मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सत्यकथन ! ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ? 

☆ सत्यकथन ! ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

पूर्वीच्या लोकांचे काही आडाखे असायचे पावसाबाबत. आणि ते ते बहुतांशी सत्यात उतरायचे.

आम्ही ज्या कंपाऊंडमध्ये राहतो त्याच्या पलीकडे जोशांचे कंपाऊंड, आणि त्या पलीकडे वेलणकरांचं कंपाउंड. वेलणकरांच्या कंपाउंडमध्ये एक भला मोठा चिंचेचा वृक्ष होता. तो कमीतकमी अडीचशे-तीनशे वर्षांचा असावा, असं वनखात्याच्या अधिकाऱ्यांचं गणित होतं. एप्रिलमध्ये त्याच्यावर लाखो फुलं फुलायची. मे महिन्यात ती वाऱ्यावर गरगरत खाली जोश्यांच्या कंपाउंडमध्ये पडायची. आमच्या घराच्या मागच्या पडवीत ती फुलं पडली की चोवीस तासात पाऊस हजर होणार, हे आमच्या आईचं निरीक्षण होतं. तसं तिचं भाकित ती सांगायची. आणि विशेष गोष्ट म्हणजे गेल्या सत्तर वर्षांत माझ्या डोळ्यांसमोर ते भाकित कधीच चुकलेलं नाही !! 

दोन वर्षांपूर्वी तो चिंचेचा भला मोठा वृक्ष कोसळला! आता पर्जन्यागमनाचं भाकित घरच्या घरी करण्याची सुविधा देणारा तो भविष्यवेत्ताच हरपला!

अशी अनेक विषयांच्या वरची भाकितं जुनी मंडळी करायची आणि ती सहसा चुकत नसत. कारण त्यामागे निसर्गाचं खोल निरीक्षण, अनुभव, तर्कबुद्धी आणि अभ्यास असायचा.

मृगाचे किडे कधी दिसतील, भारद्वाज पक्षाचं दर्शन साधारणपणे कधी होईल, याचं भाकित आठ-आठ दिवस आधी वर्तवलं जायचं. उत्तरायण आणि दक्षिणायनाचे परमोच्चबिंदू (turning points) साधारणपणे कोणत्या दिवशी येतील, हे घरात पंचांग येण्याआधीच सांगितलं जायचं.

अशी ती माणसं. हुशार आणि चतुर!

️️️️️©  सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शायद फिर इस जनम में … ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? विविधा ?

☆ शायद फिर इस जनम में … ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

आजच्या रंगोलीत लागलेलं हे गाणं. सर्वाना माहित असणारे, आवडणारे आणि प्रसिद्ध झालेले हे गाणे. गीत/ संगीत / अभिनय या सर्व दृष्टीने जमून आलेले गाणे. या गाण्याला मी प्रेम गीत वगैरे पेक्षा ‘विरह गीत’ या कँटँगरीत बसवेन.

हे गाणे ऐकले आणि मला काहीच दिवसांपूर्वी ज्योतिष अभ्यासक श्री. सचिन मधुकर परांजपे (पालघर)  यांनी लिहिलेला एक लेख आठवला. त्याचा सारांश असा:-

==========================

टेक्निकली नियतीने एक समीकरण मांडलेलं असतं. सहवासाच्या अकाऊंटचं… जोवर ती वेळ, त्या सहवासाचे हिशेब पूर्ण होत नाहीत. अकाऊंट टॅली होत नाही तोवर तो मनुष्य आपल्या आयुष्यात असतो आणि नंतर निघून जातो

नियतीचा देणंघेण्याचा हिशेब पूर्ण झाला की माणसं आयुष्यातून काढता पाय घेतात. ..एखाद्या माणसाचं आयुष्यातून चटकन निघून जाणं (मी मृत्यूबद्दल म्हणत नाही)…. एक्झिट घेऊन पाठ फिरवून जाणं आणि पुन्हा कधीच न येणं हे तुम्ही नियतीचा खेळ म्हणून जितक्या सहजतेने स्विकार कराल तेवढे तुम्ही अधिकाधिक लवचिक, शांत आणि धीरोदात्त बनत जाता. कोणाचंही असं तडकाफडकी निघून गेल्यावर विनाकारण अपराधीपणाची भावना बाळगून स्वतःला दोष न देता सावरुन घ्या. शांत व्हा आणि गोष्टी स्विकार करत चला…. दुसरा पर्याय नसतो..”

=========================

फिर आप के नसीब में

ये बात हो ना हो

शायद फिर इस जनम

में मुलाक़ात हो ना हो

वरील लेख हा या गाण्याचे एक वेगळे रसग्रहण आहे असे म्हणले तर ते मुळीच चुकीचे ठरणार नाही

मंडळी,  असे अनुभव आपल्यालाही आलेत. लहानपणापासून आजपर्यंत अनेक व्यक्तींचा ठराविक कालावधीत आपला संबंध येतो मग अगदी बालपणीचे मित्र/ मैत्रीण असतील, शाळा / काॅलेज मधील असतील ,आँफीस मधले सहकारी असतील किंवा एखाद्या गावात परिचितांकडे भेटलेली एखादी कायम लक्षात राहिलेली ‘अवलिया ‘ व्यक्ती असेल.  ब-याचदा प्रासंगिक घटनांनी त्यांची आठवण येते, त्या ठिकाणी गेल्यावर प्रसंग उभे राहतात पण परत ती व्यक्ती भेटतेच असे नाही

मात्र वरील लेखात म्हणल्याप्रमाणे ज्यांच्याशी अजून तुमचे अकांट टॅली झाले नाही, म्हणजेच दुस-या अर्थाने अजून तुमचे ‘ ऋणानुबंध ‘ तितकेच जबरदस्त आहेत असे सुहृद तुम्हाला लवकरात लवकर भेटोत ही सदिच्छा

लेखाचा शेवट आजच्या रंगोलीतीलच आणखी एका गाण्याने

चले थे साथ मिलके चलेंगे साथ मिलकर

तुम्हे रुकना पड़ेगा मेरी आवाज़  सुनकर

( तुम्हे रुकना पड़ेगा मेरा लेख  पढकर😬)

 

शुभ रविवार 🙏

#माझीटवाळखोरीपुढे_चालू 📝

© श्री अमोल अनंत केळकर

२९/०५/२२

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

www.poetrymazi.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्रीमंती मनाची— ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ श्रीमंती मनाची— ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

सोसायटी मध्ये गॅस ची pipeline टाकण्याचे काम सुरू झाले. खोदण्या साठी आलेले कामगार, आणि बायकापोरे यांचा नुसता कलकलाट सुरू झाला. सर्व बंगल्यांसमोरच मोठे खड्डे खणत होते. आमच्या गल्लीत पण मोठे खड्डे खणायचे काम सुरू झाले. 

मी रोज खिडकीतून हे दृश्य बघायची. त्या बायका  गड्यांच्या बरोबरीने पहार घेऊन जमीन खणत होत्या.

माती घमेल्यात भरून टाकायची, आणि मग संध्याकाळी ट्रक येऊन ती घेऊन जायचा. कमीतकमी आठ दहा दिवस तर हे काम चालणार होतंच.

दुपार झाली की सगळे लोक झाडाखाली जमत,आणि आणलेली भाजीभाकरी हसत खेळत खात. रोज मी त्यांच्या साठी कळशी भरून पाणी ठेवत असे. संध्याकाळी जाताना लख्ख घासलेली कळशी पायरीवर ठेवलेली असायची.

 आमच्या बंगल्या समोर काम करणारी एक मुलगी  छोट्या बाळाला घेऊन यायची. ते पोर असेल एक दीड वर्षाचे.

नुकतेच चालायला लागले होते. एका फुटक्या डबड्याला दोरी बांधली होती. ते मूल ते डबडे ओढत सगळीकडे  मजेने हिंडायचे.

त्याच्या आईशी माझी हळूहळू ओळख झाली.

“ काय ग नाव बाळाचे? “

“ नवसाचा आहे तो म्हणून मल्हारी हाये आमचा. “ तिने कौतुकाने सांगितले.

“ आणि तुझे ग? “

म्हणाली, “मी हाये रेसमा. मालकांनी हौसेने माझे नाव रेसमा ठेवलंय. “

मला हसूच आले. रेश्मा म्हणता न का येईना, पण नाव भारी होते की नाही?

तर रेसमा काळी सावळी, पण काय सुंदर  फिगर होती तिची–बघत राहावे अशी–

आत्ताच्या मुली झक मारतील अशी घाटदार. छान साडी असायची अंगावर. डोक्यात फूल, भरगच्च केस, नाकात मोरणी. आली की साडी बदलून जुने नेसायची. पोराला झाडाखाली जुन्या धडप्यावर निजवायची. तेही पडून खेळत राहायचे. मला मोठी गम्मत वाटायची या  कुटुंबाच. 

रेसमा चा कामाचा झपाटा बघण्यासारखा होता. मी  रोज तिच्या सुट्टीच्या वेळी गेटशी जाऊन गप्पा मारायची.

परदेशातल्या माझ्या  मुलींना मी रोज  reportingकरायची. डोक्याला हात लावून त्या म्हणायच्या–“ आई,तुझी पण कमाल आहे. दगडालाही बोलायला लावशील ग बाई तू. “ त्यांच्याकडे लक्ष न देता,माझ्या चौकश्या सुरूच असायच्या.

“ रेश्मा, कुठले ग तुम्ही? असलीच कामे करता का ? गावाकडे  कोणकोण असतं ? “

ही मंडळी सोलापूर कडची होती .त्यांचा मुकादम,अशी कामे आली, की या लोकांना गावाकडून घेऊन यायचा.

“ रेश्मा,किती ग रोज मिळतो तुम्हाला? “

“ ताई,गड्याला सातशे रोज आणि बाईला सहाशे पडतात रोज.” अभिमानाने रेश्मा सांगत होती. पण हे कायम नसते ना. मग गावाकडे करतो शेती. पण आता शहरच गोड वाटतं बघा.मी सांगतेय मालकाला, आपण पुण्यातच राहूया.

पोराला चांगले शिकवूया. तो नको आपल्या सारखा बिगारी व्हायला. “

 पोरगे मोठे निरोगी,गुटगुटीत होते. एक भाकरीचा तुकडा दिला की बसायचे चघळत.

नुकताच माझा नातू आणि मुलगी परदेशातून येऊन गेले होते. नातू त्याची खेळणी इथेच ठेवून गेला होता.

मी त्यातले एक छान सॉफ्ट टॉय शोधले. अगदी गोड कुत्रे होते ते.

दुसऱ्या दिवशी रेश्मा आणि मल्हारी आलेच. मी मल्हारीला ते कुत्रे दिले. आनंदाने त्याचे डोळे इतके चमकले.

त्याने आपल्या आईकडे बघितले. त्याची आई म्हणाली, “ अजून त्याला  नीट बोलता येत नाही तर तो मला विचारतोय घेऊ का असे.” 

“ घेरे बाळा,तुलाच दिलेय मी. खेळ त्याच्याशी.” मल्हारीला खूप  आनंद झाला. ते कुत्रे तो मांडीवर घेऊन बसला.

त्याच्या बोबड्या भाषेत त्याच्याशी बोलू लागला. ते डबडे कुठे टाकून दिले कोणास ठाऊक.

 रेश्मा म्हणाली, “ मावशी, तुम्ही ते खेळणे दिलेत ना, माझे काम अगदी हलके झाले बघा. मल्हारी आता एका जागी बसूनच खेळतो. आधी मला भीति वाटायची  हा चुकून खड्ड्यात तर नाही ना पडणार.” 

 रोज रोज ते कुत्रे आणि मल्हारीची जोडी सकाळी यायची.

एक दिवस म्हटले, “ अग रेश्मा, किती ग मळलेय ते कुत्रे. निदान धू तरी स्वच्छ.” 

रेश्माने कपाळाला हात लावला. म्हणाली “ अवो मावशी,त्याने दिले तर धुवू ना. चोवीस तास ते बरोबर असतय बघा–

झोपताना,जेवताना. वस्तीतली पोरे लै  द्वाड हायेत. त्याला भ्या वाटतं, कोणी चोरलं तर. म्हणून एक मिनिट त्याला दूर करत नाही .मावशी,मल्हारीला  कुत्र्याचे नाव विचारा ना.” 

“ मल्हारी,काय रे नाव तुझ्या कुत्र्याचे?”

लाजत लाजत बोबडा मल्हारी म्हणाला- “ लघु.”

आम्ही दोघी हसलो. रेश्मा म्हणाली, “ वस्तीत एक कुत्रा आहे रघु, म्हणून याचा पण रघु.”

 आता रस्त्याचे काम संपले होते. पाईपलाईन टाकून खड्डे बुजवले सुद्धा. रेश्मा माझा  निरोप घ्यायला आली

“ मावशी,लै माया केलीत आमच्यावर.आठवन ठेवा गरीबाची.”

पायावर डोके ठेवून तिने नमस्कार केला. मलाही गहिवरून आले. शंभरची नोट तिच्या हाती ठेवून म्हटले,

“ खाऊ घे मल्हारीला.”

 यालाही होऊन गेले 4 महिने. एक दिवस दुपारी बेल वाजली. कोण आहे  बघितले तर रेश्मा.माझ्या हातात एक पुडके दिले. “ अग हे काय? हे कशाला?”

“ काही  नाहीये हो जास्त. गावाला गेलो होतो ना, तर तुमच्यासाठी आमची शेंगदाणा चटणी आणि मसाला आणलाय बघा. सांगा बर का,आवडते का गरीबाची भेट.” 

 चहा पिऊन रेश्मा निघून गेली. पण मला विचारात पाडून गेली. —–

किती ही छोटी,गरीब माणसे. सहजच तिच्या बाळाला मी दिलेले खेळणे ती विसरली नाही. आपल्या परीने तिने कृतज्ञता व्यक्त केली.—-

हे इतके मोठे मन, या छोट्या माणसांना कोण देते?

©️ डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देवाणघेवाण… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ देवाणघेवाण… ☆ श्री अरविंद लिमये ☆

शब्द म्हणजे भाषेचं वैभव!भाषेचे अलंकार! या अलंकारांचं रंगरुप,कस,त्यांची जडणघडण भाषेचं मोल वाढवतात.भाषा लवचिक आणि सुंदर बनवतात.भाषेचं हे रंगरुप,सौंदर्य शब्दांच्या विविध रंगछटांवरच अवलंबून असतं.

कांही शब्द परस्परभिन्न अर्थ लेवूनच तयार झालेले असतात. रूप तेच पण अर्थरंग मात्र अर्थाअर्थी काहीच संबंध नसलेले.

अशाच काही शब्दांपैकी ‘वाण’ हा शब्द.’ मूर्ती लहान पण किर्ती महान ‘ ही म्हण चपखलपणे लागू पडावी असा हा अगदी छोटा दोन अक्षरी शब्द ! वाण या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आणि त्या प्रत्येक अर्थात लपलेल्या असंख्य अर्थकळा पाहिल्या की ‘भाषेचे सौंदर्य शब्दांमुळे खुलते’ हे सहज पटावे.

‘वाण’ म्हणजे अभाव. कमतरता. ‘येथे कशालाच वाण नाही’ म्हणजे सगळे उदंड आहे. कशाचंच दुर्भिक्ष,कमतरता, अभाव नाही. अभावाला एक प्रकारचे रितेपण,पोकळी, उणेपणा, हेच अपेक्षित आहे.या अर्थाने वाण हा शब्द कसर, चणचण, ददात, वानवा, अनुपलब्धता असं बरच कांही सामावून घेतो.

‘वाण’ म्हणजे ‘रंग’ सुध्दा. फक्त दृश्यरुपातले रंग नाही,तर व्यक्तिमत्त्वातले गुणदोष स्वभावरंगही.’गुण नाही पण वाण लागला’ या म्हणीत अंतर्भूत असलेला ‘रंग’ इथे अभिप्रेत आहे.

‘वाण’ म्हणजे नमुना. झलक, वानगी,म्हणजेच उदाहरण! याचं व्यवहारातलं एक उदाहरण म्हणजे धान्याचे दुकान! तिथे दर्शनी भागात लहान लहान वाडग्यात तांदूळ, गहू , डाळी, यांचे विविध नमुने म्हणजेच ‘वाण’ ठेवलेले असतात. ‘शितावरून भाताची परीक्षा’ करावी तसे त्या त्या धान्याचे ते वाण पाहून, तपासून कोणत्या प्रकारचे धान्य खरेदी करायचे याचा निर्णय घेणे सोपे जावे हा यामागचा उद्देश असतो.

‘वाण’ आणि ‘वसा’ या दोन शब्दांच्या संयुक्तरूपातून तयार होणारा ‘वाणवसा’ हा एक शब्द. वाणवसा म्हणजे ‘व्रत’. नित्यनेम म्हणून स्वीकारलेला एक आचार नियम!

वाण या शब्दाचा ‘घरी लागणारे किराणा सामान’ असाही एक अर्थ ‘वाणसामान’ या शब्दद्वयातून ध्वनीत होतो खरा पण मला तरी ‘वाणसामान’ हा शब्द वाण नव्हे तर ‘वाणी’ या शब्दाशी संबंधित असावा असे वाटते.वाणी म्हणजे दुकानदार. ‘वाण्याकडून आणावयाचे सामान’ ते वाणसामान या अर्थी हा शब्द बोलीभाषेतून तयार झालेला असावा आणि म्हणूनच वाण या शब्दाशी त्याचा अर्थाअर्थी काही संबंध नसावा असे वाटते.

‘वाण’ या शब्दाचा आणखी एक पूर्णपणे वेगळा अर्थ म्हणजे आहेर. आपल्या भारतीय संस्कृतीतील अनेक प्रथा-परंपरा माणसं जोडणाऱ्या आहेत. वाण देण्याची प्रथा ही त्यातलीच एक. ‘आहेर’ या शब्दाला भेट, उपहार, भेटवस्तू ,नजराणा, मानपान, शिष्टाचार, चोळी-बांगडी, घरचा आहेर असे अनेक कंगोरे आहेत.तसाच आहेर या शब्दाचा ‘वाण’ हा एक वेगळाच कंगोरा.एक अनोखा पैलू.वाण या शब्दात कोणत्याही विविध प्रसंगी दिलेले सगळ्याच प्रकारचे आहेर समाविष्ट होत नाहीत. लग्नमुंजीसारख्या समारंभात दिली जाणारी भेट किंवा भेटवस्तू म्हणजे आहेर.पण असे आहेर म्हणजे वाण नव्हे. काही विशिष्ट परंपरांमधील आहेरच ‘वाण’ म्हणून ओळखले जातात.’अधिक महिन्या’मधे जावयाला सन्मानाने दिला जाणारा आहेर म्हणजे अधिक महिन्याचं ‘वाण’. संक्रांतीचं वाण म्हणजे संक्रांतीच्या हळदीकुंकू समारंभात सुवासिनींना दिलेल्या नित्योपयोगी भेटवस्तू. या संक्रांतीच्या वाणाला ‘वस्तू लुटणं’ असंही म्हणतात. का माहित नाही. कदाचित ‘लयलूट’ याअर्थी असेल का?

वाण हा आपल्या      परंपरांमधला अतिशय मोलाचा सांस्कृतिक ठेवाच म्हणायला हवा. इथे वाण म्हणजे प्रेम,सन्मान, आपुलकी,सदिच्छा यांचे प्रतीक म्हणून दिला जाणारा आहेर.

भारतीय संस्कृतीत परस्परांमधील आपुलकीच्या  स्नेहबंधांसाठी ‘देवाणघेवाण’ अपेक्षित आहे. देवाण-घेवाण या शब्दातही ‘वाण’ हा शब्दही अंशरुपाने असणे हा निव्वळ योगायोग नसावा. आपल्या संस्कृतीत अपेक्षित असलेल्या प्रेम,आपुलकीची ‘देवाण-घेवाण’ काळानुरुप रितीभाती  बदलल्या तरी आपण विसरू नये एवढेच !!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आशिया खंडातली सर्वात मोठी लायब्ररी ☆ सुलू साबणे – जोशी ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ आशिया खंडातली सर्वात मोठी लायब्ररी ☆ सुलू साबणे – जोशी

 राजस्थान हे तेथील अनेक गोष्टी, विशेषत: तेथील वैभवशाली इतिहास, भव्य राजवाडे, राजे, महाराजे, महाराण्या यांच्या कथा, रंगेल संस्कृती आणि चविष्ट पाककृती यांमुळे प्रसिद्ध आहे.

पण कुणाला माहीत आहे का की, राजस्थानमधील थरच्या वाळवंटाखाली एक रहस्य दडले आहे? ते म्हणजे १६ फूट खाली एक भव्य दिव्य लायब्ररी आहे, जिथे १२ महिने २४ तास थंड वातावरण असते, अगदी उन्हाळ्यात सुध्दा..!

ही लायब्ररी आशिया खंडातील सर्वात मोठी लायब्ररी म्हणून गणली जाते, जिच्यात ९ लाखांपेक्षा जास्त पुस्तके आहेत..!

राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यामधल्या पोकरण तालुक्यात असलेल्या भादरिया गावात एका मंदिराखाली ही लायब्ररी बांधलेली आहे, जिच्यात एका वेळी ४००० माणसे (वाचक) बसू शकतात.

त्या ठिकाणी, ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, महाकाव्ये, इतिहास, शब्दकोश, नकाशांसंबंधी, अशी अनेक पुस्तके ५६२ काचेच्या कपाटांमध्ये मांडलेली आहेत…

 

संग्राहिका : सुलू साबणे – जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मला भेटलेली माणसं…! – भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मला भेटलेली माणसं…! – भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(त्यानंतर ती भारतात पसरली…. आणि त्याहीनंतर ती भारताच्या बाहेर सुद्धा पसरली…. ) इथून पुढे —-

रिलायन्स ग्रुपचे अंबानी, सौ नीता आणि श्री भावेश यांना भेटावयास महाबळेश्वरमध्ये गेले आणि त्यांनी त्यांना भक्कम हात दिला…

—-रस्त्यावर …..फुटपाथवर दहा मेणबत्त्या विकून स्वतःचं घर चालवणारा लहान भावेश….. आज हजारो अंध बांधवांना घेऊन मेणबत्त्या तयार करून त्या जगातल्या बारा देशांमध्ये विकत आहे…. येणारा पैसा या हजारो अंध बांधवांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी तो खर्च करत आहे….!

एक होती गांधारी…. जिने नवऱ्याच्या प्रेमापोटी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली…. आणि आईने डोळ्यावर पट्टी बांधली म्हणून शंभर “कौरव” जन्मले…. ! 

–एक आहे सौ. नीता, जिने नवऱ्याच्या प्रेमापोटी डोळे उघडे ठेवले आणि तिने शंभरावर “अंध कुटुंबे” जगवली…. !

महाभारतातली गांधारी मोठी ? की आधुनिक युगातली सौ. नीता भावेश भाटिया …. ? माझी बहिण !

नदीतल्या पाण्यात दगड असतात आणि माती सुद्धा ….. दगड फक्त भिजत असतो…. माती पाण्यात विरघळून जाते…. ! नुसतं भिजणं आणि विरघळणं यात खूप फरक असतो…भिजणं म्हणजे स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून दुसऱ्याचे विचार मान्य करणं ….. परंतु विरघळणे म्हणजे स्वतःचं कोणतेही अस्तित्व न ठेवता…. जोडीदाराच्या विचारांशी समरस होऊन स्वतःला समर्पित करणे….

श्री भावेश भाटिया यांची पत्नी सौ नीता भावेश भाटिया असो किंवा माझी पत्नी डॉ मनीषा अभिजित सोनवणे असो…. 

या दोघी अक्षरशः माती झाल्या…. आणि म्हणून आम्ही आमची मुळं या मातीत रुजवू शकलो…. 

अशा अनेक अज्ञात नीता आणि मनीषा समाजात आहेत…. मी त्यांना प्रणाम करतो…. ! 

`भीक मागणाऱ्या लोकांचे पुनर्वसन ` या तत्वावर मी आणि मनीषा आम्ही काम करत आहोत …. 

पण भावेश भाई हे तत्व स्वतः जगत आहेत आणि आचरणात सुद्धा आणत आहेत…. ! 

आणि म्हणून तो मला मोठ्या भावापेक्षाही जास्त आहे…. घरात जरी सगळ्यात थोरला मी असलो, तरी समाजामध्ये मी त्याला मोठ्या भावाचं स्थान दिल आहे…. !

पुण्यातील अंध भिक्षेकऱ्यांसाठी असाच एक प्रकल्प आमच्या माध्यमातून पुण्यात सुरु करण्याचं वचन मला भावेश भाईने दिलं आहे…! हा प्रकल्प सुरु झाला तर, पुण्यातील अंध बांधवांच्या आयुष्यात क्रांती घडेल…! 

यानंतर हा प्रकल्प महाराष्ट्रातील अंध भिक्षेकरी बांधवापर्यंत पोचवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे माझे पुढचे स्वप्न असेल…. यात आपणा सर्वांचे आशीर्वाद हवेत….! 

कार्यक्रम झाल्यानंतर भावेशभाई मला हात जोडून म्हणाला, ‘ दादा आपके साथ सेल्फी ले सकता हूँ क्या….? ‘ 

मोठी माणसं अशीच असतात….  नेहमी दुसऱ्याला आदर देतात… 

उलट मी भावेश भाईला म्हणालो, ‘ आप तो मेरे बडे भाई हो…. मैं तो एक गरीब डॉक्टर हूँ ….आपके साथ खडा होने की मेरी औकात नही है ….आप मुझे चरणोमे रख लो… तो मेरी जिंदगी बन जायेगी….! ‘ 

यावर बसल्याजागी भावेशभाईने मला मिठी मारली आणि शून्यात पहात म्हणाला…., ‘ दादा मै तो आपको देख नही सकता हूँ .. लेकीन नीताको पूछूंगा फोटो मे मेरा छोटा भाई “अभिजीत” दिखता कैसे है….?  तू मुझे बता…. ! ‘

मी म्हणालो, “ नीताभाभी को क्या पूछना है दादा … ? मैं खुद आपको बताता हूँ …., ‘ हम दोनो दिखनेमे सेम टू सेम है… दो हात, दो पांव, एक नाक, दो कान…. सब same to same….बस फर्क सिर्फ इतना है…

आसमान सिर्फ आपसे दो गज दूरी पे है…. और मेरी उंचाई आपके घुटनो तक भी नही है ….!

बस फर्क सिर्फ इतना है…हमने हाथ मे मशाल पकडी है…. आप दिल मे लिए घुमते हो….!

बस फर्क सिर्फ इतना है.. इन्सान बनने की नाकाम कोशिश हमारी…. आप ईश्वर से भी बेहतर इन्सान बन गये हो….!

बस फर्क सिर्फ इतना है… हम आँखे लिए अंधे जी रहे है…. आप अंधेरे मे रहकर, दूसरोंको रोशनी दे रहे हो….! “

—– यानंतर काळ्या चष्म्याच्या आडून भर उन्हातही पाऊस कोसळून गेला….!

(१४ मे २०२२, वैशाख शु १३, धर्मवीर संभाजी महाराज जयंती)

 समाप्त 

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आपण हल्ली इतके तुसडे का वागतो ?… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? विविधा ?

☆ आपण हल्ली इतके तुसडे का वागतो ? 🤔 … अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

हल्ली एक बदल अगदी बटबटीतपणे आढळून येतो. पूर्वी कुठल्याही सणा – समारंभाला माणसे जमली की एकमेकांना भेटत असत. गप्पा तर संपता संपत नसत.

कार्यक्रमस्थळी म्हणजे घरामध्ये, मंडपामध्ये, कार्यालयामध्ये एखादे कुटुंब शिरले की त्याचे सहजपणे विभाजन होऊन पुरुष मंडळी आपापल्या वयाच्या पुरुष गटात, स्त्रिया त्यांच्या गोतात तर लहान मुले इतर मुलांमध्ये झटकन मिसळून जात असत. पुरुष पानसुपारीच्या तबकाभोवती किंवा एखाद्याची चंची उघडून गप्पाष्टक सुरु करीत. मुलांचा कुठलेही खेळणे उपलब्ध नसले तरी धुडगूस सुरु होत असे. तमाम स्त्रियांच्या वनितवृंदाचा खास एपिसोड सुरु होई. त्यावेळीही कुटुंबाकुटुंबांमधील मानापमान, माणसांमधील हेवेदावे होते. बायकांमधली असूया, धुसफूस, अबोला असायचा. मुलांचे एकमेकांना चिडवणे, बोचकारणे असायचे. तरीदेखील यासर्व गोष्टींच्या अस्तित्वासह लोकं एकमेकांना भेटत होती, एकमेकांकडे जात होती, बोलत होती. लग्नांमध्ये मानापानांवरून भांडणे व्हायची, रुसवे फुगवे व्हायचे. वितुष्ट,अबोला असला तरी तो फार थोड्या प्रमाणात असायचा. हे सारे अगदी बळवंतराव, सदुकाका, दामुअण्णा, अनुसूयाकाकू, गंगामावशी, सिंधूआत्या, बंड्या, चिंगी, चंदू यांच्यापासून ते अगदी वसंतराव, विश्वासराव, मालती, उषा, मोहन, किशोर यांच्यापर्यंत चालू होतं !

समाजामध्ये हल्ली एक बदल अगदी बटबटीतपणे आढळून येतो. लोकांचा एकमेकांशी नैसर्गिक संवाद जवळजवळ बंद झाला आहे. हल्ली घरांमध्ये होणारे छोटे समारंभ जवळजवळ बंद झाले आहेत. मध्यम कार्यक्रम किंवा मोठे कार्यक्रम हॉलमध्ये साजरे होतात. त्याला इतकी माणसं निमंत्रित असतात की यजमानाची तुमच्यावर एक नजर पडली तरी खूप झाले. मग जमलेली माणसं आपापला गट करूनच स्थानापन्न होतात. लगेचच सर्वांची ‘ कर्णपिशाच्च ‘ बाहेर येतात. सर्वजण तात्काळ स्क्रीनमग्न होतात. समारंभ कसला आहे, कोणकोण आलाय, काय चाललंय यांच्याशी कसलाही संबंध नसल्यासारखी माणसांची बेटं होऊन बसतात. मोबाईलवरील हा ‘ शब्देवीण संवादु ‘ संपला की थोडं इकडेतिकडे बोलायचे. त्यातही नैसर्गिक संवाद नसतातच. अरे आहेस कुठे, हल्ली काय नवीन, युसला गेला होतास ना, तू किती बारीक झालीस, ड्रेस काय मस्त आहे, तुझी मुलगी काय क्यूट दिसते, मुलगा काय ICSE ला ना, असले औपचारिक संवाद घडतात. तेवढ्यात कुणाचा तरी मोबाईल वाजतो आणि हा संवादसुद्धा थांबतो. कुणी आपणहून कुणाशी अकृत्रिमपणे बोलतच नाही. प्रत्येकाला दुसऱ्याबद्दल असे वाटते की ” तो हल्ली स्वतःला खूप शहाणा समजतो ” ! बरं, हे सगळे बाजूला सारून जर एखादा आपणहून सर्वांकडे जाऊन बोलू लागला तर इतरांना वाटतं ” हा हल्ली ज्याच्या त्याच्या गळ्यात का पडतो कुणास ठाऊक “!…… हे सगळे अनुभवल्यावर असे वाटते की काय झालय आपल्याला ? आपण हल्ली इतके तुसडे का वागतो ?

मला त्याची कांही कारणे अशी वाटतात. माणसांचे एकमेकांवरील अवलंबित्व संपत चालले आहे. सक्तीची एकत्रित कुटुंब पद्धती, पैशांचे पाठबळ, मनुष्यबळ, रात्री अपरात्री लागू शकणारी मदत, सुरक्षितपणा, धंदेवाईक असलात तर व्यवसायबंधूंचा आधार अशा अनेक गोष्टींमुळे पूर्वी माणसं एकमेकांशी जोडलेली राहत असत. आता एकत्रकुटुंब मोडून छोटीछोटी कुटुंब झाली. माणसांचे उत्पन्न वाढले त्यामुळे खर्च करण्याची शक्ती वाढली. बँकांमधून मिळणारी कर्ज, एटीएम इत्यादींमुळे पैशाची आकस्मिक गरज भागते. पैसे टाकला की मनुष्यबळ उभे करता येते. घरात आजारी माणसाला सांभाळणाऱ्या माणसापासून मंगल कार्यातील कॅटररच्या फौजेपर्यंत सर्व काही उभे करता येते. अपरात्री फोन करून रुग्णवाहिका येते तर मृत्युप्रसंगी सर्वकांही सांभाळणाऱ्या व्हॅन मागवता येतत. ऑनलाईन खरेदी विक्रीमुळे धंदेबंधुंची गरज संपत चालली आहे.

समाजाऐवजी गटसमूह तयार होतायत. त्यात राहूनही माणूस एकाकी पडतोय. मानसिक – भावनिक आधार तुटत चाललाय. अपयश, दु;ख, आजारपण अशा गोष्टींमुळे खचून संपूर्ण कुटुंबच जेव्हा आत्महत्त्या करते तेव्हा असे वाटते की काय झालय आपल्याला ?        वरकरणी सर्वत्र भरभराट आणि ऐश्वर्य दिसते.असे असतांना अति ताणामुळे मधुमेह, रक्तदाब, हृद्रोग वेगाने वाढतोय. माणसा – माणसांमधील सहज आणि नैसर्गिक संवादामुळे होणारे भावनांचे अभिसरण ( ventilation ) थांबलंय! जुनी मुरलेली मैत्री विसरून मित्र आपापल्या मोठेपणाच्या कोषात जाऊन बसतात. लग्नप्रसंगी, शुभकार्यात पूर्वीची एकमेकांना मदत करण्याची पद्धत गेली.लालच आणि पराकोटी चा स्वार्थ मुळे आता तर अगदी सख्खी भावंडंसुद्धा अडवणूक करतात. बोलणं बंद करतात, नाती तोडतात…. मग पुन्हा माणूस ‘ एकला चालो रे ‘ कडे वळतो. तुसडेपणाचे एक नवीन आवर्तन सुरु होते !

तरीही हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.. काय झालाय आपल्याला ? आपण हल्ली इतके तुसडे का वागतो ?

तुम्हाला कांही उत्तर सुचतंय का ?

रचना : अनामिक.

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मला भेटलेली माणसं…! – भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मला भेटलेली माणसं…! – भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

सप्रेम नमस्कार !

शक्यतोवर मला मिळालेले पुरस्कार, मान-सन्मान या विषयी काहीही लिहिण्याचे  मी टाळतो….

स्वतःचं कौतुक स्वतःच काय करायचं?  कोणी दुसऱ्याने कौतुकाने ते इतरांना सांगितलं तर भाग वेगळा !

आज मात्र आवर्जून एका पुरस्काराविषयी लिहिणार आहे… कारण त्या निमित्ताने भेटलेल्या

अनेक व्यक्तींचा परिचय मला करून देता येईल, घडलेल्या अनेक बाबी सांगता येतील…..

या महत्त्वाच्या बाबी सांगण्याअगोदर मला मिळालेल्या पुरस्काराचा उल्लेख करणं अपरिहार्य आहे !

१४ मे, धर्मवीर संभाजीराजे महाराज यांची जयंती… !

आदरणीय गुरुवर्य बंडातात्या कराडकर…. एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व !

“व्यसनमुक्त युवक संघ” या नावाची संस्था स्थापन करून हे गुरुजी संपूर्ण महाराष्ट्रात फिरून नव्हे, “झिजून” नव्या पिढीमधून एक उत्तम भारतीय नागरिक तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

गुरुजींनी संपूर्ण जावळी तालुका व्यसनमुक्त केला आहे…

आयुष्यात केवळ पाच माणसांना मी व्यसनमुक्त करु शकलो तरी जीवनाचे सार्थक झाले असे मला वाटेल ….तिथे या ऋषितुल्य माणसाने पूर्ण एक तालुका व्यसनमुक्त केला आहे, यावरून त्यांच्या कार्याची स्पष्ट कल्पना येते…. !

—-अत्यंत करारी स्वभाव…. नजरेत जरब …. संवादाची धार तलवारीहून तीक्ष्ण…. कोणाचीही भीडभाड न ठेवणारा हा “खरा माणूस”…. अन्याय झाला तर कोणालाही पायाखाली चिरडण्याची ताकद… पण समाजात कोणी काही चांगलं केलं तर त्याच्यासमोर कमरेत वाकून मुजरा करण्याएवढी नम्रता या माणसात आहे…. !

अशा या सच्च्या माणसाने स्थापन केलेल्या संस्थेकडून… त्यांच्या शिफारशीवरून महाराष्ट्रात अत्यंत मानाचा समजला जाणारा यावर्षीचा  “धर्मवीर श्री संभाजी महाराज पुरस्कार”  मला देण्यात आला.

याच सोबत ” श्रीमती राणी लक्ष्मीबाई पुरस्कार “ सौ निता भावेश भाटिया” यांना देण्यात आला.

श्री विवेक राऊत, श्री नवनाथ मालुसरे यांचे आम्ही ऋणी आहोत.

भावेश भाटिया यांना जगात….हो जगात, त्यांना कोणी ओळखत नाही असा माणूस नसेल….

अजूनही जर कोणाला त्यांची ओळख नसेल, तर माझ्या या जगप्रसिद्ध जिवलग मित्राबद्दल थोडक्यात सांगतो….

—-महाबळेश्वर इथं लहानपणी दृष्टी नसलेला भावेश फुटपाथवर बसून मेणबत्त्या तयार करायचा आणि त्या तो विकायचा…. खूपदा भीक मागावी अशी परिस्थिती त्याच्या आयुष्यात निर्माण झाली, परंतू  तो परिस्थितीला शरण गेला नाही. आठ आठ दिवस उपाशी राहिला परंतू या स्वाभिमानी माणसाने भीक मागितली नाही…. !

भारतातील एक अब्जाधीश… उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या फॅमिलीला घेऊन महाबळेश्वरला येऊन एक बंगला भाड्याने घेऊन महिना-महिना तिथे मुक्काम करत असत….

अब्जाधीशाच्या या फॅमिलीमधल्या एका चिमुरडीला या लहान भावेशने केलेल्या मेणबत्त्या आवडल्या…. त्याचा तो एकूण गरीब अवतार पाहून…. त्याची अंध अवस्था पाहून, मेणबत्ती खरेदी केल्यानंतर तिने त्याला टीप दिली…

तो तेव्हा  म्हणाला होता… “Honoured madam… मी ऋणी आहे आपला ….परंततू मला माझ्या कामाचे पैसे हवेत…  भीक नको…. माझ्या डोळ्यात ज्योत नसेल पण हृदयात नक्की आहे….”

ही चिमुरडी भारावली….

मग दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत महाबळेश्वरला आल्यावर “ती” भावेशला भेटायची….

अनेक वर्ष त्या दोघांमध्ये संवाद झाला आणि सूर जुळले….

अब्जाधीशाच्या त्या मुलीने रस्त्यावरच्या अंध भावेशशी घरच्यांना न जुमानता लग्न केलं….

—-हो हीच ती निता…. !

अब्जाधीशाच्या मुलीने एका भिकारड्या (?) मेणबत्ती विकणाऱ्या पोराशी लग्न केलं….. याचं घरातल्या लोकांना वाईट वाटलं….

या दोघांनीही त्या घरातून काहीही घेतलं नाही….हे दोघं पाच बाय पाच च्या पत्र्याच्या खोलीत राहू लागले….

“दूरदृष्टी” असलेल्या नीताने भावेशला सांगितले, “ तू एकटा किती मेणबत्त्या करशील आणि किती विकशील ?  त्यापेक्षा आपण इतर अंध बांधवांना एकत्र करू, तू त्यांनाही मेणबत्त्या करायला शिकव,  आपण हा व्यवसाय वाढवू…. आपल्यासोबत त्यांनासुद्धा पैशाची मदत होईल….! “

—ध्येयवेड्या भावेशने सर्व अंधांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि सुरुवातीला पाच अंध बांधवांकडून मेणबत्त्या करवून घेतल्या…. !

आता भावेशचं घर चांगलं चालू लागलं आणि त्यासोबत इतर पाच अंध बांधवांचं सुद्धा…

त्याने आणखी अंध बांधव एकत्र केले…. गोतावळा वाढत गेला….

—-एक अंध माणूस इतर अंध बांधवांचे पुनर्वसन करत आहे….

बघता बघता ही गोष्ट महाबळेश्वरमध्ये पसरली ….महाबळेश्वरमधून ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली ….. त्यानंतर ती भारतात पसरली…. आणि त्याहीनंतर ती भारताच्या बाहेर सुद्धा पसरली….

क्रमशः …

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कर्मफळ आणि नियती….☆ संग्राहक – श्री अनंत केळकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ कर्मफळ आणि नियती…. ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

 हजारो गाई जरी असल्या तरी वासरू बरोबर आपल्या मातेकडेच पोहोचते, तशीच पूर्वकर्मे कर्त्याला अचूक शोधून भोग भोगायला लावतात. आपल्या डोळ्यासमोर घडणार्‍या घटना अवलोकन केल्या तर लक्षात येते की कर्मे फळताना नियती फार काटेकोर आणि कठोर असते. ती राजा म्हणत नाही की लहान मूल म्हणत नाही. अपघातात चिमण्या जीवांचे हातपाय तुटतात तर बॉम्बस्फोटात  मोठमोठ्या देशाच्या पंतप्रधानांचे मुंडके धडापासून वेगळे होते. काटेकोर संरक्षणात असलेल्या नेत्याच्या छातीत धाडधाड गोळ्या शिरतात तर दूधपित्या तान्ह्या मुलापासून आईलाच दूर नेऊन मृत्यु त्यांची ताटातूट करतो. सतीसावित्रींचा छळ, श्रीरामांचा वनवास, परमहंसांचा कॅन्सर, गुलाबराव महाराजांचे अंधत्व, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, मीराबाई यांना समाजाने दिलेला त्रास, ही सारी कर्मफलांची बोलकी उदाहरणे आहेत. प्रत्यक्ष सूर्यपुत्र असून जन्मभर झालेली कर्णाची अवहेलना, देवमाता असून पोटची सात अर्भके गमवावी लागलेली देवकी आणि आचार्य पद लाभूनही, सबंध आयुष्य कष्टात काढल्यावर मृत्युसमयीसुद्धा कंटकशय्येवर भोग भोगावे लागलेले भीष्म, या सर्वांना भगवंतानी त्यांच्या भोगाची कारणे सविस्तर सांगितली, तेव्हा कर्मफळे किती अटळ असतात त्याची प्रचिती आली.  मृत्यू राजा-रंक, स्त्री-पुरुष, लहान-थोर असा काहीही भेद करीत नाही. बुद्धिबळाच्या पटावर जरी राजा, वजीर असला तरी खेळ संपल्यावर डब्यात भरताना प्यादी खाली आणि राजेसाहेब सन्मानाने वर असे कोणी भरीत नाही तर सर्वांना एकत्र कोंबले जाते.  हे सारे लक्षात घेऊन प्राण हे देहाला वश आहेत तोपर्यंत सत्कर्में , भगवंतस्मरण,  नामस्मरण ,दानपुण्य केलं पाहिजे, कारण देहपतनानंतर प्राणप्रिय पत्नी दरवाजा पर्यंत , नातेवाईक स्मशानापर्यंत आणि देह चितेपर्यंत सोबत करतात. बरोबर येतात ती कर्में,पुण्य, भगवंत नामाचे गाठोडे—-

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खुळखुळा… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

श्रीमती अनुराधा फाटक

? विविधा ?

☆ खुळखुळा… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

स्वरा उमाताईंची सहा महिन्यांची नात तशी खेळकर पण तिच्याजवळ कुणाला तरी बसावे लागे.त्यांची सून उषा अंघोळीला गेली होती म्हणून उमाताई स्वराजवळ बसल्या असतानाच गॅसवर दूध तापत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.उतू जाईल म्हणून खेळणाऱ्या स्वराकडं बघतच त्या पटकन स्वयंपाकघरात गेल्या तसा स्वराचा रडलेला आवाज त्यांच्या कानावर आला.

‘ रडू दोन मिनिटं’म्हणत त्या दुधाजवळच थांबल्या तेवढ्यात त्यांच्या कानावर खुळखुळ्याचा आवाज आला. दूधही वर आले होते.गॅस बंद करून त्या बाहेर आल्या.शेजारचा निमिष स्वराजवळ खुळखुळा वाजवत बसला होता. स्वराही रडायची थांबली होती.

‘ आजी, मी बसतो खुळखुळा वाजवत’निमिष बोलत असतानाच उषाही अंघोळ करून बाहेर आली.तिनं स्वराला घेतलं.निमिष तिथच बसला.उमाताई मात्र कामाला लागल्या.काम करता करता त्यांना शिरीषचे,त्यांच्या मुलाचे बालपण आठवले.

एक दिवस शिरीष असाच रडत होता.उमाचे धाकटे दीर पेपर वाचत होते पण त्यांनी शिरीषकडं लक्ष दिलं नाही . हातातलं काम टाकून उमानं शिरीषला घेतलं.

‘ भाऊजी,बाहेर गेलात की शिरीषसाठी एक खुळखुळा आणा..’ दिरकडं बघत उमा बोलली.

‘ त्याचे वडील आणतील की..’पटकन उमाचा दीर बोलला आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले.चुकून संसारात पडलेला तिच्या नवऱ्याला कसलीच हौस नव्हती हे माहीत असलेल्या  दिराने तिच्या जखमेवरच मीठ चोळलं होतं.

‘ त्याच्या वडिलांचे माहीत नाही पण मी नक्की आणीन माझ्या शिरीषसाठी खुळखुळा.’त्यानंतर उमाने कधीच कुणाला काही सांगितले नाही स्वतःच्या हिमतीवर आपल्या मुलाची सर्व हौस पुरवली होती.

माणसाचं जीवन म्हणजे एक खुळखुळाच..’ उमा आपल्याच विचारात होती.जसा आयुष्याचा खुळखुळा वाजतो तसे आपण जगत असतो. परिस्थितिच्या खुळखुळ्यातून कधी मधुर नाद निघतो तर कधी त्या नादाने आपण खुळे बनतो,अस्वस्थ होतो. आपल्याला कळत नसतानाच आपल्या आयुष्यात आलेला हा खुळखुळा सतत वेगवेगळे नाद करून आपले आयुष्य घडवत असतो.कधी सुखावह तर कधी दुःखाची जाणीव त्यातून होते.असा हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं जाणारा खुळखुळा ! नाद खुळा करणारा खुळखुळा !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares