मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ !! ब्रह्मचैतन्य रुग्णालय !! ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ !! ब्रह्मचैतन्य रुग्णालय !! ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

 हे रुग्णालय की राम मंदिर – तुम्हीच ठरवा !

दवाखाना म्हणजे सवर्त्र औषधांचा गंध, चहूकडे गंभीर वातावरण असं चित्र डोळ्यासमोर येतं.

आणि मंदिर ? – उदबत्तीचा सुगंध, कुठेकुठे सुविचार, श्लोक लिहिलेले…असं काहीसं.

जर एका दवाखान्यात असंच मंगल वातावरण आहे – हे सांगितलं तर खरं वाटेल का?

पण हे खरंय…अहमदनगरचं “ब्रह्मचैतन्य रुग्णालय” अगदी एखाद्या मंदिरासारखं आहे.

डॉ. कुलकर्णी दाम्पत्याचं मूळ “चिंतामणी हॉस्पिटल”, ब्रह्मचैतन्य महाराजांच्या भक्तीरसाने भारावून जाऊन “ ब्रह्मचैतन्य रुग्णालय “ झालंय. ह्या हॉस्पिटलच्या मागेच एक प्रशस्त ३ मजली मंदिर देखील आहे.

नाममात्र शुल्क (रू ३० फक्त !) आकारून ह्या रुग्णालयात रुग्णांची तपासणी होते .

OPD मधे रुग्णांचं स्वागतच मोठ्या प्रेमाने होतं :

प्रवेश केल्या केल्या मनाचे श्लोक दृष्टीस पडतात !

डॉक्टरांना भेटण्यासाठी आपल्या नंबरची वाट बघणारे रुग्ण “ रिकामे ” बसत नाहीत…! तिथे ब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचनं व इतर आध्यात्मिक पुस्तकं वाचनासाठी उपलब्ध आहेत.

डॉक्टर कुलकर्णींचं केबिन तर एखाद्या देवघरासारखं भक्तीरसाने परिपूर्ण आहे…

वरच्या मजल्यावर admit झालेल्या रुग्णांसाठी जप-माळ आणि प्रवचनांचं पुस्तक ठेवलंय…! रुग्णावस्थेत ह्याने खूप मनःशांती मिळते.

एवढंच नाही, प्रत्येक ward ला, खोलीला संतांचीच नावं दिली गेली आहेत…

“ ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर ” महाराजांचे निस्सीम भक्त असलेल्या डॉ. कुलकर्णी दाम्पत्याच्या भक्तीरसाने त्यांचं हॉस्पिटल न्हाऊन निघालं आहे.

चहूकडे देवळांचा धंदा चालू असताना आपल्या व्यवसायालाच देऊळ बनवणाऱ्या ह्या “वैद्य” दाम्पत्याची भक्ती अतुलनीयच !

वंदन…!   

संग्राहक :– सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सत्य… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ सत्य… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

कालिदासांना ही जाणीव झाली होती की ते खूप मोठे ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली, त्यांनी पाहिलं की जवळच एक वृद्ध स्त्री विहिरीवर पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, “ माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल.” वृद्ध स्त्री म्हणाली, “ बाळा मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते.” 

 मग कालिदासाने परिचय देण्यास सुरवात केली—

कालिदास म्हणाले “ मी प्रवासी आहे. “

वृद्ध स्त्री म्हणाली, “  प्रवासी तर फक्त दोनच आहेत– एक चंद्र आणि दुसरा सूर्य– जे दिवस रात्र चालतच असतात.” 

कालिदास म्हणाले, “ मी अतिथी आहे. पाणी मिळेल ?”

वृद्ध स्त्री म्हणाली, “ अरे अतिथी तर फक्त दोनच आहेत– एक धन आणि दुसरं तारुण्य– ते निघून जातात. खरं सांग तू कोण आहेस ?” 

कालिदास म्हणाले, “ मी सहनशील आहे. आता तरी पाणी मिळेल ? “

वृद्ध स्त्री म्हणाली, “ अरे सहनशील तर तर फक्त दोनच आहेत ! एक धरती आणि दुसरं झाडं–धरती जी पुण्यवान लोकांच्या बरोबर पापी लोकांचं देखील ओझं घेऊन आहे. आणि झाडं ज्यांना दगड मारला तरी ती मधुर फळच देतात.” 

कालिदास आता हतबल झाले. आणि ते म्हणाले “ मी हट्टी आहे.”  

वृद्ध स्त्री म्हणाली, “  नाही तू हट्टी कसा असशील ?  हट्टी तर फक्त दोनच आहेत– एक नख आणि दुसरे केस– कितीही कापले तरी परत वाढतातच. “

कालिदास आता कंटाळले,आणि म्हणाले, “ मी मूर्ख आहे.”

वृद्ध स्त्री म्हणाली, “ मूर्ख तर फक्त दोनच आहेत– एक राजा, ज्याची योग्यता नसताना तो सर्वांच्यावर राज्य करतो,  आणि दुसरा दरबारातील पंडित, जो त्या राजाला रिझवण्यासाठी चुकीच्या गोष्टीला खरं सिद्ध करण्याची चेष्टा करतो.”  

कालिदास आता काहीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते. ते त्या स्त्रीच्या पायावर डोकं ठेऊन पाण्यासाठी विनवणी करू लागले. 

वृद्ध स्त्री म्हणाली, “ ऊठ बाळा,”- आवाज एकून कालिदासांनी वर पाहिलं, तर त्या स्त्रीच्या जागी साक्षात सरस्वती देवी उभी होती, कालिदास आता नतमस्तक झाले. 

सरस्वती देवी कालिदासांना म्हणाली, “ शिक्षणाने ज्ञान येते, अहंकार नाही. शिक्षणाच्या बळावर मिळालेला मान, सन्मान आणि प्रतिष्ठा यालाच तू सर्वस्व समजलास आणि त्याचा तुला अहंकार आला. तुझे डोळे उघडणे आवश्यक होते.” कालिदासांना त्यांची चूक समजली, ते भरपूर पाणी पिऊन पुढील प्रवासाला निघाले. 

तात्पर्य: विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका. 

          ८४ लाख जीवांमध्ये फक्त  माणूस पैसे कमावतो. पण इतर कुठलाच जीव उपाशी रहात नाही….  

          आणि माणूस—पॆसे कमवूनसुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही !

संग्राहक – अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आईचा उपदेश… ☆ सौ.रोहिणी अमोल पराडकर ☆

? विविधा ?

☆ आईचा उपदेश ☆ सौ.रोहिणी अमोल पराडकर ☆

सासरी जाणाऱ्या मुलीला आईने काय समजवावे

सासरी जाणारी मुलगी आईला विचारते की, “आई, नक्की कशी वागु गं मी सासरी????”

आई म्हणते की, तुझ्या वहिनीने तुझ्या आईवडिलांशी जसे वागावे, असे तुला मनापासून वाटते. त्याहुन चांगली तू  तुझ्या सासरच्या मंडळींशी वाग!!

सासरी जाणाऱ्या मुलीला आईने काय समजवावे ?

“सासर हेच तुझ घर आहे. तिकडच्या कुरबुरी आम्हांला सांगत बसू नकोस. तुझ्या बहिण भावंडांना चॅट किंवा सतत फोन करायचा नाही. पूर्वी पत्र हा एकमेव दुवा होता. सासर व माहेर मध्ये त्यावेळी मुली कशा सासरी साखरेच्या पाकाप्रमाणे मिसळून जात होत्या त्यांचा आदर्श ठेव. त्या कमवत नव्हत्या पण माणस नातेवाईक जोडत होत्या.

तुम्ही आज कालच्या मुली खूप शिकलात, गलेलठ्ठ पगार हातात पैसा खेळतो. त्यामुळे तुमची जनरेशन आमची जनरेशन……. वडिलधार्‍यांशी भांडण करणं त्यांना तुच्छ लेखण असे प्रकार तुझ्याकडून होता कामा नये.

माहेर आता हे तुझं पाहुण्यांचे घर आहे असं समज. चार दिवसासाठी ये पाहुणी म्हणून रहा आणि निघून जा…….” हे निक्षुन सांगायला हवे,

मुलगी सासरी गेल्यानंतर माप ओलांडून घरात प्रवेश केल्यावर तिच्या आईचा लगेच फोन येतो काय गं कशी आहेस? आठवण येते का? असे विचारणा सतत होत असते. काय खाल्लं? काय करते? सासू काय करते? कामाला मदत करते का? अशा फालतू गोष्टींची विचारणा वारंवार होत असते. त्यामुळे मुलगी  बिथरते. तिला कळत नाही की आपण कसे वागावे? आपली काय जबाबदारी आहे? हळूहळू भांडण वाढू लागतात आणि घटस्फोटापर्यंत पाळी येते. याला जबाबदार सर्वस्वी मुलीची आईच जबाबदार असते.

आईने निक्षून सांगितले की…….

आधुनिक तंत्रज्ञान, प्रगत तंत्रज्ञान याचा दुरुपयोग करू नको. विनाकारण रोज रोज मला फोन करू नको. आमच्या घरात म्हणजेच तुझ्या माहेरी तू लक्ष घालू नकोस. आम्ही सक्षम आहोत. आमच आम्ही बघून घेऊ सासर हेच तुझं घर आहे. त्या घरात तू प्रामाणिक व आपुलकीने वाग. सासु-सासर्‍यांना आई-वडील समज त्यांचा योग्य तो मान ठेव. कारण भविष्यात तुला ही कोणाचे ना कोणाचे तरी सासू व्हायचा आहे. त्यांच्या मुलाला त्यांच्यापासून तोडू नकोस. त्याचे परिणाम तुझ्या मुलांवर होतील तेही तुझ्याशी मग असेच वागतील. आपल्या मुलाने आपल्याशी कसं वागावं? असे  तुला वाटते तसेच आपण सासरी वागावे. टीव्ही सिरीयल बघून मनात भलते-सलते विचार आणू नकोस. ते सर्व क्षणिक आणि फसवे असते हे लक्षात ठेव.  एवढी शिकलेली मुलगी तुझ्या शिक्षणाचा व प्रगल्भतेचा वापर  कर. अंगी नम्रपणा व शालीनता बाळगून तो दाखवून दे. जितका गलेलठ्ठ पगार तितकीच गलेलठ्ठ मनावर रुजलेली संस्कृती आहे हेच दाखव. आईवडिलांचं नाव नक्कीच तुझ्या सासरी आदराने घेतलं जाईल. आम्ही मुलगी म्हणून तुझे लाड जसे केले तसेच लाड सासरी होतील. आपल्या शब्दात गोड स्वर मिसळ.

मैत्रिणींमध्ये टेंबा मिरवण्यासाठी माझ्या नवऱ्याचं नाक माझ्या मुठीत आहे. तो माझ्या शब्दाबाहेर नाही असं दाखवण्यासाठी रोज त्याच्याकडे फालतू हट्ट करू नकोस. घरात स्वच्छता टापटीपपणा ठेव. दुसऱ्याने कामाला मदत करावी अशी अपेक्षा न बाळगता स्वतः काम करावे. मग तोच आपल्या मदतीला पुढे येईल रोज सकाळ-संध्याकाळ देवाला दिवा लावुन नमस्कार कर.

अशा गोष्टी जर प्रत्येक आईने आपाल्या मुलीला शिकवल्या, तर कोर्टात दाखल होणाऱ्या पती-पत्नींमधील खटल्यांची संख्या आणि पोलिस स्टेशनला 498-अ प्रमाणे दाखल होणाऱ्या बहुतांशी खोट्या तक्रारींची संख्या, जी दिवसेंदिवस मारुतीच्या शेपटासारखी वाढत चाललीय, ती निश्चितपणे कमी होईल, होईल. अस माझ सोज्वळ मत आहे.

© सौ. रोहिणी अमोल पराडकर

कोल्हापूर  

भ्रमणध्वनी – 8208890678

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तटस्थता…लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ तटस्थता… लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

वयाच्या एका टप्प्यावर माणसाला तटस्थता येते. आयुष्यभर माणसांचे, नातेवाईकांचे, मित्रमैत्रिणींचे अनुभव घेऊन प्रगल्भता आलेली असते किंवा ती येते. प्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे, प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. घडून गेलेल्या प्रसंगाचे अवलोकन करता येते. हे खरंच घडलं का? मग घडलं तर का घडलं? आपलं काय चुकलं? ह्याचा विचार करण्याची क्षमता वाढते. माफ करण्याची  वृत्ती वाढते. साध्या साध्या गोष्टींवरून येणारा राग आता येत नाही. मनःशांती मिळायला सुरुवात होते. कशाचेही काही वाटेनासे होते. आता हे चांगले का वाईट, हे घडत असणाऱ्या गोष्टी ठरवत असतात. येणारा प्रत्येक प्रसंग किंवा घटना मनाला किती लावून घ्यायची ह्याचे जणू काही  प्रात्यक्षिकच आपल्याला मिळालेले असते. एखाद्या घटनेकडे तटस्थपणे बघता येते. आपली ह्यामध्ये काय भूमिका आहे? ती महत्वाची आहे का? आपल्या मताची गरज आहे का? हे सगळे समजून घेता येते. त्याची उत्तरे मिळत राहतात. जी उत्तरे मिळतात त्याने आपल्याला त्रयस्थपणे वागता येते.  

आता वारंवार डोळ्यात येणारे पाणी थोपवण्याची कला अवगत झालेली असते. आपले कोण परके कोण? किंवा जी आहेत ती खरंच आपली आहेत का? किंवा मग जी होती ती आपली होती का? ज्यांच्यासाठी डोळ्यात पाणी येत होतं  ती माणसे आता दुरावलेली असतात. आपल्याला  हवी तशी माणसे वागतच नाहीत हे समजायला लागतं. मग अपेक्षांचं ओझ हळूहळू कमी होत जातं आणि एक अंतर आपोआपच तयार होते. हा आलेला एकटेपणा जास्त सुंदर असतो. कुणाचेही बंधन नाही, अपेक्षा नाहीत आणि त्यामुळे होणारे दुःख नाही. त्यामुळे वागण्यातला ओलावा आपोआपच कमी होतो. बोलणे कमी होते. कर्तव्य भावनेने काही गोष्टी केल्या जातात. पण त्यातील गुंतवणूक कमी होते त्यामुळे तटस्थता येते.

आपल्या आजूबाजूचा गोतावळा आपोआप कमी होतो. आपले आपण उरत जातो आणि जग जास्त सुंदर होतं.  हा एकटेपणा जास्त सुंदर असतो. जग जास्त सुंदर दिसायला लागतं. खरं म्हणजे ते सुंदर होतंच पण आपण दुसऱ्याच्या नजरेतून बघत होतो. ही आलेली तटस्थता जगायला शिकवते. आजपर्यंत केलेल्या गोष्टी किंवा राहून गेलेल्या गोष्टी करायची एक उमेद देते. कारण आता कसलंही ओझं नसतं. कुणाकडून कसलीही अपेक्षा नसते, कोण काय म्हणेल ह्याची भीती नसते. आपण कुणाला बांधील नसतो. आपल्या कर्तव्यातून आपण मोकळे हौऊ शकत नाही, पण दूर राहून ती करू शकतो हे अनुभवायला येते. ज्या गोष्टींमध्ये विनाकारण गुंतून पडत होतो त्या गोष्टी किती फोल होत्या हे कळते. त्यामुळे आत्मपरीक्षण  केले जाते. 

नव्या आयुष्याला सुरुवात होते. आता माहित झालेलं असतं की कसं जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. त्यामुळे आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आलेली तटस्थताही छान वाटू लागते. हे ज्याला कळलं/उमगलं ती व्यक्ती खरंच भाग्यवान.

तर, काहींचे आयुष्य मात्र आम्ही अजूनही शिकतोय !— असे 

आधीच्या पिढीकडून पैसे वाचवायला शिकलो — नंतरच्या पिढीकडून पैसा वापरायला शिकतोय.

आधीच्या पिढीकडून सहवासाने नाती जपायला शिकलो – नंतरच्या पिढीकडून डिजिटली नवीन नाती जोडायला शिकतोय.

आधीच्या पिढीकडून मन मारून जगायला शिकलो –नंतरच्या पिढीकडून मन भरून जगायला शिकतोय.

आधीच्या पिढीने, Use and use more मधली उपयुक्तता शिकवली – नंतरच्या पिढीकडून Use and throw मधली नावीन्याची गंमत अनुभवायला शिकतोय.

आईकडून पिकनिकलाही घरच्या पोळीभाजीची लज्जत अनुभवायला शिकलो – मुलांकडून घरात असतांनाही पिकनिक एंजॉय करायला शिकलोय.

आधीच्या पिढीबरोबर निरांजन लावून दिवा उजळून वाढदिवस साजरा केला – नंतरच्या पिढीबरोबर मेणबत्ती विझवून अंधार करून वाढदिवस साजरा करायला लागलो.

आधीच्या पिढीने बिंबवले, घरचेच लोणी सर्वात उत्तम – नंतरची पिढी पटवून देत आहे, अमूल बटरला पर्याय नाही‌.

थोडक्यात काय, आधीच्या पिढीने शिकवले, अधिक वर्षे कसे जगायचे ते —

तर नंतरची पिढी शिकवत आहे, मरणापर्यंत आनंद घेत कसं जगायचं ते !!

— दोन्हीच कॉकटेल बनवलं तर आयुष्य किती मजेदार असेल…

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती – श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ संस्कृत: काही रोचक तथ्य…– लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ संस्कृत: काही रोचक तथ्य…– लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆ 

संस्कृत भाषेबद्दल ही २० तथ्य समजल्यावर तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल.

०१. संस्कृत ही सर्व भाषांची जननी मानली जाते.

०२. संस्कृत ही उत्तराखंडातील अधिकृत भाषा आहे.

०३. अरब लोकांनी भारतात येऊन हस्तक्षेप करण्याआधी संस्कृत ही राष्ट्रीय भाषा होती.

०४. NASA च्या म्हणण्याप्रमाणे संस्कृत ही पृथ्वीवर बोलली जाणारी सर्वात स्पष्ट भाषा आहे.

०५. संस्कृत भाषेत जगातील कुठल्याही भाषेपेक्षा जास्त शब्द आहेत. संस्कृत भाषेतील शब्दकोषात १०२ अब्ज- – ७८ कोटी ५० लाख शब्द आहेत. 

०६. कुठल्याही विषयासाठी संस्कृत हा एक अद्भुत खजिना आहे. उदाहरणार्थ : हत्तीला समानार्थी असे १०० हून जास्त शब्द संस्कृतमध्ये आहेत.

०७.  NASA कडे ताडपत्रांवर संस्कृत भाषेत लिहिलेल्या ६०००० पांडुलिपी आहेत, ज्यावर NASA चे संशोधन चालू आहे.  

०८.  Forbes Magazine ने जुलै १९८७ मध्ये Computer Software साठी संस्कृतला सर्वोत्तम भाषा मानले होते.

०९. कुठल्याही अन्य भाषांच्या तुलनेत संस्कृतमध्ये सर्वात कमी शब्दात वाक्ये पूर्ण होतात.

१०. संस्कृत ही जगातील एकमेव भाषा आहे की ती बोलतांना जिभेच्या सर्व मांसपेशींचा वापर होतो. 

११. अमेरिकन हिंदू युनिव्हर्सिटीच्या अनुसार संस्कृतमध्ये बोलणारा माणूस मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल इत्यादी रोगांपासून मुक्त होतो.

१२. संस्कृत मध्ये बोलल्याने मानवी शरीरातील Nervous System कायम सक्रिय राहते व त्यामुळे व्यक्तीचे शरीर सकारात्मक ऊर्जेने सक्रिय राहते. Speech Therapy मध्ये संस्कृत चा खूप उपयोग होतो, कारण त्याने बोलण्यात एकाग्रता येते.

१३. कर्नाटकातील मुत्तूर गावातील लोक केवळ संस्कृतच बोलतात.

१४. संस्कृतमधील पहिल्या वर्तमानपत्राचे नाव आहे ‘सुधर्म’. १९७० मध्ये सुरु झालेल्या ह्या वृत्तपत्राचे online संस्करण आजसुद्धा उपलब्ध आहे. 

१५. जर्मनीत संस्कृतला मोठा मान आहे. जर्मनीतील १४ विद्यापीठात आज संस्कृत शिकवले जाते.

१६. NASA च्या वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार जेव्हा ते अंतरिक्षात प्रवास करणाऱ्यांना संदेश पाठवत, तेव्हा त्यातील वाक्ये उलट-सुलट व्हायची व त्यामुळे संदेशाचा अर्थ लागत नसे किंवा अर्थ बदलत असे. त्यांनी बऱ्याच भाषांचा उपयोग करून पाहिला. परंतु प्रत्येक वेळेस असेच व्हायचे. शेवटी त्यांनी संस्कृतमध्ये संदेश पाठवला, कारण संस्कृतमधील वाक्ये उलटी झाली तरी अर्थ बदलत नाही. 

उदाहरणार्थ :   अहम् विद्यालयं गच्छामि।

                         विद्यालयं गच्छामि अहम्।

                          गच्छामि अहम् विद्यालयं ।

  • ह्या तीनही वाक्यांचा अर्थ एकच आहे.

१७. आपल्याला आश्चर्य वाटेल की Artificial intelligence programming साठी संस्कृत ही सर्वात suitable language आहे असा दावा NASA ने केला आहे.

१८. NASA च्या वैज्ञानिकांद्वारा 6th आणि 7th Generation चे Super Computers  संस्कृत भाषेवर आधारित असतील, जे २०३४ सालापर्यंत तयार होतील.

१९. संस्कृत शिकल्याने मेंदू तल्लख होतो आणि स्मरणशक्ती वाढते आणि म्हणूनच London  आणि Ireland मधील काही शाळांमध्ये संस्कृत भाषा शिकणे अनिवार्य केले आहे.

२०. हल्ली १७ हून जास्त देशातील कमीत कमी एका विद्यापीठात तांत्रिक शिक्षणाचे काही कोर्सेस संस्कृतमध्ये घेतले जातात.

🔔 जयतु संस्कृतम् 🔔

लेखक – अज्ञात 

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गौराईकडून गृहिणींना पत्र… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

 

?  विविधा ?

⭐ गौराईकडून गृहिणींना पत्र…  अज्ञात  ⭐  प्रस्तुती –  सौ.अस्मिता इनामदार ⭐

प्रिय  सखी,

मजेत गेले माझे दिवस..तू माझ्यासाठी प्रेमाचा आणि कष्टाचा किती घाट घातलास हे मी याची देही याची डोळा पाहिले..मी पाहिले तुझी धडपड आणि अविरत काम करणं..मी येणार म्हणून सोवळ्याचा अट्टाहास…पाळी पुढे ढकलण्याचे सगळे प्रकार….काही वेळा डोळे भरुन आले आणि काही वेळा हसू न आवरण्यासारखे झाले…मग आम्ही दोघीनी ठरवलं की चल आज तुझ्याशीच गप्पा मारू…जसं आम्ही माहेरपणाला येतो तसं तू कुठे गेलीस का गं  , ???? आमच्यासाठी पंचपक्वानं, सोळा भाज्या  केल्यास पण तू एकटी असताना शिळं पाकं खाऊन राहणं कसं जमतं????? आमच्यासाठी खेळ खेळलेस पण तुझ्यासाठी रोजचा व्यायाम करतेस का गं? आणि हो आम्हाला जेवढा मान तू देतेस ,तेवढा स्वत:ला मान कधी देतेस का गं??? जाता जाता  एक सांगू …जेवढं स्वत:ला जपशील तेवढं आम्हाला तू तुझ्यात पाहशील..

कधीही कानांनी अनहेल्दी ऐकू नकोस…तोच तो इडियट बॉक्स सुरू असतो तो आणि  डोळ्यांनी अनहेल्दी पाहू नकोस…स्वतःमध्ये ,…..  जसं पंचपक्वानं जसं तयार करतेस तसंच नविन कला शिकत जा, छंद जोपासत जा , स्वतःला वेळ दे..जगत जननीपण इतकं कॅज्युअली घेऊ नकोस…कारण जिच्यामध्ये जन्म देण्याची क्षमता आहे तिने स्वतःला जपलेच पाहिजे…आणि आवर्जून सांगते आता जिवंत गौरायांनों थोडासा आराम करा…असूया, गॉसिपिंग आणि जग काय म्हणतं याचा विचार न करता ,स्वत:ला नव्याने घडवा…आमच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून जसं तुम्ही खुलता तसं तुमच्या   चेहर्‍या वरच्या तेजाने सारं जग बदलू दे…सोवळं नक्की पाळा पण ते तुमच्या विचारांचे …गोळ्या घेऊन पाळया लांबविण्यापेक्षा आरोग्याचा जागर करा..बाकी पुढच्यावर्षी भेटू तेव्हा मला तू माझ्यासारखी दिसली पाहिजेस..मानसिक, शारीरिक सामाजिक आणि आध्यात्मिक हेल्दी!!!!

तुझीच  ,

गौरी

– अनामिक

संग्राहिका : – अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोदक… लेखिका – सुश्री शुभदा पाटकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? मनमंजुषेतून ?

☆  मोदक… लेखिका – सुश्री शुभदा पाटकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

30 रुपयाला एक मोदक? काय मोदकात सोनं वगैरे घालतात की काय? काय ही लूट? तीस रुपयाला अख्खा नारळ मिळतो, त्यात अकरा मोदक सहज बनतात. अशा विचारांची आमची पिढी. नारळाची किंमत तीस रुपये असली तरी बाकीचे पैसे कौशल्याचे आहेत. मोदक बनवणं येऱ्या गबाळ्याचं काम नाही.

श्रावण महिन्यात खाण्यापिण्याची चंगळ असायची.  त्यांचा मुकुटमणी म्हणजे मोदक. श्रावण अखेरीस माळ्यावरून मोदकपात्र काढलं जायचं. हे वजनदार तांब्याचं. मग चिंचेने घासून मस्त लखलखित करायचं. त्या महिन्याच्या वाण्याच्या यादीत आंबेमोहर (जुना) तांदूळ असायचा. हा जुनाच असला पाहिजे, नाहीतर मोदक फसणार. गणेश चतुर्थीच्या आधी चार दिवस हे तांदूळ धुवून आजोबांच्या मऊसुत धोतरावर वाळत पडणार. फक्त आजीच त्यांच्यावरून अधून मधून हात फिरवणार. बाकी कोणी तिकडे जायचं नाही. गिरणीत दळायला द्यायचे; तर  कोणत्या तरी इतर धान्याचे पीठ त्यात मिसळेल म्हणून ते घरीच दळायचे .

जातं धुवा, त्याचा खुंटा शोधा, पीठ गोळा करायची झाडणी शोधा, असा सगळा सरंजाम पूर्ण झाला की आई ते तांदूळ दळणार. आम्ही खरंतर जातं ओढायला मदत करायला उत्सुक असायचो पण तिथे धसमुसळेपणा चालत नाही. विशिष्ट लईत जातं ओढलं तरच तांदळाची पिठी हवी तशी बारीक पडते. चला मोदकासाठी तांदळाची पिठी तयार झाली.

तेव्हा फ्रीज नव्हते त्यामुळे आदल्या दिवशी अर्धी तयारी वगैरे प्रकार नाही. आम्ही अंथरुणात असतानाच नारळ फोडण्याचे आवाज ऐकायला यायचे. हे काम पुरुषांचं .दहा नारळ फोडले तरी खोबरं सहा-सात नारळाचंच पडायचं. कारण ते पांढराशुभ्र असलं पाहिजे, बाकी करवंटी जवळचं खोबरं इतर कामासाठी. आजीच सोवळ्याने चून बनवणार. चून म्हणजे गूळ खोबऱ्याचं सारण. सारण कडक झालं तर मोदक फाटतो .सारण पातळ झालं तर मोदकातून गुळाचा पाक गळतो. त्यामुळे चून जमणं महत्त्वाचं. झोपेत असताना घरभर या चुनाचा सुगंध दरवळायचा. शेवटी त्यात वेलची टाकली की सोने पे सुहागा. खरोखरच जमून आलेलं सारण सोन्याच्या रंगाचे दिसतं. 

या वेळेपर्यंत तीन-चार काकवांच्या (काकूचं अनेक वचन) आंघोळी आटपलेल्या असतात . आजीकडून मोदकाची उकड होईपर्यंत त्या पाटावर बसून युद्धाला सज्ज होतात. आजीची  गादी यांना नंतर चालवायची असते. कशी करते सासू? मोदकाची उकड बघताना यांच्या तोंडाचे पट्टे चालू असतात. ” गेल्यावर्षीचे मोदक छान झाले होते. आता यावर्षीचे कसे होतात बाई देव जाणे वगैरे.” उकळत्या पाण्याच्या आधणात आजी रवाळ तूप सोडते. आता हा वेगळा सुगंध. थोडं मीठ. पाणी चांगलं खळखळ नाचायला लागलं की अधीरतेने तांदळाची पिठी यात उडी घेते .आता एकदम ताकदीने आणि लगबगीने पुढचं काम. वेगाने ढवळण्याचं. हुश्श्श झालं एकदाचं. ही उकड चांगली जमली की अर्ध काम फत्ते. या क्षणी सगळे आवाज बंद झालेले असतात. वारा वाहायचा थांबतो. संपूर्ण जगच ‘स्टॅच्यू’ अवस्थेत. फक्त उकड- बस्स. आजीच्या चेहऱ्यावर विजय स्मित. सगळ्या काकवांचे जीव भांड्यात. पाच मिनिटाचं मौन सुटतं .

परातीत उकड मळण्याचं काम मोठ्या काकूकडे. काही चुकार पीठ तसंच राहिलेलं असतं. जड, पितळी तांब्याने त्यांना दटावावं लागतं. गरम असतानाच हे करायचं नाही तर  एकदा का थंड झालं की त्यात लवचिकता आणता येत नाही. काकू हे काम मस्त करते. घरातल्या मोठ्या मुली उत्सुकतेने बघत असतात. निरीक्षण चालू असतं.

मग आजी किती आकाराचा उकडीचा गोळा घ्यायचा. त्यात किती सारण भरायचं ते ठरवून देते .उकडीच्या गोळ्याला वाटीचा आकार देणे कौशल्याचं काम आहे. बघणाऱ्यांना तर सोपं वाटतं पण करायला गेलं तर कठीण. वाटी न बनता ताटली बनते. कडा फाटतात. पाकळ्या चिकटत नाहीत. जेमतेम पाच नाहीतर सात  पाकळ्यातच मोदक संपतो. असं काहीसं होतं. हे प्रकरण जमलं तर जमलं नाही तर अंत पाहतं. काहीजण वाटी बनवताना तेल तर काहीजण पीठ वापरतात .हळूहळू या सर्वांना एकत्र करायचं आणि त्याचं तोंड बंद करायचं की मोदक झाला तयार.

जिला मोदक जमतात ती  कितीतरी वेळ  स्वतःचीच पाठ  थोपटून घेते. मोदक पातळ कळीदार देखणा झाला पाहिजे. दिसायला पांढराशुभ्र तरी पारदर्शक. आतलं सोनेरी सारण दिसलं पाहिजे. खायला मऊ लुसलुशीत .ही सगळी कमाल असते हस्तकौशल्याची. पुरुष हे काम करू शकत नाहीत कारण यासाठी पाहिजेत नाजूक बोटं.

आता मोदकपात्रात चाळणीवर ठेवायची हळदीची पानं . त्यावर ठेवायचे भरलेले मोदक आणि पंधरा मिनिटे उकडायचे. घरभर आंबेमोहोराचा, गुळ खोबरं वेलचीचा, हळदीच्या पानांचा सुगंध पसरतो. मखरातला गणपती पण काही क्षणासाठी चलबिचल होतो. कधी कधी त्याच दिवशी हरतालिका असते आणि मोदक करणाऱ्या बायकांना फक्त या सुगंधावरच समाधान मानावं लागतं. सगळे मोदक होत आले, आता आरतीला हरकत नाही असा आदेश यायची खोटी, भराभरा आवेशात आरत्या सुरू होतात. प्रकरण हातघाईवर येतं. तयार होणारे मोदक आणि आरती यांची जणू स्पर्धाच. 

नैवेद्य दाखवला जातो, पानं घेतली जातात. पानात गरम गरम वाफाळते , सारणाने गच्च भरलेले मऊ मऊ मोदक वाढले जातात. ते फोडून त्यावर रवाळ सुगंधी तूप. आहाहा, सगळे श्रम सार्थकी लागतात.

देवा तुझ्यामुळे आम्हाला असे मोदक खायला मिळतात. त्यासाठीच तर जगतो आपण. करणारे आणि खाणारे दोघेही तृप्त. आता एका नारळाचे, एक वाटी पिठाचे मोदक चिक्कार होतात. कोणाचं डायटिंग, कोणाचा डायबिटीस, कोणाचं पित्त चाळवतं, कोणाची नावड (यांना चायनीज डपलिंग, मोमो चालतात) त्यामुळे त्यातलेही दोन उरतात. पुढच्या वर्षी विकतचे आणू असं ठरवलं जातं.

माझी या मोदक प्रकरणातून सुटका झाली कारण सासरी सगळ्यांना तळणीचे मोदक चालतात- नव्हे आवडतात. ते एकदमच सोपे.  मी साध्या पोळीच्या कणकेचेच करते. कसे माहित नाही ते दुसऱ्या दिवसापर्यंत खुसखुशीत आवरणाचे राहतात. चिवट होत नाहीत की मऊ पडत नाहीत. पुरी लाटायची डाव्या हाताच्या पाचही बोटांच्या खळग्यात पकडायची, त्यात चमच्याने सारण भरायचं, पाचही बोट जवळ आणायची. झाला मोदक तयार . (धन्य ती सून, धन्य ते सासर .नशीबानेच असं सासर मिळतं)

मोदकाचेही आता प्रकार आलेत. खवा मोदक ,आंबा मोदक, ड्रायफ्रूट मोदक, रवा मोदक, पेढा मोदक, चॉकलेट मोदक,गुलकंद मोदक, इत्यादी. त्यातला सर्वात भन्नाट प्रकार म्हणजे ‘चिंगम’ मोदक .कोणावर सूड उगवायचा असेल तर त्यांच्याकडे हे ‘चिंगम’ मोदक न्यावेत.

मोदक  कसलेही असले तरी मोदकाची चव फक्त गणेशोत्सवातच. पुरणपोळी, खीर, गुलाबजाम,जिलबी जशी कोणत्याही सणाला चालतात, तसं मोदकांचं नाही. कोणी पाडव्याला किंवा होळीला मोदक करणार नाहीत आणि केलेच तरी त्याची चवही लागणार नाही. गणपती आणि मोदक  यांचे काही खास लागेबंधे आहेत हे नक्की.

लेखिका – सुश्री शुभदा पाटकर

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शिक्षकाची कदर…अल्बर्ट फर्नांडिस ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? इंद्रधनुष्य ?

☆ शिक्षकाची कदर…अल्बर्ट फर्नांडिस ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

अल्बर्ट फर्नांडिस यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिलं आहे—-

  • रोममध्ये एकदा पोलिसांनी मला दंड केला. कामात असल्यानं मला वेळेवर दंड भरता आला नाही. त्यामुळेकोर्टात जावं लागलं. न्यायाधीशासमोर उभं केल्यावर त्यांनी कारण विचारल्यावर मी म्हटलं,” प्रोफेसर आहे, कामात एवढा गुंतलो की वेळच मिळाला नाही.”

माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आत न्यायाधीश म्हणाले,

  • अ टीचर इज इन द कोर्ट …!

लगेचच सगळे लोक उठून उभे राहिले आणि त्यांनी माझी माफी मागितली व माझा दंडही रद्द केला गेला.

त्या देशाच्या यशाचं रहस्य तेव्हा मला कळलं.

  • ज्यांना अतिविशिष्ट किंवा व्हीआयपी म्हणतात ते कोण असतात ?
  • अमेरिकेत केवळ दोन प्रकारच्या लोकांना अतिविशिष्ट मानलं गेलं आहे. वैज्ञानिक आणि शिक्षक.
  • फ्रान्सच्या न्यायालयांमधे केवळ शिक्षकांनाच खुर्चीवर बसायचा अधिकार आहे.
  • जपानमध्ये सरकारकडून परवानगी मिळाल्यावरच पोलीस एखाद्या शिक्षकाला अटक करू शकतात.
  • कोरियात प्रत्येक शिक्षकाला ते सगळे अधिकार आहेत जे भारताच्या मंत्र्याला मिळतात– तेही केवळ आपलं ओळखपत्र दाखवून.
  • अमेरिकन आणि युरोपीय देशांमध्ये प्राथमिक शिक्षकाला सर्वाधिक वेतन मिळतं, कारण तेच कच्च्या भांड्यांना आकार देतात.
  • ज्या समाजात शिक्षकांचा अपमान होतो, तिथं फक्त चोर, आणि भ्रष्टाचारी लोकच तयार होतात.

सर्व शिक्षकांना समर्पित. 

लेखक – अल्बर्ट फर्नांडिस

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शिल्लक… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ शिल्लक… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

ओंजळीत मी पाणी धरले. हाताला त्याचा गार स्पर्श छान वाटला. पण थोड्या वेळात पाणी आपणहून हळूहळू गळून गेले. मी खूप प्रयत्न केला त्याला सांभाळून धरण्याचा. नाही राहीले ते ओंजळीत ! पण हात मात्र ओले राहीले. 

ओंजळीत फुले घेतली. त्यांचा तो मऊ मुलायम अलवार स्पर्श मनाला खूप आल्हाददायक वाटला .त्यांच्या सुगंधाने मन वेडावले. पण फुले कोमेजायला लागली. म्हणून ओंजळीतून त्यांना सोडून दिले. हाताला मात्र ती सुगंधित करुन गेली . क्षणभराच्या सहवासाने सुवासाची लयलूट झाली . 

ओंजळीत मी मोती धरले. त्यांचा मऊ मुलायम पण थोडा टणक स्पर्श मनाला जाणवला. त्यांच्याकडे नुसत्या पाहाण्यानेही मनाला आनंदाचे , समाधानाचे सुख मिळाले, ते माझ्या ओंजळीत मी धरले. ते  तसेच राहिले. त्यांच्या पांढर्‍या सौंदर्याने मन मात्र शांतशांत झाले . माझी मलाच ” मी धनवान असल्याची ” भावना मनात आली .

कुठे तरी मी मनात ह्या ‘ तीन सुखांची ‘ तुलना करु लागले. आनंदाचे, समाधानाचे माप लावून मापू लागले. तेव्हा ते ठरविणे खूप कठीण वाटले. कारण, ओंजळीतून प्रत्येकवेळी मनात बरेच काही शिल्लक राहिले .

माझ्या मनाने आता ह्यात माणसे शोधायला सुरुवात केली . तेव्हा खरंच खूप व्यक्ती तिथे मला तशाच दिसल्या .

काही आपल्याजवळ येऊनही पाण्यासारख्या पटकन गळून गेलेल्या, पण मनात आपुलकीचा ओलावा काठोकाठ भरून ठेवलेल्या—-

काही फुलासारख्या, आपण हातात धरले, म्हणून कोमेजून जाणाऱ्या , पण तरीही माघारी सुगंध ठेवणार्‍या—

काही अगदी जवळच्या– मोत्या सारख्या. आपण ठेऊ तशाच राहणार्‍या, आपले जीवन मौल्यवान करणार्‍या— 

खूप चेहेरे आठवले मला , आणि नकळत माझ्या चेहर्‍यावर हास्य उमटले.

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ थोडं मनातलं… उमलत्या वेळा ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

? विविधा ?

☆ थोडं मनातलं… उमलत्या वेळा ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

सकाळी उठून बाहेर आलो आणि बागेत एक फेरफटका मारला. सूर्याची सोनेरी कोवळी किरणं सगळ्या सृष्टीला न्हाऊ घालत होती. झाडं, पानं, फुलं जणू चातक होऊन त्या सूर्यप्रकाशाचं रसपान करीत होती. पक्ष्यांची किलबिल सुरु होती. रात्री मिटलेली कमळाची कळी आपले डोळे अर्धवट उघडून साऱ्या परिस्थितीचा अंदाज घेत होती. हळूहळू तिला उमलून यायचंच होतं. गुलाबाच्या कळ्यांनाही आता जाग आली होती. जाई, जुई तर सूर्यदेवांचं स्वागत करण्यासाठी कधीच्या तयार होत्या. झेंडूची फुलं उमलली होती. सोनेरी, पिवळसर झेंडूच्या फुलांवर सोनेरी सूर्यकिरणे पडल्यामुळे त्यांचं सौंदर्य काही आगळंच  भासत होतं. मोगरा, जाई, जुई आपल्या अत्तराच्या कुपीतून सुगंधी शिडकावा करून वातावरण सुगंधित करीत होते. वाऱ्याच्या शीतल लहरी  हा सुगंध अलगद वाहून नेत होत्या. रंगीबेरंगी फुलपाखरं फुलांवर अलगद नर्तन करून आपला आनंद व्यक्त करीत होती.

सृष्टीच्या अंगणात हा प्रभातोस्तव रंगला होता. विविधरंगी पानं, फुलं, पक्षी यांनी हा रंगसोहळा साकार केला होता. सृष्टीमध्ये अव्यक्त असलेल्या निर्गुण निराकाराची पूजा निसर्गानं आपल्या परीनं मोठी सुरेख मांडली होती. या पूजेसाठी फुलं आपल्या पूर्ण शक्तीनिशी पूर्णपणे उमलून आली होती. त्यांच्या अंतरंगातून सुगंधाच्या भक्तीलहरी बाहेर पडत होत्या. पक्षी आपल्या सुरात त्याची आरती गात होते. सूर्यदेवांच्या सोनेरी प्रकाशात सृष्टीचा गाभारा उजळून निघाला होता. कुठूनतरी भूपाळीचे सूर अलगद कानी आले.

मलयगिरीचा चंदनगंधीत धूप तुला दाविला

स्वीकारा ही पूजा आता उठी उठी गोपाळा

माझ्या तोंडून आपोआप उद्गार बाहेर पडले. ‘ वा, किती सुंदर ! ‘ मनात एक प्रश्न आला. हे सगळं कशासाठी ? काही विशेष कारण आहे का ? इतका सुंदर असलेला हा सोहळा, हा उत्सव रोज कशासाठी ?

माझ्या मनातल्या प्रश्नाला सगळ्यांनी आपापल्या परीनं उत्तर दिलं. सूर्यकिरणं म्हणाली, ‘ कालची रात्र अंधारात गेली ना ! तुला उद्याची चिंता होती. मावळलेल्या दिवसाबरोबर तुझ्या कोमेजलेल्या आशा अपेक्षांना पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी आम्ही आलो आहोत. या प्रकाशाप्रमाणेच तुझा आजचा दिवसही प्रकाशमान होवो. ‘

फुलं म्हणाली, ‘ अरे रोजचा दिवस नवा. रोज आपल्या आयुष्याच्या पुस्तकाचे एक नवीन पान आपण उघडतो. मग तो रोजचा दिवस हा आपल्या जीवनातील एक सोहळाच नाही का ? म्हणून त्याची सुरुवात आम्ही पूर्णपणे फुलून करतो. उमलता उमलता सौंदर्याची बरसातही करतो. आम्ही कसे टवटवीत असतो ! तसंच प्रसन्न, टवटवीत तुम्हीही राहावं  असं आम्हाला वाटतं. तुम्हीही आपला दिवस आपले निहित कार्य, चांगली कामं करण्यात घालवावा. तोही आम्हाच्यासारखा प्रसन्न, हसतमुख आणि टवटवीतपणे. आणि जमलं तर सुगंधाची उधळण करावी. तुमच्या कर्तृत्वाचा सुगंध परिसरात दरवाळावा असं आम्हाला वाटतं. ‘

मी म्हटलं, ‘ अहो, थांबा थांबा. जीवनाचं सारं तत्वज्ञानच तुम्ही उलगडून सांगितलंत. तुमचे हे शब्द मला माझ्या अंतरंगात साठवू द्या. ‘ खरंच रोजची पहाट म्हणजे आमच्यासाठी त्या विधात्यानं दिलेलं अमूल्य वरदान आहे. प्रत्येक दिवस आमच्या आयुष्यातील सोनेरी पान आहे. कधी ऊन, वारा, पाऊस असेल. वादळे झेलावी लागतील. थंडीचा कडाका असेल. फुलं उमलण्याची थोडीच थांबली आहेत. त्यांना माहिती आहे की आपल्या या छोट्याशा आयुष्यात संकटे, सुखदुःख येणारच ! त्यासाठी उमलण कशाला सोडायचं ? कोमेजायचं कशाला ? दुर्मुखलेलं का राहायचं ? जमेल तसं फुलून यायचं. आपल्या सुगंधाची बरसात करायची.

फुलांचं मनोगत समजून घेता घेता शीतल सुगंधी वायू लहरी कानाशी येऊन गुणगुणू लागल्या. ‘ अरे, रोजचा दिवस म्हणजे सगळ्या गेलेल्या इतर दिवसांसारखाच एक असतो का ? कदाचित तुला तसं वाटेल. पण आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस आगळावेगळा असतो. जे काल होतं ते आज नाही. आणि जे आज आहे ते उद्या असणार नाही. बदल हा सृष्टीचा स्थायीभाव असतो. म्हणूनच या बदलाला रोज नव्या उत्साहानं, उमेदीनं सामोरं जायचं असतं. तुला माहिती असेलच की आम्ही सदा सर्वकाळ वाहत असतो. कधीही थांबत नाही. आम्ही थांबलो तर ही सृष्टी थांबेल. तुझ्या श्वासात आणि रोमारोमात आम्ही असतोच. तेव्हा मित्रा, या सकाळच्या प्रसन्न वेळी मोकळा प्रसन्न श्वास घे. आपल्या तनामनात नवीन ऊर्जा भरून घे आणि आजच्या दिवसाला सामोरा जा. ‘

मी वाऱ्याच्या लहरींना म्हटलं, ‘ अगदी खरं आहे तुमचं. तुम्ही आमचा प्राण आहात. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सोबत असते तुमची. तुमचा संदेश मी लक्षात ठेवीन. नवीन ऊर्जेनं भारून माझ्या कामाला सुरुवात करीन.

तेवढ्यात फुलाफुलांवर नाचणाऱ्या, बागडणाऱ्या फुलपाखरांकडे माझं लक्ष गेलं. त्यांचे विविध रंग मनाला प्रसन्न करीत होते. त्यातलं एक डोळे मिचकावीत म्हणालं, ‘ आमचंही थोडं ऐकशील का रे ? ‘ मी म्हटलं, ‘ जरूर. आज तुम्ही सगळेच मला अतिशय सुंदर संदेश देत आहात. तुमचं मला ऐकायचंच आहे. ‘

फुलपाखरू म्हणालं, ‘ आमच्या पंखांवरचे रंग तुला आवडतात ना ? पण नुसतं त्यावर जाऊ नकोस. तुला कदाचित माहिती नसेल आम्हा सुरवंटाचं फुलपाखरू होताना आम्हाला किती दिव्यातून जावं लागतं ! पण आम्ही त्याचा विचार करत बसत नाही. आम्हाला जमतील तसे निसर्गाचे रंग आमच्या अंगावर माखून घेतो. तसं आमचं आयुष्य अल्पजीवी असतं. पण आम्ही ते जगतो मात्र आनंदानं. दुसऱ्यालाही आनंद देतो. किती जगलो यापेक्षा कसं जगलो हे महत्वाचं आहे, नाही का ? ‘ असं म्हणून आपल्या पंखांची सुंदर उघडझाप करीत ते दुसऱ्या फुलावर जाऊन बसलं.

सूर्यदेवांची किरणं आता थोडी अधिक प्रखर होऊ लागली होती. निसर्गातले सगळेच घटक आपापल्या कामाला लागले होते. सगळी फुलं पूर्णपणे उमलली होती. दिवस उमलला होता. उमलत्या वेळा मला प्रसन्न करून गेल्या. माझं मनही उमललं होतं. रोमारोमात नवचैतन्याचा संचार झाला होता. उमलत्या वेळी होणारा सृष्टीचा सोहळा मी अनुभवला होता. तोच सोहळा माझ्याही जीवनात प्रतिबिंबित व्हावा म्हणून त्या निर्गुण निराकाराला मी हात जोडले.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares