मराठी साहित्य – विविधा ☆ शब्द शब्द जपून ठेव..! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ शब्द शब्द जपून ठेव..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

प्रत्येक शब्दाचे एक समान वैशिष्ट्य म्हणजे त्याचा अर्थ, रंग आणि भाव यामधील वैविध्य..! शब्दाचा खरा अर्थ जाणून घ्यायचा तर शब्दार्थाइतकाच भावार्थही महत्त्वाचा ठरतो. शब्दाच्या एकाच अर्थालाही विविध रंगछटा असतात.

शब्द हे मनातील भावना व्यक्त करण्याचे महत्त्वाचे माध्यम. त्यामुळे शब्द जाणीवपूर्वक,योग्य पद्धतीने आणि अचूकपणे वापरले गेले तरच त्याचे अर्थ, त्यातील भाव आणि रंगासहित योग्य रितीने ऐकणाऱ्याच्या मनापर्यंत पोचतात. एरवी वापरून वापरून गुळगुळीत झालेल्या शब्दातील रंग उडून गेल्याने व भाव विरून गेल्याने भावार्थही लयाला गेलेला असतो. आणि उरतो तो शब्दाचा सातत्याने सरसकट सरधोपटपणे झालेल्या वापरामुळे ठळक झालेला फक्त रुढार्थ! याचे अतिशय चपखल उदाहरण म्हणजे ‘ धर्म ‘ हा शब्द. धर्म हा शब्द ‘ उपासना-प्रणाली, ईश्वर प्राप्तीचे मार्ग यासाठी आकाराला आलेले प्रचलित धर्म’ या अर्थानेच सर्रास वापरला आणि  स्वीकारलाही जातो.त्यामुळे धर्म या शब्द फक्त ‘RELIGION’ या एकाच अर्थाने सर्रास गृहित धरण्यात येतो.पण ‘धर्म’या शब्दाला हाच एक अर्थ अभिप्रेत नाहीय. धर्म या शब्दाला श्रद्धा- प्रणाली, उपासना-पद्धती, ईश्वरोपासना, परमेश्वरप्राप्तीचे मार्ग, नीतिशास्त्र,व्यवहारशास्त्र, जीवनमार्ग, तत्त्वप्रणाली असे विविध अर्थरंगी पैलू आहेत.

या पार्श्वभूमीवर ‘धर्माची आराधना’ या विषयाचे विवेचन धर्म या शब्दाच्या अनुषंगाने करायचे तर या शब्दाच्या वर उल्लेख केलेल्या अर्थांपैकी कोणता अर्थ गृहीत धरणे योग्य होईल याचा विचार करायला हवा. मला स्वतःला त्यातील  ‘जीवनमार्ग’ या अर्थाच्या जवळ जाणारा ‘जीवनपद्धती’ हा अर्थ सर्वसमावेशक वाटतो.याला कारणही तसेच आहे. जीवन जगताना आपल्याला पार पाडाव्या लागणाऱ्या परस्पर वेगवेगळ्या अशा असंख्य भूमिका वठवत असताना आपला दृष्टिकोन नेमका कसा असावा हे विशद करणाऱ्या अनेक संकल्पनांना ‘धर्म’ हेच नामानिधान विचारपूर्वक जोडलेले असल्याचे लक्षात येते. उदा.- स्वभावधर्म,गृहस्थधर्म, पुत्रधर्म, मैत्रीधर्म,शेजारधर्म,सेवाधर्म राजधर्म आणि असेच अनेक.

जसा ‘धर्म’ तसाच ‘भक्ती’ हा शब्द.या शब्दाचेही विविध रंग आणि भाव ध्वनित करणारे तितकेच विविध अर्थ आहेत. भक्ती म्हणजे प्रार्थना.सेवा. उपासना. भक्ती म्हणजे नमन, पूजन,आळवणीच नाही फक्त तर अनुनय आणि मनधरणीही. निवेदन,विज्ञापन,मागणी, याचना, कळकळीने केलेली विनंती,असेही अर्थ ‘भक्ती’ या शब्दाच्या रंगछटांमधे लपलेले आहेत. यातील ‘कळकळीने केलेली विनंती ‘ या अर्थाची सावली असलेल्या प्रार्थना,नमन,पूजा इत्यादी अर्थांची नाळ थेट ईश्वराच्या आराधनेशी जोडलेली असते.

आराधना व भक्ती हे दोन्ही समानार्थी शब्द. त्यामुळे ‘आराधना’ या शब्दालाही प्रार्थना अनुनय,आळवणी,धावा हे सगळे अभिप्रेत आहेच.धर्म,भक्ती आणि आराधना या तीनही शब्दांचे हे विविध अर्थ,भावार्थ आणि त्यांचे विविधरंगी रूप लक्षात घेतले तर  ‘धर्माची व भक्तीची आराधना’   यावर ‘नेमके कसे व्यक्त व्हावे?’ हा मनात निर्माण होणारा प्रश्न कांहीसा संभ्रम निर्माण करणारा ठरतो.

दैनंदिन जीवनाच्या संदर्भात याचा विचार करायचा तर मूल्याधिष्ठित जीवनप्रणाली स्वीकारून भक्तीयुक्त अंतःकरणाने केलेली जीवनमूल्यांची आराधना हीच परमेश्वरापर्यंत तात्काळ पोचते हे लक्षात घ्यायला हवे.ईश्वर उपासनेच्या विविध प्रणालींचा अंगिकार आणि प्रसार करणाऱ्या विविध धर्मांनीही त्यांच्या शिकवणूकीमधे याच तत्वाचा स्विकार केलेला आहे. त्यामुळेच तात्त्विकदृष्ट्या विचार करायचा तर कोणताच धर्म ‘अधर्म ‘ शिकवत नाही. धर्माच्या ‘कट्टर’ अंगिकारातूनच ‘अधर्म’ जन्माला येत असतो.कोणत्याही धर्माचा धर्मतत्त्वांचे महत्त्व आणि अपरिहार्यता समजून घेऊन अंगिकार करणारेच ‘मानवधर्म’ असोशीने कृतीत उतरवू शकतात. धर्माचा असा ‘कृतिशील स्वीकार’ हीच खरी आराधना असे मला वाटते. धर्माचा कट्टर विचारांच्या अधीन होऊन अट्टाहासाने प्रचार व प्रसार करणारे त्यांच्याही नकळत आराधनेऐवजी अतिरेकाचा अंगीकार करुन स्वथर्मच भ्रष्ट करीत असतात. दैनंदिन जीवन आनंददायी करण्यासाठी मूल्याधिष्ठित भूमिकेतून धर्माचा केलेला स्विकार आणि त्यातून निर्माण होणारी प्रत्येक कृती सहृदयतेच्या  स्पर्शाने शुचिर्भूत झालेलीच असेल. तिथे अतिरेकाला थारा नसेल तर आराधनेला अभिप्रेत असलेला कळवळा असेल.

धर्म,भक्ती आणि आराधना हे तिन्ही शब्द म्हणूनच त्यांच्या विविध रंग,भाव न् अर्थासह मनोमन जपून ठेवणे अगत्याचे. हे झाले तर आपली आराधना सफल होण्यात प्रत्यवाय तो कोणता?

©️ अरविंद लिमये

दि.१४/०८/२०२१

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डालडा…भाग 1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ डालडा…भाग 1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

डालड्याचा शोध एका मराठी माणसाने लावला होता.

डालडा सगळ्यांनाच माहित आहे. एकेकाळी हे पिवळे डब्बे प्रत्येकाच्या घरात दिसायचे. साजूक तुपाचा सब्स्टिट्यूट असलेला हा डालडा–त्याचा तो डबाही मोकळा झाल्यावर भरपूर कामांसाठी उपयोगी पडायचा. तो आपल्या जेवणाशी आणि जीवनाशी एवढा जोडला गेला होता, की डालडा हा एक ब्रँड आहे आणि पदार्थाचं  नाव वनस्पती तूप आहे हे आपण विसरूनच गेलो होतो.

हो वनस्पती तूप– एकेकाळी याच वनस्पती तुपाने संपूर्ण दुसऱ्या महायुद्धात सैनिकांना जगवलं होतं. पण गंमत अशी की आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं  की हे वनस्पती तूप परदेशात शोधलं गेलंय. तर तसं  नाही. या वनस्पती तुपाचा शोध एका मराठी माणसाने लावला आहे.

नारायणराव बाळाजी भागवत हे त्या माणसाचे नाव. 

भागवत घराणे हे मूळचे पंढरपूरचे. घरात अगदी गर्भश्रीमंती होती. पण नारायणरावांचे वडील त्यांच्या वडिलांशी भांडून निराधार अवस्थेत मुंबईस आले. तिथेच हमाली वगैरे करून शिक्षण घेतलं.  मॅट्रिकच्या परीक्षेत  त्यांना मानाची  “जगन्नाथ शंकरशेठ” शिष्यवृत्ती मिळाली. आपल्या मेहनतीने शिक्षण पूर्ण करून ते वकील झाले. नंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. नंतर बाळाजी भागवत इंदोरच्या होळकर संस्थानचे दिवाण बनले.

बाळाजी भागवतांची पत्नी ही त्या काळातली, म्हणजे एकोणिसाव्या शतकातली मॅट्रिक होती, आणि इंग्रजी पुस्तके वाचणे हा तिचा छंद होता.

अशा सुशिक्षित माता-पित्यांच्या पोटी १८८६ मध्ये नारायणरावांचा जन्म झाला. नारायणराव व त्यांची भावंडे अभ्यासात हुशार होती. नारायणरावांनादेखील  आपल्या वडिलांच्याप्रमाणे “जगन्नाथ शंकरशेठ” स्कॉलरशिप मिळवायची होती. त्यासाठी ते संस्कृत भाषेचा अभ्यास फार जोमाने करत होते. पण त्यांच्याच एका आप्ताने त्यांना सांगितले, “ नारायणा, तुझी आर्थिक स्थिती उत्तम आहे, तुझे शिक्षण तुझे आई-वडील सहज करू शकतात. त्यामुळे उगीचच जगन्नाथ शंकरशेठ मिळवून तू दुस-या एका हुशार पण गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशाअभावी अडवू नकोस. आणि जो काही अभ्यास करशील तो आनंदासाठी कर, काही मिळवायचे असे ध्येय ठरवून करू नकोस. “

हा सल्ला नारायणरावांना जन्मभर मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरला. नारायणराव भागवतांनी मुंबईच्या झेवियर्स कॉलेजमधून  रसायनशास्त्रात डिग्री घेतली. याच काळात सर जमशेदजी टाटांच्या संकल्पनेतून कर्नाटकातील बेंगलोरमध्ये “ इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स ”ची स्थापना झाली होती.

भारतातील हे पहिले मूलभूत संशोधन केंद्र होते. नारायणरावांनी तिथल्या पहिल्याच बॅचमध्ये प्रवेश घेतला. रसायनशास्त्रात त्यांनी ऑईल्स आणि फॅट्स यावर संशोधन केले.

ते टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सची संशोधन पदवी पूर्ण करणारे पहिले विद्यार्थी ठरले. त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या भावाने देखील याच संस्थेत प्रवेश घेतला.

पास आउट झाल्यावर नारायणराव येमेन देशातील एडनला गेले. तिथे त्यांच्या वडिलांच्या मित्राचा,  इब्राहिमभाई लालजी यांचा, साबणाचा कारखाना होता. त्यांनी तिथे त्यांना मदत करण्यास सुरवात केली. त्यांच्याच घरात त्यांच्या मुलासारखे राहिले.

पुढे १९१९ मध्ये पत्नीचे निधन झाल्यावर ते भारतात परत आले. भारतात आल्यावर टाटा ऑईल मिल्स येथे कंपनीचे डायरेक्टर कपिलराम वकील यांचे मुख्य मदतनीस म्हणून ते नोकरी करू लागले.

क्रमशः….. 

संदर्भ : विज्ञान विशारद, लेखिका – वसुमती धुरू – ग्रंथाली प्रकाशन.

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ मोरू आणि चमत्कार ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? मोरू आणि चमत्कार !  ?

“पंत… पंत… पंत…”

“अरे मोरू, असं ओरडायला काय झालं, आग लागल्या सारखं ?”

“पंत आगच लागल्ये, पण ती न दिसणारी आहे !”

“आता हा कुठला आगीचा नवीन प्रकार मोरू ?”

“अहो माझ्या हृदयात लागलेली आग तुम्हाला कशी दिसेल ?”

“अरे आग बिग काही नाही, ऍसिडिटी झाली असेल तुला मोरू !”

“नाही हो पंत, ऍसिडिटी वगैरे काही नाही ! त्याच काय झालंय, गेल्या वेळेस तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी माझ्या बायकोकडून मिळणारे सगळे प्रोटीन्सचे डोस, निमूटपणे घेत होतो.”

“मग आता काय झाले मोरू ?”

“पंत, पण हा माझा मवाळपणा समजून, माझी ही मला हरभऱ्याचा डोस हल्ली जरा  जास्तच प्रमाणात द्यायला लागली आहे बघा !”

“मग बरंच आहे ना रे मोरू, बायको खूष तर घर पण कसं शांत शांत !”

“अहो पंत, पण त्या हरभऱ्याच्या डोसांमुळे माझा खिसा फाटायची वेळ आल्ये, त्याच काय ?”

“म्हणजे, मी नाही समजलो मोरू ?”

“अहो ही हल्ली गोड गोड बोलून, मला हरभऱ्याच्या झाडावर चढवते आणि एक एक नवीन नवीन मागण्या पदरात पाडून घेते आणि त्या  पुरवता पुरवता माझ्या खिशाला मोठ मोठी भोक पडायला लागली आहेत त्याच काय ?”

“अस्स, मग आता तू काय करायच ठरवलं आहेस मोरू ?”

“पंत, मी ही गोष्ट काल माझ्या शेजारच्या राणे काकांना सांगितली.”

“बरं, मग !”

“त्यांनी लगेच त्यांच्या ओळखीतल्या भगताला मोबाईल करून यावर उपाय विचारला.”

“मग काय उपाय सांगितला त्या भगताने ?”

“तो भगत म्हणाला, अमावस्येच्या रात्री हरभऱ्याच्या झाडाखाली उलट्या पिसाची काळी कोंबडी…..”

“मोरू, अरे तुझा या असल्या अंधश्रद्धेवर विश्वास आहे ?”

“अजिबात नाही पंत, मी पण राणे काकांना सांगितलं, की मी असला काही अघोरी प्रकार करणार नाही म्हणून.”

“हे बरं केलंस मोरू !”

“पण पंत, आमचे बोलण चालू असतांना तिथे नेमके सावंत काका येवून टपकले !”

“आणि त्या सावत्याचा आणि त्या राण्याचा छत्तीसचा आकडा, होय ना ?”

“बरोबर ! मग सावंत काकांनी पण इरेला पेटून त्यांच्या भगताला फोन लावला.”

“अरे बापरे, म्हणजे तुझी फारच पंचाईत झाली असेल ना त्या दोघांच्या मधे मोरू ?”

“हो ना पंत, पण मी तरी काय करणार होतो गप्प बसण्याशिवाय !”

“अरे पण सावंताच्या भगताने काय उपाय सांगितला यावर ?”

“तो तर जास्तच खतरनाक होता पंत !”

“म्हणजे ?”

“तो म्हणला, अमावस्येची रात्र बरोबर आहे, पण कोंबडीच्या ऐवजी एकशिंगी बोकडाचा….”

“खरच कठीण आहे या लोकांच, आपलं काम होण्यासाठी त्या निष्पाप प्राण्यांना उगाच….”

“पण पंत मी ह्या पैकी काहीच करणार नाहीये, तुम्ही निर्धास्त असा !”

“मोरू, हे बरीक चांगले करतोयस तू !”

“हे जरी खरं असलं पंत, तरी माझे खिसे आणखी फाटायच्या आधी, आता यावर उपाय काय तो तुम्हीच सांगा म्हणजे झालं !”

“तसा एक उपाय आहे माझ्या डोक्यात मोरू !”

“सांगा पंत, लवकर सांगा, लगेच करून टाकतो तो उपाय आणि ह्या त्रासा पासून सुटका करून घेतो माझी !”

“अरे जरा धीर धर, हा उपाय पण तसा सोपा नाहीये बरं. या साठी तुला कित्येक रात्री आपल्या गच्चीवर प्रतीक्षा करावी लागेल.”

“असं रहस्यमय बोलून माझी उत्कंठा आणखी वाढवू नका पंत !”

“अरे मोरू, आपल्याकडे असा एक पिढीजात समज आहे, की जर तुम्ही रात्रीच्या वेळेस एखादा तारा निखळतांना बघितलात आणि त्या वेळेस एखादी इच्छा मनांत धरलीत तर…..”

“ती नक्की पूर्ण होते, बरोबर ना पंत ?”

“म्हणजे हा उपाय तुला माहित होता मोरू ?”

“पंत, नुसता माहित होता असं नाही, तर हा उपाय पण करून झाला आहे माझा !”

“तुला कोणी सांगितला हा उपाय ?”

“पहिल्या मजल्यावरच्या चव्हाण काकांनी.”

“मग त्याचा तुला काहीच उपयोग झाला नाही मोरू ?”

“पंत त्या उपायची पण एक गंमतच झाली !”

“म्हणजे ?”

“अहो चव्हाण काकांच्या सांगण्यावरून मी सतत तिन रात्री गच्चीवर जागून काढल्यावर, चवथ्या दिवशी मला एक तारा निखळतांना दिसला.”

“बरं, मग ?”

“पंत, मी लगेच माझ्या मनांत इच्छा धरली की मला माझ्या बायकोकडून मिळणारे  हरभऱ्याचे डोस ताबडतोब बंद कर आणि चमत्कारच झाला !”

“कसला चमत्कार मोरू ?”

“अहो पंत, तो तारा पडतांना मी इच्छा मनांत धरायचाच  अवकाश, तो तारा आपल्या जागेवर परत गेला, आता बोला !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

२५-१०-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फजिती झाली…. पण…. ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

?  विविधा  ?

☆ फजिती झाली…. पण…. ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

असं म्हणतात की दर पाच कोसावर बोलीभाषा बदलते. आणि प्रत्येक भाषेला एक स्वतःचा स्व-भाव असतो. अशातच माझ्या बाबतीत “मराठीने केला मालवणी भ्रतार” अशी अवस्था! त्यामुळे लनानंतर मी अत्यंत शुद्ध(?) अशा पुणेरी मराठीतून एकदम सुद्ध मालवणी भाषेच्या प्रदेशात येऊन पडले आणि अक्षरशः धडपडले. कारण ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय म्हणजे अस्सल मालवणी माणसांशी रोजचाच संपर्क! त्यामुळे घडलेल्या फजितीचे हे किस्से! 

अगदी सुरुवातीला जेव्हा गर्भवती महिला तपासायला यायच्या तेव्हा आमच्यात घडणारे संवाद-

मी:- यापूर्वी कुठे दाखवले होते का?

रुग्णा:- हो, आमेरिक!

मी:- (आश्चर्याने तिला नखशिखांत न्याहाळत) अमेरिका? तुमचे मिस्टर तिकडे असतात का?  रुग्णा:- नाय! आमचे मिशेश(?) हडेच असत.

मी:- मग तुमचे माहेर तिकडे का?

रुग्णा:- नाय! माझा मायार दोडामार्गाक!

मी:- (हैराण होऊन) बरं बरं.. तिकडचे काही तपासणीचे कागद आहेत का? 

रुग्णा:- ह्या बघा तडेचा कार्ड( असं म्हणत आपले  प्राथमिक आरोग्य केंद्रातून दिलेले कार्ड पुढे करते)

मी:- हा हा, म्हणजे तुम्ही सरकारी दवाखान्यात तपासले होते तर…

रुग्णा:- ताच सांगलय मा मगाशी? आमेरिक म्हणून!

मग मला उलगडा झाला की आमच्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ‛आंबेरी’ नावाच्या गावात आहे. त्यामुळे आंबेरीला असे सांगताना या बायका मालवणी भाषेत ‛आंबेरीक’ असे म्हणत आणि मला तो उच्चार अमेरिकेसारखा वाटे.

असेच एकदा साधारण आठ- नऊ वर्षांच्या दोन मुली आल्या. त्यांच्या- माझ्यातील हा संवाद-

मुलगी:- आयेन आपडीची गोळी देऊक सांगलय.

मी:- (गोंधळून)  कसल्या गोळ्या?

मुलगी:- (जवळ येऊन कुजबुजत) आपडीच्या ओ…

मला तर “आपडी- थापडी गुळाची पापडी…” हा खेळच आठवू लागला.   माझ्या चेहऱ्यावरील गोंधळलेले हे भाव तिथेच बसलेल्या आणि डॉक्टर असणाऱ्या माझ्या पतीच्या लक्षात आले. त्यांनी हसत – हसत एका कागदावर काहीतरी लिहून तो कागद माझ्याकडे सरकवला. तेव्हा माझा चेहरा अगदी आरशात पाहण्यासारखा झाला होता. कारण ‛आपडी’ म्हणजे ‛मासिक पाळी’ या नवीन शब्दाची माझ्या डिक्शनरीत नव्यानेच भर पडली होती.

आता मात्र मी पूर्णपणे मालवणी भाषा अवगत केली आहे. तरीसुद्धा रुग्णांची म्हणून एक वेगळीच परिभाषा असते. त्यातलाच हा एक नमुना-

रुग्ण:- बाईनु, गेल्या खेपेक तुम्ही ‛भुनी बुंदी ‘ दिला होतास ना तेना माका एकदम बरा वाटलला. ताच द्या माका.

मी:- अरे, तुला एवढा पित्ताचा त्रास होत असताना मी कशाला तुला बुंदी देईन? आणि असलं काही मी दवाखान्यात कशाला ठेवेन?

रुग्ण:- तुमीच तर दिल्यात.तडे मेडिकलातसून घेवूक चिठ्ठी दिललास. त्याच्याबरोबर खयचो तरी गूळ पण होता.

(हे सर्व ऐकून आपण डॉक्टर नसून हलवाई आहोत की काय अशी मला शंका येऊ लागली.) तेवढ्यात त्याने आधीचे प्रिस्क्रिप्शन काढून समोर ठेवले. त्यावरची नावे बघून मी कपाळाला हात लावला व मुकाट्याने पुन्हा नवीन प्रिस्क्रिप्शन लिहायला सुरुवात केली.  कारण ती औषधे होती- भूनिंबादि काढा आणि योगराज गुग्गुळ!

 सध्या या दीड- दोन वर्षात कोविडमुळे आम्हाला  पेशंट लांबूनच तपासावे लागत आहेत. ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करताना येणाऱ्या रुग्णांची मानसिकता बघता इंजेक्शन नाही आणि प्रत्यक्ष हात लावून तपासणी नाही म्हणजे ‛डॉक्टराक फुकट पैसे देना’ असा समज! अशीच एक रुग्णा व डॉक्टर यामधील घडलेला हा प्रत्यक्ष किस्सा-

डॉ. :- काय गे, हल्ली बरी असस वाटता. बरेच दिवसांनी इलस!

त्यावर बाईचा जवाब इतका लाजवाब होता की बाकीचे रुग्ण डॉक्टरांकडे जरा वेगळ्याच नजरेने बघू लागले आणि डॉक्टरना आता धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरे असे वाटू लागले.

बाई:- काय करूचा येवून? तुम्ही काय आमका हात पन लावनास नाय काय जवळ पन घेनास नाय.

आता काय बोलणार? ! ! !

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खिलाडू वृत्ती जिथे गगनाला गवसणी घालते. ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

? इंद्रधनुष्य ? 

☆ खिलाडू वृत्ती जिथे गगनाला गवसणी घालते ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ☆ 

टोकियो ऑलिंपिकच्या पुरुषांच्या उंच उडी प्रकारातील स्पर्धा शेवटच्या टप्प्यात शिगेला पोहोचली होती…इटलीचा Gianmarco Tanberi व कतारचा Murtaz Essa Barshim हे दोघे, अटीतटीच्या प्रयत्नाने सुवर्णपदक जिंकायचेच या ईर्ष्येने जीवाची बाजी पणाला लावत होते…प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दोघांनी २.३७ मीटर उंचीचा टप्पा बरोबरीनेच कसाबसा, आटोकाट प्रयत्नांती ओलांडला होता. आता प्रत्येकाला पुढील टप्पा तीन प्रयत्नात ओलांडायचा होता…पण दोघेही तो टप्पा तीन प्रयत्नांतीही  ओलांडण्यात अपयशी ठरले. आता ही कोंडी कशी फुटणार ? मोठा गहन प्रश्न उभा ठाकला. ऑलिंपिक अधिकाऱ्यांनी दोघांना आणखी एक संधी देऊन हा पेचप्रसंग सोडवण्याचे ठरवले. पण यापूर्वीच तीन प्रयत्नादरम्यान इटलीच्या खेळाडूच्या- Gianmarco Tanberi च्या पायाला गंभीर दुखापत झाली होती व नाईलाजाने शेवटची संधी घेण्यास आपण असमर्थ असल्याचे सांगत त्याने स्पर्धेतून माघार घेतली. याचा अर्थ कतारचा खेळाडू Murtaz Barshim यास विजयी घोषित करून त्यास सुवर्णपदक दिले जाईल, याची त्याला कल्पना होती. पण त्याचा नाईलाज होता…‌आणि येथे खिलाडूवृत्तीचे विस्मयकारी दर्शन Murtaz Barshim ने दाखवले. त्याने जास्तीचा एक प्रयत्न आजमावून पाहण्याचीही गरज नव्हती. तो गप्प बसला असता तरीही त्यास सुवर्ण पदक मिळाल्याचे घोषित झाले असते. पण त्याने उमदेपणा दाखवित, “मी सुद्धा माघार घेतली तर आम्हा दोघांनाही सुवर्णपदक विभागून दिल्याचे घोषित केले जाईल का? “, अशी पृच्छा ऑलिंपिक अधिकाऱ्यांकडे केली. त्यांनी विचारविमर्श करून —

‘दोघांनाही ते पदक विभागून मिळेल ‘ असे कळवले..‌‌.कतारच्या खेळाडूने आपली पण माघारी घोषित केली व इटलीच्या खेळाडूला गगन ठेंगणे झाले ! आणि कतारच्या खेळाडूने- Murtaz Barshim नेही सुवर्णपदक न चुकवता ही सर्वोच्च कोटीची खिलाडूवृत्ती आपण दाखवू शकलो, या आनंदाने आपल्या प्रतिस्पर्ध्याला मिठी मारली !

पात्रता नसतांनाही स्वयंघोषित सन्मान मिरवणारे ‘ वीर’ कुठे आणि सन्मानाचा हव्यास न दाखवणारे हे ऑलिंपियन कुठे ? बडा जिगरा चाहिए उमदेपणासाठी !

संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पुण्य करताना पाप… ☆ संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? वाचताना वेचलेले ?

☆ पुण्य करताना पाप… ☆ संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर☆ 

पशुपक्षांना खायला, पाणी प्यायला देणे चांगलेच आहे. पण त्याने त्यांच्या नैसर्गिक सवयींमध्ये फरक पडतो. त्या विषयाची दुसरी बाजू मांडणारा हा लेख. लेखक माहीत नाही पण मते मात्र पटली.********

पुण्य करताना पाप होतंय-……महापाप…..

प्राण्यांना किंवा पक्षांना (कबुतरांना,माकडांना,पोपटांना वगैरे वगैरे) अन्न धान्य खाऊ घालणाऱ्यांच्या बातम्या पाहून आपल्यातला भाबडेपणा जागा होतो ! आणि कौतुक करतो आपण !!!!

प्रथमदर्शनी आपण स्वतःवरच खूश होतो की आपल्या मनात किती पवित्र आणि  सहानुभूतीचे विचार आहेत–

थोडी उसंत घ्या—आधी पुढचे शेवटपर्यंत वाचा :—

निसर्ग, या सर्व जीवांना आपल्या जन्मापूर्वीपासून पोसतोय;

त्यासाठी त्यांच्या आहार विहार आणि प्रयत्नवादाचे प्रोग्रामिंग त्यांच्या मेंदूत by default निसर्गाने टाकले आहे !

वन्य जीवांना आपण आपल्या आवडीचे -सोयीचे पदार्थ, आयते भरवून, त्यांच्या मेंदूतले सेटिंग नष्ट करतोय, त्यांच्या पुढील पिढ्यांना आयतं आणि अनैसर्गिक खाण्याची (ज्याने त्यांना, खाल्ल्यावर वेदना होतात बऱ्याचदा — हे सिद्ध झालंय) सवय लावतोय ! त्यामुळे ते त्यांचे नैसर्गिक अन्न मिळवण्याची क्षमता गमावतात कालांतराने ! त्यांची पिल्लेही अक्षम जन्मतात.

खंडाळा घाटातल्या माकडांना आयत्या वेफर कुरकुरे च्या सवयी आपण लावल्या;

त्यामुळे त्यांची वजने वाढली.–झाडांवरून उड्या मारताना बॅलन्स न झेपल्याने अपंगत्व आले. हाल होत तळमळत मेले शेवटी. 

त्यांच्या पिल्लांना मानवाच्या मदतीशिवाय रानावनातून अन्न मिळवण्याची कला मिळालीच नाही.

परिणामी रस्त्यावरचे भिकारी होण्यापलीकडे भवितव्य उरले नाही. 

outdated ‘ पुण्य ‘ याविषयीच्या कल्पनांनी स्वतःला सुखवण्यासाठी; आणि मुलांना मजा दाखवण्यासाठी

या वन्यजीवांच्या, नैसर्गिक जीवनचक्रात ढवळाढवळ करण्याचे ;खूप वाईट दूरगामी परिणाम त्यांच्यावर होतात-!!!—– आणि हे पाप आपल्या हातून होते !!

—आपल्याला वाटते की आपण किती चांगले काम करतोय–पण आपण त्या जीवांना एकप्रकारे अपंग ( किंवा adict) बनवतो !

आपल्या मुलांना कोणी फ्री मघे 2 पेग दिले, किंवा रोज कोणी 500 ची  नोट बक्षीस दिली तर काही दिवसात मुले बिघडतील— आणि त्यात त्यांचा दोष नसेल. 

असेच झालेय बऱ्याच ठिकाणी!!!

मग हे वन्यजीव सवयीमुळे आक्रमक–कधी हल्लेखोरही होतात–आयत्या चमचमीत अन्नासाठी!!

अष्टविनायकातल्या लेण्याद्री गणपतीच्या डोंगरावर गेलो होतो. 

विपुल वनसंपदा अजूनही आहे तिथे. तिथली माकडे छान नॉर्मल जगू शकली असती.

पण मानवाने हस्तक्षेप करून त्यांच्या सवयी बिघडवल्या !!

आता ती माकडे धाक दाखवून हातातल्या पिशव्या राजरोस लुटतात. फोपशी पण झाली आहेत-

हे पाप कोणाचे?

परदेशात वन्यजीवांना खाऊ घालण्यावर बंदी आहे. त्यामुळे तिथल्या वन्यजीवांच्या नैसर्गिक आहारात आणि जीवन पद्धतीत बदल होत नाही. पुढील पिढी निकोप निपजते.

आपल्या कबुतरांना आता घरटेही बांधता येत नाही, कारण  अनेक पिढ्यांना आपण आयते दाणे टाकले. कबुतरे इतकी वाढली की त्यांनी चिमण्यांची आणि इतर पक्षांची जागा व्यापली. म्हणजे 

इतर पक्षांवर अन्याय.

कबुतरांमुळे अस्थमा ब्रॉंकायटीस होतो हल्ली लोकांना!!!!

कबुतरखान्याजवळच्या लोकांशी बोला—आपल्या बेगडी पक्षीप्रेमापायी त्यांच्या लेकराबाळांना आपल्यामुळे मोठे आजार झाले आहेत.

दुधासाठी पाळल्या जाणाऱ्या गायीला तिच्या मालकाने तिचा आहार देणे अपेक्षित आहे.

मानवी आहाराने गायींना पोटाचे त्रास होतात-पोट फुगते- अपचन होते हे सिद्ध झाले आहे.

या सर्व जीवांना नैसर्गिकपणे जगता येईल अशी नैसर्गिक वनसंपदा जपू या- -देशी झाडांनी ती वाढवूया.

जुन्या काळातल्या ‘  पुण्य ‘ या विषयीच्या संकल्पना तपासून योग्य तिथे विधायक बदल करूयात. 

संतांनी हेच सांगितलंय !

कबुतरांना दाणे टाकणे थांबवूया….. 

तडकाफडकी प्रत्युत्तर देण्याची घाई करू नका—मीही तुमच्याइतकाच प्राणिप्रेमी आहे.

पक्षी प्राण्यांना मानवी आहाराची किंवा दानाची गरज नाही —त्यांचा अधिवास (झाडे, जंगले) राखू या. सखोल अभ्यासातून निघालेले निष्कर्ष समजावून घेतलेत तर आपल्या आवडत्या प्राणी-पक्षांसाठी ते खूप फायद्याचे आहे. 

(सदरहू विषयातील तज्ज्ञांच्या अभ्यासावर मते मांडली आहेत. त्यामुळे फॉरवर्ड करून आपले प्राणी- पक्षी प्रेम व्यक्त करा.)

 

संग्रहिका –  श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ज्याचा त्याचा  देव… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐ ज्याचा त्याचा  देव… ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? ज्याचा त्याचा देव्हारा ! ?

परवा एका उद्योजक मित्राच्या, तुम्ही बरोबर वाचलेत, उद्योजक मित्राच्या बंगल्याच्या वास्तुशांतीला जाण्याचा योग आला ! उद्योगपती मित्र असायला मी कोणी नेता थोडाच आहे ? असो ! तर त्याने दिलेले त्याच्या बंगल्याचे “ध्यान” हे नांव वाचून, खाली घसरणारी ढगळ हाप पॅन्ट, त्यातून अर्धवट बाहेर आलेला मळलेला शर्ट आणि नाकातून गळणारे मोती, असे शाळेत असतांनाचे त्याचे त्या वेळचे ध्यान डोळ्यासमोर आले आणि मी मनांतल्या मनांत हसलो ! पण पठ्याने पुढे मोठ्या मेहनतीने पैसा कमवला आणि त्याच्या बरोबर थोडं फार नांव !

बंगल्यात शिरल्या शिरल्या उजव्या हाताला एक मोठ देवघर होतं. अनेक देवादिकांच्या मोठ मोठ्या तसबीरींनी त्याची भिंत भरून गेली होती, पण माझं लक्ष वेधून घेतलं ते तिथल्या जवळ जवळ माझ्या उंचीच्या शिसवी देव्हाऱ्याने ! मित्राची आई त्या प्रचंड देव्हाऱ्या समोर आतील असंख्य देवांच्या लहान मोठ्या मूर्तिची, स्वतः एका चौरंगावर बसून पूजा करत होती ! मला थोडं आश्चर्यच वाटलं, कारण माझा मित्र पक्का नास्तिक आहे हे मला ठाऊक होतं. म्हणून तो देव्हारा बघून मी त्याला म्हटलं, “अरे तू एवढा देव देव कधी पासून करायला लागलास ?” “कोण म्हणत ?” “अरे मग हे एवढ मोठ देवघर त्यात तो भला मोठा देव्हारा, हे कशाचं लक्षण आहे ?” “तुला खोटं वाटेल, पण आजतागायत  मी आपणहून या देवघरात पाऊल ठेवून त्यांच्या पुढे कधीच हात जोडलेले नाहीत किंवा त्यांच्याकडे काहीच मागितलेले नाही ! माझा माझ्या मनगटावर पूर्ण भरोसा आहे !” “मग हे सगळं….” “आई साठी ! त्या देव्हाऱ्यात अनेक देव देवता आहेत, पण मी त्या देव्हाऱ्या समोर डोळे मिटून जेव्हा केव्हा उभा राहतो तेव्हा मला फक्त आणि फक्त त्यात माझ्या आईची मूर्ती दिसते, जिला मी मनोमन नमस्कार करतो, जी माझ्यासाठी सार काही आहे !” त्याच्या त्या उत्तराने मी अंतर्मुख झालो हे नक्की !

मध्यन्तरी बऱ्याच वर्षांनी सुट्टीत गावाला गेलो होतो. एकदा सकाळी गावातून फिरता फिरता, माझ्या लहानपणीच्या शाळेवरून जायची वेळ आली. तेवढ्यात मधल्या सुट्टीची घंटा झाली आणि सगळी चिल्ली पिल्ली आपापल्याला वर्गातून शाळेच्या अंगणात, कोणी खेळायला, कोणी डबा खायला बाहेर उधळली ! मी गेट समोर उभा राहून माझे बालपण आठवत उभा राहिलो ! आताही शाळेत डोळ्यात भरेल असा कुठलाच बदल झालेला जाणवला नाही मला ! नाही म्हणायला, शाळेच्या अंगणातलं पारावरच एक छोटंस मंदिर मला कुठे दिसेना. त्या क्षणी मला काय झालं, ते माझं मला कळलच नाही, मी बेधडक शाळेत शिरून हेडमास्टरची रूम गाठली. तर त्यांच्या त्या खुर्चीत एक चाळीशीची स्मार्ट मॅडम बसली होती.

ओळख पाळख वगैरे झाल्यावर मी त्यांना म्हटलं “माझ्या आठवणी प्रमाणे आपल्या शाळेच्या अंगणात पारावर एक छोटस मंदिर होतं, ते दिसलं नाही कुठे ?” “त्याच काय आहे ना जोशी साहेब, ते मंदिर ना मी इथे बदली होऊन आल्यावर फक्त मागच्या अंगणात शिफ्ट केलंय !” “ओके ! मॅडम, मी आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी असलो तरी मला विचारायचा तसा अधिकार नाही, पण आपल्याला एक प्रश्न विचारला तर राग नाही नां येणार ?” “अवश्य विचारा जोशी साहेब, त्यात राग कसला !” “नाही म्हणजे मला तुम्ही तसं करायच कारण कळेल का ?” “जोशी साहेब मी जेंव्हा इथे चार्ज घेतला, तेंव्हा पहिल्याच दिवशी सगळ्या शिक्षकांना सांगितलं, की मी मंदिर मागे शिफ्ट करणार आहे आणि त्या वेळेस सुद्धा आपल्याला पडलेला प्रश्नच बहुतेकानी मला विचारला !” “मग तुम्ही त्यांना काय सांगितलंत ?” “मी त्यांना म्हणाले, माझी देवावर श्रद्धा आहे पण मी अंधश्रद्ध नाही किंवा त्याचे अवडंबर पण माजवत नाही ! मला असं वाटतं की आज पासून तुम्ही आपापला वर्ग, हाच एक ‘देव्हारा’  मानून, त्यात असलेल्या प्रत्येक विद्यार्थीरुपी नाजूक, ठिसूळ दगडातून  सगळ्यांना हवी हवीशी सुबक छान, मूर्ती घडवायच अवघड काम करायच आहे ! तीच त्या प्रभूची सेवा होईल असं मला वाटतं. माझं म्हणणं त्यांना पटलं आणि त्यांनी त्या प्रमाणे वागून, कामं करून गेली सतत पाच वर्ष ‘तालुक्यातील उत्कृष्ट शाळा’ हे बक्षीस आपल्या शाळेला मिळवून दिलं आहे जोशी साहेब !” मॅडमच ते बोलणं ऐकून काय बोलावे ते मला कळेना ! मी त्यांना फक्त नमस्कार केला आणि शाळे बाहेर पडलो ! घरी जातांना, त्या चिमुकल्यांचा चिवचिवाट बराच वेळ कानावर पडत होता !

डिसेंबरचे कडाक्याच्या थंडीचे दिवस होते. कशी कुणास ठाऊक, पण पहाटे पाच वाजताच जाग आली आणि या अशा थंडीत मस्त आल्याचा, गरमा गरम चहा प्यायची इच्छा झाली ! बायकोला उठवायचं जीवावर आलं, म्हटलं बघूया स्टेशनं पर्यंत जाऊन कुठली टपरी उघडी आहे का. कपडे करून खाली उतरलो. रस्त्यावर तसा शुकशुकाट होता. एरवी भुकणारी कुत्री पण दुकानांच्या वळचणीला गप गुमान झोपली होती. लांबून एका रस्त्यावरच्या चहाच्या टपरीचा दिवा पेटलेला दिसला आणि माझा जीव जणू चहात पडला म्हणा नां ! जवळ जाऊन बघितलं तर तो सामानाची मांडा मांडच करत होता. “अरे एक कडक स्पेशल मिळेल का ?” “साहेब पाच मिनिट बसा. आत्ताच धंदा खोलतोय बघा.” मी बरं म्हणून त्याच्या टपरीच्या बाकडयावर बसलो. थोडयाच वेळात त्याने रोजच्या सवयी प्रमाणे, चहा उकळल्याचा अंदाज घेवून, तो चहा दुसऱ्या भांड्यात एका फडक्याने गाळला. आता फक्त काही क्षणांचाच अवधी आणि ते पृथ्वीवरचे अमृत माझ्या ओठी लागणार होतं ! त्याने मग दोन ग्लास घेवून एका ग्लासात पाणी ओतलं आणि एका ग्लासात चहा. ते पाहून मी आधाशा सारखा हात पुढे केला, पण त्याने माझ्याकडे सपशेल दुर्लक्ष करून, ते दोन ग्लास आपल्या हातात घेतले आणि मेन रोड वर जाऊन काहीतरी मंत्र म्हणून, पहिल्यांदा पाण्याचा आणि नंतर चहाचा ग्लास असे दोन्ही रस्त्यावर ओतले ! मला काहीच कळेना ! इथे त्याच पहिल बोहनीच गिऱ्हाईक चहासाठी तळमळतय आणि त्याने तो चहाचा पहिला ग्लास चक्क रस्त्यावर ओतला ! मी काही विचारायच्या आतच त्याने दुसरा चहाचा ग्लास भरून माझ्या पुढे केला. मी चहा पिता पिता त्याला म्हटलं  “अरे तो ताजा चहा आणि पाणी रस्त्यावर कशाला टाकलंस?” “साहेब मी रोजचा पहिला चहा देवाला अर्पण करतो बघा !” “देवाला ? अरे पण मला त्या मेन रोडवर तुझा कुठला मुदलातला ‘देव्हाराच’ दिसत  नाही आणि तुला त्यातला देव दिसून त्याला तू तुझा पहिला चहा अर्पण पण केलास ! खरच कमाल आहे तुझी !” “साहेब कमाल वगैरे काही नाही. माझ्या बापाने सुरु केलेली ही टपरी आता मी चालवतोय, पण त्याने शिकवल्या प्रमाणे हा रोजचा रीती रिवाज मी न चुकता पाळतोय बघा ! साहेब शेवटी देव सगळीकडे असतो असं म्हणतातच नां ? प्रश्न फक्त श्रद्धेचा असतो, खरं का नाही ?” त्याच्या या प्रश्नावर मी फक्त हसून मान डोलावली आणि त्याला पैसे देऊन सकाळी सकाळी मिळालेल्या सुविचाराचा विचार करत घरचा रस्ता पकडला !

मंडळी, शेवटी कोणाचा ‘देव्हारा’ कुठे असेल आणि त्यात तो किंवा ती कुठल्या देव देवतांची पूजा अर्चा करत असतील, हे सांगणे तसे कठीणच ! शेवटी, तो चहावाला मला म्हणाला तसं, प्रश्न शेवटी श्रद्धेचा असतो, हेच त्रिकाल बाधित सत्य, नाही का ?

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी…भाग 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी…भाग 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे☆

@doctorforbeggars

( पण कुणाचं ऐकेल तो मी कसला ? ) इथून पुढे —-

मी तिचं ऐकायचो नाही….. 

मी तिला ‘ ए म्हातारेच ‘ म्हणायचो आणि मग ती तोंडाचा पट्टा सुरु करायची, तोंडातून शिव्या यायच्या, मला मस्त गंमत वाटायची..  

वर  अजून म्हणायचो , ‘म्हातारीच तर आहेस…. तुला काय ताई म्हणायचं गं ?’  यावर  चिडून ती चप्पल दाखवायची….

लोक फूटपाथवर राहणाऱ्या या दोघांना शर्ट-पॅंट, साड्या, पैसे असं बरंच काही द्यायचे…. 

दर भाऊबीज आणि रक्षाबंधनाला मात्र मला ती बोलावून घ्यायची आणि ओवाळून झाल्यानंतर तिला भिकेमध्ये  मिळालेल्या शर्ट, पॅन्ट, बूट अशा अनेक वस्तू मला भेट म्हणून द्यायची….

बोचक्यातले शर्ट काढून मला ते होतील की नाही, हे ती  माझ्या अंगाला लावून बघायची….  

तिला मिळालेले फाटके बूट….. त्यातल्या त्यात चांगले निवडून ती मला द्यायची आणि  घालून बघ म्हणून आग्रह करायची…. 

“ होतील गं, दे मी घालतो “ असं म्हणून,  गुपचूप मी त्या  गोष्टी घ्यायचो…. 

“ व्वा…मला असाच शर्ट हवा होता “ असं मी तिला म्हणालो की तिचा चेहरा उजळून जायचा….

“ मला असाच बूट हवा होता आणि नेमका आज तू तसाच दिलास “  म्हटलं की तिला आभाळ ठेंगणं व्हायचं…. 

भीक म्हणून तिला मिळालेल्या गोष्टी ती मला द्यायची आणि मी त्या वस्तू बहिणीने दिल्या आहेत म्हणून सांभाळून ठेवायचो ….

“ शर्ट आणि बूट घाल बरं का….. न्हायी बसला तर फूडल्या बारीला दुसरा देते “  हे पण ती आठवणीने सांगायची… 

अशा प्रेमानं मिळालेल्या अनेक गोष्टींचा मी संग्रह केला आहे…. 

ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी इतिहासात अशा वस्तूंची  संग्रहालयं उभारली….

आठवणीसाठी स्मारकं बांधली…

खूप नंतर कळलं….. स्मारक बांधायला आणि संग्रहालय उभं करायला पैसा लागतच नाही….

स्मारक तयार करायचं असतं मनात आणि संग्रहालय उभं करायचं असतं हृदयात….! 

मिळालेल्या वस्तूला किंमत असेलही, नसेलही, देणाऱ्याच्या भावनेला मात्र मोल नसतं…

भावनांचं हे स्मारक बांधून उरात घेऊन मिरवायचं असतं…! 

तू डॉक्टर- मी अडाणी, तू जरा बऱ्या घरातला- मी रस्त्यावर राहणारी, असा काही भेद-भाव ती माझ्या बाबतीत करत नसे….

तिला मी म्हणजे तिच्या कुटुंबाचाच  एक भाग वाटतो.. 

ती तिच्यात आणि माझ्यात काहीही फरक करत नाही….

ती मला तिच्याचसारखा समजते…. तिने मला तिच्याचसारखं समजणं, हा मी माझा विजय मानतो !

मी म्हणजे तूच आहे आणि तू म्हणजे मीच आहे, हे ती समजत होती, आणि मी अनुभवत होतो…

“अद्वैत” ही संकल्पना नुसती वाचली होती… तिच्यामुळे मला अनुभवायला मिळाली

लोक बाहेर सर म्हणतात, ही मला मुडद्या म्हणते…

एरव्ही,’ आपणास कधी वेळ असतो ?  कधी आपणास फोन करू ? ‘ लोकांचे असे नम्रतेने मेसेज येतात…

ती मात्र बेधडक रात्री बारा वाजता फोन करते, ‘ मुडद्या मेलास का जिवंत हायेस ?  भयनीची काय आटवण हाय का नाय ?’ म्हणत ठेवणीतल्या शिव्या देते…. 

मी हसत तिला म्हणतो, “ बहीण कसली तू तर कैदाशीन आहेस, हडळ आहेस  म्हातारे …” 

मग काय …. यानंतर आणखी स्पेशल शिव्या सुरू होतात आणि मी तिने उधळलेल्या या फुलांच्या सुगंधाचा आस्वाद घेतो…. 

त्यात बहिणीच्या मायेचा आस्वाद असतो…. ! 

वजन फुलाचं होत असेलही…. सुगंधाचं करता येत नाही….

अगरबत्ती किलोत मोजत असतील सुद्धा, परंतु त्या अगरबत्तीपासून निघालेल्या सुगंधी वलयाचं वजन कशात करावं मी ….? 

ती तशीच होती– काटेरी फणसासारखी… ! 

बहीण म्हणून ती करत असलेली “माया” मोजायला माझ्याकडे कोणताही तराजू नाही…. 

तिला छत टाकून तात्पुरता निवारा करून दिला होता,  त्या झोपड्याला तिने घर म्हणून रूप दिलं होतं. मी त्यात जगण्यासाठी आवश्यक अशा सर्व वस्तू तिला घेऊन दिल्या होत्या.

लोक भीक देत होते, त्यात तिची गुजराण होत होती. परंतू  माझी बहीण भीक मागून जगत आहे, हा माझा अपमान होता…

आणि म्हणून त्या दोघांनी काहीतरी व्यवसाय करावा अशी माझी इच्छा होती…. 

क्रमशः….

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पत्त्यांची गंमत ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ? 

☆ पत्त्यांची गंमत  ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुठ्ठ्याचे  किंवा प्लास्टिकचे बनविलेले असतात. बदाम, इस्पिक, किल्वर आणि चौकट,  या चार प्रकारात प्रत्येकी १३ पत्ते मिळून ५२ पत्त्यांचा संच होतो.

पत्त्यांची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दश्शी पर्यन्त, मग गुलाम, राणी, राजा, आणि  याशिवाय 2 जोकर असतात.

१) ५२ पत्ते म्हणजे ५२ आठवडे

2) ४ प्रकारचे पत्ते म्हणजे ४ ऋतु.  प्रत्येक ऋतूचे १३ आठवडे.

3) या सर्व पत्त्याची बेरीज ३६४ 

४) एक जोकर धरला तर ३६५ म्हणजे १ वर्ष.

५) 2 जोकर धरले तर ३६६ म्हणजे लीप वर्ष.

६) ५२ पत्यातील १२ चित्रपत्ते म्हणजे १२ महिने

७) लाल आणि काळा रंग म्हणजे दिवस आणि रात्र.

पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ

१) दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश

2) तिर्री म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश

3) चौकी म्हणजे चार वेद ( ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद,आणि अथर्ववेद, )

४) पंजी म्हणजे  पंच प्राण (प्राण, अपान, व्यान, उदान ,समान)

५) छक्की म्हणजे षड्रिपु (काम ,क्रोध,मद,मोह, मत्सर,लोभ)

६) सत्ती- सात सागर

७) अठ्ठी – आठ सिद्धी

८) नववी- नऊ ग्रह

९) दश्शी – दहा इंद्रिये

१०) गुलाम- मनातील वासना

११) राणी- माया

१२) राजा-सर्वांचा शासक

१३) एक्का- मनुष्याचा विवेक

१४) समोरचा भिडू – प्रारब्ध

पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते!!!

 

 संग्राहक : — सुहास सोहोनी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सद्गुरू कृपा म्हणजे काय ? ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ सदगुरु कृपा म्हणजे काय☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

पैसा- गाडी- बंगला म्हणजे सदगुरु कृपा नव्हे…

 

आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात–

ते टळलेले संकट म्हणजे सदगुरु कृपा..!!

 

गाडीवरून जाताना कुणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो–

ते सावरणे म्हणजे सदगुरु कृपा..!!

 

एकवेळचे जेवणाचे वांधे असताना मिळालेले दोन वेळचे  पोटभर जेवण म्हणजे सदगुरु कृपा..!!

 

कोसळलेल्या दुःखरुपी डोंगराला पेलण्याची जी ताकत आपल्यात निर्माण होते, ती ताकत म्हणजे सदगुरु कृपा..!!

 

‘आता सर्व संपलं ‘ असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते —ती उमेद म्हणजे सदगुरु कृपा..!!

 

अडचणीमध्ये सर्वजण  साथ सोडून गेले असता, ” तू लढ.. आम्ही आहोत सोबत ” हे गुरुबंधूचे शब्द म्हणजे सदगुरु कृपा..!!

 

प्रसिद्धीच्या शिखरावर असतांना तेथूनच हवेत न उडता पाय जमिनीवर ठेवणे, म्हणजे सदगुरु कृपा..!!

 

पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे सद्गुरू कृपा नव्हे ते काहीही नसतानासुद्धा आयुष्यात असलेले ‘समाधान ‘ म्हणजे सदगुरु कृपा..!!

 

।।जय सदगुरु।।

 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares