मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 27 – परिव्राजक – ५ . मातृभाषा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 27 – परिव्राजक – ५ . मातृभाषा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

स्वामीजी आणि अखंडांनंद आता वैद्यनाथला पोहोचले होते. कारण ते एक धार्मिक क्षेत्र होत आणि ते अखंडानंदांनी पाहिलं नव्हतं. रस्त्यात लागणारी धार्मिक स्थळांना ते आवर्जून भेट देत असत. तिथे एक ब्राम्ह्समाजी नेते राजनारायण बोस यांची भेट घेतली. स्वामीजी त्यांना ओळखत होते. त्यांचं वय बरच म्हणजे चौसष्ट होतं. पाश्चात्य संस्कृतीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. महर्षि देवेन्द्रनाथ टागोर यांना ते गुरु मानत. मिशनर्‍यांच्या धर्मप्रसाराला पायबंदची चळवळ, विधवाविवाह सारखी सामाजिक सुधारणा चळवळ यात त्यांचा सहभाग होता. बंगाल मध्ये देशभक्तीची जाणीव उत्पन्न होण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते. युवकांमध्ये राष्ट्रीयत्वाची आणि देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी एक संस्था पण काढली होती. इंग्रज आपल्या देशावर राज्य करतात ते आपल्या कल्याणसाठी नव्हे तर त्यांच्या देशाचे ऐश्वर्य वाढावे म्हणून, म्हणून त्यांना हुसकावून लावण्यासाठी बळाचा वापर करायला काय हरकत आहे असं त्यांचं मत होतं.

त्यांच्या कुटुंबातच राष्ट्रावादाची परंपरा होती. जगप्रसिद्ध, महायोगी श्री अरविंद घोष यांची आई म्हणजे राजनारायण यांची कन्या होती. क्रांतिकारक  कन्हैयालाल दत्त यांच्या बरोबर ऐन तारुण्यात हसत हसत फाशी गेलेला सत्येन्द्रनाथ बोस हा त्यांचा पुतण्या होता. देशभक्तीच्या या परंपरेमुळे त्यांची काही मते ठाम  होती. जसे की, आपण आपला पोशाख करावा. आपल्या भाषेतच बोलावे. आपले शिष्टाचार आपण सांभाळावेत. आपण आपले भारतीय खेळच खेळावेत. यावर त्यांचा बारीक कटाक्ष असे. त्यांच्या संस्थेत कोणी एखादा इंग्रजी शब्द वापरला तर त्याला एक पैसा दंड भरावा लागे. त्यांचा हा स्वाभिमान स्वामी विवेकानंदांना माहिती होता म्हणून, इथे त्यांची भेट घेताना स्वामीजींनी अखंडानंदांना आधीच सांगून ठेवले होते की, आपल्याला इंग्रजी येतं हे त्यांना अजिबात कळू द्यायचं नाही.

त्या काळात बंगालमधल्या सुशिक्षितांमध्ये इंग्रजी शब्द वापरण्याची खूप मोठी खोड लागली होती. इतकी की आपल्या मातृभाषेत त्यांना कोणत्याही विषयावर धड विचार प्रकट करता याचे नाहीत आणि धड इंग्रजीत सुद्धा नाहीत. भाषेची दैन्यावस्थाच होती.

त्यामुळे राजनारायण यांच्याबरोबर झालेल्या गप्पांमध्ये स्वामीजींनी एकही इंग्रजी शब्द येऊ दिला नाही. राजनारायण यांना वाटले की ही संन्यासी मुलं, इंग्रजी कुठल येणार त्यांना? अशाच समजुतीत ते होते. या प्रसंगात अखंडानंद आणि स्वामीजींची मस्त करमणूक झाली होती. ही समजूत करून देण्यात आपण यशस्वी झालो असे दोघांनाही वाटले. पुढे स्वामीजींची किर्ति ऐकून राजनारायण यांना स्वामीजींची भेट आठवली आणि आश्चर्य वाटले की, “केव्हढा चमत्कार आहे हा, इतका वेळ ते माझ्याशी बोलले, पण त्यांना इंग्रजी येतं अशी शंका क्षणभर सुद्धा मला आली नाही. खरोखरच हा विलक्षण चतुर माणूस असला पाहिजे.” खरच  स्वामीजींचं केव्हढं प्रसंगावधान होतं.निश्चय होता. 

धार्मिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ज्यांनी आयुष्यभर तपश्चर्या केली त्या राजनारायण यांना स्वामीजींना वैद्यनाथला भेटावसं वाटलं कारण, ब्राह्म समाजात देशभक्तीचे विशेष महत्व नसताना सुद्धा  ,राज नारायण ब्राह्म समझी असूनसुद्धा त्यांनी तरुणांमध्ये स्वाभिमान आणि देशभक्तीची भावना निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता. हेच वेगळेपण स्वामीजींना भावलं होतं. आपल्या प्रवासात अशा व्यक्तींचीही आवर्जून भेट घेणं हा त्यांचा उद्देश असायचाच. प्रवासात अशी अनेक प्रकारची माणसे त्यांना भेटत. नव्हे स्वामीजीच त्यांना आवर्जून भेटत.

समोरच्या व्यक्तीबद्दल आदरभाव असणं किंवा त्यांना किमत देणं हा स्वामीजींचा गुण कसं वागायचं ते शिकवणारा आहे. राजनारायण यांची स्वदेशी बद्दलची आणि मातृभाषेबद्दलची भावना हे राष्ट्र प्रेमाचं उदाहरण आहे. देशाभिमानाचं उदाहरण आहे त्यामुळे स्वामीजींना ते मनापासून आवडलं होतं असं वाटतं.

मातृभाषेची दैन्यावस्था हा विषय तर आताही आहे. आपण रोजचं पाहतोय, ऐकतोय. पु.ल देशपांडे यांनी उपहासाने म्हटलं होतं, ‘आपल्या मदरटंग मध्ये आपल्या फिलिंग चांगल्या एक्स्प्रेस करू शकतो’. हा गमतीचा भाग सोडला, तर आज रोज अनेक वार्तापत्र झडताहेत वाहिन्यांवर. इतकी मोठी आपत्ती आणि इतकी घाई आहे की आंतर्राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेले शब्दच जसेच्या तसे वापरतोय. मराठी भाषा इंग्रजी शब्दांनी समृद्ध झाली आहे असेच म्हणावे लागेल. त्यात लॉक डाउन, हॉटस्पॉट, व्हायरस, सोशल डिस्टन्स या शब्दांनी तर सामान्य लोकांना काहीच कळत नाहीये असं वाटतं काही काही वेळा. ‘लॉकडाउन’ या शब्दाचा नेमका अर्थ समाजाला स्वत:च्या मातृभाषेत उमगत नाहीये. म्हणूनच याही परिस्थितीत ते कळत नसल्याने बाहेर नेहमीप्रमाणेच फिरत आहेत. जागतिक पातळीवरच्या अशा संसर्गजन्य साथीच्या सूचना, माहिती, आपल्या मातृभाषेत सोप्या शब्दात सांगितली, समजून सांगितली, तर निदान कळेल तरी. तरच ते गंभीरपणे या सगळ्याकडे बघतील. मातृभाषा हृदयाची भाषा.   

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग – 10 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग – 10 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

वालीच्या मरणाचे दुःखाने सुग्रीवाला, अंगद व ताराला शोकावेग आवरेनासा झाला. अखेर श्रीराम त्यांचे सांत्वन  करण्यास पुढे  आले. श्रीरामाची तेजस्वी मूर्ती पाहुन तारा हात जोडून म्हणाली, ” रघुनंदना ! आपण अप्रमेय जितेंद्र आहात. आपली किर्ती जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत तोपर्यत राहील. आपण क्षमाशील, पराक्रमी, बलवान, संयमी, सत्शील, दीनांचा कैवारी, ऐश्वर्यसंपन्न आहात, म्हणून माझी एक विनंती पूर्ण करावी ! ज्या बाणाने आपण वालीचा वध केला त्याच बाणाने मला मारुन मुक्ती द्यावी. स्रीहत्येचे पातक आपल्याला लागणार नाही, कारण मी व वाली एकच आहोत, आमचा आत्मा एकच आहे. वालीबरोबर मला समर्पण करुन त्याला माझं दान केल्यास मी माझ्या पतीजवळ जाऊन त्यांच्याबरोबर स्वर्गात सुखाने राहीन.”

ताराचा विलापयुक्त विचार ऐकून श्रीराम सद्गदित होऊन म्हणाले, “देवी ! तू वीरपत्नी, वीरमाता, महासती आहेस. तू एवढी विदूषी असूनसुध्दा मृत्युविषयी असे विपरीत विचार कसे करू शकतेस? विधात्याने या जगाचे काही नियम केलेले आहेत. तोच या जगाची रचना करतो. तोच पोषण करतो व संहारही तोच करतो. त्याच्या नियमांचे उल्लंघन कोणीही करु शकत नाही. वालीला वीरमरण, श्रेष्ठगती मिळाली आहे . त्याच्याबद्दल शोक न करता पुढील कर्तव्याची जाणीव ठेव ! अंगदसारख्या शूर, पराक्रमी, सद्गुणी पुत्राला राज्यावर बसवून राज्याची धुरा निष्कंटकपणे चालव. त्यातच तुझे कल्याण आणि मोक्ष आहे. विधात्याची ही आज्ञा समजून कार्य कर !”

“तू खर्‍या अर्थाने महासती आहेस. तू थोर पतिव्रता असल्याने  वालीनंतर राज्याचे शकट हाकण्याचे नवे सतीचे वाण घेऊन हे कार्य सिध्दीस नेणे तुझे परम कर्तव्य आहे.”

श्रीरामांच्या सांत्वनपर शब्दांनी व उपदेशाने ती शांत झाली. धीराने अश्रू आवरुन अंगदला व सुग्रीवला धीर दिला. वालीचा अंत्यसंस्कार सम्राटाच्या इतमाला अनुसरुन साजरा केला.

वालीनंतर सुग्रीवचा राज्याभिषेक करुन त्याला राज्यावर बसविले. त्याची पत्नी रुमा त्याला परत मिळाली. तारा खऱ्या अर्थाने “राजमाता” झाली. प्रजेचे हित व कल्याण कसे होईल याबद्दल ती सतत दक्ष असे.

सुग्रीवाच्या राज्यभिषेकानंतर चार महिने पावसाळा असल्यामुळे रामकार्यात मदत करणे अशक्यच होते. परंतु या दिवसांमध्ये सुग्रीव ऐषारामात तुडुंब डुबून गेला, रामकार्याचा त्याला संपूर्ण विसर पडला. सतत अंतःपुरात राहून मदिरा व मदिराक्षीच्या पूर्ण आहारी गेला. राम अत्यंत अस्वस्थ व अशांत झालेले  पाहून लक्ष्मणाचा संताप अनावर झाला. धनुष्याचा टणत्कार काढीतच तो सुग्रीवाकडे येऊन त्याला ललकारु लागला. लक्ष्मणाचा भयानक रोष पाहून सर्व वानरसैन्य व स्वतः सुग्रीवदेखील भयभीत होऊन घाबरले. लक्ष्मणाला शांत करण्यासाठी सुग्रीवाने ताराला पुढे पाठविले. तारा अतिशय सावध, धीरगंभीर होती. ती अत्यंत कर्तव्यदक्ष असून सगळीकडे बारीक लक्ष ठेवून होती.

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग – 9 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग – 9 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

सती साध्वी ताराचा करुण विलाप ऐकुन आणि तिचा मरणांतीक उपोषणाचा निश्चय पाहून हनुमान पुढे आले. ताराची योग्यता हनुमान जाणून होते. ते ताराला समजावत म्हणाले, “देवी, जन्म मरण प्रत्येकालाच आहे. त्यासाठी शोक करणे कितपत योग्य आहे? आपण तर विदुषी आहात ! जन्म मृत्युची परंपरा जाणता ! वालीराजांचा जीवनाचा अवधी संपल्यामुळे त्यांना वीरगती प्राप्त झाली. आपण महासती, महाविद्वान आहात, आपणाला मी काही सांगणे म्हणजे सूर्याला काजवा दाखवण्यासारखे आहे. आपण ज्ञानसंपन्न विदुषी, विवेकी, विचारी, धीरगंभीर, शांत मनस्विनी आहात.”

” कुमार अंगदच्या भविष्याचा विचार करुन आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करावे. अंगद आणि सुग्रीव दोघेही दुःखी आहेत. त्यांचे सांत्वन आपल्याशिवाय कोण करणार? कोण आधार देणार त्यांना? आता या राज्याची स्वामिनी आपणच आहात. कुमार अंगदची  आणि सर्व वानरांची माता होऊन, आपले दुःख, शोक, बाजूला ठेवून खंबीरपणे उभे राहून वानरांचे हे राज्य आपल्याला सांभाळायचे आहे , मार्गदर्शन करायचे आहे. वालीराजांच्या पारलौकिक कार्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते आटोपल्यावर  कुमार अंगदला राजसिंहासनावर बसवावे.”

त्यावर तारा म्हणाली, ” मला आता कशाचाही मोह नाही. या सर्व ऐहिक सुखाची विरक्ती आलेली आहे. अंगदसाठी काय करायचे ते, त्याचे काका सुग्रीव पाहण्यास समर्थ आहे. पुत्रमोहात अडकण्यापेक्षा पतीधर्मानुसार त्यांच्यासोबत सती जाणे हेच मी माझे कर्तव्य समजते.”

यावेळेपर्यंत वालीला किंचित शुध्द आली. ही शुध्द त्याची शेवटचीच शुध्द होती. श्वास घ्यायला त्रास होत असतांना खोल आवाजात मोठ्या प्रयत्नपूर्वक तो सुग्रीवशी बोलू लागला. ” माझ्या अंतिम समयी जेव्हा मी यमलोकी महानिर्वाणाला निघालो तेव्हा याक्षणी माझेकडून घडलेले पातक, अविचार, अत्याचार सर्व आठवून माझाच मला धिक्कार वाटत आहे. सुग्रीवा ! तुझे माझ्यावर असलेले अपार प्रेम मी कधी समजून घेतलेच नाही. तुझ्याबद्दल विनाकारण गैरसमजाने आकस ठेवून वैर केले. तुला देशोधडीला लावले. आपण प्रेमाने राहिलो असतो तर अश्या दुर्घट प्रसंगाला सामोरे जावे लागले नसते. परंतु आता तर पश्चातापालाही अवधी उरला  नाही.”

 “अंगदला स्वतःचा पुत्र समजून त्याचा सांभाळ कर ! तो तेजस्वी, पराक्रमी, शूर आहे. सुषेन वानरराजाची कन्या तारा, हिच्याजवळ अशी आंतरिक शक्ती आहे की, भविष्यात घडणार्‍या चांगल्या वाईट घटनांची सूचना तिला आधीच मिळते. निसर्गामधे व मानवी जीवनात अनेक उत्पात होतात. त्याबाबत तिने दिलेला कोणताही सल्ला हितकारक ठरतो, जो मी कधीच ऐकला नाही, त्याचे फळ माझ्या रुपाने तुझ्यासमोर आहे. ताराने दिलेला, केलेला उपदेश आणि सल्ला कोणताही किंतु, संशय मनांत न ठेवता ऐक आणि प्रत्येक कार्य तिच्या सम्मतीनेच कर !”

वालीचे बोलणे तारा ऐकत होती आणि ओक्साबोक्शी रडत होती. वालीने अंगदला जवळ घेतले.  त्याचा हात हातात घेऊन म्हणाला, ” श्रीरामाचे कार्य देवकार्य समजून त्यांना मदत कर…”

 ताराकडे पहातच वालीचे प्राणोत्क्रमण झाले. एक बलशाली तारा निखळला !

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गाद्या घालणे… अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

? वाचताना वेचलेले ?

🍃 गाद्या घालणे… अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

पूर्वी रात्रीची जेवणं आठ साडेआठ च्या सुमारास होत असत.साडेनऊ पर्यंत दिवे मालवून रेडिओवरची श्रुतिका ऐकत किंवा कधी रात्री दहाची आकाशवाणी संगीतसभा ऐकत लोक झोपेच्या आधीन होत.तत्पूर्वी गाद्या घालणे हे नित्य काम करावे लागे.तेंव्हा घरात एक किंवा दोन पलंग असत.खर म्हणजे  लोखंडी ,उभ्या आडव्या पट्ट्या असलेलली एकच कॉट असे.२/३ खोल्यांच्या लहान घरात जागाही नसे आणि प्रत्येकाने कॉटवर झोपण्याची चैन करण्याची पद्धतही नव्हती.सिंगल बेड,डबल बेड,सोफा कम् बेड,बंक बेड चा तो जमाना नव्हता.त्यामुळे घरातील ती एक कॉट वडिलांसाठी राखीव असे.ते घरात नसतील तेंव्हा दुपारी पडायला वगैरे इतरांना ती मिळे.त्यामुळे रात्री घरातील इतर सर्वांनी खाली गाद्या घालून झोपायचं हे ओघानेच आले.

घरात भिंतीला टेकवून ३/४ गाद्यांच्या वळकट्या एकावर एक रचून ठेवलेल्या असत.त्यावर एखादी सतरंजी किंवा चादर घातलेली असे ज्यायोगे गादीतला क्वचित् उसवून बाहेर आलेला कापूस दिसू नये.गाद्या घालण्यापूर्वी पुन्हा एकदा झाडून घ्यायचे.पूर्वी दोन वेळा केर काढायची पद्धत होतीच. फक्त दिवेलागणीला केर काढायचा नाही असा नियम होता.कारण ती वेळ घरात लक्ष्मी येण्याची वेळ.केर काढल्यावर सतरंज्या अंथरायच्या आणि त्यावर गाद्या पसरायच्या.गाद्या घालायचं काम सामान्यपणे घरातली पुरुषमंडळी करत आणि लहान मुले त्यांना आवडीने मदत करत.गादीवरची चादर काढून त्या चादरीने गादी जोरजोरात झटकायची. ढेकणांचाही बंदोबस्त करावा लागे..मग त्यावर हळुवारपणे चादर पसरायची.चादरीची एका बाजुची दोन टोके एकाने पकडायची आणि दुसरी दोन टोके दुस-याने पकडून हळुहळु चादर खाली आणून गादीवर अंथरायची.त्यावेळी चादरीत हवा भरुन मोठा फुगा होत असे.मग गादीवर रांगत रांगत चादरीच्या चारही बाजू ताणून ,निगुतीने गादीखाली दुमडून टाकायच्या.एकही सुरकुती तिथे असता कामा नये यावर वडिलांचा कटाक्ष असे.हे सगळं करताना घरातलं लहान मूल वडिलांच्या पाठीवर घोडा घोडा खेळत असे.घोड्यावरुन गादीवर रपेट मारली जात असे.मुलं कोलांट्या उड्या मारत  .हा खेळ रोज चाले.म्हणून गादी घालणे हे मुलांनाही  काम वाटत नसे तर उलट त्यांच्या मौजेचा भाग वाटे.शेवटी डोक्यापाशी उशा आणि पायापाशी पांघरायची चादर ठेवली की हे काम पूर्ण होत असे.गादीवर अंथरायची ‘बेडशीट ‘च असे अस काही नाही.आईची किंवा आजीची जुनी मऊ नऊवार साडीसुद्धा पांघरायला असे.हे सगळं झालं की वडिलांच्या पाठीवर पाय देणे असा एक कार्यक्रम असे.भिंतीचा आधार घेऊन आम्ही वडिलांच्या पाठीवर पाय देऊन त्यांची पाठ रोज रगडून देत असू.आईच्या वाट्याला कधीच हे कौतुक आले नाही.पण तरी ती मात्र न चुकता रोज झोपायच्या वेळी आमच्या तळपायाला साजूक तूप लावून देत असे, थंडीत पायांच्या भेगा कोकम तेलाने बुजवत असे,उन्हाळ्यात वर्तमानपत्राच्या घडीने  झोप येईपर्यंत वारं घालत असे…सगळं निरपेक्ष …शेवटी आई ती आईच.

आपण सर्व ह्या अनुभवाचा  आनंद आज ही आठवणीत साठवलेला असेलच !!

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इथे ओशाळला शेक्सपिअर… ☆ श्री सुरेश नावडकर ☆

श्री सुरेश नावडकर
? इंद्रधनुष्य ?

☆ इथे ओशाळला शेक्सपिअर…☆ श्री सुरेश नावडकर ☆

शेक्सपिअर म्हणतो, ‘ नावात काय आहे? ‘– तर नावातच खूप काही आहे.. कसं? ते बघाच… जगातील कोणत्याही देशांपेक्षा, आडनावांची विविधता फक्त भारतातच आहे.. त्यातूनही महाराष्ट्रात तर, या बाबतीत आडनावांनी कहरच केलेला आहे…

आडनावांची विविधता ही अनेक प्रकारांमध्ये विभागलेली आहे.

रंगावरुन प्रचलित असलेली आडनावं.. काळे, गोरे, पांढरे, सावळे, भुरे, हिरवे, तांबडे, पिवळे, करडे, जांभळे, तपकीरे, इत्यादी. यामध्ये अनेकदा आडनावाच्या विरुद्ध ती व्यक्ती असते.. उदा. काळे आडनावाच्या बाई, गोऱ्यापान असतात.. तर गोरे आडनावाचे सद्गृहस्थ, कोळशाशीही स्पर्धा करणारे दिसतात..

धातूंची आडनावंही, बरीच आहेत.. जसे तांबे, पितळे, लोखंडे, कासे, चांदेकर, पुणतांबेकर, इत्यादी. काही खनिजांवर आधारित असतात..  रत्नपारखी, हिरे, पोवळे, लसुणे, गारगोटे, इ.

काही आडनावे, चेहऱ्यावरील अवयवांशी जोडलेली असतात.. जसे डोळे, काने, दुतोंडे, केसकर, टकले, माने, दाते, बोबडे, तिरळे, डोळस, अंधे, डोईफोडे, इ. 

आडनावं, व्यवसायावरुनही चालत आलेली आहेत.. जसे सोनार, सराफ, चांदिवले, वकील, सुतार, पारधी, वैद्य, चिटणीस, दिवाण, भगत, गुरव, लोहार, इ. काही पिढ्यांसाठी त्यांचा तो व्यवसाय असेलही, नंतर मात्र सोनाराचं, कापडाचं दुकान असतं किंवा लोहाराचा टेलरींगचा व्यवसाय असतो..

भाजीपाल्यांवरुनची आडनावं फारच गंमतीशीर असतात.. जसे भोपळे, दुधे, कारले, पडवळ, भेंडे, गवारे, रताळे, मुळे, तोंडले, केळकर, आंबेकर, फणसे, गाजरे, ढोबळे, राजगिरे, अंबाडे, नारळे, काकडे, इ. यातील भोपळे हे सडपातळ असू शकतात.. व कार्लेकर, मिठ्ठास बोलणारे असतात..

प्राणीमात्रांवरुन पडलेली आडनावं मजेशीर असतात.. उदा. मांजरेकर, उंदरे, वाघ, चितळे, सांबारे, मोरे, बिबटे, कोल्हे, कावळे, घारे, वाघमारे, मुंगसे, लांडगे, गरुड, ससे, बकरे, म्हशीलकर, पोळ, इ. जशी आडनावं, तशी ही माणसं असतीलच याची खात्री नसते.. म्हणजे ससे हे धीट असू शकतात, तर वाघ, डरकाळी फोडणे विसरुन मितभाषी झालेले असतात..

काही गंमतीशीर, प्रकृती बिघडल्याची आडनावं पहायला मिळतात.. जसे पादरे, हगवणे, पोटफोडे, पोटे, उचके, लिडबिडे, काणे, शेंबडे, लाळे, खोकले, उकिडवे, हगे, चिपडे, ढोमे, फेंदरे, इ. यांना आपलं आडनाव सांगतानाही, संकोच वाटतो…

काही आडनावं ही, गावातील कार्यपद्धतीवर असतात.. जसे पाटील, नगरकर, कुलकर्णी, मास्तर, सरपंच, सरंजामे, इनामदार, सुभेदार, हवालदार, भालकर, मोहिते, पवार, ठाकूर, ठाकरे, देशपांडे, मेश्राम, इ.  अशा नावांना, मान असतो..

चलनावर देखील आडनावं असतात, जसे पगारे, रोकडे, सहस्त्रभोजने, लाखे, कोटस्थाने, तिजोरे, हजारे, फुकटे, पावले, सोळशे, तनखीवाले, इ. यांच्या नावातच ‘नगद नारायण’ असल्यामुळे, यांची ‘चलती’ असते..

आवाज दर्शवणारीही आडनावं असतात.. जसे बोंबले, कोकले, घुमे, बडबडे, बोबडे, मुके, हर्षे, खिंकाळे, गोंधळे, तावडे, आकांत, घोगरे, इ. 

गाव व शहरावरुन पडलेली आडनावं.. शेगांवकर, किर्लोस्कर, चिपळूणकर, कराडे, गोवेकर, सासवडकर, जिंतीकर, उसगांवकर, धारवाडकर, सोलापूरकर, मुरुडकर, पावसकर, नाशिककर, नागपुरे, मालवणकर, पुणेकर, दादरकर, वसईकर, इ. यांनी आपलं गाव सोडून पन्नास वर्षे झाली तरी आडनावाची नाळ तुटलेली नसते..

काही आडनावं चवदार, टेस्टी असतात.. जसं गोडे, आंबट, कडू, दहिवळे, ताकवले, श्रीखंडे, चक्के, कडबोळे, करंजे, पुरी, हलवाई, झणकर, हिंगमिरे, आवळे, बोरे, चिंचोरे, डाळिंबे, इ. ही नावं घेतली तरी त्यांच्या अनुभवाची चव आठवते..

आडनावांचा हा धांडोळा, थोडक्यात आटोपता घेतो.. कारण याला अंत नाही.. एवढी विविधता असूनही, काही आडनावे ही अविस्मरणीय अशीच आहेत.. कारण त्या व्यक्तींचं योगदान मोलाचे आहे…

उदा. अत्रे, म्हटलं की प्रल्हाद केशव अत्रे, देशपांडे म्हटलं की, पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे, सावरकर म्हटलं की, विनायक दामोदर सावरकर, शेळके म्हटलं की, शांताबाई शेळके, घाणेकर म्हटलं की, काशिनाथ घाणेकर, दलाल म्हटलं की, दीनानाथ दलाल, पंडित म्हटलं की, एस. एम. पंडितच आठवतात… ही आडनावांतली जादू आहे.. त्या माणसांचं मोठेपण, त्या नावाला चिकटलेलं असतं… ते नाव तसंच तेजोमय राखण्यासाठी, त्याला जपावं लागतं.. नाहीतर ‘ नाव मोठं, लक्षण खोटं ‘ व्हायला वेळ लागत नाही…

हा लेख जर शेक्सपिअरने वाचला असता, तर नक्कीच तो ‘ ओशाळला ‘ असता… हे नक्की!!

© सुरेश नावडकर

११-६-२२

मोबाईल ९७३००३४२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग – 8 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग – 8 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

वाली-सुग्रीवामधे भयंकर घनघोर युध्द सुरु झाले. वालीच्या पराक्रमापुढे सुग्रिवाचा टिकाव लागेनासा झाला. सर्व वानरसेना एका बाजुला उभे राहुन दोघांचे द्वंदयुध्द पाहत होती. वालीच्या आघाताने सुग्रीव असहाय्य होऊन खाली कोसळला. वाली आतां त्याच्यावर निर्णायक वार करणार एवढ्यात सालवृक्षाच्या बुंध्याआड लपलेल्या रामाने वालीवर बाण सोडला. काय घडले हे कळायच्या आतच वालीचा प्रचंड देह धरणीवर कोसळला. बाजुला अभं राहुन पाणावल्या डोळ्यांनी सुग्रीव हे दृष्य पाहत होता. वालीसारखा बलाढ्य, महापराक्रमी योध्दा कोसळल्याचे पाहतांच सर्व वानरसेना भयाने रणांगणातून पळून जाऊं लागली.

कांही वानरप्रमुख वाली पडल्याचा दुःखद समाचार सांगण्याकरितां धावत ताराकडे आले. हे वृत्त ऐकुन तारा दुःखाने अतिशय व्याकुळ झाली. अंगदसोबत धावत नगरीबाहेर युध्दस्थळी आली. पाहते तो काय… सर्व वानरसेना व मंत्रीगण, सेनापती मरणाच्या भीतीने पळून जातांना दिसले, एवढ्या दुःखातही ताराने सर्वांना थांबायला सांगून संतापाने विचारले, “तुम्ही वीर ना? वाली राज्यावर असतांना त्याच्या बाहुबलाच्या आश्रयाने निश्चिंतपणे सुखाने बिनधास्त राहत होतात! आता हा वीर मरणोन्मुख झाल्याचे पाहतांच भ्याडाप्रमाणे पळून जाताहात! सुग्रीवाकडुन तो पराजीत झाला म्हणुन प्राणभयाने पळ काढतां?”

भयभीत होऊन वानर ताराला म्हणाले, “देवी! प्रत्यक्ष यमधर्मच रामाच्या रुपाने आलेले आहेत, तुम्ही सुध्दा पुढे न जातां अंगदचे रक्षण करा.”

तारा एक श्रेष्ठ वीरपत्नी होती. धैर्यशील होती. ती म्हणाली, “वानरराज वाली गेले, माझे सर्वस्व गेलं. माझं सौभाग्य गेलं. आतां  पुत्रमोह, राज्य, जीवन कशाचेच प्रयोजन उरले नाही. मी फक्त माझे पती वालीराजांच्या चरणावर समर्पित होणार!”

राम लक्ष्मण आपली धनुष्ये जमीनीवर टेकवून हे दुःखद दृष्य बघत उभे होते. सुग्रीव अतीव दुःखाने मुर्च्छित होऊन वालीजवळ जमीनीवर पडला होता. तारा अत्यंत विकलावस्थेत धावत ओरडत वालीजवळ आली. वालीला पाहतांच त्याचे डोके मांडीवर घेऊन बसली व शोक करुं लागली. अंगदालाही शोक आवरेनासा झाला. सावध झालेल्या सुग्रिवाला तारा अंगदचा शोकविलाप पाहुन त्याचाही शोकपूर वाहु लागला.

तारा विलाप करत, रडत, अविचल वालीला म्हणाली, “वीरा! आपण बोलत कां नाही? आपण मिळवलेल्या सार्या  वैभवाचं काय करायचं? माझा सारा आनंद, सौख्य लुटला गेला. माझे हृदय फाटुन कां जात नाही? आपण रुमाचे अपहरण केलेत त्याचे तर हे फळ नसेल ना? मी आपणांस अनेक वेळा, अनेक हितकारी गोष्टी सांगतल्या, दुष्प्रवृत्तीपासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण आपण कधीच माझे ऐकले नाही. श्रीरामाच्या बाणाने मारले  गेलात. मला दीनता आली. असे वैफल्यपूर्ण, दयनीय, जीवन मी कधीही जगले नाही. एवढ्या मोठ्या दुःखाचा अनुभव नाही. वैधव्यजीवनच मला कंठावे लागणार ना?”

“बोला ना स्वामी! बोला ना माझ्याशी, आपल्या लाडका पुत्र अंगदशी बोला! सुग्रीव! आता निष्कंटक कर राज्य!”

एवढं बोलुन ती वालीजवळच आमरण ऊपोषणाला बसली.

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मैत्र क्षणांचे… सुश्री स्वाती महाजन -जोशी ☆ सुश्री मीनल केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ मैत्र क्षणांचे… सुश्री स्वाती महाजन -जोशी ☆ सुश्री मीनल केळकर ☆ 

मैत्र क्षणांचे लिहून बरेच महिने उलटून गेले असतील. लोकलमध्ये भेटलेल्या काहीजणींच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न. या भेटलेल्या प्रत्येकीमुळे माझ्यात काही ना काही बदल झाला हे नक्की. बावीस वर्षांचा रोज सरासरी साडेतीन तास एवढे माझ्या लोकल प्रवासाचे आयुष्य आहे. आपण अजून जिवंत आहोत ना हे बघायचे असेल तेव्हा मी सरळ उठते आणि लोकलने कुठे तरी जाऊन येते. जाताना गर्दी नसेल अशी वेळ निवडायचे पण येताना अगदी चेंगराचेंगरीत लोकलमध्ये चढायचे. असा प्रवास आणि लोकलमधले वातावरण याने पुढील काही महिने जगण्याची ऊर्जा मिळते. पण करोनाने सर्वसामान्यांसाठी ट्रेनचा प्रवास बंद होता. तेव्हा काही कारणाने रेल्वे स्थानकाच्या आसपास जावे लागले. ती ओकीबोकी स्टेशनं बघून खरच भडभडून आले. 

लोकल बंद मग त्यावर अवलंबून असलेल्या फेरीवाल्या कुठे गेल्या असतील हा विचार मनात येत असतानाच डोळ्यांसमोर उमा आली. तिला अगदी ती तीन-चार महिन्यांची असल्यापासून मी ओळखते. एका अंध जोडप्याची मुलगी. ते जोडपे लोकलमध्ये भीक मागायचे. त्या दोघांची प्रेमकहाणी आणि लग्न या सर्वांची मी साक्षीदार होते. पण ते दोघे जरा तिरसट असल्याने इतरांप्रमाणे त्यांच्याशी कधी संवाद व्हायचा नाही. त्यांना मुलगी झाली. मग ती बाई त्या छकुलीला घेऊनच लोकलमध्ये येऊ लागली. फार गोंडस मुलगी होती. सर्व प्रवासी महिलांसाठी अगदी कौतुकाचा विषय होती. तिची आई खूप प्रोटेक्टिव्ह होती. तुमची मुलगी खूप गोड आहे हो असे मी एकदा तिला म्हटलं त्या क्षणी तिने आपल्या मुलीभोवतीची मिठी अजूनच आवळली. उमा नाव ठेवल्याचे थोडे दिवसांनी तिने मला आपणहूनच सांगितले. एक दिवस उमाच्या वडिलांनी विचारले, आमची उमा गोरी आहे का काळी? ‘ छान गोरी आहे. आणि तिचे डोळे खूप बोलके आहेत.’ हे ऐकताच ते दोघेही खूप खूष झाले. उमा मोठी होत होती. दोन वर्षांची असल्यापासून ती आईवडलांना कोणते स्टेशन आले ते सांगू लागली होती. आम्हालाही फार गंमत वाटायची. ती अतिशय हुशार होती. तीन वर्षांची झाल्यावर लोकलमधल्याच प्रवाशांनी आग्रह करून तिला शाळेत घातले. दोन वर्षे नियमित शाळा सुरू होती. तिला भाऊ झाल्यानंतर आईवडलांच्या मदतीसाठी उमाची  शाळा सुटली. भाऊ झाल्याचा तिला खूप आनंद झाला होता. गणेश नाव ठेवल्याचे तिने पूर्ण डब्यातल्या बायकांना सांगितले होते. तिच्या वयापेक्षा जास्त मोठी बनून ती  आपल्या भावाला सांभाळत होती. सोबत आणलेल्या बाटलीतले दूध नासले नाही ना हेही ती तपासायची. उमा-गणेश लोकलमध्येच मोठे होत होते. उमा पुन्हा शाळेत जाऊ लागली. पण काही महिन्यात शाळा सुटली. नेरूळचे तिचे घर पडले. ते घणसोलीला रहायला गेले. मग शाळा सुटली ती सुटलीच. आईवडलांना तर शाळा हा विषय बिनमहत्त्वाचा होता. पण उमाला शिकायची आवड होती. ती जेवढं शिकली होती, त्याचा ती सारखा सराव करायची. एक दिवस मला म्हणाली, “ मॅडम मला एबीशी शिकवा ना. तिला मी ए टू झेड अक्षरे एका कागदावर लिहून दिली आणि मग गिरवून घेतली. दोन दिवसांनी भेटली तेव्हा तिला अक्षर येऊ लागली होती.  मग लोकलवर चिकटवलेल्या जाहिरातीतील अक्षर ओळखण्याचा तिला नादच लागला. तिचे पालक भीक मागत तेव्हा ती दारात शांतपणे बसून  असे. एक दिवस रुमाल विकायला आणले.  सात-आठच होते पण ती आनंदात होती. मी विचारले कुठून आणले ग. एका ताईने तिच्याकडचे दिले. मला पैसे देणार आहे. एवढं सांगून घाईने निघून गेली. परत भेटली तेव्हा म्हणाली मला सगळे भिकाऱ्याची पोरगी म्हणून चिडवतात. मला आवडत नाही. काही माल विकायचा तर पैसे नाहीत. मग मी असाच माल विकून पैसे जमवणार आणि मी पण  वेगवेगळा माल विकणार. त्यावेळी तिचे वय फक्त आठ होते. मला खूप कौतूक वाटले. उमा खूप दिवसांनी भेटली. गणेशला आश्रमशाळेत घालणार असल्याचे सांगितले. तळेगावच्या  आश्रमशाळेची  माहिती तिला गाडीतल्याच कोणी तरी दिली होती. खूप खूष होती. काही दिवसांनी मी पण शिकायला जाणार, असेही तिने सांगितले. मध्येच एकदा सगळे तळेगावला जाऊन आले. जूनपासून दाखला झाला होता. भावाचे शिक्षण मार्गी लागणार याचा तिला खूप आनंद झाला होता. आपलेही शिक्षण सुरू होईल ही आशा होती. काही दिवस ती गाडीला दिसायची. नंतर ते सर्वचजण गायब झाले. गाडीत येणे बंद झाले. नक्की कुठे गेले कोणत्याच फेरीवाल्यांना माहित नव्हते. गणेशचे शिक्षण सुरू झाले असेल का? उमाच्या स्वप्नाचे काय? या प्रश्नांनी मी अस्वस्थ होते. जरी शिक्षण सुरू झाले असले तरी लॅाकडाऊनमध्ये पुन्हा बंद पडलं असेल. खरंच एक हुषार मुलगी, आपल्या भावावर आईसारखी माया करणारी बहीण, आणि वयापेक्षा जास्त प्रगल्भ असलेली मुलगी परत कधीच बघायला मिळाली नाही. आता एकदा जाऊन उमाला शोधणार आहे हे नक्की.  

लेखिका – सुश्री  स्वाती महाजन -जोशी

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गोपीचंदन… ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ गोपीचंदन… ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

रुक्मिणी कृष्णाला विचारते ,” आम्ही तुमची येवढी सेवा करतो पण तरीही गोपींना तुम्ही विसरत नाही. असे का ? “

कृष्ण काहीही उत्तर देत नाही.

एकदा कृष्णाच्या छातीत जळजळ होत असते. कृष्ण अस्वस्थ असतात. सगळे उपचार करूनही बरे वाटत नाही. वैद्यही हात टेकतात. रुक्मिणी कृष्णाला शरण जाते. “आता तुम्हीच उपचार सांगा. आम्ही ताबडतोब अमलात आणू.”

श्रीकृष्ण म्हणतात, ” जो माझा खरा भक्त आहे त्याच्या पायाची धूळ छातीवर लावा. मला बरं वाटेल. “

महालातील सर्व जण आपल्या पायाची धूळ द्यायला नाही म्हणतात. रुख्मिणी म्हणते, ” मी खरी भक्त आहे.पण प्रत्यक्ष पती परमेश्वराला माझ्या पायाची धूळ ? माझी योग्यताच नाही, सात जन्म मी नरकात जाईन.”

हळूहळू वार्ता द्वारकेत पोहचते. इकडे वेदना तर वाढतच आहेत. सर्वजण रुख्मिणीसारखाच विचार करतात. आणि चरणरज राजवाड्यावर पोहचत नाही. 

दवंडी पिटणा-यांना गावं वाटून देतात. सर्वदूर दवंडी पिटणारे जातात. एक जण गोकुळात जातो.

दवंडी पिटताच सर्व गोपी विचारतात, “ काय करायला लागेल ते सांगा ! “

“ एका घमेल्यात बारीक रेती आणलेली आहे .त्यात उभे रहायचे आणि सारी माती तुडवायची. आम्ही ही माती घेऊन प्रभूंच्या वक्षस्थळी लावू. मात्र माती तुडवणारा प्रभूंचा खरा  भक्त असला पाहिजे. यानेच दाह मिटेल.”

गोपी विचारतात, “ मग  रुख्मिणीमातेने असे नाही केले ?”

दवंडीवाला सांगतो,  ” प्रत्यक्ष परमेश्वराला माझ्या पायाची धूळ लावून मी पापी होईन. सात जन्म नरकात रहावे लागेल  असं त्या म्हणाल्या.”

सर्व गोपी तात्काळ म्हणाल्या, ” जर  श्रीकृष्णाला बरं वाटणार असेल तर आम्ही सात जन्मच काय, शंभर जन्मही नरकात राहू. द्या ती माती  इकडे.” आणि प्रत्येक गोपी ती माती तुडवते.

पुढे ही माती श्रीकृष्णाच्या छातीवर लावली जाते आणि त्यांचा दाह शमतो.

मित्रांनो हेच ते “गोपीचंदन”.  याने दाह कमी होतो.

संग्रहिका – सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग – 7 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग – 7 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

वाली सुग्रीवचे युध्दाचं आव्हान स्विकारण्यास बाहेर येऊ लागला, त्यावेळी मात्र तारा निश्चयाने वालीला अडवण्याच्य दृष्टीने त्याच्या समोर आडवी येऊन, अत्यंत केविलवाणेपणाने, दिनवाणीपणाने यावेळी न जाण्याबद्दल त्याला विनवून अडवू  लागली. म्हणाली, “ही वेळ युध्दासाठी योग्य नाही. उद्या प्रातःकाळी युध्दास जावे, आता धोका आहे.” वाली हेटाळणीच्या स्वरात म्हणाला, ” सुग्रीवापासुन मला धोका….? अगदी हास्यास्पदच गोष्ट आहे. सुग्रीवासारख्या यतःकिंचित भेकडाचे जर मी आव्हान स्विकारले नाही तर संपुर्ण त्रिखंडांत भेकड वाली म्हणुन नामुष्की, दुष्किर्ती होईल. हे तुला चालेल का?”

तारा कळवळून वालीला म्हणाली, “स्वामी! आज सुग्रीव एकटा नाही. त्याच्या बरोबर अयोध्येचे वीर, पराक्रमी, सत्शील राजपुत्र राम-लक्ष्मण आहेत, ज्यांनी अनेक बलाढ्य राक्षसांचा वध करुन नायनाट केला. त्यांनी सुग्रीवाला त्याच्या कार्यात मदत करण्याचे आश्वासन दिलेले आहे. तुम्ही सुग्रीवाला कमी लेखू नका. तो सबल आहे. म्हणूनच विनवते, ही वेळ टाळावी. ह्या अशुभ वेळी जाऊं नये.”

वाली म्हणाला, “शुभ-अशुभ मी काही मानत नाही. सुग्रीवाने युध्दाचे अव्हान दिले, ते स्विकारणे माझे कर्तव्य आहे. त्याच्यामागे प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी त्याचा मागच्यासारखा पराभव करुन, त्याला लोळवून नक्की परत येईन.”

तारा म्हणाली, “सुग्रीव तुमचा लहान बंधु आहे. विनाकारण कशाला त्याच्याशी शत्रृत्व ठेवायचे? त्याचे तुमच्यावर किती प्रेम होते जाणत नाही का? त्याने राज्य परत केल्यावरही त्याचेवर आकसाने गैरसमजाने उगीचच संघर्ष कां वाढवायचा? निदान आतां तरी प्रेमाने, समझोत्याने त्याची रुमा त्याला परत करुन गुणागोविंदाने राहावे.”

वाली म्हणाला, “आता ते शक्य  नाही. त्याचा पराभव करुन रुमाला दाखवुन देतो की, तिचा पती किती नालायक आहे.”

त्यावर तारा म्हणाली, “असे नका हो वागू..! असे वावगे वागल्याने अनर्थ मात्र अटळ आहे. इतिहास साक्ष आहे, अहंकार व अत्याचाराची  अनेक उदाहरणे आपल्यापुढे आहेत. असे घडले आहे की, जय तर दूरच राहिला पण शेवटी मानहानी व पराभव पत्करुन धुळीस मिळावे लागले आहे.’

परंतु दुराग्रही, हटवादी वाली बधला नाही. उलट जास्तच चेकाळल्यासारखा होऊन पुढे जायला निघाला. ताराचे प्रयत्न विफल झाले, नाइलाज झाला तिचा. शेवटी म्हणाली, “जाताच आहात तर माझी एक इच्छा पुर्ण करुन तरी जा.”

ताराने आसन मांडले. त्यावर वालीला बसवुन पंचारतीने त्याचे औक्षण करतेवेळी तीने अपाद्विनाशक मंत्र म्हटला, पण तिच्या मंत्रातुन आज शक्ती निर्माण झाली नाही. पुढील घडणारे भविष्य तिला कळून चुकले. हे औक्षण अखेरचेच ठरेल याची तिला कल्पना आली. मोठ्या कष्टाने, विकल मनःस्थितीने वालीला निरोप दिला. वाली त्वेषाने निघून गेला.

ताराने अत्यंत शोक करीत मंचकावर धाडकन अंग टाकले. या पतिव्रतेला भविष्यांतील घडणार्यात घटनांची काळाने सूचना तीला दिली असावी.

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पदर…. अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ पदर…. अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

खरं तर आईच्या पोटातच आधी आईची ओळख झाली 

आणि मग नऊ महिन्यांनी तिच्या पदराची ओळख झाली.

पाजताना तिनं पदर माझ्यावरून झाकला,

आणि मी आश्वस्त झालो …

तेव्हापासून तो खूप जवळचा वाटू लागला

आणि मग तो भेटतच राहिला … आयुष्यभर… … 

शाळेच्या पहिल्या दिवशी –तो रुमाल झाला

रणरणत्या उन्हात –तो टोपी झाला,

पावसात भिजून आल्यावर –-तो टॉवेल झाला

घाईघाईत खाऊन खेळायला पळताना –तो नॅपकीन झाला

प्रवासात कधी –तो अंगावरची शाल झाला 

बाजारात भर गर्दीत कधीतरी आई दिसायची नाही

पण पदराच टोक धरून मी बिनधास्त चालत राहायचो …

मग त्या गर्दीत –तो माझा दीपस्तंभ झाला

गरम दूध ओतताना –तो चिमटा झाला

उन्हाळ्यात लाईट गेल्यावर –तो पंखा झाला

निकालाच्या दिवशी –तो माझी ढाल व्हायचा.

बाबा घरी आल्यावर, चहा पाणी झाल्यावर, तो पदरच प्रस्ताव करायचा ….

‘छोटूचा रिझल्ट लागला…चांगले मार्क पडले आहेत.. एक-दोन विषयात कमी आहेत, 

पण …पण आता अभ्यास करीन असं म्हणतोय..बाबांच्या संतापाची धार बोथट होताना

मी पदराच्या आडून पाहायचो.. हाताच्या मुठीत पदराच टोक घट्ट धरून !

त्या पदरानेच मला शिकवलं…… कधी – काय – अन कसं बोलावं

तरुणपणी जेव्हा पदर बोटाभोवती घट्ट गुंडाळला तेव्हा त्याची खेच बघून आईने विचारलंच,

“ कोण आहे ती…नाव काय?? ”

लाजायलाही मला मग पदरच चेहऱ्यापुढे घ्यावा लागला.

 

रात्री पार्टी करून आल्यावर … जिन्यात पाऊल वाजताच,  दार न वाजवता … पदरानेच उघडलं दार.

कडी भोवती फडकं बनून …कडीचा आवाज दाबून …त्या दबलेल्या आवाजानेच  नैतिकतेची शिकवण दिली

पदराकडूनच शिकलो सहजता

पदराकडूनच शिकलो सौजन्य

पदराकडूनच शिकलो सात्विकता

पदराकडूनच शिकलो सभ्यता

पदराकडूनच शिकलो सहिष्णुता

पदराकडूनच शिकलो सजगता

काळाच्या ओघात असेल, अनुकरणाच्या सोसात असेल, किंवा… स्वतःच्या “स्व”च्या शोधात असेल,

साडी गेली… ड्रेस आला 

पँन्ट आली… टाॅप आला

स्कर्ट आला… आणि छोटा होत गेला

प्रश्न कपड्याचा नाहीच आहे ,

प्रश्न आहे तो,……  आक्रसत जाऊन , गायब होऊ घातलेल्या पदराचा !

कारण पदर हे पद नसून , जन्मभराची फक्त आणि फक्त  जबाबदारी आहे . आणि ती जाणीवपूर्वक व नि:स्वार्थपणे – पेलू शकते केवळ आई ! 

खरं तर – शर्टालाही  फुटायला हवा होता पदर …

पण खरं सांगू … शर्टाला तो झेपणार नाही !!!

 

लेखक : अज्ञात 

संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares