मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सारागढीची लढाई.. श्री राजेश खवले ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ सारागढीची लढाई.. श्री राजेश खवले ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

जीवनाची लढाई जिंकण्‍यासाठी सारागढीच्‍या शिख सैनिकांप्रमाणे लढा ! 

सध्‍याच्‍या पाकिस्‍तानातील समाना पर्वतरांगेतील कोहाट जिल्‍हयातील सारागढी हे एक छोटेसे गाव होते. २० एप्रिल, १८९४ रोजी कर्नल जे कुक यांच्‍या अधिपत्‍याखाली ब्रिटीश सैन्‍यातील ३६ वी शीख रेजिमेंट निर्माण करण्‍यात आली. ऑगस्‍ट १८९७ मध्‍ये या शीख  रेजिमेंटच्‍या पाच कंपन्‍या ले.कर्नल जॉन हटन यांच्‍या अधिपत्‍याखाली उत्‍तर-पश्चिम प्रांत अर्थात खैबर-पश्‍तुनखॉ येथील समाना टेकडया, कुराग, संगर, सहटोपधार आणि सारागढी येथे हलविण्‍यात आल्‍या.

या भागात महाराजा रणजीतसिंग यांच्‍या कार्यकाळात बांधण्‍यात आलेल्‍या किल्‍यांची एक शृंखला होती. यामध्‍ये लोखार्टचा किल्‍ला आणि किल्‍ले गुलिस्‍तान हे अत्‍यंत महत्‍वपूर्ण होते. लोखार्टचा किल्‍ला हिंदुकुश पर्वतातील समाना डोंगररांगात, तर गुलिस्‍तान किल्‍ला सुलाईमान पर्वतरांगेत स्थित होता. या दोन किल्‍ल्‍यामधील अंतर फक्‍त काही मैल होते. हे किल्‍ले जवळ-जवळ असले तरी मध्‍ये उंचवटा असल्‍यामुळे एका किल्‍ल्‍यावरून दुसरा किल्‍ला दिसत नसे. दोन्‍ही किल्‍ल्‍यामध्‍ये संदेशवहन व्‍हावे म्‍हणून मधल्‍या उंचवट्यावर सारागढीची चौकी बांधण्‍यात आली होती. हेलीकोग्राफीच्‍या माध्‍यमातून हे संदेशवहन करण्‍यात येत असे. ग्रीकभाषेत ‘हेलीआस’ म्‍हणजे सूर्य. ‘ग्राफीन’ म्‍हणजे लिहिणे. हेली‍कोग्राफीमध्‍ये मोर्स कोडचा वापर करुन आरशाद्वारा सूर्यकिरणे परावर्तीत करुन संदेश पाठविला जात असे. ही सांकेतिक भाषा सॅम्‍युअल मोर्सने (१७९१-१८७२) शोधून काढली होती. मोर्स हा अमेरीकी चित्रकार आणि संशोधक होता.

सारागढीची चौकी उंच खडकावर बांधण्‍यात आली होती. तिच्‍याभोवती तटबंदी होती. हेलिकोग्राफी संदेशवहनाकरीता एक उंच मनोरादेखील बांधण्‍यात आला होता. या भागात अफगाण,  पश्‍तून, आफ्रीदी टोळया सक्रीय होत्‍या. ब्रिटीश सैन्‍यावर आणि चौक्‍यांवर त्‍या वारंवार हल्‍ले करत असत. १८९७ च्‍या सुमारास अफगाणांचे सार्वत्रिक उठाव या भागाकरीता नित्‍याचे झाले होते.

३ आणि ९ सप्‍टेंबर, १८९७ रोजी अफगाण  टोळयांनी किल्‍ले गुलिस्‍तान जिंकून घेण्‍याचा प्रयत्‍न केला. पण किल्‍ले लोखार्टमधील सैनिक किल्‍ले गुलिस्‍तानच्‍या मदतीला धावून गेले. त्‍यांनी अफगाण  टोळयांना हुसकावून लावले. लोखार्टचे सैनिक परत जातांना त्‍यांनी सारागढीची सुरक्षा मजबूत केली. तेथे एक हवालदार आणि २० सैनिक तैनात केले. हे सर्व शीख सैनिक होते.

१२ सप्‍टेंबर, १८९७ रोजी सुमारे १० हजार अफगाण -पश्‍तुनांनी सारागढीच्‍या चौकीवर हल्‍ला केला. यावेळी गुरुमुखसिंग नावाचा सैनिक हेलीकोग्राफ हाताळत होता. लोखार्ट किल्‍ल्‍यावर कर्नल हटन स्थित होता. गुरुमुखसिंहाने हेलीकोग्राफच्‍या सहाय्याने कर्नल हटनला हल्‍ल्‍याची बातमी कळविली. परंतु आपण तातडीने मदत करण्‍यास असमर्थ आहोत असा उलट संदेश हेलीकोग्राफीद्वारा हटनने पाठविला. आता सारागढीच्‍या त्‍या  २१ सैनिकांना लढणे किंवा शरण जावून चौकीचे दरवाजे खूले करून देणे असे दोनच पर्याय उपलब्‍ध होते. एक शीख सैनिक विरुध्‍द शत्रुचे ५०० सैनिक असा हा सामना होता. त्‍या २१ सैनिकांचा प्रमुख होता ‘हवालदार ईश्वरसिंह’.  त्‍याने आणि त्‍याच्‍या सहकारी सैनिकांनी रक्‍ताचा शेवटचा थेंब सांडेपावेतो लढण्‍याचा निर्धार केला.

अफगाणांनी सारागढीवर जोरदार गोळीबार सुरु केला. त्‍यात भगवानसिंह या सैनिकाला गोळी लागून तो गंभीररित्‍या जखमी झाला. अफगाणांचा नेता सारागढीतील शीख सैनिकांना सारखा ओरडून सांगत होता की, ” तुम्‍ही शरण या, चौकीचे दरवाजे उघडा तुम्‍हाला काहीही इजा होणार नाही.”  पण शीख सैनिक बधले नाहीत. हवालदार ईश्‍वरसिंहाने अतुलनीय शौर्याचा प्रत्‍यय आणून देत उर्वरीत सैनिकांना आतल्‍या तटबंदीतून लढायला पाठविले, आणि स्‍वतः पुढच्‍या तटबंदीवरून शत्रूवर ‘मार्टीनी-हेन्‍री’ रायफलीनी गोळया चालवायला सुरुवात केली. त्‍याने कित्‍येक अफगाणांना  ठार केले. चौकीच्‍या तटबंदीवरून होणारा मारा इतका तीव्र होता की, अफगाणांना सारागढीच्‍या तटापर्यंत पोहोचणे मुळीच जमत नव्‍हते.

क्रमशः….

श्री राजेश खवले 

संग्राहक : सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! छत्री आणि मास्क ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? ? छत्री आणि मास्क ! ?

“नमस्कार पंत, शुभ सकाळ !”

“अरे मोरू, ये, ये, आज बरेच दिवसांनी स्वारी उगवली म्हणायची !”

“तसं नाही पंत, मी तुमचा पेपर तुमच्या आधी रोज घरी नेवून वाचतो आणि गुपचूप आणून ठेवतो, हे तुम्हाल माहित आहेच.”

“अरे हो, आमचा पेपर माझ्या आधी तू वाचणे, हा मी तुझा जन्मसिद्ध हक्कच मानतो रे, पण आज पेपर ठेवतांना हाक मारलीस नां म्हणून विचारलं !”

“पंत काय आहे ना, आज जरा फुरसत आहे आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणाल तर, बरेच दिवसात काकूंच्या हातचा, फडक्यातून गाळलेल्या फक्कडशा आल्याच्या चहाने घसा ओला झाला नाही नां, म्हणून म्हटलं हाक मारावी तुम्हाला, म्हणजे गप्पा मारता मारता आपोआप चहा पण मिळेल !”

“असं होय, कळलं, कळलं ! अग ऐकलंस का, मोऱ्या आलाय बरेच दिवसांनी, जरा चहा टाक बरं.”

“पंत, तुमचा पण व्हायचाच असेल ना अजून ?”

“अरे गाढवा, मला काय तुझ्या सारखा सूर्यवंशी समजलास की काय ? माझा झालाय एकदा, पण आता या पावसाळी वातावरणात घेईन परत ! बरं मोरू मला एक सांग, तू हल्ली एवढा बिझी कसा काय झालास एकदम ?”

“अहो एकुलत्या एक बायकोला मदत, दुसरं काय ?”

“एकुलत्या एक बायकोला म्हणजे ? आम्ही बाकीचे सगळे नवरे तुला काय कृष्णाचे अवतार वाटलो की काय ?”

“तसं नाही पंत, माझी ही एक बोलायची स्टाईल आहे, इतकंच !”

“कळली तुझी स्टाईल आणि हो, आलंय माझ्या कानावर, आजकाल तुझ्या कौन्सीलींग करणाऱ्या बायकोची प्रॅक्टिस खूपच जोरात चालली आहे म्हणे ? चांगलंच आहे ते, पण तिची प्रॅक्टिस अशी अचानक वाढायचं कारण काय मोरू ?”

“काय सांगू पंत तुम्हांला, ही सगळी त्या करोनाची कृपा !”

“आता यात करोना कुठनं आला मधेच ?”

“सांगतो, सांगतो पंत, जरा धीर धरा ना प्लिज !”

“अरे धीर काय धरा मोरू ? तुझ्या बायकोच्या वाढलेल्या प्रॅक्टिसचा आणि करोनाचा सबंध असायला ती काय डॉक्टर थोडीच आहे ?”

“नाही पंत!”

“मग, अरे कौन्सीलींग करते ना ती ? का तिनं कौन्सीलींग करता करता, स्वतःची कुठली नवीन लस करोनावर शोधल्ये आणि ती तर नाही ना देत सुटल्ये लोकांना ?”

“काही तरीच काय हो तुमच पंत, अहो ती कौन्सीलींगच करते आणि डायव्होर्स घेण्यापूर्वी कौन्सीलींग करून डायव्होर्सघेण्या पासून दोघांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात तिची स्पेशालिटी आहे, हे तुम्हाला पण …..”

“माहित आहे रे, पण तिची प्रॅक्टिस अशी एकदम वाढण्याचा आणि करोनाचा सबंध काय ?”

“अहो पंत, हल्ली करोनामुळे  नवरा बायको दोघं घरात, कारण वर्क फ्रॉम होम !”

“बरोबर, पण…”

“आणि हल्ली कामवाल्या मावशीपण कामाला येऊ शकत नाहीत, मग रोज रोज ‘होम वर्क’ कोण करणार ?”

“बरोबर नव्या नवलाईचे कामाचे नऊ दिवस संपले की……”

“त्या वरून प्रथम वाद, रुसवे फुगवे, मग त्यातून विसंवाद आणि पुढे कधीतरी त्याचे पर्यवसान कोणीतरी हात उचलण्यात आणि मग त्याची परिणिती घटस्फोट मागण्या पर्यंत गेली की अशा नवरा बायकोच्या केसेस….”

“तुझ्या बायकोकडे, बरोबर ?”

“बरोब्बर पंत !”

“मोरू, ही आजची तुमची पिढी अशा क्षुल्लक कारणावरून घटस्फोटा पर्यंत जाते म्हणजे कमालच झाली म्हणायची !”

“अहो पंत, हे वाद विवाद म्हणजे अनेक कारणांपैकी एक कारण !”

“म्हणजे, मी नाही समजलो !”

“अहो याच्या जोडीला, नोकरीचे टेन्शन, वेगवेगळे स्ट्रेस, कोणाची नोकरी गेलेली, करोनामुळे फायनांशिअल क्रायसिस, एक ना अनेक कारण !”

“असं आहे तर एकंदरीत !”

“पण पंत या सगळ्यात, सध्या अशा केसेस मध्ये एक नंबरवर, घटस्फोटापर्यंत केस जाण्याचं एक नवीन आणि वेगळंच कारण गाजतंय!”

“परत तू कोड्यात बोलायला लागलास मोऱ्या ! अग ऐकलंस का ? चहा नको टाकूस, मोरूला वेळ नाही चहा प्यायला, असं म्हणतोय तो !”

“काय पंत एका चहासाठी…..”

“बघितलंस, आम्ही कसं सरळ सगळ्यांना कळेल असं बोलतो ! उगाच ताकाला जाऊन भांड लपवायची सवय नाही आमच्या पिढीला !”

“सांगतो सांगतो पंत, सध्या एक नंबरवर कुठलं भारी कारण आहे ते !”

“हां, आता कसं, बोल !”

“पंत, हल्ली काय होतं ना, लॉकडाऊन शिथिल झाला रे झाला, की तमाम जोडपी खरेदीला बाहेर पडतात ! मग हीsss झुंबड उडते बाजारात !”

“अरे पण मोरू त्यांचे ते वागण बरोबरच नां, सरकारने दिलेल्या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी नको का करायला प्रत्येकाने ?”

“हवी नां, मी कुठे नाही म्हणतो ?”

“मग !”

“अहो पण बाजारातून येतांना, आपल्याच नवऱ्या किंवा आपल्याच बायको बरोबर आपण घरी परत आलोय याची खात्री नको का करायला ?”

“अर्थात, पण त्याचा येथे काय संबंध मी नाही समजलो ?”

“अहो पंत, आजकाल मास्क लावल्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी नवरा बायको, चुकून बदलण्याच प्रमाण खूपच वाढलंय, आता बोला !”

“काय सांगतोस काय मोऱ्या, हे असं खरंच घडतंय ह्याच्यावर विश्वास बसत नाही माझा !”

“सांगतोय काय मी पंत आणि अशा प्रसंगात मग गैरसमज, दोघांचे एकमेकावर आरोप, प्रत्यारोप, तुझं आधी पासूनच लफडं असणार, वगैरे वगैरे.”

“अरे बापरे, खरंच कठीण आहे तुमच्या पिढीच.”

“आणि म्हणून माझ्या बायकोच्या कौन्सीलींगच्या केसेस वाढायला करोना कारणीभूत आहे असं म्हटलं मी पंत !”

“हां, हे पटलं मला मोरू, पण यात तुझी बायको बिझी झाली तर मी समजू शकतो, पण तू बिझी कशामुळे झालास ते सांग ना !”

“अहो तिला मदत करतो ना म्हणून…”

“अरे गधड्या कसली मदत करतोस तुझ्या बायकोला ते सांगशील की नाही ?”

“अहो माझं भरत कामाचं शिक्षण मला या कामी उपयोगी पडलं बघा!”

“तू आता परत कोड्यात बोलायला लागलायस, आता चहाच काय पाणी पण नाही मिळणार तुला ! अगं ए…”

“थांबा थांबा पंत, सांगतो!”

“बोल मग आता चट चट.”

“पंत, अशा मास्कच्या 99% केसेस या निव्वळ गैरसमजातून हिच्याकडे आलेल्या असतात आणि काट्याने जसा काटा काढतात, तसा यावर उपाय म्हणून त्यांना आम्ही स्वतः बनवलेले मास्कच वापरायला देतो !”

“म्हणजे, मला नीट कळलं नाही, जरा उलगडून सांगशील का ह्या मास्कची भानगड ?”

“अहो सोप्प आहे, ही प्रथम दोघांची समजूत काढते आणि नंतर त्या दोघांना आम्ही त्यांच संपूर्ण नांव ठळक अक्षरात असलेले मास्क वापरायला देतो !”

“अच्छा !”

“आणि त्या दोघांना ताकीद देतो की घराबाहेर पडतांना आम्ही दिलेलेच मास्क वापरायचे, म्हणजे आपली बायको कोण आणि आपला नवरा कोण हे ओळखणे सोपे जाईल आणि…..”

“चुकून नवरा किंवा बायकोची अदलाबदल होणार नाही, असंच ना ?”

“बरोबर !”

“अरे पण मास्क धुतांना त्याच्यावरचे नांव गेले तर, पुन्हा पंचाईत नाही का दोघांची ?”

“अहो पंत, म्हणून तर मी मगाशी म्हटलं ना, की माझं भरतकामाचं शिक्षण कामी आलं म्हणून !”

“म्हणजे रे मोरू ?”

“अहो म्हणजे मी प्रत्येकाला द्यायच्या कापडी मास्कवर, त्यांची सबंध नांव रंगीत रेशमाने भरतकाम करून लिहून देतो !”

“अस्स होय, म्हणून तू हल्ली बिझी असतोस तर !”

“हो ना पंत !”

“म्हणजे मोऱ्या जुनी झालेली फ्याशन नंतर परत येते म्हणतात, ते खोटं नाही तर !”

“आता पंत तुम्ही कोड्यात बोलायला लागलात ! तुमच्या लहानपणी कुठे करोना होता आणि त्यामुळे मास्कची भानगड असायचा प्रश्नच नव्हता तेंव्हा.”

“बरोबर, पण आता फक्त तेंव्हाच्या छत्रीची जागा या मास्कने घेतल्ये इतकंच !”

“म्हणजे काय पंत ?”

“अरे तेंव्हा बाजारातून घरी नवीन छत्री आली की, त्याच्यावर नांव पेंट केल्यावरच ती छत्री आम्हाला वापरायला मिळत असे ! कारण तेव्हा सगळ्याच छत्र्या काळ्या रंगाच्या, मग आपली छत्री चुकून हरवली तर….”

“आपले छत्रीवरचे नांव बघून ओळखायची, बरोबर पंत ?”

“बरोब्बर, म्हणजे मोरू शेवटी ‘नामाचा महिमा’ म्हणतात ते काही खोटं नाही तर!”

“धन्य आहे तुमची पंत !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शारदीय नवरात्रोत्सव.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ शारदीय नवरात्रोत्सव.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

नवरात्र हा नऊ दिवसांचा उत्सव असतो. नऊ ही संख्या ब्रह्म संख्या समजली जाते. निर्मिती शक्ती आणि नऊ हा अंक यामध्ये एक नाते आहे. जमिनीत गेल्यावर बीज नऊ दिवसांनी अंकुरते. आईच्या पोटात बाळ नऊ महिने राहते आणि जन्म घेते. 9 हा अंक सर्व अंकात मोठा आहे. आदिशक्तीचा उत्सव हा निर्मितीचा उत्सव असल्याने तो नऊ दिवस असतो.

सनातन वैदिक धर्म हा माणसाने निसर्गाशी नाते जोडावे  हे शिकवतो.  भारत हा शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे सण-उत्सवांची रचना ही शेतीच्या वेळापत्रका नुसार करण्यात आली आहे.

पावसाची नक्षत्रे संपता संपता भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते, म्हणून पृथ्वी विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थिव गणपती पूजन केले जाते. भाद्रपद कृष्णपक्षात आपण पूर्वजांचे स्मरण करतो, तर आश्विन महिन्याच्या सुरुवातीला शेतात धान्य तयार  होते म्हणून निसर्गातील निर्मिती शक्ती विषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. निर्मिती शक्ती नवीन पिढीला जन्म देते ती या आदिशक्ती मुळेच! म्हणून नवरात्र उत्सव किंवा आदिशक्तीचा उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो.

आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपले सण हे त्या त्या काळातील हवामान, शेती, प्राणी या गोष्टींशी संबंधित असतात. निसर्ग आणि मानव मूलतः एकमेकाशी जोडलेले असतात.भौतिक प्रगती च्या नादात माणूस आपले मातीशी असलेले नाते विसरत चालला आहे. आप,तेज,माती, हवा आणि अग्नी या पंचमहाभूतांचे स्मरण आपण ठेवले पाहिजे.

अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्राचा उत्सव सुरू होतो. आदिशक्तीची श्री महालक्ष्मी , श्री महासरस्वती आणि श्री महांकाली ही देवीची तीन रूपे आहेत. श्री महालक्ष्मी ही संपन्नतेची देवता आहे, तर श्री महासरस्वती ही माणसाला ज्ञान देणारी आहे. महांकाली रूपात देवी अन्यायाला वाचा फोडणे आणि गुंड प्रवृत्तीचा नाश करणे यासाठी महत्त्वाची आहे.

पारंपारिक पद्धतीनुसार पाहिले तर सृजनाची निर्मिती करणाऱ्या मातीची व धान्याची पूजा नवरात्र प्रारंभी सुरू होते. एका घटात माती घालून त्यावर कलश ठेवला जातो.त्यांवर आंब्याची पाने घालून कलशावर नारळ ठेवला जातो. घटाच्या बाजूने घातलेल्या मातीत सप्त धान्याचे बी टाकले जाते. रोज नऊ दिवस पाण्याचे सिंचन होऊन तेथील बी रुजून रोपे तयार होतात यालाच आपण घट बसवणे असे म्हणतो मातीच्या घटातून येणारी ही छोटी रूपे माणसाला सृजनाची ताकद दाखवतात! ही आदीशक्ती असते.

याचकाळात सरस्वतीची पूजा केली जाते. लहान मुलांच्या अभ्यासाचा श्री गणेशा पाटी पूजनाने केला जातो. सरस्वती ही विद्येची देवता आहे. तिचे पूजन करणे हा संस्कार लहान मुलांना दिला जातो. तिची पूजा म्हणजे आपल्या बुद्धीचे तेज वाढवण्यासाठी केलेली प्रार्थना आहे. तू शक्ती दे.. तू बुद्धि दे…असे म्हणून सरस्वती पूजन होते.

तिसरे रूप म्हणजे महांकाली! अन्यायाचे पारिपत्य करण्यासाठी देवीने घेतलेले हे दुर्गा रूप! यात देवी सिंहावर बसून, हातात आयुधे घेऊन आक्रमक स्वरूपात येते! आत्ताच्या काळात अन्यायी वृत्तीला प्रतिकार करण्यासाठी स्त्रीने सबल होणे गरजेचे आहे. त्यासाठी ही महाकाली ची पूजा आहे..

या सर्व देवी रुपांना नमन करण्याचा काळ म्हणजे नवरात्र! या नवरात्राला शारदीय नवरात्र हे सांस्कृतिक नाव  साहित्य उपासकांसाठी महत्त्वाचे आहे. लेखक, कवी यांच्याकडून जे लिहिले जाते, तीही एक सृजन शक्तीच आहे. तिचा आदर करणे, वंदन करणे यासाठी शारदीय नवरात्रात साहित्यिकांकडून, संस्थांकडून वेगवेगळे उपक्रम जाहीर होतात. चांगल्या वक्त्यांची भाषणे ऐकायची संधी या नऊ दिवसात मिळते. नवीन विचारांची मनात पेरणी होऊन नवीन लिखाणाला स्फूर्ती देणारा हा काळ! त्यामुळे आपल्याला बुद्धिवैभव देणाऱ्या सरस्वतीचे पूजन या काळातच होते. ज्याप्रमाणे पावसाची नक्षत्रे सृजनाची निर्मिती करतात, स्त्रीमध्ये बालकाची गर्भातील वाढ नऊ महिने, नऊ दिवस असते, तो हा नऊ अंक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आदिशक्तीच्या कृपेमुळेच ही नवनिर्मिती होते. भारतात विविध प्रांतात नवरात्र पूजा वेगवेगळ्या नावांनी केली जाते. जसे गुजरातेत देवीसमोर गरबा खेळला जातो, बंगालमध्ये काली माता उत्सव होतो, उत्तर भारतात दुर्गापूजन होते, तर महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठे तसेच इतरही सर्व ठिकाणी महालक्ष्मी पूजन होते.

सांस्कृतिक, पारंपारिक आणि ऋतुमानानुसार देवीचा नवरात्र उत्सव आपण साजरा करतो. आपल्या माता, भगिनी आणि कन्या या देवी स्वरूप मानून त्यांचा आदर करावा ही शिकवण या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वांना मिळावी हीच या शारदीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी मी देवीची प्रार्थना करते!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अहो आश्चर्यम् ! ☆ सौ कुंदा कुलकर्णी

सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ अहो आश्चर्यम् ! ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆ 

ज्येष्ठा कनिष्ठा गौरी बद्दल खूप माहिती आपल्याला मिळत आहे. एक अनुभव सांगते. सांगलीला होतो आम्ही त्यावेळेस. वाड्यात बरीच बिर्‍हाड होती. त्यात माझ्या मामी पण राहत होत्या

मामीकडे सुगडाच्या गौरी होत्या. झोकात गौरी हळदी कुंकू झाले. दुसरे दिवशी विसर्जन पण झाले. मामी म्हणाल्या, “ सगळ्या  आमच्या घरी या.  तुम्हाला गौरीचा चमत्कार दाखवते.”  

त्या म्हणाल्या, “ आज विसर्जन केले तरी गौरीचं अस्तित्व घरात असतं. तिला खेळायचं असतं.”  त्यांनी आपले दोन अंगठे जमिनीवर हात ठेवून उभे केले. समोर एका सवाष्णीला बसवून तिला पण त्यांच्या प्रमाणे दोन अंगठे  उभे करायला सांगितले .आणि चार अंगठ्यावर ती सुगडाची गौर म्हणजे सुगडच ठेवायला सांगितले. त्या म्हणाल्या, “ आता तुम्ही फक्त यात अक्षत टाका आणि तुमची इच्छा बोला .जर इच्छा पूर्ण होणार असेल, तर गौर  उजवीकडे फिरायला लागेल व नसेल तर डावीकडे फिरेल—–.

——-आणि अहो आश्चर्यम् !— प्रथम मीच त्या गौरीवर अक्षत टाकली आणि माझी एक इच्छा बोलून दाखवली आणि अक्षरशः 4 अंगठ्यांवर ती सुगडरुपी गौर उजवीकडून गरगर गरगर जोरात फिरायला लागली. नंतर दुसरी इच्छा बोलून दाखवली.  अक्षत टाकून मनातल्या मनातच मी काही विचारले. आणि गौर डावीकडे जोरजोरात फिरायला लागली. फक्त चार अंगठ्यावर  ती उभी होती. मग हळूहळू वाड्यातल्या सगळ्या जमल्या. आणि दीड तास हा खेळ रंगला. नंतर मामी म्हणाल्या, “ आता गौर दमली, आता बास करा. कुणीतरी अक्षत टाकली आणि म्हटले,” गौरी माते खूप खेळलीस, दमलीस आता तुझ्या तुझ्या घरी जा.”  त्यानंतर ती जागच्या जागीच हलली आणि शांत झाली. पुढे कितीही अक्षत टाकून कोणी काही विचारले तरी ती सुगडरुपी गौर अजिबात हलली नाही. हे स्वतः आम्ही अनुभवले आहे .

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆  तुमच्या तुमच्या परीनं जगा ….. ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित

?इंद्रधनुष्य?

☆ तुमच्या तुमच्या परीनं जगा ….. ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित ☆ 

खूप मोठं आहे हो आयुष्य ,

 छान निवांत जगा , कशाची घाई आहे ..?

तुमच्या तुमच्या परीनं जगा ,

तुम्हाला जमेल तसं जगा ,

उगीच बाकीचे पळतायेत

म्हणून तुम्ही पळत सुटू नका ,

त्यांना गर्दी असेल ,जाऊ द्या त्यांना ,

तुम्ही तुमची क्षमता ओळखून जगा , 

समाधान मिळवत जगा ,

वाटेत मिळेल ते सुख गोळा करत जगा ,

अचानक पुढ्यात येणाऱ्या

 दुःखांचा धैर्याने सामना करत जगा ,

शेवटी आज न उद्या

तुम्हीपण तिथेच पोहोचणार आहात ,

आयुष्याचा उपभोग घेत जगा ,

सुखाने हुरळून जाऊ नका ,

दु:खाने खचून जाऊ नका ,

दुःख आहे म्हणून तर सुख आहे , 

दुःख असल्याशिवाय सुखी होता येत नाही ,

दु:ख नको म्हणून सुखाच्या

शोधात धडपड करून शिखर

गाठणाऱ्यांच्या अपेक्षा तरी

कुठे पूर्ण होतात..?

तिथून मागे वळून पाहतांना

उमजतं त्यांना

खरं सुख खालीच होतं

दुःखाच्या अवती भोवती खेळत असलेलं..!

सुखदुःखांना सोबत घेऊन

आयुष्याचा आस्वाद घेत जगा हो–

आयुष्य खरच खूप सुंदर आहे ,

पॅकबंद खिडक्यांना उंची पडदे

लावलेली नॉन स्टॉप ए सी ट्रेन

तुम्हाला अपेक्षित स्थळी लवकर

पोहोचंवेलही.  पण त्यात ती मजा नाही

जी सर्वसामान्यांच्या नॉन एसी ट्रेन मधे 

मोकळ्या खुल्या खिडक्यातून खेळत्या हवेत

बाहेरची मौज बघत ,

येणाऱ्या स्टेशन्स वर  ,नवीन प्रवाश्यांची नजरभेट घेत , 

डब्यात मुक्त संचार करणाऱ्या

विक्रेत्यांच्या चहा भेळेत आहे ..!

लहानसहान गोष्टीतला आनंद घेत जगा ,

फार पैसा लागत नाही ,

सावकाश जगा. कशाची घाई आहे..?

जास्त पैसा = जास्त सुख

हे समीकरण  नाहीये हो बरोबर..!

 

संग्राहक : स्मिता पंडित 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मैत्री मैत्रीच असते ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ मैत्री मैत्रीच असते ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

एकदा एका माकडाला  ?अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर; त्यानं झोपलेल्या सिंहाचे ?  कान ओढले. 

सिंह उठला आणि रागानं गर्जना केली की, “ हे धाडस कोणी केलं ? 

स्वतःच्या मृत्यूला स्वत:हून कुणी बोलावलं ? “ 

माकड : “ मी कान ओढले.  महाराज, सध्या मला कोणी मित्रच नसल्यामुळे मी खूप उदास आहे?; आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका.”

सिंहानं हसून विचारलं ?: “ माझे कान ओढतांना, तुला कोणी पाहिलं तर नाही ना ?” ?

माकड : “ नाही महाराज.”

सिंह : “ मग ठीक आहे.  आता असं कर. आणखी पाच-दहा वेळा माझे कान खेच, खूपच छान वाटतंय रे !”

या कथेचे सार :— एकटा राहून जंगलाचा राजाही कंटाळतो.

यावरून स्पष्ट होतं की मैत्री ही हवीच. म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात रहा, ? त्यांचे कान ओढत रहा, म्हणजे चेष्टा मस्करी करत रहा. ? मेसेज येणे भाग्याचे समजा,  कोणीतरी आपली आठवण काढतंय. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, देवाण घेवाण करा. आनंद देण्यात घेण्यात असतो. कंटाळवाणे होऊ नका. वयाला  विसरा, मजा करत रहा. संसार प्रपंच तर सगळ्यांनाच आहे.

विश्वास ठेवा की, तुमचं मन जर नेहमी आनंदी असेल तरच आपण नेहमी निरोगी राहू.

मैत्री – श्रीमंत किंवा गरीब नसते, मैत्री शिकलेली  वा  अडाणी कशीही असो – मैत्री  मैत्रीच असते. 

सहज वाटले मन मोकळं करावं ☺️.

संग्राहक : सुहास सोहोनी 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हदगा भोंडला ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

☆ विविधा ☆  ? हदगा भोंडला ? ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

गेल्या सोमवारी दि. २७ सप्टेंबर रोजी हस्त नक्षत्र सुरू झाले आहे.  मुलींचा भोंडला या नक्षत्रात साजरा केला जातो. काही ठिकाणी हदगा, हादगा , भुलाबाई या नावाने मुली खेळ खेळतात. गाणी म्हणतात ,फेर धरतात.हे हस्त नक्षत्र पावसाच्या नऊ नक्षत्रामध्ये सर्वात महत्त्वाचे नक्षत्र आहे. हस्त नक्षत्र लागण्याच्या वेळी महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे कोकणात म्हणजे समुद्र किनारी, सह्याद्रीच्या पायथ्याशी पाऊस पडून गेलेला असतो. नारळी पौर्णिमेनंतर पूर्वा, उत्तरा नक्षत्रात ढग सह्याद्री ओलांडून घाटावर येतात.नंतर महाराष्ट्र पठारावर पाऊस पडतो. हल्ली जागतिक हवामान बदलामुळे या सर्व ऋतुमानावर नक्कीच बदल झाला आहे.पण अलिकडील काही वर्षे सोडली तर असेच पर्जन्यमान महाराष्ट्रात असायचे.

आपल्याकडे गोकुळाष्टमीनंतर रब्बी हंगाम सुरू होतो. रब्बीच्या (ज्वारी,बाजरी )पेरण्या झाल्या की साधारण महिन्यात हस्त नक्षत्र लागते. पूर्वा उत्तरा चा पाऊस भाताला योग्य मानला जातो तसा हस्ताचा पाऊस रब्बी च्या पिकांना योग्य असतो. भरपूर पाणी हस्त देतो. मुसळधार, हत्तीच्या सोंडेतून   पडावे तशा वरून धारा कोसळतात. पिके छान उगवतात नंतर स्वातीच्या नक्षत्रात त्यात दाणे भरतात. म्हणून “पडेल हस्त तर पिकेल मस्त” आणि “पडतील स्वाती तर पिकतील माणिकमोती ” अशा म्हणी खेडेगावात रूढ आहेत.

हस्तातले पहिले चार दिवसांत पाऊस पडला तर त्याला सुवर्ण चरण म्हणतात नंतरचे चार दिवस रजतचरण, नंतरचे चार दिवस ताम्रचरण, तर शेवटचे चार दिवस हे लोहचरण मानले जाते.असे हे १६ दिवसांचे हस्त नक्षत्र असते. सुवर्ण चरण कोसळले तर ते पिकांना अति उपयुक्त ठरते. नुसतेच लोहचरण पडले तर जमिनी घट्ट होतात. म्हणून हस्ताची पहिली दोन चरणे पिकांसाठी फार महत्त्वाची मानली गेली आहेत.

हस्त लागला की मला तरी लहानपणच्या हादग्याची आठवण येते.

ऐलमा पैलमा गणेशदेवा

अक्कणमाती चिक्कणमाती जातं ते रोवावं

हस्त हा दुनियेचा राजा

अशी अनेक गाणी म्हणत पाटावर रांगोळीने रेखलेल्या हत्तीची पूजा करायची. सर्व मुली  भोवती गोल फेर धरून हादग्याची, भुलाबाई ची गाणी म्हणत असू. संध्याकाळी शाळेतून आलं की लगेचच प्रत्येकीच्या घरी जाऊन आम्ही हादगा खेळायचो. खूप मजा असायची. ही मजा आपल्या ग्रूपमधील खूप जणींनी अनुभवली असेल.

मग दिवसानुसार चढत्या क्रमाने हादग्याची गाणी वाढवत न्यायची. तशाच खिरापतींची संख्याही वाढवायची. त्या खिरापती ओळखायच्या. त्यातही एक कला होती. पूर्वीच्या काळी मुलींना एकत्र यायला, जमायला, खेळायला हादगा हे चांगले निमित्त होते. एकत्र येण्यासाठीच  आपल्या संस्कृतीत असे सण , समारंभ निर्माण झाले असावेत. त्यानिमित्ताने मुली घराबाहेर पडत.

आपल्या संस्कृतीत गाय, बैल, नाग ,एवढेच काय पण देवीचे वाहन म्हणून सिंह, वाघ, मोर इ. प्राणी, पक्षी पूजिले जातात. मग आपल्याला जीवन देणाऱ्या हत्तीला आपण कसे विसरू? म्हणून हस्त नक्षत्रात आपण हत्तीची पूजा करतो.

महाभारतातील एक कथा सांगितली जाते ती म्हणजे गांधारी ने सर्व सुवासिनींना सौभाग्यवायन दिले .ते हत्तीवरून मिरवणूक काढून थाटात दिले. कुंतीला ही तसेच वायन द्यावे असे वाटले. पण तिला हत्ती मिळाला नाही. मग तिने ही गोष्ट पुत्र भीमाला सांगितली. तर भीमाने स्वर्गातून इंद्राचा ऐरावत हत्ती आईला आणून दिला. आणि आईची इच्छा पूर्ण केली.

हादग्याची भरपूर गाणी मला तोंडपाठ आहेत. आपल्या पैकी बहुतेकींना ती येत असतीलच. अजूनही खूप ठिकाणी महिला, मुली हौसेने हादगा एक दिवस का होईना खेळतात. हादग्याची गाणी म्हणतात. एकत्र येतात. त्यातूनच आपल्या या छान परंपरांचे जतन आणि संवर्धन होते.

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आई—!!! भाग 4 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

 

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆ आई—!!! भाग 4 ☆ 

(©️doctor for beggars )

( मी काय बोलणार यावर—-) इथून पुढे 

मी स्तब्ध झालो…!

स्वतःच्या जगण्याची भ्रांत असतांना, कटु अनुभव गाठीशी असतांना, पुन्हा ती कुणाचीतरी आई होण्याचा प्रयत्न करते…! 

हे वेडेपण आहे कि आई व्हायला आसुसलेल्या मातेची गाथा… ?

‘चला निघु मी डाॕक्टर ? 

केळी घ्यायचीत मला…’ आजीच्या वाक्यानं मी भानावर आलो.’आता केळी कशाला…? नाही म्हणजे कुणाला… ?’ ——मी अजुनही धक्क्यांतुन सावरलो नव्हतो.  

‘अहो, तो काल मला म्हणाला, केळ्याचं शिकरण खाऊशी वाटतंय. मग मी सकाळी पैसे घेवुन निघाले केळी आणायला… पण लाॕकडाउन मुळे सगळंच बंद, केळी कुठंच मिळेनात. आता घरी जावुन त्याला कुठल्या तोंडानं सांगु, केळी मिळाली नाहीत म्हणुन…! 

मग आठवलं… मंदिरात येतांना लोकं केळी सफरचंद वैगेरे फळं घेवुन येतात देवाला वाहण्यासाठी… जातांना यातलंच एखादं फळ भिका-यांना देवुन जातात… ! 

म्हटलं बघू, पैशानं नाही तर भीक मागुन तरी मिळेल एखादं केळ…! शिकरण करुन देईन हो, पोराचं मन तरी मोडणार नाही…!’ 

भरलेल्या डोळ्यांनी मला आता मंदिर दिसेना, देव दिसेना… दिसत होती फक्त एक आई… ! 

रस्त्यावरल्या अपंग पोरामध्ये आपलं पोर पाहणारी ही बाई…!

निराधाराला पदराखाली घेणारी ही बाई…!

हातात पैसे असुनही कुणाच्यातरी आनंदासाठी भीक मागायलाही तयार झालेली ही बाई…!

याच बाईत मला दिसली आई !!!

भरल्या डोळ्यांनी मी तीचे पाय धरायला वाकलो, तीने पाया पडु दिलं नाही… ! 

‘आज्जी, मी तुमची एखाद्या वृद्धाश्रमात सोय करु…? दाटल्या गळ्यानं मी विचारलं. 

यावर डोळे बारीक करत तीनं विचारलं होतं,’पण वृद्धाश्रमात दोघांची एकत्र सोय होईल आमची… ?’ 

‘नाही आज्जी, वृद्धाश्रमात तुमची सोय होईल, मुलाचं मग बघु काहीतरी… !’ 

माझं बोलणं उडवुन लावत, माझ्या खांद्यावर थोपटत म्हणाली… ,’काय डाॕक्टर, मग काय फायदा…? माझ्यावाचुन तो कसा राहील ? बरं निघते मी… अजुन केळ्याची सोय करायचीय मला…’ 

असं म्हणत, ती निघाली केळी शोधायला…! —–

मी इकडं तिकडं आसपास पाहिलं… सर्व बंद. 

आज कुणाच्या हातात मला केळी दिसली असती तर मीच जावुन मागुन आणली असती…

मला दोघांचं भविष्य दिसत होतं… आजी कुठवर त्या मुलाचं करेल किंवा तो अपंग मुलगा तरी आजीला किती आणि कशी साथ देणार…या विचारानं आज्जीला शेवटचं विचारलं, ‘आज्जी वृद्धाश्रमाचं काय करु…?’

यावर ती हसत म्हणाली होती, ‘अहो या वयात मोठ्या मुश्किलीने पुन्हा आई झाल्येय मी … आता कशाला मायलेकरांची ताटातुट करता… ? 

या आधी दोन ल्येकरं गमावलीत मी…. आता तिसऱ्याला तरी माझ्याबरोबर राहू  दे…त्याच्या अंतापर्यंत किंवा माझ्या अंतापर्यंत …!

ती झराझरा चालत माझ्यासमोरुन निघुन गेली…!

नव्यानंच पुन्हा आई झालेल्या, म्हातारपणानं वाकलेल्या त्या माऊलीच्या पायात इतकं बळ आलं कुठुन … ? 

आईला वय कुठं असतं…?

ती कधीच म्हातारी होत नाही, हेच  खरं ! 

गरीब असण्याचा श्रीमंत असण्याचा, तरुण असण्याचा, वृद्ध असण्याचा, पैसे असण्याचा, पैसे नसण्याचा कशाचाही संबंध नसतो आई होण्याशी… ! 

ती फक्त आई असते !

पोराची एक इच्छा भागवण्यासाठी ती भीकही मागू  शकते… ! 

पोरासाठी मागितलेली एक भीक एका पारड्यात आणि सढळ हातानं केलेली हजारो दानं दुस-या पारड्यात ! 

दोन्हीचं वजन सारखंच…!!! 

यानंतर मी त्या जागेवर, केळी घेऊन ब-याचदा गेलो… पण ती दिसत नाही !

हातात केळी घेऊन माझी नजर तिला शोधत असते…

का कोण जाणे…तिला शोधतांना मंदिराचा कळस झुकलाय असा मला भास होतो…! 

का कोण जाणे…तिला शोधतांना दारातली ती तुळस मोहरली आहे असा मला भास होतो…!

का कोण जाणे…तिला शोधतांना तिने उच्चारलेला शब्द न् शब्द आज अभंग झाला आहे असा मला भास होतो…!

का कोण जाणे…तिला शोधतांना मी पुन्हा बाळ झालो आहे असा मला भास होतो…!

का कोण जाणे…!!!

समाप्त 

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मा. द. मा. मिरासदार यांस… ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  विविधा ?

☆ मा. द. मा. मिरासदार यांस… ☆ सौ राधिका भांडारकर  

माननीय प्रिय द.मा.मिरासदार यांस,

स.न.वि.वि…

आदरणीय लेखकमहाशय,या क्षणी तुम्हाला संबोधताना,कै. द.मा. मिरासदार असे लिहीताना हात थरथरला म्हणून कै.  हे संबोधनात्मक अक्षर मी टाळले.

कालच तुमच्या निधनाची बातमी ऐकली आणि एक दु:खाची लहर सळसळून गेली.मृत्यु अटळ.मृत्यु सत्य.

तुम्ही चौर्‍याण्णव वर्षाचं परिपूर्ण आयुष्य जगून, लोकांना हसवत, हसत जगाचा निरोप घेतलात. मात्र आमच्यासाठी ,प्रचंड हास्य तुमच्या लेखन प्रपंचातून  ठेवून गेलात….. तुमच्या निखळ हास्यकथा वाचतच खरं म्हणजे आम्ही वाढलो. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. तुम्ही १९६२ सालापासून, महाराष्ट्रात आणि परदेशातही ठिकठिकाणी, कथाकथनाचे कार्यक्रम केलेत आणि आम्हा श्रोत्यांची अपार करमणूक केलीत. ध्वनीक्षेपकासमोर उभे राहून, हातवारे करुन तुम्ही बोलू लागलात की एक अद्भुत नाट्यच अनुभवायला मिळायचे.

मराठीतील, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं वि जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांची विनोदी लेखन परंपरा आपण चालू ठेवलीत. व्यंकुची शिकवणी,  माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, माझी पहिली चोरी,भूताचा जन्म अशा अनेक हास्यकथांचे उत्कृष्ट लेखन आणि तितकंच प्रभावी सादरीकरण हे श्रोत्यांना ,चिंता समस्यांपासून दूर नेउन मनमोकळं हंसणं

देत…या सर्वच कथा मनावर कोरलेल्या आहेत.

विसंगतीतून निर्माण होणारा विनोद नेहमीच ऐकणार्‍याला ,जीवनाचा एक सकारात्मक दृष्टीकोन देतो.

एखाद्या घटनेकडे कधी तटस्थपणे,कधी हसत खेळत. विनोदी अंगाने बघायला शिकवतो.यश ,अपयश पचवायची ताकद देतो. द.मा.,तुमच्या लेखनाने हे केले.

आम्हाला समृद्ध केलंत तुम्ही…खूप ऋणी आहोत आम्ही तुमचे…

गप्पागोष्टी, मिरासदारी,गुदगुल्या ,गप्पांगण ,ताजवा असे २४कथासंग्रह तुम्ही आम्हाला दिलेत.एक डाव भूताचा

ह्या  गाजलेल्या चित्रपटाची कथा तुमचीच.त्यातली तुमची हेडमास्तरांची भूमिकाही मनावर ठसली.

तुमच्या बहुतेक कथा ,ग्रामीण जीवनावरच बेतलेल्या आहेत.गणा मास्तर,नाना चेंगट,राम खरात,बाबु पेहलवान,

चहाटळ अनशी,ज्ञानु वाघमोडे अशा एकाहून एक ,गावरान,इब्लीस,बेरकी,वाह्यात ,टारगट क्वचित भोळसटही  पात्रांनी आम्हाला पोट धरुन हसायला लावले आहे.या सर्व पात्रांना आमच्यासाठी एक निश्चित चेहरा दिला.हे सारे चेहरे आमच्या आयुष्याच्या वाटचालीत

हसत हसत सामील झाले.आमचे सोबती बनले.मनुष्य स्वभावाचे,इच्छा आकांक्षाचे, छोट्या छोट्या स्वप्नांचे ,

मनोर्‍यांचे, इमल्यांचे आरसे बनले.भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे ,कावेबाजपणाचे, लबाडीचे

धूर्त राजकारणाचे ,धडे दिले.सर्वार्थाने अचंबीत झालेल्या सर्वसाधारण सामान्य माणसाकडे पहायलाही शिकवलं.

काही गंभीर कथाही तुम्ही लिहील्यात.जसं की ,विरंगुळा

कोणे एके काळी , स्पर्श वगैरे.त्यांतून जीवनातले कारुण्यही तुम्ही  अचूक टिपलेत.पण तरीही तुमचा स्वाभाविक कल हा मिस्कील ,विनोदी लेखनाकडेच राहिला.तिथेच बहरला.

पुण्याच्या साहित्य संमेलनात तुम्ही तुमची ‘भुताची गोष्ट’

ऐकवली होती.सतत दीड तास श्रोतृवर्ग हास्यकल्लोळात डुबला होता.एकेक पात्र रंगतदारपणे डोळ्यासमोर ऊभे केले.तुमच्या आवाजातले चढउतार,कथा फुलवण्याची जबरदस्त क्षमता,नाट्यमयता, अभिनय सारेच सर्वांग सुंदर होते..त्यावेळीही तुमचे वय ऐंशी अधिकच होते…

सलाम तुमच्या कलेला. सलाम तुमच्या लेखनाला…

वि. रा. भाटकर हे विनोदी गद्यप्रकार लिहीणारे… तुमचेच टोपण नाव  होते.

द.मा. भरभरुन दिलंत तुम्ही आम्हा साहित्यप्रेमींना…

खूप  हसवलंत. बोधप्रद करमणुक केलीत .ज्ञानातून मनोरंजन केले.एक मोठ्ठा साहित्य ऐवज आमच्यासाठी ठेवून गेलात….आम्ही खूप कृतज्ञ आहोत!!खूप ऋणात आहोत.

आज तुमच्या अचेतन देहावर भावपूर्ण श्रद्धांजलीचे फुल वाहते!!!

 

तुमची एक

लेखनवेडी,..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आई—!!! भाग 3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆ आई—!!! भाग 3 ☆ 

(©️doctor for beggars )

(“म्हणजे तुम्ही त्याला माफ केलंत ! “ ) इथून पुढे —-

 “ माफ करणारी मी कोण ? कुणाचा तरी सांभाळ कर अशी माझ्यावर कुणीतरी जबाबदारी टाकली होती, आई म्हणुन मी ते कर्तव्य केलं… आता त्याने माझा सांभाळ करावा असा हट्ट मी का धरु ? मुलानं माझी परतफेड करावी असं वाटणं…तिथंच आईपण संपतं… ! “

“ हो ना पण, मुलाला त्याचं कर्तव्य कळू नये ? “ 

“ डाॕक्टर, रस्त्यांत खडे टोचतात म्हणुन रस्त्यांवर कुणी गालिचा अंथरत नाही, आपण आपल्या पायात चप्पल घालावी– त्याला त्याचं कर्तव्य कळेल न कळेल… आपण कशाला कुणाला शिकवायला जायचं ? आपलं  काम करत रहायचं, फळाची अपेक्षा न धरता… !” 

गीतेच्या ग्रंथाला हातही न लावता, गीतेतला एक अध्याय मला आज्जीकडुन समजला होता. 

“ चला डाॕक्टर, निघते मी… माझं पोरगं घरी एकटंच असेल… मला जायला हवं आता…! “ 

“ क्काय…??? “  मी जवळपास किंचाळलो असेन… कारण या वाक्यावर ती दचकली होती. 

“ अहो आज्जी, आत्ताच तर म्हणालात ना… एक मूल लहानपणीच  वारलं– बहिणीचा सांभाळलेला मुलगा सोडून गेला… आता हे काय… ? ”

ती मंद हसली. म्हणाली, “ सांगेन पुन्हा कधी भेट झाली तर… आधी मला केळी घ्यायला पाहिजेत कुठुनतरी…” 

“ नाही आज्जी, आत्ताच सांगा… प्लीज… माझ्या मनातनं हे जाणार नाही… “ 

ती शांतपणे म्हणाली,  “ अहो डाॕक्टर, कोरोनाच्या तपासणीसाठी दवाखान्यात गेले होते, तेव्हा ठरवलं होतं, चाचणी पाॕझिटीव्ह असेल तर उत्तमच.  नाहीतर येतांना सरळ एखाद्या गाडीखाली झोकुन द्यायचं. “  

“ मग…? “  आवंढा गिळत मी म्हटलं. 

“ मग काय ? जगायचं कसं आणि मरायचं कुठं हा विचार करत पडले असतांना माझं लक्ष शेजारच्या खाटेवर गेलं…साधारण चाळीशीचा एक मुलगा त्या खाटेवर होता—- कमरेखाली अधु ! 

मी त्याच्याकडे पाहिलं… !  डोळे मिचकावत मला म्हणाला… ” काय होनार नाय मावशी तुला, काळजी करु नको… अगं आजुन लय आयुष्यं हाय तुला..!” 

“ हा कोण कुठला ? स्वतःच्या जगण्याची खात्री नाही आणि मला जगण्याचं बळ देतो… ? 

मावशी म्हणतो… ?—- हा निराधार अपंग… रस्त्यांवर राहतो… माझ्यासारखाच तपासणीसाठी आणलेला…!— मरण्याचे विचार घेवुन वावरत असतांना वाटलं… आज माझं मूल जिवंत असतं तर याच्याच एव्हढं नक्की असतं.– ज्या काळात तो गेला… त्याचकाळात त्याच्याऐवजी समजा मीच गेले असते तर त्याचीही अवस्था आज अशीच अपंग आणि निराधार झाली असती… तो ही आज रस्त्यावरच असता…!–डाॕक्टर , त्या अपंग मुलात, मला माझं मुल दिसलं. आमच्या दोघांच्या तपासण्या निगेटिव्ह आल्यावर मी त्याला माझ्याकडे घेवुन आले—त्या दिवशी मी परत आई झाले हो… मरायचं म्हणुन ठरवुन गेलेली मी… येताना आई होवुन, लेकरु घेवुन आले. “ 

—मला काय बोलावं सुचेना. डोळ्यांतुन माझ्या झरझर पाणी वाहु लागलं. 

“ आज्जी, आधीच तुमची कमाई काही नाही, पेन्शन पुरत नाही… त्यात अजून एका व्यक्तीला घेवुन आलात सांभाळायला…?”   मी आश्चर्याने विचारलं. 

“ डाॕक्टर, आईला आपलं मुल सांभाळायला पैसे लागत नाहीत. आईला व्यवहार कधीच कळत नाही… !  शिवाय पैसा जगायला लागतो…जगवायला नाही…! “ 

“ म्हणजे … ? “  मी आ वासून विचारलं. 

“ म्हणजे, जो स्वतःचा विचार करत  स्वतःपुरता जगतो त्याला पैसे लागतात… पण आपण जेव्हा “स्व” सोडुन दुस-याला जगवायचा विचार करायला लागतो… त्यावेळी त्या दोघांची काळजी कुणी तिसराच करत असतो…आपण फक्त त्या तिस-यावर विश्वास ठेवायचा ! “

मी हे तत्वज्ञान ऐकत मूकपणे उभा होतो. 

“ मोठी झालेली मुलं, आपल्या आईला त्यांच्या घरात  राहण्याचं भाडं मागतीलही कदाचित् … पण नऊ महिने गर्भाशयात राहण्याचं भाडं आईनं कधी मागितल्याचं माहित आहे का ?–आईला व्यवहार कधीच कळत नाही डाॕक्टर  ! “

मी शहारलो हे ऐकून… ! 

‘आज्जी, आधीचे दोन वाईट अनुभव बघता, हा पण गेला सोडुन तर ? पुढं तुमचं काय ?’ मी चाचरत बोललो. 

‘डाॕक्टर, हा सोडुन गेला तरी, तो माझं आईपण घेवुन जावु शकणार नाही ना ?

एखादी स्त्री जेव्हा बाळाला जन्म देतो… त्यावेळी नुसतं बाळच जन्माला आलेलं नसतं… एक आई पण जन्म घेते त्याचवेळी… !

दोन जीव जन्मतात त्यावेळी… एक मुल आणि एक आई ! 

जन्माला आलेल्या त्या बाळाने आईला, आईपण हे त्याच्या जन्मावेळीच बहाल केलेलं असतं… हे लाभलेलं आईपण कोण कसं काढुन घेईल ?

मी काय बोलणार यावर—–

क्रमशः —-

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares