मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भाषा… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? मनमंजुषेतून ?

☆ भाषा… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

दसरा झाला. ह्या वर्षीचा दसरा जरा पाऊस,विजा,कडकडाट आणि गडगडाट ह्यामध्ये पार पडला त्यामुळे नेहमीचा सणाचा उत्साह, लगबग लुप्त होऊन जरा ह्या चैतन्यावर निरुत्साहाचं मळभ आलं होतं.असो.  

“ कालाय तस्मै नमः “

नवरात्राची धावपळ, लगबग संपली. आता जरा निवांतपणा आला आला, असं वाटतं नं वाटतं तोच दिवाळी येतेय. नवरात्र उरकलं आणि आता वेध दिवाळीचे.

नवरात्र उरकलं हा विचार मनात आला खरा आणि लगेच मराठी भाषेची मोठी गंमतच वाटली. उरकलं हा शब्द तसा अर्थाने सरळसरळ घेतला तर बरोबरच, पण गर्भितार्थ बघितला तर चूकच. 

आपण हे सणवार, कुळाचार हे मनापासून करीत असतो. ह्या पासून आपल्याला आनंद,समाधान लाभतं. आणि ‘उरकलं ‘ हा शब्द जरा निरुत्साही वातावरणात काम झालं की मनात येतो.

खरंच भाषा हा प्रकारच मुळात लवचिक. मोडू तसा मोडणारा, वळवू तसा वळणारा, वाकवू तसा वाकणारा. ही भाषाच आपल्याला एकाच शब्दाचे अनेक अर्थ पुरविते. तर एकीकडे हीच भाषा समानार्थी शब्दासाठी अनेक पर्याय पण सुचविते नाही का ? —–

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जानकीसाठी… अनुवादक : समीर गायकवाड ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ जानकीसाठी… अनुवादक : समीर गायकवाड ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

(राजेश्वर वसिष्ठ यांच्या ‘जानकी के लिए’ या हिंदी कवितेचा स्वैर अनुवाद.)

देह गतप्राण झालाय रावणाचा

स्तब्ध झालीय लंका सारी

सुनसान झालीय किल्ल्याची तटबंदी  

कुठे कसला उत्साह नाही

नाही तेवला दिवा कुणाच्या घरी 

घर बिभिषणाचे वगळता!  

 

समुद्र किनारी बसलेले विजयी राम

बिभिषणास राज्य लंकेचे सोपवताहेत

जेणेकरून प्रातःकाळीच व्हावा त्याचा राज्याभिषेक

सातत्याने ते लक्ष्मणास पृच्छा करताहेत

आपल्या सहकाऱ्यांचे क्षेम कुशल जाणताहेत

चरणापाशी त्यांच्या बसुनी आहे हनुमान!

 

धुमसताहेत लक्ष्मण मनातूनच  

की, सीतेला आणण्यास का जात नाहीत राम            

अशोक वाटिकेत?

पण बोलू काही शकत नाहीत. 

 

हळू-हळू सारी कामं निपटतात

संपन्न होतो राज्याभिषेक बिभिषणाचा

आणि राम प्रवेश करतात लंकेमध्ये

मुक्कामी एका विशाल भुवनात.

 

अशोक वाटिकेस धाडतात हनुमाना

देण्यास ही खबर

की, मारला गेला आहे रावण       

आता लंकाधिपती आहे बिभिषण.

 

बातमी ती ऐकताच सीता

होऊन जाते दिग्मूढ   

बोलत काहीच नाही

बसते वाटेकडे लावूनि डोळे

रावणाचा वध करताच

वनवासी राम झालेत का सम्राट?   

 

लंकेत पोहोचून देखील दूत आपला पाठवताहेत

जाणू इच्छित नाहीत की, वर्षेक कुठे राहिली सीता

कशी राहिली सीता?

डोळ्यांना तिच्या अश्रुंच्या धारा लागतात

जयांना समजू शकत नाहीत हनुमान

बोलू शकत नाहीत वाल्मिकी.

 

राम आले असते तर मी भेटवलं असतं त्यांना

त्या परिचारिकांशी

ज्यांनी भयभीत करून देखील मला

स्त्रीचा सन्मान सारा प्रदान केला

रावणाच्या त्या अनुयायी तर होत्याच

परंतु माझ्यासाठी मातेसमान होत्या.          

 

राम जर आले असते तर मी भेटवलं असतं त्यांना

या अशोकाच्या वृक्षांशी

या माधवीच्या वेलींशी

ज्यांनी माझ्या अश्रुंना

जपलंय दवबिंदूसम आपल्या देहावर

पण राम तर राजा आहेत

ते कसे येतील सीतेला नेण्यास?

 

बिभिषण करवतात सीतेचा शृंगार

आणि पाठवतात पालखीत बसवूनी रामांच्या भुवनी.

पालखीत बसलेली सीता करते विचार,

जनकानेही तिला असाच तर निरोप दिला होता!

 

‘तिथेच थांबवा पालखी’,

गुंजती रामांचे स्वर

येऊ द्या पायी चालत सीतेला, मज समीप

जमिनीवरून चालताना थरकापते वैदेही

काय पाहू इच्छित होते

मर्यादा पुरुषोत्तम, कारावासात राहून देखील

चालणं विसरतात का स्त्रिया?

 

अपमान आणि उपेक्षेच्या ओझ्याखाली दबलेली सीता

विसरून जाते पतीमिलनाचा उत्साह

उभी राहते एखाद्या युद्धबंद्यासम!

 

कुठाराघात करतात राम – सीते, कोण असेल तो पुरुष

जो वर्षभर परपुरुषाच्या घरी राहिलेल्या स्त्रीचा

स्वीकार करेल?

मी तुला मुक्त करतोय, जिथे जायचेय तिथे तू जाऊ शकतेस.

 

त्याने तुला कवेत घेऊन उचललं

आणि मृत्यूपर्यंत तुला पाहत जगला.

माझं दायित्व होतं तुला मुक्त करण्याचं

मात्र आता स्वीकारु शकत नाही तुला पत्नीसारखं!       

 

वाल्मिकींचे नायक तर राम होते

ते का बरे लिहितील, सीतेचे रुदन

आणि तिची मनोवस्था?

त्या क्षणांत सीतेने काय नि किती विचार केले असतील

की, हे तेच पुरुष आहेत का

ज्यांना मी वरले होते स्वयंवरी,

हे तेच पुरुष आहेत का ज्यांच्या प्रेमाखातर

महाल अयोध्येचा त्यागला होता मी

आणि भटकले होते वनोवनी!

 

होय, रावणाने मला बाहूंत घेतलेले

होय, रावणाने मला प्रेमाचा प्रस्ताव दिलेला

तो राजा होता, इच्छा असती तर बलपूर्वक नेलं असतं आपल्या घरी

पण रावण पुरुष होता

त्याने केला नाही माझ्या स्त्रीत्वाचा अपमान कधी

भलेही मर्यादा पुरुषोत्तम म्हणून गौरवलं नसेल त्याला इतिहासात!                                           

 

हे सर्व वाल्मिकी सांगू शकले नसते

कारण त्यांना तर रामकथा सांगायची होती!

 

पुढची कथा तुम्ही जाणताच,

सीतेने दिली अग्निपरीक्षा. 

कवीला होती घाई लवकर कथा संपवण्याची

परतले अयोध्येस राम, सीता आणि लक्ष्मण

नगरवासियांनी केली साजरी दीपावली

ज्यात सामील झाले नाहीत नगरातले धोबी. 

 

आज दसऱ्याच्या या रात्रीस

मी उदास आहे त्या रावणासाठी,

ज्याची मर्यादा

कुण्या मर्यादापुरुषोत्तमाहून कमी नव्हती

 

मी उदास आहे कवी वाल्मिकींसाठी,

जे रामाच्या जोडीने सीतेचे मनोभाव लिहू शकले नाहीत

 

आज या दसऱ्याच्या रात्रीस

मी उदास आहे स्त्रीच्या अस्मितेसाठी

त्याचं शाश्वत प्रतीक असणाऱ्या जानकीसाठी!… 

 

– राजेश्वर वसिष्ठ यांच्या ‘जानकी के लिए’ या हिंदी कवितेचा स्वैर अनुवाद.

अनुवादक : समीर गायकवाड

संग्राहिका :मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वसुबारस आणि धनत्रयोदशी ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  विविधा ?

☆ वसुबारस आणि धनत्रयोदशी ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

वसुबारस

दिवाळी या आपल्या मोठ्या सणाची सुरुवात वसुबारस पासून होते. वसुबारस म्हणजे गाई प्रति कृतज्ञता दाखवण्याचा सण!

महाराष्ट्र हे राज्य शेतीप्रधान असल्याने वसुबारस या दिवसाचे महत्त्व आहे. अश्विन कृष्ण द्वादशीला वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य व त्यासाठी असलेली बारस म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते त्यांच्या पायावर पाणी घालून हळदी कुंकू वाहून पूजा करतात. गाईला नैवेद्य म्हणून पुरणपोळी खाऊ घालतात. हिंदू संस्कृतीत गाईला गोमाता समजले जाते व तिच्या उदरात देवांचा वास आहे म्हणून गाई प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तसेही आपल्या संस्कृतीत नाग, बैल अशा निसर्गात असणाऱ्या प्राण्यांचे पूजा करून ते दिवस साजरे करण्याची प्रथा आहे. वसुबारस पासून अंगणात तुळशीपाशी घराबाहेर पणत्या, आकाश कंदील लावून दिवाळीची सुरुवात केली जाते..

 धनत्रयोदशी

दिवाळी सणाचा दुसरा दिवस धनत्रयोदशी या दिवशी धनाची पूजा करतात. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर वैद्य लोक धन्वंतरी ची पूजा करतात धने गुळ याचा नैवेद्य दाखवतात ज्या वैद्यकीय बुद्धीच्या जोरावर आपण रोग्याला बरे करू शकतो, त्या धन्वंतरी बद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी!

आता दिवाळी अगदी दारात आलेली असते. पूर्वीच्या काळी घराला अंगण असे त्यामुळे सकाळ, संध्याकाळ अंगणात सडा मारून, दारात रांगोळी काढणे, पणत्या लावणे असा कार्यक्रम होत असे. आता फ्लॅट सिस्टीम मुळे ही मजा गेली, तरीही आपल्या छोट्याशा ब्लॉकच्या आत आनंदोत्सव साजरा करायचा म्हणजे आनंदालाच बंधन घातल्यासारखे वाटते! पण कालाय तस्मै नमः !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २ ( वायु, इंद्र, मित्रावरुण सूक्त ) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २ ( वायु, इंद्र, मित्रावरुण सूक्त ) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋषी – मधुछंदस् वैश्वामित्र

देवता – १ ते ३ वायु; ४ ते ६ इंद्रवायु; ७ ते ९ मित्रावरुण 

मराठी भावानुवादित गीत : डॉ. निशिकांत श्रोत्री

वाय॒वा या॑हि दर्शते॒मे सोमा॒ अरं॑कृताः । तेषां॑ पाहि श्रु॒धी हव॑म् ॥ १ ॥

सर्व जना आल्हाद देतसे हे वायू देवा

येई झडकरी तुझे आगमन होऊ दे देवा

सिद्ध करुनिया सोमरसा या उत्तम ठेविले

ऐक प्रार्थना अमुची आता दर्शन तव होऊ दे ||१||

वाय॑ उ॒क्थेभि॑र्जरन्ते॒ त्वामच्छा॑ जरि॒तारः॑ । सु॒तसो॑मा अह॒र्विदः॑ ॥ २ ॥

यागकाल जे उत्तम जाणत स्तोत्रांचे कर्ते 

वायूदेवा तुझियासाठी सिद्ध सोमरस करिते

मधुर स्वरांनी सुंदर स्तोत्रे महती तुझी गाती

सत्वर येई वायूदेवा भक्त तुला स्तविती ||२||

वायो॒ तव॑ प्रपृञ्च॒ती धेना॑ जिगाति दा॒शुषे॑ । उ॒रू॒ची सोम॑पीतये ॥ ३ ॥

विश्वामध्ये शब्द तुझा संचार करित मुक्त

श्रवण तयाचे करिता सिद्ध सर्व कामना होत 

सोमरसाचे पान करावे तुझी असे कामना 

तव भक्तांना कथन करूनी तुझीच रे अर्चना ||३||

इन्द्र॑वायू इ॒मे सु॒ता उप॒ प्रयो॑भि॒रा ग॑तम् । इन्द॑वो वामु॒शन्ति॒ हि ॥ ४ ॥

सिद्ध करुनिया सोमरसाला तुम्हासि आवाहन

इंद्रवायु हो आता यावे करावाया हवन

सोमरसही आतूर जाहले प्राशुनिया घ्याया

आर्त जाहलो आम्ही भक्त प्रसाद या घ्याया ||४||

वाय॒विन्द्र॑श्च चेतथः सु॒तानां॑ वाजिनीवसू । तावा या॑त॒मुप॑ द्र॒वत् ॥ ५ ॥

वायूदेवा वेग तुझा हे तुझेच सामर्थ्य

बलशाली वैभव देवेंद्राचे तर सामर्थ्य

तुम्ही उभयता त्वरा करावी उपस्थित व्हा अता 

सोमरसाची रुची सर्वथा तुम्ही हो जाणता ||५||

वाय॒विन्द्र॑श्च सुन्व॒त आ या॑त॒मुप॑ निष्कृ॒तम् । म॒क्ष्वै॒त्था धि॒या न॑रा ॥ ६ ॥

अनुपम आहे बलसामर्थ्य इंद्रवायुच्या ठायी

तुम्हासि प्रिय या सोमरसाला सिद्ध तुम्हापायी

भक्तीने दिव्यत्व लाभले सुमधुर सोमरसाला

सत्वर यावे प्राशन करण्या पावन सोमरसाला ||६||

मि॒त्रं हु॑वे पू॒तद॑क्षं॒ वरु॑णं च रि॒शाद॑सम् । धियं॑ घृ॒ताचीं॒ साध॑न्ता ॥ ७ ॥

वरद लाभला समर्थ मित्राचा शुभ कार्याला 

वरुणदेव हा सिद्ध राहतो अधमा निर्दायला

हे दोघेही वर्षा सिंचुन भिजवित धरित्रीला

भक्तीपूर्वक आवाहन हे सूर्य-वरुणाला ||७||

ऋ॒तेन॑ मित्रावरुणावृतावृधावृतस्पृशा । क्रतुं॑ बृ॒हन्त॑माशाथे ॥ ८ ॥

विश्वाचा समतोल राखती वरूण नी सूर्य 

पालन करुनी पूजन करती तेही नियम धर्म

धर्माने नीतीने विभुषित त्यांचे सामर्थ्य 

आवाहन सन्मानाने संपन्न करावे कार्य ||८||

क॒वी नो॑ मि॒त्रावरु॑णा तुविजा॒ता उ॑रु॒क्षया॑ । दक्षं॑ दधाते अ॒पस॑म् ॥ ९ ॥

सर्वउपकारी सर्वव्यापी मित्र-वरूणाची

अपूर्व बुद्धी संपदा असे जनकल्याणाची

व्यक्त होत सामर्थ्य तयांचे कृतिरूपातून

फलश्रुती आम्हासी लाभो हे द्यावे दान ||९||

©️ डाॅ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

या सूक्ताचा शशांक दिवेकर यांनी गायलेला आणि सुप्रिया कुलकर्णी यांनी चित्रांकन केलेला व्हिडिओ यूट्युबवर उपलब्ध आहे. त्यासाठी लिंक देत आहे. रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा.  

https://youtu.be/1ttGC6lQ16I

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 2 Indra Vayu Mita Varun Sukt

Rugved Mandal 1 Sukta 2 Indra Vayu Mita Varun Sukt

भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री 

९८९०११७७५४

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्वर्गाची करन्सी….अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ स्वर्गाची करन्सी….अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

एक मोठे उद्योगपती होते. अतिशय धनाढ्य… भरपूर गाड्या, बंगले, कंपन्या त्यांच्याकडे होत्या. काही म्हणता कशालाच काही कमी नव्हतं…

एक दिवस ते गाडीमधून कंपनीत जाताना, त्यांनी ड्रायव्हरला रेडिओ लावायला सांगितला.कुठलं तरी अधलं -मधलं चॅनेल लागलं.चॅनेलवर एकाचं काही अध्यात्मिक बोलणं चालू होतं.तो प्रवचक बोलत होता, “मनुष्य आयुष्यात भौतिक अर्थाने जे काही कमावतो, ते सर्व काही, मृत्यूसमयी त्याला इथेच सोडून जावं लागतं. तो त्यातले काही म्हणजे काहीच घेऊन जाऊ शकत नाही…”

या उद्योगपतींनी हे ऐकल्यावर ते एकदम अंतर्मुख झाले.एकदम सतर्क झाले.त्यांना एकाएकी जाणवलं,

डोक्यात लख्खकन् प्रकाश पडला की, आपण जे काही प्रचंड वैभव उभारलं आहे, त्यातला एकही रुपया मरताना आपण आपल्या पुढल्या जन्मासाठी घेऊन जाऊ शकत नाही. सर्व काही इथेच सोडून जावं लागणार आहे.

त्यांना एकदम कसंतरीच झालं.ते कमालीचे अस्वस्थ झाले…. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्यांनी तातडीने एक बैठक बोलावली… बैठकीला झाडून सगळे सहाय्यक, सचिव, सल्लागार, सेक्रेटरी, कायदेतज्ज्ञ बोलावले आणि जाहीरपणे सांगितलं की, “मी ही अगणित संपत्ती मिळवली आहे, ती मी मरताना माझ्याबरोबर घेऊन जाऊ इच्छितो. तर मी ते कसे घेऊन जाऊ शकतो, ते मला तुम्ही नीटपणे, विचारपूर्वक सांगा”.

सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले की, आज साहेब हे काहीतरी असंबध्द काय बोलताहेत!  मरताना तर कुणालाच काही बरोबर नेता येत नाही… हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे आणि हे तर ढीगभर संपत्ती बरोबर न्यायची भाषा बोलताहेत. हे जमणार कसं?

साहेबांनी सर्वांना शोधकार्य करायला सांगितलं. बक्षिसे जाहीर केली की, जो कुणी मला यासाठी १००% प्रभावी पध्दत सांगेल, त्याला मी बेसुमार संपत्ती बहाल करीन.

जो तो पध्दत शोधायचा प्रयत्न करू लागला, माहिती काढू लागला. पण काही जमेना. प्रत्येकजण अथक प्रयत्न करत होता. पण उत्तर काही सापडत नव्हतं. 

बिझनेसमन दिवसागणिक उदास होत होते.त्यांना हरल्याप्रमाणेच वाटू लागलं की, मी का हे सर्व बरोबर नेऊ शकत नाही?म्हणजे मी हे सर्व इथेच सोडून जायचं?  का? मला न्यायचंय हे सर्व.जे मी मेहनतीने मिळवलंय,ते मला का नेता येऊ नये?त्यांना काही  सुचेना.

मग त्यांनी यासाठी जाहिरात दिली. भलंमोठं बक्षीस ठेवलं. पण उत्तर सापडेना.

एक दिवस, अचानक एक माणूस या बिझनेसमनच्या ऑफिसमधे आला. ‘साहेबांना भेटायचंय’, म्हणाला.

बिझनेसमननी त्याला केबिनमधे बोलावलं.तो माणूस म्हणाला, “माझं नाव श्याम. मला तुम्हांला काही  विचारायचंय. मगच मी यावर काही उत्तर सांगू शकेन.” 

बिझनेसमन म्हणाले, “विचार”.

याने विचारलं की, “साहेब, तुम्ही कधी अमेरिकेला गेलाय?”

“हो,”बिझनेसमन म्हणाले.

“खरेदी केलीये तिथे?” श्यामने विचारले.

“हो”. बिझनेसमन म्हणाले. “पैसे कसे दिलेत?” श्यामने विचारले.

“कसे म्हणजे?आपले पैसे देऊन अमेरिकन डाॅलर्स विकत घेतले व दिले,” बिझनेसमन उत्तरले.

“बाकी आणखी कुठल्या कुठल्या देशात गेलात?. तिथे काय खरेदी केलीत आणि काय काय चलने वापरलीत?”

ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलिअन डाॅलर्स. सिंगापूरला सिंगापूर डाॅलर्स. मलेशियाला रिंगिट. जपानला येन. बांगलादेशला टका… सौदी अरेबियाला रियाल… दुबईला दिरहम्स…

थायलंडला बाथ… युरोपला युरो… म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी जी जी म्हणून करन्सी चालते, तीच घ्यावी लागते व वापरावी लागते.” बिझनेसमन म्हणाले.

“म्हणजे तुमच्याकडे असलेले पैसे हे सर्व ठिकाणी जसेच्या तसे चालत नाहीत.तर ते तुम्हाला देशानुरूप, जागेनुरूप  बदलून घ्यावे लागतात.जिथे जिथे, जी जी करन्सी आहे, ती ती तुमच्याकडचे रुपये देऊन बदलून घ्यावी लागते.”

“बरोबर,” बिझनेसमन म्हणाले.

“मग त्याच न्यायाने तुम्हाला तुमचे पैसे देऊन त्याबदली स्वर्गाची करन्सी देखील विकत घ्यावी लागेल. तिथे तुमचे रुपये कसे चालतील?” श्याम म्हणाला.

“मग?” बिझनेसमनने कुतूहलाने विचारले.

“तिथे ही करन्सी चालणार नाही, कारण स्वर्गाची करन्सी आहे ‘पुण्य!’ आणि तिथे तीच तुम्हांला घ्यावी लागेल. मगच तुम्हाला ती वापरता येईल!

तेव्हा तुमच्याकडचे पैसे हे तुम्हाला ‘पुण्य’ नावाच्या करन्सीमध्ये रूपांतरित करून घ्यावे लागतील. मगच ती बरोबर नेता येईल आणि तिथे वापरता येईल.”

बिझनेसमनच्या डोक्यात आता जास्त लख्ख प्रकाश पडला की, शेवटी बरोबर न्यायला ‘पुण्यच’ कमवायला हवं!

इथली करन्सी अशीच  गोळा करावी लागेल की, जिचे पुण्यामध्ये रूपांतर होऊ शकेल. असा काही विचार, वर्तन, आचरण करावं लागेल की, जे जाताना पुण्याच्या रूपात बरोबर नेता येईल.

बिझनेसमनच्या प्रश्नाला यथार्थ उत्तर मिळालं होतं.  ते श्यामच्या पायाच पडले. त्यांनी त्याला  यथोचित बक्षीस दिले आणि त्याचा सत्कार केला. मनोमन ठरवलं की, या भूतलावर जगण्यासाठी जे काही मिळवतो आहे, मिळवलं आहे,ते आता ‘पुण्य’ नावाच्या करन्सीमध्ये रूपांतरित करून घ्यायचं.आणि हे शेवटपर्यंत करतच राहायचं.वरती जाताना घेऊन जायला एवढे पुरेसे आहे.

लेखक :अज्ञात

संग्राहक : श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी विलोमपदे – palindromes ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

मराठी विलोमपदे – palindromes ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

लहानपणी Palindrome हा प्रकार आवडायचा. 

Palindrome म्हणजे असा शब्द, वाक्प्रचार , वाक्य किंवा कोणतीही अर्थपूर्ण अक्षररचना, जी शेवटाकडून सुरुवातीकडे वाचत गेलं तरी बदलत नाही.

इंग्रजीत Palindrome ची रेलचेल शेकड्याने आहे. पण मराठीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच…. 

लहानपणी तर दोन तीनच माहित होते…. 

१) चिमा काय कामाची 

२) ती होडी जाडी होती. 

३) रामाला भाला मारा. 

आता अजून वेगळी विलोमपदे –

१) टेप आणा आपटे. 

२) तो कवी ईशाला शाई विकतो. 

३) भाऊ तळ्यात ऊभा. 

४) शिवाजी लढेल जीवाशी. 

५) सर जाताना प्या ना ताजा रस. 

६) हाच तो चहा 

वा वा ! हे ताजे मराठी पॉलिनड्रोम्स, आय मीन, विलोमपदे.  वाचून मजा आली. आणखी काही विलोमपदे, आय मीन, पॉलिनड्रोम्स माहित आहेत का कोणाला?

 Very Interesting

तं भूसुतामुक्तिमुदारहासं वन्दे यतो भव्यभवं दयाश्रीः ||१||

श्रीयादवं भव्यभतोयदेवं संहारदामुक्तिमुतासुभूतं ||२||

या श्लोकामध्ये पहिल्या चरणात श्रीरामाची स्तुती आहे आणि दुसऱ्या चरणात श्रीकृष्णाची .

या श्लोकाचे वैशिष्ट्य असे की, यातले दुसरे चरण पहिल्या चरणाच्या उलट्या क्रमात आहे . वाचून बघा …… 

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆  पप्पाची मुलगी, मुलीचा पप्पा…अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ पप्पाची मुलगी, मुलीचा पप्पा…अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

माझी मुलगी मोठी झाली.

एके दिवशी सहज म्हणाली,

‘पप्पा,मी तुम्हाला कधी रडवलंय का?’

मी म्हटलं,

‘का रे पिल्लू, असं का विचारतेस?’

ती : ‘काही नाही असंच.’

मी : ‘नीट आठवत नाही. पण एकदा…’

ती : ‘कधी?’ तिनं अधीरतेने विचारलं.

मी म्हणालो, ‘तू एक वर्षाची असताना मी तुझ्यासमोर पैसे, पेन आणि खेळणं ठेवलं.

कारण मला बघायचं होतं की, तू काय उचलतेस?

तुझी निवड ठरविणार होती की, मोठेपणी तू कशाला जास्त महत्व देतेस.

जसे

पैसे म्हणजे संपत्ती,

पेन म्हणजे बुद्धी

आणि

खेळणं म्हणजे आनंद.

मी हे सर्व सहजच पण उत्सुकतेने करत होतो.

मला बघायची होती तुझी निवड.

तू एकाच ठिकाणी बसून आळीपाळीने सर्व गोष्टींकडे बघत होतीस

आणि

मी तुझ्या पुढ्यातच बसून शांततेने तुझ्याकडे पहात होतो.

तू रांगत-रांगत पुढे आलीस.

मी श्वास रोखून पहात होतो

आणि

क्षणार्धात तू त्या सगळ्या वस्तू बाजूला सारून माझ्या मिठीत शिरलीस.

माझ्या लक्षातच नाही आलं की,

‘या सगळ्यांबरोबर मीसुद्धा एक निवड असू शकतो.’

ती पहिली वेळ होती जेव्हा तू मला रडवलंस.

 

खास मुलींच्या पप्पांसाठी:

खरंच मुलगी पाहिजेच.

 

लेखक :अज्ञात

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आत्मसाक्षात्काराचा क्षण… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ आत्मसाक्षात्काराचा क्षण… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. शनिवार होता, पारावरच्या मारुतीला एक भक्त शेंदूर लावत होता. कडेने एका हातात तेलाची बुधली आणि एका हातात रुईच्या पानांची माळ घेऊन बरीच मंडळी उभी होती. अचानक त्या मारुतीच्या अंगावरचं शेंदराचं आवरण गळून पडलं आणि….

…… आणि आत दिसली गणपतीची सुबक मूर्ती. लोक आश्चर्यचकित. आता हे तेल ओतायचं कुठं आणि ही माळ घालायची कुणाच्या गळ्यात ?

आपलही असंच होत असतं. परमेश्वर सगळ्यांना पृथ्वीवर पाठवतांना पाठवतो फक्त माणूस म्हणून. स्वच्छ कोरी मनाची पाटी, निखळ हसू आणि अत्यंत भावस्पर्शी नजर घेऊन. आपण दहा बारा दिवसातच त्याचं नाव ठेऊन

पहिला जातीचा शेंदूर फासून मोकळे होतो. मग हळूहळू त्याची पंचेंद्रिये काम करू लागतात. त्याच्या मनाच्या पाटीवर कधी घरातले, कधी बाहेरचे काहीबाही खरडून ठेवतात. घर, कुटुंब, गाव, शाळा, कॉलेज, समाज, यामध्ये वावरत असताना एकावर एक विचारांचे, विकारांचे लेप नुसते थापले जातात. आणि मग जणू हीच आपली ओळख आहे अशा थाटात आपणही वावरायला सुरुवात करतो. वरचेवर थापले जाणारे हे लेप, हे मुखवटे, मग आपल्यालाही आवडायला लागतात. माणसं, समाज काय तेलाच्या बाटल्या, हार घेऊन उभे असतातच. नजरेतला विचार हरपतो.  त्याची जागा विखारानं घेतली जाते. आपल्यातल्या मूळ स्वरूपाची जाणीव हळूहळू नष्ट होते.

अचानक एक दिवस काहीतरी घडतं आणि ही शेंदराची पुटं आपोआप गळून पडतात. आतलं मूळ चैतन्य प्रकट होतं. तो क्षण आत्मसाक्षात्काराचा असतो. सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय सहसा हे घडून येत नाही. हा क्षण खूप मोलाचा असतो. खूप प्रयत्नपूर्वक सांभाळावा लागतो. नाहीतर गडबडीत आपणच परत आपल्या हाताने आपल्याला शेंदूर फासून घेतो. कारण त्या शेंदऱ्या स्वरूपाची सवय झालेली असते. लोकांच्या तेलाची, माळेची, नमस्काराची भूल पडलेली असते.

आणखी एक क्षण असा मुखवटे उतरवणारा असतो तो म्हणजे शेवटचा क्षण. परमेश्वर सगळे चढलेले मुखवटे, आवरणं, दागिने, एवढंच काय, कपडेसुद्धा काढून ठेवायला लावतो. ज्या मूळ शुद्ध स्वरूपात आणून सोडलं होतं त्या मूळ स्वरूपात घेऊन जातो. बरोबर येतं फक्त आपल्या भल्याबुऱ्या कर्माचं गाठोडं, ज्याचा हिशोब वर होणार असतो. म्हणून या जीवनप्रवासात जर अधेमधे कुठे हे शेंदराचे मुखवटे गळून पडले, तर तो आत्मसाक्षात्काराचा क्षण ओळखा…. त्याला  जपा. 

नाहीतर आहेच…… 

“पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननीजठरे शयनं…. “

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पुन्हा प्रवाहात…अज्ञात ☆ सुश्री निलिमा ताटके ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ पुन्हा प्रवाहात…अज्ञात ☆ सुश्री निलिमा ताटके ⭐

ऑस्ट्रेलियातील एका आजोबांची ही गोष्ट आहे.हे आजोबा रोज पहाटे समुद्रकिनारी फिरायला जात.जाताना हातात एक टोपली असे.किनाऱ्यावर हे काहीतरी वेचायचे आणि पुन्हा समुद्रात नेऊन टाकायचे.

अनेक दिवस हे त्यांचे काम पाहून जेनीने त्यांना विचारले, ” आजोबा, तुम्ही हे काय करता?”

आजोबा हसले आणि म्हणाले, “बेटा, मी किनाऱ्यावर आलेले स्टारफिश गोळा करतो आणि पुन्हा त्यांना प्रवाहात सोडतो.अगं, भरतीच्या लाटांबरोबर ते बाहेर तर फेकले जातात ; पण त्यांची चाल मंद असल्याने ते पुन्हा समुद्रात पोहोचू शकत नाहीत. अशांना मी पुन्हा प्रवाहात मिसळण्याची संधी देतो.”

 ही गोष्ट वाचल्यावर वाटले, की असे अनेक आजी-आजोबा समाजातून बाहेर फेकल्या गेलेल्या मुलां-मुलींना पुन्हा समाजाच्या प्रवाहात सोडायला मदत करतात.

लेखक :अज्ञात

संग्राहिका :  सुश्री निलिमा ताटके

ठाणे.

मोबाईल 9870048458

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आरती म्हणजे काय व आरतीची उत्पत्ती कशी? ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? इंद्रधनुष्य ?

☆ आरती म्हणजे काय व आरतीची उत्पत्ती कशी? ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

आरती म्हणजे औक्षण. ‘ शब्द कल्पद्रुम ‘ नावाचा ग्रंथ आहे, त्यात हे औक्षण किती करायचे या संदर्भात एक श्लोक आहे. मूर्तीच्या पायाशी चार वेळा, नाभी भोवती दोन वेळा, मुखाभोवती एक वेळ आणि सर्वांगावरून सात वेळा.-बस संपली आरती. आरती म्हणण्याची प्रथा कधी सुरु झाली हा थोडा संशोधनाचा विषय. महानुभाव पंथाच्या चक्रधर स्वामींच्या काही आरतीसदृश रचना आहेत असं म्हणतात. आणि ज्ञानेश्वरांनी काही अशा रचना केल्या होत्या, पण त्या भगवतगीतेचं कौतुक करणाऱ्या. माझ्या मते हा प्रकार श्री रामदासस्वामी या लोकोत्तर संताने चालू केला असावा.  जशी त्यांनी मारुतींची स्थापना केली, व्यायामशाळा चालू केल्या, त्याच पद्धतीने समाज एकत्र यावा, मोंगलांची त्यांच्या मनातील भीती कमी व्हावी, म्हणून हा प्रपंच मांडला होता का ? राम जाणे. एवढी छान पूजा केली आहे तेव्हा देवाला ‘ येई हो विठ्ठले ‘ म्हणून संगीत आवतण आर्ततेने द्यायचं. यात खूप आरत्या त्या देवाच रूप, काम सांगणाऱ्या आहेत, आणि शेवटी ‘ देवा तू ये ‘ अशी आळवणी. आणि या आळवणीला देव प्रतिसाद देतो तो प्रसाद अशी समजूत .

अथर्ववेदाचे एक परिशिष्ट वाचायला मिळाले, त्यात एक गोष्ट वाचली. राक्षसांच्या पुरोहिताने काहीतरी मंत्रप्रयोग करून, इंद्राची झोप उडेल म्हणजे निद्रानाश होईल असे काहीतरी केले. इंद्र त्रस्त झाला व त्याने बृहस्पतीना यासाठी उपाय विचारला. तेव्हा बृहस्पती म्हणाले की “ मी तुला एक उपाय सांगतो त्याला अरार्त्रिक म्हणतात. एक तबक घेऊन त्यात वेगवेगळी फुले ठेव व एक त्यात दीप लावून सुवासिनीकडून औक्षण करून घे. व हे करताना एक मंत्र म्हण. यामुळे तुला या त्रासातून मुक्ती मिळेल.” या अरात्रिकामधून आरती या विषयाचा जन्म झाला. देवाला झोपविण्यासाठी पहिली आली ती शेजारती. मग त्याला परत उठविण्यासाठी आली ती काकडआरती. पूजेनंतर ५ वाती किवा दिव्याने ओवाळून करायची ती पंचारती. एकच दिवा असेल तर एकारती, धूप जाळला असेल तर धुपारती, कापूर असेल तर कापूरारती . 

समर्थांनी जवळ जवळ ८० ते ८२ आरत्या लिहिलेल्या आहेत. सर्व अत्यंत प्रासादिक. गेली ४०० वर्ष याची मोहिनी जनमानसावरून उतरलेली नाही. एखाद्या महान व्यक्तीच्या काव्याला, शब्दांना मंत्राचं पावित्र्य येत ते असं. याला म्हणतात चिरंजीविता .यात एक गम्मत अशी की रामदास हे काही आजच्यासारखे संधीसाधू ,दलबदलू नाहीत. गणपती बाप्पा असो की  मारुतीराया असो, की कुठलीही देवी असो, आरतीमध्ये तिचे गुणगान करतील, पण प्रत्येक आरतीमध्ये शेवटी त्या देवाला ‘ साहेब तुमचं मी कौतुक केलं असलं, तरी मी दास रामाचा ,’ ही आठवण ते करून देतातच. रामदासांनी अनेक आरत्या लिहिल्या आहेत. सर्व सुंदर आहेत. त्यातील देवतांची वर्णनंही खूप सुंदर. 

पण या आरतीपेक्षा संत एकनाथांनी लिहिलेली दत्ताची आरती एक वेगळी आणि सुंदर आहे. या आरतीचे स्वरूप इतर आरत्यांच्यापेक्षा वेगळे अशाकरिता की कुठल्याही आरतीत त्या देवाचे रूपवर्णन, त्याचे पराक्रम आणि नंतरच्या कडव्यामधून साधारण फलश्रुती असा प्रकार असतो. पण दत्ताच्या आरतीत ‘ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ‘, ‘अभाग्यासी कैची कळेल हि मात ‘ अशा ओळी आहेत. म्हणजे थोडक्यात, मला तो कळलाच नाही असा पहिल्या दोन कडव्यात स्वानुभव आहे व उरलेली दोन कडवी फलश्रुती आहे. याचे कारण असे की एकनाथ महाराज त्यांच्या गुरूच्या म्हणजे जनार्दनस्वामी यांचेकडे हट्ट धरून बसले की मला दत्त महाराजांचे दर्शन घडवा. जनार्दनस्वामींनी त्यांना दौलताबाद येथे किल्ल्यावर बोलावले. एक दिवस एक योगी एकनाथ महाराजांच्या समोर येऊन उभे राहिले. एकनाथांनी त्यांना आपण कोण असे विचारले, तेव्हा तो योगी त्यांना आशीर्वाद देऊन न बोलता निघून गेला आणि नंतर जेव्हा जनार्दनस्वामी हसले तेव्हा एकनाथ महाराजांना समजले की दत्तमहाराज दर्शन देऊन गेले. तेव्हा ही आरती एकनाथ महाराजांनी तेथे लिहिली आणि ते लिहून गेले– ” सबाह्याभ्यंतरीं तू एक दत्त ,अभाग्यासी कैची कळेल ही मात “–फारच सुंदर चुटपूट .

मंडळी मी या विषयातील तज्ञ नाही. मी जे वाचतो, ऐकतो ते मित्रमंडळींना सांगावे, एवढीच इच्छा असते .

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares