्या होत्या. म्हणून तर माणसांच्यात घटकाभर त्यांनाही रमायला आवडत असावे. तितक्यात कुणीतरी एका कुंडीत लावलेले आवळीचे झाड तिथे आणून ठेवले. पाठोपाठ भगवान विष्णूंचा ध्यानस्थ फोटोही तिथे मांडण्यात आला. कुंडीभोवती फुलांची रांगोळी काय, फुलांचे तुळशीचे हार काय !! ती कुंडीतली छोटीशी आमलकी अर्थात आवळीच हो, लाजून चूर होतेय असा सीतामाईंना भास झाला. तिची इवली इवलाली नाजूक पाने तिने जणू लाजबावरी होऊन मिटून घेतली होती असंच वाटत होतं. खरंतर किती साधंसच तिचं रुप, पण श्रीविष्णूंच्या सान्निध्यात ते अधिकच खुललं होतं. ती अधिकच सौंदर्यवती भासत होती. नववधूचे भाव तिच्यावर विलसत होते. खरंतर नववधू तर सध्या वृंदादेवी आहेत. पण तरीही ही आमलकी किती आनंदात दिसत होती. औटघटकेचे तिचे हे सुख, हे सान्निध्य, पण ती अत्यंत समाधानी होती. सीतामाई एकटक तिच्याकडे पहात होत्या. ते रामरायांच्या चतुर नजरेने बरोबर टिपलं. थोडीशी थट्टा करायची लहर त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी एकवार लक्ष्मणाकडेही पाहिलं. पण तो काय बोलणार अशावेळी. तो बिचारा आपले धनुष्य सावरीत स्वस्थ उभा !!

श्रीराम — सीते, हे सीते , अशा एकटक कुठे पाहताय नक्की ? तुमच्याहून रुपाने कुणी सरस आहे की काय ?

सीतामाई – लटके हसत मान वेळावत, “अहो तसंच काही नाही. पण आज ती आमलकी पहा ना कशी अनुपम दिसतेय. आजचा दिवस तिच्या भाग्याचा. हेवा नाही हो आमच्या मनी. आपले एकपत्नी व्रत आम्ही जाणत नाही का ? पण तिचे उजळलेले रुप नेत्रात साठवावे वाटते हो. आज तिला विष्णूंचे सान्निध्य लाभलंय. त्यांचा परीस स्पर्श तिला मिळतोय. त्यांची कृपादृष्टी आज तिच्यावर आहे. समाधान मिळतंय हो ते पाहून.

श्रीराम— सीते हे वैभव तर तिच्या ओटीत तुम्हीच घातलंत ना. तिच्या झाडाखाली विष्णूरुपात पूजा करुन–तेही तुमच्या लक्ष्मीरुपात. आपण उभयतांनी तिथेच वास केला म्हणून तर तिचे माहात्म्य थोर झाले.

सीतामाई— ते सारं स्मरणात आहे हो. पण मी आता वेगळाच विचार करतेय. आपण राम अवतारात १४ वर्षे वनांतरी काढली. आणि त्या गोकुळातल्या कृष्णाने गाईगुरांबरोबर गोपगोपींबरोबर वनविहार केला. दोन्ही अवतारात वनात वास होताच. पण किती फरक पडला ना दोहोंत. कृष्ण अवतारात आपला एकमेकांचा सहवास किती ते जरा आठवावंच लागेल. तुमचा सहवास लाभला तो राधेला आणि वृंदेलाच.

श्रीराम — अवतारलीला होत्या त्या सर्व. पण हा राम मात्र सीतारामच किंवा सीताकांत म्हणून स्मरला जातो हेही सत्य आहे ना–

“ सीताकांत स्मरण जयजयराम “ —  लक्ष्मणाने हळूच जयजयकार करत श्रीरामांना आपले अनुमोदन दर्शवले.

आता यावर सीतामाई निरुत्तर. पण रामांना कोपरखळी मारायचीच होती. त्यांचे लक्ष तितक्यात समोर गेलं. लाडू, पेढे, पोहे, चित्रान्ना, केळी, फुटाणे,- भगवंतासमोर किती ते भोग मांडले जात होते. पाणी फिरवून नैवेद्य दाखवला जात होता. रामराया आशिर्वाद मुद्रेत होते. स्मित हास्य चेहेऱ्यावर उमटत होते. ते पाहून सीतामाई चटकन म्हणाल्या, 

“ अहो ऐकलंत का, तो नैवेद्य कृष्णार्पण आहे बरं. रामराय काय वनवासी, कंदमुळं खाऊन राहिलेले. तुम्हाला कुठला नैवेद्य दाखवायचा हा भक्तांना कायम प्रश्न पडत असावा. त्यामुळे सगळा नैवेद्य कृष्णार्पणच !! आणि हो, इथे श्रीविष्णूसहस्रनाम आवर्तन होणार आहे हे पण ध्यानात असू दे. “  

श्रीराम — “ होय सीते जाणून आहोत ते आम्ही. ‘ सहस्र नाम तत्तुल्य रामनाम वरानने ‘ –  ठाऊक आहे ना.

रामकृष्णहरी हा या युगासाठी अत्यंत सोपा मंत्र आहे. जो हा मंत्र जपेल त्याचे कल्याण होईल. आवर्तन श्रीविष्णूसहस्रनामाचे पण साक्षीला राम आहे हे महत्त्वाचे !!”

सीतामाई — एकवचनी रामाचे कुठलेही वचन कसे हो उणे पडावे. आम्ही निरुत्तर आहोत. तुमच्या बाणांप्रमाणे तुमचे वाक्बाणही अमोघ आहेत हे मान्य आहे आम्हाला.”

श्रीराम -राम अवतारात वनवासी राहिलो. पण कृष्ण अवतारात खरे निसर्ग सान्निध्य मोकळेपणाने अनुभवले. गोपांचा जीवनाधार तो गोवर्धन, त्यावरील वृक्ष राजी, यमुनेचा तो खळाळ अन् तिचे ते धीरगंभीर डोह, यमुना तटावरचा तो कदंब, आवळी, ते वृंदावन, गोधन, वेणूनादाने नादावलेले इतरही पशुपक्षी, हे सारे तर सृष्टीचे भाग. ही विपुल सृष्टी आहे. म्हणून मानवी जीवन समृद्ध आहे. म्हणूनच फक्त गोवर्धन नव्हे तर सर्व सृष्टीचे वर्धन व्हावे आणि अर्थातच पुढील पिढीसाठी संवर्धनही तितकेच महत्वाचे हे जाणून तशा लिला रचल्या. तशा कथा रचल्या आणि त्यातून कालातीत असे संदेश मानव जातीला दिले.” 

सीतामाई — होय त्यासाठी गीतेची निर्मिती झाली. विभूतीयोगाद्वारे आपली विभूती निसर्गाच्या कोणकोणत्या रुपात आहे हे सांगितलंत. तेच मुख्य सूत्र धरुन आपल्या ऋषीमुनींनी सणवारांची रचना केली, असंच म्हणायचं आहे ना ?”

लक्ष्मण — “ मध्येच बोलतोय श्रीरामा. शेषरुपात या पृथ्वीचा भार आम्ही तोलतोय म्हणून जे वाटतंय ते बोलू का–”

सीतामाई — “ अहो भाऊजी, परवानगी  काय हो मागताय? अहो बोलू शकता तुम्ही. तुमचे आमच्यात शाश्वत स्थान आहेच.”

लक्ष्मण — “ मानवाने त्याच्या कल्याणाकरता घालून दिलेल्या परंपरांचे पालन करावे यासाठी खरेतर मीच मनोभावे प्रार्थना करेन. कारण मानवाची चुकीची पावले धरणीला भारभूत होतात. आणि पर्यायाने मलाही.”

श्रीराम– “ अगदी योग्य बोललास लक्ष्मणा ! धर्माचे पालन व रक्षण करण्यासाठी परंपरांचे  आणि पर्यावरणाचेही समजून उमजून जतन हेही महत्त्वाचे. काळाची बदलती पावले ओळखण्याइतका माणूस सूज्ञ आहेच. त्याने फक्त हितकारी मार्गावर पावले टाकत समस्त मानव जातीचे कल्याण साधावे.” 

रामराया कल्याण करायला उत्सुक आहेतच. ते सर्वांच्या हृदयातच स्थित आहेत. ते फक्त ओळखावे आणि ज्याने त्याने आपले कल्याण साधावे.

लेखिका : सौ.प्रिया श्रीनिवास जोग, चिंचवड पुणे

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…2 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ संस्कृत साहित्यातील   स्त्रिया…2 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

सीता

रामायण हा आपल्या संस्कृतीतील एक आदर्श ग्रंथ मानला जातो. आदर्श माता- पती- पत्नी- पिता अशी अनेक नाती येथे आदर्श म्हणून बघितली जातात. आपल्यासमोर सीता म्हणजे केवळ एक आदर्श पत्नी, सून अशाच रुपात उभी केली गेली आहे. पण रामायण आणि संस्कृत साहित्याचा बारकाईने अभ्यास केला तर असे लक्षात येते की सीता तेवढीच कणखर आणि निश्चयी स्त्री होती.

रावणाचा पराभव करून जेव्हा राम सीतेला सोडवतो आणि तिच्यापुढे अग्निदिव्य करण्याचा प्रस्ताव मांडतो त्यावेळी सीता तो प्रस्ताव स्वीकारते पण रामाला सुनावते,“ प्रभू, माझ्यात जे स्त्रीत्व म्हणजे निर्बलत्व आहे त्यावर तुम्ही एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे संशय घेत आहात. पण माझ्यातील सशक्त अशा पत्नीत्वावर तुमचा विश्वास नाही. माझा स्वभाव आणि हृदय नेहमीच  स्थिर आहे आणि तिथे फक्त तुम्हालाच स्थान आहे. भलेही रावणाने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न जरी केला असता तरी माझी तुमच्यावरची भक्ती आणि प्रेम यत्किंचितही कमी झाले नसते. त्यामुळे मनाने मी नेहमीच पवित्र आहे.”

आज समाजामध्ये विनयभंगाची अनेक उदाहरणे दिसत असताना केवळ शारीरिक पवित्र्यावर स्त्रीचे चारित्र्य ठरवले जाते. अशावेळी हजारो वर्षांपूर्वी जन्माला आलेली ही स्त्री सहजपणे एक शाश्वत सत्य सांगून जाते.

अयोध्येत परत आल्यावर काही काळ सुखात घालवल्यावर केवळ एका सामान्य नागरिकाच्या बोलण्यामुळे राम सीतेचा त्याग करतो. आणि तेही अशावेळी जेव्हा तिच्या पोटात त्याचा अंश वाढत असतो. अरण्यात पोहोचेपर्यंत सीतेला याची कल्पनाही नसते. जेव्हा तिला ते समजते त्यावेळी अपमानाने क्रोधीत झालेली सीता तत्क्षणी लक्ष्मणाला विचारते,“ माझ्या अशा अवस्थेत माझा त्याग करणे योग्य आहे? हीच का तुमच्या इक्ष्वाकु वंशाची परंपरा?” त्यानंतर शांत झाल्यावर “हेच आपले प्राक्तन आहे. कदाचित गेल्या जन्मीचे पाप मी या जन्मी फेडत असेन ” असे स्वतःच्या मनाला समजावत ती आलेल्या परिस्थितीला खंबीर मनाने सामोरी जाते.

यातली अन्यायाला विरोध करणारी सीता पदोपदी प्रत्ययास येतेच. पण त्याचबरोबरच समोर आलेल्या संकटाला तितक्याच सक्षमतेने तोंड देणारी सीता तितकीच सामर्थ्यवान वाटते.

सर्वात शेवटी जेव्हा रामाची आणि लव-कुश- सीतेची गाठ पडते आणि राम तिला पुन्हा अयोध्येस नेण्यास उत्सुक असतो तेव्हा ती येण्यास नकार देते.  ज्या ठिकाणी ती राणी म्हणून मानाने वावरलेली असते. ज्या प्रजेवर तिने मनापासून प्रेम केलेले असते. तिच प्रजा तिच्यावर अन्याय होत असताना तिच्या बाजूने उभी रहात नाही. ज्या पतीसाठी, त्याच्यावरील प्रेमासाठी तिनेही चौदा वर्षे वनवासात घालवली त्यानेही तिची उपेक्षाच केली ही खंत कुठेतरी तिच्या मनात असतेच. जिथे  तिच्या आत्मसन्मानाला डावलले गेले तिथे ती पुन्हा पाऊल ठेवत नाही. त्यातून तिचा स्वाभिमान दिसून येतो.

अशाप्रकारे आदर्श सून, आदर्श पत्नी, आदर्श माता असणारी सीता तितकीच निग्रही, स्वाभिमानी आणि अन्यायाविरुद्ध लढणारी सशक्त स्त्री होती.

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares