मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अशी झाले मी उद्योजिका ☆ सुश्री स्नेहलता गाडगीळ

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ अशी झाले मी उद्योजिका ☆ सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆ 

लहानपणी सुट्टीमध्ये व्यापार हा खेळ चालायचा. मी नेहमी बँकर व्हायची. मला वाटायचे आपल्याला विकत घेणे, विकणे जमणार नाही. पण खेळ खूप आवडायचा. मग हळूहळू व्यापाराची गंमत कळायला लागली आणि मोठेपणाची बीजे रुजू लागली.

शाळा खूप छोटी होती. त्यामुळे फारश्या  गोष्टी बघायला मिळाल्या नाहीत. वेगळे शिक्षण घेतले नाही. आजकाल शाळेमधून सुध्धा एक्स्ट्रा ॲक्टिविटीज खूप असतात.

नंतर एमएससी झाले. १९७५ साली.माझे पोस्ट ग्र्याज्युएशन आणि लग्न एकदमच झाले. कॉलेज संपले. आणि नवीन वैवाहिक जीवनाची सुरवात झाली. पण माझी मनापासून काहीतरी स्वतः करण्याची इच्छा प्रचंड होती. नोकरी न करता स्वतः लोकांना नोकरी द्यावी म्हणजेच एखादा व्यवसाय सुरू करावा अशी प्रबळ इच्छा होती. तसेही नोकरी करण्यास घरून विरोध होता.आणि मग माझ्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे १९७७ साली दिवाळी पाडव्याला घरामध्ये व्यवसायाची मुहूर्त मेढ रोवली गेली. त्याला नाव दिले ‘ हेम इलेक्ट्रॉनिक्स ‘.दोन टेबले, एक कामगार आणि आमचे घर ही व्यवसायाची जागा. मग मार्केट शोधणे, कच्चा माल जमा करणे, हे सर्व सुरू झाले आणि मार्च ७८ मध्ये १००स्के. फूट जागेमध्ये तयार झाला पहिला प्रॉडक्ट.

नंतरची दोन वर्षे इमर्जन्सी लाईट युनिट्सच्या खूप ऑर्डर्स मिळत गेल्या. त्यावेळी ५-६ तास दिवे जात असत. अशी हळूहळू सुरवात झाली. नंतर आम्हाला मार्केटिंग एजन्सीनी संपर्क साधला आणि मग व्यवसाय वाढीस लागला. माझे पतीही ८४ साली नोकरी सोडून हेम इलेक्ट्रॉनिक्सला जॉईन झाले. ते बंगलोरहून  M E झालेले असल्याने ते आल्यावर आम्ही जवळ जवळ २०० नवीन प्रॉडक्ट्स  मार्केटमध्ये आणले.

त्यांची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी ह्यामुळे आम्ही आमचे पाय घट्ट रोऊन परदेशी प्रॉडक्टच्या  इतकेच उत्तम दर्जाचे पण संपूर्ण स्वदेशी बनवटीचे प्रॉडक्ट्स खूप कमी किमतीत सर्व इंजिनियरिंग इन्स्टिट्युट ,आर अँड डी लॅबना पुरवठा करू लागलो.

जसा जसा व्यवसाय वाढला तशी जागा कमी पडू लागली.  मग आम्ही एम आय डी सी  मिरजमध्ये  आमच्या नवीन वास्तूमध्ये स्थलांतर केले. नंतर कालांतराने दुसरी इमारतही उभी राहिली.

माझा धाकटा मुलगा दोन वर्षे बंगलोर मधील मल्टी नॅशनल कंपनी मध्ये काम करून २००९ साली आमच्या कंपनी मध्ये रुजू झाला. तिघे मिळून २०२० डिसेंबरपर्यंत काम केले.

माझे पती ह्यांचे डिसेंबरमध्ये निधन झाले. थोडे दिवस मी थोडी व्यवसायापासून दूर गेले होते.  पण आता पुन्हा नव्या दमाने कामात रुजू झाले.

व्यावसायिकाला वयाची अट नसते. एक उद्योजक स्वतः काम करून  रोजगार निर्माण करतो आणि अप्रत्यक्षपणे सरकारला बेरोजगारीचा प्रश्न सोडवायला मदत करतो.

म्हणून मला असे वाटते की जास्तीत जास्त मुलांनी फक्त छान नोकरी मिळवणे हे ध्येय न ठेवता, स्वतः उद्योजक होण्याचा विचार करावा.

सरकार नवीन उद्योगाला खूप मदत करते. महिला उद्योजकाला सरकारकडून खूप योजनाही जाहीर होतात.

म्हणून मला इतकेच सांगायचे आहे की कितीतरी क्षेत्रात अजून नवनवीन उद्योग निर्मिती होऊ शकते. नवीन पिढीने तिथे काही करत येईल का असा विचार करून आत्मनिर्भर भारत करण्यास सहाय्य करावे.

© सुश्री स्नेहलता गाडगीळ

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ कुंपण…. कवी कै. वसंत बापट ☆ रसग्रहण.. श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? काव्यानंद ?

☆ कुंपण…. कवी कै. वसंत बापट ☆ रसग्रहण.. श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

कवी कै. वसंत बापट

जन्म – 25 जुलाई 1922

मृत्यु – 17 सितम्बर 2002

? कुंपण ?

आई आपल्या घराला

किती मोठं कुंपण

तारामागे काटेरी

कां ग रहातो आपण?

पलिकडे कालव्याजवळ

मोडक्या तुटक्या झोपड्या

मुलं किती हाडकुळी

कळकट बायाबापड्या

लोक अगदी घाणेरडे

चिवडतात घाण

पत्रावळीतले उष्टे म्हणजे

त्यांचे जेवणखाण !

काळा काळा मुलगा एक

त्याची अगदी कमाल

हातानेच नाक पुसतो

खिशात नाही रुमाल

आंबा खाऊन फेकली

मी कुंपणाबाहेर कोय

त्यानं म्हटलं घेऊ कां?

मी म्हटलं होय

तेव्हापासून पोटात माझ्या

कुठतरी टोचतयं गं

झोपतानाही गादीमध्ये

कुंपण मला बोचतयं गं !

  • कवी कै. वसंत बापट

आपल्या घरापेक्षा वेगळे वातावरण बघणाऱ्या बालमनाला पडलेले प्रश्न आदरणीय कवी वसंत बापट यांनी मुलाच्याच शब्दातून या कवितेत मांडले आहेत

सुस्थितीतील एका कुटुंब

झोपडपट्टी जवळच्या सर्व सोयीनी युक्त एका शानदार

घरात रहायला आल्यावर त्या घरातल्या बाल्यावस्थेतील एका मुलाचे घराभोवती फिरणे,

निरीक्षण करणे सुरु झाले तेव्हा

‘आपल्या घराभोवती एक काटेरी कुंपण असून त्याच्या जवळ  असलेल्या मोडक्या तोडक्या झोपड्या त्याला दिसल्या.अशा झोपड्या कधीच न पाहिलेल्या त्याची झोपड्या व त्यात रहाणाऱ्या माणसांबद्दलची उत्सुकता वाढली.कुंपणाजवळ उभा राहून तो निरीक्षण करू लागला. ते पहात असताना त्याच्या मनात  जे बालसुलभ प्रश्न निर्माण झाले ते तो आईला विचारू लागला.

‘आई, आपण रहातो त्या घराभोवती मोठे काटेरी कुंपण कां आहे? आपल्या समोरच्या त्या मोडक्या तोडक्या झोपडपट्ट्या आहेत तेथे कितीतरी मुलं असून ती  हाडकुळी असून तिथल्या बायाबापड्या कळकट असतात. ही घाणेरडी माणसे आपण टाकलेल्या पत्रावळीतले अन्न चिवडतात, जेवण म्हणून खातात. त्यातला एक काळा मुलगा खिशात रुमाल नसल्याने हातानेच नाक पुसतो. आंबा खाऊन मी कोय फेकली ती त्याने मला विचारून घेतली.

तेव्हापासून आई मला काहीतरी वाटते,

झोपलेल्या मऊ गादीवर मला कुंपण बोचतेयं ‘

कविवर्य वसंत बापट यांनी मुलाच्या मनातील प्रश्नातून समाजाचे विदारक चित्र आपल्यासमोर उभे केले आहे कुंपण हे गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये असलेल्या दरीचे प्रतिक असून ते साधेसुधे नाही तर काटेरी आहे गरीब हे शेवटपर्यंत गरीबच रहाणार आणि श्रीमंत आपल्याजवळ कोणी येऊ नये स्वतःभोवती कुंपण घालणार. श्रीमंत, गरिबांचे खाणे,रहाणीमान यातील तफावत बालवृत्तीला न समजल्याने त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाले .मऊ गादीवर त्याला झोप येत नाही. तर घराभोवतीच्या कुपणाचे काटे त्याला टोचतात म्हणजे असे कां? आपण आंबा खायचा आणि त्यांनी कोय कां? त्याना केव्हा आंबा मिळणार?आपल्या घराभोवतीचे काटेरी कुंपण निघाले तर….त्याना काहीतरी देता येईल. कधी निघणार हे कुंपण ही अस्वस्थता,’ मऊ गादीमध्ये कुंपण बोचते या ओळीतून जाणवते.

लहान मुलांना पडणारे प्रश्न मोठ्यांना पडले तरच समाजभान जागे होईल असाही या कविता लेखनाचा हेतू असावा.समाजदरी कमी करण्याचा एक प्रयत्न म्हणजे ही कविता असे वाटते.विचार प्रवृत्त करणारी ही कविता बरेच काही सांगून जाते.

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित/सौ.मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पिनकोड ☆ संग्रहिका – सुश्री मृदुला अभंग

?  विविधा ?

☆ पिनकोड ☆ संग्रहिका – सुश्री मृदुला अभंग ☆

भारतातील पिनकोड सिस्टिम चा जनक कोकणातील ‘राजापूर’ मधील शाळेत शिकलेला एक हुशार माणूस असेल याची आपल्याला पुसटशी कल्पना ही नसेल… त्यांचे नाव श्रीराम भिकाजी वेलणकर…

PIN म्हणजे Postal Index Number… १९७२ पर्यंत जनरल पोस्ट ऑफिसांत पत्रांवरचे पत्ते वाचून त्यांची विभागवार विभागणी व्हायची… पण त्यात बऱ्याच अडचणी यायच्या… म्हणजे एकसारख्या नावाची माणसं, एकसारख्या नावाची गावं, कधी कुणाचं अक्षर नीट वाचता येण्यासारखं नसे… आणि हे सगळं कमी की काय म्हणून आपल्या देशभरात पत्ता लिहिण्यासाठी वापरलेल्या कितीतरी भाषा.! चुकीचे पत्ते लिहिणं हा तर काही लोकांचा जन्मसिद्ध अधिकार आहेच.!

या सगळ्या अडचणीतून जात असताना त्यावर उपाय म्हणून  पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असलेले श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली… पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली…

पिनकोडची रचना अशी आहे… पूर्ण देश ९ झोन मध्ये विभागला गेला आहे… यातले ८ झोन हे भौगोलिक विभाग आहेत… तर एक खास मिलिट्रीसाठी वापरला जातो… या मधील पहिले दोन अंक पोस्ट ऑफिस दर्शवतात… म्हणजे यातही हा तक्ता वापरता येईल…

११, दिल्ली…*

१२ व १३, हरयाणा…*

१४  ते १६, पंजाब…*

१७, हिमाचल प्रदेश…*

१८ ते १९ जम्मू/काश्मिर…*

२० ते २८, उत्तर प्रदेश/उत्तराखंड…*

३० ते ३४ – राजस्थान…*

३६ ते ३९, गुजरात…*

४० ते ४४, महाराष्ट्र…*

४५ ते ४९ मध्य प्रदेश/छत्तीसगड…*

५० ते ५३, आंध्र प्रदेश…*

५६  ते ५९, कर्नाटक…*

६० ते ६४, तामिळनाडू…*

६७ ते ६९, केरळ…*

७० ते ७४, पश्चिम बंगाल…*

५५ ते ७७, ओरिसा…*

७८, आसाम…*

७९, पूर्वांचल…*

८० ते ८५ बिहार आणि झारखंड…*

९० ते ९९, आर्मी पोस्टल सर्व्हिस…*

म्हणजे सहा आकडी पिनकोडमधला पहिला अंक विभाग दाखवतो, दुसरा अंक उपविभाग, तिसरा अंक  सॉर्टींग जिल्हा आणि राहिलेले शेवटचे तीन अंक हा त्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर असतो…

उदाहरणार्थ ४१३००१ हा सोलापूरचा पिनकोड आहे… यात पहिला अंक दाखवतो पश्चिम विभाग, त्यानंतर १३ हा पश्चिम विभागातल्या महाराष्ट्रातला एक उपविभाग दाखवतो, ४१३ हा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो, तर शेवटचे तीन अंक ००१ हा सोलापूर जिल्ह्यातल्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर आहे…

*आता पत्रं लिहिणं दुर्मिळ होत चाललं असलं तरी पिनकोड सिस्टिम कधीच इतिहासजमा होणार नाही… ही अशी पद्धत शोधणाऱ्या श्रीराम भिकाजी वेलणकर यांना मानाचा मुजरा.

श्रीराम वेलणकर हे संस्कृत पंडित होते व पाली भाषेचे गाढे अभ्यासकही होते…

 

— संग्रहिका – सुश्री मृदुला अभंग

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-5 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

@doctorforbeggars

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-5 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(पण, नेमकं इथेच कुठेतरी काहीतरी चुकतं आणि नाती तुटतात –  फाटतात आणि लोक रस्त्यावर येतात… !) इथून पुढे —-

अशा तीन पिढ्यातले, हे तीन प्रतिनिधी आज रस्त्यावर होते …! 

प्रसंगी या तिघांचा मी मुलगा झालो… प्रसंगी वडील झालो आणि जमेल तेव्हा यांचा आजोबाही झालो. 

एकाच जन्मात तीन पिढ्या जगलो… ! 

सासवडला निघायची वेळ झाली, तिघांनीही डोळ्यात पाणी आणून मला निरोप दिला.

Paralysis वाल्या बाबांना काही केल्या हात जोडता येईनात…. मी त्यांच्या पाया पडलो आणि जोडू पाहणारे ते हात माझ्या हाताने माझ्याच डोक्यावर ठेवून घेतले…! 

रस्त्यावरून आज हे तिघेही एकाच वेळी, एकाच दिवशी एकाच सुरक्षित घरात जातील…

मला किती आनंद झालाय…. हे सांगण्यासाठी…. कुठून शब्द उधार आणु….? 

श्री मंगेश वाघमारे माझा सहकारी….!

मंगेशला म्हटलं, ‘सासवडला जाताना भारीतल्या भारी हॉटेलमध्ये यांना घेऊन जा आणि खाऊ पिवु घाला… जे हवंय ते.’

आम्ही काय करतोय ते रस्त्यात बघत उभा असलेला एक बिनकामाचा बघ्या छद्मीपणे म्हणाला, ‘पण यांना भारी हॉटेलमध्ये येऊ देतील का ?’ 

मला चीड आली… म्हणालो, ‘का रे ? ते माणसासारखे दिसत नाहीत तुला …? 

का ती माणसं नाहीत… ?

का नाहीत येऊ देणार त्यांना हॉटेल मध्ये… ?

दोन पायांवर उभे असलेले तुझ्या बापाच्या वयाचे हे लोक तुला “माणूस” म्हणून दिसत नाहीत फुटक्या ??? 

रिकामटेकड्या बघ्याने माझा अवतार पाहून पळ काढला. 

मंगेशकडे वळून बघत पुन्हा म्हणालो, ‘मंगेश, हॉटेलमध्ये तुम्हाला कोणीच अडवणार नाहीत, आणि जर कुणी अडवलंच तर सांगा यातला एक डॉ. अभिजित सोनवणेचा “भाऊ” आहे, एक “बाप ” आहे आणि एक “आज्जा” आहे ! 

मंगेशने गालात हसत या तिघांना हाताला धरून गाडीत बसवलं. 

श्री अमोल शेरेकर, श्री गौतम सरोदे आणि श्री बाळू गायकवाड या माझ्या सहकाऱ्यांनी, मी पाहिलेल्या या स्वप्नाला मूर्त रूप देण्यासाठी खूप मदत केली….

अंघोळ घालण्यापासून ते पायातले किडे काढण्यापर्यंत या साथीदारांनी मला मदत केली…… मी ऋणात आहे त्यांच्या ! 

डॉ. भाटे सर, माझ्या कुटुंबातली ही तीन माणसं, आज मी आपल्या स्वाधीन करतोय…. आपल्या छत्रछायेखाली उर्वरित आयुष्य ते नक्कीच आनंदाने जगतील, याची मला खात्री आहे. 

पूर्वी रस्त्यावर पडलेल्या, परंतु आता डॉ. भाटे  दाम्पत्याच्या पदराखाली असणाऱ्या, इतर आई-बाबांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या, जर कोणाला सेवा करावीशी वाटली तर, ती डॉ. भाटे दाम्पत्याच्या माध्यमातून जरूर करता येईल. 

त्यांचे फोन नंबर मी देत आहे.— 96890 30235 //7276647470

पुढे माझ्या या कुटुंबीयांना, हॉटेलमध्ये ग्राहक म्हणून अत्यंत अदबीने मिळालेली वागणूक… माणूस म्हणून मिळालेला मान… याने हे तिघेही भारावून गेले.

त्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञता, तृप्ती, समाधान आणि शांती असे सर्व संमिश्र भाव दाटून आले होते. 

त्यांचे हे भाव म्हणजेच माझी जमा पुंजी….! 

ही सर्व पुंजी मी माझ्या मनाच्या तिजोरीत जपून ठेवली आहे.

आज जगातला सर्वात श्रीमंत माणूस मी असल्यागत मला वाटतंय राव… !!! 

(या तिघांच्याही आत्मप्रतिष्ठेला कोणताही धक्का पोहोचणार नाही अशा पद्धतीने माहितीसाठी त्यांचे फोटो Soham Trust या नावे असलेल्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहेत)

– समाप्त –

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मकर संक्रांत….भाग-२ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ मकर संक्रांत….भाग-२ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

यानंतरचा मुख्य दिवस मकरसंक्रांत. या दिवसाची एक पौराणिक कथाही सांगितली जाते. संक्रांत या देवतेने संकरासुर दैत्याचा वध केला. तो हा आनंदाचा आनंदोत्सवाचा दिवस. संक्रांती म्हणजे सम्यक क्रांती. क्रांती मध्ये   हिंसेला महत्व असेल, पण सं–क्रांती मध्ये मानवी मनाचे संकल्प बदलण्याचा विचार असतो. संक्रांती म्हणजे संग क्रांती. प्रत्येकाने मुक्त व आनंदी जीवन जगणाऱ्या, लोकांशी संग युक्त होऊन,  षड्रीरिपूं पासून दूर राहण्याचा संकल्प करायला हवा. संक्रांती म्हणजे संघ क्रांती. “संघे शक्ती कलौ युगे”. संघामध्ये शक्ती विपुल प्रमाणात एकत्र आल्याने कठीण कार्यही सहजगत्या पार पडते. हा सण –उत्सव लोकांना जोडण्याचे काम करतो. म्हणून आनंद सुसंवाद आणि ऐक्‍याचे प्रतीक मानला जातो. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग (संक्रांत). (तमसो मा ज्योतिर्गमय).

संक्रांतीला तीळ  (स्नेह) आणि (गुळ)  गोडी याला महत्व आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार थंडीच्या दिवसात रुक्ष झालेल्या शरीराला स्निग्धतेची  गरज असते. ती गरज भागविणारे तीळ हे सर्वोत्तम खाद्य आहे. आहारात वापरणे प्रकृतीला लाभदायक ठरते. तसेच तीळयुक्त पाण्याने  स्नान करतात. अध्यात्मानुसार  तिळात कोणत्याही इतर तेलापेक्षा, सत्व लहरी ग्रहण करण्याची क्षमता जास्त असल्याने, सूर्याच्या संक्रमण काळात साधना चांगली व्हायला, सर्वोत्तम मानले जातात. तिळाचे तेलही पुष्टीप्रद असते. या दिवशी ब्राह्मणांना दान, शिवमंदिरात तिळाच्या तेलाचे दिवे  लावतात. पितृ श्राद्ध करून, तिलांजली देऊन, तर्पण करतात.तिळामुळे असुर श्राद्धात विघ्न आणत नाहीत, अशी समजूत आहे. जेवणात गुळाच्या किंवा पुरणपोळ्या करतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे .आप्तेष्टांना तिळगुळाची वडी किंवा लाडू देऊन, “तिळगुळ घ्या,गोड गोड बोला” असे शब्द उच्चारले जातात.

“तिलवत वद  सस्नेहमं, गुडवत मधुरम वद । 

उभयस्य प्रदानेन  स्नेहवृद्धीः  चिरं भवेत ।।”

अशी सदिच्छा व्यक्त केली जाते. काहीजण पुण्यकाळ व महापुण्य काळ मुहूर्तावर सूर्यदेवाला अर्घ्य देऊन, पूजा करून ,आरती करून, सूर्य मंत्र  २१ किंवा १०८वेळा पठण  करतात. पूजेच्या वेळी काही भाविक 12 मुखी रुद्राक्ष धारण करतात. त्यामुळे चेतना व वैश्विक बुद्धिमत्ता बऱ्याच पातळ्यां पर्यंत वाढून, कामे यशस्वी होतात अशी समजूत आहे. भगवान शनिदेव मकर राशीचे स्वामी असल्याने, जप ,तप ,ध्यान आदी धार्मिक क्रियांना महत्त्व आहे. संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलीला, सासरचे काळी साडी, हलव्याचे दागिने आणि तिळगुळ आणतात. तसेच जावयाला हलव्याचा हार, गुच्छ ,चांदीच्या वाटीत तिळगुळ घालून देतात. लहान बाळालाही काळे कपडे, हलव्याचे दागिने घालून, बोरन्हाण घालतात. (चिरमुरे, बोरं, भेंड, बत्तासे, चॉकलेट वगैरे). थंडीचे दिवस असल्याने काळा रंग  ऊब  देत असल्याने, काळे कपडे घेण्याची पद्धत असावी. स्त्रिया हळदीकुंकू करून तिळगुळ व दान देतात.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित/सौ.मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-4 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

@doctorforbeggars

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-4 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(आता दुसरी कुठलीही पूजा मांडण्याचं मला कारण नाही….. माझी पूजा झाली !  ) इथून पुढे —-

मी कुराण वाचलं नाही….

मला पवित्र गीता वाचायला जमलं नाही….

मी बायबल सुद्धा वाचलं नाही….

गुरु ग्रंथसाहिब माझ्यापासून खूप दूर होते, मी तीथपर्यंत पोचूच शकलो नाही….

माझ्यासारख्या नालायकाला, ज्ञानेश्वरी काय कळणार ? म्हणून मी ज्ञानेश्वरीला हात सुद्धा लावला नाही…. …!

पण मी माणसांची वेदना वाचत गेलो, त्यांची सहवेदना होत गेलो…. आणि हे वाचता वाचता, मी त्यांची संवेदना झालो… !

या तिघांचीही मी समवेदना झालो !!!

यातल्या ज्या माझ्या बंधूला डोळ्यांना दिसत नाही, तो आश्रमात जाताना मला म्हणाला,  ‘सर, माजी एक शेवटची विच्छा आहे…. पुरवाल का ?’

मी म्हणालो, ‘अरे हो, का नाही? बोल ना…!’

मला वाटलं होतं, तो खाण्याच्या पिण्याच्या किंवा इतर आणखी कोणत्या गोष्टीबाबत बोलेल….

पण, तो म्हणाला, ‘ज्या आबिजित सोनवने नावाच्या मानसानं माझ्यासाटी इतकं केलं, त्या आबिजित सोनवनेचा  मला येकदा चेहरा पाहायचा आहे… कसा दाकवाल सर ?’

त्याच्या या वाक्याने मला गहिवरून आलं…. !

काय बोलू मी यावर ?

त्याला मी म्हणालो, ‘तुला पूर्वी दिसत होतं ना …?  तेव्हा तू स्वतःला आरशात पाहत असशील, तेव्हा तुझा चेहरा कसा दिसतो हे तुला माहित असेल ना …? बरोबर…?

‘हां बरोबर सर….! ‘

‘अरे मग मी तुझ्यासारखाच दिसतो… आपण दोघेही सेम टू सेम आहोत… आपण जुळ्या भावांप्रमाणेच आहोत रे दिसायला राजा…. !

‘खरंच सर…?’  असं म्हणत तो भाबडा जीव, त्याच्या अंध काठीशी, मुठीने चाळवाचाळव करत आनंदला होता… !

अवकाशात बघत तो स्वतःचा हरवलेला चेहरा आठवत असावा….

‘आपून दोगे दिसायला सारकेच आहोत काय …?

भारीच की सर…. म्हंजे मी आबिजित सारखा …. आणि आबिजित माझ्यासारकाच आहे का ? .. भारीच की सर….

पिच्चर मदी दाकवतात तसं….

तुमचा डुप्लिकेट मी,  माजा डुप्लिकेट तुमी…. आयला, भारीच की सर….!

दोन शरीरं….. पण आपलं मन आणि तोंडावळा येकच …. व्हय ना सर ??? ‘

होय रे होय, मित्रा आपण एकच आहोत….!

ज्ञानेश्वरी न वाचताही “अद्वैत” ही संकल्पना आज मला त्याने समजावली होती… !

“तो” आणि “मी” आम्ही दोघेही एक झालो होतो…. !

हे तिघे….!

यातील ज्याला दिसत नाही, तो माझ्या वयाचा ….

दुसरे बाबा ज्यांच्या पायात किडे होते, ते माझ्या वडिलांच्या वयाचे….

आणि तिसरे बाबा, ज्यांना Paralysis आहे ते माझ्या आजोबांच्या वयाचे….

तीन पिढ्यांमधील हे तीन प्रतिनिधी…. !

यातल्या एकाला आई-वडिलांनी सोडलंय…

दुसऱ्याला मुलांनी घराबाहेर काढलंय…

आणि तिसऱ्याला नातवाने टाकून दिलंय…. !

आपण कुठे चाललो आहोत आणि कशासाठी ?

नाती न टिकणं, यामध्ये मीपणा आडवा येतो…. माघार कोणी घ्यायची…. ???

कधीकधी स्वतःचा प्रकाश चंद्राला देऊन

काळोखी रात होऊन जगावं….

कधीतरी स्वतःचा उजेड दिव्याला देऊन

नुसती वात होऊन पहावं…

नाती टिकवण्यासाठी माघार घेण्यात लाज कशाची ?

कधी कधी आपणच शिंपी व्हावं आणि तुटलेलं एखादं नातं जोडून द्यावं…

वायरमन होऊन आपणच कधीतरी दोन तूटलेल्या

तारांचं मिलन घडवावं…

माळी होऊन कधी तरी रडणाऱ्याच्या हाती

फुल द्यावं…

दुसऱ्याच्या वेदना समजून घेत

गुणगुणनारं आपणच एक हृदय व्हावं…

पण, नेमकं इथेच कुठेतरी काहीतरी चुकतं आणि नाती तुटतात –  फाटतात आणि लोक रस्त्यावर येतात… !

क्रमशः….

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मकर संक्रांत….भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ मकर संक्रांत….भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

हिंदू संस्कृतीतील इंग्रजी तारखेप्रमाणे येणारा एकमेव सण म्हणजे मकर संक्रांत — संक्रमण. संक्रांतीचा सण हा निसर्गाचा उत्सव आहे .भारत हा कृषिप्रधान देश असल्याने निसर्गाशी, शेतीशी निगडित असा हा उत्सव आहे. 22 डिसेंबर पासून उत्तरायणाला सुरुवात झाली तरी, सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो ,म्हणजे संक्रमण करतो, तो दिवस 14 जानेवारी. सूर्य भ्रमणामुळे पडणारा फरक भरून काढण्यासाठी, दर 80 वर्षांनी संक्रांतीचा दिवस एक दिवस पुढे ढकलला जातो. व 15 जानेवारीला संक्रांत येते. यानंतर दिवसाचा काळ मोठा, आणि रात्रीचा काळ लहान व्हायला सुरुवात होते. धार्मिक हिंदू लोक उत्तरायणात मृत्यू यावा, असा जप करतात. मृत्यूलाही थांबवून धरणारे पितामह भीष्म हे उत्तम उदाहरण आहे.

संपूर्ण देशभर या सणाला महत्त्व आहे. वेगवेगळ्या प्रदेशानुसार त्याची नावे आणि साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रात संक्रांत, तामिळनाडूमध्ये पोंगल, कर्नाटक आणि केरळ मध्ये संक्रांति ,उडुपी भागात संक्रमण, तर काही ठिकाणी, यादिवशी सूर्याने उत्तरायणी चळवळ सुरू केली, म्हणून त्यास उत्तरायणी असेही म्हणतात .तसेच शेतात धान्याची कापणी चालू असते, म्हणून कापणीचा सण, असेही म्हणतात .तेलगू त्याला पेंडा पाडुंगा , बुंदेलखंडात सकृत, उत्तरप्रदेश बिहार मध्ये, खिचडी करून सूर्याला अर्पण करून, दानही  दिले जाते, म्हणून या दिवसाला खिचडी असेच  म्हणण्याची प्रथा आहे. गंगासागर मध्ये या दिवशी खूप मोठा मेळावा भरवला जातो. हिमाचल हरियाणामध्ये मगही आणि पंजाब मध्ये लोव्ही म्हणतात. मध्यप्रदेशात सक्रस, जम्मूमध्ये उत्तरैन, काश्मीर घाटी मध्ये    शिशुर संक्रांती, आसाम मध्ये भोगाली बिहू, तर ओरिसामध्ये आदिवासी या दिवशी पासून नवीन वर्ष सुरू करतात. केरळ मध्ये तर हा उत्सव  ७–14 –21           किंवा  40 दिवसांचाही करून, संक्रांति दिवशी त्याची सांगता करतात. गुजरात मध्ये आजही तिळाच्या लाडू मध्ये  दान घालून गुप्त दान देण्याची पद्धत आहे. तसेच तेथे पतंग उडविण्याच्या स्पर्धाही घेतल्या जातात. त्यामागील शास्त्र म्हणजे, पतंग उडविण्यासाठी मैदानात किंवा गच्चीत जावे लागते. आणि आपोआपच  सौरस्नान घडते. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही  जोडलेले आहे. त्यादृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्याही खूप महत्त्व आहे.

सूर्याचा ( पृथ्वीचा ) धनु रास ते मकर रास या प्रवासाच्या काळाला धुंधुरमास किंवा धनुर्मास म्हणतात.( 13 डिसेंबर ते 1३ जानेवारी). मकर संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजे भोगी. हा धनुर्मासाचा शेवटचा दिवस. याबाबत पुराणातही एक कथा सांगितली आहे. या काळात एखाद्या दिवशी तरी पाहाटे स्वयंपाक करून, उगवत्या सूर्याला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे.

आपल्याकडे संक्रांत हा तीन दिवसाचा उत्सव साजरा करतात. भोगी, संक्रांत ,आणि किंक्रांत.

भोगी दिवशी  सुगडाच्या (सुघटचा अपभ्रंश  सुगड असा असावा ). पूजेचे महत्व असते. मातीची नवीन गाडगी, ( घट) कोणी दोन, कोणी पाच अशी आणून, त्यापैकी एका मध्ये अगदी छोटी बोळकी ,(ज्याला चिल्लीपिल्ली म्हणतात). घालतात. ऋतूप्रमाणे शेतातून आलेले गाजर, घेवडा, शेंगा, सोलाणा, ऊस, बोर, तिळगुळ, असे जिन्नस त्यामध्ये भरून, ती देवापुढे ठेवून , त्याची पूजा करतात. एका सुपामध्ये बाजरीचे पीठ ,शेंगा, पातीचा कांदा ,मुगाची डाळ, तांदूळ, लोणी, वस्त्र, विड्याचे पान, दक्षिणा, सुपारी, इतकच नाही तर अगदी स्नानासाठी शिकेकाई, खोबरेल तेल असे सर्व ठेवून ते  वाण स्नानापूर्वी एखाद्या सुवासिनीला  देण्याची पद्धत आहे .या दिवशीच्या स्वयंपाकात  तीळ लावून  बाजरीच्या भाकरी राळ्याचा भात किंवा खिचडी आणि वरील सर्व भाज्या एकत्र करून केलेली भाजी  (या भाजीला लेकुरवाळी असे नाव आहे.) भरपूर लोणी, दही असा हा आरोग्यदायी घाट असतो.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित/सौ.मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

@doctorforbeggars

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(कुणीतरी परीक्षा घेत होतं माझी….! ) इथून पुढे —

तिघांचीही सोय करणं गरजेचं होतं… पण माझ्या स्वतःकडे कोणतीही सोय नाही…. 

तिघांची एकदम, एकाचवेळी, सोय कुठे आणि कशी करणार ? कोण या तिघांना पटकन प्रवेश देऊन कायमची जबाबदारी स्वीकारेल ? 

मी कात्रीत सापडलो होतो, आणि हे तिघेही माझ्याकडे डोळे लावून बसले होते….! 

मागच्या आठवड्यात माया केअर सेंटरचे संचालक डॉ. श्री व सौ भाटेताई यांच्याशी एका कार्यक्रमात भेट झाली होती. 

या दाम्पत्याचं मला कौतुक वाटतं. जिथं प्रत्यक्ष मुलं आपल्या आई बापाला सांभाळत नाहीत, तिथं हे दोघे रस्त्यावर पडलेल्या अनेक लोकांना आपल्या घरात घेऊन येतात. मुलांनी सोडून दिलेल्या आईबापांना स्वतःचे आई-बाबा म्हणून सांभाळतात. 

एखादी व्यक्ती घरात घेऊन येणं म्हणजे एखादी वस्तू घरात आणण्या इतकं सोपं नसतं. त्या व्यक्तीचं जेवण-खाणं, कपडा लत्ता, दुखणं खुपणं, सर्वच बघावं लागतं …. मरेपर्यंत! 

अशात, यांच्याकडे जागा कमी, काम करायला कामगार मंडळी कुणीही नाहीत, अपुरी साधनसामुग्री, सरकारी कोणतीही मदत नाही.

डॉ सौ भाटेताई, स्वतः आजारी असून सुद्धा, स्वयंपाक बनवण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत सर्व कामं करून या आईबाबांची सेवा शुश्रूषा करतात.

अशाही परिस्थितीत, यापूर्वी रस्त्यावर मला सापडलेले चार ते पाच लोक मी यांच्या सेंटरला ठेवले आहेत, डॉ भाटे दांपत्य, माझ्या या लोकांचा सांभाळ करत आहे. 

ऋण कसं फेडावं यांचं ? 

इतक्या प्रतिकूल परिस्थितीत असताना, आपण आणखी तीन लोकांचा भार यांच्यावर टाकावा का ? …. असं म्हणत, निर्लज्जपणे मी पुन्हा डॉ. भाटे सरांनाच फोन लावला. 

भाटे सरांना विषय सांगताच ते चटकन म्हणाले, ‘पाठवून द्या सर माझ्याकडे त्यांना.’

‘पण भाटे सर, अगोदरच तुम्ही इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून वेळ मारून नेत आहात त्यात…’ 

मला पुढे बोलू न देता ते म्हणाले, ‘परिस्थिती आपल्याला अनुकूल अशी कधीच नसते, ती आपल्याला बनवावी लागते सर, आणि आपण परिस्थिती अनुकूल होण्याची वाट बघत बसलो तर रस्त्यात पडलेले हे लोक आपली वाट न बघता देवाघरी जातील, आपणच मग आपल्याला माफ करू शकणार नाही… पाठवून द्या तुम्ही तिघांनाही…!’ 

काय बोलू मी या माणसापुढे ?

शुक्रवार 17 डिसेंबर 2021,  हा दिवस या तिघांना भाटे यांच्या आश्रमात पाठवण्यासाठी मी निश्चित केला.

त्या अगोदर बाकीची सर्व तयारी म्हणजे पोलिसांना कळवणे, त्यांच्यासाठी लागतील त्या सर्व वस्तू विकत घेणे वगैरे सोपस्कार पार पाडले. 

शुक्रवारच्या सकाळी यांची आंघोळ आणि दाढी कटिंग झाली.

यांना आणलेले नवे कोरे कपडे घातले. तिघांनाही नवीन बॅगा आणि सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तू त्या बॅगेत ठेवून दिल्या. 

आंघोळ आणि दाढी-कटिंग नंतर, वर्षानुवर्षे काळवंडून पडलेली पितळी समई, घासावी पुसावी आणि लख्ख व्हावी …. तसे आता हे तीघे दिसत होते… !

पहाटेचा काळोख हळूहळू विरत जावा आणि सूर्याने आपला मुखडा दाखवावा…. आज तसे ते दिसत होते… !!! 

संध्याकाळी घरात पूर्ण अंधार असावा आणि देव्हाऱ्यामध्ये ठेवलेली पणती आपण चेतवावी आणि यानंतर तो देव्हारा काळोखात उजळून निघावा, आज तसे भासत होते मला हे तिघेही…. !!! 

माझ्यासाठी हिच पूजा…हाच माझा अभिषेक… ! 

हाच माझा नैवेद्य… हाच मला मिळालेला प्रसाद आणि हिच मी केलेली आरती… !!!

आता दुसरी कुठलीही पूजा मांडण्याचं मला कारण नाही….. माझी पूजा झाली ! 

क्रमशः….

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! अल कपोने आणि दयाळू काल्या दादा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? अल कपोने आणि दयाळू काल्या दादा ! ?

“अगं ऐकलंस का, चहा टाक बघू फक्कडसा, मग तो घेता घेता तुला आणलेली एक वस्तू दाखवतो !”

“असं बोलून तुम्ही उगाच आशा लावता आणि ती वस्तू नंतर नेहमी फुसका बारच ठरते !”

“अगं आज आधी आणलेली वस्तू एकदा बघ तर खरी, मग ठरव फुसका बार आहे का ऍटोम बॉम्ब आहे ते !”

“ठीक आहे ! फुसका बार निघाला तर खाली इराण्याकडे जाऊन कटिंग पिऊन यायचा आणि ऍटोम बॉम्ब निघाला तर घरच्या आल्याच्या चहा बरोबर क्रीम बिस्कीटं मिळतील तुम्हांला !”

“ठीक आहे !  हा बघ नऊ इंच धारदार पात असलेला, गेल्या शतकातला रामपुरी चाकू !”

“उ s s ठा, ताबडतोब उ s s ठा आणि खाली इराण्याकडे जाऊन कटिंग चहा पिऊन या !”

“अगं पण माझं जरा ऐकून तर…”

“काय ऐकायचं तुमच ? घरात पाच पाच वेगवेगळे चाकू, सुऱ्या असतांना, हा रामपुरी चाकू कशाला आणलाय तुम्ही? त्याने मी काय सगळी कामं सोडून मर्डर करत सुटू की काय ?”

“अगं अशी डोक्यात राख नको घालून घेऊ ! या रामपुरीने पण अनेक खरे खून केले आहेत त्या….”

“आणि असा रामपुरी चाकू तुम्ही मला देताय आणि वर चहा मागताय ? आज आता तुम्हांला दिवसभर चहाच काय, नाष्टा, जेवण काहीच मिळणार नाहीये, कळलं ?”

“अगं जरा बैस आणि शांतपणे मी काय म्हणतोय ते ऐकून तरी घे आणि मग बोल !”

“ठीक आहे, बोला पटपट, मला भरपूर कामं पडली आहेत घरात !”

“अगं हा रामपुरी चाकू साधासुधा नाही ! याची नक्षीदार मूठ बघितलिस का ?”

“त्यात काय बघायचं? सोनेरी रंगाची आहे म्हणून….”

“अगं वेडाबाई ती खऱ्या चांदीवर सोन्याच पाणी दिलेली मूठ आहे !”

“काय सांगताय काय ?”

“मग ? अगं हा रामपुरी खास आहे म्हटलं ! गेल्या शतकात आपल्याकडे होऊन गेलेल्या ‘दयाळू काल्या दादाचा’ आहे हा !”

“अहो पण हा तुम्हाला मिळाला कुठे ?”

“अगं आपल्याकडे जी ‘दानी आणि मनी’ नावाची लिलाव संस्था आहे ना तिथून हा मी लिलावात घेतला, अँटिक पीस म्हणून !”

“मी पण ऐकून आहे त्या संस्थे बद्दल, जी लिलावातून आलेल्या अर्ध्या पैशाचे गरजूना दान करते !”

“बरोब्बर !”

“पण केवढ्याला घेतलात हा रामपुरी चाकू ते सांगा ना ?”

“अगं त्याची एक गंमतच झाली ! त्या संस्थेच्या लीलावातील सगळ्या दुसऱ्या वस्तू खूपच चढया भावाने गेल्या, पण या रामपुरी चाकूला कोणी बोलीच लावे ना !”

“का हो ?”

“अगं असं काय करतेस ? याच रामपुरीने ‘दयाळू काल्या दादाने’ तेरा श्रीमंत सावकारांचे मर्डर केले होते ना ?”

“आणि असा चाकू तुम्ही घरात घेवून आलात ? आधी तो फेकून…..”

“अगं माझं जरा ऐक ! त्या दादाने गेल्या शतकात श्रीमंत सावकारांचे मर्डर केले असले तरी त्याने त्यांचे धन गरीब लोकांतच वाटले ! म्हणून तर त्याला ‘दयाळू काल्या दादा’ म्हणतात !”

“पण हा रामपुरी आपण घ्यावा असं का वाटलं तुम्हांला ?”

“अगं त्याच काय झालं सांगतो. परवाच पेपरात एक बातमी वाचली ! परदेशातल्या जगप्रसिद्ध ‘सदबी’ या लिलाव कंपनीने, गेल्या शतकात इटालीत होऊन गेलेल्या ‘अल कपोने’ या कुप्रसिद्ध ‘गॉडफादरचे’ पिस्तूल अडीच कोटी रुपयांना, कॅलिफोर्नियात झालेल्या लिलावात विकले म्हणून ! अगं त्या पिस्तूलानेच त्या कुप्रसिद्ध ‘अल कपोनेने’ दोनशे जणांचा खून केला होता !”

“बापरे !”

“पण मजा अशी, की त्याच्यावर शेवट पर्यंत एकाही खुनाचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही बोल ! पण हां, त्याला ‘टॅक्स’ चुकवल्या प्रकरणी दोषी ठरवून फक्त साडे सात वर्षाची शिक्षा झाली !”

“कठीणच आहे सगळं!”

“अगं पण तो वर बसला आहे ना तो सगळं बघत असतो बघ ! वयाच्या फक्त ४८ व्या वर्षी एका दुर्धर आजाराने त्याचे निधन झाले.”

“ते सगळं ठीक, पण हा रामपुरी….”

“अगं एकदम स्वस्तात मिळाला !”

“खऱ्या चांदीची मूठ आणि त्यावर सोन्याचं पाणी दिलेला, तरी स्वस्तात कसा काय मिळाला ?”

“त्याच कारण म्हणजे त्या रामपुरी चाकूने गेल्या शतकात झालेले तेरा खून ! त्यामुळे त्या चाकूला कोणी लोकं बोलीच लावायला तयार होईनात, हे मी तुला मगाशी बोललोच.”

“बरोबरच आहे लोकांचं, असा खुनी चाकू कोण कशाला घरात….”

“हो, पण त्यामुळे ‘दानी आणि मनी’ कंपनीचे धाबे दणाणलं आणि त्यांनी त्याच्या बेस प्राईस पेक्षा खालची बोली स्वतःच डिक्लेर केली !”

“बापरे”

“तरी कोणी तो घ्यायला तयार होईना ! शेवटी कंपनीने स्वतःच एकशे एक किंमत डिक्लेर केली तरी सगळे गप्प !”

“मग ?”

“मग शेवटी मीच एक्कावन्न रुपयाची बोली लावली आणि ती कबूल होऊन मी हा अँटिक रामपुरी चाकू घरी घेवून आलो !”

“हो पण आपण याच करायचं काय ?”

“आपण काहीच नाही करायच ! हा असाच शोकेस मधे ठेवून द्यायचा ! जे काही करायच ते आपल्या नातवाने मोठा झाल्यावर !”

“म्हणजे ?”

“अगं तो मोठा झाल्यावर जेंव्हा हा अँटिक रामपुरी तो पुन्हा एखाद्या लिलावात विकेल, तेव्हा त्याला नक्कीच कमीत कमी पन्नास लाख तरी मिळतील बघ !”

“कमाल आहे बाई तुमची ! आत्ता आणते आल्याचा चहा आणि क्रीम बिस्कीटं !”

असं बोलून बायको हसत हसत किचनकडे पळाली आणि मी नातवाला त्याच्या तरुणपणी मिळणाऱ्या पन्नास लाखावर, बोटं कापली जाणार नाहीत याची दक्षता घेत हळुवार हात फिरवत, चहाची आणि क्रीम बिस्कीटांची वाट बघत बसलो !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी तिळगुळ संक्रात… ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?विविधा ?

☆ मी तिळगुळ संक्रात… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

मी..अगबाई! नवं वर्षंउगवलं.जानेवारी महिना सुरु झाला. आता संक्रातीचे वेध लागले.   .स्वच्छ तीळ चिकीचा गुळ आणायलाच हवा..शिवाय सुगडी..बोरं ऊस आवळे..कितीही ठरवलं ना या वेळेस चितळेकडूनच आणूया लाडू,आता नाही हो होत…पण मन नाही ना मानत..नाही म्हटलं तरी  संस्काराची मूळं नाही सुटत हो..

पण अधिक माहिती देण्यासाठी संक्रात आणि तिळगुळ माझ्या घरीच आले आहेत..अम्मळ बोलूच या का त्यांच्याशी..

काय म्हणताय् तिळगुळजी..

तिळगुळ…सर्वप्रथम मी तुझं कौतुकच करतो की या वयातही तू अजुन तीळगुळ घरी बनवतेस…

संक्रात..अरे पण तुझं महत्व सांग ना..नाही जमत सगळ्यांनाच स्वत: बनवायला..महत्वाचं आहे ते तिळगुळाचं  असणं,..

तिळगुळ…हे बघ तिळआणि गुळाचं बंधन म्हणजे मी..तिळगुळ…हेमंत ऋतुत येते संक्रांत..

थंडीची शिरशिरी..तीळ हे उष्णवर्धक ,स्निग्ध.शिवाय त्यातली अॅमीनो प्रथीने ,लोह शरीरास पोषक असतात. गुळातही सुक्रोज आणि ग्लुकोज  आणि लोहअसते .ते .शरीराचे तपमानही राखते अन् कांतीही सतेज राहते…म्हणून संक्रातीला माझे महत्व असते बरं का?शिवाय स्नेह आणि मैत्रीचे मी प्रतीक.राग हेवे दावे विसरून जायचे.नवे स्नेहसंबंध प्रस्थापित करायचे..तीळगुळ घ्या गोड बोला म्हणत आनंदाचे, प्रेमाचे बंध जोडायचे..

मी..किती छान!!आपल्या भारतीय सणातली ही तत्वंच महत्वाची..

संक्रांत…अगदी बरोबर!

मी..पण संक्रातबाई,,”काय बाई संक्रांत आली माझ्यावर..”असं लाक्षणिक अर्थानं ,थोडंसं कडवट कां बरं बोलतात!!

संक्रांत…कारण यावेळी एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करणं असतं ना..१४जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.आणि या भ्रमणास मकर संक्रांत असं म्हणतात.याचवेळी उत्तरायण सुरु होते.हा काळ धर्म परंपरेच्या दृष्टी कोनातून अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो. अन्न ,वस्तु यांचं दान केलं जातं..

सूर्याची पूजा केली जाते.शुक्राचाही उदय होतो..

मी ..भारतात संक्रातीला वेगवेगळी नावेही आहेत ना..

संक्रांत..हो .तामीळनाडुत पोंगल असतो.बिहार मधे तर मला खिचडीही म्हणतात…

मी ..खिचडी?

संक्रांत…हो.कारण या दिवशी तुर मसुर तांदुळाची खिचडी बनवून खायचीही प्रथा आहे.

तीळाचे लाडु ,वड्या ,रेवडी गजक गुळपोळी या खाद्य पदार्थांची तर रेलचेलच असते…

मी..वा!!किती छान माहिती मिळाली.भारतीय सण म्हणजे नुसतीच संस्कृती किंवा परंपरा नव्हे, त्यामागे शास्त्रीय विचार आहे.बदलणार्‍या ऋतुमानाचा आणि मानवी जीवनाचा केलेला वैज्ञानीक अभ्यास आहे…मग स्त्रीयांसाठी हळदीकुंकु,वाण वाटणे ,लहान मुलांचे बोर नहाण पतंग उडवणे या आनंदकृती असल्या तरी भारतीय कृषीपरंपरेला आणि निसर्गाला मानणार्‍या आहेत…आनंदाचे संकेत आहेत.

खरोखरच आज मला मी,तीळगुळ आणि संक्रांत यातील परस्पर संबंध डोळसपणे जाणता आले…

चला तर मग तिळगुळ घ्या अन् गोड बोला…..

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares