मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पोटीस…  लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? इंद्रधनुष्य ?

☆ पोटीस…  लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

 

मनाच्या पेटा-यात कुठली आठवण कोणत्या व्यक्तीला किंवा वस्तूला बिलगून बसलेली असते, ते सांगता येत नाही.. परवा फेसबुकवरच्या एका खाद्यसमूहावर एक फोटो अचानक पहाण्यात आला.. लांब दांड्याच्या लोखंडी काळ्याभोर पळीचा तो फोटो पाहून अंगावर सर्रकन् काटा आला.. नि ती पळी आठवणींचं बोट धरून थेट लहानपणात घेऊन गेली..

आमचं बालपण अगदी साधसुधं.. मोकळंढाकळं, अवखळ, खोडकर नि गरीबडं. आजच्यासारखा ना तेंव्हा टीव्ही होता, ना मोबाईल ना व्हिडिओ गेम्स.. शाळेतले काही तास नि घरातला जेवणा-अभ्यासाचा वेळ सोडला तर इतर वेळी नुसता धांगडधिंगा, खेळ नि हुंदडणं.. साहजिकच पडणं.. झडणं..

बोटाची ठेच, गुडघ्यावरचं खरचटणं, जखम.. कधीतरी डोक्याची खोकसुद्धा.. बटाटा सोलावा तसं सोलवटलेलं कातडं, त्यातून डोकावणारं लाल-गुलाबी मांस, भसकन् बाहेर पडलेल्या रक्ताच्या काळ्याभोर गुठळ्या… नि यांना बिलगून बसलेली अंगणातली नाहीतर मैदानातली माती.. रक्ता-मासाच्या ओढीनं घोंगावणा-या चार-दोन माशा नाहीतर चिलटांचा ढग.. नि थेट मस्तकापर्यंत पोहोचणारं ते चरचरणं.. !!

पण यातलं काहीही खेळापासून जरासुद्धा ढळू न देणारं.. पडल्यावर “टाईमप्लीज” म्हणत तळव्याच्या मागच्या बाजूच्या अगदी मध्यावर थुंकी लावणं, दोन-चार मिनिटं डोळे मिटून वेदनेचा अंदाज घेणं नि वीज चमकावी तसं झटक्यात उठून जखमेवर हातानं झटकणं नि पुन्हा खेळात सामील होऊन “घेतला वसा न सोडणं !” 

घरात डझनावर असणारी पोरबाळं नि रोजच्या होणा-या जखमा.. कधी चप्पल चावून होणारे फोड, उन्हाळ्यात हावरटपणानं रिचवलेल्या आंब्यानं होणारी गळवं, हाता-पायांवर होणारी केस्तुटं.. आई -बाप कुणाकडं नि कशा कशाकडं पहाणार ? म्हणतात नां.. “रोज मरे त्याला कोण रडे ?”

“पोरं म्हटल्यावर पडायचीच.. जखमा व्हायच्याच.. “, “पडे झडे माल वाढे” असल्या रांगड्या विचारसरणीचे ते दिवस नि आमचे माय-बाप होते.. “जा ती जखम पाण्यानं धू” म्हणत पाठीत एक धपाटा पडायचा.. फार तर जखमेवर हळदीची पूड नाहीतर तत्क्षणी होळी साजरी करायला लावणारं “आयोडीन” नावाचं क्रूर नि जहाल जांभळं द्रावणं ओतलं जायचं.. !!

धूळ, रक्ताच्या गुठळ्या, माती, माशा, चिलटं… यातल्या कशालाही न जुमानता एके दिवशी ती जखम खपलीनामक काळ्या कवचाखाली दिसेनाशी व्हायची नि त्या जखमनामक विषयाची इतिश्री व्हायची…

“बाळा, खूप लागलय कारे ? हॅंडिप्लास्ट लावूया हं.. डॉक्टरकाकांकडं जाऊ या का ? आता स्ट्रिक्ट रेस्ट घ्यायची बरं का ! फार तर झोपून मोबाईलवर गेम खेळ.. ” अशी आजच्या मुलांसारखी कौतुकं वाट्याला येणं आमच्या कमनशिबात नव्हतंच !!

जखमेपासून खपलीपर्यंतचा प्रवास मुकेपणानं पार पडायचा.. बारकसं गळू थोडसं मोठं होऊन कधी फुटलं ते कळायचं नाही.. केस्तुटातला केस थोरला भाऊ निर्दयपणानं ओढायचा नि थोडासा पू बाहेर येऊन ते होत्याचं नव्हतं होऊन जायचं.. पण प्रत्येकवेळी हा प्रवास इतका सुलभ असायचाच असं नाही.. रोगजंतू जखमेत शिरकाव करायचे, त्यांच्याशी लढताना लक्षावधी पेशी धारातीर्थी पडायच्या नि त्या “पू” नामक पिवळसर द्रव्याच्या रूपातून जखमेत भरून रहायच्या.. रोगजंतूंनी रक्तात प्रवेश केलेला असायचा.. ठणकत्या जखमेबरोबर ताप भरायचा.. लाल बारकसं गळू कधी मोठं होत जायचं नि त्या पिवळ्याजर्द गळवाची वेदना सोसण्यापलीकडे जायची.. अवघड जागी झालं असेल तर हे गळू “दे माय धरणी ठाय” अशा स्थितीला न्यायचं..

कुठं दुर्लक्ष करायचं नि कुठली गोष्ट गंभीरपणे घ्यायची हे अचूक समजणा-या आमच्या माऊलीच्या कपाळावर ही वाढती जखम, पू नि तापणारं अंग पाहून चिंतेची आठी उमटायची.. पण लगेच हातपाय गाळून डॉक्टरांकडे आपल्या पोराला नेणा-या त्या काळच्या आया नव्हत्या.. स्वत:च्या वैद्यकीय ज्ञानावर (तुटपुंज्या का असेना) विश्वास असणा-या नि म्हणूनच पोरांच्या आजाराशी स्वत: लढणा-या त्या झाशीच्या राण्या होत्या. (अर्थात डॉक्टरांकडे नेण्यासाठी लागणा-या छनछनीची बारा महिने असणारी कडकी.. हेही एक ठोस कारण होतच म्हणा !)

तिन्हीसांजेची वेळ.. दिवस सरेल तसा ठणका अजूनच वाढलेला.. पोराच्या रडण्यानं सारं घर कातरलेलं..

“या गादीवर आता झोपून रहायचं, आजिबात उठायचं, चालायचं, खेळायचं नाही. ” म्हणत ती माऊली लेकराला स्वत:च्या हातानं झोपवायची. गरमागरम कॉफी पाजायची. मऊ भाताचे चार घास भरवायची.. एव्हाना रात्रीनं बस्तान बसवलेलं असायचं..

“आई खूप दुखतय”….

” हो.. थोडं थांब हं… ” 

आई घरातल्यांची जेवणखाणं उरकायची..

पेशंट पोराच्या भोवती भावंडं गोल करून बसलेली…

“मने, समोरच्या कोनाड्यात पानं ठेवलीय, *ती घेऊन ये आणि फडताळातलं माझं पांढरं जुनं पातळ आण” 

आता त्या पोराला नि भावंडांनाही अंदाज आलेला असायचा.. ती एका खास प्रोसिजरची तयारी असायची..

पोटीसची…. !!

“आई नको.. आई पोटीस नको… ” ते पोर बेंबीच्या देठापासून ओरडायचं.. भोवतालच्या भावंडाना “सुपातले हसतात” हे एका बाजूला असलेलं फीलींग नि दुस-या बाजूला काळजात अजून चर्र करणारा स्वत:च्या वेळचा चटका… अशा संमिश्र भावनांनी व्यापलेलं असायचं !

मनीनं पिंपळाची, गुलबक्षीची अशी पानं भावासमोर ठेवलेली.. आईच्या पांढ-या सुती पातळातून लांबशी पट्टी काढून एका बाजूला मधोमध फाडून थोड्याशा भागाला विभागलेलं..

स्वयंपाकघरातून “चर्र” असा आवाज..

आईनं लांब दांड्याच्या तापलेल्या लोखंडी पळीत कणीक, हळद, थोडं पाणी नि थोडं तेल घातलेलं.. पिठल्यासारखा झालेला लगदा.. नि त्यामुळे गरमागरम पळीतून निघणा-या वाफा नि आसमंतात घुमणारा तो जोरदार “चर्र” आवाज.. पेशंट पोराला अजूनच घाबरवून सोडणारा… “बळीच्या बक-याच्या” चेह-यावरचे नि याच्या थोबाडावरचे भाव तंतोतत जुळणारे.. !

आईचं त्या पोटीसाच्या पळीसहित आगमन…

“मला नको.. मी नाही लावून घेणार.. पोटीस नको.. ” म्हणत भेदरलेल्या पोराचा पळण्याचा प्रयत्न… नि त्याला भावंडांनी घट्ट पकडून ठेवणं.. आईचं चमच्याने पानाच्या सपाट भागावर पोटीसाचं भयंकर गरम पीठ घालणं..

नि…

नि…

पाऊस पोराच्या पाठीवर बरसणारा.. भावंडांचीही तीच गत.. नि त्या माऊलीच्या कुशीत गाढ झोपी गेलेलं तिचं लेकरू !!

शेजारच्या खोलीतल्या दाराआडून हा सोहळा पाहणारे भेदरलेले त्याचे बाबा.. दगडाच्या त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालेलं..

नि… घाबरट समजत असलेल्या बायकोच्या करारीपणाच्या साक्षात्कारानं दिपलेले त्यांचे डोळे…. !!

पुढचे दोन दिवस हा पोटीसाचा रणसंग्राम… तिस-या दिवशी सकाळी पोटीसाला घाबरून जखमेचं पलायन.. वेदना आणि तापाचाही रामराम…

नंतर शिल्लक राहणारा फक्त व्रण…. आईच्या कणखरपणाची, वात्सल्याची नि पोटीसाची जन्मभर आठवण करून देणारा…. !!

आजही म्हणूनच पळीचा फोटो पाहिला नि पोटीसाच्या आणि माझ्या माऊलीच्या आठवणीनं जीव चिंब चिंब झाला… !!

उष्णतेनं जखमेभोवतीचा रक्तप्रवाह वाढवणारं नि जखम बरी होण्यास मदत करणारं…. हळदीमुळे जखमेतल्या रोगजंतुंना मारणारं पोटीस…. आज वापरणं तर सोडाच पण कुणाला माहीतही नाही..

काळाच्या प्रवाहाबरोबर वाहून गेलेल्या अनेक मौल्यवान गोष्टींपैकी ते एक.. !. शास्त्राने अनेक औषधे आणली. प्रभावशाली अॅंटिबायोटिके जखमांना ताबडतोब आटोक्यात आणतातही.. गोळी घेतली की काम संपून जातं.. पोटीसासारखं झंझट नाही.. म्हणूनच पोटीस नामशेष झालं..

कबूल आहे..

पण सा-या कुटुंबाला एकत्र आणणा-या, माऊलीच्या वात्सल्याच्या वर्षावाला कारणीभूत ठरणा-या त्या पोटीसनामक सोहळ्याला मात्र आपण मुकलो !! 

लेखिका : © नीला महाबळ गोडबोले, सोलापूर.

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ Mesponsible… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

MESPONSIBLE – लेखक  : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

माझ्या आईला अनेक दिवस झोप येत नव्हती. तिला दमल्यासारखं वाटे. ती चिडखोर, चिडचिडी झाली होती.

…आणि एक दिवस अचानक ती बदलली…

त्या दिवशी माझे वडील तिला म्हणाले:

 – मी तीन महिन्यांपासून नोकरी शोधत आहे आणि मला नोकरी मिळाली नाही… मी निराश आहे, आज मित्रांसह बिअर घेणार आहे.

माझ्या आईने उत्तर दिले:

 -ठीक आहे… बिअरच्या बिलाचे तुम्हीच पाहा आणि रात्री उशीर झाल्यास मित्राकडेच झोपा..

माझा भाऊ तिला म्हणाला:

 – आई, मी विद्यापीठात सर्व विषयांमध्ये मागे आहे.. मला माहीत नाही, माझा निकाल कसा असेल..

माझ्या आईने उत्तर दिले:

 – ठीक आहे, तू अभ्यास केलास तर नक्कीच पास होशील. आणि जर तू तसे केले नाहीस तर, सेमिस्टरची पुनरावृत्ती करशीलच. पण शिकवणीची फी तुझी तूच द्यायची..

माझी बहीण तिला म्हणाली:

 – आई, मी कार ठोकली..

माझ्या आईने उत्तर दिले:

 – ठीक आहे बेटा, गॅरेजमध्ये घेऊन जा. आणि पैसे कसे द्यायचे, ते बघ. आणि गाडी दुरुस्त होईपर्यंत बस किंवा रेल्वेने फिर..

तिची सून तिला म्हणाली:

 – आई, मी तुमच्याकडे काही महिने राहायला येते आहे.

 माझ्या आईने उत्तर दिले:

 – ठीक आहे. लिव्हिंग रूमच्या पलंगावर सोय बघ आणि स्वतःसाठीचे ब्लँकेट शोध..

आईकडून येणाऱ्या या प्रतिक्रिया पाहून आम्ही सर्वजण काळजीत पडलो.

आम्हाला शंका आली, की ती डॉक्टरकडे गेली होती… कदाचित तिला त्या गोळ्यांचा ओव्हरडोस झाला असेल… त्यानंतर आम्ही आईसोबत बोलण्याचे ठरविले..

पण नंतर… तिने आम्हाला तिच्याभोवती गोळा केले आणि स्पष्ट केले:

प्रत्येक व्यक्ती तिच्या आयुष्यासाठी जबाबदार आहे, हे समजायला मला बराच काळ लागला. माझी व्यथा, चिंता, माझे नैराश्य, माझे धैर्य, माझा निद्रानाश आणि माझा ताण, तुमच्या समस्या सोडवत नाहीत, तर माझ्या समस्या वाढवतात, हे कळायला मला अनेक वर्षे लागली.

कोणाच्याही कृतीसाठी मी जबाबदार नाही, परंतु मी त्यावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांसाठी मी जबाबदार आहे.

म्हणून, मी या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे, की माझे स्वतःचे कर्तव्य आहे की शांत राहणे आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला तुमच्याशी संबंधित असलेल्या गोष्टी सोडवायला लावणे..

मी योग, ध्यान, चमत्कार, मानवी विकास, मानसिक स्वास्थ्य आणि न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंगचे अभ्यासक्रम घेतले आहेत आणि त्या सर्वांमध्ये मला एक समान धागा आढळला…

मी फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवू शकते. तुमच्या स्वतःच्या समस्या कितीही कठीण असल्या, तरी त्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक संसाधने आहेत. माझे काम तुमच्यासाठी प्रार्थना करणे, तुमच्यावर प्रेम करणे, तुम्हाला प्रोत्साहन देणे हे आहे. परंतु तुमच्या समस्या सोडवणे आणि तुमचा आनंद शोधणे हे तुमच्यावर अवलंबून आहे.

तुम्ही मला विचारले, तरच मी तुम्हाला माझा सल्ला देईन आणि तो पाळायचा की नाही, हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या निर्णयांचे चांगले किंवा वाईट परिणाम असतील आणि ते तुमचे तुम्हालाच भोगावे लागतील.

म्हणून आतापासून मी तुमच्या जबाबदाऱ्यांचे ग्रहण, तुमच्या अपराधाची पोती, तुमच्या पश्चात्तापाची धुलाई, तुमच्या चुकांची वकिली, तुमच्या विलापांची भिंत, तुमच्या कर्तव्याची निक्षेपी सोडून देत आहे…

आतापासून, मी तुम्हाला स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण प्रौढ घोषित करत आहे.

माझ्या घरी सगळेच अवाक् झाले होते.

त्या दिवसापासून, कुटुंब अधिक चांगले कार्य करू लागले. कारण घरातील प्रत्येकाला माहीत होते की त्यांना नेमके काय करणे आवश्यक आहे.

आपल्यापैकी काहींसाठी हे कठीण आहे. कारण आपण काळजीवाहू म्हणून मोठे झालो आहोत. आपण इतरांसाठी जबाबदार असतो. आई आणि पत्नी म्हणून आम्ही सर्व गोष्टींपासून दूर राहतो. आपल्या प्रियजनांनी कठीण प्रसंगातून जावे किंवा संघर्ष करावा, असे आपल्याला कधीच वाटत नाही. प्रत्येकाने आनंदी व्हावे अशी आपली इच्छा असते.

परंतु, जितक्या लवकर आपण ती जबाबदारी आपल्या खांद्यावरून काढून त्या प्रिय व्यक्तीवर टाकू, तितके चांगले. आपण त्यांना ‘MESPONSIBLE’ होण्यासाठी तयार करू…

प्रत्येकासाठी सर्व काही बनण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही… स्वतःवर जबाबदार्‍यांचा दबाव आणणे थांबवा…………

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दार आणि खिडकी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ दार आणि खिडकी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

व्यवहाराच्या पायावर उभारलेल्या संसाराच्या इमारतीची आखणी कितीही योग्य तऱ्हेने केली तरी काही त्रुटी राहतातच असं दिसतं ! घराच्या भिंती सभोवतालच्या समाजाने बंदिस्त केलेल्या असतात, तर परमेश्वरी कृपेचे छप्पर सर्वांनाच नेहमी सावली आणि आधार देतं! दार- खिडकी हे घराचे आवश्यक, अपरिहार्य भाग! जसे घरातील नवरा बायको !कधी कधी वाटतं चुकांचे कंगोरे आपले आपणच बुजवून घ्यायचे असतात! खिडकी आणि दार यांचे प्रपोर्शन योग्य असेल तर ते चांगले दिसते.. खिडकीने जर दाराएवढं बनायचं ठरवलं तर घराचे रूप बिघडते! अर्थात हे माझं मत आहे!

दार ही राजवाट आहे जिथून प्रवेश होतो, त्याचे मोठेपण मानले तर आपोआपच बाकीचे भाग योग्य रीतीने घर सांभाळतात. खिडकी वाऱ्यासारखी प्रेमाची झुळूक देणारी असली की घरातील हवा नेहमी हसती, खेळती, फुलवणारी राहते. ही खिडकी बंद ठेवली तर चालत नाही, कारण तिची घुसमट वाढते! प्रकाशाचा किरण तिला मिळत नाही. एकेकाळी स्त्रीच्या मनाच्या खिडक्या अशा बंद केलेल्या होत्या! शैक्षणिक प्रगतीच्या सूर्याचे किरण झिरपू लागल्यावर तीच खिडकी आपलं अस्तित्व दाखवू लागली.

बाहेरचे कवडसे तिला- तिच्या मनाला -उजळवून टाकू लागले, पण म्हणून खिडकीचे अस्तित्वच मोठं मोठं करत दाराएवढं बनलं किंवा त्याहून मोठं झालं तर…. इमारतीच्या आतील सौंदर्य कदाचित विस्कटून जाईल! येणाऱ्या वाऱ्या वादळाचा धक्का खिडकी पेलू शकणार नाही.. तिला दाराचा आधार असेल तर जास्त चांगलं असेल!

सहज मनात आलं, ब्रिटिश कालीन इमारतींना दारं आणि खिडक्या दोन्ही मोठीच असत. !जणू काही तेथील स्त्री आणि पुरुष यांचा अस्तित्व फार काळापासून समानतेच्या दिशेने वाटचाल करू लागले, त्या उलट आपल्याकडे वाडा संस्कृतीत दार खूप मोठे असले तरी त्याला एक छोटं खिडकीवजा दार असे, ज्याला दिंडी दरवाजा म्हणत.. त्यातून नेहमी प्रवेश केला जाई! उदा. शनिवार वाड्याचे प्रवेशद्वार जरी मोठे असले तरी आत प्रवेश करण्यासाठी छोटा दिंडी दरवाजा आहेच..

जुन्या काळी स्वयंपाक घरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बाहेरच्याना दुस्तर होता. तसेच भक्कम पुरुषप्रधान दार ओलांडून किंवा डावलून, चौकट तोडून बाहेर पडणे स्त्रीलाही कठीण होते.

साधारणपणे ४०/५० वर्षांपूर्वी स्त्रीवर कठीण प्रसंग आला तर तिची अवघड परिस्थिती होत असे. शिक्षण नाही आणि आर्थिक स्वातंत्र्य कमी असल्यामुळे संसाराचा गाडा ओढण्याची एकटीवर वेळ आली तर हातात पोळपाट लाटणे घेण्याशिवाय पर्याय नसे.

मागील शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांची परिस्थिती काहीशी अशीच होती. त्यामुळे स्त्री शिक्षण हे महत्त्वाचं ठरलं! शिक्षणामुळे आत्मविश्वास मिळाला, नोकरीमधील संधी वाढल्या..

पण हळूहळू कौटुंबिक वातावरण ही बदलत गेलं. घरातील पुरुष माणसांबरोबरच स्त्रीचं अस्तित्वही समान दर्जाचे होऊ लागले. अर्थातच हे चांगले होते, परंतु काही वेळा स्त्री स्वातंत्र्याचाही अतिरेक होऊ लागतो आणि घराची सगळी चौकट बिघडून जाते.

अशा वेळी वाटते की एक प्रकारचे उंबरठ्याचे बंधन होते ते बरे होते का? अलीकडे संसार मोडणे, घटस्फोट घेणे या गोष्टी इतक्या अधिक दिसतात की दाराचे बंधन तोडून खिडकीने आपलेच अस्तित्व मोठे केले आहे की काय असे वाटावे!

दार आणि खिडकी एकमेकांना पूरक असावे. दाराला इतकं उघड, मोकळं टाकू नये की, त्याने कसेही वागावे आणि खिडकी इतपतच उघडी असावी की हवा, प्रकाश तर खेळता रहावा आणि चौकट सांभाळावी!

संसाराच्या इमारतीचा हा जो बॅलन्स आहे, त्यात दोघांचेही असणारे रोल दाराने आणि खिडकीने सांभाळावे नाहीतर या चौकटी खिळखिळ्या होऊन संसाररूपी इमारतीची वाताहात होण्यास वेळ लागणार नाही……

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – १३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – १३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

आम्ही पाच – २

एका मुक्त, मोकळ्या, स्वतंत्र वातावरणात आम्ही पाच जणी वाढत होतो, घडत होतो. मुक्त, मोकळे वातावरण म्हणजे आम्ही स्वैर होतो, बेशिस्त होतो, मोकाट होतो असे मात्र नाही. आम्हा पाचही बहिणीत एकमेकात आणि घरात आई वडील, आजी यांच्याशी एक सुसंवाद होता. आम्ही मोकळेपणाने बोलू शकत होतो, प्रश्न विचारू शकत होतो, बालवयातल्या आणि नंतर समज येऊ लागल्यानंतरच्याही कितीतरी शंकांना, अडचणींना, हवं नको वाटणाऱ्या अनेक बाबींना आम्ही बिनधास्त मांडू शकत होतो आणि मुख्य म्हणजे, “अजून तू लहान आहेस, तुला काही कळत नाही” अशी असमाधानकारक अधांतरी उत्तरं आम्हाला कधीच मिळाली नाहीत.

मागे वळून पाहताना आज मला एक प्रकर्षाने जाणवते की मनातली वादळं, शंकांचं निरसन, जर घरातच आपल्या प्रिय आणि मोठ्या व्यक्तींकडून झालं तर ती व्यक्ती सक्षम आणि निर्भय बनते. स्वतःच्या चुकांची कबूली देण्याचंही बळ तिला मिळतं. निर्णय शक्तीची एक सर्वसाधारण प्रक्रिया तिच्या व्यक्तिमत्त्वात सहजपणे घडत जाते आणि किंकर्तव्यमूढतेपासून ती व्यक्ती आयुष्यभर दूर राहते. आम्हा पाचही बहिणींच्या बाबतीत हे निश्चितपणे घडलं.

घर लहान की मोठं हा प्रश्नच नसतो. आनंदाच्या क्षणी जिथे आख्ख घर नाचतं, गोंधळलेल्या मानसिक अवस्थेत जे घर कुशीत घेतं, छोट्या-मोठ्या मन मोडून टाकणाऱ्या भावनांना जे घर पदरात घेतं तेच खरं सुरक्षित घर. अशा एका सुरक्षित घरात आम्ही वाढलो. “मुलीच्या जातीला हे शोभत नाही बरं का ?” अशी फट्टू वाक्यं आम्ही आमच्या घरात कधीच ऐकली नाहीत.
“तुला हेच करायचं आहे का ? कर मग. समोर येणाऱ्या अडचणींना तुझं तुलाच सामोरे जायचं आहे हे मात्र लक्षात ठेव. यथाशक्ती आम्ही तुझ्या पाठीशी राहूच. ” असं प्रेरणा देणारही, सावध करणारही आणि आधार देणारं सामर्थ्य आम्हाला अशा शब्दांतून नक्कीच लाभलं.

एक आठवण मला सांगावीशी वाटते. ज्या सुंदर, मोठ्या, डोळ्यांमुळे हरवलेली छुंदा सापडू शकली तशाच माझ्या मोठ्या डोळ्यांनी मात्र मला एका वाईट क्षणी न्यूनगंड प्राप्त करून दिला. आमच्या गल्लीत एक कोंबड्या पाळून अंडी विकणारी मुस्लिम वयस्कर बाई राहायची. तिला आम्ही बटूबाई म्हणायचो. ती एकटीच राहायची. तिच्या आयुष्याविषयी फारशी कुणाला माहिती नव्हती पण अंडी विकण्याच्या निमित्ताने तिचा घरोघर संचार असायचा. ती काहीशी फटकळ आणि कर्कश्यही होती पण वाईट नव्हती. बरी होती. खेळता खेळता कधी कोणाला तहान लागली तर ती पटकन पाणीही प्यायला द्यायची पण त्या दिवशी मात्र मला तिचा अत्यंत राग आला. रविवार असावा. आमचा बालचमुचा लगोरीचा खेळ मस्त रंगात आला होता आणि त्याचवेळी माझ्याकडे बघून ती म्हणाली, “ए बटारे ! जरा इकडे ये तर.. ”
मोठ्या डोळ्यांची म्हणून हीने मला “बटारी” म्हणावे ? प्रचंड राग आणि प्रचंड दुखावल्यामुळे मी ताडताड जिना चढून घरी आले आणि खिडकीतूनच तिला जोरात म्हणाले, ”मला बटारी म्हणतेस तू कोंबडी चोर आहेस. ” आणि जिजीच्या कुशीत शिरून मी बेफाम रडले.

माझं बालमन विदीर्ण झालं होतं. माझ्या आईचा माझ्या पाठीवर मायेचा हात होता आणि माझ्या चारही बहिणी माझ्या भोवती कडकडून भेदरल्यासारख्या उभ्या होत्या. त्यांच्याही डोळ्यात मला रडताना पाहून अश्रू जमले होते. एरवी आम्ही एकमेकींशी कितीही भांडत असू पण आमच्यापैकी कोणालाही बाहेरच्या कुणा व्यक्तीने दुखावलं तर मुळीच खपवून घेतलं जायचं नाही. अशा अनेक क्षणांनी त्यावेळी आम्हा पाचही जणींना ही एक जाणीव दिली होती की आमची पाच जणींची एक वज्रमूठ आहे. सगळ्या मतभेदांना, विचारांना, निराळ्या स्वभाव छटांना डावलूनही ही घट्ट मूठ कधीही सैल झाली नाही हे विशेष.

आता उषा—निशाही मोठ्या होत चालल्या होत्या. त्यांच्या जाणिवा बहरत होत्या. त्या जुळ्या असूनही त्यांच्यात काहीच साम्य नव्हतं. दिसण्यात, वागण्यात, स्वभावात, संपूर्णपणे त्या एकमेकींपासून भिन्न होत्या. काही ना काही किरकोळ कारणांनी सतत भांडायच्या. उषा जास्त आक्रमक होती. निशा मजबूत, दांडगी असली तरी ती तितकीच समंजसही होती. ”जाऊ दे !” वाली होती.
“चल आता ! शाळेत जायला उशीर होतोय आपल्याला” म्हणून भांडता भांडताच त्या एकमेकींचा हात घट्ट धरून शाळेला निघायच्या. त्यांच्या मागे दोन लांब, घट्ट वेण्या उडवत, ठुमकत छुंदा निघायची कारण त्या तिघींची शाळा आणि शाळेची वेळ एकच होती आणि या तिघींना असे एकत्र बघत असताना मला मी यांची मोठी बहीण अशी एक बलशील भावना स्पर्शून जायची. कधी ती सुखद असायची तर कधी थोडीशी त्रासदायक होई.

एखादे वेळेस मला उगीच वाटून जायचं की घरातली सगळी कठीण, अंग मेहनतीची, क्लिष्ट कामं मलाच करावी लागतात. रोज आईला पाट्यावर वाटण वाटून देणे, कधी घराच्या कोपऱ्या कोपऱ्यातून कचरा काढणं, उंच दोरीवर काठीने कपडे वाळत घालणे, रात्री गाद्या घालणे, आंब्याच्या सीझनमध्ये पातेलं भरून आंब्याचा रस काढणे, शिवाय जीजीचे तर फारच उद्योग असायचे. अनारशासाठीचे ओलसर तांदूळ जात्यावर दळताना तिच्या जात्याच्या खुंट्याला फिरवू लागणे, पावसाळ्यात पप्पा टोपली भरून “करंदी” आणायचे ती बारीक “करंदी” (हा एक कोलंबीचाच प्रकार) सोलत बसणे, शाळेला सुट्टी लागली, मे महिना आला की आमचं घर म्हणजे एक वर्कशॉपच होऊन जायचं. आजच्यासारखी मुलांसाठी भरणारी, व्यक्तिमत्व विकास घडवणारी शिबिरं वगैरे तेव्हा नव्हती. सुट्टीत घर हेच शिबीर व्हायचं. विविध उपक्रम राबवले जायचे या शिबीरात.

मे महिना म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यातली वाळवणं सुरू व्हायची. पोह्याचे पापड, उडदाचे पापड, साबुदाण्याच्या चिकवड्या, तांदळाच्या कुरडया, कमळाची देठं दह्यात भिजवून, गोल गोल चिरून वाळत घालणं, गवारीच्या शेंगा मीठ लिंबू तिखट लावून वाळवून त्याची भिशी करायची, ताकातल्या सांडगी मिरच्या असायच्याच. एक सारखं कुटणं, लाटणं, वाळत घालणं आणि संध्याकाळी परत आवरणं. या साऱ्याभोवती आमचं आख्ख घर गुंतलेलं असायचं आणि खास अलिबागहून मागवलेले कितीतरी शेर कडवेवाल निवडायचे. त्यातले चाडे दाणे वेगळे करायचे. वर्षभर लागणारा अत्यंत आवडता पदार्थ म्हणजे वालाचं बिरडं ! मग त्याची उस्तवावर नको का करायला ? शिवाय हे स्वत:च्या घरापुरतंच मर्यादित नसायचं. गल्लीत एकमेकांकडे पापड लाटायला जाण्याचीही एक वेगळीच मजा असायची. प्रत्येकाच्या सोयी, सवलतीप्रमाणे “पापडदिन” ठरायचा. संध्याकाळी घरी परतताना त्याच पापडांचा वानवळा असायचा. उषा—निशा यथाशक्ती आणि गंमत म्हणूनही आवडीने या कामात सहभागी असायच्या. आमच्या बहिणींमध्ये छुंदा ही अत्यंत हुशार आणि अभ्यासू. सतत कुठल्या ना कुठल्या परीक्षाच देत असायची. त्यामुळे सहजच तिला या घरगुती कामांपासून रजा मिळत असे. उषाचे वेगळेच, तिचे तिचेही उपक्रम असायचे. कोऱ्या कागदावर चित्रं काढायचा तिला फार नाद होता. तसे तिचे अनेक उद्योग असायचे आणि घरभर पसारा असायचा आणि तो सगळा पसारा निशा आणि आई सतत आवरत असायच्या. ताई आजोबांकडेच राहायची पण आमच्यात असली की मात्र अगदी सारं काही नीटनेटकेपणाने करायची. आजोबांच्या निरनिराळ्या गंमती सांगायची. अखंड बडबड असायची तिची. पण ती एक वेगळीच एन्टरटेनमेंट होती.

मे महिन्याच्या सुट्टीत आई भरतकाम, विणकाम, शिवणकामही आम्हा मुलींना शिकवायची. त्यात माझी प्रगती शून्य असली तरी ताईचा मात्र अव्वल नंबर लागायचा.
निशा लहान असली तरी तिला या साऱ्या कामांची आवड होती की नाही हे माहीत नाही पण ती अत्यंत मेहनती होती. तिला लहानपणापासूनच प्रचंड उरक होता. उपजतच तिच्यात एक व्यवस्थापनेचा गुण होता. तिचाही घरकामातला वाटा आणि सहभाग मोठाच असायचा. शिवाय मी तिला माझी काही कामे पासऑन करायची. माझ्या बॉसिंग करण्याच्या पद्धतीनुसार.. पण तिने कधीही आदळआपट केली नाही. पप्पा ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी त्यांची बॅग तर तीच भरायची आणि पपा तिलाच विचारायचे, “ निशू आज तू बॅगेत नॅपकिन ठेवायला विसरलीस. ”त्यावेळी मला पपांचा रागही यायचा. निशा बिचारी वाटायची. ईवलीशी तर होती ती !

पण अख्खा दिवस काम करून थकलेल्या आईचे पाय मात्र उषाच दाबून द्यायची. पप्पांचं डोकंही दाबून द्यायची. त्यांना झोप लागावी म्हणून म्हणायची, “थांबा तुम्हाला मी एक छान गोष्ट सांगते, ” मग तिची गोष्ट सुरू व्हायची.
“एक होता निजाम.. ”
अशीच तिच्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात असायची आणि हा तिचा निजाम मुक्तपणे पृथ्वीपासून चंद्रापर्यंत प्रवास करायचा. तो कधी शाळेतही जायचा. कधी शिक्षक असायचा तर कधी विद्यार्थी. कधी चार पट्ट्यांचा मार खायचा तर कधी दहा पट्ट्यांचा मार कुणाला द्यायचा पण तिचा निजाम शूर होता, लढवय्या होता, पराक्रमी होता आणि तितकाच हळवा आणि स्वप्नाळू होता. उषाच्या कथेतला हा असा बहुरूपी, बहुरंगी, बहुढंगी निजाम आज उषा या जगात नसली तरी आमच्या मनात मात्र अमर राहिला आहे.

असो ! अजून खूप बाकी आहे. मन अनंत आठवणींनी तुडुंब भरलेलं आहे. या गाठोड्यात आयुष्यभराचा पसारा बांधून ठेवलाय. एकदा का ते उघडलं की त्यात कसं हरवून जायला होतं….

क्रमश: भाग तेरावा 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘‘ध्वज सोन्याचा झळकत सुंदर…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘‘ध्वज सोन्याचा झळकत सुंदर…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

भारतरत्न लतादीदींनंतर जर भारतीय संगीतात कोणाचं नाव अगदी सहज ओठांवर येत असेल, ते म्हणजे आशाताई भोसले यांचं! दोघीही ‘संगीतसूर्य’ मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्यका! तो सोनेरी झळकता सूर दोघींमध्ये तेजाळला नाही तरच नवल! आशाताईंना गळा आणि बुद्धीचंही वरदान मिळालंय. त्यांनी अनेक भाषांमध्ये विविध प्रकारची हजारो गाणी गाऊन विक्रमच केला आहे. संसारातील धावपळ, आणि मुलाबाळांचं करून, आशाताईंनी त्या कठीण काळात, इतकी गाणी कधी आणि कशी रेकॉर्ड केली असतील, याचं मला नेहमीच आश्चर्य आणि अप्रूप वाटतं!

त्याकाळी गाणी रेकॉर्ड करणं हे एक आव्हानच होतं. त्यांच्या समकालीन अनेक गायक गायिकांमध्ये वेगळं आणि उठून दिसण्यासाठी त्यांनी अमाप कष्ट घेतले, रियाज केला, मेहनत केली. रेल्वेचा प्रवास करून, धुळीत – गर्मीत उभं राहून, प्रत्यक्ष सर्व वादकांबरोबर थेट लाइव्ह गाणं आणि तेही उत्कृष्टरित्या सलग एका टेकमध्ये साकार करणं, ही सोपी गोष्ट नव्हती. मी गायला लागले, तेव्हा सुद्धा माझी ९० ते ९५ टक्के गाणी मी दिग्गज वादक समोर असताना, सलग एका टेकमध्ये Live रेकॉर्ड केली असल्याने, मी यातील आव्हान आणि याचं महत्त्व निश्चितपणे जाणते. ‘वेस्टर्न आऊटडोर’ हा आशिया खंडातील सर्वोत्तम रेकॉर्डिंग स्टुडिओज् पैकी एक समजला जातो. त्या स्टुडिओतील अत्यंत बुद्धिमान साऊंड इंजिनीअर श्री. अविनाश ओक यांनी लतादीदी, आशाताई, जगजित सिंह यांची अनेक गाणी इथे रेकॉर्ड केलीत. माझेही जवळपास सर्व आल्बम अविनाशजींनी इथेच रेकॉर्ड केले, हे मी माझं भाग्य समजते. त्यांच्या मते, ‘लाईव्हमधे काही मिनिटांसाठी वादकांसह गायकाच्या, म्हणजे सर्वांच्याच ऊर्जा एकवटलेल्या असतात. प्रत्येक जण आपलं काम जीव ओतून अचूक करतो. एक गूढ, दैवी शक्ती त्या गाण्यात प्राण फुंकते. म्हणून अशा गाण्यांचा आत्मा अमरच असतो. त्यामुळेच ही गाणी ‘कालातीत’ होतात.’ 

आजकाल, डिजिटल रेकॉर्डिंग ही व्यवस्था गायकांसाठी खूप सोपी आहे. परंतु भावपूर्णतेसाठी सर्व वादकांसोबत गाणं हीच पद्धत योग्य होती, असं मलाही वाटतं. आशाताईंची शेकडो गाणी मला आवडतात. पण त्यातलं पंडित हृदयनाथजींनी स्वरबद्ध केलेलं ‘धर्मकन्या’ चित्रपटातलं ‘नंदलाला रे’ हे गाणं म्हणजे ‘मुकुटमणी’ आहे! 

‘नंदलाला.. ’ ही भैरवी. एकदा या गाण्याबद्दल बोलताना हृदयनाथजी मला म्हणाले की, उस्ताद सलामत – नजाकतजींच्या भैरवीनं त्यांना झपाटलं आणि ही स्वर्गीय रचना अवतरली. मला तर नेहमी वाटतं, कोणीही दुसऱ्याकडून कोणतीही रचना उचलताना त्यातून नेमकी काय दर्जेदार गोष्ट घेतो, हे त्या – त्या माणसाच्या बुद्धीच्या आकलनाच्या क्षमतेवर अवलंबून असतं. त्यात हृदयनाथजींनी एक से एक अशा कमाल जागा बांधल्या आहेत की, ही स्वरांची अभूतपूर्व सौंदर्यस्थळं आपल्याला आनंदाने स्तिमित करतात. आणि आशाताईंनी ती अशा काही भन्नाट ऊर्जेनं एकेका दीर्घ श्वासात गायली आहेत की एखादा शास्त्रीय संगीतातला गायकही ते ‘आ’ वासून पाहत राहील.

तसंच १९८३-८४ नंतर धर्मकन्या’मधली ‘पैठणी बिलगून म्हणते मला.. ’ सारखी अद्वितीय गाणी मला हृदयनाथजींसोबत भारतभर झालेल्या ‘भावसरगम’ कार्यक्रमात, त्यांच्या शेजारी स्टेजवर बसून सादर करण्याचं भाग्य लाभलं. तेव्हा ही सगळी गाणी किती अफाट सुंदर आणि आव्हानात्मक आहेत, याचा प्रत्यय घेत मी ते आव्हान स्वीकारून आनंदाने गात असे. त्याच वेळी आशाताईंची महती अधिक जाणवत असे. या गाण्यातली ‘शिरी’ या शब्दांवरची सट्कन येणारी गोलाकार मींड गाताना तर मला, दिवाळीच्या फटाक्यातलं आकाशात झेपावणारं रॉकेटच दिसतं, ज्याचं नोटेशन काढणं खरंच कठीण आहे. ती जागा अपूर्व आहे.

‘पूर्व दिशेला अरूण रथावर’ हे गाणं ऐकताना समोर ‘ध्वज सोन्याचा झळकत सुंदर’ चित्ररूपाने डोळ्यांपुढे साकार होतो. या शब्दावरील भूप रागातून नट रागातील मध्यमावर हरकत घेऊन विसावतो, त्या हरकतीच्या जागेचे टायमिंग म्हणजे कळसच! अशा अनेकविध भाषांमधील त्यांचा ‘आशा टच’ हा काही विरळाच!

आशाताईंचं संगीत क्षेत्रात उच्चतम नाव असलं तरी आमच्या भेटीत, त्या किती साधेपणानं बोलतात, वागतात याची आठवण झाली तरी मला गंमतच वाटते.

एकदा पार्ल्याच्या दीनानाथ सभागृहात दिवाळी पहाट कार्यक्रमात लतादीदी सोडून सगळी मंगेशकर भावंडं स्टेजवर हजर होती.. “तुमच्याकडे मंगेशकर भगिनी सोडून आणखीन कोण कोण गायलंय?” हा प्रश्न निवेदकाने पंडित हृदयनाथजींना विचारला. त्यावर माझे गुरू हृदयनाथजींनी माझं तोंडभरून कौतुक केलं आणि म्हणाले, “माझ्याकडे पद्मजा ‘निवडुंग’ चित्रपटासाठी ‘केव्हातरी पहाटे’ व ‘लवलव करी पातं’ आणि इतर गाणीही फार सुंदर गायली आहे!”

आशाताई, उषाताई, मीनाताई, अशा बहिणींसमोर या दिग्गज कलाकार भावाने माझं कौतुक केल्यावर, नंतर त्या माझ्याशी कशा वागतील, काय बोलतील, अशी मला धाकधूक होती. परंतु मध्यंतरात आशाताईंसारख्या महान गायिकेने मला जवळ बोलावून, माझ्या गाण्याचं, तसंच साडीचं, दागिन्यांचं, (अशा स्त्रीसुलभ गोष्टींचंही) कौतुक केलं, हे पाहून मला अचंबाच वाटला. मीही त्यांच्या साडीचं कौतुक केल्यावर, “ही साडी मी तुम्हाला देऊ का?” असंही त्यांनी मला विचारलं. अर्थात, मी फार संकोचले आणि मनोमन आनंदलेही!

एकदा दादर येथील नुकतंच नूतनीकरण झालेल्या, ‘महात्मा गांधी जलतरण तलावा’चं उद्घाटन होतं. त्यानिमित्ताने तिथे माझ्या गाण्याचा कार्यक्रम होता. योगायोगाने हाही दिवाळी पहाटचाच कार्यक्रम होता.

दुसर्‍या दिवशी इंदौरला ‘सानंद’तर्फे दिवाळी पहाट कार्यक्रम असल्याने मला या कार्यक्रमानंतर त्वरित निघून इंदौरचं विमान गाठणं आवश्यक होतं. परंतु आयोजक श्री. प्रसाद महाडकर मला म्हणाले, “पद्मजाताई, थोडं थांबाल का अजून? आशाताईंनी ‘मला पद्मजाला आज भेटायचंच आहे!’ असा निरोप पाठवला आहे. आशाताईंना भेटायची मलाही तीव्र इच्छा होतीच. परंतु विमान गाठायचं म्हणून वेळेअभावी निघावं लागेल, असा त्यांना फोनवर निरोप दिल्यावरही आशाताईंनी, ‘पद्मजाला थांबवूनच ठेवा’ असा परत निरोप दिला.

काही वेळ मनाची उत्सुकता, आणि घालमेल चालू असताना आशाताई सुहास्यवदने आल्या आणि त्यांनी माझ्या ओंजळीत सोनचाफ्याची काही घमघमीत फुलं आनंदाने दिली. माझ्या आयुष्यात अनेकदा असे अविश्वसनीय आणि आनंदाचे सोनेरी क्षण आले, त्यापैकी हा एक! त्या ओंजळभर सुगंधी फुलांचा घमघमाट मला आजवर आनंद देत आला आहे..

परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो !

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुके अभंग, मुक्या ओव्या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ मुके अभंग, मुक्या ओव्या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

आमच्या नवरा बायकोत कधी कधी भांडण व्हायचं. भांडण उंबऱ्याच्या बाहेर जाणार अशी शक्यता निर्माण झाली की, माझी आजी आम्हा दोघांना मायेने जवळ घ्यायची. समोर बसवायची. आमचे दोघांचेही हात हातात घेऊन बोलायची..

ती म्हणायची, “ लेकरांनो, असं करून कसं चालेल? अजून लै लांब जायचंय तुम्हाला.. बाळांनो, दोघं बी विस्तू झाला तर विझायचं कसं? कुणीतरी एकाने पटकन पाणी व्हावं आणि विस्तवावर सांडून जावं.. म्हणजे आग लागणार न्हाय.. अन् जर एकदा का आग लागली तर मग सगळं जळून राख हुईल.. ” तिच्या या वाक्याने आमच्या दोघांचं पाणी होऊन जायचं. आणि नकळतपणे आम्ही आजीचा हात धरलेला असायचा.

आजी पदर डोळ्याला लावून डोळ्यातून आलेलं पाणी पुसत बोलू लागायची. आजोबांच्या आठवणीत हरवून जायची. वादळातल्या, पावसातल्या आणि उन्हाने करपलेल्या पण त्यातून ही फुलवलेल्या तिच्या संसाराची गोष्ट सांगून झाली की, डोळे पुन्हा पदराने पुसत हळूच म्हणायची, “ आता या म्हातारीला घोटभर चहा मिळेल का बाबांनो?” त्यावर घरातले सगळे हसायचे.

आमचं भांडण मिटलेलं असायचं आणि आजी चहा पीत बसलेली असायची. आकाशातला एक जुना निखळलेला तारा त्याच्या अनुभवाचे असंख्य ऋतू माझ्या ओंजळीत ठेवतोय, असा भास मला नेहमी व्हायचा.. आणि आजही होतो..

आता माझी आजी नाहीय. ती गेली तिच्या प्रवासाला निघून कायमची. पण जाताना विस्तव आणि पाणी नावाचं समीकरण आमच्या अंत:करणाला देऊन गेली. अधूनमधून होतात आमची भांडणे, पण आग लागायच्या आधीच आम्ही पाणी होऊन विस्तु विझवलेला असतो. तिच्या जवळ बसून आम्ही त्यावेळी तिचं ऐकलं, म्हणून आज आम्हाला वाहत्या पाण्यासारखं जगता येतं..

तुम्हाला एक खरं सांगू.. ?

हे ओंजळीत अनुभवांचे ऋतू देणारे निखळलेले तारे आहेत. पण त्यांचं ऐकून घेणारी पिढी राहिलेली नाहीय. त्यामुळे आता आजी- आजोबा मुके झालेत.

परिणामी घटस्फोटासाठी आज वकिलांच्या ऑफिसमध्ये गर्दी मावत नाहीय. त्यांचं ऐकूनच घ्यायला आपण तयार नाहीयत. आज ते पिकलेलं पान, जुनं झालेलं झाड अशा यादीत त्यांना टाकून आपण मोकळे झालो आहोत.  

आणखी एक, घरातलं लहान बाळ रडायला लागलं की आधी त्याच्यासाठी हक्काची जागा आजीची मांडी असायची. आता बाळ रडत नाही कारण बाळाच्या मांडीवर आपण फोन देऊन मोकळे झालो आहोत आणि आजीची मांडी रिकामी झालीय. त्या म्हाताऱ्यानी नव्हे नव्हे त्या महान – ताऱ्यांनी आता हताश होऊन बोलणं बंद केलं आहे. परतीच्या प्रवासाचं तिकीट त्यांनी केव्हाच काढून ठेवलेलं आहे. घराच्या एका कोपऱ्यात मानेखाली उशी धरून चिमणीच्या पिलांसारखी चिव चिव करत वरच्या छताकडे एकटक नजर लावून ती पडलेली आहेत. ज्येष्ठ नागरिक संघात नाही मन रमले रे त्यांचे. त्यांना नातवंडे हवी असतात. पण नातवंडे मोबाईलवर नाहीतर करिअरच्या नादात बिझी झालीयत. आजीची आणि आजोबांची दुनिया आता मुकी झाली आहे. त्या पिढीला या पिढीशी खूप बोलायचं होतं; पण बोलताच आलं नाही. कारण ऐकायला कुणी नाही.

नेहमीप्रमाणे आजही या लेखाचा शेवट आशावादी असावा, असं मनाला वाटत आहे. परंतु, भूतकाळ गतप्राण आणि वर्तमान आंधळा झालेला असताना आदरणीय सुरेश भट यांच्या गझलेच्या ओळी माझा हुंदका वाढवत आहेत. त्या ओळी अशा…

“जरी या वर्तमानाला

कळे ना आमुची भाषा

विजा घेऊन येणाऱ्या

पिढ्यांशी बोलतो आम्ही”

मला नम्रपणे इतकंच सांगायचं आहे की, “भट साहेब, तुम्ही म्हणाला अगदी तसंच या पिढ्या विजा घेऊनच जन्माला आल्या. पण कान गमावून बसल्या. ठार…ठार…ठार.. बहिऱ्या झाल्या. फाईव्ह जीच्या आणि रिल्सच्या धूमधडाक्यात आजीच्या ओव्या मुक्या झाल्या.. मुक्या झालेल्या ओवीत आजोबांचे अभंग पुसले गेले. शेवटचा श्वास घेऊन आजी-आजोबा निघून जातील. पिकलेली पाने गळून पडतील आणि या पिढीला व्हॉटसअपच्या स्टेटससाठी एक जिव्हाळ्याचा विषय मिळेल. आणि विस्तवावर पाणी होऊन कुणाला सांडता येणार नाही. परिणामी सगळी राख झालेली असेल.

बस.. इतकाच हुंदका होता अडकून राहिलेला तो फक्त बाहेर काढला..

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ स्वत्व… – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? काव्यानंद ?

☆ स्वत्व… – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

राधिका भांडारकर हे नाव माझ्या मते आपणा सर्वांनाच माहित आहे, कारण त्या स्वतः या अभिव्यक्ती ई दैनिकांसोबत जोडलेल्या आहेत आणि सातत्याने त्यांचे गद्य /पद्य लेखन चालू असते.

रसग्रहणासाठी ही कविता मला खास निवडावीशी वाटली याचे कारण म्हणजे, मनस्पर्शी साहित्य परिवार या समूहातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या एका काव्य स्पर्धेत राधिका ताईंच्या या कवितेला उत्कृष्ट कविता असे मानांकन मिळाले आहे. अभिव्यक्तीनेसुद्धा ही खबर वाचकांपर्यंत पोहोचवली होतीच.

 सर्वप्रथम आपण ही कविता पाहूया.

सौ राधिका भांडारकर

☆  स्वत्व ☆

*

नकोच वाटते मला दया माया

आहेत वाटा कितीतरी अजून

चालेन त्यावर जरी एकटी मी

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

सारे मुखवटे भासतात मजला

का घ्यावे दान मी त्यांच्याकडून?

कशाला व्हावे मिंधे कुणाचे

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

नको लाचारी वा हाजी हाजी

प्रतिमाच माझी ठेवेन टिकवून

मन्यात आहे सळसळता प्रवाह

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

खोट्यापुढे का तुकवायची मान

मुलाम्याला का जायचे मोहून 

स्वत्वचा राखेन प्रश्नाला भिडून

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

आक्रमण माझ्या जर अस्तित्वावरी 

केले कुणी तर त्यांना डावलून

सिद्ध करेन मी माझ्या स्त्रीत्वाला

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

ही संपूर्ण कविता वाचल्यावर पटकन आपल्यासमोर उभी राहते ती या कवितेतील मी म्हणजे एक अत्यंत कर्तुत्ववान, करारी, स्वाभिमानी, असत्याची चीड असणारी आणि प्रचंड आत्मविश्वासाने समाजात वावरणारी कणखर निडर अशी स्त्री ! या स्त्रीमध्ये मला माझी आजीच दिसली आणि त्यामुळेच ही कविता मला अत्यंत जवळची वाटली.

नकोच वाटते मला दया माया

आहेत वाटा कितीतरी अजून 

चालेन त्यावरी जरी एकटी मी

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

या पहिल्याच कडव्यात कवितेतील नायिका म्हणते की तिला उगीचच कोणाची दया माया नको आहे. कितीही अडचणींनी तिला व्यापले असले, तिचे रोजचे रस्ते बंद झाले असले तरी आणखी कितीतरी वाटा तिच्यापुढे मोकळ्या आहेत. ती एकटीने त्या वाटांवरून चालण्यास समर्थ आहे. सहानुभूतीची तिला गरज नाही कारण तिचा स्वाभिमान अजूनही जाज्वल्य आहे.

सारे मुखवटे भासतात मजला

का घ्यावे मी दान त्यांच्याकडून

कशाला व्हावे मिंधे कुणाचे

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

तिला आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसे भेटली. अनेकांनी तिला मदतीचे हात देण्याचा प्रयत्न केला, परंतु खरे आणि खोटे चेहरे कसे ओळखावे हा मोठा प्रश्न तिच्यापुढे आहे. ती अत्यंत सतर्क आणि सजग अशी स्त्री आहे. त्यामुळे मुखवट्या मागचा चेहरा तिला दिसत असावा बहुदा. मायावी कांचन- मृगापाठी पळणारी ती स्त्री नाही, आणि म्हणूनच तिच्या आयुष्यात येणारे अनेक जण तिला वरवरचे मुखवटेच वाटतात. तिला असंही वाटतं की स्वतः सक्षम असताना उगीच कुणाचे उपकार घेऊन मिंधे का व्हावे? ती पुढे म्हणते,

नको लाचारी वा हाजी हाजी

प्रतिमाच माझी ठेवेन टिकवून

धमन्यात आहे सळसळता प्रवाह

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

कितीही अडचणी आल्या, संकटांना सामोरे जावे लागले, तरी तिला तिच्या कर्तुत्वाने समाजात मिळविलेली तिची प्रतिमा कायम ठेवायची आहे. यासाठीच तिला कोणाची लाचारी नको, कोणाची हाजी हाजी नको.

खोट्यापुढे का तुकवायची मान

मुलाम्याला का जायचे मोहून

स्वतःच राखेन प्रश्नाला भिडून

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

हे जग, ही माणसं म्हणजे वरवरचा मुलामा आहे. या मुलाम्याला मोहून मी खोट्याची साथ देणार नाही, त्यापुढे माझी मान तुकवणार नाही. स्वत्वाला सांभाळून मी खोटं पितळ उघडं पाडीन. केवढा हा आत्मविश्वास आणि कणखरपणा!

आक्रमण माझ्या जर अस्तित्वावरी

केले कुणी तर त्यांना डावलून

सिद्ध करेन मी माझ्या स्त्रीत्वाला

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

या शेवटच्या कडव्यात ती समाजातील पुरुषांना आव्हान देते की मी स्त्री आहे म्हणून मला कोणी कमी समजू नका. माझ्या अस्तित्वावर जर तुम्ही हल्ला केलात तर याद राखा. मी माझं स्त्रीत्व सिद्ध करेन.

या ठिकाणी मला सीतेच्या अग्नी दिव्याची प्रकर्षाने आठवण आली. आजची स्त्री ही खरंतर कोणत्याही क्षेत्रात तसूभरही मागे नाही. मात्र असे असून सुद्धा कितीतरी निर्भया आपण पाहतोच.

राधिका ताईंची ही कविता अशा विकृतींना शह देणारी आहे. ही कविता वाचताना आपल्याही नसानसातून रक्त खवळते. या मनोविकृतींचा अगदी संताप संताप होतो, हेच या कवितेचे यश आहे.

वीर रसाची एक सकारात्मक दृष्टिकोन असलेली ही कविता आहे.

यात तसे कोणतेही काव्यमय शब्द नाहीत, परंतु साध्या शब्दातूनही अंगार फुलणारे असे हे काव्य आहे.

दिंडी वृत्तातील ही कविता. प्रत्येक चरणात ९+१० अशा मात्रांचे बंधन असूनही चरणातील कोणताही शब्द मात्रा जुळविण्यासाठी वापरला आहे असे मुळीच वाटत नाही

‘धमन्यात आहे सळसळता प्रवाह ‘ – – मात्राबद्ध असूनही किती चपखल बसले आहेत पहा हे शब्द! वृत्तबद्ध काव्य करताना हीच तर कवीची खरी कसोटी आहे. राधिकाताई या कसोटीला पूर्ण उतरल्या आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

त्यांनी अशाच विविध विषयांवर प्रकाश टाकणाऱ्या, आणि समाज प्रबोधन करणाऱ्या कविता लिहाव्या आणि वाचकांचे मनोरंजनही करावे. त्यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी मी त्यांना सुयश चिंतीते.

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवन जगण्याची कला :- अध्यात्म – भाग – ३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

जीवन जगण्याची कला :- अध्यात्म – भाग – ३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

(श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणतात की ‘सतत नामात राहावे. ‘ आजच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘range’ मध्ये रहा. ‘Be Connected.’) – इथून पुढे — 

संत तुकाराम महाराजांची एक गोष्ट आहे.

महाराज वारीला जाताना नेहमी आपल्या मित्राला सोबत येण्यास सांगत. तो नेहमी एक कारण सांगे की मी येणारच होतो पण मला माझ्या ओसरीवरील खांबाने धरुन ठेवले आहे. एकदा उत्सुकतेने महाराज त्याच्या घरी गेले आणि बघतात तो काय? त्यांच्या मित्रानेच त्या खांबाला धरुन ठेवले होते. महाराजांनी मित्राच्या ते लक्षात आणून दिले आणि मग तो नित्य वारीला जाऊ लागला. आपलीही अवस्था त्या मित्रासारखीच आहे. फक्त आपल्या ओसरीवरील खांब थोड्या वेगळ्या प्रकारचे आहेत आणि मुख्य म्हणजे आपल्या ओसरीवर अनेक खांब आहेत. एक खांब असमाधानाचा आहे, एक काळजीचा आहे, एक भीतीचा आहे, एक द्वेषाचा आहे, एक आळसाचा, एक कटू वचन किंवा कटू वाणीचा आहे. हे सर्व खांब आपण सोडले तर आपण ‘तुकाराम महाराजां’बरोबर आनंदाने आनंदाच्या वारीला जाऊ शकतो. वारकऱ्यांना वारीत जाऊन जो आनंद मिळतो तो आनंद आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात लाभू शकतो. याची सूत्र आपल्याला अध्यात्मात मिळतात. संतांनी ती सूत्रे आचरणात आणून, पडताळून बघितली आणि मग आपल्या सारख्या सामान्य मनुष्याना सांगितली.

 “ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्तीं असूं द्यावे समाधान”

 — संत तुकाराम महाराज

हे वरील वचन संत तुकाराम महाराज जगले. ते जगले यामागे त्यांना काही सिद्ध करायचे नव्हते, त्यांना काही कमवायचे नव्हते, त्यांना लौकिक संपत्ती नको होती, त्यांना पदप्रतिष्ठा नको होती. म्हणून आज चारशे वर्ष होऊनही त्यांचे नाव अबाधित राहिले आहे. संत तुकारामांची गाढवावरून धिंड काढली गेली, त्यांचा प्रतिसाद होता, गावकरी चांगले आहेत, त्यांनी माझे खूप मोठं कौतुक केले, नाहीतर माझी मिरवणूक कोणी काढली असती ? मला सारा गावं बघता आले, त्यांच्या गळ्यात शिराळे, घोसाळे, आदी भाज्यांच्या माळा घातल्या तेव्हा ते म्हणाले, चला! चार दिवसांची भाजी सुटली”. जन्मजात सावकारी असतानाही दुष्काळात सर्व कर्जांचे कागद त्यांनी खातेदारांना परत देऊन टाकले. कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नसताना, आंदोलने केलेली नसताना, तसा सरकारी आदेश नसताना ‘उस्फुर्त कर्जमाफी’ केली. पुढे सावकारी बुडाली आणि दिवाळे निघाले तेव्हा सुद्धा तुकाराम महाराज यांनी फक्त प्रतिसादच दिला. बायको, मुले, भाऊ जेव्हा दुष्काळाची शिकार झाली, तेव्हा ते म्हणाले,

“बरे जाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली ॥ 

अनुतापे तुझे राहिले चिंतन, जाला हा वमन संसार ॥

बरे जाले जगी पावलो अपमान, बरे गेले धन ढोरे गुरे ॥ 

बरे जाले नाही धरिली लोकलाज, बरा जालो तुज शरण देवा ॥

बरे जाले तुझे केले देवाईल, लेकरे बाईल उपेक्षिली ॥

तुका म्हणे बरें व्रत एकादशी, केले उपवासी जागरण ॥”

त्याच्याही पुढे जाऊन ते म्हणतात,

*”बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता॥

विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥

बाईल मेली मुक्त जाली । देवे माया सोडविली ॥

विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥ 

पोर मेले बरे जाले । देवे मायाविरहित केले।

विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज।। 

माता मेली मज देखता । तुका म्हणे हरली चिंता ।। 

विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज।।”

इतके कर्तव्यनिष्ठुर होणे आपल्याला जमणार नाही, परंतु आपण प्राप्त स्थितीचा स्वीकार तरी नक्कीच करु शकतो. कारण एकच त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या प्रारब्धाचा खुल्या मनाने संपूर्ण स्वीकार केला आणि आयुष्यास समर्पक प्रतिसाद दिला. थोडा अभ्यास केला तर हा अलिखित नियम सर्व संतांनी काटेकोरपणे पाळला आहे असे आपल्या लक्षात येईल. संत ज्ञानेश्वर अर्थात माऊली,

संत मीराबाई, अगदी अलिकडील संत गाडगे महाराज, ह्या सर्वांनी आपल्या वाट्याला आलेले प्रारब्ध आनंदाने भोगून संपवले, झालेल्या हालअपेष्टा, यातना, उपेक्षा सहजपणे स्वीकारल्या. अर्थात ‘प्रतिसाद’ देऊन, कोणाही माणसावर आकस न ठेवता. माऊलींनी पसायदानात ‘खळ सांडो’ असे न म्हणता ‘खळांची व्यंकटी सांडो’ असे म्हटले हा सुद्धा प्रतिसादच!!

आयुष्याला तुमच्या तर्कशास्त्राशी वा तत्वांशी काहीही देणेघेणे नाही, ते आपापल्या पद्धतीने प्रवाही होत असते. अखेरीस तुम्हांला या जीवन प्रवाहातून प्रवाहित व्हायचे असते. म्हणून जीवनाला सर्वोत्तम प्रतिसाद द्या. कारण आयुष्य हे कधीही आपल्या तर्कशास्त्रावर चालत नाही.

बदल हा जीवनाचा सर्वश्रेष्ठ नियम आहे. गोपाळ कृष्णाच्या चरित्रात आपल्याला याचे दर्शन होते. ज्याला जन्म होण्याआधीपासूनच शत्रू मारायला टपले होते. जन्म झाल्यावर देखील लगेच स्वतःच्या आईला सोडून दुसऱ्या ठिकाणी जावे लागले, तिथे सुद्धा पुतना मावशी आलीच. आपण कृष्ण चरित्र बघतांना तो अवतार होता हा ‘समज’ मनातून काढून टाकूया. कृष्ण ‘समाजाच्या’ गरजेनुसार आणि लोकांसाठी उपयुक्त असेच जीवन जगला. वेळप्रसंगी स्वतःचे नाव खराब होईल याची त्याने तमा बाळगली नाही. आजही त्याला ‘रणछोडदास’ असे म्हटले जाते. राजपुत्र म्हणून जन्माला आलेला मुलगा एक गवळ्याच्या घरी वाढला, गुरुकुलात राहिला, अगदी सोळा सहस्त्र नारीचा पती झाला, पण प्रत्येक गोष्ट त्याने समाजाचे व्यापक हीत ध्यानात ठेऊन समाज केली. “मैं नही, तू ही” हे सूत्र श्रीकृष्णाने जीवनातील बदल आनंदाने स्वीकारत आजीवन पाळले. म्हणूनच ते ‘पुरुषोत्तम’ झाले. ह्यालाच ‘अध्यात्म’ म्हणतात. म्हणूनच श्रीकृष्ण आज प्रत्येक भारतीयाच्या मनात स्थान प्राप्त करून आहे.

अगदी अलिकडील उदा. घ्यायचे तर लोकमान्य टिळकांचे घेता येईल. मुलगा गेल्याची वार्ता कोणीतरी येऊन टिळकांना सांगितले, लोकमान्य त्यावेळी केसरीचा अग्रलेख लिहीत होते, ते सहज म्हणाले की अग्रलेख पूर्ण करुन येतो. हा धीरोदत्त पणा अध्यात्म जीवनशैलीतूनच येतो. इथे सुद्धा लोकमान्यांनी ‘प्रतिसादच’ दिला आहे आणि परिस्थितीचा आनंदाने स्वीकार केला आहे. स्वा. सावरकरांना ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली, तेंव्हा त्यांचे पाहिले उद्गार काय होते ? “पन्नास वर्षे ब्रिटिशांचे राज्य टिकेल ?” हा प्रतिसादच होता. सर्व क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी, शास्त्रज्ञ ‘अध्यात्म’च जगत आलेले आहेत.

‘प्रतिक्रिया’ ही अपरिहार्यता असू शकते पण ‘प्रतिसाद’ नेहमीच मनुष्याची खिलाडू वृत्ती दाखविणारा, उस्फुर्त आणि सकारात्मक असतो. जीवनाकडे परमेश्वराची ‘लीला’ म्हणून पाहणारा असतो. आत्मविश्वास दाखविणारा आणि जगण्याची उमेद वाढविणारा असतो.

म्हणोन आळस सोडावा ।

येत्न साक्षेपें जोडावा ।

दुश्चितपणाचा मोडावा ।

थारा बळें ।। दा. १२. ९. ८।।

 — समर्थ रामदास

आपण दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न अनेक वेळा करुन बघितला आहे. त्यात आपण किती यशस्वी झालो हे आपल्याला चांगलें कळले आहे. त्यामुळे आपण आता स्वतःला बदलूया, कारण ‘बदल स्वीकारणे’ आणि ‘स्वतःत बदल करणे’ हे दोन्ही आव्हानात्मक आहे. आपण बदललो की त्यामानाने जग बदलतेच.

“नजरे बदली तो नजारे बदले।

नाव ने कष्ती बदली तो किनारे बदले।”

एक दगडाचा व्यापारी होता. त्याच्याकडे विविध रंगाचे, विविध दर्जाचे, विविध आकाराचे दगड विकायला होते. एक भला मोठा दगड त्याच्याकडे बरेच दिवस पडून होता. तो दगड बरेच दिवस विकला जात नव्हता. एकदा एक कारागीर त्याच्याकडे आला. त्याला म्हणाला हा दगड मला देता का? बरेच दिवस तो पडून होता, म्हणून तो म्हणाला फुकट ने कारण त्याने माझी जागा अडवली आहे. कारागिराने तो दगड नेला, त्यातून सुंदर शिल्प तयार केले. एकदा व्यापारी त्याच्याकडे गेला असताना त्याने शिल्प बघितले. तो सुद्धा आश्चर्य चकित झाला. त्याने कारागिराचे तोंड भरुन कौतुक केले. म्हणाला, “तुम्ही चांगले शिल्प घडवले. त्यावर तो कारागीर म्हणाला की त्या दगडात आधीपासूनच ते शिल्प होते, मी त्याच्या आजूबाजूचा अनावश्यक भाग काढून टाकला”.

आपण सुद्धा ईश्वराचे अंश आहोत, लेकरे आहोत. आपल्यातील अनावश्यक भाग आपल्याला काढून टाकता आला तर आपल्या जीवनांचे देखील सुंदर शिल्प निश्चित बनू शकेल, यात शंका नाही. फक्त अनथक प्रयत्न अत्यावश्यक आहेत. नाहीतर मॉर्निंग walk ला जाण्यासाठी घड्याळाला गजर लावणे आणि सकाळी गजर वाजला की सवयीने तो बंद करणे हाच बरेच लोकांचा ‘व्यायाम’ असतो, तसे व्हायला नको.

अध्यात्माच्या आजच्या कालानुरूप नवीन व्याख्या कराव्या लागणार आहेत, त्या खालीलप्रमाणे असू शकतील.

१. ‘असेल तर असो, नसेल तर नको’ म्हणजे अध्यात्म

२. ‘हवे नको पण’ जाणे म्हणजे अध्यात्म …. विनातक्रार स्वीकार्यता (Unconditional acceptance) म्हणजे अध्यात्म.

३. कुटुंबाची, समाजाची, देशाची ‘आई’ होणे म्हणजे अध्यात्म, उदा. सिंधुताई सपकाळ उर्फ माई.

४. ‘मेरी झाशी नही दुंगी’ म्हणणे आणि तशी कृती करणे म्हणजे अध्यात्म.

५. स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणे म्हणजे अध्यात्म.

६. ‘श्रवण’ केल्याप्रमाणे कृती करणे म्हणजे अध्यात्म.

७. आपल्या कलागुणांचा, उपलब्ध साधन संपत्तीचा समाजासाठी उपयोग करणे म्हणजे अध्यात्म. इ.

‘जीवन जगण्याची कला- अध्यात्म ‘.. ह्या लेखाचा समारोप एका कवितेने करतो.

*

आत आपुल्या झरा झुळमुळे निळा स्वच्छंद।

जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद।।धृ।।

*

घन धारातुनी ख्याल ऐकतो रंगुनी मल्हाराचा।

बघता बघता मोरपिसारा साऱ्या संसाराचा।

मनात पाऊस बरसे उधळीत मातीचा मधुगंध।।१।।

*

दुःखाला आधार नको का? तेही कधीतरी येते।

दोस्त होऊनी हातच माझा आपुल्या हाती घेते।

जो जो येईल त्याचे स्वागत हात कधी न बंद ।।२।।

*

झाडाची झुलणारी फांदी कधी लावणी भासे।

साधा कोरा कागदही कधी चंद्र होऊनी हासे।

सर्वत्रच तो बघतो धुंदी, डोळे ज्याचे धुंद ।।३।।

*

कधी कुणाचे आसू पुसता बोटांनी हळुवार

हात होतसे वाद्य सुरांचे पाझरती झंकार

प्रेमाच्या या गाण्यासाठी प्रेमाचा हा छंद ।।४।।

*

कवी : श्री. मंगेश पाडगावकर 

– समाप्त – 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “अन्नसंस्कार — सर्वांना उत्तम अन्न मिळावे…” – लेखिका : सुश्री अमृता खंडेराव ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “अन्नसंस्कार — सर्वांना उत्तम अन्न मिळावे…” – लेखिका : सुश्री अमृता खंडेराव ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

आमची आई जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होती. तिच्या खेडोपाडी बदल्या व्हायच्या. मग माझे वडील त्या गावात जास्तीत जास्त चांगले घर भाड्याने मिळवायचे आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करायचे. वडिलांची जिल्हा बदली व्हायची आणि आईची गावागावात. त्यामुळे आम्ही सगळे फक्त शनिवारी रविवारी एकत्र यायचो.

ज्या गावात राहत आहोत त्या गावातल्या चांगल्या दुकानात आई किराणाचे खाते काढायची. एक दोनशे पानी वही केलेली असायची. तिला आम्ही किराणा वही असे म्हणायचो. किराणा वहीच्या सुरुवातीच्या पानावर आईचे नाव पत्ता लिहिलेला असायचा. फोन नसल्यामुळे फोन नंबरचा प्रश्नच येत नव्हता. पहिल्या पानावर ||श्री|| असे लिहून खाली क्रमवार किराणाची यादी केली जायची. महिन्याचा किराणा एकदम भरण्याची पद्धत होती. त्यानंतर एखादी गोष्ट संपली तर पुन्हा वहीत लिहून सामान आणावे लागायचे.

आणलेल्या सामानासमोर त्याची किंमत लिहून त्याखाली त्याची टोटल मारून किराणा दुकानदार सही करायचा. दर महिन्याला पगार झाला की आई त्याचे बिल चुकते करायची. घरोघरी अशा किराणा वह्या असायच्या आणि किराणा भरायची हीच पद्धत होती‌. दर महिन्याला किराणाच्या पिशव्या घरी आल्यानंतर आई त्या स्वच्छ जागी ठेवायची. त्याच्या भोवती पाणी फिरवून हळदीकुंकू वाहायची आणि नंतर सामान डब्यात भरले जायचे. दर महिन्याला डबे घासून सामान भरायची पद्धत होती. आम्ही भावंडे किराणा सामानातले कपड्याचे आणि अंगाचे साबण काढून त्याची गाडी गाडी खेळायचो. साबण रॅकमध्ये जाईपर्यंत हा खेळ सुरू राहायचा.

थोडक्यात किराणा आणणे हा सुखकारक सोहळा असायचा. यादी लिहिण्यापासून ते सामान डब्यात जाईपर्यंत शेंगदाणे मुरमुरे गूळ खोबरे मनसोक्त तोंडात टाकायला मिळायचे.

आई जेव्हा किराणाच्या पिशव्यांची पूजा करून हात जोडायची त्यावेळी मी सुद्धा तिच्याबरोबर हात जोडायची. आईच्या चेहऱ्यावर कृतार्थ भाव दिसायचा. कष्टाने मिळविलेल्या अन्नाचा सन्मान करणे आणि त्याला सांभाळून वापरणे हा साधासुधा संस्कार होता. बोधीच्या जन्मानंतर किराणा भरल्यावर मी पूजा करताना छोटा बोधी पण हात जोडायचा आणि डोके जमिनीवर टेकवून पिशव्यांना नमस्कार करायचा. त्यानंतर तोही सामानातले साबण काढून गाडी-गाडी खेळायचा….

अन्न ही मनुष्याची मूलभूत गरज आहे. अन्न मिळाल्यानंतर मनुष्याला आनंद होणे साहजिक आहे. अन्न जेव्हा कष्ट केल्यावर मिळते तेव्हा सात्विक आनंद होतो. तृप्तता मिळते. जेव्हा अन्न भ्रष्टाचाराने किंवा अयोग्य मार्गाने किंवा एखाद्याला लुटून मिळते तेव्हा ते अन्न आरोग्य आणि शांतता देऊ शकत नाही.

दुसऱ्यावर अन्याय करून किंवा भ्रष्टाचाराने मिळवलेले अन्न खाल्ल्यानंतर अन्नदोष निर्माण होतो. असे अन्न रोग आणि मानसिक त्रास निर्माण करते. कलह आणि लसलस निर्माण करते. असले अन्न खाताना संपूर्ण घरदार एकमेकाकडे चोरटेपणाने किंवा संशयितासारखे पाहत असते.

आपण अन्न तयार केल्यानंतर त्यातले चार घास दुसऱ्याला देण्याची इच्छा निर्माण होते तेव्हा लक्ष्मी प्रसन्न होते. भुकेल्याच्या मुखात चार घास दिले तर घर सकारात्मक ऊर्जेने भरून जाते. म्हणून भारतीय दर्शनात अन्नदानाला फार महत्त्व दिले गेले आहे. अन्नदान तुमच्यातली दुसऱ्याची भूक जाणण्याची क्षमता विकसित करते. तुम्हाला माणूस म्हणून जगायला मदत करते.

लॉकडाऊन च्या काळात तर लोकांना किराणा सामानाचे महत्त्व फारच पटले. त्याकाळी भीतीपोटी लोक दुप्पट किराणा भरू लागले. किराणा दुकान उघडल्याबरोबर पटकन सामान आणून ठेवू लागले. गरजूंना गावोगावी किराणाचे किट वाटले गेले. खरोखरच किराणा सामानाला आयुष्यात अनन्य साधारण महत्त्व आहे. महिन्याचा किराणा एकदम घरात येणे हे संसारातले फार मोठे सुख आहे. दिवाणखान्यातले महागडे डेकोरेशन किंवा भारी-भारी शोभेच्या वस्तू हे घराचे सौंदर्य नसून, गहू, तांदूळ, साखर, डाळींनी भरलेले डबे हे घराचे खरे सौंदर्य आहे.

घरात शिधा भरलेला असला तरच कुठलीही बाई शांत चित्ताने राहू शकते‌. अन्नाची विवंचना संपल्याशिवाय कुठल्याही स्त्रीचे मन स्थिर होऊ शकत नाही. आपल्याला कोणी अन्न दिल्यानंतर आपण हात जोडून नमस्कार करावा आणि त्याचे आभार मानले पाहिजेत‌

दिलेल्या अन्नाचा कृतज्ञतेने स्वीकार करावा कारण अन्न हे पूर्णब्रह्म आहे. ते तुमचा पिंड पोसते. अन्न फक्त रक्त धातू मांस मज्जा इतकेच निर्माण करते असे नाही तर भावना आणि विचारसुद्धा अन्नातूनच निर्माण होतात. हे अन्नाला पूर्णब्रह्म मानण्यामागचे खरे कारण आहे. म्हणूनच सात्विक अन्न खाल्ल्यानंतर मिळणारी तृप्ती आणि शांतता याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही.

अन्न बाह्यस्वरूपी निर्जीव दिसत असले तरी ते शरीरात गेल्यानंतर ऊर्जा निर्माण करते. अन्नामध्ये पोटेन्शिअल एनर्जीचा मोठा साठा असतो‌. जिवंत शरीरात गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण करण्याची अन्नात क्षमता असते. अन्न जेव्हा बीज रूपात असते आणि मातीत पेरले जाते त्यावेळी ते पुन्हा नवीन अन्नाची निर्मिती करण्याइतके सक्षम असते.

अन्न हे पूर्णब्रह्म हे अगदी खरे आहे‌

लेखिका : सुश्री अमृता खंडेराव.

प्रस्तुती : मोहन निमोणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ यशवंत आयुष्याची ‘सारथी’ ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

☆ यशवंत आयुष्याची ‘सारथी’ ☆ श्री संदीप काळे ☆

एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी ओडिशात गेलो होतो. कार्यक्रम संपल्यावर ओडिशामध्ये काही ठरवलेल्या ठिकाणी भेट देण्यासाठी मी बाहेर पडलो. ओडिशातल्या बालेश्वर इथं एका पत्रकार मित्राकडं जेवणानंतर पायी आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर निघालो. आईस्क्रीम खात आम्ही एका बाकावर बोलत असताना एक व्यक्ती बाजूला क्लासमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची गोष्ट हिंदीमधून त्या समोर बसलेल्या युवकांना सांगत होती.

त्या शिकवणाऱ्या माणसाला मला भेटायचं आहे, असं मी त्या पत्रकार मित्राला म्हणालो. तो पत्रकार मित्र आतमध्ये गेला. आतमध्ये जाऊन तो बाहेर आला आणि मला म्हणाला, ‘‘शिकवणारे आमच्या भागातलेच उपविभागीय अधिकारी आहेत. आपण क्लास सुटला की, त्यांना भेटू.’’

क्लास सुटला, आम्ही त्यांना भेटायला गेलो. मी बोलताच क्षणी त्यांच्या लक्षात आले, मी महाराष्ट्राचा आहे असा. बोलण्यातून त्यांचा चांगला परिचय झाला. माझ्याशी बोलणारे ते अधिकारी अवघ्या २८ वर्षांचे होते. ते यूपीएससी पास होऊन ओडिशामध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू झाले होते.

प्रथमेश अरविंद राजेशिर्के असं या अधिकाऱ्याचं नाव. ते कोकणातल्या चिपळूण तालुक्यातील मांडकी या गावचे. आम्ही दोघेजण बोलत होतो. प्रथमेश यांचा सर्व प्रवास थक्क करणारा होता.

प्रथमेश व त्यांचे कुटुंबीय कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. प्रथमेशही दवाखान्यामध्ये अभ्यास करत होते. परिस्थिती अत्यंत हलाखीची, त्यामुळे घरी बसून परीक्षा देण्याशिवाय प्रथमेश यांना पर्याय नव्हता. या काळात एका मित्राच्या माध्यमातून ‘सारथी’ या पुण्यामधल्या शासकीय संस्थेची माहती मिळाली. शिक्षणासाठी मुलांचा खर्च पूर्णपणे उचलला जातो, असं प्रथमेश यांना कळालं.

प्रथमेश ‘सारथी’च्या परीक्षेला बसले. ती परीक्षा पास झाले. त्यांना ‘सारथी’मुळे तेरा हजार रुपये दर महिन्याला मिळत गेले. दिल्लीच्या क्लासची संपूर्ण फी ‘सारथी’ने भरली होती. प्रथमेश म्हणाले, ‘‘मी ‘सारथी’चे प्रमुख असलेले काकडे सर यांना भेटलो. त्यांनी दिलासा दिला. माझ्या आजारपणातही ते माझ्यासोबत होते.

माझ्या आयुष्यात ‘सारथी’चा दोन अर्थाने महत्त्वपूर्ण वाटा आहे. एक माझ्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये आर्थिक साह्य करून मला उभं केलं आणि दुसरं जबरदस्त असे मार्गदर्शन, मेंटॉरशिप दिली. जर त्या काळामध्ये ‘सारथी’ने मला हात दिला नसता तर मी आणि माझ्यासारखे कित्येक मित्र कदाचित घरीच राहिले असतो. ’’ 

मी प्रथमेशला म्हणालो, ‘‘तुम्ही ओडिशाच का निवडलं?’’ 

प्रथमेश म्हणाले, ‘‘मला आदिवासी बांधवांची सेवा करायची होती. इथल्या अनेक युवकांना मला लाल दिव्याच्या गाडीत बसवायचं होतं. ते मी केलेही. मी सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करावं, ही माझ्या वडिलांची फार इच्छा होती; पण जेव्हा माझा यूपीएससीचा निकाल लागला, तेव्हा ते सगळं बघायला वडील नव्हते. ’’ वडिलांच्या आठवणींमध्ये भावनिक झालेल्या प्रथमेश यांचा निरोप घेऊन मी परतीच्या मार्गाला निघालो. ‘सारथी’ इतक्या मोठ्या प्रमाणात काम करते, हे मला माहिती नव्हतं.

ओडिशा इथून मला कामानिमित्त थेट पुण्याला जायचं होतं. शनिवारी सायंकाळी पुण्यामध्ये पोहोचलो. काही जणांना भेटण्यासाठी मी त्यांची वाट पाहत होतो. प्रवीणदादा गायकवाड, राहुल पापळ, विलास कदम, अशी सगळी मंडळी आम्ही एका ठिकाणी बसलो होतो. बोलता बोलता मी प्रवीणदादा यांच्याकडे सारथीचा विषय काढला. प्रवीणदादाने मला सारथीच्या कामाविषयी भरभरून सांगितलं. मी वारंवार ज्या सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे सरांविषयी उल्लेख करत होतो, त्या काकडे सरांविषयी प्रवीणदादा गायकवाड खूप चांगले सांगत होते. त्यांनी काकडे सरांना फोन लावून माझ्याकडे फोन दिला.

मी अत्यंत नम्रपूर्वक त्यांना माझी ओळख सांगत मला तुम्हाला भेटायचं आहे, अशी त्यांना विनंती केली. त्यांनी मला सकाळी भेटायला या असं सांगितलं.

फोन ठेवल्यावर प्रवीणदादा म्हणाले मराठा, कुणबी समाजाच्या मुलांच्या भविष्य, करिअर यासाठी सारथी सारखा महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट काळाची गरज बनला होता. मराठा, कुणबी समाजामध्ये सारथीमुळे शिक्षणाचे प्रमाण खूप वाढलं. युपीएससी, एमपीएससी मध्ये सरकारी नोकरीमध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या वाढली. सारथीने प्रमाणपत्र, आर्थिक मदत, मार्गदर्शन या स्वरुपात शाब्बासकी दिल्यामुळे नववी पासून मुलं अभ्यासाकडे वळली. त्यांना शिष्यवृत्ती मिळू लागली. आई-वडील तिकडे वळले. मुलांमध्ये अभ्यास करण्याची स्पर्धा लागली. जयंती, पुण्यतिथीच्या नावाखाली वर्गण्या मागणारे मुलं एमपीएससी, यूपीएससी करण्यासाठी दिल्लीला जायचे असे म्हणू लागले. त्यासाठी सारथीने सर्व आर्थिक मदत केली. त्या सर्वांसोबातची आमची बैठक संपली.

मी बाणेरला गेस्ट हाऊसला गेलो. ‘सारथी’वर आलेले अनेकांचे लेख वाचून काढले. बातम्या, अनेकांनी केलेले संशोधन मी वाचलं. मराठा, कुणबी समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यासंदर्भात २०१८ मध्ये मराठा समाजाचे अनेक मोर्चे निघाले. त्यात मराठा समाजाच्या मुलांचा शैक्षणिक विकास व्हावा, अशी मागणी होती. या मागणीतून अत्यंत बुद्धिमान, संवेदनशील, दूरदृष्टी असलेल्या देवेंद्र फडणवीस या अभ्यासू अशा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ‘सारथी’ची सुरुवात केली. दिवसेंदिवस आर्थिक अडचणीमध्ये दारिद्र्याच्या गाळामध्ये फसणाऱ्या मराठा, कुणबी समाजातील मुलांचे ‘सारथी’मुळे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ लागलं.

‘सारथी’चा चार तास अभ्यास केल्यावर माझ्या लक्षात आलं, ‘सारथी’ने मागच्या चार वर्षांत चार लाखांपेक्षा अधिक तरुणाईचे मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केलं. मी या कामामुळं प्रचंड भारावून गेलो. तेवढ्या रात्री मी देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला, त्यांचे अभिनंदन केले. त्यांनीही मला प्रतिसाद दिला. देवेंद्र यांनी ‘सारथी’च्या माध्यमातून झालेले सामाजिक काम, भविष्यामध्ये ‘सारथी’च्या माध्यमातून मराठा, कुणबी समाजाचा होणारा उद्धार त्याचे नियोजन अगदी नेमकंपणानं माझ्यासमोर ठेवलं.

सकाळी लवकर उठून ‘सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांची भेट घेण्याचं ठरवलं. काकडे सर (९८२२८०८६०८) यांनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. बाहेर एक व्यक्ती झाडाला पाणी घालत होती. एकीकडे ते बगिचा साफ करत होते तर दुसरीकडे झाडांना पाणी घालत होते.

‘‘काकडे सरांचं घर इथंच आहे का?’’ असं मी त्यांना विचारलं, त्यांनी होकाराची मान हालवली. हातामध्ये असलेलं पाणी झाडांना घातलं. हात धुतले आणि डोक्याचा लावलेला रुमाल काढत त्यांनी हात पुसले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही सकाळचे संदीप काळे का?’’ मी म्हणालो, ‘‘हो. ’’ ‘‘या आतमध्ये. मीच काकडे. ’’ मला काही क्षण आश्चर्य वाटलं. आम्ही आतमध्ये गेलो.

काकडे सर यांच्या पत्नी शरदिनी नाश्ता घेऊन आल्या. त्यांनीही मला खुशाली विचारली. मी ‘सारथी’विषयी ऐकलं होतं. जो ‘सारथी’विषयी अभ्यास केला होता, त्याच्या पलीकडे जाऊन मला काकडे सरांनी ‘सारथी’चे अनेक पैलू सांगितले. छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं ‘सारथी’ सुरू झाली त्या छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम इथं उभं राहिलंय.

काकडे सरांनी काही पत्रं माझ्यासमोर ठेवली आणि ती मला वाचायला सांगितली. ती पत्र खूप भावनिक होती. कोणाच्या आई, वडील, बहिणीचं, कुण्या यशस्वी झालेल्या युवक- युवतींची ती पत्रे होती. तुम्ही ‘सारथी’च्या माध्यमातून मदत केली नसती तर माझ्या आयुष्याचं काय झालं असतं? काम करून शिकणं एवढं सोपं नव्हतं? योग्य वयात योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ दिलं. काकडे सर तुम्हीच आई-बाबा झालात, असं त्या पत्रातला मजकूर सांगत होता. ती पत्रं नव्हती, तर लाखो यशस्वी झालेल्या तरुण मनांचा हुंकार होता.

मराठा आणि कुणबी समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास व्हावा, या उद्देशाने २०१८ ला सुरू झालेले सारथी प्रामुख्याने शेती करणाऱ्या मराठा, कुणबी समाजासाठी उपयोगाला आली. नांदेडला जिल्हा परिषदेमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमामध्ये जबरदस्त कामगिरी केलेल्या आयएएस काकडे सर यांची मुद्दाम ‘सारथी’साठी निवड केली गेली.

एका छोट्याशा शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या काकडे सर यांचे वडील वामनराव शिक्षक होते. आई सुभद्रा गृहिणी होत्या. शेतकऱ्यांच्या गरीब मुलांसाठी काकडे सर यांनी काहीतरी करावं, असं त्यांच्या आई-वडिलांना नेहमी वाटायचं. त्यांच्या अनेक ठिकाणच्या विशेष कामगिरीतून ते दिसलंही. पण सारथीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या कित्येक मुलांना मिळालेला लाल दिवा पाहायला काकडे सर यांचे आई-वडील आज नव्हते याचे मलाही खूप वाईट वाटत होते.

मी आणि काकडे सर ‘सारथी’कडे निघालो. रस्त्याने जाताना पुन्हा काकडे सर ‘सारथी’च्या शाबासकीचा महिमा मला सांगत होते. मागच्या चार वर्षांत पाचशे एक्कावन तरुण एमपीएससी परीक्षेमध्ये अव्वल ठरले. तर या चार वर्षांमध्ये यूपीएससीमध्ये ८४ तरुणांनी जबरदस्त यश संपादन केलं. केंद्र शासनाच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पात्र ठरवूनही मेरीटमध्ये नंबर न लागणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सारथी’ने हेरलं आणि त्यांच्या आयुष्याचा उद्धार केला. नववीपासून ते वयाच्या चाळीस वर्षांपर्यंत ‘सारथी’ मध्ये कितीतरी प्रकारच्या शिक्षणासाठी मदत केली जाते.

अनेक व्यक्ती, अनेक संस्था अनेक सामाजिक कार्यकर्ते ‘सारथी’च्या कामांमध्ये वेळ देत आहेत. परवा लागलेल्या एमपीएससी, यूपीएससीच्या निकालामध्ये बारा मुलं आयएएस झाले, तर अठरा मुली आयपीएस झाल्यात. आता ‘सारथी’ अजून विस्तार करत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह, प्रशिक्षण केंद्र यासाठी भर देत आहे.

काकडे सर यांच्याकडे इतक्या यशोगाथा होत्या, इतके अनुभव होते की, ते एका लेखांमध्ये मांडणे मला शक्य नव्हतं. रविवार असूनही आज ‘सारथी’ला काकडे सर यांना भेटण्यासाठी आलेली मुला-मुलींची संख्या कमी नव्हती. त्या मुला-मुलींमध्ये अनेक पालक असे होते की, ज्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यातल्या अनेकांनी हातामध्ये काकडे सरांच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी हार आणले होते. काकडे सरांनी ‘सारथी’ मधून मला अनेक गरीब, शेतकरी, मजूर, वडिलांची मुलं असणाऱ्या आयपीएस, आएएस यांच्याशी माझं बोलणं करून दिलं. त्यांचं म्हणणं एकच होतं, ‘सारथी’ने मदत केली नसती तर आमच्या आयुष्यामध्ये हा सोन्याचा क्षण आला नसता.

मी काकडे सरांचा निरोप घेऊन परतीच्या मार्गाला निघालो. काकडे सरांनी निघताना मला छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र भेट म्हणून दिले. पुस्तकाच्या कव्हरवरचे शाहू महाराज पाहून माझे डोळे पाण्याने भरून आले. त्या ‘सारथी’च्या प्रत्येक कामात मला शाहू महाराज दिसत होते.

शासनाचा एखादा उपक्रम पिढ्यानपिढ्या प्रेरणा देणारा कसा असू शकतो, याचं सर्वोत्तम उदाहरण माझ्यासमोर ‘सारथी’ होते. शासनाचे अनेक प्रकल्प आहेत, त्यात प्रचंड पैसा असून काय करता? केवळ उपक्रम आहे, असं म्हणून चालत नाही, तर ते राबवणारे डोके सक्षम पाहिजे. काकडे सरांच्या माध्यमातून, त्यांच्या टीमच्या माध्यमातून ती सक्षमता तिथे मला दिसत होती.

आपल्या अवतीभोवती पिढ्यानपिढ्यांचा उद्धार करणारे असे अनेक उपक्रम असतील, त्या प्रकल्पाला तुम्ही-आम्ही सगळ्यांनी हातभार लावणं गरजेचं आहे, बरोबर ना.. !

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares
image_print