मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक टपाल दिन…! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? विविधा ? 

☆ जागतिक टपाल दिन…! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

टपाल आणि माझं नातं कधी जुळलं ते आठवत नाही. पण गावात जुन्या ग्रामपंचायतीच्या बाहेर पोस्टाची लाल टपाल पेटी अडकवलेली होती.शाळेला जाता जाता आम्ही मारुतीच्या मंदिरात खेळायला थांबायचो. कुतुहल म्हणून शेजारच्या ग्रामपंचायतीच्या व्हरांड्यातील खिडकीला अडकवलेली टपाल पेटी न्याहाळायचो कुणीतरी खिडकीवर चढून पेटीचे झाकण उघडझाप करायचं.कुणीतरी आत हात घालून काय आहे का पहायचं.कधी हात पेटीत अडकवून घ्यायचो.कुणी ती पेटी वाजवायची.कुणीतरी ओरडलं तर धूम ठोकायची.असा खेळ सुट्टीत नेहमीच चालायचा.यात महत्वाची कागदं येतात जातात असं कुणीतरी सांगून जायचा. मग हळूहळू थोडी माहीती होत गेली.

…आमच्या वाड्यातला गोरापान आणि घाऱ्या डोळ्याचा बापू तात्या(बापू वाघमारे) सायकलीला पिशवी अडकवून दररोज सकाळी करगणीला जायचा आणि काही तासानं परत यायचा. असं नेमानं घडायचं. त्याची जायची आणि यायची वेळ एकच असायची. शाळेपुढून त्याचं जाणं येणं असायचं. त्यामुळं बापू तात्या करगणीतून रोज पिशवीतून काहीतरी आणतो आणि घेऊन जातो याचंही कुतुहल असायचं. बापू तात्या करगणीतून आलेला दिसला की पत्रं आली असं ऐकायला मिळायचं.

गावात पाटलाच्या वाड्याजवळ असणाऱ्या अत्ताराच्या घरात पोस्ट ऑफिस होतं. तिथं हुसेन अत्तार पोस्टमास्तर म्हणून असायचे. त्यांच्याच घरातल्या एका खोलीत पोस्ट असायचं. उंचपुरा,मोठ्या डोळ्यांचा,खड्या आवाजाचा आणि हसऱ्या चेहऱ्याचा हुसेनभई आजही डोळ्यापुढून हटता हटत नाही. हुसेनभई नेहमी पोस्टाची महत्वाची पत्रे न चुकता बापू तात्यांकडून गावातल्या वाड्यावस्त्यावर पोहचवायचे. कुणाला नोकरीचा कॉल आला,कुणाची मनीऑर्डर आली सगळी खबर पोस्ट मास्तर जवळ असायचीच. पोस्टानं आमचं महत्वाचं यायचं आहे,आलं म्हणजे सांगा -असं अवर्जून तरुण पोरं हुसेन मास्तरला आठवणीनं सांगत रहायची. रोज बापू तात्यालाही विचारत रहायची. पोस्ट असलेल्या या खोलीत आलेल्या पोस्टावर जाडजुड असा शिक्का काळ्या शाईत बुडवून मारलेला आवाज बाहेर ऐकू यायचा. त्यावेळी १५ पैशाचं जाड पोस्टकार्ड मिळायचं त्यावर रुबाबदार पट्टेरी वाघाचं चित्र असायचं.

चौथी पाचवीत होतो तेव्हा सावंताची बायना काकू तिच्या मुंबईतल्या पोरीकडं साधं पोस्टकार्ड लिहून पाठवायला सांगायची. ती बरीच लांबड लावत लिहायला सांगायची पण पत्रावर थोडंच लिहायला जागा असायची. पत्ता लिहून पोस्टात टाकायला द्यायची. कधी मुंबईहून पोरीचं पत्र आलं की वाचून दाखवायला हाक मारून बोलवायची.

खरंतर इथूनच असं पोस्टाचं नातं जुळत गेलं.मी ही माझ्या मुंबईच्या मोठ्या आत्त्याबाईला पत्र पाठवायचो. गावाकडची ख्यालीखुशाली कळवायचो. तिचंही पत्र यायचं. पाचवीत असताना माझ्या मुंबईच्या याच इंदिरा आत्याने पोस्टाने जाड  आणि मजबूत असे पाठीवर अडकवायचे कापडी दफ्तर पाठविले होते. ते दफ्तर पाठीवर घेऊन किती मिरवलं होतं मी.

ती कधी कधी मनीऑर्डर करून पैसेही पाठवायची. पैशातून पाटी-पुस्तकं-कपडे घ्यायला सांगायची. खूप शिक म्हणायची. तिचा आणि माझा पोस्टामुळंच हा दुवा जुळत राहीलेला. ती आता नाही पण तिच्यामुळंच खरंतर शिक्षणाची गोडी लागली होती. तिनं रुजविलेल्या शिक्षणाच्या जिद्दीमुळंच मी शिक्षण घेत राहीलो. माझी तीन पुस्तके प्रकाशित झाली. M.Ed., SET, झालो. आणि चार विद्यापिठाच्या Ph.D.साठी निवडलोही गेलो. माझ्या बालपणीच्या प्रत्येक आठवणीत पोस्टाचा आणि मुंबईच्या आत्याबाईचा ठेवा चिरंतन आहे. माझ्या निंबवड्याच्या रेखा आत्यालाही मी साधं पोस्टकार्ड लिहून पाठवायचो.

कधी लाल शाईनं लिहलेला कागद बापूतात्या घेऊन यायचा. ती तार असायची. लाल अक्षरातलं पत्र बघितलं की बायकांची रडारड सुरू व्हायची. गलका व्हायचा. कुणीतरी गेल्याची खबर असायची. कुणीतरी शिकलं सवरलेलं ती तार वाचून दाखवायचं. तार आलीय म्हंटलं की सगळे धसका घ्यायचे.

मी सातवीत असताना एकदा गावात येणाऱ्या पेपरमधले कोडे सोडवून पोस्टाने पाठवले होते. काही दिवसांनी बापूतात्याने पार्सल आले आहे,पोस्टातून सोडवून घ्या- म्हणून निरोप दिलेला. बक्षीसाचा रेडीओ पोस्टाने माझ्या नावे आला होता. त्याचं भारी कौतुक माझं मलाच वाटलं होतं. हुसेनभईने दीडशे का दोनशे रुपये भरून तो सोडवून घ्यायला सांगितले होते. पण तेवढे पैसे नव्हते. आमच्या आप्पाने कुणाकडून तरी पैसे गोळा करून दोन दिवसांनी तो रेडीओ सोडवून घेतला होता. ‘खोक्यात काहीही असेल,अगदी दगडंही,आमची जबाबदारी नाही’ असं हुसेनभईने अगोदरच सांगून बक्षीसाची हवाच काढून घेतली होती. पण खोक्यात चांगला मर्फी कंपनीचा रेडीओ आला होता. सेल घालून सुरुही झालेला. केवढा आनंद झाला होता. रेडीओ सुरु करून गावातनंही मिरवला होता. आप्पा सकाळ संध्याकाळ मोठ्या आवाजात तो रेडीओ लावून घराबाहेरच्या दिवळीत ठेवायचा. पुढं कितीतरी दिवस तो साग्रसंगीत सोबत वाजत राहीलेला.

पुढं हळू हळू काही पुस्तकं पोस्टानं मागवू लागलो. रंगपेटीही एकदा पोस्टाने आली होती. दिवाळीच्या वेळी पोस्टकार्डवर आकर्षक ग्रिटिंग कार्ड रंगवून ते मित्र व नातेवाईकांना पाठवलेली अजूनही आठवते. पुढं कॉलेजला असताना घरून मनीऑर्डर यायची. शिक्षणासाठी तोच आधार असायचा. आईआप्पाला पत्रातून ख्यालीखुशाली पाठवायचो. गावाकडून माझे दोस्त कधी गुंड्या,कधी रावसाहेब पत्र पाठवायचे. शाळेतला दोस्त मधू पुकळे काम शोधण्यासाठी मुंबईला गेला होता तेव्हा आठवणीनं पत्र मुंबईतनं पाठवायचा. पिक्चरमधल्या गोविंदाला भेटलेला किस्सा पत्रातून त्याने कळवला होता. रक्षाबंधनाच्या दोन तीन दिवस आधी मुंबईच्या अंजूताईच्या राख्या न चुकता पोस्टाने येत रहायच्या.जवळच्या कितीतरी ज्ञात अज्ञातांनी पोस्टाने नोटस्,पुस्तके आणि मैत्रीची पत्रे पाठवलेली अजूनही आठवतात.नोकरीचा कॉलही पोस्टाने आलेला आजही मी जतन करून ठेवलाय. सिने अभिनेते स्व.दादा कोंडके यांना पाठवलेले पत्र अजूनही लक्षात आहे. ते पत्र त्यांना मिळालं का नाही काहीच कळलं नाही. कॉलेज जीवनात कॉलेजमधल्या एका मैत्रीणालाही पाठवलेले पत्रही तिला पोहचले का नाही काहीच कळलं नाही. ‘आमचा बाप आणि आम्ही ‘या पुस्तकाचे लेखक डॉ.नरेंद्र जाधव यांना माझे

‘काळजातला बाप ‘ पुस्तक दोनवेळा पाठवले होते. दोन्ही वेळा चुकीचा पत्ता म्हणून परत आलेले ते पार्सल मी अजूनही तसेच पॅकिंगमध्ये जपून ठेवलंय.

…अशा कितीतरी आठवणीं पोस्टाशी नाते घट्ट करणाऱ्या.. आजही त्या मनाच्या पोस्ट पाकीटात जतन करून ठेवल्यात पोस्टातल्या बचत खात्यासारख्या…!

आज पोस्ट खात्यात बरेच बदल झालेत पण पोस्टाशी असलेला आठवणींचा सिलसिला अजूनही माझ्या गावातल्या पोस्टमन बापू तात्या आणि हुसेन मास्तरच्या भोवती स्पीड पोस्ट सारखा पिंगा घालत राहतो…!

(आगामी संग्रहातून..)

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘रंग माझा वेगळा….’ – सुश्री सुलभा गुप्ते ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘गोष्ट खूप छोटी असते….’ – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

रंगात रंग तो गुलाबी रंग

मला बाई आवडतो श्री रंग ॥

छेः छेः ! गैर समज करून घेऊ नका . माझे नाव गुलाबी नाही आणि मी हा नवऱ्याच्या नावाचा उखाणाही घेतलेला नाही, त्याचे नाव पण श्रीरंग नाही. कोणी म्हणेल लेखिकेच्या मनात आधीच होळीचे रंग भरलेत , तसे पण नाही.

इंद्रधनुष्याचे सात रंग सर्वज्ञात आहेत —- ” ता ना पि हि अ नि जा “

असे इंद्रधनूचे रंग लक्षात ठेवण्याचे सोपे सूत्र शाळेत आम्हाला शिकवले होते . तसेच हे सात रंग एकत्र येतात तेव्हा इंद्रधनुष्य तयार होते , जे फक्त आकाशात दिसते, ही निसर्गाची किमया . आणि ते बघायला आबालवृद्ध सगळेच धावतात कारण हे अद्भुत बघून खूप आनंद होतो.

माणसाच्या आयुष्यात देखील हे सात रंग कधी ना कधी डोकावून जातात—-

केशरी रंग  त्यागाचा

पांढरा रंग शांतीचा

हिरवा भरभराटीचा

गुलाबी रंग प्रेमाचा

लाल रंग रक्ताचा

काळा म्हणजे निषेध !

—अशा सर्व संमत कल्पना आहेत.

माझ्या मनात मात्र प्रत्येक रंगाच्या वेगळ्या कल्पना आहेत. रंगांशी निगडित आपल्या भावना, अनुभव असतात. तो तो रंग बघून त्या भावना जागृत होतात.

केशरी म्हटले की डोळ्यांसमोर उभा राहतो , डौलाने डुलणारा , शिवाजी महाराजांचा ” भगवा ” –मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक, महाराष्ट्र धर्माची, हिंदू धर्माची शान, देवळांच्या शिखरांवर शोभणारे केशरी ध्वज ! विजय पताका !

पांढरा रंग म्हणताच मला आठवतात  हिमालयाची उंच उंच बर्फाच्छादित शिखरे . त्यागाचे प्रतीक . उन्हातान्हाची पर्वा  न करता वर्षानुवर्षे उभे राहून सीमेचे रक्षण करणारा, आपल्या उंचीने भारताची शान उंचावणारा नगाधिराज हिमालय.  – मनात अभिमान उत्पन्न करणारा !

पांढरा रंग आणखी एक आठवण करून देतो — – सर्वसंग परित्याग करून पांढरी वस्त्रे  परिधान करणारे श्वेतांबर जैन साधू ! आपोआप आदराने आपण नतमस्तक होतो .

हिरवा रंग तर सृष्टीचा—

” हिरवे हिरवेगार गालिचे । हरित तृणांच्या मखमालीचे ” 

बारकाईने विचार केला तर निसर्गात हिरव्या रंगाची लयलूट आहे . गवत हिरवे , इवल्या रोपट्यांची पाने हिरवी, वृक्षलतांची पाने हिरवी . झाड लहान असो की मोठे, पाने मात्र हिरवीच !

मातृत्वाची चाहूल लागलेल्या तरुणीसारखी, हिरव्या रंगाने नटलेली सृष्टी ! काय विलोभनीय रूप तिचे !

लाल रंग आणि रक्ताचे जवळचे नाते . माझ्या डोळ्यांसमोर येथे युद्ध भूमीवर सांडलेले सैनिकांचे रक्त आणि जीव वाचवण्यासाठी केलेले रक्तदान . रक्तच ! पण एक मातृभूमीसाठी सांडलेले आणि दुसरे कुणा अनोळखीचा जीव वाचवण्यासाठी केलेले रक्तदान

काळा रंग निषेधाचा ! मोर्चामध्ये वापरतात काळे झेंडे. पण माझ्या मनात चित्र उभे रहाते – पावसाळ्यातले ते काळे ढग – पावसाच्या आगमनाची शुभवार्ता घेऊन येणारे दूतच ते ! बळीराजाला आनंद देणारे, ग्रीष्माच्या उन्हाने तापलेल्या तृषार्त भूमीला शांती संदेश घेऊन येणारे !

आता मुख्य माझा आवडता रंग – – अहो कोणता काय ? ?? –अर्थात गुलाबी .

नवजात बालकाच्या ओठांचा गुलाबी–प्रेयसीच्या ओठांचा गुलाबी–लज्जेने प्रियेच्या गालांवर फुलणारा गुलाबी–

मधुर , औषधी गुलकंद बनवावा असा गुलाबांचा गुलाबी–आपल्या उमलण्याने आसमंत दरवळून टाकणारा सुंदर गुलाब , रंग गुलाबी—- हे सर्व तर अर्थात मोह पाडतातच पण मुख्य म्हणजे —

लहानपणापासून ऐकलेले, वाचलेले, फोटोत पाहिलेले – सावळ्या घननीळाचे गुलाबी पदकमल —-

कमलपुष्प अधिक गुलाबी– की भगवान श्रीकृष्णाची सुकुमार पावले अधिक गुलाबी ? मनात नेहमीच संभ्रम निर्माण होतो . 

पण म्हणूनच माझा आवडता रंग  – श्रीरंग ! भक्ति- प्रेमाचा रंग श्री रंग .

आठवा रंग . श्री रंग. 

लेखिका : सुलभा गुप्ते, सिडनी .

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पालक स्वतःचीच… लेखिका :उषा फाटक ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ पालक स्वतःचीच… लेखिका :उषा फाटक ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

मी. वय ७४ ….पालक स्वतःचीच !!

पंचवीस वर्षापूर्वी माझी दोन्ही मुलं घर सोडून बाहेर गेली.

प्रथम शिक्षणासाठी, मग नोकरी साठी.

आधी देशात, नंतर परदेशात.

त्याच वेळी मनाशी खूणगाठ बांधली की आता यापुढे आपणच आपल्या साठी. (खरंतर ही खूणगाठ मुलं जन्माला आली तेव्हाच बांधली होती, की वीस पंचवीस वर्षांनी पाखरं घरटं सोडून उडून जाणार).

एकदा मनाची तशी धारणा झाल्यावर पुढचं फार सोपं होतं. आपली सर्व कामे आपणच करायची.

शक्यतो कुणावर अवलंबून रहायचं नाही. एकदा करायला लागलं की सगळं जमतंच !!

त्या काळात हा शब्द नव्हता पण ‘आत्मनिर्भर’ झाले.

घरात कंप्यूटर असून कधी हात न लावणारी मी, पन्नासाव्या वर्षी क्लासला जाऊन कंप्यूटर शिकले. मुलांना मेल करु लागले. पुढे फेसबुक, व्हाट्सअँप, स्काईप, व्हिडिओ कॉल …टेक्नॉलॉजी बदलत गेली तसं मीही सगळं वापरायला शिकले. मुलं पुढे पुढे धावताहेत… आपण थोडं चालायला तरी हवं. नाहीतर आपल्यातलं अंतर वाढतच जाईल.

केल्याने होत आहे रे….. आधी केलेची पाहिजे !!

आत्मविश्वास वाढत गेला. आता कोविडच्या काळात ऑनलाईन व्यवहार सोपे झाले. खरेदी, बँकेचे व्यवहार ऑनलाईन करायला शिकले. काही अडले, तर विनासंकोच कुणाला विचारते.

आता मी एकटी रहाते. मुलांशी संपर्क असतोच. आपली आई चांगली खंबीर आहे, हा विश्वास मुलांनाही आहे.

सुदैवाने प्रकृती चांगली आहे. लहानपणापासून केलेला व्यायाम आणि संतुलित आहार-विहार यामुळे हे साध्य झाले आहे.

नातेवाईक, शेजारी यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. मित्रमंडळी आहेत, स्वतःचे छंद आहेत. वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच कधी पडत नाही.

एक गोष्ट नक्की…. आपण दुसऱ्यासाठी होईल तेव्हढे करत रहावे… आपल्यावर वेळ आली तर कोणीतरी नक्की धावून येतील. आधी प्रेम द्यावे आणि मग प्रेम घ्यावे…

“एकमेका करू सहाय्य” हा आजच्या जगण्याचा मूलमंत्र आहे.

आज तरुण असलेल्या पिढीलाही मी हेच सांगेन…  म्हातारपणासाठी जशी आर्थिक तरतूद करता, तशी शारीरिक आणि मानसिक तरतूदही करा. शारीरिक फिटनेससाठी व्यायाम  आणि मानसिक फिटनेससाठी आवडीचा छंद जोपासा… स्वतःचे विश्व निर्माण करा….आणि मुख्य म्हणजे झाल्यागेल्याची खंत करणे सोडून द्या. वृत्ती समाधानी ठेवा.

आणि हो, हे सर्व एका दिवसात निर्माण होत नाही. तरुण वयातच याची सुरुवात करावी लागते. तरच म्हातारपण सुखाचे होईल !

लेखिका :उषा फाटक

संग्राहिका: मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावधानता… भाग २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ सावधानता… भाग २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

जलचर  म्हणजे माशांचे प्रकार, कासव ,  मगरी यांचे सावधपण वेगळे असते. शार्क माशांच्या कातडीमधे विद्युत वहन होते. चुंबकीय क्षेत्रामुळे त्याचे व्होल्टेज तयार होते.व त्यानुसार तो डाव्या उजव्या बाजूला जाऊन दिशा ठरवतो.तसेच व्हेल मासा जेव्हा शंभर – शंभर कि. मि. प्रवास करतो तो एक डिग्रीसुद्धा इकडे तिकडे न होता ,सरळ रेषेत प्रवास करतो. याबद्दलचे कोडे अजूनही उलगडलेले नाही. सील सारखे सस्तन जलचरसुद्धा चुंबकीय  क्षेत्राचा वापर करतात. चुंबकीय क्षेत्रात थोडा जरी बदल झाला तरी तो त्यांच्या लक्षात येतो.आँक्टोपस आपले अवयव कसेही  वाढवतो आणि सावज पकडतो. तारा मासे विषारी द्रव सोडतात. समुद्री गाय म्हणजे अवाढव्य जलचर! सात सात तास अखंड समुद्रातील वनस्पती खात असतात.व ताशी पाच मैल वेगाने  फिरत असतात. मगरी आपली  अंडी मऊ भुसभुशीत संरक्षित जागेत व डोहाच्या ठिकाणी घालून ती मातीने गाडून त्याची राखण करतात. अंड्यातून पिल्ले बाहेर आली की पोहायला सुरुवात करतात. बदके किंवा राजहंसही एखाद्या प्राण्यापासून धोका आहे असे कळताच त्यावर ते फुत्कारतात.आणि अत्यंत आक्रमक होतात.काही जीवांना उपजतच द्न्यान असते. बदकाची पिल्ले अंड्यातून बाहेर पडली की,लगेच दाणे टिपायला लागतात. आकाशात घार दिसली की कोंबडी वेगळा आवाज काढून आपल्या पिलांना जवळ बोलावते.आणि आपल्या पंखाखाली घेऊन त्यांचे रक्षण करते.या सावधपणाचे वर्णन कसे करावे?

पक्ष्यांच्या बाबतीत सांगायचे तर, पक्षी स्थलांतर ही अनाकलनीय आणि विस्मयकारक घटना आहे असे म्हणावे लागेल. उत्तर ध्रुवावरील (सैबेरिया)भागात थंडी सुरू झाली की, खाद्याच्या तटवड्यामुळे अनेक पक्ष्यांचे थवेच्या थवे स्थलांतर करू लागतात. एका वर्षात ३६०००कि.मि.प्रवास म्हणजे उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव आणि पुन्हा उत्तर ध्रुव असा न चुकता करतात आणि  रात्री दाट पानांंमधे विश्रांती घेऊन स्वसंरक्षण करतात.अनेक पक्षी आपली विष्ठा पातळ आवरणात ठेवून ,विसर्जन करुन ,घरटे साफ ठेवतात. पिलांना अन्न भरवून ती स्वावलंबी होईपर्यंत सावधपणे त्यांच्या पाठीशी रहातात.सुगरण पक्ष्याचे तर किती कौतुक करावे तितके कमीच.! हिवाळ्यात थंडीची पूर्वसूचना ते लोकांना देतात. कायम थव्याने राहून ,घरटीही मोठ्या संख्येने बांधून, नवीन वसाहतच स्थापन करतात. धोका उत्पन्न झाल्यास चिट् चिट् असा आवाज काढून संपूर्ण वसाहतीला धोक्याचा इशारा देतात. नरपक्षी घरट्याचा पाऊण भाग विणतो.मादीला घरटे पसंत पडले की, मग तो अस्तर लावून घरटे पूर्ण करतो.अशी चार पाच घरटी बांधून कुटुंब वाढवतो.

घरटी बांधताना जमिनीपासून तीस मिटर उंचीवर व घरट्याखाली पाणी असेल अशा  ठिकाणी  किंवा काट्याच्या बाभळीच्या झाडावर अशा निर्धोक जागी घरटे बांधणे पसंत करतो.घरटे बांधताना देखील सुरुवातीला नळीचा आकार ,आतमध्ये  कधी जोडघरेही असतात. जेणेकरुन मोठा पक्षी  आत जाणार नाही. ही सावधानताच नव्हे काय?

सुगरणीवर अनेकांनी कविताही केल्या आहेत. बहिणाबाई तर म्हणतात, “अरे खोप्यामधी खोपा , सुगरणीचा चांगला,एका पिलासाठी तिने जीव झाडाला टांगला. किती छान!

क्रमशः…

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ होतं असं कधीकधी…! ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ होतं असं कधीकधी…!  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

खूप महत्वाच्या मीटिंगमध्ये असतो आपण…

बऱ्याच वर्षांनी अचानक एका जवळच्या मित्राला आठवण येते आपली….

इच्छा असूनही कॉल उचलू शकत नाही आपण…

संध्याकाळी घरी आल्यावर आठवण येते…

परत कॉल करावा तर बोलायला विषय नसतो आपल्याकडे…

टाळतो आपण कॉल करायचा….

त्याचा दोन दिवसानंतर मेसेज येतो…

‘तुझ्या ऑफिस बाहेर होतो…

भेटलो असतो…’

जुन्या आठवणी काढत बसतो आणि  मन रमवतो त्यातच..

स्वतःला खोटं खोटं समजावत…!

होतं असं कधी कधी….!!!

🍁🍁🍁

कडक उन्हात सिग्नलला बाईक उभी असते आपली…

रस्त्याच्या कडेला एक वृद्ध जोडपं असतं मागत लोकांना…

माया,कणव दाटून येते मनात आपल्या…

‘कसं आपल्या आई वडिलांना लोक असं वाऱ्यावर सोडत असावेत?’

पाकिटात हात जातो…

शंभराची नोट लागते हाती…

व्यवहार जागा घेतो ममतेची…

समोरचा म्हातारा ओळखतो… बदलतो…

“दहा दिलेस तरी खूप आहेत पोरा…”

तो सुटका करतो आपली पेचातून…

आपल्याच नजरेत आपल्याला छोटं करून…

होतं असं कधी कधी….!!!

🍁🍁🍁

दिवाळीचे पाहुणे असतात जमलेले…

आज कामवाली येणार की नाही याची धाकधूक असते…

तिच्या असण्याने आपण किती निवांत आहोत याची जाणीव होते अशा  वेळी…

दुपारची जेवणे उरकून गप्पा रंगात आलेल्या असतात…

ती येते…

काम आटोपते…

तिच्या मुलांना राहिलेली बासुंदी द्यावी का ह्या संभ्रमात असताना, कामवाली एक डबा देते हातात आपल्या…

चिवडा लाडू असतो त्यात…

“तुम्ही दर वेळा देता… आज माझ्याकडून तुम्हाला…”

‘कोण श्रीमंत कोण गरीब’, हा विचार सोडत नाही पिच्छा आपला…

होतं असं कधी कधी….!!!

🍁🍁🍁

ढाराढूर झोपेत असतो उन्हाळ्याचे गच्चीवर…

आई उठवते उन्हं अंगावर  आल्यावर…

अंगात ताप असतो तिच्या…

आपण सुट्टीचा आलोय घरी म्हणून उसनं बळ आणते अंगात ती…

मेसच्या खाण्याने आबाळ होत असेल म्हणून चार दिवस होईल तेवढे जिन्नस पोटात आणि उरलेले डब्यात भरून येतात आपल्यासोबत…

दिवस उलटतात…

वडिलांचा एके रात्री फोन येतो…

“काम झालं असेल तर आईला एक फोन कर… आज तिचा वाढदिवस होता…”

कोडगेपणा म्हणजे हाच तो काय…!

चडफडत facebook च्या virtual मित्राना केलेले  birthday विश आठवतात…..

लाजत तिला फोन करतो…

“आमचा कसला रे या वयात वाढदिवस? तू जेवलास ना?? तब्येतीला जप बाबा…”

ती बोलते…

कानात गरम तेल ओतल्याचा भास होतो…

अश्रूंचा मुक्त वावर होतो डोळ्यांतून…

काहीतरी खूप खूप दूर जातंय आपल्या पासून असं जाणवत राहतं…!!

खरंच, होतं असं कधी कधी…!!

लेखक :अज्ञात

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावधानता… भाग १ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ सावधानता… भाग १ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

डार्विनचा उत्क्रांती वादाचा सिद्धांत,  “Survival of the fittest “(जगण्यास  जे लायक असतील तेच जगतील .) याचा विचार करता माणूस हा पथ्वितलावर उत्क्रांत झालेला शेवटचा प्राणी. निसर्गाने मानवाला बुद्धीचा  नजराणा बहाल केला आहे. आणि त्याच्या जिवावर तो जमिनी पासून आकाशातच काय, अवकाशापर्यंतचे क्षेत्र आपल्या कवेत घ्यायला लागला आहे. तरीसुद्धा जिद्न्यासा आणि कुतूहलाने प्राणी, पक्षी त्यांचे वर्तन याचा अभ्यास व संशोधन करावेसे वाटायला लागले आहे. कारण त्यांच्या संवेदना माणसापेक्षा कितीतरी पटीनी अधिक असल्याचे लक्षात आले आहे.

‘सावधपणा’ म्हणजे दक्ष असणे, सावध असणे वगैरे. प्रत्येक जीवाला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दक्ष व सावध रहावे लागते. सजीव कसे सावध असतात ,याचा विचार करायचा तर अगदी झाडे, वेली, एकपेशीय जीवापासून कीटक, माशा, मुंग्या,जलचर, पक्षी, प्राणी, जंगली प्राणी यांचा विचार करावा लागेल.

अँमिबासारख्या एकपेशीय प्राण्याला स्पर्शेंद्रिय नसते. पण त्याला स्पर्श केल्यास सावध होऊन तो आपले अंग आक्रसून घेतो. युग्लिना या एककोषिक प्राण्यालाही स्पर्शेंद्रिय नसते. पण प्रकाशाची जाणीव करुन देणारे  अतिसूक्ष्म इंद्रिय असते.त्यानुसार त्याला सजगता येते.व तो सावध होतो.

अगदी लहान कीटक वाळवी, मुंग्या, झुरळ, यांच्यामध्येसुद्धा सावधपणा असतो.त्यांचे वर्तन वेगवेगळे असते.त्यांची एक भाषा असते. कामकरी वाळवी किंवा मुंग्या रांगेतून जाताना येताना आपल्या भूमिकांशी स्पर्श करीत चालतात. चालताना त्यांच्या अंगातून एक प्रकारच्या वासाचा द्रव पाझरतो.त्या वासामुळे त्या न चुकता आपापल्या वारुळात परततात. मुंग्या जर चुकून दुसऱ्या समुहात गेल्या दुसऱ्या मुंग्या त्यांना सामावून घेत नाहीत. हुसकावून लावतात. किंवा मारतात. कित्येकदा हवेच्या बदलातला धोका कळल्याने मुंग्या तोंडात अंडी घेऊन जाताना आपण पहातो.हा सावधपणाच ना?नाकतोडा, टोळासारख्या कीटकांच्या पोटावर पातळ असलेले द्न्यानेंद्रिय  ध्वनी ग्रहण करतो. व त्याद्वारे तो  सावध राहू शकतो.काही कीटकात कामकरी असतात ते घरे बांधतात.अन्न गोळा करून संततीची काळजी घेतात.सैनिक असतात ते घर आणि संततीचे रक्षण करतात.मादी कीटक प्रजोत्पादन करते.प्रत्येक जण आपापले काम दक्ष राहून करत असतो. मधमाश्यांबद्दल सांगायचे तर कामकरी माशा मधाचे ठिकाण सापडल्यावर मोहोळावर येऊन विशिष्ट तर्हेने  गोलाकार 8 आकड्याप्रमाणे फिरुन दोन्ही बाजूला हालचाल करतात. आणि मध मिळविण्याची माहिती इतरांना देतात. निरिक्षणाने सिद्ध झालेले आहे की मधमाशीला उत्तम स्मरणशक्ती , हुशारी व वेळेचेही भान असते. कुंभारीण  तोंडाने मातीचा चिखल करुन सुंदर घर  बनवते. व त्यामध्ये अंडी घालते.त्यांच्या वर्तनाबद्दल  खरोखरच आश्चर्य वाटते.

