मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुंदर दृष्टांत ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

☆ सुंदर दृष्टांत ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

एक संन्यासी फिरत फिरत एका दुकानावरून जात होता. त्याचे सहज लक्ष गेले त्या दुकानात बरेच लहान मोठे डबे, बरण्या होत्या. 

त्या संन्याशाच्या मनात सहज एक विचार आला आणि त्याने त्या दुकानदाराला एक डबा दाखवून विचारले की “ यात काय आहे? “  दुकानदार म्हणाला, “ त्यात मीठ आहे.”  संन्यासी बुवांनी आणखी एका डब्याकडे बोट दाखवून विचारले, “  यात काय आहे? “ दुकानदार म्हणाला, “ यात साखर आहे.“—असे करत करत बुवांनी शेवटच्या डब्याकडे बोट करून विचारले, “ आणि यात काय आहे? “ दुकानदार म्हणाला, “ यात श्रीकृष्ण आहे.” 

संन्यासी अचंबित झाला आणि म्हणाला, “ अरे या नावाची कोणती वस्तू आहे ? मी तर कधी ऐकली नाही. हे तर देवाचे नाव आहे.” 

 दुकानदार संन्यासीबुवांच्या अज्ञानाला हसून म्हणाला, ” महाराज तो रिकामा डबा आहे, पण आम्ही व्यापारी रिकाम्या डब्याला रिकामा नाही म्हणत.  त्यात श्रीकृष्ण आहे असे म्हणतो.”

बुवांचे डोळे खाडकन उघडले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले. 

ते ईश्वराला म्हणाले,  “अरे कोणत्या कोणत्या रूपाने तू ज्ञान देतोस. ज्या गोष्टीसाठी मी एवढा भटकलो, घरदार सोडून संन्यासी झालो, ती गोष्ट एका दुकानदाराच्या तोंडून मला ऐकविलीस.

परमेश्वरा मी तुझा शतशः आभारी आहे “— असे म्हणून त्याने त्या दुकानदाराला साष्टांग नमस्कार केला.

जे मन-बुद्धी- हृदय,  काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, ईर्षा, द्वेष, चांगले-वाईट आणि सुख-दुःख, अशा लौकिक गोष्टीने भरले आहे, तिथे श्रीकृष्ण म्हणजेच भगवंत कसा राहील? जे रिकामे आहे– म्हणजेच एकदम स्वच्छ आहे, अशाच ठिकाणी, म्हणजे अशाच मन, बुद्धी व हृदयात परमेश्वर वास करतो. 

लोकांना दाखवायला गीता व ज्ञानेश्वरी वाचली, किंवा एकादशीला आळंदी-पंढरपूरची वारी केली,  तरी मन-बुद्धी-हृदय जोपर्यंत रिकामे होत नाही– म्हणजे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत परमेश्वर तिथे वास करणार नाही.. 

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रारब्धाचा हिशेब ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रारब्धाचा हिशेब ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

एक दिवस एक माणूस पूर्वसूचना न देता कामावर गेला नाही.

मालकाला वाटलं ह्याचा जर पगार वाढवला तर हा काम मन लावून करेल ….

म्हणून पुढच्या वेळेस मालकाने पगाराव्यतिरीक्त त्याला पैसे वाढीव दिले ….

तो काही बोलला नाही , त्याने चुपचाप मिळालेले पैसे ठेवून दिले ….

काही महिन्यानंतर परत तसंच घडलं—तो पूर्वसूचना न देता गैरहजर राहिला …

मालकाला त्याचा खूप राग आला , आणि त्याने विचार केला की ,

याचा पगार वाढवून काय फायदा झाला ??? हा काही सुधारणार नाही …..

पुढच्या वेळेस मालकाने त्याला वाढवलेला पगार कमी करून त्याच्या हाती पगार दिला ….

त्याने कुठलीही तक्रार न करता चुपचाप पगार घेतला …

मालकाला खूप आश्चर्य वाटलं.

अखेर न राहवून त्याने त्याला विचारलं , ” मागच्या वेळेस तू गैरहजर राहिलास, तरी तुझा पगार वाढवला—तेव्हा सुद्धा तू काही बोलला नाहीस , आणि ह्या वेळेससुद्धा तू पूर्वसूचना न देता गैरहजर राहिलास,  म्हणून तुझा वाढवलेला पगार कापला. तरीही तू काही बोलत नाही,,,, असं का ??? ” 

त्यावर त्याने दिलेलं उत्तर मनाला भिडणारं होतं—-

तो म्हणाला ,“ मालक पहिल्या वेळी मी गैरहजर राहिलो त्यावेळी मला मुलगा झाला होता …

तुम्ही माझा पगार वाढवलात, तेंव्हा मी विचार केला , देवाने माझ्या मुलाचा पालनपोषणाचा हिस्सा पाठवला …. दुस-यांदा जेव्हा मी गैरहजर राहिलो तेंव्हा माझ्या आईचं निधन झाले होते. 

आणि तुम्ही माझा वाढवलेला पगार कापलात —- मी मनाशी विचार केला माझी आई तिचा वाटा तिच्या बरोबर घेऊन गेली . मग मी ह्या पगाराबद्दल चिंता का करू, ज्याची जबाबदारी खुद्द देवाने घेतली आहे … ?

तात्पर्य –

जीवनात काय मिळवलसं आणि काय गमावलसं असं जर कुणी विचारलं तर,

बेशक सांगा,

जे गमावलं तो माझा अविचार होता आणि जे कमावलं ती सद्गुरू कृपा होती.

?.

”खूप सुंदर नाते आहे माझ्यात व देवामध्ये ….”

“जास्त मी मागत नाही आणि कमी देव देत नाही … ?

यालाच प्रारब्ध म्हणतात…

जीवन खूप सुदंर आहे, कष्ट करा अन आनंदाने जगा …. ?

 

प्रस्तुति –  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सुरू…..☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

?  विविधा  ?

 ☆ सुरू….. ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

 रोज गडबडीने ग्राउंडवर फेऱ्या मारून घरी येऊन कामाला लागणारी मी रविवार असल्याने फेऱ्या मारून झाल्यावर ग्राउंडवरच एका बाकावर बसले.इकडं तिकडं बघितलं. ओळखीचं कुणी दिसलं नाही तसं सभोवताली बघू लागले आणि एका झाडाने माझे लक्ष वेधले.

सरळसोट वाढलेले ते सुरुचे झाड होते.त्याच्याकडं बघताना मनात विचार आले.आपल्या विस्ताराचा पसारा न वाढविता, आजूबाजूला न बघणाऱ्या या झाडाने आकाशाकडंच झेप घेतली की,

त्याची ही वृत्ती मला फार आवडली.ना फांद्यांचे अवडंबर ना फुलांचा मायापाश, सोस!स्वतंत्र जगण्याची ओढ असलेलातो वृक्ष मला एखाद्या व्रतस्थासारखा वाटला.

शाळेत मुलांना शिकविलेला सूचीपर्णी वृक्षांचा प्रदेश आठवला. बर्फाळ प्रदेशात आपल्या टोकदार पानांनी अंगावरचे बर्फ झटकणारा तो सुरे आणि आकाशात झेप घेणारा हा सुरु.एकमेकांचे भाऊबंदच दुसऱ्यात न अडकणारे !

त्या सुरूची मी माझ्याशी तुलना करु लागले. आपल्याला गोतावळा गोळा करण्याची हौस !त्यात अडकलेल्या मायापाशात बऱ्याचवेळा आपल्या ध्येयाचाही आपल्याला विसर पडतो. ज्याची गरज नसते त्यात गुंतून पडतो.अहंकार,  स्वार्थ जोपासतो.

‘कसला विचार करतेस?’

माझं मन मला म्हणालं, मन नव्हे तो सुरुच माझ्याशी बोलला.तशी मी सावध झाले.

‘जमेल कां आपल्याला सुरुसारखे जगणे?सोडता येईल कां मायापाश?तोडता येतील कां स्वार्थाच्या फांद्या?’

खांद्यावर असलेल्या पर्समधील मोबाईल वाजला.नाईलाजाने हातात घेतला.मुलाचा फोन होता.पटकन उठले.

‘मी नाही सुरु होऊ शकणार’

सुरुच्या झाडाकडं बघतच उठले.घरच्या ओढीने !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री क्षेत्र पद्मालय ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ? 

☆ श्री क्षेत्र पद्मालय ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

(एकाच मंदिरात दोन गणपती असणारं, भारतातील एकमेव “श्री क्षेत्र पद्मालय”:)

देवदेवतांचा पौराणिक वारसा लाभलेले आणि ३१३७ ईसापूर्व महाभारत काळातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले,  खान्देशातील श्री क्षेत्र पद्मालय,  म्हणजे संपूर्ण भारतातील श्री गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. श्री. क्षेत्र पद्मालय हे डोंगर माथ्यावर वसलेले आहे. एरंडोलहून पद्मालयला  जातांना एक छोटा घाटच चढावा लागतो. श्री क्षेत्र पद्मालय,  हे श्री गणेशांच्या साडेतीन पीठांपैकी एक पूर्णपीठ म्हणून ओळखले जाते. महाभारतातील भीम-बकासूराचे द्वंद्व,  पद्मालय येथेच झाल्याचे सांगतात.

जगात कोणत्याही गणपती मंदिरात गेल्यास,  गणपतीची एकच मूर्ती पाहावयास मिळते. मात्र,  श्री क्षेत्र पद्मालय येथे,  एकाच छत्राखाली,  एकाच सिंहासनावर,   गणरायाच्या दोन मुर्त्या दृष्टीस पडतात,  त्यात एक मूर्ती उजव्या सोंडेची व दुसरी मूर्ती डाव्या सोंडेची आहे. दोन्ही स्वयंभू प्रवाळ गणेश आहेत. ते कसे प्रकट झाले याचे वर्णन श्रीगणेश पुराणातील उपासना खंडातील ७३, ७४, ९० व ९१,  या अध्यायांत मिळतो. रिध्दिसिध्दी प्राप्त करुन देणारे हे भारतातील,  एकमेव श्री गणेशाचं जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

महाभारतात पांडवांवर,  जेव्हा अज्ञातवासात राहण्याचा प्रसंग आला,  तेव्हा ते एकचक्रानगरीत राहिले होते. ती एकचक्रानगरी म्हणजेच आजचे एरंडोल. त्या काळी, एकचक्रानगरी भोवताली घनदाट जंगल होते. तेथे बकासूर नावाचा राक्षस रहायचा. त्याची भोजनाची व्यवस्था गावकरी करायचे. त्याला रोज गाडीभर अन्न आणि  एकमाणूस खायला लागायचा. पांडव ज्या ब्राम्हणाकडे रहात,  त्याची पाळी आल्यावर,  त्याच्या ऐवजी भीम जंगलात अन्न घेवून गेला. व त्याने बकासूराचा वध केला. त्या नंतर त्याला तहान लागली. त्या जंगलात,  त्याने आपल्या हाताच्या कोपराने जमिनीवर प्रहार केला. तेथे मोठ्ठा खड्डा पडला व त्यातून पाणी निघाले. भीमाने त्या पाण्याने आपली तहान भागवली. तेच भीमकुंड. जे आजही पद्मालयला बघायला मिळते. पूर्वी या कुंडात एका खाटेची दोरी बुडेल,  इतके ते खोल होते,  असं सांगतात. आता ते गाळाने भरुन गेले आहे. एरंडोलला,  पांडवांचा वाडा अजूनही बघायला मिळतो. येथून धरणगावहून पद्मालयला  जायला भुयार होते असे सांगितले जाते. धरणगांवी दत्त टेकडीवर या भुयाराचं मुख बघायला मिळते,  ज्यातून घोड्यावर बसून प्रवास करता येत होता,  असं जुनेजाणते सांगतात. हाच तो पद्मालय आणि धरणगावातला अदृष्य बंध. म्हणून आम्हा धरणगावकरांनाही ते वैभवच वाटते. पूर्वी धरणगाव हे एरंडोल तालुक्यातच होते. आता विभाजन झाल्याने धरणगाव स्वतंत्र तालुका झाला आहे. 

पौराणिक कथेनुसार राजराजेश्वर सहस्त्रार्जुन याने केलेल्या जप-उपासनेवर प्रसन्न होवून,  येथेच त्याला उजव्या सोंडेच्या स्वरूपाने “श्री” नी दर्शन दिले. तर,  शेषनागाला शंकर भगवंतांनी टाकून दिले होते. तेव्हा,  श्री शंकरांनी पुन्हा त्याला गळ्यात धारण करावे,  यासाठी शेषाने “श्रींची” तपश्चर्या केली. त्याला डाव्या सोंडेच्या स्वरूपात श्रींनी  तलावातून दर्शन दिले. अशी आख्यायिका पुराणात आहे. म्हणून या ठिकाणी एकाच मंदिरात श्रींची दोन मनभावन रुपं प्रवाळ स्वरुपात अनुभवता येतात.      

मंदिरासमोर असलेल्या विस्तीर्ण तलावात सदैव  कमळाची फुले फुलतात. यावरून या क्षेत्राला पद्मालय असे नाव पडले आहे. पद्म म्हणजे कमळ आणि आलय म्हणजे निवास. कमळाचे निवासस्थान म्हणजे पद्मालय. हे संपूर्ण क्षेत्र पूर्वीच्या काळी घनदाट आरण्य होते. वनौषधींनी नटलेले,  निसर्ग संपदेने परिपूर्ण आणि जंगली प्राणी,  श्वापदांनी समृध्द होते. ज्याच्या खाणाखुणा आजही अनुभवता येतात. 

श्री क्षेत्र पद्मालय येथील गणपती मंदिराची रचना ही हेमाडपंथी असून बनारस येथील काशी विश्वेश्वराच्या जुन्या मंदिराची ती प्रतिकृती असल्याचे सांगितले जाते.  संत गोविंद महाराजांनी १८२५ मध्ये या देवालयाचा जिर्णोद्धार केला आहे. ते अजानबाहू,  सिध्द पुरुष होते. त्यांना श्री गजाननांनीच स्मरणसाधनेत दर्शन देवून,  आदेश दिल्याने ते येथे आले. या मंदिराचा शोध घेतला आणि जिर्णोद्धार केला. त्यासाठी त्यांनी भडगाव येथील खाणीतील दगड वापरल्याचा उल्लेख जुन्या दस्तऐवजात मिळतो. देवालयात मूर्ती समोर मोठा सभामंडप असून,  प्रवेश करताना साडेचार फुट उंचीचा दगडाचा एक मोठा उंदीर पाहण्यास मिळतो.  देवालयासमोर मोठा दगडी घाट बांधला आहे.  

या ठिकाणी एक मोठी पंचधातू मिश्रित अशी,  सुमारे अकरा मणाची,  ४४० किलोची घंटा बांधण्यात आली आहे. ही घंटा १८२६ मध्ये श्री क्षेत्र काशीविश्वेश्वर येथील,  ठठेरी बाजारातील देवीदयाळ या कारागिराने बनवली आहे–जिचे त्या काळातील मुल्य ११००/-रु होते. जी वाजवली,  तर तिचा आवाज एकचक्रानगरी म्हणजे, आजचे एरंडोल पर्यंत ऐकू येत असे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या उंबऱ्यावर अनलासुराचे  शिर आहे. हा अनलासूर मुखातून अग्नीवर्षाव करत असे. त्याने तिन्ही लोकांवर विजय मिळविला होता. त्याचा उपद्रव वाढल्याने,  त्याला बालगणेशाने गिळंकृत करुन संपविले. गिळंकृत केल्यावर,  गणेशाच्या पोटात जो दाह झाला,  तो शमविण्यासाठी श्री गणेशाला,  २१ ऋषींनी २१ दूर्वा वाहिल्याची अख्यायिका आहे. 

धरणगाव येथून (२२ किमी) जळगाववरुन (३० किमी) व एरंडोल येथून (११ किमी) वर असलेल्या पद्मालय येथे जाण्यासाठी बस सेवा सुरू आहे.

संग्राहक : सुहास सोहोनी 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ म्हातारीची मस्त गोष्ट…  विठ्ठलराव गाडगीळ  ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ म्हातारीची मस्त गोष्ट…  विठ्ठलराव गाडगीळ  ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

 

दिवंगत नेते विठ्ठलराव गाडगीळ यांनी एक गोष्ट सांगितली होती. 

ती गोष्ट अशी..——-

“एक म्हातारी होती. 

ती झोपडीत राहत असे. 

ती अत्यंत गरीब होती. 

तिच्या झोपडीच्या बाहेर एक आंब्याचे झाड होते. 

त्या झाडाचे आंबे विकून ती आपले पोट भागवत असे; परंतू तिथे शेजारी तिचे आंबे चोरायला लागले. 

ती आणखी गरीब झाली. 

एके दिवशी एक साधू तिच्या झोपडीत आला आणि म्हणाला- म्हातारे मी भुकेला आहे,  मला काहीतरी खायला दे. 

म्हातारी म्हणाली मी गरीब आहे. माझ्याकडे एकच भाकरी आहे; पण त्यातली अर्धी तुला देते. 

साधूने अर्धी भाकरी खाल्ली,  पाणी प्यायला आणि प्रसन्न झाला. 

तो तिला म्हणाला. 

“म्हातारे तू गरीब असशील,  

परंतू तुला खरी माणुसकी आहे. तू अर्धी भाकर दिलीस- 

मी प्रसन्न आहे. कोणताही वर माग. 

म्हातारी म्हणाली,  

“मला असा वर दे की माझे शेजारी आंबे चोरायला आले की त्यांनी झाडाला हात लावल्याबरोबर ते झाडाला चिटकून लटकत जातील आणि मी आज्ञा केल्याशिवाय सुटणार नाहीत” 

साधू म्हणाला ‘तथास्तू’

दुसऱ्या दिवशी तिला सकाळी आठ-दहा शेजारी आंब्याला चिकटलेले दिसले. 

सर्व ओरडत होते,  “म्हातारे सोडव!,  म्हातारे सोडव!” पुन्हा हात लावणार नाही असे त्यांनी कबूल केल्यावर तिने त्यांना सोडून दिले.

“आणखी काही वर्षे गेली. म्हातारी आणखी म्हातारी झाली. तिच्या मृत्यूची वेळ आली. 

तिच्या मरणाचा दिवस आला आणि तिला न्यायला यमराज आले. 

ती यमराजाला म्हणाली,  

मला आणखी काही वर्षे जगू द्या. यमराज म्हणाले,  

“नाही,  ते शक्य नाही कारण तुझ्या कपाळावर मरीआईने आजचा दिवस लिहिला आहे. त्यामुळे तुला आजच न्यावे लागेल. 

परंतू तुझी शेवटची काही इच्छा असेल तर सांग.

“म्हातारी म्हणाली,  

“माझ्या झोपडीच्या बाहेर एक आंब्याचं झाड आहे. मरणापूर्वी त्याचा एक आंबा मला खावासा वाटतो आहे.” 

आंबा आणायला यमराज स्वतः झाडाजवळ गेले. झाडाला स्पर्श केल्याबरोबर यमराज झाडाला चिटकले आणि ओरडू लागले,  

“म्हातारे सोडव,  म्हातारे सोडव” 

म्हातारी म्हणाली,  

“एका अटीवर सोडवीन. 

मी इच्छा करेल त्याच वेळी मरेन. 

मला इच्छामरणी करशील तर सोडवेन.” 

यमराज म्हणाले. “तथास्तु!” 

त्यामुळे ती म्हातारी अजून जिवंत आहे आणि ती कधी मरणार नाही. 

तिचे नाव आहे “भारतीय लोकशाही!!”

( संसदमार्ग-लोकशाहीचा राजमार्ग- ले. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्या पुस्तकातून साभार. ) 

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बापमाणूस ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

?  विविधा  ?

☆ बापमाणूस ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

काही दिवसांपूर्वी आमच्या ब्रह्मकमळाच्या झाडावर एका बुलबुलच्या जोडीने घरटे बांधले आणि थोड्याच दिवसात छोटी, चिमुकली पिल्ले दिसू लागली. आई – बाबा आपापल्या  पिल्लांसाठी खाऊ घेऊन येत असत. पण ते घरटे इतके खाली होते की आमच्या घरातील मांजरे त्यावर डोळा ठेवून होती. आणि एक दिवस त्यांनी डाव साधलाच.बिचाऱ्या आई बुलबुलची शिकार त्यांनी केली.पिल्ले एकटी पडली. पण बाबा बुलबुल मात्र आता दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडू लागले.ते दृश्य बघताना माझ्या डोळ्यासमोर बापाची अनेक रुपे उभी राहू लागली.

काही वर्षांपूर्वी लहान मुलांसाठी “निमो” नावाचा एक animated चित्रपट आला होता. त्यामध्ये छोट्या निमो माशाची आई मरते व त्याचे बाबा त्याचा डोळ्यात तेल घालून सांभाळ करु लागतात. पण दुर्दैवाने निमो कोळ्यांच्या जाळ्यात सापडतो आणि मग त्याला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी केलेली धडपड आपल्या काळजाला हात घालते.

मग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला तो श्री. ना. पेंडसे यांच्या गारंबीच्या बापूचा ‛ विठोबा’!

लेकावर अमाप प्रेम करणारा ! बापूच्या आईला स्वतःच्या स्वार्थापुढे मुलगा आणि नवरा यांची किंमत नसते. पण हा विठोबा आपल्या या बापूवर इतके आंधळे प्रेम करत असतो की आपला मुलगा कधी चुकीच्या मार्गाला लागला हे त्यालाच समजत नाही.

याउलट नरेंद्र जाधवाचा मिश्किल आणि रांगडा बाप त्या प्रतिकूल परिस्थितीतही अनेक विनोद निर्माण करत आयुष्य आनंदाने कसे जगायचे हे नकळतपणे मुलांना शिकवून जातो.

तर ह. मो. मराठे यांचे वडील म्हणजे विक्षिप्तपणाचा नमुना! आपल्याबरोबर त्या लहानग्या आईविना असणाऱ्या पोराची फरफट करणारे! पण त्याचबरोबर त्या मुलावर माया पण असणारे ! असे अजब मिश्रण!

अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असणारे शिवाजीमहाराज शत्रूशी दोन हात करताना जेवढे कणखर होते तितकेच आपला पुत्र शंभूराजांच्या बाबतीत अतिशय हळवे!  दिलेरखानाच्या छावणीतून पुत्राला परत आणण्यासाठी ते स्वतः जातीने जातात. अवघड जागेचे दुखणे तितक्याच कौशल्याने हाताळले पाहीजे हे त्यांच्यातील बापाला माहीत होते. म्हणूनच स्वतःतील राजेपण बाजूला ठेवून ते बाप बनून शंभूराजांना परत घेऊन येतात.

‘मार्टिना नवरातिलोव्हा’ नावाची ८०/९० च्या दशकातील  टेनिस खेळणारी लोकप्रिय खेळाडू! लहानपणी तिच्या पुरुषी दिसण्यावरुन शाळेतील मुले- मुली तिला चिडवत असत. त्यावेळी तिचे वडील हिरमुसलेल्या  तिला सांगतात,“ आयुष्यात सुंदर दिसणे महत्वाचे नाही तर आपल्या कर्तृत्वाने दुसऱ्याच्या जीवनात काहीतरी सुंदर अनुभूती देणे अधिक महत्त्वाचे आहे. ” आणि त्यानंतर तिने विम्बल्डनमध्ये  इतिहास घडवला. तिच्यात हा आत्मविश्वास केवळ वडिलांच्या शब्दांनी निर्माण झाला.

ज्या समाजात लहान असताना सिंधुताई सकपाळ  रहात होत्या त्या समाजात स्त्रियांनी शिक्षण घेणे योग्य मानले जात नव्हते. तरीही त्यांच्या आईच्या विरोधाला न जुमानता सिंधुताईंच्या वडिलांनी त्यांना यथाशक्ती शिक्षण दिले. त्याच इवल्याश्या पुंजीवर सिंधुताईनी आज केवढी भरारी मारली आहे हे आपण जाणतोच.

इंदिरा संत व ना.मा. संत यांचा मुलगा , लेखक‛ प्रकाश संत’ यांना वडिलांचा सहवास अगदी अल्पकाळ मिळाला. पण त्यांच्या लेखनातून प्रकाशना ते भेटत गेले व  त्यांचे जीवन समृद्ध होत गेले.      

याउलट प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला हिच्या सौंदर्य व अभिनयाचा फायदा घेत तिच्या वडिलांनी तिच्या लहान वयातच चित्रपटक्षेत्रात तिचा प्रवेश करवून अमाप पैसा मिळवला.

‛आनंद यादव’ यांना वडिलांच्या जाचामुळे अनेकदा ‛शिक्षणापासून वंचित रहावे लागते की काय?’ अशी परिस्थिती निर्माण होत असे.

परवाच झी वहिनीच्या ‘लिटल चॅम्प’ या कार्यक्रमात एका मुलीने वडीलांविषयी अतिशय कृतज्ञतापूर्ण उद्गार काढले. त्यांच्या वैयक्तिक समस्येमुळे आईचा सहवास नसणाऱ्या या मुलींना वडील तितक्याच जबाबदारीने सांभाळत आहेत. आणि ही गोष्ट खरोखरच प्रशंसनीय आहे.

असे हे वडिलांचे वेगवेगळे रंग त्या एका घटनेने मनात उभे राहिले. काळ बदलला तसे हे नाते पण बदलत गेले. पूर्वी घराघरात वडिलांची प्रतिमा ‛कडक शिस्तीचे’ अशीच असे. वडीलांसमोर बोलण्याची मुलांची हिम्मत होत नसे.पण हळूहळू ही मानसिकता बदलली आणि नाते अधिक दृढ होऊ लागले. वडील केवळ वडिलांच्या भूमिकेत न राहता मित्रत्वाच्या नात्याने मुलांशी जोडले गेले. काहीवेळा मनात असूनही  प्रत्यक्ष भावना व्यक्त करण्यास मनुष्याला संकोच वाटतो. पण आता फेसबुक, व्हाट्सएपच्या माध्यमातून  दोघेही आपल्या भावना  अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचवू लागले आहेत.

जग बदलले, घरे बदलली, माणसे बदलली. त्यामुळे नात्यांचे रंग बदलले.पण पिढ्यान् पिढ्या वडिलांची भूमिका तिच राहिली. काही अपवाद असतीलही; पण घरातील ‘आधारवड’ म्हणून वडील आजही ठाम उभे असलेले दिसतात. त्या बुलबुल बाबासारखा पिल्लांच्या पंखात बळ येईपर्यंत तो त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो.पिल्ले आकाशाला गवसणी घालू लागली की मात्र अभिमानाने डोळे भरुन त्याची भरारी बघण्यात धन्यता मानतो. म्हणूनच तो “बापमाणूस”!

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शास्त्रीय जागर ….. डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे 

? मनमंजुषेतून ?

शास्त्रीय जागर ….. डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

“काय कटकट आहे!” म्हणत, पाय आपटत श्रुतिका आरतीला आली. तिच्या चेहेऱ्यावरचा त्रासिक भाव आईने टिपला होता. आरती झाल्यावर प्रसादासाठी पुढे आलेल्या हातावर चापट देत आई म्हणाली, “आता कशाला प्रसादाला पहिला नंबर? यायचं नव्हतं ना आरतीला?”

अर्धवट कळत्या, १३ वर्षे वयाच्या श्रुतिकाला हे पूजा, आरती, नवरात्र सगळं बोरिंग वाटत होतं. आज आईने तिला समजवायच ठरवलं. “काय गं, तुला माहित आहे का नवरात्र का करतात?” आई ने विचारलं. तशी ती रागाने म्हणाली, “त्यात काय, काहीतरी ऑर्थोडॉक्स रूढी, कुठे देवी पाहिली कोणी? पण म्हणे ९ देवींची पूजा असते. मम्मा , तू काहीही म्हण, मला पटत नाही हे.” “अगं पण तुला कोणी सांगितलं की देवींची पूजा करण्यासाठीच नवरात्र आहे असं. त्याला शास्त्रिय आणि वैचारिक दोन्ही base आहेत.ऑर्थोडॉक्स आहे की नाही तूच ठरव” आई म्हणाली. “हँ, त्यात काय शास्त्रीय? ” श्रुतिका

“बाळा, नवरात्र हे बी- बियाणांच testing kit आहे. पूर्वी आतासारखी खूप बियाणं किंवा खतं नव्हती मग सगळ्या प्रकारची धान्य थोडी थोडी टाकून त्याचं एकप्रकारे testing केलं जातं नवरात्रात की ह्यांच्यापासून पीक कसं येईल? ” “हो का? Interesting आहे. पण मग आताच का?” श्रुतिकाला प्रश्न पडला म्हणून आईला बरं वाटलं. “बरोबर विचारलं, अगं या दरम्यान रब्बी पिकांचा हंगाम सुरू होतो, आणि ती पिकं पाण्यावर वाढतात ना मग हा trial pack बरं का!” आईने उत्तर दिलं.

“wow, मम्मा, भारीच की, आणि लोकांनी ते मनापासून करावं म्हणून देवाचं नाव, हो ना?” श्रुतिका एकदम excite झाली होती. ” पण मग आई ते, तू जोगवा मागायला का पाठवते? मला नाही आवडत. खूप embrassing वाटतं” श्रुतिकाने आईला मनातलं सांगितलं. “हे बघ बाळा, मी म्हंटलं ना, वैचारिक पण पार्श्वभूमी आहे. जोगवा मागणे म्हणजे काय तर आपला वृथा अभिमान बाजूला ठेवून शरण जाणे. पूर्वी लोक ह्या मागितलेल्या जोगव्यावर पोट भरायचे. तुमच्या भाषेत ego बाजूला ठेवून गरीब लोकांची दुःख समजून घ्यायची. आता तुम्ही जाताच ना ते चॅरिटी का काय साठी पैसे मागायला? मग देवाच्या नावाने मागितलं तर छिद्र पडतं का अंगाला?”

“Right मम्मा, तो ‘फुलोरा’ का? त्यातली पापडी खूप आवडते मला.” श्रुतिकाचं डोकं आता शंकांनी भरलं होतं. आई हसून म्हणाली, ” किती चौकशा त्या! अगं , मी म्हंटलं ना, रब्बी पिकाचा हंगाम सुरू होतो, मग दिवसभर शेतात राबायचं तर घरी काहीतरी कोरडा खाऊ असावा, मुलंही खातात. ते तुम्ही evening snack म्हणतात ना, तेच! आणि हो तेच त्याकाळचे chatting चे साधन होते फुलोरा लाटायला एकत्र आलेल्या बायकांना! Live whatsapp! “आई, कसले हुशार होते गं  आपले पूर्वज! मग आता सांग, कुमारिकेची पूजा कशाला? आता मला का नाही बोलवत आणि, लहान मुलींनाच का?”

“वेडाबाई, प्रत्येक स्त्री मध्ये प्रचंड शक्ती आहे. ही देवीची रूपं त्याचीच जाणीव करून देतात, ती लहानपणीच करून दिली तर त्यांना गम्मत पण वाटते आणि आपण काही तरी भारी करू शकतो हे त्यांच्या मनावर ठसतं. पूर्वी, लवकर लग्न व्हायची, पाळी यायच्या आधीच, त्यामुळे कुमारिका ह्या छोट्याच असायच्या एवढंच! ते काय तुम्ही म्हणता ना toddler, teenager वैगेरे त्यांचं चार्जिंग गं” आई.

“आयला, सॉरी, म्हणजे कमाल ग आई. प्रत्येक दिवसाला आणि सणाला काहीतरी आधार आहे. आता last, ते धान का धाण म्हणजे तो तुरा लावून का जायचं सीमोल्लंघनाला?” श्रुतिकाची प्रश्नावली सम्पणार म्हणून आईने हुश्श केलं. “मी म्हंटल ना, testing kit मधलं कुणाचं बियाणं चांगलं आहे हे त्या दिवशी कळतं मग, तुमची काय ती pilot study गं!” श्रुतिकाच्या डोळ्यातली चमक आईला बरच काही सांगत होती. “आणि आई , मला माहित आहे, दसरा म्हणजे, आपल्यातल्या रावणाला किंवा दुर्गुणांना, रामाने म्हणजे सद्गुणांनी जिंकायचं आणि ते हृदयापासून करायचं म्हणून हृदयाच्या आकाराची आपट्याची पानं प्रतीक म्हणून लुटायची, बरोब्बर ना?”

“म्हणूनच तुला सांगते, भारतीय संस्कृती, right choice है बेबी.” आई

आज आईने सुप्त कल्पकता वापरून तिच्यातल्या सरस्वती आणि श्रुतिकामधल्या दुर्गाचा GBनवरात्रानिमित्त  शास्त्रीय जागर केला होता.

©️®️ डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर

संग्रहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अध्यन्त प्रभू ☆ संग्रहिका – सुश्री शैला मोडक

? इंद्रधनुष्य ? 

☆ अध्यन्त प्रभू ☆ संग्रहिका – सुश्री शैला मोडक ☆ 

आज एक खूपच वेगळी मूर्ती दाखवणार आहे. बहुधा कुणी पाहिली नसावी.

ही मूर्ती चेन्नई आय्.आय्.टी. जवळ, “मध्य कैलाश” नावाच्या मंदिरात आहे. ही मूर्ती फारशी जुनी नाही. अंदाजे पन्नास वर्षांपूर्वीची आहे.

उजवा भाग ‘गणपती’ आणि डावा भाग ‘मारुती’ अशी असणारी ही विलक्षण मूर्ती आहे. उजव्या वरच्या हातात ‘अंकुश’,  तर खालच्या हातात ‘तुटका दात’,  आणि डावीकडचा हात ‘गदा’ धरून आहे. डोक्यामागून ‘शेपूट’ डोकावते. 

या मूर्तीला “अध्यन्त प्रभू” म्हणून ओळखतात. मंदिराच्या विश्वस्तांना स्वप्नात याच रूपात दर्शन मिळाले, म्हणून तशी मूर्ती बनवली गेली.

शक्ती आणि बुद्धी यांचा संगम असलेली ही अभिनव कलाकृती आहे….

संग्राहक : सुश्री शैला मोडक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लक्झरी म्हणजे काय? ☆ संग्राहिका : सौ. स्मिता पंडित

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ लक्झरी म्हणजे काय? ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित ☆ 

अमेरिकेतील सर्वात महागड्या हॉस्पिटलमधून उपचार मिळणे म्हणजे लक्झरी नाही. 

—— लक्झरी म्हणजे निरोगी असणे.

लक्झरी म्हणजे क्रूझवर जाणे नाही आणि प्रसिद्ध शेफने तयार केलेले अन्न खाणे नाही.

—— लक्झरी म्हणजे आपल्या स्वतःच्या अंगणात उगवलेले ताजे सेंद्रिय अन्न खाणे.

लक्झरी म्हणजे तुमच्या घरात लिफ्ट असणे नाही.

——- लक्झरी म्हणजे अडचणीशिवाय 3-4 मजले चढण्याची क्षमता.

 लक्झरी म्हणजे मोठे रेफ्रिजरेटर घेण्याची क्षमता नाही.

——- लक्झरी म्हणजे ताजे शिजवलेले अन्न दिवसातून 3 वेळा खाण्याची क्षमता.

लक्झरीमध्ये होम थिएटर सिस्टीम असणे अन त्यावर हिमालयीन मोहीम पाहणे नव्हे.

——– लक्झरी हिमालयीन मोहिमेचा शारीरिक अनुभव घेणे आहे.

 60 च्या दशकात एक कार एक लक्झरी होती.

 70 च्या दशकात टेलिव्हिजन ही लक्झरी होती.

 80 च्या दशकात टेलिफोन ही लक्झरी होती.

 90 च्या दशकात संगणक एक लक्झरी होती …

 मग आता लक्झरी म्हणजे नेमके काय ?

—— निरोगी असणे, आनंदी असणे, आनंदी वैवाहिक जीवनात असणे, प्रेमळ कुटुंब असणे, प्रेमळ मित्रांसोबत असणे, प्रदूषित नसलेल्या ठिकाणी राहणे, — या सर्व गोष्टी दुर्मिळ झाल्या आहेत. 

—- आणि हीच खरी” लक्झरी” आहे.

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वर्षानुवर्षांच्या वास्तू-वस्तू ☆ सुश्री मृणालिनी मकरंद जोशी

?  विविधा  ?

☆वर्षानुवर्षांच्या वास्तू-वस्तू ☆ सुश्री मृणालिनी मकरंद जोशी

“काय गं आई, चहा-साखरेचे डबे बदलूया का आता ? किती वर्षांपासून हेच डबे वापरते आहेस…!” इति कन्यका.

“अगं, आजीच्या संसारतले डबे आहेत हे… माझ्या लग्ना आधीपासून हेच डबे आहेत चहा-साखरेला… आणि डबे बदलले, तर एखाद्यावेळेस आजीला वाईट वाटेल गं…” माझे तिला उत्तर.

“अगं काही नाही वाईट वाटणार… मी सांगते तिला बरोबर. आता आपण किचनचे इतके छान  renovation केले आहे, तर करूयात ना काही बदल…. एखाद्या छोट्याशा बदलामुळेसुद्धा जरा फ्रेश वाटते गं… आई, हे बघ हे जे दोन प्लास्टिकचे कंटेनर आहेत ना, ते आताच्या आपल्या नवीन रंगसंगतीला किती मॅच आहेत बघ… आता यातच ठेवूया चहा-साखर.” कन्येचे प्रत्युत्तर…!

तिचे म्हणणे तसे बरोबरच होते. घरात काही सुसह्य बदल करायला काहीच हरकत नाही खरं तर… आपल्यालाच छान वाटते. पण…

किचन गरजेनुसार थोडे renew करून घेतले. जुने सुद्धा खूप सामान, भांडी माळ्यावर होती. काही वस्तू स्वच्छ करून कधीतरी उपयोगी पडतील, म्हणून पुन्हा ठेवून दिल्या. काही माझ्या मदतनीस मावशींना दिल्या. दोन-तीन वस्तू पुन्हा वापरायला काढल्या… तर काही वस्तू देववतही नव्हत्या पण ठेववतही नव्हत्या.

मनात एक विचार आला…. घराचा जसा वास्तू-पुरुष असतो ना… तशाच या ‘वास्तू-वस्तूही’ असतात नाही का ? वर्षानुवर्षे या वस्तू आपल्या घरात असतात. स्वयंपाक घरात तर अगदी हमखास… घरात घडणाऱ्या घटना, येणारे नवीन सदस्य, जन्म, मृत्यू, होणारे अनेक छोटे-मोठे बदल हे वास्तू-पुरुष पहात असतो, असं आपण मानतो. तसेच हे सर्व या ‘वास्तू-वस्तूही’ पहात असतात, नाही का…!

स्वयंपाक घरात पोळपाट-लाटणे, तवा, स्टील किंवा पितळी डबे, कढया, परात, नारळ खोवणी, विळी, किसणी, गॅस बर्नर, डायनिंग टेबल, पाणी भरून ठेवायची भांडी… अशा अनेक वस्तू असतात, ज्या वर्षानुवर्षे आपण त्याच वापरतो. माझ्याकडे सासूबाई वापरायच्या तो दगडी पोळपाट आहे… असाच वर्षानुवर्षं. खूप जड आहे, पण रोजच्या पोळ्या मी त्यावरच करते. सवय झाली आता… आईंना मात्र तो उचलायला जड जातो हल्ली… पण तशी त्यांना पोळ्या करायची वेळ  क्वचितच येते. मला अनेकींनी सुचवले, ‘बदलून टाक गं पोळपाट… किती जड आहे…’ पण मला मात्र तोच आवडतो.

वास्तू-पुरुषाप्रमाणेच स्वयंपाकघरातल्या या वास्तू-वस्तूही अनेक प्रसंगांचे साक्षीदार असतील. दोन-तीन पिढ्यांचे संसार…  प्रेमात, मायेत मुरलेली ‘लोणची’ भांड्याला भांडी लागल्यावर होणारे आवाज… चहाच्या पेल्यातली वादळे…  वेगवेगळ्या हातांतल्या काकणांची वेगवेगळी किणकिण… धुपाच्या सुवासात मिसळून गेलेले साग्रसंगीत स्वयंपाकाचे सुवास… कुलाचार सांभाळण्याची घरातल्या बायकांची लगबग… कधी बारशाचा तर कधी श्राद्धाचा स्वयंपाक….! कधी बाळांचे बोबडे बोल तर कधी वृद्धांच्या आवाजातील थरथर…

आणि… आणि….     

यासर्वांबरोबरच प्रेमातला गोडवा, शब्दांमधला कडूपणा, स्वभावातला तिखटपणा, डोळ्यातील पाण्याचा खारटपणा…. हे सगळं सुद्धा अनुभवत असतील… असेच वर्षानुवर्षे…!

घरातील बाईच्या या वस्तू इतक्या सवयीच्या झालेल्या असतात, की त्यांच्यासाठी तो एक comfort zone असतो. ‘वादा करो नहीं छोडोगे तुम मेरा साथ…. किचन में तुम हो… इसलिये मैं भी हुं l’ असं या दोघांमधील नातं असतं…! मुळात स्वयंपाकघर हेच मुळी बायकांच्या जिव्हाळ्याचे असते.

माळ्यावरच्या भांड्यांमध्ये काही तांब्या-पितळेची सुद्धा भांडी आहेत आमच्याकडे… ही भांडी तर खरोखर ‘वास्तू-वस्तू’ आहेत. आताची पिढी प्रॅक्टिकल विचार करणारी… लेक म्हणाली,”आई, कधी वापरतो तरी का गं आपण या वस्तू ? स्वच्छ करायलाही किती जिकिरीचं असतं गं… बरं बाई तू ठेवलीयेस अजूनही ही भांडी…” तिला म्हणाले,”खरंय गं राणी तुझं… पण या भांड्यांची किंमत (पैशातली नव्हे) आणि महत्व मनाला माहितीय ना… आयुष्यात  ‘आपल्याकडे या मौल्यवान वस्तू नाहीत,’ अशी खंत कधी मनाला वाटू नये ना… म्हणून ठेवल्यात मी अजूनही या वस्तू…. वर्षानुवर्षे. ‘वास्तू-वस्तूच’ आहेत त्या आपल्या… !!”

© सुश्री मृणालिनी मकरंद जोशी

औरंगाबाद

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares