☆ सूर संगीत राग गायन (भाग १४ ) – राग~जौनपूरी/जीवनपूरी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
सूर संगत~राग~जौनपूरी/जीवनपूरी
मागील आठवड्यांत आसावरी थाटांतील दरबारी कानडा रागाविषयीच्या विवेचनानंतर त्याच आसावरी थाटांतील राग जौनपूरी किंवा जीवनपूरी या रागाविषयी लिहावे असे मला वाटते.
आपल्याला माहीतच आहे की सर्वसाधारणपणे थाटातील स्वरांप्रमाणेच त्या त्या थाटोत्पन्न रागांतील स्वर रचना असतात. आसावरी थाटात गंधार,धैवत व निषाद कोमल म्हणून दरबारी कानडा आणि जौनपूरी दोन्ही रागांत ग ध नी कोमल! हे सर्व स्वर सारखे असूनही दोन राग भिन्न का बरे वाटतात? त्याचे कारण रागांचे चलन!
षाडव ~ संपूर्ण जातीचा हा राग आरोही रचनेत सरळ मार्गी आहे तर अवरोही रचना मात्र वक्र स्वरूपाची असल्याचे आपल्या लक्षांत येते.
असे असले तरी काही लोक सां (नी)(ध)प म (ग) रे सा असा सरळ अवरोहही घेतात.मात्र वक्रतेमुळे आणि गंधार व धैवताच्या आंदोलनामुळे रागाचे माधूर्य अधिक वाढते.तसेच तीच या रागाची ओळख आहे.
धैवत वादी व गंधार संवादी मानून हा राग सादर करायचा असतो. वादी धैवत हा उत्तरांगांतील स्वर असल्यामुळे याची बढत मध्य व तार सप्तकांतच केली जाते.रियाजासाठी मात्र मंद्र सप्तकांतही गाणे आवश्यक आहे.
आसावरी हा जनक राग प्राचीन आहे.जौनपूरी आणि आसावरी या दोहोत तसा फारसा फरक नाही.जौनपूरीत आरोही निषाद आहे तर आसावरीत आरोहात निषाद वर्ज्य आहे येवढाच काय तो फरक!हिंदुस्तानी संगीतातला आसावरी हा राग दक्षिणेकडे गायला जातो,पण ते जीवनपूरी व आसावरीचे मिश्रण असते.उत्तर हिंदुस्तानी संगीतातही हे दोन राग वेगळे ठेवणे बर्याचदां शक्य होत नाही.
मंगेश पाडगांवकरांच्या “दूर आर्त सांग कुणी छेडिली आसावरी” ह्या कवितेला यशवंत देव यांनी जी संगीत रचना केली आहे ते आसावरी व जीवनपूरी यांच्या मिश्रणाचे उत्तम उदाहरण आहे.
दिवसा सादर होणारा हा राग मधूर तर आहेच,पण खेळकर वृत्तीचाही आहे.किशोरीताई अमोणकर यांची “छुम छननन बिछुवा बाजे”किंवा अश्विनी भिडे यांनी गायिलेली “अब पायल बाजन लागी रे” या बंदिशी ऐकल्या की जौनपूरीतला खेळकरपणा आपल्या डोळ्यासमोर साकार होतो, आणि मनाची सगळी मरगळ झटकून नवचैतन्य निर्माण झाल्याचा भास होतो.
मायकेल राॅबीन्सन या अमेरिकेतील संगीतप्रेमी माणसाने जौनपूरी ऐकल्यानंतर एखाद्या मादक आणि सुंदर स्त्रीचे चित्र डोळ्यासमोर उभे रहाते असे उद्गार काढले आहेत.
मानापमान नाटकांतील”प्रेमभावे जीव जगी या नटला”हे जौनपूरीतील पद असेच चेतना जागृत करणारे आहे.भक्तिरचनाही ह्या रागात गोड आणि भावपूर्ण वाटतात.याचे उदाहरण म्हणजे अभिषेकीबुवांनी गाजविलेला संत गोरा कुंभार या नाटकातील
“अवघे गरजे पंढरपूर/चालला नामाचा गजर”हा अभंग,तसेच “देवा तुझा मी सोनार”ही भक्तीरचना!सी रामचंद्र यांनी सरगम या चित्रपटांतील”छेड सखी सरगम”हे गाणे जीवनपूरी/आसावरी ह्या मिश्रणांतूनच संगीतबद्ध केले आहे.टॅक्सी ड्रायव्हरमधील”जाये तो जाये कहाॅं,मुघलेआझममधील”मुहब्बतकी झूठी कहानीपे रोये” ह्या गाण्यांवर जौनपूरीची छाप आहे असे जाणवते.
जौनपूर या गांवाच्या नावावरून जौनपूरी हे नाव आले असावे व नंतर त्याचे जीवनपूरी झाले असे काहींचे मत आहे.सुलतान शर्की या अमीर खुश्रोच्या शिष्याने हा राग बनविला असेही मानतात.
तानसेन वंशाचे गायक मात्र या रागाचे अस्तित्व नाकारतात.काहीही वाद असले तरी भारतीय संगीतात जौनपूरी अथवा जीवनपूरी या रागाला निश्चितपणे स्वतंत्र अस्तित्व आहे.
एक पाच वर्षाची खूप प्रेमळ गोंडस मुलगी. तिचं बोलणं ऐकत राहावं असं. कल्याणमधील खडकपाडा येथे वसंत व्हिला रस्त्यावर वृंदावन पॅराडाइज या आलिशान वस्तीत राहते. तिच्यासाठी आणलेला खाऊ; मग ते साधे चॅाकलेट असूदे, प्रत्येकाला हवं का? म्हणून विचारल्याशिवाय खात नाही. गंमत म्हणून कुणी हवं म्हणालं तर त्याला देण्यात तिला आनंदच वाटतो.
खेळत असतानाही तिचं सगळीकडं बारीक लक्ष असतं. घरात आजी, आजोबा, आई वडील व मोठी बहीण सुहानी असं छोटं कुटुंब. सारा आजोबाना आप्पा म्हणते. एका अपघातात आप्पांच्या लहान मेंदूला इजा झालेली. त्यामुळे त्यांचा शरीरावर ताबा राहत नाही. आधाराशिवाय उठले तर तोल जाऊन पडण्याचा धोका असतो. चुकून आप्पा उठलेच तर सगळ्यात अगोदर लक्ष असतं ते साराचंच. मग काय, आप्पा उठले, आप्पा उठले असा दंगा करून सगळ्याना सावध करते.
वृंदावन पॅराडाइजमध्ये तीन विंग्ज आहेत. मध्ये मोठे ग्राउंड आहे. बाजूला क्लब हाऊस व छोटासा स्विमिंग टॅंक आहे. त्या ठिकाणी एखादा छोटा कार्यक्रम असला की समोरच्या ग्राउंडवर मंडप घालून केला जातो. असाच एक कार्यक्रम होता. मंडपवाले मंडप घालण्यात व्यस्त होते. सारा, सुहानी आणि त्यांचे दोन मित्र तेथे खेळत होते.
त्याच इमारतीवर जिथं जागा मिळेल तिथं काही कबुतरेही आहेत. त्यातील एक कबुतर मंडपाच्या आधारासाठी लावलेल्या बा़ंबूवर येऊन बसले. आजारी असल्यासारखे दिसत होते. थकलेलं वाटत होतं. खेळत असलेल्या साराचं लक्ष त्याच्याकडं गेलं.
तिथंच साराच्या वडीलांचे मामा व आणखी दोघे खुर्च्या टाकून बसले होते. सारानंच आणून दिलेले पाणी पीत होते.
“मामा, त्या कबुतरालाही तहान लागलीय. त्याला पाणी हवंय.” कबुतराला पाहून सारा म्हणाली.
“मग दे ना आणून.” असं मामा म्हणाले आणि सगळ्यानी हसण्यावारी नेलं.
साराही खेळण्यात दंग झाली असं सर्वांना वाटलं. पण तीचं लक्ष त्या कबुतराकडं होतं.
अचानक सारा “ओ सिक्युरिटी काका, ओ सिक्यूरिटी काका इकडे या” अशा हाका मारू लागली. तिला कुणी काहीतरी काम सांगीतलं असेल असं वाटून बसलेल्यानी ऐकून सोडून दिलं. सारा स्विमिंग टॅंक कडं गेली. सिक्युरिटी काका पण गेटवरून हलले नाही.
पुन्हा तशीच हाका मारत सारा आली. आता मात्र ती चिडलेली दिसत होती.
“सिक्यूरिटी काका लवकर या ना. तुम्ही काय कबुतराला मरून देणार आहात काय?” असं सारा वैतागून म्हणताच सिक्यूरिटी काका धावत गेले तर त्याना ते कबुतर स्विमिंग टॅंकमध्ये पडलेले दिसले. कोरोनामुळे कोणी पोहत नसल्याने त्यात पाणी थोडे कमी होते. तहानेनं व्याकुळ झालेल्या त्या जीवाने पाण्यासाठी टॅंकमध्ये झेप घेतली होती पण बाहेर यायला त्याला किनारा सापडत नव्हता. आणि त्याला पायऱ्याही नव्हत्या.
सिक्यूरिटी काकानी कचरा काढण्याच्या जाळीने कबुतराला अलगद बाहेर काढले आणि साराच्या चेहऱ्यावर हसू खुलले. एका पक्ष्याचा जीव वाचवल्याचे समाधान तिच्या डोळ्यात दिसत होतं.
☆ विविधा ☆ शोध शांततेचा ….. ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
अलीकडं घरी आम्ही दोघेच असतो.हे सकाळी दवाखान्यात जातात. त्यानंतर साधारणपणे मी एकटीच असते.त्यामुळे माझ्या दुपारवर कोणाचाही हक्क नसतो. आजही मी एकटीच दिवाणवर लोळत पडले होते. दाराची बेल वाजली. कोण बाई एवढ्या ऊन्हाचं? असं म्हणत मी दार उघडलं. दारात एक तरुणी उभी होती.
‘हाय’ ती घुसलीच घरात.
माझ्या कपाळावरील आठ्या बघून सुध्दा ती हसत हसत गळ्यातच पडली.
‘कोण तू?’ मी घुश्शातच विचारलं. (खरंतर अगोचर म्हणायचं होतं. पण जीभ आवरली.)
कानात छोटे छोटे स्पिनर्सवाल्या डुलणाऱ्या रिंग्ज. . . . . . अं . . . अं. . . . अं. . ही तर. .
‘बरोब्बर अगं मी तूच. . ती. . ती कॉलेजमधली दीपा’.
टाळीसाठी लहानसा हात पुढं आला. मीही टाळी दिली.
‘काय हा अवतार दीपा? साडी, टिकली, बांगड्या,.. . ‘
या वाक्याकडं दुर्लक्ष करून स्वयंपाकघरात जाता जाता मी विचारलं. . . ‘कॉफी?’
‘पळ्ळेल. . . ‘
आता मी ही हसत हसत आत वळले.
ती केंव्हाच ओट्यावर चढून पाय हलवत बसली.
‘हे काय नेसकॅफे? ब्र्यू नाही? ‘
‘नाही गं, ह्यांना ब्र्यू नाही आवडत.’
‘हो क्का? ‘
मग ओट्यावर बसूनच कॉफी चे घुटके घेत भरपूर गप्पा झाल्या.
कॉलेजच्या दीपाला मी निरखत राहिले. मला ती न्याहाळत होती. अल्लड, अवखळ, निरागस, दीपा. ठाम पण शांत दीपा. साधी, सरळ तरीही मैत्रिणींच्या घोळक्यात राहणारी, डोळ्यात सुंदर, निरामय, साधीशी स्वप्नं. . .
तेव्हढ्यात करकचून ब्रेक लागल्याचा आवाज आला. लोकांचा गलका ऐकू येऊ लागला. आरडाओरडा, गाड्यांच्या हॉर्नचे कानठळ्या बसवणारे आवाज. . . . दोघींनीही कानावर हात ठेवले. ती तर कपाळावर आठ्यांच जाळं घेऊन, हातात डोकं खुपसून बसली.काही वेळानंतर आवाज थोडे कमी झाले.
‘काय ग, असल्या कोलाहलात कुठं घेतलंस घर?’
‘विसरलीस तुला हवं होतं शांत, रमणीय परिसरात छोटंसं घर. कुठं आलीस तू? ‘
‘हं. हे डॉक्टर आहेत ना! मध्यवर्ती ठिकाणी बरं पडत त्यांच्या व्यवसायासाठी.’ मी पुटपुटले.
‘एवढ्या कलकाटात! बापरे!!. कल्पनाच करवत नाही.
‘सोप्पं जातं त्यांना. खाली दवाखाना वर घर.मुलांनाही शाळा-कॉलेज जवळ. भाजी मार्केट दोन मिनिटांवर.’
‘काय म्हणतेयस ऐकूही येत नाही नीट.’
‘असू दे ग.’
‘काय? क्क क्क काय….? रस्त्यावरचे आवाज पुन्हा वाढले बघ. धन्य आहेस बाई तू. तूच बैस इथं तुझं घर सांभाळत. मी कलटी घेते.’ बाय बाय. करत ती निघूनही गेली. मी दीपा.. दीssपा.. अशा हाका मारत राहिले.
पण ती कधीच जीना उतरुन पळाली.
मी मात्र सोफ्यात विचार करत बसले. बरोब्बर बोलली ती. तेच तर स्वप्न होतं. लहान असलं तरी चालेल, घर हवं शांत वसाहतीत, गर्दी पासून दूर.. खरंच राहूनच गेलं…
कितीदा बोलूनही दाखवलं ह्यांना की एखाद्या कमी वर्दळीच्या जागी घर होतं मनात माझं, स्वप्नातलं, इवलंसं. इथला रस्ता सकाळी सहा वाजल्यापासूनच बोलू लागतो. गाड्यांची खडखड, हॉर्न ची पीं पीं, सायलेन्सर काढलेल्या बाईक्सचा कर्णकर्कश आवाज. या सगळ्यात पक्ष्यांची किलबिल ऐकू येतच नाही. हलक्याशा झुळूकीनं डोलणाऱ्या पानांची सळसळ वाऱ्यावर विरुन जाते. रेडिओ टीव्ही मोठ्या आवाजात कोकलत असतील तरच कान वेधतात. हा वर्दळीचा रस्ता रात्री बारा वाजेपर्यंत वहात असतो. कर्णकटू सूरात वेडेवाकडे आलाप? गात असतो. ओरडत असतो. मनातलं शांतता वाटणारं घर दूर राहिलंय. हरवून गेलंय. बांधायचंच राहून गेलं… राहूनच गेलं.
☆ विविधा ☆ केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर… ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆
आठवणीं मग त्या कटू असोत किंवा गोड; अविस्मरणीय क्षणांच्या स्वरूपात मनांत दाटलेल्या असतात. त्यांची चाहूल मनात काहूर माजवते. लुप्त आठवणींचा कधीकधी असा कवडसा पडतो की मन हळवं होतं.
माझ्या मनाचे पापुद्रे उलगडत उलगडत ह्या सगळ्या आठवणीत रमायला मला फार आवडतं.
एखादा जुना झालेला पिवळा फोटो पाहून, जुन्या गाण्याचा एखादा आर्त स्वर ऐकून जशी मनात विचारांची गर्दी होते ना तसं काहीतरी हा प्रसंग आठवून झाली. आणि……. अर्थातच मला तुम्हाला ही गोष्ट सांगावीशी वाटली….
बऱ्याच दिवसांनंतर माझं घराचं स्वप्न पूर्ण झालं होतं.नवीन घर तसं गावाच्या थोडं बाहेरच !अर्थात मी नवीन घरात आल्यावर घरकामात आणि घर सजवण्यात रमले पण केतकी मात्र कंटाळली. तिला काही करमेना… वाड्यातलं गोकुळ सोडून आली होती ना ती!!
दुपारपर्यंत गद्रे बाईंसोबत बालवाडीत असायची. त्यानंतर मीच तिच्या बरोबर खेळायची पण संध्याकाळी मात्र तिच्या सोबत खेळायला कोणीच नसायचं. तिला थोडा विरंगुळा हवा ना? पण माझा नाईलाज होता. जवळपास फारसं कुणी शेजारीपाजारी नव्हतं.सगळा औद्योगिक परिसर.. त्यादिवशी आम्ही दोघी घराच्या गच्चीवर गेलो होतो. “आई, तो बघ आपला वाडा..” दूरवर तिला आमचा राहता वाडाच दिसला.”अग बाई हो का? आणि वाड्यात कोणकोण दिसतंय?” तिनं सगळ्यांची नावं घेतली. मलाही तिची कीव आली.” आपण जाऊया रविवारी वाड्यात सगळ्यांना भेटायला.” मी तात्पुरती समजूत काढली खरी पण तेवढ्यानं तिचं समाधान झालं नाही.
तेवढ्यात एक ओळखीचा आवाज आला. “आई कसला आवाज आला गं?” आवाज माझ्या ओळखीचा होता पण तो आवाज मला इथे अपेक्षित नव्हता,त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केलं, पण पुन्हा एकदा तो आवाज आला आणि मी त्या दिशेने पाहिलं आणि मोहरले.
“अगं किटू, तो बघ मोर!” समोरच्या एका छोट्याशा घराच्या अंगणात मोर दिसला मला! त्याची केकाच मला ऐकू आली होती.मला खूप आश्चर्य वाटलं. “मोर असा ओरडतो? चल ना आई आपण पाहायला जाऊ.” मला तिचं मन मोडवेना.
घराच्या अंगणात पायरीवर एक आजी बसल्या होत्या.”या” त्यांनी आमचं उबदार स्वागत केलं.”बरं झालं आलात. मी येणारच होते तुमची ओळख करून घ्यायला.”आजी बोलल्या आणि त्यांनी आपलंसं करून टाकलं आम्हाला!
केतकी कडे बघून त्या म्हणाल्या, “बाळाबाई, नाव काय तुझं?”केतकी म्हणाली, “आम्ही मोर पाहायला आलोय”मुद्द्याचं बोलून रिकामी झाली ती. “हा मोर तुमचा आहे ?जंगलातनं आणलाय तुम्ही? तो पिसारा का फुलवत नाही?”.तिला विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे न देता तिची स्वतःच्या प्रश्नांची सरबत्ती चालू होती.डोळ्याच्या पापण्या देखील न लवता केतकी मोर पाहण्यात रमली होती.
“अंधार झाला चल आता” मी म्हटलं, पण तिचा काही पाय निघेना. “आता मोर पण झोपणार आहे बाळा, उद्या ये हं !” त्या इवल्याश्या जीवाचं इवलसं अंतकरण जड झालं होतं हे जाणवलं मला…..
झोपेपर्यंत ती मोराबद्दलच बोलत होती. तिला मुख्य प्रश्न पडला होता तो असा की,मोर पिसारा केव्हा फुलवणार ? मग पाऊस कधी पडणार? आंब्याच्या वनात आपण कधी जायचं?….
केतकी मनात रंग सोहळ्याच्या स्मृती घेऊन स्वप्न सफरीवर गेली होती.आज तिचं रमलेलं मन अगदी पटकन निद्रादेवीच्या अधीन झालं होतं. सकाळी उठल्यावर मी कामाच्या गडबडीत होते त्यामुळे स्वारी बाबांकडे वळली. मोराबद्दल मलाही जितकं ज्ञान नव्हतं तितकं या बाप-लेकीच्या संवादानं मला समजलं.
आज ती दुपारी शाळेतून आली तशी तहानभूक विसरलेली ती लगेचच पळाली मोराकडे !! एव्हाना आजींची आणि तिची गट्टी जमली होती. आजीनाही तिच्या शिवाय चैन पडत नसते. “आई आता आकाशात ढग येणारेत मग मोर पिसारा फुलवून नाचणाराय” निरागस मन मला सांगत होतं.
आजींचं आणि माझं विशेष बोलणं व्हायचं नाही.गॅलरीतून नुसतेच हातवारे आणि मूक संभाषण पण…. आज केतकीनं निरोप आणला.”आई,आजीने तुला बोलवलंय.”मला हाताला धरून घेऊन देखील गेली ती….. आजी आपल्या बद्दल काहीतरी तक्रार सांगतील असंच तिचं साशंक मन स्वसमर्थन करायच्या तयारीत होतं.
“उद्या गौरी यायच्या. केतकीला साडी नेसून पाठवा. तिलाच नळावर पाठवते. इथेच जेवेल घासभर…” असं आजी म्हणाल्या, आणि केतकीच्या आनंदाला उधाण आलं होतं. उद्या कधी येतो असं झालं तिला… गौरी-गणपतीचे दिवस आज सकाळपासून आभाळ भरून आलं होतं केतकीच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. मोर पिसारा फुलवून नाचेल असा विश्वास वाटत असावा का त्या जीवाला ?……
सकाळी तिचे डोळे उघडले तसं “आई आज मला कुठली साडी नेसवणार ?बांगड्या कुठल्या घालायच्या?” एक वेगळाच आनंद आणि उत्साह तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.
गौराई नटली होती. एक गोड पापा देऊन पळाली ती आजीकडे. दुपार झाली तरी अजून ती आली नाही. तशीही ती कधीच बोलल्याशिवाय येत नसे आणि आजी तिला कधीच जा म्हणत नसत.
इतक्यात तिच्या “आई,आई” अशा हाका ऐकू आल्या. गॅलरीत पोहोचते अन् पाहते तो काय? मोरानं पिसारा फुलवला होता आणि माझी गौराई त्याच्यासोबत उभी होती. अवर्णनीय असं ते दृश्य मी डोळ्यांत साठवून घेत होते.मोर अन् केतकी दोघेही नाचत होते. आंब्याच्या वनात जाण्याची आस ठेवणारी केतकी स्वतःच्याच बनात मोराला नाचताना पाहत होती.
मोरानं तिचा आजचा दिवस खास करून टाकला होता.’देता किती घेशील दो कराने’ इतका आनंद तिच्या ओंजळीत टाकला होता. मी मनोमन मोराचे आभार मानले.
लगबगीने कॅमेरा घेऊन खाली पळत सुटले. मी पोचेस्तोवर मोर उडून कठड्यावर जाऊन बसला. “माझ्यासोबत मोराचा फोटो काढायचा होता ना गं” असं म्हणून केेतकी रडू लागली.
“थांब हं किटू, मी मोराला घेऊन येते.” असं म्हणून केतकीला आजींच्या ताब्यात घेऊन मी कॅमेरा घेऊन मोरा पाठीमागे धावणार तोच….. तो पुन्हा उडून माझ्या घराच्या गच्चीच्या कठड्यावर बसला. मी पळत पळत गच्चीवर आले. त्याच्या नकळत लपून त्याच्याकडे पाहत बसले. त्याला हळूच एका क्षणी मी माझ्या कॅमेऱ्यात कैदही केलं…. दुसऱ्याच क्षणी तो पुन्हा उडाला आणि एक जोरदार धमाका झाला, आणि दिसेनासा झाला. तो बसलेल्या ठिकाणाच्या जवळच इलेक्ट्रिकचा डांब होता. त्याचा त्याला शाॅक बसला होता.
मी पुढे जाऊन पाहिलं तर…. माझ्या अंगणात मोरपिसांचा सडा पडला होता. माझ्या कॅमेरात कैद झालेला तो जगाच्या बंदिवासातून मुक्त झाला होता. तो क्षण मोराचा ‘प्राण प्रयाणोत्सव’ ठरला….. तिसऱ्याच क्षणी माझ्या मनांत केतकीचा विचार आला आणि मी शहारले. मी ताबडतोबीनं मृत मोराची विल्हेवाट लावली जेणेकरून केतकीच्या नजरेत हे सारं येऊ नये.
केतकी माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. मी मोराला घेऊन येणार असा तिचा माझ्यावर विश्वास होता.
मला पाहताच केतकीच्या डोळ्यातलं पाणी पापण्यांवर येऊन थांबलं. ती मला बिलगली. मोठ्या आवाजानं घाबरली होती ती. तिची नजर मोराला शोधत होती. “आई,मोर कुठे गेला?”
“मोर उडून गेला बाळा! आपण आता दुसरा आणू हं!”. आजीनं जड अंतकरणाने माझ्या निरागस लेकराची समजूत काढली आणि, गाभण ढग फुटल्यासारखं त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पाट वाहू लागला.
केतकीला विषयाचं गांभीर्य समजू नये म्हणून”जाताना तुला कितीच्या काय पीसं देऊन गेलाय बघ” असंही त्या म्हणाल्या.
“इतकी सगळी पिसं मला एकटीला दिलीत? यातलं एक सुद्धा मी कोणालाही देणार नाही”. मनाचा पक्का निर्धार करून मृत्यूचं गम्य नसलेलं ते निरागस मन पीसं गोळा करत होतं.
माझी अवस्था धीर सोडलेल्या,गहिवरल्या मेघा सारखी झाली होती. मला आणि आजीना एक माणूस गेल्याचं दुःख झालं होतं. केतकीचा एक प्रिय मित्र गेला होता.केतकीच्या बाल मनाचा विरंगुळा होता तो!
त्याच्या पिसारयातील पीसं आणि त्यातील रंग पहात केतकी स्वप्न रंगात रंगली होती. पिसाच्या हळुवार स्पर्शानं मोहरुन गेली होती.
जीवन जितकं सुंदर तितकंच मरणही सुंदर असतं का हो? असेलही ! वसंत ऋतू जितका रम्य तिचकाच शिशिरऋतू ही रम्य असतोच ना?
मोराचं जाणं हा प्रयाणोत्सव होता जणू…. माझ्या निरागस जीवाला परमानंद देऊन गेला होता तो!!
☆ इंद्रधनुष्य ☆ थोडक्यात..पण महत्त्वाचे ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆
एका वर्षाचे महत्त्व अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांला विचारावे, एका महिन्याचे महत्त्व मातृत्वाच्या वाटेवर असलेल्या महिलेला विचारावे, एका सप्ताहाचे महत्त्व साप्ताहिकाच्या संपादकास विचारावे,एका दिवसाचे महत्त्व मजुरी न मिळालेल्या मजुरास विचारावे, एका तासाचे महत्त्व आपले अर्धे राज्य देऊन एक तास मृत्यू लांबविण्याचा आग्रह धरणाऱ्या सिकंदराला विचारावे, एका मिनिटाचे महत्त्व वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत कोसळण्याच्या एक मिनिट आधी सुरक्षितपणे बाहेर पडणाऱ्या भाग्यवंताला विचारावे आणि एका सेकंदाचे महत्त्व केवळ एका सेकंदामुळे सुवर्णपदक न मिळू शकलेल्या ऑलिंपिकमधील धाव स्पर्धकाला विचारावे.
संग्राहक – श्रीमती अनुराधा फाटक
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
परवाच सुधीर मोघे यांचे ‘गाणारी वाट’ हे पुस्तक वाचनात आले. त्यांच्या चित्रपट- मालिका लेखनातील गीतांचा प्रवास यामध्ये आहे. त्यातील एका गाण्याचा प्रवास वाचताना मी पुन्हा नकळत त्या गाण्यात गुंतून गेले-“सांज ये गोकुळी सावळी सावळी….” !
वास्तविक हे गाणे श्रीधर फडक्यांनी आपल्या एका कार्यक्रमासाठी सुधीर मोघ्यांकडून लिहून घेतले. बाकी बरीचशी गाणी गदिमा नी सुधीर फडक्यांसाठी लिहिली होती, पण ती स्वरबद्ध झाली नव्हती. ती चालीत बांधून त्याचा एक कार्यक्रम श्रीधरजीनी तयार केला होता. त्यातील एक गाणे प्रभातीचे रंग दाखवणारे होये. त्याच्या जोडीला म्हणून हे एक गाणे शामरंगावर तयार झाले. संगीत श्रीधर फडके आणि गायिका आशा भोसले! या त्रयींनी एक अजरामर कलाकृती निर्माण केली.
नंतर अनेक वर्षांनी हे गाणे ‘वजीर ‘ या चित्रपटात घेतले व अश्विनी भावे या गुणी अभिनेत्रीवर चित्रित झाले. चित्रपटाच्या सुरुवातीलाच हे गाणे येते. पुढच्या संकटाची कसलीच चाहूल नसलेली ही युवती या शामरंगात आकंठ बुडालेली दिसते.
सूर्य अस्ताला टेकला आहे आणि अंधार दाटून आला आहे. कवीने अशी कल्पना केली आहे की ही गोकुळातील संध्याकाळ आहे. त्यामुळे त्या सावळ्या कान्ह्याच्या रंगासारखीच ती सावळी आहे, जणू काही त्याचीच सावली वाटावी. दिवसभर रानात चरत असणाऱ्या गाई आता घरच्या आणि वासराच्या ओढीने खुराने धूळ उडवत अंधाऱ्या होत चाललेल्या वाटेवरुन धावत आहेत. त्यांच्याबरोबर पाखरांचे थवे सुद्धा घरट्यात परतत आहेत. आणि त्याचवेळी दूरवर कोण्या एका देवळात सांजवात लावून घंटानाद होत आहे. दूरवर दिसणारी पर्वतरांग सूर्याचा अस्त होताना काळ्या रंगात बुडून जाते आहे. जणू काही या सर्व संध्येला दृष्ट लागू नये म्हणून निसर्गाने रेखलेली ही काजळाची दाट रेघ आहे.
पुढे कवी या सावळ्या- शामवर्णाच्या रंगात इतका बुडून गेला आहे की त्याला डोहातले चांदणे पण सावळेच दिसू लागते, कारण आजूबाजूला त्या नटखट सावळ्याची चाहूल आहे.
पुढच्या ओळी म्हणजे कवीच्या प्रतिभेचा आणि त्या कवितेतील संकल्पनेचा चरम बिंदू आहे असे मला वाटते-
“माऊली सांज अंधार पान्हा”- ही सावळी संध्याकाळ म्हणजे एक माता आहे आणि ती अंधार पान्हवते आहे. त्यामुळे त्या कृष्णवर्णाने हे संपूर्ण विश्वच व्यापून राहिले आहे, जणू काही ते त्या सावळ्या कान्ह्याचे दुसरे रुपच आहे.
असा तो कान्हा वाऱ्याच्या मदतीने अलवार बासरी वाजवत आसमंतात स्वरांची बरसात करत आहे. त्यामुळे जणू काही आम्हा रसिकांच्या समोर स्वररुपी अमृताच्या ओंजळी रित्या होत आहेत.
या गाण्याची आणखी एक गंमत अशी आहे की “पर्वतांची दिसे दूर रांग” हे कडवे यात रेकॉर्डिंगच्या वेळी जोडले गेले.त्यापूर्वी फक्त दोनच कडवी गायली जायची. पण नंतर घातलेले मधले कडवे त्या ठिकाणी इतके चपखल बसले आहे की ते जोडीव काम आहे हे कधी लक्षातसुद्धा येत नाही. हेच ते प्रतिभावंत कवीचे कवित्व असे म्हणावे लागेल. म्हणूनच अवघ्या दहा ते बारा ओळीत ‘सुधीर मोघे’ यांनी एखाद्या कुशल चित्रकाराने आपल्या कुंचल्याने संध्याकाळ कागदावर साकारावी तशी आपल्या शब्दरूपी कुंचल्याच्या अदाकारीतून काळ्या रंगांच्या विविध छटातून ही गोकुळात उतरणारी सावळी संध्याकाळ साकारली आहे. आमच्या मनावर त्या दृश्याचे स्थिरचित्र त्यांनी लीलया साकारले आहे. कविता म्हणून ही रचना जशी अप्रतिम आहे तसेच त्या शब्दांना श्रीधर फडके यांनी दिलेली सूरांची संजीवनी त्यातील कृष्णवर्ण अधिक गहिरा करते. आशा भोसले यांचा अद्वितीय असा स्वर या गाण्याला एक वेगळीच उंची प्राप्त करुन देतो. म्हणूनच या संपूर्ण अविष्कारात सांजावलेले आपल्यासारख्या रसिकांचे मन पुन्हा पुन्हा त्या शामरंगी सावळ्या रंगात रंगून जाते.
रीत आणि विपरीत यातील फरक नेमका अधोरेखित करतो तो रीतसर हा शब्द!
रीतसर म्हणजे उचित.जे रीतीला धरुन नसेल,म्हणजेच योग्य नसेल ते सगळं अनुचित. म्हणजेच विपरीत.
हे इतकं सगळं सोपं असलं तरी त्यातही एक मेख आहेच. उचित-अनुचित ठरवायचं कसं आणि कुणी? तसं तर रीत कुणीच ठरवत नाही. ती ठरते. रीत त्यातली सोय,योग्यायोग्यता पाहून अनुभवानुसार आवश्यक ते बदल करुन हळूहळू स्विकारली जाते. पुढे काळाच्या कसोटीवर ती खरी उतरली की आपसूकच रुढ होते. मग ती गोष्ट त्यापध्दतीनेच करायचा प्रघात पडतो आणि मग त्या रुढ पध्दतीचीच रुढी बनते.
काळ बदलला की काळानुसार हळूहळूच पण तरीही या रुढीत फरक पडत जातोच. पण ते बदल रुढ होईतोवर रीतीनुसार करायलाच हवं म्हणून त्यामागचा उद्देश लक्षात न घेता अंधानुकरणाने मूळ रीत पाळली जातेच. कारण एखादी गोष्ट रीतसर झाली नाही तर मनालाच रुखरुख लागून रहाते.
रीत म्हणजे प्रघात, शिरस्ता, रिवाज, परिपाठ, कार्यपध्दती आचारपध्दती. अशा या रिवाज, पध्दतीनाच ‘रीतभात’ ही म्हणतात. पूर्वी नव्या नवरीच्या सासरघरी तिच्या प्रत्येक हालचालींवर सर्वांचं बारीक लक्ष असायचं. कांही खटकलं तर ‘माहेरच्यानी हिला कांही वळणच लावलं नाही’ असं म्हंटलं जायचं. हे ‘वळण’ लावणं म्हणजेच करण्यासवरण्याची, वागण्या बोलण्याची शिस्त म्हणजेच रीत समजावून सांगणं. इथे ‘रीतसर’ म्हणजे व्यवहारातील ‘शहाणपण’.
कांही रीती कुलाचाराच्याही असतात. लग्न किंवा शुभकार्यानंतरचं बोडण किंवा गोंधळ हे अशा कुलाचारांचंच एक उदाहरण. कुलाचारांच्या जाती-पोटजातींनुसार विविध रीती असतात व त्या असंख्य तडजोडी करुन कां होईना पण पाळल्याही जातात.
कांही रीती वैयक्तिक पातळीवर वेगवेगळ्या असतात. उदाहरणार्थ स्वैपाक. पदार्थ एकच पण तो बनवण्याची कृती, पध्दत प्रत्येकीची वेगळी. त्या कृती, रीतींनुसार चवी चांगल्या तरीही वैविध्य जपणाऱ्या असतात.
रीत जेवायला बसण्याची, जेवण करण्याची, झोपण्या-उठण्याच्या वेळा पाळण्याची, अंथरुणं घालण्या-काढण्याची अशा अनेक प्रकारच्या कार्यपद्धतीची असते. या रीतीभाती कौटुंबिक पातळीवरच्या. म्हणूनच प्रत्येक घरच्या त्या त्या घरची वैशिष्ठे जपणाऱ्या. वातावरण साळढाळ असणाऱ्या घरी अशा गोष्टीतली शिस्त बरीचशी शिथिल म्हणूनच सोयीची, सुखावह असते. शिस्त कडक, काटेकोर असेल तर ते घर चित्रासारखं सुंदर दिसलं, तरी त्या घरातील आनंदाचा करडा रंग फारसा सुखावह नसतो. घरगुती कार्यपध्दतीतील रीतीभाती घरपण जपणाऱ्या मात्र हव्यातच.
तसंच आॅफिसमधल्या कार्यपध्दतीना, रीतीना काटेकोर नियम असतात. त्यात चालढकल करायची नाही या शिरस्त्यामुळे त्या नियमांचा उद्देशच लक्षात न घेता नियमानुसार काम करण्याचा अट्टाहास ‘लालफितीचा कारभार’ म्हणून बदनाम होतो, तर नियम आणि व्यवहार यांची सांगड घालणारा एखादा अधिकारी शिस्तबध्द काम करुनही लोकप्रिय होतो.
रीती जशा व्यक्ति, कुटुंब, आॅफिसपातळी वरच्या तशाच त्या सामाजिक स्तरावरच्याही असतात. त्या जनरीत, लोकरीत, परंपरा या नावांनी ओळखल्या जातात.
सरकारदरबारी रीतीना शिष्टाचार (protocol) म्हणतात.
निसर्गाच्या रीतीना निसर्गनियम म्हणतात आणि त्यानुसारच सृष्टीक्रम नियत असतो.
अशारितीने सर्वपातळींवरच रीतींचं महत्त्व वादातीत आहे हे खरं, पण निसर्गनियमानुसार काटेकोर वागणं आणि मानवनिर्मित रीतींचं फार अवडंबर न माजवता त्याचा उद्देश लक्षात घेऊन तारतम्य बाळगणं हेच सुखावह ठरणारं असेल..! रीती पाळणं हे ओझं न वाटता आनंददायी ठरणारं असायला हवं. तरचं त्यांचं बंधन न वाटता त्या सुखसाधन म्हणून सहजपणे स्विकारल्या जातील आणि जोपासल्याही..!!
आपलं बालपण आणि मग पर्यायानं जगणं समृद्ध करण्यात अनंत गोष्टींचा हातभार असतो. माझ्या पिढीच्या बालपणाचा विचार केला तर ‘आकाशवाणी केंद्र’ आणि त्यामुळं वाट्याला आलेले दर्जेदार सूर, शब्द, विचार ह्या गोष्टींचा वाटा फारच मोलाचा आहे. म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टींत खूप वैविध्य होतं… फक्त सुराचा विचार केला तरी किती विविध सूर ह्या रेडिओ नावाच्या अद्भुत यंत्रानं आयुष्यात आणले. किशोरीताई, भीमसेनजी, कुमारजी, जसराजजी, शोभाजी, आशाबाई, लताबाई, सुधीर फडके, सुमनताई, वाडकरजी, अनुराधाजी हा प्रत्येकच आणि असे अनेक सूर म्हटलं तर किती वेगळे पण तितकेच देखणे! गुलाब, मोगरा, शेवंती, अबोली, जाई-जुई अशा प्रत्येकच फुलाचं सौंदर्य वेगळं… त्यांत तुलना कशी आणि कोणत्या निकषावर करणार!? माझ्याही मनात ह्या प्रत्येक सुरानं सौंदर्याची व्याख्या जास्त गडद आणि विस्तृत करत नेली. त्यांचे ऋण हे शब्दातीत आहेत.
मागच्या आठवड्यात आशाबाईंना ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मान घोषित झाला. खरंतर, मुळातच दैवी अंशानं सन्मानित झालेल्या व्यक्तींना मिळालेला कोणताही सन्मान, पुरस्कार हा त्या पुरस्काराचाच दर्जा वाढवणारा असतो. त्यामुळं त्याविषयी लिहिण्याचं काही प्रयोजनच नाही. मात्र ह्या बातमीच्या निमित्तानं पुन्हा आपसूक माझ्या मनोविश्वातला ‘आशा भोसले’ हा अमाप देखणा कोपरा धुंडाळला गेला. आशाबाईंच्या गळ्यातल्या बहुपैलुत्वाविषयी मी नव्यानं काही लिहावं इतका माझा वकुब नाही. म्हणून माझ्या त्या सुराशी असलेल्या नात्याला निरखावं हा सोपा मार्ग मी निवडला. आशाबाईंचा सूर हा खूप आपुलकीनं आपल्याला हृदयाशी धरतो असं मला वाटतं. एखाद्या शब्दलेण्याच्या अर्थाकाराशी एकरूपत्व साधत त्या भावविश्वात एका असोशीनं स्वच्छंदपणे किंबहुना स्वैरपणे स्वत:ला झोकून देण्याचा आशाबाईंच्या सुराचा जो स्वभावधर्म आहे त्याला अक्षरश: तोड नाही! अशा त्या झोकून देण्यातलं उन्मुक्तपणच मग ऐकणाऱ्याला आवेगानं येऊन भिडतं आणि तिथेच आशाबाई ह्या ‘एकमेवाद्वितीय’ ठरतात.
तैयार, संस्कारी गळा हे तर गाणाऱ्याचं माध्यम! मात्र आपल्या सुरानं ऐकणाऱ्याच्या भावविश्वात घरटं बांधणं हे अलौकिकत्वाचं देणं आणि ते फेडताना ज्या काळजातून तो सूर उमटतो त्या काळजाचंही तावून-सुलाखून निघणं ओघानं आलंच! म्हणूनच तर ‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी’ हे गाताना हुंदके देत ढसाढसा रडणाऱ्या आशाबाई आणि त्यामुळं त्यादिवशी कितीतरीवेळा स्थगित झालेलं रेकॉर्डिंग, ही कथा ऐकायला मिळते. अशी संवेदनशीलता राखल्याशिवाय तो सूर ऐकणाऱ्यांची मनं आरपार छेदून जाणं कसं शक्य होईल!? एखाद्या सुरातल्या रसरशीत जाणिवाच तर ऐकणाऱ्याच्या मनात उतरतात आणि जाणिवांची ती अपार तरलता आशाबाईंच्या सुरांत लख्ख दिसते, म्हणून त्या आपल्या काळजाशी इतक्या सहजी संधान बांधू शकतात.
कोणताही गीतप्रकार असो… प्रत्येकच गीत `हे आशाबाईच गाऊ शकतात’ असं वाटायला लावतं, ह्याचं कारण म्हणजे केवळ त्यांना लाभलेला दैवी सूर नव्हे तर त्यांचा समर्पणभाव! पाणी जसं स्वत:चं वेगळं अस्तित्व विसरून आपल्याला येऊन मिळणाऱ्या रंगात रंगून जातं तसं आशाबाई त्या-त्या रचनेच्या शब्द-सुरांशी एकाकार होऊन जातात आणि मग तिथं काहीच ‘टिपिकल’ न उरता खास त्या-त्या रचनेचा असावा तोच रंग आशाबाईंच्या सुरांतून ओतप्रोत ओसंडत राहातो. ह्या सुराच्या किती आणि कायकाय आठवणी सांगाव्या… आणि सांगायला गेलंच तरी त्या कुठून सुरू कराव्या आणि कुठं व कसं थांबावं तरी!…
‘गोरी गोरी पान फुलासारखी छान’, ‘चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी’, ‘झुकुझुकु झुकुझुकु आगीनगाडी’, ‘नाच रे मोरा नाच’, ‘शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा’ अशी गीतं ऐकताना अगदी लहान, गोंडस, गोबऱ्या गालांचं मूल ज्यांच्या सुरांतून हसताना स्पष्ट जाणवतं तोच सूर ‘कुठं कुठं जायाचं हनिमुनला’ ह्या शब्दांना न्याय देताना तसूभरही मागं राहात नाही. ‘अजि मी ब्रम्ह पाहिले’, ‘ब्रम्हा विष्णु आणि महेश्वर’ ह्या शब्दांतलं ब्रम्ह ज्यांच्या सुरांतून प्रकट होतं, ‘हरिनाम मुखी रंगते, एकतारी करी वाजते’ ह्या शब्दांतला मीरेचा प्रेमभाव ज्या सुरांतून झरलेला ऐकताना डोळ्यांच्या कडा ओलावतात, ‘जन्मभरीच्या श्वासांइतुके मोजियले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम’ ह्या भाबड्या शब्दांतला अतूट भक्तिभाव जे सूर स्पष्ट दाखवतात तेच सूर ‘जा जा जा रे नको बोलू जा ना’, ‘हवास मज तू, हवास तू’, ‘शारद सुंदर चंदेरी राती’ ‘चढाओढीनं चढवित होते, बाई मी पतंग उडवित होते’, ‘एक झोका चुके काळजाचा ठोका’, ‘येऊ कशी प्रिया’, ‘जांभुळपिकल्या झाडाखाली’, ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’ असे कित्येक अनोखे भावही अगदी नेमकेपणी टिपून ते आपल्या मनात उतरवतात. ह्यातल्या कुठल्याच रंगात रंगून जाताना तो सूर जराशीही गल्लत करत नाही.
‘तरुण आहे रात्र अजुनी’ मधल्या ऐन तारुण्यात वैधव्य भाळी आलेल्या सैनिकाच्या पत्नीचा तो मूक आकांत, ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’ ऐकताना श्वासांत जाणवू लागलेली थरथर, ‘का रे दुरावा का रे अबोला’ मधली ती काळजाला हात घालणारी मनधरणी, ‘देव जरी मज कधी भेटला’ मधे उतरलेलं मूर्तिमंत आईचं काळीज, ‘नभ उतरू आलं’ मधलं त्या सुराचं झिम्माडपण, ‘गेले द्यायचे राहून’ मधली जखम भळभळत ठेवणारी खंत, ‘दिसं जातील दिसं येतील’ मधल्या संयमी सुरांतून डोकावणारा आशावाद, ‘केव्हांतरी पहाटे’ मधल्या सुरांतला गूढ चांदणभास, ‘मल्मली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे’ मधली ती प्रणयोत्सुकता, ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’ म्हणत त्या परमोच्च शक्तीला घातलेली विरक्तीभरली साद, ‘पाण्यातले पाहाता प्रतिबिंब हासणारे’ ऐकताना ओठांवर येणारं लाजरं हसू आणि मनात उमलणारे ते नवखे भाव, ‘भोगले जे दु:ख त्याला’ मधली मन कुरतडणारी वेदना,
‘खेड्यामधले घर कौलारू’ मधली डोळ्यांसमोर सुरम्य खेडं उभं करणारी रमणीयता, ‘समईच्या शुभ्र कळ्या’मधलं एक अगम्यपण, ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ म्हणतानाचं सुरूपता वाट्याला न आल्यातलं दुखरेपण आणि एके क्षणी सत्य उमजल्यावर सुरांत उतरलेला त्या पिल्लाच्या देहबोलीतला डौल, ‘मी मज हरपुन बसले गं’ म्हणतानाचं ते सुराचं हरपलेपण, ‘स्वप्नात रंगले मी’ ऐकणाना आपलं भावविभोर होत गुंगून जाणं, ‘स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हां’ मधल्या अपूर्णतेतल्या गोडीनं अवघा जीव व्यापून टाकणं… हा प्रत्येक आणि असे अजून कित्येक भावरंग नेमकेपणी अनुभवताना आपण आशाबाईंच्या सुराचं न फेडता येण्यासारखं देणं लागतो.
आजच्यासारखी ‘ब्रेक-ब्रेक के बाद’ रेकॉर्डिंगची सोय उपलब्ध नसताना ‘जिवलगा कधी रे येशील तू’ सारखी पाच रागांत बांधलेली अवघड रचना सहजसुंदर सुरांत पेलणं, ‘घनरानी साजणा’ मधली सुराची जितकी उंची तितकीच खोलीही सहजी जपणं, ‘चांदणे शिंपीत जाशी’ मधली चंचलता सांभाळतानाही सुराचं नेमकेपण जपणं, वडील मा. दीनानाथांच्या शैलीत त्यांनी सादर केलेली नाट्यपदं अशा कित्येक गोष्टी दैवदत्त देखण्या सुराला आशाबाईंनी मेहनतीनं पाडलेले पैलूही दाखवतात… अर्थात मी करत असलेलं हे सगळंच वर्णन म्हणजे मुळाक्षरं गिरवत असलेल्या चिमुरड्यानं अनभिज्ञतेच्या कोषात असताना एखाद्या प्रतिभासंपन्नतेची स्तुती करण्याइतकं बालिश आहे. मात्र ह्या असामान्य सुरावर वेडं प्रेम करायला तर कोणत्याच गुणवत्तेचा निकष लागू होत नाही. त्याच प्रेमभावानं आज मी ‘ज्योतीनं तेजाची आरती’ असा प्रकार केलाय. अक्षरश: तसाच प्रकार… म्हणून केवळ बसल्याबसल्या मनात सहजी उमटलं ते लिहीत गेले, एक सामान्य पण वेडं प्रेम करणारी रसिक म्हणून! त्यांच्या सगळ्या कामाचा हा धावता आढावा म्हणावं इतकाही ह्याचा आवाका नाही. त्यांचा उर्दू, हिंदी ह्या भाषांचा अभ्यास आणि त्यातलं अजोड असं सांगितिक कर्तृत्व ह्या गोष्टीकडे वळायचं तर यादी संपता संपणार नाही. मराठीतलीच आधी कुठं संपलीये म्हणा!
आशाबाई, तुमच्या सुराविषयी, तुमच्या संगीतप्रवासाविषयी नुसतं लिहायच्या कल्पनेनंही दमछाक होतेय! तुमचा सूर, त्याचं अलौकिकत्व, समर्पणभावानं तुमचं त्याच्याशी तादात्म्य पावणं हे आम्ही फक्त अनुभवावं आणि त्या दिव्य अनुभूतीच्या ऋणात राहावं! तुम्ही आणि तुमचा सूर चिरंतन होवो, ही त्या विश्वनियंत्याकडे आम्हा संपूर्ण ई-अभिव्यक्ती परिवाराची मन:पूर्वक प्रार्थना!
☆ मनमंजुषेतून ☆ सत्वगुण लक्षण – भाग-2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
आज काळ इतका बदलला आहे की, समर्थांच्या काळानुरूप त्यांना अपेक्षित असणाऱ्या सत्वगुणांच्या कसोट्या आता तंतोतंत वापरता येणं शक्य नाही, असंच म्हणावं लागेल. समाजमनाची धारणा, माणसाची जीवन-पध्दती, जीवनमूल्ये, आयुष्याकडे बघण्याची आणि विचारांची दिशा — सगळंच खूप बदललं आहे. त्यामुळे समर्थांच्या काळानुरूप तेव्हा अपेक्षित असणाऱ्या सत्वगुणांनुसार प्रत्यक्ष आचरण करता येणे आता खरोखरच अवघड आहे असं नाईलाजाने म्हणावे लागेल. पण तरीही “भक्ती निकट अंतरंगे”असा जो सत्वगुणाचा एक सर्वोत्तम निकष समर्थांनी सांगितला आहे, तो मात्र त्रिकालाबाधित असा आहे— काळ कितीही बदलला तरीही आचरणात आणण्यासारखा आहे. कारण ”अंतरंगाशी निकट असणारी भक्ती”ही परमेशाप्रती असावी, असा याचा शब्दशः अर्थ असला, तरी आजचा काळ लक्षात घेता, याचा अभिप्रेत अर्थ मात्र आता नक्कीच अधिक व्यापक असायला हवा. पण म्हणजे कसा? तर तो असा असायला हवा असे मला वाटते. —-सत्वगुण अंगी बाळगण्याचा मुख्य हेतू मनात कमालीची भक्तिभावना निर्माण करणे — म्हणजे त्यासाठी ध्यास घेणे –मग तो स्वतःतच वसणाऱ्या परमेशाची ओळख पटवून देणाऱ्या कुठल्याही गोष्टीचा ध्यास असू शकतो—- उत्तम विचारांचा- उत्तम आचारांचा ध्यास — उत्तम ते शिकण्याचा ध्यास — इतरांशी वागतांना, त्यांच्या जातीधर्मानुसार, त्यांच्या कामानुसार, त्यांच्या शारीरिक, बौद्धिक किंवा आर्थिक क्षमतेनुसार भेदभाव न करता, सगळ्यांशी सारख्याच सौहार्दाने, प्रेमाने, आपलेपणाने वागण्याचा ध्यास — इतरांना निरपेक्ष वृत्तीने जमेल तितकी मदत करत रहाण्याचा ध्यास … इथे मी नुकतंच वाचलेलं एक छान वाक्य मला आठवतंय, जे आजच्या व्यावहारिक जगाशी नातं सांगणारं, त्याच भाषेतलं असलं, तरी समर्थांच्या उपदेशाच्याच थेट जवळ जाणारं आहे —–”वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे— आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढी उच्च किंमत मिळेल.” वाहवा. —-. आज वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर, माणसाला क्षणोक्षणी अस्थिरतेच्या, अनिश्चिततेच्या स्वैर झोक्यावर, हतबल होऊन बसायला भाग पाडणाऱ्या अनिर्बंध परिस्थितीत, कितीही विपरीत परिस्थिती ओढवली तरी श्रध्येय देवतेवरचा आणि मुख्यतः स्वतःवरचा विश्वास ढळू न देता, मन शांत व स्थिरच कसे राहील यासाठी आवर्जून आणि अभ्यासपूर्ण प्रयत्न करण्याचाही ध्यासच घेणे गरजेचे झालेले आहे.
“देव आहे‘– आणि माझ्यातही नक्कीच ईश्वरी अंश आहे” अशी जाणीव मनापासून व्हावी, असे अनेक प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात. पण प्रत्येकजण हे सत्य जाणवण्याइतका सजग नसतो. मग तसे सतत सजग रहाण्याचा ध्यास घेणे, हाही महत्वाचा सत्वगुणच — ज्याला काळाचे बंधन नाही. मग, “माझ्यात जसा ईश्वरी अंश आहे, तसाच तो इतर प्रत्येक सजीवातही नक्कीच असणार“ हे मान्य करता येणे अवघड मुळीच नाही आणि तसे एकदा खात्रीपूर्वक मान्य केले, की मग समर्थांना अपेक्षित असणारा सत्वगुण उच्च कोटीवर पोहोचायला कितीसा वेळ लागणार?
“देवा– सोडव रे बाबा आता लवकर” असं हताशपणे म्हणतांना आपण अनेकांना ऐकतो. पण “सोडव” म्हणजे “मरण दे”हा एकच अर्थ त्यात अभिप्रेत असतो का? तर अजिबातच नाही. “सोडव”म्हणजे ‘आयुष्यातल्या कटकटींपासून, समस्यांपासून, मनाचा गुंतवळ करून टाकणाऱ्या परिस्थितीपासून तू सोडव‘ अशी खरंतर ती भीक मागितलेली असते. पण देवाकडे अशी भीक मागण्याची माणसाला गरजच नाही, असेच समर्थांचे ठाम म्हणणे असावे, असे दासबोध वाचतांना प्रकर्षाने जाणवते. कारण आत्मरक्षणासाठी सतत सज्ज असलेल्या सशक्त सत्वगुणांना आवर्जून, प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक, आणि मनापासून पाचारण केले, त्यांना मनापासून आपले मानले, तर देव स्वतः वेगवेगळ्या रूपात माणसाला भेटायला येईल– फक्त ‘तो मला ओळखता यायलाच हवा” असा ध्यास मात्र मनात बाळगला पाहिजे. मग जगण्याचा कुठलाही मार्ग, अगदी नाईलाज म्हणून जरी निवडावा लागला तरीही, त्या मार्गावर परमशक्तीवरच्या विश्वासाच्या, श्रद्धेच्या आणि भक्तीच्या पायघड्या घालून, त्यावर फक्त सत्वगुणांचीच फुले उधळत जाण्याचा निश्चय केला, की मग कुठल्याही मार्गाने गेले तरी अंती तो जगन्नियंता, परमेशाचे आपल्यासाठी श्रध्येय असणारे स्वरूप घेऊन, आपल्या रक्षणासाठी, आणि त्याही पुढे जाऊन, मानवजन्माचे अंतिम उद्दिष्ट साध्य करून देण्यासाठी सज्ज असणारच.
——— सध्याच्या परिस्थितीला अनुरूप असा हाच बोध समर्थांनाही अपेक्षित असावा असे मनापासून म्हणावेसे वाटते.
आजवर मला कधीच एखादं अद्भुत, चमत्कारिक, उत्कंठावर्धक, अगदी आठवणीत राहावं असं, दुसऱ्याचं मनोरंजन होईल असं किंवा ज्या स्वप्नापासून काही बोध घेता येईल असं स्वप्न पडलं नाही.
माणसाचा स्थायीभाव असलेले हे स्वप्न मला सहसा पडतच नाही. वर्गात मैत्रिणी जेव्हा रंगवून त्यांना पडलेली स्वप्न सांगत आणि त्यात रंगून जात, तेेंव्हा माझ्या चेहऱ्याचा रंग फिका पडे. किती बेमालूम थापा मारतात या? मलाही थापा मारायचा मोह होई.
मी आईला नेहमी विचारी, “आई मला स्वप्न का पडत नाहीत ?” “उत्तर नसलेले प्रश्न विचारायची भारी वाईट सवय आहे या मुलीला, जा.. दिवास्वप्न तरी बघ!” आईचं उत्तर असायचं. पुन्हा माझा नवीन प्रश्न तयार ‘दिवास्वप्न?.’.. ते काय असतं? ते तरी कधीच पाहिलं नाही.
देवा शप्पथ खरं सांगते खोटं सांगणार नाही. कधी नव्हे ते काल मला खरंच स्वप्न पडलं आणि ते सांगावसं वाटलं…….
त्याचं काय झालं…….
अंधार भुडुक झाला होता. डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नव्हतं. प्रकाशाचा एक कवडसा नव्हे एक बिंदू ही शोधून सापडंत नव्हता. क्षणभर आपण दृष्टिहीन झालो आहोत का? अशी शंका यावी इतका काळोख…. अंगावर शहारा आला. भीतीने गाळण उडाली होती.
मला दरदरून घाम फुटला, तो दार ठोठावण्याच्या आवाजानं…. खरंच कोणी ठोठावत होतं का दार? की भास होता नुसता? बसल्या जागेवरून उठून दार उघडण्याची हिम्मत माझ्यात नव्हती. म्हणून तिथूनच “कोण आहे रे तिकडं?” असं मी विचारलं. अर्थात अपेक्षित उत्तर आलंच नाही.
बऱ्याच वेळा माझं मन मला योग्य ते सल्ले देतं कारण त्याच्याशिवाय मला आहेच तरी कोण म्हणा?….
“अजिबात दार उघडू नकोस. बाहेर करोना उभा आहे.” ते म्हणालं. दरदरून घाम आलेलं माझं शरीर गारठलं.” कोण आहे म्हणून काय विचारतेस? ‘गो करोना’ ‘गो करोना’ असं म्हण…. माझ्या तोंडातून शब्द फुटेनात……
मला आठवले ते फक्त आठवले. रामदास रचित ‘भीमरूपी महारुद्रा’ ‘मारुतीराया बलभीमा’ सगळं सगळं म्हणून झालं पण मारुतीरायाला काही सवड झाली नाही यायला. एव्हाना दार खिळंखिळं झालं होतं. क्षणार्धात ते उघडलं…..
समोर एक प्रसन्न मुद्रेची, सालंकृत, लक्ष्मीस्वरूप दुर्गावतारातील नारी वाघावर स्वार होऊन माझ्यासमोर उभी ठाकली. ‘देवी पावली’ असं म्हणून मी नतमस्तक झाले.
“अगं, माझ्या काय नमस्कार करतेस तू? मी तर ‘करोना मर्दिनी” करोना शब्दानं माझी गाळण उडाली. नाकाभोवती चादर घट्ट गुंडाळून मी मुटकुळं करून खाली मटकन् बसले. वाघ माझ्याकडं डोळे विस्फारून बघत होता. वाघ पार्किंग लाॅट मध्ये उभा असल्यागत उभा होता.
‘करोना मर्दिनी’ या नावातच संहार जाणवला मला. मन म्हणालं, “अगं हिच्यामुळेच सौख्य शांती निर्माण होणार आहे. चटकन नमस्कार कर” मनावर विश्वास ठेवून मी सकारात्मक पवित्रा घेतला आणि पुनःश्च नमन केलं.
ती हसली. “अगं मी तुझी सेविका!” असं म्हणून तिनं आपल्या दहा हातातल्या दहा गोष्टी खाली ठेवल्या. कोणता जादूचा दिवा मी घासला आणि ही देवी अवतरली? असा मी विचार करत होते.
“लसेंद्र बाहुबली, या इकडे.” तिच्या सांगण्यावरून वाघानं रुबाबात पावलं उचलली. त्याचं नावही त्याला साजेसं रुबाबदार असंच होतं. तो तिच्यापाशी आला. तिच्या इशारा शिवाय तो काहीच करत नव्हता याची मला आता मनोमन खात्री पटली पण शेवटी वाघ म्हणा की वाघोबा…. भीती तर वाटतेच ना हो?
मला भेदरलेलं पाहून ती म्हणाली, “अगं तो काही करत नाही.आपलाच आहे तो..” या तिच्या वाक्यानं मला तमाम कुत्र्यांच्या मालकांची आठवण झाली.
“तुझ्या सुरक्षेसाठी ही भारतीय बनावटीची लस घेऊन आले आहे. ती घेण्याचा पहिला मान तुला मिळतोय.” ती म्हणाली. मी रडवेल्या चेहऱ्याने हसले. वाघ ही स्मितहास्य करत होता असे जाणवले मला…
करोनाशी दोन हात करायची ताकद असलेली ही सिरम इन्स्टिट्यूट ची ही लस! याशिवाय आपल्या देशाची लोकसंख्या जास्त असल्यानं मी इतर देशांतून आयात केलेल्या सर्व लशी सोबत आणल्या आहेत, जेणेकरून तुटवडा होऊ नये.” असे म्हणून तिने आयुधांकडं बोट दाखवलं.
ज्या गोष्टीसाठी गेले वर्षभर मी उतावळी होते ती गोष्ट माझ्यासमोर होती. तीही वाघावर बसून आली होती. नशिबवानच म्हणायची मी!
करोना मर्दिनी म्हणाली, “वाघावर बैस म्हणजे मला लस टोचायला सोयीचे जाईल. माझ्या काळजात धसस् झालं. करोना पेक्षाही वाघावर बसून लस घेणे हे भीतीदायक होतं.
श्रीकृष्णानं देखील संभ्रमावस्थेत असलेल्या अर्जुनाला दुर्गा स्तोत्र म्हणायला लावलं होतं. मीही तेच म्हटलं. क्षणभर इतकं मोठं आसन आपल्याला कोणीतरी देऊ करतय याचा आनंदही झाला. माझ्यासमोर लसेंद्र चक्क झुकला… मी त्याच्यावर आसनस्थ झाले.
दुर्गा झाल्याची चमक माझ्या डोळ्यात होती पण भीतीने माझं सर्वांग थरथरत होतं. दातावर दात कडकडा वाजत होते. घशाला कोरड पडली होती. तशातही मी करोना मर्दिनीला विनंती केली,” ताई लस टोचत असतानाचा माझा एक फोटो घ्याल प्लीज?”
“हो! हो! आम्ही तो घेतोच कारण सगळ्यांची तशी मागणी आहे. त्यातून तुझा चेहरा अगदी ‘लसोजेनिक’ आहे. आमच्या लसेंद्र बाहुबलीला आम्ही सेल्फी घेण्यात ट्रेन केलेलं आहे. दे तुझा मोबाईल त्याच्या पंजात”
रेडी ????चीज….. क्लिक!!!
वाघानं डरकाळी फोडली. लसीकरणाची नुसतीच पोझिशन घेऊन वाघानं सेल्फी काढला.
पुढच्याच क्षणी इन्जेक्शन टोचलं जाणार होतं…….
“अजिबात घाबरू नकोस. लस घेतल्यावर तुझा चेहरा ‘लसलशीत’ होईल. शिवाय लस घेतल्याचं धाडस केल्याबद्दल तुला मी ‘लसवंती जोशी’ या नावानं सर्टिफिकेट हि देईन….” मी तिच्या ‘लसकोषा’ वर फिदा झाले होते.
सर्टिफिकेट मिळणार या आनंदात मी माझ्या दंडावर शड्डू ठोकला आणि सामोरी गेले……
“आई गंऽऽ” अशी किंकाळी मारत मी उठले तर, दंडाचा चावा एका मुंगीनं घेतला होता……
स्वप्न लगेचच सत्यात उतरलं….
‘लसेंद्र बाहुबली’ वर आरुढ झालेली करोना मर्दिनी ‘लस मोहीम’ फत्ते करण्यात ‘लशस्वी’ झाली हे सुज्ञास सांगणे न लगे!!!