मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “तात्यांची अंत्ययात्रा…”  – लेखक – श्री विश्वास सावरकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “तात्यांची अंत्ययात्रा…”  – लेखक – श्री विश्वास सावरकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

तात्यांचे प्राणोत्क्रमण झाल्याची दुःखद वार्ता सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरली. वृत्तपत्रांनी दुपारीच विशेष अंक काढले. नभोवाणीने दुपारी साडेबारा वाजता वृत्त प्रसृत केले. वृत्त ऐकताच अंत्यदर्शनासाठी सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन प्रांतसंघचालक कै. काशीनाथपंत लिमये आणि आचार्य अत्रे आले. त्यांनी तात्यांच्या खोलीत जाऊन अंत्यदर्शन घेतले. आता अंत्ययात्रा काढण्यासाठी प्राथमिक सिद्धता करण्याचे दायित्व सर्वच कार्यकर्त्यांवर-विशेषतः हिंदूसभेच्या कार्यकर्त्यांवर पडले. त्यांनी यात्रेसाठी एक लष्करी गाडा शव वाहून नेण्याकरता मिळवण्याचा प्रयत्न केला. संबंधित अधिका-यांना तशी विनंती करण्यात आली. परंतु ती नाकारण्यात आली.

ही वार्ता आचार्य अत्रे यांना समजल्यावर त्यांनी, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांना विनंती केली की, शासनाकडून आपली मागणी पुरी होत नसल्याने व्ही. शांताराम यांनी त्यांच्या चित्रनगरीतून तोफा व बंदुका घेऊन बसलेले सैनिकांचे चित्रफलक लावलेला ट्रक सिद्ध करून द्यावा. त्यांच्या या विनंतीला मान देऊन व्ही. शांतारामांनी अवघ्या -एक तासांत लष्करी गाड्याप्रमाणे एक ट्रक सिद्ध करून धाडला. अंत्ययात्रा सावरकर सदनपासून निघून गिरगावातल्या चंदनवाडी विद्युत्वाहिनीत जाणार होती. म्हणजे तब्बल ६-७ मैलांचे अंतर होते. तरीही सहस्रावधी स्त्री-पुरुष आरंभापासून यात्रेत सामील झाले होते. त्या यात्रेची व्यवस्था आचार्य अत्रेही पाहत असल्याने ते प्रथमपासून उपस्थित होते.

त्याआधी दर्शनासाठी शासनाच्या वतीने मंत्री मधुसूदन वैराळे, व्ही. शांताराम व संध्या, लता मंगेशकर आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रांतील अनेक नामवंत व्यक्ती येऊन आपली श्रद्धांजली वाहून गेल्या होत्या. शासनाच्या वतीने मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा दुखवट्याचा संदेश माझ्या नावे सर्वप्रथम सचिवालयातून आला. मात्र त्या दिवशी मुख्यमंत्री, तसेच गृहमंत्री शासकीय दौ-यावर मुंबईबाहेर गेले होते. यात्रेतील जनता ‘सावरकर अमर रहे’, ‘सावरकरांच्या राजकारणाचा विजय असो’, ‘हिंदू धर्म की जय’, ‘हिंदू राष्ट्र की जय’ आदी घोषणा देत होते. एका गाडीत ‘नंदादीप समिती’ च्या कार्यकर्त्या सावरकरांची पदे गात होत्या, तर दुसच्या गाडीत भजनी मंडळाच्या स्त्रिया भजने म्हणत मिरवणुकीच्या अग्रभागी जात होत्या. वाटेत ठिकठिकाणी कमानी, फुलांच्या परड्या रस्त्यांवर उभारल्या होत्या आणि तात्यांचे शव ठेवलेला लष्करी गाडा जसा पुढे जात असे तशी त्यावर परड्यांतून पुष्पवृष्टी केली जात होती.

यात्रा जेव्हा आर्थर रोड तुरुंगापाशी आली, त्या वेळी एक आगळे दृश्य दिसले. तुरुंगाच्या बाहेरच्या मुख्य दारावर पहारा करणारे पोलीस शवगाडा समोर येताच त्यांचा फिरता पहारा थांबवून खांद्यावरच्या बंदुका खाली उलट्या धरून दक्ष स्थितीत नतमस्तक होऊन उभे राहिले होते, तर त्या चार भिंतीच्या मागे असलेल्या चाळीच्या वरच्या मजल्यावरून जमलेल्या कैद्यांनी स्वयंस्फूर्तीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे’, ‘स्वा. सावरकर की जय’ अशा घोषणा देऊन श्रद्धांजली वाहिली. वरील हृदयस्पर्शी दृश्य शव-गाड्यावरून मला स्पष्ट दिसत होते.

पार्थिव देहाची मिरवणूक बॉब सेन्ट्रल रेल्वे स्टेशनपाशी आली. त्या वेळी संघाच्या गणवेषधारी स्वयंसेवकांनी तात्यांना सैनिकी पद्धतीने मानवंदना दिली. मिरवणूक जेव्हा भडकमकर मागनि जाऊ लागली तशी घराघरातून लोक येऊन मिरवणुकीत सामील होत होते. पुढे गिरगाव रस्त्यावरून शवयात्रा चंदनभूमीकडे सरकू लागली त्या वेळी रस्ता शोकाकूल जनतेच्या अलोट गर्दनि व्यापून गेला होता. घराघराच्या गच्च्या माणसांनी भरून गेल्या होत्या.

त्या वेळची आठवण झाली की, पुढे साप्ताहिक ‘मार्मिक’ च्या व्यंगचित्राखाली जी ओळ प्रसिद्धली होती त्याचे स्मरण झाल्यावाचून राहत नाही. तात्यांच्या ‘सागरा, प्राण तळमळला’ ह्या काव्यपंक्तीप्रमाणे रचलेली ती ओळ म्हणजे ‘प्राणा, (जन) सागर तळमळला!!’ 

शेवटी अंत्ययात्रा चंदनवाडीत पोचली. त्या वेळी भाषण करताना आचार्य अत्रे यांनी निदर्शनास आणले की, स्वा. सावरकरांसारख्या प्रखर देशभक्ताला श्रद्धांजली वाहण्यास महाराष्ट्र शासनाचा एकही मंत्री उपस्थित असू नये, ही शरमेची गोष्ट आहे. त्या वेळी समाजातूनही ‘शेम’ ‘शेम’ च्या आरोळ्या उठल्या. नंतर अनेक मान्यवर वक्त्यांनी श्रद्धांजली वाहिल्यावर सुधीर फडके यांनी ‘श्रीराम, जयराम जय जय राम! चा गजर सुरू केला, आणि तो चालू असताना तात्यांच्या अचेतन शरीराला विद्युत्दाहिनीत अग्नी दिला गेला.

या क्रांतीसूर्याच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन… 🙏

(संदर्भ- आठवणी अंगाराच्या, पृष्ठ- २६-२८, विश्वास सावरकर © सावरकरी_विचाररत्ने फेसबुक पेज) 

लेखक : श्री विश्वास साव

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देव… – कवी : कुसुमाग्रज ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ देव… – कवी : कुसुमाग्रज  ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

देव मानावा की मानू नये

या भानगडीत मी पडत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही.. !

 

ज्यांना देव हवा आहे

त्यांच्यासाठी तो श्वास आहे,

ज्यांना देव नको आहे

त्यांच्यासाठी तो भास आहे,

आस्तिक नास्तिक वादात

मी कधीच पडत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही.. !

 

हार घेऊन रांगेत कधी

मी उभा रहात नाही,

पाव किलो पेढ्याची लाच

मी देवाला कधी देत नाही,

जो देतो भरभरून जगाला

त्याला मी कधी देत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही.. !

 

जे होणारच आहे

ते कधी टळत नाही,

खाटल्यावर बसून

कोणताच हरी पावत नाही,

म्हणून मी कधी

देवास वेठीस धरीत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही.. !

 

देव देवळात कधीच नसतो…

तो शेतात राबत असतो,

तो सीमेवर लढत असतो,

तो कधी आनंदवनात असतो,

कधी हेमलकसात असतो,

देव शाळेत शिकवत असतो,

तो अंगणवाडीत बागडत असतो,

तो इस्पितळात शुश्रूषा करीत असतो,

म्हणून…

ह्यांच्यातला देव मी कधी नाकारत नाही.. !

 

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही.. !

कवी: कुसुमाग्रज

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कवी आणि काव्य… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ कवी आणि काव्य… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

कवितेविषयी माझंही एक छोटंसं स्फुट -***

✍ “ कवी व काव्य”

✍ गद्य विद्वत्तेची रांग

पद्य तुक्याचा अभंग

अगदी मोजक्या शब्दात काव्याची केलेली व्याख्या. सर्वांना पटेल आणि रुचेल अशीच,.

कोण असतो कवी ?

काय असतं काव्य ?

व्हिक्टर ह्युगो म्हणतात, त्याप्रमाणे कवी म्हणजे एका देह कोशात सामावलेली समग्र सृष्टी.

एखाद्याला जे काही सांगायचंय ते गद्यात चार पाने किंवा चारशे पाने होईल. आणि तेच काव्यात फक्त चार ओळीत सांगता येईल,. ही आहे ताकद कवितेची.

सुख दुःख, प्रेम विरह, श्रीमंती गरिबी, आई वडिल, परमेश्वर, पंचमहाभुते, भूत भविष्य वर्तमान, कुठलाही विषय कवीला आणि पर्यायाने काव्याला वर्ज्य नाही.

एकाच कवितेतून प्रत्येक रसिक वेगवेगळा अनुभव घेऊ शकतो.

कसं असतं काव्य?

 अक्षरे सांधुनी ओली

शब्दांचे राऊळ झाले

अर्थाच्या गाभाऱ्याशी

कवितेचे विठ्ठल आले

आणि अशा काव्याला म्हणावंच लागत नाही की,

” माझे काव्य रसाळ रंजक असे

ठावे जरी मन्मना

” द्याहो द्या अवधान द्या ” रसिकहो

का मी करू प्रार्थना ? “

रसिकहो, कवी या शब्दाच्या भोवती किती आवरणं असावीत? आणि काव्याचे तरी किती प्रकार?

ओवी, अभंग, श्लोक, भूपाळी, आरती, वेचे, कविता, गझल, अष्टाक्षरी, भावगीत, भक्तीगीत, बालगीत, बडबडगीत, बोलगाणी, पाळणे, डोहाळे, उखाणे, लावणी, पोवाडे ‘, समरगीत, स्फूर्ती गीत, देशभक्ती गीत, प्रार्थना अबबब. आणखी कितीतरी आहेत. तरीही कवीची ही काव्यकन्या दशांगुळे उरलेली असतेच.

जवळजवळ प्रत्येक कवीने काव्या विषयी खूप काही लिहून ठेवलंय

केशवसुत तर साभिमान म्हणतात

आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील तारांगणे

आणि हे खरं आहे. श्री रामप्रभू घराघरात पोहचले कारण, वाल्मिकी, तुलसीदास आणि आधुनिक वाल्मिकी गदिमा यांच्यामुळे, असं म्हटल्यास वावगं होणार नाही.

कवी हा आपल्याच एका विश्वात रमणारा प्राणी असतो. त्याच्या आनंदात आपण सर्वांनी सहभागी व्हायला हवं. कवीला येणारा अनुभव हा साधुसंतांना येणाऱ्या आध्यात्मिक आनंदाच्याच जातीचा असतो.

कवितेवर जो प्रेम करू शकतो, काव्यानंदाचा जो उपभोग घेऊ शकतो, त्याचा आत्मा कधीही मलीन होणे शक्य नाही. त्याच्या ठायी मानवी दोष, उणिवा, दुबळेपणा, असेलही कदाचित, पण त्याचा आत्मा मात्र सदैव एका तेजोमय वातावरणात भरारी घेत असतो. प्रत्येक कवी हा ” ज्ञानोबामाऊली तुकाराम ” या मध्यमपदलोपी समासा इतकाच मोठा आहे.

उंची इमला शिल्प दाखविल

शोभा म्हणजे काव्य नव्हे

काव्य कराया जित्या जिवाचे

जातीवंत जगणेच हवे

राहिला प्रश्न रासिकाचा

रसिकहो थोडेसे तरी काव्य आपल्या वृत्तीत असल्याखेरीज तुम्हाला खऱ्या काव्याचा साक्षात्कार कुठेही होणार नाही.

शेवटी काय ?

कवी मनमोहन म्हणतात

शव हे कवीचे जाळू नका हो

जन्मभरी तो जळतची होता

फुले त्यावरी उधळू नका हो

जन्मभरी तो फुलतची होता.

धन्यवाद!

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “राजं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “राजं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

आई मी आता मोठा झालोय बघ.. करून येऊ दे कि मला एकट्याने जंगलची सफर… घेऊ दे कि मला शिकारीचा अनुभव… कळू दे इतर प्राण्यांना या छोट्या युवराजची काय आहे ती ताकद… जंगल राजांच्या दरबारात मलाही जायचं राजांना मुजरा करायला… आलो आहे आता तर सामिल करुन घ्या मला तुमच्या सैनिक दलात.. मी लहान कि मोठा याचा फारसा करू नका विचार तुम्ही खोलात… बऱ्या बोलानं जे तुमचा हुकूम पाळणार नाहीत… त्यांची काही मी खैर ठेवणार नाही.. जो जो जाईल विरोधात या राजाच्या त्याचा त्याचा करीन मी फडशा फडशा… मग तो कुणी का असेना दिन दुबळा वा बलवान… त्याला राजा पुढे तुकवावी लागेलच आपली मान… राजाच्या पदरी मुलुखगिरीचा होईन मी शिपाईगडी.. स्वारीला जाऊन लोळवीन ना एकेका शत्रूची चामडी.. गाजवीन आपली मर्दुमकी मग खूष होऊन राजे देतीलच मला सरदारकी… मग दूर नाही तो दिवस चढेल माझ्या अंगावरती झुल सरसेनापतीची.. बघ आई असा असेल तुझ्या लेकराचा दरारा… भितील सारी जनाता कुणीच धजणार नाही माझ्या वाऱ्याला उभा राहायला.. मिळेल मला मग सोन्या रूप्याची माणिक मोत्यांची नि लाख होनांची जहागिरी.. जी माॅ साहेब म्हणतील तुला सदानकदा कुणबिणी वाड्यात करताना चाकरी… ते दिवस नसतील कि फार दूरवर बघ यशाचे आनंदाचे नि सुखाचे आपले दारी गज झुलती.. आई मी आता मोठा झालोय बघ करू दे कि मला राजाची चाकरी… “

“अरे तू अजून शेंबडं पोरं आहेस.. अजूनही तुझं तुला धुवायचं कळतं तरी का रे… नाही ना.. मग आपण नसत्या उचापतींच्या भानगडी मध्ये नाक खुपसू नये समजलं… आपला जन्म गुलामगिरी करण्यासाठी झालेला नाही.. ताठ मानेने नि स्वतंत्र बाण्याने जगणारं रे आपलं आहे कुळ… जीवो जीवस्य जीवनम हाच आहे आपल्या जगण्याचा मुलमंत्र… पण म्हणून काही उठसुठ विनाकारण आपण दीनदुबळ्यांची शिकार करत नाही… जगा आणि जगू द्या हाच निर्सागाचा नियम आपण पाळत असतो… आणि अत्याचार कुणी करत असेल इथे तर त्याला सोडत नसतो.. पण जे काही करतो ते स्वबळावर… कुणाच्या चाकरीच्या दावणीला बांधून गुलामगिरीचं जिणं कधीच जगत नाही… त्यांनी म्हटलं पाहिजे असा कनवाळू राजा दुसरा आम्ही कधी पाहीलाच नाही… असा ठेवलाय आपण प्रेमाचा दरारा सगळ्या जंगलाच्या वावरात… म्हणून तर आजही आपलं आदरानं नावं घेतलं जात घराघरात… तुला व्हायचं ना मोठं मग हे स्वप्न तू बाळगं आपल्या उराशी… राज्यं असलं काय नि नसलं काय काही फरकच पडत नसतो आपल्याला असल्या टुकार, लबाड, विचाराशी… आपणच आपल्याला कधी राजे म्हणवून घ्यायचंय नाही ते रयतेने विनयाने, आदराने म्हणत असतात ते पहा ते निघालेले दिसताहेत ना ते आमचे राजे आहेत… समजलं…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२२ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२२ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

गुंडीचं उडुपी हॉटेल –

श्रीवर्धमान सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या या अन्नदान उपक्रम मुळे माझे मन मागे मागे अगदी जुन्या पुण्यात पोहोचलो आणि डोळ्यासमोर आलं ते गुंडीचं उडुपी हॉटेल सकाळ ऑफिस कडे जाणारा श्री जोगेश्वरी च्या जवळचा बोळ म्हणजे चालू करांचा बोळ. ‘बोळ’ हा त्यावेळचा परवलीचा शब्द होता. कारण तिथून पुढे वेश्यावस्ती लागत होती पानाचा तोबरा काजळ, केसांचे फुगे, रंगीबेरंगी साड्या, लाल भडक ओठ अशा त्या नेहमी नटून खिडकीत बसून असायच्या. आम्हाला तिथे जायला बंदी होती. पण का?हे काही कळायचं नाही, आणि विचारायची प्राज्ञा पण नव्हती शनिवार वाड्यावर किंवा जिजामाता बागे कडे जायला त्या बोळा चा शॉर्टकट होता. एकदा हिम्मत करून आम्ही मैत्रिणी तिथून गेलो आमचे भेदरलेले चेहरे बघून त्या हंसायला लागल्या हातवारे करून डोळे मिचकावून आम्हाला जेव्हा त्या बोलवायला लागल्या नां तेव्हा अहो!आमचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली एका दमात आम्ही तो बोळ ओलांडला. शालू करांच्या बोळ्याच्या तोंडाशी असलेल्या गुंडीच्या हॉटेलमध्ये त्या बायका राजरोस पणे शिरायच्या. जोगेश्वरीच्या खिडकीतून आम्ही चोरून बघायचो. चहा पिऊन बनपाव खाऊन पैसे न देता बेधडक त्या बाहेर पडायच्या. नवलच वाटायचं बाई आम्हांला! पै न पै वसूल करणारे हॉटेल मालक हात चोळत बसायचे. आणि तो तांडा गेल्यावर त्यांचा उद्धार करून डोळे गरागरा फिरवायचे. आमच्याकडून मात्र एका गोळीचे पाच पैसे पण सोडायचे नाहीत असं वाटायचं वाचले तर ते पाच पैसे उद्या उपयोगी पडतील. कधी कधी तर गोळी घेऊन पाच पैशाचं गाणं मुठीत आवळून पैसे न देता पळायचा आमचा विचार असायचा, हे लक्षात आल्यावर मालक ओरडायचे, “ए चाललात कुठे? गोळीचे पैसे टाका. पैसे कुणी द्यायचे तुमच्या काकांनी की मामांनी?त्या बायकांना सूट देणारे मालक आपल्याला गोळ्या फुकट का देत नाही या विचारांनी नाक फुगवून पाय आपटत आम्ही हॉटेलच्या पायऱ्या उतरायचो. गुंडी बारा महिने बंडी (जाकिट) घालायचे. अस्सा राग यायचा त्यांचा. सुरेश माझा भाऊ जरा बंडं होता. तो म्हणाला एक दिवस मी या गुंडी मालकांच्या बंडीचं बटणचं तोडणार आहे त्यावेळच्या पोरकटपणाचे आता हसू येतयं. ज्येष्ठ नागरिकात जमा झालेले आम्ही म्हणजे मी आणि सुरेशपरवा ह्या आठवणीने पोट धरून धरून हसलो. पण बरं का मंडळी! आमच्याकडून पैन पै वसूल करणारे गुंडी तसे सत्पात्री दान देणारेही होते. दुकान उघडल्यावर पहिला चहाचा कप दाराशी आलेल्या भिकाऱ्याला ते द्यायचे आणि नंतर भटक्या कुत्र्यांसाठी पावाची लादी मोकळी करायचे. ते पुढे आणि कुत्री त्यांच्या मागे हा सीन बघितल्यावर आम्ही म् ओरडायचो, ” अरे ते बघ दत्त महाराज चाललेत. त्यांचा हा नेम कधी चुकला नाही. आम्हाला कंजूष वाटणारे श्री गुंडी कुत्र्यांना देवासारखे वाटायचे. जोगेश्वरी च्या परिसरात प्रत्येकाच्या अंगात काही ना काही देण्याची दानत होती. सुवासिनी सणावारी आवर्जून मंदिरात येणाऱ्या गरीब ब्राह्मणांना पोटभर जेवायला घालून वस्त्रदान दक्षिणा देऊन संतुष्ट करायच्या. नवरात्रात माझ्या आईकडे तर नऊ दिवस सवाष्ण असायची. गरिबी असली तरी घासातला घास मुंजा, ब्राह्मणांसाठी गाईसाठी पण बाजूला काढला जायचा. श्रावण, भाद्रपद, अश्विन महिन्यात तर दानशूरतेचा कळस गाठला जायचा, कुमारीका सवाष्णी श्रीजोगेश्वरीच रूप समजून पुजल्या जायच्या आणि मायेची सावली ती जोगेश्वरी माता अनेक रूपातून अनेकांना दर्शन देऊन तृप्त करायची. अगदी खरं आहे हे! जोगेश्वरीची लीला तिचा महिमाच अघाध आहे. जय अंबे जय जोगेश्वरी माता की जय

– क्रमशः… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अन्नाची नासाडी नकोच… लेखक/लेखिका  : सुश्री सविता भोसले / श्री सुनील इनामदार ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ अन्नाची नासाडी नकोच… लेखक/लेखिका  : सुश्री सविता भोसले / श्री सुनील इनामदार ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

लग्नाचे मस्त रिसेप्शन सुरू होते. लोक रांगेमध्ये नवरदेव- नवरीला शुभेच्छा देत… भेटवस्तू देत…. फोटो काढत…. पुढे पुढे सरकत होते. झाल्यावर जेवणाचा मस्त आस्वाद घेत होते.

“अरे.. अरे…. हे काय करतोस? चक्क नोट फाडतोस. “

असा मोठाsss आवाज झाल्यामुळे, हॉलमधील सर्वांनीच स्टेजकडे वळून पाहिले. काहींना कसला गोंधळ आहे… तो कळेच ना… म्हणून सर्वजण स्टेज जवळ जमा झाले.

“अरेssss नकुल ! काय करतोयस तू? चक्क पाचशेची नोट फाडली! हा माझा अपमान आहे. असं कोणी करता का?”

असं म्हणून त्या जवळच्या नातेवाईकाने, नवरदेवाशी भांडायला सुरुवात केली. तेव्हा हॉल मधे कुजबूज सुरू झाली. त्यांच्या भांडणावरून एवढे कळाले की,

भेट म्हणून आलेले पैशाचे पाकीट तिथेच फोडून त्यातील पाचशेची नोट सर्वांसमोर फाडली होती. हे सर्व पाहून उपस्थितांना मोठा धक्का बसला. कारण नवरदेव.. नकुल… हा अतिशय समजूतदार मुलगा होता. तो असे काही करेल; असे कुणालाही वाटले नव्हते. थोड्या वेळ शांतता पसरली. जेवणाऱ्यानीही आपले जेवण मध्येच थांबवले.

सर्वांचे प्रश्नार्थक चेहरे पाहून, नकुलने माईक हातात घेतला आणि तो शांतपणे बोलू लागला.

“मी असे केले; त्यामुळे तुम्हा सर्वांना खूप आश्चर्य आणि माझा रागही आला असेल. पण यामागेही काही कारण आहे. मी ते तुम्हाला सांगू इच्छितो. आपण सर्वजण खूप चांगले लोक आहात. छान पैकी जेवणाचा आस्वाद घेत आहात. पण मला असे आढळले की ९०% लोक आपले जेवणाचे ताट अर्धवट जेवून, जेवणाच्या ताटात बरेचसे पदार्थ टाकून देत आहेत. कुणी कुणी तर वाटीभर भाजी घेऊन, एक घास खाऊन, तशीच वाटी डस्टबिन मध्ये टाकली. असे आजच नाही तर; बऱ्याच ठिकाणी मी पाहतो. मला तुमचा अपमान करण्याचा हेतू अजिबात नाही… तुम्ही पोटभर जेवा पण अन्न वाया घालवू नका. भले गर्दी असेल तर पदार्थ संपल्यावर पुन्हा रांगेत उभे राहावे लागते; पण फार वेळ नाही लागत हो! एकदम वाढून घेतल्याने अंदाज येत नाही. म्हणून अन्न तसेच टाकून दिले जाते. आज आपल्या भारतात कितीतरी जण उपाशी झोपतात. तुम्हाला मी एक ५००रुपयाची नोट फाडली तर किती राग आला!!! पण…. तुम्ही जेव्हा आपल्या ताटात बरेच उष्टे अन्न टाकता तेव्हा पाचशे रुपये पेक्षा जास्त किमतीचे अन्न वाया घालवत आहात;; पण ते कळून येत नाही…. आपणाला याची जाणीवही नसते किंवा जाणवत असेल तरी, दुर्लक्ष करतो का आपण? एक चपाती किंवा एक भाजी किंवा कुठलाही अन्नपदार्थ बनवण्यासाठी, ते उगवण्यापासून ते तुमच्या ताटापर्यंत खाण्यायोग्य बनवण्यासाठी… अनेक जणांचे हात लागलेले असतात. त्यांची मेहनत असते… वेळ आणि पैसा घालवलेला असतो! मग तो कोणाचा का असेना!!

‘मला कुठे खर्च येतो ?

मी कशाला काळजी करू?’

असा विचार असतों का तुमच्या मनात?

जी गोष्ट अन्नासाठी तीच पाण्याबाबत आहे.

हे तुम्हाला दर्शविण्यासाठी, मी पाचशेची नोट फाडली. आता तुम्हाला वाटेल की, तेवढ्यासाठी नोट फाडायची काय गरज? नुसतं सांगितलं असतं तरी चाललं असतं. पण काळजी करू नका! ही फाडलेली नोट खोटी होती. आणि या माझ्या छोट्याशा नाटकात माझा हा मित्रही सहभागी होता. “

असे म्हणून त्याने त्याला मिठी मारली. दोघांनी भांडण्याचे उत्तम नाटक केले होते.

हे ऐकल्यावर सर्वांनी मनापासून टाळ्या वाजवल्या. एव्हाना प्रत्येकाच्या मनात असलेला प्रश्न आणि राग निघून गेला होता.

त्यानंतर नकुलने सर्वांना शपथ घ्यायला लावली की,

“मी कुठेही.. म्हणजे 

घरामध्ये…

हॉटेलमध्ये….

लग्नामध्ये….

अन्नाचा एकही कण वाया घालवणार नाही. “

त्या रिसेप्शन मधून बाहेर पडलेला प्रत्येक सुशिक्षित व्यक्ती… सुसंस्कृत होऊन घरी गेला.

प्रत्येकाला तो विचार खूप म्हणजे खूपच आवडला.

लेखक : सविता भोसले / सुनील इनामदार

मो.  ९८२३०३४४३४.

प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘आनंद वाटणाऱ्या ओंजळी…!’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘आनंद वाटणाऱ्या ओंजळी…!’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆3

एखादा माणूस रोज हसतमुखाने दुसऱ्यांना मदत करतो. त्यांच्यासाठी वेळ देतो. प्रेम आणि माया वाटतो. तो खरोखरच श्रीमंत असतो. ह्या श्रीमंतीचा संबंध पैशाशी नसतो, तर अंतःकरणाच्या समृद्धीशी असतो.

कधी कधी वाटते, आपल्याकडे काय आहे दुसऱ्याला देण्यासाठी? पैसा नाही, मोठं घर नाही, भरगच्च वस्त्रालंकार नाहीत. पण या गोष्टींचा खरा अभाव नसतो. अभाव असतो तो आनंद वाटण्याच्या वृत्तीचा. ज्यांच्याकडे ही वृत्ती असते त्यांची ओंजळ कधी रिकामी राहत नाही.

मला आठवतेय, माझ्या गावातली एक आजी कायम उत्साहाने दुसऱ्यांच्या मदतीला धावून जायची. कुणाच्या घरी अडचण आली, की ती कधी डबा पाठवायची, कधी धीर द्यायची, कधी अंगणातली मोगऱ्याची फुलं गजऱ्यात गुंफून एखाद्या सूनबाईंना हसवत राहायची. तिच्या या प्रेमळ स्वभावामुळे सारा गाव तिला आपलीच म्हातारी मानायचा.

मी एकदा आजीला विचारलं, “आजी, तू एवढ्या सगळ्यांना मदत करतेस त्या बदल्यात तुला काय मिळतं?”

ती हसली आणि म्हणाली, “बाळा, आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधी रिकाम्या राहत नाहीत. परमेश्वर त्यांना पुन्हा भरून टाकतो. जशी विहीर पाणी देते, पण कधी कोरडी पडत नाही. अगदी तशीच माझीही ओंजळ आहे. “

मी विचार करत राहिलो. खरंच. आनंद, प्रेम, माया ही अशी संपत नसतात. उलट, जितकी जास्त वाटली, तितकी वाढत जातात.

संपन्नता ही केवळ गोष्टींमध्ये नसते. ती मनात असते. आणि जी माणसं दुसऱ्यांना आनंद देतात, ती आयुष्यभर कधीच रिकामी होत नाहीत!

 लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्री. ब्रह्मानंद पै 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – ही घटना म्हणजे – दत्तसेवेबद्दलची नकळत माझ्या मनावर चढू पहाणारी सूक्ष्मशा अहंकाराची पुटं खरवडून काढण्याची सुरुवात होती हे त्या क्षणी मला जाणवलं नव्हतंच. पण आम्हा सगळ्यांचंच भावविश्व उध्वस्त करणाऱ्या पुढच्या सगळ्या घटनाक्रमांची पाळंमुळं माझ्या ताईच्या श्रद्धेची कसोटी बघणारं ठरलं एवढं खरं! त्या कसोटीला ताई अखेर खरी उतरली पण त्यासाठीही तिने पणाला लावला होता तो स्वतःचा प्राणपणाने जपलेला स्वाभिमानच!!)

“हे गजानन महाराज कोण गं?” त्यादिवशी मी कांहीशा नाराजीने ताईला विचारलेला हा प्रश्न. पण ‘ते कोण?’ हे मला पुढे कांही वर्षांनी पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतर समजलं. अर्थात तेही माझ्या ताईमुळेच. तिच्या आयुष्यात आलेल्या, तिला उध्वस्त करू पहाणाऱ्या चक्रीवादळातही गजानन महाराजांवरील अतूट श्रद्धेमुळेच ती पाय घट्ट रोवून उभी राहिलीय हे मी स्वतः पाहिलं तेव्हा मला समजलं. पण त्यासाठी मला खूप मोठी किंमत मोजावी लागली होती! तिचं उध्वस्त होत जाणं हा खरं तर आम्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का होता! या पडझडीत ते ‘आनंदाचं झाड’ पानगळ सुरू व्हावी तसं मलूल होत चाललं.. आणि ते फक्त दूर उभं राहून पहात रहाण्याखेरीज आम्ही काहीही करू शकत नव्हतो. नव्हे आम्ही जे करायला हवे होते ते ताईच आम्हाला करू देत नव्हती हेच खरं. तो सगळाच अनुभव अतिशय करूण, केविलवाणा होता आणि टोकाचा विरोधाभास वाटेल तुम्हाला पण तोच क्षणभर कां होईना एका अलौकिक अशा आनंदाचा साक्षात्कार घडवणाराही ठरणार होता !!

एखाद्या संकटाने चोर पावलांनी येऊन झडप घालणे म्हणजे काय याचा प्रत्यय आम्हा सर्वांना आला तो ताईला गर्भाशयाचा कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा! या सगळ्याबाबत मी मात्र सुरूवातीचे कांही दिवस तरी अनभिज्ञच होतो. मला हे समजलं ते तिची ट्रीटमेंट सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेल्यानंतर. कारण मी तेव्हा विदर्भ मराठवाड्यातल्या ब्रॅंचेसचा ऑडिट प्रोग्रॅम पूर्ण करण्यांत व्यस्त आणि अर्थातच घरापासून खूप दूर होतो. तेव्हा मोबाईल नव्हते. त्यामुळे मला वेळ मिळेल तसं मीच तीन चार दिवसांतून एकदा रात्री उशीरा लाॅजपासून जवळच असलेल्या एखाद्या टेलिफोन बूथवरून घरी एसटीडी कॉल करायचा असं ठरलेलं होतं. कामातील व्यस्ततेमुळे मी त्या आठवड्यांत घरी फोन करायचं राहूनच गेलं होतं आणि शिळोप्याच्या गप्पा मारायच्या तयारीने नंतर भरपूर वेळ घेऊन मी उत्साहाने घरी फोन केला, तर आरतीकडून हे समजलं. ऐकून मी चरकलोच. मन ताईकडे ओढ घेत ‌राहिलं. ताईला तातडीनं भेटावंसं वाटत होतं पण भेटणं सोडाच तिच्याशी बोलूही शकत नव्हतो. कारण तिच्या घरी फोन नव्हता. ब्रँच ऑडिट संपायला पुढे चार दिवस लागले. या अस्वस्थतेमुळे त्या चारही रात्री माझ्या डोळ्याला डोळा नव्हता. आॅडिट पूर्ण झालं तशी मी लगोलग बॅग भरली. औरंगाबादहून आधी घरी न जाता थेट ताईला भेटण्यासाठी बेळगावला धाव घेतली. तिला समोर पाहिलं आणि.. अंहं… ‘डोळ्यात पाणी येऊन चालणार नाही. धीर न सोडता, आधी तिला सावरायला हवं.. ‘ मी स्वत:लाच बजावलं.

“कशी आहे आता तब्येत?”… सगळ्या भावना महत्प्रयासाने मनांत कोंडून टाकल्यावर बाहेर पडला तो हाच औपचारिक प्रश्न!

“बघ ना. छान आहे की नाही? सुधारतेय अरे आता.. “

ताईच्या चेहऱ्यावरचं उसनं हसू मला वेगळंच काहीतरी सांगत होतं! ती आतून ढासळणाऱ्या मलाच सावरू पहातेय हे मला जाणवत होतं.

केशवरावसुद्धा दाखवत नसले तरी खचलेलेच होते. त्यांच्या हालचालीतून, वागण्या बोलण्यातून, उतरलेल्या त्यांच्या चेहऱ्यावरून, बोलता बोलता भरून येतायत असं वाटणाऱ्या डोळ्यांवरून, त्यांचं हे आतून हलणं मला जाणवत होतं!

मी वयाने त्यांच्यापेक्षा खूप लहान. त्यांची समजूत तरी कशी आणि कोणत्या शब्दांत घालावी समजेचना.

“आपण तिला आत्ताच मुंबईला शिफ्ट करूया. तिथे योग्य आणि आवश्यक उपचार उपलब्ध असतील. ती सगळी व्यवस्था मी करतो. रजा घेऊन मी स्वत: तुमच्याबरोबर येतो. खर्चाची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. तुम्ही खरंच अजिबात काळजी करू नका. ताई सुधारेल. सुधारायलाच हवी…. “

मी त्यांना आग्रहाने, अगदी मनापासून सांगत राहिलो. अगदी जीव तोडून. कारण थोडंसं जरी दुर्लक्ष झालं, उशीर झाला,.. आणि ताईची तब्येत बिघडली तर.. ? ती.. ती गेली तर?.. माझं मन पोखरू लागलेली मनातली ही भीती मला स्वस्थ बसू देईना.

केशवरावांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. आणि मलाच धीर देत माझी समजूत घातली. बेळगावला अद्ययावत हॉस्पिटल आहे आणि तिथे सर्व उपचार उपलब्ध आहेत हे मला समजावून सांगितलं. त्यांनी नीट सगळी चौकशी केलेली होती आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वदृष्टीने विचार केला तर तेच अधिक सोयीचं होतं. मी त्यापुढं कांही बोलू शकलो नाही. ते सांगतायत त्यातही तथ्य आहे असं वाटलं, तरीही केवळ माझ्याच समाधानासाठी मी तिथल्या डॉक्टरांना आवर्जून भेटलो. त्यांच्याशी सविस्तर बोललो. माझं समाधान झालं तरी रूखरूख होतीच आणि ती रहाणारच होती!

केमोथेरपीच्या तीन ट्रीटमेंटस् नंतर ऑपरेशन करायचं कीं नाही हे ठरणार होतं. ती वाचेल असा डॉक्टरना विश्वास होता. तो विश्वास हाच आशेचा एकमेव किरण होता! केमोचे हे तीन डोस सर्वसाधारण एक एक महिन्याच्या अंतराने द्यायचे म्हणजे कमीत कमी तीन महिने तरी टांगती तलवार रहाणार होतीच आणि प्रत्येक डोसनंतरचे साईड इफेक्ट्स खूप त्रासदायक असत ते वेगळंच.

ताईचं समजल्यावर माझी आई तिच्याकडे रहायला गेली. त्या वयातही आपल्या मुलीचं हे जीवघेणं आजारपणही खंबीरपणे स्वीकारून माझी आई वरवर तरी शांत राहिली. घरातल्या सगळ्या कामांचा ताबा तिने स्वतःकडे घेतला. तिच्या मदतीला अजित-सुजित होतेच. औषधं, दवाखाना सगळं केशवराव मॅनेज करायचे. ताईचे मोठे दीर-जाऊ यांच्यापासून जवळच रहायचे. त्यांचाही हक्काचा असा भक्कम आधार होताच. हॉस्पिटलायझेशन वाढत राहिलं तेव्हा योग्य नियोजन आधीपासून करून तिथं दवाखान्यांत थांबायला जायचं, आणि एरवीही अधून मधून जाऊन भेटून यायचं असं माझ्या मोठ्या बहिणीने आणि आरतीने आपापसात ठरवून ठेवलेलं होतं. प्रत्येकांनी न सांगता आपापला वाटा असा उचलला होता‌. तरीही ‘पैसा आणि ऐश्वर्य सगळं जवळ असणाऱ्या माझं या परिस्थितीत एक भाऊ म्हणून नेमकं कर्तव्य कोणतं?’ हा प्रश्न मला त्रास देत रहायचा. जाणं, भेटणं, बोलणं.. हे सगळं सुरू होतंच पण त्याही पलिकडे कांही नको? सुदैवाने ताईच्या ट्रीटमेंटचा संपूर्ण खर्च करायची माझी परिस्थिती होती. मला कांहीच अडचण नव्हती. ‘हे आपणच करायला हवं’ असं मनोमन ठरवलं खरं पण आजवर माझ्यासाठी ज्यांनी बराच त्याग केलेला होता त्या माझ्या मोठ्या बहिणीला आणि भावाला विश्वासात न घेता परस्पर कांही करणं मलाच प्रशस्त वाटेना. मी त्या दोघांशी मोकळेपणानं बोललो. माझा विचार त्यांना सांगितला. ऐकून भाऊ थोडा अस्वस्थ झाला. त्याला कांहीतरी बोलायचं होतं. त्याने बहिणीकडं पाहिलं. मग तिनेच पुढाकार घेतला. माझी समजूत काढत म्हणाली, ” तिच्या आजारपणाचं समजलं तेव्हा तू खूप लांब होतास. तू म्हणतोयस तशी तयारी मी आणि हा आम्हा दोघांचीही आहेच. शिवाय मी आणि ‘हे’ सुद्धा खरंतर लगेचच पैसे घेऊन बेळगावला भेटायला गेलो होतो. केशवरावांना पैसे द्यायला लागलो, तर ते सरळ ‘नको’ म्हणाले. ‘सध्या जवळ राहू देत, लागतील तसे खर्च करता येतील’ असंही ‘हे’ म्हणाले त्यांना, पण त्यांनी ऐकलं नाही. “मला गरज पडेल तेव्हा मीच आपण होऊन तुमच्याकडून मागून घेईन’ असं म्हणाले. मला वाटतं, या सगळ्यानंतर आता तू पुन्हा त्यांच्याकडे पैशाचा विषय काढून लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस. जे करायचं ते आपण सगळे मिळून करूच, पण ते त्या कुणाला न दुखावता, त्यांच्या कलानंच करायला हवं हे लक्षा़त ठेव. ” ताई म्हणाली.

केशवराव महिन्यापूर्वीच रिटायर झाले होते. फंड आणि ग्रॅच्युइटी सगळं मिळून त्यांना साडेतीन लाख रुपये मिळालेले होते. अजित आत्ता कुठे सी. ए. ची तयारी करीत होता. सुजितचं ग्रॅज्युएशनही अजून पूर्ण व्हायचं होतं. एरवी खरं तर इथून पुढं ताईच्या संसारात खऱ्या अर्थाने स्वास्थ्य आणि विसावा सुरू व्हायचा, पण नेमक्या त्याच क्षणी साऱ्या सुखाच्या स्वागतालाच येऊन उभं राहिल्यासारखं ताईचं हे दुर्मुखलेलं आजारपण समोर आलं होतं.. !

“तुला.. आणखी एक सांगायचंय…. ” मला विचारांत पडलेलं पाहून माझी मोठी बहिण म्हणाली.

पण…. आहे त्या परिस्थितीत ती जे सांगेल ते फारसे उत्साहवर्धक नसणाराय असं एकीकडे वाटत होतं आणि ती जे सांगणार होती ते ऐकायला मी उतावीळही झालो होतो… !!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उणिवांची जाणीव … लेखिका : सौ. साधना डोंगरे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ उणिवांची जाणीव … लेखिका : सौ. साधना डोंगरे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

ऐक ना…

परवा बोलता बोलता मी तिला म्हणाले….

तू नक्की भाग घे या स्पर्धेत…

तशी ती म्हणाली….

ती म्हणजे ती मुक्ता ग… आपण तिला allrounder म्हणतो…

ती म्हणाली मला…. म्हणजे बघ विचार करावास असे वाक्य होते म्हणजे आहे तिचे.

माझ्यातल्या उणीवांची जाणीव आहे मला. त्यामुळे नको ग सध्या तुला सांगते मी खरचच पुन्हा नव्याने आकर्षित झाले तिच्याकडे…

उणीवांची जाणीव…. या दोन शब्दांचे एकत्र येणे म्हणजे सुधारणेचा प्रगतीचा श्रीगणेशाच नाही का…

उणीवा जाणवणे हाच एक गुण दुर्मिळ झालाय आजकालच्या जगात…. जो तो स्वतः सिध्द असल्यासारखा वागतोय त्यावेळी ही मात्र… जिला खूप काही येतय ती म्हणते…. उणीवांची जाणीव आहे म्हणून… थांबूया सध्या…. आवडलेच मला तिचे असे म्हणणे…

बघ ना…

उणीवांची जाणीव झालीय तर त्या उणीवा कमी करण्यासाठी वेळ हवाय तिला….

उणीवा नेमक्या कशा दूर करता येतील यावर विचार करण्यासाठी वेळ हवाय….

स्वाभाविक शारीरिक मानसिक अशा कुठल्या पातळीवर जाऊन आपण उणीवा दूर करु शकतो हे शोधण्यासाठी ती कामाला लागलीय…

आणि त्या दृष्टीने आत्मचिंतन ही चालू केलय तिने…

खरच उणीवांची जाणीव आपल्याला किती सामृध्दिक मोकळेपण देतेय हे विचारांती कळलय मला…

म्हणजे बघ ना….

उणीवांची जाणीव मला प्रतिक्रियेवर विचार कर सांगते.

एखाद्याच्या असाधारण व्यक्ततेवर किंवा होणाऱ्या टीकांवर भाष्य करताना खिलाडूवृत्तीने स्विकारल्यास तर माणासांना गमावणार नाहीस तू हे सांगते.

आणि मग आचरणातून आपोआप नम्रता डोकावायला लागते. आणि संवादास आवश्यक असे वातावरण ही तयार होते चुकांची जबाबदारी न टाळता उलट ती स्विकारून आत्म भान येतं ही आत्मजागरुकता आनंद देवून जाते….

आणि उणीवांची जाणीव खऱ्या अर्थाने वर्तुळ पुर्ण करते.

उणीवांची जाणीवेवर विचार मंथन करताना मधेच उलटे झालेल्या शब्दानी मी अंतर्बाह्य ढवळून निघाले….

ते शब्द होते…

“जाणीवेची उणीव“…

जाणीवेच्या उणीवेवर ही ऐक ना म्हणणार आहे तुला…

लेखिका : सौ. साधना डोंगरे 

प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आत्मिक वैभव… ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

☆ आत्मिक वैभव… ☆ श्री संदीप काळे ☆

मागच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात वाईट काय झाले असेल तर, यशोमती ठाकूर ताईला अपयश आले. ताईला भेटण्यासाठी मी अमरावतीला गेलो होतो. ताईची भेट काही कारणास्तव लांबणीवर गेली. पुढचे दोन दिवस या भागातल्या भेटीगाठी करायच्या, या उद्देशाने मी मेळघाटच्या दिशेने निघालो. मेळघाटमधल्या काही ओळखीतल्या लोकांशी संपर्क केला, तर ते सारे कामात होती. ‘वैभवभाई’ मेळघाटात आहेत, त्यामुळे यावेळी भेटणे शक्य नाही. असे दोन तीन जणांकडून निरोप आले. कोण ‘वैभवभाई’? असे विचारेपर्यंत शेवटच्या व्यक्तीनेही फोन ठेवला. मेळघाटामधल्या घटांग, मसुंडी, बेला, कोहना, जैतादेही, बिहाली, हत्तीघाट, सलोना, भवई अशा अनेक गावांत मी गेलो. त्या ठिकाणी गेल्यावर माझ्याशी परिचित असणारी व्यक्ती मला हेच सांगत होती. ‘वैभवभाई’ आताच येऊन गेले. कुठे किराणा सामान दिले. कुठे कपडे दिले. कुठे शाळेचे साहित्य, कुठे घरात लागणारे साहित्य, तर कुठे अन्य काही साधनसामुग्री दिली. बापरे, कोण आहे हा माणूस, ? जो या अत्यंत दुर्लक्षित असलेल्या भागात एवढे मोठे काम करतो, असा मला प्रश्न पडला होता. माझ्यासोबत याच भागातले किशन जांभोरी होते. मी त्यांना विचारले, ‘मामा हे ‘वैभवभाई’ कोण आहेत, ? त्यांनी मला वैभव यांच्याविषयी सांगितले. मी त्यांना म्हणालो, ‘लावा बरं फोन त्यांना’. मामाच्या फोनवर मी वैभवजी यांना बोललो. एक माणूस नि:स्वार्थीपणे या भागात काम करतोय, हे त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होते. एका तासानंतर आमचे भांद्री या गावात भेटायचे ठरले. आम्ही भेटलो. खूप गप्पा झाल्या आणि वैभवचे कधीही कोठे न दाखवलेले खूप मोठे सामाजिक कामही माझ्या पुढे आले. काय काही काही माणसे असतात, जी प्रचंड मोठे काम करतात. त्यात वैभव एक होते.

वैभव वानखडे (९४२३४०१०००) अकोला येथील आदर्श कॉलनीमधला एक युवक. वैभवचे आजोबा आणि वडील हे सेवाभावी वृत्तीने प्रचंड झपाटलेले व्यक्तिमत्त्व होते. ‘आपला जन्म देण्यासाठी झाला’ हा विचार वैभव यांच्या मनात लहानपणापासून अगदी शिगोशीग भरला होता. वैभव म्हणाले, माझे वडील गेल्यावर अनेक मित्रांच्या मदतीने उभा केलेला खूप मोठा व्यवसाय तसाच बाजूला ठेवून बाबांच्या आठवणीत पूर्णवेळ सेवाभावी कार्यात स्वतःला झोकून द्यावं असा विचार करून मी बाहेर पडलो. एका वर्षाने मागे फिरून पाहिले तर ज्या अनेकांची भिस्त माझ्या व्यवसायावर होती, त्यांचे कुटुंब उघड्यावर पडायची वेळ आली होती. मी स्वतःला थोडे सावरत, थोडा व्यवसाय आणि अधिकचे सेवाभावी कार्य असे काम सुरू केले. जसे माझे आजोबा आणि वडील यांना ‘आत्मिक वैभवा’ची रुची निर्माण झाली होती, तशी रुची मलाही लागली होती. सर्व जण माझी काळजी करायचे. एकटी माझी आई मीरा वानखडेला सारखे वाटायचे, माझा मुलगा प्रत्येक पाऊल धाडसाने टाकतो. आई जेजे म्हणायची ते ते व्हायचं. एका महिलेकडे आणि युवकांकडे बोट करीत वैभव म्हणाले, ‘ही माझी पत्नी पूनम, आणि हा गौरव काटेकर हे दोघेंजण राज्यातील गरीब मुलांचे शिक्षण, गरिबी निर्मूलन उपक्रम, आणि मराठी शाळा या तिन्ही उपक्रमांचे काम पाहतात. ‘मी वैभव यांना म्हणालो, हे तिन्ही उपक्रम आहेत तरी काय’? वैभव म्हणाले, २०१२ ला मी ‘नि:स्वार्थ सेवा फाउंडेशन’ आणि ‘सेवा बहुउद्देशीय संस्था’ अशा दोन संस्था काढल्या. माझे बाबा गेले आणि बाबांच्या आठवणीत २०१९ पासून या दोन्ही संस्थांच्या कामाला प्रचंड गती मिळाली. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून नि:स्वार्थ सेवा होत आहेत, हे कळल्यावर राज्यातून शेकडो तरुण या कामासाठी पुढे आले. मेळघाटसारखे राज्यातले २८ गरिबी आणि भीषण संकटे असणारे भाग आम्ही निवडले. तिथे प्राथमिक स्वरूपात जे काही पाहिजे ते पुरवले. गरिबी फार वाईट असते, या काळात जो कुणी साथ देतो, तो देवापेक्षा मोठा वाटायला लागतो. माझ्या बाजूला असलेल्या एका महिलेकडे खुणावत वैभवजी मला म्हणाले, ‘ही अंजना याच मेळघाट भागातली. तिची सात मुले दगावली. कुपोषण, रोगराई, अज्ञान अशी कारणे त्या सात मुलांच्या जाण्यामागे सांगण्यात आली. माझ्या दृष्टीने ही मुले जाण्यामागे खरे कारण होते गरिबी. आता अंजना सोबत जो मुलगा उभा आहे. तो तिचा मुलगा शिवा आहे’. मी अंजनाकडे पाहत म्हणालो, ‘शिवा तर मला एकदम पैलवान वाटतो’. डोळ्यात आलेली आसवं पुसत अंजना म्हणाली, ‘दादा, कुठे तरी देव हाय ना जी’.. ! आपल्या पोटात नऊ महिने वाढवलेला मांसाचा गोळा जेव्हा डेडबाॅडी होऊन आपल्याच हातावर असतो ना, तेव्हा त्या आईला धरणीमाय जागा देत नाही. त्या आईचा आक्रोश कुणालाही दिसत नाही, तो आतला आक्रोश फार भयंकर असतो. माझ्या तिसऱ्या बाळापासून वैभवदादांची ओळख झाली. एक तरी बाळ वाचेल असे वाटत होते, पण छे ! आठव्या बाळंतपणाच्या वेळी पूनमवहिनी आणि वैभवदादा मला त्यांच्या घरी अकोल्याला घेऊन गेले. चांगल्या दवाखान्यात माझी प्रसूती झाली. पुढे वैभव भाऊने अनेक फिरते दवाखाने या भागात सुरू केले. ज्यातून माझ्यासारख्या अनेक अंजनाला त्यांचे मातृत्व मिळाले. आम्ही बोलत, बोलत त्या मेळघाटातल्या भागात वैभव यांच्यामुळे झालेल्या अनेक सामाजिक कामांचे दाखले अनुभवत होतो. वैभव यांनी गौरव काटेकर, तृप्ती महाले, पूनम कीर्तने, गिरीश आखरे, वैशाली जोशी, अशा अनेकांची ओळख करून दिली. चर्चेतून आमचा रस्ता ‘अमरावती’च्या दिशेने कटत होता. ३४० जणांची पूर्णवेळ काम करणारी टीम, हे तिन्ही उपक्रम मोठ्या उत्साहाने राबवत होती. मेळघाटामध्ये गरिबी निर्मूलन उपक्रम, शाळाबाह्य मुलांसाठी उभे केलेले वैभव यांचे काम पाहून कोणीही थक्क होईल, असे ते काम होते. या स्वरूपाचे काम केवळ मेळघाटामध्ये नव्हते तर, राज्यात छत्तीस जिल्ह्यांत सुरू होते. अगदी कुठलाही गाजावाजा न करता. आमच्या गाडीत वैभव यांनी सुरू केलेल्या त्या तिन्ही उपक्रमांविषयी चर्चा सुरू होती. आता ‘मराठी शाळा वाचली पाहिजे’ या उपक्रमाविषयी समजून घेण्याची मला उत्सुकता लागली होती. वैभव म्हणाले, ‘आपण सारे आपल्या मराठी शाळेत शिकलो’. कसे वागायचे, जगायचे हे सारे संस्कार आम्हाला मराठी शाळेने शिकवले. अशा जीव की, प्राण असणाऱ्या शाळा वाचाव्यात यासाठी आम्ही राज्यभरात सर्व्हे करून एक रूपरेषा ठरवली. सर्व राज्यांत २४० शाळा निवडल्या, ज्या शाळेतून बाहेर पडणारी दीड लाखाहून अधिक मुले दुर्दम्य आत्मविश्वास घेऊन आभाळाला गवसणी घालायचे काम करतात. कोण किती वाईट आहे, यंत्रणा किती कामचुकार आहे, यात आम्ही कधीही घुसत नाही. आम्ही आमचे ठरवलेले काम करतो. आम्ही अमरावतीजवळच्या घटांग या शाळेत पोहचलो. त्या त्या शाळेतले अनेक प्रयोग वैभव आणि त्यांची टीम मला सांगत होती. तिथे असणाऱ्या श्रीजया, विजया, कान्होपात्रा या तिन्ही बहिणी एका पाठोपाठ नवोदयला लागल्या. त्यांचे वडील साधी पानपट्टी चालवतात. त्या शाळेत कोणी स्पर्धा परीक्षांची तयारी करते. कोणी खेळाची. कुणी छान कविता लिहितो. हे याच शाळेत का पाहायला मिळत होते, त्याचे कारण या शाळेत वैभव आणि त्यांच्या टीमने मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून अनेक उपक्रम विकसित केले होते. या घटांगच्या शाळेसारख्या राज्यात २४० शाळांमध्ये लाभ घेणाऱ्या विद्यार्थांना भेटायचे आहे त्यांच्या ‘वैभवभाई’ यांना. आभार मानणारे पालक, शिक्षक, विद्यार्थी त्यांच्या पुढे अगदी साधेपणात नतमस्तक झालेले वैभव, त्या शाळेतला सारा प्रसंग मी अगदी डोळे भरून पाहत होतो. वैभव यांच्या सर्व टीमने त्या शाळेतील कामामध्ये स्वतःला गुंतवले होते. बाजूला मी आणि वैभव दोघे बोलत बसलो होतो. वैभव म्हणाले, ‘माझे आजोबा कृष्णराव वानखडे यांनी पदरमोड करून आणि लोक वर्गणीतून बहुजनांच्या मुलांसाठी अनेक शाळा सुरू केल्या. या काळात आपण नव्या शाळा काढू शकत नाही, पण आहे त्या शाळा चांगल्या करू शकतो. वडिलांचेही माझ्याविषयी खूप स्वप्न होते. वडिलांच्या आठवणीतून डोळे पाणावलेल्या वैभव यांचे लक्ष एका उत्साहाने धावत येणाऱ्या मुलीकडे गेले. ती मुलगी ‘बाबा’ म्हणत, वैभव यांच्या गळ्यात येऊन पडली. तिने वैभवच्या डोळ्यातून बाहेर पडणारे अश्रू पुसले. ती मुलगी म्हणाली, ‘तुम्हाला कोणाची आठवण येते?, माझ्या आजोबांची की तुमच्या आजोबाची?. वैभव काहीच बोलले नाहीत. त्यांनी पुन्हा त्या मुलीला घट्ट पकडले. त्या दोघांचेही डोळे अश्रूनी भरली होती. एकमेकांच्या स्पर्शातूनच त्यांचे बोलणे सुरू होते. थोडे भानावर येत वैभव मला म्हणाले, ‘ही माझी मुलगी शिवन्या. शिवन्या आणि माझी आई आताच मुंबईवरून आलेत. या दोघींनाही माझ्या सामाजिक कामात प्रचंड रुची आहे’. वैभव यांच्या आईची ओळख झाली. बऱ्याच गप्पा झाल्यावर मी जाण्यासाठी निघालो. वैभव यांच्या आईच्या पायावर मी डोके ठेवत आईला म्हणालो, ‘आई, अनेक जन्म साधना केल्यावर तुम्हाला असा पुत्र मिळाला असेल’. माझे बोलणे ऐकून आईचे डोळेही पाणावले होते. मी निघालो. थोडे पुढे गेल्यावर मलाही अश्रू आवरेनात. माझे अश्रू त्या ‘आत्मिक वैभवा’साठी होते, ज्याला वाटते सगळीकडे ‘चिरंतन टिकणारा’ विकास झाला पाहिजे. ज्यांना वाटते, सगळीकडे चांगले झाले पाहिजे. तुम्हालासुद्धा हे ‘आत्मिक वैभव’ मिळायचे असेल तर, तुम्ही नक्की ‘वैभव’च्या पावलावर पाऊल टाका, बरोबर ना.. !

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares