सौ .कल्पना कुंभार
? विविधा ?
☆ आयुष्याचे धडे गिरवताना…☆ सौ .कल्पना कुंभार ☆
आयुष्याचे धडे गिरवताना…
खरं आयुष्य उमगत गेलं…
– सौ.कल्पना कुंभार..
आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात ज्यामुळे कळत नकळत आपली जीवनाकडे पहाण्याची दृष्टीच बदलून जाते..काही व्यक्ती ,काही प्रसंग ,काही चित्रपट, नाटकं तर काही पुस्तक आपल्याला आयुष्य कसं जगावं ..? याचा धडाच देतात व जगणंच बदलून टाकतात..
एकदा लहानपणी दुसरी तिसरीला असताना मी माझ्या कुटुंबियांसोबत आमच्या गावी गेले होते. तेथे गेल्यावर दुसऱ्याच दिवशी मम्मी पहाटे लवकर उठली व गोठ्यात गेली..मलाही जाग आली होती म्हणून मीही गेले मागून.. तिने गोठा स्वच्छ केला व म्हशीची धारही काढली.. मी सगळं पहात तेथेच बसले होते..मी मम्मीला म्हणाले, ” मम्मी, तुला घाण वाटत नाही का ग गोठ्यात..?मला तर खूप वास येतोय व शेण बघून कसतरीच होतय..आणि तुला दूध काढायला कसं येत ग..?तुला भीती नाही वाटली म्हशींची.??”
मम्मी म्हणाली, ” अग जस आपण आपलं घर स्वच्छ करतो तस हे म्हशीच घरच आहे..आणि तुला एक सांगू ..नेहमी लक्षात ठेव ..माणसानं वाईट काम करताना लाज बाळगावी ..चांगलं काम करताना नाही..मी गोठा स्वच्छ केला कारण ते स्वच्छ राहिले तर जनावरांच आरोग्य चांगलं राहील व आपलंही…”
मी पुन्हा म्हणाले, ” मम्मी , पण तू तर खूप शिकलेस ..शिक्षिका आहेस..मग असलं का काम करायचं..?” मम्मी हसली व म्हणाली , ” बाळ,कोणतंही काम लहान मोठं नसत ग..आणि आपण खूप शिकलो तरी आपल्या काही गरजा भागविण्यासाठी काम करावेच लागते ..आणि कष्टाच काम करण्यात लाज कसली..? ज्या कामामुळे आपले ,आपल्या कुटुंबाचे व समाजाचे नुकसान होईल ते काम करायला लाजावे..”
त्यावेळची ही घटना मला खूप काही शिकवून गेली.. आणि आयुष्यभर लक्षात ही राहिली..कोणतंही काम कमी दर्जाचं नसत..त्यामागचे कष्ट व प्रामाणिक हेतू महत्वाचा..मग अस कष्टाचं काम करायला लाजायच कशाला..??आपण जीवनात कितीही शिकलो..खूप पैसा मिळवला तरी मातीशी पाय घट्ट रोवून उभं रहायचं..हे मी नकळत शिकले..
माझ्या लहानपणापासून च मला माझ्या पणजोबा व पणजी चा सहवास लाभला..त्यांना एकच लेक..ती म्हणजे पप्पांची आई.. त्यामुळे त्यांना संभाळणार कोण..?असा जेंव्हा प्रश्न निर्माण झाला तेंव्हा पप्पा त्याना इचलकरंजी ला घेऊन आले..पणजी मी लहान असतानाच गेली पण माझे पणजोबा..आम्ही बाबा म्हणायचो त्यांना..खूप प्रेमळ पण तेव्हढेच कडक स्वभावाचे..उंच,धिप्पाड शरीरयष्टी.. जणू पैलवानच..सगळेच घाबरायचे त्यांना..सगळं वेळेत लागायचं त्यांना..मम्मी शाळेच्या गडबडीतही खूप छान सांभाळायची त्यांचा स्वभाव..कधीच चिडलेल किंवा आदळआपट केलेलं पाहिलं नाही मी तिला…
एकदा बाबा आजारी होते..उठताही येत नव्हतं..सगळ्या चादरी ही घाण झाल्या होत्या.. त्यांनाच सांगताना लाज वाटत होती . पण माझ्या पप्पानी व मम्मीने कसलीही तक्रार न करता..ते शी व शु च सगळं स्वच्छ तर केलंच..मम्मी ने बाबा ना आंघोळही घातली..बाबांचेच डोळे पाणावलेले मी पाहिले त्यावेळी.. नंतर मी व दादाने त्या दोघांना विचारले, ” तुम्हाला शी काढताना घाण नाही वाटली..?” पप्पा म्हणाले, ” त्यांनी मी लहान असताना माझी पण शी काढलीच होती..त्यांना कधी घाण वाटलं नाही..मग मला कसं वाटेल..आणि माणूस जसजसा म्हातारा होतो ना..तसा तो लहान मुलांप्रमाणे वागायला लागतो..मग आपल्याला मोठं व्हाव लागतं.. कोणीही समोर असू दे..त्याच्या वेळेला पडताना नेहमी मन स्वच्छ ठेवायचं..कशाला घाण नाही म्हणायचं..हेच जगणं आहे बाळांनो…” आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ..पप्पा व मम्मी दोघेही शाळेला गेल्यावर..पप्पांच्या प्रमाणेच माझ्या दादालाही बाबांची शी काढताना पाहिलं..आणि हा प्रसंग मनावर कोरला गेला..दोन वर्षांपूर्वी जेंव्हा माझे सासरे आजारी पडले तेंव्हा मलाही त्यांचं सगळं करताना अजिबात घाण वाटलं नाही..आणि माझ्या बाबांच्या डोळ्यात जस पाणी होतं तसच पाणी मला माझ्या आहोंच्या डोळ्यांत त्यावेळी दिसलं… माझ्या मुलांसाठीही कदाचित आयुष्यातील तो एक धडाच होता…
या lockdown मध्ये जेंव्हा मी आजारी पडले तेंव्हा माझ्या दहावी मध्ये असलेल्या लेकाने कपडे मशीन मध्ये धुऊन उन्हात वाळत घालण्यापासून ते मला ताट वाढून हातात देण्यापर्यंत न लाजता काम केले . मला भावनिक आधारही दिला..तेंव्हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कार कसे पाझरत जातात हे समजलं..या कोरोनाच्या काळातही आजी आजोबांचं ऑक्सिजन रोज जेंव्हा माझी लेक चेक करायची तेंव्हा त्यांच्या डोळ्यांतील अभिमान माझ्याही डोळ्यांत उतरत होता..
आज आयुष्याचा धडा गिरवताना या विषयाबद्दल विचार करताना मला आणखी एक प्रसंग तुम्हा सर्वांना सांगू वाटतो..
मी बीए करत होते..त्या रात्री पप्पाना एकदम अस्वस्थ वाटू लागलं..श्वास घेताना त्रास होऊ लागला..तेंव्हा दादाने त्याना life line ला ऍडमिट केलं..त्यांना हार्ट अटॅक आला होता..कसलंस इंजेक्शन ही दिलं डॉक्टरनी.. दादा त्यावेळी MD करत होता. पप्पाना ICU मध्ये ऍडमिट करून दोनच दिवस झाले होते आणि…मम्मीची आई..माझी आजी हार्ट ऍटॅक ने गेली.. गावाकडून फोन आला रात्री..मला तर काहीच समजेना..काय करावे..दादा दवाखान्यात थांबला होता.. त्याने गाडी ठरवली व मम्मी व तिच्या मैत्रीणीला सोबत म्हणून गावी पाठवलं.. सगळं आवरून मम्मी पहाटे परत आली..आणि माझ्या गळ्यात पडून खूप रडली….सहा वाजले होते..न झोपता आवरून नाश्ता व चहा घेऊन लगेच सात वाजता ती दवाखान्यात पप्पांसमोर हजर होती..जणू काही झालंच नाही..हसत सगळं करत होती..स्वतः च दुःख बाजूला सारून पप्पांच्या विनोदावर तिला हसताना बघून मला मात्र खूप रडू येत होतं..पण कसं काय मलाही माहीत नाही..मीही खंबीर होत गेले.. त्यानंतर पप्पांची बायपास सर्जरी झाली जी खूप क्रिटिकल होती..देवाची कृपाच ती सर्जरी यशस्वी झाली..पण पप्पांची तब्बेत खूपच नाजूक झाली होती.. कोणताही मानसिक ताणतणाव त्यांना द्यायचा नाही असं डॉक्टरनी सांगितलं त्यामुळे पप्पांपासून ही घटना आम्ही एक वर्षभर लपवली.. त्यासाठी किती खोटं बोलावं लागलं..हे सांगताच येणार नाही मला.. घराच गेट वाजलं की बाहेर पळत जायचं..येणाऱ्या व्यक्तीला आजींचा विषय काढू नका असं तिथेच सांगून घरात घायच असं मी जवळजवळ वर्षभर केलं..या घटनेने मला शिकवलं ..आपलं दुःख कितीही मोठं असलं तरी एखादयाच्या जिवापेक्षा मोठं काहीच नाही…..
खरच असे कितीतरी प्रसंग , व्यक्ती किंवा क्षण आपल्या आयुष्यात हे येतच असतात..पण त्यातून नेमकं काय वेचायच हे ज्याचं त्यानं ठरवायचं..पण हेही तितकंच खरं त्या घटना चांगल्या असो किंवा वाईट ..शिकवून जातात बरच काही..आणि आयुष्याच्या पुस्तकातील एक धडा बनून नेंहमीच मार्गदर्शन करत रहातात …आपलं कुटुंब हे एका स्वच्छ, नितळ, गोड पाण्याच्या झऱ्यासारखं आहे..झरा जसा पुढे पुढे जाताना ही आपली खरी चव सोडत नाही..तसच आपलं आयुष्य ही असच वाहत असत..त्यामध्ये कुठेही वाईट विचार मिसळले जाणार नाहीत यासाठी पालकांनी सजग ..जागरूक रहाणं महत्वाचं..कुटुंबात रुजलेले संस्कार हे समाजासाठी नक्कीच उपयोगी पडतात..कळत नकळत आपण इतरांना जपू लागतो.. त्यांना मदत करू लागतो..पण हे तेंव्हाच होतं जेंव्हा एखादं कुटुंब संस्काराच्या भरभक्कम पायावर उभं असत..
कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी म्हटलच आहे….
सांगा कसं जगायचं..??
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा…
दुवा देत हसायचं की शिव्या देत रडायचं
तुम्हीच ठरवा..कसं जगायचं..??
पेला अर्धा भरला आहे असं देखील म्हणता येत..
पेला अर्धा सरला आहे असं देखील म्हणता येत
मग भरला आहे म्हणायचं
की सरला आहे म्हणायचं..
तुम्हीच ठरवा..
सांगा कसं जगायचं..??
© सौ .कल्पना कुंभार
इचलकरंजी
मोबाईल नंबर:: 9822038378
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