क्रमशः…

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – प्रस्तावना आणि सूक्त (१ : १) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – प्रस्तावना आणि सूक्त (१ : १) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

प्रस्तावना आणि सूक्त ( १ : १ )

सनातन धर्माचे तत्वज्ञान ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांमध्ये सांगितलेले आहे. विद् या धातूपासून वेद या शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे. विद् या धातूचे जाणणे, असणे, लाभ होणे आणि विचार करणे, ज्ञान देणे असे विविध अर्थ आहेत. 

वेद हे अपौरुषेय ज्ञान आहे. संपूर्ण ब्रह्मांडात जे काही आहे, त्या सर्वांचे जे काही गुणधर्म आहेत ते सर्व असप्रज्ञात आत्मसाक्षात्काराने जाणून घेतल्याने वेदांची निर्मिती झाली. हे सर्व ज्ञान मूलतः ज्ञानी ऋषींच्या अनुभूतिजन्य प्रज्ञेत साठविलेले होते आणि ते केवळ मौखिकरित्या त्यांच्या शिष्याला दिले जात असे. पुढे श्रीगणेशाने  देवनागरी लिपी निर्माण केल्यानंतर केव्हा तरी ते ग्रंथ स्वरुपात उपलब्ध झाले असावेत. वेद जुन्या संस्कृत भाषेत किंवा गीर्वाण भाषेत आहेत. 

यातील ऋग्वेद मराठी गीतरुपात मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ऋग्वेदातील अनेक खंडांना मंडळ अशी संज्ञा असून त्यातील प्रत्येक अध्यायाला सूक्त म्हणतात. काही श्लोकांनी म्हणजेच ऋचांनी  प्रत्येक सूक्त बनते. वेगवेगळ्या ऋषींनी वेगवेगळ्या छंदांत या ऋचा रचलेल्या आहेत. मूळ ऋचा दीड ते दोन चरणांच्या आहेत. सुलभ आकलनासाठी आणि गेयता प्राप्त होण्यासाठी मी त्यांचा मराठीत भावानुवाद केलेला आहे. गीतऋग्वेदाचा भावानुवाद येथे मी क्रमशः प्रसिद्ध करणार आहे. 

ही गीते सुश्राव्य गीतात गायली गेलेली असून त्यांचे व्हीडीओ युट्यूबवर प्रसारित झालेली आहेत. या व्हिडीओत गीतांबरोबरच त्या त्या सुक्तात आवाहन केल्या गेलेल्या देवतांची रेखाचित्रे देखील  उपलब्ध आहेत. प्रत्येक गीताच्या तळाशी मी आपल्या सोयीसाठी मुद्दाम त्या गीताच्या व्हिडिओची लिंक प्रसारित करीत आहे. सर्वांनी मुद्दाम त्या स्थळी भेट देऊन या व्हिडिओचा आस्वाद लुटावा. 

डॉ. निशिकांत श्रोत्री, एम. डी., डी. जी. ओ. 

——————————————————————————————————————————-

ऋग्वेद अग्निसुक्त १.१

देवता : अग्नि 

ऋषी : मधुछन्दस वैश्वामित्र

मराठी भावानुवादित गीत : डॉ. निशिकांत श्रोत्री

 

अ॒ग्निमी॑ळे पु॒रोहि॑तं य॒ज्ञस्य॑ दे॒वमृ॒त्विज॑म् । होता॑रं रत्‍न॒धात॑मम् ॥ १ ॥

अग्निदेवा तूचि ऋत्विज यज्ञपुरोहिता

होऊनिया आचार्य अर्पिशी हविर्भाग देवता

अनुपम रत्नांचा स्वामी तू निधीसंचय करितो

स्तवन तुला हे अग्निदेवते भक्तीने भजतो ||१||

अ॒ग्निः पूर्वे॑भि॒र्ऋषि॑भि॒रीड्यो॒ नूत॑नैरु॒त । स दे॒वाँ एह व॑क्षति ॥ २ ॥

धन्य जाहले प्राचीन ऋषींना अग्निस्तुती करण्या

अर्वाचीन ऋषी उचित मानिती अग्नीला स्तवण्या

याग मांडिला विनम्र होऊनी अग्नीला पुजिण्या

सिद्ध जाहला अग्नीदेव देवतांसि आणण्या ||३||

अ॒ग्निना॑ र॒यिम॑श्नव॒त्पोष॑मे॒व दि॒वेदि॑वे । य॒शसं॑ वी॒रव॑त्तमम् ॥ ३ ॥

भक्तांसाठी प्रसन्न होता तू वैभवदाता

वृद्धिंगत हो शुक्लेंदूवत हरण करी चिंता

यशोवंत हो पुत्रप्राप्ती तुझ्या कृपे वीरता

कृपादान हो सर्व सुखांचे अग्निदेव भक्ता ||३||

अग्ने॒ यं य॒ज्ञम॑ध्व॒रं वि॒श्वतः॑ परि॒भूरसि॑ । स इद्दे॒वेषु॑ गच्छति ॥ ४ ॥

कृपादृष्टी तव चहूबाजूंनी ज्या यज्ञावरती

तया होतसे वरदाने तव पवित्रता प्राप्ती

प्रसन्न होती देवदेवता पावन यज्ञाने

स्वीकारुनिया त्या यागाला तुष्ट तयांची मने ||४|| 

अ॒ग्निर्होता॑ क॒विक्र॑तुः स॒त्यश्चि॒त्रश्र॑वस्तमः । दे॒वो दे॒वेभि॒राऽग॑मत् ॥ ५ ॥

अग्नीद्वारे समस्त देवा हविर्भाग प्राप्त

पंडित होती बुद्धीशाली मिळे ज्ञानसामर्थ्य

आळविलेल्या सर्व प्रार्थना अग्निप्रति जात

देवांसह साक्षात होऊनी यज्ञ करीत सिद्ध ||५|| 

यद॒ङ्‍ग दा॒शुषे॒ त्वम् अग्ने॑ भ॒द्रं क॑रि॒ष्यसि॑ । तवेत्तत्स॒त्यम॑ङ्‍गिरः ॥ ६ ॥

अंगिरसा हे अग्निदेवते आशीर्वच देशी

मंगल तुझिया वरदानाने तृप्तीप्रद नेशी

कृपा तुमची हे शाश्वत सत्य भक्ता निःशंक

शीरावर वर्षाव करावा तुम्हा हीच भाक ||६||

उप॑ त्वाग्ने दि॒वेदि॑वे॒ दोषा॑वस्तर्धि॒या व॒यम् । नमो॒ भर॑न्त॒ एम॑सि ॥ ७ ॥

अहोरात्र हे अग्निदेवते वंदन तुज करितो

प्रातःकाळी सायंकाळी आम्ही तुला भजतो

तुझी अर्चना मनापासुनी प्रज्ञेने करितो

लीन होउनी तव चरणांवर आश्रयासि येतो ||७||

राज॑न्तमध्व॒राणां॑ गो॒पामृ॒तस्य॒ दीदि॑विम् । वर्ध॑मानं॒ स्वे दमे॑ ॥ ८ ॥

पुण्ययज्ञि तू विराज होउन विधिरक्षण करिशी

यज्ञाधिपती यज्ञविघ्न नाश पूर्ण करिशी 

हीच प्रार्थना अग्नीदेवा तुझिया पायाशी 

तेज तुझे दैदिप्यमान किती आमोदा वर्धिशी ||८||

स नः॑ पि॒तेव॑ सू॒नवेऽ॑ग्ने सूपाय॒नो भ॑व । सच॑स्वा नः स्व॒स्तये॑ ॥ ९ ॥

आम्ही लेकरे अग्निदेवा मायाळू तू पिता

लाड पुरवुनी तूच आमुचे हरुनी घे चिंता

नकोस देऊ आम्हा अंतर लोटू नको दूर

क्षेम विराजे तुझिया हाती नसे काही घोर ||९||

भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री 

९८९०११७७५४

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गृहिणीची कमाई… सुश्री सुमन नासागवकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ गृहिणीची कमाई… सुश्री सुमन नासागवकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

एक दिवस एक उच्चशिक्षित नवरा आपल्या बायकोला  भाषण देत होता, “पैसे कमव आणि मग तुला कळेल  की पैसा कसा खर्च करावा.मी तुला आज एक दिवस देतो. घराच्या बाहेर पड आणि बघ किती स्पर्धा चालू आहे. काहीतरी प्रयत्न कर काम शोधण्यासाठी”…..आणि तीही एक शिक्षित बायको, एक आई आणि एक सून होती.

ती बाहेर निघाली आणि दिवसभर फिरत राहिली.. इकडे जा, तिकडे जा आणि मग तिच्या लक्षात आले, ‘अरे हो. खरंच की. आपण ही पैसा कमावू शकतो. मग का आपण शिक्षित असूनही इतके दिवस घालवले?’

घरी आली. नेहमीप्रमाणे सासू सासऱ्यांना वेळेवर नाश्ता, जेवण, मुलांचा डबा, वेळेवर शाळेत पाठवणे , नवऱ्याला डबा, त्याचा आवडीचा नाश्ता, जेवण बनवले आणि खोलीत गेली.

नवरा आला आणि म्हणाला, ” काय मग? कळाले असेल आज, मार्केटमध्ये किती स्पर्धा चालू आहे आणि तू फक्त घरात बसलीयस.”

तिने काही न बोलता त्याला एक लिस्ट दिली. त्यात तिने घरात  घालवलेली अनेक व्यर्थ वर्षे व मार्केट मध्ये त्या कामांसाठी मोजावी लागणारी किंमत यांची यादी होती.

तिने सुरुवात  त्याच्याच आई-वडिलांपासून केली होती. ज्यावेळेस त्याने वाचायला सुरुवात केली, त्याला एकदम घाम फुटला.

  • सासू-सासऱ्यांची सेवा, ज्याला मार्केटमध्ये केअरटेकर म्हणतात. पगार – ₹20,000
  • मुलांचा सांभाळ आणि त्यांना संस्कार लावणे ज्याला मार्केटमध्ये बेबीसीटिंग म्हणतात. पगार ₹15000
  • घरातील पसारा जागेवर ठेवणे  आणि घर काम करणे ज्याला मार्केटमध्ये मेड म्हणतात.पगार ₹5000
  • आणि त्याच बरोबर सर्वांची आवडनिवड बघून सकाळ संध्याकाळ केलेला स्वयंपाक,ज्याला मार्केटमध्ये कूक म्हणतात.पगार ₹10000
  • घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार ज्याला मार्केटमध्ये पाहुण्यांचे आदरातिथ्य करणारा होस्ट म्हणतात. पगार ₹5000 अशा प्रकारे तिने नवऱ्याकडे महिन्याच्या ₹55000 पगाराची मागणी केलेली होती.

मग त्याच्या डोळ्यातून हळू हळू अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ज्या व्यक्तीने स्वतःचा  कणभरही विचार न करता  माझ्या घराला वेळ दिला, तिची  किंमत मार्केटमध्ये शोधूनही न मिळणारी होती.

तात्पर्य एवढेच की ज्यावेळेस एक शिक्षित स्त्री घरात बसते त्यावेळेस ती खूप विचार करुन सगळं काही करत असते. एक आईच मुलांवर चांगले संस्कार करू शकते. त्यांच्याकडे चांगले लक्ष देऊ शकते.

गृहीत धरलेली प्रत्येक बायको ही एक जबाबदार सून, आई आणि बायको ह्यांचं कर्तव्य निस्वार्थपणे निभावत असते. त्यांना कमी लेखू नका.

लेखिका: सुमन नासागवकर, अमळनेर.

संग्राहिका :मंजुषा सुनीत मुळे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तनोटराय देवी…. लेखिका – सुश्री विभा पटवर्धन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ तनोटराय देवी…. लेखिका – सुश्री विभा पटवर्धन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

तनोट राय देवी – खरं तर हे नावसुध्दा मी आधी ऐकले नव्हते. पण आम्ही राजस्थान टूरला गेलो असताना जैसरमेलला टेन्टमधे राहून तेथील थरचे वाळवंट व त्या अनुषंगाने   वालुकामय सौंदर्याचा आस्वाद घेत असताना आमच्या गाईडने सांगितले की येथून साधारण २०० किलोमीटरवर प्रसिध्द श्री तनोट राय देवीचे जागृत मंदिर आहे. तेथे जायला ४ तास लागले. मंदिरात प्रवेश करतानाच मला नेहमीपेक्षा जरा वेगळे वाटले. चौकशीअंती कळले की हे मंदिर BSF – Border Security Force च्या अखत्यारीत आहे व या मंदिराची पूर्ण देखभाल अगदी पूजेसहीत BSF करते. त्यामुळे सर्वत्र एकप्रकारची शिस्त जाणवते. कसलेही अवडंबर नाही. सकाळची पूजा झाल्यावरचे प्रसन्न वातावरण, देखणी फुलांची आरास केली होती. स्थानिक लोक भक्तीभावाने दर्शनास येत होते. दर्शन लांबूनच होते. शेजारी बरेच गोटानारळ ठेवलेले होते, ते प्रत्येकजण घेऊन वाढवत होते. अर्धा देवीपुढे व अर्धा प्रसाद –हे सर्व विनाशुल्क. मंदिरात कोणीही पुजारी वा गुरूजी नव्हते. पण सारे काही शांतपणे चालले होते. 

मंदिर परिसरात फिरत असताना तेथे शोकेसमधे खूप सारे जवानांचे व बॉम्बचे फोटो दिसले. अशी माहिती मिळाली की BSF चे हे आराध्य दैवत आहे. १९६५च्या युध्दात पाकिस्तानी सैन्याने या मंदिराच्या परिसरात ३०००+ बाँम्ब फेकले होते, पण तरीही मंदिराचे काहीही नुकसान झाले नाही व सर्व बाँम्ब न फुटता वाया गेले. तेथे आजही बरेच बाँम्ब पहायला ठेवले आहेत. एवढे बॉम्ब टाकल्यावर कसलेही नुकसान न होणे हा आपल्या व पाकिस्तानी सैन्यासाठी एक चमत्कारच होता. म्हणून या देवीला ‘ बमवाली देवी ‘ असे पण म्हणतात. हा चमत्कार पाहून पाकिस्तानी सैन्याचे ब्रिगेडीयर शाहनवाज यांनी देवीदर्शनाची परवानगी मागितली. आपल्या सरकारने अडीच वर्षाने ती दिल्यावर त्यांनी देवीचे दर्शन घेतले व मंदिराला चांदीची छत्री अर्पण केली, जी आपल्याला आजही पहायला मिळते . 

मंदिराबाहेर १९६५च्या भारत पाकिस्तान युध्दाची आठवण म्हणून एक विजयस्तंभ उभारला आहे. हा स्तंभ आपल्या मनात आपल्या जवानांच्या शौर्याची व बलिदानाची आठवण जागवतो. मंदिराएवढेच या विजयस्तंभासमोर नतमस्तक होत असताना मी परत एकदा माझ्या हजारो जवानांचे प्राण वाचवणाऱ्या देवीपुढे विनम्रपणे झुकले व प्रार्थना केली की ‘ देवीमा अशीच माझ्या जवानांवर तुझी कृपा ठेव व अखंड पाठीशी रहा.’ 

येथून भारत पाकिस्तान सीमा २० किमी आहे. तेथे जाण्यासाठी या मंदिर परिसरातच BSF ने काही औपचारिकता पूर्ण केल्यावर पास देण्याची व्यवस्था केली आहे. ती पूर्ण करून आपल्याला बॉर्डरपर्यंत जाता येते. तेथे मोठा वॅाचटॅावर आहे. येथून सर्व परिसर छान दिसतो. यावेळी प्रथमच Front line – Border वर कार्यरत असलेली महिला ऑफिसर ड्युटीवर दिसली . तिच्याशी संवाद साधत आम्ही तिच्याप्रती वाटणारा आदर व अभिमान व्यक्त केला. त्यांचे नाव श्रीमति सुमती, व त्या श्री गंगानगरच्या असल्याचे त्यांनी सांगितले. या बॅार्डरपोस्टचा नंबर ६०९ आहे व शेवटचे गाव आहे बावलीया.  प्रत्यक्ष बॅार्डरवर, जेथून पाकिस्तान फक्त १५० मीटरवर आहे, तेथे जाण्याचा एक संस्मरणीय अनुभव घेऊन आम्ही समला परतलो.

 

लेखिका : सुश्री विभा पटवर्धन  

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘गोष्ट खूप छोटी असते….’ – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘गोष्ट खूप छोटी असते….’ – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

* तुम्ही गाडीतून जाताना, न उतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला, तर बऱ्याचदा तो मिळतच नाही, पण उतरून जर, “दादा, पत्ता सांगता का?” असं विचारलं, तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते….

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

 

*स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्याला, घरी पोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही, तर फारसं बिघडत नाही, पण फोन केला, तर नातं नक्कीच जुळतं…

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

 

*अंधारात तुम्ही कधी पाय अडखळून पडलात, तसाच मागचाही पडू शकतो. तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं, तर अंधारातही त्याचे डोळे बोलतात….

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

 

*आपापलं सामान घेऊन तर सगळेच रेल्वेचा दादर चढतात. पण त्याही वेळी एखाद्या आजीचा हात धरून तिला मदत केली तर, तिने घट्ट धरलेला हात आपली आई आठवून देतो….

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

 

*घंटागाडीत तुमचा कचरा घेणारा तुम्हाला रोजच भेटतो. कधी त्याला ग्लोव्ह्ज द्यायचे. कधी स्किनचं मलम देऊन टाकायचं…

गोष्ट खूप छोटी असते हो,पण करायची.

 

*कमी जागेत बाईक पार्क करताना तिरक्या स्टॅंडवर न लावता, सरळ स्टॅंडवर लावून मागच्यालाही थोडी जागा ठेवली, तर त्याचं “थँक यू” ऐकायला मस्त वाटतं….

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

 

*किराणा दुकानाच्या गर्दीत, तिने घेतलेल्या सामानाचा ढीग पाहणाऱ्याने त्या ताईची पिशवी आपण धरून ठेवली, तर सामान नीट ठेवणं तिला सोप्पं जातं.

माणसा-माणसांतील निष्कारण असलेली बंधनं गळून पडतात…

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

– अज्ञात 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares