मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चहा – भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ चहा ☕ भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

ओतून दिलेला चहा मोरीत  वाहत होता .पाण्यात मिसळून त्याचा रंग बदलत होता ,मी टक लावून पाहत होतो.पाहता पाहता मी माझ्या बालपणीच्या आठवणीत केव्हा गेलो कळलेच नाही……….

सकाळ झाली की आमचा सर्व भावंडांचा घोळका अंगणातील चुली भोवती जमायचा .लाकडे पेटवून या चुलीवर पाणी गरम करणे,सकाळचा चहा हे सर्व सोपस्कार याच चुलीवर व्हायचे.पण खरं तर या चुलीचा फायदा हिवाळ्यात हात शेकण्यासाठी व चर्चा करण्यासाठी अधिक व्हायचा.कधी कधी याच चुलीवर गोवऱ्यांच्या राखेत  भरतासाठी वांगी किंवा हुरड्याची कणसे भाजली जायची .पण आमच्यासाठी रोजचा आनंददायी प्रसंग म्हणजे सकाळचा या चुलीवर तयार होणारा चहा.आम्ही सात बहीण भाऊ,आत्या आई बाबा आणि वेळेवर येणारा आगंतुक असा दहा बारा लोकांचा चहा आमची आई मांडायची,चहा मांडायची म्हणजे गंजात तितके कप पाणी टाकायची,त्यात रेशन दुकानातून मिळालेली दोन मुठी साखर टाकली जायची. त्यात ब्रुक ब्रँड कंपनीची फुल छाप चहापत्ती टाकली जायची.या चाहापत्तीच्या  दहा पैसे किमतीच्या पुड्या किराणा दुकानात मिळायच्या.शिलाई मशीन द्वारा या पुड्यांच्या माळा कंपनीचं बनवीत असे, दिवाळीतील उटण्याचा पुड्या प्रमाणे त्या दुकानात लटकलेल्या असतं. आमच्या आईचं गणित असे होते की एका वेळेसच्या चहा साठी एक पुडी टाकायची ,असे हे लाल रसायन चुलीवर उकळायचे,लवकर उकळी यावी म्हणून आम्ही भावंडं फुंकनिने फुंकून जाळ वाढविण्याचा प्रयत्न करायचो. उकळी येईपर्यंत चहाकडे पहात राहणे हा आम्हासाठी आनंददायी अनुभव असायचा.सुरवातीला बुडबुडे यायचे नी मागून उकळीचा भोवरा.तो पर्यंत कुणीतरी दहा पैशाचे दूध ग्लासात विकत आणले असायचे ,ते चहाच्या रसायनात टाकले की बस चहा तयार…..चहा तयार झाला की आम्ही भावंडं आपापली भांडी पुढे करायचो.बहुदा त्या मोठ्या वाट्या असायच्या.मोठ्यांना कपबशी भरून चहा दिला जायचा त्याचा आम्हाला हेवा वाटायचा.आम्हाला त्यामुळे कमी चहा मिळेल असे उगीच वाटायचे.आमच्या भांड्यात आईने थोडा जास्त चहा टाकावा म्हणून प्रत्येकाचा प्रयत्न असायचा.त्यात भांडणे व्हायची व एखाद्याचा चहा सांडायचा मग सर्व भावंडं त्याला आपला थोडा थोडा चहा दयायचे.  रात्रीच्या शिळ्या पोळ्या मग आम्ही या चहात तुकडे करून टाकत असू.थोड्या वेळात त्या मस्त नरम होत.त्याचा आस्वाद आम्हाला अमृततुल्य वाटायचा.

चहाचा एक थेंबही वाया जात नसे.भलेही या चहात भरपूर दूध, विलायची,मसाले अद्रकं नसेलही पण आम्हाला फरक पडत नसे.त्यामुळेच कदाचित आज मोरीत टाकलेल्या चाहाबद्दल हळहळ वाटली असावी.पोरांना चहाची खरी किंमत व आनंद कसा कळेल.चूक त्यांची नाही,गरिबी त्यांच्या वाट्याला आलीच नाही.         

समाप्त

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गभस्तिनी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ गभस्तिनी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆ 

गभस्तिनी ही महर्षि दधीचि  यांची पत्नी, महर्षी अगस्ती यांची मेहुणी व लोपामुद्राची बहीण होती. उत्तर प्रदेशात नैमिषारण्याजवळ सीतापुर येथे दधीची ऋषींचा आश्रम होता. पतीसमवेत ती आनंदाने रहात होती. आश्रमाजवळ अनेक वृक्ष पक्षी व प्राणी होते. त्यांच्यावर हे पती-पत्नी खूप प्रेम करत. आश्रमात कोणीही आले तरी गभस्तिनी  आनंदाने त्यांचे स्वागत करत असे. दाधीचि ऋषींच्या हाडांमध्ये वज्र तेज होते. वृत्रासुर राक्षसाचा वध करण्यासाठी इंद्रादी देवांनी त्यांना अस्थि दान करण्यास सांगितले. ऋषींनी आनंदाने अस्थिदान केले. कामधेनूने त्यांचे सर्व मांस चाटून टाकले. तिथे फक्त त्यांचे केस आणि त्वचा उरली. त्यावेळी गभस्तिनी गंगा नदीचे पाणी आणण्यासाठी गेली होती. ती परत आल्यावर तिला आपले पती दिसेनात. तिने अग्नीला विचारले माझे पती कुठे आहेत? अग्नीने सर्व प्रसंग सांगितला. तिला खूप वाईट वाटले. ती पतिव्रता होती. मी आता सती जाणार असे तिने सर्वांना सांगितले. परलोकात मला माझे पती भेटतील असे ती म्हणू लागली. इंद्राने खूप समजावण्याचा प्रयत्न केला. तू गरोदर आहेस. तुला सती जाण्याचा अधिकार नाही. पण ती अत्यंत हुशार होती. आपल्या ज्ञानाच्या सहायाने तिने कुणाचीही मदत न घेता स्वतःचा गर्भ स्वतःच बाहेर काढला. व पिंपळाच्या झाडाकडे गेली. खरं तर तिथे खूप वृक्ष होते. पण पिंपळ हा सर्वश्रेष्ठ वृक्ष आहे तो 24 तास प्राणवायू बाहेर टाकत असतो. त्याची पाने फुले फळे खाण्यायोग्य असतात याचे पूर्ण ज्ञान तिला होते. तिने आपला गर्भ पिंपळाला अर्पण केला व सांगितले या माझ्या होणाऱ्या बाळाला भाऊ बहीण नाहीत. तूच त्याचे पालन पोषण आणि रक्षण कर. व तिने अग्नीला वंदन केले. स्वतःच चिता रचली. व पतीचे केस आणि त्वचा यासह तिने अग्निप्रवेश केला. तिची आज्ञा शिरसावंद्य मानून पिंपळ वृक्षाने त्या गर्भाची देखभाल पालन पोषण केले. नऊ महिने होताच त्यातून एक बालक जन्माला आले. पिंपळ वृक्षाची पाने फुले फळे खाऊन ते वाढू लागले. तेच पिप्पलाद ऋषी.

गभस्तिनीला आपले बाळ पाहता आले नाही. पण बाळाच्या जन्माची पालनपोषणाची पूर्ण जबाबदारी पिंपळ वृक्षाकडे सोपवून पतीबरोबर सती जाणे हा पत्नीधर्म तिने  निभावला. आजचे टेस्ट ट्यूब बेबी, सरोगेट मदर, सिझेरियन हे तंत्रज्ञान तिच्या अगाध ज्ञानापुढे फिके आहे. अशी ही न भूतो न भविष्यती आदर्श पत्नी आदर्श माता. कोटी कोटी नमन

 

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गोडी अमृताची, झळाळी सुवर्णाची ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ गोडी अमृताची, झळाळी सुवर्णाची ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

१५ ऑगस्ट १९४७ ‘स्वतंत्र भारता’ ची पहिली पहाट झाली. प्राचीवर केशरी रंगाची उधळण, सूर्यकिरणांची शुभ्र प्रभा आणि स्वतंत्र भूमातेची हिरवाई या सर्वांमध्ये असंख्य स्वातंत्र्यवीरांचे शौर्य, त्याग, बलिदान यांचे पवित्र असे ‘नीलचक्र’ यांच्या संगमातून जणू सर्वत्र भारताचा तिरंगा ध्वज लहरत होता. सर्वत्र आनंदी आनंद भरून वाहत होता. स्वतंत्र भारतात सर्वजण मुक्त श्वास घेत होते. स्वातंत्र्यलढ्यातून स्वातंत्र्यप्राप्तीची यशश्री लाभली होती.

हा लढा सोपा नव्हता. असंख्यांचे अतुलनीय शौर्य, असीम त्याग आणि परम बलिदान यामुळे हा दिवस उजाडला होता. म्हणूनच या सर्वांचे मंगल स्मरण आणि त्यांच्या कार्याचे पावित्र्य राखणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. देशहीत जपणाऱ्या चांगल्या कृतीतून त्यांना आपण मानवंदना दिली पाहिजे.

आज देशाच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी होत आहे. देशाने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. मोठी प्रगती केली आहे. वेगवेगळ्या वाटा चोखाळत यशाची शिखरे गाठली आहेत.

या टप्प्यावर थोडे सिंहावलोकन केले, थोडे सद्य परिस्थितीचे अवलोकन केले तर काही गोष्टींचा आवर्जून विचार करायला हवा हे लक्षात येते.

आपल्या देशाचा प्राचीन इतिहास अतिशय वैभवशाली, समृद्ध असा आहे.नंतर देशाला दीर्घकालीन अशा पारतंत्र्याला तोंड द्यावे लागले. त्यासाठीच दीर्घकालीन स्वातंत्र्यलढा सुरू होता. असंख्य क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी, निस्सीम देशभक्तांच्या परम बलिदानाने, धैर्याने, शौर्याने, त्यागाने देशात स्वातंत्र्याची पहाट उगवली.

स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही प्रस्थापित झाली. देशाने या दीर्घ कालखंडात अनेक राजकीय स्थित्यंतरे अनुभवली. मत-मतांतरे, विविध वैचारिक धारा यातून देशाला वाटचाल करावी लागली. तरीही देशाने अखंड प्रगतीची वाट सोडली नाही.

मुळामध्ये आपल्याला आध्यात्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, बौद्धिक, वैचारिक बैठक भक्कम लाभलेली आहे. या पक्क्या पायावर प्रगतीचा आलेख चढत गेला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, विज्ञान, वैद्यकशास्त्र, संरक्षण शास्त्र, दळणवळण अशा कितीतरी क्षेत्रात देशाने प्रगतीची नवी नवी शिखरे गाठलेली आहेत. अणूचाचणी आणि अंतराळ संशोधन क्षेत्रातली प्रगती तर अत्युच्च अशी आहे. संशोधन क्षेत्रातही खूप मोठे काम सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानात तर जगातील अव्वल देशांत आपला समावेश आहे.

आत्ताच्या कोव्हिड -१९ च्या महामारीवर स्वतःची लस तयार करून यशस्वी मात करणे हे तर देशाचे अभूतपूर्व यश आहे. जगाच्या इतर देशांमधील, अगदी प्रगत देशांमधील परिस्थिती पाहिल्यावर आपली कामगिरी अगदी कौतुकास्पद आणि अभिमानाचीच आहे.जगण्याच्या प्रत्येक स्तरावर प्रचंड विभिन्नता असणाऱ्या एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या आपल्या देशाने जिद्द, प्रामाणिक प्रयत्न आणि धैर्याने सामूहिकरित्या संकटांचा यशस्वी प्रतिकार केलेला आहे.

स्वातंत्र्याबरोबरच सदैव धगधगती सीमा सुरक्षा देशाच्या वाट्याला आलेली आहे. देशाने युद्ध, दहशतवादी कारवाया यांचा धैर्याने सामना करीत यशस्वी प्रतिकार केलेला आहे.  आज लष्कराच्या तिन्ही दलांची अद्ययावत बांधणी, प्रभावी शस्त्रसज्जता यामुळे देशाच्या संरक्षणाच्या बाबतीत मजबूत स्वयंपूर्णता आलेली आहे.

या देशात तरुणाईची संख्या खूप मोठी आहे ही आपली मोठी जमेची बाजू आहे. या हुशार, सक्षम तरुणवर्गाला योग्य ध्येय, योग्य मार्गदर्शन आणि योग्य संधी मिळणे खूप आवश्यक आहे. यासाठी जाणकारांनी, ज्येष्ठांनी प्राधान्याने त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे.  अगदी लहान मुलांना चांगले संस्कार,  देशप्रेमाचे धडे योग्य पद्धतीने दिले पाहिजेत. सोशल मीडिया, नव्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर, त्यातील गंभीर धोके समजावून सांगितले पाहिजेत.

आपल्या देशाला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. तिन्ही ऋतू आपल्याकडे समानच असतात. भरपूर पाऊस, खळाळत्या नद्या, स्वच्छ भरपूर सूर्यप्रकाश, भरपूर हिरवी गर्द वनराई ही आपली समृद्धी आहे. पण वाढत्या शहरीकरण, औद्योगिकीकरणाच्या नादात आपले तिकडे दुर्लक्ष झाले आहे. मोठ्या प्रमाणावर जल, वायू प्रदूषण, प्रचंड प्रमाणात वृक्षतोड याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम दिसत आहे. परिणामतः निसर्गाचे चक्र बिघडते आहे. बदलत्या हवामानाने सतत शेती पिकांचे खूप मोठे नुकसान होते आहे. यासाठी निसर्गाला जपले पाहिजे. नदीजोड प्रकल्प प्रत्यक्षात आणले पाहिजेत. शेतकरी वर्गाची परिस्थिती सुधारून शेती व्यवसाय पुन्हा भरभराटीला आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत.

इतरही सर्व गोष्टींमधे देशात सर्व काही चांगलेच, सुरळीत सुरू आहे असे नाही. परकीय शक्तींचे आक्रमण, दहशतवादाचा वाढता धोका या पासून सावध राहायला हवे. मुकाबला करण्यासाठी सतत सज्ज असायला हवे.

इतरही अनेक प्रश्न, अनेक अडचणी आहेत. वाढता भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, धर्मांधता, अज्ञान, दारिद्र्य, कुपोषण, अस्वच्छता, रोगराई अशा कितीतरी गोष्टींवर खूप काम व्हायला हवे. म्हणजे मग समाजाच्या सर्व स्तरातील अंतर कमी होत एकसंध समाज निर्माण होण्यास मदत होईल. या सर्व अभियानांमध्ये प्रत्येकाने सक्रिय सहभागी होत आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. म्हणजे मग देश नक्कीच प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर राहील यात शंका नाही.

देशाची एवढी प्रचंड लोकसंख्या, इतक्या विविध प्रांतातील नैसर्गिक, सामाजिक वेगळेपण, विभिन्न भाषा, विचारसरणी, राहणीमान यामुळे कोणतीही गोष्ट सहजासहजी साकार होत नाही. राजकीय हेतूने आरोप-प्रत्यारोप, विरोध अडचणी  ठरलेल्या असतात. यातूनही मार्ग काढत कितीतरी चांगल्या गोष्टी देशाने केलेल्या आहेत. व्यापक देशहीताचा विचार करून लोकांनी यासाठी पुढे आले पाहिजे. जबाबदार नागरिक बनून आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत.  भ्रष्टाचार, हिंसाचार, स्त्रीयांवरील अत्याचार, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान असे कुठलेही दुष्कृत्य घडू नये यासाठी जागरूक राहिले पाहिजे. आपल्या घराप्रमाणेच देशाचीही काळजी घ्यायला हवी. दुसऱ्या देशातील चांगल्या गोष्टींचे गोडवे गात न बसता त्याच गोष्टी आधी आपल्या देशात आपण पाळण्याचा निर्धार केला पाहिजे.

आज आपला देश प्रगतीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामे, सुधारणा सुरू आहेत. मोठमोठे प्रकल्प, उद्योगधंदे, तंत्रज्ञानाची मोठी झेप घेत देश जगातल्या प्रमुख देशातला महत्त्वाचा देश नक्कीच बनेल. त्यादृष्टीने देशाची वाटचाल सुरू आहे. हे यश आपणा सर्वांचे असणार आहे. यासाठी सरकार, प्रशासन आणि नागरिक यांच्या छान समन्वयाची वज्रमूठ बांधली गेली तर प्रगतीचा हा  गोवर्धन उचलणे शक्य होणार आहे. शेवटी ही श्रीकृष्णाची भूमी आहे.

स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा करून’शतक महोत्सवी” वर्षात देश पुन्हा वैभवाच्या शिखरावर असेल हे निश्चित.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चहा – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ चहा ☕ भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

सकाळची बगीच्यातील रपेट व मित्र मंडळीतील गप्पा आटोपून घरी आलो, घड्याळाकडे नजर टाकली साडेआठ वाजून गेले होते. घरात शांतता पसरली होती,म्हणजे तरुण मंडळींचा दिवस अजून सुरू झाला नव्हता तर,आमच्या सौ. ही दिसत नव्हत्या पण त्या जागृत झाल्याचे पुरावे दिसत होते.बाहेर पडलेले वर्तमानपत्र टीटेबलवर ठेवलेले होते. सोफ्यावर टाककेले कव्हर नीट नेटके केलेले होते,खोलीतील सटर फटर सामान योग्य जागी  पोहोचले होते.देवघरासमोरील पदकात ताजी पारिजात व शेवंतीची फुले वातावरणात प्रसन्नता निर्माण करीत होती.बहुतेक सौभाग्यवती टेरेसवर गार्डन मध्ये झाडांना पाणी टाकत असाव्या,मी नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र उचलले, मुख्य बातम्या वर नजर टाकली व ठेऊन दिले कारण ते माझे दुपारचे बौद्धिक खाद्य होते. सहजच किचन कडे नजर टाकली गॅसवर काहीतरी होते. जवळ जाऊन पाहिले तो चहा होता. बऱ्याच वेळेपूर्वी बनविलेला असावा, पूर्ण थंड झाला  होता. तीन चार कप तरी होताच. बऱ्यापैकी उकळल्या गेल्यामुळे चहाला मस्त रंग चढला होता,दुधात नाममात्र पाणी असावे,त्यात रेड लेबल चहा भरपूर टाकला होता.चार पाच वेलचीच्ये दोडे आणि अद्रकाचे तुकडे त्यात होते, ते माझ्याकडे पाहून हसत आहेत असे मला वाटले. तो चहा पाहून माझी चहाची तलफ जागृत झाली,मी हळूच गॅस सुरू केला समोरच्या कपाटातून घेतलेल्या कपात मी चहा ओतून घेतला, नी पिणार तोच आमच्या सौ.आल्याची चाहूल लागली. पायऱ्यांवर  ती वरून येताना दिसली, अग तू पण घेतेस का चहा, मी सहज विचारले. अहो तो चहा बिलकुल पिऊ नका,किती वेळचा उघडा पडून आहे.सकाळी मुले उठतील आणि कामवाली येईल म्हणून मांडला होता पण कामवाली आली नाही, नी मुले तर अजूनही उठली नाही. मोरीत ओतून द्या तो चहा,दोन तास जुना आहे तो. सौ.ची आदेशवजा सूचना, कानावर पडली पण भरपूर दुधाचा महागडी चाहापत्ती आणि अद्रक विलायची चा तो श्रीमंत चहा मोरीत टाकून देण्याची  इच्छा होत नव्हती,अग काही होत नाही चहाला!  टपरी वाले नाही का दिवस भर चहा विकत राहतात.मी स्वतःचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला.तेव्हड्यात आमचे कन्या पुत्र दोघेही अवतरले,चहा प्रकरण दोघांनी ऐकले,दोघेही मला समर्थन देतील असे वाटले,पण दोघांनी मलाच समजावलं,अहो बाबा जहर असते जुना चहा असे म्हणत आमच्या कन्येने पुरा चहा मोरीत ओतला माझ्या हातातील कपासह.मी पाहतच राहिलो,

 

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अद्भुत मंदीरे… संकलन :- सतीश अलोणी ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

?इंद्रधनुष्य?

अद्भुत मंदीरे… संकलन :- सतीश अलोणी ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆ 

जाणून घेऊ या, या काही अदभुत मंदिरांची माहिती.

भारत हा एक असा देश आहे, जिथे लोक विविध रितीभातींना मानतात आणि आपल्या धर्म आणि आस्थानुसार ते मंदिरांत पूजा-पाठ करतात.

अशाच एका मंदिरा बद्दल सांगत आहोत, जिथे देवाची नाही तर प्राण्यांची पूजा करतात. या मंदिरात लोक प्राण्यांना श्रद्धाभाव ने पाहिले जाते. त्यामागे काही आख्यायिका देखील आहे. येथे असणारे प्राणी देखील लोकांना नुकसान पोहोचवत नाही. चला तर मग जाणून घेऊ या, या काही मंदिरांची माहिती.

१) डॉग टेम्पल, कर्नाटक-

हे डॉग टेम्पल कर्नाटकाच्या रामनगर जिल्ह्याच्या चन्नापटना मध्ये स्थित आहे. या मंदिराची निर्मिती वर्ष २०१० मध्ये एक व्यवसायिका द्वारे केली गेली. हा व्यवसायिकाने केम्पम्मा मंदिराची निर्मिती केली , हे मंदिर ग्रामदेवी केम्पम्मा यांना समर्पित आहे.एका आख्यायिकेनुसार, मंदिराची स्थापना होत असताना ग्राम देवी केम्पम्मा यांनी दोन कुत्र्यांना शोधण्याचा आदेश ग्रामस्थांना केला होता, जे पूर्वी गावातून गायब झाले होते, जेणे करून मंदिराला वाईटापासून वाचवता येईल.

ग्रामीणांना ते कुत्रे मिळाले नाही, म्हणून त्यांनी एक मंदिर बनवले आणि मंदिरात दोन कुत्र्यांच्या मुरत्या स्थापित केल्या. एका आख्यायिकेनुसार, ग्रामस्थांनी या डॉग टेंम्पल मंदिराचा निर्माण करून कुत्र्यांची माणसांच्याप्रति एकनिष्ठेच्या भावनेला समर्पित केले आहे.

२) भालू मंदिर –

छत्तीसगढ़- छत्तीसगढ़ मध्ये चंडी माता मंदिर आहे. हे मंदिर बऱ्याच गोष्टींसाठी विशेष आहे. छत्तीसगडच्या या महासमुंदाच्या या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की, या मंदिरात आरतीच्या वेळी काही भालू (अस्वल) येतात आणि इथल्या पुजाऱ्याकडून प्रसाद घेऊन खातात. आणि या मंदिराच्या नऊ प्रदक्षिणा लावून परत निघून जातात. विशेष म्हणजे की, या मंदिरात येणारे भालू कधीही कुणाला त्रास देत नाही. या मंदिरात येणाऱ्या भालूंच्या उपस्थितीमुळे या चंडी माता मंदिराला भालू मंदिर म्हणून देखील ओळखले जाते.

३) मंकी मंदिर –

जयपुर- राजस्थानच्या जयपूरच्या टेकड्यांमध्ये गलताजी यांचे मंदिर आहे. इथे भाविक पवित्र पाण्यात स्नान करण्यासाठी येतात. या परिसरात रामगोपालजी नावाचे मंदिर आहे, या मंदिरात माकड मोठ्या संख्येने येतात. मंदिरात माकडांच्या उपस्थितीमुळे या मंदिराला माकडाचे मंदिर किंवा बंदर मंदिर म्हटले जाते. माकडाला मारुती(हनुमानाचे) रूप मानतात, म्हणून लोक या माकडांना सन्मान देतात.

४) मन्नरसला नागराज मंदिर –

 हरिपद,केरळ -केरळच्या हरिपद येथे मन्नरसला नागराज मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन आहे आणि हे मंदिर नागदेवाला समर्पित आहे. हे मंदिर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. हे मंदिर भारताच्या केरळ राज्यात आपले एकमेव मंदिर आहे. या मंदिरात सुंदर सापाच्या मुरत्या नक्काशी केलेल्या आहेत. मन्नरसाच्या मंदिराच्या वाटेवर आणि झाड्यांवर सापाच्या १००००० नक्काशी कोरलेल्या आहे.

या मंदिराच्या भेटीला दूरवरून भाविक येतात. पण अपत्य प्राप्तीची इच्छा करणारे दाम्पत्य येथे आवर्जून भेट देतात. आणि अपत्यप्राप्तीसाठी पूजा करतात. अपत्यप्राप्ती झाल्यावर ते बाळाला घेऊन येथे येतात आणि सापांच्या मुरत्या इथे प्रसाद स्वरूपात अर्पण करतात.

संकलन : सतीश अलोणी

संग्राहक : स्मिता पंडित 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डाॅ.अनिल अवचट .. एक निखळलेला तारा ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?विविधा ?

☆ डाॅ.अनिल अवचट .. एक निखळलेला तारा ☆ सौ राधिका भांडारकर ☆

कितीतरी तेजस्वी तारे निखळले…

डाॅ.अनिल अवचट हे ही ,पुण्यातील अत्यंत नामांकीत ,साहित्यिक, बहुआयामी व्यक्तीमत्व…!

एक पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ता,प्रतिभावंत कलावंत काळाच्या पडद्याआड गेला….

त्यांची कितीतरी पुस्तकं ..!!

त्यांची पुस्तकं वाचत असताना ,आपल्या मध्यम वर्गीय जगण्याच्या पलीकडे एक जग आहे,याची जाणीव होते..आपल्या सुरक्षित कोषातून बाहेर पडण्याची ऊर्मी त्यातून मिळते…

पूर्णीया  हे त्यांचं पहिलं पुस्तक.आणि माझं आवडतं पुस्तक.त्यांत त्यांनी बिहारचं अंतरंग उलगडलय्.तिथली समाजव्यवस्था,जमीनदारी,अस्पृश्यता,वेठबिगारी,कंगाली यांचं वर्णन वाचून अक्षरश:हादरायला होते.

ते संवेदनशील आणि मनमोकळे होते. लोकांमधे वावरणारे होते. ते नि:संशय मराठीतले महत्वाचे लेखक ठरतात.त्यांनी आयुष्यभर मिशनर्‍यांसारखं, वंचितांचं, गरिबांचं, कष्टकर्‍यांचं, जगणं, समाजासमोर आणण्याचं काम केलं.

आणि हे सर्व लिखाण प्रत्यक्ष बघून,फिरून ,बोलून!लोकांमधे वावरून केलं आहे.त्यामुळे त्यांत रुक्षपणा,बोजडपणा ,अजिबात नाही. जणू वाचकाचं बोट धरून त्यांना काही दाखवावं असं त्यांचं लेखन…मोकळं मुक्त…जसं बोलणं तसं लिहीणं…त्यामुळे अनिल अवचट यांच्याशी प्रत्यक्ष ओळख नसली तरी ते कधीही अनोळखी वाटले नाहीत…

धागे आडवे उभे,वाघ्या मुरळी,प्रश्न आणि  प्रश्न, वेध ,छेद, संभ्रम , कोंडमारा,माणसं ,अशा कित्येक पुस्तकांतून  हा पैलुदार साहित्यिक भेटत राहिला…त्यांच्या विचारातला लवचिक पणा ,तसा ठामपणाही सतत जाणवला.अस्तित्व टिकवणारी साहित्यनिर्मीती असंच मी म्हणेन…

दलीत पँथर, छात्र युवा संघर्ष वाहिनी, भूमीसेना, हमाल पंचायत वगैरेंशी त्यांचे संबंध होते. नामदेव ढसाळ, राजा ढाले, कुमार सप्तर्षी यांसोबत ते काही काळ या चळवळीत राहिले.पण कार्यकर्त्याचा आपला पिंड नाही हे जाणून ते त्यातून बाहेर पडले पण एकाचवेळी लेखनाच्या माध्यमातून जोडलेले ही राहिले.

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र ही त्यांचीमहत्वाची सामाजिक ओळख!या त्यांच्या कार्याला पुलंसारख्या आणि अनेक नामांकीत श्रेष्ठींने हात दिले.गेल्या पस्तीस वर्षात त्यांनी कितीतरी हजार व्यसनी लोकांना व्यसनमुक्त करून त्यांचे पुनर्वसन केले.मात्र याचे सर्व श्रेय त्यांनी आपली पत्नी सुनंदाला दिलं.”मी फक्त व्यसनी लोकांच्या जगण्यावर लिहीण्यापुरता…”असे ते म्हणत.

ओरिगामी या कलाछंदांतून ते जगभरच्या बालविश्वाशीही जोडले गेले. त्यांची कित्येक डिझाईन्स ही स्वनिर्मीत  होती… अनेक रुपातले मोर ,गणपती,पक्षी हत्ती घोडे, विदूषक, सांताक्लाॅज्.. त्यांनी स्वत: कागदातून बनवले..जपानमधे ती कायमस्वरुपी प्रदर्शनातही ठेवली आहेत…

ते सुंदर बासरीही वाजवायचे…चित्र काढायचे..

असा हा बहुयामी ,साहित्यिक कलावंत मुक्त मोकळा आणि एक सच्चा माणूस….आज नाही..

विसर्जीत झाला..

त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर…

कागदावरच्या प्रत्येक ठिपक्यात पारदर्शक विसर्जनाचे क्षण तरंगत असतात.

जंगलात ,ऋतुचक्रात हे सामावलेले असते..

झाडाचे पिकले ,पिवळेपान फांदीवरून निसटते.

हवेत तरंगत,मौनाच्या प्रार्थना सारखे जमिनीवर अलगद टेकते…विसर्जित होते.अगदी हळुवारपणे.विसर्जन ही एक  मौलीक गिफ्ट आहे…!!

साहित्यविश्वातले एक सुवर्णपान गळाले…

ज्यांनी जगणे उजळले…

सर्व साहित्यप्रेमींतर्फे या संवेदनशील व्यक्तीमत्वाला प्रेमपूर्वक वंदन…

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

मनोहर फार्म हाउस आज अगदी गजबजून गेलं होतं. जिव्हाळ्याचे नातेवाईक,  स्नेही-संबंधित जमले होते. गेल्या चार वर्षापूर्वी सुहासने आपल्या शाळेतल्या वर्गमित्राकडून प्रकाशकडून ही जमीन विकत घेतली होती. त्याच्या बायकोला कॅन्सर झाला होता आणि तिच्या उपचारांसाठी बर्‍याच पैशांची आवश्यकता होती. उपचाराच्या दरम्यान घरून येण्यासारखे कोणी नव्हते. तिची देखभाल त्यालाच करणं भाग होतं. त्या सगळ्यात त्याची नोकरीही गेली. पाच वर्षापूर्वी सुहासच्या शाळेतील दहावीच्या बॅचने गेटटूगेदर केलं. तेव्हा सुहासला त्याची परिस्थिती कळली. तो पैशासाठी जमीन विकणार असल्याचे तेव्हा म्हणाला. सारखी रजा घ्यावी लागत असल्यामुळे नोकरी कितपत टिकेल, याचीही त्याला शंका वाटत होती. सुहासने मग त्याची जमीन विकत घेतली. पुढे दोन वर्षांनी तिथे फार्म डेव्हलप केला. फार्म हाऊसही बांधलं. त्या सगळ्या इस्टेटीचा व्यवस्थापक म्हणून त्याने प्रकाशलाच नेमलं. जमिनीतून पालेभाज्या,  फळभाज्या,  फुले वगैरे लावून त्याचे उत्पन्नही प्रकाशने घ्यावे, असे त्याने सुचवले. प्रकाशला देवच मदतीला धावून आल्यासारखे वाटले. त्याच्या बायकोची रश्मीची ट्रीटमेंट झाली. आता तिचा धोका टळलाआहे,  असं डॉक्टर म्हणतात. प्रकाश नेहमी म्हणतो, `कृष्ण सुदामाची कथा आपण वाचली होती. सांगतही होतो लहानपणी. पण प्रत्यक्षात असा कृष्ण आपल्या नशिबात येईल, असं कधी वाटलं नव्हतं.’ आता रश्मीची तब्बेतही सुधारलीय.  ती पण भाजीपाला पिकवण्यात,  फुले, हार करणं,  यासारख्या कामात प्रकाशला खूप मदत करते.  सुहासचा एकेकाळचा जिवाभावाचा मित्र त्याचं फार्म आणि फार्म हाऊसचा व्यवस्थापक बनलाय.. त्याच्यावर विश्वास टाकून सुहास गावोगावी, देशोदेशी जायला मोकळा झालाय ॰.

आताशी नातेवाईक, संबंधित म्हणायला लागले होते, `सुहास, तू फार्म हाऊस बांधलंस म्हणे! एकदा बघायला हवं!’  सुहासच्याही मनात येत होतं,  एकदा कुठल्या तरी निमित्ताने आपल्या सगळ्या जिव्हाळ्याच्या माणसांना तिथे बोलवावं आणि सगळ्यांनी एक दिवस मस्त मजेत काढावा. पण काय निमित्त काढावं?  आणि त्याला एकदम आठवलं,  पुढच्या महिन्यात आप्पांना सत्तर वर्षं पूर्ण होताहेत,  तर वहिनींना साठ. शिवाय त्यांच्या लग्नालाही चाळीस वर्षं होताहेत. त्या निमित्ताने एक झकास गेटटूगेदर करू या. याबद्दल सुहास सुखदाशी बोलला,  तेव्हा ती म्हणाली, ‘`याबद्दल माई-आप्पांशी बोलूयात नको! त्यांना एकदम सरप्राईज देऊयात.’ सुहासला ती कल्पना आवडली. रोज वेगवेगळ्या योजना ठरू लागल्या. मिहीर-मिरालाही त्यांनी बजावलं, `माई-आप्पांना काही कळू देऊ नका. त्यांना एकदम…’

`सरप्राईज’ मुलं ओरडली.

मग मुलं रोज एकमेकांशी कानातल्या कानात कुजबुजू लागली. नेत्रपल्लवी, हातवारे होऊ लागले. घरात काही तरी शिजतय,  हे मालतीच्या लक्षात आलं.

`अग, काय चाललय काय तुमचं?’  मालतीनं न राहवूनविचारलं. `काही नाही ग!’ मिहीर मीराला तोडावर बोट ठेवून खुणा करत म्हणाला नाही तर ती पटकन बोलून गेली असती ना! 

 `ती ना, आमची एक गम्मतआहे.’ मीरा म्हणाली.

`आम्हाला पण कळू दे की तुमची गंमत.’

`अंहं! बाबा म्हणाले, कुण्णाला सांगायचं नाही.’

`आई-आप्पांना तर मुळीच नाही.’

`अरे, आम्हाला पण तुमच्या गमतीत घ्या ना!’

`सांगू का?’ मीरा म्हणाली, तशी मिहीरने तिला डोळ्यांनीच ‘गप्प बस’ म्हणुन खुणावले.

`की नाई, या महिन्यात वीक एंडला आपण फार्म हाऊसवर जाणार आहोत. ‘

`असं का? छान! छान!’

`आपणच नाही काही! काका-काकू,  मामा- मामी आणि खूप खूप लोकांना बोलावणार आहेत बाबा’

`हो का? पण का म्हणे?’

बोलता बोलता  मीरा विसरूनच गेली, की आजी आणि आप्पांना काहीच कळू द्यायचं नाहीये. ती पटकन म्हणूनगेली, ` अग, तुझा आणि आप्पांचा वाढदिवस आहे ना! तुझा साठावा. आप्पांचा सत्तरावा. ‘ आणि मग तिने एकदम जीभ चावली.

‘`काय हे मीरा?  सगळं सीक्रेट तू ओपन केलंस.’

 `सॉरी… सॉरी…’ मीरा कान धरत म्हणाली.

`अग, बाबा म्हणाले, त्या निमित्ताने आपण गेटटूगेदर करू या. ‘ 

संध्याकाळी सुहास घरी आल्यावर मालती म्हणाली, `अरे, कसला घाट घातलायस?’

`घाट? कसला?’

`ते काही तरी गेटटूगेदरम्हणत होते मीरा, मिहीर.’

`हां! ते होय?  अग,  बरेच दिवस सगळे म्हणताहेत, सुहास तुझं फार्म हाऊस बघायचंय.’

`ते ठीक आहे. गेटटूगेदर कर तू! पण ते वाढदिवस वगैरे असलं काही नको हं! वाढदिवस आता मुलांचे साजरे कराययचे?  की आमचे? ‘

`बरोबर आहे. आणि पंचाहत्तरी साजरी करतात. सत्तरी नव्हे. ‘ आप्पा म्हणाले.

`आणि लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजराकरतात. चाळीसावा नव्हे. ‘ मालती म्हणाली.

`आम्ही आणखी पाच -दहा वर्षं जगू की नाही,  अशी शंका नाही ना आली तुम्हाला? ‘ आप्पा हसत हसत म्हणाले.

`मुळीच नाही. आणखी पाच वर्षांनी आपण तुमचा अमृत महोत्सव साजरा करू. दहा वर्षांनी तुमच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सव नि त्याच्या पुढल्या वर्षी सहस्त्रचंद्र दर्शन.’ इती सुखदा. मालतीची लाडकी सून.

क्रमश:….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शताब्दी ची शिदोरी.. ऋजुता पेंडसे ☆ संग्राहिका – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 

? मनमंजुषेतून ?

☆ शताब्दी ची शिदोरी.. ऋजुता पेंडसे ☆ संग्राहिका – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

शताब्दी कार्यक्रम संपून जवळपास पंधरा दिवस झाले! अजूनही त्या दिवसांच्या आठवणी मनात रेंगाळत आहेत.. मागच्या वर्षी शताब्दी वर्ष सुरू झाले, तेव्हा कोरोनामुळे काही मर्यादित लोकांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम साजरा झाला.. मनात स्वप्न होते की, पुढच्या वर्षी कोरोनाचे संकट दूर झालेले असेल आणि आपण अधिक आनंदाने कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकू! पण.. … कोरोना पूर्ण गेलेला नसला तरी सुदैवाने डिसेंबर मध्ये तो मर्यादित प्रमाणात होता. त्यामुळे कार्यक्रमासाठी भरपूर उपस्थिती आपल्याला दिसली..

यंदा शताब्दी वर्ष असले तरी आपण या कालखंडाच्या माध्यान्हीच्या कालखंडात होतो.शाळेच्या 1969 च्या बॅचने 1996 साली पंचविसावे वर्ष उत्साहाने साजरे केले होते. तेव्हाही आपण उत्साहानं जमलो होतो, पण शताब्दी चा उत्साह काही वेगळाच! 25, 26, 27, 28 डिसेंबर 2021 हे चार दिवस शाळेच्या शताब्दी महोत्सवाचे होते.या चार दिवसांत उत्साह अगदी ओसंडून वाहत होता!

संस्थेचे अध्यक्ष  आणि कार्याध्यक्षा  यांनी कार्यक्रमाची आखणी अगदी व्यवस्थित केली होती. शाळेशी संबंधित सर्व लोक उत्साहाने कार्यक्रमाची आखणी करत होते.आम्ही हे सर्व व्हाॅट्सपच्या माध्यमातून पहात होतो. पहिले दोन-तीन दिवस तरुणाईचे होते. ज्यांनी शाळा सोडून जेमतेम वीस पंचवीस वर्षे झाली होती, त्यांचा उत्साह अपूर्व होता.त्या त्या दिवसाचे व्हिडिओ पाहून आम्हाला हे सर्व कळले.

२७ डिसेंबर ला आमच्या वर्गाची बॅच बरीचशी शाळेत  हजर झाली होती.शाळा अगदी सजली होती.

तो मोठा पेंडाॅल, त्यात चमकणाऱ्या झिरमिळ्या,   सगळीकडे लायटिंग आणि शताब्दी सोहळ्याचा आनंद दाखवणारा द्योतक म्हणून मोठ्ठा ‘आकाश कंदील!’जणू काही दिवाळीच होती शाळेची! मी आणि माझी मैत्रीण रिक्षाने हॉटेल वरून गावात येताना रिक्षावाला सुद्धा शाळेच्या शताब्दी बद्दल उत्साहाने बोलत होता!’ एवढा मोठा समारंभ पाहिलाच नाही कधी!’गावातले वातावरणही शाळे प्रमाणेच उत्साहाने भारलेले होते!

२८ तारखेला सकाळी नटून थटून आम्ही उत्साहाने शाळेत आलो. जवळपास पन्नास-पंचावन्न वर्षांनी काही चेहरे आम्ही प्रथमच पाहत होतो. त्यामुळे ‘हीच का गं ती, पूर्वी लांब केस असणारी, किंवा ‘हाच का तो, आता टक्कल पडलेला!’ असे प्रश्न एकमेकींना विचारले जात होते! वय वाढले तरी मूळचे रूप डोळ्यासमोर असतेच ना! एकमेकांशी किती बोलू नि किती नको असे चालू असतानाच नाश्त्याचा आस्वाद घेतला जात होता. चारही दिवस त्याच उत्साहाने पोहे, बटाटेवडे,चहा,काॅफी अखंड मिळत होती. मुख्य कार्यक्रम सुरु होताना ढोल-ताशांच्या गजरात शाळेच्या मुख्य दरवाज्यापासून ज्योत पेंडाॅलमध्ये आणण्यात आली. वातावरण अतिशय आनंदाचे होते. सर्व मान्यवर आपापल्या जागेवर स्थानापन्न झाले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणारे सर खूपच छान ओळख करुन देत होते सर्वांची! .पाहुण्यांची ओळख,  अध्यक्षीय भाषण तसेच इतरही प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाली. आणि सत्कार समारंभ सुरू झाला. शाळेसाठी खूप मोठमोठ्या देणग्या येत होत्या.मी वडिलांच्या नावे दिलेली देणगीची रक्कम फार मोठी होती असे नाही,पण त्यानिमित्त माझा सत्कार करण्यात आला.शाळा ही आपल्याला मातेसमान असते.आणि तिच्या हातून  हा माझा सत्कार झाला ह्याचे मला खूप अप्रूप वाटले! या सर्व कार्यक्रमानंतर जेवणाचा कार्यक्रम दोन अडीच वाजेपर्यंत चालू होता. त्या नंतर आम्हाला थोडावेळ आमच्या वर्गात जाण्यास मिळाला. आम्ही आपापली बाके धरून बसलो. आमचे जुने शिक्षक,बाई  … सर्वांच्या आठवणी आणि त्यांचे तास मनासमोर आणत खूप एन्जॉय केले! बालपण साक्षात उभे राहिले डोळ्यासमोर! तीन साडेतीन वाजता पुन्हा एकदा पेंडाॅलमध्ये  करमणुकीच्या कार्यक्रमासाठी जमलो. त्यात मला माझ्या दोन कविता वाचण्याची संधी मिळाली!

आमच्या वर्गाचा महंमद रफी असणाऱ्या मित्राची गाणी खासच झाली.कित्येक विद्यार्थ्यांनी शाळेच्या छान आठवणी सांगितल्या. त्यानंतर  मुलामुलींनी गाण्याच्या तालावर नाचून घेतले.तिथेअसलेल्या युनिफॉर्म मधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी च्या कट् आऊट मध्ये आम्ही फोटो काढले.तसेच 100  च्या अंकामागे उभे राहून ही फोटो काढले गेले! लहान मुलांप्रमाणे आम्ही बागडत होतो अगदी!कार्यक्रमाला वेळ खूपच कमी मिळाला असे म्हणत म्हणतच सहा वाजेपर्यंत कार्यक्रम आवरता घ्यावा लागला. पेंडॉल मधून बाहेर पडायला कुणाचेच मन होत नव्हते! प्रत्येकाचे पाय अडखळत होते पण शेवटी कुठेतरी थांबावेच लागते ना! घोळक्या घोळक्याने मुले -मुली(स्वतः ला आम्ही अजून शाळेचे विद्यार्थी च समजत होतो.) गप्पा मारत होते. एसटीचा संप, कोरोना ची भीती या सगळ्याला तोंड देत जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्षा सर्व परिचित असल्याने वातावरण आपुलकीचे होते.त्या दोघांनी तसेच इतर सर्व कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्वांनी  ह्या कार्यक्रमासाठी खूप कष्ट घेतले होते.शाळेच्या इतिहासात हे सुवर्णक्षण नक्कीच कायम स्वरुपी रहातील!  तिथून निघताना खूप सार्‍या आठवणींची शिदोरी बरोबर मिळाली होती .पुढची शताब्दी काही आपल्यासाठी नाही, पण या शताब्दी ची शिदोरी आम्हाला आनंद देण्यासाठी आयुष्यभरासाठी मिळाली असं मात्र मला वाटलं!

 

  – ऋजुता पेंडसे

संग्रहिका – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ किर्तीमुख.. ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ किर्तीमुख.. ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

देवळात गाभाऱ्याचे दरवाजावर किर्तीमुख कितीजणांना माहीत आहे?”

एकदा पार्वतीच्या सौंदर्याची स्तुती ऐकून महा शक्तिशाली जलंधर राक्षसाने पार्वतीस लग्नाची मागणी घालण्यास राहूला आपला दूत म्हणून पाठवले. राहू कैलासावर गेला,त्याने जलंधरासाठी पार्वती ला मागणी घातली, हे  ऐकून संतापलेल्या भोलेनाथांच्या तिसऱ्या डोळ्यातून एक भीषण राक्षस निर्माण झाला,आणि राहूवर धावून गेला.त्या राक्षसाचे महाभयंकर रूप बघून राहू गर्भगळीत झाला,त्याने शिवाच्या पायावर लोळणंच घेतली.भोलेनाथांनी दूत बनून आलेल्या राहूला माफ आणि तिथून काढता पाय घेतल्यावर महादेव परत ध्यानस्थ झाले. पण इकडे त्या भयंकर राक्षसाची भूक वाढतच होती. त्याने भोलेनाथांना विचारले, की मी काय खाऊ?ध्यानात मग्न होत असलेल्या महादेवांनी सांगितले,की खा स्वतःलाच.देवाधिदेव महादेवाची आज्ञा शिरसावंद्य मानून राक्षसाने स्वतःला पायापासून खायला सुरवात केली आणि खात खात त्याचे फक्त डोकेच उरले.

तरीही त्याची भूक भागली नाही.महादेवाचे ध्यान संपल्यानंतर त्याला दिसले ते फक्त राक्षसाचे डोके.त्या राक्षसाच्या आज्ञा पालनावर  भोलेनाथ प्रचंड खुश झाले. त्यांनी त्या डोक्याला नाव दिले कीर्तिमुख.

ह्या जगात कधीही न संपणारी गोष्ट म्हणजे मनुष्याचे पाप.

अमर्याद अशी भूक असलेल्या किर्तीमुखाला देवाने काम दिले भक्तांची पापं खाण्याचे पंढरपूरचा विठ्ठल असो,  कोल्हापूरची अंबाबाई,किंवा तुळजापूरची भवानी,ह्या महाराष्ट्राच्या देवतांच्या मागे जी चांदीची महिरप किंवा कमान असते,त्याकडे आपले फारसे लक्ष जात नाही.त्या कमानीवरच विराजमान असते हे किर्तीमुख.दक्षिण भारतात शिवमंदिरांच्या शिखरावर ही किर्तीमुखे कोरलेली असतात जी शिवभक्तांची पापे गिळत असतात.शिवाचा मनुष्याच्या पापे करण्याच्या क्षमतेवर पुरेपूर विश्वास.म्हणून किर्तीमुखाला आजही पोटभर खायला मिळते

संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – संस्मरण ☆ लेखांक # 8 – मी प्रभा… नावात काय आहे ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? आत्मकथन ?

☆ लेखांक# 8 – मी प्रभा… नावात काय आहे ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

माझं नाव प्रभा सोनवणे! गेली पंचेचाळीस वर्षे मी या नावानेच ओळखली जाते,साहित्य क्षेत्रात जी काही लुडबुड केली, ती आता नावारूपास आली आहे, कवयित्री, लेखिका, संपादक म्हणून प्रभा सोनवणे हे नाव लोकांना माहित आहे, परवा पासपोर्टचं नूतनीकरण करायला गेलो, त्या आधी एजंटने सांगितले होते आधार कार्डावर जसं संपूर्ण नाव आहे तसंच पासपोर्ट वर असायला हवं, म्हणजे नव-याच्या नावासकट! मग त्या संपूर्ण नावाची गॅझेट मधे नोंद करून घेतली त्यासाठी पैसा, वेळ वाया घालवला, पासपोर्ट ऑफिस च्या बाहेर एजंट ने सांगितले तिथे स्क्रीन वर नीट पाहून घ्या नाव आणि पत्ता बरोबर आहे का! तरीही व्हायचा तो घोटाळा झालाच, पत्ता चेक केला,नाव चेक करायचं राहून गेलं, पूर्वी पासपोर्ट वर “सोनवणे प्रभा” एवढंच नाव होतं ते तसंच राहिलं! नव-याचं नाव जोडायचं राहून गेलं, म्हणजे ज्या साठी केला होता आट्टाहास…..ते राहूनच गेलं!

प्रसिद्ध इंग्रजी लेखक  शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? पण नावात बरंच काही आहे. आई सांगायची तिला माझं नाव मृणालिनी ठेवायचं होतं पण त्या काळात देवबाप्पा हा सिनेमा खूप गाजला होता (माझा जन्म १९५६ सालचा आहे) त्यातल्या “चंदाराणी ” नावाचा बराच प्रभाव होता, माझ्या मामांनी माझं नाव चंदाराणी ठेवलं आणि  आईला आवडत असलेलं एक चांगलं  नाव मला मिळालं नाही!

लग्नानंतर सासूबाईंनी प्रभा नाव ठेवलं, आजीला आवडत असलेलं “नूतन”, गुरूजींनी क अक्षरावरून नाव ठेवायला सांगितलं म्हणून “कात्यायनी” ही नावं सुद्धा मी वापरली आहेत. कारण असं वाटतंच आपलं एक छानसं नाव असावं.

पण आता वयाच्या पासष्टाव्या वर्षी प्रभा हेच नाव स्वतःचं वाटतं कारण गेली पंचेचाळीस वर्षे तिच माझी ओळख बनली आहे. प्रभा सोनवणे या नावाला स्वतःची एक प्रतिमा निर्माण करता आली, या नावाची जनमानसात एक छाप आहे…..म्हणूनच या मालिकेचं नाव आहे……  मी…. प्रभा अर्थात हे शीर्षक मंजुषा मॅडमनी सुचवलं आहे!

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares