मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवाळी  कालची आणि आजची.. भाग –2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ?  मनमंजुषेतून  ?

☆ दिवाळी  कालची आणि आजची.. भाग –2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

दिवाळी गोवत्स द्वादशी पासूनही साजरी करतात. गुरुद्वादशी असंही म्हटलं जातं. खेड्यात  गोधनाला खूप महत्त्व असल्याने पूर्वीपासून आताही गाय-वासराची किंवा त्याच्या फोटोची पूजा करतात. शिष्य गुरूंचे पूजन करायचे. मात्र आज ही प्रथा फारशी दिसत नाही.

धनत्रयोदशी दिवशी पूर्वी आणि आताही व्यापारी वह्या आणि तिजोर्यांची पूजा करतात. धन्वंतरी जयंती असल्याने वैद्य डॉक्टर त्याची पूजा करतात. पूर्वी आणि आताही. पूर्वीची आणखी एक प्रथा कणकेच्या तेलाचा दिवा घराबाहेर संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून लावला जायचा. आणि सर्वजण मिळून सूर्याला प्रार्थना करायचे मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामसह त्रयोदश्यां  दीपदानात सूर्यज प्रियतां मम . आज क्वचित ठिकाणी हे दिसते. पूर्व परंपरेनुसार   क्वचित  ठिकाणी ब्रह्मास्त्राच्या  प्रतिमेची , निर्जळी उपास  करून, पुरणाचा नैवेद्य दाखवून पूजा करतात. ही प्रथा आज फारशी माहित नाही पाण्याचे हांडे  घासूनपुसून तेही पूजले जायचे.आज गिझर आणि गॅस असल्याने हांडे कोठे दिसत नाहीत. नरक चतुर्दशी दिवशी चे अभ्यंगस्नान आजही आहे. पण पूर्वी इतका मसाज करणे होत नाही. पूर्वी तीळ, खसखस, वाटून ते उटणे अंगाला लावत. आज उटण्याची तयार पावडर मिळते. नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट फोडले जायचे. आज कारिट कोणाला माहित असेल असे वाटत नाही. लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी विष्णू आणि कुबेर आणि घरातील दागदागिने यांची पूजा केली जायची.तसेच अलक्ष्मीचा नाश व्हावा म्हणून घरातला कचरा काढणारी केरसुणीची पूजा करून दमडी आणि सुपे वाजवून बाहेर टाकला जायचा. आजही काही ठिकाणी हे चित्र दिसते. काही घरात, घरातली स्त्री समाधानी, आनंदी रहावी , म्हणून गृहलक्ष्मी  म्हणून तिची पूजा केली जाते. पूर्वीचे फटाके आणि आता चे फटाके यातही खूप फरक पडला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री जागवत असत. पगडी पट मांडला जायचा .खेळ रात्री उशिरापर्यंत चालायचा. करमणुकीचे दुसरे साधन नव्हते. आता नवीन पिढीला पगडी पट हा खेळ आणि ते नावही माहीत नसावे. पाडव्यादिवशी खेड्यात लव्हाळीची दिवटी करून त्याने गायी वासरांना ओवाळून त्यांचे आशीर्वाद घेतले जायचे . यादिवशी शेणाचा गोवर्धन पर्वत करून, त्यावर दुर्वा फुले  खोचून , कृष्ण गाई वासरे यांची चित्रे त्यावर मांडून पूजा आणि मिरवणूक काढण्याची  प्रथा होती ही प्रथा आज फारशी दिसत नाही. पत्नी पतीला ओवाळण्याची पद्धत पुर्वापार आहे.फक्त देणे-घेणे वाढले आहे. भाऊबीज, या दिवशी भावाने घरी न जेवता बहिणीकडे जेवावे, आणि तिने भावा प्रति प्रार्थना करून कुशल चिंतावे.”हातजोडी ते उगवत्या नारायणा, जतन कर देवा ,माझा बंधूजी  राणा”. असे म्हणून ओवाळावे. ही प्रथा आज आहे . फक्त भेटवस्तू देण्यात फरक पडलाय.

दिवाळी हा सण नात्या नात्यांशी इतकंच काय पर्यावरणातल्या प्रत्येक गोष्टीशी भाव बंधनांनी आणि आत्मीयतेने जवळीक आणणारा असा  हा सण !कालच्या दिवाळीतला आनंद, चैतन्य ,उत्साह, यात बदल होतच राहणार. काल आणि आज प्रमाणे उद्याच्या दिवाळीतही फरक पडणारच. लाईटच्या माळा, भडक सजावटी, मिठाया ही सगळी आनंदाची बाह्यरूप. खरी दिवाळी मनांकडून  मनाकडे. एकमेकांबद्दल वाटणारा प्रेम जिव्हाळा आपलेपणा हीच खरी दिवाळी मनामनांची.

   “सर्वांना दिवाळी भरभराटीची, समृद्धीची, शांतीची आणि आरोग्यदायी जावो”

समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ पंडित जसराज ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत –  पंडित जसराज ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

एखादं गर्भरेशमी वस्त्र ल्यायल्यानंतर त्याच्या तलम, मुलायम स्पर्शानं मन मोहवतं, सुखावतं, शांतावतं. नेमकी तशीच अनुभूती नावाप्रमाणे रसराज असणारे पं. जसराज ह्यांचा सूर आपल्याला देतो. काहीही ढिम्म कळत नसलेल्या लहानग्या वयात मी पं. जसराजांना ऐकलं. अगदी ऋषितुल्य, प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि भावगर्भ सूर ह्यांची ती एकत्रित अनुभूती एकूणच ‘सौंदर्याची व्याख्या’ माझ्या मनात रुजवण्याऱ्या घटकांपैकी एक म्हणावी लागेल. एखाद्या सुंदर सुरानं मनाला स्पर्श करून तिथं घर करायला वय, ज्ञान, समज काहीकाही आड येत नाही. तसंच अगदी लहागग्या वयातच त्यांच्या सुरानं माझ्या मनात घर केलं. अत्यंत तलम, मुलायम, लडिवाळ, मनाला खोलवर स्पर्श करणारा आणि महत्वाचं म्हणजे मन शांतावणारा सूर म्हणजे जसराजींचा सूर ही व्याख्याच मनावर कोरली गेली.

सुरांत हरवून जाणं म्हणजे काय हे त्यांच्याकडे पाहाताना, त्यांना ऐकताना उमजत होतं. सुरांतली भावगर्भता हा मला भावलेला जसराजजींचा सगळ्यात मोठा पैलू! मेवाती घराण्याच्या ह्या अध्वर्यूविषयी, त्यांच्या गायकीविषयी मी काही लिहिणं म्हणजे अगदीच मिणमिणत्या ज्योतीने तेजाची आरती केल्यासारखं आहे. परंतु आपापल्या परीनं प्रत्येकजण कलाकाराच्या गाण्यातली सौंदर्यस्थळं शोधत असतो किंबहुना ती आपसूकच श्रोत्याच्या मनात उमटत जातात. त्यांच्या बाबतीत मला जे भावलं ते म्हणजे त्यांच्या सुरांतली मनाला स्पर्शणारी, मनात खोलवर झिरपत जाणारी भावगर्भता! शास्त्रीय संगीत म्हटलं की बहुतांशीवेळा गळा नसणाऱ्या, संगीत न शिकणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात अकारणच त्याचं एक क्लिष्ट चित्र रंगवलं गेलेलं असतं. मात्र जसराजजींचं महत्तम योगदान म्हणजे दुसऱ्याला भावविभोर करणाऱ्या आपल्या सुरांनी त्यांनी अत्यंत सर्वसामान्य माणसाला शास्त्रीय संगीताची गोडी लावली.

नेमानं संगीताची साधना घडत असलेल्या घरात पं. जसराजजींचा जन्म झाला. त्यांचे पिता पं. मोतीराम जसराजजी अवघे चार वर्षांचे असताना निवर्तले मात्र त्यापूर्वी त्यांच्याकडून जसराजजींना संगीताची दीक्षा मिळाली होती. त्यानंतर त्यांचे सर्वात वडील बंधू पं. मणिराम ह्यांच्याकडून गायनाची व मधले बंधू पं. प्रताप नारायण ह्यांच्याकडून तबल्याची उत्तम तालीम त्यांना मिळाली. त्यानंतर मेवाती घराण्याचे दिग्गज महाराणा जयवंत सिंह वाघेला व आगऱ्याचे स्वामी वल्लभदास ह्यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. बाबा श्याम मनोहर गोस्वामी महाराजांच्या सानिध्यात हवेली संगीताचा बारकाईने अभ्यास करून त्यांनी बऱ्याच नवीन बंदिशी बांधल्या. त्यांच्या बंदिशींचा एक वेगळाच ढाचा आणि बहुतांशी बंदिशींचे कृष्णमय शब्द ऐकताना अक्षरश: भान हरपून जायचं. बंदिशीच्या शब्दांना न्याय देत रसाळपणे समोरच्या कोणत्याही वर्गवारीतल्या श्रोत्याला रसोत्पत्तीच्या परमोच्च बिंदूवर पोहोचलेल्या आपल्या सुरांनी न्हाऊ घालणे ही त्यांची खासियत! मनोमन सदैव कृष्णभक्तीत रममाण असणाऱ्या जसराजजींनी अनेक भजनांतूनही आपल्या भक्तिरसानं रसिकांना चिंब न्हाऊ घातलं. ही सगळी किमया म्हणजे संगीतमार्तंड पं. जसराजांनी आपल्या दैवी देणगीला दिलेल्या अपार साधनेची जोड आणि त्याचं फलित होतं.

आवाजाच्या नैसर्गिक धाटणीत असलेल्या फरकामुळं स्त्री व पुरुष गायक, दोघांनाही स्वत:च्या आवाजाच्या पोताशी तडजोड न करता, स्वरतंतूंवर ताण न देता एकत्र गाता येत नाही. सहगायन करायचं म्हटलं तर कुणा एकाला आपल्या आवाजाच्या नैसर्गीक पट्टीपेक्षा चढ्या किंवा खालच्या पट्टीत गाणं अपरिहार्य होऊन जातं. त्यामुळं गाणाऱ्याचं समाधानही होत नाही आणि गायनाचा म्हणावा तसा प्रभावही पडत नाही. बहुधा स्त्रीशिष्यांना स्वत:च्या पट्टीत तालीम देताना किंवा स्त्री व पुरुष शिष्यांना एकत्र तालीम देताना आवाजाच्या नैसर्गिक पट्टीतल्या फरकाच्या गोष्टीवर त्यांचं सातत्यानं चिंतन घडत राहिलं असावं आणि त्यातूनच त्यांनी एक अभिनव प्रयोग केला, जो प्रथम पुण्यात झाला आणि तिथल्या रसिकांना तो अत्यंत भावल्याने त्यांनी त्या प्रयोगाला जसराजजींच्या सन्मानार्थ प्रेमभावानं ‘जसरंगी जुगलबंदी’ हे नाव दिलं.

शास्रीय संगीतातील मूर्छना तत्वावर आधारित असलेला हा प्रयोग आहे. ह्या जुगलबंदीत एक स्त्री गायक तर एक पुरूष गायक असतो. दोघंही आपापल्याच पट्टीत गातात तरीही सोबत गाऊ शकतात. दोघांचे साथीदार वेगवेगळे असतात कारण त्यांच्या पट्ट्या वेगळ्या असतात. दोघांचे रागही भिन्न असतात, तरीही त्यातलं एकसंधपण टिकून राहातं कारण एका गायकाचा मध्यम दुसऱ्या गायकाचा षड्ज असतो आणि एकूण स्केलमधली स्वरांतरं बदलत नाहीत. फक्त षड्जाचं स्थान बदललं तर त्यानुसार रागाचं नाव बदलतं. ह्याच गोष्टीचा वापर करून हा प्रयोग केला गेला जो अतिशय लोकप्रिय झाला. अर्थातच ह्या प्रयोगाला काही मर्यादा नक्कीच आहेत ज्या अपरिहार्य आहेत. मात्र एक नाविन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण गोष्ट म्हणून ही जुगलबंदी नक्कीच अनुभवण्यासारखी आहे. 

आज विचार करता वाटतं, जसराजजींचा भावगर्भ रससंपन्न सूर, किशोरीताईंची अफाट प्रतिभासंपन्न, विद्वत्तापूर्ण तरीही रसाळ गायकी, कुमारजींचा टोकदार सुरातील नक्षीदारपणे उभा केलेला राग, भीमसेनजींचा कमावलेला दमदार सूर अशा अनेक अद्भुत गोष्टींनी आमच्या पिढीचं संगीताचं वेड समृद्ध केलं आहे. फक्त संगीताशी निष्ठावंत असणाऱ्या ह्या कलाकारांनी डोळ्यापुढं उभं केलेलं संगीताचं एक सुंदर, मनमोहक विश्व कायमच सोबत असतं, मनाच्या तळाशी जपून ठेवलेली ह्या कलाकारांच्या कलेनं प्रदान केलेली अलौकिक रत्नप्रभा ही बऱ्याचदा जगण्याची ऊर्जा ठरते. ‘आत्मसुख देणारं ते हे संगीत’ अशी धारणा वर्षानुवर्षं मनात जपली गेली आहे ती केवळ त्यांच्या सच्च्या सुरानं दिलेल्या अद्भुत अनुभूतीमुळं! असे संस्कार आमच्या पिढीच्या कानांवर झाले यापरते आमचं भाग्य ते काय असावं!? ह्या व्यक्तिमत्वांनी आमचं जगणं समृद्ध केलं… मनात अनेक जाणिवांची रुजवण ह्यांच्या कलेनं केली… डोळे मिटताक्षणी ह्यांच्या सुरांनी ‘त्याचं’ दर्शन घडवलं… अस्सलपण म्हणजे काय हे ह्यांच्या सुरांनी दाखवलं!

इतकंच म्हणता येईल की, भगवद्गीतेतल्या ‘त्याच्याच’

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥

ह्य आत्म्याच्या व्याख्येनुसार तशाच आत्मीय सुराचं ‘त्यानं’च ह्या कलाकारांना दिलेलं वरदान म्हणजे आपल्यासाठी निखळ आनंदाचा ठेवा, ऊर्जास्त्रोत व प्रेरणास्थान! ह्या स्वरसाधकांनी ‘साधलेल्या’ अलौकिक सुरांना सादर वंदन! ह्या चार सुरांना गुंफणारी शब्दमाला आज पूर्ण होतेय. अशा अनोख्या पद्धतीनं दिवाळी साजरी झाल्याच्या आनंदात आपली रजा घेते. त्यापूर्वी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ??

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बलिप्रतिपदा… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

?  विविधा ?

☆ बलिप्रतिपदा… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

बलिप्रतिपदा! दीपावलीच्या उत्सवातील हा तिसरा  दिवस. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा. बलिराजाच्या स्मरणार्थ साजरा होणारा दिवस. कोण हा बलिराजा? पौराणिक कथेनुसार हा अत्यंत सत्वशील,दानशूर असा हा राजा. पण गर्वाने धुंद झालेला.तो दानशूर असल्याने दिलेला शब्द पाळत असे.त्याच्या या गुणाचा फायदा घेऊन भगवान विष्णूंनी त्याचे गर्वहरण केले.त्यांनी बटू वामनाचा अवतार   धारण केला व भिक्षा मागण्यासाठी बलिराजाकडे गेले.त्यांनी त्याच्याकडे फक्त तीन पाऊले जमीन मागितली.बलिराजाने ती देण्याचे वचन देताच विष्णूने भव्य रूप धारण केले.एक पाऊल स्वर्गात,दुसरे पृथ्वीवर ठेवले व तिसरे पाऊल कुठे ठेवू असे विचारले.तेव्हा आपला शब्द पाळण्यासाठी बलिराजाने आपले मस्तक पुढे केले.या संधीचा फायदा घेऊन विष्णूंनी आपले पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात गाडले व आपले अवतार कार्य पूर्ण केले.मात्र त्याच्या अंगी असलेल्या सद्गुणांची कदर करून त्याला पाताळाचे राज्य देऊ केले व आपण स्वतः या राज्याचे द्वारपाल बनले.त्याच्या सद्गुणांची पुढील पिढ्यांना जाणीव असावी म्हणून हा दिवस त्याच्या नावाने साजरा केला जाईल असे वरदानही दिले.तो हा दिवस.त्याच्या प्रजा हित कारक वृत्तीमुळे आजही ‘इडा पीडा टळो आणि बळीराजाचे राज्य येवो’ अशी प्रार्थना केली जाते.कितीही सद्गुण अंगी असले तरी एखादा दुर्गुण सुद्धा त्या गुणांवर मात करतो व विनाशाला कारणीभूत होतो याचे   हे उदाहरण म्हणावे लागेल.

हा दिवस वेगवेगळ्या प्रांतात वेगळ्या नावाने व पद्धतीने साजरा केला जातो. खरे तर हा शेतक-याचा सण. शेतकरी झेंडूच्या माळांनी जनावरांचा गोठा सुशोभित करतात. काही ठिकाणी शेणाचा गुराखी, गवळणी, कृष्ण, पाच पांडव केले जातात.आगरी समाजात शेणाच्या गोळ्यांचा बळीराजा केला जातो.तांदूळाच्या पिठाच्या रांगोळ्या काढल्या जातात. धनगर समाज आपल्या मेंढरांचे कौतुक करतो तर आदिवासीही आपल्या पशूधनाकडे विशेष लक्ष देतात. संपन्नतेच्या या दिवसांत ज्यांच्यामुळे संपन्नता आली त्या पशूधनालाही आनंदात सहभागी करून घेतले जाते. हीच आपली कृषी संस्कृती आहे.आपले सगळे सण उत्सव हे निसर्गाशी निगडीत असे आहेत आणि ते तसेच ठेवण्याचे आपले प्रयत्न असले पाहिजेत.

उत्तर भारतात हा दिवस नवीन विक्रम संवत म्हणून साजरा होतो. तसेच काही ठिकाणी गोवर्धन पूजाही केली जाते. पक्वान्न व मिठाई  मोठ्या प्रमाणात अर्पण केले जातात. त्यामुळे याला अन्नकूट असेही म्हणतात. काही ठिकाणी बलिराजा व त्याची पत्नी विंधावली यांचे चित्र काढून पूजा केली जाते.

याच  दिवशी पार्वतीने महादेवाना द्यूतात हरवले.म्हणून ही द्यूतप्रतिपदा.

कृषी संस्कृतीतील नव्या आर्थिक वर्षाची सुरूवात होण्याचा हा दिवस.व्यापारी मंडळीही आदले दिवशी म्हणजे अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यावर प्रतिपदेला हिशेबाच्या नव्या वह्यांचे पूजन करतात व नवे आर्थिक व्यवहार सुरू करतात.नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस असल्याने गुढी पाडव्याप्रमाणेच या दिवसाचे महत्त्व आहे. त्यामुळे या दिवसाला दिवाळी पाडवा असेही म्हणतात.  आपल्या संस्कृतीत शुभ मानल्या गेलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त. या मुहूर्तावर सोने तसेच नव्या वस्तुंची खरेदी, गुंतवणूक केली जाते. या शुभदिनी पत्नी आपल्या पतिला ओवाळते व ओवाळणीच्या रूपात पती पत्नीला भेटवस्तू घेऊन देतो. नव विवाहीत मुलीच्या माहेरी विवाहानंतरच्या पहिल्या दिवाळीला जावयाला व त्याचे आप्तेष्टांना बोलेवले जाते. त्यांचा विशेष आदर सत्कार केला जातो. भेटवस्तू दिल्या जातात. पहिली दिवाळी दिवाळसण म्हणून दणक्यात साजरी होते. बदलत्या काळानुसार भेटवस्तूचे स्वरूप बदलत गेले तरी त्यामागील भावना मात्र टिकून आहेत हेच आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.

हा दिवाळी पाडवा आणि नूतन वर्ष सर्वांनाच आनंदाचे ,सुखसमृद्धीचे जावो. निसर्गावर मात करण्यापेक्षा निसर्ग मित्र बनून आपल्या मूळ संस्कृतीचे जतन करण्याचा संकल्प करू! शुभ दीपावली !

? ? ?

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गोव्यातील नरकचतुर्दशी…. ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ गोव्यातील नरकचतुर्दशी.. ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे 

आपण जशी आतुरतेने दिवाळीची वाट पहात असतो तशी गोवेकर मंडळी दिवाळीची वाट पहात असतात.

गोवा म्हटले की आपल्याला तिथला ख्रिसमसची आठवण होते तसे इथल्या दिवाळीचे वेगळेपण आहे गोव्यात गणेशोत्सव प्रमाणे दिवाळी उत्साहाने साजरी केली जाते उत्तर प्रदेशात दसऱ्या दिवशी रावणाचे दहनकेलं जातं तसं नरक चतुर्दशी दिवशी नरकासुराच्या प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा गोव्यात आहे.एक वर्ष गोव्यात असताना हा सोहळा पहाण्याचा योग आला.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुराच्या प्रतिमा उभारल्या जातात. ह्या प्रतिमा अगदी ऐंशी फुटापर्यंत आणि अक्राळविक्राळ बनविल्या जातात अशी माहिती मिळाली. पुण्यातील गणेश उत्सवाप्रमाणे ढोल,ताशा झांजे गजरात मिरवणूक काढली जाते., त्यांची स्पर्धा ठेवली जाते. या प्रतिमा तयार करण्यासाठी घराघरातून वर्तमानपत्र रद्दी व कागद गोळा केले जातात., तसेच थर्माकोलचा वापरही केला जातो.ही प्रथा शेकडो वर्षापासून .सुरू आहे. गोवा मुक्ती संग्रामानंतर नरकासुराच्या प्रतिमेचे दहन केले गेले आणि पुढे ही पद्धत सुरू झाली अशी माहिती मिळाली.

  पूर्वी दिवाळीच्या सुमारास भाताचे पीक निघाले की शेतातील तण, घराच्या आजूबाजूचे गवत,सुका पालापाचोळा यापासून नरकासुराच्या प्रतिमा तयार करत यातूनच आजचे नरकासुराचे महाकाय रूप तयार झाले.

गोव्यामध्ये पणजी, मडगाव,फोंडा, म्हापसा वास्को याठिकाणी मोठमोठ्या प्रतिमा उभ्या केल्या जातात. हल्ली कारखान्यात मुखवटे बनवले जातात ,  काही कुटुंबे नरकासुराचे मुखवटे तयार करण्याचे काम करतात. नरकचतुर्दशीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून दिवाळीच्या पूर्वसंध्येला उभारलेल्या नरकासुराच्या प्रतिमेचे नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे दहन करतात .हा सोहळा पाहण्यासाठी खूप लोक येतात. त्यानंतर अभ्यंगस्नान करून दिवाळीचा फराळ केला जातो.  दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, नात्यांचा उत्सव तसाच खाद्यपदार्थांचा उत्सव आहे. फराळ म्हटले की लाडू करंजी ,चकली, शंकरपाळी आलीच.पणगोव्यात पहिल्या दिवशी मात्र फोवच म्हणजे पोह्यांचे पांच प्रकार करतात.गोडाचे पोहे त्यात गुळ आणि ओला नारळाचा चव घालतात,तिखसे फोव हिरव्या मिरच्या व ओले खोबरे घालून करतात,ताकाचे फोव ताकातभिजवून त्यात मिरची कोथिंबीर घालतात, आगीचे फोव म्हणजे सोलकढीत भिजवलेले आणि फोटो फोव फोडणी करून केलेले पोहे . हा फराळ करून मग एकामेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात.  हल्ली बऱ्याच घरात दिवाळीचा फराळ आपल्या सारखा बनवला जातो.

ह्या काळात सुट्टी असल्यामुळे पर्यटक हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी करतात.आणि या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचा आनंद लुटतात.

 

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लहानपणीची दिवाळी ☆ सौ कुंदा कुलकर्णी

सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ लहानपणीची दिवाळी ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆ 

आनंदाची दिवाळी

घरी बोलवा वनमाळी

घालिते मी रांगोळी

गोविंद गोविंद—–

अशी गीते गात शेणाने सारवलेल्या स्वच्छ अंगणात रांगोळी काढत आमची दिवाळी सुरू व्हायची. बांबूच्या कामट्या आणि रंगीत कागद वापरून केलेला आकाश कंदील घरावर उंच   टांगलेला असायचा.

आईच्या हाताखाली फराळ करताना जाम मजा यायची. घराची साफसफाई , देवघर, तुळशीवृंदावन धुवून रंगवून ठेवलेले असायचे.

फराळाची सुरुवात शकुनाच्या करंजीनेच करायची असा जणू अलिखित नियम होता. त्यातही सुरुवातीला मोदकच करायचा गणपतीला नैवेद्य दाखवायचा हेही पूर्वापार चालत आलेले. करंजीचे पीठ म्हणजे रवा मैदा  आई निरशा दुधात भिजवायची त्यामुळे करंजी खुसखुशीत व्हायची व सोवळ्यात राहायची. नरक चतुर्दशीला पहाटे देवाला नैवेद्य दाखवून मगच आम्हाला खायला मिळायची. करंज्या झाल्या की लगेच चिरोटे, शंकरपाळी, रव्याचे व बेसनाचे लाडू,

साध्या भाजणीची खमंग कडबोळी व विशिष्ट भाजणीची चकली तयार व्हायची. त्याच तळणीच्या तेलात चिवडा परतायचा की झाला  फराळ संपन्न. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आई दहीपोहे करायची व त्या दिवशी हवा तितका फराळ खा म्हणायची. नंतर मात्र ती देईल तितकेच आम्ही आनंदाने खात असू. घरोघरी फराळाची ताटे फिरत असत.

दिवाळी हा सणांचा राजा——–

मांगल्याचा, प्रकाशाचा, खमंग फराळाचा, गोड-धोड पक्वान्नांचा, जल्लोषी फटाक्यांचा, बाळगोपाळांनी कल्पकतेने साकारलेल्या किल्ल्यांचा, रंगीबेरंगी आकाशकंदीलांचा, भेट कार्ड देऊन साधणाऱ्या जिव्हाळ्याचा, झेंडूची फुले, आंब्याची पाने यांनी बनवलेले तोरण दाराशी बांधून सर्वांचे स्वागत करण्याचा, सुंदर सुंदर रांगोळ्यांचा,  पणत्यांच्या दीपोत्सवाचा, कोर्‍या करकरीत कपड्यांचा, फुलांनी सुगंधित झालेल्या देवघराचा, जावईबापूंच्या दिवाळसणाचा, पाडवा , भाऊबीज साजरे करून त्यातील नात्यांचा गोडवा वाढवणारा , सर्वांना तृप्त करणारा हा सण.

उगारला चाळीमध्ये मुले किल्ला, आकाश कंदील व तोरणे करत असत. आम्ही मुली फराळ व रांगोळ्या यात आमचे कौशल्य दाखवत असू. सगळेच मध्यमवर्गीय पण मिळेल त्यात समाधान मानून आपले काम जास्तीत जास्त चांगले करायची धडपड सगळेजण करायचे.सांगलीचे एक काका दरवर्षी फटाके विकायला यायचे. त्यांच्याकडूनच वडील मंडळी.  खरेदी करायचे. केवढा आनंद व्हायचा. मिळेल तो वाटा पुरवून पुरवून वापरायचा. बायका भाजणीचे पीठ, अनारसा पीठ, करंज्यांचे सारण, घरीच मन लावून करायच्या.” इन्स्टंट चा जमाना” अजून आलेलाच नव्हता.

वसुबारसेला दिवाळीची सुरुवात व्हायची. मूल झालेल्या प्रत्येक बाईने त्या दिवशी उपवास करायचा असे आई सांगायची. त्यामुळे आपली. मुलेबाळे आरोग्यसंपन्न व सुखासमाधानात राहतात असा तिचा दृढ विश्वास होता. संध्याकाळी गायवासराची पूजा प्रार्थना करताना वेगळा आत्मविश्वास यायचा.

धनत्रयोदशीला सगळ्यांच्या दिव्यांच्या वातीचे टोक दक्षिण दिशेला. त्याला मनोभावे नमस्कार केला की अपमृत्यु टळतो हे आजही पटत आहे. त्यादिवशी  बायकांची दिवाळी असायची. सुवासिक तेल , शिकेकाई भरपूर गरम पाणी घेऊन साग्रसंगीत नहाणे व्हायचे. पित्त होऊ नये म्हणून गोड शिरा खायचा. दुपारी पाट , रांगोळी, उदबत्ती, एखादे पक्वान्न असे उदरभरण झाले की गोविंदविडा खायचा. अशी चैन असायची. एका दिवाळीला आजोळी चिकुर्डे येथे गेलो होतो. आजोबा नामांकित वैद्य  असल्यामुळे त्यांनी मनोभावे केलेली  धन्वंतरीची पूजा आजही आठवते.

नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान केले नाही तर नरकात जावे लागते असा  धाक असल्यामुळे सगळे पहाटे उठून अभ्यंग स्नान करीत असत. आई सर्वांना औक्षण करायची. मग नवे कपडे, वडील मंडळींना नमस्कार, त्यांनी तोंड भरून दिलेले आशीर्वाद, पोटभर फराळ, फटाके उडवणे, दुपारी सुग्रास भोजन, एखादी डुलकी संध्याकाळी थाटामाटात लक्ष्मी पूजन , हळदी कुंकू अशी धमाल असायची.

पाडव्याला पत्नीने पतीला सुवासिक तेल लावून आंघोळ घालावी व आंघोळ घालतानाच ओवाळावे अशी पद्धत होती. महागडी बक्षिसे देण्याची पद्धत नव्हती. बायका देखील हट्ट करत नव्हत्या. भाऊबीजेला बंदा रुपाया मिळाला की आम्ही बहिणी हुरळून जायचो. उगारला कानडी लोक खूप. भाऊबीजेच्या दुसरे दिवशी त्यांच्याकडे

“आक्कनतदगी ” म्हणजे “आक्काची तीज” अर्थात आक्काची तृतीया असे. त्यादिवशी भाऊ बहिणीला ओवाळून भेट देत असे .कधीकधी आम्ही दिवाळीला आमच्या मूळ गावी वाळव्याला जात असू. तिथे मोठ्ठ घर होतं. पडवीत गाई-म्हशी पाडसं होती. खूप मोठ्ठा ओटाहोता . तिथे गाईच्या ताज्या शेणा ने सारवून शेणाचे गोकुळ आम्ही बहिणी उत्साहाने तयार करत असू. गोप गोपी कृष्ण राधा तुळशी वृंदावन उखळ मुसळ जाते गाय वासरू सारे निगुतीने तयार करत असू. बलीप्रतिपदेला भलामोठा बळीराजा बनवताना मला फारच मजा यायची. पांडव पंचमीला पाच पांडव, द्रौपदी, कृष्ण, बलराम , राधा , सत्यभामा, रुक्मिणी , यशोदा, गोपी असे आठवून आठवून खूप पात्र॔ उभी करतांना दुपार होऊन जायची. आईचा स्वयंपाक तयार असायचा. मग आम्ही प्रत्येक पात्रासमोर शेणाची ताटली ठेवून सर्व जेवण वाढत असू.

त्यावेळी दिवाळीच्या पहिल्या दिवशी परटिणीचा मान असायचा. घरोघरी जाऊन ती पुरुषांना ओवाळायची. प्रत्येक जण यथाशक्ती ओवाळणी द्यायचे.

आता जमाना बदलला. जुने रीतिरिवाज मागे पडले. जागेची अडचण, वेळेची कमतरता, आधुनिकतेचे फॅड यामुळे दिवाळी साजरी करण्याच्या कल्पना बदलत चालल्या.सुट्टी त बाहेर भटकणे बाहेरचे खाणे सहली काढणे यात या पिढीला रस आहे. आनंदाच्या कल्पना बदलत चालल्या आहेत.” कालाय तस्मै नम:”

 

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवाळी  कालची आणि आजची.. भाग –1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ?  मनमंजुषेतून  ?

☆ दिवाळी  कालची आणि आजची.. भाग –1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

भारतीय संस्कृती ही  निसर्गाधिष्ठित  तर आहेच,पण त्याचप्रमाणे विज्ञाननिष्ठ अशी महान संस्कृती आहे.सण , उत्सव  हे ही निसर्गाला अनुसरूनच आहेत.

सगळ्या सणांचा राजा म्हणजे दिवाळी.दिव्यांच्या ओळी .तेल आणि वात यांची ज्योती तोच दीप.पूर्वी अंगणात  दिव्यांच्या ओळी प्रज्वलित करत असत.आज जागे अभावी एखादी पणती आणि रंगबिरंगी लाईटच्या माळा लावलेल्या जातात.पूर्वी  दारात अंगणात सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून सडा टाकून  रंग भरून मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जायच्या.आज मोठ्या शहरात लहान जागेत कुंदनच्या तयार  रांगोळ्या ठेवून  हौस भागवली जाते.दिवाळी हा सण खरा कृषीवलांचा सर्वोच्च आनंदाचा सण. घरात आलेली धान्यलक्ष्मी हीच धनलक्ष्मी. गोठ्यात असंणार  जित्राब गाई ,म्हशी, बैल ,वासरे यांची दिवाळी.सगळ्यांच्या कष्टातून आलेलं धन  त्याची पूजा ही दिवाळी.70 वर्षापूर्वीची माझ्या आठवणीतली आणि आजची. दिवाळी यामध्ये  खूप फरक पडलेला मी पहातेय. एकशे वीस वर्षापूर्वी कवी केशवसुतांनी दिवाळी छान वर्णन केली आहे भिंती रंगविल्या नव्या फिरूनिया केली नवी आंगणे…….. पूर्वी अंगणात मातीचे किल्ले छोटे गाव शेत केल जायचं. पण आज अंगण खूपच कमी ठिकाणी असली तरी आहे त्या जागेत सजावट करून कृत्रिम किल्ले आणून ठेवले जातात खरा लोकसंस्कृतीचा अभ्यास करायचा असेल तर खेड्यात जायला हवं. माझ्या लहानपणीची दिवाळी मला आठवते. शेणाने अंगण सारवून शेणाच्याच  गवळणी, विहीर, जात ,दळणारी बाई असे अनेक प्रसंग, म्हणजे गावगाडा करायचा. शेतातील झेंडूचे फुले त्यावर खोचायची. रोज पहिलं काढायचं आणि नवीन करायचं पांडव पंचमी दिवशी पांडव, द्रौपदी, उठून बसलेला बळीराणा , त्यांच्यासमोर ताट,वाट्या  भांडी सगळ  शेतातच. त्या ताटांमधे थोडं,थोडं फराळाच घालायचं वरती जोंधळ्याच्या  धाटांचा मांडव करायचा. मात्र शेणाची कधी घाण वाटली नाही. आज हे चित्र क्वचितच पहायला मिळेल. पूर्वी दिवाळीच्या अगोदर कामट्या आणून, तासून ,चिरमुरे कागद लावून आकाश दिवे  घरी करत असत. आता बाजारात नवनवीन रंग बिरंगी आकाशदिवे मिळतात. वेळ आणि कष्टही वाचले. पूर्वी दिवाळीची अपूर्वाई म्हणजे नवीन कपडे. सर्वसामान्यपणे एक कपडा दांडीवर आणि एक  अंगावर  असे असायचे. त्यामुळे वर्षातून एकदा दिवाळीला नवीन कपडे घेणे असायचेच. आता कपडा आवडला की घेतला, असे नेहमीच कपडे घेणे चालू असते. त्यामुळे पूर्वीचा दिवाळीच्या कपडे खरेदीचा आनंद हा वेगळाच होता. आणखी महत्त्वाचा भाग म्हणजे फराळाचे पदार्थ. पूर्वी फराळाचे अनेक प्रकारचे पदार्थ करत असत . वर्षातून एकदाच सगळं  व्हायचं. जवळच्यांना फराळाचे डबे द्यायचे असायचे. बारा बलुतेदारांना फराळ द्यावा लागायचा. आज शहरात आणि त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबात ऑर्डरचे आणि मर्यादित पदार्थ असल्याने ते शक्य होत नाही. आता सर्व पदार्थ कायम मिळत असल्याने त्याचे अप्रूप वाटत नाही. पूर्वी दिवाळीची चाहूल लागली की सासरी गेलेल्या मुली माहेरासाठी आसुसलेल्या असायच्या. मायबापही मुली नातवंडे येणार, म्हणून मनाचे मांडे रचत असत. आता मुलींना माहेरी जाण्यापेक्षा कुटुंब आणि ग्रुपने ट्रीपला जाण्यात, मौजमजा करण्यात जास्त ओढ वाटते. पूर्वी दिवाळीला पाहुणे आले की आनंद व्हायचा तो एक नात्यांच्या  गुंफणीचा  उत्सव असायचा. विभक्त कुटुंबात पाहुणे येणे हे प्रमाण खूप कमी झालेलं आहे.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! बंपर दिवाळी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? बंपर दिवाळी ! ?

“नमस्कार पंत, हा तुमचा पेपर. निघतो जरा घाईत आहे.”

“जाशील रे मोऱ्या, जरा घोटभर चहा घे आणि मग निघ, काय ?”

“बरं, आता तुम्ही इतका आग्रह करताच आहात तर…”

“अरे माझं जरा कामं होतं, म्हणून म्हटलं चहा पिता पिता बोलू !”

“पंत, आज गंगा उलटी कशी काय वाहायला लागली ?”

“म्हणजे ?”

“पंत मी नेहमी तुमच्यकडे काहीतरी कामं घेऊन येतो, सल्ला मागायला येतो आणि आज….”

“अरे गाढवा, गंगेला सुद्धा कधीतरी वाटत असेल नां, प्रवाहाच्या उलट वहावं म्हणून ! ते सगळं असू दे, मला सांग तुझी ती चाळीतली दुसरी खोली रिकामीच आहे नां अजून, का कोणी भाडेकरू ठेवला आहेस ?”

“नाही पंत, अहो ती रिकामीच आहे. गावाकडचे पै पाहुणे आले की बरी पडते वापरायला !”

“हे बरीक चांगल झालं!”

“चांगल झालं म्हणजे ?”

“अरे चांगल म्हणजे, मला ती खोली जरा वापरायला देशील का ?”

“पंत, हे काय विचारण झालं ? काही सामान वगैरे ठेवायच होत का ?”

“हो रे मोऱ्या, दोन नवीन मोठे led tv ठेवायचे होते !”

“मग पंत, त्यासाठी आख्खी खोली कशाला ? माझ्या राहत्या घरी मी ठेवतो की !”

“अरे नुसते दोन tv नाहीत, आणखी बरंच सामान आहे रे !”

“बरंच सामान म्हणजे, मी नाही समजलो! आणि मुळात तुमच्याकडे एक tv ऑलरेडी असतांना हे दोन नवीन LED कशाला घेतलेत ?”

“आता तुला सार काही सविस्तर सांगतो. अरे आमच्या पमी आणि सुमीच लग्न आहे दोन महिन्यांनी, हे तुझ्या कानावर आलं असेलच !”

“हो, बायको म्हणाली मला तसं चार पाच दिवसापूर्वी. त्या दोघींचे लग्न एकाच मांडवात लागणार आहे म्हणून.”

“हो रे, माझे दोन्ही जावई मला खरोखरचं भले भेटले बघ, म्हणून तर एकाच मांडवात एकाच दिवशी दोघींची लग्न लागणार आहेत. एका लग्नाच्या खर्चात दोन लग्न !”

“हे चांगलंच आहे पंत आणि म्हणून मला वाटलं तुमचे पाहुणे वगैरे येणार त्यासाठी तुम्हाला खोली वापरायला हवी आहे.”

“नाही रे. अरे सध्या दिवाळी ऑफर चालू होती LED tv ची, एकावर एक फ्री ! म्हणून म्हटलं घेऊन टाकू एक सुमीला आणि एक पमीला !”

“अस्स होय, पण मग tv शिवाय आणखी काय काय सामान ठेवायचं आहे पंत त्या खोलीत ?”

“अरे सध्या दिवाळी मुळे offer चा नुसता सुकाळ आहे बघ ! सोफा कम बेडचा सेट घेतला तर त्यावर मोठ डायनींग टेबलं आणि आठ खुर्च्या मोफत ! बोल आहेस कुठे ? म्हणून म्हटलं…..”

“घेऊन टाकू सोफा कम बेडचा सेट, जो होईल पमीला आणि डायनींग सेट सुमीला, काय बरोबर नां ?”

“अगदी बरोबर बोललास मोऱ्या !”

“पण पंत, हे सगळं सामान जरी माझ्या खोलीत ठेवलं तरी माझी अर्धी खोली रिकामी….”

“रहाणार नाही, याची गॅरंटी देतो मी !”

“म्हणजे ?”

“अरे अजून मला त्या खोलीत एक मोठं गोदरेजच कपाट आणि त्यावर फुकट मिळणारी मोठी लाकडी शो केस ठेवायची आहे नां !”

“अरे बापरे, त्या वस्तूंची पण काही स्कीम चालू आहे का ?”

“हो ना रे मोऱ्या ! अरे गोदरेज कपाटावर एक लाकडी मोठी शोकेस फुकट आहे कळल्यावर म्हटलं घेऊन टाकू लग्नात द्यायला, एक….”

“सुमीला आणि एक पमीला, काय बरोबर नां ?”

“बोरोब्बर ओळखलंस मोऱ्या !”

“पंत तरी पण माझी खोली….”

“अजून सामान आहे म्हटलं !”

“काय ?”

“अरे अजून त्या खोलीत दोन मोठे टिबल डोर फ्रीज, दोन मोठे मायक्रो वेव्ह, दोन डिनर सेट, दोन व्ह्याकूम क्लीनर आणि दोन डिश वॉशर पण ठेवायचे आहेत, एकावर एक फ्री मिळालेले !”

“बापरे, म्हणजे त्या दोघींच्या नवीन संसाराला लागणाऱ्या सगळ्या वस्तू तुम्ही देताय म्हणा की.”

“अरे मला दोनच मुली आणि दोघींच्या घरच्यांनी काहीच मागितल नसलं, तरी आपण समजून नको का द्यायला  ?”

“ते ही खरचं म्हणा ! पण पंत त्या दोघी लग्न लागल्यावर राहणार कुठे ?”

“अरे तुला सांगतो त्यांच्या रहायच्या जागेची सोय पण मीच करून ठेवली आहे !”

“काय सांगताय काय आणि ती कशी काय बुवा ?”

“अरे त्याच काय झालं विरारच्या एका बिल्डरची ऑफर होती, एका फ्लॅटवर एक फ्लॅट फ्री म्हणून, म्हटलं घेऊन टाकू एक सुमीला होईल आणि एक पमीला होईल !”

“खरंच कमाल झाली तुमची पंत ! पण तुम्हाला एक खाजगी प्रश्न विचारला तर राग नाही नां येणार ?”

“अरे मोऱ्या, राग कसला बोल तू बिनधास्त !”

“तसं नाही पंत, आता तुम्ही एवढा सगळा खर्च करताय तर त्यासाठी भरपूर पैसे पण लागले असतीलच नां ?”

“अर्थातच मोऱ्या ! अरे एकावर एक वस्तू किंवा जागा फुकट असली तरी पहिल्या वस्तूला पैसे हे मोजावेच लागले मला !”

“मी तेच म्हणतोय, तुम्ही तर गेल्या वर्षी म्युनिसिपालिटी मधून रिटायर झालात आणि इतका खर्च एकदम कसा काय झेपला तुम्हाला पंत ?”

“मला वाटलंच, तू हा प्रश्न नक्की विचारणार म्हणून ! अरे माझ्या या सगळ्या खर्चाची तरतूद आपल्या मायबाप महाराष्ट्र सरकारनेच केली आहे बघ !”

“ती कशी काय पंत ? मी नाही समजलो !”

“मोऱ्या, चाळीत कोणाला बोलू नकोस, तुला म्हणून सांगतोय ! अरे मला आपल्या राज्य सरकारच्या लॉटरीच दिवाळी बंपर सोडतीच दोन कोटी रुपयांचे पाहिलं बक्षीस लागलंय, आहेस कुठे ?”

“धन्य आहे तुमची पंत !”

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ भीमसेन जोशी ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत –  भीमसेन जोशी ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

कंठात दिशांचे हार

निळा अभिसार

वेळुच्या रानी

झाडीत दडे

देऊळ गडे, येतसे

जिथुन मुलतानी

— कविवर्य ग्रेस

ह्या गूढ शब्दचित्रांतून ऐकू येणारा पवित्र पण घनगंभीर सूर मला भीमसेनजींच्या सुरासारखा भासतो.

ज्या वयात मुलं सवंगड्यांशी खेळण्यात रममाण असतात त्या अवघ्या अकराव्या वर्षी सुराचा ध्यास घेऊन गुरूच्या शोधात पंडितजी कर्नाटकातील गदग येथून घर सोडून निघाले. केवळ तो ध्यास त्यांना ‘मैफिलीचा बादशहा’ होण्यापर्यंत घेऊन गेला आणि हा मैफिलीचा बादशहा भारतीयांच्या गळ्यातील ताईत तर झालाच, शिवाय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायनशैली जगभरात पोहोचवण्याचं महान कार्य त्यांनी केलं. अर्थात, तिथवर पोहोचण्याचा मार्ग सुलभ नव्हता. मात्र नियतीनं त्यांना सुराचा जो ध्यास दिला होता तो सूर त्यांना सापडावा हीसुद्धा तिचीच योजना होती.

रिक्तहस्तानं अंगावरच्या कपड्यानिशी गुरूच्या शोधात बाहेर पडलेल्या ह्या लहानग्या भीमसेनला जशी बऱ्याचदा परिस्थितीची ठोकर खावी लागली तसेच काही आधाराचे हातही लाभले. त्यात दोन भजनं म्हणून दाखव मग तुला पोटाला दोन घास देत जाईन’ असं म्हणणारा समृद्ध विचारांचा अन्नापदार्थांचा गाडीवाला असो किंवा काही कालावधीनं थोड्याफार मार्गदर्शनाचा लाभ झाल्यावर भीमण्णांनी रियाज सुरू केला तेव्हां ‘रोज इतका रियाज करतोस तर ताकद टिकून राहाण्यासाठी हे घ्यायलाच पाहिजे’ असं म्हणून आपल्या गायीचं निरसं दूध त्यांना आग्रहानं प्यायला लावणारी गंगव्वा असो!

अगदी लहानपणी जानप्पा कुर्तकोटी, माधव संगीत विद्यालयातील कृष्णराव पंडित व राजाभैया पूछवाले ह्यांच्याकडून लाभलेल्या थोड्या ज्ञानासोबत बाहेर पडलेल्या पंडितजींना त्यांच्या भ्रमंतीत ग्वाल्हेरचे सुप्रसिद्ध सरोदवादक हाफिज अली खान, खडकपूरचे केशव लुखेजी, कलकत्त्यचे पहाडी सन्याल, दिल्लीतील चांदखान साहेब, जालंधरचे अंध धृपदिये मंगतराम अशा अनेक लोकांचं शिष्यत्व पत्करून जमेल तेवढा ज्ञानार्जनाचा प्रयत्न केला. शेवटी जालंधरच्या संगीतसंमेलनात भेटलेल्या पं. विनायकबुवा पटवर्धनांनी त्यांना सल्ला दिला की, ‘तुमच्या स्वत:च्या गावाजवळच कुंदगोळ येथे सवाई गंधर्व राहातात, त्यांच्याकडं तालीम घ्या.’ त्यांच्या सल्ला मानून पंडितजी घरी परतले आणि सवाई गंधर्वांकडं त्यांची तालीम सुरू झाली. सुरुवातीला भीमसेनजींना विशेष काही न शिकवता त्यांच्या निष्ठेची फक्त चाचपणी सुरू होती. मात्र त्यांची प्रामाणिक लगन लक्षात आली तसं सवाई गंधर्वांनी ह्या शिष्याला मनापासून घडवायला सुरुवात केली. सुरुवातीला एक वर्ष एकाच रागाची तालीम सुरू होती. नंतर आलापीप्रधान असलेल्या किराणा घराण्याच्या सर्व प्रमुख रागांची तालीम दिली गेली. पुढच्या कालावधीत एक वर्षभर रामपूरला उस्ताद मुश्ताक हुसेन खान साहेबांकडेही भीमसेनजींनी तालीम घेतली.     

एक असामान्य कलाकार अस्तित्वात येताना त्याची ज्ञानलालसा किती पराकोटीची असते ह्याचं नेमकं उदाहरण म्हणजे पंडित भीमसेन जोशी! आपल्याला देहभान विसरायला लावणारा दमदार सूर ‘कमावताना’ पंडितजींनी ज्ञानार्जनासाठी किती मार्ग चोखाळले, किती कष्ट सोसले आणि केवढी साधना केली हे फक्त त्यांचं तेच जाणोत! स्वत: हे सगळं सोसून रसिकांना अलगद वेगळ्या विश्वाची सफर घडवून आणण्याऱ्या आपल्या लाडक्या पंडितजींचं न फेडता येण्यासारखं ऋण आपल्यावर आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच ‘संतवाणी’चा प्रवाह स्वत:च्या संगीतात सामावून घेतल्यानं भारताच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येक मनात त्यांनी घर केलं. त्यांच्या ‘संतवाणी’वर लोकांनी अलोट प्रेम केलं. याशिवाय ठुमरी, कन्नड भजनं, हिंदी भजनं, भावगीत इ जे जे प्रकार त्यांनी हाताळले ते सगळेच त्यांनी ‘कमावलेल्या’ दमदार, बुलंद आवाजानं झळाळून उठले.

स्वत:च्या गुरूंच्या नावानं त्यांनी सुरू केलेला आणि अखंड सुरू राहून आता सत्तरीच्या उंबरठ्याशी आलेला सवाई गंधर्व महोत्सव म्हणजे त्यांच्या गायकीच्या बरोबरीनं संगीतक्षेत्राला लाभलेलं त्यांचं आणखी एक योगदान आहे. हे व्यासपीठ निर्माण करून शास्त्रीय संगीतातील गुणी कलाकारांना रसिकांसमोर येण्याची केवढी मोठी संधी त्यांनी प्राप्त करून दिली. एका ध्येयानं प्रेरित होऊन गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मनापासून वर्षानुवर्षं साधना करणारे निष्ठावंत कलाकार मैफिलीत गाण्याएवढे तयार झाले असं त्यांच्या गुरूंना वाटलं की ‘सवाई गंधर्व महोत्सवा’पासून त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला सुरुवात व्हायची. `तिथं गाणार आहे म्हणजे चांगला अभ्यासू कलाकारच असणार’ हे गणितच ठरून गेलं होतं. भीमसेनजींच्या पुढच्या पिढीतील आजच्या सर्व नावाजलेल्या कलाकारांचं ‘नावारुपाला’ येणं त्यांच्या आशीर्वादानं ह्या व्यासपीठावरूनच सुरू झालं असावं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्वत: कलाकार असूनही सर्व कलाकारांना एकत्र आणणारा असा संगीतसोहळा सातत्यानं करत राहाणं हे त्यांच्या गायकीइतक्याच विशाल असलेल्या त्यांच्या मनोवृत्तीचं द्योतक आहे. अशा सर्वार्थानं संपन्न ‘भारतरत्ना’स सादर वंदन!

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिन दिन दिवाळी – भाग-2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  विविधा ?

☆ दिन दिन दिवाळी – भाग-2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

दारावरती तोरण, अंगणी 

               ताजी सडा – रांगोळी 

                        अवतीभवती लखलखती 

                                     सांगती पणत्यांच्या ओळी 

                                                  आली, आली दिवाळी आली ——

——– दिवाळी आली आणि घरोघरी जराशी विसावली की मग ती दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते “ नरकचतुर्दशी “ या नावाने. या दिवशी नरकासुर या राक्षसाचा, कृष्ण, सत्यभामा, आणि काली यांनी वध केला, आणि त्याचा आनंद यादिवशी साजरा केला जाऊ लागला, अशी पुराणकथा तर सर्वश्रुतच आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी, म्हणजे चंद्रप्रकाशात , वाटलेले तीळ अंगाला चोळून मग अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे, आणि असे केल्याने, दारिद्र्य, दुर्दैव आणि अनपेक्षित अप्रिय घटना, यापासून संरक्षण होण्यास मदत होते, असेही मानले जाते. नंतर नरकासुराचे प्रतीक म्हणून 

‘करट‘ नावाचे छोटे फळ पायाने चिरडणे, अशासारख्या प्रथाही आहेत. विचारांती असे जाणवते की या प्रथा-पद्धतींमागचा खरा आणि उदात्त हेतू हाच असावा की, ‘ आळस , वाईट विचार आणि त्यामुळे घडणारी वाईट कृत्ये यामुळे आयुष्यात नरकसदृश परिस्थिती निर्माण होते याची जाणीव सर्वच माणसांना व्हावी, आणि सर्वांच्याच आयुष्याला  सज्ञानाचा, सत्प्रवृत्तींचा , आणि सत्कर्मांचा प्रकाश सदैव व्यापून रहावा.’  

या दिवसाला — काळी चतुर्दशी, रूप चतुर्दशी, छोटी दिवाळी, भूत चतुर्दशी, काली चौरस, आणि नरक-निवारण चतुर्दशी– अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. 

हा दिवस वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो— 

कालीमातेने नरकासुराचा वध केला होता असे मानून काही भागात यादिवशी महाकाली म्हणजे शक्तीचे पूजन केले जाते. 

काही तमीळ कुटुंबांमध्ये या दिवसाला “ नोम्बू “ असे म्हणतात, आणि याच दिवशी लक्ष्मीचीही पूजा केली जाते.

कर्नाटकात तसेच गोवा आणि तामिळनाडूमध्ये दिवाळी वसुबारसेला नाही, तर नरकचतुर्दशीला सुरु होते, असे मानतात. 

राजस्थान-गुजरातमध्ये याला “ काली चौरस “ असे म्हणतात. दुष्ट आत्मे आणि दुष्ट माणसांची काळी- म्हणजे वाईट नजर कोणावर पडू नये म्हणून कुलदेवतेचे पूजन केले जाते. याच सुमारास शेतातले नवे धान्य घरात आलेले असते, त्यासाठी यादिवशी देवाचे आभार मानले जातात. 

गोव्यात कागद-गवत आणि फटाके यापासून नरकासुराचा प्रतीकात्मक पुतळा बनवून, त्याचे दहन केले जाते. तिथेही ‘ करट ‘ हे कडू फळ पायाखाली चिरडून जणू नरकासुराला चिरडून मारतात.  

पश्चिम बंगालमध्ये कालीपूजेचा आदला दिवस “ भूत-चतुर्दशी “ म्हणून पाळला जातो. तिथे असा विश्वास बाळगला जातो की, या दिवशी आधीच्या चौदा पिढयांमधल्या पूर्वजांचे आत्मे आपल्या कुटुंबातल्या हयात असलेल्या नातेवाईकांना भेटायला येतात. त्यावेळी त्यांना घराचा रस्ता कळण्यासाठी आणि घराभोवती घुटमळणाऱ्या दुष्ट आत्म्यांना आणि दुष्ट शक्तींना हुसकावून लावण्यासाठी घराभोवती चौदा दिवे लावले जातात. घरातले अंधारे कोपरे-कोनाडे प्रकाशाने उजळून टाकले जातात. 

दक्षिण भारतातील काही भागात या दिवसाला “ दीपावली भोगी “ असे म्हटले जाते. म्हणजे दिवाळीचा आदला दिवस.

“विविधतेत एकता “ हे आपल्या देशाचे अनेक बाबतीत दिसणारे वैशिष्ट्य या दिवशीही प्रकर्षाने दिसून येते, कारण हा दिवस वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या चालीरीतींनुसार साजरा केला जात असला, तरी प्रत्येक ठिकाणी त्यामागील विचारात मात्र “संपूर्ण एकता “ आहे, असे निःशंकपणे म्हणायला हवे — आणि तो विचार म्हणजे– माणसाच्या मनातल्या विनाशकारक दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट विचार-आचार, घातक सवयी, आणि एकूणच आयुष्य दुःखदायक आणि नरकसदृश्य  करणाऱ्या सगळ्याच गोष्टींचा संपूर्ण विनाश व्हावा, आणि संपूर्ण मानवजातीलाच आनंदी- शांत- समाधानी, असे साफल्याने उजळलेले संपन्न आयुष्य जगता यावे. हाच विचार नरकासुरासारख्या इतर कितीतरी उदाहरणांचा प्रतीकात्मक उत्तम उपयोग करून, विविध सणांच्या माध्यमातून लोकांच्या मनावर ठसवण्याचा विचार ज्या ज्या  कुणी इतका जाणीवपूर्वक आवर्जून केला असेल, त्या सर्व महान माणसांना यानिमित्ताने कृतज्ञतापूर्ण  मनःपूर्वक नमस्कार. 

यानंतरचा दिवस लक्ष्मीपूजनाचा. दिवाळीतला हा महत्वाचा दिवस. या दिवशी श्रीविष्णूंनी लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या बंदिवासातून मुक्त केले, ही पौराणिक कथा बहुतेकांना माहिती आहे. भारतीय संस्कृतीतील ही वैशिष्ट्यपूर्ण पूजा मानली जाते. कारण अमावस्या, एरवी इतर अकरा महिन्यांमध्ये अशुभ मानली जात असली, तरी अश्विन महिन्यातली ही अमावस्या मात्र अतिशय शुभ मानली जाते. अशी आख्यायिका आहे की, या अमावास्येच्या रात्री स्वतःला राहण्यासाठी योग्य असे स्थान शोधण्यासाठी लक्ष्मी सर्वत्र संचार करते. आणि ज्या घरी चारित्र्यसंपन्न, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी, आणि क्षमाशील पुरुष, आणि गुणवती, पतिव्रता स्त्रिया राहतात, त्या घरी रहाणे तिला आवडते. आत्ताच्या काळात मात्र लक्ष्मीचे हे योग्य घर शोधण्यासाठीचे जे निकष आहेत, त्यात स्त्री-पुरुष असा भेदभाव लक्ष्मीने तरी करू नये अशी तिला मनापासून विनंती करावीशी वाटते, कारण पतिव्रता या शब्दात अपेक्षित असलेला एकनिष्ठपणा, आणि गुणसंपन्नता ही दोघांमध्येही असली पाहिजे. तसेच वर उल्लेखलेले गुणही दोघांनी , किंबहुना घरात राहणाऱ्या सर्वांनीच अंगी बाळगले, तरच ते पूर्ण कुटुंब खऱ्या अर्थाने सुखी-समाधानी, आनंदी आणि इतरांना — आणि अर्थात लक्ष्मीलाही हवेहवेसे वाटेल —- पण हा विचार, काही अपवाद वगळता, जनमानसात अजून तरी म्हणावा तसा रुजलेला दिसत नाही याचा खेद वाटतो . असो.   

या दिवशी समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची संध्याकाळनंतर पूजा केली जाते. ही पूजा मुख्यतः धनलक्ष्मीची आणि कुबेराची केली जाते. पैसे, दागिने, व्यवसायाच्या वह्या, अशी चल आणि अचल लक्ष्मीची, थोडक्यात स्वतःकडे असणाऱ्या समृद्धीची ही पूजा असते.  तिच्यामुळेच आपण शक्य तितके सुखाचे जीवन जगू शकत आहोत ही कृतज्ञतेची भावनाच यावेळी म्हटल्या जाणाऱ्या आरत्यांमधून, प्रार्थनांमधून व्यक्त होतांना दिसते. लक्ष्मीबरोबर कुबेराची पूजा  का ? तर कुबेर हा देवांच्या संपत्तीचा संग्राहक समजला जातो. आणि संपत्ती कशी राखावी याची शिकवण त्यांनी द्यावी अशी प्रार्थना त्यांच्याकडे केली जाते. 

चुकीच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती “ अलक्ष्मी “ समजली जाते, जिला अजिबातच पूजनीय म्हणता येत नाही, हे मात्र ही लक्ष्मीपूजा करतांना ध्यानात ठेवलेच पाहिजे.  जिथे सर्वतोपरी पावित्र्य, शुद्धता, सत्यता, आणि भक्ती असते तिथेच लक्ष्मी निवास करते. अशा ठिकाणी धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी, आणि मुख्य म्हणजे गृहलक्ष्मीही समाधानी असणे गृहीत असते. घर स्वच्छ ठेवणाऱ्या केरसुणीचीही यादिवशी लक्ष्मी म्हणून पूजा करणारी आपली थोर संस्कृती आहे खरं तर. पण एरवी प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहता, कितीतरी घरांमध्ये गृहलक्ष्मीला केरसुणीसमानच  वागणूक दिली जात असल्याचे जाणवते. अशी घरे पाहतांना, “ यांच्याकडे लक्ष्मी म्हणजे केरसुणी “ असे उलटे समीकरण आहे की काय ? ” असा उपरोधिक प्रश्न आपसूकच पडतो. म्हणून लक्ष्मीपूजनाचे बाकीचे सोपस्कार आणि प्रार्थना करतांना, “ आता माझी गृहलक्ष्मीच  या प्रश्नाचे योग्य उत्तर देण्याइतकी सक्षम आणि पुरेशी खंबीर होऊ दे गं लक्ष्मीमाते–कृपा कर.  माझे आयुष्य- माझे घर तिच्याशिवाय समृद्ध होऊच शकणार नाही — “  ही प्रार्थनाही प्रत्येक विचारी माणसाने फक्त  यादिवशीच नाही तर नेहेमीच  करावी ही माफक अपेक्षा आहे.

ही आणि आयुष्यातली यापुढची प्रत्येकच दिवाळी सर्वांना अतिशय सुख-शांती देवो या हार्दिक शुभेच्छा.   

       

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संकेत आनंदाचा…. ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  मनमंजुषेतून ?

☆ संकेत आनंदाचा…. ☆ सौ राधिका भांडारकर 

तेव्हां आम्ही धोबी गल्लीत रहात होतो.आमचं एक माडीचं घर होतं.तसं मोठं होतं पण खालच्या मजल्यावर दोन खणी घरात भाडोत्री होते. गद्रे आणि मोहिले. तशी गल्लीत नऊ दहाच घरं होती. काही बैठी काही एक मजली. एकमेकांना चिकटून. गुण्या गोविंदाने रहात होती.

तसे किरकोळ वाद ,भांडणं ,जळुपणा होता. पण किरकोळच. बाकी गल्लीतली सलाग्रे, मथुरे, मुल्हेरकर,दिघे,आब्बास, वायचळ ही मंडळी म्हणजे एक संपूर्ण कुटुंब होतं.सर्वधर्मीय,सर्वसमावेशक. आम्ही घराघरातील सगळीच मुले एकत्र वाढलो ,खेळलो, बागडलो.एकमेकांच्या घरातलं भुकेच्या वेळी मनमुराद खाल्लं. कुठलाही सण असो,एकत्रच साजरा केला. ईद,नाताळ, दिवाळी सारेच. ईदची खीरकुर्मा, नाताळचा केक,आणि दिवाळीचे करंजी लाडू  सगळ्यांचा आनंद लुटला….

आजही त्या सणांच्या आठवणी मनाच्या कप्प्यात तितक्याच टवटवीत आहेत..

दिवाळी तर गल्लीतला सर्वात मोट्ठा सण !! कधी परिक्षा संपतात, आणि दिवाळीची मज्जा लुटतो अस्सं होऊन जायचं!!

जैन मंदीरात जाऊन संगमरवरी दगडाचे तुकडे गोळा करायचे.लपत छपत घरी आणायचे ,कुटायचे ,गाळायचे आणि वस्त्रगाळ पांढरी शुभ्र रांगोळी बनवायची.तांदळाची कांजी बनवायची- कंदील करायला. दुकानात जाऊन काठ्या, रंगीत जीलेटीन पेपर्स, सोनेरी, चंदेरी कागद आणायचे.आणि सगळ्यांनी मिळून घरोघरीचे कंदील बनवायचे. दिलीप ,शरद,हे मुख्य कलाकार.आम्ही मदतनीस. भांडणेही व्हायची पण गंमत कमी नाही झाली.

पेटत्या उदबत्तीच्या टोकाने, ठिपक्यांच्या रांगोळीसाठी कागदावर आखून भोके पाडायची.

फराळ तर मिळूनच व्हायचा.आज काय मुल्हेरकरांच्या चकल्या, नाहीतर मथुर्‍यांकडे करंज्या…कुणाचा चिवडा कुणाची शेव..सामुदायिक मान मोडून केलेला फराळ..

अवीट गोडीचा अन् चवीचा..

मृदुला रांगोळ्या काय मस्त काढायची…घरोघरी तिला डिमांड….कुठे बदकाची, कुठे मोराची….गल्लीत रांगोळ्यांचं प्रदर्शनच व्हायचे….अभ्यंग स्नानाने सारी गल्ली सुस्नात व्हायची…धनाची पूजा..राक्षस म्हणून पायाखाली चिरडलेलं ते सांकेतिक चिराटं….ईड जावो, पीडजावो..सारे सुखी राहो..ही काळोखातच  काठी आपटून केलेली प्रार्थना घरोघरी घुमायची..

रात्री तर सारी गल्ली पण त्यांच्या मंद प्रकाशात उजळून जायची….फटाक्यांचीही आतषबाजी असायचीच….

अशी खूप सुंदर दिवाळी..नव्या वस्त्रांची ,नव्या रंगांची, निर्मळ प्रकाशाची…ना कसाला देखावा,ना चढाओढ…निव्वळ आनंद..सणाचा सांकेतिक सामुदायिक उत्सव…

काळ बदलतोच. काळाबरोबर कल्पना बदलणारच. जे काल होतं ते आज कसं असणार…जीवनाची गतीच वाढली..पराकोटीच्या तांत्रिक विकासाने जग जवळ आले.  पण आत्मे विखुरले..,रेडीमेडचा जमाना आला.आयता फराळ,आयत्या रांगोळ्या..आयते कंदील..पारंपारिक सण आजही धूमधडाक्यात होतातच….मला ” ,पण..”घालून काही भाष्य नाही करायचय्..सगळ्या नव्याचं स्वागतच आहे…

नवं जपताना जुनं चांगलं राखावंं…परंपरेतलं मूळ आणि उद्देश सांभाळावे. अतिरेक टाळावा. आनंद जपावा..पर्यावरण जपावेच..सृष्टीचेही आणि नात्यांचेही…

शुभ दीपावली…!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares