मराठी साहित्य – विविधा ☆ स्पॅनिश फ्लू-अ  फरगॉटन पेंडेमिक – भाग 1 ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

☆ विविधा ☆ स्पॅनिश फ्लू-अ  फरगॉटन पेंडेमिक – भाग 1 ☆ सौ. सुनिता गद्रे☆ 

Covid-19 ची साथ चीन मधून निघाली…बघता बघता जगातल्या 195 देशांना तिनं आपल्या कब्जात घेतलं….आता जगभर माहिती-तंत्रज्ञानाचा इतका प्रसार झाला आहे की आजच्या तारखेला पूर्ण जगात किती कोविड -19 पॉझिटिव आहेत? किती जणांनी आजारावर मात केली? किती जण दुर्दैवानं मृत्युमुखी पडले? भारतातील आकडेवारी….. वगैरे सगळं एका क्लिकवर आपल्याला समजू शकतं.

याबद्दल आपण सर्वांना या दीड वर्षात खूप सारं वाचलंय, ऐकलंय आणि अनुभवलंय पण!

टीव्ही वरची याबाबतची चर्चा मी ऐकत होते.त्यावेळी शंभर वर्षापूर्वीच्या स्पॅनिश फ्लू चा उल्लेख आला.1918 ते 1920 पर्यंतच्या कालावधीत या महामारीने जगातल्या पाच करोड किंवा त्याहून अधिक लोकांचे प्राण घेतले ह़ोते….नुसत्या भारतातच दोन करोड लोक मृत्युमुखी पडले होते.

आज मितीस covid-19 मुळे भारतातल्या सर्व राज्यात मिळून या दिड वर्षात 5ते6  लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत.. त्या दृष्टीने पहाता स्पॅनिश फ्लूने आपण गमावलेल्याआपल्या प्रियजनांचा आकडा 2करोड,हा  खूपच मोठा आहे. या महामारी मुळे त्याकाळीआपल्या देशात,गावागावातून.. शहरा शहरातून…राज्या राज्यातून किती तरी लोक मृत्यूमुखी पडले असतील. असे मला वाटते.मग 1918 ते 1920 मध्ये त्यावेळी तरुण,जागरूक (वर्तमानपत्र वगैरे वाचणार्‍या सुशिक्षित) असलेल्या आपल्या वडीलधाऱ्यां कडून उदाहरणार्थ दोन्ही आजोबा आणि आज्या, इतर परिजन यांच्याकडून त्याबाबत आपण काहीच कसे ऐकलेले नाही? लेखक,कवी यांच्या साहित्यातून त्याबाबतचा साधा उल्लेखही का नाही आढळत ? अशा शंका माझ्या मनात उत्पन्न झाल्या.

याउलट त्या मानाने…1896 मध्ये, म्हणजे स्पॅनिश फ्ल्यू या साथीच्या बावीस वर्षे आधी पसरलेल्या प्लेगबाबत आपल्याला खूप माहिती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भावाला झालेला प्लेग, लोकमान्य टिळकांचा मुलगा प्लेगमधे  दगावला होता… (याबाबतची ही माहिती…) लोकमान्य टिळक त्यावेळी खूप महत्त्वाच्या राजकारणात गुरफटलेले होते. त्यांची गुप्त बैठक चालू होती. कोणीतरी त्यांना ही बातमी सांगितली.

 तेव्हा टिळक म्हणालेहोते, “सगळ्या गावाची होळी पेटली आहे. त्यात माझ्या घरची एक गोवरी गेली.” दुःखाचे फार प्रदर्शन ते करत बसले नाहीत.हे पण खूप जणांना माहित आहे. अगदी माझ्या जवळचे उदाहरण सांगायचे तर, माझे पणजोबा (आईचेआजोबा )पण प्लेगने गेले होते. पणजीकडून,आजीकडून याबाबत आम्ही खूप ऐकले होते. बाधित उंदरामुळे हा रोग पसरला होता.सर्व लोक गावाबाहेर तंबूत वगैरे राहायला गेले होते.अशी वेगवेगळ्या लोकांकडून भरपूर माहिती ऐकली होती. मग  1918ते 20 च्या स्पॅनिश फ्लूबद्दल लोकांना अजिबात माहिती का नाही? हे जाणून घ्यायची तीव्र इच्छा माझ्या मनात जागृत झाली. त्यादृष्टीने मी काही वाचन केले, गुगल, यु ट्यूब ढवळून काढली आणि सगळी वस्तुस्थिती मला माहीत झाली.

 तीच तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा  प्रयत्न आहे.

प्रथम 1896च्या प्लेगबद्दल सांगते. हाँगकाँग येथे ही साथ 1894 पासून सलग तीन वर्षे उसळी मारत होती….. तिनेच पुढे मुंबईवर कब्जा केला.. आणि पुण्यात तर 1896 मध्ये तिने कहर माजवला. पुढे पुरत्या मुंबई राज्यात ती पसरली.प्लेगच्या काळात आपल्या लोकांचे जीवन विस्कळीत तर झालेच होते, शिवाय जीवितहानी ही खूप झाली होती.हजारोलोक दगावले होते.

त्या काळात मुंबई बंदरावरून भरभरून,बोटीने आपल्याकडचे अन्नधान्य इंग्लंड मध्ये जायचे. आणि धान्याच्या एवढ्या प्रचंड साठ्यात उंदीर तर खेळत असायचेच.बाधित उंदरामुळे हा रोग पसरतो त्यामुळे इंग्रज घाबरून गेले होते.ही साथ आपल्या देशात.. इंग्लंडमध्ये, जाऊ नये म्हणून ब्रिटिश सरकारने कलेक्टर रँड याच्याकरवी आपल्या  सोल्जर्स कडून,लोकांना विश्वासात न घेता मोठ्या प्रमाणावर घर तपासणी सुरू केली.लोकांवर खूप अत्याचार करण्यात आले. धाकदपटशा, मारहाण, स्त्रियांची अब्रू लुटणे…. या प्रकाराने संतापलेल्या जनतेतील ‘चाफेकर बंधूंनी’ रँडची हत्या केली. मुंबई राज्यात मोठ्या प्रमाणात ही साथ पसरली होती…ही याची पार्श्वभूमी असल्याने प्लेग आपल्या लोकांच्या लक्षात राहिला.

            क्रमशः….

© सौ सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शुक्रवारचे गरम चणे…… ☆ श्री विजय गावडे

श्री विजय गावडे

? मनमंजुषेतून ?

☆ शुक्रवारचे गरम चणे…… ☆ श्री विजय गावडे ☆  

गेले ते दिन गेले. बालपणस्य कथा रम्य :

जे काय म्हणाल ते लागू पडेल त्या रम्य बालपणाला. त्या मंतरलेल्या दिवसांना. पावसाळा आला की मोठ्या प्रमाणेच आम्हा शाळकरी मुलांना सुद्धा श्रावण महिन्याची ओढ लागायची.  त्याच्या अनेक कारणामध्ये श्रावणी सोमवारची शाळा फक्त अर्धा दिवस असणे हे एक होतं.  तशी श्रावण महिन्यात सुट्ट्यांची रेलचेल असे.  गणपती बाप्पा च्या आगमनाची चाहूलहि श्रावण सुरु झाला की लागे.

श्रावणातील शुक्रवार हा  आम्हांला खूप आवडायचा. किंबहुना पावसाळ्यातील शुक्रवार म्हणजे तव्यावर भाजलेल्या खमंग चण्यांच्या मुठी तोंडात कोंबून साजरा करायचा  वार असायचा.  आंबोली चौकुळचा तो पाऊस त्या काळी खऱ्या अर्थाने कोसळायचा. साधारण होळी दरम्यान सुरु झालेला पाऊस गणेश चतुर्थी आली तरी न थकता आपलं अस्तित्व राखून असायचा. ‘ शिगम्यान पावस नी चवतीन गिम ‘ अशी मालवणी म्हणच प्रचलित होती त्यावेळी. अतिवृष्टीमुळे कित्येक वेळा शाळा अर्ध्यावरच सुटे. आमच्या आनंदाचं हेही एक कारण असे.  परंतु शुक्रवारी दुपार नंतर आम्ही वर्गात असलो की चणे विकत आणण्यासाठी पैसे गोळा केले जायचे. हि जबाबदारी मॉनिटर वर असायची. फक्त पाच पैसे वर्गणी देऊन मूठभर गरमागरम चणे बुक व्हायचे. आजूबाजूच्या घरातून तवा आणला जायचा. तात्पुरती चूल पेटविली जायची. दुकानातून एक, दोन किलो चणे आणले जायचे. चण्यावर मिठाचे पाणी शिंपडून ते खरपूस भाजले जायचे. हि सगळी कामे करतानाचा आमचा उत्साह कपडे ओले चिंब झाले तरी टिकायचा. घरी गेल्यावर पावसात उनाडक्या केल्या म्हणून आई कडून उत्तरपूजा बांधली जायची ती वेगळी. पण ‘शुक्रवारचे गरम चणे, कुणा हवे का फुसदाणे’ या मस्तीत असे कित्येक पावसाळी शुक्रवार आम्ही बालमित्र मैत्रिणींनी साजरे केलेले अजूनही स्मरणात आहे.

आता ते आठवलं की मनात चणे फुटतात आणि चणे न खाताही ती खरपूस चव जिभेवर रेंगाळते.

 

© श्री विजय गावडे

कांदिवली, मुंबई 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जाने कहा गये वो दिन.. ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ जाने कहा गये वो दिन.. ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

वेळ रात्री नऊ साडेनऊची. घराघरांमधल्या हॉलमधे टिव्ही, मालिकांचे घाणे टाकत असतो. बथ्थड डोक्याच्या मठ्ठ मराठी मालिका.. कपिल शर्माचा कॉमेडी शो, हवा येऊ द्या.. असं काही तरी चाललेलं असतं. माणसं बायकांचं, बायका माणसांचं सोंग घेऊन प्रेक्षकांचं मन रमवण्याचा प्रयत्न करत असतात. ढॅण– ढॅण  करत जाहिराती अंगावर येऊन कोसळत असतात. त्या सगळ्या गचक्यात जेवणं उरकणं चालू असतं. कोणी एकीकडे मोबाईलमधे डोकं खूपसून दूर कोणाशी तरी चॅट करत असतं. त्या नादात ताटात काय चाटतोय त्याचं भान नसतं. हे झालं आताच्या काळातलं चित्र.

 —— साधारण पन्नासएक वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय घरांमधे रात्रीचं चित्र कसं असायचं बरं?

 ——-सुट्टीत, उन्हाळ्यात किंवा असंच कोणी टूम काढली की तिन्हीसांजेला मुलांची अंगत पंगत व्हायची. आपापल्या घरून ताटं घेऊन मुलं कोणाच्या तरी अंगणात किंवा गच्चीत जमायची. हसत खेळत पाखरांची पंगत उठायची. कधी जेवणानंतर लगेच मामाचं पत्र सुरू व्हायचं. नदी की पहाड… डबा ऐसपैस.. अरिंग मिरिंग लोंगा तिरिंग…गाई गोपी उतरला राजा… भोज्जा…

नऊ साडेनऊ म्हणजे तर झोपायची वेळ असायची.. आठ साडेआठलाच अंथरूणं टाकणे नावाचा कार्यक्रम सुरू व्हायचा. गाद्या घालून झाल्या की मच्छरदाण्या लावणे. पण त्या आधी मुलांच्या कोलांटउड्या व्हायच्या. हा कार्यक्रम साधारणपणे कोणी मोठ्या माणसाने डरकाळी वजा इशारा देईपर्यंत चाले. मग मच्छरदाणी प्रकरण सुरू होई.  मच्छरदाण्यांची ठराविक दोरी ठराविक खिळ्यांनाच बांधावी लागायची. त्यामुळे ज्याचं काम त्यालाच करावं लागायचं. असं कोणीही आलं आणि मच्छरदाणी बांधली असा मामला नसायचा. मच्छरदाणी बांधली की आपलं सगळं सामानसुमान घेऊन मच्छरदाणीत शिरावं लागायचं. मग सारखं आत बाहेर करता यायचं नाही. कारण मग डास आत घुसायचे. तरी झोपण्यापूर्वी एखादा डास शिरलेलाच असायचा. मग प्रत्येक जण आपापल्या मच्छरदाणीत रांगत टाळ्या पिटतोय असं दृष्य दिसायचं. 

पण रात्रीची खरी मजा तर उन्हाळ्यात असायची.. गच्चीवर झोपण्याची. रोडच्या कडेला असलेल्या ओट्यावर पण बिनधास्तपणे झोपायचे लोक. अंगणातही झोपायचे. पण गच्चीवरचा मामला काही औरच. ब-याचदा माळवदाची घरे असत. जिना वगैरे असेलच असंही नसायचं. एखादी मोडकीशी शिडी असायची. मोठाली पोरं अंथरूणं वर न्यायची. बारकाली पोरं त्यांना मदत करायची. मोठी माणसं–महिला वर्ग खालचं कडीकुलपं बघून शेवटाला येत. तोपर्यंत वर अंथरूणं पडलेली असत. कधी पोरं संध्याकाळीच अंथरूणं घालून ठेवत. रात्रीपर्यंत ती गार पडलेली असत. ट्रांझिस्टर्स तेव्हा नवीनच आलेले होते. मग ठराविक स्टेशनं लावली जात. विविध भारतीवर, सिलोनवर जुन्या गाण्यांचा कार्यक्रम,भुले बिसरे गीत, बेलाके फूल वगैरेअसायचे.. रफीचा मधाळ आवाज, ‘खोया खोया चांद’ म्हणत आकाशातल्या चांदला थबकायला भाग पाडायचा. किशोर… सुधा मल्होत्रा, ‘कश्तीका खामोश सफर’ घडवायचे. त्या काळच्या निवेदकांच्या आवाजातही वेगळाच खानदानी ठहराव असायचा..शब्दांची लडिवाळ नाजूक बोटं जणू  झोपेची जादू करताहेत असे त्यांचे निवेदन असायचे.  वातावरणातल्या शांततेचा लहेजा सांभाळून त्यांचं ऩिवेदन चालायचं.. गाणी ऐकता ऐकता कधी निद्रादेवी कवळायची कळायचं पण नाही.

आता रफी, रेडीओ, खोया खोया चांद.. कश्तीका खामोश सफर.. सगळंच खामोशीच्या पडद्याआड गेलं. गच्चीवर झोपणं. अंथरूणं घालणं. तांब्या भांडं, ओडोमॉस घेऊन…  ट्रांझिस्टर घेऊन वर जाणं. आकाशाकडे बघत पूरवैया अनूभवत  रेडिओ ऐकणं, व्याधाचं नक्षत्र शोधणं.. चंद्राच्या डागांमधे ससा-हरीण शोधणं… सगळं वेडगळपणाचं वाटावं इतकं विज्ञानाने लोकांना शहाणं करून सोडलं. 

नवनवीन शोधांनी माणसाची आयुष्याची लांबी वाढली पण त्यातली खोली हरवली.  लोकसंख्या भरभर वाढली.अंगण तेवढंच राहिले आणि त्याचे हकदार वाढले. 

ऐंशीच्या दशकात आधी टिव्ही ने माणसं गिळली. नंतर मोबाईलने.  दोघांनी मिळून मुलांचं तर बालपणच खाऊन टाकलं. सुरुवातीला टिव्हीचा एकच चॅनल होता– तोही संध्याकाळी पाचला सुरू व्हायचा.  पण आख्खा वाडा, बिल्डींग त्याच्यासमोर एकवटायची. तल्लीन व्हायची. आता शेकडो चॅनल्स आले, तरीही मन रमत नाही. रिमोट घेऊन, ‘घे पुढं.. घे मागं’..असं तासभर करावं तरी दर्जेदार म्हणावं असं काही सापडत नाही. सज्जन लोकांऐवजी दुर्जन पात्रांची चलती आली. परोपकारी लोकांना कोणी विचारेनासं झालं आणि ज्याच्या अंगी जास्त उपद्रव- मूल्य त्याला दहशतीपोटी का होईना.. जास्त मान, अशी वेळ आली…सगळ्यांमधे एकप्रकारचं चिंबावलेपण आलं. जुन्या शांत जगरहाटीचा ठहराव सगळा वाहून गेला. 

चटणी भाकरी जाऊन पिझ्झा पास्ता आला. घरी आयाबायांनी निगुतीनं केलेल्या शेवया गेल्या आणि ‘टू मिनिट नुडल्स’ आल्या. दिवाळी दस-याला घर माणसांनी भरायचं. आता प्रत्येकाला नियतीने वेगवेगळ्या खुंटीवर टांगून टाकलं.  पैसा खूप आला, पण सुख समाधान मात्र हरवलं. जाहिरातींनी माणसं हावरट बनवली. शोभेच्या वस्तू… सामानाने घरं भरली..पण कोठीची खोली रिकामी झाली. स्पर्धा, अहंकार ह्यांनी माणुसकी.. जगण्यातला आनंद हिरावून घेतला. चंद्राला भाऊ मानणा-या बायका आणि चंद्राला मामा म्हणणारी पोरं हळू हळू नामशेष झाली. त्याच चंद्रावर आता प्लॉट्सची विक्रीपण सुरू झाली. काळाने सगळ्यांमधली हळवी नाती पुसून टाकली. आणि निव्वळ चौकस चिकित्सक पिढी जन्माला आली. मार्कांच्या शर्यतीत माहितीचा पूर आला.. ज्ञान मात्र कुठे तरी तोंड लपवून बसलं. पैसे कमवायला शिकवणारे कारखाने उभे राहिले,  पण जगणं शिकवणारं कोणी राहिलं नाही..  

यंत्रयुगाने माणसाचा वेळ वाचेल अशी यंत्रे तर दिली,  पण जगण्यातली फुरसतच हरवून गेली——

——–अशा वेळी आपसूकच मनात येतं—- “ दिल ढुंढता.. है.. फिर वही… फुरसतके रातदिन…”

—–ज्या कुणी लिहिलंय –फार सुंदर व वास्तव आहे 

 

संग्राहक – श्री सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गणेशोत्सव काल -आज -उद्या .. ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

? विविधा ?

☆ गणेशोत्सव काल -आज -उद्या .. ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सर्वांच्या जिव्हाळ्याचा, आनंदाचा, उत्साहाचा सण म्हणजे गणेशोत्सव ! तो कधीपासून सुरु झाला याची नोंद इतिहासात असणार, पण गणपती मळाचा की चिखलाचा ? आख्यायिकाही वेगवेगळ्या आहेत.कुणी पुराणात जाऊन पाहिलंय ? नाही, तेही कल्पनेनेच लिहिले त्यामागे तत्कालीन परिस्थिती, भौगोलिक, आर्थिक सामाजिक,  वैज्ञानिक ही असेल कदाचीत पण ते प्रमाण मानत आपण पाळत आलो.त्या काळी काळाशी ते सुसंगत असेल ही ! 

ब्रिटिशांविरुद्ध समाजात एकी निर्माण करण्यासाठी लो.टिळकांनी घरातला गणपती चौकात ठेवला की जेणेकरून लोक एकत्र येतील मग त्यांना समजावणे, सांगणे सोपे जाईल.  मग त्याला सार्वजनिक रूप आले.टिळकांचा मूळ उद्देश जनजागृती व लोकांना एकत्र येणे हे सफल झाले असतीलच, पण पुढे ही प्रथा तशीच राहिली अन मंडळे वेगवेगळ्या कल्पना लढवून कल्पकता अन सामाजिक प्रबोधन करू लागली.मनोरंजनाच्या विविधरंगी कार्यक्रमानी उत्सव बहरू आणि भारु लागले.एक चैतन्य संचारले. या उत्सवात नियमितच्या रुटीनमधून लोकांचे मनोरंजन होऊ लागले, विरंगुळा मिळू लागला.लोक शिकले, शिक्षित झाले उत्सवात बदल झाले.लोकसंख्या वाढली, आता खरे तर काळानुसार बदल व्हायला हवे होते पण उलटेच घडले.

भरमसाठ मंडळे, एकमेकांवर ईर्षा, भांडणे करू लागली.  जबरदस्तीच्या देणग्या, उंचच उंच मुर्त्या, डॉल्बी, बीभत्स गाणी यांनी उत्सवाचे सात्विक रूप जाऊन हिडीस रूप आले.प्रसादाच्या नावाखाली जेवणावेळी, अन अन्नाचा अपव्यय होऊ लागला.रस्त्यावरची गर्दी, डॉल्बीचे शरीरावरील घातक परिणाम, पाणी प्रदूषण, ट्रॅफिक जॅम अन सामाजिक वातावरण गढूळ केलंय या सार्वजनिक उत्सवाने !म्हणजे आचार विचारात काळानुसार बदल होऊन सुसंस्कृतपणा यायच्या ऐवजी त्याची दिशा भरकटली अन दशा दशा झाली की हे आवरायला गणेशालाच बोलवावे वाटतेय.

सामाजिक वातावरण,  पर्यावरण यांचा विचार आम्ही करत नसू तर मग कायदाच का करत नाहीत?’एक छोटे गाव एक गणपती’, मोठे शहर एक गल्ली एक गणपती ?’ मोठ्या मूर्ती बनवणे कायद्याने बंद का केले जात नाही ? पर्यावरण पुरकच मूर्ती तयार करा म्हणून कायदा का होत नाही ? घरगुती, सार्वजनिक मूर्तींना ठराविक उंचीचे प्रमाण का दिले जात नाही ?कारण या सर्वांना खतपाणी घालायला राजकारणी मंडळी कारणीभूत आहेत.उत्सव जवळ येताच मंडळांना शर्ट, भरमसाठ देणगी दिली जाते अन ऐतखाऊ, चंगळवादी पिढ्याना सवय झालीय की उत्सव आला की राजकारण्यांकडे भीक मागून जगायचे.टोकाच्या अस्मिता अन श्रद्धाही ! सामाजिक जागृती अशा विचित्र, ओंगळ वळणावर आलीय, करोडो रु चा चुरा पाच ते सात दिवसात होतोय.अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच मंडळे सामाजिक बांधिलकी, सलोखा अन विधायक उपक्रम राबवतात, बाकी सर्व तेच ते जेवणावेळी, रोषणाई अन डॉल्बी !

खरे तर भारत हा कृषिप्रधान देश आहे अन म्हणून सर्व सण उत्सव हे शेतकरी जीवनाशी निगडित होते.देवाचा प्रसाद अन फुले फळे ही त्या त्या ऋतूनुसार ! चिखलाचे देव पाण्यात विसर्जित करायचे म्हणजे पुन्हा ते निसर्गात मिसळावेत जसे मनुष्य जन्मास येतो अन शेवटी मातीत मिसळून एकरूप होतो ! तसेच या देवांच्या मूर्तीचे देखील ! बघा, नागोबा, बैल, मातीचेच अन गणपती ही मातीचाच ! बारा बलुतेदारांना वेगवेगळ्या सणाला महत्त्व होते अन त्यांचा चरितार्थ यातून होत असे म्हणून हे सण अन औपचारिक गोष्टींचे चक्र त्या गावगाड्याच्या गरजेनुसार फिरत असे ! आता ते सर्व सम्पले, शेती सम्पली, कृषिप्रधान देश व्यापार प्रधान अन नोकरीप्रधान झाला अन सगळे सण व्यापारी गणिते करू लागले ! शेतातून, परसातून फुले, पत्री, दुर्वा न मिळता थेट बाजारातून मिळू लागली. पाना फुलांचा, फांद्यांचा बाजार बसू लागला अन कसल्याही परस्थितीत ते केलेच पाहिजे ही मानसिकता वाढली.

अमुक सण अमुक स्पेसॅलिटी याचे स्तोम वाढले शेतात पिकापेक्षा तणकट फोपावल्यासारखे !

मला आठवतो माझ्या बालपणीचा गणेशोत्सव ! श्रावणातल्या झडीने अन भादव्याच्या उन्हाने पिकं तरारून यायची. सोबत गवत तणही फोपवायचे पिकांशी स्पर्धा करत, रस्त्याच्या दुतर्फा तरवड, गवतफुल फुललेली असायची.परसदारी विविधरंगी गौरी फुलायच्या   रंगीबेरंगी फुलपाखरे सगळीकडे आनंदाने भिरभरायची.ज्वारी, मका कम्बरेला लागलेली असायची. मूग, काळा श्रावण, चवळीच्या शेंगा अंगणात ऊन खात पडायच्या.मुगातल्या लाल अळ्या अन  चवळीच्या पांढऱ्या अळ्या शेंगेतून बाहेर पडून वाट दिसेल तिकडं धावायच्या. उन्हात टरफल फुटून शेंगा चट चट आवाज करत फुटायच्या अन कडधान्य बाजूला पडायची. चिमण्या दिवसभर या आळ्या गट्टम करण्यात व्यस्त अन शेतकरीन धान्याची उगा निगा करण्यात ! इकडे शेतीच्या पिकांची लगबग अन सण चौकटीत ! पटपट ही काम आवरून सणाच्या तयारीला लागायची ! घराघरात देवळीला सोनेरी बेगड लावून मखर करून गणपती विराजमान व्हायचा क्वचितच तो टेबल किंवा तत्सम वस्तूवर स्थानापन्न व्हायचा.शेतात दुर्वा दव बिंदूंचे मुकुट परिधान करून पावसाची नव्हाळी लेऊन हिरव्या कंच लुसलुशीत पेहरावात मुबलकपणे हवेवर डुलायच्या.आघाडा रस्त्याच्या कडेला कुंपणात आपली डोकी उंचावत अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडायचा ! उदबत्ती, निरांजन,  कागदाच्या झुरमुळ्या, दरवर्षी याच सणाला राखून ठेवलेले नवीन रंगीबेरंगी कापड टेबल वर बस्स इतकीच घरगुती गणपतीची आरास ! फार फार तर कागदाची  एखादी प्रभावळ ! पेढे, पेरू, केळ, चुरमुरे बत्तासे, शिरा, मोदक प्रसाद इतकाच माफक !

सार्वजनिक मंडळ गल्लीत एकच साधी मूर्ती, छोटासा मंडप, विद्युत रोषणाई स्टेरीओवर तेव्हढाच गल्लीपुरता गाण्यांचा आवाज घुमायचा अन मनात आनंदी आनंद भरायचा. आमची गल्ली गावाच्या एका टोकाला, खूप मोठी ! जणू छोटेसे एक गावच ! गल्लीतल्याच नाटक कंपनीचं एखादं नाटक किंवा विविध गुण दर्शन बस इतकेच मनोरंजन ! गावात वेगवेगळ्या पेठांचे वैशिष्ट्य पूर्ण आरास, देखावे कधी जिवंत देखावे अन तीच स्टेरिओवरील गाणी त्या त्या काळातील मराठी हिंदी चित्रपटातील ! वातावरण आनंदान भरून  जायचं ! वेगळं काही वाटत नव्हतं किंवा देव आणि गाणी यांचा काही संबंध असावा हे ध्यानी येत नव्हतं ! कुठेही धावपळ, ताण किंवा बोजा नसायचा.पाच दिवस घरोघरी विराजमान होऊन पुरणपोळी खाऊन,  सार्वजनिक गणपती शिरा खाऊन त्यांच्या गावी जायचे मन हुरहूरते ठेऊन अन शेतकरी पुढील शेताच्या कामाच्या लगबगीत !

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मलंग…. – श्री विलास चारठाणकर ☆ संग्रहिका – प्रस्तुति – कालिंदी नवाथे

? वाचताना वेचलेले ?

☆ मलंग…. – श्री विलास चारठाणकर ☆ संग्रहिका – प्रस्तुति – कालिंदी नवाथे ☆ 

मलंग म्हणजे मुसलमान फकीर नव्हे:-

भगवान दत्तात्रेयांनी अनेकांना मलंग रूपात दर्शन दिल्याचे उल्लेख वाचनात येतात व लोक चक्क मलंगचा अर्थ मुसलमान फकीर असाच सारख्या वेशामुळे गृहीत धरतात.

नागपूर विद्यापीठातील थोर संशोधक डॉ.म.रा.जोशी यांनी “मलंग” शब्दावर प्रचंड संशोधन करून सर्व इस्लामी देश व भाषातून हा शब्द व त्याचा अर्थ शोधला पण हा शब्द अथवा ही संकल्पना कोणत्याही इस्लामी देश अथवा भाषेत आढळून आली नाही. अधिक संशोधनात केवळ काश्मिरी भाषेत व त्यांच्या तरल लोकात हा शब्द प्रचलित असून त्याचा अर्थ मुसलमान फकीर नसून हिंदू योगी असा आहे.

या शब्दाची व्युत्पत्ती मल्ल+अंग=मलंग अशी आहे.  बर्फाच्छादित प्रदेशात योग साधना करणारे योगी सतत आपले  शेजारी धुनी पेटवून त्यातील  भस्म(राख)आपल्या अंगावर(मल्ल) लावीत असतात व थंडी पासून शरीराचे रक्षण करीत योग साधना करतात.  ही धुनी नीट करण्यासाठी लांब चिमटा व फळे गोळा करण्यासाठी व पाणी पिण्यासाठी कठिण कवचाच्या फळाचाच बनविलेला कटोरा वापरतात व काश्मिरी लोकांसारखा(फकीरसदृष) वेष करतात त्यामुळे लोक मलंग म्हणजे फकीर असाच अर्थ समजतात.

डॉ.म.रा.जोशी यांनी अनेक पुराव्यांनी हे सिद्ध केले आहे.

श्री विलास चारठाणकर, इंदौर.

प्रस्तुति –  कालिंदी नवाथे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उसळ आणि उसळी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

 

? विविधा ?

?  उसळ आणि उसळी !  ?  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

काल सेन्सेक्सने उसळी घेऊन आठ्ठावन्न हजाराचा टप्पा पार केल्यावर, एक सामान्य माणूस म्हणून, मी माझी प्रतिक्रिया नोंदवू इच्छितो, जी प्रत्येकाने आपापल्या जोखमीवर वाचावी, ही नम्र विनंती !

ही जी काय उसळ अठ्ठावन्न हजाराच्या तापमानला आज उसळी घेऊन रटरटते आहे, तिचा खरा बॉयलिंग पॉईंट काय असेल, असावा हे भले भले स्वतः अर्थशास्त्र कोळून प्यायलेले अभ्यासक सुद्धा आज पर्यंत सांगू शकले नाहीत, तिथे तुमच्या, माझ्या सारख्या सामान्य लोकांचा काय पाडाव लागणार ? कारण ही जी उसळ ज्या जी जी भाय टॉवर नावाच्या भांड्यात शिजायला ठेवली आहे, त्या भांड्या खालचा गॅस कोणता अदृश्य हात, स्वतःच्या मर्जीनुसार कमी जास्त करतो ते कळतच नाही ! त्यामुळे होतं काय, या उसळीचा स्वाद घ्यायला येणारे नवीन नवीन खवय्ये, ती थोडीशी चाखून सुद्धा, स्वतः गॅसवर गेल्याची अनेक उदाहरणं आपण सगळ्यांनी पहिली आहेत !

फार पूर्वी, शेअर मार्केटरुपी सट्ट्याच्या मुदपाकखान्याच्या वाटेला जाणे हे सामान्य मराठी मध्यमवर्गात  निशिद्ध मानलं जात होतं !

माझ्या माहितीतले असेच अनेक मराठी मध्यमवर्गीय जे पूर्वी “कोटात” कामाला जायचे, ते या मुदपाखान्याची पायरीच काय, त्याच्या फुटपाथवरून (तेव्हा ते खरंच होते हो) सुद्धा जात नसत ! उगाच आत शिजणाऱ्या उसळीचा गंध नाकात जाऊन ती उसळ खायची दुर्बुद्धी व्हायला नको !  ही मंडळी तेंव्हा, आपल्या महिन्याच्या पगारात टुकीने संसार करून, त्यातून थोडे फार पैसे वर्षं भरात वाचलेच तर बँकेत किंवा पोस्टात FD रुपी खात्रीशीर “जनता थाळी” घेण्यात धन्यता मानत असतं ! असो ! जशी दृष्टी तसा कोन आणि तसे त्याचे फळ !

मला विचाराल तर माझ्या मते, ही जी जी भायच्या भांड्यात सतत शिजणारी, रटरटणारी उसळ म्हणजे एक अगम्य साईड डिश आहे ! ही  उसळ काहींना कधीतरी चविष्ट लागते तर काहींची जीभ (आणि पर्यायाने खिसा) कधीतरी त्यातील तिखटामुळे पोळते ! त्यामुळे या जी जी भायच्या टॉवरमधे जाऊन त्या उसळीचा स्वाद घ्यायचा, का खात्रीशीर “जनता थाळी” घ्यायची हे ज्याचे त्याने ठरवलेले बरे !

सुज्ञास अधिक काय सांगणे ?

© श्री प्रमोद वामन वर्तक

०४-०९-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आरसा… ☆ श्री मनोज कुरंभटी

? विविधा ?

☆ आरसा… ☆ श्री मनोज कुरंभटी ☆

मनुष्य प्राणी जन्माला आल्यापासून तो ज्या काही वस्तूंच्या संपर्कात येतो आणि जी वस्तू परिचयाची होते, त्यातली महत्वाची वस्तू म्हणजे आरसा.

मुलं रडायला लागलं की त्याला नादी लावण्यासाठी त्याला आरसा दाखवतात , त्यावेळी स्वतःचे प्रतिबिंब कुतूहलाने पाहत असताना त्याचे रडणे  थांबते, ही आरश्याची जणू पहिली ओळख. प्रथम ते लहान मुलं ते प्रतिबिंब बघून घाबरले असेल पण नंतर त्या प्रतिबिंबाला बघून खुदकन हसते. त्यानंतर जणू आरसा त्याच्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य घटक बनून जातो.

स्वतःचे प्रतिबिंब न्याहाळताना माणूस त्या प्रतिबिंबित व्यक्तिमत्वाशी इतका समरस होऊन जातो की दिवसभरात किती वेळा माणूस त्याचे प्रतिबिंब न्याहाळत असेल सांगता येत नाही.

आरश्यासारखी प्रामाणिक वस्तू नसेल, जे आहे ते स्पष्टपणे दाखवतो. आरश्यात सौंदर्य जसे खुलून दिसते तसे व्यक्तीमत्वामधील दोषही, आहे तसेच दाखवले जातात. चेहऱ्यामधील सौंदर्याची तफावत अथवा कमतरता पण स्पष्ट केली जाते. घरामधील महत्वाची  वस्तू आणि अविभाज्य घटक म्हणून आरश्याचे स्थान आहे.

माणसाच्या उत्क्रांतीत आरश्याचे स्थान कधी आले असेल?असे म्हणतात, ‘माणूस तळ्याच्याकाठी पाणी पिण्यासाठी वाकला होता त्यावेळी संथ पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब त्याला दिसले. त्या वेळेपासून त्याला कुतूहल निर्माण झाले आणि स्वतःचे प्रतिबिंब बघावे ह्या निकडीतून आरशाचा शोध लागला असावा.

काचेच्यामागे मुलामा चढविल्यानंतर जो चकचकीतपणा आला, त्यात बघणाऱ्या व्यक्तीचे प्रतिबिंब दिसले, ते बघून आरश्याची निर्मिती झाली असावी. ज्या माणसाने आरश्याचा शोध लावला, तोही स्वतःचे प्रतिबिंब बघून खुदकन हसला असेल .असा हा आरसा लहान बाळापासून अगदी आजी आजोबांपर्यंत सगळ्यांचा लाडका झाला.

बालपणात तसे आरश्याकडे दुर्लक्ष होत असेल पण वयात येताना तो एकदम जवळचा वाटू लागतो. किशोर वय असो वा तारुण्याचा काळ आरश्यात स्वतःचे प्रतिबिंब न्याहाळत केश रचना करणे, पेहेराव करणे, आरश्यात स्वतःला न्याहाळत स्वतःचे व्यक्तिमत्व कसे खुलले हे बघत राहणे, अश्या गोष्टी जणू अंगवळणी पडतात. त्यात तरुणींचा तारुण्यकाळातील खुपसा वेळ आरश्यापुढेच जात असेल.

‘दर्पण झूठ न बोले’ ह्या उक्तीप्रमाणे, जसे आहे तसे प्रतिबिंब आरसा दाखवत असतो. त्यामुळे एखादी सौंदर्यवती आरश्यापुढे स्वतःच्या सौंदर्याने मोहून जाते तर साधारण चेहऱ्याची व्यक्ती आरश्याकडे पाहत स्वतःचे सौंदर्य अधिकाधिक खुलवण्याचा विचार करत असते. आरश्यात दिसणाऱ्या प्रतिमेने माणसं आनंदतात तसेच चेहऱ्यावरील डाग बघून अस्वस्थही होतात. वाढत्या वयाच्या खुणा दर्शविणाऱ्या सुरकुत्या आणि पांढरे केस बघून मन चिंतीत होते. मग त्यावर तरुण दिसण्याचे उपायही आरश्यात पाहूनच केले जातात, जणू वृद्धत्वाच्या पाऊलखुणा पुसून टाकण्याची एक धडपड. त्याच आरशाच्या साह्याने सौंदर्य खुलवत ठेवण्याचा प्रयत्न सुरू असताना  वाढत्या वयासोबत होणारा शारीरिक बदल स्वीकारण्याची मानसिकता मात्र वाढीस लागत नाही.  आरश्यात चेहऱ्याचे वास्तव दर्शन होत असताना ते टाळणे असंभव पण तरीही स्वतःच्या व्यक्तिमत्वावर अफाट प्रेम करण्याची सवय आरश्यामुळेच लागते.

खरं तर सुंदर चेहरा अथवा सौंदर्य दाखवणे हाच आरश्याचा उपयोग नाही. आहे ते आहे तसे प्रतिबिंबित करणे हे आरश्याचे प्रामाणिक कर्तव्य. जेव्हा आहे तसे स्वीकारण्याची सवय लागते अथवा प्राप्त परिस्थितीचा स्विकार केला जातो त्यावेळी असलेले प्रतिबिंब अथवा प्रतिमा आपलीशी वाटू लागते.

आरसा हा व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब दाखवत असताना, त्या प्रतिमेकडे पाहत आपण स्वतःवर खुश होत असतो. काही वेळा आरश्यापुढे पाहत स्वतःमधील आत्मविश्वास जागृत करता येतो. Self Talk हा मानसशास्त्रातील महत्वाचा घटक आहे, ज्या योगे माणूस स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो. काही वक्ते त्यांच्या उमेदीच्या काळात आरश्यापुढे उभे राहून भाषणाचा सराव करत. आजही प्रेसेंटशन स्किल सुधारण्यासाठी आरश्याचा वापर करतात.

‘आरसा हा सर्वोत्तम मित्र आहे, कारण आपण जेव्हा दुःखी असतो त्यावेळी तो कधीच हसत नाही.’

कधीकधी हाच आरसा जणू तुमची साथ सोबत करत असतो. विचार करा, घरात एकटेच असाल आणि एकटेपण जाणवत असेल अश्यावेळी नकळत आपण आरश्यापुढे उभे राहतो.

कवि गुलजार म्हणतात,

“आईंना देख कर तसल्ली हुई।

हमको इस घर में जानता है कोई।।”

आरसा भलेही  माणसाचे बाह्य सौंदर्य प्रतिबिंबित करत त्याला खुश करत असेल पण सौंदर्य काय फक्त तेवढेच आहे? शारीरिक सौंदर्याइतकेच मनाचे सौंदर्य महत्वाचे. चांगला स्वभाव, आनंदी स्वभाव, नितळ, निर्व्याज आणि संवेदनशील मन ह्या बाह्य सौंदर्याप्रमाणे महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आरश्यात प्रतिबिंबित होत नाहीत पण त्या मानसिक सौंदर्यामुळे जाणवणारा आत्मविश्वास चेहऱ्यावर दिसतो आणि तो प्रतिमेत परिवर्तित होतोच.

समोरची जिव्हाळ्याची आणि प्रिय व्यक्ती,काही वेळेस आरश्याप्रमाणे प्रामाणिकपणे तुमचे गुण आणि दोष न्याहाळत असतात. त्या गुण दोषांचे समर्पक प्रतिबिंब त्याच्या प्रामाणिक मतानुसार परिवर्तित करत असतात. अश्यावेळी ते स्वीकारण्याचा, मनाचा मोठेपणा हवाच.

“आयुष्यात असे लोक जोडा की जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि आरसा बनतील.

आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.”

आपल्या प्रिय व्यक्तीच नाही तर आपल्या सभोवतालचे लोकही जणू आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असू शकतात. ही सभोवतालची माणसं काही फक्त बाह्य व्यक्तिमत्वाने प्रभावित होत नाहीत तर तुमचा चांगुल स्वभाव, तुमचे वागणे, बोलणे, बोलण्यातील मार्दवता, प्रेमळ भाष्य आणि निष्पाप मन ह्या अंतर्गुणांनी प्रभावित होत असतात आणि त्यांचा प्रतिसाद त्यांच्या  वागणुकीतून दिसत असतो. जणू आपल्या वागण्याचे प्रतिबिंब समोरच्या माणसाच्या वागणुकीतून व्यक्त होत असते.

जे. कृष्णमूर्ती समर्पक शब्दात म्हणतात,

 “समोरची व्यक्ती हा जणू तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा होय, तुमचे प्रतिबिंब त्यात दिसत असते.”

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं।पूर्णात्पूर्णमुदच्यते।।

 पूर्णस्य पूर्णमादाय। पूर्णमेवावशिष्यते।।

ह्या उपनिशदातील उक्तीप्रमाणे थोडा वेगळा विचार केला तर,

“पूर्ण आकार धारण करून,

पूर्ण आकारात राहून,

पूर्ण आकाराला स्पर्श न करणे,”

ही किमया असणारा हा ‘आरसा’.

© श्री मनोज कुरुंभटी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दृष्टीकोन… ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? जीवनरंग ?

☆ दृष्टिकोन… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

” चौकट आपल्या विचारांची “

प्रत्येक गोष्टीला अनेक अर्थ असती

जैसी ज्याची दृष्टी तैसे त्यास भावती |

एकच गोष्ट प्रत्येकाला वेगवेगळी वाटते. एका अंगणात एक मोठी छान रांगोळी काढलेली असते. काही जण ती बघतात.एकाला त्याचा आकार आवडतो, एकाला ती सुबक वाटते,एकाला रंगसंगती आवडते, एक म्हणतो ‘रेघ खूप छान बारीक काढली’,  तर दुसरा म्हणतो मध्य थोडा बाजूला गेल्याने बेडौल झाली,एकाला लहान वाटते तर दुसऱ्याला मोठी वाटते. प्रत्येक जण वेगवेगळ्या जागेवरून बघतो, प्रत्येकाची आवड वेगळी, त्यामुळे एकाच रांगोळीवर वेगवेगळे अभिप्राय येतात. सात आंधळे आणि हत्तीची गोष्ट तर सर्वश्रुतच आहे.

हा अनुभव नेहमीच प्रत्ययाला येतो. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो आणि मग मतमतांतरे होतात.प्रत्येकजण आपापल्या जागी ठाम असतो आणि काही अंशी बरोबरही असतो. अशावेळी नुसता वाद घालत न बसता दुसऱ्याचे विचार, त्याचा दृष्टीकोन समजून घेतला तर आपल्या विचारांना पण वेगळी दिशा मिळू शकते. काही वेळेस आपण कल्पना पण केली नव्हती असा पर्याय मिळू शकतो. यासाठी सर्वात उत्तम उपाय ‘ऐकावे जनाचे अन् करावे मनाचे’. पण आपलेच खरे हा दुराग्रह न करता, आधी जनांचे ऐकावे हे मात्र नक्की. बहुश्रुत असणे हे खूपदा फायद्याचे ठरते.

संसाराच्या एवढ्या मोठ्या वाटचालीनंतर काही गोष्टी मनात पक्क्या रुजल्या आहेत. सुरुवातीला एखादी गोष्ट हवी तशी झाली नाही की त्रास व्हायचा. अनुभवाने बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. काही गोष्टी ह्या आपल्या हातात असतात.काही इतरांच्या हातात असतात तर काही दैवाधिन असतात.आपल्या गोष्टी आपण करू हे ठीक आहे. पण हातात नसलेल्यांचे काय करायचे ? 

मग विचारसरणीच बदलली.आपल्या हातात असणाऱ्या गोष्टी प्रामाणिकपणे करायच्या, इतर गोष्टींमधील जे शक्य आहेत ते प्रयत्न करायचे आणि आपल्या हातात नसलेले सोडून देऊन शांत रहायचे. जे योग्य असते ते अवश्य घडतेच. फक्त यातले आपले प्रयत्न योग्य, प्रामाणिक आणि पुरेसे असायला हवेत.आपल्या हातात नसलेल्या गोष्टींबद्दल त्रागा करून मनस्ताप वाढवायचा नाही. जे ‘आपले ‘आहे ते आपल्याला मिळतेच. मिळणार नाही ते मिळत नाहीच. मात्र खिलाडूपणाने हे वास्तव स्वीकारायचे. या सकारात्मक वृत्तीने आपला आनंद मात्र शाबूत राहतो.

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

सातारा 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शिक्षक दिन विशेष – लुगड्याची गोष्ट …. ☆ श्री रवींद्र देवघरे “शलभ’

☆ शिक्षक दिन विशेष – लुगड्याची गोष्ट …. ….☆  श्री रवींद्र देवघरे “शलभ’ ☆

रात्रीची वेळ.. निरव शांतता .. तेलाच्या दिव्याचा मिण मिणता प्रकाश.

सावित्रीबाई पांघरूण अंगावर घेऊन झोपण्याच्या तयारीत..

ज्योतीराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळा वर हात ठेवतात.

“,सावित्री. !” ज्योतीराव उद्गारले, “अगं, तुझं अंग गरम आहे. ताप येतोय का तुला ? “

“आहो, एवढं काही नाही .थोडी कण-कण आहे, झालं.” ,सावित्रीबाई.

“अग पण ही कण-कण वाढली तर आपल्या शाळेचं कसं होईल? ,

मुलींच्या शिक्षणाच काय होईल?……..

ते काही नाही,उद्याच वैद्यांना बोलावतो,
तू औषध घे म्हणजे लवकर बरी होशील.”‘,–ज्योतीराव.

“आहो, हा ताप औषधाने नाही जायचा.” सावित्रीबाई.

“मग?” ज्योतीरावांचा आश्चर्यचकित प्रश्न.

” तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं देऊ शकलात तर हा ताप आपोआप जाईल.” सावित्रीबाई…..

ज्योतीराव काहीशा नाराजीने दुस-या कुशीवर वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागले.

त्यांचे विचारचक्र सुरु झाले.
लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री नक्कीच नाही………..

मग सावित्री असे का बरं बोलली?……….

तिच्याकडे एक लुगडं असताना ती दुसरं लुगडं का मागते?………..

आपल्याकडे जे पैसे आहेत ते शिक्षण कार्या करता आहेत ….

बायकोच्या लुगड्या करिता नव्हे …………

पण सावित्री शाळेत जाण्याकरिता लुगडं मागतेय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार………..

विचार करीत-करीत ज्योतीराव झोपून गेले.

दुस-याच दिवशी ज्योतीरावांनी सावित्रीबाई्च्या हातावर नवे लुगडे ठेवले.

बाईंच्या डोळ्यात पाणी आलं………..

लुगड्यासाठी खर्च करायला ज्योतीरावांना खूप त्रास झाला असणार,

कारण त्यांच्या जवळ जे पैसे आहेत ते शिक्षण कार्याकरिता……

सावित्रीबाई पक्के जाणून होत्या.
त्या नंतर बाईंना कधी ताप नाही आला.

ज्योतीरावांना आश्चर्य वाटले, “हे कसं काय.”………

लुगड्या साठी ताप घेणारी सावित्री नाहीच…………

ज्योतीरावांनी सावित्रीबाईंचे शाळेतील सहाय्यक होते, त्यांची भेट घेतली. आणि त्यांना सविस्तर प्रसंग सांगितला.

त्यांनी उलगडा केला,”सावित्रीबाई शाळेत येतांना लोक अंगावर शेण चिखलाचा मारा करतात.

बाई शाळेत आल्यावर अंगावरील लुगड्यावरचे शेण चिखलाचे डाग धुऊन ओल्या लुगड्याने दिवसभर शाळेत शिकवितात.

त्या मुळे रात्री त्यांना ताप येत असेल.

परंतु आता तुम्ही त्यांना दुसरं लुगडं दिल्या पासून शाळेत आल्यावर लुगडं बदलून माखलेलं लुगडं धुऊन ठेऊन कोरड्या लुगड्याने शाळेत शिकवितात .

त्या मुळे आत्ता त्यांना ताप येत नसेल.”

आत्ता ज्योतीरावांच्या डोळ्यात पाणी आलं..

सावित्रीबाईंच्या महानतेस ज्योतीरावांनी मनोमन प्रणाम केला…!!

आपणही त्या दोन्ही महान विभूतींस प्रणाम करू या…

कारण त्यांच्यामुळेच् आजच्या स्त्रीयां ज्या कुठल्यही जातीच्या असो की धर्माच्या शिकु शकल्या ..!!

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

© श्री रवीन्द्र देवघरे “शलभ’

नागपूर.

मो  9561117803.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पावसाची रुपं… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

 

? विविधा ?

☆ पावसाची रुपं… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

पावसाची रुपं

                   “येरे येरे पावसा

                    तुला देतो पैसा

                  पैसा झाला खोटा

                  पाऊस आला मोठा “

पैसा घे पण ये बाबा!पैसा खोटा निघाला तरी चालेल पण तू येच.” असं खरच म्हणावं अशी दडी तू मारतोस तर कधी “थांब थांब,थोडी उसंत घे रे.” असाही बरसतोस.

शब्द म्हणजे काय; त्यांचा अर्थ काय हे कळण्याआधीच तू माझ्या मनात बरसू लागलास. आई -आजी बरोबर मी ही टाळ्या वाजवत तुझ्या संगे ताल धरला.माझ्या बोबड्या बोलाने आईचा घट आनंदाने भरुन वाहू लागला. गालावरून हात फिरवत आजीचे हसूही तिच्या कापर्‍या गालांवर पसरले.

थोडी मोठी झाले. पावसाची गाणी,गाण्यातले शब्द, शब्दांची गंमत समजू लागली.

‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?’

मनातला भोलेनाथाला तथास्तु म्हणत हातात हात घालून तू माझ्या बरोबर खेळू लागलास. तुझ्याच साठलेल्या पाण्यात उड्या मारणं, डबक्यात साठलेल्या पाण्यातून मुद्दामच वेगानं सायकल चालवणं हे तूच तर मला शिकवलंस. कागदी नावा पाण्यात सोडून त्या बरोबर काठाकाठानं भिजत वाहतांना तूही माझ्या संगे मस्ती केलीस,हो ना?

टप टप थेंब वाजवत तू आलास की मी पाटी पुस्तक विसरून गारा वेचे,नाचे,खिदळे!! नक्कीच ते भोळे बालरुप तुलाही भावलं  असावं. . . . . तरीही रंगीबेरंगी रेनकोटात मला लपेटून बोट धरून तू मला शाळेतही नेलेस! खोट नको बोलू!नवीन पुस्तकांचा वास तुलादेखीलआवडत असे.

         ‘पाऊस वाजे धडाडधूम

         धावा धावा ठोका धूम

         धावता धावता गाठले घर

        पड रे पावसा दिवसभर ‘

बालबोलीतले हे कौतुक तुला देखील ऐकावेसे वाटे,काय ओळखलं ना बरोबर ?

बडबड गीतांचे अवखळ वय हळू हळू सरले. तुझे संगीत मनात गुंजी घालू लागले.

      ‘आला पाऊस मातीच्या वासात ग . .  .

पहिल्या पावसाचा मातीचा वास मनाला वेड लावू लागला .पावसात भिजण्यापेक्षा पाऊस अनुभवण्याचा सुज्ञ पणा आला. तू कधी सर सर येतोस, कधी रिमझिम बरसतोस. कधी पाऊलही न वाजवता येतोस तर कधी तांडवनृत्य करतोस . कधी कडकडाटी गर्जन करतोस तर कधी वार्‍याबरोबर सगळ्यांची दाणादाण उडवत येतोस.तुझी रुपे बघण्याचं, स्वत:तच रमण्याचं वय आलं. तू ही बालीश पणा सोडून खट्याळ झालास. आता तू माझी फजिती करु लागलास. कॉलेजला जाताना छत्री सांभाळत,कपडे सावरत,खांद्यावरची कंडक्टर बॅग लटकवत मी चालले की तू फिदीफिदी हसू लागलास. तू मुद्दामच वात्रट वार्‍याला माझी छत्री उलटी करायला सांगायचास. नेमकं सबमिट करायच जरनल तुझ्या मुळे चिखलात पडत असे. पण मी त्या गावचा नाहीच अस दाखवत तू तिथून पळ काढायचास.मी तुझ्या वर तेंव्हा रागावतच असे थोडीशी !

       पण तेव्हढ्यात तू गात आलास . . .

     ‘ऋतु हिरवा, ऋतु बरवा’

माझ्यासाठी इंद्रधनुची कमान उभी करुन आलास. असे वाटले की या कमानीवरुन सहजपणे चढून आकाशातल्या तुझ्या अंगणात पोचेन. खोट नाही . . अगदी खरचं!

निळ्यासावळ्या टेकडीवरून माझ्या चित्तचोरासमवेत हातात हात घालून फिरताना त्या पाचूच्या बनात सप्तरंगी कमान घेऊन भेटलास. पुढील सुखद सहजीवनाची तार कानात झंकारत रिमझिम बरसलास.

. . . . . . . वर्षे सरली. . . बेलबॉटमचे, नेलपेंटचे दिवस गेले,हातात इवलीइवलीशी झबली टोपडी आली, बाळलेणी आली. तू भेटायला यायचास पण बाळाचे वाळत घातलेले कपडे काढण्याची माझी धावपळ! तुझी रुपे निरखण्यापेक्षा बाळलीला जास्त मोहवत होत्या ना! स्वेटर मोजे विणण्याचे दिवस आले व गेलेही. पुन्हा एकदा मुलांच्या बरोबर मी लहान झाले . गारा वेचत व नाव पाण्यात सोडत आई पण विसरून किशोरी झाले .जोरात तुषार शिंपडून हसलास ना खुशीत?

शीळ घालत,सायकल वर स्वार होऊन तू माझ्या मुलांच्या सवे घरात येऊ लागलास. मी हातात टॉवेल तयार ठेवू लागले . पण जुन्या आठवणीने ओठांच्या कोपर्‍यात किंचित आलेले हसू तू अचूक हेरलेस ना?

मोठे डोळे करून मुलांना दटावत असे मी! पण लेक्चर चुकवून मैत्रिणींच्या बरोबर तुझ्या तालात केलेली झिबांड झिम्मड झिम्म्याने मनात फेर धरलाच रे!

आता मात्र तू येतोस सुंठ,आलं,काढ्याचा वास घेऊन ! तुझ्या आगमनाची वर्दी देत मातीचा दरवळ येतो. .  . मी मात्र घरात काढ्याचे साहित्य आहे ना याची खात्री करते. तुला अंगाखांद्यावर घेऊन चिंब भिजावसं वाटतं पण तुझ्या सरींबरोबर मनातल्या मनातच फुगडी घालते.

कानटोपी चढवून, शाल गुंडाळून बाल्कनीतून ,खिडकीतून तुला न्याहळत राहते. थरथणारे हात बाहेर काढून ओंजळीत तुला साठवते.

गारांना घेऊन थाडथाड पावले वाजवत येणार्‍या किंवा सरसर धुंदीत येणार्‍या तुझ्या रुपापेक्षा संथगतीने येणारं तुझं म्हातारं रुपच आपलसं वाटू लागलय हल्ली. . . . .

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

१२/७/२०२०

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares