मराठी साहित्य – काव्यानंद ☆ स्वत्व… – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? काव्यानंद ?

☆ स्वत्व… – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

राधिका भांडारकर हे नाव माझ्या मते आपणा सर्वांनाच माहित आहे, कारण त्या स्वतः या अभिव्यक्ती ई दैनिकांसोबत जोडलेल्या आहेत आणि सातत्याने त्यांचे गद्य /पद्य लेखन चालू असते.

रसग्रहणासाठी ही कविता मला खास निवडावीशी वाटली याचे कारण म्हणजे, मनस्पर्शी साहित्य परिवार या समूहातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या एका काव्य स्पर्धेत राधिका ताईंच्या या कवितेला उत्कृष्ट कविता असे मानांकन मिळाले आहे. अभिव्यक्तीनेसुद्धा ही खबर वाचकांपर्यंत पोहोचवली होतीच.

 सर्वप्रथम आपण ही कविता पाहूया.

सौ राधिका भांडारकर

☆  स्वत्व ☆

*

नकोच वाटते मला दया माया

आहेत वाटा कितीतरी अजून

चालेन त्यावर जरी एकटी मी

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

सारे मुखवटे भासतात मजला

का घ्यावे दान मी त्यांच्याकडून?

कशाला व्हावे मिंधे कुणाचे

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

नको लाचारी वा हाजी हाजी

प्रतिमाच माझी ठेवेन टिकवून

मन्यात आहे सळसळता प्रवाह

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

खोट्यापुढे का तुकवायची मान

मुलाम्याला का जायचे मोहून 

स्वत्वचा राखेन प्रश्नाला भिडून

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

आक्रमण माझ्या जर अस्तित्वावरी 

केले कुणी तर त्यांना डावलून

सिद्ध करेन मी माझ्या स्त्रीत्वाला

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

ही संपूर्ण कविता वाचल्यावर पटकन आपल्यासमोर उभी राहते ती या कवितेतील मी म्हणजे एक अत्यंत कर्तुत्ववान, करारी, स्वाभिमानी, असत्याची चीड असणारी आणि प्रचंड आत्मविश्वासाने समाजात वावरणारी कणखर निडर अशी स्त्री ! या स्त्रीमध्ये मला माझी आजीच दिसली आणि त्यामुळेच ही कविता मला अत्यंत जवळची वाटली.

नकोच वाटते मला दया माया

आहेत वाटा कितीतरी अजून 

चालेन त्यावरी जरी एकटी मी

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

या पहिल्याच कडव्यात कवितेतील नायिका म्हणते की तिला उगीचच कोणाची दया माया नको आहे. कितीही अडचणींनी तिला व्यापले असले, तिचे रोजचे रस्ते बंद झाले असले तरी आणखी कितीतरी वाटा तिच्यापुढे मोकळ्या आहेत. ती एकटीने त्या वाटांवरून चालण्यास समर्थ आहे. सहानुभूतीची तिला गरज नाही कारण तिचा स्वाभिमान अजूनही जाज्वल्य आहे.

सारे मुखवटे भासतात मजला

का घ्यावे मी दान त्यांच्याकडून

कशाला व्हावे मिंधे कुणाचे

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

तिला आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसे भेटली. अनेकांनी तिला मदतीचे हात देण्याचा प्रयत्न केला, परंतु खरे आणि खोटे चेहरे कसे ओळखावे हा मोठा प्रश्न तिच्यापुढे आहे. ती अत्यंत सतर्क आणि सजग अशी स्त्री आहे. त्यामुळे मुखवट्या मागचा चेहरा तिला दिसत असावा बहुदा. मायावी कांचन- मृगापाठी पळणारी ती स्त्री नाही, आणि म्हणूनच तिच्या आयुष्यात येणारे अनेक जण तिला वरवरचे मुखवटेच वाटतात. तिला असंही वाटतं की स्वतः सक्षम असताना उगीच कुणाचे उपकार घेऊन मिंधे का व्हावे? ती पुढे म्हणते,

नको लाचारी वा हाजी हाजी

प्रतिमाच माझी ठेवेन टिकवून

धमन्यात आहे सळसळता प्रवाह

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

कितीही अडचणी आल्या, संकटांना सामोरे जावे लागले, तरी तिला तिच्या कर्तुत्वाने समाजात मिळविलेली तिची प्रतिमा कायम ठेवायची आहे. यासाठीच तिला कोणाची लाचारी नको, कोणाची हाजी हाजी नको.

खोट्यापुढे का तुकवायची मान

मुलाम्याला का जायचे मोहून

स्वतःच राखेन प्रश्नाला भिडून

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

हे जग, ही माणसं म्हणजे वरवरचा मुलामा आहे. या मुलाम्याला मोहून मी खोट्याची साथ देणार नाही, त्यापुढे माझी मान तुकवणार नाही. स्वत्वाला सांभाळून मी खोटं पितळ उघडं पाडीन. केवढा हा आत्मविश्वास आणि कणखरपणा!

आक्रमण माझ्या जर अस्तित्वावरी

केले कुणी तर त्यांना डावलून

सिद्ध करेन मी माझ्या स्त्रीत्वाला

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

या शेवटच्या कडव्यात ती समाजातील पुरुषांना आव्हान देते की मी स्त्री आहे म्हणून मला कोणी कमी समजू नका. माझ्या अस्तित्वावर जर तुम्ही हल्ला केलात तर याद राखा. मी माझं स्त्रीत्व सिद्ध करेन.

या ठिकाणी मला सीतेच्या अग्नी दिव्याची प्रकर्षाने आठवण आली. आजची स्त्री ही खरंतर कोणत्याही क्षेत्रात तसूभरही मागे नाही. मात्र असे असून सुद्धा कितीतरी निर्भया आपण पाहतोच.

राधिका ताईंची ही कविता अशा विकृतींना शह देणारी आहे. ही कविता वाचताना आपल्याही नसानसातून रक्त खवळते. या मनोविकृतींचा अगदी संताप संताप होतो, हेच या कवितेचे यश आहे.

वीर रसाची एक सकारात्मक दृष्टिकोन असलेली ही कविता आहे.

यात तसे कोणतेही काव्यमय शब्द नाहीत, परंतु साध्या शब्दातूनही अंगार फुलणारे असे हे काव्य आहे.

दिंडी वृत्तातील ही कविता. प्रत्येक चरणात ९+१० अशा मात्रांचे बंधन असूनही चरणातील कोणताही शब्द मात्रा जुळविण्यासाठी वापरला आहे असे मुळीच वाटत नाही

‘धमन्यात आहे सळसळता प्रवाह ‘ – – मात्राबद्ध असूनही किती चपखल बसले आहेत पहा हे शब्द! वृत्तबद्ध काव्य करताना हीच तर कवीची खरी कसोटी आहे. राधिकाताई या कसोटीला पूर्ण उतरल्या आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

त्यांनी अशाच विविध विषयांवर प्रकाश टाकणाऱ्या, आणि समाज प्रबोधन करणाऱ्या कविता लिहाव्या आणि वाचकांचे मनोरंजनही करावे. त्यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी मी त्यांना सुयश चिंतीते.

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवन जगण्याची कला :- अध्यात्म – भाग – ३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

जीवन जगण्याची कला :- अध्यात्म – भाग – ३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

(श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणतात की ‘सतत नामात राहावे. ‘ आजच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘range’ मध्ये रहा. ‘Be Connected.’) – इथून पुढे — 

संत तुकाराम महाराजांची एक गोष्ट आहे.

महाराज वारीला जाताना नेहमी आपल्या मित्राला सोबत येण्यास सांगत. तो नेहमी एक कारण सांगे की मी येणारच होतो पण मला माझ्या ओसरीवरील खांबाने धरुन ठेवले आहे. एकदा उत्सुकतेने महाराज त्याच्या घरी गेले आणि बघतात तो काय? त्यांच्या मित्रानेच त्या खांबाला धरुन ठेवले होते. महाराजांनी मित्राच्या ते लक्षात आणून दिले आणि मग तो नित्य वारीला जाऊ लागला. आपलीही अवस्था त्या मित्रासारखीच आहे. फक्त आपल्या ओसरीवरील खांब थोड्या वेगळ्या प्रकारचे आहेत आणि मुख्य म्हणजे आपल्या ओसरीवर अनेक खांब आहेत. एक खांब असमाधानाचा आहे, एक काळजीचा आहे, एक भीतीचा आहे, एक द्वेषाचा आहे, एक आळसाचा, एक कटू वचन किंवा कटू वाणीचा आहे. हे सर्व खांब आपण सोडले तर आपण ‘तुकाराम महाराजां’बरोबर आनंदाने आनंदाच्या वारीला जाऊ शकतो. वारकऱ्यांना वारीत जाऊन जो आनंद मिळतो तो आनंद आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात लाभू शकतो. याची सूत्र आपल्याला अध्यात्मात मिळतात. संतांनी ती सूत्रे आचरणात आणून, पडताळून बघितली आणि मग आपल्या सारख्या सामान्य मनुष्याना सांगितली.

 “ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्तीं असूं द्यावे समाधान”

 — संत तुकाराम महाराज

हे वरील वचन संत तुकाराम महाराज जगले. ते जगले यामागे त्यांना काही सिद्ध करायचे नव्हते, त्यांना काही कमवायचे नव्हते, त्यांना लौकिक संपत्ती नको होती, त्यांना पदप्रतिष्ठा नको होती. म्हणून आज चारशे वर्ष होऊनही त्यांचे नाव अबाधित राहिले आहे. संत तुकारामांची गाढवावरून धिंड काढली गेली, त्यांचा प्रतिसाद होता, गावकरी चांगले आहेत, त्यांनी माझे खूप मोठं कौतुक केले, नाहीतर माझी मिरवणूक कोणी काढली असती ? मला सारा गावं बघता आले, त्यांच्या गळ्यात शिराळे, घोसाळे, आदी भाज्यांच्या माळा घातल्या तेव्हा ते म्हणाले, चला! चार दिवसांची भाजी सुटली”. जन्मजात सावकारी असतानाही दुष्काळात सर्व कर्जांचे कागद त्यांनी खातेदारांना परत देऊन टाकले. कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नसताना, आंदोलने केलेली नसताना, तसा सरकारी आदेश नसताना ‘उस्फुर्त कर्जमाफी’ केली. पुढे सावकारी बुडाली आणि दिवाळे निघाले तेव्हा सुद्धा तुकाराम महाराज यांनी फक्त प्रतिसादच दिला. बायको, मुले, भाऊ जेव्हा दुष्काळाची शिकार झाली, तेव्हा ते म्हणाले,

“बरे जाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली ॥ 

अनुतापे तुझे राहिले चिंतन, जाला हा वमन संसार ॥

बरे जाले जगी पावलो अपमान, बरे गेले धन ढोरे गुरे ॥ 

बरे जाले नाही धरिली लोकलाज, बरा जालो तुज शरण देवा ॥

बरे जाले तुझे केले देवाईल, लेकरे बाईल उपेक्षिली ॥

तुका म्हणे बरें व्रत एकादशी, केले उपवासी जागरण ॥”

त्याच्याही पुढे जाऊन ते म्हणतात,

*”बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता॥

विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥

बाईल मेली मुक्त जाली । देवे माया सोडविली ॥

विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥ 

पोर मेले बरे जाले । देवे मायाविरहित केले।

विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज।। 

माता मेली मज देखता । तुका म्हणे हरली चिंता ।। 

विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज।।”

इतके कर्तव्यनिष्ठुर होणे आपल्याला जमणार नाही, परंतु आपण प्राप्त स्थितीचा स्वीकार तरी नक्कीच करु शकतो. कारण एकच त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या प्रारब्धाचा खुल्या मनाने संपूर्ण स्वीकार केला आणि आयुष्यास समर्पक प्रतिसाद दिला. थोडा अभ्यास केला तर हा अलिखित नियम सर्व संतांनी काटेकोरपणे पाळला आहे असे आपल्या लक्षात येईल. संत ज्ञानेश्वर अर्थात माऊली,

संत मीराबाई, अगदी अलिकडील संत गाडगे महाराज, ह्या सर्वांनी आपल्या वाट्याला आलेले प्रारब्ध आनंदाने भोगून संपवले, झालेल्या हालअपेष्टा, यातना, उपेक्षा सहजपणे स्वीकारल्या. अर्थात ‘प्रतिसाद’ देऊन, कोणाही माणसावर आकस न ठेवता. माऊलींनी पसायदानात ‘खळ सांडो’ असे न म्हणता ‘खळांची व्यंकटी सांडो’ असे म्हटले हा सुद्धा प्रतिसादच!!

आयुष्याला तुमच्या तर्कशास्त्राशी वा तत्वांशी काहीही देणेघेणे नाही, ते आपापल्या पद्धतीने प्रवाही होत असते. अखेरीस तुम्हांला या जीवन प्रवाहातून प्रवाहित व्हायचे असते. म्हणून जीवनाला सर्वोत्तम प्रतिसाद द्या. कारण आयुष्य हे कधीही आपल्या तर्कशास्त्रावर चालत नाही.

बदल हा जीवनाचा सर्वश्रेष्ठ नियम आहे. गोपाळ कृष्णाच्या चरित्रात आपल्याला याचे दर्शन होते. ज्याला जन्म होण्याआधीपासूनच शत्रू मारायला टपले होते. जन्म झाल्यावर देखील लगेच स्वतःच्या आईला सोडून दुसऱ्या ठिकाणी जावे लागले, तिथे सुद्धा पुतना मावशी आलीच. आपण कृष्ण चरित्र बघतांना तो अवतार होता हा ‘समज’ मनातून काढून टाकूया. कृष्ण ‘समाजाच्या’ गरजेनुसार आणि लोकांसाठी उपयुक्त असेच जीवन जगला. वेळप्रसंगी स्वतःचे नाव खराब होईल याची त्याने तमा बाळगली नाही. आजही त्याला ‘रणछोडदास’ असे म्हटले जाते. राजपुत्र म्हणून जन्माला आलेला मुलगा एक गवळ्याच्या घरी वाढला, गुरुकुलात राहिला, अगदी सोळा सहस्त्र नारीचा पती झाला, पण प्रत्येक गोष्ट त्याने समाजाचे व्यापक हीत ध्यानात ठेऊन समाज केली. “मैं नही, तू ही” हे सूत्र श्रीकृष्णाने जीवनातील बदल आनंदाने स्वीकारत आजीवन पाळले. म्हणूनच ते ‘पुरुषोत्तम’ झाले. ह्यालाच ‘अध्यात्म’ म्हणतात. म्हणूनच श्रीकृष्ण आज प्रत्येक भारतीयाच्या मनात स्थान प्राप्त करून आहे.

अगदी अलिकडील उदा. घ्यायचे तर लोकमान्य टिळकांचे घेता येईल. मुलगा गेल्याची वार्ता कोणीतरी येऊन टिळकांना सांगितले, लोकमान्य त्यावेळी केसरीचा अग्रलेख लिहीत होते, ते सहज म्हणाले की अग्रलेख पूर्ण करुन येतो. हा धीरोदत्त पणा अध्यात्म जीवनशैलीतूनच येतो. इथे सुद्धा लोकमान्यांनी ‘प्रतिसादच’ दिला आहे आणि परिस्थितीचा आनंदाने स्वीकार केला आहे. स्वा. सावरकरांना ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली, तेंव्हा त्यांचे पाहिले उद्गार काय होते ? “पन्नास वर्षे ब्रिटिशांचे राज्य टिकेल ?” हा प्रतिसादच होता. सर्व क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी, शास्त्रज्ञ ‘अध्यात्म’च जगत आलेले आहेत.

‘प्रतिक्रिया’ ही अपरिहार्यता असू शकते पण ‘प्रतिसाद’ नेहमीच मनुष्याची खिलाडू वृत्ती दाखविणारा, उस्फुर्त आणि सकारात्मक असतो. जीवनाकडे परमेश्वराची ‘लीला’ म्हणून पाहणारा असतो. आत्मविश्वास दाखविणारा आणि जगण्याची उमेद वाढविणारा असतो.

म्हणोन आळस सोडावा ।

येत्न साक्षेपें जोडावा ।

दुश्चितपणाचा मोडावा ।

थारा बळें ।। दा. १२. ९. ८।।

 — समर्थ रामदास

आपण दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न अनेक वेळा करुन बघितला आहे. त्यात आपण किती यशस्वी झालो हे आपल्याला चांगलें कळले आहे. त्यामुळे आपण आता स्वतःला बदलूया, कारण ‘बदल स्वीकारणे’ आणि ‘स्वतःत बदल करणे’ हे दोन्ही आव्हानात्मक आहे. आपण बदललो की त्यामानाने जग बदलतेच.

“नजरे बदली तो नजारे बदले।

नाव ने कष्ती बदली तो किनारे बदले।”

एक दगडाचा व्यापारी होता. त्याच्याकडे विविध रंगाचे, विविध दर्जाचे, विविध आकाराचे दगड विकायला होते. एक भला मोठा दगड त्याच्याकडे बरेच दिवस पडून होता. तो दगड बरेच दिवस विकला जात नव्हता. एकदा एक कारागीर त्याच्याकडे आला. त्याला म्हणाला हा दगड मला देता का? बरेच दिवस तो पडून होता, म्हणून तो म्हणाला फुकट ने कारण त्याने माझी जागा अडवली आहे. कारागिराने तो दगड नेला, त्यातून सुंदर शिल्प तयार केले. एकदा व्यापारी त्याच्याकडे गेला असताना त्याने शिल्प बघितले. तो सुद्धा आश्चर्य चकित झाला. त्याने कारागिराचे तोंड भरुन कौतुक केले. म्हणाला, “तुम्ही चांगले शिल्प घडवले. त्यावर तो कारागीर म्हणाला की त्या दगडात आधीपासूनच ते शिल्प होते, मी त्याच्या आजूबाजूचा अनावश्यक भाग काढून टाकला”.

आपण सुद्धा ईश्वराचे अंश आहोत, लेकरे आहोत. आपल्यातील अनावश्यक भाग आपल्याला काढून टाकता आला तर आपल्या जीवनांचे देखील सुंदर शिल्प निश्चित बनू शकेल, यात शंका नाही. फक्त अनथक प्रयत्न अत्यावश्यक आहेत. नाहीतर मॉर्निंग walk ला जाण्यासाठी घड्याळाला गजर लावणे आणि सकाळी गजर वाजला की सवयीने तो बंद करणे हाच बरेच लोकांचा ‘व्यायाम’ असतो, तसे व्हायला नको.

अध्यात्माच्या आजच्या कालानुरूप नवीन व्याख्या कराव्या लागणार आहेत, त्या खालीलप्रमाणे असू शकतील.

१. ‘असेल तर असो, नसेल तर नको’ म्हणजे अध्यात्म

२. ‘हवे नको पण’ जाणे म्हणजे अध्यात्म …. विनातक्रार स्वीकार्यता (Unconditional acceptance) म्हणजे अध्यात्म.

३. कुटुंबाची, समाजाची, देशाची ‘आई’ होणे म्हणजे अध्यात्म, उदा. सिंधुताई सपकाळ उर्फ माई.

४. ‘मेरी झाशी नही दुंगी’ म्हणणे आणि तशी कृती करणे म्हणजे अध्यात्म.

५. स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणे म्हणजे अध्यात्म.

६. ‘श्रवण’ केल्याप्रमाणे कृती करणे म्हणजे अध्यात्म.

७. आपल्या कलागुणांचा, उपलब्ध साधन संपत्तीचा समाजासाठी उपयोग करणे म्हणजे अध्यात्म. इ.

‘जीवन जगण्याची कला- अध्यात्म ‘.. ह्या लेखाचा समारोप एका कवितेने करतो.

*

आत आपुल्या झरा झुळमुळे निळा स्वच्छंद।

जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद।।धृ।।

*

घन धारातुनी ख्याल ऐकतो रंगुनी मल्हाराचा।

बघता बघता मोरपिसारा साऱ्या संसाराचा।

मनात पाऊस बरसे उधळीत मातीचा मधुगंध।।१।।

*

दुःखाला आधार नको का? तेही कधीतरी येते।

दोस्त होऊनी हातच माझा आपुल्या हाती घेते।

जो जो येईल त्याचे स्वागत हात कधी न बंद ।।२।।

*

झाडाची झुलणारी फांदी कधी लावणी भासे।

साधा कोरा कागदही कधी चंद्र होऊनी हासे।

सर्वत्रच तो बघतो धुंदी, डोळे ज्याचे धुंद ।।३।।

*

कधी कुणाचे आसू पुसता बोटांनी हळुवार

हात होतसे वाद्य सुरांचे पाझरती झंकार

प्रेमाच्या या गाण्यासाठी प्रेमाचा हा छंद ।।४।।

*

कवी : श्री. मंगेश पाडगावकर 

– समाप्त – 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “अन्नसंस्कार — सर्वांना उत्तम अन्न मिळावे…” – लेखिका : सुश्री अमृता खंडेराव ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “अन्नसंस्कार — सर्वांना उत्तम अन्न मिळावे…” – लेखिका : सुश्री अमृता खंडेराव ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

आमची आई जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होती. तिच्या खेडोपाडी बदल्या व्हायच्या. मग माझे वडील त्या गावात जास्तीत जास्त चांगले घर भाड्याने मिळवायचे आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करायचे. वडिलांची जिल्हा बदली व्हायची आणि आईची गावागावात. त्यामुळे आम्ही सगळे फक्त शनिवारी रविवारी एकत्र यायचो.

ज्या गावात राहत आहोत त्या गावातल्या चांगल्या दुकानात आई किराणाचे खाते काढायची. एक दोनशे पानी वही केलेली असायची. तिला आम्ही किराणा वही असे म्हणायचो. किराणा वहीच्या सुरुवातीच्या पानावर आईचे नाव पत्ता लिहिलेला असायचा. फोन नसल्यामुळे फोन नंबरचा प्रश्नच येत नव्हता. पहिल्या पानावर ||श्री|| असे लिहून खाली क्रमवार किराणाची यादी केली जायची. महिन्याचा किराणा एकदम भरण्याची पद्धत होती. त्यानंतर एखादी गोष्ट संपली तर पुन्हा वहीत लिहून सामान आणावे लागायचे.

आणलेल्या सामानासमोर त्याची किंमत लिहून त्याखाली त्याची टोटल मारून किराणा दुकानदार सही करायचा. दर महिन्याला पगार झाला की आई त्याचे बिल चुकते करायची. घरोघरी अशा किराणा वह्या असायच्या आणि किराणा भरायची हीच पद्धत होती‌. दर महिन्याला किराणाच्या पिशव्या घरी आल्यानंतर आई त्या स्वच्छ जागी ठेवायची. त्याच्या भोवती पाणी फिरवून हळदीकुंकू वाहायची आणि नंतर सामान डब्यात भरले जायचे. दर महिन्याला डबे घासून सामान भरायची पद्धत होती. आम्ही भावंडे किराणा सामानातले कपड्याचे आणि अंगाचे साबण काढून त्याची गाडी गाडी खेळायचो. साबण रॅकमध्ये जाईपर्यंत हा खेळ सुरू राहायचा.

थोडक्यात किराणा आणणे हा सुखकारक सोहळा असायचा. यादी लिहिण्यापासून ते सामान डब्यात जाईपर्यंत शेंगदाणे मुरमुरे गूळ खोबरे मनसोक्त तोंडात टाकायला मिळायचे.

आई जेव्हा किराणाच्या पिशव्यांची पूजा करून हात जोडायची त्यावेळी मी सुद्धा तिच्याबरोबर हात जोडायची. आईच्या चेहऱ्यावर कृतार्थ भाव दिसायचा. कष्टाने मिळविलेल्या अन्नाचा सन्मान करणे आणि त्याला सांभाळून वापरणे हा साधासुधा संस्कार होता. बोधीच्या जन्मानंतर किराणा भरल्यावर मी पूजा करताना छोटा बोधी पण हात जोडायचा आणि डोके जमिनीवर टेकवून पिशव्यांना नमस्कार करायचा. त्यानंतर तोही सामानातले साबण काढून गाडी-गाडी खेळायचा….

अन्न ही मनुष्याची मूलभूत गरज आहे. अन्न मिळाल्यानंतर मनुष्याला आनंद होणे साहजिक आहे. अन्न जेव्हा कष्ट केल्यावर मिळते तेव्हा सात्विक आनंद होतो. तृप्तता मिळते. जेव्हा अन्न भ्रष्टाचाराने किंवा अयोग्य मार्गाने किंवा एखाद्याला लुटून मिळते तेव्हा ते अन्न आरोग्य आणि शांतता देऊ शकत नाही.

दुसऱ्यावर अन्याय करून किंवा भ्रष्टाचाराने मिळवलेले अन्न खाल्ल्यानंतर अन्नदोष निर्माण होतो. असे अन्न रोग आणि मानसिक त्रास निर्माण करते. कलह आणि लसलस निर्माण करते. असले अन्न खाताना संपूर्ण घरदार एकमेकाकडे चोरटेपणाने किंवा संशयितासारखे पाहत असते.

आपण अन्न तयार केल्यानंतर त्यातले चार घास दुसऱ्याला देण्याची इच्छा निर्माण होते तेव्हा लक्ष्मी प्रसन्न होते. भुकेल्याच्या मुखात चार घास दिले तर घर सकारात्मक ऊर्जेने भरून जाते. म्हणून भारतीय दर्शनात अन्नदानाला फार महत्त्व दिले गेले आहे. अन्नदान तुमच्यातली दुसऱ्याची भूक जाणण्याची क्षमता विकसित करते. तुम्हाला माणूस म्हणून जगायला मदत करते.

लॉकडाऊन च्या काळात तर लोकांना किराणा सामानाचे महत्त्व फारच पटले. त्याकाळी भीतीपोटी लोक दुप्पट किराणा भरू लागले. किराणा दुकान उघडल्याबरोबर पटकन सामान आणून ठेवू लागले. गरजूंना गावोगावी किराणाचे किट वाटले गेले. खरोखरच किराणा सामानाला आयुष्यात अनन्य साधारण महत्त्व आहे. महिन्याचा किराणा एकदम घरात येणे हे संसारातले फार मोठे सुख आहे. दिवाणखान्यातले महागडे डेकोरेशन किंवा भारी-भारी शोभेच्या वस्तू हे घराचे सौंदर्य नसून, गहू, तांदूळ, साखर, डाळींनी भरलेले डबे हे घराचे खरे सौंदर्य आहे.

घरात शिधा भरलेला असला तरच कुठलीही बाई शांत चित्ताने राहू शकते‌. अन्नाची विवंचना संपल्याशिवाय कुठल्याही स्त्रीचे मन स्थिर होऊ शकत नाही. आपल्याला कोणी अन्न दिल्यानंतर आपण हात जोडून नमस्कार करावा आणि त्याचे आभार मानले पाहिजेत‌

दिलेल्या अन्नाचा कृतज्ञतेने स्वीकार करावा कारण अन्न हे पूर्णब्रह्म आहे. ते तुमचा पिंड पोसते. अन्न फक्त रक्त धातू मांस मज्जा इतकेच निर्माण करते असे नाही तर भावना आणि विचारसुद्धा अन्नातूनच निर्माण होतात. हे अन्नाला पूर्णब्रह्म मानण्यामागचे खरे कारण आहे. म्हणूनच सात्विक अन्न खाल्ल्यानंतर मिळणारी तृप्ती आणि शांतता याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही.

अन्न बाह्यस्वरूपी निर्जीव दिसत असले तरी ते शरीरात गेल्यानंतर ऊर्जा निर्माण करते. अन्नामध्ये पोटेन्शिअल एनर्जीचा मोठा साठा असतो‌. जिवंत शरीरात गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण करण्याची अन्नात क्षमता असते. अन्न जेव्हा बीज रूपात असते आणि मातीत पेरले जाते त्यावेळी ते पुन्हा नवीन अन्नाची निर्मिती करण्याइतके सक्षम असते.

अन्न हे पूर्णब्रह्म हे अगदी खरे आहे‌

लेखिका : सुश्री अमृता खंडेराव.

प्रस्तुती : मोहन निमोणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ यशवंत आयुष्याची ‘सारथी’ ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

☆ यशवंत आयुष्याची ‘सारथी’ ☆ श्री संदीप काळे ☆

एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी ओडिशात गेलो होतो. कार्यक्रम संपल्यावर ओडिशामध्ये काही ठरवलेल्या ठिकाणी भेट देण्यासाठी मी बाहेर पडलो. ओडिशातल्या बालेश्वर इथं एका पत्रकार मित्राकडं जेवणानंतर पायी आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर निघालो. आईस्क्रीम खात आम्ही एका बाकावर बोलत असताना एक व्यक्ती बाजूला क्लासमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची गोष्ट हिंदीमधून त्या समोर बसलेल्या युवकांना सांगत होती.

त्या शिकवणाऱ्या माणसाला मला भेटायचं आहे, असं मी त्या पत्रकार मित्राला म्हणालो. तो पत्रकार मित्र आतमध्ये गेला. आतमध्ये जाऊन तो बाहेर आला आणि मला म्हणाला, ‘‘शिकवणारे आमच्या भागातलेच उपविभागीय अधिकारी आहेत. आपण क्लास सुटला की, त्यांना भेटू.’’

क्लास सुटला, आम्ही त्यांना भेटायला गेलो. मी बोलताच क्षणी त्यांच्या लक्षात आले, मी महाराष्ट्राचा आहे असा. बोलण्यातून त्यांचा चांगला परिचय झाला. माझ्याशी बोलणारे ते अधिकारी अवघ्या २८ वर्षांचे होते. ते यूपीएससी पास होऊन ओडिशामध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू झाले होते.

प्रथमेश अरविंद राजेशिर्के असं या अधिकाऱ्याचं नाव. ते कोकणातल्या चिपळूण तालुक्यातील मांडकी या गावचे. आम्ही दोघेजण बोलत होतो. प्रथमेश यांचा सर्व प्रवास थक्क करणारा होता.

प्रथमेश व त्यांचे कुटुंबीय कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. प्रथमेशही दवाखान्यामध्ये अभ्यास करत होते. परिस्थिती अत्यंत हलाखीची, त्यामुळे घरी बसून परीक्षा देण्याशिवाय प्रथमेश यांना पर्याय नव्हता. या काळात एका मित्राच्या माध्यमातून ‘सारथी’ या पुण्यामधल्या शासकीय संस्थेची माहती मिळाली. शिक्षणासाठी मुलांचा खर्च पूर्णपणे उचलला जातो, असं प्रथमेश यांना कळालं.

प्रथमेश ‘सारथी’च्या परीक्षेला बसले. ती परीक्षा पास झाले. त्यांना ‘सारथी’मुळे तेरा हजार रुपये दर महिन्याला मिळत गेले. दिल्लीच्या क्लासची संपूर्ण फी ‘सारथी’ने भरली होती. प्रथमेश म्हणाले, ‘‘मी ‘सारथी’चे प्रमुख असलेले काकडे सर यांना भेटलो. त्यांनी दिलासा दिला. माझ्या आजारपणातही ते माझ्यासोबत होते.

माझ्या आयुष्यात ‘सारथी’चा दोन अर्थाने महत्त्वपूर्ण वाटा आहे. एक माझ्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये आर्थिक साह्य करून मला उभं केलं आणि दुसरं जबरदस्त असे मार्गदर्शन, मेंटॉरशिप दिली. जर त्या काळामध्ये ‘सारथी’ने मला हात दिला नसता तर मी आणि माझ्यासारखे कित्येक मित्र कदाचित घरीच राहिले असतो. ’’ 

मी प्रथमेशला म्हणालो, ‘‘तुम्ही ओडिशाच का निवडलं?’’ 

प्रथमेश म्हणाले, ‘‘मला आदिवासी बांधवांची सेवा करायची होती. इथल्या अनेक युवकांना मला लाल दिव्याच्या गाडीत बसवायचं होतं. ते मी केलेही. मी सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करावं, ही माझ्या वडिलांची फार इच्छा होती; पण जेव्हा माझा यूपीएससीचा निकाल लागला, तेव्हा ते सगळं बघायला वडील नव्हते. ’’ वडिलांच्या आठवणींमध्ये भावनिक झालेल्या प्रथमेश यांचा निरोप घेऊन मी परतीच्या मार्गाला निघालो. ‘सारथी’ इतक्या मोठ्या प्रमाणात काम करते, हे मला माहिती नव्हतं.

ओडिशा इथून मला कामानिमित्त थेट पुण्याला जायचं होतं. शनिवारी सायंकाळी पुण्यामध्ये पोहोचलो. काही जणांना भेटण्यासाठी मी त्यांची वाट पाहत होतो. प्रवीणदादा गायकवाड, राहुल पापळ, विलास कदम, अशी सगळी मंडळी आम्ही एका ठिकाणी बसलो होतो. बोलता बोलता मी प्रवीणदादा यांच्याकडे सारथीचा विषय काढला. प्रवीणदादाने मला सारथीच्या कामाविषयी भरभरून सांगितलं. मी वारंवार ज्या सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे सरांविषयी उल्लेख करत होतो, त्या काकडे सरांविषयी प्रवीणदादा गायकवाड खूप चांगले सांगत होते. त्यांनी काकडे सरांना फोन लावून माझ्याकडे फोन दिला.

मी अत्यंत नम्रपूर्वक त्यांना माझी ओळख सांगत मला तुम्हाला भेटायचं आहे, अशी त्यांना विनंती केली. त्यांनी मला सकाळी भेटायला या असं सांगितलं.

फोन ठेवल्यावर प्रवीणदादा म्हणाले मराठा, कुणबी समाजाच्या मुलांच्या भविष्य, करिअर यासाठी सारथी सारखा महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट काळाची गरज बनला होता. मराठा, कुणबी समाजामध्ये सारथीमुळे शिक्षणाचे प्रमाण खूप वाढलं. युपीएससी, एमपीएससी मध्ये सरकारी नोकरीमध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या वाढली. सारथीने प्रमाणपत्र, आर्थिक मदत, मार्गदर्शन या स्वरुपात शाब्बासकी दिल्यामुळे नववी पासून मुलं अभ्यासाकडे वळली. त्यांना शिष्यवृत्ती मिळू लागली. आई-वडील तिकडे वळले. मुलांमध्ये अभ्यास करण्याची स्पर्धा लागली. जयंती, पुण्यतिथीच्या नावाखाली वर्गण्या मागणारे मुलं एमपीएससी, यूपीएससी करण्यासाठी दिल्लीला जायचे असे म्हणू लागले. त्यासाठी सारथीने सर्व आर्थिक मदत केली. त्या सर्वांसोबातची आमची बैठक संपली.

मी बाणेरला गेस्ट हाऊसला गेलो. ‘सारथी’वर आलेले अनेकांचे लेख वाचून काढले. बातम्या, अनेकांनी केलेले संशोधन मी वाचलं. मराठा, कुणबी समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यासंदर्भात २०१८ मध्ये मराठा समाजाचे अनेक मोर्चे निघाले. त्यात मराठा समाजाच्या मुलांचा शैक्षणिक विकास व्हावा, अशी मागणी होती. या मागणीतून अत्यंत बुद्धिमान, संवेदनशील, दूरदृष्टी असलेल्या देवेंद्र फडणवीस या अभ्यासू अशा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ‘सारथी’ची सुरुवात केली. दिवसेंदिवस आर्थिक अडचणीमध्ये दारिद्र्याच्या गाळामध्ये फसणाऱ्या मराठा, कुणबी समाजातील मुलांचे ‘सारथी’मुळे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ लागलं.

‘सारथी’चा चार तास अभ्यास केल्यावर माझ्या लक्षात आलं, ‘सारथी’ने मागच्या चार वर्षांत चार लाखांपेक्षा अधिक तरुणाईचे मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केलं. मी या कामामुळं प्रचंड भारावून गेलो. तेवढ्या रात्री मी देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला, त्यांचे अभिनंदन केले. त्यांनीही मला प्रतिसाद दिला. देवेंद्र यांनी ‘सारथी’च्या माध्यमातून झालेले सामाजिक काम, भविष्यामध्ये ‘सारथी’च्या माध्यमातून मराठा, कुणबी समाजाचा होणारा उद्धार त्याचे नियोजन अगदी नेमकंपणानं माझ्यासमोर ठेवलं.

सकाळी लवकर उठून ‘सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांची भेट घेण्याचं ठरवलं. काकडे सर (९८२२८०८६०८) यांनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. बाहेर एक व्यक्ती झाडाला पाणी घालत होती. एकीकडे ते बगिचा साफ करत होते तर दुसरीकडे झाडांना पाणी घालत होते.

‘‘काकडे सरांचं घर इथंच आहे का?’’ असं मी त्यांना विचारलं, त्यांनी होकाराची मान हालवली. हातामध्ये असलेलं पाणी झाडांना घातलं. हात धुतले आणि डोक्याचा लावलेला रुमाल काढत त्यांनी हात पुसले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही सकाळचे संदीप काळे का?’’ मी म्हणालो, ‘‘हो. ’’ ‘‘या आतमध्ये. मीच काकडे. ’’ मला काही क्षण आश्चर्य वाटलं. आम्ही आतमध्ये गेलो.

काकडे सर यांच्या पत्नी शरदिनी नाश्ता घेऊन आल्या. त्यांनीही मला खुशाली विचारली. मी ‘सारथी’विषयी ऐकलं होतं. जो ‘सारथी’विषयी अभ्यास केला होता, त्याच्या पलीकडे जाऊन मला काकडे सरांनी ‘सारथी’चे अनेक पैलू सांगितले. छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं ‘सारथी’ सुरू झाली त्या छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम इथं उभं राहिलंय.

काकडे सरांनी काही पत्रं माझ्यासमोर ठेवली आणि ती मला वाचायला सांगितली. ती पत्र खूप भावनिक होती. कोणाच्या आई, वडील, बहिणीचं, कुण्या यशस्वी झालेल्या युवक- युवतींची ती पत्रे होती. तुम्ही ‘सारथी’च्या माध्यमातून मदत केली नसती तर माझ्या आयुष्याचं काय झालं असतं? काम करून शिकणं एवढं सोपं नव्हतं? योग्य वयात योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ दिलं. काकडे सर तुम्हीच आई-बाबा झालात, असं त्या पत्रातला मजकूर सांगत होता. ती पत्रं नव्हती, तर लाखो यशस्वी झालेल्या तरुण मनांचा हुंकार होता.

मराठा आणि कुणबी समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास व्हावा, या उद्देशाने २०१८ ला सुरू झालेले सारथी प्रामुख्याने शेती करणाऱ्या मराठा, कुणबी समाजासाठी उपयोगाला आली. नांदेडला जिल्हा परिषदेमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमामध्ये जबरदस्त कामगिरी केलेल्या आयएएस काकडे सर यांची मुद्दाम ‘सारथी’साठी निवड केली गेली.

एका छोट्याशा शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या काकडे सर यांचे वडील वामनराव शिक्षक होते. आई सुभद्रा गृहिणी होत्या. शेतकऱ्यांच्या गरीब मुलांसाठी काकडे सर यांनी काहीतरी करावं, असं त्यांच्या आई-वडिलांना नेहमी वाटायचं. त्यांच्या अनेक ठिकाणच्या विशेष कामगिरीतून ते दिसलंही. पण सारथीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या कित्येक मुलांना मिळालेला लाल दिवा पाहायला काकडे सर यांचे आई-वडील आज नव्हते याचे मलाही खूप वाईट वाटत होते.

मी आणि काकडे सर ‘सारथी’कडे निघालो. रस्त्याने जाताना पुन्हा काकडे सर ‘सारथी’च्या शाबासकीचा महिमा मला सांगत होते. मागच्या चार वर्षांत पाचशे एक्कावन तरुण एमपीएससी परीक्षेमध्ये अव्वल ठरले. तर या चार वर्षांमध्ये यूपीएससीमध्ये ८४ तरुणांनी जबरदस्त यश संपादन केलं. केंद्र शासनाच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पात्र ठरवूनही मेरीटमध्ये नंबर न लागणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सारथी’ने हेरलं आणि त्यांच्या आयुष्याचा उद्धार केला. नववीपासून ते वयाच्या चाळीस वर्षांपर्यंत ‘सारथी’ मध्ये कितीतरी प्रकारच्या शिक्षणासाठी मदत केली जाते.

अनेक व्यक्ती, अनेक संस्था अनेक सामाजिक कार्यकर्ते ‘सारथी’च्या कामांमध्ये वेळ देत आहेत. परवा लागलेल्या एमपीएससी, यूपीएससीच्या निकालामध्ये बारा मुलं आयएएस झाले, तर अठरा मुली आयपीएस झाल्यात. आता ‘सारथी’ अजून विस्तार करत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह, प्रशिक्षण केंद्र यासाठी भर देत आहे.

काकडे सर यांच्याकडे इतक्या यशोगाथा होत्या, इतके अनुभव होते की, ते एका लेखांमध्ये मांडणे मला शक्य नव्हतं. रविवार असूनही आज ‘सारथी’ला काकडे सर यांना भेटण्यासाठी आलेली मुला-मुलींची संख्या कमी नव्हती. त्या मुला-मुलींमध्ये अनेक पालक असे होते की, ज्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यातल्या अनेकांनी हातामध्ये काकडे सरांच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी हार आणले होते. काकडे सरांनी ‘सारथी’ मधून मला अनेक गरीब, शेतकरी, मजूर, वडिलांची मुलं असणाऱ्या आयपीएस, आएएस यांच्याशी माझं बोलणं करून दिलं. त्यांचं म्हणणं एकच होतं, ‘सारथी’ने मदत केली नसती तर आमच्या आयुष्यामध्ये हा सोन्याचा क्षण आला नसता.

मी काकडे सरांचा निरोप घेऊन परतीच्या मार्गाला निघालो. काकडे सरांनी निघताना मला छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र भेट म्हणून दिले. पुस्तकाच्या कव्हरवरचे शाहू महाराज पाहून माझे डोळे पाण्याने भरून आले. त्या ‘सारथी’च्या प्रत्येक कामात मला शाहू महाराज दिसत होते.

शासनाचा एखादा उपक्रम पिढ्यानपिढ्या प्रेरणा देणारा कसा असू शकतो, याचं सर्वोत्तम उदाहरण माझ्यासमोर ‘सारथी’ होते. शासनाचे अनेक प्रकल्प आहेत, त्यात प्रचंड पैसा असून काय करता? केवळ उपक्रम आहे, असं म्हणून चालत नाही, तर ते राबवणारे डोके सक्षम पाहिजे. काकडे सरांच्या माध्यमातून, त्यांच्या टीमच्या माध्यमातून ती सक्षमता तिथे मला दिसत होती.

आपल्या अवतीभोवती पिढ्यानपिढ्यांचा उद्धार करणारे असे अनेक उपक्रम असतील, त्या प्रकल्पाला तुम्ही-आम्ही सगळ्यांनी हातभार लावणं गरजेचं आहे, बरोबर ना.. !

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “किस्से कोर्टातले…” – लेखक : ॲड. श्री रोहित एरंडे ☆ प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “किस्से कोर्टातले…” – लेखक : ॲड. श्री रोहित एरंडे ☆ प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

किस्से कोर्टातले… 

जिवंतपणी अन्न-अन्न आणि मेल्यावर पिंडदान…”

सध्या पितृपंधरवडा चालू आहे. आपल्या पितरांना / पूर्वजांना सद्गती मिळावी असा विश्वास असणारे पक्ष विधी करत असतात.

मात्र दरवर्षी पितृपंधरवडा सुरू झाला की एक जुनी केस आठवते..

आई – वडील गेल्यावर श्राद्ध पक्ष करा किंवा करू नका, पण ते जिवंत असताना तरी त्यांच्याशी नीट वागणे जास्त महत्वाचे आहे हे लक्षात येते.

आमच्याकडे एक केस होती. आई – वडिलांचा स्वतःचा बंगला होता आणि त्यात ते सुखाने राहत होते. मुलगा त्याच्या नोकरीसाठी त्याच्या कुटुंबाबरोबर परदेशी राहत होता.. मध्येच त्या मुलाला PhD करायची होती आणि त्याची फी खूप जास्त होती.. म्हणून त्याने आई वडीलांमागे टुमणे लावले की बंगला विकून त्याचा हिस्सा द्यावा. आई – वडिलांनी परोपरीने त्याला सांगितले की त्यांच्या मृत्यूनंतरच तुलाच ही मिळकत मिळेल, अशी भांडणे कशाला करतो आणि हा बंगला त्यांनी अत्यंत कष्टाने बांधला आहे, तिथे उत्तम बाग केली आहे, त्यांच्यानंतर तो त्यालाच मिळेल, पण व्यर्थ.. मुलाचे सल्लागार त्याची बायको आणि बायकोचे भाऊ..

मुलाने आम्हाला सल्ल्यासाठी फोन केला. मी म्हटले तुम्हाला आवडेल असा सल्ला देता येणार नाही, तर योग्य तो सल्लाच देईन आणि तो असा की आई वडिलांच्या स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये त्यांच्या हयातीमध्ये मुलांना काही हक्क नसतो..

मुलाने आई वडिलांशी संबंधच तोडून टाकले, ना फोन ना काही, आई-वडील वेड्या आशेने नातवंडांच्या फोनची वाट बघायचे..

नंतर सुमारे ७-८ महिन्यांनी वडील आजारी पडले आणि गेले आणि नंतर लगेचच आई पण गेली, पण एकाच्याही आजारपणाला किंवा अंत्यविधीला हे चिरंजीव ” कार्यबाहुल्यामुळे” येऊ शकले नाहीत !! 

नंतर एक – दोन वर्षांनी गणपतीच्या सुमारास त्या मुलाचा मला फोन आला की, ” सर मी पितृपंधरवड्यामध्ये पुण्याला येतोय, मला तुम्हाला भेटायचे आहे.. ” त्या प्रमाणे तो आला आणि विचारले की आई वडिलांनी काही विल करून ठेवले आहे का? मी सांगितले माझ्याकडे तरी नाही.. पण मी विचारले की अहो, तुम्ही आता अचानक कसे काय आलात, आई वडील गेल्यावरही आला नाहीत ?

तो म्हणाला, ” अहो काय सांगू, You know I’m trying hard for PhD admission but not been able to get through for some or the other reason… आणि आता बंगल्याचे पण काहीतरी करायला हवे ना ? “

नंतर म्हणाला, “अजून एक कारण आहे.. खरे तर माझा या श्राद्ध पक्ष या गोष्टींवर काही विश्वास नाही.. पण अहो गेले काही महिने आमच्याकडे सतत आजारपणे, माझ्या नोकरीत भांडणे, PHD admission मध्ये अडचणी, असे प्रकार चालू आहेत. मग माझ्या बायकोने तिच्या आईच्या सांगण्यावरून कोणाला तरी ऑनलाईन पत्रिका दाखवली, तेव्हा त्यांनी सांगितले की आई वडिलांचे श्राद्ध, पिंडदान केले तरच हे प्रकार थांबू शकतील, म्हणून आता बायकोच्या हट्टाखातर आलोय ” असे तो म्हणाल्यावर मी निःशब्द झालो..

मनात म्हटले, “Poetic Justice किंवा कर्माचा सिद्धांत म्हणतात तो हाच की काय ? आई वडील जिवंत असताना त्यांच्याशी भांडायचे, त्यांचे अंत्यदर्शन घ्यायलाही यायचे नाही आणि आता हे प्रकार करायचे. “जिवंतपणी अन्न-अन्न आणि मेल्यावर पिंडदान” ही म्हण आज प्रत्यक्षात बघितली.. असे किंवा त्यासारखे प्रकार कोर्टात घडताना दिसतात आणि नात्यापेक्षा पैशाला किंमत जास्त आहे असे दिसून येते.. पण असे करून सुख किंवा मानसिक शांतता लाभते का ? 

मला तरी या प्रश्नाचे उत्तर नाही असेच वाटते… What goes around comes around हे खरे.

लेखक : ॲड. श्री रोहित एरंडे

प्रस्तुती : श्री जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मुक्ती…” – लेखिका : सुश्री स्वाती नितीन ठोंबरे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “मुक्ती…” – लेखिका : सुश्री स्वाती नितीन ठोंबरे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

योगिनी सकाळी लवकरच उठली. आज वर्षश्राध्द होतं ना तिचं…! चोच घासली, पंख फडफडवले आणि आकाशातून खाली झेपावली घराकडे जाण्यासाठी…

वर्षभरापुर्वी याच घरातून निरोप घेतला होता तिनं सगळ्यांचा. तसा कारभार लवकरच आटपला होता तिचा. क्षुल्लक आजाराचं निमित्त झालं. मग एकात एक दुखणी. वर्ष-दीड वर्ष अंथरुणात… आणि एक दिवस सकाळी खेळ संपला! 

अगदी भरल्या संसारातून उठावं तसं झालं. मोठी २० वर्षांची आणि धाकटी १७ वर्षांची. म्हटलं तर दोघी सज्ञानच… पण आई म्हणून योगिनीचा जीव तुटायचा.

मोठी जगन्मित्र… सतत मित्र-मैत्रिणींचा गराडा. बहुधा घराबाहेरच बराचसा वेळ. अभ्यासात तशी हुशार… पण फारसं लक्ष नसायचं तिचं अभ्यास करण्यात. ‘hi mom… bye mom…’ केलं की पायात सॅन्डल्स सरकावून स्कूटीला कीक मारून पोरगी पसार!

कधी घरात सापडलीच, तर चार समजुतीच्या गोष्टी सांगण्याची पण सोय नाही… ‘मॉम्, प्लिज लेक्चर नको!’ मित्रपरिवार चांगला असला तिचा, तरी या वयात नको ती आकर्षणं काय कमी असतात का? मग योगिनी चिंता करत बसायची.

धाकटीचं तंत्र वेगळंच… ती अगदीच घुमी होती. सगळ्यात अलिप्त. तिला ना कधी आनंद व्यक्त करताना बघितलं, ना कधी दु:ख… तिच्या मनात काय चालू आहे, याचा थांगपत्ताही ती कधी लागू द्यायची नाही.

कधी कधी योगिनीला वाटायचं, ही आपलीच मुलगी का…? कसलाच संवाद नाही तिच्याशी! योगिनीच्या नवऱ्याच्या वळणावर गेली होती बहुधा… कारण तोही असाच अलिप्त, कोरडा. ऑफिसात पाटी टाकून घरी आला की, बराचसा वेळ टिव्ही बघण्यात, सोफ्यावर लोळण्यात जायचा त्याचा.

डोंबिवली–चर्चगेट प्रवास करून, दमून भागून योगिनी संध्याकाळी घरात यायची, तरी हा सोफ्यावरच…! तिच्या येण्याची दखलसुद्धा नाही. योगिनी होती म्हणून चार माणसं जोडून होती. नातेवाईकांचं येणं-जाणं, रीतीप्रमाणं देणं-घेणं, कार्याला हजेरी, कुणाचं हळदीकुंकू, डोहाळजेवण, बारसे, मुंज, लग्न… सगळे हिनंच बघायचं.

योगिनी आता घराकडे झेपावली… मुलींना डोळे भरून बघायला आतुर झाली होती ती. जरा कानोसा घेतला किचनच्या खिडकीत बसून, पण काही हालचाल दिसेना.

‘काव… काव…’ करत, पंख सावरत, कठड्यावरून चालत योगिनी हॉलच्या खिडकीपाशी आली. फोटो दिसला तिचा भिंतीवर… हार घातलेला.

नवरा आणि धाकटी एकमेकांना चिकटून बसले होते सोफ्यावर… ‘अंगानं भरली ही…’ धाकटीकडे बघत योगिनी स्वतःशीच पुटपुटली. घर तसं टापटीप दिसत होतं. ती जाताना जसं होतं तसंच… तिनं लावलेल्या तुळशीनं पण चांगलाच जोम धरला होता.

खिडकीबाहेर कपडे वाळत घातले होते. अगदी एका रेषेत… सुरकुतीसुद्धा नाही! योगीनीला जरा नवलच वाटलं. इतका टापटीपपणा ना कधी नवऱ्यानं दाखवला, ना कधी मुलींनी…! श्राद्धाची मात्र काही तयारी दिसेना. योगिनी हिरमुसली.

जरासंच पुढं माहेर होतं तिचं… आई थकली असेल, वाट बघत असेल… योगिनी माहेरच्या कठड्यावर विसावली. तिची आवडती जागा होती ती. तिथं बुचाचं गच्च भरलेलं झाड होतं. त्याच्या फुलांचा वास योगिनीला फार आवडायचा.

आईची चाहूल कुणी न सांगताच कळली तिला… हातात ताट घेवून थबकत आई कठड्यापाशी आली. नजरेनंच खूण पटली…

“घे बाई, भरपेट खा… तुझ्या आवडीचे भाजणीचे वडे केलेयत. केळ्याची कोशिंबीर आणि साय-भात… तुला आवडतो तस्साच. मुली एका वर्षात मोठ्या झाल्यात. मोठी धाकटीची अगदी आईच्या मायेनं काळजी घेते. मुलींची आत्या आणि काकू तर एक दिवसाआड एक फेरी मारतातच तुझ्या घरी… मुलींचे सगळे लाड अगदी प्रेमानं होतायत… आणि जावईबापूसुद्धा जातीनं कुकर लावतात. अगदी बेसिक, पण थोडा स्वयंपाकही करतात…

“श्राद्धाची तयारी घरी दिसली नाही म्हणून नाराज होऊ नकोस. तुझी मोठी… तुला आवडणारा शिरा घेऊन सकाळीच गेलीये अनाथाश्रमात मुलांना वाटायला… धाकटीनं तुला आवडणारं बटमोगर्‍याचं रोप लावलंय आज अंगणात…

“घडी नाही विस्कटली तुझ्या संसाराची… तू होतीस म्हणून सगळे लाडावलेले होते. मात्र घराला जे वळण लावून तू निघून गेलीस, त्या वळणानं हळूहळू का होईना नीटनेटका प्रवास चाललाय त्यांचा… 

“आता गुंत्यातून मोकळी हो… तू बावीस वर्षं सिंचलेलं संस्काराचं रोपटं छान फोफावलंय… आणि तुझ्या मुलींना आणि नवऱ्याला कवेत घेऊन भक्कमपणे उभं आहे, हे बघ आज… आणि निश्चिंतपणे मुक्त हो!”

लेखिका : स्वाती नितीन ठोंबरे

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवन जगण्याची कला :- अध्यात्म – भाग – २ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

जीवन जगण्याची कला :- अध्यात्म – भाग – २ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

(आजपर्यंत जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यांनी कधीही आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांना प्रतिक्रिया दिलेली नाही तर विवेकाने ‘प्रतिसाद’ दिला आहे.) – इथून पुढे

यशापयश हे सुद्धा सुखदुःखासारखेच सापेक्ष आहे. अमुक मार्क मिळविले, अमुक महाविद्यालयात प्रवेश मिळाला, नामांकित कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली, परदेशात जाता आले, मोठ घर बांधता आले, महागडे वाहन विकत घेता आले किंवा एखादे स्वप्न सत्यात आणता आले तर आपण यशस्वी झालो आणि यामधील मोजक्याच गोष्टी करता आल्या किंवा यातील काहीच जमलं नाही तर मी अपयशी झालो. ही दोन्हीही वाक्ये अर्धसत्य आहेत. जोपर्यंत आपण हिंमत हरलेलो नाही तोपर्यंत आपण अपयशी असूच शकत नाही. जीवनातील यश हे नेहमी कोणते शिखर पार केले यापेक्षा ते पार करताना किती अडथळे आले यावर ठरत असते आणि ठरायलाही हवे. एखादं वेळेस लौकिक दृष्ट्या मनुष्याला अपयश येऊ शकते. पण या सर्व घडामोडीत, धबडग्यात ‘मनुष्य’ म्हणून आपले मूल्य वाढविणे हे सुद्धा यशस्वी होणेच होय. एका वाक्यात यश म्हणजे काय सांगायचे असेल तर खालील प्रमाणे सांगता येईल. “मरावे परी कीर्ती रूपे उरावे।” तसेच यशाची आणिक एक सोपी व्याख्या आहे. ‘आपल्याला लौकीक जीवनात किती यश मिळालं यापेक्षा आपल्याला दुसऱ्यांना यश मिळविण्यासाठी किती मदत करता आली’.

समाधान नावाची कोणतीही वस्तू बाजारात मिळत नाही. ज्याला स्वतःला नक्की काय हवे आहे हे योग्य वेळी कळते, तो ते मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, कधीकधी तो गोष्ट मिळतेच असे नाही. पण तरीही आपण पुरेसे कष्ट घेतले, योग्य ते प्रयत्न केले असे समजून ही माणसे नवीन जोमाने परत कार्यरत होताना दिसतात. यश मिळालं नाही तर रडत न बसता केलेल्या प्रयत्नातून अमुक एक गोष्ट शिकता आली याचेही त्यांना समाधान असते. कोणतेही काम उरकण्यापेक्षा त्यांचे कामाच्या परिपुर्णतेकडे जास्त लक्ष असते.

“मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण।”

किंवा

“रण जिंकून नाही जिंकता येत ‘मन’।

‘मन’ जिंकल्याशिवाय नाही जिंकता येत रण।।”

आधुनिक विज्ञान असे सांगते की जी गोष्ट जितकी सूक्ष्म असते ती अधिक शक्तिशाली आणि नियंत्रित करण्यासाठी जिकिरीची असते. अणुबाँब किंवा अणुशक्ती ही याची उत्तम उदाहरणे आहेत. मानवी मन यापेक्षा सूक्ष्म असते. अणू प्रयोगशाळेत तरी दाखवता येईल पण मनाचा थांगपत्ता लागणे अतीमुश्किल !!

म्हणून कोणतेही संत असोत, त्यांनी सर्वप्रथम उपदेश आपल्या मनाला केला असावा. नुसता उपदेश केला नाही तर मनाला प्रसन्न करुन घेण्याचे विविध मार्ग त्यांनी आपल्यासाठी सहज उपलब्ध करुन दिले आहेत. मुळात मन प्रसन्न का करायचे? याचा आधी विचार करायला हवा. मला जीवनाकडून नक्की काय हवे आहे? मनुष्य म्हणून माझा जन्म झाला असेल तर मनुष्य म्हणून माझे काही विहित कर्तव्य असलेच पाहिजे. जगात कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही असे विज्ञान सांगते, तर माझा जन्म झाला याला काहीतरी प्रयोजन नक्कीच असणार. ? मनुष्य म्हणून आपण सर्व सारखे असलो तरी आपण एकाच कारखान्यात उत्पादीत केलेले एकाच वजनाचे, एकाच सुगंधाचे ‘साबण’ नाही. त्यामुळे प्रत्येकाचे जीवनध्येय वेगवेगळे असणे स्वाभाविक आहे. ते जीवनध्येय शोधणे आणि त्यानुसार आचरण करणे हे मनुष्याचे आद्यकर्तव्य असले पाहिजे. पण मनुष्य देहबुद्धीच्या अधीन जाऊन ‘आहार, निद्रा, भय आणि मैथुन’ यालाच आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता मानतो आणि

*”पुनरपि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनं” याच चक्रात फिरत राहतो.

आतापर्यंत आपण सामान्य मनुष्य कसा वागतो, त्याचे दुष्परिणाम काय होतात, त्यामुळे मनुष्याचे कसे नुकसान होते हे आपण पाहिले. प्रत्येकाला आनंद / समाधान हवे आहे पण ते का मिळत नाही हे सुद्धा आपण पाहिले. आता तो कसा मिळवायचा ते आपण पाहूया.

सर्वप्रथम आपले एकमत आहे ना की आपल्याला आपल्या जीवनात आनंद हवा आहे. सर्वाना मान्य असेल तर आपण पुढे जाऊ. धन्यवाद.

आपला आजचा विषय आहे जीवन जगण्याची कला:- अध्यात्म !! अर्थात कोणतीही कला शिकायची असेल तर ती शिकण्यासाठी काही नियम असणे स्वाभाविक आहे.

१. ही सृष्टी निसर्गनियमानुसार चालते

२. आपण सुद्धा यासृष्टीचे एक अविभाज्य घटक आहोत.

३. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायाने वरील सर्व नियम मलाही तंतोतंत लागू होतात.

४. मी आजपासून दृढनिश्चय केला आहे की मला ‘आनंदी जीवन जगण्याची’ कला शिकायची आहे.

५. त्यामुळे ही कला शिकण्यात यशस्वी होणे ही सर्वस्वी माझी जबाबदारी आहे.

६. सामान्य मनुष्याला साधारणपणे जबाबदारी झटकण्याची थोडी सवय असते असे आपल्या लक्षात येईल. प्रत्येक गोष्ट सरकारने करावी असा त्याचा मूक हट्ट असतो. त्याला यो योग्य जागी व्यक्त करता येत नाही, त्यामुळे त्यातून अपेक्षित लाभ त्याला होत नाही आणि झालाच तर तो योग्य वेळी मिळत नाही. थोडक्यात त्याचा अपेक्षाभंगच होतो. एकदा त्याने स्वतः स्वतःची जबाबदारी घेतली तर ‘अचानक उन्हात चांदणे पडावे’ असा त्याच्यामध्ये, त्याच्या दृष्टिकोनात बदल झाल्याचे दृष्टीस पडते. कालपर्यंत नकोसे असलेले तेच जग दृष्टिकोन बदलल्यामुळे त्याला आज अधिक आकर्षक वाटू लागते.

समाजात सध्या काही शब्दांचे खरे अर्थ पुन्हा एकदा समजावून सांगण्याची गरज आहे असे जाणवते. तसेच बऱ्याच शब्दांचे अर्थ समजून घेण्यात किंवा समजून देण्यात आपण गल्लत करीत आहोत असे वाटते. त्यात प्रामुख्याने ‘धर्म’ आणि ‘अध्यात्म’ हे दोन शब्द येतात किंवा आज आपल्या विषयाशी निगडित असे हे दोन शब्द आहेत. आधी आपण धर्म म्हणजे काय ते पाहू. सध्या आपल्याकडे धर्म हा शब्द ‘पंथ’ (religion) या अर्थाने शासनाने स्वीकारला आहे आणि शालेय अभ्यासक्रमातून तेच शिकविले गेल्यामुळे मागील पिढीपासून हाच अर्थ मनामध्ये रुजला आहे. यामुळे धर्म या शब्दाबद्दल अनेक समजुती/गैरसमजुती समाजात रुढ झाल्या आहेत असे जाणवते. जो सर्वांची धारणा करतो, तो धर्म! आपल्याकडे मातृधर्म, पितृधर्म, राजधर्म, पुत्रधर्म असे विविध धर्म सांगितले गेले आहेत. वरील शब्दांतून मनुष्याचे कर्तव्य प्रगट होते. पण सध्या पूजपाठादि कर्म म्हणजे धर्म, उपासतापास म्हणजे धर्म. सणसमारंभ म्हणजे धर्म अशा अनेक चुकीच्या समजुती समाजात रुढ झाल्या आहेत. देवळात जाणे आणि धर्मापर्यंत जाणे यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. देवळात जाणे ही भौतिक, शाररिक घटना आहे. धर्मांजवळ जाणे ही आत्मिक घटना आहे. देवळापर्यंत जाणे ही भौतिक यात्रा आहे, ही अध्यात्मिक यात्रा नव्हे. ज्याची अध्यात्मिक यात्रा सुरु होते त्याला सारी पृथ्वीचं मंदिरासारखी दिसायला लागते. आणि मग मंदिर कुठे आहे, हे शोधणं त्याला कठीण होऊन जातं. मानणं हा धर्म नाही तर जाणणं हा धर्म.

अध्यात्म म्हणजे भगवी वस्त्रे, अध्यात्म म्हणजे गळ्यात माळ, अध्यात्म म्हणजे जपतप, अध्यात्म म्हणजे कर्मकांड, अध्यात्म म्हणजे उपासतापास, अध्यात्म म्हणजे तिर्थ यात्रा, अध्यात्म म्हणजे दानधर्म, अध्यात्म म्हणजे देवदर्शन, अध्यात्म म्हणजे ब्रह्मचर्य, अध्यात्म म्हणजे वारी, अध्यात्म म्हणजे कथा कीर्तन, अध्यात्म म्हणजे भजन पूजन, अध्यात्म म्हणजे गुरू, अध्यात्म म्हणजे अनुग्रह/दीक्षा, अध्यात्म म्हणजे मठ मंदिर, अध्यात्म म्हणजे गूढ, अध्यात्म म्हणजे फक्त बिनकामाच्या लोकांचा उद्योग, अध्यात्म म्हणजे दासबोध, ज्ञानेश्वरी गाथा इ. ग्रंथांचे वाचन, अध्यात्म म्हणजे साठीनंतर वेळ घालवण्याचे साधन असे अध्यात्म शब्दाचे अनेक अर्थ आज समाजात रूढ आहेत. पण अध्यात्म या शब्दाच्या काही समर्पक अर्थ पुढीलप्रमाणे असू शकतील. अध्यात्म म्हणजे निरासक्ती ( detachment), अध्यात्म म्हणजे प्रतिसाद आणि सर्वात चांगला आणि सर्वाना सहज समजेल असे दोनच शब्द ‘आई’!! आनंदी किंवा अध्यात्मिक जीवन जगण्यासाठी एकतर ‘सर्वांची आई’ व्हा अन्यथा ‘सर्वांना आई’ माना.

आई म्हणजे वात्सल्य. बाळाला जन्म देऊन फारतर एखादी स्त्री जन्मदात्री होऊ शकेल आई होण्यासाठी अधिक काही असण्याची, करण्याची निश्चित गरज आहे. आई कधी रागावते का? सगळा दया-क्षमा-शांतीचा कारभार!. ज्यांनी प्रत्येक स्त्री मध्ये मातृत्व बघितले ते संत झाले आणि ज्या मातांनी आपल्या मुलांना प्रत्येक स्त्रीकडे बघताना, समाजाकडे बघताना, देशाकडे बघताना पुत्रभावाने बघायला शिकविले ते महापुरुष झाले. भारतातील सर्व महापुरुष महान मातृभक्त होते. जो मातृभक्त नाही तो महान होऊच शकत नाही. आज ‘मातृत्व’भावाचा अभाव असल्यानेच अनेक समस्या भीषण रूप धारण करीत आहेत. आपण खऱ्या अर्थाने ‘मातृत्व भावना’ पुनः प्रस्थापित करु शकलो तर पन्नास टक्के समस्या आपसूक संपतील.

एक संतवचन आहे, “आपल्या बायकोतील आई दिसायला लागली साधक पक्का झाला.”

हा ‘भाव’ जागृत रहावा म्हणून पूर्वी स्त्रिया स्वतःची ओळख मी अमक्याची आई अशी करुन द्यायच्या. छोट्या छोट्या गोष्टींचा मनुष्याच्या मनावर परिणाम होत असतो हे आज आधुनिक विज्ञान सुद्धा मान्य करते. आपल्या पूर्वसूरींना किती सूक्ष्म विचार केला होतां याचे हे आपल्या यावरुन लक्षात येईल. मेमरी कार्ड वरील एखादा bite खराब झाला तर अख्खे memori card corrupt होते, तसेच मनावरील तृष्णेचा एखादा छोटासा डाग देखील आयुष्याच्या नाशास कारणीभूत होऊ शकतो. शिल्प घडवताना कारागीर पुरेशी सावधनाता बाळगून काम करतो. अगदी त्याचप्रमाणे मानवी जीवनाचे शिल्प घडवताना अखंड सावधानता बाळगणे अत्यावश्यक आहे.

म्हणून समर्थ म्हणतात, “अखंड सावधान असावे।” तर तुकाराम महाराज म्हणतात, “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग।” तर श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणतात की ‘सतत नामात राहावे. ‘ आजच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘range’ मध्ये रहा. ‘Be Connected.’

– क्रमशः भाग दुसरा 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणींची पेटी… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ आठवणींची पेटी… ☆ सुश्री नीता कुलकर्णी

माढ्याच्या काकू.

आता पक्ष पंधरवडा सुरू झाला आहे पितरांचं स्मरण करायचं.. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची.

श्राद्धपक्ष करायचं. गोडधोड करायचं. पितरांच स्मरण करून तर्पण करायचे… म्हणजे त्यांना तृप्त करायचे..

त्यासाठी आई वडील सासू सासरे …. यांच्या बद्दल लेख लिहून झाले.

मनात विचार आला … फक्त पितरंच कशाला? पितरांप्रमाणेच आपल्याला प्रेम, माया, स्नेह देऊन ज्यांनी आपलं आयुष्य घडवलं त्यांची थोडीशी आठवण काढू…

म्हणून हा माढ्याच्या काकूंवर लेख लिहिला – – – – 

… लग्न होऊन मी पुण्यासारख्या शहरातून सोलापूर जवळच्या माढा या छोट्याशा गावात गेले. हे तिथल्या स्टेट बँकेत नोकरीला होते. एका डॉक्टरांच्या वाड्यात वरच्या मजल्यावर आम्ही राहत होतो. डॉक्टरांच्या आईंना काकू म्हणत असत. त्यांचा मला मोठा आधार वाटायचा. मी बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडूनच शिकले.

वाड्याच्या दरवाज्याच्या दारात एक मोठा आडवा कट्टा होता. संध्याकाळ झाली की त्या कट्ट्यावर काकु येऊन बसायच्या. आसपासच्या बायका गप्पा मारायला यायच्या. जाणारे येणारे थांबून बोलायचे.

गावात लायब्ररी होती. पुस्तकं बदलायला, भाजी आणायला मी संध्याकाळी बाहेर जात असे. येताना काकु म्हणायच्या … ” ये बैस थोडावेळ “

तो कट्टा म्हणजे गंमतच होती. अनुभवानी मला तर त्या कट्ट्याच वेडच लागलं. रोज तिथं काहीतरी नवीन घडायचं.

चार घर पलीकडे टाकून असलेली कमला लहान बाळाला घेऊन आली. “काकु बघा ना. हा नुसता रडतोय झोपतच नाहीये. “

” अग जरीची कुंची घातलीस टोचतीय बाळाला. “

” माझ्या आईनी शिवलीय”

” म्हणून काय झोपताना घालशील? जा साध टोपडं घेऊन ये” 

काकुंनी कुंची काढली. पदरानी बाळाचा चेहरा, मान पुसली. पेपर घेऊन वारा घालायला लागल्या.. काही वेळातच बाळ गाढ झोपलं. जरा वेळाने येऊन ती बाळाला घेऊन गेली.

एक वेडसर मुलगा कधीतरी यायचा.

” ये बस ” काकुंनी म्हटलं की तो जमिनीवरच बसायचा. आत जाऊन त्याला पोळी, भाजी एखादं गोड काही असेल ते घेऊन यायच्या. मला म्हणाल्या,

” अशी माणसं देवाची असतात बघ.. देवानंच त्यांना असं घडवले. त्यांचा कधी राग राग करू नये. मनाने निर्मळ आहे ग ते लेकरू”

एक अतिशय सुंदर, शालीन बाई जरीची साडी नेसलेली डोक्यावरून पदर घेतलेली रस्त्याने जाताना काकुंना ” बऱ्या आहात का “?म्हणाली

” हो मी बरी आहे”

” जरा देवीला जाऊन येते. “

“ये हो”

मी म्हटल “किती सुंदर आहेत ह्या बाई. कोण आहेत”

“तू नवीन आहेस. तुला अजून काही माहित नाही. “

तेवढ्यात एक बाई म्हणाली.. ” खूप मोठं घर आहे तिचं… आणि हंड्या, झुंबर आहेत तिच्या घराला “

मी म्हटलं ” कधीतरी बघायला पाहिजे “

लगेच काकु कडक आवाजात मला म्हणाल्या, ” खबरदार काही बघायला जायची जरूर नाही. तिच्या घरी कधी जायचं नाही. पाटलाची रखेल आहे ती. “

… मी एक धडा घेतला.

पलीकडच्या घरातली नुकतच लग्न झालेली नवीन सून घाबरतच आली. ” काकु वांग्याच्या भाजीत जास्तीच मीठ झालंय. सासुबाई गावाला गेल्यात. काय करू?”

” चार बटाटे उकडून भाजीत घाल. तिखट, कूट घाल. “

” पण त्यानं वाढीव भाजी होईल.. ” 

” उद्या राहिलेल्या भाजीत ज्वारीचे पीठ, तिखट, मीठ, कोथिंबीर घाल आणि त्याची थालीपिठं कर “

“चांगली होतील का “?

“अग करून तर बघ. आणि लक्षात ठेव अशा गोष्टी पुरुषांना सांगायच्या नसतात”

दुसरे दिवशी ती सांगत आली, ” सगळ्यांना थालपीठं फार आवडली. कोणाला काही कळलं नाही. अगदी तुला मला झालं. “

…. संसाराला सुरुवात करतानाच अन्नाचा मान राखायचा, वाया घालवायचं नाही. हा संस्कार तिला मिळाला आणि मलाही…

एके दिवशी मी खाली कट्ट्यावर गेले नव्हते. शेजारची बायडी मला बोलवायला आली.

” खाली चला काकूंनी तुम्हाला बोलावलंय. बायजा येणार आहे. “

कोण बायजा मला कळेना. खाली गेले तर कट्टा फुल भरलेला होता. खाली मातीत सुद्धा बायका बसल्या होत्या. एक साधीशी बाई डोक्यावरून पदर घेतलेली…. तीच बायजा ओटीवर बसली होती. मला फारच उत्सुकता लागली. सगळ्या जमल्या तस काकूंनी तिला सांगितलं 

” हं कर सुरू “

बायजानी संत तुकाराम, संत नामदेव, ज्ञानेश्वर महाराज यांचे अभंग सुरेल आवाजात म्हटले. एक जण म्हणाली,

” ए ते जनीच गाणं म्हण ना, तुझं ते गाणं आम्हाला आवडत. “

मग जनाबाईची गाणी झाली. गोड आवाजात जात्यावरच्या ओव्या बायजानी म्हणून दाखवल्या.

आज वाटतं तेव्हा त्या लिहून ठेवायला हव्या होत्या. सगळ्या तिचे कौतुक करत होत्या.

… नंतर लक्षात आलं की तिथे एका गायिकेचा लाईव्ह कार्यक्रम सादर झाला होता. जाणारे येणारे पण ऐकत उभे होते. काकुंनी तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला…

“देवानी आवाजाची देणगी दिली आहे तुला. भाग्यवान आहेस बघ. ” बायजानी काकूंना वाकून नमस्कार केला. बायजाच्या कलेचा छोटासा सन्मान त्यांनी केला. इतरांना त्याचा आनंद दिला… किती गोड कल्पना… एखाद्याच्या कलेला कशी दाद द्यावी हे मी शिकले.

काकूंचा मुलगा डॉक्टर होता. पण पेशंट काकुंनाच औषधं विचारायचे. घरगुती उपायांची तर त्यांच्याकडे पोतडीच होती.

गुराखी, रात्री येणारा रामोशी जाताना दिसला की त्याला जवसाची, तिळाची, दाण्याची चटणी दे. नाहीतर जे काही घरात असेल ते त्याला बोलवून त्या द्यायच्या.

माझ्या मुलाला आनंदला पहिला भात त्यांनीच भरवला. काकुंनी सांगितलं

“लहान लेकराला सारखं घरात ठेवू नये. सगळीकडे न्यावं म्हणजे लेकराला काही बाधत नाही. “

आज लक्षात येतं … मुलांची प्रतिकारशक्ती सहज कशी वाढवायची हे काकूंनी मला शिकवलं.

ही जुनी जाणती माणसं म्हणजे चालती बोलती ज्ञानाची पुस्तकं असतात. हे आज लक्षात येतं.

जगात वावरताना लागणाऱ्या अनेक गोष्टी नकळतपणे मी त्या कट्ट्यावर शिकले.

रोज काहीतरी तिथं नवं घडत असायचं. कधी तरी काकू एकट्या पण असायच्या…

सुनेला भाकरी करता येत नाही अशी तक्रार करण्याला बाईला त्या म्हणाल्या.. ” लोकाची पोर आपल्या घरी आली आहे. आता ती आपली झाली आहे. घे सांभाळून… पुरुषांच्या चार भाकरी तू कर. तिच्या तुटक्या भाकरी तुम्ही खा. हळूहळू शिकेल ती पोर… “

त्यांच इतकं सहज सोपं तत्वज्ञान होतं. प्रश्न फार पुढे जाऊ द्यायचेच नाहीत. तिथल्या तिथे उपाय सांगायच्या…

अशी निर्मळ मनं, प्रेमळ नाती अनुभवायला मिळाली आजही काकू… आणि त्यांचा तो कट्टा स्मरणात आहे.

एकदा काकू एकट्याच कट्ट्यावर होत्या. म्हटलं 

“आज कोणी नाही तर तुम्हाला करमत नसेल ना ?”

तर म्हणाल्या, ” सांगू का तुला.. कोणी नसेल ना तर मी आपला ‘श्रीराम जय राम जय जय राम ‘ जप करत बसते. तो रामराया आपल्या जवळ आहे असं वाटतं बघ. ” 

असं खरखुरं अध्यात्म काकू जगत होत्या……

“ साधं सोपं जगणं हीच श्रीमंती आहे. ”.. हे काकूंच्या वागण्यावरून मी शिकले. अशी माणसं आयुष्य समृद्ध करतात. आणि आयुष्यभर लक्षात राहतात. ही माणसं आयुष्यात आली हे माझ भाग्यच..

… आज त्यांच्या आठवणीने गहिवरूनच आलं आहे … थांबते आता इथं….

© सुश्री नीता कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सर, मुझसे अच्छा कौन कर सकता है?” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

सर, मुझसे अच्छा कौन कर सकता है?” ☆ श्री संभाजी बबन गायके 

(मारता, मारता.. मरे तो झुंजणारा कमांडो ! ) 

03-00-01-10… Three Overs-No Maiden-One Run-Ten Wickets.

ज्यांना क्रिकेटची भाषा समजते त्यांना वरील आकडेवारीचा अर्थ निश्चित समजेल. इतरांसाठी सांगतो… तीन षटके गोलंदाजी केली, त्यातील एकही षटक निर्धाव गेले नाही.. एक धाव दिली आणि दहा बळी घेतले! एकाच डावात सर्वच्या सर्व गडी बाद करायचे म्हणजे दहा बळी घ्यायचे, असे क्रिकेट इतिहासात आजवर केवळ तीन वेळा घडले आहे. १९९९ मध्ये अनिल कुंबळे याने पाकिस्तानविरुद्ध ही कामगिरी केली होती आणि त्याची ही कामगिरी अजूनही लोकांच्या लक्षात आहे.

– – – पण लढाईच्या मैदानावर खरोखरच्या कसोटीत दहा बळी घेणा-या आणि त्या प्रयत्नात स्वत:ही बळी गेलेल्या एका श्रेष्ठ सैनिकाची कहाणी लोकांच्या लक्षात नाही, कारण ती कुणाला ठाऊक नाही… म्हणून हा एक अल्प प्रयत्न!

वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकीत, आरंभी साधा शिपाई म्हणून सैन्यात भरती झालेला तो नौजवान स्वयंस्फूर्तीने PARA SF म्हणजे PARACHUTE SPECIAL FORCE च्या नवव्या रेजिमेंट मध्ये २००२ मध्ये दाखल झाला आणि बघता बघता लान्स नायक पदावर पोहोचला.

स्पेशल फोर्स खरेच नावाप्रमाणे विशेष असते. यांतील निवड प्रक्रिया अतिशय आव्हानात्मक असते. आधी निष्णात Parachute Diver (हवाई छत्रीच्या साहाय्याने विमानातून उडी मारणारे) व्हावे लागते, नंतरच्या अधिक कठीण प्रशिक्षणात इतर भयावह कामांसह काही तासांत शंभर किलोमीटर्सचे अंतर पायी पार करायचे, त्यात खांद्यावर दहा किलो वजन आणि सात किलो वजनाचे शास्त्र वाहून न्यायचे, अशी अनेक आव्हाने असतात. थोडक्यात सांगायचे तर, ह्या गटात सामील होऊन ‘Balidaan Badge’ मिळवायला वाघाची छाती, सिंहाची हिंमत, हत्तीचे बळ, घोड्याचे चापल्य आणि पाषाणाचे काळीज लागते. हा मान मिळवण्यासाठी आलेल्या सैनिकांपैकी केवळ दहा ते पंधरा टक्केच सैनिक स्पेशल ठरतात! याचाच अर्थ उत्तमातून सर्वोत्तम सैनिक निवडले जातात. आणि यातील एक सैनिक गमावला जाणे, म्हणजे देशाची केवढी मोठी हानी होते, हे लक्षात घेतले जावे!

भारताच्या इतर सीमांच्या तुलनेत पाकिस्तानला लागून असलेल्या जम्मू काश्मीर येथील सीमेवर गेली कित्येक वर्षे काही न काही घडत असते. याच भागातून पाकिस्तानी अतिरेकी भारतात घुसतात आणि स्थानिक युवकांना हाताशी धरून, भडकावून भारत देशविरोधी कारवाया करतात. या अतिरेक्यांना रोखून धरण्याचे काम राष्ट्रीय रायफल्स सारखे सैन्य विभाग करीत असतात. PARA Special Force चे commandos सुद्धा इथे तैनात असतात. गरज पडली तर अतिरेकी सीमेत घुसण्याच्या बेतात असताना त्यांच्या सीमेत घुसून त्यांना संपवण्याचे धाडसी कामही आपले जवान पार पाडतात. हे कमांडो छोट्या छोट्या गटांनी आपली कामगिरी बजावत असतात. आजवर सुमारे आठ हजार अतिरेकी भारतीय सैन्याने यमसदनी धाडले असून सहा हजार जणांना जिवंत पकडले आहे. आणि या प्रयत्नात शेकडो भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे…. यावरून काय ते समजावे! आजही, या क्षणीही हे छुपे युद्ध सुरु आहे. आजही आपली पोरं मारत आहेत आणि मारत आहेत! याची जाणीव आपण सतत ठेवली पाहिजे.

आजचे आपले कथानायक मोहन नाथ गोस्वामी उत्तराखंड मधील नैनीताल मधील लालकुंआ जवळच्या इंदिरानगर गावात ५ मे, १९८४ रोजी जन्मले. त्यांचे वडील सैन्यातच कार्यरत होते. त्यांच्यापासून स्फूर्ती घेउन मोहन नाथ सैन्यात भरती झाले. अतिशय नीडर, शूर आणि पराक्रमी असलेल्या मोहन नाथ यांना काश्मीर मधील खरोखरची लढाई खुणावत होती. अतिरेक्यांना मारण्यासाठी त्यांचे हात शिवशिवत होते. २००५ मध्ये त्यांनी para sf स्पेशल फोर्सेस मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज दिला आणि अत्यंत कठीण प्रशिक्षण पूर्ण करून ते 9, Parachute Battalion Commando बनले. भीती नावाचा शब्द शब्दकोशात नसलेले मोहन नाथ अगदी आरंभापासून सर्व मोहिमांमध्ये आघाडीवर असत. दहा वर्षांत ते लान्स नायक पदावर पोहोचले. 13625566W हा त्यांचा सर्विस क्रमांक होता. खरं तर सेवाज्येष्ठ असल्याने आता त्यांना सतत प्रत्येक मोहिमेवर जाण्याची गरज नव्हती. इतर कनिष्ठ सहकाऱ्यांना ते पुढे पाठवू शकत होते. त्यांचे वरिष्ठही त्यांना तसे सुचवत… पण मोहन नाथ यांना कर्तृत्व गाजवून दाखवायचे होते.. देशासाठी शत्रूला नेस्तनाबूत करण्यात त्यांना जास्त रस होता.. ते कुटुंबियांना नेहमी सांगायचे… मरुंगा तो दस बारा दुष्मनोको मार कर!

“सर, मुझसे अच्छा कौन कर सकता है?” ते सिनिअर अधिकारी साहेबांस मोहिमेवर पाठवा असा हट्ट धरीत… आणि म्हणत… मी करून दाखवेन, साहेब!

आणि तसा एक नव्हे तर लागोपाठ तीन प्रसंग घडले. कुपवाडा परिसरात ६, राष्ट्रीय रायफल्स तैनात होती. 9, Para SFसुद्धा इथे सक्रीय होती. अतिरेकी शोध आणि विनाश मोहीम हाती घेतली गेली २२ ऑगस्ट, २०१५ रोजी रात्री. पाकिस्तानातून काही अतिरेकी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात होते. मोहन नाथ गोस्वामी आपल्या तुकडीतील इतर कमांडो साथीदारांसह अतिरेक्यांना भिडले. या धुमाश्चक्रीत आपला एक सैनिक जायबंदी झाला. भीषण गोळीबाराची तमा न बाळगता मोहन नाथ यांनी त्या साथीदाराला खांद्यावर घेतले आणि सुरक्षित जागी पोहोचवले आणि पुन्हा मोर्चा सांभाळत ३ अतिरेक्यांचा खात्मा केला. लगेचच २६ ऑगस्ट, २०१५च्या रात्री ते पुन्हा मोहिमेत सामील झाले आणि विजयी होऊन परतले. आणखी तीन बळी मिळवले होते! यावेळी मूळ पाकिस्तानी असलेला एक कुप्रसिद्ध अतिरेकी जिवंत पकडण्यात आपल्या सैन्याला यश मिळाले. या दोन मोहिमांमध्ये सहा अतिरेकी खलास केले गेले. २ सप्टेंबर, २०१५… तिसरी मोठी मोहीम निघाली… अर्थातच मोहन नाथ गोस्वामी सर्वांत पुढे होते…. कुपवारा जिल्ह्यातील हापरुदा येथील घनदाट जंगलात अतिरेक्यांचा एक मोठा गट घुसल्याची माहिती मिळाली…. या लबाड श्वापदांना सापळा रचून जेरबंद करण्याची योजना होती. रात्रीचे आठ सव्वा आठ झाले असतील… अचानक चार अतिरेकी टप्प्यात आले… दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरु झाला. मोहन नाथ यांचे दोन सहकारी जबर जखमी झाले.. अतिरेक्यांनी त्यांना पुरते घेरले होते आणि त्या दोघांच्या जीवाला मोठा धोका होता.. मोहन नाथ आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सहकारी कमांडोसह आडोसा सोडून बाहेर आले… गोळीबार सुरूच होता… चार पैकी एकाला त्यांनी अचूक ठोकले… उरलेले तीन अतिरेकी गोळीबार करीत पुढे येत असतानाच… मोहन नाथ साहेबांनी त्यांच्यावर झेप घेतली… साहेबांच्या मांडीमध्ये गोळ्या घुसल्या… पण त्याची काळजी न करता ते पुढे सरकले… त्यांनी आणखी एक बळी घेतला… त्याच्या थेट काळजात गोळी घातली… दुसऱ्याला गंभीर जखमी करून त्याला मरणपंथावर ढकलला… आता मोहन नाथ यांच्या छातीत गोळ्या घुसल्या होत्या… त्यांनी चौथ्या अतिरेक्याच्या अंगावर वाघासारखी झेप टाकली… त्याच्या छाताडावर गन टेकवून ट्रिगर ओढला… आणि आणखी एक अतिरेकी नरकात धाडला. पण तो पर्यंत मोहन नाथ साहेबांच्या जखमांतून प्रचंड रक्तस्राव झाला होता. या मोहिमेत त्यांनी चार अतिरेकी ठार मारण्यात मोलाची कामगिरी बजावली होती आणि शिवाय आपल्या तीन साथीदारांचे प्राणही वाचवले होते.. स्वत:चे प्राण देऊन! सलग ११ दिवसांत हाती घेतलेल्या अतिरेकीविरोधी ३ मोहिमांत commando लान्स नायक मोहन नाथ गोस्वामी यांनी १० अतिरेकी ठार मारण्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता… आणि एकाला जिवंत पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती! “दहा शत्रू तर नक्कीच मारीन” हे त्यांचे शब्द त्यांनी खरे करूनच प्राण सोडले…. सर, मुझसे अच्छा कौन कर सकता है? या त्यांच्या प्रश्नाला एकच उत्तर होते.. लान्स नायक मोहन नाथ गोस्वामी साहब… आप जैसा बहादूरही इस काम को अंजाम दे सकता है!

या अतुलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने लान्स नायक मोहन नाथ गोस्वामी, 9, PARA SF Commando यांना मरणोत्तर अशोकचक्र (शांतता काळातील सर्वोच्च सैन्य सन्मान) प्रदान करून गौरवले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगी आहे.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवीची ओटी… लेखिका – सुश्री संजना इंगळे ☆ संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

🌼 देवीची ओटी… लेखिका – सुश्री संजना इंगळे ☆ संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

“मध्ये कुठेही थांबू नकोस, 10 च्या बसने तडक गावच्या लक्ष्मी मंदिरात ये… “

“हो सासूबाई.. “

“आणि काय काय घ्यायचं लक्षात आहे ना. ?”

“हो पण.. परत एकदा सांगता का, चेक करून घेते.. “

“किती गं वेंधळी तू, देवीची ओटी कधी भरली नाहीये का?? बरं एक काम कर, तुपाचा दिवा लागेल… तूप घे एका डबीत.. देवीसाठी एखादी साडी घे, बांगड्या आणि नारळ.. थोडीशी फुलं… आलं का लक्षात??”

“हो हो सासूबाई.. “

नीरा आज ऑफिस ला उशिरा जाणार होती, महत्वाची मिटिंग होती त्यात नीरा चे sugestions वापरण्यात येणार होते… पण सासूबाईंचा हट्ट…

नीरा आणि सूरज नोकरीनिमित्त फ्लॅट मध्ये रहात होते… सासर 30 किमी वर होतं… देवीची ओटी भरायची म्हणून सासूबाई गावच्या मंदिरात जाणार होत्या, सूनबाईनेही ओटी भरावी म्हणून त्यांनी तगादा लावला.. नीरा ने सासूबाईंच्या शब्दाचा मान ठेऊन त्यांना प्राधान्य दिलं आणि तयारीनिशी ती निघाली.. धावपळ बरीच झालेली तिची…

अखेर ती बस पकडून मंदिरात पोचली, सासूबाई तिचीच वाट बघत होत्या..

“हे काय?? ड्रेस वर आलीस?? साडी तरी घालायची… “

“अहो आई इथून सरळ ऑफिस ला जायचं म्हणून.. “

“काय बाई आजकालच्या मुलींना देवाधर्माचं काही कळत नाही.. बरं चल ओटी भरून घेऊ.. “

दोघीजणी आत गेल्या… तिथे एक वृद्ध पुजारी होते… देवीसमोर ओटी ठेवली की ते घेत असत.. आणि आत गाभाऱ्यात देवीला ठेवत..

त्यांना पाहून नीरा हसली, त्यांनीही प्रतिसाद दिला..

“तुम्ही ओळखता काय एकमेकांना??”

“हो… आम्ही.. “

“ते जाऊदे, गुरुजी ओटी भरून घ्या देवीला.. “

सासूबाई तिला तोडत म्हणाल्या… सासूबाईंनी साग्रसंगीत एकेक वस्तू परंपरे प्रमाणे देवीला वाहिली… नीरा गोंधळून गेली… तिला काही समजेना नक्की काय करायचं..

“आधी हळद कुंकू वाहा… अगं हे बोट नाही, त्या बोटाने.. आता अक्षता.. आता साडी ठेव, त्यावर पाच मुठा तांदूळ… एक मूठ परत घे… नारळ दे… “

नीरा सासूबाईंच्या सांगण्याप्रमाणे सर्व करत होती.. सासूबाई मधेच ओरडल्या..

“अगं ही कुठली साडी?”

“मी दिवाळीत काही साड्या घेतलेल्या, ही काही वापरत नाही मी.. “

“अगं एक दीड हजार ची साडी आहे ती… देवीला साधी 100 रुपयाची साडी द्यायची असते.. अरे देवा.. दिवाळी काढणार ही मुलगी… आणि हे तुप कुठलं?”

“घरी कढवलेलं… “

“अगं दिव्यासाठी बाजारातून स्वस्तातलं तूप आणायचं… आणि ह्या बांगड्या??”

“माझ्याच… नवीन घेतलेल्या, पण वापरल्या नाहीत.. “

सासूबाई डोक्याला हात लावतात… देवीला हात जोडतात, “देवी माते… सुनबाई अजून नादान आहे, तिची चुकी माफ कर, आणि ओटीचा स्वीकार करून आम्हाला पाव बाई.. “

गुरुजी सगळं बघत असतात, हे सगळं बघून म्हणतात..

“देवी तुम्हाला नाही पण तुमच्या सूनबाईला पावेल हो.. “

“काय?”

“होय… तुम्ही पूजा करताना स्वस्त, टाकून दिलेल्या, आपल्याला उपयोगात नसलेल्या वस्तू देवाला वाहतात, पण तुमच्या सुनेने घरी काढवलेल्या तुपाचा दिवा लावला, तिचीच एक साडी देवीला दिली, स्वतःच्याच बांगड्या देवीला दिल्या… देवीला तुम्ही जे अर्पण करता त्याच्यामागचा भाव हवा असतो.. तुमचा मोह तूप, साडी, बांगड्यांत आहे… पण तुमच्या सुनेने कसलाही मोह न धरता स्वतःच्याच वापरातील एक भाग काढून देवीला दिला… हेच महत्वाचं असत… एखादा लहान मुलगा आपला आवडता खाऊ खात असताना एक घास हळूच आईला भरवतो तेव्हा आईला किती कौतुक वाटतं, तेव्हा उष्टा घास भरवला म्हणून आई रागवत नाही… तसंच आहे हे… आणि देवीला मिळालेल्या चांगल्या वस्तू मी अनाथाश्रम मध्ये देऊन येतो, तुमच्या सुनेशी तिथेच भेट झालेली, ती दर महिन्याला तिथे देणगी देऊन येते… “

सासूबाईंना खूप वाईट वाटलं, देवाधर्माचं करत नाही म्हणून आपण सूनबाईला किती बोललो, पण खऱ्या अर्थाने तीच खरी भक्ती करतेय.. आपण फक्त स्वार्थीपणाने मोहात अडकून यांत्रिक पूजा करतोय याची त्यांना जाणीव झाली.

लेखिका : संजना सरोजकुमार इंगळे

संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print