मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्याची योग्य दिशा… सुश्री अंजली गवळी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

आयुष्याची योग्य दिशा… सुश्री अंजली गवळी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

आयुष्यात अनेकदा असं होतं की, आपण ठरवतो एक आणि होतं वेगळंच. त्यामुळे संपूर्ण आयुष्यच भरकटल्यासारखं वाटायला लागतं. पुढे काय करावं याची काही दिशा दिसत नाही आणि त्यातून हतबलता वाढायला लागते. कारण जे काही अनपेक्षित समोर येतं त्याबाबत आपण काही विचारच केलेला नसतो. पण त्या परिस्थितीतही पुन्हा उठून सज्ज होण्यातच खरं सामर्थ्य आहे. जो हे सामर्थ्य ओळखतो, कोणत्याही परिस्थितीवर रडण्यापेक्षा तिला सामोरं जाण्याचं धाडस दाखवतो तोच खरा नायक ठरतो.

इतिहास अभ्यासक, लेखक, प्रेरणादायी वक्ते नितिन बानगुडे पाटील यांचं एक भाषण अतिशय प्रसिद्ध झालं आहे. आयुष्याला दिशा कशी द्यायची याविषयी ते मार्गदर्शन करतात. ते म्हणतात, “जगायचं असेल तर सिंहासारखं जगता आलं पाहिजे. शेळी बनून जगण्यात अर्थ नाही. पण त्यासाठी सिंहासारखे कष्ट घेण्याची तयारीही असली पाहिजे. जर आयुष्यात काही साध्य करायचं असेल, यश मिळवायचं असेल तर पहिले त्याच्या प्रवासाला सुरुवात करावी लागेल. आपल्या क्षमता, कौशल्य, सामर्थ्य सगळ्याच्या साहाय्याने स्वतःला झोकून द्यावं लागेल आणि मगच ध्येय ठरवलेल्या दिशेने आपण प्रवास करु शकतो. केवळ आणि केवळ अपार मेहनतीच्या जोरावरच कोणताही माणूस यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. जो कोणी हे काहीच करणार नाही तो मात्र नैराश्यात नाहीसा होईल. टिकतो तोच जो काहीतरी साध्य करतो, मिळवतो.

आयुष्यात आपण जिंकूच हा आत्मविश्वास असलं तर यश नक्कीच मिळतं. त्यासाठी स्वतःच्या क्षमतांची ओळख करुन घ्यावी, स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव असावी. यशस्वी तेच झाले ज्यांनी नियोजनपूर्वक काम केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यशाचं रहस्यही आपल्याला हेच सांगतं. भान राखून त्यांनी योजना आखल्या आणि बेभान होऊन त्या अंमलात आणल्या. आपणही स्वतःच्या क्षमता, मर्यादा जाणून नियोजन करावं आणि एकदा ते केलं की बेभान होऊन ते पूर्ण करण्यासाठी कामाला लागावं.“

असं म्हणलं जातं की, प्रत्येक माणूस असामान्य, अलौकिक असतो. त्याला हवं ते मिळवण्याची सगळी क्षमता त्याच्यात असते. पण त्या क्षमतांची जाणीवच नसल्याने तो सामान्य बनून जगतो. खरं तर अभिमान वाटेल असं काम आपल्याला करुन दाखवता आलं पाहिजे. त्यासाठी स्वतःच्या बुद्धिमत्तेवर, स्वतःच्या क्षमतांवर आपल्याला प्रचंड विश्वास असायला पाहिजे. पण नेमकं इथेच आपण कमी पडतो आणि आयुष्याला दिशा मिळण्याऐवजी दशा होऊ जाते. आपलं भविष्य कसं असणार हे ठरवणं बरंचसं आपल्या हातात असतं. जर आपण नियमित व्यायाम केला, चांगल्या लोकांमधून राहून चांगले विचार केले, ध्येयपूर्तीसाठी भरपूर मेहनत घेतली तर आयुष्याची दिशा चांगलीच असणार आहे यात काही शंकाच नाही. पण जर आपण गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये राहत असू, महत्त्वाची कामं करण्यात चालढकलपणा करत असू, आपल्या आयुष्याबाबतच आपल्यात प्रामाणिकपणा नसेल, अनैतिकता भरली असेल तर आपल्या आयुष्याची दिशा भरकटणारच. त्यामुळे आयुष्याला चांगल्या दिशेने न्यावं की वाईट दिशेने न्यावं हे ठरवणं आपल्या हातात आहे.

आपल्या आजूबाजूचं वातावरणही आपल्या आयुष्याला कशी दिशा मिळणार, हे ठरवत असतं. आजूबाजूला काहीही महत्त्वाकांक्षा नसलेल्या व्यक्ती असतील, कोणतंही गांभीर्य नसलेल्या व्यक्ती असतील तर आपणही हळूहळू त्यांच्यासारखंच होत असतो. हेच जर ध्येय असलेली माणसं आजूबाजूला असतील, आयुष्याबाबत गांभीर्य असलेल्या व्यक्ती असतील तर आयुष्य चांगल्याच दिशेने जाईल. आपल्याला काय हवं आहे, कसं आयुष्य हवं आहे ते ठरवून आपण संगत निवडली पाहिजे. भविष्याच्या दृष्टीने व्यवस्थित योजना आखून त्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपल्याला करता आले पाहिजेत. आपल्या आयुष्याचा उद्देश काय हे आपण एकदा लक्षात घेतलं तरी आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी मदत होऊ शकते. गरज आहे फक्त उघड्या डोळ्यांनी आयुष्याकडे बघण्याची, ध्येय ठरवून ते पूर्ण करण्याची आणि आपण असामान्य आहोत हे दाखवण्याचीही. हे सगळं आपण करु शकलो तर आपलं आयुष्य योग्य दिशेला आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो.

— ले. : अंजली गवळी 

संग्राहक : श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग- २८ – परिव्राजक – ६. देवभूमी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग- २८ – परिव्राजक – ६. देवभूमी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

जवळ जवळ अडीचशे किलोमीटर ची आडवी पसरलेली हिमालयची रांग, सव्वीस हजार फुट उंचीवरचे नंदादेवी चे शिखर असा भव्य दिसणारा देखावा बघून स्वामीजी हरखून गेले. त्यांनी हिमालयाचे असे दर्शन प्रथमच घेतले होते. मध्यभागी नैनीतालचे शांत आणि विस्तीर्ण सरोवर त्याच्या काठावर वसलेली वस्ती, आणि सर्व बाजूंनी डोंगर उतारावर असलेले शंभर फुट उंचीचे वृक्षांचे दाट असे जंगल. नैनीतालच्या कुठल्याही भागातून दिसणारे हे नयन मनोरम आणि निसर्गरम्य दृश्य भुरळ घालणारे होते.

नैनीतालहून अल्मोर्‍याला त्यांचा पायी प्रवास सुरू झाला. सर्व पहाडी प्रदेश. निर्जन रस्ता, तुरळक भेटणारे यात्रेकरू, गंभीर शांततेत फक्त पक्षांचा सतत कानावर पडणारा किलबिलाट, असा एक डोंगर झाला की दुसरा पार करायचा. रस्त्यात एखाद दुसरं दुकान दिसायचं. पण पैसे जवळ नसल्यानं त्याचा असूनही उपयोग नाहीच. कुणी दाता रस्त्यात भेटला आणि त्याने काही दिले तरच खायला मिळणार. धर्मशाळाही खूप कमी होत्या तेंव्हा. त्यामुळे संध्याकाळ झाली की जिथे अंग टाकायला मिळेल तिथे थांबायचं. असा हा अवघड प्रवास एक तपश्चर्याच होती. या अडचणीं चा विचार केला तर, आज आम्ही हॉटेल्स, गाड्या, साइट सींग चे घरूनच बुकिंग करून निघतो. सतत मोबाइल द्वारे संपर्कात असतो. अडचण नाहीच कशाची. तरीही आपण त्या ठिकाणी /शहर/देश बघायला गेलो की तिथे आपल्याला काय बघायचं हेच माहिती नसतं. फक्त मौज मजा, खाद्याचा आस्वाद आणि खरेदी आणि महत्वाचं म्हणजे फोटो प्रसिद्धीची हाव. असो, अशा प्रकारे स्वामीजी आणि अखंडानंद यांना अडचणींचा विचार सुद्धा डोक्यात नसायचा. आध्यात्मिक प्रेरणा मात्र होती.

नैनीताल सोडल्यानंतर तिसर्‍या दिवशी दोघं काकरीघाट इथं झर्‍याच्या काठावरील पाणचक्की जवळ मुक्कामास थांबले. तिथून अल्मोरा पंचवीस किलोमीटर होतं. दोन नद्यांचा संगम, काठावर मोठं पिंपळाचं झाड, प्रसन्न वातावरण अवर्णनीय शांतता, वनश्री बघून स्वामीजी भारावून म्हणाले, “ध्यानस्थ बसण्यासाठी ही जागा किती सुंदर आहे.”

आणि काय पिंपळाच्या झाडाखाली आसनास्थ होऊन स्वामीजींनी डोळे मिटून घेतले. काही क्षणातच त्यांचे ध्यान लागले. काही वेळाने भानावर येऊन त्यांनी शेजारी पाहिले आणि अखंडांनन्दांना म्हणाले, “माझ्या आयुष्यातल्या अतिशय महत्वाच्या क्षणांपैकी एका क्षणातून मी आता बाहेर पडलो आहे. या पिंपळाच्या झाडाखाली मला नेहमी पडत असलेल्या आजवरच्या आयुष्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. लहनात लहान अणू आणि प्रचंड विस्तार असलेलं ब्रम्हांड या दोहोत असलेल्या ऐक्याची प्रचिती मला आली आहे. या अफाट विश्वात जे जे आहे, तेच सारं आपल्या या छोट्याशा शरीरात सामावलेलं आहे. समग्र विश्वाचं दर्शन मला एका अणुमध्ये घडलं आहे.” त्यांना झालेल्या या साक्षात्काराच्या तंद्रीतच ते दिवसभर होते. आपल्या आयुष्यातला एक महान क्षण असे स्वामीजींनी या अनुभवाबद्दल म्हटले आहे. या झाडाला बोधिवृक्षाचं महत्व प्राप्त झालं होतं जणू. आज अल्मोर्‍याला पण रामकृष्ण मठ आहे.

आता अल्मोरा जवळच होतं. अल्मोरा उंच पर्वताच्या पठारावर वसलेलं होत. तिथे जाताना तीन,चार किलोमीटरचा चढ चढता चढता स्वामीजी थकले आणि भुकेने त्यांना चक्कर पण आली. अखंडानंद घाबरले, जवळपास काही मदत मिळेल का शोधू लागले. समोरच एक कबरस्तान होतं. बाजूला एक झोपडी होती. तिथे एक मुसलमान फकीर बसला होता. त्याने काकडीचा रस करून तो स्वामीजींच्या देण्यासाठी पुढे आला एव्हढ्यात त्याच्या लक्षात आलं, अरे हा तर एक हिंदू संन्यासी दिसतोय आणि तो थांबला. अशा अवस्थेत सुद्धा स्वामीजी त्याला म्हणाले, आपण दोघं एकमेकांचे भाई नाहीत काय? हे ऐकताच त्या फकिराने  स्वामीजींना रस पाजला. स्वामीजींना थोड्याच वेळात हुशारी वाटली आणि थोड्या विश्रांति नंतर ते तिथून निघाले. ज्या ठिकाणी स्वामीजींनी ही विश्रांति घेतली त्या ठिकाणी अल्मोर्‍याचे एक दाम्पत्य श्री व सौ बोशी सेन यांनी स्वामी विवेकानंद विश्राम स्थान उभं केलं आहे.

अल्मोर्‍याला लाला बद्री शाह यांच्याकडे राहिले. तिथून निघून गुहेमध्ये कठोर साधना आणि ध्यानधारणा केली. पुन्हा अल्मोर्‍याला परतले. अशातच कलकत्त्याहून तार आली की, त्यांच्या बावीस वर्षीय धाकट्या बहिणीने योगेंद्रबालाने आत्महत्या केली. स्वामीजी खूप अस्वस्थ झाले. लहानपणापासून बरोबर वाढलेल्या बहिणीचा अंत स्वामीजींना दु:ख देऊन गेला. तिचे लग्न लहान वयातच झाले होते तिला खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. तिचं घर खूप सनातनी होतं. धार्मिक पण सनातनी कुटुंब असेल तर स्त्रियांना केव्हढ्या हाल अपेष्टा आयुष्यभर सहन कराव्या लागतात. अशा स्त्रियांच्या नशिबी केव्हढं दु:ख येतं याची जाणीव स्वामीजींना यावेळी प्रखरतेने झाली. याचवेळी त्यांच्या मनात स्त्रीविषयक आधुनिक दृष्टीकोण तयार झाला. पण हे दु:ख त्यांनी जवळ जवळ दहा वर्षानी जाहीर बोलून दाखवले होते.

स्वामीजी, अलमोर्‍याहून निघून कौसानी, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग येथे गेले. रुद्रप्रयागचं सौंदर्य बघून ते प्रसन्न झाले. तिथला अलकनंदाचा खळाळत्या प्रवाहाचा नाद ऐकून ते म्हणतात, “ही अलकनंदा आता केदार रागाचे सूर आळवित चालली आहे.”

अखंडानंदांना अस्थम्याचा त्रास झाला. थोडे उपचार करून सर्व श्रीनगरला आले. तिथे कृपानंद, सारदानंद, तुरीयानंद हे गुरुबंधु पण एकत्र भेटले. इथे दीड महिना सर्वांनी ध्यानधारणा आणि उपनिषदांचा अभ्यास केला. नंतर टिहरीला महिनाभर राहून पुढे डेहराडूनला गेले. मग गणेशप्रयाग ,मसूरी, हरिद्वार करत देवभूमी हिमालयचा निरोप घेऊन स्वामीजी मिरतला येऊन पोहोचले.

 क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ श्रावण मनभावन ☆ सौ. अर्चना देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ श्रावण मनभावन… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆

आषाढ अमावस्येला दिवे, समयाउजळून त्यांचे पूजन केले जाते .या दिवशी जरा जिवांतिकाचा कागद लावून श्रावण महिनाभर त्याचे पूजन केले जाते .दिवा हे ज्ञानाचे, वृद्धिंगतेचे प्रतिक मानले जाते. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे दीप. दिव्याची आवस म्हणजेच येणाऱ्या श्रावणाची चाहूल..दुसऱ्या दिवशी पासून श्रावण महिना सुरू होतो तसे पाहिले तर आषाढात पावसामुळे वातावरण कुंद असते ,बाहेर चिखलामुळे चिक-चिक असते.त्यामुळे घराबाहेर पडायला मन नाराज असते पण श्रावण येताच सगळीकडे अल्हाददायक वातावरण असते. या काळात निसर्ग बहरलेला असतो ,निसर्गाने मरगळ टाकून उत्साहाची हिरवळ पांघरलेली असते. अगदी दगडावरही शेवाळ उगवलेले असते पण या हिरव्या रंगांमध्ये विविधता आढळते .काही झाडांची पाने हिरवीगार तर काही झाडांची फिकट हिरवी तर काही पोपटी रंगाची आढळतात. तसे पाहिले तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. या दिवसात ऊन- पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरू असतो .काही वेळा आकाशातील सप्तरंगी मोहक इंद्रधनुष्य पाहून डोळ्याचे पारणे फिटते.

बालकवी म्हणतात ,

“श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे”

तर कुसुमाग्रज म्हणतात “हसरा लाजरा आला श्रावण”

स्त्रीचे मन सांगते”सणासुदींची घेऊन उधळण

 आला हसरा श्रावण..,

कर्तव्य संस्कृतीची देतो आठवण

अनमोल संस्कृती ठेवा करू या जतन”

स्त्रीच्या नजरेतून पाहायचे झाल्यास  तिने सगळे बदल स्वीकारले आहेत अगदी हसत खेळत. तिने आपली संस्कृती जपली आहे. पूर्वी तिची जागा उंबऱ्याच्या आत होती पण येणारा प्रत्येक क्षण ती आनंदाने जगायची. यामध्ये सण , व्रत वैकले तिच्यासाठी पर्वणी असायची .श्रावण म्हणजे स्त्रियांचा आनंद वाढवणारा, त्यांचा मान सन्मान वाढवणारा महिना.या महिन्यात येणारे सण आनंदीत करतात.

श्रावणातल्या सोमवारी शंभू महादेवाचे पूजन केले जाते .पुण्याला तर मृत्युंजय महादेव मंदिरात पहाटेपासून महादेवाला दुधाचे अभिषेक सुरू असतात .बरेच भाविक पहाटे पहाटे स्नान करून दुधाची पिशवी घेऊन पायी मंदिरात पोहोचतात, दर्शन घेऊन प्रसादाचे दूध घेऊन घरी परततात आणि आपल्या कामावर जायला निघतात. संध्याकाळी तर अगदी जत्रेचे स्वरूप आलेले असते,दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात पण शिस्तीने दर्शन घेऊन भाविक समाधानाने घरी परततात.

आमच्या कॉलेज जीवनात श्रावणी सोमवारी हरिपूरला  जत्रेला जाण्यात एक वेगळाच आनंदा असायचा. स्टॅन्ड पासून गप्पा मारत, तिखट मीठ लावलेलया पेरूची चव चाखत हरिपूर केव्हा यायचे ते समजायचेच नाही. नेहमीच्या अभ्यासातून वेळ काढून एक छोटीशी पिकनिकच असायची.

मंगळवारी  मंगळागौर पूजन म्हणजे नवविवाहित तरुणींना  पर्वणी असायची ,तिचा निम्मा जीव सासरी तर निम्मा  जीवमाहेरी अशी  तिची अवस्था असायची. थोडक्यात एक पाय सासरच्या दारात तर दुसरा पाय माहेरच्या अंगणात. पूर्वी श्रावणात मुलीला माहेरी घेऊन जाण्यासाठी कोणीतरी येत असे.तिचे आसुसलेले मन म्हणायचं,

“सण श्रावणाचा आला आठवे माहेरचा झुला कधी येशील बंधुराया नको लावू वाट बघाया”

साधारणपणे 40 वर्षांपूर्वी नवविवाहित मैत्रिणीसह सकाळी मंगळागौरी पूजन केले जायचे , पांढऱ्या शुभ्र फुलांनी महादेवाची पिंड सजायची , आजूबाजूला गोकर्ण जास्वंद  गुलाब, बेल, पत्री, दुर्वा केवडयाचे पान लावून सुशोभित केली जायची.अशारीतीने मैत्रीणीच्या बरोबर मंगळागौर सजायची,,दुपारी मस्त पुरण  वरणाचे जेवण व संध्याकाळी सवाष्णी ना हळदी कुंकू, मटकीच्या उसळी सह फलाहार आणि रात्रभर फुगडी ,झिम्मा ,पिंगा…. सारखे  पारंपरिक खेळ खेळले जायचे.,या कार्यक्रमाला सखे,सोबती, नातेवाईक एकत्र येत त्यामुळे नात्याची वीण घट्ट होत असे.

श्रावण शुक्रवारी तर माहेरवाशीण सवाष्णीचे कौतुक न्यारेच असे. दुपारी पुरणाच्या दिव्यांनी औक्षण केले जायचे, जेवण्यासाठी काहीतरी गोड पक्वान्न आणि संध्याकाळी दूध व फुटाणे यांची मेजवानी असे. आम्ही लहान असताना आईबरोबर शुक्रवारी हळदी कुंकवाला  जात होतो तिथे अटीव दूध पिऊन येताना फुटाणे खाण्यात खूप मजा यायची. शिवाय घरी वेलदोडा, केशर घातलेले दूध असायचे. आजही या दुधाची चव जिभेवर रेंगाळते पण हल्ली नोकरी निमित्त स्त्री घराबाहेर पडू लागली पण त्यातूनही एखादी दिवस अर्धी रजा काढून मंगळागौर पुजते ,रविवारी शुक्रवारचीसवाष्ण , शनिवारचा मुंजावाढते,  सत्यनारायण पूजा करून घेते.लोकलच्या महिला डब्यामध्ये मंगळागौरीचे खेळ खेळते किंवा मंगळागौरीचा खेळ खेळणाऱ्या ग्रुपला बोलावून याचा आनंद लुटते .शुक्रवारी मैत्रिणींना फुटाणे देऊन हळदी कुंकवाची हौस भागवते.आजची स्त्री कितीही पुढारलेली असली तरी , तिची जीवनशैली आधुनिक असली तरी आपल्या सवडीनुसार आपले रीती रिवाज, परंपरा ती सांभाळत असते.

पूर्वी नागपंचमी राखी पोर्णिमा, गोकुळाष्टमी याशिवाय दररोज येणारा सण ती साजरे करायची त्यामुळे तिच्या शरीरावरचा ताण निघून जायचा,या सर्वातून ऊर्जा घेऊन पुढे येणाऱ्या गणपती गौरीच्या तयारीला ती लागत असे. 

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माहिती आहे तुम्हाला? देशातला पहिला “मॉल” शंभर वर्षांपूर्वी लातूरात उभा राहिला…!! – लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ माहिती आहे तुम्हाला? देशातला पहिला “मॉल” शंभर वर्षांपूर्वी लातूरात उभा राहिला…!!  – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

मॉल म्हणजे काय? तर मोठी इमारत किंवा कनेक्ट इमारतींची मालिका, ज्यामध्ये विविध वस्तू एकत्र मिळणाऱ्या दुकानांची मालिका… ज्यात हॉटेल्स पण असतील असे ठिकाण… जगात 19 व्या शतकात बांधकामात अनेक प्रयोग झाले.. रचनात्मक शहरे उभी राहिली… भारतात ब्रिटिशांनी त्यांच्या शैलीत अनेक इमारती बांधल्या… पण देशात पहिल्यांदा शहराच्या मध्यभागी भव्य गोलाकार मार्केट उभं करून शहरातले सगळे रस्ते जोडण्याची अभिनव कल्पना सुचली ती लातूरकरांना… सालं होतं 1917..  देशभरात ब्रिटिशांची सत्ता होती. मात्र लातूरवर निजामशाहीची हुकूमत होती, ब्रिटिशांबरोबर तह करून आपलं राज्य चालविणाऱ्या निजामकाळात लातूरमधल्या तत्कालीन व्यापाऱ्यांच्या डोक्यात अशा मार्केटची कल्पना सुचली की, सगळ्या गोष्टी लोकांना एकत्र मिळाव्यात. मग त्याची रचना पक्की झाली… मध्यभागी देवीची प्रतिष्ठापना.. त्यामागे आपल्या पाठीशी आदीशक्तीचे पाठबळ आहे ही धारणा प्रत्येकाच्या मनात असावी…  8 जून 1917 रोजी लातूर मध्ये “गंजगोलाईची स्थापना करण्यात आली.. त्याचे उदघाटन, निजामकाळातील सुभेदारी म्हणजे आयुक्त कार्यालय गुलबर्गास्थित होतं, त्याचे सुभेदार होते राजा इंद्रकरण… त्यांच्या हस्ते झाले आणि आजच्या व्याख्येप्रमाणे देशातला पहिला “मॉल” लातूरात उभा राहिला.

‘गंज’ हा उर्दू शब्द आहे, त्याचा अर्थ होतो वस्तूबाजार (आणि मराठवाड्यात, मोठे गोल भांडे असते दूध वगैरे काढण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी त्यालाही गंज म्हणतात) अशी गोल, वस्तूबाजार असलेली बाजारपेठ उभी राहिली..  त्याला 16 रस्त्यांनी जोडण्यात आले… या सोळा रस्त्यांवर ठोक व्यापारी दुकाने वसविली गेली.. एक रस्ता फक्त सोनारासाठी म्हणजे सराफ लाईन, दुसरा रस्ता फक्त कापड दुकान – ती कापड लाईन, एक लाईन अन्नधान्याची – भुसारलाईन… असे 16 रस्ते – सोळा ठोक व्यापाराच्या लाईन.. असं देशात कुठे आहे का? तर आहे, पण लातूरची गंजगोलाई उभी राहिल्यानंतर दिल्लीत 1921 ला ब्रिटिश अधिकारी एडविन लुटनेस यांनी गोल मार्केट वसविले.. कमी जागेत अधिक दुकाने दळणवळणासाठी सोयीस्कर ठरतात म्हणून ही रचना केली… पुढे 1925 मध्ये रायपूरलाही गोल मार्केट ब्रिटिशांनी वसविले.

लातूरची गोलाई एतद्देशीय लोकांनी त्यांच्या कल्पनेतून उभी केली. या स्थानिक व्यापाऱ्यांनी आपल्या जागेची मागणी,  त्याकाळी लातूरची पेशकारी ज्या औशावरून चालायची – तिथले पेशकार  सुजामतअली यांच्या मदतीने हैद्राबाद निजाम दरबारी पोहचवली व जागा उपलब्ध करून घेतली..  पुढे 1945 ला परदेशावरून आलेल्या फय्याजुद्दीन या वास्तूरचनाकाराच्या मदतीने कच्ची गोलाई पक्की झाली…!!

1905 ला लातूरला तहसील दर्जा मिळाला. त्यापूर्वी नळदुर्ग हे तहसील कचेरीचे ठिकाण होते. 1923 ला मिरज लातूर रेल्वे सुरु झाली आणि लातूरची वाढ व्यापारी केंद्र म्हणून झाली… या व्यापारी पेठेची ख्याती देशभर पसरली. त्यातून गंजगोलाई आणि तिचे वैशिष्ट्य देशभर पसरले… गंजगोलाई हे लातूरच्या इतिहासातील सोनेरी पान आहे… आणि लातूरकरांच्या मनामनात या गंजगोलाईबद्दल अभिमान आहे. ते लातूरकरांच्या अभिमानाचे प्रतीक आहे… अशा या गंजगोलाईचा आज वर्धापन दिन आहे… चला लातूर संस्कृतीचा अभिमान ठेवू या… देशभर तो अधिक तेजाने पसरवू या…!!       

लेखक – अज्ञात

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिना अखेरचे पान – 7 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिना अखेरचे पान – 7 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

ज्येष्ठाच्या अखेरीस पावसाने हजेरी लावलेली असते. जणू काही ‘मी आलोय’ हे सांगण्यासाठीच सरी येऊन जातात. पण लवकरच हा पाऊस आपल्या लवाजम्यानिशी येतो तो मुक्काम करण्याच्या बेतानेच. सरी निघून गेलेल्या असतात आणि कोसळणारा पाऊस आषाढ घेऊन येतो. जून मध्ये निसर्गाची पाऊले नुसतीच ओली झालेली असतात. ती जुलैमधल्या चिखलात कधी बुडून जातात समजतही नाही.

आषाढ म्हटला की ओथंबलेल्या मेघमाला तर डोळ्यासमोर येतातच पण मनही कसं भरून आल्यासारखं वाटतं. पावसामुळं हवेत येणारा गारवा,कधी कुंद वातावरण,हातात वाफाळलेल्या चहाचा कप,जमिनीवर वाढत जाणारी हिरवाई,शेतात चाललेली लगबग,छत्री नाहीतर रेनकोटची रस्त्यावर वाढलेली वर्दळ, हे सगळं आषाढातच बघायला मिळणार.

पण आषाढ आला म्हटलं की पहिली आठवण होते ती कवी कुलगुरू कालिदासाची. आषाढाचा पहिला दिवस हा कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर ही त्याची जयंती नव्हे किंवा पुण्यतिथीही नव्हे. पण त्याच्या अजरामर अशा ‘मेघदूत’ या महाकाव्याच्या स्मृती जागवून त्याच्या प्रतिभेला सलाम करण्याचा हा दिवस !

याच आषाढाचा म्हणजे सर्वांच्या परिचयाचयाच्या जुलै महिन्याचा पहिला दिवस कृषी दिन म्हणूनही साजरा होतो. तसेच हाच असतो डाॅक्टर्स डे आणि नॅशनल पोस्टल वर्कर्स डे. डाॅक्टरांबद्द्ल कृतज्ञता आणि पोस्ट कर्मचा-यांच्या कामाची दखल घेण्याचा हा दिवस. हा दिवस सी. ए. दिनही आहे.

सात जुलै हा चाॅकलेट डे असतो तर दहा जुलै आपण मातृ सुरक्षा दिन म्हणून साजरा करतो.

अकरा जुलै हा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवस म्हणून पाळला जातो.

भारताच्या दृष्टीने एकोणीस जुलै हा दिवस ही महत्त्वाचा आहे. कारण याच दिवशी 1969 साली प्रमुख खाजगी बॅंकांचे राष्ट्रीयिकरण करण्यात आले आणि लोकाभिमुख बॅकिंग ला सुरूवात झाली.

वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन व व्याघ्र दिन म्हणून जाहीर झाला आहे.

याच दिवशी 1969 साली मानवाने प्रथम पृथ्वीच्या बाहेर म्हणजे चंद्रावर पाऊल ठेवले. म्हणून वीस जुलै हा चांद्रदिनही आहे.

वन आणि पाऊस यांचे नाते लक्षात घेऊन तेवीस जुलै हा दिवस वनसंवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. तर चोवीस जुलै आहे कझिन्स डे. आपल्याच भावंडांना शुभेच्छा देण्याचा दिवस.

1999 साली कारगील येथे युद्धात  मिळवलेल्या विजयाची आठवण ताजी ठेवण्यासाठी सव्वीस जुलै हा कारगील विजय दिन म्हणून साजरा केला जातो. वाघांची घेती संख्या लक्षात घेऊन ,त्याविषयी जागृती करण्यासाठी एकोणतीस जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो.

 तीस जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन असतो.

भारतात जुलै महिन्याचा चौथा रविवार हा पालक दिन म्हणून साजरा केला जातो.

असे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करत असतानाच आपण पारंपारिक सणवारही तेवढ्याच उत्साहाने साजरे करतो. ज्येष्ठात काही ठिकाणी कर्नाटकी बेंदूर झालेला असतो. आता या महिन्यात महाराष्ट्रीय बेंदूर येतो. तर मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सणही याच महिन्यात असतो.  

आषाढ महिन्यातील पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही दिवसांना विशेष महत्त्व आहे. कारण पौर्णिमा ही गुरुजनांना वंदन करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘गुरूपौर्णिमा’ म्हणून साजरी होते. तर,अमावस्या ही ‘दिव्याची अमावस्या’ असल्यामुळे घरातील सर्व दिप,समया,यांचे पूजन करून त्या प्रज्वलीत केल्या जातात. प्रकाशाची पूजा करून अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा हा दिवस.

शुद्ध पक्षात येणारी एकादशी ही आषाढी एकादशी. ज्येष्ठात मार्गस्थ झालेल्या पालख्या पंढरपूरात येऊन पोहोचलेल्या असतात आणि अवघी पंढरी विठूरायाच्या नामाने दुमदुमून गेलेली असते.

याच महिन्यात थोर समाजसुधारक गो. ग. आगरकर आणि लोकमान्य टिळक  यांचा जन्मदिन आहे. तर बाजी प्रभू  देशपांडे,अण्णाभाऊ साठे,सरखेल कान्होजी आंग्रे,वीर शिवा काशीद, संत सावतामाळी आणि डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथि असते.  

एकीकडे निसर्गाच्या चक्राबरोबर पुढे पुढे जात आपण संस्कृती आणि परंपरा जपताना इतिहासातही डोकावून पाहत असतो. वर्तमानातील एक महिना संपतो आणि सर्वांचा मनभावन असा श्रावण खुणावू लागलेला असतो. मेघांनी भरपूर देऊन झालेल असतं. म्हणूनच की काय रिमझिमणा-या पावसासाठी मन आसुसलेलं असतं. ऊन पावसाचा खेळ बघायला डोळे आतूर झालेले असतात आणि हिरवाळीच्या वाटा श्रावणाकडे घेऊन जात असतात. 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तुज पंख दिले देवाने… भाग -2 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ तुज पंख दिले देवाने…भाग -2 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

याशिवाय अनेकदा घरातील  प्लबिंग, इलेक्ट्रिक कामे किंवा गॅस शेगडी दुरुस्त करणे यासारख्या छोट्या- मोठ्या कामांसाठी कोणी व्यक्ती उपलब्ध होत नाहीत. कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल दुरुस्ती हीही आजच्या काळातील आवश्यक असणारी गोष्ट आहेत. त्यातही कौशल्य असणारे लोक कमी आहेत. करियर म्हणून अशाही काही क्षेत्रांमध्ये कौशल्य प्राप्त करून एखादा विद्यार्थी आपली एक नवी वाट निर्माण करू शकतो. याशिवाय संगीत- नृत्य क्षेत्रात वापरली जाणारी वाद्ये तयार करणे- त्याची दुरुस्ती करणे, स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची दुरुस्ती, वॉशिंग मशीन दुरुस्ती अशाही कामांमध्ये कौशल्य असणाऱ्या व्यक्ती हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच आहेत. त्यामुळे या क्षेत्रातही करियरच्या अगणित संधी उपलब्ध होऊ शकतात. अशी कामे करणाऱ्या व्यक्तींना एकत्र करून एखादी एजन्सी तयार करणे व लोकांना घरपोच सेवा उपलब्ध करून देणे हाही एक व्यवसाय होऊ शकतो. दर महिन्याला मेंटेनन्स या स्वरूपात या सेवा उपलब्ध करून दिल्या तर लोक आनंदाने या सेवेचा लाभ घेतील.

“योजक: तत्र दुर्लभ:|” असे संस्कृतमध्ये एक वचन आहे. म्हणजे जगातील कोणतीही गोष्ट निरुपयोगी नसते. फक्त त्याचा योग्य वापर करणारा दुर्लभ असतो. आपले आयुष्यही इतके कवडीमोल नाही की ते सहज संपवून टाकावे. म्हणूनच ते सुंदर कसे करता येईल याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणूनच दहावी/ बारावी हे केवळ आपल्या आयुष्यातील केवळ मैलाचा दगड आहेत एवढाच विचार विद्यार्थ्यांनी केला तर गुणांच्या चढाओढीत त्यांना नैराश्य येणार नाही.

आता लवकरच नवीन शैक्षणिक धोरण अमलात येणार आहे. कदाचित यावर्षीच्या बोर्डाची परीक्षा ही शेवटची बोर्डाची परीक्षा असेल. हे नवीन शैक्षणिक धोरण हे पूर्णपणे विद्यार्थीकेंद्रित आणि कौशल्याधारीत आहे. नवीन क्षितिजांचा, नवीन काळाला अनुसरून अनेक कौशल्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. शिवाय विविध विद्याशाखेमधील वेगवेगळे अडसर दूर करून एक पारदर्शक प्रणाली निर्माण करण्याचा यात प्रयत्न केला गेला आहे आणि मुळात पुस्तकी अभ्यासावर गुण न देता विद्यार्थ्यांच्या मूलभूत कौशल्यांचा अभ्यास करून गुण दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिक, भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक , शारीरिक वाढीच्या दृष्टीने आवश्यक असणारे घटक या धोरणात समाविष्ट करण्यात आले आहेत. मुलांनी अधिकाधिक संशोधन, प्रयोगशीलता यावर भर देऊन परिस्थितीनुसार नवीन काहीतरी निर्मिती करावी. त्यासाठी  सर्व शाळांमधून अशाप्रकारची वातावरणनिर्मिती व्हावी अशी कल्पना या धोरणामध्ये आहे. त्यामुळे मुलांना येणारे नैराश्य आणि त्यातून नकळत केल्या जाणाऱ्या आत्महत्या यावर आपोआप नियंत्रण येईल अशी आपण आशा करु या.

परमेश्वराने सर्वच पक्ष्यांना उडण्यासाठी पंख दिले आहेत. पण कोणी किती भरारी मारावी हे त्या पंखांच्या क्षमतेवर अवलंबून असते. त्यामुळे घार जेवढ्या उंचावरून उडू शकेल तितक्या उंचावरून चिमणी उडू शकणार नाही. पण आपल्या मर्यादेत  आपल्याला आवश्यक तेवढी भरारी ती निश्चितच मारू शकेल. म्हणूनच आज निकाल जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना असे म्हणावेसे वाटते की-

 “ तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने”

तुमच्यातील क्षमता ओळखून, त्याचा पुरेपूर वापर करून भरारी मारायची ठरवली तर जीवन का नाही सुंदर बनणार?

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ इंदिरा : तीन ऋणे – सुश्री विनिता तेलंग ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

? मनमंजुषेतून ?

☆ इंदिरा : तीन ऋणे – सुश्री विनिता तेलंग ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

‘आपल्या अंधाऱ्या प्रवासात प्रकाशाचे झोत फेकणाऱ्या ‘ तीन जणांच्या ज्या ऋणांविषयी इंदिराबाईंनी लिहिलं आहे, ते सारं खरं तर कोणत्याही उमलू पहाणाऱ्या कलाकारासाठी फार मोलाचे आहे..

इंदिराबाई लिहितात —-

कवी माधव जूलियन त्यांना शिकवायला होते. ते एकदा, ‘ तुम्ही कविता लिहिता असं समजलं, तर येतो एकदा पहायला ‘ असं म्हणून एक दिवस खरंच घरी आले. जाताना माझ्या मनाविरुध्द आईने त्यांना कवितांची वही दिली..

आता इथे काय अभिप्राय येतो म्हणून प्राण कंठाशी आलेले !आठ दिवसांनी सरांनी वही आणून दिली आणि सांगितले….. “ शब्दसंग्रह वाढवा.. त्यासाठी  ज्ञानेश्वरी वाचा. शब्दासाठी कविता अडली असे दारिद्र्य असू नये. शब्द म्हणजे काय ते ज्ञानेश्वरी तुम्हाला सांगेल. दुसरे, जेव्हा कविता लिहावी वाटते तेव्हा जे वाटते ते प्रथम गद्यात लिहून काढा. ते झाले की कवितेत लिहा. काही बदल हवा वाटला तर तो पुन्हा गद्यात लिहा.. पुन्हा त्यानुसार कवितेत बदल करा..”

दुसरे दुर्गाबाई भागवतांचे सांगणे…..

बोलता बोलता त्यांनी विचारले, ” सध्या काय वाचताय?”

” तसे विशेष काही नाही..”

यावर त्या उत्तरल्या, ” पण जे वाचता त्याचे टिपण ठेवता ना?…”

“नाही हो..” असे उत्तरताना इंदिराबाई गुदमरल्याच !….  पुढे बाई सांगतात….. .

“आणि मग एक अद्भुत झाले ! त्यांनी मला क्षुद्र, अडाणी ठरवले नाही. त्या मला म्हणाल्या,  “ कसे वाचन करावे, मी सांगते…” असे म्हणत त्यांनी कागद पेन घेतले, त्यावर रेघा ओढून खण पाडले आणि त्या सांगू लागल्या. अगदी मनापासून व जिव्हाळ्याने.

त्यांच्या सांगण्याचा तपशील आठवत नाही, पण सारांश असा होता……

“ वाचन नेहमी जाणीवपूर्वक करावे. कोणतेही पुस्तक वाचा, शेजारी एक वही ठेवावी. त्या पुस्तकातील आवडलेले, न आवडलेले मुद्दे नोंदवावेत. त्यावरचे आपले मत नोंदवावे. झाल्यावर एकूण पुस्तकाविषयीचे मत नोंदवावे. ही नोंद स्वतंत्र करावी; व मागील नोंदी व ही नोंद तपासून लेखनाविषयीचे तुमचे निष्कर्ष नोंदवावेत. मग एकूण पुस्तकाचे एक स्वतंत्र टिपण या साऱ्यावरुन करावे. तुम्ही कविता अशा तऱ्हेने वाचा. बघा तरी !”  इतके तपशीलवार त्यांनी मला सांगितले ! त्या विदुषी खऱ्याच !”

तिसरे वि.स.खांडेकर…

एकदा ते म्हणाले, ” तुम्हाला मी एक काम सुचवणार आहे. तुम्ही कविता प्रत्यक्ष कागदावर उतरू लागलात की, हे करायचे. एका वहीत तारीख टाकून त्या दिवशी सुचलेल्या ओळी, कविता लिहायची. पुन्हा त्यात काही भर पडली, बदल झाले, तर पुन्हा तारीख टाकून पुढच्या पानावर लिहायचे. मागच्या ओळींसकट. क्रम बदलला, शब्द बदलले तर त्याचीही नोंद करायची. मथळे बदलले वा काहीही काम त्या कवितेवर केले तरी ते नोंदवायचे. अशी ती कविता- रचनेची डायरी ठेवायची.. अगदी प्रामाणिकपणे. तुम्ही हे करु शकाल म्हणून सांगतो. हे काम समीक्षेला पुढे नेणारे आहे….”

“या साऱ्या सूचना मी सहीसही अमलात आणल्या असे नाही. पण ही तीन ऋणे माझ्या मनात बिल्वदलांसारखी टवटवीत आहेत. या सूचनांचा गाभा मी आत्मसात केला आहे. माझ्या लेखनप्रवासाची वाटचाल या प्रकाशकिरणांनी थोडीफार उजळली आहे, हे निश्चित.”

हे वाचल्यावर पुन्हा प्रकर्षानं आपल्या तोकडेपणाची जाणीव झाली !

वाटलं की उत्स्फूर्तता, सहजभाव, लालित्य हे सारं जपूनही शास्त्रशुध्द पध्दतीने लिखाण विकसित करता येऊ शकतं, तसं ते केलं पाहिजे .

एखादा कसलेला नट त्याच्या नैसर्गिक जिवंत अभिनयाचा प्रभाव पाडतो, तेव्हा त्यामागे त्याची शास्त्रशुद्ध मेहनत असते. गायक रियाज करतो, ताना पलटे घोटतो, तसे लेखक, कवी म्हणून आपण काय करतो ?

तर या इंदिराबाईंच्या बिल्वदलानं असं विचारात पाडलं !

लेखिका – सुश्री विनिता तेलंग

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सन्माननीय अपवाद : लो. टिळक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ सन्माननीय अपवाद : लो. टिळक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

पुण्यातील ज्ञानप्रकाश हे दैनिक व टिळक यांचे अजिबात पटत नसे .  एकदा ज्ञानप्रकाशच्या संपादकांना अग्रलेख लिहिणे जमणार नव्हते, म्हणून हरीपंत गोखले हे टिळकांकडे आले व म्हणाले उद्यासाठी मला एक अग्रलेख लिहून द्या. टिळक म्हणाले ‘अर्ध्या तासाने या !’ गोखले आल्यावर टिळकांनी एक लखोटा त्यांच्या हातात दिला.  तो उघडून पाहिल्यावर त्यांचा डोळ्यांवर विश्वास बसेना.  टिळकांनी ज्ञानप्रकाशच्या संपादकांच्या शैलीत अग्रलेख लिहिला होता– आणि तो त्यांच्या परंपरेशी साधर्म्य राखणारा— टिळकांवर टीका करणारा ! असे होते टिळक महाराज !

एका संपादकाने दुसऱ्या वृत्तपत्रात स्वतःवरच टीका करणारा अग्रलेख लिहावा, हा कधीही मोडला न जाणारा जागतिक विक्रमच होय . 

“SWARAJYA IS MY BIRTH RIGHT, AND I SHALL HAVE IT.“ असे परकीय सत्तेला ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या नुकत्याच झालेल्या जयंतीनिमित्त मनःपूर्वक वंदन 

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तुज पंख दिले देवाने… भाग -1 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ तुज पंख दिले देवाने…भाग -1 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

हल्लीच मुंबईला एका लग्नाला गेले होते. त्यावेळी नीताला अचानक समोर बघून मला आश्चर्य वाटले. नीता म्हणजे माझी लहानपणीची शेजारची मैत्रीण! माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी असून नापास होत होत माझ्या वर्गात आली होती. 10 वीत दोनदा नापास झाल्यावर मात्र घरच्यांनी तिचे लग्न लावून दिले होते. तिच्या माहेरी गरिबी होतीच. पण सासरची परिस्थिती पण यथातथाच होती. लग्नानंतर माझा आणि नीताचा काही संबंध राहिला नव्हता. आणि आज अचानक या लग्नात ती मला लग्नाची केटरर म्हणून भेटली. तिच्याशी बोलताना कळले की लग्नानंतर मुंबईत आल्यावर आपल्या पुरणपोळ्या करण्याच्या कौशल्यावर तिने एक मोठा उद्योग सुरू केला. त्यात घरच्या सगळ्या लोकांना तिने सामावून घेतले आणि आज मोठी उद्योजिका म्हणून तिने मुंबईत नाव कमावले आहे. मला तिचे खूप कौतुक आणि अभिमान वाटला. आणि त्याचवेळी दहावी / बारावीचे निकाल जाहीर झाल्यावर आत्महत्या करणाऱ्या अनेक मुलांचे चेहरे डोळ्यासमोर तरळून गेले. नीताने त्यावेळी निराश होऊन असा काही निर्णय घेतला असता तर? पण तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होता आणि म्हणूनच आज ती ताठ मानेने उभी आहे.

हल्लीच दहावीचा निकाल लागला. काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल लागला. बऱ्याच जणांनी उत्तम यश संपादन केले आहे. आपापल्या आवडीच्या क्षेत्रात ते आपले करियरही करतील. पण आत्ताच्या ट्रेंडनुसार केवळ मेडिकल , इंजिनिअरिंग, सी. ए. किंवा एम्.पी.एस.सी/ यु.पी. एस. सी पास होऊन त्यात यश संपादन करणे म्हणजेच करियर का? ज्यांची ते करण्याएवढी बौद्धिक क्षमता नाही त्या मुलांचे काय? बऱ्याचदा परीक्षेतील गुणांना महत्व देऊन या मुलांच्या क्षमता तपासल्या जातात. पण एखाद्याकडे बौद्धिक क्षमता कमी असेल तर कदाचित दुसऱ्या प्रकारची क्षमता अधिक चांगली असेल. उदा. चित्रकला, सुतारकाम, नृत्य, गायन, शिलाईकाम, पाककला अशा इतर गोष्टीत ते अधिक पारंगत असतील आणि त्यांच्या या क्षमतेचा वापर करून त्यांना करियरमध्ये नवीन संधी निर्माण करता येऊ शकतात.

आपण लहानपणी खेळताना पत्त्यांचा बंगला करायचो. त्यातला सर्वात खालचा पत्ता काढला तर काय व्हायचे? सर्व बंगला कोसळून जायचा. वैद्यकीय, इंजिनिअरिंग, सी.ए. या सर्व क्षेत्रातही असेच आहे. या क्षेत्रातील फक्त वरची पदे आपण पाहतो. पण त्यांना मदत म्हणून लागणाऱ्या इतर गोष्टींचा आणि त्यात कौशल्य प्राप्त करून करियरच्या नवीन वाटा चोखाळण्याचा आपण कधी प्रयत्न करतो का? उदा. मेडिकलचेच उदाहरण घ्यायचे झाले तर रक्त- लघवी तपासणी, एक्स- रे, एम. आर. आय., डोळ्याचा नंबर तपासणे व चष्मा तयार करणे, दातांची कवळी तयार करणे इ. कामे प्रत्यक्षात डॉक्टर करत नाहीत. तर ती कामे करण्यासाठी वेगळे प्रशिक्षण घेऊन अनेक सहाय्यक त्यांना मदत करत असतात. इंजिनिअरिंग क्षेत्रातही  प्रत्यक्ष इंजिनियर होता आले नाही तरी इंजिनियरना सहाय्यक म्हणून कामे करण्यासाठी पण छोटे- मोठे कोर्स आहेत. अकौंटिंग क्षेत्रातही अनेक असेच कोर्स सध्या उपलब्ध आहेत. कॉम्पुटर क्षेत्रात तर लाखो संधी आहेत.

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डोंगर – झाडे – आणि पाणी ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ डोंगर – झाडे – आणि पाणी ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

डोंगर आणि झाडाशिवाय जमिनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य आहे. 

1) डोंगर हे जमिनीतील पाणीसाठ्याचे बाह्य कवच असते. उन्हाळ्यात डोंगराचे बाह्य आवरण तापते. मात्र  भूपृष्ठापर्यंत उष्णता पोहचू न शकल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. याउलट डोंगर फोडला तर उष्णता थेट पोहचते व डोंगराच्या पोटातील ओलावा संपुष्टात येतो. 

2) पाणी जमिनीत दोन प्रकारे साठवले जाते. एक मृत साठ्याचे पाणी आणि दुसरे जिवंत साठ्याचे पाणी . 

मृत साठ्याचे पाणी हे दहा फुटावर पाझरते तर जिवंत साठ्याचे पाणी दहा ते १०० फूट व त्यापेक्षा अधिक पातळीवर आढळते.

जेेव्हा पाऊस पडतो तेव्हा नदी-नाल्याचे पाणी मृत साठ्याच्या स्वरूपात जमिनीत साठले जाते, जे की एकदा उपसले की संपून जाते. आणि जोपर्यंत ओढे वगळ वहात असतात तोपर्यंतच विहीर व बोअरला पाणी असते. 

तर जिवंत साठ्याचे पाणी आज तरी भूगर्भातून संपलेले आहे. कारण जिवंत पाणी खोलवर जाण्यासाठी नैसर्गिक यंत्रणा हवी असते. 

3) एक पाण्याचा थेंब खडकातून पाझरून भूगर्भात जाण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजेच दहा फुटांवर जाण्यासाठी दहा वर्ष लागतात. 

4)  एक झाड एका दिवसाला दहा लिटर पाणी जमिनीत ५० फुटावर घेऊन जाते. कारण झाड हे जमिनीच्या वर जेवढ्या उंचीपर्यंत असेल तेवढीच खोलवर त्याची मुळे असतात. म्हणून झाडं ही निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहे, 

5) एक लिंबाचे झाड एकूण दहा हजार लिटर पाणी पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते. याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३० झाडं लिंब, चिंच ,जांभूळ, आंबा , मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील. म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे. 

6) एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाड एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.आणि ते ही पन्नास फुटाच्याही खाली. वडाची व पिंपळाची मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात. 

एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते, आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो. 

म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा. 

आपण एका बोअरवेलसाठी एक लाख रु.खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख रु. खर्च करतो. पण पाणी लागण्याची  कुठलीच शाश्वती नसते. 

— कारण आपली नियत ही धूर्त असते. डोंगर संपुष्टात आणण्याची, डोंगरावरील झाडं तोडण्याची, बांध संपवून बोडके करण्याची नियत असते. म्हणून मग पाणी येणार तरी कुठून? 

6) पाण्याचे दुर्भिक्ष हे मानवनिर्मित आहे. देवाला दोष देण्यात अर्थ नाही. खरे दोषी आपण व आपला स्वार्थ आहे. 

हवा ही ऊर्जा आहे.

पाणी हे अमृत आहे

तर माती ही जननी आहे.

तर झाडं हे जीवनदायी आहेत. —

झाड नसेल तर हवा रोगट होते. पाणी विषासमान होते आणि माती वांझ होवून शापीत होते.

7) झाडांचं मूल्य समजून घ्या… आणि दहा रूपयाचं फक्त एक झाडं शेत असेल तर शेतात, नाही तर माळरानावर, डोंगरावर कुठेही जगविण्याची जबाबदारी घ्या…. 

या शिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. तुम्ही गावाचे, शहराचे, देशाचे, समाजाचे आणि स्वहिताचे जर काही देणं लागत असाल तर एवढचं साधं काम करा. 

झाडं माणसाचे मन, मस्तिष्क व जीवन हिरवंगार करत असतात. 

8) एक सदैव लक्षात असू द्या. झाडांची पाणी साठवण्याची व वाहण्याची क्षमता त्यांच्या  वयावर व प्रकारावर अवलंबून असते. शक्यतो देशी झाडे लावा.

— “झाडे लावा – झाडे जगवा” —

माहिती प्रस्तुती : विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares