मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ससा आणि कासव — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ससा आणि कासव — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

खेड्यातली ती शाळा.. कोणत्यातरी जुन्या वाड्यात भरणारी.. पहिली ते चौथी सगळे वर्ग एकाच मोठ्या हॉल मध्ये एका गुरुजींच्या अधिकारात चालणारे..

नशिबाने त्या वर्षी शाळेला स्त्री शिक्षिका मिळाल्या आणि मुलींना वेगळा वर्ग मिळाला.. मोठ्या छान होत्या जोशी बाई.. शहरातून इतक्या दूर खेड्यात बदली होऊन येणं त्यांना सोपं गेलं नसणार पण त्या हसतमुख राहून आपली नोकरी करत. बाई आल्यावर शाळा सातवी पर्यंत वाढली.. वर्गात बहुतेक मुली मध्यमवर्गीय असत त्या काळी..

संजीवनी अशीच गरीब कुटुंबातून आलेली.. घरी अठरा विश्वे दारिद्रय आणि घरी बरीच माणसं.. वर्गात संजीवनी मागेच बसायची. , नाहीत धड कपडे, नाहीत पुस्तकं नीट की वह्या नाहीत.. बरं अभ्यासात तरी कुठे हुशार होती ती? बाई सांगून थकत पण हिच्या डोक्यात शिरेल तर शप्पथ…. गबाळी, चेहऱ्यावर लाचार हसू आणि वर्गात सगळे हिडीस फिडीस करत ते ऐकूनही ही कधी चिडली नाही.. कधी डबा असायचा तर कधी मधल्या सुट्टीत काहीच आणायची नाही.. मुलींनी दिलं की म्हणायची “नको ग.. उपास आहे आज माझा.. ” संजीवनी दिसायला मात्र सुरेख.. गोरी घारी उंच पण घरच्या दारिद्र्याने हडकलेली.. वर्गातल्या मुली तिच्याशी मैत्री करायला अजिबात उत्सुक नसत पण बिचारी संजीवनी लोचट सारखी जाई त्यांच्या मागे मागे.. “ ए मला घ्या ना ग तुमच्यात खेळायला… मी येऊ का? ” पण हजार वेळा विचारूनही त्या हिला कधीही बोलावत नसत..

वर्गातली कुमुद मात्र अतिशय हुशार.. सतत वर्गात पहिली.. कुमुदला देवाने सढळ हाताने सगळं काही दिलं होतं. सुंदर रूप, घरची श्रीमंती. आणि बुद्धीही तितकीच चांगली.. शाळेत बाई सुद्धा कुमुदच्या कौतुकात कमी पडत नसत..

संजीवनी जुन्यापान्या पुस्तकांवरून अभ्यास करून पुढच्या वर्गात जायची.. आणि एखाद्या सम्राज्ञीसारखी कुमुद डौलात येऊन सर्वच्या सर्व बक्षिसे घेऊन जात असे.

संजीवनीची आई गरिबीने गांजून गेलेली होती.. एकदा संजीवनीची मावशी गावाला आली बहिणीला भेटायला. आपल्या बहिणीचं ते अठरा विश्वे दारिद्र्य तो पोरवडा, ते निष्क्रिय मेव्हणे बघून हादरूनच गेली ललिता, संजीवनीची मावशी..

”अग काय हा संसार तुझा उषा? काय हे?कोणत्या काळात रहाताय तुम्ही? पाच मुली?”

उषा ओशाळवाणे हसत म्हणाली…. ”अग ललिता, मुलगा नको का वंशाला? ”

ललिताने कपाळावर हात मारून घेतला..

”लले, तुझं बरंय एकच मुलगा आणि थांबलीस.. ”

“उषा, काही अक्कल नाही तुला. कसला दिवा अन काय.. ते जाऊ दे. ही संजू मला आल्या दिवसापासून चिकटली आहे.. किती ग गोड आहे पोरगी.. नेऊ का मी हिला मुंबईला ? मी तिला छान शाळेत घालेन शिकवेन.. येतेस संजू माझ्या बरोबर?” ललिताने संजूला विचारले..

उषा म्हणाली, ” ने खुशाल. नाहीतरी तिला इथलं काहीही आवडत नाहीच. सदा तोंड फुगवून बसते आणि घर घाण, अस्वच्छ अशी नावे ठेवते. ”

”मावशी, मी खरंच येऊ तुझ्याबरोबर? मी चांगली वागेन तिकडे. तुला त्रास नाही देणार आणि खूप शिकून मोठी होईन मावशी.. या घरात मला अभ्यास करायलाही वेळ होत नाही ग.. सगळं समजतं मला शाळेत ग, पण कधी नीट वही नाही की पुस्तकं नाहीत. कसा करू मी अभ्यास? बाईना वाटतं मी मठ्ठ आहे. ” संजूच्या डोळ्यात पाणी आलं.. मावशीने तिला जवळ घेतलं.

”संजू चल तू माझ्याबरोबर मुंबईला. नक्की नीट रहाशील ना? मी सारखी सारखी नाही हं तुला गावाला पाठवणार.. मलाही नोकरी आहे तिकडे ग.. ”

संजू म्हणाली, ” नाही ग मावशी.. मी येते तुझ्या बरोबर.. ” आत्ता नाही, पण जून मध्ये येईन मी तुला न्यायला. उषे निदान तिच्या शाळेचा दाखला तरी काढून ठेव.. तेवढं तरी कर आई म्हणून. ” ललिता रागाने म्हणाली.. “मावशी, नक्की येशील ना? मी तुला अपयश देणार नाही. पण मला नेच ग इथून.. ” संजूच्या डोळ्यात पाणी आलं. ”ललिता म्हणाली नक्की नेईन मी तुला बाळा.. ” 

त्या जून मध्ये ललिता संजूला घेऊन मुंबईला गेली.. आयुष्यात पहिल्यांदाच गाडीत बसली संजू.. त्यातल्या त्यात चांगला फ्रॉक नीटनेटक्या लांब केसांच्या वेण्या.. मावशीला गहिवरून आलं.. प्रेमाने तिने संजूच्या डोक्यावरून हात फिरवला..

मावशीची कार मुंबईत शिरली. संजूचे डोळेच फिरले ती गर्दी, त्या मोठमोठ्या इमारती, तो झगझगाट बघून.. मावशीचा छान फ्लॅट होता शिवाजी पार्कला..

संजू घरात आली.. ” अय्या, मावशी, किती छान ग फ्लॅट तुझा. पण आमच्या गावाच्या घरापेक्षा लहान आहे ना?” मावशी तिचे मिस्टर आणि ललिताचा मुलगा कुमार हसायला लागले.

कुमार म्हणाला, “आता विसरायचं बरं का ते तुझं खेडं.. ही मुंबई आहे संजू.. ” संजू लाजली. ”. मावशी मला दाखव ना स्वयंपाकघर.. मी चहा करू का?” 

संजूने सुंदर चहा केला.. पटापट कपबश्या धुतल्या.. ”मावशी इथे मला सगळं भातुकली सारखं वाटतंय गं.. कित्ती आटोपशीर सगळं.. ” संजू बाल्कनीत उभी राहिली. आठव्या मजल्यावरून छोटी दिसणारी मुंबई ती भान हरपून बघत होती.. मावशीने तिला जवळच्या चांगल्या शाळेत घातले.

संजू नवी पुस्तके वह्या सॅक बघून हरखून गेली. नवीन कोरा युनिफॉर्म बघून तिला रडू आलं.. ललिताने तिला जवळ घेतलं..

”मन लावून शीक संजू. “म्हणाली मावशी..

संजू मुंबईत लवकरच रुळून गेली. तिला शाळेत चांगले मार्क्स मिळायला लागले.. बघता बघता संजू पक्की मुंबईकर झाली.. पूर्वीची खेडवळ संजू नाहीशी झाली.. मुळात सुंदर असलेल्या संजूवर आरोग्याची नवी झळाळी चढली.. संजू चांगले मार्क्स मिळवून बारावी झाली आणि त्या उत्तम मार्क्सवर तिला मायक्रोबायॉलॉजी ला प्रवेश मिळाला..

मावशीला किती मदत होत असे संजूची.. सकाळी लवकर उठून संजू सगळी कामे पटापट करून टाकी.. मग येत पोळ्याच्या मावशी.. , संजू सकाळी भाजी करून टाकी आणि सगळे आपापले डबे घेऊन निघून जात.. संजू कॉलेजमधून आली की संध्याकाळी छानसं खायला करी.. किती गुणी होती संजू..

मावशीच्या मनात येई, हे रत्न तिकडे त्या खेड्यात असंच झाकोळून गेलं असतं..

त्या दिवशी ललिताचा पुतण्या अचानक भेटायला आला. सुबोध मर्चंट नेव्हीमध्ये होता.. यावेळी सहा महिन्यांनी तो मुंबईला बोटीवरून उतरला होता.. काका काकूंच्या घरी चार दिवस रहावे आणि मग जावे आपल्या आईबाबांकडे पुण्याला असा बेत होता त्याचा..

अचानक कॉलेज मधून आलेली संजू त्याला दिसली.. ललिताने ओळख करून दिली. ही माझी भाची संजीवनी. आणि हा सुबोध माझा पुतण्या.. ” सुबोथ या सुंदर मुलीकडे बघतच राहिला..

सुबोध आता जवळजवळ तीस एकतीस वर्षाचा झाला पण त्याने अजून लग्नच नव्हते केले.. चार दिवस राहून सुबोथ पुण्याला निघून गेला..

संजूने निरागसपणे विचारलं, ” हे दादा कुठे नोकरी करतात? बोटीवर काय काम करतात ते?” कुमार हसला आणि तिला सगळं समजावून सांगितलं..

दर वेळी परस्पर बोटीवर जाणारा सुबोध यावेळी पुन्हा काकांकडे आला…. दरम्यान संजू एमेस्सी झाली.. तिला एका हॉस्पिटलमध्ये मायक्रोबायॉलॉजिस्ट म्हणून चांगली नोकरी मिळाली..

कोकणच्या खेडेगावच्या सुरवंटाचं सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरू झालं.. संजूची नोकरी सुरू झाली. पहिला पगार होताच तिने काका मावशी आणि कुमारला हॉल मध्ये बोलावलं..

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – १४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – १४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

गणपती १”

आमच्या घरी तांदुळाचा गणपती असे. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रभात समयी सुस्नात होऊन पप्पा सुंदर, जांभळ्या रंगाचा कद नेसून गणपती पूजनासाठी बसत. एका गोष्टीचं मला नेहमी आश्चर्य वाटायचं ते म्हणजे पप्पांच्या व्यक्तिमत्त्वात आढळणाऱ्या विसंगतीचं. कर्मकांडं, पूजाअर्चा यावर पप्पांचा विश्वास नव्हता की ते त्यावर विसंबूनच नव्हते हे मला कळलं नाही पण गणपती म्हणजे बुद्धी देवता, विद्येची आराध्यदेवता. बाकी गणपतीची विघ्नहर्ता, सुखकर्ता वगैरे विशेषणे कदाचित पप्पांसाठी म्हणजे त्यांच्या वैचारिक बैठकीसाठी तितकीशी महत्त्वाची नसतील पण विद्येची देवता म्हणून गणपती या दैवता विषयी त्यांना अपरंपार प्रेम होतं आणि त्याच भावनेतून आमच्या घरी गणपती पूजन फार सुंदर पद्धतीने होत असे.

आई चौरंगाखाली सुरेख रांगोळी रेखायची आणि सागवानी पाटावर बसून चौरंगावर तांदूळ पसरून पप्पा त्यातून सोंडवाला, मुकुटधारी, लंबोदर, चतुर्भुज गणेश साकारत. पायाशी तांदळाचा मूषक, भोवती झेंडूच्या गेंदेदार फुलांची चौकट, कापूर उदबत्तीचा सुवास आणि आम्ही सगळेजण पप्पांच्या डाव्या उजव्या हाताशी मनोभावे हात जोडून, त्यांच्या सुरेल स्वरात गायलेली गणपतीची कहाणी ऐकत असू.

।। सिद्धगणेश सिद्धंकार
मनीच्छले मोत्येहार
सोन्याची काडी रुप्याची माडी
तेथे सिद्धगणेश राज्य करी
राजामागे राज
राणीमागे सौभाग
निपुत्राला पुत्र
आंधळ्याला नेत्र
त्यांनी वाहिली सोन्याची काडी
आम्ही वाहू दुर्वांची पत्री
त्यांना प्रसन्न झालात
तसे आम्हाला व्हा ।।

तीन पदरी सूत्रात एकेक दुर्वांची जुडी गुंफत २१ वेळा पप्पा ही कहाणी सांगत आणि मग २१ दुर्वांच्या जुडीची ही माळ गणपतीला वाहत.

त्यानंतर आरती, “घालीन लोटांगण” “मंत्रपुष्पांजली” आणि डोळे मिटून, नाकावर हात ठेवून, प्रणव मुद्रेत अर्पण केलेला पांढराशुभ्र, कळीदार २१ मोदकांचा, चांदीच्या ताटातला सुरेख सुगंधी नैवेद्य !

ॐ प्राणाय स्वाहा
ॐ अपानाय स्वाहा
ॐ उदानाय स्वाहा
ॐ व्यानाय स्वाहा
ॐ ओम समानाय स्वाहा
ॐ ब्रह्मणे नमः

अशा रितीने गणपती पूजन झाल्यानंतर मनाला अतिशय प्रसन्नता जाणवायची. कापूर, उदबत्तीच्या सुगंधात, सुग्रास स्वयंपाकाच्या मधुर वासात घर दरवळलेलं असायचं.

खरं म्हणजे आमची संपूर्ण गल्लीच गणेशमय झालेली असायची. घरोघरी यथाशक्ती, यथामती गणपतीची प्रतिष्ठापना व्हायची. सण सोहळ्यातला सामुदायिक आनंद, सार्वजनिकतेचं महत्त्व आम्ही लहानपणी खऱ्या अर्थाने अनुभवलं असं म्हणायला हरकत नाही. गल्लीत गजाचा गणपती, सलाग्र्यांचा गणपती, दिघ्यांचा गणपती जसा मूर्ती सजावटीसाठी प्रसिद्ध होता तसाच मुल्हेरकरांचा गणपती म्हणजे आम्हाला आमच्याच घरचा गणपती वाटायचा. अगदी तेव्हापासून आजपर्यंत. मुल्हेरकरांच्या गणपती सजावटीत आम्हा सर्व सवंगड्यांचा हातभार लागायचा पण या कार्यक्रमातला प्रमुख अध्यक्ष म्हणजे दिलीप मुल्हेरकर. दिलीप हा सर्वच बाबतीत गल्लीतला एक अनभिषिक्त लीडर होताच. तो एक उत्तम कलाकार होता, उत्तम क्रीडापटू होता. क्रिकेट कसे खेळावे ते आम्ही त्याच्याकडूनच शिकायचो. तो जितका संवेदनशील होता तितकाच तापट होता. खरं म्हणजे माझ्यापेक्षा तो लहान होता पण कलेच्या क्षेत्रात सगळ्यांनीच त्याचे मोठेपण मान्य केले होते त्यामुळे गणपती सजावटीसाठी लागणाऱ्या सामानापासून ते मखर बनवण्यापर्यंत तो जे जे सांगेल ते ते आम्ही त्याला मदत म्हणून, गंमत म्हणून करायचो.

टेबलावर छानसा रेशमाने भरलेला टेबलक्लॉथ टाकायचा, त्याच्या चारी बाजू कलात्मक रित्या दुमडून त्यावर बनवलेलं पुट्ठ्यांचं, रंगीत चकाकणार्‍या पेपर वेष्टनातलं, टिकल्यांनी सजवलेलं मस्त मखर ठेवायचं. मागे, बाजूला दिव्यांच्या माळा, फुलांच्या माळा सोडायच्या. खरं म्हणजे गणपतीच्या मखराच्या या तयारी पासूनच आमच्या अंगात गणेशोत्सवाचा उत्साह भरायचा. मग सकाळी टाळ, झांजा घेऊन आग्यारी लेनमध्ये एका तात्पुरत्या मंडपात विक्रीसाठी मांडलेल्या, कोकणातल्याच एका खास मूर्तिकाराकडची (मला त्यांचं नाव आता आठवत नाही) सुंदर, मध्यम आकाराची देखणी, प्रसन्न गणेशाची मंगलमूर्ती— आम्ही त्यावर विणलेला एखादा रुमाल टाकून घरी घेवून येत असू. दिलीप, चित्रा, संध्या, बेबी, सुरेश, अशोक, बंडू आणि आमचा गल्लीतला बालचमू मिळून गणपतीची थाटात मिरवणूक असायची. गणेश आगमनाच्या स्वागताची मिरवणूक. पुन्हा चालताना….

पायी हळूहळू चाला
मुखाने मोरया बोला…

गणपती बाप्पा मोरया… अशी झांजा वाजवत ही आनंद गीते मुक्तपणे गात आम्ही आमच्या या आवडत्या गणेश पाहुण्याला घरी आणत असू. उंबरठ्यात ओवाळायचे, चारी दिशांना पाणी सोडायचे, गुळखोबरं ओवाळून नजर उतरवायची आणि मखरात बसवायचे. एखाद्या विमानतळावरून नाही का आपण आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला रिसिव्ह करत ? अगदी तीच भावना आमच्या मनी या गजाननासाठी असायची.

आमचा स्वतःचा घरचा गणपती दीड दिवसाचा असायचा. त्यानंतर गौरीपूजन मात्र असायचे पण मुल्हेरकरांच्या गणपतीचे विसर्जन गौरीबरोबर व्हायचे म्हणजे कधी पाच दिवस तर कधी सात दिवस. आरत्यांचा गजर चालायचा, जवळजवळ गल्लीत सगळ्यांच्याच घरी आम्ही आरतीला जात असू आणि सहजपणेच प्रत्येक घरी आरतीच्या वेळाही ठरत.

मुल्हेरकरांकडे गायलेल्या आरत्या आजही माझ्या कानात आहेत. दिलीप तबला, ढोल, पेटीची व्यवस्था करायचा.

येई हो विठ्ठले माझे माऊली ये म्हणताना लागलेला सूर आत मध्ये काहीतरी उचंबळून टाकायचा.

रखमाई वल्लभ्भा राईच्या वल्लभ्भा म्हणताना पडलेली ती तबल्यावरची थाप कशी वर्णन करू ? आणि दशावताराची आरती म्हणताना तर कंठ भरून जायचा.

रसातळाशी जाता पृथ्वी पाठीवर घेसी
परोपकारासाठी देवा कासव झालासी
देवा कासव झालासी

शब्दाशब्दांचा सूर लांबून केलेला उच्चार आणि पेटीच्या संगतीत म्हटलेल्या त्या सुरेख आरत्या म्हणजे आमच्या जडणघडणीच्या काळातली संस्कार शक्तीपीठे होती.
हरे राम हरे राम राम हरे हरे हे गतिशील नामस्मरण, तितक्याच गतीत वाजत असलेले टाळ आणि झांजा, हे म्हणत असताना स्वतःभोवती मारलेल्या प्रदक्षिणा आणि समोरच्या मखरातील, तबकातल्या निरांजनाच्या प्रकाशात उजळलेली ती हास्यवदना, प्रसन्नदायी, मंगलमूर्ती आजही अंतरीच्या कप्प्यात पावित्र्य आणि मांगल्य घेऊन स्थिरावलेली आहे.

मंत्रपुष्पांजलीने आरतीची सांगता व्हायची, हातात पुष्प पाकळ्या घेऊन, डोळे मिटवून पप्पा सूर लावायचे..

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि.. … त्या एकेका मंत्रोच्चारातला दिव्यपणा कळत नसला तरी जाणवायचा नक्कीच.

आवर्जून सांगते की आमच्या गल्लीत काही मुस्लीम परिवार होते. शरीपा, ईसाक, अब्दुल, बटुबाई, आरतीला भक्तीभावाने हजर रहात. प्रसादभक्षण करत. आमचा गणपती असा सर्वधर्मपरायणी होता.

खरोखरच दरवर्षी येणाऱ्या या दहा दिवसाच्या लाडक्या पाहुण्यांनी नकळत जीवनातली सत्त्वबीजे आमच्यात नक्कीच पेरली. गल्लीतला गजाचा गणपती रात्री बाल्याच्या नृत्याने रंगायचा मध्ये ढोलकी वादक बसलेला असायचा. गायकही असायचा आणि सभोवताली गोलाकार नृत्य करणारे कलाकार असत. त्यांच्या उजव्या पायात चाळ बांधलेले असत आणि *गणा धाव रे गणा पावरे* अशी गणरायाची आळवणी करून नाचायला सुरुवात व्हायची. या नृत्यात काही वैविध्य, सौंदर्य नसायचं. गाणाराही बऱ्याच वेळा भसाड्या आवाजात गायचा.

चांगला ठकडा ठरलाय गो
सोळा सहस्त्र भोगून नारी
ब्रह्मचारी ठरला ग …

असे काही शब्द त्या गाण्यात असायचे. पण या नृत्यातला ठेका आणि लय एक प्रकारे मनात बसायची. नाचणार्‍यांत एकसंधपणा असायचा. पावलांच्या गतीत एक मेळ असायचा आणि एक प्रकारची लोक संस्कृती, लोकसाहित्य या रुपातून रस्त्यावर अवतरायचं आणि त्यातलं भारीपण कुठेतरी जाणवायचं.

तर असा हा आमचा आठवणीतला गणपती. दरवर्षी भाद्रपद महिन्यात चतुर्थीला येतच असतो पण माझ्या मनातला आजचा आणि तेव्हाचा गणपती वेगळ्या रुपात असतो आणि हो एक गंमत सांगायची राहिली. गणेश चतुर्थीच्या दिवशी “चंद्र पहायचा नाही. पाहिला तर चोरीचा आळ येतो” हे भय बालमनावर इतकं ठासून ठेवलेलं होतं की एक तर त्या दिवशी रात्री बाहेर पडायचंच नाही, नाहीतर रस्त्यात खाली मान घालून चालायचं. कुणीतरी वात्रटपणे म्हणायचे (बहुतेक वेळा ती व्यक्ती मीच असायचे. ) ”ते बघ काय वरती ?” आणि पटकन सगळ्यांनाच वर आकाशात बघायला व्हायचं आणि नेमकी सुंदर चतुर्थीची चंद्रकोर वाकुल्या दाखवत नजरेसमोर यायची पण खरोखरच या दर्शनाने चोरीचे आळ आले का ? कोण जाणे ! पण पुढे आयुष्य जगत असताना ज्या नाना प्रकारच्या ठेचा लागल्या, विनाकारण दोषही लागले, स्वतःचा चांगुलपणा गैरसमजुतीमुळे काळवंडला गेला त्याला हेच कारण असेल का ? गणेश चतुर्थीच्या दिवशी घेतलेले चंद्रदर्शन…?

माहीत नाही. पण या गणरायाने एक समर्थ मन मात्र घडवलं.

— क्रमश: भाग १४  

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फजान…. लेखक – डॉ. शिरीष भावे ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ फजान…. लेखक – डॉ. शिरीष भावे ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

नॅशनल जिओग्राफिक वाहिनीवरचे माहितीपूर्ण लघुपट पाहणे हा माझा फावल्या वेळातला आवडता छंद. असाच एक लघुपट, थायलंडमधल्या हत्तींच्या प्रशिक्षण केंद्रावर आधारित, मी पाहत होतो. जंगली हत्तींना माणसाळावून त्यांचा वापर करणे ही एक अमानुष प्रक्रिया आहे. पर्यटकांना जंगलातून पाठीवर बसवून फिरवणे अथवा लाकडी ओंडक्यांसारख्या जड वस्तू वाहून नेणे अशा गोष्टींसाठी हत्तींचा वापर केला जातो. महाकाय आणि शक्तिशाली असलेलं हे जनावर सहजासहजी माणसाळत नाही. फासे टाकणे, खड्डा खोदून त्यात सापळा लावून त्यांना पकडणे अशा मार्गांनी त्यांना आधी बंदिस्त करावं लागतं आणि त्यानंतर सुरु होते त्यांच्यावर हुकमत गाजवण्यासाठी, त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी केली जाणारी अघोरी प्रक्रिया. पकडलेल्या हत्तीला साखळदंडाने बांधून एका छोट्या लाकडी पिंजऱ्यामध्ये कोंडलं जातं. त्यानंतर उपाशी ठेवणे, भाल्यांनी टोचणे, झोपू न देणे अशा मार्गांनी त्याचा अनन्वित छळ केला जातो. इंग्रजीमध्ये याला “ब्रेकिंग द स्पिरिट ऑफ द एलिफंट” म्हणजे हत्तीची आंतरिक उर्मी आणि जिजिविषा नष्ट करणे असं म्हणतात. या सर्व क्रूर प्रक्रियेला ‘ फजान ‘ असं म्हणतात.

मी पहात असलेल्या लघुपटामध्ये त्या प्रशिक्षण केंद्राचा प्रमुख कार्यक्रमाच्या निवेदकाला माहिती देत होता. एके ठिकाणी एक प्रचंड मोठा, लांबलचक सुळे असलेला हत्ती उभा होता. निवेदकाच्या लक्षात आलं की त्याच्या पायात एक जाडजूड साखळदंड बांधलेला आहे पण तो दुसऱ्या बाजूला कुठेच बांधलेला नसूनही तो हत्ती इंचभरही जागचा हालत नाहीये.  त्यानी ,”हे कसं” असं आश्चर्याने विचारलं तेव्हा केंद्रप्रमुख म्हणाला,” ती साखळी फक्त त्याच्या पायात अडकवलेली पुरेशी असते. ती दुसरीकडे बांधायची गरज नसते. ती साखळी त्याच्या पायात आहे याची नुसती जाणीव त्याला असली की तो जागच्या जागी उभा राहतो!”

लघुपट संपला आणि मी अंतर्मुख झालो. ही अशीच साखळी आपल्या विस्तृत, खंडप्राय देशाच्या पायात अडकवून इंग्रज निघून गेले. 1947 साली त्यांनी ती दुसऱ्या बाजूने सोडली तरी अजूनही आपल्या मनात ती काल्पनिक शृंखला बांधलेलीच आहे. 1835 साली लॉर्ड मेकॉलेने अतिशय धूर्तपणे या देशाच्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केला. इंग्रजी भाषेला सर्वोच्च दर्जा दिला गेला. स्थानिक भाषांचं महत्त्व पद्धतशीरपणे छाटलं गेलं. इंग्रजी भाषेचा साखळदंड आपण अजूनही पायात दिमाखात मिरवतो. आपल्या समृद्ध स्थानिक भाषांमध्ये व्यवहार करणं आपण कमीपणाचं समजतो. भाषेबरोबर तिच्याशी निगडित संस्कृती आली आणि झालं आपल्या राष्ट्रीय अस्मितेचं आणि क्षमतेचं खच्चीकरण. इंग्रजांनी आपला सामूहिक आत्मविश्वास इतका नष्ट केला की स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षं होऊनही बरेचसे नियम आणि अधिनियम इंग्रज राजवटीमध्ये अंमलात असलेले अजूनही आपण वापरतो. मोटार वाहन अधिनियम इंग्रजांनी 1919 साली बनवला आणि तो स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष तसाच राबवला जात होता.

वैयक्तिक जीवनात अशी काल्पनिक साखळी मनात बांधून जगणारे अनेक जण आहेत. राहुलचंच उदाहरण बघा ना.

काही दिवसांपूर्वी अतिशय विष्षण मनोवस्थेमध्ये मला भेटायला आला होता. एका बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची उत्तम नोकरी होती. परंतु कुठल्यातरी गूढ तणावाखाली असल्याच्या खुणा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. मी विचारलं,” काय रे राहुल, इतका चिंताग्रस्त का तू?”  “माझ्या बॉसला मी प्रचंड घाबरतो.आज नोकरी लागून दहा वर्ष झाली तरीसुद्धा तो मला रागवेल, वाईट साईट बोलेल अशी उगीचच भीती सतत मनात असते. खरंतर माझ्यावाचून त्याचं पान हलत नाही; पण मी मात्र निष्कारण तणावाखाली जगतो.”

मी म्हटलं,” पण तू तर त्या ऑफिसमधला एक महत्त्वाचा दुवा आहेस. तुला असं राहण्याचं कारणच काय?”

“मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा पहिल्या सहा महिन्यांमध्ये माझा बॉस माझ्यावर येता जाता उगाचच डाफरत असे. ती दहशत अजूनही माझ्या  मनात खोलवर रुजलेली आहे. मी त्यातून बाहेर पडू शकत नाहीये. तो नवीन येणाऱ्या  सगळ्यांनाच अशी वागणूक देतो, हे मी पाहिलंय.” “म्हणजे तुझ्या बॉसने तुझं फजान केलं तर.” असं म्हणून मी राहुलला हत्तीची गोष्ट सांगितली. “ती साखळी नाहीच आहे, खरं तुझ्या पायात. तू ज्या क्षणी ती मनाने काढून टाकशील त्या क्षणी एका मुक्त मनाचा जन्म होईल. आत्ताच्या आत्ता, या क्षणी ते तू कर राहुल”. 

माझ्या नजरेला नजर देत त्यानी रोखून पाहिलं आणि फक्त ” येस्स्ssss” असं म्हणत तो निघून गेला.

योगायोग असा की त्यानंतर दोन दिवसांनी रूपालीची भेट झाली. तीसुद्धा अशाच कुठल्यातरी दबावाखाली असल्याची चिन्हं मी ओळखली.

“माझं लग्न होऊन मी सासरी आले आणि माझ्या सासूबाईंनी पहिल्या  वर्षात माझा पूर्ण ताबा घेतला. मला कुठलंच स्वातंत्र्य नव्हतं. साध्या साध्या गोष्टीत त्यांची सतत दादागिरी असे. खरंतर आज लग्नानंतर दहा वर्षांनी मी त्यांच्यावर कुठल्याच दृष्टीने अवलंबून नाही. माझं स्वतःचं करियर आहे, अस्तित्व आहे आणि आर्थिक स्वातंत्र्यही आहे. पण तरीसुद्धा माझ्या मनात भीती असते, त्या मला कशावरून तरी बोलतील. आता खरं तर त्या तशा वागतही नाहीत. पण मी ही मनातली बेडी कशी झुगारून देऊ?”

मी मनात म्हटलं ,”हे अजून एकाचं फजान. “

राहुलला जे सांगितलं तीच गोष्ट  मी रुपालीला ऐकवली. “रूपाली सासूबाईंनी फजान केलं तुझं. फेकून दे ती मनातली साखळी.”  अचानक साक्षात्कार व्हावा, याप्रमाणे ती दुर्दम्य आत्मविश्वास आणि दृढनिश्चय मनात घेऊन माझ्या समोरून गेली.

काही महिन्यांनी दोघेही भेटले. दोघांचेही पहिलं वाक्य तेच होतं. “काका, फजान संपलं. साखळी आता पायातही नाही आणि मनातही.”

आपल्या देशाच्या पायातीलही ती मायावी शृंखला गळून पडण्याची मी आशेने वाट पाहतोय.

लेखक :  डॉ. शिरीष भावे

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मिरजेतला उदास आपलेपणा… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ मिरजेतला उदास आपलेपणा… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर 

वडिलांच्या बदलीचा हुकूमनामा आमची इवलीशी आयुष्ये ढवळून टाकीत असे. पुण्यातल्या नूतन मराठी विद्यालयाच्या लहान शाळेत चौथीच्या वर्गातून मिरजसारख्या ठिकाणी जायचा आदेश जरा जास्तच जाचक वाटला. छानसा गणवेश, शाळेत पोहोचवायला-आणायला घरची माणसे, डबा, दप्तर, मातकामाचा वर्ग, सवंगडी या सौख्यातून उठून जाऊन मिरजेच्या शाळेत गेले, तेव्हा जीव घुसमटला.

मिरजमधला दिवाण जोशींचा भला मोठा वाडा अंधारात बुडून जाई. माडीवरच्या बाल्कनीत उभे राहिले, की शहरही अंधारात बुडल्यासारखे वाटत असे. पुण्याची आठवण येऊन जीव कासावीस होई. तिथून मिरजेचा मिरासाहेबांचा दर्गा दिसे. रात्री घुमटावरचा हिरवा दिवा पाहून अंधार अधिकच गडद होई. अशावेळी माझा सांगाती रेडिओ असे आणि रेडिओ सिलोन माझ्या सांत्वनासाठी चित्रपटसंगीताची भरगच्च शिदोरी घेऊन येत असे. रेडिओचे निवेदक मला एकेक गाण्याची अचूक माहिती पुरवीत असत. त्या वेळी जुन्या गाण्यांची अन आगामी चित्रपटांतल्या गाण्यांची बरसात होत असे.

त्या वेळी ‘फागुन’ चित्रपटातली गाणी रेडिओवर प्रचंड वाजत असत. माझ्या बालपणाने एक बोट शंकर-जयकिशनच्या हाती दिले होते – दुसरे ओ. पी. नय्यरने पकडले. ‘पिया पिया ना लागे मोरा जिया’, ‘इक परदेसी मेरा दिल ले गया’, ‘छुन-छुन घुॅंगरू बोले’, अशी गाणी कितीदा तरी ऐकू येत. अशाच एका उदास संध्याकाळी ‘फागुन’ मधले गाणे लागले- ‘मैं सोया अखियाँ मींचे’- ‘तेरी जुल्फों के नीचे’ आशा-रफीच्या युगलगीतातल्या संथ लयीने माझे इवलेसे हृदय हलले. ‘ये कौन हँसी शरमाया, तारों को पसीना आया… ‘ त्यातल्या नर्म शृंगार, प्रणय, शब्दांतून झिरपणारी प्रेमभावना, याबद्दल माझे बालमन पूर्णपणे अनभिज्ञ होते. जुल्फें, बाहें… याबद्दल अगदी बेखबर ; पण पुणे सोडून आलेले नव्या दुनियेत एकाकी विहरणारे माझे मन त्या गाण्यातल्या शब्दसुरांकडे झेपावले. मग मी रोज विशिष्ट वेळी त्या गाण्याची वाट पाहू लागले.

अशा वेळी आणखी एका गाण्याने मला खुणावले. ‘चंपाकली’ चित्रपटातले लताचे ‘छुप गया कोई रे, दूरसे पुकारके, दर्द अनोखे हाय, दे गया प्यार के… ‘ माझ्या मनात त्या ‘दर्द’ ने हलकेच प्रवेश केला असावा आणि शब्दार्थ- भावार्थ ओलांडून ते गीत मला आणखी उदास करीत राहिले अन कधी-कधी थोपटत राहिले.

हळूहळू मिरजदेखील आपलेसे वाटू लागले. मित्र-मैत्रिणी, बाई, मास्तर, यांचे वर्तुळ जमू लागले. रेडिओ सिलोननी सुवर्णकालाच्या संगीताची टांकसाळ माझ्यासाठी खुली केली होती. अमर, देवल चित्रपटगृहांत पोस्टर्स झळकू लागताच त्यातल्या एकेका गाण्याचे तपशील माझ्या जिभेवर हजर असत आणि गाण्यांनी माझे अवघे जग भारून जाई.

एके दिवशी सामानाची बांधाबांध पुन्हा सुरु झाली. अंबाबाईचे देऊळ, मिरासाहेबांच्या दर्ग्याचा उरूस, किल्ल्यातले आत्याचे भले मोठे घर, तिच्या कानडी भाषक घरातले खमंग पुरणाचे कडबू, बसप्पा, मलप्पा चौगुलेंचे पेढे… अशा मिरजेकडे पाठ फिरवून पुण्यात आलो. पुढच्या घटनांनी आयुष्य भरून गेले. चित्रपटगीतांनी भरभरून माप पदरात टाकले. त्या गाण्यातून जीवनाचा वेध घेण्याचा छंद जडला. सळसळत्या वृक्षांतून जीवनरस मिळवावा, तसा गाण्यांचा अक्षय्य ठेवा लाभला. मिरजेत ऐकलेल्या गाण्यांचे अर्थ उमगत राहिले.

‘आज है सुनी सुनी दिलकी ये गलियां 

बन गयी कांटे मेरी खुशियो की कलियां 

हाय! याही तो मेरे दिन थे सिंगार के… ‘

… हे पुन्हापुन्हा ऐकताना मनात असोशी भरून राहायची.

‘मुस्कुराओ के जी नहीं लगता’ सारख्या गाण्यासाठी मी माझी सारी व्यवधाने दूर ठेवायची. चित्रपटाचे प्रवाह बदलले अन आपल्या जीवनाचेदेखील. कृष्णधवल चित्रपट गेले; रंगीत आले. अँग्री यंग मॅनच्या युगाचे उदयास्त झाले. तरीदेखील सुवर्णयुगाच्या चित्रपटगीतांनी खिशातली नाणी खुळखुळत राहिली. आपल्या श्रीमंतीला ओहोटी लागलीच नाही, असे वाटत राहिले. त्या श्रीमंतीला आणखी एक मोरपीस लागले.

ज्यांची नावे गाण्यापाठोपाठ निवेदक ऐकवीत राहायचा, त्यांना प्रत्यक्ष भेटायचे योग् आले. पुढे तो माझ्या कामाचा एक भाग झाला. भेटी, मुलाखती, लेखन आणि पुन्हा गाण्याच्या आनंदाची मैफल होत राहिली. बाहेरच्या अपमानाचे, उपेक्षांचे बाण परतवून लावणारा अक्षय्य भाता माझ्या जवळ होता ना ! 

एके दिवशी मुंबईतल्या संगीतप्रेमी स्नेह्याने निरोप पाठवला.. त्या संध्याकाळी आठवणी जागवायला जमलेल्यांमध्ये वयोवृद्ध कवी प्रदीप होते. संगीतकार अनिल विश्वास मीनाजींबरोबर हजर होते. मोती सागर, सितारादेवी, शायर कमर जलालाबादी होते. गप्पांची मैफल रंगात आलेली होती. शेरोशायरी, विनोद यांना बहर आला होता. ‘रोटी’ मधला सितारादेवींचा हृदयस्पर्शी रोल, ‘दूर हटो ऐ दुनियावलों’ ची छपन्न कडवी लिहून आणणारे कवी प्रदीप, अनिलदांनी ऐकवलेली फैज अहमद फैज यांची गझल.. मैफल रंगात आली होती. चहापानाच्या वेळी मी कमरसाहेबांना ‘जलती निशानी’ मधल्या लताच्या ‘रूठ के तुम तो चल दिये’ बद्दल छेडले… हे गाणे आठवते का विचारले. त्यांनी अनिलदांकडे पाहिले. म्हणाले, “कसे विसरणार? चित्रपट पहिल्याच शोनंतर कोसळला होता !” … त्या दोघांना हसू आवरेना. अनिलदांनी त्याला संगीत दिलेले होते.

हरवून गेलेल्या चित्रपटांतली अविस्मरणीय गाणी… सोन्यासारखी गाणी… तीच तर माझ्याजवळ आहेत.

‘हे माझे कुँवार डोळे-तुझ्याशी नजर मिळवताना खाली झुकले आहेत. हरले आहेत. तू माझा जन्मोजन्मीचा साथीदार आहेस ना… मग, चल, माझ्या भांगात चांदण्या भर… ‘ … अशा अर्थाची गाण्यातली ओळ चित्रपटसंगीताच्या फार मोठ्या ‘बिझिनेस’ मधून मी हलकेच गाठीशी बांधते. फार लहानपणीचा दर्ग्याच्या घुमटावरचा दिवा आठवतो. त्याला लपेटलेला अंधार आठवतो; पण त्याहीवेळी आपण उगाच उदास का झालो होतो, ते कळत नाही…

आजदेखील गाणे ऐकताना डोळे का भरतात… ? छे ! या वयात मन आवरायला शिकले पाहिजे…

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ इंदरजित सिंह की दुकान – ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

इंदरजित सिंह की दुकान  ☆ डॉ. जयंत गुजराती

गेली तीस वर्षे मी हेच नाव वाचत आलोय, इंदरजित सिंह की दुकान, मोठ्या ठळक अक्षरात ते लिहीलेले. दुकानावरच्या पत्र्याला गंज चढलाय, पण त्यावरील अक्षरे अजूनही मिरवतात स्वतःला ठळकपणे. दुकानाच्या मालकाने स्वतःचेच नाव दिलंय दुकानाला त्याचं अप्रूप नवख्यांना बरेच दिवस पुरतं, मात्र एकदा दुकानाची सवय झाली की तो दुकानाच्या प्रेमातच पडतो.

काय नसतं या इंदरजितच्या दुकानात? रोजच्या वापरातील वस्तुंचा खचच पडलाय म्हणाना! शाळेत जाणाऱ्या मुलाने खोडरब्बर मागितलं तर मिळेल. घरातील बल्ब उडालाय तर तोही मिळेल. कुणा षौकिनाने टाय मागितली की तीही हजर. स्त्रियांच्या मेकप सामानाचे तर ते माहेरघरच. मागाल ते मिळेल ही पाटीच दर्शनी भागात! दुकान तसं छोटंसंच. पण कॉलनींच्या नाक्यावरचं. होय, तीन कॉलनी एकत्र होतील अशा हमरस्त्यावरचं दुकान. लंबचौरस आत आत जाणारं. दुकानात शॉकेसेसची भरमार, शिवाय लहानमोठे कप्पेच कप्पे. सगळं ठासून भरलेलं. वरती पोटमाळा. तोही मालाने खचाखच भरलेला. इतकं असूनही इंदरजितने दुकान नीटनेटकं छानपैकी सजवलेलं. काहीही ओबडधोबड, अस्ताव्यस्त वा गबाळं दिसणार नाही. अधिकचा फॅन्सीपणा न करता आकर्षक मांडणी कशी करावी हे इंदरजितकडून शिकावं! गेली तीस वर्षे हे मी पाहत आलोय. इंदरजित एकदा ओळखीचा झाला की त्याला दुकानात पाऊल टाकल्या बरोबर सांगावसं वाटणारच की ‘दिल जीत लिया!’

दुकान उघडलं की सकाळपासून जे त्याचं बोलणं सुरू होतं ते रात्री दुकान वाढवेपर्यंत. तो शिकलेला किती हे आजतागायत कुणालाही ठाऊक नाही पण त्याच्या जीभेवर सरस्वती नाचते हेच खरं! सकाळीस वाहे गुरूची अरदास म्हणत तो दिवसाची सुरूवात करतो व जसजसे गिऱ्हाईक येईल तसा तो खुलत जातो. कोणत्याही वयाचं गिऱ्हाईक येवो, महिला असो, पुरूष असो, मूल असो वा युवा वृद्ध कोणीही, त्याला विषयांचं वावडं नव्हतं. इतक्या गोष्टी होत्या ना त्याच्याकडे. किस्से तर त्याच्या तोंडूनच ऐकावेत इतके मजेशीर असायचे. त्याचं मधाळ बोलणं व हसतमुख चेहेरा हे वेगळंच रसायन होतं.

आलेल्या गिऱ्हाईकांना हातचं जाऊ न देता आपलंसं करण्याचं त्याचं कसब वादातीत. माझ्यासाठी तो इंदर कधी झाला हे मलाही कळलं नाही. दिवसभरात दुकानात जाणं झालं नाही तर संध्याकाळी काही वेळेसाठी का होईना त्याला भेटल्याशिवाय चैन पडत नसे. क्वचित तेही घडायचं नाही तर येताजाता हात उंचावून रस्त्यावरूनच ख्यालीखुशालीची देवघेव होत असे. हे इतकं सवयीचं होऊन गेलं होतं की घरी गेल्यावर बायको हमखास विचारायची, “इंदरला भेटून आलात की नाही?”

फाळणीच्या वेळेस त्याचे वडील आपलं घरदार पाकिस्तानात सोडून नेसत्या वस्त्रानिशी भारतात आले. पंजाबमधे बस्तान बसवलं. मुलं मोठी केली. त्यातला हा इंदरजित. फाळणीची जखम खोलवर वडिलांकडून इंदरजितने उसनवारी वर घेतली. फाळणीचे किस्से ऐकून ऐकूनच लहानाचे मोठे झालो हे तो दर्दभरल्या आवाजात सांगायचा तेव्हा आपलं ही काळीज तुटेल की काय ही भीति वाटायची. पंजाबी, हिंदी उर्दूवर त्याची हुकूमत होती. शेरोशायरी हे जीव की प्राण. जर त्याने दुकानदारी केली नसती तर तो उत्तम कवी लेखक झाला असता इतकी त्याची जाण.

पन्नाशी उलटली पण त्याचा रंगेल व मिश्कील स्वभाव काही बदलला नाही. तसा तो होता मोना शीख. गुरूद्वारात मथ्था टेकण्यासाठी नेहेमीच जात असे. प्रसंगी कारसेवाही करायचा. इंदरजितला जे खरोखर ओळखत होते त्यांना तो कौतुक मिश्रित कोडंच वाटत असे. सकाळीस सश्रद्ध असणारा इंदरजित संध्याकाळ उलटल्यावर शायराना होऊ जायचा, शिवाय पंजाबी असल्याने खाण्यापिण्यात अव्वल. विशेषतः पिण्यात तर खास. कुठला ब्रांड खास आहे व तो कुठे मिळतो याची तर तो विकिपीडियाच.

एक भरभरून संपन्न आयुष्य जगलेला इंदरजित व क्वचित दिसणारी त्याची देखणी बायको पम्मी या दोघांचं एकच दुःख होतं. त्यांना मूल नव्हतं. याचं अपार वैषम्य तो उघड उघड बोलून दाखवत असे. त्यामुळेच की काय, दुकानात मूल आलं की तोही मुलासारखा होऊन जायचा. त्यांना हवं ते लाडेलाडे द्यायचा. एरवी सुद्धा मालसामान काढताना एखाद्या मुलाने बरणी उघडून गोळ्या चॉकलेट घेतले तर तो कानाडोळा करायचा. वरतून म्हणायचा वाहे गुरूने चिडीयांना चुगण्यासाठी अख्खे खेत सोडून दिले होते ही तर बरणी आहे! 

एके दिवशी इंदरजित सिंह की दुकान बंदच दिसली. चौकशी केली तर इंदरजित पंजाबला गावी गेल्याचं कळलं. वाटलं येईल परत. आठवडा झाला. महिना झाला. सहा महिने झाले. इंदरजित आलाच नाही. मोबाईल स्वीच ऑफ तर कायमचाच. मी लावणंच सोडून दिलं. रस्त्यावरनं जाताना त्याचं बंद शटर पाहून गलबलायला होतं. संध्याकाळी येताना त्याच्या बंद दुकानाच्या पायऱ्यांवर रेंगाळणं होतं. ही तर रोजच विचारते, “इंदरची काही खबरबात?” माझं गप्प राहणं पाहून तीसुद्धा खंतावते. मग मनात एक कळ उठते व मनातच बोल उठतात, “ये रे बाबा इंदर, परत ये, मागाल ते मिळेल हे तुझं ब्रीदवाक्य होतं ना? दुकान जरी बंद असलं तरी ती पाटी आत अजून तशीच असेल ! तर हेच मागणं की ये, किंवा जिथे कुठे असशील तेथे सुखात रहा !” 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मराठवाडा मुक्ती-संग्रामाचा इतिहास…”  लेखक : अज्ञात ☆ माहिती प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “मराठवाडा मुक्ती-संग्रामाचा इतिहास”  लेखक : अज्ञात ☆ माहिती प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

पूर्वपीठिका…

संत ज्ञानेश्वरांच्या कालात आपल्या मराठवाड्यावर आपलेच राज्य होते. देवगिरी ही राजधानी होती आणि रामदेवराय हा राजा होता.

अल्लाउद्दीन खिलजी या परकीय आक्रमकाने इ. स. १२९४-९५ ला आपल्यावर स्वारी केली, रामदेवरायास हरवले आणि आपण परतंत्र झालो. मराठेशाहीत आपल्यावर राज्य करणार्या निजामास थोरला बाजीराव आणि माधवराव पेशवे यांच्याक्डून पराभूत करून मांडलिक तर बनवण्यात आले.

पण मराठवाडा काही हिंदवी स्वराज्यास जोडण्यात आला नाही.

मराठेशाहीचा अस्त होण्यापूर्वीच निजामाने इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करले.

इंग्रज गेल्यानंतर निजामाने स्वत:चे भारतापासून वेगळे असे स्वतंत्र राष्ट्र घोषित केले. १७सप्टेम्बर१९४८पर्यंत आपण त्याच्या गुलामीत होतो.

निजाम घराण्यात सात निजाम झाले. त्यापैकी सातवा निजाम मीर उस्मान अली हा १९११साली गादीवर आला.

त्याने अलीगढ मुस्लीम विद्यापीठात शिक्षण घेतले होते. या निजामाने राज्यातील शाळांची संख्या एकदम कमी केली व १९२२पासून धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी सुरु केली. आमिष दाखवून किंवा बळजबरीने धर्मांतरे करण्यास सुरुवात केली. मजलिसे मुत्तेहादिल मुसल्मिन[एम आय एमMIM] य़ा सैनिकी संघटनेची स्थापना करून तिच्याकरवी जनतेवर अत्याचार सुरु केले. याच संघटनेचे पुढे रजाकार मध्ये रुपांतर झाले. रझाकार प्रमुख कासिम रझवी हा लातूरचा असून अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचाच विद्यार्थी होता. विशेषत: १९४६ ते १९४८ या काळात भयंकर अत्याचार झा्ले. गावे जाळणे, महिलांवर बलात्कार करणे, बळजबरीने धर्मांतर करणे, दलितांना धमकावून सरकारी बाजू घ्यायला लावणे असे प्रकार रझाकारांनी केले.

आर्यसमाज

निजामाच्या या अत्याचारास सर्वप्रथम विरोध आर्यसमाजाने केला व शेवटपर्यंत त्यासाठी लढा दिला. यात अनेक आर्यसमाजी हुतात्मा झाले. सत्याग्रह, जेल भरो, ध्वमस्फोट असे सर्व प्रकार आर्यसमाजाने हाताळले. हुतात्म्यांमध्ये उदगीरचे भाई श्यामलालजी, भीमराव पाटील, शंकरराव सराफ, लोहार्याचे रामा मांग, गुंजोटीचे वेदप्रकाश, शंकर जाधव, एकनाथ भिसे, बहिर्जी वाप्टीकर, धारूरचे काशिनाथ चिंचालकर, किल्ल्रारीचे माधव बिराजदार, जनार्दनमामा, फकीरचंद्रजी आर्य, कल्याणानंदजी, मलखानसिंह, रामनाथ असाना, सुनहराजी, ब्रह्मचारी दयानंद, मानकरणजी, लक्षैयाजी, सत्यानंदजी, विष्णूभगवंत तांदूरकर, इत्यादि. नांवे प्रमुख होत. या सत्याग्रहाचे नेतृत्व एकाच्या अटकेनंतर दुसरा अशा साखळी पद्धतीने पं नरेंद्रजी आणि स्वामी स्वतंत्रानंद यांच्या मार्गदर्शनात महात्मा नारायण स्वामी, श्री चांदकरणजी शारदा, श्री खुशहालचंद खुर्संद, राजगुरु धुरेंद्र शास्त्री, देवव्रत वानप्रस्थ, महाशय कृष्ण, द्न्यानेश्वर सिद्धांतभूषण, विनायकराव विद्यालंकार यांनी केले. गोदावरीबाई किसन टेके यांच्यासारख्या महिलांनीही निजामी अत्याचाराचा प्रतिकार केला. नारायणबाबू यांनी प्रत्यक्ष निजामावर ध्वम फेकला होता पण निजाम बचावला.

स्वा. सावरकर आणि हिंदुमहासभा.

१९३५साली इंग्रजांनी भारतास टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य देण्याचे मान्य करून प्रांतांना स्वायत्तता दिली. त्यानुसार १९३७ला मुंबई प्रांतात कूपर-मेहता मंत्रिमंडळ सत्तेवर आले व त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्त केले. यानंतर सावरकर हिंदुमहासभेचे अध्यक्ष झाले व त्यांनी आर्यसमाजाच्या निजामविरोधी लढ्यास मोलाचे साह्य केले. सावरकरांनी भारतभर दौरे करून या विषयावर व्याख्याने दिली व निजामशाहीत घुसण्यासाठी सत्याग्रही तयार केले तसेच या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी जमवला. सत्याग्रहींचे जत्थेच्या जथे निजामशाहीत घुसले. यांपैकी एका जत्थ्याचे नेतृत्व पंडित नथुराम गोडसे यांनी केले. त्यांना निजाम शासनाने एक वर्षाचा सश्रम कारावास ठोठावला. सावरकरांनी निजामी अत्याचाराबाबत अनेक लेख लिहून जागृती केली आणि निजामाला अत्याचार बंद करण्याचे आवाहन केले. सत्याग्रहींसाठी निजामाचे तुरुंग अपुरे पडू लागले तेव्हा १९३९साली निजामाने सावरकर आणि आर्यसमाज यांना त्याम्च्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले व सत्याग्रह थोड्या काळासाठी स्थगित झाला.

डॊ. आम्बेडकर

निजामाने बाबासाहेबांची धर्मांतराची घोषणा ऐकली. त्याने बाबासाहेबांना दोन कोटी रूपये देऊ केले, त्या बदल्यात मराठवाड्यातील दलित जनतेसोबत इस्लाम कबूल करण्याचे आवाहन केले. बाबासाहेबांनी ते दोन कोटी रूपये ठोकरले. इतकेच नव्हे तर आमिष दाखवून किंवा बळजबरीने धमकावून धर्मांतरित झालेल्या दलित बंधूंना स्वधर्मात परतण्याचे आवाहन केले, आवाहनाचे हे पत्रक त्यांनी नैशनल हेराल्ड या दैनिकात प्रसिद्धीस दिले. बाबासाहेबांचे समविचारी बौद्ध भिक्षु उत्तम यांनी काही काळ बंगाल हिंदुसभेचे प्रदेशाध्यक्ष भूषवले होते. ब्रह्मदेशातून तेरा सत्याग्रही निजामविरोधी लढ्यात सहभागी होण्यास आले होते.

वंदे मातरम आंदोलन

निजामी राज्यात वंदे मातरम हे गीत गाण्यास बंदी होती. महाविद्यालयीन तरुणांनी ही बंदी मोडण्याचे आंदोलन केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या आंदोलनास प्रोत्साहन दिले. बंदी मोडणार्या विद्यार्थ्यांना निजामाने विद्यापीठातून काढले तेव्हा विदर्भ प्रांतातील महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे आवाहन सावरकरांनी त्यांना केले. त्यानुसार अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी नागपूरला आले. या आंदोलनात रामचंद्र राव यांनी पोलीसांचे फटके खात असताना सुद्धा वंदे मातरम च्या घोषणा चालूच ठेवल्या. त्यामुळे त्यांचे वंदे मातरम रामचंद्र राव असेच नांव पडले. ते पुढे हिंदुमहासभा आनि आर्यसमाजाचे सक्रिय कार्यकर्ते झाले. या आंदोलनास पंडित नेहरूंनीही पाठिम्बा दिला होता. त्यांचे अनुयायी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव याच आंदोलनातून पुढे आले.

मुस्लीम सत्याग्रही

अनेक मुस्लीम बांधवांनीही निजामविरोधी लढ्यात आपले योगदान दिले. त्यात शहीद शोएब उल्ला खान आणि सय्यद फय्याज अली हे प्रमुख होत. शहीद शोएब उल्ला खान हे इमरोज या वृत्तपत्राचे संपादक होते. ते आपल्या सम्पादकीयांतून निजामी अत्याचारांवर कठोर टीका करीत. रझाकारांनी २१ औगस्ट १९४८ला रात्री १वाजता पाठीत गोळ्या घालून त्यांची हत्या केली. सय्यद फय्याज अली हे अजमेरचे निवासी. अजमेर आर्यसमाजाच्या प्रेरणेने त्यांनी पुसदच्या आर्य सत्याग्रहात भाग घेतला आ्णि तुरुंगवास भोगला. कताल अहमद, मौलाना सिराजुल हसन तिरमिजी, पंजाबचे मुंशी अहमद्दीन, कराचीचे मियां मौसन अली, सातार्याचे मौलाना कमरुद्दिन यांनीही निजामविरोधी लढ्यात आपले योगदान दिले.

स्वामी रामानंद तीर्थ आणि स्टेट कांग्रेस

स्वामी रामानंद तीर्थ यांनी विविध कारणांसाठी १९२८, १९३८, १९४०, १९४३ या वर्षी कारावास भोगला. स्टेट कांग्रेसवर तिच्या स्थापनेपूर्वीच बंदी घालण्यात आली होती. भारत स्वतंत्र झाला तरी निजामाने आपले राज्य त्यात विलीन न करण्याची घोषणा केली. स्टेट कांग्रेसने या घोषणेविरुद्ध ७ औगस्ट १९४७ ला खूप मोठे मोर्चे काढले. आ. कृ. वाघमारे, शेषराव वाघमारे, अनंत भालेराव, भाई बंशीलाल, दिगंबरराव बिंदू, राजूर तालुक्यातील विधिद्न्य निवृत्ती रेड्डी, कलिदासराव देशपांडे, माणिकराव पागे, राजाराम पाटील, इत्यादि नेते हे त्यावेळी स्वामीजींचे सहकारी होते. १५ औगस्ट १९४७साली लोकांनी आपल्या घरांवर तिरंगे फडकवले. स्वामीजींना पुन्हा तुरुंगात धाडण्यात आले. रझाकारांचे अत्याचार वाढले. सावरकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना सशस्त्र लढा देण्याचे आवाहन केले. ना. य. डोळे यांनी लिहिले आहे की महात्मा गांधींनीही या लढ्यात शस्त्र वापरण्याची अनुमती दिली होती.

रझाकार आणि जनता यांच्यात सशस्त्र लढा पेटला.

सैनिकी कारवाई

भारत सरकारने संघराज्यात विलीन होण्याचा विचार करण्यासाठी निजामास १५ औगस्ट १९४८ पर्यंतची मुदत दिली होती. पण निजाम या मुदतीनंतरही विलीन होण्यास तयार नव्हता. जनता आणि रझाकार यांच्यात संघर्ष पेटला होता. १२सप्टेम्बर १९४८ या दिवशी जिनांचे पाकिस्तानात निधन झाले. त्याच दिवशी मध्यरात्री सरदार पटेल यांनी पं. नेहरूंना बजावले की सैनिकी कारवाईची मान्यता दिली नाही तर आपण मंत्रिमंडळातून बाहेर पडू. तेव्हा नेहरूंनी निजामाविरुद्ध सैनिकी कार्रवाईच्या आदेशावर स्वाक्षरी केली. पटेलांनी १३सप्टेम्बर १९४८ला आपले सैन्य तीन दिशांनी निजामशाहीत घुसवले. रझाकारप्रमुख कासिम रझवी हा चारच दिवसांत पाकिस्तानला पळून गेला. १७सप्टेम्बर १९४८ या दिवशी निजामाने संध्याकाळी ५ वाजता आपले राज्य भारतीय संघराज्यात विलीन केले. त्याने विमानतळावर सरदार पटेलांना वाकून नमस्कार केला. अशा प्रकारे ६५३ वर्षांच्या पारतंत्र्यानंतर मराठवाडा स्वतंत्र झाला.

सर्व नागरिकांना मराठवाडा स्वातंत्र्य दिनाच्या ” हार्दिक ” शुभेच्छा !! 💐

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भाकरी – – लेखक : डॉ. दीपक रानडे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ भाकरी – – लेखक : डॉ. दीपक रानडे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

सर्जरी संपायला उशीर झाला होता. ट्युमर खूपच लोचट, चिकट. आणि हात लावीन तिथे भुसभुस रक्तस्राव होत होता. सकाळी 9. 30 ला सुरुवात केलेली केस, अखेर संध्याकाळी 5. 45 ला संपली. पोटात भुकेचा वणवा पेटला होता. ह्या कोविड प्रकरणामुळे ऑपरेशन थिएटरच्या मजल्यावर असलेले कॉफी शॉप बंद होते.

सेकंड शिफ्टच्या मावशी आलेल्या दिसल्या. त्यांना बिनधास्त विचारलं- ” मावशी, डब्यात काय आणलंय?”

मावशीनं प्रेमाने उत्तर दिलं- “सर, आज कांद्याची भाजी आणि चटणी भाकर हाय डब्यात. भाज्या लयी महाग झाल्यात. ”

मी तिला “सर्जनस रूममध्ये डबा घेऊन ये, ” म्हणालो. भूक अनावर झाली होती.

तिने एक छोटासा स्टीलचा डबा आणि कागदाची वळकटी तिच्या पिशवीतून काढून माझ्या पुढ्यात दोन्ही मांडले.

त्या कागदाच्या वळकटीत 4 घट्ट रोल केलेल्या ज्वारीच्या भाकऱ्या होत्या. स्टीलचा डबा उघडला, तर तिखट तांबड्या रंगाची तेलात परतलेली कांद्याची भाजी आणि एका कोपऱ्यात हिरव्या मिरचीचा ठेचा होता. त्या अन्नावर मी अक्षरशः तुटून पडलो. ती भाजी भाकरी, ठेचा अमृताहूनी गोड लागत होता. बघता बघता दीड भाकरी डीचकली, आणि मावशीने आणलेल्या गार पाण्याचा ग्लास गटागटा प्यायलो. तेव्हा कुठे पोट शांत झाले.

भाकरी!काय ताकद आहे ह्या अन्नात!

भाकरीला न तुपाचे, तेलाचे लाड. बनवताना तिला धपाटे घालुन, डायरेक्ट विस्तवावर भाजणे. कुठे पोळपाटाची शय्या नाही, की लाटण्याचे गोंजरणे नाही की तव्याचे संरक्षण नाही. भाजीचा आगाऊ हट्ट न करणारी, चटणीलासुद्धा तेवढ्याच प्रेमाने कुशीत घेऊन पोट भरणारी ही माऊली. कित्येक चुलींवर ही भाकरीच फक्त पोट भरण्याचे काम करते.

काय सामर्थ्य आहे ह्या भाकरीचे!

कष्ट करणाऱ्या मंडळींचे साधे, कष्टाळू अन्न.

कुठेतरी, रस्त्याच्या कडेला, तान्हे मूल कापडी पाळण्यात बांधून, कित्येक माऊलींच्या ममतेची ही भाकरीच पोशिंदी. ह्या भाकरीच्याच जीवावर, रस्ते, बिल्डिंगस, सोसायट्या, बंगले उभे आहेत. त्या भाकरीच्या प्रत्येक घासात, कष्टाचा सुगंध आणि गोडवा जाणवतो.

ती कांद्याची भाजी म्हणजे भुकेने व्याकुळ झालेल्या जिवाला पर्वणीच.

त्या माउलीला पोटभर आशीर्वाद दिले.

त्या भाकरीमध्ये कष्ट करणाऱ्याचेच पोट भरण्याची क्षमता असते. कष्ट करणाऱ्या हातांनाच त्या भाकरीचा घास तोडण्याची ताकद असते. त्या माउलीला तिचा डबा पुढे करण्याची उदारता त्या भाकरीनेच बहाल केली असावी. त्या भाकरीमध्ये केवळ पोट भरण्याचे सामर्थ्य नसून, कष्ट करणाऱ्या व्यक्तीमध्ये कणखरता, चिकाटी, आत्मबळ आणि सोशिकता निर्माण करण्याचे अद्भुत रसायनदेखील असते. भाकरी केवळ खाद्य पदार्थ नसून, जीवनशैलीचे, संस्कृतीचे प्रतीक आहे.

उगाच जिभेचे फाजील चोचले न करणारी, दंतपंक्तीला भक्कम करणारी, पोट भरण्याची विलक्षण संपन्नता असणारी ही भाकरी म्हणजे खऱ्या अर्थाने पूर्णब्रह्म आहे.

मला जेव्हा जेव्हा शक्य होते, तेव्हा तेव्हा मी मावशी- मामांच्या जेवणात घुसखोरी करतोच. त्यांच्या स्वयंपाकामध्ये प्रामाणिक कष्टाची रुचकरता तर असतेच, पण त्यांच्या चेहऱ्यावरची चार घास वाटून खाण्याची उदार भावना, प्रेम, हे खरोखर मनाला स्पर्शून जाते आणि ते दोन घास खरेच स्वर्गीय आनंद देऊन जातात. त्यांच्या डब्यातल्या भाकरीची बातच काही और आहे.

खाऊन झाल्यावर डोळ्याच्या कडा ओलावल्या. तो मेला कांदा कितीही शिजवला, तरी डोळ्यात पाणी आणतोच.

लेखक :डॉ दीपक रानडे

प्रस्तुती : अनंत केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ व्यथेला शब्द लाभावे… कवयित्री : सुश्री आश्लेषा महाजन ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ व्यथेला शब्द लाभावे… कवयित्री : सुश्री आश्लेषा महाजन ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

☆ कविता ☆ व्यथेला शब्द लाभावे

व्यथेला शब्द लाभावा,

अशी बांधीव ती नाही 

तुला देऊ कशी लाही? 

तशी आटीव ती नाही…

 *

मनाच्या खोल अंधारी 

स्मृतींचा कालवा दाटे 

तमा पिंजून एखादा 

दिठीला काजवा भेटे…

 *

क्षणाला लख्ख बिल्लोरी 

उजेडा, अर्थ दे ना तू 

धुनीसाठी हवी ऊर्जा,

असे अंतस्थ हा हेतू…

 *

नको वरपांग काहीही,

उरातिल आर्त उसळू दे 

मनाच्या मंथनापोटी 

खरा उद्गार मिसळू दे…

 *

व्यथेला शब्द लाभाया,

युगे तिष्ठूनिया पाही

लिपीला भार का व्हावा?

अनर्था, बोल ना काही…

 *

— आश्लेषा महाजन.

Mob. 9860387123

रसग्रहण 

 व्यथेला शब्द लाभावा,

अशी बांधीव ती नाही 

तुला देऊ कशी लाही? 

तशी आटीव ती नाही..

“व्यथेला शब्द लाभावे “हे काव्यशीर्षक वाचताच स्मृतींचा कालपट क्षणाचा कालावधी न सरताच नजरेसमोर तरळतो. प्रत्येकाच्या काळजात व्यथेची कथा नांदतच असते. या व्यथेला बोल, शब्द लाभावेत व ती तिच्या परिमाणासकट परिणामांना व्यक्त करणारी असावी असा आंतरिक घोष कानी निदादतो. व्यथेची भावना तशी सार्वत्रिकच आहे. प्रत्येक जण कधी ना कधीतरी तिला सामोरा गेलेला असतो. व तो दाहक अनुभव, ती अनुभूती माणसाच्या काळजाला निरंतर छळत राहते. साहजिकच कवितेच्या अंतरंगाकडे हृदय आकृष्ट होते. कवयित्रिच्या शब्दभात्यातले सुयोग्य शब्दबाण आपल्या व्यथेला घायाळ करतील आणि तिचे ते शब्दरूप पाहायला मिळेल अशी सुप्त इच्छा वाचकाच्या मनात मूळ धरू लागते. व्यथेची व्याप्ती व्यक्त करायला शब्द लाभावेत, ते पुरेसे यथार्थ व अर्थपूर्ण असावेत ही भावना कवितेत व्यक्त होताना दिसते. असामान्य वाटणारी प्रत्येकाची व्यथा निराळी! तिचा भार अर्थवाही शब्दांनी वाहून न्यावा ही कामना प्रत्यक्षात येणे सहज सोपे नाही हे वास्तव कविता वाचताना ध्यानात येते. कवयित्री म्हणते व्यथेला शब्द लाभावा, ती अबोल राहू नये, तिने व्यक्त व्हावे, तिला व्यक्त करावे. व्यथा भोगणाऱ्याला ती व्यक्त करण्यासाठी तसेच खुद्द व्यथेलाही शब्द लाभावेत असा अर्थ अभिप्रेत असावा. मनातली ही इच्छा फलद्रूप व्हावी. पण यासाठी तिचे रूप, स्वरूप व्यक्त करण्याजोगे दृष्यमान असायला हवे ना ! तिचे मनात वसत असलेले रुप कल्पनेच्या कुंचल्यातून व शब्दमाध्यमातून व्यक्त करणे वा तिचे वर्णन करणे हे कठीणच! ही व्यथा बांधीव, एकसंध नाही. विस्कळीत, दुभंगलेली, पसरलेली, इत:स्तत: विखुरलेली आहे. जणू काही ती सर्वव्यापी आहे. तिची जमवाजमव करून तिला शब्दरूप देणे गरजेचे आहे. हे आकळले तरी ते प्रत्यक्षात कसे घडवून आणावे, कसे घडावे? व्यथेला शब्दात बांधणे म्हणजे शब्दांकित करणे तसेच “बांधून टाकणे” हाही अर्थ अभिप्रेत असावा. व्यथेला शब्द लाभावा असे जरी वाटत असले तरी तिच्या रूपामुळे तिला तो लाभणार नाही असा काहीसा सूचक निर्देश निदर्शनास येतो. या व्यथेची लाही, तिचा लहानसा कण कसा कुणाला द्यावा?कारण ती आटीव म्हणजे आटलेली, घट्ट झालेली, संपृक्त नाही. अजून ती धगधगती आहे, लाहीसम तडतडणारी आहे, बेचैन करणारी आहे, प्रवाही आहे. नानाविध व्यथा असल्याने तिचे रूप एकसमान नाही.

मनाच्या खोल अंधारी 

स्मृतींचा कालवा दाटे 

तमा पिंजून एखादा 

दिठीला काजवा भेटे…

कुठेही कसेही न सामावणाऱ्या अदृश्य, अथांग अशा मनाच्या आत आत अगदी तळघरात, खोल खोल अंधारात स्मृतींचा कालवा दाटलेला आहे. कालवा या शब्दाचा सुंदर अर्थ मनाला भावतो. मानवनिर्मित प्रवाह म्हणजे कालवा. येथे व्यथेचा प्रवाह हा कालव्यासम आहे हा अर्थ अभिप्रेत आहे. अर्थात ही व्यथा मानवनिर्मित आहे हे लक्षात आणून दिले आहे. तसेच अंतरंगात कालवाकालव करणारा तो कालवा. व्यथेचे मूळ व कूळ, तिची उत्पत्ती व व्याप्ती दर्शवणारा हा शब्द!! व्यथेचा हा काळाकुट्ट तम अंतरंगात व्यापून उरलेला आहे. तो काळोख अगदी पिंजून काढला तर नजरेला एखादा काजवा जो क्षणिक आणि स्वयंप्रकाशी आहे तो कधीतरी भेटतो. येथे “पिंजून काढणे” हा वाक्प्रचार म्हणजे खूप प्रयत्न केल्यावर गवसणे. कवितेतील आशयाला हा एकदम समर्पक आहे. एखादा आशेचा किरण व्यथा भोगताना अथक प्रयत्नाने कधीतरी खुणावतो ही भावना व्यक्त केली आहे. तसेच व्यथा दूर करण्यासाठी स्वतःच्या प्रयत्नांचे महत्त्व सांगितले आहे.

क्षणाला लख्ख बिल्लोरी

उजेडा, अर्थ देना तू 

धुनीसाठी हवी ऊर्जा,

असे अंतस्थ हा हेतू…

काजव्याच्या सानुल्या उजेडाकडे कवयित्री याचना करते आहे की हे उजेडा! त्या विविक्षित क्षणाला लखलखीत बिल्लोरी अर्थ दे. अर्थात त्या अंधारात लाभलेल्या उजेडाने आयुष्याला चमक, झळाळी लाभो. बिल्लोरी या शब्दातून केवळ चमकदार उजेड अंतर्भूत नाही तर तो इंद्रधनु सम सतरंगी असावा अशी भावना व्यक्त केली आहे. या प्रकाशामुळे जगण्याचे अर्थपूर्ण भान येऊ दे, आयुष्याला चांगला मार्ग मिळू दे असा भावार्थ!! आणि हे सर्व गरजेचे आहे कारण ही धुनी पेटती राहावी, यासाठी तिला ऊर्जेची गरज आहे. येथे धुनी ही शरीराची आहे. ती पेटलेली आहे, धगधगती आहे हे लक्षात येते. तसेच जगण्याचा जो यज्ञ, धुनी आहे त्यात समिधा म्हणून अर्पण करण्यासाठी जगण्याचीच ऊर्जा लाभावी. आशेच्या अर्थपूर्ण ऊर्जेचा एखादा तरी किंचितसा स्त्रोत लाभावा अशी मनीषा व्यक्त केली आहे, कारण अंतरंगात स्थित असणारा, नेहमी वसणारा हा आंतरिक हेतू आहे. अंतस्थ म्हणजे आतला, खोल मनाच्या गाभ्यातला हेतू!!जगण्याची इच्छा सोडलेली वा सुटलेली नाही. व्यथेच्या अटळ स्थानाचे भान राखून जीवन आशेच्या किरणावर जगण्याचा प्रयत्न आहे.

नको वरपांग काहीही 

उरातील आर्त उसळू दे 

मनाच्या मंथनापोटी

खरा उद्गार मिसळू दे….

कवयित्रीला कुठले ही काही ही वरवरचे, उथळ, वरपांगी, सकृतदर्शनी आहे असे दिसणारे, खोलवर विचार न करणारे काहीही नकोय. दुसऱ्याच्या व्यथाभावनेला लाभणारे वरवरचे सहानुभूतीपर शब्द ही नकोत. अर्थात व्यथा भोगताना कुणाच्या अर्थहीन निरुपयोगी सहाय्याची अपेक्षा कवयित्रीला नाही. आपल्या वेदनेवर तिला स्वतःच आधार शोधायचा आहे. यासाठी उरातील, काळजातील आर्त भावना उसळून येऊ देत. व्यथा या नेहमी उरात दडलेल्या, दडविलेल्या असतात हे सत्य लक्षात घेतले आहे. त्या उसळून येऊन एक प्रकारे त्यांचा उद्रेक व्हावा व तसे झाल्याने व्यथेच्या भोगातून बाहेर पडण्याची प्रखर व तीव्र जाणीव स्वतःला असल्याशिवाय व झाल्याशिवाय व्यथेपासून सुटका नाही, यावर दुसरा उपाय नाही. मनाचे मंथन यातून सखोल चिंतन अपेक्षित आहे. जीवनात समाधान मिळावे व ते मिळवण्यासाठी व्यथेच्या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळावा. काय करायचे याचे विश्लेषण करून त्यातून निष्कर्ष काढणे हे गरजेचे आहे. असे झाले तर तो खरा अर्थपूर्ण उद्गार लाभेल. उद्गार या शब्दाचा अर्थ अभिव्यक्ती करण्यासाठी योग्य वचन, बोल उक्ती मिळणे हा आहे. या शब्दयोजनेतून मनाच्या मंथनाप्रती मनात असलेली कवयित्रीची तळमळ किती प्रांजळ आहे हे लक्षात येते. ताकदीचा व खरा उद्गार लाभला व मनाच्या मंथनात मिसळला तरच मार्ग मिळेल, मार्ग दिसेल याची खात्री आहे.

व्यथेला शब्द लाभाया 

युगे तिष्ठूनिया पाही 

लिपीला भार का व्हावा?

अनर्था, बोल ना काही…

व्यथेची भावना, तिची तीव्रता व खोली सापेक्ष आहे. तिची जाण संपूर्णपणे होणे सर्वथा अशक्य आहे याचे सजग भान कवयित्रीला आहे. त्यामुळे व्यथा व व्यथेला स्वतःला व्यक्त करण्यासाठी, बोलके होण्यासाठी यथार्थ शब्द लाभावेत अशी अपेक्षा केली आहे. यासाठी व्यथा युगानुयुगे तिष्ठत उभी आहे असे कवियत्रीने म्हटले आहे. यातून कालातीत असलेली व्यथा काळाशी सुसंगतपणे व्यक्त होणे अशक्यप्राय आहे हे कळते. व्यथेला अभिव्यक्त करण्याची घाई न करता योग्य शब्द-भाव-रसनिष्पत्ती होईपर्यंत थांबायची तयारी आहे. अगदी युगानुयुगे वाट पाहायची तयारी आहे. वाट पाहत राहून ही, तिष्ठत असूनही ते शब्द, ते बोल मिळू शकत नाहीत. “तिष्ठत” शब्दातून आतुरतेने बराच काळ वाट पाहणे हे जाणवून दिले आहे. लिपीला म्हणजे लिखाणाच्या सूत्रबद्ध पद्धतीला, अक्षरांना व्यथेचा भार होतोय. अर्थात ती अक्षरेही असमर्थ ठरत आहेत व्यथा व्यक्त करण्यासाठी !कवितेतील आशय अगदी खोलवरपणे लक्षात येतो व मनाला भिडतो ही. तसेच लिपीने का व कशासाठी व्यथेचा भार वाहायचा असा मूलभूत प्रश्न पडला आहे. अशा परिस्थितीत कवयित्री मनात व जीवनात भरून राहिलेल्या अनर्थालाच काही बोलायची विनंती करते आहे. लिपी तर बोलत नाही, बोलू शकत नाही तर अनर्था आता तूच बोल असे अतिशयोक्तीपूर्ण मागणे कवयित्रीने केले आहे.

व्यथेची सार्वत्रिक भावना व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द लाभणे अत्यंत अवघड आहे कारण व्यथा ही भावना समजून घ्यायची आहे, तिचे दृश्यरूप दृष्टीस पडत नाही. अत्यंत संवेदनशील मनाचा आविष्कार या कवितेत जाणवतो. उचित, वेचक व वेधक शब्दांचा समर्पक प्रयोग, भावनेचा स्तर कळावा म्हणून योजलेले विविध साहित्यिक अलंकार कवितेतील आशयाला पूरक व पुष्टी देणारे आहेत. व्यथेला शब्द लाभावा, मनाचा खोल अंधार अशी अनेकानेक चेतनागुणोक्तीची उदाहरणे या कवितेत सुंदर रीतीने मांडली आहेत. त्यांना चेतना प्रदान करून त्यांचे व्यक्ती स्वरूप वर्णिले आहे. काळोखाला पिंजणे मधील अतिशयोक्ती अलंकार, स्मृतींचा कालवा मधील रूपक तसेच कवितेला असलेली लयबद्धता असे अनेक काव्यविशेष मनाला मोहविणारे आहेत. हे वियद्गङ्गा वृत्त आहे. कवितेचा “काव्यप्रकार” म्हणून मोल वृद्धिंगत करणारे आहेत. कवयित्रीने कवितेतून व्यथेला शब्द लाभावा असे म्हणताना तिला बोलके केले आहे. तिच्या मूकपणात तिचे अस्तित्व प्रकर्षाने लक्षात येते.

मनाचा वेध घेणारी ही कविता आहे. वाचक जेव्हा आपल्या मनाची नाळ कवितेशी जुळवतो तेव्हा ती सार्वत्रिक होते आणि यातच त्या कवितेचे महत्त्व अधोरेखित केले जाते. अशी ही नितांत सुंदर भावपूर्ण कविता मनात रेंगाळत राहील व निरंतर स्मरणात राहील या बद्दल दुमत होणे नाही.

© सुश्री नीलिमा खरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अक्षर… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ अक्षर…  ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

विश्वातील अनादी काळापासून, अक्षरशः अक्षर निर्मिती ! न क्षरती इति 

अक्षर ! ज्याचा नाश कधीच होत नाही असे अक्षर ! अक्षर कुठून तयार झाली ? भाषा व लिपी कोणती जरी असली तरी , अक्षर ही प्रथम नाद निर्माण करतात ! नाद हा परत दोन प्रकारचा आहत आणि अनाहत !  आहत नाद 

मुखातून वा कोणत्याही आघातजन्य पदार्थापासून निर्मित असतो अनित्य असतो. अनाहत नाद हा स्वर्गीय नित्य असतो. मुखातील जिव्हा, टाळू, दंत ओष्ट, नासिक ह्यांच्या आघातामुळे नाद किंवा अक्षर तयार होत असते. 

अ उ म – म्हणजेच ओम  हा आकार, उकार, मकार ह्या तीन धातूंपासून तयार झाला आहे . 

अक्षर हे मानवाचे प्राण आहे ! बघा हं विचित्र वाटेल पण त्रिकालाबाधित सत्य आहे ! जन्मतः प्रसव झाल्यापासून को s हं ? किंवा को अहं ! ह्या अक्षरांना किती महत्व आहे हे तुम्ही जाणताच . बाळ रडले ह्याचा अर्थ त्याचा पहिला श्वास चालू झाला ! रडणे म्हणजेच श्वास घेणे आणि सोडणे , म्हणजेच त्याचा श्वासोच्छ्वास चालू झाला ! ह्यांचाच अर्थ त्याचे फुफ्फुसे व ह्रदय क्रिया चालू झाली !त्याला जीव प्राप्त झाला ! मंडळी  हाच तो अनाहत नाद ! इथे कुठलाच आघात न होता अक्षर तयार झाले ! ईश्वर निर्मित नाद ! अक्षरे देऊन गेला ! प्राण व्यानं उदान ह्या वायूची गती इथे प्राप्त झाली .  प्राण ह्रदयस्थित व्यानं फुफ्फुस स्थित , उदान कंठ स्थित !

आपण बोलताना वरील तिन्ही वायूंचे चलनवलन होत असतेच . अपान वायू मलमूत्र विसर्ग होत असताना कार्य करते . तर समान वायू 

अग्निवर्धन करून अन्न पचन करते. आघात होण्यासाठी वायू व आकाश ह्याची गरज आघात मुखात होतो व तोंडातील वा श्वास मार्गातील पोकळी किंवा अवकाश अक्षर , शब्द निर्मिती करत असते . माणूस सजीव असेपर्यंत अक्षर आवाज जन्मापासून मृत्यू पर्यंत अव्याहतपणे चालू असते ! आघात अक्षर शब्द हे जेव्हा थांबतील तेव्हा जीव नाहीसा होतो ! जीव जात  असताना पण घश्यात घुरघुर लागते व श्वास थांबतो – त्यालाच मृत्यू म्हणतात ! 

अनेक अक्षर मिळून शब्द तयार होतो , परा – पश्चन्ती मध्यमा – वैखरी ही त्याचे सूक्ष्म रूपे होत ! बेंबीच्या देठापासून ते कंठातून – मुखापासून बाहेर पडण्याच्या क्रियेला खरतर फुफ्फुसे व कंठ श्वासपटल मुख ही सर्व कार्यरत असतात ! त्यासाठी वरील तिन्ही वायूचे साक्षात प्राणाचे कार्य अव्याहतपणे चालू असते . शरीरांतर्गत ह्या सूक्ष्म क्रिया असतात . तो सजीव बोलत असतो आहत नादामुळे , मुखातील आघातामुळे ! ह्याच आघातामुळे नादमय संगीत पण तयार होत असते .

अक्षर ही सरस्वती कृत निर्मित ! तर चौदा विद्या चौसस्ट कला ह्या श्री गणेशाधीन श्री गणपती ही त्याची देवता . मग सरस्वती पूजन का ? सरस्वती ही प्रत्येक्ष्यात प्रतिभा ! उत्स्फूर्तता ! सृजनशील ! वाक् – बोलणे , ईश्वरी – अनाहत नाद निर्माण करणारी बीज मंत्र !

अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ आं 

यरळवष श स हं ळ क्ष ज्ञ 

क ख ग ग इत्यादी मुळाक्षरे 

काही भाषेत बाराखडी, तर काही भाषेत चौदाखडी

उदा. कानडी भाषा चौदाखडी ( ह्रस्व आणि दीर्घ ए ) असो. 

पाणिनीला मात्र वेगळीच बीजमंत्र मिळाले . शंकराच्या डमरूतुन त्याला चौदा शब्द समुच्चय मिळाला ! त्यावरच पाणिनीने लघुसिद्धांत कौमुदी हे व्याकरण शास्त्राचे नवीन प्रबंध निर्माण केला . जे आजही व्याकरण शास्त्राचे आधारभूत ग्रंथ म्हणून पाहिले जाते . चार चार अक्षरांचा चौदा समूह तयार करून त्यांनी , अक्षरपट मांडला . विस्तार भयास्तव येथे देत नाही ! तरीपण ह्या शास्त्राला नाद संरचना ( phoneticks ) म्हणून जगात मान्यता आहे ! 

कर्ण बधिर शास्त्रात उपयोग केला गेला ! महत्वाचे म्हणजे मला अस प्रश्न पडतो की ? 

सुदृढ माणूस ऐकू शकतो , बोलू शकतो . मूक बधिरांचं काय ? ? अक्षर समूह म्हणजे शब्द , शब्द समूह म्हणजे वाक्य . नाम क्रियापद कर्म , इत्यादी . 

ही मुळाक्षरे, तसेच संगीत शास्त्रातील , “सा रे ग म प ध नी सा”  सप्तसूर कोमल स्वर 

“मंद्र मध्य तार सप्तक” ह्यांचा  कंठातून होणारा आघात – नादमय ध्वनी इथे मुळाक्षरे सप्तस्वरच राज्य करतात !

अस असलेतरी मुखातून आलेला ध्वनी कर्ण पटलावरच कार्य करतात, किंबहुना कर्ण अबाधित असेलतरच ह्याचे ज्ञान होणार . 

मुळाक्षरे जशी आहेत तशीच बिजाक्षरे पण वेदानी प्रमाणभूत मानली आहेत. हीच बिजाक्षरे देवांच्या प्राण प्रतिष्ठासाठी ग्राह्य मानली जातात. 

आपण वार्षिक गणपतीचा उत्सव दहा दिवस आनंदाने साजरा करतो . दहा दिवस  आपण मनोभावे पूजा करतोच बाजारातून   आणलेला गणपती, घरी पूजेसाठी ज्यावेळी मांडतो त्यावेळी, बिजाक्षरानी त्यात प्राण व्यान उदान अक्षरांनी प्रतिष्ठा केली जाते. ती अक्षरे खालीलप्रमाणे.

ओं आं ह्रिम क्रोम् । 

अं यं रं लं वं शम वं सं हं लं इत्यादी — सर्व अनुनासिक अक्षर 

जन्मतः बाळ रडत ते पण अनुनासिक अक्षर !

को ss हं किंवा टँहै टँह्या ही अशी अनादी अनंत प्रक्रिया सृष्टीत अव्याहत चालू आहेच. बऱ्याच वनस्पतीमध्ये पण ही क्रिया चालू असतेच उदा. केळीचा कोका ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी आवाज येतो. तो अक्षरशः अक्षरांनी. तस बरेच काही अक्षराबद्दल सांगता येईल. ह्या जगात तुम्ही आम्ही असू वा नसू पण अक्षरे ही अबाधित असतील एवढं मात्र खरे !

तेच प्रांजळ सत्य आहे . 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘प्रिय सुदामा…‘☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

☆ प्रिय सुदामा… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

प्रिय सुदामा,

तुला लिहिलेलं माझं पहिलंच आणि बहुदा शेवटचं पत्र…!

तसा खूप उशीर झाला आहे,  पण आजची एकूण परिस्थिती बघून माझे मनोगत तुझ्यापाशी व्यक्त करावेसे वाटले. मूठभर पोह्याचे तुझे ऋण होतं माझ्यावर, म्हणून तू जास्त लक्षात राहिलास….!

माझी नरदेह सोडून सुमारे पाच हजार वर्षे झाली…!

माझ्या संपूर्ण जीवनात मी ‘स्वार्था’पोटी एकही गोष्ट केल्याचे आठवत नाही..!

गावाच्या भल्यासाठी घराचा त्याग करावा, राज्याच्या भल्यासाठी गावाचा त्याग करावा आणि देशाच्या भल्यासाठी जीवाचाही त्याग करावा असे आपल्याकडे मानले जाते. मी तसेच आचरण केले, नाही का… ?

माझ्या जन्मानंतरचे सोडून देऊ, पण जन्माच्या आधीपासूनच माझ्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार होती…!

जन्म झाल्या झाल्या मला जन्मदात्रीला सोडून दुसऱ्यांच्या घरी राहावं लागले…!

जन्माला आल्यावर पुतना मावशी मारायला टपली होती…!

त्यानंतर कालिया नाग….!!

माझ्या मामाने तर मला मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला….!

धर्मरक्षणासाठी मला माझ्या मामाला मारावे लागले….!

तिथे जरी मला बलराम दादा होता, तरी जबाबदारी माझ्यावरच जास्त होती….!

मित्रांना लोणी, दूध, दही खायला मिळावे म्हणून मी अन्नाची चोरी करायचो, मी कधीही संपत्तीची चोरली नाही, पण सर्वांनी मला ‘चोर’ ठरवले….!

माझी यशोदामाई सुद्धा मला चोर म्हणाली,तेव्हा मला खूप वाईट वाटले….!

पण एक सांगतो, गोकुळात मला जे प्रेम मिळाले ते नंतर मला कुठेच मिळाले नाही. सगळे गोपगोपी लोण्यासारखे मृदूल…!

गोपींनी तर मला ‘सर्व’ ‘स्व’ दिले….!

तरीही मला कर्तव्यपालनासाठी माझ्या प्रिय गोकुळाचा कायमचा त्याग करावा लागला.

नंतरच्या बऱ्याच गोष्टी तुला माहीत आहेतच….!

तुम्हा सर्वांना त्यातील राजकारण दिसले असेल…!

कधी मला ‘कृष्ण’शिष्ठाई करावी लागली तर कधी मला ‘रणा’तून पळून जावे लागले..!

अनेक राक्षसांचे वध करावे लागले…!

नरकासुराच्या बंदी खान्यातील सोळा सहस्त्र नारींना मी सोडविले, पण त्यांना सामाजिक प्रतिष्ठा देण्यास समाज पूढे येईना, शेवटी मीच त्यांच्याशी विवाह केला….!

द्रौपदीला मी वस्त्रे पुरवली, अर्जुनाला गीता सांगितली अशा अनेक गोष्टी माझ्याकडून नियतीने करवून घेतल्या….!

मग लोकं मला ‘अवतार’ मानू लागले….!

मला देवत्व प्रदान केले गेले…! 

आणि कोणालाही देवत्व प्रदान केले की सामान्य लोकांचे काम सोपे होते. कशीतरी रोजची पूजा करायची, (खरं तर उरकायची !), मंदिरात ‘भंडारा’ करायचा. ‘उत्सव’ साजरा करायचे. हल्ली जो गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी करतात. ना त्यात गो (गाय)  असते, ना गोपाळ असतात ना त्या हंडीत दही असते……!

जे असायला नको ते मात्र सर्व असते….!

मला तुम्ही लोकांनी देव केले, माझी भक्ती करायला सुरुवात केलीत. पूजा अर्चा जमली तर अवश्य करा पण माझी खरी भक्ती करायची असेल तर मी जसा प्रत्येक संकटात वागलो तसे वागण्याचा प्रयत्न करावा. मला तुम्ही पुरुषोत्तम म्हणता पण ‘पुरुषोत्तम’ होण्यासाठी प्रयत्न करणारे फार कमी लोकं आहेत. तुम्हाला मनमोहन व्हायला आवडते पण ‘कालियामर्दन’ करण्याची कोणाची तयारी दिसत नाही. आज अनेक ‘नरकासुर’ आहेत, अनेक ‘कालिया’ आहेत पण त्यांचा बंदोबस्त कोण करणार ? विचार करा.

प्रत्येकाने जेव्हा आपापली काठी लावली तेव्हा माझ्या करंगळीने गोवर्धन उचलला गेला, हे आपण विसरून जात आहात. गीता सांगायला तुम्हाला कोणीही भेटेल पण त्यासाठी तुम्हाला अर्जुनासारखे भक्त व्हावे लागेल…!

भक्ती तशी प्राप्ती असे म्हणतात, पण आज सुचवावेसे वाटते, जशी भक्ति तशी प्राप्ती!!.

आज माझा ‘जन्मोत्सव’ तुम्ही पारंपरिक पद्धतीने साजरा कराल, तेव्हा याचाही विचार कराल, असा विश्वास वाटतो. 

तुझा सखा,

कृष्ण

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
image_print