मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! फिटनेसचा फ़ंडा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? फिटनेसचा फ़ंडा ! ?

“गुडमॉर्निंग पंत !”

“नमस्कार, पण आज तुझा आवाज एकदम रडवेला का आणि खांदा कशाला चोळतोयस तुझा ?”

“काठी लागली पंत, डोक्याच खांद्यावर निभावलं, तुमच्यकडे आयोडेक्स असेल तर द्या जरा.”

“देतो देतो, पण सकाळी सकाळी बायको बरोबर भांडण…. “

“नाही हो पंत, जोशी काकूंची काठी लागली.”

“जोशी काकूंची काठी तुला कशी काय लागली ?”

“अहो हा सगळा त्या केळकर काकांचा फिटनेस फ़ंडयाचा प्रताप.”

“आता यात केळकर कुठून आला ?”

“सांगतो सांगतो. तुम्हाला माहीतच आहे सध्या सगळ्या जिम वगैरे बंद आहेत आणि सगळेच आपापल्या घरी अडकल्यामुळे… “

“तू मूळ मुद्यावर ये आधी, उगाच पाल्हाळ नकोय.”

“हां, तर घर बसल्या आणि चाळीत फिरून करायचे काही व्यायाम प्रकार केळकर काकांनी काही लोकांना शिकवले.”

“बर, पण त्यात जोशीणीचा काय संबंध ?”

“पंत केळकरांनी जोशी काकूंना शाखेत जसे काठीचे हात फिरवायला शिकवतात तसे काही प्रकार शिकवले.”

“पण तिच्या काठीचा आणि तुझ्या खांद्याचा… “

“अहो पंत त्याच काय झालं, आता जोशी काकू चाळभर,  धुण्याची काठी घेऊन दोन्ही हाताने फिरवत फिरत असतात.”

“काय सांगतोस काय, अख्ख्या चाळभर ?”

“हो ना आणि त्यांच्या काठीचा प्रसाद माझ्या प्रमाणेच अनेकांना बसून चाळीत

भांडणांचे जंगी सामने सुरु झालेत.”

“अरे बापरे !”

“इतकंच नाही काकूंच्या काठीने चाळीतले यच्चयावत सार्वजनिक दिवे पण फुटले ते वेगळेच.”

“काय बोलतोयस काय ? सगळे सार्वजनिक दिवे… “

“फुटले आणि त्यावरून होणारी चाळकऱ्यांची भांडणं सोडवता सोडवता, माझ डोक फुटायची पाळी आल्ये.”

“बर बर, मी असं करतो तुला आयोडेक्स बरोबर अमृतांजन पण देतो मग तर झालं ?”

“पंत इथे माझी काय हालत झाल्ये आणि तुम्हाला विनोद सुचतायत !”

“यात कसला विनोद, तुझ्या दुखऱ्या खांद्यासाठी आयोडेक्स मागायला तूच आला होतास आणि आता तुझ लोकांच्या भांडणामुळे डोक फुटायची वेळ आल्ये म्हणालास म्हणून मी तुला आपणहून अमृतांजन.. “

“खरच आहे ते, अमृतांजन पण लागेलच मला, कारण तुम्हाला अजून बर्वे काका आणि साने काकांच्या भांडणा बद्दल… “

“आता ते दोघे कशाला भांडले एकमेकाशी ?”

“इथे पण केळकर काकांचा  फिटनेस फ़ंडाच कारण झाला.”

“तो कसा काय ? “

“पंत त्यांच्या फिटनेस फ़ंडयात  दोरीच्या उडया पण होत्या.”

“हो, तो पण एक चांगला घरगुती व्यायाम प्रकार आहे खरा.”

“पंत, सानेकाका त्यांच्या घरात दोरीच्या उडया मारत होते आणि त्याच वेळेस खालच्या मजल्यावरचे बर्वेकाका जेवत होते !”

“म्हणजे दोघेही आपापल्या घरीच होते ना, मग भांडणाचा संबंध आला कुठे ?”

“अहो पंत साने उडया मारायला लागले की खाली बर्व्यांच्या ताटात त्यांच्या सिलिंगची माती पडायची !”

“अरे चाळीस वर्षात चाळ खिळखिळी झाल्यावर सिलिंग मधून माती नाहीतर काय सोन  पडणार आहे ? तूच विचार कर म्हणजे झालं.”

“हो बरोबरच आहे पण त्यामुळे बर्वे काकू आल्या माझ्याकडे तणतणत. मी काकूंना म्हटलं, बर्वे काकांना ताट घेऊन दुसरीकडे बसून जेवायला सांगा.”

“बरोबर आहे तुझ, मग ?”

“त्यावर बर्वे काकू मला म्हणतात कशा ‘ती ह्यांची जेवायला बसायची रोजची जागा आहे, दुसरीकडे बसून जेवलं तर त्यांना जेवण जात नाही’ आता बोला ?”

“अरे बापरे, असं म्हणाली बरवीण ?”

“हो ना, वर मला सांगायला लागल्या ‘तूच सान्याला सांग उडया मारायची त्यांची जागा बदलायला’ आणि गेल्या तरातरा निघून घरी.”

“मग तू काय केलंस ?”

“काय करणार, गेलो साने काकांकडे, झाला प्रकार सांगून त्यांना म्हटलं, तुम्ही प्लीज जरा तुमची दोरीच्या उडया मारायची जागा बदलता का ?”

“मग काय म्हणाला सान्या?”

“साने काका म्हणाले ‘मी माझ्या घरात कुठ उडया मारायच्या आणि कुठे नाही हे मला सांगायचा कुणाला अधिकार नाही. तूच बर्व्याला त्याची जेवायची जागा बदलायला सांग.’ असं म्हणून माझ्या तोंडावर धाडकन दार लावले त्यांनी.”

“फारच पंचाईत झाली असेल ना तुझी त्या वेळेस.”

“हो ना, दोघेही वयाने मोठे आणि हट्टाला पेटलेले.”

“मग कसा काय मार्ग काढलास त्यातून तू ?”

“मार्ग कसला काढतोय, घरी येवून मस्त ताणून दिली. पण पाच मिनिट आडवा पडतोय न पडतोय, तोच दाराची कडी वाजली.”

“उगाच तुझी झोप मोड झाली ना, पण दारात कोण आलं होत तुझी झोप मोडायला ?”

“अहो दार उघडून बघतोय तर काय, पहिल्या मजल्यावर जिन्याशेजारी राहणारे राणे काका, रागाने लालबुंद होऊन दारात उभे.”

“आता राण्याला राग यायच काय कारण ?”

“मी विचारलं राणे काकांना, तर मला म्हणाले वरच्या कोकणे काकांनी त्यांची झोप मोड चालवली आहे, जिन्याने सारखं वर खाली जाऊन येवून.”

“जाऊन येवून म्हणजे, मी नाही समजलो.”

“पंत हा पण केळकर काकांचा फिटनेस फ़ंडा.”

“म्हणजे त्यांचे भांडण पण केळकराच्या फिटनेस फ़ंडया मुळे झाले की काय? “

“हो पंत, केळकर काकांनी कोकणे काकांना घरी बसून बसून त्यांचे वजन वाढल्यामुळे आणि घुडघे दुखत असल्यामुळे, जिने चढण्या उतरण्याचा व्यायाम सांगितला होता करायला.”

“बरोबरच आहे केळकराच आणि तुला दुसरा एक उपाय सांगतो गुडघे दुखीवर.”

“पंत इथे मी कशाला आलोय आणि तुम्ही मला….”

“अरे ऐकून तर घे, गुडघे दुखत असतील तर कमरे एव्हढया पाण्यात रोज अर्धा तास चालायचं, घुडघे दुखी कुठच्या कुठे पळून जाईल बघ तुझी.”

“आता मीच पळतो पंत, तुमचं बोलण ऐकून माझ डोक खरच फुटेल की काय अस वाटायला लागलं आहे.”

“सॉरी सॉरी, पण कोकण्याच्या जिन्याने खालीवर जाण्याने,  राण्याची कशी काय बुवा झोप मोडायची, ते नाही समजलं !”

“अहो कोकणे काकांचा अजस्त्र देह जिन्याने खाली वर करू लागला की आपल्या चाळीचे आधीच जीर्ण शीर्ण झालेले लाकडी जिने… “

“दाण दाण आवाज करायचे आणि राण्याची खोली जिन्याजवळ असल्यामुळे त्याच्या झोपेचं खोबरं व्हायच, बरोबर ?”

“बरोबर पंत, त्यामुळे त्या दोघांचे पण कडाक्याचं भांडण झालं आणि दोघेही माझ्याकडे एक मेकांची तक्रार घेऊन आले आणि …. “

“तू नेहमी प्रमाणे माझ्याकडे यावर उपाय सुचवा म्हणून, काय खरं ना?”

“हो पंत, तुम्हीच चाळीत सगळ्यात जुने जाणते आणि अनुभवी …. “

“नेहमीची मस्काबाजी पुरे ! आता मला आधी सांग, आपल्या चाळीतले योगा शिकवणारे गोरे गुरुजी सध्या चाळीत….. “

“नाहीत ना, ते मध्यतंरी गावाला गेले आणि सध्याच्या परिस्थितीमुळे गावालाच अडकलेत.”

“बर बर आणि योगासन पण कुणाच्या तरी देखरेखी खाली केलेली बरी, नाहीतर उगाच कोणाला तरी त्याचा त्रास पण होऊ शकतो.”

“मग कसं करायच आता पंत.”

“अरे मी असतांना कशाला घाबरतोस.  उद्याच्या उद्या एक पत्रक काढ, चाळ कमिटीचा अध्यक्ष म्हणून.”

“बर, पण त्या पत्रकातून काय सांगायचं लोकांना?”

“लोकांना सांगायचं की कोणीही केळकराचा फिटनेस फ़ंडा वापरायचा नाही.”

“मग पंत लोकांनी फिट राहण्यासाठी काय करायच?”

“माझा फिटनेस फ़ंडा वापरायचा !”

“तुमचा फिटनेस फ़ंडा, म्हणजे काय पंत ?”

“काही नाही, ज्या लोकांना या लॉक डाऊन मधे फिट रहायच आहे त्यांनी आपापल्या घरात रोज सकाळी फक्त बारा सूर्य नमस्कार घालायचे, बस्स.”

“त्यानं लोक खरंच फिट राहतील पंत ? “

“यात तुला शंका घ्यायच कारणच नाही. “

“ते कसं काय पंत?”

“अरे शास्त्र शुद्ध पद्धतीने घातलेल्या प्रत्येक सूर्य नमस्कारात सगळी योगासन समाविष्ट असतात, हे माहित्ये का तुला ?”

“नाही पंत, पण लोकांना शास्त्र शुद्ध पद्धतीने सूर्य नमस्कार घालायला…. “

“मी शिकवणार आणि प्रत्येकला सांग, की घरात राहून ज्यांना ज्यांना फिट रहायच त्यांनी….”

“पंतांना भेटून शास्त्र शुद्ध सूर्य नमस्कार कसे घालायचे ते लवकरात लवकर शिकून घ्या आणि…. “

“केळकराच्या फिटनेस फ़ंडयामुळे होणारी चाळीतली भांडणे टाळा.”

“धन्य आहे तुमची पंत !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आनंद…….सकारात्मक विचार ☆ संग्रहिका – सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ आनंद– सकारात्मक विचार  ☆सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

माणसाचं जगणं हे त्याच्या विचारांनी सुंदर होत असते आणि त्याचे हे विचार जर सुंदर आणि सकारात्मक असतील तर त्याला सर्व जण नेहमीच आठवणीत ठेवतात.. ठेवत असतात..

सकारात्मक विचार, चांगला विचार येणं हा विचारांच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे..

फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आकाशाला गवसणी घालणारी महत्त्वाकांक्षा जीवनाला एक वेगळीच उत्तेजना देते

जगाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. ‘”सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत की गाणं म्हणत”…जर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगलेच घडते..

आपण पाहावं तसं आयुष्य आपल्याला दिसतं. प्रत्येक क्षण जर  रसरसून जगायचा ठरवला तर खरोखर तसा छान अनुभव यायला लागतो. सकाळी उठल्याबरोबर डोळे उघडले की आजूबाजूला जे जे म्हणून दिसेल, सजीव, निर्जीव वस्तू, परिसर त्याला मनातल्या मनात मी ‘”गुड मॉर्निग’” म्हणते तसेच मनातल्या मनात स्वत:लाच ‘”गुड मॉर्निग’” म्हणते  व स्वतःलाच एक छानस स्माईल पण देते.. अशानं एक सकारात्मकतेची भावना आपोआपच मनातून शरीरभर झिरपत जाते व ताजंतवानं वाटायला लागते.. उठल्यापासूनच सकारात्मक विचार करायला सुरुवात करते मग दिवसभरात कशीही परिस्थिती वा  आव्हानं समोर आले तरीही त्या त्या क्षणांतला आनंद टिपते म्हणजे माइंडफुल राहायचं तो क्षण जगायचा. चहाच्या कपाला ओठांना होणारा पहिला स्पर्श असो वा चहाच्या पहिल्या घोटाची चव असो. मस्त एन्जॉय करते मी… पुढे घडत जाणाऱ्या प्रत्येक घटनेतला चांगला भाग शोधते तशी मनाला सवयच लावून घेतली आहे म्हणा ना..! विपरीत, प्रतिकूल परिस्थितीतही हे धोरण ठेवायचं बरं.. ! तश्या परिस्थितीतही काहीतरी चांगलं असतंच असतं.. ते शोधायची मनाची धाटणी बनवायची. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत त्या विनाअट शांतपणे स्वीकारायच्या आणि शांतपणे पुढे जायचं…

आनंदी राहणं ही एक कला आहे. मुख्य म्हणजे ज्या गोष्टींमुळे, व्यक्तींमुळे, क्षणांमुळे आनंद मिळतोय त्या प्रत्येकाबद्दल कृतज्ञ राहायचं…

आनंदी होण्यासाठी आपल्या सगळ्यांची धडपड असते किंबहुना पीस आणि ब्लिस, आनंद, मन:शांती मिळवण्यासाठीच प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करीत असते.. आपल्याला कायमस्वरूपी आनंदी राहता येतं का ? किंवा येईल का ? जीवनातला प्रत्येक क्षण आपण खऱ्या अर्थाने जगू शकतो का ? या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहेत. मात्रं त्यासाठी आपल्याला विशिष्ट दिशेने प्रयत्न करावे लागतील. मनाच्या सवयीची, विचारांची धाटणी बदलायला लागेल. जगण्याविषयीचा दृष्टिकोन बदलायला लागेल. हे मनाचं ‘रिप्रोग्रॅमिंग’ असेल. विशिष्ट पद्धतीनं मनाची मशागत झाली की मग तेथे आनंदाची, समाधानाची बीजं पेरली जातील. सकारात्मकता, भौतिक जीवनातील यश आणि आंतरिक आनंदाची निरंतर शक्यता निर्माण होईल. मनाची मशागत करताना काही भावना, विचार आपला भागच बनवून टाकाव्या लागतील…

स्वत:शी संवाद साधणं हा सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. स्वत:ला स्वत:मध्ये असणाऱ्या गुण-दोषांसहित स्वीकारणं म्हणजेच सकारात्मक स्व-प्रतिमा निवडण्यासाठी उचललेलं पहिलं पाऊल…  इतर व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतात, त्यांना आपण कसे वाटतो, यावरून स्वत:ची किंमत करू नये किंवा ठरवू ही नये कारण आपणच स्वत:ला चांगले ओळखू शकतो नाही का?..

 

संग्रहिका –  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ क्लर्कची हुशारी ☆ संग्राहक – श्री माधव केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ क्लर्कची हुशारी ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

कान्ट्रक्टरशी बोलणी  झाल्याचे सांगून क्लर्कनी फाईल साहेबांच्या पुढ्यात ठेवली. 

साहेबांनी शेरा मारला —-

—-APPROVED

दोन दिवसांनंतर कान्ट्रक्टर दिलेला शब्द पाळायला कानाडोळा करू लागला.

क्लर्कनी ही गोष्ट साहेबांना सांगितली.

साहेब — “ आता काय करायचं ? “ 

क्लार्क ( स्मितहास्य करत )– “ साहेब फक्त * APPROVED* च्या आधी * NOT *  लिहा– बस्स—-

 —–NOT APPROVED

आता परेशान होण्याची वेळ होती कान्ट्रक्टरची . 

परत क्लर्कशी तडजोड करत क्लर्कला कसंबसं राजी केलं–

क्लर्क परत फाईल घेऊन साहेबांच्या समोर गेला…..

साहेब ( वैतागून ) — “ आता काय करायचं ? “

क्लर्क ( हसत ) — “ साहेब फक्त *NOT* च्या पुढे * E *  लिहा म्हणजे झालं —

—-* NOTE  APPROVED * बस्स..

साहेब (डोक खाजवत):—( आणि मनात ) — च्यायला मी कसा काय याचा साहेब झालो….! ?

अर्थात आपला देश क्लार्क लोकांच्या अश्या अक्कलहुशारीवर चालत आहे.

?हसत राहा आनंदी राहा ?

संग्राहक – सुश्री मानवी केळकर/श्री माधव केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चांदणक्षण आठवणींचे ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? मनमंजुषेतून ?

☆ चांदणक्षण आठवणींचे ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

“को जागर्ती, को जागर्ती, कोण जागं आहे? हे बघत शंकर-पार्वती आज आकाशातून फिरत जात असतात आणि म्हणून आज जागं राहायचं, म्हणजे सुख-समृद्धी आपल्या घरी येते” अशी कोजागिरी ची गोष्ट लहानपणी आम्ही मामा मराठ्यांच्या चाळीत ऐकत असू.  ती गोष्ट वैद्य वहिनी अगदी रंगवून सांगायच्या आणि दरवर्षी ऐकली तरी त्यातील गोडी कमी व्हायची नाही! मराठ्यांची चाळ आमच्या घरापासून जवळच असल्याने आणि त्या चाळीत आमचे येणेजाणे असल्याने कोजागिरी साजरी करायला आम्ही तिथे जात असू.माझ्या जवळच्या मैत्रिणी तिथे रहात असत. साधारणपणे 1962 ते 71 आमचे बि-हाड रत्नागिरीत होते. तोच माझा शाळेचा ही कालखंड होता, त्यामुळे मैत्रिणींचे वेड घरच्यां पेक्षा जास्तच! एकत्र खेळायचं, शाळेला जायचं, शाळेतून येताना कोपऱ्यावर तासन-तास गप्पा मारायच्या असा आमचा दिनक्रम होता!

रत्नागिरी शहर तसं लहान! मराठ्यांची चाळ झाडगावात प्रसिद्ध… बटाट्याच्या चाळी सारखी! जवळपास सतरा अठरा बि-हाडे असतील तिथे! वेगवेगळ्या वयाची, वेगवेगळ्या व्यवसायातील माणसे तिथे आनंदाने राहत असत. चाळीतला गणपती उत्सव ही दणक्यात साजरा होत असे. पाऊस नसला तर करमणुकीचे कार्यक्रम  होत असत. कोजागिरी पौर्णिमेला मात्र बहुतेक वेळा लख्ख चांदणे अनुभवता येई! आता इतका निसर्ग लहरी नव्हता बहुतेक! चाळीत कार्यक्रम ठरला की आमचे छोट्या मुलांचे करमणुकीचे कार्यक्रम असतच! छोटी नाटिका,नकला, चित्रपटातील गाणी नाट्यछटा वगैरे. मीनाच्या वडिलांचा स्टुडिओ असल्याने तेथील मोठा पडदा कार्यक्रमासाठी मिळत असे. 

संध्याकाळपासून आमची कार्यक्रमाची तयारी सुरु असे. त्यातल्या आठवणार्‍या एक-दोन नाटिका म्हणजे एक ध्रुवाची आणि दुसरी कृष्णाची! माझ्या मैत्रीण बरोबर अर्थातच त्यात माझी भूमिका असे. असे हे कार्यक्रम झाले की कोजागिरीच्या रात्री समुद्रावर फिरून येणे हा आनंदाचा भाग!  टिपूर चांदण्यातून,  चमचमणाऱ्या वाळूतून, समुद्राचे खळाळणारे रूप पाहात फिरताना अवर्णनीय आनंद मिळत असे. समुद्रावरुन घरी यायला नको वाटत असे पण भेळ आणि मसाला दूध याच आकर्षण अर्थातच चाळीत पुन्हा घेऊन येत असे. चंद्राला ओवाळून दुधाचा नैवेद्य दाखवायचा आणि आणि दुधाचा आस्वाद घ्यायचा, यामध्ये स्वर्गीय सुख होते. या सर्वासाठी सामूहिक वर्गणी  असे. सगळेजण एकत्र येऊन काम करत असत. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचे आनंद घेण्यात सगळेच सामील असत. आतासारख्या मोठमोठ्या पार्ट्या नसतील तेव्हा, पण एकत्र येऊन भेळ खाणे, दुग्धपान करणे आनंददायी असे.त्या आटीव दुधाचा स्वाद अजूनही मनात रेंगाळत आहे! पावभाजी,वडा पाव यासारखे पदार्थ तेव्हा नव्हते! कधीकधी गाण्याच्या भेंड्या, संगीत खुर्ची यासारखे खेळही होत असत.

कोजागिरी जागवणे हे बहुतेक दर वर्षी होई. कोकणात पावसाचा सीझन संपला, आणि आकाश निरभ्र झाले की पावसाला कंटाळलेली माणसे कोजागिरीचा आनंद मनसोक्त घेत असत!

कोजागिरी पौर्णिमेला “नवान्न पौर्णिमा” असेही म्हणतात, कारण यादरम्यान ‘हळवं भात’ शेतात तयार झालेले असे. त्या नव्या तांदळाच्या खिरीचा नैवेद्य  या दिवशी करतात. यानंतर दसरा-दिवाळी यासारखे मोठे सण येणार असल्याने कोजागिरी पौर्णिमे पासूनच वातावरण आल्हाददायक होण्यास सुरवात होत असे. कोजागिरी पासून एक महिना वेगवेगळ्या देवळातून (रामाच्या, राधा कृष्णाच्या, विठ्ठलाच्या) काकड आरती सुरू होत असे. त्या पहिल्या दिवशी तरी आम्ही देवाला जाऊन काकड आरती साजरी करत असू.थंडीची हलकीशी सुरुवात झालेली असे. स्वच्छ हवा, टिपूर चांदणे आणि समुद्रावरचे फिरणे अशा सर्व अविस्मरणीय अनुभवाचे वर्णन शब्दात करणे

अशक्य आहे…

आज इतकी वर्षे झाली तरी मामा मराठ्यांच्या चाळीत अनुभवलेली कोजागिरी मनात जपून ठेवली आहे. काळाबरोबर माणसे गेली,ती चाळही गेली ,पण आमच्या स्मरणात मात्र मामा मराठ्यांच्या चाळीतील ते चांदणक्षण कायमचे राहून गेले!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वाटणी – उन्नती गाडगीळ  ☆ प्रस्तुती – सौ.  सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

? वाचताना वेचलेले ?

☆ वाटणी – उन्नती गाडगीळ  ☆ प्रस्तुती – सौ.  सुनिता गद्रे☆ 

मंदिराबाहेर ठेवलेली पायताणं भिजली. त्या बरोबर माझ्या अंतरातील मिजास… उफाळून जीभेवर आली. हळहळली.. चडफडली.. अन् पुटपुटली…

” छीsss आता माझे तलम, मलमली मोजे ओले होतील ना ! “

समोर.. फूटपाथवर.. मोडक्या.. विटक्या छत्रीखाली काटका.. फाटका.. तरूण व्रुत्तपत्र, पुस्तके विक्रेता.. पुढ्यात पुस्तके मांडून बसलेला..

क्षणात..  अवखळ वावटळ  आली.. धारा नृत्य सुरू झाले. त्याची छत्री उडाली.. वर्षाराणीने पुस्तकांना अमृत पान दिले…

तो काटका.. फाटका असून.. न चडफडता.. हासत.. हासत.. फाटक्या कपड्यात पुस्तके बांधून झाडाखाली.. दुकान थाटून कुडकुडत उभा.. Great !!!

माझ्यातील मिजासीला.. गुर्मीला.. रडतराऊ व्रुत्तीला त्याच्या कृतीने टपली.. मारली !!!

? असाच एकदा.. आडदांड.. द्वाड .. वारा.. गवाक्षातून भसकन.. आत शिरला..

अन् क्षणार्धात… माझ्या मौल्यवान  फुलदाणीचा चक्काचूर झाला..

मी.. हुंदकत..स्फुंदत काचा गोळा करत राहिले..

इवली.. चिऊताई टकारून माझ्या कडे बघत होती..

वाऱ्याने पडलेले तिचे घरटे.. त्यातीलच  काडी काडी.. वेचून माझ्या गच्चीत.. आडोशाला घरटे बांधत होती..

फडफडत होती.. चिवचिवत होती..

धडपडत होती..

गिरकत.. मुरकत.. नेटानं.. पुन्हा पुन्हा.. बांधत होती..

टकमक माझ्या कडे बघून.. कसं जगायचं  या शास्त्रातली Phd मिळवलेली चिऊताई मला सांगत होती…

” सतत सतत रडायचं नसत.. मनाला आवरून.. लढायचं असतं!!!”

धन्यवाद?

 

© उन्नती गाडगीळ ??

प्रस्तुती –  सौ सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मांडवावरची वेल ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ मांडवावरची वेल ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

आमच्या घरी सरुबाई  खूप वर्षे काम करतात. अतिशय गरीब, प्रामाणिक, आणि कष्टाळू. त्या दिवशी खूप अस्वस्थ होत्या.  सकाळी चहा पण नको म्हणाल्या.

“ काय झालय सरुबाई.” 

“ काय न्हाय व रोजचे तमाशे.. जीव नुसता नको झालाय. रोज रोज कटकटी, भांडणतंटे.

मुलं मोठी झाली तरी अक्कल येईना या नवऱ्याला,.दारू तरी किती ढोसावी–आता  ही पोरं शिकून मार्गी लागली तरच आशा– कसलं व हे  जिणं. बघा ना, तुमच्या ताई एवढंच असेल माझं थोरलं. ताई आपल्या किती अब्यास करत असतात ते बघतेय ना मी. आणि आमचं दिवटं–

अक्खा दिवस वस्तीत फिरत असत्यय शाळा बुडवून. आमची वस्ती ही अशी. बाई वेळ नाही व लागत बिगडायला. न्हाय म्हणायला,पोरगी मात्र आहे हुशार  पण किती व काम लागतं तिला बी घरात.” 

सरुबाईची समजूत घालून, खायला देऊन, पाठवले खरे,पण मन मात्र अस्वस्थच होते.

दिवस पळत होते. माझ्याच आयष्याची लढाई लढताना, मी तरी कुठे कोणाकोणाला पुरणार होते? —

दरम्यान,माझ्या हॉस्पिटलने चांगलाच जीव धरला। खूप छान चालायला लागले। मला दिवसाचे 24 तास पुरेनासे झाले आता मी सरुबाईना पगार वाढवला. माझ्या हॉस्पिटलच्या पेशंटचे जेवणखाण त्या करू लागल्या. मला ती काळजीच उरली नाही. मध्ये मध्ये समजायचे, मुलगी छान मार्क मिळवतेय, पण मुलगा काहीही करत नाही. नुसता अड्ड्यावर बसून जुगार खेळतो.

 –आम्ही बघण्या खेरीज काहीच करू शकत नव्हतो.

सरूबाईंची  मुलगी खूप वेळा यायची आईला मदत करायला. मोठी गोड मुलगी. वेळ मिळाला, की अभ्यासाचे पुस्तक उघडून बसायची. मला मोठे कौतुक वाटायचे तिचे..काही अडले,तर माझ्या मुलीला विचारायची—

त्या दिवशी मला तिने प्रगती पुस्तक दाखवले. कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकणाऱ्या या पोरीला आठवीत  ९0 टक्के मार्क्स होते, पाच तुकड्यात ती पहिली आली होती.

आम्हाला अत्यंत आनंद झाला.आणि कौतुक वाटले. मी तिला मोठे बक्षीस दिले.  माझ्या मुलींनीही  तिला सांगितले, “ हे बघ,राधा,आता मागे वळून बघू नको. खूप हुषार आहेस तू.

आत्ता वाटेल तेवढे कष्ट कर, पण या परिस्थितीतून तू स्वतःला बाहेर  काढ. अग, हेही दिवस जातीलच. आम्ही आहोत ना–कोणतीही मदत लागेल ती माग.” 

राधाला दहावीला 92 टक्के मार्क मिळाले. मला विचारायला आली—

“ बाई, यापुढे मी काय करू? आई तर माझं लग्न करायला निघालीय, पण बाई,मला शिकायचंय  हो। मला तुमच्यासारखे मोठे व्हायचंय. मला डॉक्टर तर होता येणार नाही, पण निदान  काहीतरी करून दाखवायचं आहे. ”

तिची तळमळ अगदी काळजाला भिडली. सरुबाईना बोलावले आणि म्हटले,

“ लग्न  करताय हो राधाचे? वाटतंय का जीवाला काही ?  द्या असाच दारुडा बघून, की सुटलात. 

जरा धीर धरा सरुबाई. ही मुलगी खरंच पुढे जाईल, पांग फेडील तुमचे. मी भरते तिची सगळी फी यापुढे.. “ 

“ अव, फी मस भराल बाई, पण लोक काय म्हणतील ? आणि हिला शिकलेला नवरा कुठून आणू मग.? “

मी चिडून म्हणाले,” गप बसा. आणेल  तिचा ती शोधून. जा ग राधा, मी घेईन सगळी तुझ्या शिक्षणाची जबाबदारी.” 

राधा 12  वी झाली. इतके सुरेख मार्क होते, की  तिला कुठेही सहज प्रवेश मिळू शकत होता.

पुन्हा राधा माझ्याकडे आली.‘ आता काय? ‘हा प्रश्न होताच कायम. माझी बहीण डि. एड.  कॉलेजची प्रिंसिपल होती।

आधी राधाला विचारले, “ तुला शिक्षक  व्हायला आवडेल का? बघ–तू  2 वर्षात डी एड होशील, आणि लगेच नोकरीही लागेल. मग बाहेरून कर बी. एड. नाही तर तुला नर्सिंगचाही पर्याय आहे–सहज मिळेल तुला ऍडमिशन दोन्हीकडे. “ 

राधा म्हणाली, “ बाई,मी जर नर्सिंग केले, तर मला सगळे फ्री होईल ना? हॉस्टेल, स्टायपेंड? “ 

” अर्थात राधा.  तुला काहीही खर्च नाही पडणार.” 

राधाने बी. एस्सी. नर्सिंगला  ऍडमिशन घेतली. तिची जिद्द कायम होती. राधा आता एकदम स्मार्ट झाली.  दिसायला  छान होतीच, पण चेहऱ्यावर बुद्धीचे तेज दिसू लागले.

राधा बी. एस्सी. ला डिस्टिंक्शनमध्ये पास झाली. लगेच तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जॉब मिळाला. फुल युनिफॉर्ममधली राधा माझ्यासमोर येऊन उभी राहिली, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणीच आले.  किती सुंदर दिसत होती राधा.

तीनच वर्षात राधा चीफ स्टाफ झाली. ‘ ऑपरेशन थिएटर सिस्टर ’ अशी मोठी जबाबदारीची पोस्ट  तिला मिळाली.

एक दिवस ती माझ्या घरी एका मुलाला घेऊन आली—” बाई,आता हाही प्रश्न  तुम्हीच सोडवायचा– नेहमी सारखा. “ 

राधाच्या चेहऱ्यावर लाजरे हसू होते. 

“ बाई हा सतीश. माझ्याच हॉस्पिटलमध्ये नोकरी करतो. एम.कॉम. आहे, आणि हॉस्पिटल ऍडमीनमध्ये आहे.  मला लग्न करायचंय याच्याशी. “ 

मी सतीशची माहिती विचारली. छानच होता मुलगा. स्वतःचा छोटा फ्लॅट होता. आईवडील गावी असायचे. पगारही चांगला  होता. पण सरुबाई —“ बाई ,जातीचा न्हाय आमच्या हा. “ 

“ सरुबाई, बास झाले. काय केलेत हो आजपर्यंत या लेकरासाठी तुम्ही? लग्नासाठी  एक पैसाही न मागणारा असा उमदा जावई आपणहून दारात येऊन उभा राहिलाय. आणि मुले मोठी आहेत आता. मुकाट्याने परवानगी द्या. नाही तर ती लग्न करूनच येतील.” 

सरुबाईना पटले– साधेसुधे लग्न झाले. किती सुंदर दिसत होती जोडी. मला वाकून नमस्कार करताना राधा म्हणाली, “ बाई तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. तुमच्या दोन, तशीच तिसरी  मुलगी मानलीत मला .” राधाने  मला मिठी मारली. मला  खूप समाधान मिळाले. 

केव्हाही पायदळी तुडवली जाईल अशी ही वेल,  माझ्या हातून मांडवावर चढवली गेली.

आता ती फुलेल फळेल—- आणि समाधान मला मिळेल. 

देवानेच हे काम करून घेतले होते माझ्याकडून. 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाकरीयन … भाग दुसरा ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ भाकरीयन … भाग दुसरा ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

(इथंच हाताला पहिला चटका बसतो.) इथून पुढे —-

एका हाताने पाणी न दुसऱ्या हाताने पीठ मर्दत रहायचे,पाणी बेतानेच घालत रहायचं अन्यथा पीठ पातळ होते आणि भाकरी थापली जात नाही.तर पीठ मळत मळत छानसा मऊ गोळा तयार करायचा मग परातीत थोडेसे पीठ पसरून त्यावर गोळा ठेवून हलक्या हाताने गोल गोल थापायला सुरुवात करायची,डावा हात कडेला लावून आकार एकसारखा राखण्याचा प्रयत्न करायचा.(अधून मधून जाळ एकसारखा करत रहायचं,एक म्हणजे एकच काम करत राहिले तर तवा थंड पडायचा.)थोडी पुढं सरकली भाकरी की मग दोन्ही हातानी थापायला सुरुवात करायची.उजवा हात मध्यभागी न डाव्या हाताने  कडेवर एकसारखा हलकासा दाब देत देत गोळ्याच्या प्रमाणात भाकरीचा गोल ठरवायचा.(पण भाकरी थापताना पण एक गंमत होते-गोळ्या खाली पीठ जास्त झाले तर बाजूच्या कडांवर येते आणि भाकरी भाजली की ती  खालच्या बाजूने पिठूळ पांढरी दिसते.पीठ कमी झालं तर भाकरी मधेच चिकटते आणि गोल फिरत नाही आणि पुढेही सरकत नाही; म्हणून खालच्या पिठाचा बिनचूक अंदाज अनुभवानेच येतो.)एकदम गोळा घट्ट झाला की भाकरी चिरते.भाकरी चिरली की तिथं मळलेल्या पिठाचा जोड दिला तरीही ती एकसंध होत नाहीच.गोळा घट्ट झाला तरी भाकरी पुढं सरकत नाही आणि गोळा पातळ झाला तरी खाली चिकटतो आणि भाकरी पुढं सरकत नाही किंवा  भाकरी उचलून टाकताना तुकडे तरी पडतात किंवा मधेच हात जाऊन भसका तरी पडतो.इतकी सारी काळजी घेत थापलेली भाकरी  हळुवार पणे कडेला नेत पटकन उचलून तव्यात न सुरकुती पडता चटकन टाकण्याचे पण कसब असावे लागते.पूर्वीचे लोखंडी तवे खोलगट असायचे भाकरी तव्यात टाकताना मनगटाच्या आतल्या बाजूने बांगडी जवळ चरदिशी चटका बसायचा,हा दुसरा चटका! आता जाळ पुन्हा एकसारखा करून समान जाळ लागतोय का बघायचे अन्यथा जिथं कमी जाळ लागत असेल तिथं तवा थोडासा उचलून दगडाची बारीक चिप सारायची मग भाकरीवर पुरेसे पाणी फिरवून दुसऱ्या भाकरीकडे वळायचे.जसजशी चूल तापू लागेल तसे निखारे बाहेर काढायचे,भाकरीला लावलेले पाणी सुकले असले तर भाकरी पलटी करून पुन्हा तव्यात टाकायची.( इथं पण एक गंमत अशी होते की पाणी जास्त झाले तर भाकरी पचत नाही लवकर आणि लावलेले पाणी सुकून गेले तर भाकरी चिरते न कडक होते त्यामुळं कींचित ओली आहे तोवरच भाकरी पलटायची)

चुलीतला जाळ एकसारखा करत तव्यातली सर्व बाजूनी भाजलेली भाकरी चुलीतले निखारे बाहेर छोट्या वाफ्यात बाजूला ओढून लावायचे त्याला चुलीचा आधार देऊन भाकरी उभी करायची,तोपर्यंत परातीत थापून झालेली भाकरी तव्यात टाकायची,जाळ एकसारखा करायचा,एखादी ढलपी,शेणकुटाचा तुकडा किंवा चार चिपाड आत सारून नवीन भाकरी थापायला घ्यायची, तोपर्यंत निखाऱ्यावरची भाकरी फुललेली असते,ती काढून बुट्टीत टाकायची.पहिल्या भाकरीतला एक छोटासा तुकडा काढून अग्नीला अर्पण करायचा आणि पाण्याचे चार शिंतोडे चुलीत मारायचे मग पुढच्या भाकरीकडे वळायचे. जळण बाभळीचे,लिंब करंज असे कठीण असले तर निखारे चांगले रसरशीत पडतात मग भाकरी पटपट भाजतात. नुसत्या चिपाडाचे निखारे पडत नाहीत त्यामुळं जळण चांगल्या दर्जाचे असले तरच भाकरी पटापटा होतात चूल एकसारखी धगधगत रहाते आणि कितीही भाकरी कराव्या लागल्या तर कंटाळा येत नाही.चिपाड मात्र सारखी विझतात आणि सारखा जाळ घालून भाकरी थापताना बाईचा जीव रडकुंडी येतो.या सर्वातून तावून सुलाखून बाई भाकरीत निष्णात होते.

तर कुणाच्याही भाकरीला इथून पुढं नावं ठेवताना भाकरियन नक्की आठवा.

आजकाल मुलींना कुणी स्वयपाक घरात येऊच देत नाही त्यामुळं आई स्वैपाक करताना निरीक्षण बिरीक्षण असली काही भानगड नसते शिवाय स्वैपाक करण्याची गोडीही लावली जात नाही. गॅसवर भाकरी चांगल्याच होतात .एखादं वेळेस भाकरी नाही आली तरीही चालते कारण दोन वेळेस चपातीच खाल्ली जाते. आमची मुलगी शिकल्या, नोकरी करणार मग स्वैपाकाची तिच्याकडून स्वैपाकाची अपेक्षा करू नका असे सांगणारे देखील आईवडील आहेत पण माणूस प्रेमाने बांधून ठेवण्यात चांगल्या स्वैपाकाचा देखील महत्त्वाचा वाटा आहे.

असो,आम्ही अशा पद्धतीने शाळा शिकत शिकत सर्वच कामे करत जबाबदार झालो.त्यामुळं जीवनात कधीच कुठल्या प्रसंगाला मागे हटलो नाही कितीही स्वैपाक असो,धुणे असो की भांड्याचा खिळा काहीच वाटत नाही सहजच कामे करून टाकतो.

स्वतःचे पोट भरण्याइतपत तरी चविष्ट आणि सकस स्वैपाक प्रत्येकीलाच करता यायला हवा असे माझे स्पष्ट मत आहे.बाहेरचं कितीही महागडे चविष्ट  खाद्यपदार्थ असले तरी घरच्या साध्या सात्विक जेवणाची सर नाहीच!

(कसे वाटले भाकरियन? आवडले तर नक्की पुढं पाठवा)

समाप्त 

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सखी रंगावली ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

?  मनमंजुषेतून ?

☆ सखी रंगावली ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆ 

दोन बोटांच्या चिमटीत अलवारपणे रांगोळी घ्यायची आणि मुक्तपणे जमिनीच्या अंगांगावर, फक्त तिच्यासाठी विविध रंग ढंगाचे, सुरेख, सुबक,कोरीव अमाप अलंकार आपण स्वतः घडवायचे,तिच्या सौदर्यासाठी आपल्या आत्म्याचा आविष्कार करायचा आणि तिला मनभावन करायचं! अहाहा! यातील अत्युच्य आनंद काय वर्णावा…

रांगोळी…अस नुसतं म्हटलं तरी अनेक आकार, आकृत्या, रंग, रेषा,ठिपके सगळं डोळ्यासमोर येऊ लागतं. 

मी कुठेही गेले तरी माझं लक्ष प्रथम दर्शनी रांगोळीकडे जात, त्यात काय नावीन्य आहे, त्यातील कलात्मकता, कल्पकता, सर्जनशीलता माझं लक्ष आपोआपच वेधून घेते. 

खर तर प्राचीन काळापासून घराच्या भिंतींवर, दारात विविध आकार, आकृत्या, सांकेतिक चिन्ह रेखाटून लिंपन केलं जात असे, पण तेव्हा  त्याला रांगोळी  म्हणत नसत. अशी चिन्ह ,आकृत्या शुभसुचक असल्याचं प्राचीन काळी मानत असत.

आपल्या संस्कृतीतही रोज देवघरात, दारात  रांगोळी काढली जाते. रांगोळी  नकारात्मक शक्तीला घरात प्रवेश करू देत नाही अशी समजूत आहे.

रांगोळीची शुभचिन्ह, स्वस्तिक, कमळ, गोपद्म, शंख, देवीची पावलं, ठिपक्यांच्या विविध रांगोळ्या सर्वांच्याच परिचयाच्या आहेत.विविध सण, समारंभ,  कार्यक्रम, उदघाटन, रांगोळी,स्पर्धा, उत्सव अशा अनेक प्रसंगी मोठं मोठ्या आकर्षक रांगोळ्या लक्षवेधी ठरत आहेत.

कुणी फुलापानांची, कुणी धान्याची रांगोळी काढत. कुणी पायघड्यांची तर कुणी पाण्यावर, तेलावरही रांगोळी काढतात.  दक्षिणेकडे तांदुळाच्या पीठाने रांगोळी काढतात. कुणी थ्रीडी रांगोळी काढतात तर कुणी पोर्ट्रेट रांगोळी काढतं.  कुणी देवदेवतांची  थोर व्यक्तीची रांगोळी काढतात. रांगोळीकार, कलाकार, रसिक त्या त्या ठराविक प्रसंगी अशा आपल्या कला, हौस  रांगोळीच्या माध्यमातून सादर करतात आणि प्रसंगाला शोभा आणतात. 

रांगोळी हाती आली की मला काय काढू नी काय नको असं होऊ लागतं. वेगळं काही काढावं अस वाटू लागतं!

अगदी नव्या वर्षारंभी, गुढीपाडव्याची उंच ऐटीत उभी असलेली गुढी, तिला नेसवलेलं हिरवं ,लाल काठाच रेशमी वस्त्र, झेंडूच्या फुलांचा हार आणि साखरेची केशरी माळ,वरचा उपडा केलेला कलश…जसच्या तस माझ्या रांगोळीत अवतरत! चैत्रगौरीची आरास करून झोपाळ्यातील गौरीसमोर तेहतीस प्रतिकांची रांगोळी म्हणजेच चैत्रागण काढताना त्या रेषा नाजूक, सुबक  रेखीव हुबेहूब दिसावीत असा प्रयत्न असतो. आता तर असे मोठं मोठ्या रांगोळ्यांचे तयार छाप ही मिळतात. पण मला ते छाप मारणं म्हणजे आळशीपणा,कामचलावूपणा केल्यासारखं वाटत. 

माझ्या रांगोळी रेखाटन प्रक्रियेतच आषाढी वारीही होते. या वारीतून साक्षात पांडुरंग अवतरतो. त्यासाठी तासनतास गेले तरी त्या पांडुरंगाच मुखकमल तयार होताच उच्च कोटीचा परमानंद मिळतो.

हिरव्या सरींचा श्रावण ,घरात आणि दारातही हिरवीगार रांगोळी माझ्याकडून काढून घेतोच. गणपतीत, रोज एक वेगळी गणपतीची रांगोळी! गौरी आगमनाला, तांब्याच्या गौरी..कलशावर बसवलेले त्यांचे मुखवटे,त्यांचे अलंकार, डोळ्यातील भाव, लाल ओठ,केस, हसरा चेहरा किती किती म्हणून त्यांना रांगोळीने मोहक करू अस होत मला! 

नवरात्रीत ठरलेल्या रंगांप्रमाणे रोज ठरलेल्या रंगाची रांगोळी, पण वैविध्यपूर्ण ,त्यात अमूर्त कलेचाही भाग येतो. अष्टमीला देवीचा मुखवटा रेखाटण्यात खरोखर एक आव्हान असत!

दसऱ्याला आपट्याची हृदयाच्या आकाराची हिरवीगार पानं काढताना, त्यातील शाखा ,उपशाखा तंतोतंत दिसल्या तर ते पान जीवंत वाटू लागतं! 

दिवाळीत, प्रत्येक दिवशी  रांगोळीची  वेगळी नक्षी ! कमळात विराजमान असलेल्या, आशीर्वाद देणाऱ्या महालक्ष्मी आणि गजलक्ष्मी यांची सुबकता ,मोहकता रेखाटताना… माझी आई नेहमी म्हणते आपण कोण काढणारे? ती जगन्माता आपल्याकडून करवुन घेत असते. 

या देवीच्या सेवेसाठी तिच्यासमोर रांगोळीचा पैठणीचा पदर,काठ, त्यातील नाजूक सोनेरी बुट्टे, पैठणीचा ठराविक रंग लक्ष्मीपूजनाच्या भाव भक्ती आणि  हर्षासोबत मनही सौदर्य भावनेने तुडुंब भरून जात.  शेजारी ठेवलेल्या दिव्यांच, पणत्यांच तेज, मनामनात आणि  वातावरणात पसरत असतानाच… त्या पैठणीच्या काठातील जरीची वीण मधूनच सोन्यासारखी चमचमत असते. 

ह्या दिवाळीच्या तेजोमय आठवणी सरत असतात तोपर्यंत येते संक्रांत!

दोन बाय दोन च्या चौकोनात  राखाडी रंगाच्या आकाशाच संध्याकाळीच दृश्य, खाली  हिरवळीवर हलव्याचे दागिने, मंगळसूत्र, कानातले, हळदी कुंकवाचे करंडे, वाटीभरून रंगीत तिळगुळ हलवा…सगळं रांगोळीच्या टपोऱ्या हलव्याचं ह! ” तिळगूळ घ्या गोड बोला” म्हणून सवाष्णींची ओटी भरून वाण देताना ,प्रत्येक मैत्रिणीने माझ्या रांगोळीच कौतुक केलेलं असत. कौतुकाने मूठभर मांस चढलेल असत आणि आनंदाने आतल्या आत ‘मोतीचुर के लड्डू फूटतात!’

मी  कित्येकदा रांगोळी प्रदर्शन बघायला आवर्जून जाते. तिकडे  हुबेहूब वाटणारी व्यक्तिचित्र, रेल्वेगाडी, पक्षी, अनेक निसर्गचित्र सगळं मनाला भावणारं! एके ठिकाणी तर घडी घातलेल वर्तमानपत्र जमिनीवर पडलंय अस वाटत होतं,इतकी सूक्ष्म, रेखीव हुबेहूब, त्यातील प्रिंट अक्षरही जबरदस्त  बारीक रेखाटली होती. खरच अशा महान कलाकारांना, त्यांच्या कलेला सलाम करावासा वाटतो.

मला अगदी सर्व प्रकारच्या रांगोळ्या येतात अस नाही पण हौस म्हणून  मनापासून प्रयत्न मात्र असतो. ठिपक्यांच्या रांगोळ्यापेक्षा  मुक्त, स्वैर  रांगोळ्या काढणं आणि त्यात माझ्या हृदयातील रंगांचं सौदर्य भरण मला फार आवडत. रांगोळीचे विविध रंग तिच्यात ‘जीव’ आणतात. मला तासनतास स्वतःजवळ थांबवून ,स्वतःला माझ्याकडून घडवून घेणारी, माझ्या रोमारोमाला आनंद देणारी, माझ्यात सर्जनशीलतेचे विचार जागृत करणारी माझी सखी रंगावली! तिच्या कायमच्या सोबतीने,

माझा प्रत्येक दिवस मंगलमय सण होतो! 

 

© सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माघार कोणी घ्यावी ? ☆ संग्राहक – श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ माघार कोणी घ्यावी ? ☆ संग्राहक – श्री विनय माधव गोखले ☆ 

माघार कोणी घ्यावी

दोघांमध्ये भांडण ?  माघार कोणी घ्यावी ?  स्वामी विवेकानंद यांचे उत्तर—–

“दोघांमध्ये भांडण झाले तर माघार घ्यायची कुणी ? —

 ज्याचे विचार बरोबर असतात त्याने माघार घ्यावी, की ज्याचे विचार चुकीचे आहेत, त्याने माघार घ्यावी? “

स्वामी विवेकानंदाना असा प्रश्न विचारण्यात आला……

 स्वामी विवेकानंद म्हणाले –” चूक कोण,बरोबर कोण याला अजिबात महत्व नाही….,

 ज्याला सुखी रहायचे आहे, आनंदी राहायचे आहे, त्याने या भांडणातून माघार घ्यावी….”

—–“स्वार्थ आणि मोठेपणा ” सोडला की, आनंद घेता येतो आणि देताही येतो…

अपेक्षा, गैरसमज, अहंकार, तुलना, यामुळे एकमेकातील नाती बिघडू शकतात… 

असे होऊ नये म्हणून—– 

” विसरा अन् माफ करा ” हे तत्त्व केव्हाही चांगलं  …

“ग्रंथ” समजल्याशिवाय “संत” समजणार नाही…आणि “संत” समजल्याशिवाय ”भगवंत”समजणार नाही.हेच सत्य आहे. 

 

संग्राहक : श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाकरीयन … भाग पहिला ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ भाकरीयन … भाग पहिला ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

‘अरे संसार संसार जसा तवा चुल्हावर

        आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर.’

भाकरीचे उदाहरण देऊन संसाराचा सार्थ अनुभव बहिणाबाईंनी सांगितलाय. भाकरी हवी असेल तर त्यासाठी तव्याचे चटके, चुलीची धग सहन करायलाच हवी. कोणतीही इच्छित गोष्ट सहज प्राप्त होत नाही असेच बहिणाबाईंना सुचवायचे आहे. सुख हवे असेल तर दुःख झेलावे लागते,हिरवळ हवी असेल तर उन्हातानातून चालावे लागते,परमेश्वरभेट हवी असेल तर कठोर तपश्चर्या करावी लागते, मोह मायेपासून अलिप्त रहावे लागते. थोडक्यात एखादी गोष्ट विनासायास मिळाली की तिचे महत्व रहात नाही मात्र तीच वस्तू प्रयत्नातून,परिश्रमातून मिळाली असेल तर तिचा आनंद अवर्णनीय तर असतोच पण चिरंतर देखील असतो.

एखादी माऊली एकाग्र होऊन चटचट भाकरी थापते आणि प्रत्येक भाकरी टम्म फुगते.चुलीवरच्या त्या भाकरींचा ढीग आपण भान हरपून पहातो आणि तिच्या कौशल्याचे मनातून कौतुक करतो,किती छान वाटते आपल्याला!पण तिने हे कौशल्य आत्मसात करायला बराच वेळ घालवलेला असतो,निरीक्षण,प्रयोगातून आणि सरावातून हे कौशल्य तिला सहज प्राप्त होते. ‘Practice makes man perfect’ एखाद्या गोष्टीच्या सरावाने माणूस त्यात अव्वल होतो.

तरीही भाकरी करायला शिकण्यापासून ती परफेक्ट जमणे आणि सराव होणे ही तशी किचकटच प्रक्रिया आहे.चांगली भाकरी जमणे हे करणारीच्या हातोटीवर तर अवलंबून आहेच पण बाकीच्या गोष्टी पण त्यास कारणीभूत असतात.

खरे तर चांगल्या पिठापासूनच भाकरीची सुरुवात होते.गिरणीवर पीठ कसे दिले?यावर चांगल्या भाकरीची यशस्वीता अवलंबून असते.ज्वारी खूप जुनी असेल किंवा पावसात भिजलेली असेल तर पीठ वसवसते आणि भाकरी थापता येत नाही,कितीही पट्टीची सुगरण असली तरीही!

गिरणीत गव्हाच्या किंवा डाळीच्या दळणावर ज्वारी दळून दिली असेल तरीही भाकरी तव्याला चिकटते किंवा भाकरी डागलते.आजकाल बऱ्याच ठिकाणी ज्वारीची वेगळी आणि गव्हाची वेगळी गिरण असते त्यामुळं ती समस्या नसते मात्र ग्रामीण भागात अजूनही एकच गिरणी सगळ्या दळणाला वापरली जाते.हल्ली भाकरी गॅसवर हेंदालीयमच्या तव्यात भाजली जाते त्यामुळं भाकरीला सर्व बाजूने हवी तशी आच देऊन भाकरी चांगली करता येते.त्याचबरोबर आता पहिल्यासारखी कसलीपण ज्वारी नसते,प्रतवारीनुसार व गुणवत्तेनुसार बाजारात ज्वारी मिळते व अशा ज्वारीची  भाकरी चांगलीच होते.एकूण काय तर हल्ली चांगली भाकरी यायला फारसे कष्ट पडत नाहीत किंवा नवशिकिला भाकरी लगेचच जमू लागते शिवाय हल्लीच्या मुलींना आत्मविश्वास खूपच आहे कारण काही बिघडले,चुकले किंवा पीठ,भाकरी वाया गेली तरी घरचे रागवत नाहीत.त्यामुळं थोड्याशा सरावाने तिला चांगल्या भाकरी जमू लागतात.पण आमच्या लहानपणी आम्ही मुळाक्षरापासून शब्द शिकण्यासारखे भाकरी करायला शिकलो.

सर्वसाधारण वय वर्षे बारा किंवा अगोदरच भाकरी करायला आली पाहिजे असा अलिखित दंडक होता. स्वैपाक प्रथम, शाळा दुय्यम होती, त्यामुळं तितक्या वर्षाची मुलगी झाली की लगेच कुणीपन घरात आले की लगेच पोरीला बघून विचारायचे,’स्वैपाक पाणी येतोय की नाही अजून?’ मग येत असला की कौतुक व्हायचं, नसला येत की नावे ठेवत, त्यामुळं आपल्याला स्वैपाक आला पाहिजे ही आंतरिक हुरहूर आणि तळमळ प्रत्येकीला असायची. पण एकदम भाकरी शिकणे किंवा नुसती भाकरी येण्यालाही महत्व नव्हतं;तत्पूर्वी घरातील बारीक सारिक कामे पहिली यायला हवीत, ती अगदी पहिली दुसरीपासून सुरू होत. झाडलोट, राखकेर भरणे, भाज्या निवडणे,पाणी भरणे, चुलीपुढं जळण आणून ठेवणे, दुकानातून काहीबाही घरच्या गरजेच्या वस्तू आणणे,आई स्वैपाक करताना तिथंच बसून हाताखाली लागणाऱ्या वस्तू देणे आणि हे करतच स्वैपाकाचे म्हणजेच भाजी कशी फोडणीला टाकायची, आमटी कशी करायची, कशात काय घालायचं आणि कशात काय घालायचे नाही? याचे अचूक निरीक्षण करायचे त्याचबरोबर आई, आजी किंवा घरातील मोठी स्त्री भाकरी कशी करते हेही स्वैपाकघरात बसून बघावे लागे. यातूनच मग स्वैपाकाचे तंत्र शिकता यायचे आणि गोडीही लागायची.अधे मध्ये एखादा छोटा गोळा घेऊन भाकरी थापता येते का याचे प्रात्यक्षिक करून बघायला मिळायचे.

अचानक एखादे दिवशी कोणीतरी म्हणे,’आज भाकरीला बस.’ त्यावेळी आनंद ही होई आणि भीतीही वाटे, भाकरी जमणार का नाही? प्रथम चुलीतला जाळ एकसारखा करायचा, लोखंडी जडशीळ तवा चुलीवर ठेवायचा, त्यात उसुळला (उथवणी) भाकरीच्या अंदाजाने पाणी ओतायचे. परातीत पिठाचे गोल आळे करायचे, त्यात तव्यातलं उकळलेले पाणी ओतायचे.उलथण्याने पीठ हळुवार कालवून बाजूला सारायच. तोपर्यंत तिकडं हलक्या बोटांनी चुलीचा जाळ एकसारखा करायचा,चार काटक्या आत सारून फडक्याला बोटं पुसून पीठ मळायला सुरुवात करायची.इथंच हाताला पहिला चटका बसतो.

क्रमशः….

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares