मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “श्री सुधांशु मनी”… ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनु ष्य ?

☆ “श्री सुधांशु मनी”… ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित  ☆

सुमारे ६ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे , २०१६ची.

रेल्वेचे एक मोठे अधिकारी होते. खूप मोठे. पेशाने इंजीनियर होते. त्यांच्या रिटायरमेंटला केवळ  दोन वर्षे  बाकी होती. सहसा रिटायरमेंटच्या वेळीजेव्हा अंतिम पोस्टिंगची वेळ येते तेव्हा कर्मचार्‍याला त्याची निवड विचारायची पद्धत आहे. पसंतीच्या ठिकाणी अंतिम पोस्टिंग यासाठी की कर्मचार्‍याने आपल्या शेवटच्या दोन वर्षांत आपल्या आवडीने घर वगैरे बनवावे, स्थिर व्हावे. आरामात रहावे. परंतु या अधिकार्‍यानेने आपली अंतिम पोस्टिंग मागितली ICF चेन्नई ला.

ICF म्हणजे Integral Coach Factory, रेल्वेचे डबे बनविण्याचा कारखाना.

 रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने त्यांना विचारले, काय करणार?

ते इंजीनियर म्हणाले, “ आपल्या देशाची स्वतःची सेमी हायस्पीड ट्रेन बनविण्याची इच्छा आहे.” —–

–ही तेव्हाची घटना आहे जेव्हा ताशी १८० किमी धावणारी Spanish Talgo कंपनीच्या डब्यांची चाचणी सुरू होती.

चाचणी सफल होती.. पण ती कंपनी १० डब्यांच्या गाडीसाठी सुमारे २५० कोटी रुपये मागत होती. शिवाय तंत्रज्ञान देण्याचा करारही करत नव्हती. 

अशा परिस्थितीत या इंजीनियरने संकल्प केला की ‘ आपल्याच देशात मी स्वदेशी तंत्रज्ञान वापरून Talgo पेक्षा चांगली गाडी बनवीन. तीही अर्ध्याहून कमी किमतीत.’ 

रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने विचारले, “Are You Sure, We Can Do It ?” 

उत्तर होते… “Yes Sir! “ 

“ किती पैसे लागतील R&D साठी ?” —- “ फक्त १०० कोटी रु सर!” 

रेल्वेने त्यांना ICF मध्ये पोस्टिंग आणि 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिले.

त्या अधिकार्‍याने लगेच रेल्वे इंजीनियर्सची एक टीम उभी केली आणि सर्वजण कामाला लागले. 

दोन वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर  जे निर्दोष प्रॉडक्ट तयार झाले, त्याला आपण ट्रेन १८– म्हणजेच “ वन्दे भारत रॅक” नावाने ओळखतो.

आणि ठाऊक आहे या १८ डब्यांच्या गाडीला खर्च किती लागला? केवळ ९७ कोटी ! जेव्हा की Talgo केवळ १० डब्यांच्या ट्रेनचे २५० कोटी मागत होती.

ट्रेन १८ हा भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासातला निर्दोष असा हिरा आहे.

या गाडीचे वैशिष्ट्य हे आहे की, या गाडीला ओढण्यासाठी कोणत्याही इंजिनाची गरज नाही. कारण हिचा प्रत्येक डबा स्वतःच  ‘ सेल्फ प्रोपेल्ड ‘ आहे, म्हणजे त्या प्रत्येक डब्यात मोटर लावलेली आहे.

दोन वर्षात तयार झालेली पहिली रॅक, वन्दे भारत ट्रेन या नावाने वाराणसी ते नवी दिल्ली धावली.

या यशस्वी इंजीनियरचे नाव आहे सुधांशु मनी. २०१८ मध्येच हे निवृत्त झाले.

या देशात ट्रेन-१८ च्या यशासाठी कुणी या टीमचे कौतुक तर केले नाहीच, परंतु काही दिवसांपूर्वी जेव्हा वन्दे भारत म्हशीला धडकली आणि तिचा समोरचा भाग क्षतिग्रस्त झाला, तेव्हा सर्व वामपंथी आणि देशद्रोही ट्रेनच्या अपयशाच्या नावाने शंख करायला लागले, तेव्हा सुधांशु सरांना दु:ख झाले. आणि त्यांनी एक लेख लिहून त्या ट्रेनच्या डिझाईनची वैशिष्ठ्ये सांगितली…

श्री. मनी  सेवानिवृत्त होऊन सध्या लखनऊला रहात आहेत.

 संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवा तू करतोस ते योग्यच आहे… सौ.शुभांगी देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ देवा तू करतोस ते योग्यच आहे… सौ.शुभांगी देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

आज फ्रीज उघडला तर काय काय त्यात भरलेले. महालक्ष्मी साठी केलेले पुरण ,ओल्या नारळाचे उरलेले सारण, परवा बाप्पांच्या विसर्जनासाठी केलेली वाटली डाळ, असे बरेच उरलेले ठेवलेले.

बाप्पा आले पण येताना काही आणले नाही,अगदी दहा दिवस लागणार माहित असूनही, कपडे नाही,औषधे नाही,अंथरायला नाही, पांघरायला नाही, छत्री,रेनकोट ,अगदी साधा रुमालही नाही.

त्यांना माहीत होत खाली भौतिक सुखाचा सतत विचार करणाऱ्यांनी त्यांची चोख व्यवस्था केली आहे. नसती केली तरी बाप्पा कोणत्याही परिस्थितीत अगदी आनंदात आहेतच.

ते जातांना माझ्याच मनाची घालमेल, की शिदोरी द्यायची बाप्पांना. पुन्हा २१ मोदक केले, डाळ केली. नैवेद्याच्या वाटीत नैवेद्य ठेवला. तेवढाही नेला नाही. पण आले तेव्हा जसे आनंदी होते, प्रसन्न होते, तसेच जातांना होते. डोळ्यातून आशिर्वादाची,समाधानाची झलक दिसत होती.

महालक्ष्मी येण्याआधी तेच झाले. किती ती तयारी. घराची स्वच्छता,आरास करण्यासाठी बाजाराच्या चकरा. महालक्ष्मीसाठी साड्या घेतांना मला आवडल्या म्हणून बाजूला काढलेल्या अजून दोन तीन साड्या. तिच्यासाठी म्हणून दोन आणल्या खऱ्या, पण त्यातही एक मला होतीच….. मग फुलोरा, पुरण, त्या १६ भाज्या,चटण्या, कोशिंबिरी.

आधीच्या खूप पसाऱ्यातून, आधीच्या  कुळाचारातून ,रीतीरीवाजातून, माझ्या मनाच्या घालमेलीनंतर मीच कमी कमी केलेले ,थोडे सुटसुटीत होईल असे पदार्थ, नैवेद्य, त्यात माझा ओतलेला सुगरणपणा……. हे सगळं सगळं करून खूप थकायला झाले. पण त्या महालक्ष्मी आणि त्यांच्या बाळांनी जाताना काहीही नेले नाही, त्या पिटुकल्यांनी जाताना आई जवळ काहीही हट्ट केला नाही. त्याही जाताना भरभरून आशीर्वाद देऊन गेल्या….. कुंकवाच्या करंड्यात मला भासतील असे दोन चिमटीच्या खुणा ठेवून गेल्या. दोन्ही सणांनी खूप खूप आनंद दिला. 

पण आता हा उरलेला मागचा पसारा बघता सहज मनात विचार आला, मला जर कोणी दहा दिवसात किंवा तीनच दिवसात सगळं पटापट आवरून आता चला, बास आता इथले वास्तव्य ,असे जर म्हणाले तर माझे कसे आवरेल?

…… बापरे! हा विचार नुसता मनात आला आणि सर्व ब्रम्हांडच आले डोळ्यासमोर….. 

नुसते थोडा वेळ बाहेर जायचे म्हंटले तरी पाऊस येईल का?—कपडे बाहेर आहेत का?—अन्न झाकलेय का?—

मी बाहेर गेल्यावर गॅसवाला येईल का?—मोबाईल घेतलाय का?——बापरे बाप किती विचार डोक्यात.

साधे  एक दिवस गावाला जायचे म्हंटले तर  मी १० साड्या पलंगभर पसरवून ठेवते. कोणत्या दोन घ्याव्यात ह्यावर माझेच माझे एकमत होत नाही. काही साड्या जाड,जड, फुगणाऱ्या, काही चुरगळणाऱ्या, काही ओल्या झाल्या तर खराब होतील का? असे ढीगभर विचार डोक्यात—-

——मग कायमचे जायचे असेल, त्यात बरोबर काहीच न्यायचे नाही ,आणि दोन, तीन, फारतर दहा दिवसात सगळाच पसारा आवरायचं म्हंटले तर कसे होणार?

परवा त्या सायरस मिस्त्री नावाच्या टाटा कंपनीच्या मोठ्या व्यक्तीला अपघात झाला. केवढा पसारा,केवढे साम्राज्य असेल त्यांचे? किती कोटींची गुंतवणूक, किती कोटींची उलाढाल…  कसं आणि कोणी आवरायचं हे सगळं. त्यांनी जे ठरवले असेल ते तसेच राहिले की मनात….. 

खूप वेळा एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं.

मग कधी कधी वाटते की ह्या पॉलिसीज, इन्शुरन्स, ही संपत्ती, हे खोऱ्याने चोरून लपवून ठेवलेले पैसे, काळे धन, लॉकर्स, शेती, जमिनी, कारखाने, नाव, पद, प्रतिष्ठा, इगो,ह्या सगळ्या सगळ्याला खरंच काय अर्थ आहे?—-

—-तरी माणूस धावतोच आहे, धावतोच आहे ,तोंडाला फेस येईपर्यंत पळतोच आहे ,खोटी खोटी स्वप्न बघतोच आहे, झगमगाटी दुनियेमध्ये रमतोच आहे. कसलाच भरवसा नाही तरी तीन तीन महिन्यांचे रिचार्ज मारतोच आहे.

गाड्या ,फ्लॅट,बुक करतोच आहे—-

—- का ? कशासाठी?

दरवर्षी येणाऱ्या आणि बुद्धीची देवता असणाऱ्या बाप्पाकडून काहीच शिकत नाही. उलट त्या बाप्पांनाच पुन्हा पुन्हा ह्या येण्याजण्याच्या फेऱ्यात अडकवतोय—-

“ गणपती बाप्पा मोरया — पुढच्या वर्षी लवकर या.” –

बाप्पा ही येतात तेही काहीच न घेता, जाताना काहीच न नेता. आणतात फक्त आनंद..देतात फक्त आनंद.

आपणच अडकलो आहोत ह्या चक्रव्यूहात— अडकण्याचे सगळे मार्ग आपण माहित करून घेतलेत. बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला नकोय.

ह्या जीवाचे तंतर काही समजत नाही—

आला सास गेला सास, जिवा तुझं रे तंतर..

अरे जगणं मरण एका सासाच अंतर!

देव कुठे? देव कुठे,आभायाच्या आरपार!

देव कुठे, देव कुठे तुझ्या बुबाया मधी र !

हा आपल्याच बुबुळामधील देव, आपल्याच बुबुळामधील आपल्या प्रेमाचा माणूस, आपल्याला शेवटपर्यंत दिसत नाही.

देव येतात ,देव जातात, आशीर्वाद देतात ,आनंद देतात. प्रत्येक वर्षी तेच ते सांगण्यासाठी येतात. पण तरीही आपल्याला काहीही समजत नाही. देवांच्याकडून, निसर्गाकडून आपल्याला काही शिकवण घ्यायचीच नाही. ते दोघेही नुसते देतच असतात. कसलीच अपेक्षा न ठेवता– पण मुळात आपल्याला समजूनच घ्यायचे नाही.

आपण तर आपल्या आईवडिलांच्याकडून ,आणि आईवडील मुलांच्या कडून अपेक्षा ठेवतात.

एक साडी कुणाला दिली तर तिने चार डबे घासून द्यावे अशीही आपली अपेक्षा असतेच.

गणपती बाप्पा तू बुध्दीची देवता.

लहानपणी रोज आई म्हणून घ्यायची ते आजही आठवतंय— ‘ की देवा मला चांगली बुध्दी दे.’—आता कुणी  हे असे मागणे फारसे  मागताना दिसतच नाही.

मागण्या पण काळानुरूप बदलल्या आहेत. गणपतीकडे तरी तेच मागायचे लोक.

तो येताना बुद्धी आणत असेल वाटायला सोबत… पण कुणी मागितली तर ?

असो. माणसाच्या ह्या सगळ्या वागण्यामुळे त्याने काही प्यादी अजून त्याच्या हातात ठेवली आहेत.

त्याला माहित आहे की ह्या आधाशी माणसाला नेण्याची पूर्व कल्पना दिली, तर काय काय बांधून वर नेईल हा.

तो सगळा विचार करूनच त्याची गणितं संपली की तो काहीच विचारत नाही.–बोलावणे आले की नेतोच.

नाहीतर हा माणसाचा जमवलेला पसारा तीन दिवसात, दहा दिवसात काय, तर कधीच न आवरता येणारा आहे.

तो फक्त ह्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होतो.  बाकी काही नाही.

देवा तू करतोस ते योग्यच आहे.

लेखिका : सौ.शुभांगी देशपांडे

संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ प्रामाणिकपणा रक्तातच असावा लागतो… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ प्रामाणिकपणा रक्तातच असावा लागतो… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

दोनशे रुपयांची उधारी देण्यासाठी केनियाचा खासदार तीस वर्षांनी छत्रपती संभाजी महाराज नगरमधे  येतो…!!

एकीकडे कोट्यवधी रुपये बुडवून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपतींची उदाहरणं समोर असताना, परदेशात स्थायिक असलेली व्यक्ती तीस वर्षापूर्वीची अवघ्या काहीशे रुपयांची उधारी फेडायला भारतात येऊ शकते का? 

या प्रश्नाचं उत्तर कोणीही नकारार्थी देईल. 

मात्र औरंगाबादेतील काशिनाथ गवळी यांची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी केनियाचा रहिवासी तब्बल तीस वर्षांनी भारतात आला. ही गोष्ट आहे केनियाचा खासदार रिचर्ड टोंगी याची.. 

सध्या केनियाचे रहिवासी असलेले रिचर्ड शिक्षणासाठी औरंगाबादेत होते. त्यावेळी परिस्थिती जेमतेम. खायची अडचण असताना एका माणसानं मदत केली. त्याची त्यावेळची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी रिचर्ड तब्बल ३० वर्षांनी परत आले. तब्बल तीस वर्षानंतर झालेली ही भेट या परदेशी पाहुण्यासाठी आणि औरंगाबादेतील काशिनाथ गवळी यांच्यासाठी फारच आगळीवेगळी होती. अगदी सगळ्यांच्याच डोळ्यात या भेटीने अश्रू तरळले आणि प्रामाणिकपणाची एक वेगळी जाणीव या भेटीतून औरंगाबादच्या गवळी कुटुंबीयांना झाली. खासदार रिचर्ड टोंगी आता केनियाच्या संरक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समितीचे उपाध्यक्षही आहेत. रिचर्ड यांचं शिक्षण औरंगाबादेत झालं होतं. मौलाना आझाद कॉलेजमधून त्यांनी व्यवस्थापनाची पदवी घेतली. त्यावेळी ते औरंगाबादेत एकटे रहायचे. खाण्याची-राहण्याची सगळीच अडचण. कॉलेजच्या बाजूलाच असलेल्या वानखेडेनगरमध्ये काशिनाथ गवळी यांचं किराणाचं दुकानं होतं. अनेक परदेशी मुलं त्यावेळी तिथं यायची. रिचर्डही त्यापैकीच एक. रिचर्डना  काशिनाथकाकांनी मदत केली आणि त्यांना रहायला घर मिळालं. इतकंच नाही, तर खाण्यापिण्याच्या वस्तूही ते काशिनाथकाकांच्या दुकानातूनच घ्यायचे. १९८९ मध्ये त्यांनी औरंगाबाद सोडलं त्यावेळी काशिनाथकाकांकडे 200 रुपयांची उधारी बाकी राहिली होती. रिचर्ड मायदेशी परतले. तिकडे राजकारणात जाऊन त्यांनी मोठं पदही मिळवलं, मात्र भारताची आठवण त्यांना कायम यायची. त्यात खास करुन काशिनाथकाका यांनी केलेली मदत आणि त्यांच्या 200 रुपये उधारीची जाणीव त्यांना होती. गेली 30 वर्ष त्यांना भारतात यायला जमलं नाही, 

मात्र काही दिवसांपूर्वी केनिया सरकारच्या एका शिष्टमंडळासोबत रिचर्ड भारतात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर त्यांची पावलं आपसूकच औरंगाबादकडे वळली आणि त्यांनी शोध घेतला तो काशिनाथकाकांचा. तब्बल दोन दिवस त्यांनी काकांना शोधलं आणि अखेर त्यांची भेट झाली. ही भेट रिचर्डसाठी जणू डोळ्यात पाणी आणणारी ठरली. काकांना पाहून ते रडायला लागले. खरंतरं काकांच्या नीटसं लक्षातही नव्हतं. मात्र रिचर्डने ओळख दिली आणि काकांना सगळं आठवलं. ही भेट म्हणजे अनेक वर्षांची प्रतीक्षा फळाला आल्याचं रिचर्डने सांगितलं. आणि पैसै परत करण्याचा प्रामाणिकपणा सुद्धा भारतानेच शिकवला असल्याचंही ते आवर्जून सांगतात. 

“ काकांनी त्यावेळी मदत केली, त्यांचे फार उपकार माझ्यावर आहेत, अनेक वर्ष त्यांच्या कर्जाची परतफेड कशी करु, हे सुचत नव्हतं. मात्र यावेळी भारतात आलो आणि थेट त्यांचं घरचं गाठलं. त्यांना भेटून आनंद झाला, पैसे परत करणं हा प्रामाणिकपणा आहे, असं लोक म्हणतात, मात्र हे मी या देशातच शिकलोय याचा अभिमान आहे, अशा शब्दात रिचर्डने आपल्या भावना व्यक्त केल्या.” 

‘ अनेक वर्ष रिचर्ड गवळी कुटुंबाबद्दल सांगत होते, मात्र भेट काही शक्य होत नव्हती. अखेर यावेळी ती झाली, याचा रिचर्डना आनंद आहेच, मात्र मलाही अभिमान असल्याचं’  रिचर्डची पत्नी मिशेल टोंगी यांनी सांगितलं. “काशिनाथकाकांचा उल्लेख त्याने बरेच वेळा केला होता, मात्र आज भेट झाल्याचा आनंद वाटला.’  नवऱ्याच्या प्रामाणिकपणाचा निश्चितच अभिमान असल्याचं मिशेल म्हणतात.

काशिनाथ गवळी यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात टोंगी दाम्पत्याचं स्वागत केलं. मराठमोठ्या पद्धतीनं टॉवेल-टोपी आणि साडी देऊन त्यांनी दोघांचा सत्कार केला. रिचर्डने त्यांच्या घरी जेवणही केलं. अजूनही काशिनाथरावांचं प्रेम कायम असल्याची भावना रिचर्डने व्यक्त केली. त्यांनी काशिनाथकाकांना केनियाला येण्याचं आमंत्रणही दिलं आहे.

प्रामाणिकपणा कोणी कोणाला शिकवू शकत नाही, तो रक्तातच असावा लागतो, हेच खरं. 

लेखक : अज्ञात

संग्राहिका – माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ परतीचा फराळ… अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

? वाचताना वेचलेले ?

🍃 परतीचा फराळ… अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

परतीचा पाऊस असतो तसा परतीचा फराळही असतो.आठवणी देऊन जाणारा आणि जाताजाता हुरहूर लावणारा …!

घराघरात कुशल गृहीणी आता डब्यांची अदलाबदल करुन संपुर्ण घराला कन्फ्युज करायला सुरुवात करतात.मोठ्या डब्यांमधला फराळ लहान डब्यात शिफ्ट होतो. निवडणुका संपल्यावर नेतेमंडळी दिसत नाहीत तसा कालपर्यंत समोर असलेला फराळ आता शोधावा लागतो.

ओल्या नारळाच्या करंज्या एखाद्या सौंदर्यसाम्राज्ञीने आलिशान कारमधे बसून नीट दर्शनही न देता वेगानं निघून जावं तशा केल्या आणि संपल्या सुध्दा अशा गायब होतात.

चकलीच्या डब्यावर सगळयांचाच डोळा असतो पण शेवटची चकली खाताना होणारा आनंद प्रचंड असतो ती खाल्ल्यावर डबा घासायला न टाकता झाकण लावून तो तसाच ठेवणा-याला फसवणे आणि अपेक्षाभंग करणे या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी असं माझं मत आहे.

पाहुण्यांसाठी मागच्या रांगेत लाडवाचा डबा लपवला जातो कारण लहानपणापासून दिवाळी झाल्यानंतर महत्वाचे फराळाचे पदार्थ संपल्याचे कळताच येणारे पाहुणे हा एक खास वर्ग आहे हे पटलंय.

प्रत्येक फराळाच्या पदार्थाची एक एक्सपायरी डेट असते ती गृहीणींना अचूक माहीती असते ईतके दिवस विचारावे लागणारे चकलीच्या डब्यासारखे मौल्यवान डबे सहज उपलब्ध होत समोर दिसू लागले की भोळीभाबडी जनता उगाच आनंदून जाते पण त्यामागे एक्सपायरी डेटचं राजकारण असतं.

डब्यात तळाला गेलेल्या शंकरपाळयांचा डबा चहा केल्यावर मुद्दाम समोर ठेवला जातो कारण त्याचीही एक्सपायरी डेट जवळ येत असते.

जास्त मीठ मसाला तळाशी असलेला दाणे संपत चाललेला चिवडा कांदा- टाॅमेटो -कोथिंबीरीचा मेकअप करुन समोर येतो. मिसळीचा बेत आखला जातो.

शेव हा प्रकार कधी संपवावा लागत नाही तो संपतो पोहे उपमा करुन त्यावर सजावटीसाठी वापरली जात ती संपते.

असा हा ‘परतीचा फराळ’ दिवाळीच्या आठवणींचा… रिकाम्या कुपीतल्या अत्तराच्या सुगंधासारखा…जिभेवर रेंगाळणा-या चवीचा… जाताजाता पुढच्या वर्षी पुन्हा एकत्र धमाल  करु म्हणत एकमेकांचा निरोप घेत डब्यातून बाहेर पडणारा… गृहिणीला केल्याचं समाधान- कौतुक देणारा…आणि शेवटी शेवटी संपत जाताना आणखी चविष्ट होत जाणारा … परतीचा फराळ

हो आणि एक राहीलंच घरोघरी ताटं यायची घरोघरी ताटं जायची.

त्यात घरोघरच्या चकल्या कडबोळ्या काही कडक काही तिखट काही खुसखुशीत तर काही वातड पण सगळ्यांना मुक्ती मिळायची ताकाच्या झणझणीत कढीत समाधी मिळायची. एक वेगळीच सबगोलंकारी चव यायची जठराग्नीची तृप्ती व्हायची.

काही फुकट जाण्याचा विषयच नसायचा.

अन्नब्रह्माची किंमत असायची

🙏

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खाद्यसंस्कृती ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ खाद्यसंस्कृती ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

दिवाळी तशी आटोपून गेली तरी अजून फराळाचे डबे गच्च भरलेले आहेतच. आम्हां बायकांची एक गम्मतच असते एकीकडे वजन वाढतयं म्हणून काळजीत पडतो आणि एकीकडे खाद्यपदार्थांच्या डब्यांची शीग उतरु मुळी देत नाही. खरचं आपली खाद्यसंस्कृती आहे मोठी विलक्षण.

ह्या खाद्ययात्रेत दोन गट पडतात . एक गट तब्येतीनं खाणा-यांचा आणि एक गट भरभरून खाऊ घालणा-यांचा. आग्रहाने खाऊ घालणा-या तमाम लोकांना सलाम आणि त्यांच्या पदार्थांना न्याय देणा-या, अन्नदात्यांना “सुखी भव”असा आशिर्वाद देणा-यांनांपण सलाम.

एक नोव्हेंबर. नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस,पहिली तारीख. ही एक तारीख पुर्वी नोकरदारांसाठी फार महत्त्वाची असायची. आजचा हा दिवस “जागतिक शाकाहार दिन” म्हणून ओळखल्या जातो.

कुठल्याही व्यक्तीची आहाराविषयी आवडनिवड ही त्याच्या रहिवासाच्या भोवताली असणारी भौगोलिक परिस्थिती, हवामान तसेच आजुबाजुचे वातावरण, लहानपणापासूनच्या सवयी,मनावर असलेला पगडा ह्यावर अवलंबून असते. खरं सांगायचं तर ज्या गावातून, घरातून, संस्कृतीतून,संस्कारांमधून आम्ही मोठे झालो, घडलो त्यात लहानपणी तर शाकाहाराशिवाय दुसरा कुठला आहार असतो हे आमच्या गावीही नव्हंतं.किंबहुना शाकाहाराशिवाय दुसरा कुठला सामिष आहार असतो ही गोष्ट लहानपणीच्या आकलनशक्ती पलीकडील बाब होती.

पुढे हळूहळू वयाची शाळकरी फेज पार करतांना विज्ञानाचा अभ्यास करतांना “जीवनसाखळी”ची संकल्पना वाचनात आली, आणि मग सामिष आहार हा आपण घेत नसलो तरी तो आहार निषीद्ध नसून उलटपक्षी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक सुद्धा असतो ही नवी बाब कळली. जीवनसाखळी सुरळीत सुरू राहण्यासाठी मी जरी शाकाहारी असले तरी सामिष आहार घेणारे पण भरपूर लोक असतात हे मैत्रिणींच्या बरोबर गप्पांच्या ओघातून कळले.

आपली शाकाहारी खाद्यसंस्कृती होते पण एक अफाट खाद्यसंस्कृती आहे हे नक्की. खरतरं फक्त शाकाहारी आणि दोन्ही प्रकारचा आहार घेणाऱ्यांमध्ये कोण चूक कोण बरोबर हा मुद्दाच नसतो मुळी.कारण मानवाला नुसते उदरभरण म्हणून अन्न सेवन करायचं नसतं तरं त्याचबरोबर “जिव्हा”याने की “रसना”तिलापण प्रसन्न, तृप्त ठेवायचं असतं.आणि प्रत्येक व्यक्तीचे जीभेचे चोचले हे वेगवेगळे असूच शकतात. फक्त खाणं असो वा बोलणं, आपली जिव्हा ही आपल्याच ताब्यात हवी हे मात्र नक्की.

मी स्वतः संपूर्णपणे शाकाहारी असले तरी वेगवेगळे सामिष, पौष्टिक पदार्थ खाणा-या दर्दी मंडळींचं मला प्रचंड कौतुक वाटतं.खरी दर्दी मत्स्यप्रेमी,मांसाहारी मंडळी डोळेमिटून कुठल्या प्राणीजातीचा आहार आपण घेतोय हे छातीठोक सांगू शकतात त्यांच्या खव्वैयेगिरीला आणि अभ्यासाला सलाम.

शाकाहारी मंडळींमध्ये एकच प्रकार असतो  परंतु मासांहारी मंडळींमध्ये वेगवेगळे प्रकार असतात,एक बेधडक सामिष आहार घेतो हे सांगणारे आणि दुसरे लपूनछपून खाणारे. असो

पु.ल.देशपांडे ह्यांची खाद्यसंस्कृती वाचली की शाकाहाराचा आवाका किती मोठा,प्रचंड आहे ह्याची कल्पना येते.मी तर पु.ल.चं खाद्यसंस्कृती वाचल्यानंतर प्रत्येक वाचनानंतर मला काहीतरी दरवेळी वाचन हाती लागतं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भगवंत सगळे बघत असतो… ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ भगवंत सगळे बघत असतो… ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

महेशचं घर एका देवळासमोर होतं. पहाटेच लोक मंदिरात यायला लागायचे. एक दिवस महेश उठून पाहतो तर काय, रस्त्यावर असलेल्या त्याच्या गाडीला मागून कोणीतरी धडक दिलेली होती.

चडफडत महेश गाडीजवळ गेला, किती नुकसान झालंय ते बघायला.  तर काचेवर एक चिठ्ठी अडकवलेली होती. त्या चिठ्ठीवर एक नाव आणि फोन नंबर लिहिलेला होता, आणि फोन करण्यास सांगितले होते.

त्याने त्या नंबरवर फोन लावला. 

पलीकडचा माणूस म्हणाला, ‘‘ मी वाटच पाहत होतो तुमच्या फोनची. तुमच्या गाडीला धडक देणारा मीच. 

मी काकड आरती करून बाहेर आलो. चुकीचा गियर पडल्यामुळे गाडी मागे जायच्याऐवजी पुढे गेली आणि तुमच्या गाडीवर आदळली. पहाटे तुम्हाला त्रास द्यायला नको म्हणून चिठ्ठी ठेवली. मी तुमचं सगळं नुकसान भरून देतो.’’

त्याने सगळं नुकसान भरूनही दिलं, आणि तो माफीही मागत होता. 

महेशला काही राहवेना. त्याने विचारलं, ‘‘ तुम्हाला धडक देताना कोणीही पाहिलं नव्हतं. आपणहून कबूल कसं काय केलंत? हे सगळं टाळू शकला असतात.”

यावर तो माणूस म्हणाला…

“कोणी बघत नव्हतं कसं? भगवंत सगळं बघत असतो आणि रोज पहाटे दर्शन घेऊन माझ्या अंगात एवढाही प्रामाणिकपणा नसेल तर— तर माझ्यासारख्या माणसाला मंदिरात जाण्याचा काय अधिकार? “ 

संग्राहक : श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गूढ असं बरंच कांही… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ गूढ असं बरंच कांही… ☆ श्री अरविंद लिमये ☆

स्वप्न म्हंटलं किं ‘मुंगेरीलालके हसीन सपने’ आठवणं सहाजिकच आहे.पण ‘स्वप्न’ म्हणजे फक्त तेवढंच नव्हे.मुंगेरीलालसारखे दिवास्वप्ने पहाणारे जसे आहेत तसेच आयुष्यातलं नेमकं उद्दीष्ट ठरवून त्यादिशेने प्रदीर्घकाळ अथक, प्रयत्न न् कष्ट करीत ध्येय प्राप्तीनंतरचा स्वप्नपूर्तीचा कधीच न विरणारा आनंद मिळवणारे आणि जपणारेही आहेतच. दिवास्वप्नं पहात स्वप्नरंजनात मश्गूल रहाणाऱ्यांबाबतची किंव आणि स्वप्नपूर्तीसाठी जीवाचं रान करणाऱ्यांबद्दलचा कौतुकमिश्रित आदर यांना निमित्त होणाऱ्या स्वप्नांच्या या दोन रुपांमधे गूढ असं कांहीच नाहीय.पण प्रत्येकालाच सुप्तावस्थेत दिसणाऱ्या स्वप्नांमधे मात्र कधीच थांग न लागणारं गूढ ठासून भरलेलं आहं.ती स्वप्ने हेच एक गूढ विश्व आहे. जाणवतं, दिसतं.. पण ते जसंच्या तसं इतरांना त्याचवेळी दाखवता मात्र येत नाही. ते खास ज्याचं त्याचंच असतं. त्या क्षणांपुरतं त्याच्यासाठी अगदी खरं..तरीही तो एक भासच.भास-आभासाचा चकवा देत रहाणारा एक खेळ!

‘स्वप्न’ मला एखाद्या भरकटत गेलेल्या नाटक किंवा सिनेमासारखं वाटतं.बघताना त्यात गुंतत जात असलो तरी त्यातून बाहेर पडल्यावर न पटणारं, असंबद्ध, अविश्वसनीय सगळं कृत्रिम,तद्दन काल्पनिक, कशाचा कशाला मेळ नसणारं असं काहीसं वाटत रहाणारं..!

खरंतर स्वप्न एखाद्या नाटक किंवा सिनेमातल्या प्रसंगांच्या विखुरलेल्या तुकड्यांसारखंच तर असतं.आपल्या मन:पटलाच्या रंगभूमीवर दिसणारं नाटक किंवा मन:पटलाच्या पडद्यावर दिसणाऱ्या सिनेमासारखं..!स्वप्न आपण समोर बसून नाटक-सिनेमासारखं पहातही असतो आणि अकल्पितपणे त्याचाच एक भाग बनून स्वतः त्यात भूमिकाही करत असतो. तरीही आपला स्वतःचाच मन:पटलावरचा आपलाच वावर समोर बसून पहावा तसं पाहूही शकत असतो.सगळंच गूढ.. अतर्क्य..!

हे स्वप्न पडणं जसं तसंच त्यांचं विरणंही तितकंच गूढ!त्याचा थांगच लागू नये असं.मला स्वतःला आजपर्यंत पडलेल्या असंख्य स्वप्नांपैकी अगदी मोजकीच स्वप्ने आज आठवतात हे जसे , तसेच इतर न आठवणाऱ्या स्वप्नांचे विरुन जाणेही मला अनाकलनीय वाटतं आलंय हेही खरेच.स्वप्न पहात असताना त्यातले सगळेच घटना-प्रसंग एखाद्या वास्तव क्षणांसारखे अनुभवत असताना त्या क्षणी मनाला झालेल्या त्या स्वप्न-घटनादृश्यांच्या स्पर्शांची जाणिव, त्या स्पर्शांमधला त्या त्या वेळचा दिलासा,आनंद किंवा दुःख, वेदना,थरारही लख्ख जाणवत राहिलेला पुढे बराच वेळ. पण दचकून जाग येताच कुणालातरी ते स्वप्न, तो अनुभव सांगावं असं उत्कटतेने वाटत असतानाच जादूची कांडी फिरावी तसं सगळंच विरून गेलेलं..! हे विरुन जातंच कसं आणि कुठे हे प्रश्नही स्वप्ने कां आणि कशी पडतात या प्रश्नांसारखीच अनुत्तरीत, अनाकलनीयच! या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं काम मानसशास्त्रीय संशोधनाद्वारे अखंडपणे सुरु आहेही.पण ‘आपल्या मनातल्या सुप्त इच्छा,भावनांचा कल्लोळ, दडपणं,नैराश्य,अस्वस्थ करणारे त्रासदायक विचार..असं सगळ्याचं आपल्या सुप्तावस्थेत चित्रभाषेत प्रकट होणं म्हणजे स्वप्न’ यासारखे आजवरच्या संशोधनाचे निष्कर्ष मला तरी अनेक शक्यतांपैकी फक्त एक शक्यता आहे असेच वाटते. एखाद्या हिमनगाचे टोक दिसावे तसे न् तेवढेच.स्वप्नाच्या गूढ अर्थांच्या एका सूक्ष्म कणाएवढे!कारण स्वप्नांच्या इतर अतर्क्य, सूचक,प्रेरणादायी,दृष्टांतसदृश स्वप्न-प्रकारांचा थांग या निष्कर्षानंतरही अद्याप कुणालाच लागलेला नाहीय.अगदी तो अनुभव,त्यातली उत्कटता ज्याने स्वतः अनुभवलीय त्यालाही नाही.

या अतर्क्य अशा सूचक स्वप्नांचा मी स्वतःही अनुभव घेतलेला आहे.अतिशय उत्कट आनंदानुभव दिलेले ते क्षण आणि त्यातील बारकाव्यांसकट ते मोजके स्वप्नानुभवही मी इतक्या वर्षांनंतरही विसरु शकत नाहीय..!आणि तरीही त्यामागील गूढ मात्र अथक प्रयत्नांनंतरही मला उकललेलं नाहीय.निदान ते उकलेपर्यंततरी ‘स्वप्न’ म्हणजे अतिशय गूढ असं बरंच कांही.. असंच म्हणावं लागेल.

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मानवी सवय…(एक खरी गोष्ट)☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ मानवी सवय…(एक खरी गोष्ट)☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

एक महिला आहे जयपूरमध्ये, ती PG ( पेइंग गेस्ट ) ठेवते. त्यांचे वडिलोपार्जित घर आहे, ज्यामध्ये मोठ्या १०-१२ खोल्या आहेत. 3 बेड प्रत्येक खोलीत ठेवल्या आहेत. त्यांच्या पीजीमध्ये जेवणही उपलब्ध आहे.

त्या मनापासून स्वयंपाक करतात. खाणाऱ्यांनाही ते आवडते. इतके उत्तम की सर्वोत्तम शेफला बनवता येणार नाही. नोकरदार लोक आणि विद्यार्थी त्यांच्या PG मध्ये राहात.

प्रत्येकजण सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण घेई, ज्यांना गरज आहे त्यांना दुपारचे जेवण पॅक करून मिळे.

पण त्यांचा एक विचित्र नियम आहे, प्रत्येक महिन्यात फक्त 28 दिवस अन्न शिजवले जाई, उर्वरित 2 किंवा 3 दिवस स्वयंपाकघर बंद. ते दिवस हॉटेलात खा अथवा काहीही करा, पण बाहेर. 

मी विचारले, “ हे का ? किती विचित्र नियम आहे हा. तुमचे स्वयंपाकघर फक्त २८ दिवसच का ?”

“ आमचा नियमच आहे. म्हणूनच आम्ही फक्त २८ दिवसांसाठीच जेवणाचे पैसे घेतो. “ 

मी म्हणालो, “ हा काय विचित्र नियम आहे ? आपणच बनवला आहे, मग नियम बदला.”

ती म्हणाली, “ नाही. नियम हा नियम असतो.”

एके दिवशी मी त्यांना पुन्हा चिडवले, २८ दिवसांच्या त्या विचित्र नियमावर.

त्यादिवशी ती बोलली आणि म्हणाली, “ तुला समजणार नाही भाऊ, सुरुवातीला हा नियम नव्हता. मी खूप प्रेमाने असा स्वयंपाक करून खायला घालत असे. पण त्यांच्या तक्रारी कधी संपतच नसत. कधी ही उणीव, कधी ती उणीव, नेहमी असमाधानी आणी नेहमी टीका…… त्यामुळे वैतागून हा नियम केला. २८ दिवस प्रेमाने खायला द्या आणि उरलेले 2-3 दिवस बाहेरचे खा. आता त्या ३ दिवसात नानी आठवते. मैदा आणि मसूर यांचे भाव कळतात. बाहेर किती महाग आणि तरीही निकृष्ट अन्न मिळते हे कळते. चहाचे दोन घोट १५ ते 20 रुपयांना मिळतात.—- माझे मूल्य त्यांना या ३ दिवसांतच कळते, त्यामुळे उरलेले २८ दिवस अतिशय नरम राहतात.” 

खरंय — जास्त आरामाची व आयत्याची सवय माणसाला असमाधानी आणि आळशी बनवते.

अशीच परिस्थिती देशात राहणार्‍या काही जनतेची देखील आहे, ज्यांना देशाच्या प्रत्येक परिस्थितीत नेहमीच काही उणिवा दिसतात. अशा लोकांच्या मते देशात काहीही सकारात्मक घडले नाही, होत नाही आणि होणारही नाही.

अशा लोकांनी काही दिवस पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा श्रीलंकेत घालवावे, जेणेकरून त्यांची बुद्धी बरोबर ठिकाणावर येईल. 

संग्राहक : विनय गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ इंजिन ऑइल बदला…. श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

? विविधा  ?

☆  इंजिन ऑइल बदला… श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆  

“ओ ताई, तुम्ही त्याला काही देऊ नका. ह्यांची सवयच आहे दिवसभर भीक मागत फिरण्याची.. वर्षानुवर्षे भीक मागत फिरतात, पण काम करत नाहीत, कष्ट करत नाहीत. काम करायचा आळस असतो. आयते पैसे मिळत असतील तर कोण कशाला कष्ट करेल?” तो दुकानदार माझ्या बायकोला सांगत होता. आणि तिच्या सोबत असलेला माझा साडेतीन वर्षांचा मुलगा मात्र “आपण त्या बाळाला बिस्कीट देऊया” असा आग्रह करत होता. 

असे प्रसंग खरंच खूप कठीण असतात. कोणत्याही स्वार्थाशिवाय किंवा मतलबीपणाशिवाय आपली मुलं आपल्याकडं दुसऱ्याच कुणासाठी तरी काही मागतात तेव्हा फार कौतुक वाटतं आणि भरूनही येतं.

पूर्वानं त्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि ती त्यांना म्हणाली, “दादा, तुम्हीच त्यांना काही काम का देत नाही?” 

त्यावर तो लगेच म्हणाला, “असल्या भिकरड्याला कोण काम देणार हो?” 

“हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. त्यांनी काहीतरी काम केलं पाहिजे असं तुम्ही जोरात म्हणणार आणि त्यांना काम द्या म्हटलं की मागे फिरणार. या माणसांना कुणीच काम दिलं नाही तर ही माणसं भीक मागण्याशिवाय दुसरं करणार तरी काय?” ती म्हणाली. 

“पण हे सरकारचं काम आहे. माझं नाही.” 

“जर ते सरकारचं काम असेल तर मग तुम्ही या माणसांना वाटेल तसं बोलणं बंद केलं पाहिजे, कारण ते तरी तुमचं काम कुठं आहे? तुमच्या व्यवसायाव्यतिरिक्त तुम्ही इतर कुणालाही काहीही उलट सुलट बोलू शकत नाही. कुणाला काही बोलायचं असेल तर ते सरकार बोलेल.” ती शांतपणे आणि तितक्याच ठामपणे म्हणाली. समोरच्या दुकानदाराचे डोळे टोमॅटोसारखे लाल झाले. 

“तुम्ही मला शिकवू नका. हे माझं दुकान आहे, मी कुणालाही काहीही बोलेन. तुम्ही ते सांगू नका.” तो रागाने म्हणाला. 

“हा आपला देश आहे. या देशातल्या कुणाही माणसाला तुम्ही विनाकारण काहिही बोलू शकत नाही.” ती म्हणाली. 

हा माझा पण देश आहे. मग काय मी भिकाऱ्याला काम देत बसू काय?” दुकानदार.

“हा तुमचा पण देश आहे ना? मग जसा मला सल्ला दिलात, तसा लोकांना सल्ला का देत नाही तुम्ही? ‘ मॅगी खाऊ नका, मैद्याचे पदार्थ खाऊ नका, चायनीज गोष्टी वापरू नका’ वगैरे वगैरे..?” ती. 

“असं सांगत बसलो तर धंदा बुडेल माझा. लोक या गोष्टी घेतात म्हणून तर धंदा चालतो आमचा. हे खाऊ नका असं मी लोकांना कसं म्हणू?” दुकानदार.

“म्हणजे तुमच्या फायद्यासाठी लोकांच्या प्रकृतीला हानिकारक असलेल्या गोष्टी तुम्ही विकणार आणि नफा मिळवणार. बरोबर ना?” ती.

“मग तसे सगळेच वागतात. मी एकटाच नाहीये.” तो म्हणाला. एव्हाना काऊंटर वर आठ- दहा आणि रस्त्यावर आठ – दहा माणसं गोळा झाली होती. 

“हे बघा दादा, त्या माणसाचा प्रश्न सुटावा यासाठी तुम्ही काय केलंत? तुम्ही काहीच केलं नाहीत आणि वर तो माणूस गुन्हेगार असल्यासारखं बोलताय.” ती. 

“हो मग.. ही माणसं अशीच असतात. त्यांच्या बद्दल चांगलं बोलावं अशी त्यांची लायकी तरी आहे का?” दुकानदार. 

“अहो, भिकारी म्हणजे चोर – दरोडेखोर नव्हे. त्याचं पोट भरण्यासाठी तो तुमच्याकडे पैसे मागतो. तुमची इस्टेट मागत नाही. तुम्ही दिलेल्या पैशातून तो सोनं-चांदी घेत नाही, मॉलमध्ये जात नाही, फॉरेन टूरला जात नाही. पण तुम्ही त्याची पार लायकीच काढलीत. हे चुकीचं आहे. माझी तुमच्या दुकानातली ही शेवटची खरेदी.” असं म्हणून ती बाहेर निघून आली. तिनं त्या बाहेरच्या माणसाला दोन फरसाणचे पुडे दिले आणि घरी आली. 

घरी आल्यावर मुलानं मला “आईचं दुकानात भांडण झालं बघा” अशी बातमी लगेच सांगितली. त्याला आम्ही अजून भीक आणि भिकारी या दोन्ही संकल्पना शिकवलेल्या नाहीत. ज्या लोकांकडे काम नसतं, पैसे नसतात, राहायला घर नसतं, अशी माणसं रस्त्यावर वगैरे राहतात आणि भूक लागली की लोकांकडे पैसे मागतात किंवा खायला अन्न मागतात, एवढंच त्याला शिकवलं आहे. त्यामुळं, भिकारी हे प्रकरण “खूप भूक लागलेला आणि खिशात पैसे नसलेला माणूस” एवढंच त्याच्या लेखी आहे. म्हणूनच, तो बावरून गेला होता. एखाद्या माणसाला आईनं खायला दिलं तर त्यात भांडण करण्यासारखं काय आहे, हेच त्याला समजत नव्हतं. पुष्कळ समजावून सांगितल्यानंतर तो शांत झाला. 

पण या निमित्तानं एक जाणीव मात्र आणखी घट्ट झाली की, काळ वाऱ्याच्या वेगानं बदलत असला आणि दिवसेंदिवस जग अधिकाधिक व्यावहारिक होत असलं तरीही लहान मुलांच्या मनांमध्ये माणसांविषयीचं प्रेम, आस्था, आपुलकी उपजत असते आणि ती जाणवते. आपण जितके रुक्ष, आणि व्यावहारिक कोरडेपणाने वागू त्याचंच अनुकरण मुलं करतात आणि आपसूकच तिही तशीच होतात. 

यंदा दिवाळीच्या खरेदी दरम्यान असं जाणवलं की, लहान मुलांना सामाजिक भान फार उत्तम असतं आणि ते बऱ्यापैकी नैसर्गिक असतं. मुलं काही समोरच्या मुलाला पैसे द्या असं म्हणत नाहीत. आपण त्याला खाऊ देऊ, खेळणी देऊ असं म्हणतात. पैसा हा मुद्दा त्यांच्या लेखी नसतोच. 

“स्वतःच फुगे विकणारे काका- काकू त्यांच्या मुलाला फुगा का देत नाहीत?” या प्रश्नाचं उत्तर देणं फार कठीण असतं. डी मार्ट मध्ये पॉपकॉर्न काऊंटर वरच्या काकांना त्यानं प्रश्न विचारला होता की, “तुमच्या बाळाला तुम्ही पॉपकॉर्न नेता का?” त्यावेळी त्या समोरच्या माणसाचा निरुत्तर झालेला चेहरा मी वाचला आहे. अशावेळी अंगावर काटा येतो. पण माझ्या मुलानं आईला दोन पुडे घ्यायला लावले आणि एक त्या माणसाच्या हातात दिला, त्यांच्या बाळासाठी…! अनेकदा लहान मुलं अशी काही व्यक्त होतात की, ती लहान आहेत यावर विश्वासच बसत नाही. 

रस्त्यावरून जाताना कुठं एखादा अपघात झालेला दिसला की, मोठी माणसं नुसतंच पाहून निघून जातात किंवा कित्येकजण तर बघतही नाहीत. पण लहान मुलं “आपण त्या काकांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊया” म्हणून मागं लागतात. आणि आपण मात्र ‘कुठं ही नसती उठाठेव करा आणि ब्याद मागं लावून घ्या’ असं स्वतःशीच म्हणत पुढं निघून जातो. 

मुलांना नुसतं “सॉरी, थँक यू किंवा एक्सक्यूज मी” एवढं म्हणायला शिकवणं म्हणजे सामाजिक शिष्टाचार शिकवणं नसतं. माणूस म्हणून जगावं कसं, हे त्यांना प्रत्यक्ष आचरणातून शिकवावं लागतं. मुलांची भावनिक बुद्धिमत्ता लहान वयात फार उत्तम असते. त्यामुळं, आपल्या आचरणातला फोलपणा, दुटप्पीपणा, ढोंगीपणा मुलं लगेच व्यवस्थित ओळखतात. आपले आईवडील आपल्याला शिकवताना वेगळं शिकवतात आणि स्वतः वागताना मात्र वेगळंच वागतात, हे मुलांना पटकन समजतं. 

ज्या मुलाला रस्त्यावरच्या कुत्र्याच्या पिल्लाला भूक लागली आहे हे समजतं, त्याला काहीतरी खाऊ घालावं असं त्याला वाटतं, त्या पिल्लाला आपण घरी घेऊन यावं असं वाटतं, त्या मुलाला ‘काहीच समजत नाही’ असं कसं म्हणावं? उलट त्यांनाच खरं तर जे समजायला हवं ते नेमकं समजत असतं. 

कितीतरी गोष्टी मुलांना आवडत नाहीत. त्यांना सिगारेट ओढणारी माणसं आवडत नाहीत, रस्त्यांवर पचापच थुंकणारी माणसं किंवा घाणेरड्या शिव्या देणारी माणसं आवडत नाहीत. शू किंवा शी लागली की रस्त्यातच भिंतीशी जाणं तर त्यांना अजिबातच आवडत नाही. पण तरीही हे सगळं आपण एक समाज म्हणून त्यांना स्विकारायला लावतो. हे आपलं चुकत नाही का? 

मुलांचे डोळे आणि कान अत्यंत तीक्ष्ण असतात आणि सदैव तत्पर असतात हे सगळ्या समाजानंच कायमचं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. समाजातल्या एकाही मुलावर चुकीच्या गोष्टींचा प्रभाव पडता कामा नये, उलटपक्षी त्यांच्या जडणघडणीसाठी सर्वार्थाने उत्तम सामाजिक वातावरण आपण राखलंच पाहिजे, ह्या जाणिवेची आवश्यकता आहे. आणि आपण आपल्या मुलांना योग्य ते सामाजिक वातावरण देण्यात अपयशी ठरत आहोत हीच वस्तुस्थिती आहे. 

काही दिवसांपूर्वीच माझ्या शेजारच्या मुलानं त्याच्या शिक्षिका असणाऱ्या बाईंचे बिकिनी मधले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेले मला दाखवले होते. त्यात एका फोटोत तर त्या बाईंच्या हातात भरलेला ग्लास देखील होता. स्वतःचे बिकिनी घातलेले आणि दारू पितानाचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट करण्याची इतकी हौस असणाऱ्या बाईंनी प्राथमिक शिक्षिका होऊच नये असं मला प्रामाणिकपणे वाटलं. त्यांनी मॉडेलिंगच करायला हवं. 

इतकंच काय, मी स्वतःसुद्धा अनेक शिक्षकांना समाजात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना, मद्यपान करताना पाहिलेलं आहे. कित्येक शिक्षकांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर विचित्र पोस्ट पाहिल्या आहेत. विविध ऐतिहासिक ठिकाणी, गडकोटांवर मुलांच्या सहली घेऊन आलेल्या कितीतरी महिला शिक्षिकांना तोकड्या कपड्यात पाहण्याची वेळ आली आहे. हे सगळं मुलांवर कोणते प्रभाव पाडणार आहे, याची जाणीव माणसांना नसते का? असा प्रश्न पडतो. 

ऐन वसुबारसेच्या संध्याकाळी आम्ही सवत्स धेनू पूजा करून येत असताना, माझे दोन-तीन वर्गमित्र सहकुटुंब – सहपरिवार (मुलाबाळांसकट) कारमध्ये होते. तिघेही आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. उच्च पदस्थ आहेत, यशस्वी आहेत. त्यांच्यातला एक जण तर नामांकित विधिज्ञ आहे.

माझ्या गाडीपुढेच त्यांची गाडी होती. एका वाईन शॉप बाहेर त्यांनी गाडी थांबवली, दोघे जण गाडीतून उतरले आणि दारूच्या बाटल्या घेऊन आले, गाडी निघून गेली. बायका मुलांसह एकत्र असताना दारू कशाला हवी? मला खेदाचा धक्का बसला. एक क्षणभर मी मनातून हादरून गेलो. ऐन दिवाळीच्या दिवशी दारू का हवी? कुटुंबं बदलतायत आणि खरोखरच चुकीच्या पद्धतीने बदलतायत, हे फार प्रकर्षानं जाणवलं. 

पालकमित्रांनो, आपल्या देशाच्या प्रथम नागरिक असलेल्या महिला राष्ट्रपती कशा राहतात, कशा वागतात, कशा बोलतात, त्यांची जीवनशैली कशी आहे, हे तरी पहा. त्यांनी स्वतः शिक्षिका म्हणून काम केलं आहे, हे लक्षात घ्या. एकूण काय, आपल्याला खूप बदलावं लागेल. निदान पुढच्या पिढ्यांच्या उत्तम जडणघडणीसाठी तरी आपल्याला बदलावंच लागेल.. 

आपला समाज ज्या इंजिनावर चालतो ना, त्यातलं इंजिन ऑईल म्हणजे आपली मनं आहेत. ती जितकी स्वच्छ असतील तितकं इंजिन व्यवस्थित चालेल. ती जितकी उत्तम असतील, तितकं इंजिनाचं स्वास्थ्य उत्तम राहील आणि ती जितकी सकारात्मक प्रभावी असतील तितकी त्या इंजिनाला सकारात्मक गती येईल.. 

म्हणून, समाजाच्या इंजिनातलं इंजिन ऑईल बदला मित्रहो.. नाहीतर एके दिवशी ते इंजिन कायमचं बिघडून बसेल…

(आवडल्यास लेखात कुठलाही बदल न करता मूळ लेखकाच्या नावासहच शेअर करा ही विनंती.)

लेखक :  श्री मयुरेश उमाकांत डंके

मानस तज्ज्ञ, संचालक- प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या नजरेतून बदलती दुबई – भाग – २ ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ माझ्या नजरेतून बदलती दुबई – भाग – २ ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

ग्लोबल व्हिलेज आणि डेझर्ट सफारी या दोन दुबईतील स्थळांना भेटी दिल्या त्या अगदी उल्लेख करण्याजोग्या ! ग्लोबल व्हिलेज म्हणजे सर्व जग जणू एका मोठ्या मैदानावर पसरलेले…… चीन, येमेन, मलेशिया, पाकिस्तान, भारत अशा विविध देशांच्या स्टाॅल्सनी भरलेली रंगीबेरंगी दुनिया ! सगळ्या आसपासच्या छोट्या देशातील लोक या ग्लोबल व्हिलेज मध्ये खरेदीसाठी येतात. इथे जाण्यासाठी रेंटवर गाड्या मिळतात. आम्हीही ग्लोबल व्हिलेजला भेट दिली. खरेदी झाली ती येमेनच्या मसाल्याच्या पदार्थांची ! एवढे मोठे दालचिनीचे भारे आणि लवंगा – मिऱ्याचे  डोंगर प्रथमच पाहिले ! इराण मधील सुंदर वस्तूंचे तसेच गालिचांचे स्टॉल बघायला मिळाले. बऱ्याच प्रकारच्या करमणुकीच्या गोष्टीही तिथे होत्या. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात ग्लोबल विलेजला खूप गर्दी असते.

‘डेझर्ट सफारी’ हे दुबईतील आणखी एक अट्रॅक्शन ! दुबईच्या एका ट्रिपमध्ये आम्ही डेझर्ट सफारीची ट्रीप केली. फक्त चार-पाच तासांची ट्रिप ! पण खूपच वेगळी ! डेझर्ट सफारी बुक केल्यानंतर ठराविक वेळी पिकप् साठी गाडी येते. दुबईपासून काही अंतरावर पोहोचले की या गाडीतून आपण उतरतो. तिथून वाळूत जाणाऱ्या स्पेशल गाड्या असतात, त्यामध्ये आपल्याला बसवून देतात. वाळूचे डोंगर धडाधड  चढत उतरत या गाड्या जातात तेव्हा आपल्या पोटात भीतीचा गोळा उठतो ! तरुण लोक मात्र आरडाओरडा  करून या गाडीत एन्जॉय करत असतात ! नंतर या गाड्या ग्राउंड लेव्हलवर असलेल्या मोठ्या तंबूसारख्या दिसणाऱ्या ठिकाणाजवळ आपल्याला घेऊन जातात. आम्ही तिथे गेलो तेव्हा संध्याकाळ होत आली होती. डिसेंबर २००८ मध्ये आम्ही गेलो होतो. हवेत खूप गारवा होता. वातावरण छान होते. प्रथम कॅमल राईड करून आम्ही आत गेलो. तेथे तऱ्हेतऱ्हेचे स्टॉल्स होते. सिनेमात पाहतो तसे खास अरबी वातावरण ! बसायला गाद्या, लोड तक्के, हुक्क्याचे स्टॅन्ड शेजारी ! मेहेंदी स्टाॅल, खास अरबी ड्रेस घालून फोटो काढायची सोय, विविध सरबते, जादूचे प्रयोग करणारे लोक, काचेच्या फ्लाॅवरपाॅटमध्ये वाळू घालून त्यात डिझाईन काढणारे, असे भरपूर काही बघायला मिळत होते. जेवणाची सोय तिथेच होती. जेवणानंतर तिथे वैशिष्ट्यपूर्ण असा ‘ बेली डान्स ‘ बघायला मिळाला.बऱ्याच जणांनी तिथे नाचून घेतले. दोन-तीन तास अशी जत्रा अनुभवताना वाटलं, जगाच्या पाठीवर कुठेही जा,  माणूस स्वतःच मनोरंजन कोणत्या ना  कोणत्या तरी पद्धतीने करत असतोच ! 

अशी ही अनोखी डेझर्ट सफारीची ट्रिप केल्यानंतर आम्ही ‘धाऊ’ ट्रीप केली. ही खाडीवरची सफर होती. ‘धाऊ’ क्रूजवर नातवाचा  वाढदिवस साजरा केला ! संध्याकाळची क्रूज बुक केली होती. ठरल्याप्रमाणे सात वाजता

आम्ही खाडीवर गेलो. सगळीकडे दिव्यांचा लखलखाट आणि लोकांचा कलकलाट होता. खाडीवर सजवलेल्या, छान छान नाव दिलेल्या बोटी निघण्यासाठी सज्ज होत्या. आमच्या बोटीचं नाव होतं “चांदनी”! बोटीतून एक दीड तासाची खाडीवरची सफर होती ती ! आम्ही बोटीत बसल्यावर प्रथम वेलकम ड्रिंक दिले गेले. बोट चालू झाली. बोटीतून बाहेरचा परिसर खूपच छान दिसत होता. आकाशातील चांदण्यांबरोबर स्पर्धा करणारे दुबईच्या खाडी तीरावरचे लायटिंग पहात आम्ही सफरीचा आनंद घेतला. काही करमणुकीचे कार्यक्रम  क्रूझवर चालू होते. नातवाच्या वाढदिवसासाठी तिथे केकही सांगितला होता आम्ही !  त्यामुळे केक कटिंग करून  बोटीवर सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गाण्याच्या तालावर तिथे नाचही सुरू होता. जेवणाचा बेत छान होता. मस्तपैकी जेवण करून आम्ही धाऊ ट्रिप एन्जॉय केली.

 ग्लोबल व्हिलेज डेझर्ट सफारी, धाऊ, या सर्व वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांना भेटी देत दोन-तीन वर्ष कशी गेली कळलंच नाही. ९ सप्टेंबर २००९ साली दुबई मेट्रो सुरु झाली. मेट्रोत बसून आम्ही दुबई मॉल, बुर्ज खलिफा पहायला गेलो होतो. दुबई मॉल बघत बघत आत गेले की बुर्ज खलिफापर्यंत जाता येते. ‘ बुर्ज खलिफा ‘ ही जगातील उंच इमारतींपैकी 

एक ! बुर्ज खलिफाच्या १२४ व्या मजल्यापर्यंत जाता येते. पूर्ण दुबईची माहिती एका छोट्या थेटरमध्ये स्क्रीनवर दिली जाते आणि मग लिफ्ट इतकी झुमकन्  जाते की १२३ वा मजला कधी आला ते कळतच नाही. तिथे साधारणपणे अर्धा पाऊण तास ३६० अंशाच्या गोलाकार भागातील खिडक्यातून, दुर्बिणीतून संपूर्ण दुबई पाहता येते.

—अशाप्रकारे दुबई फिरता फिरता आम्ही आता 2014 सालापर्यंत आलो होतो.

— भाग दुसरा 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares