मराठी साहित्य – विविधा ☆ गणेशोत्सवाचे बदलते स्वरुप ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

☆ विविधा ☆ ?️गणेशोत्सवाचे बदलते स्वरुप?️ ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

लोकमान्यांनी गणेशोत्सव सुरू केला त्याला शतक सरूनही अनेक वर्षे लोटली. त्या काळात ती एक गरज होती. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जनमत तयार करणे अत्यावश्यक होते. त्यासाठी स्वदेशी लोकांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करणे हेही गरजेचे होते. गणपती आणि शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची दोन दैवते! आणि त्यांच्या निमित्ताने लोक एकत्र येऊ शकतात हे लोकमान्यांनी ताडले होते. म्हणून त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. त्याचा फार चांगला परिणाम दिसून आला. लोक एकत्र येऊ लागले. लोकमान्यांचा हेतू साध्य झाला. त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा हे दोन्ही उत्सव सातत्याने सुरूच राहिले.इंग्रजांना या धार्मिक भावनेत ढवळाढवळ करणे अशक्य झाले. परिणामी गणेशोत्सव महाराष्ट्रात तरी मोठ्या प्रमाणात सुरूच राहिला.

हे लोण नंतर सर्व देशभर पसरले. महाराष्ट्रातील गावोगावी गणेशोत्सव मंडळे स्थापन करण्यात आली. पुण्यात, मुंबईत तर शतक लोटलेली अनेक गणेशोत्सव मंडळे आहेत. दरवर्षी चढत्या क्रमाने गणेशोत्सव थाटात साजरा केला जातो.

स्वातंत्र्य प्राप्ती पर्यंत  हे सगळे ठीक होते. नियमितपणे गणेशोत्सव शांततेत पार पडायचा.  पण गेली साठ सत्तर वर्षे  त्यात चढाओढ सुरू झाली. विजेची झगमगाट असणारी रोषणाई, हिडीस गाणी, मोठ्ठे लाऊड स्पीकर या गोष्टीचा अतिरेक झाला. त्यासाठी लागणारी वर्गणी ( काही वेळा जबरदस्तीने) गोळा केली जाऊ लागली. गणपती म्हटलं की लोक वर्गणी देतच होते.

नंतरच्या काळात तर या शांततेची जागा गडबड, गोंधळ, हुल्लडबाजीने कधी घेतली ते कळलेच नाही. लोकमान्यांचा मूळ उद्देश कधीच सफल झाला होता. आता गणेशोत्सवाच्या नावाखाली अहमहमिका, स्पर्धा, नाचगाणी सुरू झाली. मध्यंतरीच्या काळात तर सिनेमातली गाणी  स्पीकरवर लावून त्यावर हिडीस अंगविक्षेप करत नाचणे ही फॅशन झाली. हे प्रकार फार वाढले.

एकेका गावात अनेक गणेशोत्सव मंडळे आपापल्या मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा करतात. पुण्यात मुंबईत तर गल्लोगल्लीत  गणपतीचे मंडप उभारले जातात. वाहतुकीचा बोजवारा उडतो.आणि विसर्जन मिरवणुकीचे तर विचारायलाच नको. रात्र रात्र मिरवणूका निघतात. त्यात धार्मिक भावना कमी आणि दिखाव्यालाच जास्त महत्त्व दिले जाते. हे कितपत योग्य आहे? हे दहा दिवस कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांवर प्रचंड ताण पडतो.हेही लक्षात घ्यायला हवे.

हे सगळे बदलायला पाहिजे हे आता हळूहळू लक्षात येत आहे. सगळीच मंडळे हुल्लडबाजी करणारी नव्हती. तेच आदर्श आहे. हे आता काही प्रमाणात ध्यानात येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत आहे  .हे चांगले लक्षण आहे. बहुतेक ठिकाणी गणेशोत्सवाचे पावित्र्य जपले जाते. हुल्लडबाजी फारशी होत नाही. कित्येक कार्यकर्ते म्हणविणारे लोक मंडपात, विसर्जन मिरवणुकीत  दारू पिऊन यायचे. लोकांना आणि लोकमान्यांना हे स्वरूप तर नक्कीच अपेक्षित नव्हते. ते स्पृहणीय ही नाही.

या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आता धर्मभेद, भेदभाव काही राहिला नाही. सर्व जातिधर्माचे लोक बिनधास्त गणेशोत्सवात सहभागी होतात. ही खूप चांगली सुधारणा आहे. अजूनही काही ठिकाणी गोंधळ घातला जातोच. ते चूक आहे. स्पर्धा सुद्धा निकोप असावी. मुख्य म्हणजे गणेशोत्सवाचे पावित्र्य राखले पाहिजे.          खरोखरच लोकांनी त्यानिमित्ताने एकत्र यावे. विचारांची देवाणघेवाण करावी.

आता नवीन संकल्पनेनुसार एक गाव एक गणपती या कल्पनेचाही  विचार पुढे येतो आहे.  यात पर्यावरणाचा   समतोल राखणेही महत्वाचे ठरते.गणेशोत्सवाचा मूळ उद्देश मर्यादित न राहता लोकमान्यांनी संकल्प केल्याप्रमाणे अधिक व्यापक असावा. त्यातून अखंड निकोप, निर्वैर, सुसंघटित समाजाचे प्रतिबिंब उमटावे. नवीन पिढीने काही चांगले संस्कार जतन करून चांगले संकल्प सोडावेत. त्यांचा राष्ट् उभारणीच्या कामात या गणेशोत्सवाच्या स्वरूपाचा चांगला उपयोग करून घ्यावा. हीच सदिच्छा.

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माझ्या गाडीला व्हेनीला आईसक्रीम आवडत नाही ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ माझ्या गाडीला व्हेनीला आईसक्रीम आवडत नाही .. ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

पियाँटिक ह्या जनरल मोटर्स च्या शाखेला एके दिवशी एक तक्रार आली.

——” माझ्या गाडीला व्हेनीला आईसक्रीम आवडत नाही.”

जनरल मोटर्स ने साहजिकच ह्या तक्रारीकड़े दुर्लक्ष केले. 

काही दिवसांनी पुन्हा त्या व्यक्तीने हीच तक्रार केली. 

यावेळी जनरल मोटर्स ने त्याची चौकशी करायची ठरवले. त्यांनी त्या व्यक्तीला त्याची तक्रार व्यवस्थित सांगणयास सांगितले.

—–व्यक्तीने उत्तर दिले की तो, त्याची पत्नी आणि मुले रोज जेवण केल्यावर आईसक्रीम खायला जातात. रोज वेगवेगळे फ्लेवर घेतात. पण ज्या दिवशी ते व्हेनीला फ्लेवर घेतात त्या दिवशी त्यांची गाड़ी सुरु होत नाही.

जनरल मोटर्सने ‘ असे होउच शकत नाही ‘ असा दावा केला आणि दुर्लक्ष केले. इतर लोकांनी आणि कंपन्यानीसुद्धा त्या व्यक्तीची चेष्टा केली.

——काही दिवसांनी त्या व्यक्तीने परत हीच तक्रार केली. आता मात्र जनरल मोटर्सपुढे त्याची चौकशी करण्याशिवाय पर्याय नव्हता.

त्यांनी आपला एक इंजीनिअर त्या व्यक्ती कड़े पाठवला. इंजीनिअरने गाड़ी चेक केली. सगळे व्यवस्थित  असल्यामुळे नाईलाजाने त्याला त्या व्यक्तीसोबत रहावे लागले. रात्री आईसक्रीम खायला जाताना इंजीनिअर पण सोबत गेला. आईसक्रीम खाऊन सगळे घरी आले. दुसऱ्या दिवशी परत आईसक्रीम खायला गेले. व्यक्तीने व्हेनीला आईसक्रीम आणले —- आणि काय आश्चर्य त्या व्यक्तीने सांगितल्या प्रमाणे गाड़ी सुरुच झाली नाही. 

——-इंजीनिअरने परत गाड़ी चेक केली पण सगळे नीट होते. शेवटी त्याने कंपनीला कळवले की व्यक्तीने सांगितलेली तक्रार खरी आहे.

कंपनीने इंजीनियर ला तिथेच राहून नीट लक्ष देण्यास सांगितले. त्याप्रमाणे इंजीनिअरने प्रत्येक गोष्टीची पाहणी करायला सुरवात केली. रोज त्या व्यक्तीबरोबर आईसक्रीम खायला गेल्यावर काही दिवसानंतर इंजीनिअरच्या लक्षात आले की ती व्यक्ती  जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते, तेव्हा त्याला गर्दीमुळे वेळ लागतो. पण व्हेनीला फ्लेवरला जास्त मागणी असल्यामुळे त्याच्यासाठी वेगळे काउंटर होते आणि सर्विस पण तत्पर होती.  त्यामुळे तो ते घेऊन लवकर येतो. आणि नेमकी हीच गोष्ट इंजीनिअरला पाहिजे होती. त्याने त्या गोष्टीवर खुप अभ्यास केला. तेव्हा लक्षात आले की ती व्यक्ती  जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते,  तेव्हा त्याला यायला वेळ लागतो. तोपर्यन्त गाडीचे इंजिन थोड़े गार होते, आणि गाड़ी पुन्हा लगेच चालू होते. पण ती व्यक्ती  जेव्हा व्हेनीला फ्लेवर घेते,  तेव्हा तो लगेच परत येतो. त्यामुळे गाडीच्या इंजिनला गार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे इंजिन मधील पेट्रोलचे इव्हेपरेशन होते आणि ते ब्लॉक होते व परत चालू होत नाही. 

——आणि मग गाडीच्या इंजिनला गार करण्यासाठी लागणारे संशोधन सुरु झाले. जगातील अग्रमानांकित कंपनी मर्सेडीज़ने कार्ल बेंझ व विलिअम मेयबैकच्या मदतीने 1901 साली आपल्या ‘मर्सेडीज़ 35’ साठी पहिला रेडिएटर बसवला, जो आजही इंजिनचा अविभाज्य भाग आहे.

——–एकादी फालतु वाटणारी गोष्टसुद्धा जगाला किती पुढे घेऊन जाते हेच यातून सिद्ध होते.

म्हणून—दृष्टिकोन बदला….. परिस्थिती बदलेल…… ! ??

 

संग्राहक – श्री सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घालीन लोटांगण वंदीन चरण…… ☆ प्रस्तुती सुश्री माधवी काळे

? वाचताना वेचलेले ?

☆ घालीन लोटांगण वंदीन चरण…… ☆ प्रस्तुती सुश्री माधवी काळे ☆ 

||वैशिष्ट्ये व अर्थ||

बाप्पाची आरती झाल्यानंतर एका लयीत व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते .अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हणले जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.

आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हे एक मंत्र आहे.

वैशिष्ट्ये 

(१) प्रार्थनेतील चार कडव्यांचे कवी हे वेगवेगळे आहेत. 

(२) ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत.

(३)  पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत. (४)बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही सर्व देवांच्या आरती नंतर म्हणली जाते. 

(५)सर्व  कडवी कृष्णाला  उद्देशूनआहेत. यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही.

(६) वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे.

आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया

[१]

घालीन लोटांगण वंदीन चरण |

 डोळ्यांनी पाहिन रूप तुझे | 

 प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन |

भावे ओवाळीन म्हणे नामा |

—वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे

  अर्थ..

कृष्णाला उद्देशुन संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन  अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन .

[२]

     त्वमेव माता च पिता त्वमेव |

     त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव |

    त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव |

    त्वमेव सर्व मम देव देव |

——हे कडवे आद्यगुरू शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृत मध्ये आहे .हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे.

 अर्थ..

तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस .

[३]

  कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा |

  बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात |

  करोमि यद्येत सकल परस्मै |

  नारायणापि समर्पयामि ||

——-हे कडवे श्रीमदभगवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे.

अर्थ…

श्रीकृष्णाला उद्देशून

हे नारायणा ,माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे.

[४]

 अच्युतम केशवम रामनारायणं |

 कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी |

 श्रीधर माधवं गोपिकावल्लभं |

 जानकी नायक रामचंद्र भजे ||

——-वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्ठम् मधील आहे. म्हणजेच आठव्या शतकातील आहे.

अर्थ…

मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला .

हरे राम हरे राम |राम राम हरे हरे|

           हरे कृष्ण हरे कृष्ण |कृष्ण कृष्ण हरे हरे |

——हा सोळा अक्षरी मंत्र “कलीसंतरणं” या उपनिषदातील आहे.( ख्रिस्तपूर्व काळातील असावा.) कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री राधाकृष्णाला समर्पित आहे.

अशी ही वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे .तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवा पर्यंत पोचतो .

 – राम कृष्ण हरी

प्रस्तुती  – सुश्री माधवी काळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कलास्वाद ☆ निसर्गातून कलाकृतीकडे – कलाकृतीकडून निसर्गाकडे ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते

सौ.वंदना अशोक हुळबत्ते

? कलास्वाद ?

☆ निसर्गातून कलाकृतीकडे – कलाकृतीकडून निसर्गाकडे ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆

निसर्ग हा सर्वात मोठा कलाकार आहे. त्याने निर्माण केलेल्या कोणत्याच दोन गोष्टीत सारखेपणा नसतो. एवढी विविधता आहे निसर्गात. सर्व झाडे  हिरवीच. पण प्रत्येक झाडाचे हिरवेपण वेगळे. प्रत्येक झाडाची उंची वेगळी. आकार वेगळा, पाने वेगळी, प्रत्येक पानाचा रंग वेगळा, गंध वेगळा, ढंग वेगळा,आकार वेगळा.काही पाने स्वतंत्र उमेदवारासारखी एकटी तर काही हातात हात घालून आलेल्या मैत्रिणी सारखी एकत्र. काही पाने लांब तर काही आखूड, काही गर्द हिरवी तर काही पोपटी, आणि काही रंगीबेरंगीसुध्दा. कोवळ्या पानातून नाजूकता डोकावते तर पिकल्या पानातून ताठरता. तरी ही ती हळवी. पाने नेहमी माझे लक्ष वेधून घेतात. त्या पानात मला अनेक आकार दडलेले दिसतात. ते अस्वस्थ करतात. या पानातून काही कलाकृती बनवाव्यात असे वाटू लागले आणि त्यातूनच पानाफुलापासून कोलाजचित्रे बनवू लागले.

 

जास्वंद, पेरू आंबा, तगर, कन्हेरी, पिंपळ, बदाम, इ. विविध प्रकारच्या पानांची मांडणी करून  फुलपाखरू, कासव, मासा, उंदीर,पोपट, इ‌आकार तयार केले आहेत. दोन तीन प्रकारची पाने एकत्र मांडून, काही पानांचा आकार कात्रीने विशिष्ट प्रकारे कापून, कौशल्यपूर्ण कलाकृती तयार केल्या आहेत. यात कोंबडा,  मोर, माकड, हरीण, बगळे, गणपतीही चित्रे तयार केली आहेत. बदामाची पाने हिरवी, तांबूस पिवळी असतात. या छटांचा वापर करून पाणी भरणारी स्त्री, निसर्गचित्र , हत्ती अश्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती तयार केल्या आहेत. विविध प्रकारची पाने वापरून विठ्ठलाचे चित्र तयार केले आहे. वेगवेगळी अशी दिडशेहून अधिक चित्रे मी बनवली आहेत.

निसर्ग नेहमी खुणावत असतो आपल्या ते ओळखता आले पाहिजे. म्हणजे अशा कलाकृती सहज तयार करता येतात.

निसर्गातून कलाकृतीकडे कलाकृतीकडून निसर्गाकडे जाण्याचा प्रवास सुकर होतो.

 

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

सांगली

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माॅर्निग वाॅक….☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? विविधा ?

☆ माॅर्निग वाॅक ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

लेकाची बारावीची परीक्षा संपली.सुधाने मोकळा श्वास घेतला.तिला एकदम महिला परिषदेत ऐकलेल्या व्याख्यानाची आठवण झाली.चाळीशीनंतर महिलांनी आपल्या प्रकृतीबद्दल जागरुक रहायला हवं.तिने मनाशी ठरवले उद्या पासून माॅर्निग वाॅकला जायचे.

सकाळी सहा वाजता फिरण्यासाठी घराबाहेर पडली.अजून काळोख होता.थोडासा गारवाही जाणवत होता.खूप प्रसन्न वाटले.चार पावले चालली, तेवढ्यात कुत्र्याची कळवळ ऐकू आली.चार- पाच कुत्री एकमेकावर भुंकत होती.जसजसा आवाज जवळ येऊ लागला,तसे सुधाचे पाय लटपटायला लागले.आता ती कुत्री आपल्याच अंगावर आली तर या विचाराने सुधा जागीच थांबली.

मनात आले,आल्या पावली घरी परत जावे.पण घरी जायचा अवकाश , घरातील सगळे हसतील,मी फिरणार म्हणजे हे दोन दिवसाचे नाटक होणार हे समजून आधी तोंडसुख घेतले होते. मी आता घरी परत गेले तर दिवसभर चर्चला विषय.त्यापेक्षा इथंच थांबलेले बरं.पाचएक मिनिटांनी कुत्री बाजूला झाली.तसा सुधाने सुटकेचा श्वास घेतला. पुढे चालू लागली.चार पावले जाते न जाते तोच एका घरातून एक व्यक्ती आपल्या कुत्र्या सोबत बाहेर आली.कंबरे एवढा मोठा कुत्रा होता. जीभ बाहेर काढून दाखवत होता. जरा निरखून पाहिल्यावर दिसले,त्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा होता.तो पट्टा मालकाने धरला होता.आपल्या या कुत्र्यापासून भिती नाही असे म्हणून कपाळावरचा घाम पुसला. पुढे चालु लागली.तो समोरून दोन कुत्री येताना दिसली.अंतर जरा जास्त होते म्हणून तिने स्वत: ला सावरतचं रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने चालायला सुरुवात केली. सकाळी बबसकाळी किती कुत्री असतात रस्त्यात.कसे बरं चालावं? कोण कसे यांना पकडत नाही? किती हा त्रास? मुलेबाळे कशी चालणार या रस्त्यावर?

मोकाट कुत्र्यांचे काही तरी केलेच पाहिजे, असे विचार सुरू असतानाच समोरून येणाऱ्या कुत्र्यानी अचानक वेग घेतला.ती धावत आपल्याच दिशेने येतात असे तिला वाटले.तिने चालण्याचा वेग वाढवला. तशी ती कुत्री अजून जोरात पळत वेगात जवळ येताना दिसली.

आता सर्वांगाला घाम फुटला,पाय लटपटायला लागले.तेवढ्यात दोन शाळकरी मुले त्या कुत्र्यांजवळून बिनधास्त गेली.आता आपण काय करावे? कुठे बसावे? असे वाटू लागले.रस्त्यात चोहोबाजूला पाहिले. बसण्यासारखे काहीच नव्हते‌.पुन्हा स्तब्ध झाली.

दोन कुत्री समोरच्या मालकाबरोबर चाललेल्या कुत्र्यावर भुंकत होती.ते कुत्रे ही जोरात भुंकू लागले.क्षणभर सुधाला वाटले,ही कुत्री एकमेकांशी बोलत असावीत.आम्ही कसे स्वतंत्र आहोत.हवं तसे हवं तेव्हा कुठे ही फिरतो.लोकांना घाबरवतो, आम्ही मुक्त जगतो.तू मात्र मालकाच्या तालावर जागतोस.त्यांनी फिरायला बाहेर काढले तर फिरणार नाही तर दिवसभर घरात एका जागी बांधून पडणार.मालकांनी दिलं तर खाणार, फिरायला नेहले तर फिरणार,त्याच्या घराची राखण करणार.तोड ते बंधन.हो मुक्त.चल आमच्या बरोबर….हे काय सूचतय मला?या विचाराने तिला हसू आले.

कुत्रा जास्त पायात येताना त्या कुत्र्याच्या मालकाने त्या कुत्र्याला हुसकावून लावले.तशी कुत्री पायात शेपटी घालून लांब निघून गेली.तो मालकही आपल्या कुत्र्या सोबत दुसऱ्या गल्लीत वळला. सुधा भानावर आली.आपला बराच वेळ रस्त्यातच गेला.आता भरभर चालले पाहिजे असे म्हणत ती एका ग्राऊंडजवळ आली.लोखंडी फाटकातून आत पाऊल टाकणार  तेवढ्यात समोरून एक कुत्रे आले आणि उडी मारून गेले.हे इतकं अचानक झाले तिला काही कळलेच नाही.भितीने हृदयाचे ठोके मात्र वाढले.फाटकाच्या आधाराने काही क्षण उभारली आणि चालू लागली.तोच दोन कुत्र्यांची पिल्ले जवळून पळत गेली.आज काय कुत्रे डे आहे का?

सकाळपासून सगळीकडे सगळी कुत्री माझ्याच मागे का? काय घोडे मारले मी त्यांचे? या विचारात चालत असताना तिला जाणवले तिची ओढणी कुणी तरी मागून ओढत आहे.तिला पुढे चालता येईना.मागून कुत्री भुंकत आहेत.असा भास झाला.तिची ओढणी कुत्र्यांने तोंडांत धरली आहे असे जाणवले.जवळ जवळ मोठ्याने ती किंचाळली.माॅर्निग वाॅक करणारे लोक थांबले.ते धावतच सुधा जवळ आले.आपल्या काय होतय हे कळायच्या आता तिला भोवळ आली.एकाने तोंडावर पाणी मारले.” मॅडम  काय झाले?बरं वाटतंय का?”

 आपल्या भोवती माणसांचा गराडा पाहून तिला काय झाले ते कळलेच नाही.

” काय झाले मला?”

” अहो आता तुम्ही किंचाळलात?भोवळ आली तुम्हाला.आम्ही विचारतोय तुम्हाला काय झाले?”

“मला…मी…मला…कुत्रे…कुठाय ?”

” कुत्री… ती काय तिकडे लांब खेळत‌ आहेत.”

तिने पाहीले तर खरंच  कुत्री लांब होती.तिने आपली ओढणी बघितली.

” आता माझी ओढणी कुत्र्यांनी पकडली होती ना?”

” नाही.तुमची ओढणी त्या झुडपात अडकली होती.मी काढली.”

हे ऐकून सुधा चांगली ओशाळली.सावरत उठली.इकडे तिकडे न बघता तिने तडक घर गाठले.  पुन्हा कधी ही माॅर्निग वाॅकला न येण्याच्या दृढ निश्चयाने.

 

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

सांगली

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला भावलेला गणेश ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ मला भावलेला गणेश ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

संकष्टी झाली. गणपतीची आरती झाली. आणि सर्वजण अथर्वशीर्ष म्हणू लागलो. ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसी——-त्वमेव सर्वम खल्विदं  ब्रह्मासी. पूर्ण म्हणून झालं आणि माझ्या मनात गणेश तत्वा बद्दल विचार सुरू झाले. गणपती ,गजानन ,गजमुख, विनायक अशी गणपतीची कितीतरी अर्थपूर्ण नावे आहेत. हत्तीचे मुख असलेली, रत्नजडित किरीट घातलेली, तुंदिल तनु असलेली ,जवळ उंदीर घेतलेली अशी सुंदर पार्थिव मूर्ती  हाच गणेश का ? मला भावलेला गणेश यापेक्षा आणखी किती तरी जास्तीचा आहे.

प्रत्येक गोष्टीला दोन रूप असतात .एक डोळ्याला दिसणार अस व्यक्त रूप, आणि दुसरं डोळ्याला न दिसणार पण शक्तिमान अस अव्यक्त सूक्ष्म रूप. मला भावलेलं गणेशाचे रूप हे सूक्ष्म आणि भावात्मक स्वरूपाचे ही आहे.

गण याचा अर्थ संख्या किंवा मोजणे, मोजमाप करणे वगैरे. ब्रम्ह  हे अनंत ,अपरिमित आहे. ब्रम्हातूनच अनेक ब्रम्हांडांचा जन्म झाला.जे अव्यक्त होत ते व्यक्त झालं. त्यातलंच एक अगदी छोटे आपलं जग. जग हे अनंता पासून सांता पर्यंत व अपरिमिता पासून परिमिता पर्यंत येत, तेव्हा ते मोजमाप करण्यायोग्य होत. न मोजता येणार्या तत्वाला, मोजता येण्यायोग्य बनवण कठीण आहे. गणितज्ञाला हे अनंततत्व, कोणत्या मूळ घटकाचे बनले आहे, किती प्रमाणात काय मिसळलं की काय बनेल ,हे  गणन प्रक्रियेतील    नैपुण्याचं काम ,आपल्या शिरावर वाहतो तो तज्ञ –इश  तोच गणेश. गणितज्ञांचा गणितज्ञ तोच गणेश. प्रत्येक गोष्टीला एक मिती असते. जसं की चिकू ,आंबा, फणस, ज्वारी ,बाजरी, प्रत्येकाचं स्वरूप निराळ. याची पानं, फुलं ,फळं, निराळी .आंब्याच्या झाडाला लिंबू लागत नाही. किंवा गुलाबाला जाई ,जुई लागत नाही. अशी निसर्गात एक नियमबद्धता आहे. ही नियमबद्धता जेव्हा असंतुलित होते, तेव्हा निसर्गच  ती संतुलित करण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि मग भूकंप ,ज्वालामुखी, आवर्षण, पूर, रोगराई या गोष्टी व्हायला लागतात. निसर्गाची ही नियमबद्धता  टिकविणारा  नियंत्राता तोच गणेश.

आपले जग हे पृथ्वी आप तेज वायु आकाश या पंचमहा तत्वांनी बनले आहे .ही पाच तत्वे ठराविक प्रमाणात एकमेकात मिसळून, त्याचे पंचीकरण झाले. उदा:– अर्ध्या आकाश तत्वात ,उरलेली चारही तत्वे प्रत्येकी एक अष्टमांश अशी गणना झाली .या गणनेच्या मूळाशी असलेली अधिष्ठात्री देवता (त्वं मूलाधार स्थितोसि नित्यम् ) ती शक्ती म्हणजेच गणेश.

सर्व सृष्टीची निर्मिती ही ओमकारातून झाली आहे. गणेशाचे रूप , नाद स्वरूप ओमकार प्रधान आहे .गणेशाला गजमुख असेही म्हणतात. अर्थमय नाद करणे, असा अर्थ गजधातूतून  व्यक्त होतो. गणेशोत्तर तापिनी उपनिषदात गणेशाला  गणनाकार नाद म्हटले आहे. तो गणनाकार नाद करतो, म्हणून तो गजमुख. प्रत्येक गोष्ट ओमच आहे .असे मांडुक्य उपनिषदात सांगितले आहे. आकाशातून पृथ्वीवर पडणारा पाऊस  –जलतत्व , आकाशाकडे   झेपावणार्या ज्वाळा  हे अग्नितत्व, या दोन्हीमधील गाठ हे पृथ्वीतत्व  ,त्यातून येणारा प्रवाह हे वायुतत्व. त्यावरील चंद्रकोरीची दोन्ही टोके, मन आणि बुद्धी. त्यावरील टिंब हे चैतन्य आणि हे सगळं ज्यामध्ये सामावलंय ते आकाश तत्व. अशीही अष्टधा प्रकृती तोच गणेश.

गणेशाचा एक वैज्ञानिक अर्थही मला भावला .पदार्थाचा ,वस्तूचा, सगळ्यात लहान घटक म्हणजे अणू. अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो .व त्यांच्या बाहेरून इलेक्ट्रॉन फिरत असतो. त्याची अष्टक स्थिती प्राप्त करून स्थिर होण्याची धडपड असते. त्याची गणना करून त्याला स्थिर होण्यासाठी, पूरक बनून ,त्याची  आठ आकड्यापर्यंत गणना करुन देतो, ती शक्ती म्हणजेच  गणेश.

गुर पासून गौरी म्हणजे ,सतत उद्यमशील शक्ती किंवा उर्जा. ऊर्जेने धारण केलेली , ती गौरी. सृष्टी निर्माण करणारी ,गणना कार नादमय सृजनशक्ती ईश्वरी शक्ती म्हणजे गौरी नंदन गणेश.

निर्मिती करणारा ब्रम्हा, सातत्य राखणारा विष्णू आणि विलयाला नेणारा महेश या सर्व शक्ती म्हणजेच गणेश. आपण तरी काय करतो ! पार्थिव गणपतीचे आगमन करतो. आनंदाने ,अपूर्वाईने त्याची पूजा करतो. उत्सव  करतो. आणि विसर्जन ,म्हणजे पुन्हा पृथ्वीतत्त्वात विलय करतो .हे चक्र निसर्गात  सतत चालू आहे. झाडे ,पर्वत ,समुद्रातील बेटे, यांचीही उत्पत्ती होते.  स्थित रहाते. आणि  विलय होतो. आणि परत पुन्हा नवीन जन्म! या सगळ्या साठी लागणारी शक्ती तोच गणेश.

या विश्वाच्या मागे राहून कार्य करणारी शक्ती, म्हणजे एक फार मोठे रहस्य आहे. एक गूढ आहे . उलगडणे ही तितकेच अवघड व कठीण काम आहे .आणि ते काम करणारा ज्ञानमय ,विज्ञानमय असा गणेशच  असतो.

गणेशोत्सव जवळ आला आहे. सर्व शक्तींच्या प्रतीकाची, पार्थिव गणेशाची पूजा करत असताना ,या निसर्गाचा  र्हास,  न करता ,

त्याचे रक्षण करणे हीच भावात्मक पूजा खऱ्या अर्थाने पूजा होईल आणि गणेश प्रसन्न होईल.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मनापासून प्रार्थना ! ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? विविधा ?

☆ मनापासून प्रार्थना ! ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

साधारण २ वर्षांपूर्वी ‘मुंबई मेट्रो’ ची एक जहिरात लागायची, त्यातील एक वाक्य फारच लक्षवेधी होते

” हे क्षण माझे मला जगू द्या “

२०२० आणि आता २०२१ च्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, आज गणपती बाप्पाला हेच मागणे मागावेसे वाटते

बाप्पा,
ते गणेशोत्सवातील सर्व क्षण परत आम्हाला मिळवून द्या

मिरवणूक, मंडळांचे देखावे, लांबचलांब रांगा, एकमेकांच्या घरी जाऊन दर्शन, सामुहिक आरत्या, प्रसाद, सहस्त्रावर्तन, विविध कलाकारांचे कार्यक्रम आणि बरच काही

ढोल, लेझीम , ताशा
निनादू देत ही आशा
भाग्याची येऊ दे दशा
तुझ्याच कृपा दृष्टीने

सर्व कलाकारांना तुझी सेवा करायची संधी सतत मिळू दे अशी मनापासून प्रार्थना

तुज नमो ??

 

#तूचगणेशादैवत_माझै

अमोल ?

भाद्रपद शु.तृतीया
०९/०९/२१

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्व बदल ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? मनमंजुषेतून ?

☆ स्व बदल ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆ 

नाही म्हणू नका, 

काहीतरी करून दाखवूया 

दुसऱ्याला नाही, 

तर स्वतःलाच बदलून दाखवूया 

 

फुटपाथ हा फक्त चालण्यासाठी असतो

फेरीवाले विक्रेते ह्यांच्या बापाचा नसतो 

मान्य आहे, 

रस्त्यातली खरेदी, वेळेची बचत करते 

सर्व काही आपल्याला, स्वस्त्यात मिळते 

अहो,

घाणीचे साम्राज्य, तिथेच तर पसरते 

सवय आपलीच, शहराची दुर्दशा करवते 

तुम्हीच नाही म्हणा, ते बसणार नाहीत  

रस्त्यात आपला ठेला, ते मांडणार नाहीत 

विचार करा,

विचार करा, आपल्या वरिष्ठ नागरिकांचा 

रस्ता द्या हो त्यांना, त्यांच्या हक्काचा 

नाही म्हणू नका,

काहीतरी करून दाखवूया 

दुसऱ्याला नाही, 

तर स्वतःलाच बदलून दाखवूया 

 

सिग्नलचे पालन करून, शिस्तीचे धडे गिरवू

झेब्राच्या आधी, एका रांगेत गाडी थांबवू 

नको तो हॉर्न, नको ती घिसाडघाई 

मीच पहिला, अशी नको ती बढाई 

उजव्या हाती आहे त्याला, पहिले जाऊ द्या हो 

कोंडी न करता, इंधन आणि वेळ वाचवूया हो 

गाडी पार्किंग करताना, दुसऱ्यांचा विचार करूया 

वेगावर नियंत्रण ठेऊनच गाडी चालवूया 

नाही म्हणू नका,

काहीतरी करून दाखवूया 

दुसऱ्याला नाही,

तर स्वतःलाच बदलून दाखवूया 

 

गावातील आपलेच बांधव, वणवण फिरतात 

पाण्यासाठी अजूनही, त्यांचे हाल होतात 

शहरात मात्र पाण्याचा, अति वापर करतात 

आंघोळीला शॉवरखाली, तासनतास बसतात 

पाण्याचे नियोजन करून, अपव्यय टाळूया 

पावसाचे पाणी अडवून, बंधारे बांधूया 

काहीही करून गावकऱ्यांना, दिलासा देऊया 

श्रमदान करून गावांमध्ये, शेततळी बांधूया 

नाही म्हणू नका,

काहीतरी करून दाखवूया 

दुसऱ्याला नाही,

तर स्वतःलाच बदलून दाखवूया 

 

झाडांची कत्तल करून, इमारती बांधतात 

काँक्रीटची दाट जंगले, उभी रहातात 

ऑक्सिजनची कमी होऊन, माणसे मरतात 

माणसेच माणसाच्या मरणाला, जबाबदार ठरतात 

झाडे लावून, जंगलांचे जाळे वाढवूया 

जंगलाचे, वणव्यांपासून रक्षण करूया 

निसर्गाशी मनापासून, जवळीक साधूया

वाढदिवस हा झाडे लावून, साजरा करूया 

नाही म्हणू नका,

काहीतरी करून दाखवूया 

दुसऱ्याला नाही,

तर स्वतःलाच बदलून दाखवूया 

 

स्कुटर गाड्या चालवून, प्रदूषण वाढतंय 

पब्लिक ट्रान्सपोर्टला, मात्र टाळ लागतंय 

पेट्रोल डिझेलमुळे होतेय, पैशांची उधळण 

अती वाहनांनमुळे होतेय, ध्वनी प्रदूषण

हॉर्न वाजवून कानाचे पडदे नका फाडू 

संयम राखूनच रस्त्यावर गाडी चालवू 

चालणे, सायकलवर, भर देऊन तर बघा 

स्व स्वास्थाचा, विचार करून तर जगा  

नाही म्हणू नका,

काहीतरी करून दाखवूया 

दुसऱ्याला नाही, 

तर स्वतःलाच बदलून दाखवूया 

 

कचऱ्याचा प्रश्न, हा उभाच का रहातो 

मुळात कचराच, आपण का बरे करतो 

स्वच्छतेचे शिक्षण, हे शाळेतून मिळावे

घरात त्याचे, सगळ्यांनी धडे गिरवावे

कचऱ्याचे व्यवस्थित, नियोजन करूया 

त्यापासूनच खताची, निर्मिती होऊ द्या 

ओला आणि सुका ह्यांचे विभाजन करूया 

घरातल्या कचऱ्याचे खतात रूपांतर करूया 

नाही म्हणू नका,

काहीतरी करून दाखवूया 

दुसऱ्याला नाही,

तर स्वतःलाच बदलून दाखवूया 

 

प्ल्यास्टीकवर  वर बंदी घालून, जगायला शिकूया

काही अडत नाही, त्याशिवाय राहून तर बघूया 

कापडी पिशवी घेऊनच खरेदीला बाहेर पडूया 

देणारा देतो तरीही, प्लास्टिक पिशवीला नाही म्हणूया 

अनेक पर्यायांपैकी चांगल्याची निवड करूया 

पुढच्या पिढीचा विचार, करूनच वागूया  

काही झाले तरी निर्धार पक्का करूया 

प्लास्टिकला कायमचेच, राम राम म्हणूया 

नाही म्हणू नका,

काहीतरी करून दाखवूया 

दुसऱ्याला नाही,

तर स्वतःलाच बदलून दाखवूया

 

स्वतःशीच आरशात बघून, संवाद साधूया 

स्वतःलाच मनापासून, समज देऊया 

स्वतःशीच ठाम राहून, बदल घडवूया 

स्वतःलाच बदलण्याची, एक संधी देऊया 

दुसऱ्यात पहिले आपण, स्वतःला शोधूया 

स्वतः कडूनच बदलाची, हमी घेऊया 

नाही म्हणू नका,

काहीतरी करून दाखवूया 

दुसऱ्याला नाही,

तर स्वतःलाच बदलून दाखवूया

स्वतःला नाही,

तर शहरालाच बदलून दाखवूया 

शहराला नाही,

तर देशालाच बदलून दाखवूया——-

 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

मो. नं. ९८९२९५७००५. 

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वेळ ☆ संग्राहिका – डॉ. ज्योती गोडबोले 

डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

☆ वेळ संग्राहिका – डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

खूप आहे आपल्याकडे असं आपल्याला वाटत असत पण प्रत्यक्षात खरंच तो नसतोच कोणाकडे अशी एक गोष्ट म्हणजे वेळ. हा शब्द किती आपल्या रोजच्या जगण्यात येतो नाही, कदाचित खूप कमी असतो म्हणून डोकावतो का इतका सहज. आपण किती म्हणतो काळ आला होता पण वेळ आली नव्हती. किंवा त्याहीपेक्षा साधंसं म्हणजे हा/ही कधी वेळेवर येईल तर शपथ. हातासरशी आणि वेळेवर करावीत ग कामं असं ऐकतं ऐकतंच तर मोठे होतो की आपण. हातातली कामं बदलत जातात फक्त पण वेळ आपला तसाच. कायम कमी पडत आलेला. हा वेळ म्हणजे वाढत्या ओढाळ वयाच्या मुलीचा फ्रॉक असावा जणू. सतत तोकडा पडणारा. माझी एक मैत्रीण सांगत होती मला परवा की कसं एक नामांकित बाई तिला सांगत होत्या ह्या वेळेवरून. मैत्रीण साधी आहे माझी सरळ, नेटका आणि तो सुद्धा एकटीनं संसार करणारी. मग तिच्याकडे कुठून असणारं वेळ. ह्या बाई एकट्या वर तारांकित व्यक्तिमत्व. मग त्या त्यांचा मौल्यवान वेळ खर्च करून सांगू लागल्या की वेळ नसतोच ग कोणाकडे. तो काढावाच लागतो. बघ. तू पण काढत जा. वेळ काढल्यानेच तो मिळतो. आपल्यासाठी आपण नाही वेळ काढणार तर कोण? चार वाक्यात चार वेळा बोलल्या त्या हा शब्द. आणि ती सांगायला जाणार इतक्यात त्यांच्याकडचा संपला बहुदा. मग त्या सरळ निघून गेल्या तिथून. वेळकाळ पाहून माणसं बरेचदा वागतं नाहीत ते असं. सल्ले देणं काय हो सोपं असतं खूप. तितक्या सहजतेनं आपण दुसऱ्याला देऊ शकतं नाही, तो असतो वेळ.

किती लोकांना सतत घड्याळात बघायची सवय असते. सवय काय पटकन लागते आणि चटकन सुटतं नाही. आणि कित्येकदा ती आपल्या सोयीची आणि समोरच्याच्या गैरसोयीची असते. ही पण तशीच एक सवय. आमचे एक काका आहेत. लहानपणी जेव्हा घरी येतं तेव्हा मी असे तिथेच. मांजरीसारखी लहान मुलं पण सारखी पायात घोटाळतात. तर ते आले की जवळपास पाचव्या मिनिटापासून भिंतीवरच्या घड्याळात बघत असत. तेव्हा ते खरंच व्यस्त असत. पण तरीही ते स्वतःहूनच येतं. तरी आल्यावर त्यांना किती हा आपण येऊन मूर्खपणा केलाय असं वाटू लागे बहुदा आणि मग त्यांच्या मनातली ही अस्वस्थता अशी घड्याळात डोकावून व्यक्त होतं असावी. अस्वस्थता किती पाण्यासारखी असते  वाट फुटेल तिथून झिरपत राहते फक्त. यथावकाश काकांची व्यस्तता कमी कमी होतं गेली. पण सवय कसली सुटायला. भिंतीवरून मनगटाकडे आणि तिथून पुढे हातातल्या मोबाईल वर येऊन ती स्थिरावली, इतकंच. वेळेचं आणि त्यांचं कधी जमलं नाही, असंच आता म्हणायचं.

अशाच एक खूप जवळच्या बाई. असं ऐकलं आहे खूप की यांना वेळेचं गणित कधी सुटलं नाही. वडील फार मोठा माणूस. लोकसंग्रह फार. नावाजलेलं आणि गाजलेलं नावं. पण ते सुद्धा त्यांच्या कामी आलंच नाही. वेळ नव्हती त्यांच्यासोबत हेच खरंय का मग. इतकं पिकलं पान होऊन गेल्या. ते सुद्धा ह्या अशा काळात आणि मुख्य म्हणजे ह्या अशावेळी जेव्हा कोणीही कितीही इच्छा असली तरी कोणाकडे सहज उठून जाऊ शकत नाही. त्यांना शेवटचा निरोप दयायला सुद्धा जास्त कोणी येऊ शकलंच नाही. वेळच आली होती अशी, काय करणारं. पण वाईट वाटतं. खूप वाटतं आणि….

किती जणांच्या बाबत म्हटलं जात की हा/ही वेळेआधीचं जन्माला आलायं. भविष्याचा वेध घेणाऱ्या माणसांच्या बाबतीत तर किती वेळा ऐकलंय. आपण त्यांना आज समजून घेऊ नाही शकतं म्हणजे आपली कुवत कमी पडली असं म्हणावं का तेच आलेत वेळेआधी असं म्हणावं ह्याचं संभ्रमात राहतो आपण. वेळेला समानार्थी शब्द म्हणून काळ हा शब्द वापरला जातो, मराठीत. आणि ह्या वेळेच्या संदर्भातच नुकत्याच निर्वतलेल्या श्री. मंगलेश डबराल ह्या जागतिक हिंदी कवीच्या शेवटच्या कवितासंग्रहाचे नाव, ‘स्मृती एक दुसरा समय है’ हे असावं आणि ते मला माहित सुद्धा नसावेत ह्याची इतकी खंत वाटते की अजून काही लिहिलं जाणार नाही. आता ते पुस्तक मी विकत घेईन. वाचेन त्यांना. पण वेळ साधता आलीच नाही ह्याची हळहळ कायमचं राहिलं मनात. आता ती स्मृतींमधून उरेल आणि काळ गेला किती तरी पुरेल. इतकंच ——–

संग्राहिका – डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – कट, कट कट !☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? कट, कट कट ! ?

सकाळचा नेत्रसुखद मॉर्निंग वॉक घेऊन सोसायटीच्या जवळ आलो आणि माझा डावा डोळा फडफडायला लागला ! असा डावा डोळा अचानक फडफडायला लागला, तर आपल्यावर काहीतरी अरिष्ट येणार, असं जुन्या जाणत्या लोकांच मत ! माझा काही अशा गोष्टींवर विश्वास नाही, पण तुम्हाला सांगतो मंडळी, मी जिन्याची जसं जशी एक एक पायरी चढायला लागलो, तस तसा माझ्या डोळ्याचा फडफडण्याचा वेग पण वाढायला लागला ! मी बेल वाजवण्यासाठी बेलच्या बटनाला हात लावणार, तोच फ्लॅटच दार आपोआप उघडलं आणि माझा डावा डोळा फडफडायचा अचानक थांबला ! त्या धक्क्यातून सावरून समोर बघतोय तर दुसरा जोरदार धक्का मला बसला ! माझी एकुलती एक बायको हातात चहाचा कप घेऊन हजर ! आता हेच जर ते गोड अरिष्ट असेल तर ते मलाच काय, कुठल्याही नवरोबाला आवडेल, खरं की नाही ?

“अगं हे काय ? आज एकदम न मागता चहा आणि तो सुद्धा मी घरात शिरायच्या आधी?” “मी म्हटलं रोज रोज तुम्हाला कशाला ‘अगं जरा चहा देतेस का?’ अशी माझी विनवणी करायला लावायची ! आज आपणच तुम्ही न मागता, तुम्हाला चहा देवून सरप्राईज द्याव !” त्यावर तिच्या हातचा चहा घेऊन मी घरात येत तिला म्हटलं  “माझे आई, गेल्यावेळच्या तुझ्या ‘सरप्राईजची’ शिक्षा अजून माझी आई मला देत्ये, ती पुरे नाही का झाली ?” “हे बघा, माझी त्या वेळेस काहीच चूक नव्हती बरं.” त्यावर मग मी चहाचा घोट घेता घेता बायकोला म्हटलं “अगं तू मला नुसतं म्हणालीस, आई येणार आहे म्हणून, मला वाटलं तुझी आई, म्हणजे सासूबाई येणार म्हणून !” “तुम्हाला तेव्हा तसं वाटलं यात माझी काय चूक ?” “बरं, चूक झाली माझे आई ! पण आता मला खरं खरं सांग, या आजच्या माझ्या स्वागता मागे कुठले छुपे कारण दडलं आहे ?” “अहो माझी ती पुण्याची मालू मावशी आठवते का तुम्हाला ?” “मालू मावशी… ” “अहो ती नाही का आपण आपलं लग्न झाल्यावर तिच्या पाया पडायला गेलो…..” “हां, हां आत्ता आठवलं, तिचा बंगला काय मस्त आहे ना कोथरूडला!” आता हिच माहेर पुण्यात त्यामुळे तिचे बहुतेक सारे नातेवाईक पुण्याचे आणि जवळ जवळ सगळ्यांचेच बंगले, म्हणून मी आपली अंधारात एक गोळी चालवून बघितली. पण तुम्हाला सांगतो मंडळी, ती बरोब्बर वर्मी लागली ! “हां, तिच ती, तर त्याच मालू मावशीचा मगाशी फोन आला होता.” “अस्स, काय म्हणतात मालू मावशी, तब्येत वगैरे बरी आहे ना त्यांची ?” “हो, अगदी ठणठणीत आहे ती आणि हो, तिच्या मुलीच्या, मुलीच लग्न आहे परवा त्याचच बोलावणं करायला तिनं फोन केला होता !” “अरे व्वा, मग जाऊया की आपण दोघं!” “दोघं नाही मी एकटीच!” मी मनांत आनंदून, पण वरकरणी तसं न दाखवता तिला म्हटलं “म्हणजे ? तुझं लग्न झालंय आणि तुला एक नवरा पण आहे, हे मावशी विसरली की काय?” “अहो तसं नाही, सध्याच्या करोना काळात लग्नाला फक्त ५० लोकं कार्यात सहभागी होऊ….” “ते माहित्ये गं मला, पण आपल्याकडून आपण दोघं….” “नाही जाऊ शकत” बायको ठामपणे म्हणाली. ते ऐकून माझ्या मनांत, चार पाच दिवसाच्या स्वातंत्र्याची स्वप्न पडायला लागली ! मी आणखी काही बोलणार, तर तीच पुढे म्हणाली “अहो माझाच नंबर ५० माणसात ५० वा आहे आणि तो सुद्धा मावशीच्या लंडनच्या भाच्याची बायको येणार नाही म्हणून! ती जर येणार असती तर, माझा पण पत्ता कट होता, कळलं.” मी मनातल्या मनांत त्या अज्ञात भाच्याचे आणि त्याच्या अज्ञात बायकोचे आभार मानत हिला म्हटलं “हे नक्की ना?” “म्हणजे ?” “म्हणजे, तू नक्की एकटीच पुण्याला लग्नाला जाणार हे.” “हो” “मग मी काय म्हणतो, आता अनायासे तू पुण्यात जात आहेस तर, लग्न झाल्यावर चार पाच दिवस आईकडे जाऊन ये.” “तेच माझ्या डोक्यात होतं, पण या करोनमुळे आपल्या स्वयंपाकाच्या मावशी येत नाहीत, मग तुमचे जेवणाचे हाल….” “अजिबात होणार नाहीत, हल्ली सगळ्या हॉटेलनी (आणि बारनी) होम डिलिव्हरी चालू केली आहे. त्यामुळे तू माझ्या जेवणाची अजिबात काळजी करू नकोस !” “ठीक आहे, मग परवाच लग्न लागलं की मी आईकडे चार पाच दिवस राहून येईन.” असं म्हणून बायको आनंदाने किचन मधे गेली आणि मी उद्या पासून मिळणारे चार पाच दिवसाचे स्वातंत्र्य कसे साजरे करायचे या विचारात मग्न झालो. रमेश, सुरेश, नंदन आणि योगेश यांना मोबाईलकरून सेलिब्रेशनचे आमंत्रण करून टाकले आणि अंघोळीला पळालो.

रात्री कधी नव्हे ती, बायकोला बॅग भरण्यात मदत करत होतो, तेवढ्यात बायकोचा मोबाईल वाजला. “अय्या मालू मावशीचा आहे” असं मला सांगत तिने फोन उचलला. “बोल गं मावशी, ही काय उद्याची बॅगच भरायला बसल्ये.” या बायकोच्या एका डायलॉग नंतर, तिचा मोबाईल नाही पण आवाज म्यूट झाला आणि तिच्या चेहऱ्यावरचे रंग बदलत जाऊन डोळ्यात पाणी उभे राहिलं. दहा मिनिटं अशीच म्यूट गेली आणि बायकोने “ठीक आहे” असं म्हणून मोबाईल बंद केला व रडायला आणि बॅग उपसायला एकदमच सुरवात केली. “अगं असं एकदम रडायला…..” “मी नाही जात आहे लग्नाला” ते ऐकून मला परत कोणीतरी पारतंत्र्याच्या बेडया ठोकल्याचा भास झाला ! “अगं पण का?” “माझा पत्ता कट झाला” असं म्हणून ती पुन्हा रडायला आणि बॅग उपसायला लागली. “पण लग्नाच्या वऱ्हाडी मंडळीत तुझा ५० वा नंबर होता…”  “होता ssss ! पण आता मावशीच्या लंडनच्या भाच्याच्या बायकोला रजा मिळणार आहे आणि ती लग्नाला नक्की येणार आहे म्हणून मावशीने माझा पत्ता कट केला !”

बायकोचे ते वाक्य, मला मिळणाऱ्या चार पाच दिवसाच्या स्वातंत्र्यचा पण आपोआप पत्ता कट करून गेले आणि मी डोकयावर पांघरूण घेऊन, मित्रमंडळींना कसं पटवायचं याचा विचार करू लागलो !

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares