मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ स्वार्थ आणि परमार्थ ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 स्वार्थ आणि परमार्थ ! 😂 💃श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“आई, हे घ्या गरमा गरम कांदा पोहे !”

“दिसतायत तरी बरे, पण चव कशी असेल कुणास ठाऊक !”

“आता ते खाल्ल्यावरच कळेल नां ?”

“ते बरीक खरं हॊ सुनबाई, पण हे गं काय ?”

“काय आई ?”

“तू आज दुपारी जेवणार नाहीस वाटतं ?”

“जेवणार तर ! आता घरातली सगळी कामं मी एकटीने एकहाती करायची म्हणजे अंगात ताकद नको का माझ्या ?”

“झालं तुझं पालूपद पुन्हा सुरु !”

“यात कसलं आलंय पालूपद ? मी घरातली सगळी कामं एकटीने करत्ये हे खरं की नाही ?”

“खरं आहे !”

“मग झालं तर !”

“अगं हॊ, पण नंतर तू लगेच, ‘आपण आता कामाला बाई ठेवूया का? हेच विचारणार नां ?”

“अ sss य्या ! तुम्हीं खरंच मनकवड्या आहात अगदी आई !”

“उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस !”

“ते मला या जन्मी तरी शक्य होईल असं वाटत नाही बाई !”

“म्हणजे ?”

“अहो आई, आता तुम्हांला त्या हरभऱ्याच्या झाडावर चढवायच म्हणजे, तुमचं नव्वद किलोच्या आसपास असलेलं वजन मला आधी उचलता तरी यायला हवं नां ?”

“कर्म माझं !”

“नाही आई, मी तुमच्या वजना बद्दल बोलत्ये नां ? म्हणून तुम्ही ‘वजन माझं’ असं म्हणा, ‘कर्म माझं’ असं नका म्हणू बाई !”

“कळली तुझी अक्कल ! कुठल्या शाळेत होतीस गं शिकायला लहानपणी ?”

“अतिचिकित्सक विद्यालय, ठोंबे बुद्रुक, बोंबे वाडी, जिल्हा रत्नागिरी.”

“तरीच सगळी बोंबा बोंब आहे !”

“मला नाही कळलं तुम्हाला काय बोलायचं आहे ते ?”

“ते मरू दे गं ! मला आधी सांग मगाशी मी तुला विचारलं, तू आज दुपारी जेवणार आहेस का नाहीस, त्याच उत्तर दे मला आधी !”

“बघा म्हणजे कमलाच झाली तुमची !”

“आता यात कसली आल्ये माझी कमाल सुनबाई ?”

“अहो त्या प्रश्नाला मी मगाशीच उत्तर नाही का दिलं, हॊ जेवणार आहे म्हणून. पण असं का विचारताय तुम्ही आई ?”

“अगं म्हणजे असं बघ, मला नाष्ट्याला ताटलीत फक्त कांदापोहे दिलेस आणि स्वतः ताटात कांदा पोह्या बरोबर चार पोळ्या, भाजी, आमटी, वाटीभर भात आणि स्वीट डिश म्हणून दोन बेसन लाडू घेवून आल्येस नां, म्हणून म्हटलं दुपारी जेवणार आहेस का नाही म्हणून !”

“अहो आई त्याच काय आहे नां, माझं डाएट चालू झालं आहे नां आजपासून. त्यामुळे मला वजन कमी करण्यासाठी आता रोज सकाळी, सकाळी असा हेवी ब्रेकफास्ट करणं अगदी अनिवार्य आहे बघा !”

“हे कुणी सांगितलं तुला ?”

“माझ्या डाएटीशन देखणे मॅडमनी !”

“अगं पण त्यांच नांव तर दिवेकर मॅडम नां ?”

“नाही हॊ, त्या वेगळ्या आणि त्यांची फी कुठे आपल्याला परवडायला ! त्या वेगळ्या आणि ह्या वेगळ्या !”

“सुनबाई तुला एक सुचवू का ?”

“बोला नां आई !”

“तुझ्या त्या देखणे मॅडमकडे तुझ्या बरोबर माझं पण नांव नोंदव नां गं !”

“कशाला आई ?”

“अगं मगाशी बोलता बोलता तूच नाही का म्हणालीस, माझं वजन नव्वद किलो आहे म्हणून ?”

“हॊ, म्हणजे मी तसं अंदाजे म्हणाले खरं, पण तुम्ही वजन काट्यावर चढलात तर एखादं वेळेस ते एकोणनव्वद सुद्धा भरेल ! काही सांगता येतं नाही.”

“आता माझी खात्रीच पटली बघ सुनबाई !”

“कसली खात्री आई ?”

“तुझ्या त्या अति चिकित्सक शाळेचं नांव चांगलंच रोशन करत्येस तू याची !”

“मग, होतीच आमची शाळा तशी फेमस त्या वेळेस !”

” क ss ळ ss लं ! आता तुझ्या बरोबर माझं पण नांव त्या देखणेबाईकडे रजिस्टर कर. मला पण माझं वजन कमी करायच आहे, तुझ्या सारखा असा हेवी ब्रेकफास्ट करून !”

“कशाला आई ?”

“अगं मला पण वाटत नां की आपलं वजन कमी करावं म्हणून, म्हणजे तुला, मला हरभऱ्याच्या झाडावर चढवताना उगाच त्रास नको व्हायला !”

“जाऊ दे आई, तुम्ही आता गरमा गरम कांदे पोहे खा आणि मला सांगा कसे झालेत ते !”

“एका अटीवर कांदे पोहे खाईन सुनबाई.”

“कोणत्या अटीवर आई ?”

“तुझं हे डाएट बीएटच खुळं डोक्यातून काढून टाक !”

“मग माझं वजन कमी कसं होणार  आई ?”

“माझ्याकडे त्यावर एक उपाय आहे सुनबाई !”

“कोणता उपाय आई ?”

“आज विलास ऑफिस मधून आला की त्याला म्हणावं पन्नास किलो बासमती तांदुळाची ऑर्डर दे वाण्याला !”

“पन्नास किलो बासमती तांदूळ ? अहो पण आई ह्या एवढ्या तांदुळाच करायच काय ?”

“तुला आणि मला वजन कमी करायच आहे नां ?”

“अहो हॊ आई, पण त्याचा आणि पन्नास किलो बासमती तांदुळाचा संबंध काय ?”

“सांगते आणि तुझ्या बाबुला सांग तांदुळाची ऑर्डर देवून झाली, की ते माळ्यावर टाकलेलं जुनं दगडी जात सुद्धा खाली काढून ठेवं म्हणाव !”

“कशाला आई ?”

“अगं आता थोडयाच दिवसात बाप्पा येणार, घरोघरी मोदकांचे बेत आखलेले असणार, हॊ की नाही ?”

“बरोबर !”

“तर आपण दोघींनी काय करायच, त्या सगळ्या बासमतीच्या तांदुळाची मोदकाची मस्तपैकी पिठी करायची आणि….”

“विकायची, हॊ नां ?”

“अजिबात नाही !”

“मग काय करायच काय त्या एवढ्या सगळ्या तांदूळ पिठाचं ?”

“अगं आपल्या सोसायटीच्या पंचवीस घरात प्रत्येकी अर्धा अर्धा किलो घरोघरी गणपतीत बनणाऱ्या  मोदकांच्यासाठी घरगुती पीठ आपल्या जात्यावर फुकट दळून द्यायचं ! काय कशी वाटली माझी आयडिया ?”

“कमाल केलीत तुम्ही आई ! मानलं तुम्हांला !”

© प्रमोद वामन वर्तक

०५-०८-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ || जय गिरनारी – एक यात्रा || ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? विविधा ?

☆|| जय गिरनारी – एक यात्रा || ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

(1) ‘गोरख’शिखर, ‘गुरु’शिखर  आणि ‘अंबा माता’ शिखर (घंटा) (उजवीकडून डावीकडे) (2) सोमनाथ मंदिर (समोर सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा दिसत आहे)

गुजरातमधील ‘सोमनाथ’ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक देवस्थान आणि ‘गिरनार’ हे दत्तात्रेयांचा वास असलेले जागृत गिरीस्थान हयापलीकडे मला दोन्हीबद्दल कणमात्रही माहिती नव्हती.  बरेच लोक तिकडे जाऊन आल्यावर त्यांच्याकडून काही माहिती कानी पडायची “खूप भारी आहे…” वगैरे.  पण ती तितक्याच त्वरेने एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने विसरून जायची. काही वर्षांपूर्वी माझी आई व आत्या ‘सोमनाथ’ला जाऊन आल्यामुळे तिकडील काही फोटो पहायला मिळाले होते. परंतु मी स्वत: कधी उठून तिकडे जाईन असे कधी वाटले नव्हते… तेही एप्रिलच्या रणरणत्या उन्हाळ्यात आणि तेही सुट्टीच्या सीजनला, रेल्वेची टिकीटे सर्व फुल्ल असताना आयत्या वेळेला बुकिंग करून…

पण म्हणतात ना, योग जर असेल तर सर्व गोष्टी आपोआप जुळून येतात. आमचेही थोडेफार असेच झाले. रेल्वेची प्रतीक्षा यादीत खोलवर असलेली तिकिटे अगदी आदल्या दिवशी RAC / CNF होत गेली आणि पाहतापाहता मित्र गणेश दाबक, धनंजय जोशी हयांसोबत मी बुधवार १३एप्रिल रोजी रात्रौ ८:३० च्या पुणे-अहमदाबाद रेल्वे मधून निघालो सुध्दा…

सकाळी ७:३० ला अहमदाबाद स्टेशन आल्यावर फलाटावरील स्टॉल वर ताजा ढोकळा, त्यावर गोडसर कढी, सामोसे आणि चहा असा चविष्ट नाष्टा झाला. तासाभराने जबलपूरहून आलेल्या ‘सोमनाथ’ च्या ट्रेन मध्ये बसलो. जूनागढ स्टेशन जवळ येत असतानाच आम्हाला गिरनार शिखरांचे “दुरून डोंगर साजरे” असे छान दर्शन झाले. आकाशात उंचचउंच घुसलेली शिखरे बघून खरे तर छाती दडपून गेली होती.

संध्याकाळी ६ वाजता सोमनाथला पोहोचलो.  छोट्या टुमदार रेल्वे स्टेशनातून रिक्षाने बाहेर पडल्यावर एक म्हातारा रिक्षावाला सामोरा आला. तो जरा नियम पळून सावकाश रिक्षा चालवेल ह्या विचाराने त्याच्याबरोबर बाहेर आलो. त्याची रिक्षाही जवळपास त्याच्याच वयाची होती. पण गियर टाकून सुरुवातीलाच बुवांनी मेन रोड वर ट्राफिकच्या उलट दिशेने रिक्षा वळवल्यावर आमच्या भुवया वर गेल्या. दहा मिनिटातच सोमनाथ मंदिराच्या मागील ‘कृष्णा’ हॉटेलमध्ये मुक्कामी पोहोचलो.

(1) सोमनाथचा समुद्रकिनारा व डाईक्स (2) १०,००० किमी समुद्र असल्याचे दर्शवणारा बाणस्तंभ

चहा-आंघोळ आवरून मंदिरात पोहोचेपर्यंत ‘सोमनाथा’ची आरती सुरू झाली होती. मोठ्या आवाजात ढोल लयबद्ध वाजत होते, त्यामुळे मंदिरात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते.  शेवटीशेवटी द्रुत लयीत गजर होऊन आरती संपली.  संध्याकाळाचा छान समुद्री वारा खात आम्ही त्या विस्तीर्ण मंदिराभोवती एक फेरफटका मारला.  तिथेच आम्हाला ‘दिशादर्शक बाण’ पहायला मिळाला जो हिन्दी महासागरात १०००० किलोमीटर जमीन नसल्याचे दर्शवितो. गर्दी असूनही सगळीकडे निखालस स्वच्छता आणि चोख व्यवस्था होती.

आरतीनंतर मंदिरामागेच ‘लेजर शो’ झाला ज्याला दमदार commentary दस्तूरखुद्द अमिताभ बच्चन ह्यांची होती. पुराणकाळापासून ते सोन्याचांदी-हिरेमाणकाने मढवलेले सर्वात वैभवशाली मंदीर बनेपर्यंत पासून ते गझनीचा मुहम्मद व इतर मुघल आक्रमकांनी अनेकवेळा लुटलेले, ते आधुनिक काळापर्यंत पुनर्बांधणी करून सरदार पटेलांनी उभारलेले, असा सर्व चित्र-इतिहास जवळजवळ सहा-सात मजले उंच अशा त्या भव्य मंदिरावरच लेझर ने प्रोजेक्ट केलेला पाहणे आणि ऐकणे हा खूपच छान अद्भुत अनुभव होता…कुणीही चुकवू नये असा!

‘लेजर शो’ संपल्यावर आम्ही शंखांच्या दुकानात फिरायला गेलो. चांगल्या शंखांच्या किमती रु. १३००-१५०० च्या पुढेच होत्या. आत्ताच खरेदी केला आणि नंतर घरी रोजच्यारोज वाजवला नाही तर बायको शंख करेल, अशी एक भीतीही मनाला चाटून गेली. कधीकाळी दक्षिणेत ‘रामेश्वर’ला जाऊ तेव्हा सस्त्यात खरेदी करू, असे मनाशी ठरवून विचार रद्द केला. 

दुसर्‍या दिवशी सकाळी उठलो आणि आवरून होटेलच्या मागेच असलेले अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले मूळ दगडी शिवमंदीर पहायला गेलो. दर्शन घेऊन परत येताना छोट्या गल्लीमधील एका नाश्त्याच्या गाडीवर थांबून जिलेबी, ढोकळा, फाफडा असा फक्कड गुजराती नाश्ता केला.

हॉटेल मालकास एव्हाना सुपरिचित असलेल्या धनंजय जोशींनी (त्यांची ही २८ वी गिरनार भेट होती!) आदल्या दिवशी ठरवल्याप्रमाणे ठीक ११ वाजता ‘बाबू’ रिक्षावाला हॉटेलात हजर झाला.  आम्हा तिघांना घेऊन मग त्याने जवळपासच्या मंदिरांचा फेरफटका मारून आणला. त्यामध्ये ‘त्रिवेणी संगम’, ‘गोलकधाम मंदीर’, ‘सूर्य मंदीर, ‘हनुमान मंदीर, ‘श्रीराम मंदीर, ‘शशीमोचन महादेव’, ‘पाटण प्रभास’, ‘भालका तीर्थ’ ह्यांचा समावेश होता.

(1) ‘अंबा माता’ मंदिर (2) श्रीकृष्ण चरण पादुका (3) भालका तीर्थ (क्षमायाचक भिल्लास अभय देताना श्रीकृष्ण)

कपिला, हिरण आणि सरस्वती (लुप्त) ह्या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर घाट आहे आणि काही sea gull पक्षी उडत होते. ते सूर मारून तुमच्या हातातील खाऊ उचलून नेतात. त्यांना भरवण्यासाठी आम्ही बिस्किटेही घेतली पण उन्हे वाढली असल्याने पक्ष्यांनी आमच्याकडे चोचही न फिरवून सपशेल दुर्लक्ष केले. मग तिथल्याच एका धष्टपुष्ट गीर गाईला आम्ही बिस्किटे खिलवून टाकली.  

‘गोलकधाम मंदीर’ इथून हिरण नदीचे छान दर्शन घडते. इथे श्रीकृष्ण मंदिरामध्ये गीतेचे संपूर्ण अठरा अध्याय कोरलेले आहेत. ह्यास्थानी भगवान श्रीकृष्णांनी मृगयेस आलेल्या भिल्लाच्या हातून स्वत:च्या पावलास तीर मारवून घेऊन आपला अवतार समाप्त केला, अशी आख्यायिका आहे. इथे त्यांच्या चरण पादुका आहेत. तसेच बंधू बलरामांनीही इथे आपला अवतार समाप्त केला असे मानतात. मागल्या बाजूस श्रीकृष्ण आणि बलराम यांचे पाळणाघरही बघायला मिळते.

इथून पुढे सूर्यमंदीर पाहून आलो. बर्‍यापैकी मोडकळीस आलेले दिसले. एकंदरीत सर्व जी मंदिरे होती ती पुराणकाळातील आख्यायिकांशी निगडीत आणि जुनी  होती. श्रीराम मंदीर आणि ‘भालका तीर्थ’ फक्त आधुनिक काळातील बांधलेले वाटले.  असो.

‘भालका तीर्थ’ इथून रिक्षा पळवली ती थेट सोमनाथ रेल्वे स्टेशन कडे. १२:३० च्या रेल्वे ने निघून अडीच तासांत आम्ही पोहोचलो ते जुनागढला. हॉटेल ‘मंगलम’ इथे छान गुजराती थाळी जेवून थोडा वेळ हॉटेल रूममध्ये विश्रांति घेतली. आमच्या हॉटेल रूममधून ‘उडनखटोला’ (मराठीत ‘रोप वे’) वर-खाली करताना दिसत होते. आम्हाला आता पुढील वेध लागले होते ते म्हणजे ‘गिरनार’चे चढाईचे…

संध्याकाळी साडेचारच्या सुमारास आम्ही हॉटेल लॉबीमध्ये जमलो. बाहेरच ट्रेकिंगसाठी काठ्या भाड्याने मिळाल्या. त्या घेऊन जवळच असलेल्या सुसज्ज अशा उडनखटोलाच्या तळस्थानकाला चालत पोहोचलो. मात्र तिथे सिक्युरिटीने आमच्या ब्यागांमधील पाण्याच्या सर्व बाटल्या काढून फेकून द्यायला लावल्या.  अर्थात आतमध्ये पाण्याच्या बाटल्या विकत मिळत होत्या.J लवकरच उडनखटोलाच्या पाळण्यात बसून आम्ही झर्रकन निघालो. चांगल्यापैकी वेगाने खेचत वरवर जात होतो.  खालून पायर्‍यांचा मार्ग दिसत होता अर्थात ह्या वेळेस फारसे कुणी दिसले नाहीत.

साधारण दहा-बारा मिनीटातच आम्ही ‘अंबा माता’ मंदिरापाशी पोहोचलो. फारशी गर्दी नसल्याने छान दर्शन झाले. खाली जाणार्‍यांसाठी सहा वाजता पाळण्याची शेवटची फेरी असल्याचे स्पीकरवर ओरडून सांगत होते.

प्रथम पंक्ति (1) उडनखटोलेवाले राही (2) गोरख शिखरावरून दिसलेले गुरुशिखर, मागे लक्ष्मी शिखर, तळाशी धुनी आणि आकाशात पौर्णिमेचा चंद्र

द्वितीय पंक्ति (1) गुरुशिखर (2) चंद्र आहे साक्षीला (3) पुणेकर ‘गिरनारी’ कुटुंबीय

वीसपंचवीस मिनीटानी आम्ही पुढील म्हणजे ‘गोरख’ शिखराकडे निघालो. इथे वारा एकदम भन्नाट होता, त्यामुळे उकाडा अजिबात जाणवत नव्हता. साधारण अर्ध्या-पाऊण तासात आम्ही तिथे पोहोचलो. गोरखनाथांचे वास्तव्य असल्याने ह्या स्थानाला विशेष महत्व आहे. इथे एक धुनी कायम प्रज्वलित असते. इथेच आम्हाला घोलप नावाचे चिंचवडला राहणारे एक भक्त भेटले. ते आले की तीन-तीन महीने इथे यात्रिकांच्या सेवेसाठी म्हणून शिखरावर वास्तव्याला असतात. बोलताबोलता त्यांनी ‘गुरुशिखरा’चा उल्लेख ‘हेडक्वार्टर’ असा केला ते विशेष वाटले.

पुढे गुरुशिखराकडे प्रयाण केले. ह्या पायर्‍या प्रथम खाली उतरून नेतात आणि मग गुरुशिखराकडे चढत नेतात. अर्थात इथेही एखाद्या गडावर बघायला मिळतो त्याप्रमाणे पायर्‍यांच्या कडेला भक्तमंडळींनी प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या टाकून कचरा केलेला दिसत होताच. एव्हाना संध्याकाळ व्हायला लागली आणि पायर्‍यांच्या बाजूचे दिवे उजळल्याने पुढची मार्गक्रमणा सोपी झाली. शिवाय थोड्या वेळात पौर्णिमेचा चंद्र उगवल्याने शिखरे प्रकाशमान दिसू लागली.

 ‘गुरुशिखरा’पाशी पोहोचायला साधारण एक तास लागतो. सुदैवाने इथेही फारशी गर्दी नसल्याने ‘चरण पादुकां’चे पाच-एक मिनिटे शांत आणि पवित्र वातावरणात छान दर्शन घडले.  हा आमच्या यात्रेचा मिटल्या डोळ्यांनी आपले अस्तित्व विसरायला लावणारा, एक विलक्षण आनंदाची अनुभूती देणारा क्षण होता. मंदिरातील साधूने कपाळाला गंध लावल्यावर आम्ही मंदिरातून बाहेर पडलो व पायर्‍या उतरायला लागलो.  तिथेच जगन्नाथपुरी वरून आलेले एक जटाधारी ‘चिलीम’ साधू भेटले. त्यांच्याशी आध्यात्मिक, राजकीय, रशिया-युक्रेन युध्द, पुरीचे मंदीर, भविष्य अशा विविध विषयांवर काही विलक्षण गप्पा झाल्या.

तिथून मग परतीच्या प्रवासास सुरुवात केली. तत्पूर्वी एक टप्पा पार करायचा होता तो म्हणजे ‘धुनी’.  ह्यासाठी मधूनच दुसरीकडे पायर्‍या उतरून जावे लागते. 

उतरायला सुरुवात केली आणि तेवढ्यात आमच्या मागून कुणीतरी धडपडल्याचा आणि पाठोपाठ बायका ओरडल्याचा आवाज आला. वर जाऊन पहिले तर आमच्याबरोबरच्या कुटुंबातील बाई आणि त्यांची आठ-नऊ वर्षांची मुलगी अशा दोघी पाय सटकून चांगल्या दहा-बारा पायर्‍या गडगडत खाली आल्या होत्या. मुका मार चांगलाच लागला होता पण सुदैवाने कुणाला हाड फ्राक्चर वगैरे काही झाले नव्हते. त्यांना मग ‘धुनी’पर्यन्त उतरवले आणि तिथे थोडा प्रथमोपचार मिळाला.  धुनीचे दर्शन घेऊन मग तिथेच जेवण-वजा प्रसाद घेतला.  आता अंधारात परंतु दिव्यांच्या प्रकाशात परतीचा प्रवास करायचा होता तो ‘गोरख शिखर’ आणि नंतर ‘अंबा माता’ मंदिरांकडे.

गणेश आणि मी त्या मायलेकींना काठीचा आधार देत सर्वांच्या पुढे निघालो.  आणि बोलण्यामध्ये गुंतवत असे उतरवले की त्यांना वेदनेचा विसर पडावा. शक्यतो न थांबता उतरत राहिलो. गोरख शिखरापाशी पोहोचल्यावर एक चहावाला सर्वांना सेवा म्हणून चहा देत होता. आता उतरणार्यान्पेक्षा चढणार्‍यांची संख्या वाढू लागली होती. परंतु कुठेही गर्दी होत नव्हती की ढकलाढकलीही होत नव्हती. एकमेकांना “जय गिरनारी” असे प्रोत्साहन देत सर्वजण उत्साहात पायर्‍या चढत किंवा उतरत होते. वाटेत पाण्याचे बाटल्या, लिम्बू सरबत,चहा-कॉफी वगैरेंची दुकाने लागतात त्यामुळे थकावट दूर होत होती. वृद्ध, वयस्कर  मंडळींना पायर्‍या चढणे सोपे नव्हते पण तरीही निर्धाराने सर्वजण चालत होते. यात्रिक मंडळी बरीच मुंबई –पुण्याकडची असल्याने कानावर मराठीच जास्त पडत होते. मुंबईमधील एक दाम्पत्य त्यांच्या तरूण पण आंधळ्या मुलीला घेऊन आले होते. वडिलांच्या पाठीमागून त्यांच्या खांद्यावर हात ठेवून ती पायर्‍या उतरत होती.  मात्र उन्हामुळे व अतिश्रमामुळे कदाचित तिला पित्ताचा त्रास व्हायला लागला. दुकानासमोरच्या एका बाजेवर निजवल्यावर तिला बरे वाटले.

आम्हाला ‘अंबा माता’ मंदीरापासूनच्या  ५००० पायर्‍या उतरायला जवळपास चार तास (रात्रीचे १०:४० ते पहाटे २:४०) लागले.  पायाचे आणि पावलांचे अगदी तुकडे पडायची वेळ आली होती. संध्याकाळी हेच अंतर पाळण्यात बसून अगदी आरामात दहा मिनिटात चढून गेलो होतो.  होटेलात पोहोचलो तेव्हा कपडे घामाने चिंब ओले झाले होते. मस्तपैकी शॉवर घेऊन असे काही गुडुप्प झोपलो की बस्स! J

दुसर्‍या दिवशी १२:३० वाजताची वेरावळ-पुणे गाडी पकडायची होती. तत्पूर्वी जुनागढ मध्ये गुजरातची प्रसिद्ध अशी बांधणीची कापडे घेण्यासाठी गावात खरेदीला जायचे ठरवले. अस्खलित गुजराती बोलू शकणारा गणेश बरोबर असल्यामुळेच आम्ही हा बेत ठरवला. ‘कापड खरेदी’ म्हटल्यावर जावा-नणंदांची जोडीही आमच्याबरोबर यायला तयार झाली. गणेशने मग एका रिक्षावाल्याला गाठले आणि त्यासोबत काहीतरी ‘गुज्जु-गोष्टी’ करून त्याला पटवले. जुनागढ गावच्या बाजारातील एका गल्लीत तो आम्हाला घेऊन गेला. तिथे अर्ध्या-पाऊण तासात मनासारखी कापड खरेदी झाली. इथेही गणेशच्या ‘गुज्जु-भाषा’ ज्ञानाचा आम्हाला किमतीत घासाघीस करण्याकामी भरपूर फायदा झाला. मग रिक्षा रेल्वे स्थानकाकडे भरधाव पळवली. रेल्वे गाडी थोडी उशिरानेच आली.  पुढील ‘पुणे’ प्रवासात आम्हाला काही ‘उणे’ पडले नाही. J

आयुष्यात “जय गिरनारी” म्हणून एकदा का ह्या पवित्र, निसर्गसुंदर गिरीस्थळी जाऊन आलात की तेच तुम्हाला पुन्हा पुन्हा बोलावत राहते असा अनेकांचा अनुभव आहे. पुढील बोलावणे कधी येतेय ह्याची आम्हीही आतुरतेने वाट पाहतोय!

©  विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रेडिओ सिलोन…भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? मनमंजुषेतून ?

☆ रेडिओ सिलोन…भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

(History: The history of Radio Ceylon dates back to 1925, when its first precursor, Colombo Radio, was launched on 16 December 1925 using a mediumwave radio transmitter of one kilowatt of output power from Welikada, Colombo. Commenced just 3 years after the launch of BBC, Colombo radio was the first radio station in Asia and the second oldest radio station in the world.)  

Source: Radio Ceylon – Wikiwand

आमच्या बालपणीचे दिवस म्हणजे १९६५ ते १९७५ चा कालखंड, आजच्या पेक्षा बऱ्याच बाबतीत वेगळा. मनोरंजन ही त्याकाळी चैनीची बाब समजली जायची. चित्रपट, नाटके ही साधने उपलब्ध असली तरी त्यासाठी पैसे खर्च करण्याची तयारी सर्वांचीच नसायची. मग मनोरंजनाचे सहज उपलब्ध साधन म्हणजे काय तर रेडिओ. परिसरात बऱ्यापैकी आर्थिक स्थिती असलेल्या घरात रेडिओ असायचे आणि शेजारच्या चार घरापर्यंत आवाज जाईल येवढ्या मोठ्या आवाजात त्यावरिल कार्यक्रम ऐकले जायचे. आमच्या सारख्यांना त्यातूनच रेडिओचा परिचय झाला. रेडिओ  म्हणजे “रेडिओ सिलोन” अशी आमची धारणा होती कारण या व्यतिरिक्त कुणीही रेडिओ वर दुसरे स्टेशन लावत नसे. उपहारगृहात ही रेडीओवर सिलोन हेच स्टेशन सुरू असायचे. “ये सिलोन ब्राडकास्टींग कारपोरेशन का व्यापार विभाग हैं”. हे वाक्य आम्हाला पाठ झाले होते.

अनेकांची सकाळच रेडिओ च्या संगीताने व्हायची. समाचार, भक्तिगीते ऐकत आपआपली कामे लोक करायचे, रेडिओ ऐकण्यामुळे कुणाच्या कामात अडचण येत नसे, सकाळचा ज्येष्ट नागरिकां चा आवडीचा कार्यक्रम म्हणजे ” पुराने फिल्मो का संगीत”. आम्हाला सहगल, तलत मेहमूद, हेमंत कुमार, प्रदीप, सुरैया, शमशाद बेगम,  नूरजहाँ. या गायकांचा परिचय याच कार्यक्रमामुळे झाला. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेस “खुश है जमाना आज पहली तारीख है” हे गीत हमखास लावले जायचे.  रेडिओ सिलोन च्या लोकप्रियतेचे गमक होते चित्रपट गीते, कारण आल इंडिया रेडिओ वर चित्रपट गीतांचे प्रसारण होत नव्हते, चित्रपट गीतांना विरोध करणारी याचिका सन १९५२ ला कलकत्ता येथील प्रो. चक्रवर्ती यांनी न्यायालयात केली  होती त्यामुळे आल इंडिया रेडीओवर सिनेगितांचे प्रसारण होत नव्हते. त्यामुळे रेडिओ सिलोन ची लोकप्रियता वाढली.

त्यावेळी सकाळच्या प्रसारणात सर्वात लोकप्रिय कार्यक्रम असायचा “आप ही के गीत” नवीन चित्रपटांच्या गीतांचा हा कार्यक्रम असायचा, महत्वाचे म्हणजे श्रोत्यांच्या फर्माइश वर गीतांची निवड केली जायची आणि गाण्याच्या प्रसारणा आधी पसंती कळविणाऱ्यांची नावे घेतली जायची. आपले नाव रेडीओवर यावे म्हणून लोक पोस्टकार्ड पाठवायचे. अनेकांना ही सवयच लागली होती. अनेक गावात तर त्यासाठी श्रोता संघ स्थापन झाले होते. भाटापारा, झुमारितलय्या या गावांची नावे त्यावेळी खूप प्रसिद्ध होती या गावातील लोकांची नावे अनेकदा यायची. नवीन चित्रपट येण्यापूर्वीच या कार्यक्रमामुळे गीते लोकप्रिय व्हायची व गीतांमुळे चित्रपट पाहिले जायचे. सिलोन रेडिओ  हे व्यापारी तत्त्वावरआधारलेले स्टेशन असल्यामुळे त्यावर अनेकवस्तुंच्या जाहिरातींचे प्रसारणही व्हायचे, काही जाहिराती आजही आठवतात. सॉरीडॉन, बोर्नव्हीटा, एसप्रो, व्हिक्स, टिनोपाल, यातही ‘तन्दुरूस्ती की रक्षा करता है लाइफबॉय… लाइफबॉय है जहां तन्दुरूस्ती है वहां… लाइफबॉय… ही जाहिरात मला आजही पाठ आहे.

क्रमशः…

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आनंदाचे भागीदार ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आनंदाचे भागीदार ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

ज्यांना वयोमानामुळे किंवा इतर कोणत्या परिस्थितीमुळे अजिबात ऐकू येत नाही, अशा लोकांचं रस्त्यावर जगणं मुश्कील झालंय….

ऐकू न आल्यामुळे, कोणतंही काम करण्यास त्यांना अडथळा येतोच…. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, रस्ता ओलांडताना किंवा चालताना गाडीचे आवाज न ऐकू आल्यामुळे एक्सीडेंट होऊन मृत्यूचे किंवा अपंगत्वाचे प्रमाण वाढत आहे…

आणि याचमुळे मागील तीन महिन्यांपासून माझ्या भीक मागणाऱ्या वृद्ध माता पित्यांच्या कानाची तपासणी सुरू करून, त्यांना श्रवण यंत्रे देण्यास सुरुवात केली आहे.  

मशीन मिळाल्यानंतर, कानात मशीन घालून ही मंडळी कानावर आडोशासारखा हात धरून…. अगदी मन लावून…. नजर एका जागी स्थिर करून…..रस्त्यावरील गाड्यांचा आवाज ऐकतात….हॉर्न ऐकतात… रस्त्यावर चाललेला गोंगाट ऐकतात….! 

एरव्ही खरंतर अशा गोष्टी आपण ऐकायचं टाळतो….. पण “ते” मात्र जीव लावून या गोष्टी ऐकत असतात…. ! 

मी गंमतीने त्यांना या बद्दल विचारतो, तेव्हा ते म्हणतात,  “ काय करणार डॉक्टर?  पूर्वी  जेव्हा ऐकायला येत होतं तेव्हा जवळची माणसं सोबत असून सुद्धा बोलत नव्हती…. आज पुन्हा ऐकायला यायला लागलंय…. पण आज ती जवळची माणसं सुद्धा नाहीत आणि त्यांचा आवाज सुद्धा ….. मग काय करणार ? आम्ही बसतो गाड्यांचे आवाज ऐकत, आपल्याला ऐकू येतं याचा आनंद घेत….! “ 

हे ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावरचं कारुण्य रेखाटायला माझ्याकडे शब्द नाहीत…..! 

आपल्या माणसांचा आवाज शोधणारी…. निर्जीव गाड्यांच्या हॉर्नशी संवाद साधू पाहणारी…. ही पिढी हळूहळू डोळ्यादेखत नष्ट होईल…. ! 

आपल्या वृद्ध आई-वडील, आजी आजोबा यांना न सांभाळणारी ही मंडळी आपल्याला कुठे घेऊन जाणार आहेत माहित नाही…! 

मी लहानपणी पुस्तकात वाचलं होतं– “आपण आज जी माणसं पाहतो, ती फार फार पूर्वी माकडं होती…” 

मला भीती वाटते …. इथून पुढच्या काही वर्षानंतर लहान मुलांच्या पुस्तकात धडा असेल— “आपण आज जी “माकडं” पाहतो आहोत… ती फार फार पूर्वी “माणसं” होती ! “

अशी वेळ येण्याअगोदर आपल्या जुन्या खोडांना आपणच जपलं पाहिजे…. ! 

कानाची मशीन ही एक अत्यंत “महाग” गोष्ट आहे… 

परंतु ऐकू यायला लागल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरचं समाधान हे त्याहीपेक्षा जास्त “मौल्यवान” वाटतं मला ….!

“महाग” आणि “मौल्यवान” यातला फरक एकदा समजला की खर्च झाल्याचं दुःख होत नाही…. !!!

कळत-नकळतपणे आपणही सर्व जण त्यांच्या या चेहऱ्यावरील ” आनंदाचे भागीदार ” आहात, म्हणून आपणास कळविण्याचा हा खटाटोप !!!

© डॉ मनीषा आणि डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भाव , अभाव आणि प्रभाव… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

? वाचताना वेचलेले ?

भाव, अभाव आणि प्रभाव …☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

श्रीकृष्ण युधिष्ठिर आणि बलराम दादाच्या आग्रहास्तव कौरवांकडे दूत बनून गेला. जसं रामराया मिथिलेत आल्यावर जनक महाराजांनी सीतेचं सुंदरसदन रिकामं करून रामरायाची निवास व्यवस्था केली होती, त्याचप्रमाणें दुर्योधनाने आपल्या भावाचं, दुःशासनाचं राजभवन सुशोभित करून कृष्णाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. परंतू , श्रीकृष्णाने ते नाकारलं. शिवाय युद्ध टाळण्याची चर्चा निष्फळ ठरल्यावर जेव्हा दुर्योधनाने एक प्रयत्न म्हणून भगवंताला ५६ भोग भोजनाचं निमंत्रण दिलं, तेसुद्धा गोविंदाने नाकारलं….

भगवंताने भोजन नाकारण्याचं जे स्पष्टीकरण दिलं ते फार मार्मिक आहे. गोपाळ म्हणाले, “दुर्योधना, एखाद्याकडचं भोजन घेण्याची तीन कारणे असू शकतात ! —

 १) भाव २) अभाव ३) प्रभाव

१) अन्न देणाऱ्याचा प्रेम भाव

२) भुकेल्याकडे अन्नाचा अभाव

३) भुकेल्याच्या मनात अन्नदात्याबद्दलचा प्रभाव

मुरारी म्हणाला, “दुर्योधना, मला जेवू घालण्यात तुझा प्रेमभाव नसून कपट आहे. मी शिधा सोबत आणलेला असल्याने माझ्याकडे अन्नाचा अभाव नाही. आणि तुझ्या दुराचरणामुळे माझ्या मनांत तुझ्याबद्दल आदरयुक्त प्रभाव नाही. मग तुझे हे ५६ भोग मी का स्विकारावे ? “

लहानपणी घरात भरपूर दूध, दही, लोणी असूनही दुसऱ्याकडे डल्ला मारणारा हा माखनचोर आतासुद्धा सोबत शिधा असतांना दुसरीकडे जेवायला जायच्या विचारात होता.

तेव्हा, द्रोणाचार्य, कृपाचार्य या आदरणीय गुरूजनांनी भोजनाचं निमंत्रण दिलं. परंतू , दुराचारीचा पक्ष धरल्याने कान्हाने त्यांचंसुद्धा निमंत्रण नाकारून त्यांचं गर्वहरण केलं ! आणि मग भगवंतानें विचार केला की, भूक तर लागलीच आहे आणि हे सर्व लोक तर माझ्या भोजनाच्या अनुग्रहाला पात्र नाहीत. परंतु, ब्रम्हज्ञानी, कर्मयोगी आणि अनन्य भक्त असलेला एकजण या राज्यात आहे, तो म्हणजे भक्त विदुर !

मन करम वचन छांड चतुराई ।

तबहि कृपा करत रघुराई ।।

मग काय ! भगवंत विनाआमंत्रण या भक्ताच्या घरी स्वतःहून गेले. परंतू, दैव म्हणा किंवा प्रारब्ध, विदुरकाका बाहेर गेलेले होते. काकू घरी होत्या. आणि ज्या भगवंताची आतापर्यंत भक्ती केली तो प्रत्यक्ष आपल्या दारात उभा पाहून त्या मातेचा कंठ दाटून आला आणि रडत रडतच भगवंताला हाताला धरून बसवलं…

विदुराणी भिजलेल्या डोळ्यांनी हा मुखचंद्र न्याहाळत म्हणाली, ” लाला, अरे दररोज तुझ्यासाठी लोणी-साखर काढून ठेवत होते, तू आलाच नाहीस. आता आलास, पण लोणी-साखर तयार नाही ?”

आणि मग काय सांगू ! या साध्वीने,  आत जाऊन लोणी करत बसले तर भगवंताचा चेहरा नजरेआड होईल, म्हणून मग बाजूला ठेवलेले केळीचे घड घेतले आणि या भावविभोर अवस्थेत केळी सोलून भगवंताला साली भरवू लागली, आणि केळी बाजूला टाकू लागली.

थोड्या वेळाने जेव्हा विदुरकाका आले, तेव्हा परब्रम्ह परमात्मा स्वतः अचानक घरी आलेला पाहून आता काकांनी अश्रूंनी श्रीचरणी अभिषेक घातला. नंतर त्यांना भगवंताला केळीच्या सालांचा भोग चालू पाहून कसंतरी वाटलं आणि मग त्यांनी केळी भरवायला सुरुवात केली. आणि काकांनी विचारलं, ” हे गिरीधर, केळी गोड आहेत ना ?”

एवढा वेळ हे काका काकू रडत होते, आता भगवंताचा गळा भरून आला, अश्रू अनावर झाले. हा गोकुळ नंदन म्हणाला, 

“काका, केळी फार गोड आहेत. परंतू काकूंच्या हातानं जी सालं खाल्ली ना त्याची बरोबरी फक्त माझ्या बालपणी यशोदा मातेने भरवलेल्या लोण्याशीच होऊ शकते. आज मला माझं बालपण पुन्हा जगायला मिळतंय या अमृतसेवनाने “

आणि हे ऐकून पुन्हा तिघांनी अश्रूंचा बांध मोकळा केला. हे तिघं म्हणजे भक्ती, प्रेम आणि ज्ञान ! विदुरकाकांचं परमात्मज्ञान, विदुराणीची निर्लेप, निर्दोष भक्ती आणि भगवंताचं या दोघांवरचं अमर्याद प्रेम ! या तिघांपैकी कोण श्रेष्ठ हे कसं आणि का ठरवायचं ?

भगवंताला साक्षी ठेवून सांगतो, हा भक्ती, प्रेम आणि ज्ञान यांचा त्रिवेणी संगम म्हणजे नाम ! ते नाम जीवापाड जपून कर्तव्याच्या मर्यादा सांभाळाव्या, भगवंत आपल्या घरी यायला, आपल्या हृदयांत साठवायला वेळ नाही लागणार.

।। श्रीगुरुदेवदत्त ।।

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संगीत ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 ☆ संगीत ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“संगीत !”

“संगीत” आवडत नाही असा माणूस मिळणे विरळाच ! हां, आता व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने कोणाला काय आवडेल आणि काय नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न झाला. कोणाला कंठाळी संगीत पसंत असते तर कोणी शांत सुमधुर संगीतात रमतो ! मुळ मुद्दा काय, तर वेगवेगळ्या  प्रकारचे “संगीत” हा आपल्या जीवनाचा अविभाज्य  भाग आहे, हे आपण पण मान्य कराल.

मला स्वतःला vocal classical किंवा instrumental संगीत त्यातल्या त्यात जास्त आवडते.  पण तुम्ही जर मला विचारालं की हा “राग” कोणता ते ओळख, तर मी पार निरुत्तर होतो ! तसा एक प्रकारे मी कान सम्राटच जास्त आहे म्हणा ना !

मध्यंतरी संगीतातील जाणकार असलेल्या माझ्या एका नातेवईकांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला. त्यांच्याकडे जुन्या classical LP रेकॉर्डस पासून कॅसेट, सीडी यांचा नुसता खजिनाच आहे. मी सहजच गप्पा मारता मारता हाताला लागलेली एक सीडी चालू केली आणि पुन्हा गप्पांकडे वळलो.  गाणे सुरू झाले आणि ते गप्पा मारता मारता मधेच थांबले आणि मला म्हणाले “अरे प्रमोद, हा सकाळचा राग आहे आणि आता संध्याकाळ असल्याने आपण संध्याकाळच्या एखाद्या रागाची सीडी लावूया !”

मला थोडा “राग” आला. पण वर म्हटल्या प्रमाणे मी फक्त कान सम्राट असल्याने मला तो फरक समजला नाही. यात माझी त्यांच्या दृष्टीने शंभर टक्के चूक असली, तरी ते “संगीत” मला स्वतःला, जर “त्या वेळेस” आनंद देत असेल, तर मी ते का ऐकू नये असा प्रश्न पडला ! असो !

प्रत्येकाची आनंद उपभोगायची व्याख्या वेगवेगळी असते आणि ती तशी असणे निसर्ग नियमाला धरूनच आहे !  ती जर का सगळ्यांची एकच असती, तर सगळ्यांचेच  आयुष्य एक सूरी झाले असते, होय की नाही ?

खरे पाहिले तर या चराचरात अनेक प्रकारचे आवाज काही ना काही कारणाने कायम निर्माण होत असतात. त्या आवाजातून सुद्धा कोणी नाद संगीत शोधण्याचा प्रयत्न सतत करीत असतो, असं माझं स्वतःच मत आहे !

एव्हढेच कशाला रिकामे पत्र्याचे डबे, लाकडी खोकी यातून सुद्धा नाद संगीत निर्माण होऊ शकते आणि त्याचे प्रत्यंतर आपण आपल्याकडील जगप्रसिद्ध तबला वादकांच्या भावाकडून, कधी नां कधी घेतले असेलच !

नुकताच सिंगापूरला जाण्याचा योग आला होता.  तिथे नेहमी प्रमाणे पहाटे फिरायला गेलो असता दोन पक्ष्यात चाललेला “संगीत रूपी” संवाद, हो खरोखर त्याला संवादच म्हणावे लागेल, तो ऐकतांना मी भान हरपून एका जागी किती तरी वेळ ऊभाच होतो !  त्यांतून येणारी एक प्रकारच्या  “नाद संगीताची” मला जाणवणारी अनुभूती, माझे मन मोहरवून जात होती !

माझे असे ठाम मत आहे, की या जगात ठायी, ठायी, जिकडे तिकडे, “संगीत” तच “संगीत” भरलेले आहे ! फक्त ते ऐकण्यासाठी आपण आपले कान “तयार” करण्याची गरज आहे, म्हणजे मग त्यातून आपल्याला मिळणारा आनंद हा खरोखरच स्वर्गीय असेल या बद्दल मला खात्री आहे !

एकूण काय, तर प्रत्येकाने आपल्या वाट्यास आलेल्या जीवनात, ते जगत असतांना, त्यातील “नाद संगीत” शोधत शोधत, जीवनाचा आनंद घेत घेत आयुष्य जगले, तर सर्वांचेच कल्याण होईल !

आपले जीवन कायम संगीतमय राहो हीच मनोकामना !

© प्रमोद वामन वर्तक

२९-०७-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भारतरत्न गुलझारीलाल नंदा ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ भारतरत्न गुलझारीलाल नंदा ☆ संग्राहक – श्री माधव केळकर☆

भाडे न दिल्याने घरमालकाने ९४ वर्षीय वृद्धाला भाड्याच्या घरातून हाकलून दिले.  म्हाताऱ्याकडे जुना पलंग, काही अॅल्युमिनियमची भांडी, प्लास्टिकची बादली आणि घोकंपट्टी वगैरे शिवाय काहीही सामान नव्हते. म्हातार्‍याने मालकाला भाडे देण्यासाठी थोडा वेळ देण्याची विनंती केली.  शेजाऱ्यांनाही म्हातार्‍याची दया आली आणि त्यांनी घरमालकाला भाडे देण्यासाठी थोडा वेळ द्यायाला सांगितले . घरमालकाने अनिच्छेने त्याला भाडे भरण्यासाठी थोडा वेळ दिला.

म्हातार्‍याने सामान आत घेतले.

तेथून जाणाऱ्या एका पत्रकाराने थांबून सर्व दृश्य पाहिले.  ही बाब आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे उपयुक्त ठरेल असे त्यांना वाटले.  त्याने एक मथळा देखील शोधला, ” क्रूर जमीनदार पैशासाठी म्हातार्‍याला भाड्याच्या घरातून बाहेर काढतो.”..   मग त्याने त्या जुन्या भाडेकरूचे काही फोटो काढले आणि भाड्याच्या घराचेही  काही फोटो काढले.

पत्रकाराने जाऊन आपल्या प्रेस मालकाला घडलेला प्रकार सांगितला.  प्रेसच्या मालकाने चित्रे पाहिली आणि त्यांना धक्काच बसला.  त्यांनी पत्रकाराला विचारले, “ म्हाताऱ्याला ओळखता का? “ पत्रकार नाही म्हणाला.

दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मोठी बातमी छापून आली.  ” गुलझारीलाल नंदा, भारताचे माजी पंतप्रधान, एक दयनीय जीवन जगत आहेत.” असे शीर्षक होते.  या बातमीत पुढे लिहिले होते की, माजी पंतप्रधान कसे भाडे देऊ शकले नाहीत, आणि त्यांना घरातून कसे हाकलून देण्यात आले.  आजकाल फ्रेशर्सही भरपूर पैसे कमावतात, अशी टिप्पणीही  केली गेली.  तर दोन वेळा माजी पंतप्रधान राहिलेल्या आणि दीर्घकाळ केंद्रीय मंत्री राहिलेल्या व्यक्तीकडे स्वतःचे घरही नाही.

वास्तविक गुलझारीलाल नंदा यांना रु.  500/- प्रति महिना भत्ता उपलब्ध होता.  मात्र आपण स्वातंत्र्यसैनिकांच्या भत्त्यासाठी लढलो नसल्याचे सांगत त्यांनी हे पैसे नाकारले होते.  नंतर त्यांच्या मित्रांनी त्यांना असे सांगून भत्ता स्वीकारण्यास भाग पाडले की मुळात त्यांना दुसरे कोणतेही स्त्रोत नाही.  या पैशातून ते  घरभाडे देऊन गुजराण करत असत .

दुसऱ्या दिवशी विद्यमान पंतप्रधानांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना वाहनांच्या ताफ्यासह त्यांच्या घरी पाठवले.  एवढ्या व्हीआयपी वाहनांचा ताफा पाहून घरमालक थक्क झाला.  तेव्हाच त्यांना कळले की त्यांचे भाडेकरू श्री गुलझारीलाल नंदा हे भारताचे माजी पंतप्रधान होते.  घरमालक त्यांच्या गैरवर्तनाबद्दल लगेच गुलझारीलाल नंदा यांच्या चरणी नतमस्तक झाले.

अधिकारी आणि व्हीआयपींनी गुलझारीलाल नंदा यांना सरकारी निवास आणि इतर सुविधा स्वीकारण्याची विनंती केली.  गुलझारीलाल नंदा यांनी, ‘या वृद्धापकाळात अशा सुविधांचा काय उपयोग?’ असे सांगून त्यांची ऑफर स्वीकारली नाही.  शेवटच्या श्वासापर्यंत ते एका सामान्य नागरिकाप्रमाणे सच्चे गांधीवादी म्हणून जगले.  1997 मध्ये सरकारने त्यांचा भारतरत्न देऊन गौरव केला.

आदरांजली आणि विनम्र अभिवादन

संग्राहक : माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 1 ☆ सौ. अमृता देशपांडे  

मला आज लिहायचं आहे

” डोळ्यातले पाणी ” या विषयावर.  आश्चर्य वाटलं ना! रडणं म्हणजे नकारात्मक वृत्तीचं आणि भावनांचं प्रकटीकरण.  धैर्य, पराक्रम,  सकारात्मक विचार,  सहिष्णुता,  हास्य या सर्वापुढे

‘ रडणं ‘ ही एक हलक्या किंवा खालच्या दर्जाची वृत्ती,  असा सर्वसाधारण समज.  रडणे या क्रियेशी संबंधित जेवढे काही वाक्प्रचार आहेत,  ते त्या क्रियेची अनावश्यकता आणि दुर्लक्षितता व्यक्त करतात .

” हिची रड काही संपत नाही” , ” जरा काही झालं की लागला मुळूमुळू रडायला “, ” अरे, पुरूषासारखा पुरूष तू, आणि रडतोस?” अशी अनेक वाक्ये आहेत.  त्यामुळे रडणं हे मनाचा कमकुवतपणा दर्शवितं  अशी पूर्वीपासून समजूत रूढ झाली आहे.

खरंतर ‘ रडणं ‘ किती नैसर्गिक आहे.  ” हसणं ” या प्रकारात स्मितहास्य,  हास्याचा गडगडाट, गालातल्या गालात हसणे, खुक् कन हसणे, खुद्कन हसणे, असे विविध पोटप्रकार आहेत. तसंच, रडणं किंवा डोळ्यातलं पाणी  यालाही अनेक नावे आहेत. अश्रू पाझरणे, आसवं गाळणे, टिपं गाळणे, गंगाजमुना,  डोळे वहाणे,  डोळे डबडबणे,  इत्यादि….

माणसाच्या मनाचा आरसा म्हणजे त्याचे डोळे. डोळे जितके पारदर्शी,  तितकंच डोळ्यातलं पाणी ही पारदर्शी असतं. डोळ्यातले पाणी म्हणजे मनातल्या भावनांचं न लपवता येणारं अदृश्य रूप. मग त्या भावना दुःखाच्या असोत वा आनंदाच्या,  कौतुकाच्या असोत वा कृतार्थतेच्या,  यशाच्या असोत वा अपयशाच्या,  प्रेमाच्या असोत किंवा संतापाच्या, उपकाराच्या असोत वा लाचारीच्या, भूतकाळाशी निगडीत असोत किंवा वर्तमानाशी, विरहाच्या असोत वा पुनर्मीलनाच्या.  मनातल्या या सगळ्या भावनांच्या कल्लोळाचं सदृश्य रूप म्हणजे डोळ्यातले पाणी.  कधी कधी भावनांच्या दाटून आलेल्या उमाळ्यापुढे व्यक्त होताना शब्द कमी पडतात, ते काम अश्रू करतात.

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ समजून घ्या – एक वीज कर्मचारी ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

? मनमंजुषेतून ?

☆ समजून घ्या – एक वीज कर्मचारी ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

“पाऊस पडला,लाईट गेला !” या विधानाला अर्थ नाही. पाणी आणि वीज यांचा ३६ चा आकडा असतो. नैसर्गिक गोष्टी त्याला अपथ्याच्या असतात. आठ महिने तापलेले इन्सुलेटर्स अचानक पडलेल्या पाण्याने फुटतात. त्याची देखभाल आधी करता येत नाही. हेअर लिकेज डोळ्यांना दिसत नाही. मोठं नुकसान टाळण्यासाठी सुरूवातीच्या काळात मुद्दाम बंद ठेवतात. दिवसेंदिवस बंद ठेवण्यापेक्षा योग्य वेळी बंद ठेवणं योग्य नाही का? जरा समजून घ्या.

सबस्टेशन अक्षरशः विद्युतदाहिनी असते. तिथे जिवंत माणसं काम करत असतात. गमबूट, हँडग्लोव्हज् पावसात सुरक्षेचं काम पाहिजे त्या क्षमतेनं करत नाहीत . ते बिचारे रॉकेल आणि मशाल यांच्यामधे काम करत असतात. सबस्टेशनमधे धुक्याच्या दिवसातली अग्नीवलयं पहा. दिसतात सुंदर, असतात मात्र क्रूर. अनवधानानं, ग्राहकांसाठी घाईत झालेली चूक फक्त मरण देते हे लक्षात घ्या. समजून घ्या.

परमिट मागे दिल्यावर चुकून चालू करताना फिडर बदलला की, लाईनवरचा खाली पडण्याआधी वर जातो. ब्रेकर, आयसोलेटर, फीडर, सीटी, पीटी, डीपी, कंट्रोल केबिन्समधे काम करणं म्हणजे जराशी चूक नि यमाची भूक! हे समजून घ्या.

पावसात सुरुवातीला, शेवटी विजा असतात. पोल विद्युतवाहक असतो आणि लाईनमन त्यावर काम करत असतो. म्हणजे तो चक्क सरणात काम करत असतो. ग्लोव्हज् घालून ग्रीप मिळत नाही, नि काढले तर सुरक्षा मिळत नाही. अशावेळी लाईनमन सुरक्षा बाजूला ठेवताना मी बघितलंय. एबीस्विच काम करत नाही. मग सबस्टेशनला विनंती करावी लागते. ती विनंती मान्य करणं यंत्रचालकाला अडचणीत आणतं. त्यालाही आई, मुलं, बायको, उकाडा, थंडी, भिजणं असतंच. एक क्षण वैधव्य देतो, निपुत्रिक करतो, अनाथ करतो. समजून घ्या.

लाखो प्रकारची, जंगलीपेक्षा बागायती झाडं हीच वीज जायला जास्त कारणीभूत. ती तोडूही द्यायची नाही, तार जोडूही द्यायची नाही, नि वीज हवी, हे कसं चालेल? वीज जाण्याचं जास्त वेळचं कारण अर्थफॉल्ट म्हणजे झाडं आहेत. समजून घ्या.

मूर्ख राजकारण्यांच्या नादी लागून आपण बिलं भरत नाही. मग इंशुलेटर, वायर, नटबोल्ट, फ्यूजखरेदी अशक्य होतं. स्पेअर्सचा तुटवडा– तरी वीजेचा बटवडा करणारा लाईनमन –  समजून घ्या.

उन्हाळ्यात मेंटेनन्स करावा, तर आपलाच पंखा, एसी, फ्रीज, टी.व्ही, वॉशिंग मशीन, पंप त्याला परवानगी देत नाही. वीजप्रवाह चालू ठेवून मेंटेनन्स करता येत नाही. आयपीएलची एक ओव्हर बघू शकत नाही, तेव्हा आपण पंख्याखाली आरामखुर्चीत चिडचिड करतो. तेव्हा लाईनमन आणि सबस्टेशनचे ऑपरेटर्स जिवावर उदार असतात– तुम्हाला नंतर पूर्ण सामना दिसावा म्हणून. समजून घ्या.

उन्हाळा सहन होत नाही याचं कारण वीज कर्मचारी असतात का? याचा विचार करा. एखाद्याच्या मरणाबाबत आपण इतके असंवेदनशील का?

फक्त समजून घेऊया. चिडचिड होण्याआधी थांबेल आणि केलेली शिवीगाळ आणि नाराजी करुणाष्टक होईल.

वीज नसताना हे टाईप करतोय, कारण मी समजून घेतलंय. मला भिजत चाललेली कामं महाभारतातल्या संजयासारखी दिसतात. घरात बसून….

–एक वीज कर्मचारी

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आपल्या भारतातील विलक्षण, अद्वितीय गावे… ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆

? इंद्रधनुष्य ?

आपल्या भारतातील विलक्षण, अद्वितीय गावे… ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

आपल्या भारतातील विक्षण, अद्वितीय गावे

१ ) आळंदी गाव (महाराष्ट्र) – आळंदी या गावात आजही (गाव वेशीत) मास – मटण मिळत नाही या गोष्टीला 700 वर्षे पुर्ण झालीत.

२ ) शनिशिंगणापूर (महाराष्ट्र) – संपूर्ण गावात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही.

३ ) शेटफळ (महाराष्ट्र) – प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात, कुटुंबाचा सदस्य असल्यासारखी सर्पराजाची उपस्थिती.

४ )- हिवरे बाजार (महाराष्ट्र) – भारतातील सर्वात “श्रीमंत” खेडे.  ६० अब्जाधीश घरे. एकही “गरीब” नाही. सर्वाधिक GDP असणारं खेडं.

५ )– पनसरी (गुजरात) – भारतातील सर्वात “अत्याधुनिक” खेडेगांव. गावातील सर्व घरात CCTV जोडण्या असून, Wi-Fi सुविधाही आहेत. गावातील सर्व ‘पथदीप’ सौर उर्जेवर चालतात.

६ )- जांबुर (गुजरात) – भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक “आफ्रिकन” वाटतात. [परिसरात आफ्रिकन गांव अशीच ओळख]

७ ) कुलधारा (राजस्थान) – “अनिवासी” गांव. गांवात कोणीही रहात नाही. घरे बेवारस सोडलेली आहेत.

८ )- कोडिन्ही (केरळ) – जुळ्यांचे गांव. जवळपास प्रत्येक घरात जुळं.

९ )– मत्तूर (कर्नाटक) -दैनंदिन व्यवहारासह सगळ्याच कामकाजासाठी “संस्कृत” भाषेचा अनिवार्य वापर करणारे गाव.

१० )- बरवानकाला (बिहार) – ब्रम्हचाऱ्यांचे गांव. गेल्या ५० वर्षांपासून गावात लग्न-सोहळाच नाही.

११ )– मॉवलिनॉन्ग (मेघालया) – ‘आशिया’ खंडातील सर्वात “स्वच्छ” गांव. पर्यटकांना भुरळ घालणारे लहानशा दगडावरील महाकाय पत्थराचे निसर्ग-शिल्प.

१२ )– रोंगडोई (आसाम) – बेडकांचे लग्न लावल्यास पर्जन्य सुरू होतो, अशी श्रद्धा (की अंधश्रद्धा ?) जपणारं गांव. असं लग्न हा ‘ग्रामसण’ च असतो.

१३ )- कोर्ले गांव,रायगड जिल्हा (महाराष्ट्र) – Korlai  विलेज स्वातंत्र्यानंतर व पोर्तुगीज गेल्यानंतरही ” पोर्तुगीज “ भाषा दैनंदिन व्यवहारात वापरणारे गाव.

१४ )-मधोपत्ती गाव( उत्तर प्रदेश) – एका गावातून ४६ पेक्षा जास्त माणसे  IAS झालेले हे गाव, ९० टक्केपेक्षा जास्त सरकारी नोकरीमध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी देणारे हे गाव भारताने नमूद केले आहे…

१५ )– झुंझुनू (राजस्थान) – फौजींच गाव, एका घरातून तीन ते चार फौजी, पाच पाच पिढ्यांपासून  प्रत्येक घरात फौजी, खरी देशसेवा म्हणजे हे गाव आणि गावातली प्रत्येक व्यक्ती… ६ हजार पेक्षा जास्त सेवानिवृत्त, आणि ११ हजारहून  जास्त फौजी देशाच्या विविध भागात नोकरीवर रुजू…

— असाच वेगळेपणा जपणारी आणखीही गावे असतील. माहिती मिळवा, आणि इतरानांही माहित करून द्या.

संग्राहिका : हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares