मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ असाही चांगुलपणा… ☆ प्रस्तुती – श्री साहेबराव माने ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ असाही चांगुलपणा… ☆ प्रस्तुती – श्री साहेबराव माने ☆

मुलगी जन्मल्यावर या गावात घडतं काहीतरी फारच वेगळं… विचारात टाकणारं असंही एक गाव.

मुलगी झाली हो! असं ऐकलं की नाकं मुरडली जातात आजही! हो हे अगदी खरं आहे. मुलगी ही देणेकऱ्याचे देणं समजली जाते. मुलगी म्हणजे जबाबदारीच.. परिणामी मुलगी नकोच असा सूर आजही आळवला जातो.

ती इतकी नकोशी होते की तिचं नाव नकुशी ठेवण्यापासून आईच्या गर्भातच तिला मारण्यापर्यंत पावले उचलली जातात. स्त्रीभ्रूणहत्या कायद्याने गुन्हा असूनही समाजातल्या सर्वच स्तरांवर हे कृत्य केले जाते.

यामुळे मुलींचा जनन दर खूप खालावला असून काही वर्षांनी लग्नासाठी मुलगी हवी म्हणून मारामाऱ्या होतील अशी परिस्थिती आहे..यालाही काही अपवाद आहेतच. जे जाणतात मुलगी होण्याचे महत्व आणि स्वागत करतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीचे..एक अभिनव परंपरा जपून.

कोण आहेत हे लोक? कोणती परंपरा यांनी सुरू केली? चला तर जाणून घेऊयात— राजस्थानच्या राजसमांड जिल्ह्यातील पिपलांत्री गाव. जे आज जगाच्या नकाशावर ‘इको-फेमिनिस्ट’ गाव म्हणून स्वतःची ओळख मिळवून आहे. त्याच गावात, गावातील प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर १११ झाडांचे वृक्षारोपण केले जाते.

भारतासारख्या विकसनशील देशात मुलीचा जन्म हा तिच्या माता-पित्यासाठी जबाबदारीचे ओझे मानला जातो. पण पिपलांत्री गावच्या लोकांनी मात्र मुलीचा जन्म हा आनंदोत्सव मानून साजरा करायला सुरवात केली ती २००६ पासून.

झालं असं की गावचे त्यावेळचे सरपंच शामसुंदर पालिवाल यांची लाडकी कन्या किरण हिचा डिहायड्रेशनने मृत्यू झाला. शोकाकूल पालिवाल परिवाराने तिच्या स्मृतीप्रित्यर्थ गावाच्या वेशीजवळ एक झाड लावले.

त्यानंतर शामसुंदर पालिवाल यांच्या मनात कल्पना आली की गावातील प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर हे असे वृक्षारोपण केले तर उत्तमच होईल. साऱ्या गावकऱ्यांना विश्वासात घेऊन या परंपरेला २००७ मध्ये सुरवात झाली. आज जवळपास एक हजार हेक्टर जमिनीवर वृक्षारोपण झाले आहे.

पालिवाल सांगतात जेव्हा ते २००५ मध्ये सरपंच झाले तेव्हा साऱ्या परिसरात संंगमरवरासाठीचे खाणकाम चालू होते. या खाणींमुळे आजूबाजूचे डोंगर, परिसर उजाड झाला होता. पर्यावरणाचे नुकसान होत होते. आधीच कमी असलेल्या पाण्याची टंचाई अजूनच जाणवत होती.

पाण्याअभावी गावचा विकास रखडला होता. त्यातच राजस्थानातील इतर गावांप्रमाणे बालविवाह, मुलींना हीन वागणूक या गोष्टीही गावात होत्या. या मुलीदेखील कुटूंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून लहान वयातच मजूरी सारखी कामे करू लागत, ज्यामुळे त्या अशक्तच रहात व लहान वयातच मृत्यू पावत.

त्यातच २००७ मध्ये पालिवाल यांची मुलगी डिहायड्रेशनने मृत्यू पावली. हीच घटना एक नवीन वळण देणारी ठरली. त्याप्रमाणे आता गावात मुलीचा जन्म झाला की हिंदूंमध्ये शुभ मानल्या गेलेल्या संख्येइतकी म्हणजे १११ झाडे लावतात. यामुळे मुलीच्या जन्माचा आनंद तर साजरा होतोच पण पर्यावरणपूरकता ही वाढते. या संपूर्ण परिसरात आता जवळपास ३,५०,००० झाडे आहेत. ज्यात आंबा, उंंबर, चंदन, पिंपळ, बांबू, नीम यांसारखी पर्यावरणपूरक झाडे आहेत. या झाडांमुळे कधीकाळी उजाड,बंजर माळरान झालेली जमीन आज सदाहरीत बनली आहे.

मुलीच्या जन्माप्रित्यर्थ जरी वर्षभर वृक्ष लागवड होत असली तरी दरवर्षी ऑगस्ट महिन्यात एका खास उत्सवाचे आयोजन केले जाते. ज्यात त्या वर्षभरात जन्मलेल्या मुलींच्या हस्ते वृक्षारोपण होते.

५५०० लोकवस्ती असलेल्या या गावात दरवर्षी सरासरी ६० मुली जन्माला येतात. या मुली आपल्या नावाने लावलेल्या प्रत्येक झाडाला रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधतात. इथे झाडांनाही आपल्या कुटूंबातील घटक समजतात.

इतकेच नाही तर ज्यांना मुली नाहीत असे लोक ही आपल्या पुढच्या पिढीत येवू घातलेल्या मुलींसाठी वृक्षारोपण करतात. हा बदल नक्कीच सुखावह आणि सकारात्मक आहे.

येणारा नवीन सरपंच आणि इतर अधिकारी वर्ग यांना वडाच्या झाडाच्या साक्षीने ही परंपरा पुढे चालू ठेवण्याची शपथ घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

”राजस्थान हा योद्ध्यांचा देश आहे. पूर्वीच्या वीरांनी परकीय आक्रमणं थोपवली आणि आम्ही रोगराई आणि प्रदूषण यांच्याविरूद्ध लढतो आहोत.” पालिवाल सांगतात.

गेल्या काही वर्षांत पालिवाल यांच्या या योजनेने पर्यावरणपूरक आणि स्त्रीवादी चळवळीने व्यापक रूप घेतले आहे. वृक्षारोपणाबरोबरच नवजात मुलीच्या पालकांना एका शपथपत्रावर सही करावी लागते–ज्यात आमच्या मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न करणार नाही, तसेच तिचे शिक्षण ही पूर्ण करू, अशा अटी समाविष्ट असतात. याबरोबरच मुलीच्या पालकांकडून १०,००० रूपये व उर्वरीत गावातील लोकांच्या जमा वर्गणीतून अशी प्रत्येकी ३१००० रूपयांची दामदुप्पट ठेव पावती प्रत्येक मुलीच्या नावावर ठेवली जाते. मुलगी १८ वर्षांची झाली की ही जमा रक्कम मुलीच्या लग्नासाठी किंवा पुढील शिक्षणासाठी दिली जाते. यामुळे स्त्रीभ्रुणहत्या, बालमजूरी,बालविवाह या  वाईट गोष्टींना आळा बसला तर आहेच, पण गावातील मुली चांगले शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनियर, उच्चपदस्थ सरकारी अधिकारी होण्याची स्वप्नं बघत आहेत

पिपलांत्री गावात रुजलेल्या आणि वाढलेल्या या सदाहरीत जंगलामुळे आता भूजलाच्या पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. खाणकामामुळे उजाड बनलेल्या जमिनी हिरव्यागार झाल्या आहेत. झाडांमुळे वेगवेगळे पक्षी,प्राणी पिपलांत्रीमधे दिसतात. पायातून बागडणारे ससे किंवा दिवसा रस्त्यांवर फिरणारे मोर किंवा वेगवेगळ्या जातींचे पक्षी पिपलांत्रीमध्ये सहज दिसतात. ह्या सांस्कृतिक बदलामुळे स्त्रियांचेही जीवनमान उंचावले आहे. तुम्ही जर सतत काम करत राहिलात तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतातच आणि इतरही त्याच्याशी जोडले जातात हा पालिवाल यांचा अनुभव आहे.

मुलींचा सन्मान व पर्यावरणाचे रक्षण इतकाच या जंगलांच्या निर्मितीमागचा उद्देश नसून त्यातून स्थानिक लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा हाही हेतू होता. प्रत्येकालाच उद्योग किंवा कारखान्यांमध्ये नोकरी मिळेल हे शक्य नाही. त्यामुळे स्वयंरोजगार निर्मिती हाच आमचा उद्देश होता, असं पालिवाल सांगतात.

यात त्यांनी महिलांचे सहकारी बचतगट स्थापन करून त्याद्वारे महिलांना घरगुती पदार्थांचे उत्पादन आणि विक्री यांना प्रोत्साहन दिले जाते. एखाद्याचा मृत्यू झाला तरी ११ झाडांचे वृक्षारोपण केले जाते. या सर्व झाडांची लागवड गावाबाहेरील माळरान व रिकाम्या जागेत केली जाते.

पिपलांत्रीमध्ये वॉटर हार्वेस्टिंग बरोबरच, बंधारे बांधणे, त्यांचे रूंदीकरण तसेच शेततळ्यांची निर्मिती यांचीही कामे केली जातात. जर सरकारी योजनांचा योग्य पद्धतीने उपयोग केला तर एकटा माणूसही किती मोठा बदल करू शकतो याचे पिपलांत्री हे उदाहरण आहे.

आज इको-फेमिनिस्ट म्हणून ओळख मिळवलेल्या या गावाला अनेक जण भेट देतात. तसेच पिपलांत्री पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठीही येतात. गावात लग्न होवून आलेल्या मुली,स्त्रियाही  दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून उच्चशिक्षित होतात. राज्यसरकारने पिपलांत्री मॉडेलच्या अभ्यासासाठी गावात एक ट्रेनिंग सेंटरही उभारले आहे, तसेच राहण्याचीही व्यवस्था केली आहे. गावाच्या या कार्याबद्दल गावाचा ‘ राष्ट्रपती पदक ’ देऊन गौरव करण्यात आला आहे. १११ झाडांच्या लागवडीने सुरू झालेली ही चळवळ आज पर्यावरणपूरक जंगलांच्या निर्मितीत बदलली आहे.

जेव्हा परंपरांच्या माध्यमातून एखाद्या उदात्त कार्याची सुरुवात होते तेव्हा ते कार्य नक्की यशस्वी होते. बदल होतो.  फक्त तो होण्याच्या इच्छेने कामाला सुरुवात केली पाहीजे. ह्या शामसुंदर पालिवाल यांच्या उदाहरणावरून हेच सिद्ध होते.

संकलन : श्री साहेबराव माने

पुणे 

9028261973.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सख्खं म्हणजे काय? ☆ प्रस्तुती – सुश्री मानसी आपटे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ सख्खं म्हणजे काय? ☆ प्रस्तुती – सुश्री मानसी आपटे ☆ 

सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खी मैत्रीण, सख्खे काका, सख्खी काकू, सख्खी मावशी

नेमकं काय असतं हे “सख्ख प्रकरण?” 

 

सख्खा म्हणजे आपला सखा.

सखा म्हणजे जवळचा

जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही, केव्हाही, काहीही सांगू शकतो.

त्याला आपलं म्हणावं,

 त्याला सख्ख म्हणावं !

 

सध्याच्या कलियुगात, आपण काय करतोय हे सख्ख्या नातेवाईकांच्या कानावर पण पडता नये इतकी खबरदारी घेतली जाते, तिथे सख्य नसते- पथ्य असते.

 

ज्याच्याजवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो, मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा  काळजातलं दुःख सांगून स्फुंदून स्फुंदून रडूही शकतो त्याला सख्ख म्हणावं, त्याला आपलं म्हणावं !

 

ज्याच्याकडे गेल्यानंतर 

आपलं स्वागत होणारच असतं 

आपल्याला पाहून त्याला हसू

येणारच असतं

अपमानाची तर गोष्टच नसते 

फोन करून का आला नाहीस अशी तक्रारही नसते !

 

पंढरपूरला गेल्यावर 

विठ्ठल म्हणतो का …..

या या फार बरं झालं !

माहूरवरून रेणुका मातेचा 

किंवा कोल्हापूरवरून महालक्ष्मीचा किंवा तिरुपतीहून गिरीबालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ? या म्हणून !

मग आपण का जातो ?

कारण भक्ती असते, शक्ती मिळते आणि संकट मुक्तीची आशा वाटते ….म्हणून !

हाही एक प्रकारचा” आपलेपणाच !”

 

लौकिक अर्थाने, वस्तूच्या स्वरूपात देव आपल्याला कुठे काय देतो ? किंवा आपण नेलेले तो काय घेतो?

काहीच नाही.

 

रुक्मिणी काय पाठीवरून हात फिरवून म्हणते का, 

किती रोड झालीस ? कशी आहेस ? 

सुकलेला दिसतोस, काय झालं? —

नाही म्हणत.

 

मग दर्शन घेऊन निघतांना वाईट का वाटतं?

पुन्हा एकदा मागे वळून का पहावं वाटतं ?

प्रेम, माया, आपुलकी, विश्वास म्हणजेच “आपलेपणा !”

 

हा आपलेपणा काय असतो ?—

 

आपलेपणा म्हणजे भेटण्याची ओढ

भेटल्यानंतर बोलण्याची ओढ 

बोलल्यानंतर ऐकण्याची ओढ

निरोप घेण्याआधीच पुन्हा भेटण्याची ओढ !

 

ज्याला न बोलताही आपलं दुःख कळतं  त्याला आपलं म्हणावं 

मग ते नातं चुलत, मावस असलं तरी सख्ख म्हणावं !

 

मी त्याचा आहे आणि तो माझा आहे ही भावना दोघांच्याही मनात सारखीच असणे …..

म्हणजे ” आपलेपणा! “

 

एक शब्दही न बोलता ज्याला पाहिल्या पाहिल्या डोळे भरून येतात

आणि निःसंकोचपणे गालावरून ओघळू लागतात, 

तो आपला असतो , 

” तो सख्खा असतो !”

 

लक्षात ठेवा,

ज्याला दुसऱ्या साठी ” सख्ख ” होता येतं त्यालाच कुणीतरी सख्ख असतं, 

बाकी फक्त परिचितांची यादी असते —-नको असलेल्या माणसांची गर्दी असते !

 

तुम्हीच सांगा…..

फक्त आईची कूस एक आहे म्हणून सख्ख म्हणायचं का ?

ज्याला तुमच्या दुःखाची जाणीवच नाही त्याला सख्ख म्हणायचं का? 

 

आता एक काम करा —–

 

करा यादी तुम्हाला असणाऱ्या

सख्ख्या नातेवाईकांची 

झालं न धस्सकन 

होतयं न धडधड 

नको वाटतंय न यादी करायला ….

 

रडू नका, पुसून टाका डोळ्यातलं पाणी 

आणि मानायला लागा सर्वांना आपलं—– कोणी कितीही झिडकारलं तरी—-

 

कारण …रागराग आणि तिरस्कार करून काहीच हाती लागत नाही 

जग फक्त प्रेमानेच जिंकता येतं..

 

संग्राहिका : सुश्री मानसी आपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिना अखेरचे पान – 8 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिना अखेरचे पान – 8 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पावसाचं ये जा चालूच आहे. आषाढात कोसळणारया पाऊस म्हणजे भरू लागलेली धरणे आणि मनात महापुराची भीति. पण हळुहळू हा जोर कमी होऊ लागतो. पुन्हा पाऊस आणि बघता बघता पाऊस गायब. हा लपंडाव म्हणजे श्रावण. म्हणजेच ऑगस्ट. श्रावण असो किंवा ऑगस्ट, दोन्ही  दृष्टींनी हा महिना महत्वाचा. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील महत्वाच्या दोन घटना या महिन्यात घडल्या. एक म्हणजे नऊ ऑगस्ट!  1942 च्या या दिवशी स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळे वळण मिळाले. ‘चले जाव’ च्या घोषणेने अवघा देश दुमदुमून निघाला. दुसरा महत्वाचा  दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट. 1947 च्या या दिवशीच आपला देश स्वतंत्र झाला हे आपल्याला माहितच आहे. त्यामुळे हा ऑगस्ट महिना आपल्या सर्वांना खूप खूप महत्त्वाचा. या दोन महत्वाच्या दिवसांव्यतिरिक्त अन्यही काही दिवस महत्वाचे आहेत. एक ऑगस्ट हा मुस्लिम स्त्रिया हक्क दिन आहे. 1905 मध्ये बंगालाच्या फाळणीच्या विरोधात जी स्वदेशी चळवळ कलकत्त्यात सुरू झाली त्याची आठवण म्हणून सात ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीचा दिवस वीस ऑगस्ट राष्ट्रीय सद्भावना दिवस म्हणून पाळला जातो. तर हाॅकीतील किमयागार मेजर ध्यानचंद यांच्या गौरवार्थ एकोणतीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा होतो.

या ऑगस्ट महिन्यात जागतिक स्तरावरील अनेक दिवसांचेही महत्व आहे. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशीप डे आहे. आदिवासींचे अस्तित्व व त्यांची संस्कृती याकडे लक्ष वेधण्यासाठी नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. बारा ऑगस्ट जागतिक युवा दिन आहे. छायाचित्र कला व कलाकार यांच्या सन्मानार्थ एकोणीस ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी व एकवीस ऑगस्ट हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो.

सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट या दिवशी झालेल्या अणुबाँबच्या हल्ल्याच्या जखमांची आठवण करून देणारे दिवस म्हणजे अनुक्रमे हिरोशिमा दिन आणि नागासकी दिन. !

प्राण्यांचे रक्षण आणि वर्धन यांचे महत्त्व लक्षात आणून देणारे दिवस म्हणजे जागतिक सिंह दिन, हत्ती दिन आणि कुत्रा दीन. हे अनुक्रमे दहा, बारा आणि सव्वीस ऑगस्टला साजरे होतात.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, दत्तभक्त टेंबेस्वामी, हुतात्मा राजगुरु, गोस्वामी तुलसीदास, महानुभाव पंथाचे श्री चक्रधरस्वामी या महान व्यक्तींच्या जन्माचा हा महिना. तर याच महिन्यात लोकमान्य टिळक, अहिल्याबाई होळकर, राजीव गांधी या राष्ट्रीय नेत्यांच्या जीवनप्रवासाची अखेर झाली. भगवान पार्श्वनाथ यांचा निर्वाण दिनही याच महिन्यातील.

या ऑगस्ट इतकाच  महत्त्वाचा श्रावण महिना! एकीकडे निसर्गाची मुक्त उधळण तर दुसरीकडे सण, व्रतवैकल्यांची गडबड. रंग गंधाचे लावण्य अंगावर मिरवणारा मास. राखीपौर्णीमा साजरी करून भावाबहिणींचे नाते दृढ करणारा मास. नारळ वाहून समुद्राला शांत होण्याची विनंती करणा-या दर्यावर्दींचा मास. नागपंचमी, बैलपोळा यासारख्या कृषी संस्कृतीशी निगडीत असणा-या सणांचा महिना. मोहरमचे ताबूत नाचवणा-या मुस्लिमधर्मीयांचा मास.  पारशी नूतन वर्ष, फरवर्दिन, याच महिन्यात सुरू होते.

आषाढात कोसळून कोसळून दमलेल्या पावसाला थोडीशी विश्रांती घ्यावीशी वाटत असावे. म्हणून तर श्रावणातल्या हलक्याफुलक्या  सरी थांबून थांबून पडत असाव्यात. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने, श्रावणात निळा घन बरसून जाता जाता घनश्यामाची आठवण करून देत असतो. निसर्गातील आणि संस्कृतीतील वैभवाचे दर्शन घडवणारे साहित्य, काव्य, गीते यामुळे तर मनाची प्रसन्नता आणखीनच वाढत जाते. या प्रसन्न मनाने आपण सगळेच उत्सुक असतो मोरयाचे स्वागत करण्यासाठी!सुखकर्ता दुःखहर्ता अशा त्या गणरायाचे वेध लागलेले असताना, हवा हवासा वाटणारा श्रावण केव्हा निघून जातो, समजतही नाही. कालचक्राचे एक पाऊल मात्र पुढे पडतच असते.

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जय गणेश आणि निळी कमळं !! ☆ वसंत वैभव ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? विविधा ?

☆ जय गणेश आणि निळी कमळं !! ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

गणपती आणि निळी कमळं यांचं माझ्या मनात अतूट नातं आहे… २००३ साली माझ्या मुलाचं अभिजितचं लग्न झालं त्यानंतर पाच महिन्यांनी गणेशोत्सव आला. आमच्या घरात गणपती बसत नाही… पण घराच्या दारातच मंडळाचा गणपती बसतो… माझी सून प्रिया एक दिवस म्हणाली, आपण उद्या पहाटे दगडूशेठ हलवाईं च्या गणपतीला जाऊ ! आम्ही सर्वजण तयार होऊन पहाटे चार वाजता गणपतीच्या दर्शनाला गेलो, ते गणपती दर्शन अलौकिकच असतं ! गणेशाचा वाहण्यासाठी मुली /बायका निळी कमळं विकत असतात! गेली अनेक वर्ष आम्ही ती निळी कमळं विकत घेतोय बाप्पासाठी आणि घरी परतताना आमच्यासाठीही ! निळी कमळं फक्त त्याच एका पहाटे घेतली जातात… माझ्या आजोळच्या गावात एक तळं होतं ..म्हणजे आहे.. आमच्या लहानपणी त्यात असंख्य निळी कमळं असायची… निळ्याकमळाचं आकर्षण तेव्हांपासूनचं… पुढे निलकमल हा सिनेमा पाहिला तेव्हाही राजकुमारी “निलकमल” अर्थात वहिदा रेहमानला पाहून तळ्यातली निळी कमळंच आठवली होती….

दगडूशेठच्या गणपतीचं दर्शन घेण्याचा नेम अर्थात सूनबाईनी पाडलेला पायंडा २००३ पासून आम्ही पाळतोय कोरोना काळात तो खंडित झाला ! या वर्षी कदाचित पहाटे पाऊले गणेशाच्या दर्शनासाठी वळतील पण आता ही प्रथा आमच्या घरात सुरू करणारी प्रिया आणि अभिजित, सार्थक तिघेही सिंगापूरला आहेत सध्या! पण माझ्यासारखी एरवी “सूर्यवंशीय” असलेली बाई सूर्य उगवायच्या आत उठून तेव्हा सारखंच आताही गणेश दर्शन घ्यायला जाईल असं वाटतंय…

ती निळी कमळंही साद घालतीलच आ ऽऽऽऽ जाओ….अशी☺बस गणेशजी का बुलावा आना चाहिए….🙏

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी…???… अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ मी…???… अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

मी— १ मुलगी, १ बहिण, १ मैत्रीण, १ पत्नी, १ सून, १ जाऊ, १ नणंद, १ आई, १ सासू , १ आजी, १ पणजी,….

सर्व काही झाले… पण “ मी “ चं व्हायचं राहून गेलं… आयुष्य संपत आलं… अन् आता वाटतयं स्वतःसाठी जगायचंच राहिलं। 

कळत नव्हतं तोपर्यंत आईने आजीने नटवलं… नंतर दादा अन् बाबांनी बंधन घातलं… वयात आल्यावर माझ्या प्रत्येक गोष्टींचे अर्थ निघू लागले… अन् नकळत माझे चारित्र्यच चर्चेत यायला लागले… माझ्या फिरण्या वागण्या बोलण्या हसण्या वर सोईस्कररित्या बंधन आले… एका मित्राची मैत्रीण होतानाही समाजाने आडवे घातले… 

अन् आता काय शिक्षण झाले म्हणून काका बाबा स्थळ बघायला लागले…नोकरीचा प्रश्न मांडायला गेले तर म्हणे नोकरी आता कशी करणार …सासरच्यांना विचारुनच करावी लागणार… बाजारात वस्तू दाखविल्याप्रमाणे १० वेळा माझाही दाखविण्याचा कार्यक्रम झाला … प्रश्नांचं भांडार अन् अपेक्षांचा ढीग माझ्यासमोर आला… त्याचा हसत हसत स्वीकारही केला -साथीदाराकडे बघून… नंतर त्याचे फोन, त्याची मर्जी सुरु झाली… मी स्वत्व अर्पण केल्यावर त्यानेही मला खूप आश्वासने दिली… नकळत मी एका ‘ संसार ‘ नावाच्या नव्या विश्वात ढकलले गेले …

अन् पुढचे आयुष्य जणू मृगजळच झाले … घर नवरा सासू सासरे यांच्यात गुंतले… छोट्या छोट्या गोष्टी येत नाहीत म्हणून बोलणे टोमणेही ऐकले… माहेरी नाही सांगितले, वाईट वाटेल म्हणून… हसतमुख राहिले नेहमी दुःख लपवून…अन् अचानक माझ्यावर कोडकौतुकाचा वर्षाव झाला सुरू… कारण माझ्यामुळे येणार होतं घरात एक लेकरु… मुलगा की मुलगी चर्चा झाली सुरू… अन् खरचं मलाही कळत नव्हते काय काय करु… विस्कटलेल्या मनाने पुन्हा एकदा उभारी घेतली…

अन् कोमेजलेल्या फांदीला पुन्हा नवी पालवी फुटली… नऊ महिने सरले… अन् त्या निष्पाप जिवाकडे बघून मी भरुन पावले… आई असे नवे नाव मला मिळाले… त्या छोटयाश्या नावासोबतच खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आली… आनंद मानत राहिले नेहमी मुलांच्या आनंदात… वेगळीच धांदल उडू लागली माझी घर सांभाळण्यात … 

आतापर्यंत साठवलेल्या स्वप्नांना गच्च गाठ मारली… अन् मुलांसाठी पै पै साठवली… शिक्षण झाले भरपूर,  तशी नोकरीही मिळाली दोन्ही मुलांना… आई वडिलांसह सोडून गेले देशाला… मधून मधून येत होते. भेटी गाठी घेत होते. … लग्न तुम्ही जमवा म्हणाले तेच काय कमी होते? … लग्न झाले दोघांचे तशी सासूही झाले… मुलांपेक्षा जास्त आता नातवांची वाट पाहत राहिले … उतारवयात आता त्यांच्याच आधार वाटू लागला … अन् दुधात साखर म्हणजे एक नातू  माझा भारतात सेटल झाला… पुन्हा एकदा मन माझे त्याच्यात रमले… आता त्याचे लग्न झाले … नातसुनेचे पाऊल घराला लागले … मन आनंदाने भरुन गेले… अन् कवळी बसवलेल्या बोळक्याला हसू आले…

अपेक्षांचा आलेख उंचावत होता… अन् मला पणतीचा चेहरा पहायचा होता … तीही इच्छा माझी पूर्ण झाली… घरात एक  गोंडस पणती आली… पुन्हा ए कदा मीही तिच्यासोबत बालपणात गेले…

अन् आता मात्र सर्वजण वाट पाहू लागले … माझ्या मरणाची… तेव्हा पाणावलेल्या डोळ्यांनी मनात घर केलं…

अन् सगळं काही झालं असताना उगाच काही तरी बाकी असल्यासारखं वाटू लागलं…संपूर्ण आयुष्याचा आढावा मी घेतला आणि लक्षात आले की… ‘मी’ व्हायचंच  राहून गेलं … सर्वांची लाडकी झाले, पण स्वतःची झालेच नाही कधी …नेहमी दुसऱ्यांचा विचार केला– स्वतःच्याही  आधी…हे सर्व लक्षात यायला ९० वर्षांचा काळ लोटला होता …

पण आता मात्र माझ्या मनाने ठाम निर्णय घेतला होता… कपाट उघडून माझ्या आवडीचा स्लिवलेस ड्रेस घातला… मस्त मेकअप करुन तयार झाले मनसोक्त फिरायला … कुठे जायचयं असं काहीच ठरलं नव्हतं …देवाला मात्र सारं काही ठाऊक होतं … त्यानेही मस्त गेम खेळला माझ्याशी … पर्स घेऊन बाहेर आले तर यमराज उभा होता दाराशी … !!

— असे होण्याआधीच जीवनाचा खरा आनंद घ्या, स्वतःला देखील वेळ द्या, आणि आपणच आपले लाड करा.

 “ मी “ ला ओळखा.

लेखक : अनामिक

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तो निसर्गच असतो… व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ तो निसर्गच असतो… व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

शिक्षणानं सगळी उत्तरं मिळत नाहीत. मेंदूतल्या आळसावलेल्या पेशींना शिक्षण फक्त जाग आणतं. वस्तू, माणसं, आकडे, इतिहास ह्यांची कोठारं म्हणजे मेंदू. स्मरणशक्ती, स्मृती ह्यांचं प्रचंड गोडाऊन म्हणजे मेंदू. किडलेलं धान्य, विचार, आठवणी फेकून देण्याचं सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय शिक्षणाचं ज्ञानात रूपांतर होत नाही. शिक्षण म्हणजे पोपटाचा पिंजरा. ज्ञान म्हणजे राजहंस. नीर-क्षीर भेद समजल्याशिवाय अनावश्यक माहितीनं बेजार झालेला मेंदू टवटवीत राहणार नाही. नव्या शुद्ध विचारांसाठी त्या करोडो पेशी रिकाम्या हव्यात आणि भक्तीसाठी मनाचे, कमळाच्या पानाचे द्रोण निर्लेप हवेत. अशा रिकाम्या जागी जो उतरतो तो निसर्गच असतो.

वपु काळे. ~’ तू भ्रमत आहासी वाया..’ 

संग्राहिका : मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 5 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 5 ☆ सौ. अमृता देशपांडे  

मुलींच्या शाळेत ‘ सारेगमप ‘ स्पर्धा होती. नमिताची  व ईशाची 30 मुलींमधून निवड झाली. इतर मुलीही होत्या. आठवडाभर प्रॅक्टीस आणि रविवारी स्पर्धा असे दोन महिने चाललं होतं.  शेवटी फक्त दोनच स्पर्धक राहिले.  नमिता आणि ईशा. दोघीही अतिशय तयारी करून आल्या होत्या. अंतिम टप्पा गाठला.  दोघींचीही चार चार गाणी झाली आणि निकालाचा क्षण आला.  मंचावर दोन स्पर्धक – दोघी मैत्रिणी होत्या. उत्सुकता, बावरलेपण, धडधडणारी छाती, दोघींही आतुरतेने वाट पाहत होत्या. एकमेकींचे हात घट्ट पकडून उभ्या होत्या. निकाल घोषित झाला.  नमिता जिंकली होती.  दोघीही एकमेकींना घट्ट मिठी मारून रडायला लागल्या. किती समजावले तरी थांबेनात. शेवटी मुख्याध्यापिका मंचावर गेल्या.  त्यांनी दोघींना सावरले. त्यांनी नमिताला विचारले, “नमिता,  तू का रडते आहेस? तू Winner आहेस ना?” नमिता रडतच बोलली, ” मॅडम,  ईशा जिंकली नाही म्हणून मला वाईट वाटलं ” तर ईशा म्हणाली, ” नमिता Winner झाली म्हणून मला खूप आनंद झालाय, इतका कि मला रडू आलं ” .

अश्रू चं इतकं निरागस, सुंदर रूप दुसरं कुठलं असू शकेल?

नमिता, ईशा एकमेकींसाठी रडल्या. आपल्या यशापेक्षा जिवलग मैत्रिणीचं अपयश मनाला लागणं, आणि मैत्रिणी च्या यशात आपलं अपयश विसरून जाणं,  हा मैत्रीचा आणि यश अपयश या दोन्ही ला योग्य प्रकारे सामोरे जाण्याचा धडा दोघींनी घालून दिला.

जर त्या भावना आवरून रडल्या नसत्या तर मैत्रीची,  प्रेमाची जागा असूया, ईर्ष्या  , हेवा यांनी घेतली असती. किती धोकादायक होतं ते! म्हणून त्या रडल्या ते योग्यच होतं ना!

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डाउन साइझिंग… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ डाऊनसाइझिंग… ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

नेमेची येतो मग पावसाळा, या उक्तीप्रमाणे दरवर्षी जाणारी मी, जवळजवळ तीन वर्षांनी अमेरिकेला लेकीकडे गेले. कोरोना संकटामुळे 3वर्षे जाऊ शकले नव्हते. यावेळी बरेच बदल घडलेले दिसले. तिकडे नेहमी गेल्यामुळे,तिकडे कायम राहणाऱ्या,समवयस्क मैत्रिणीही झाल्या होत्या माझ्या.  

जरा स्थिरस्थावर झाल्यावर विचारले, “रमाला करू का फोन? बरी आहे ना ती?” 

 मुलगी म्हणाली, “अग, त्या आता आमच्या शहरात राहत नाहीत.” 

रमा म्हणजे बडे प्रस्थ होते इथले. तिचे यजमान नामांकित भूलतज्ञ होते इथे. मग भाग्याला काय उणे हो? अतिशय आलिशान, लेकसाइड,  भव्यदिव्य १५-१६ खोल्यांचे घर, स्वतःची बोट, मोठा डेक  असे फार सुरेख घर होते रमाचे. माझ्या मुलीशी त्यांची दोस्ती होती. खरेतर ते माझ्या वयाचे, पण गाणे,याकारणाने त्यांची अदितीशी, आणि पर्यायाने माझ्याशीही खूप छान दोस्ती झाली.

माणसांचा खूप लोभ त्यांना. मुलगे दुसऱ्या गावात  स्थायिक झालेले आणि सुना दोघीही अमेरिकन. त्यामुळे एकत्र राहण्याचा प्रश्न संभवत नाही. दोघेही अतिशय रसिक, त्यामुळे इकडे नाटक घेऊन भारतातले लोक आले, की रमाकडेच त्यांचे रहाणे, पाहुणचार, हे ठरलेलेच. 

डॉक्टर रिटायर झाले आणि एवढ्या मोठ्या घरात खूप वर्षे दोघेही राहिले —  माणसे बोलवत, मैफिली जमवत.!! मुले मात्र खूप दूरच्या शहरात नोकऱ्या करत होती. आता संध्याछाया दिसू लागल्या. रमाची दोन्ही गुडघ्याची ऑपरेशन्स  झाली. मुले आली नाहीत ,त्यांना रजा नव्हत्या. दोघांनीच  ते निभावले. हळूहळू इतर तक्रारीही सुरू झाल्या. आता मात्र हे घर विकून टाकून, लहान घर घ्यावे आणि मुलाच्याजवळच घर बघावे, हा निर्णय रमाआणि माधवने घेतला. हा मुलगा त्यातल्या त्यात त्यांच्याजवळ होता–. म्हणजे 2 तास ड्राईव्हवर.

अतिशय दुःखाने रमा-माधवने आपले टोलेजंगी घर विकले, आणि जरा लहान घरात ते  गेले. आपले इतके वर्ष साथ देत राहिलेले शहर, मित्र मंडळ सोडून. आता त्यांना भेटायला जाणे मला शक्य नव्हते .फोनवरच बोललो आम्ही. रमाला अतिशय वाईट वाटत होते. 

मला म्हणाली, “,काय करणार ग?  कोण येणार आमच्या मदतीला सारखे? त्यापेक्षा म्हटले,जवळच्या मुलाच्या घराजवळ घर घ्यावे. त्यालाही बरे पडेल,आणि त्याच्या लहान मुलांनाही आमचा उपयोग होईल. ही अमेरिका आहे बरं. म्हातारपणी असेच डाउन सायझिंग करावे लागते. आपला पसारा आवरून लहान घरात आणि तिकडून मग  old age होम, हाच पर्याय उरतो इकडे.त्यालाही आमची मानसिक तयारी झाली आहे. बघ,जमले तर ये भेटायला,आणि नवीन घर बघायला. निराशा होईल तुझी.हे घर काहीच नाहीये आमच्या पूर्वीच्या घराच्या तुलनेत.” 

रमाने फोन खाली ठेवला. तिचा downsizing शब्द मात्र मनात रुतलाच. मी विचार करू लागले, आपणही आता म्हातारे व्हायला लागलोय, नव्हे झालोच आहोत. मी माझे घर डोळ्यासमोर आणले. एकतर मोठ्ठे  घर आणि  भयंकर हौस !!. निरनिराळे सामान, वस्तू, सुंदर क्रोकरी, बेडशीट्स, कपडे – भांडी जमवायची. —बाप रे. हौसेहौसेने मी जमवलेले  क्रोकरी सेट्स आले डोळ्यासमोर. शिवाय खूप पूर्वी आईने दिलेले म्हणून जपून ठेवलेले ‘स्टीलची १२  ताटे, १२ वाट्या ‘असे सेट्स—माझ्याकडे आता कोण येणार आहेत बारा आणि पंधरा लोक ? हल्ली आम्ही घरी शक्यतो पार्ट्या करतच नाही, आणि इतके लोक तर नसतातच ना. मग बाहेरच जमतो सगळे एखाद्या छानशा हॉटेलमध्ये.

पूर्वीची गोष्ट वेगळी होती. पैसा कमी असायचा. बाहेर हॉटेलात जायची पद्धतही नव्हती. सगळेघरी करण्याकडे गृहिणीचा कलअसायचा, हाताशी वेळही भरपूर असायचा. आता काळ किती बदलला, आम्हीही  बदललोच  की. मी जरी अतिशय व्यस्त होते माझ्या व्यवसायात, तरी सगळे घरीच करायची. त्यासाठीही जमवलेली भांडीकुंडी आता कशाला लागणार आहेत ?

मध्यंतरी, बहिणीच्या कोकणातल्या गावात,  रामाच्या देवळात उत्सवअसतो, त्यासाठी देऊन टाकली सगळी ताटे वाट्या भांडी. कामवाल्या वंदनाला दिली धडअसलेली पण मला कंटाळाआला म्हणून नको असलेली बेडशीट्स.  कपाट आवरायला काढले तर नको असलेल्या नावडत्या ड्रेसचे ढीग काम करणाऱ्या सुरेखाच्या मुलीला देऊन टाकले, आणि एक कप्पा रिकामा झाला. हल्ली मी फार  क्वचितच साड्या नेसते. बघितले तर साड्यांची उतरंड लागलेली गोदरेजच्या कपाटात. भावजय साडीच नेसते, तिला म्हटले,घेऊन जा ग तुला हव्या त्या साड्या.—-तरी अजून सगळ्या देऊन टाकायला मन होत नाही ते वेगळे. ”एवढी आध्यत्मिक पातळी गाठली नाहीअजूनआईने,” असे उपहासाने मुली म्हणाल्याच– दुष्ट कुठल्या– असो.

असे करत, बरंच आवरत आणलंय सध्या. आता कसं सुटसुटीत वाटतंय घराला आणि मलासुद्धा. मध्ये एकदा कामवाली म्हणाली, “ताई ब्याग द्याकी एखादी जुनी. कपडे ठेवायला बरी पडेल .”  माझ्याकडच्या असंख्य मोठ्या बॅग्सपैकी एक बॅग तिला आनंदाने दिली. तिच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद मला किती समाधान देऊन गेला म्हणून सांगू.

आता मी परदेशात गेले की तिकडून येताना हावऱ्यासारखी खरेदी करत नाही. नुसते बघते सगळे पण घेत मात्र काही नाही. मन भरून तृप्त झाले माझे आता. पूर्वीसारख्या बॅग्स दाबून भरत नाही. आता नकोच वाटतो हा पसारा आणि हव्यास. मुलगी म्हणाली, ”हे काय? यावेळी काहीच नाही का खरेदी करायची?”   म्हटले, “ वा ग वा. नाही कशी?माझ्या प्रियजनांना भरपूर चॉकलेट्स नेणार,बदाम पिस्ते नेणार तर. आणि माझ्या वंदना, स्वाती,संगीता या घर काम करणाऱ्या माझ्या सहकारी बायकाना कुठे नेलपॉलिश, कुठे छानशी किसणी, कुठे नॉनस्टिक तवा, अशा त्यांना वाटणाऱ्या अपूर्वाईच्या गोष्टीच फक्त नेणार. बाकी लोकांकडेअसते सगळे. त्यांना नाही कसली अपूर्वाई.”  मुलगी हसली आणि म्हणाली, ‘रोज व्हाट्सअपवर येणाऱ्या अध्यात्मिक मेसेजचा परिणाम झालेला दिसतोय आईवर.”  म्हटले, “नाही ग बाई, उलट रमापासून धडा घेतलाय की अमेरिकेसारखे आता  पुण्यात पण आम्ही डाउन सायझिंग करायला शिकले पाहिजे. नकोच तो वस्तूंचा हव्यास, आणि व्याप तितका ताप. यावेळी खरंच येताना दोन्ही बॅग्स अगदी कमी भरल्या वजनाने. आता घरी कोणतीही वस्तू घेताना मनाला दहावेळा विचारीन,की ही खरंच हवीय का. 

रमाकडून शिकलेला हा अनमोल… पसारा आवरण्याचा धडा ,गिरवायला सुरवात केली आहे हे नक्की ! रमाने नाईलाजाने केले डाउनसायझिंग, पण मी मात्रअगदी समाधानानेआणि न कुरकुरता सुरवात केलीय.

 — तर मग मैत्रिणींनो करा सुरवातआवरायला, —आणि घराचे आणि मनाचेही डाउनसायझिंग करायला—

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ थेरेसा सर्बर माल्कल! ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ थेरेसा सर्बर माल्कल! ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

रशियातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या या बाईंमुळे जागतिक महिला दिन साजरा होतो.. वाचा त्यांचं कार्य काय आहे….. थेरेसा सर्बर माल्कल!

हे नाव तुम्ही पूर्वी कधी ऐकलं आहे का? नाही? आज आपण जो जागतिक महिला दिन साजरा करत आहोत त्याचा आणि या नावाचा घनिष्ठ संबंध आहे. कसा तो आम्ही सांगतो…

मंडळी, एखादा दिवस साजरा करण्यामागे नेमके काय कारण आहे, त्याचा इतिहास काय आहे, हा पायंडा कुणी पाडला हे जाणून घेणे महत्वाचे असते. जर ही माहिती तुम्हाला असेल तर तो दिवस साजरा करण्याचा आनंद द्विगुणित होतो. आता आजच्या जागतिक महिला दिनाचेच उदाहरण घ्या ना..  सर्वांना माहीत आहे की आज महिला दिन आहे, पण याची सुरुवात थेरेसा सर्बर माल्कल या महिलेने केली हे कुणालाच माहीत नाही. दुर्दैवाने थेरेसा आज विस्मृतीत गेल्या आहेत. चला तर मग आजच्या दिवसाचे निमित्त साधून आपण त्यांची ओळख करून घेऊया…

थेरेसा यांचा जन्म १ मे १८७४ ला  रशियातल्या बार नावाच्या शहरात एका ज्यू परिवारात झाला. जन्मापासूनच ज्यू विरोधी वातावरणात वाढलेल्या थेरेसा यांना आणि त्यांच्या परिवाराला रशियाच्या त्झार राजवटीत प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यामुळं अनेक कुटुंबे तिथून स्थलांतर करून अमेरिकेत गेली. त्यात थेरेसा यांचेही कुटुंब होते.  १८९१ साली अमेरिकेत  दाखल झाल्यावर थेरेसा यांनी इतर ज्यू लोकांप्रमाणे चरितार्थासाठी मिळेल ते काम  केले. प्रथम एका बेकरीमध्ये, नंतर एका कपड्यांच्या कारखान्यात त्यांना काम मिळाले. त्यांचा मूळ स्वभाव चळवळ्या आणि बंडखोर असल्याने त्यांचे लक्ष कामगार स्त्रियांच्या प्रश्नांकडे वेधले गेले. थेरेसा फक्त प्रश्न बघून गप्प बसणाऱ्या महिला नव्हत्या… त्या प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करू लागल्या आणि त्यातूनच कामगार स्त्रियांच्या संघटनेची निर्मिती त्यांनी केली.  या स्त्री संघटनेतून स्थलांतरित कामगार स्त्रियांचा आवाज उठवण्याचे काम त्या करू लागल्या.

लवकरच त्यांच्या असे लक्षात आले की, फक्त संघटना चालवून भागणार नाही. महिलांना पुरुषांच्या समान हक्क हवे असतील तर राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखले. आता त्यांनी कामगार स्त्रियांच्या प्रश्नांसोबतच एकंदरीत स्त्री-पुरुष समानतेवरही लक्ष केंद्रित केले. सोशालिस्ट पार्टीमध्ये प्रवेश करून त्यांनी राजकारणात शिरकाव करून घेतला. त्यावेळी सोशालिस्ट पार्टी ही  एकमेव अशी पार्टी होती ज्यात महिलांना प्रवेश मिळत असे. आम्ही स्त्री-पुरुष भेदभाव करत नाही असा त्यांचं ब्रीदवाक्य होतं. यामुळेच थेरेसा सोशालिस्ट पार्टीकडे आकर्षित झाल्या होत्या. परंतु दुर्दैवाने लवकरच त्यांना सत्य समजले की पार्टीचा नारा फक्त दिखाऊ स्वरूपाचा होता. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत महिलांना नगण्य स्थान मिळत असे. थेरेसा यांनी यामुळे निराश न होता असे ठरवले की, पार्टी न सोडता आपली समांतर विचारधारा चालवून आपले ध्येय साध्य करायला हवे. त्यांनी सोशालिस्ट महिलांची एक वेगळी चळवळ सुरू केली आणि महिलांसाठी राजकारणात एक वेगळे स्वतंत्र व्यासपीठ असायला हवे असे जोरदार मत मांडले.

शेवटी सोशालिस्ट पार्टीने त्यांचे म्हणणे मान्य केले आणि अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच महिलांसाठी वेगळे डिपार्टमेंट बनवण्यात आले. त्याच्या अध्यक्षपदी थेरेसा विराजमान झाल्या. मंडळी, त्या काळी ही गोष्ट अजिबात सोपी नव्हती! एक तर महिला, त्यात अमेरिकेबाहेरील स्थलांतरित कामगार… ही एका नव्या पर्वाची सुरुवात होती!

या पदावर बसून थेरेसा यांनी महिलांच्या हक्कासाठी लढा दिला. त्यातलाच एक हक्क म्हणजे  महिलांना मतदानाचा अधिकार! तोपर्यंत अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. तो मिळायलाच हवा हा मुद्दा थेरेसा यांनी सर्वांसमोर मांडला आणि बरेच प्रयत्न करून त्यासाठी समर्थन मिळवले. या सोबतच महिलांचे अनेक प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले. महिलांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण केली.

थेरेसा यांनी जगाचे लक्ष महिलांच्या समस्यांकडे वेधले जावे म्हणून एक कल्पना मांडली. वर्षातला एक दिवस ‘महिला दिन’ म्हणून साजरा व्हावा हीच ती कल्पना…  सोशालिस्ट पार्टीने त्यांना याबाबतीत साथ दिली आणि अमेरिकेत पहिला ‘राष्ट्रीय महिला दिन’ १९०९ साली २८ फेब्रुवारी रोजी साजरा झाला. ही कल्पना नंतर युरोपियन देशांमध्ये सुद्धा पसरली आणि नंतर जगभरात लोकप्रिय झाली. आज सर्वानुमते जगभरात एकाच दिवशी म्हणजे ८ मार्च रोजी ‘जागतिक महिला दिन’ साजरा होतोय, या मागे मूळ कारण थेरेसा सर्बर माल्कल या आहेत.

थेरेसा माल्कल यांचे १७ नोव्हेंबर १९४९ मध्ये निधन झाले. एक स्थलांतर होऊन अमेरिकेत आलेली मुलगी ते अमेरिकेच्या राजकारणातील बलशाली महिला असा त्यांचा थक्क करणारा प्रवास होता. त्यांचे निधन झाल्यावर हळू हळू लोक त्यांना विसरले. आज आपण महिला दिन साजरा करतो पण थेरेसा यांचा उल्लेख कुठेही होत नाही हे दुर्दैवी सत्य आहे.

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वय असतं का पावसाला? ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ वय असतं का पावसाला?☔ ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

हो असतं की…….

मऊ दुपट्यात आईच्या खांद्यावरून बघताना पाऊस एक वर्षाचा असतो.

वाजणारे बूट मुद्दाम डबक्यात आपटत चालताना पाऊस चार वर्षाचा असतो..

शाळेतून येताना छत्री मुद्दाम वाऱ्याच्या दिशेने धरून उलटी करताना पाऊस बारा वर्षाचा असतो..

ट्रेकिंग करताना चिंब भिजल्यावर टपरीवर चहा पिताना पाऊस टीन एज ओलांडत असतो..

तिला पाऊस आवडतो, रिमझिम गिरे सावन वगैरे गाणी ऐकताना अपरिहार्यपणे पाऊस गद्धे पंचविशीत असतो.

भिजायला नको वाटायला लागलं की पन्नाशी येते पावसाची..

गुडघे दुखू लागले की साठीशांत होते पावसाची..

नंतर नंतर पाऊस  मफलर कानटोपी गुंडाळून काठीच घेतो हातात ,आणि नातवंडांना ओरडतो पण, की अरे भिजू नका रे पावसात..

आपल्यासोबत बदलत जाणारी पावसाची रूपं पाहिली की मनात येतं…

 

किती पहावा पाऊस

धुके चष्म्यात दाटले

किती गेले पावसाळे

थोडे डोळ्यात उरले..

 

वय पावसाला नाही

वय मला भिववीते

अशा सर्दाळ हवेत

संधी वाताला मिळते. 

 

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares