मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रणरागिणी संजुक्ता पराशर ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ रणरागिणी संजुक्ता पराशर ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

हातात एके 47 घेऊन घनदाट जंगलात शिरल्यावर तब्बल 16 अतिरेक्यांना यम सदनाला पाठवून आणखी 64 अतिरेक्यांना अटक करणाऱ्या संजूक्ता पराशरची कहाणी स्वतःला अबला समजणाऱ्या देशातील प्रत्येक स्त्रीला माहिती व्हायला पाहिजे। 

दिसायला गोरीपान आणि सुंदर अशी संजूक्ता जर कधी आपल्या समोरून गेली तर तिच्या अफाट कर्तृत्वाची आपण कल्पनाही करू शकणार नाही। एक सामान्य स्त्री लाखो सामान्य पुरुषांनाही जमणार नाही असं काम करते तेव्हा तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे सोशल मीडियावर गायले जायला हवेत, पण आम्हाला राजकारण आणि जात, धर्मापलीकडेहि आणखी दुनिया आहे हेच मान्य नसतं। त्यामुळे संजूक्ता पराशरच्या फेसबुक पेजला लाखभरहि लाईक मिळत नाहीत आणि राजकारणी, सिनेनट मात्र करोडोंनी लाईक मिळवतात। 

आसाम सारख्या मागासलेल्या राज्यात शाळेत शिकून नंतर दिल्लीच्या जेएनयु मधून डिग्री घेणारी संजूक्ता 2006 मध्ये आयपीएस देशात 85 क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली। युएस फॉरेन पॉलिसी विषयात तीने पीएचडी केल्यामुळे ती डॉक्टर संजूक्ता पराशर म्हणून ओळखली जाते। तिचं लग्न झालं तेही आयएएस अधिकारी पुरू गुप्तांशी। त्यांना 6 वर्षाचा मुलगा आहे। संजूक्ताची आई त्याला सांभाळते। 

संजूक्ताची पोस्टिंग 2014 मध्ये आसाम मधील सोनीतपुर जिल्ह्यात सुप्रिंटेंडंट ऑफ  पोलीस म्हणून झाली आणि अग्निदिव्य म्हणजे काय ह्याची प्रचिती तिला रोजच घ्यावी लागली। बोडो अतिरेक्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता। शेकडो लोकांचे बळी गेले होते। आसामच्या घनदाट जंगलात शिरून त्यांच्याशी मुकाबला करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण। हातात एके 47 घेऊन संजूक्ता सीआरपीएफ च्या जवानांना घेऊन जेव्हा घनदाट जंगलात शिरायची तेव्हा जवानानाही दहा हत्तीचं बळ मिळायचं। अनेक मोहिमा यशस्वी झाल्यामुळे अतिरिकेही संजूक्ताच्या नावाने कापू लागले होते। तिला पत्राद्वारे आणि फोनद्वारे धमक्या येऊ लागल्या होत्या। परंतु शिर तळ हातावर घेऊन फिरणाऱ्या संजूक्तावर कसलाच परिणाम झाला नाही। तब्बल 16 अतिरेकी मारले गेले आणि 64 अटक झाले, तेही तिच्या अवघ्या 18 महिन्यांच्या कारकीर्दीमध्ये। 

आज संजूक्ता पराशर दिल्ली मध्ये कार्यरत आहे। देशातील दहशतवाद पूर्णपणे निपटून काढणं हेच तिचं ध्येय आहे। अशा ह्या खऱ्या खुऱ्या रणरागिणीच्या अफाट कर्तुत्वाला आपण सर्वानीच मानाचा मुजरा करायला हवा। सलाम करायला हवा!

#I_Salute_Sanjukta_Parashar

(सुवर्णमेघ या फेसबुकपेज वरुन साभार)

 

संग्राहक : सुनीत मुळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मनाचे संतुलन…. ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ मनाचे संतुलन…. ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

-अब्राहम लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा संसदेत भाषण करण्यासाठी गेले. सर्व सिनेट सदस्यांनी भरलेल्या सभागृहात त्यांना आपलं अध्यक्ष म्हणून पहिलं भाषण करायचं होतं. त्या भरलेल्या सभागृहात लिंकन पोहोचले आणि भाषण सुरु करण्यापूर्वी एक जेष्ठ सदस्य, जे अत्यंत श्रीमंत उद्योगपती होते, ते उठून उभे राहिले आणि लिंकनना उद्देशून म्हणाले, ” मि. लिंकन, तुम्ही हे विसरू नका की तुमचे वडील माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी बूट बनवत होते.”

सगळे उपस्थित जोरात हसले आणि त्यांना वाटलं की याने लिंकन यांना एक जोरदार चपराक लावली आहे, आणि त्यांची लायकी दाखवली आहे.

मात्र काही व्यक्ती कशाच्या बनलेल्या असतात कोणास ठाऊक? ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनाचं संतुलन ढळू देत नाहीत आणि आपल्या हजरजबाबी विद्वत्तेने समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करून आपला मोठेपणा सिद्ध करतात, तेही अगदी शांतपणे—– लिंकन ही असेच !!

—-सभागृह काय होणार याकडे जिवाचा कान आणि डोळ्यात जीव आणून पहात होतं.

प्रेसिडेंट लिंकन यांनी सरळ सरळ त्या व्यक्तीवर नजर रोखून धरली , आणि त्याला म्हणाले,

“सर, मला माहित आहे हे, की माझे वडील आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी बूट बनवत होते.  तसेच इथे अनेक इतरही सदस्य आहेत की ज्यांच्या कुटुंबासाठी माझे वडील बूट बनवत होते, कारण त्यांच्यासारखी पादत्राणे इतर कोणीच बनवू शकत नव्हतं.”

—“ते एक कलाकार होते, ते एक निर्माते होते, त्यांच्या हातात जादू आणि कला होती.  त्यांनी बनवलेल्या चप्पल-बूट फक्त ह्या फक्त चपला आणि बूट नव्हते, आपलं संपूर्ण मन आणि कसब  त्यात ओतून अत्यंत काळजीपूर्वक हे काम ते करत होते. मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे, तुम्हाला या पादत्राणाविषयी काही तक्रार आहे काय? कारण हे कसब मलाही अवगत आहे की हे बूट कसे बनवायचे. आपली काही तक्रार असेल तर नक्की सांगा.  मी आपल्याला एक नवीन बुटांचा जोड बनवून देईन– पण माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत माझ्या पिताजींनी बनवलेल्या बुटांविषयी अजून तरी कोणाची काहीच तक्रार आलेली नाही. ते एक अत्यंत हुशार आणि मनस्वी कलाकार आणि कारागीर होते आणि माझ्या वडिलांचा मला आजही सार्थ अभिमान आहे !!!”

—-सर्व सभागृह बधिर झालं होतं, कोणाला काय बोलावं हे सुचत नव्हतं. अब्राहम लिंकन ही काय व्यक्ती आहे याची एक छोटीशी झलक आणि चुणूक या प्रसंगातून सगळ्यांना दिसली होती आणि त्यांना त्यांच्या वडिलांचा अभिमान असल्याचा आता त्यांनाही अभिमान वाटू लागला होता.

यातून एकच गोष्ट लक्षात घ्या, प्रसंग कसाही असो, आपला तोल जावू देवू नका.

कोणी आपला कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या. 

 ” आपल्या स्वतःच्या परवानगी शिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही ” –हे वाक्य मनावर कोरून ठेवा.

आणि— कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मन:शांती ढळू देवू नका.

“काय घडलंय यामुळे आपण दुखावले जात नसतो— तर घडलेल्या गोष्टीला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे दुखावले जाण्याची शक्यता असते..!!

चला खंबीर मनाने प्रतिकूल परिस्थिती बदलण्यासाठी सज्ज होऊया… # Calm # मनशांती

 

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिवाळीची सांगता… ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  विविधा ?

☆ दिवाळीची सांगता… ☆ सौ राधिका भांडारकर  

चार दिवसांची दिवाळी.धामधूमीत आली आणि गेलीही.

खप्पून ,पूर्वतयारी करून केलेले फराळाचे भरले डबे तळाशी गेले.रांगोळीतले रंग भुरकटले .तेलवातीत भिजलेल्या पणत्या गोळा करून ठेवल्या. काही दिवसांनी आकाश कंदीलही उतरवले जातील.ईलेक्ट्रीकच्या माळा गुंडाळून पुढच्या दिवाळीपर्यंत नीटनेटक्या कपाटात ठेवल्या गेल्या.

अंगणातला फटाक्यांचा ,धूम्मस वास असलेला कचराही गोळा करुन झाला..

गॅलरीतल्या एका टाईलवर सारवलेला गेरु मात्र होता.

कसा रिकामा ,रंगहीन दिसत होता.सकाळी झाडपूस करणारी बाई मला विचारत होती,”अव ताई पुसु का आता हे तांबड..?लई वंगाळ दिसतय्…”

मी म्हटलं,”पुस बाई..झाली आता दिवाळी….”

करोना,सुरक्षित अंतर,भयभीत मने या सगळ्या पार्श्वभूमीवरही प्रत्येकाने आपापली दिवाळी साजरी केलीच.अंधारावर मात करणारा प्रकाशाचाच सण …

धाग्यांच्या गुंतागुंतीत एखादा कलाबुतीचा तार कसा चमकून जातो ना …तशीच या दिवाळीनं चमक आणली…

चार दिवसांचे चार सोहळे..गायीला घास भरवला,धनाची पूजा केली,लक्ष्मीलाही पूजलं,रूपकात्मक नरकासुराचाही वध केला,ईडा पीडा टळो,बळीचं राज येवो,असा गजर केला,सहजीवनाची आनंद औक्षणे केली, आनलाईन भाऊबीजही साजरी केली..तेल ऊटणे सुगंधी साबणांनी स्नानं ऊरकली… रांगोळ्यांनी दार सजले.

फुलांच्या तोरणांनी चौकट नटली..कोपरा न् कोपरा प्रकाशानं ऊजळवला…झुमवर सगळं गणगोत गोळा झालं..व्हर्चुअल फराळ .व्हर्चुअल फटाके…शुभेच्छा ,आशिर्वाद. सगळं सगळं आॅनलाईन…

कसं असतं ना ,मनुष्यप्रवृत्ती मूळातच आनंद साजरा करणारी असते.भले आनंदाची माध्यमे बदलोत पण हेतु नाही बदलत…दिवाळी हा तर आनंदाचा, प्रकाशाचा,
स्नेहबंधनाचा ,स्नेहवर्धनाचा सण!!

शिवाय या सणांत निसर्ग,देवदेवता ,पशुपक्षी झाडंपानं सार्‍यांचं संवर्धन असतं…आपल्या संस्कृतीत केरसुणीलाही लक्ष्मी मानून तिचीही पूजा केली जाते.

यामागचा संदर्भ खूप अर्थपूर्ण आहे…चराचरात लहान थोर असं काही नसतं…मनातली विषमता दूर करुन सार्‍यांना सामावून घ्यायचं असतं… एका वातीनं दुसरी वात पेटते म्हणूनच तेलाचा दिवा पूजनीय…

मनातल्याच आसुरांचा संहार करायचा…नको लोभ,नको स्वार्थ..नको हिंसा नको असत्य…नको द्वेष नको मत्सर..असुया…वृद्धी प्रेमाची ,स्नेहाची..परोपकाराची व्हावी..
दिवाळी म्हणून साजरी करायची…

दिवाळी आली,संपली पण जाताना याच जाणीवा देऊन पुन्हा येण्यासाठीच परतली…

कवीवर्य ना.धो.महानोर परवा म्हणाले,

“मोडलेल्या माणसांचे..

दु:ख ओले झेलताना..

त्या अनाथांच्या ऊशाला..

दीप लावू झोपतांना..।।

दिवाळीची सांगता करताना याच ओळी सोबत रहाव्यात…

शूभ दीपावली!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गाणं नेमकं कसं सुचतं?….गुरू ठाकूर ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

☆ मनमंजुषेतून ☆ गाणं नेमकं कसं सुचतं?….गुरू ठाकूर ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

2019 ची कोजागरी पौर्णिमा मला आजही आठवते.तारीख होती 13 October 2019 कोजागिरी निमित्त मी आणि राहुल रानडे “मैफिल शब्द सुरांची ” हा कार्यक्रम दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात  करत होतो. गाणं सुचण्याची प्रक्रिया आणि त्याला चाल लावण्याची प्रक्रिया यावर चर्चा झाल्यानंतर राहुल रसिकप्रेक्षकांना  म्हणाला , ” आपण आता गाणं नेमकं कसं सुचतं याचं प्रात्यक्षिकच पाहू, म्हणजे तुम्ही एक विषय आणि शब्द गुरूला द्यायचे आणि तो इथल्या इथे तुम्हाला गाणं लिहून दाखवेल” . रसिक अर्थातच उत्साही. त्यांनी विषय निवडला रोमॅण्टिक साँग..  दिलेल्या शब्दात  मुक्त छंदात कविता लिहिणे सोपे पण गाणे ते देखीलछंद आणि वृत्त सांभाळून  कारण पुढे राहुल त्याला चाल ही लावतो त्या मुळे  धुवपद म्हणजे मुखडा आणि शिवाय एक कडवे असं गाणं बसवणं म्हणजे सत्वपरीक्षा . तरीदेखील रोमॅंटिक सॉंग आहे म्हटल्यावर होईल असा एक विचार डोक्यात आला  तेवढ्यात प्रेक्षकातून कोणीतरी म्हणालं की आज कोजागिरी आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला जे शब्द देऊ त्यात कोजागिरीच्या रात्रीचे रोमांटिक सॉंग लिहा. इथे माझ्या पोटात गोळा आला. कारण या सगळ्या करता वेळ जास्तीत जास्त दहा मिनिटांची असते.

यावर मी काही बोलण्या आधीच राहुल म्हणाला , “हो हरकत नाही सांगा शब्द.” आणि मग रसिकांकडून शब्द येऊ लागले. आणि माझ्या लक्षात आले की रसिक हे खरेच मराठी रसिक आहेत. त्यांनी दिलेले शब्द आशय विषयाला धरुन आणि गेय होते. ते असे होते..

मिठी ,चांदणे, स्पर्श, हुरहूर, कोजागिरी,सूर,

 डोळे, मधुरात्र, सागराची गाज, ओढ,रात्र,

मी शब्द कागदावर उतरवता उतरवता डोक्यात त्यांची जुळवाजुळव करत होतो.. इतक्यात कोणीतरी म्हणाला फितूर.. आणि मला नाहीच सापडणार असं वाटता वाटता सेलोटेपचं टोक सापडावं तसं गाणं सापडलं..  अतिशय अवघड वाटणारा पेपर त्यादिवशी पाच मिनिटातच सोडवून झाला..हेच ते गाणं——  

                              फितुर डोळे गुंतता ,

                                                मधुरात्र झाली बावरी 

                              ये मिठीतच होऊ दे 

                                                साजरी कोजागिरी —-

                              कोवळी हुरहूर आहे 

                                                 स्पर्शवेडा सूर आहे 

                              या रुपेरीशा घडीला 

                                                 प्रीतीचे काहूर आहे —-

                              वाजू दे प्राणात 

                                                  आता मिलनाची पावरी 

                              ये मिठीतच होऊ दे 

                                                   साजरी कोजागिरी —–

— गुरू ठाकूर

संग्राहक :- सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सहस्रचंद्रदर्शन शांती ☆ संग्राहक – श्री अशोक काका कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ सहस्रचंद्रदर्शन शांती ☆ संग्राहक – श्री अशोक काका कुलकर्णी ☆

वयाच्या ५० व्या वर्षापासून प्राचीन काळी वेगवेगळ्या शांती सांगितल्या आहेत.

त्या म्हणजे,—–

५० व्या वर्षी वैष्णव शांती, 

५५ व्या वर्षी वारुणी शांती,

६० व्या वर्षी उग्ररथ शांती, 

६५ व्या वर्षी मृत्युंजय महारथी शांती, 

७० व्या वर्षी भौमरथी शांती,

७५ व्या वर्षी ऐन्द्री शांती, 

८० व्या वर्षी सहस्त्र चंद्र दर्शन शांती,

85 व्या वर्षी रौद्री शांती, 

९० व्या वर्षी कालस्वरूप शांती,

९५ व्या वर्षी त्र्यंबक मृत्युंजय शांती 

आणि १०० व्या वर्षी त्र्यंबक महामृत्युंजय शांती. 

सहस्त्र चंद्र दर्शन म्हणजे त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात १००० वेळा पूर्ण चंद्र पहिला आहे. किंवा त्याच्या आयुष्यात १००० वेळा पौर्णिमा येऊन गेल्या. इतके सार्थ आयुष्य खूप कमी लोक जगतात म्हणूनच हे विशेष आहे. आपली मराठी कालगणना चान्द्रवर्षीय आहे म्हणून १००० चंद्र पाहण्याचा सोहळा केला जातो. हे मोजायची पण पद्धत आहे.

ती अशी –

८० वर्षात १२ x ८० म्हणजे ९६०, त्यात २७ अधिक महिने येतात म्हणजे ९६० + २७ = ९८७. म्हणजे ८० वर्षात १००० चंद्र पहिले जात नाही म्हणून ८१ वर्ष पूर्ण झाल्यावर येणाऱ्या १००० व्या पौर्णिमेला हा दिवस साजरा करतात. ह्या मध्ये काही ज्योतिष्यांच्या मते ३२ अधिक मास येतात म्हणून ८१ व्या वर्षातील ८ व्या महिन्यात सहस्त्र चंद्र पूर्ण होतात. पुन्हा ह्यामध्ये खग्रास चंद्र ग्रहण पण जमेस धरावे लागते. यावर शौनक ऋषिच्या विवेचनाच्या आधारे “वयोवस्थाभीधशांतीसमुच्चय:” ह्या पुस्तकात धर्मशास्त्र कोविद श्री नारायण शास्त्री जोशी, यांनी दिले आहे. त्यांच्या मते दरवर्षी सुमारे १२ अशी ७९ वर्षात ९४८ चंद्र दर्शने आणि खग्रास चंद्रग्रहणा नंतर नव्याने होणारे चंद्रदर्शन व असे २४ चंद्रदर्शन एव्हडे मिळून ९४८ + २८ + २४ = १००० चंद्रदर्शन होतात. ८० व्या वर्षानंतर ८ व्या महिन्यात केलेला विधी हा सौर कालगणनेनुसार असतो. म्हणजे वैखानस गृह्य सूत्रानुसार रविवर्षेण असते. शांती साठी देवता आणि हवन सामग्री पण ठरलेली आहे. सहस्त्र चंद्र दर्शनाला देवता आहे चंद्र आणि हवन सामग्री आहे आज्य. ह्या शान्तींच्या वेळी देवतेला हवन अर्पून त्या व्यक्तीच्या आयुरारोग्यासाठी प्रार्थना केली जाते. त्यायोगे त्या व्यक्तीचे पुढील आयुष्य सुखात जाते.

सामान्यत: एकसष्ठी, पंचाहत्तरी आणि ८१ वर्षानंतर अशा शान्त्या केल्या जातात. आता सहस्त्रचंद्र दर्शनच का सूर्य दर्शन का नाही? तर “चंद्रमा मनसो जात:”– म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे. मला वाटते साठीनंतरच वयस्क लोकांना आपण उपयोगाचे नाही, आपली सद्दी संपली, आपल्याला अडगळीत टाकतील, कोणी विचारणार नाही अशा अनेक शंका घेरून टाकतात. ऐंशी वर्षे म्हणजे फारच जास्त होतात, त्यांचीच मुले साठीला येतात. कधी – कधी जोडीदार पण साथ सोडून जातो. अशा वेळी घरातल्याच लोकांनी त्यांचे मन जाणून घेऊन ते अजून आम्हाला हवे आहेत असे एक सुंदरसा घरगुती का होईना कार्यक्रम करून त्यांना तसे वाटू दिले, त्यांना कपडे किंवा चष्मा, कवळी, चांगली पुस्तके, एखादा छोटासा टीव्ही अशी भेट देऊन, सहस्त्र दिव्यांनी ओवाळले तर त्यांना किती बरे वाटते. आपण अजून हवे आहोत ही भावनाच किती चांगली आहे. म्हणून सहस्त्रचंद्र दर्शन विधी असावा. आता होम करायचा कारण उत्सव मूर्ती ऐंशी वर्षे तंदुरुस्त का राहिली म्हणून कोणी नजर पण लावेल, सगळ्यांच्या नजरा चांगल्या असतात असे नाही. म्हणून होम करून सगळी अरिष्टे दूर करायची.

संग्राहक – श्री अशोककाका कुलकर्णी   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ श्वानपुराण….. ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ श्वानपुराण….. ☆ सौ  ज्योती विलास जोशी 

बालवाडीतल्या माझ्या भावाची फी द्यायची म्हणून शिशु वर्गाची पायरी चढले,आणि पायरीवर पायरीगत दिसणाऱ्या कुत्र्यावर माझा पाय पडला.लगेच ‘सॉरी’ म्हटलं मी त्याला पण कुत्रचं ते… ‘जशास तसे’ या उक्तीनुसार ते चावलं मला अन् मी केकाटले. माझी जीवघेणी किंकाळी ऐकून शिरोळे गुरुजी धोतराचा सोगा सावरत बाहेर आले.मला एक जोरदार शिवी हासडून म्हणाले,” तू त्याच्यावरचं कशाला पाय ठेवलीस? पायरी नव्हती तुला पाय ठेवायला?त्याच्या का नादी लागलीस? गप पडलं होतं ना ते?” गुरुजी कुत्र्याची वकिली करत होते. कुत्र्याची खोडी काढायला, त्याचा नाद करायला मी निर्बुद्ध का आहे? पण गुरुजींच्या नादी कोण लागणार?माझ्या हातातले फीचे पैसे काढून घेऊन,”चल हेड बाईकडं..असं म्हणून माझा रट्टा धरून शिरोळे गुरुजींनी मला हेड बाईच्या पुढ्यात उभं केलं. हेडबाईच्या सांगण्यावरून त्यांनी मला माझ्या घरी पोहोचवलं.

कुत्रा चावल्यानं सरकारी हॉस्पिटल मध्ये माझ्या पोटांनं चौदा दिवस इंजेक्शनचा त्रास सोसला. मला कुत्रा चावल्याची बातमी पेपरमध्ये कदाचित येईल या आशेवर मी होते आणि पेपर चाळत होते.”अगं कुत्रा तुला चावला तर ती बातमी होऊ शकत नाही. याउलट तू कुत्र्याला चावली असतीस तर ती बातमी झाली असती” असं बाबा म्हटल्याचं आठवतं मला.

कुत्रा हा बातमीचा विषय नसून जिव्हाळ्याचा विषय आहे.हे माझ्या लक्षात आलं पण जेव्हापासून तो मला चावला तेव्हापासून कुत्र म्हटलं की मी नखशिखांत हादरते.तो माझा वीक पॉइंट झाला आहे. लहानपणी ‘हाथी मेरे साथी’ दोन-चारदा पाहिला…..प्रत्येक वेळी नव्याने पाहतो असा पाहिला…. प्रत्येक वेळी तेवढ्याच संवेदनशीलतेने रडून थिएटर डोक्यावर ही घेतलं.माझं मुसूमुसू रडं पाहून इतरेजन खुसूखुसू हसायचे, पण….. कुत्र्याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तेरी मेहरबानियाॅ’ या सिनेमाच्या पोस्टरकडेसुद्धा ढुंकून बघायची माझी इच्छा नसायची. इतका तिटकारा मला त्या कुत्र्याच्या चेहऱ्याचा….

स्वामीनिष्ठ, इमानदार अशा विशेषणांनी सुशोभित आणि रतन टाटा, बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज अशा प्रतिथयश लोकांच्या कुत्र्यावरील प्रेमाने प्रसिद्ध आलेल्या या जातीचा मला कधीकधी हेवा वाटतो. रतन टाटांनी गोव्याहून आणलेल्या ‘गोवा’ नावाच्या आपल्या कुत्र्याला आपल्या ग्लोबल हेडक्वारटर मधील म्हणजेच बॉम्बे हाऊस मधील खास जागेत ठेवलं आहे. शिवाजी महाराजांचा ‘वाघ्या’ तर सगळ्या मराठी माणसात प्रसिद्ध !! बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘टाॅबी’ कुत्रा सर्वश्रुत आहे.अमेरिकेतील एका शहरात एका मालकाने आपल्या मृत्यूनंतरची छत्तीस कोटीची प्रॉपर्टी ‘लुलू’नावाच्या त्याच्या कुत्र्याच्या नावे केली आहे. अहोभाग्य त्या कुत्र्यांचं !!!

कुत्र्यांच्या नावावरून एक गंमत अशी की आमच्या वाड्याच्या मालकिणीनं स्वतःच्या कुत्र्याचं नाव ‘पुराणिक’ठेवलं होतं. मी त्यावेळेस सात आठ वर्षाची असेन….मला आठवतंय मी बाबांना कळकळीनं असं सांगितलं होतं की माझं लग्न ‘पुराणिक’ आडनावाच्या माणसाची होता कामा नये.बाबांना फार उशिरा माझ्या त्या कळकळीच्या विनंतीचं प्रयोजन समजलं होतं…..

प्रेम म्हणजे प्रेम असतं,ते कुणी कुणावर करावं हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असतो. कुत्र्याबद्दलची माझी भूमिका स्वच्छ आहे.माझं त्याच्याशी वैर नाही पण त्याच्याविषयी प्रेम बिलकुल नाही. एकदा एका

मैत्रिणीकडे गेले होते. कसं कोणास ठाऊक पण ‘कुत्र्यापासून सावध राहा’ या पाटीकडं माझं लक्ष गेलं नाही. तिच्या घराची पायरी चढणार तो पुनश्च पायरीवर एक पायरीच्याच रंगाचं कुत्र झोपलेलं….. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी अर्थातच मी घेतली.तिला खालूनच फोन केला. “अगं काही करत नाही ते.” प्रत्यक्ष भगवंताला देखील इतक्या गॅरंटीनं सांगता येणार नाही तसं तिनं सांगितलं. “ओलांडून ये त्याला”( तो कोणावरच भुंकत नाही कोणालाच काही करत नाही. तर मग पाळलासंच का बिचारे ?असा प्रश्न मनांत आल्यावाचून राहिला नाही.) घाबरलेल्या भेदरलेल्या अवस्थेत मी त्याला ओलांडायला गेले आणि माझा पाय त्याच्यावर पडलाच. सिंहाच्या पिंजऱ्यात लाईट गेलेल्या रिंगमास्टरची काय अवस्था होईल तशी माझी झाली. इतक्यात मैत्रीण खाली आली. “किती घाबरतेस ग ?काही केलं का त्यांनं तुला?भुंकला देखील नाही गं तो!!”असं म्हणून तिने त्याला कडेवर घेतलं.”कम हनी, कम टू मम्मा” असं मातृप्रेम दाखवणाऱ्या तीच श्वानप्रेम बघून मी धन्य झाले, पण अप्रूप अजिबात वाटलं नाही त्या गोष्टीचं….

सकाळी फिरायला जाताना टापू टापूत बसलेली भटकी कुत्री आता माझ्या ओळखीची झाली आहेत. अर्थात असा हा माझा दावा…. माहित नाही कधी घेतील ती माझा चावा…. मालकाचं गळ्यात पट्टा बांधलेलं कुत्र दिसलं की संघटितपणे जोरजोरात त्याच्यावर ती भुंकायला लागतात. अगदी थेट ते टापूतून बाहेर पडेपर्यंत… वाघासारखं दिसणारं ते मालकाच्या संरक्षणाखाली ऐटीत चालत असतं. मालकाला जणु ते सांगत असतं आत्ता मला तू संभाळ. नंतर तुझं रक्षण करायची जबाबदारी माझी….तसा त्या दोघांत एक अलिखित करार असावा बहुदा…चार आण्याचा जीव असलेली ती भटकी कुत्री पण त्यांचा आवाज एखाद्या डॉल्बी लाऊड स्पीकर सारखा! आसमंत हादरवून टाकणारा!गांधीजीं सारख्या अहिंसावादी माणसानं भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर घेतला होता त्या बापूजींना माझे प्रणाम…..

रस्त्यावरच्या सार्वजनिक वाचन केंद्रावरची दोन कुत्री कुठलंही वाहन आली की त्या वाहनाच्या वेगानं फर्लांग भर पळत जातात आणि माघारी येतात. हे मी रोज पाहते. एक दिवस न राहून मी त्याच्या प्रमुखांना म्हटलं,”अहो यांना बांधून ठेवा की! उगा आपलं वाहनांच्या मागे पळत सुटतात.”त्यावर ते म्हणाले.”असुद्या मॉर्निंग रनिंग करतात !एरवी लडदूछाप आहेत. खाऊन खाऊन माजलीत दोघं.पहुडलेलीच असतात दिवसभर…. कोणावर भुंकत नाहीत. एन्जॉय करतात लाइफ झालं”….

जेव्हा मी ह्यांची अर्धागीनी झाले तेव्हा मात्र कुत्रं पाळणं हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न बनला. याचं कारण हे ‘श्वानप्रेमी’ आणि कुत्रा हा माझा वीक पॉइंट… अर्थात लग्नानंतर इतके चांगले विषय आम्हा दोघात होते की कुत्र्यासारखा विषय संभाषणात कधी आलाच नाही. त्यामुळं मला कुत्र्या विषयी इतका आकस आहे हे त्यांना ठाऊक नव्हत. तीन महिन्याची ओली बाळंतीण मी जेव्हा परतले त्यावेळी ह्यांनी माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट म्हणून घरी आणलेलं छोटासं कुत्र्याचं पिल्लू मला दाखवलं. मला ह्यांनी दोन बाळाची आई करून टाकलं होतं. पण मला मंजूर असायला हवं होतं ना ते?

मी अजूनही काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. ह्या गोष्टीचे त्यांनाही आश्चर्य वाटत होतं. दोन्ही पिल्लं अखंड कुई कुई करत होती. त्यात भरीस भर म्हणजे मालकिणीचं कुत्रं! एरवी ‘आओ जाओ घर तुम्हारा’ म्हणणारं ते आज आपल्या टापूत आलेल्या या नवख्या कुत्र्यावर अखंड भुंकत होतं. मालकीण यथावकाश खाली आली. माझं बाळ तिच्या हातात होतं ती म्हणाली,”आजच आलाय.आमचं कुत्र भुकायचं थांबणार नाही तेव्हा तुमच्या कुत्र्याला आजची रात्र घरातच बांधा. उद्या काहीतरी व्यवस्था करू” ……

दोन्ही पिल्लानी रात्र जागवली हे सांगायला नकोच. त्या दोघांकडे पाहात मी यांना माझं सगळं श्वासनपुराण सांगितलं आणि पहाटे पहाटे मी यांच्याकडून मला हवं असलेलं ते एक वचन घेतलं. वचन देता देता, ‘जे लोक कुत्रं पाळतात त्यांच्या घरी लक्ष्मी येते’असंही माझं समुपदेशन झालं, पण मला ‘लक्ष्मी’ नको होती, ‘शांती’ हवी होती. स्त्रीहट्ट कुणाला सुटलाय ?….सकाळ सकाळी कुत्र्याच्या पिल्लाची गावाकडं रवानगी झाली.. आणि माझं पिल्लू शांत झोपू लागलं.

भविष्यात पुन्हा या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी ह्यांना निक्षून सांगितलं,” एका म्यानात दोन तलवारी कधीच बसत नाही.ज्या दिवशी कुत्रं या घरात येईल त्या दिवशी मी बाहेर पडलेली असेन…..” अजून तरी तशी वेळ आलेली नाही.

सध्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. या करोना काळात कधीतरी कुत्र्याचं रडणं अपशकुनाचा संकेत देतं, तेव्हा  हे म्हणतात…

“अगं ,आम्ही जसे कुत्र्याचे शौकीन तसेच कुत्र्यांनाही आमची सवय… आताशा आम्ही त्यांना फारसे दिसत नाही आहोत ना रस्त्यावर म्हणून ती कावरीबावरी होऊन रडतात…..”

ते काही असो. कुत्र्याला ‘श्वान’ किंवा ‘सारमेय’ म्हणावं असं मला कधी वाटत नाही .कुत्रं समोर आलं की या जन्मी तरी हाssssड ……

हेच शब्द ओठी……

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ☆ अल्लड अवखळ मन ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

 ?  मनमंजुषेतून  ?

☆ अल्लड अवखळ मन ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

मायेच्या हळव्या स्पर्शाने फुलते

नात्याच्या गंधात धुंद मोहरते

मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे

का होते बेभान कधी गहिवरते—-

मन…कधीच न उलगडणारे कोडे… शब्दात न मांडता येणारे मन वेडे.. आकाशासारखे अथांग… सागरासारखे गहिरे.. क्षणात फुलणारे… क्षणात कोमेजणारे .. सावरणारे …अडखळणारे,

तर कधी आशेच्या हिंदोळ्यावर झुलणारे हे मन….

किती  सांगावी महती या मनाची.. मन चंगा तो कटोती  मे गंगा असे म्हणतात म्हणूनच उत्तम शरीराबरोबरच मनही निरोगी असणे तितकेच गरजेचे आहे. रिकामे मन हे सैतानाचे घर असते. यासाठी मनाला नेहमी चांगल्या गोष्टीत गुंतवायला हवे.

आपण इतरांची मने जपण्यासाठी खूप काही करतो. स्वतःच्या आशा अपेक्षांना मुरड घालतो पण या सर्वांची मने जिंकताना आपल्यालाही एक मन आहे हे साफ विसरून जातो. कधीतरी आपलेच मन आपल्याला विचारेल की, माझ्यासाठी तू काय केलेस? आहे उत्तर?….

योग्य आहार ,विहार, व्यायाम याने जसे शरीर चांगले राहते तसेच छंदाची जपणूक, चांगले मित्र, छान पुस्तक वाचन, गायन, वादन, बागकाम … मनापासून आवडणारे कोणतेही काम हे भरभरून आणि आनंदाने करायला हवे. थकलेल्या शरीराला जसे स्फूर्ती येण्यासाठी टॉनिक देतात तसेच आपले छंद आपल्या मनासाठी टॉनिक म्हणून काम करतात…

स्वतःचे ही मन जपा. त्याला काय हवे-नको ते बघा. त्याचेही कोड कौतुक करा.सकारात्मक विचारांनी त्याला फुलवा.आनंदी क्षणात भुलवा ..मग बघा जीवनाचे इंद्रधनुष्य कसे सप्तरंगानी बहरून येते…

    नजर को बदलो

नजारे बदल जायेंगे

    मन को बदलो

धूप मे भी छांवको पाओगे—–

 

© सौ. स्वाती रामचंद्र कोरे

खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ Not At Home…. ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

 ☆ Not At Home…. ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆ 

खरंतर Not at Home हा परफेक्ट शब्द.

पण लहानपणी मे महिन्यात सगळी भावंडं एकत्र जमलो कि पत्त्यात हा डाव रंगायचा. पण तेव्हा विंग्रजी फार यायचं नाही मग जो तो ज्याला जसं ऐकू आला उच्चार तसं म्हणायचा. नाॅटॅट होम, नाॅटॅ-ठोम काय वाट्टेल ते !! तसंही आपण आपल्याच घरात तरी कुठे असायचो? ते ही Not At Home च. कधीही मित्र मैत्रिणीच्या घरी जाऊन हुंदडायला मिळायचं. येऊ का? वगैरे विचारण्याच्या formalities नव्हत्या. 

“Challenge” ला पण चायलेन्ज, चाॅलेन्ज काय वाटेल ते म्हणायचो.

“लॅडीज” नावाचा खेळ फक्त लेडीजनीच खेळायचा असं आपलं उगीच वाटायचं मला. त्यात एक वख्खई बोलली जायची. लाडूची म्हणजे ३२ कळ्या किंवा अर्धा लाडू १६ कळ्या वगैरे. झब्बू पण असाच एक डाव. झब्बू देताना एक पानी आणि गड्डेरी. मजाच सगळी.

हे सगळे शब्द कुठून आले ?देव जाणे?

काचापाणी, पट, सागरगोटे हे अजून काही प्रकार बैठ्या खेळातले. काचापाणीसाठी भांड्यांच्या काचा जमवायला अगदी कचराकुंडी पण गाठलीय.

सगळेच खेळ आपल्याला जिवंत ठेवायचे. वेगळा असा “स्पोर्टस् डे” नसायचा. रोजच खेळ. शाळा दुपारची असली की दप्तर फेकून ?‍♀️?‍♂️ धावत सुटायचं! कारण उशीरा पोहचलं खेळायला तर “कटाप” करायचे (actually cut off) खेळातून.

तळहातावर थोडसं चाटून “टॅम्प्लीज” (टाईम प्लीज खरा शब्द) करणं, लपंडावात “धप्पा” म्हणणे, “रडीचा डाव खडी”असं चिडवणे, मग समोरच्यानी आपल्याला “जो म्हणतो तोच” असं बोट आपल्यापुढे नाचवत म्हणणे या सगळ्याची मजा काही औरच.

आजच्या मुलांना काय कळणार ती??

लगोरीsss असं सात ठिक-या एकमेकांवर ठेवून त्यावर पाय फिरवणे, तो नाही फिरवला तर लगोरी लागली असं धरत नसत. तसेच “डब्बा ऐसपैस”. पत्र्याचा एक फालतू डबा पण अनन्यसाधारण महत्व मिळालेला.

डालडाचा वनस्पती तुपाचा हिरवं नारळाचं झाड असणारा डबा पण फार महत्त्वाचा. तो कमरेला बांधून विहीरीत धपाधप उड्या मारणे हा रविवार सकाळचा कार्यक्रम. 

“लपंडाव” खेळताना मुलं मुद्दाम एकमेकांचे शर्ट, टी शर्ट बदलून गंडवायचे आणि शर्टाची बाही दिसेल असे लपायचे. मग चुकीचं नाव घेतलं कि धप्पा मिळायचा “राज्य असणा-याला … ?

राज्य असणा-यालाच पकडायला लावायचं हा काय न्याय!! पण अशा नियमांवर अपील नसायचंच.

“जोडसाखळी, रस्सीखेच” म्हणजे नुसती ओढाओढी.

“दगड का माती” म्हटले की जे म्हणेल त्यावर उभं रहायचं. दगडावर उभं रहायचं असेल तर तो सापडेपर्यंत फक्त धावायचं.

“विषामृत”मधे विष म्हणुन स्पर्श करायचा मग विष मिळाले कि स्तब्ध उभं रहायचं. मग कुणी तरी येऊन अमृत द्यायचं…काय एकेक मज्जा !!

पावसाळ्यात घरी बसू असं तर मुळीच नाही. पावसाळ्यात “रूतवणी” हा खेळ. 

एक लोखंडी सळई घेऊन चिखलात रुतवत जायचे. त्याचे पाॅईन्ट्स मोडायचा. सळई पडली की दुसरा खेळायचा. पहिला औट. 

“आबाधूबी” (अप्पा-रप्पी) लई भारी गेम. पाठ शेकुन काढणारा. यात शक्यतो प्लास्टीकच्या बाॅल घेतला जायचा. रबरी ट्यूब कच-यातून, भंगारातून शोधून तिचे तुकडे करून त्याचाही बाॅल केला जायचा.

साबणाचे फुगे करायला कागदाची बारीक सुरनळी करणे, करवंटीचे फोन, काडेपेटीत वाळू भरून टिचकीनी ती उगडून अंगावर उडवणे… what a creativity !!! काही नाही तर बाॅल घेऊन “टप्पा- टप्पा” हा खेळ तरी व्हायचाच. ते मोजले जायचे ते ही सार्वजनिकरित्या, मोठ्याने बोंबलत.

क्रिकेट खेळताना फळकूट पण चालायचं. एखादी बोळ पण चालायची. टीम पाडायच्या. आपणच अनेक नियम बनवायचे. या कंपाउंड बाहेर गेला बाॅल की फोर, तिकडे सिक्स, एक टप्पा औट, रन आऊट चे नियम वेगळे. कुणाच्या खिडकीची काच फोडली तर सार्वजनिक धूम ठोकणे हा अलिखित नियम. मुली, मुलगे एकत्र खेळायचो तेव्हा. सगळेच मुलींचे “दादा”. क्रिकेट; कबड्डी साठी टीम मेंबर कमी असले की  मुलींना डिमांड. 

“टीपी टीपी टीप टॉप”, व्हॉट कलर डू यू वाँट”? काहीतरी भारी रंग सांगायचा. मग नसेल तर औट करायचे. यातही धावायचंच. “ढप, गोट्या” रिंगण आखून जो सांगितला जाई तो ढप किंवा गोटी रिंगणाबाहेर नेम धरून उडवायची–ऑलिंपिक लेव्हलची नेमबाजी.!! मग यात चंदेरी, पाणेरी, काळी, घारी अशी गोट्यांची वर्णनं. 

एक जबराट खेळ होता. टायर्स फिरवणे. जुने टायर्स घेऊन ते काठीने बडवत पळवत नेऊन त्याची शर्यत लावायची. खूप धमाल यायची टायर्स पळवायला! 

”ठिक्कर पाणी” हा फक्त मुलींचा खेळ समजला जायचा. एखादा मुलगा जरी यात आला तर “मुलीत मुलगा लांबोडा, भाजून खातो कोंबडा” ? म्हणुन चिडवायचे. फरशीची खपटी घेऊन त्याला थुंकी लावुन ती रकान्यात फेकायची आणि एका बाजुने लंगडी खेळत जाऊन ती पायानेच सरकावुन चौकटीच्या बाहेर जाईल अशा रितीने फेकायची. रेषेवर पडली तर औट. 

कांदाफोडी, डोंगराला आग लागली पळा पळा पळा, खांब खांब खांबोळी, शिवाजी म्हणतो, दोरीवरच्या उड्या, मामाचं पत्रं हरवलं, शिरा-पूरी भातुकली हे तर सगळे गर्ल्स स्पेशल खेळ. मुलींची monopoly. 

नाव, गाव, फळ, फूल, नाटक/सिनेमा, रंग, प्राणी, पक्षी, वस्तू काय वाटेल ते. वह्याच्या वह्या भरायच्या. 

भातुकली, दो-या बांधून घर घर खेळणं, दाण्याचे लाडू आणि चुरमु-याचा भात एवढाच कायम स्वैपाक असायचा भातुकलीत.

व्यापार, सापशिडी, सागरगोटे, काचापाणी हे दुपारचे खेळ. 

वारा पडलेला असेल तर बॅडमिंटन. 

पण तो श्रीमंती खेळ. जिच्या हाती रॅकेट ती/तो फार भाव खायचे. मग रॅकेट नसणारे एकत्र यायचे आणि बॅडमिंटन पेक्षा बाकी खेळ कसे भारी यावर वादावादी.

कॅरम पण तसाच श्रीमंती खेळ. 

ते नको असायचे. त्यात धांगडधिंगा करता यायचा नाही ना !! 

“पतंग बदवणे” यात जो माहिर, तो सगळ्यात भारी. ?

मुली आपल्या ही काट, ती काट सांगायच्या आणि फिरकी धरायच्या. मग ती काटताना ढील देणे वगैरे प्रकार करावे लागायचे. काटता आली नाही पतंग की मग मांजा नीट नाही, कन्नी नीट बांधली नाही या तक्रारी. 

दिवेलागणी झाली की परवचा म्हणून रात्री जेवणं झाली की अंताक्षरी आणि  भुताच्या गोष्टी.

निव्वळ Nostalgic !!!

समृद्ध, श्रीमंत बालपण होतं आपलं.

करता येईल का तसं आजच्या लहान मुलांचं???

काहीतरी जादू घडावी आणि होऊन जावं आपल्यागत.

नाही का ???

संग्राहक : श्री अनंत केळकर   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाऊबीज: आठवणी दाटतात…..  ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?विविधा ?

☆ भाऊबीज: आठवणी दाटतात…..  ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

ज भाऊबीज. आज बहिणीने भावाला ओवाळायचं आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची. ओवाळणीच्या तबकातील दिवा हे सूर्याचे प्रतीक. सूर्य हा जीवनदाता. ’तू अनेक सूर्य पहा’ असा अर्थ त्या ओवाळण्यात आहे. भाऊ-बहीण यांच्या नात्यात एक अनोखे माधुर्य आहे. या नात्याचे कौतुक करताना लोकसाहित्याने खूप खूप ओव्या रचल्या आहेत. बहिणींना आपला लाडका भाऊ अगदी जवळचा वाटतो. जणू भाऊ म्हणजे गळ्यातला ताईत.  एका ओवीत एकीनं म्हंटलयं, ‘दुबळा पाबळा का होईना, पण एक तरी भाऊ बहिणीला असावाच.  का? भाऊबीजेला एक पावलीची चोळी आणि कधीतरी, थकल्या भागल्या देह-मनाला एका रात्रीचा विसावा.’ 

भाऊ मोठा असला, तर तो बहीण आणि वडील यांच्यामधला दुवा असतो.तो मित्र असतो. सल्लागार असतो. रक्षणकर्ता असतो. धाकटा असला, तर त्याच्या खोड्याही बहिणीला आनंद देतात. तो बहिणीला आपल्या मुलासारखाच वाटतो. असेच काही-बाही विचार मनात येत होते. विचार करता करता त्यांची वावटळच झाली. या वावटळीने मला एकदम उचललं आणि बालपणीच्या अंगणात नेऊन उतरवलं. तिथे आठवणी झिम्मा खेळत होत्या. 

एक जण लगबगीने पुढे आली, ‘मी आठवते तुला?’

‘हो ग, तुला कशी विसरेन? ‘बालपणीच्या त्या निरागस वयातली, तितकीच निरागस आठवण. … आठ वर्षाची असेन मी तेव्हा. आजोळी होते मी तेव्हा. माझे मुंबईचे मामा-मामी, लता दिलीप सगळे आले होते. दिलीप माझ्या बरोबरीचा. लता आमच्यापेक्षा चार वर्षाने मोठी. तो भाऊबीजेचा दिवस होता. दिलीपने आमच्या दोघींकडून छान चोळून मोळून घेतले. आदल्या दिवशी तिळाचे वाटण केलेले होते. ते लावायला लागताच तो म्हणाला, तो चिखल मला लावू नकोस!’ त्यावर आजी म्हणाली, ‘अरे त्यामुळे शरीरावरची छिद्रे मोकळी होतात. अंग मऊ होतं.’ मगं तो काही बोलला नाही. मी वाटण जरा जास्तच खसखसून त्याला लावलं. आज महाराजांना पाण्याची बदली आयती द्यायची होती. विसण घालायचं होतं. उटणं लावायचं होतं. त्यावेळेपर्यंत मोती साबण आला नव्हता. निदान आमच्या घरात तरी. दोन बादल्या पाणी त्याला घालून झालं, तरी त्याचं ‘अजून घाल’ संपेना. एव्हाना बंबातलं गरम पाणी संपून नुकतच वरून घातलेलं गार पाणी येऊ लागलं होतं. मी म्हंटलं, ‘घालू गार पाणी?’ तशी महाराजांनी एकदाचा टॉवेल गुंडाळला. अंग पुसून नवे कपडे घातले. दादामामांनी त्याला दहा रूपयाच्या दोन नोटा दिल्या. एक मला घालायला आणि एक लताला घालायला.

मी पण आंघोळ करून जरीचं परकर –पोलकं घातलं. तशी त्याने सुरू केलं, ’सुंदर ते ध्यान । समोर उभे राही। जरी परकर घालूनिया ।। ‘आहा, काय ध्यान दिसतय?’ माझ्यावरून हात ओवाळत तो म्हणाला. मी काही चिडले नाही. त्याच्या खिशातल्या नोटेकडे बघत होते ना मी!.  मग ओवाळण्याचा कार्यक्रम झाला. लताताईच्या तबकात त्याने नोट टाकली. नंतर मी ओवाळलं. मी आपली ओवाळतेय … ओवाळतेय… ओवाळतेय. नोट काही खिशातून बाहेर येईना. मी म्हंटलं ,’टाक की लवकर. माझा हात दुखायला लागलाय.’ 

त्याने खिशावर आपला हात ठेवत म्हंटलं , ‘घे बघू घे.’ आणि तो पाटावरून उठून चक्क पळायलाच लागला. ‘म्हणाला, ‘हे पैसे माझे आहेत.’ मी म्हंटलं , ‘दादामामांनी मला ओवाळणी घालण्यासाठी तुला दिलेत.’ ‘असं? मग मला पकड आणि घे.’ मी जवळ गेले की तो पळायचा. आमची शिवाशिवीच सुरू झाली. पण मी काही त्याच्याइतकी चपळ नव्हते. शेवटी रडत रडत आजीकडे गेले.  आजीची आणि त्याची काही तरी नेत्रपल्लवी झाली. आजी खोटं खोटं त्याला रागावली. मी म्हंटलं, ‘दादांनी दिलेले पैसे द्यायचेत, तर इतका कंजूषपणा करतोयस, स्वत:चे द्यायचे झाले, तर काय करशील? बहुतेक माझ्याकडे ढुंकूनसुद्धा पाहणार नाहीस.  

‘घ्या. रडूबाई… रडूबाई रडली… आजीपुढे जाऊन रडली….’ त्याने नोट माझ्या परकराच्या  झोळात फेकून दिली. त्या दहा रुपयाचे मी काय केले हे आता आठवत नाही. मोठे छान दिवस होते ते. पुन्हा किती तरी वर्षं आम्ही भाऊबेजेला भेटलो नाही.आणि पुन्हा भेटलो, तेव्हा खूप सुजाण झालो होतो. तेव्हा, जुन्या भाऊबीजेची आठवण काढायची आणि लोट-पोट होत हसायचो.  आता हेही आठवतय, की तो मिळवायला लागला आणि आता भाऊबीजेला आम्ही प्रत्यक्ष भेटत नसलो, तरी माझ्यासाठी कधी साडी, कधी ऊंची पर्स, कधी नेकलेस, कधी भारी अत्तराच्या किंवा सेंटच्या बाटल्या असं काही ना काही भाऊबीज म्हणून येत रहातं. 

इतक्यात एक जण लाजत… संकोचत माझ्याकडे आली. ‘ मी… मी आठवते तुला.’

‘तुला कशी विसरेन? दुसर्‍याच्या कष्टाचा कळवळा येणार्‍या माझ्या भावाची आठवण तू…त्या वर्षी दिवाळीला मी माझ्या काकांकडे होते. माझी चुलत बहीण नलिनी. ती आणि मी एकाच वयाच्या. तिने खूप आग्रह केला की आमच्याकडे ये म्हणून. त्यावर्षीची माझी दिवाळी काकांकडे झाली. मला चार मोठे चुलत भाऊ. नर्कचतुर्दशीला आणि भाऊबीजेला सगळ्यांनी आम्हा दोघींकडून छान अंगमर्दन करून घेतलं. माझा दोन नंबरचा चुलतभाऊ बाबू म्हणाला , ’सगळ्यांना तेल लावून तुमचे दोघींचे हात चांगले भरून आले असतील. चला! आता तुम्ही पाटावर बसा. मी तुमच्या हाता-पायांना तेल लावतो. आम्ही म्हंटलं, ‘तू म्हणालास ना, पुष्कळ झालं, आमचं हात दुखणं कमी झालं. नाही म्हंटलं तरी दुसर्‍याच्या कष्टाचा विचार  करणारा  भाऊ आपल्या घरात आहे याचा मला आनंद झाला. अभिमान वाटला. ‘ऐसी कळवळ्याची जाती। लाभावीण करी प्रीति।‘ दुसर्‍याचा विचार करणारं त्याचं हरीण –काळीज त्या दिवशी प्रथम लक्षात आलं. मग त्याने आम्हा सर्वांना ‘सुवासिनी’ सिनेमा दाखवला. 

एवढ्यात आणखी एक जण इतरांना मागे सारत धिटाईने पुढे आली. म्हणाली, ‘तुला ‘गणेश नगरचे’ महादेवराव आठवतात की नाही?’ मी म्हटलं, ‘त्यांना कशी विसरेन? ते तर माझ्या ‘मर्मबंधातली ठेव’ आहेत. 

पुण्यात एका लग्नाच्या वेळी दादा आणि वसुधाताई यांची भेट झाली. सहज गप्पा मारता मारता तेही सांगलीचेच आहेत, असं कळलं. त्यांचं नाव महादेव आपटे. मी एकदम म्हणाले, ’मीही माहेरची आपटे.’ त्यावर ते म्हणाले, ‘अरे वा! मग तू आमची माहेरवाशीणच झालीस की! आता यायचं आमच्याकडे. गणेशनगरला. ’ मी मान डोलावली. अशा लग्नकार्यात किंवा  प्रवासात झालेल्या ओळखी आणि त्यावेळी दिलेली आश्वासनं तिथल्या तिथे विरून जातात. पण यावेळी तसं झालं नाही.  ती दोघं एक दिवस फोन करून आमच्या घरी आली आणि जाताना ‘आता तुमची पाळी’ असं बजावून गेली. दोघंही पती-पत्नी अतिथ्यशील. लाघवी. भेटेल त्याच्याशी मैत्री जोडण्याची अनावर हौस. हळूहळू मी खरोखरच त्यांच्या घरच्यासारखी झाले. त्या वर्षी त्यांनी मला भाऊबीजेला बोलावले. मी संध्याकाळी गेले. त्यानंतर राखी पौर्णिमेला काही मी गेले नाही. संकोच वाटला, की दरवेळी आपण त्यांच्याकडून ओवाळणी घेत राह्यचं, हे काही बरं नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी फोन …. ‘काल वाट पहिली. तू आली नाहीस. असं चालणार नाही…’ वगैरे… वगैरे… मला माझ्या कोत्या विचारांची लाज वाटू लागली. प्रेमाचं रागवणं. त्यानंतर ही चूक मी पुन्हा केली नाही. बरं त्यांना बहीण नाही, म्हणून त्यांनी हे नातं जोडलं असंही नाही. त्यांना सख्ख्या, चुलत, मावस अशा अनेक बहिणी होत्या. शिवाय वसुधाताईंच्या बहिणीही ओवाळायला यायच्या. वसुधाताई स्वत:च ओवळणीची छान तयारी करून ठेवत. भेटलेल्या प्रत्येकाशी नातं जोडणं आणि निभावणं हा दादांचा स्वभावधर्म होता. आता दादा नाहीत. वहिनीही नाहीत. पण त्यांनी होते तोवर अगदी निरपेक्ष असं प्रेम आमच्यावर केलं. 

असंच निरपेक्ष प्रेम आमच्या दादांनी म्हणजे माझ्या मोठ्या भाऊजींनी माझ्यावर केलं. अगदी लग्न झाल्यापासून.  ते माझ्या वडलांसारखेच होते. माझे सल्लागार होते. मित्र होते. दुसर्‍यांच्या उपयोगी पडायचा त्यांचा स्वभावच होता. माझे लग्न झाल्यावर माझा भाऊ काही वर्ष भाऊबीजेला यायचा. पण पुढे दरवर्षी ते शक्य होत नसे. असंच एका वर्षी कुणीच नव्हतं ओवाळायला. आमच्या वाहिनी (माझ्या जाऊबाई) म्हणाल्या, ‘आज कुणाला तरी ओवाळल्याशिवाय राह्यचं नसतं. तू यांना ओवाळ. मग तेव्हापासून, माझे भाऊ आलेले असले, नसले, तरी आमच्या दादांना ( माझ्या मोठ्या भाऊजींना ) मी ओवाळू लागले. राखी पौर्णिमेला राखी बांधून ओवाळू लागले आणि त्यांच्या वाढदिवसाला त्यांना ओवाळून औक्षण करू लागले, ते अगदी परवा परवापर्यंत. गेल्या दोन वर्षांपूर्वी धनत्रयोदशीलाच ते गेले. तेव्हा ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्यात मी माझा मोठा भाऊ, मार्गदर्शक, संरक्षक आणि सल्लागार पाहिला. 

आज अशा सगळ्या भावांच्या आठवणी काढता काढता, मनात एक हुरहूर दाटून आलीय. कालप्रवाहात सगळे वाहून गेले. मी या प्रवाहाच्या काठाशी उभी राहून म्हणते आहे, ‘गेले ते दिन गेले….’ 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गेले ते दिवस ☆ संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

? इंद्रधनुष्य ? 

☆ गेले ते दिवस ☆ संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने ☆ 

आज आठवते ना आपल्या लहानपणीची दिवाळी. २५ पर्यंत पाढे पाठांतर, २१ दिवसांचे दहा ओळींचे शुद्धलेखन, कविता पाठांतर, निबंध. दिवाळी सुट्टी अभ्यासासाठी दोनशे पानी वही व शुद्धलेखनासाठी शंभर पानी दुरेघी वही.

गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. इतका दिवाळीतला गृहपाठ करूनसुद्धा आपण दिवाळीत धम्माल करायचो. किल्ले बनवायचो, रांगोळीसाठी अगरबत्तीने ठिपके पाड़ून द्यायचो. मनसोक्त फटाके फोडायचो. सापाची गोळी आठवते ना… टेलिफोनचा फटाका आठवतो का… चिड़ी कुठून कुठे उड़ायची माहित आहे ना… राॅकेट साठी कुठून पण बाटली शोधून आणायचो. रस्त्यावर लावलेला बाण आड़वा होऊन कोणाकोणाच्या ढेंगातून गेला होता आठवतंय ना. कधी कधी बाण कोणाच्या खिडकीतून घरात घुसायचा, मग त्या काकी भडकण्याच्या आधी सगळे तिथून धूम ठोकायचे. 

सगळे फटाके संपल्यावर अर्धवट पड़लेल्या फटाक्यांची दारू पेपरमध्ये जमा करायचो आणि पेपराला सगळ्याबाजूने आग लावल्यानंतर उड़ालेला आगीचा ज्वाळ पहाताना मिळणारा आनंद.

खरंच, दिवाळीच्या दिवसात आम्ही श्रीमंत व्हायचो कारण बाबा, मामा, काका, खिशात पैसे टाकायचे आणि उरलेल्या दिवसात अर्ध्या तासाचे 50 पैसे किंवा तासाचा 1 रुपया  देऊन सायकल भाड़्याने घेऊन फिरायला जायचो ना…

आता फक्त हातात मोबाईल घेऊन त्यातच गर्क असलेली  मुले दिसतात तेव्हा सांगावेसे वाटते, अरे दिवाळी म्हणजे व्हाॅटसअपवरचे मेसेज आणि व्हिड़ीओ नसतात रे….!

असो….  !! ?⭐?

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares