मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ थेंबाचे अस्तित्व☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆ क्षण सृजनाचा ☆ थेंबाचे अस्तित्व ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

पावसाळ्यात माझ्या घराच्या पागोळ्यांवरून पडणारे थेंब निरखणे हा माझा विरंगुळा ! समुद्राच्या लाटा पाहण्यात जसा वेळ जातो ना अगदी तसंच काहीसं…….पुन्हा पुन्हा तीच गोष्ट पण मनाला नव्याने जाणवणारी अशी…..

थेंबांचे निरीक्षण करता करता मी थेंबांच्या अस्तित्वा विषयी विचार करू लागले. माझ्या डोळ्यांना दिसतो तोवर त्याचं अस्तित्व का? मातीत विरे पर्यंतच त्याचं अस्तित्व का ?की माझ्या मनात हृदयात आठवणीत तो असेपर्यंत त्याचं अस्तित्व?…..

थेंब नंतर कुठे जातो? ओढ्यात, डोहात, नाल्यात, समुद्रात ,नदीत ,मातीत की पुन्हा ढगात ?

मला तो नानाविध रूपात, रंगाढंगात  दिसतो. किमान माझ्या मनात तो आहे हे त्याचं अस्तित्व मी नाकारू शकत नाही.

ह्या त्याच्या नश्वर प्रवासाची कहाणी मी कविता स्वरूपात लिहिली .

 

थेंबाचं अस्तित्व

एकदा एक थेंब……

मातीवर पडला

मृदगंध आला

अन् श्वासात भरला

 

एकदा एक थेंब

फुलावर पडला

दवबिंदू झाला

अन् चमकू लागला

 

एकदा एक थेंब

डोहात पडला

मित्रांसोबत डुंबला

अन् न्हाऊन निघाला

 

एकदा एक थेंब

बीजाला बिलगला

बीज अंकुरले

भरून पावला

 

एकदा एक थेंब

अळवा वर पडला

अळवावरचे पाणी म्हणून

नाकारला गेला

 

एकदा एक थेंब

अग्नित पडला

वाफ होऊन

ढगात गेला

 

एकदा एक थेंब

गाला वर पडला

खळी होऊन

गोड हसला

 

एकदा एक थेंब

हातावर पडला

तीर्थ होऊन

पवित्र झाला

 

एकदा एक थेंब

चक्षूतून ओघळला

अश्रु होऊन

मुग्ध गहिवरला

 

एकदा एक थेंब

अमृत होऊन आला

मोहिनीच्या हातून

जीवनदायी ठरला

 

एकदा एक थेंब

समुद्राच्या फेसातून उठला

सूर्याच्या किरणांनी

सोनेरी झाला

 

एकदा एक थेंब

चातकाला मिळाला

तृषा त्याची भागवून

पुण्यवान ठरला

 

एकदा एक थेंब

नदीला भेटला

एकरूप होऊन तिच्याशी

सार्थकी लागला

 

एकदा एक थेंब

शिंपल्यात पडला

मोती होऊन

चमकत राहिला

 

एकदा एक थेंब

दुसऱ्या थेंबाला मिळाला

थेंबे थेंबे तळे साचले

पुढे त्याचा प्रवाह झाला

 

इटुकला थेंब

पिटुकलं अस्तित्व

थेंबा थेंबा ची एकजूट

करी संपन्नतेची लयलूट

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

[email protected]

9822553857

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नातं ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ मनमंजुषेतून ☆ नातं ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

नातं कस असावं, तर एखादा गोफ सुरेख विणलेला असतो तस असावं. एकमेकांची मने घट्ट सुबक विणलेली असावीत.

एकाच्या दुःखाने नकळत दुसर्‍याच्या पापण्या ओल्या व्हाव्यात, तर एकाचे सुख दुसर्‍याच्या चेहर्‍यावर ओसंडून वहावे.

नात्याला कोणते लेबल असलेच पाहिजे असे नाही,पण असलाच तर खरेपणा असावा, प्रेम, जिव्हाळा असावा, विश्वास असावा आणि महत्त्वाचे म्हणजे नात्यात पारदर्शकता असावी. जे असेल ते उघड आत बाहेर काही नाही, लख्ख प्रकाशा सारखे.

नातं माऊ गोधडी सारख असावं, मायेच्या उबेन भरलेल हव. हव हव असवाटणार खरखरीत रगा सारख नसावं, जे हव तर असत पण नाईलाज म्हणून.

मला खरच मनापासून वाटते की एखाद तरी नातं अस नक्की असावं, जिथे हक्काची एक हाक असावी, मायेची एक थाप असावी आणि न मारलेली हाक सुद्धा त्या व्यक्तिला ऐकु जावी.

खूप कमी जणांच्या नशिबात अशी नाती असतात आणि ज्याला ती मिळतात तो खरा भाग्यवान नाही का? असे मला तरी वाटते. तुम्हाला काय वाटते??

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संवाद ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी

श्री एस्.एन्. कुलकर्णी 

☆ विविधा ☆ संवाद ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी ☆ 

संवाद हा मनुष्याच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग/घटक आहे. संवादाशिवाय माणूस राहुच शकत नाही. दोन व्यक्तिंमध्ये नाते निर्माण होते तेदेखील त्यांच्यामधील सतत घडणार्‍या संवादामुळेच. संवादामुळे नुसतेच नाते निर्माण होत नाही तर ते फुलते, विकसित होते आणि ते सुदृढही होते. मग नाते कोणतेही असो. मैत्रीचे असो, पतिपत्नीचे असो, आईवडील, भाऊबहीणीचे असो. या सर्व नात्यांचे मूळ सुयोग्य संवादातच असते. संवाद संपला, थांबला अथवा खुंटला तर त्या नात्याला घरघर लागलीच म्हणुन समजा. तेंव्हा नात्यामध्ये सतत संवाद हा हवाच. रोजच्या जीवनात म्हणुन संवादाला फार महत्व आहे.

संवादामधून आपण अनेक गोष्टी साध्य करीत असतो. संवादामुळे दोन व्यक्तिंमधील गैरसमज दुर होतात. नियमित संवाद असेल तर गैरसमज निर्माणच होत नाहीत.

संवाद म्हणजे बोलणे. नुसतेच बोलत राहणे म्हणजे संवाद नव्हे. दुसरे काय म्हणताहेत, दुसर्‍यांचे म्हणणे काय आहे हे शांतपणे लक्ष देऊन ऐकणे यालासुध्दा संवादच म्हणतात.

पण बर्‍याचवेळा आपण संवादाशिवायही आपण आपले म्हणणे सांगु शकतो. आपण आपल्या देहबोलीतूनही (body language) अनेक गोष्टी व्यक्त (राग, प्रेम, आनंद) व्यक्त करीत असतो. अशावेळी बोलण्याची आवश्यकता नसते. एक गोष्ट मात्र नक्की की आपण हे नेहमी पाहीले पाहीजे की संवाद बंद होता कामा नये, संवाद हरवता कामा नये.

दुसर्‍या व्यक्तिशी आपण सहज संवाद साधु शकतो. पण आपल्याला स्वत:शी संवाद साधता आला पाहीजे. स्वत:शी बोलता आले पाहीजे. यातुनच आपण स्वत:ला ओळखु शकतो. बर्‍याचवेळा आपण अनेक चुका करतो. स्वत:शी केलेल्या संवादातुनच या चुका आपल्याला ऊमगतात.एकदा का चुक समजली की ती दुरूस्त करू शकतो किंवा भविष्यात आपण त्या चुका करणार नाही. स्वत:शी संवाद सुरू केला की आपण अहंगड/न्युनगंडावर सहज मात करू शकतो कारण यामधुन आपण स्वत:ला ओळखु लागलेलो असतो. स्वत:शी केलेल्या संवादावरून आपण नॉर्मल लाईफ जगु शकतो.

संवाद जसा दोन व्यक्तिंमध्ये घडत असतो तसाच तो दोन देशांमध्ये/दोन राष्टांमध्ये सुध्दा घडत असतो. दोन देशांमध्ये नियमित संवाद असेल/ बोलणे असेल तर सर्व व्यवहार सुरळीत होतात. व्यापार तसेच संबंध सुरळीत होतात. अगदी युध्दजन्य परिस्थिती असेल आणि त्या देशांमध्ये संवाद असेल तर ती परिस्थिती निवळण्यात मदतच होते. युनोचे कामच हे आहे की सर्व राष्टांना एकत्र आणणे आणि त्यांच्यामध्ये नियमित संवाद घडवून आणणे. त्यामुळे संवादाला आपल्या आयुष्यात फार महत्व आहे.

तेंव्हा आपण काळजी घेऊया की आपल्या दैनंदीन जीवनात संवाद हरवणार नाही.

©  श्री एस्. एन्. कुलकर्णी

वारजे, पुणे-४११०५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘पैंजण’ कवितेचं  रसग्रहण☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

(निवेदन – आजपासून कवितेच्या रसग्रहणावर आधारित ‘काव्यानंद’ हे नवीन सादर सुरू करत आहोत. आज प्रथम वाचा, ‘पैंजण’ या कवितेचं रसग्रहण। )

☆  काव्यानंद ☆ ‘पैंजण’ कवितेचं  रसग्रहण☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

‘पैंजण’ ही नीलम माणगावे यांचीनिवेदन – आजपासून कवितेच्या रसग्रहणावर आधारित ‘काव्यानंद’ हे नवीन सादर सुरू करत आहोत. आज प्रथम वाचा, ‘पैंजण’ या कवितेचं रसग्रहण कविता, चार पिढ्यातील ‘स्त्री’च्या स्थिती-गतीचा, मन-विचारांचा वेध घेते. पैंजणाच्या प्रतिकातून अतिशय संवेदनशीलतेने आणि कलात्मकतेने, पिढी-दर-पिढी, भावना-विचारात झालेले परिवर्तन यात दाखवले आहे.

आजी जड, वजनदार पैंजण घालून  आपल्या साम्राज्यात मिरवायची. तिचे साम्राज्य तरी केवढे? स्वैपाकघर, माजघर एवढेच. पण त्यात ती साम्राज्ञीच्या रुबाबात वावरायची. पैंजण पायाच्या घोट्याशी घासले जायचे. पाय दुखायचे. कळ यायची. जखम व्हायची. पैंजण जसे घोट्याशी जखडलेले, तसे मन संसाराशी, परंपरेने आलेल्या संस्काराशी जखडलेले. त्यामुळे दुखलं, खुपलं, तरी ती संस्काराची पट्टी बांधून जखमेला ऊब द्यायची. मनाची समजूत घालायची. आपल्या या राज्यात ती खूश असायची.

आईने जड, वजनदार पैंजण  वापरणं सोडून दिलं. त्याऐवजी ती नाजूक तोरड्या वापरू लागली. परंपरेचं थोडसं जोखड तिने कमी केलं. आपल्या आईपेक्षा ती थोडी मोकळी झाली. तिचा वावर ओसरी, अंगण, गच्ची असा होऊ लागला. तरी पण कधी कधी तोरडीचा हूक अडकायचा. साडीचा जरीचा काठ फाटायचा. दोरे लोंबायचे. जरतारी संसारात थोडं विसंवादाचं फाटकंपण अनुभवाला यायचं, पण तरीही ती आपलं घर, अंगण, गच्ची यात खुशीनं भिरभिरायची.

तिसर्‍या पिढीतली ‘मी’ घराच्या फाटकातून बाहेर पडले. भोवतालाचं जग विस्तारलं. मोकळा श्वास घेता येऊ लागला. टोचणं, बोचणं, दुखणं, खुपणं, जखमा नकोत, म्हणून मी पैंजण, तोरड्या दोन्ही टाकून दिल्या. नाजूक, हलके, सॅंडल्स, चपला, बूट ‘मी’ वापरू लागले. तरीही कधी चपला टोचायच्या. बूट चावायचे. पण बाहेर मिळणार्‍या स्वातंत्र्यासाठी, मुक्त श्वासासाठी ’मी’ने हे सगळं सहन केलं.

आता चौथ्या पिढीतली ‘माझी मुलगी’ म्हणते, ‘आई पैंजण, तोरड्या, सॅंडल्स, चपला काहीच नको. पायच होऊदेत कणखर, पोलादी, काटेकुटे तुडवणारे, जखमा सहन करणारे, निदान पुढलं शतक येण्यापूर्वी….’ मुलीला आत्मभान आलय. बाहेर येणार्‍या संकटांचा सामना करण्यासाठी आपण आत्मनिर्भर व्हायला हवं, अशी तिची आकांक्षा आहे.

स्वैपाकघर, माजघरात मिरवणारी आजी, अंगण-गच्चीपर्यंत भिरभिरणारी आई, सॅंडलल्स घालून घराबाहेर पडणारी कवितेतली मी आणि, पैंजण, तोरड्या चप्पल, बूट, सॅंडल काही नको. पायच होऊ देत आता… घट्ट, मजबूत, पोलादी’ असं म्हणणारी तिची मुलगी सगळ्या जणी कशा लख्खपणे डोळ्यापुढे उभ्या राहतात.

कविता मुक्तछंदात आहे. प्रत्यक कडव्यात समानार्थी प्रासयुक्त आलेले शब्द कवितेला एक वेगळंच नादसौंदर्य प्राप्त करून देतात. उदा. सांगायचं तर, आजीचे ‘पाय भरून यायचे, दुखायचे, खूपायचे, घोटे काळे ठिक्कर पडायचे. किंवा जखम व्हायची, चिघळायची….’ किंवा नाजूक तोरड्या घालायला सुरुवत करताना आई म्हणते, ‘ना पाय दुखणं , ना खुपणं, ना चिघळणं,’ तर तोरड्याही नको, म्हणताना ‘मी’ म्हणते, अडकणं, बोचणं, चिघळाणं, फाटणं काहीच नको. …’ असे शब्द वाचताना वाटतं, ‘शब्दांनो मागुते या’ असं कवायत्रीला म्हणावंच लागलं नसणार. शब्द आपोआपच तिच्या लेखणीच्या मागे मागे आले असणार.

२०व्या शतकाच्या अखेरीस लिहिलेली ही कविता. स्त्रीमुक्तीचा प्रवास ती अगदी सहज-साधेपणाने अधोरेखित करते. कुठेही आक्रोशी स्वर नाही. कमीत कमी शब्दातून अतिशय कलात्मकतेने ही वाटचाल कवयत्रीने आपल्यापुढे मांडली आहे.

महाराष्ट्र राज्यशिक्षण मंडळाने इयत्ता 11 वी साठी मराठी भाषेचे जे पाठपुस्तक तयार केले आहे, त्या ‘युवा भरतीत’ नीलम माणगावे यांच्या ‘पैंजण‘ या कवितेचा समावेश आहे.

 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शहाणपणाची उघडा कवाडे ☆ श्री सतीश स. कुलकर्णी

श्री सतीश स.कुलकर्णी 

☆ मनमंजुषेतून ☆ शहाणपणाची उघडा कवाडे ☆ श्री सतीश स. कुलकर्णी ☆ 

‘The only thing you absolutely have to know is the location of the library.’

अल्बर्ट आईनस्टाईन ह्यांचं हे प्रसिद्ध वाक्य आहे. आमच्या वाचनालयाचं स्थळ माझ्यासह सगळ्याच सभासदांना अगदी चांगलं माहीत आहे. पण आमच्यासारख्या सामान्यांच्या जगण्यात त्याचं नेमकं ‘स्थान’ काय आहे (किंवा काय असावं!), हे प्रशासनाला किंवा राज्यकर्त्यांना उमगलेलं नाही. त्यामुळंच सार्वजनिक वाचनालयांची दारं अजून बंदच आहे. ती कधी उघडणार, ह्याची काहीच कल्पना नाही.

राज्य सरकारनं ५ ऑक्टोबरपासून बार, रेस्टॉरंट उघडायला परवानगी दिली. आणखी काही गोष्टी केल्या आणि काही जुने निर्बंध चालूच ठेवले. ह्यात कुठेच ग्रंथालयांचा-वाचनालयांचा उल्लेख नाही, हे विशेष. असा अनुल्लेख म्हणजे उपेक्षाच!

साक्षरतेचे प्रमाण ८० टक्क्यांच्या घरात गेलेल्या आपल्या देशातील बहुसंख्यांना वाचनालये उघडावीत, त्यासाठी काही मागणी करावी, असं वाटल्याचं दिसलं नाही. (काही तुरळक अपवाद असतील.) वृत्तपत्रांद्वारे कोरोनाचा फैलाव होतो, अशा ‘व्हॉट्सॲप विद्यापीठीय’ बातम्यांचा पूर आल्यानंतर तसा तो होत नाही, हे सांगण्यासाठी वृत्तपत्रांची एकच घाई उडाली. त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी ह्यांना बोलते करून त्या बातम्या पहिल्या पानावर ठळकपणे छापण्यात आल्या. वृत्तपत्रांच्या माध्यमातून विषाणू पसरत नसेल, तर तो पुस्तकांच्या पानांमधून कसा पसरेल, असा प्रश्न वाचनालयांच्या बाबतीत विचारायचं मात्र विसरूनच गेलं.

‘अनलॉक : ५’च्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेला मात्र जाग आली. ‘ग्रंथालये बंद असणं, ही बाब एकूण साहित्य व्यवहाराच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे ती उघडण्यास परवानगी द्यावी,’ अशी मागणी साहित्य परिषदेनं केल्याची बातमी शुक्रवारच्या दैनिकांमध्ये आहे. पण एकूणच साहित्य व्यवहार पाहणाऱ्यांना काय किंमत द्यायची किंवा त्यांच्याशी कसा व्यवहार करायचा, हे प्रशासन हाकणाऱ्यांना किंवा राज्यकर्त्यांना माहीत आहे. त्यामुळे ‘मागणी केली, बातमी आली’ एवढ्यावरच समाधान मानण्याची वेळ.

अधिकृत परवानगी मिळाल्याच्या किती तरी दिवस आधीपासून रेस्टॉरंट आणि बारमध्ये सहजपणे ‘बसता’ येते, अशी चर्चा कर्णोपकर्णी असते. तिथे ग्रंथालयावरचे निर्बंध मात्र कडकपणे चालू असतात. त्यावाचून कुणाचे काही अडत नाही, ही तर भावना त्यामागे नसावी ना?

ह्या कसोटीच्या काळात वाचन-संस्कृतीच्या कसोटीला आपण उतरावं, ह्या भावनेनं वाचनालयाकडून काही झाल्याचं दिसलं नाही, ह्याचं वाईट वाटतं. वाचनालय सुरू व्हावं ह्यासाठी आम्ही सभासदांनीही रेटा लावला नाही. (हा लेख khidaki.blogspot.com इथे प्रसिद्ध झाल्यानंतर दोन दिवसांपासून काही वाहिन्या व वृत्तपत्रे ह्यांनी ही मागणी लावून धरली.)

इंटरनेटवर भटकताना कॅनडाच्या ओंटारिओ परगण्यातील ‘किचनेर पब्लिक लायब्ररी’ चं संकेतस्थळ दिसलं. काही शाखा असलेलं हे वाचनालय १० ऑगस्टपासून पुन्हा चालू झालं. त्याचा आनंद संकेतस्थळावर व्यक्त झालेला दिसतो. सभासदांना उद्देशून तिथं लिहिलं आहे – ‘आमच्या ह्या जागेत तुमचं पुन्हा स्वागत करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे! खूप दिवसांपासून आम्हाला तुमची आठवण येत होती…’ सरकारच्या अनुदानावर (म्हणजे जनतेच्या पैशातून) चालणाऱ्या इथल्या सार्वजनिक वाचनालयांना आपल्या वाचकांची अशी मनापासून आठवण झाली का?

समर्थ रामदास स्वामींनी ‘प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ असं लिहून ठेवलं. त्यातलं अखंडित महत्त्वाचं आहे. सफ़दर हाशमी ‘किताबें’ कवितेत लिहितात –

किताबें करती है बातें

बीते जमानों की

दुनिया की, इंसानों की

आज की कल की

एक-एक पल की।

खुशियों की, ग़मों की

फूलों की, बमों की

जीत की, हार की

प्यार की, मार की।

सुनोगे नहीं क्या

किताबों की बातें?

आपण सगळ्याच पातळ्यांवर कान बंद करून घेतल्यानंतर पुस्तकांचे हे अस्फुट उद्गार त्या पानांतून कसे ऐकू येतील!

वाचल्यानं माहिती मिळते, ज्ञान वाढतं. माणूस शहाणा होतो म्हणतात.

आपली प्रजा शहाणीसुरती असावी, असं कोणत्या जमान्यातील राज्यकर्त्यांना वाटत असतं हो!

हा सविस्तर लेख व असे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या – khidaki.blogspot.com

 

©  श्री सतीश स.कुलकर्णी 

संपर्क – [email protected],  [email protected]

(चित्र साभार श्री सतीश स. कुलकर्णी )

 

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सलीलप्रवाहात डोकावताना…. ☆ डाॅ.मेधा फणसळकर

डाॅ. मेधा फणसळकर

☆ विविधा ☆  सलीलप्रवाहात डोकावताना…. ☆ डाॅ. मेधा फणसळकर ☆

आम्ही टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील सर्व कलाप्रेमी वैद्य लोक कॉलेजमध्ये असताना एका कलासक्त, संस्कृत विषयाच्या प्राध्यापिक असणाऱ्या “ माधवी पटवर्धन” या व्यक्तिमत्वाबरोबर कलेच्या माध्यमातूनच जोडल्या गेलो. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या आम्हा मुलांमधील कलेच्या ओढीला हलकेच साद घालत सुरु केलेले कलामंडळ म्हणजे एक आनंदाचे झाड होते. तेच झाड पुन्हा एकदा अतुलच्या प्रयत्नाने पुन्हा बहरले. आम्ही ऑनलाईन भेटू लागलो आणि जवळजवळ वीस वर्षांनी ते मैत्र पुन्हा एकदा उजळले. त्यातीलच कालचे पुष्प म्हणजे ‛ सलील कुलकर्णी’ यांच्याशी झालेल्या गप्पा! सलीलप्रवाहात डोकावताना आलेली अविस्मरणीय क्षणाची अनुभूती!

सलीलजींच्या भाषेत सांगायचे तर “ विकिपीडियावर जे नाही ते ज्ञान केवळ आजी- आजोबांकडे आहे आणि अशा अनुभवाच्या पायाशी नेहमी बसावे” आम्हीही काल असाच काहीसा अनुभव घेतला. आणि एक संपन्न अनुभवाचा, विचारांचा खजिना आम्हाला गवसला.

सलीलजींच्या गाण्यातून, लेखनातून आणि वेगवेगळ्या कार्यक्रमातून ते आपल्याला नेहमी भेटतच असतात. पण काल झालेल्या ‛या हृदयीचे त्या हृदयी’ संवादातून हे व्यक्तिमत्त्व अधिकच उलगडत गेले. आज महाराष्ट्रात राहूनही उत्तम मराठी शब्दसुद्धा कानावर पडणे दुरापास्त झाले आहे. अशा वेळी सलीलजींच्या बोलण्यातील शब्दसंपत्ती, सखोल चिंतन मनाला अधिक समृद्ध करुन गेले. ऐकण्याची प्रक्रिया कमी झाली आहे याबद्दल त्यांना खंत वाटते. एखादे गाणे कित्येक वेळा ऐकले तरी प्रत्येक वेळी काहीतरी नवी अनुभूती देते. म्हणूनच ते म्हणतात ,“ गप्पा आणि भाषणामध्ये फरक आहे आणि त्यामुळेच मला गप्पा मारायला आवडतात.”  कारण त्यात  देवाण- घेवाण आहे. बोलणे आणि ऐकणे या दोन्ही प्रक्रिया त्यात आहेत.

आपले वैद्यकीय शिक्षण आणि कार्यक्षेत्र याची निवड करायची वेळ आली तेव्हा मनाला पटला तोच निर्णय घेतला आणि संगीतक्षेत्र निवडले. हे सांगताना ते म्हटले,“ ज्या गावात राहायचे नाही तिथे बंगला का बांधायचा?” अशा सहज सोप्या उपमा- उदाहरणानी हा सलीलप्रवाह आम्हाला त्यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवत होता.

सातशेच्या वर त्यांनी संगीतरचना केल्या. बरेच वेळा आधी चाल आणि मग त्यावर शब्द सुद्धा बांधले. पण ठिपके जोडून रांगोळी काढण्यापेक्षा एखाद्या मनस्वी चित्रकाराने कुंचल्याच्या सहज मारलेल्या फाटकाऱ्यातून अप्रतिम चित्र उमटावे तसे गाणे आतून आले तरच रसिकांपर्यंत सहज पोहोचते असे त्यांना वाटते.

हृदयनाथ, लता मंगेशकर या नेहमीच त्यांच्या गुरुस्थानी असणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यांच्याविषयी भरभरून बोलताना ते म्हणाले,“ झाड जितके मोठे तितका त्याचा विस्तार मोठा! ते ओरबाडण्यापेक्षा त्याचे सतत निरीक्षण करावे  आणि ते आपल्या आत रुजवण्याचा प्रयत्न करावा.”

अशाच गप्पा रंगत असताना “पुढच्या पिढीसाठी काय संदेश असेल किंवा काहीतरी उत्तम- अभिजात पुढे रुजावे असा गाण्यातून प्रयत्न असतो का?” असे विचारल्यावर ते लगेच म्हणाले,“ माझ्या मुलांनी काय ऐकावे हे मी ठरवू शकत नाही. पण उत्तम तेच त्यांच्या कानावर पडावे असा विचार कदाचित अंतर्मनात असेल आणि त्यातून जर असे संगीत निर्माण होत असेल आणि त्यातून पुढची पिढी घडली तर जास्त आनंद आहे.”

प्रत्येक गाणे हे खरं तर मूळची एक कविता असते हे आपण जाणतोच. जेव्हा अशा कवितांना संगीतकाराचा परिसस्पर्श लाभतो तेव्हा त्याचे सोने होते. पण त्यातही एक संगीतकार म्हणून त्यांनी एक विचार मांडला जो खरोखरच विचार करण्यासारखा आहे. ते म्हणतात,“ प्रत्येक वृत्तबद्ध कविता चालीत बांधण्याचा अट्टाहास करु नये. काहीवेळा सूरांनी त्याची धार बोथट होते आणि कवितेचा भाव हृदयापर्यंत पोहचू शकत नाही.”  एक मनस्वी कलाकारच एखाद्या कालाकृतीकडे इतक्या डोळसपणे बघू शकतो. म्हणूनच या सलीलप्रवाहात डोकावताना खोल असला तरी त्याचा नितळ तळ स्पष्ट दिसत होता. या प्रवाहाची स्वतःची अशी मनोभूमिका, दिशा ठरलेली आहे. आणि ती सखोल चिंतनातून आली आहे. म्हणूनच त्या प्रवाहातून वाहणारा विचारांचा खळखळता झरा काल आम्हाला निखळ आनंदात चिंब भिजवून गेला.

 

©  डाॅ. मेधा फणसळकर

9423019961

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खार! ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ विविधा ☆ खार! ☆ श्रीमती अनुराधा फाटक  ☆ 

‘लहान सुंदर गोजिरवाणी अशी दिसे ही खार, लुसलुशीत हे अंग तिचेच शेपूट गोंडेदार!’

अशा वर्णनाची बालगीतात कुतूहलाचे स्थान निर्माण करणारी खार आजची नसून रामायणकालापासून तिची सर्वांना ओळख आहे .

रावणाच्या तावडीतून सीतेला सोडविण्यासाठी लंकेत प्रवेश करता यावा म्हणून वानरसेनेच्या मदतीने श्रीरामानी सेतू बाधंण्याचे

काम सुरु केले त्यावेळी एक खार सतत समुद्रातील वाळूत लोळून सेतूबांधावर येऊन आपले शरीर झाडत असल्याचे प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आले. खारीचे हे काम पाहून त्यांनी कौतुकाने तिच्या पाठीवरून हात फिरविला. त्याची निशाणी अजूनही समस्त खार जमातीवर दिसते.खारीच्या शरीरावर असणारे पट्टे म्हणजे खारीच्या पाठीवर हात फिरविलेले श्रीरामांच्या बोटांचे ठसे समजले जातात. आपल्या कुवतीप्रमाणे दुसऱ्यांना मदत करणारी, स्ततःच्या इच्छेनुसार, कोणाचीही बळजबरी नसताना काम करणारी माणसे दुसऱ्यांच्या कामात खारीचा वाटा उचलताना दिसतात.

सतत वृक्षावर राहणारा, प्रत्येक वस्तू कुरतडून खाणारा  सर्वसंचारी असा निरुपद्रवी प्राणी म्हणजे खार! काही मुले एखादी वस्तू दाताने कुरतडत। बसतात तेव्हा खारीसारखा कुरतडत बसू नको असे म्हणतात. स्वतःच्या शरीराचा तोल सांभाळण्यासाठी खारीला झुपकेदार शेपूट उपलब्ध झाली असावी. खारीसारखी चपळ वृत्तीची मुले पाहिली की,सर्वांना आनंद होतो. खारीचा वाटा उचलून सर्व मुलांनी काही चांगले उपक्रम केले तर राष्ट्र उभारणीच्या कार्याचे उद्याचे चित्र नक्कीच आशादायक असेल. आज अजगराप्रमाणे सुस्तावलेल्या समाजात चेतना निर्माण करण्यासाठी खारीसारख्या कार्यक्षम प्रवृत्तीच्या माणसांची गरज आहे.

झरझर झाडावर, सरसर खाली पळणारी खार महत्वाचीच आहे.

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अधीक महिना ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

☆ इंद्रधनुष्य ☆ अधीक महिना ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆ 

अधिक मास

अधिक मास म्हटलं की प्रत्येकच स्त्रीमध्ये एक प्रकारे उत्साह जागतो आणि महिनाभर वेगवेगळ्या प्रकारची रोज ३३ फुले वाहून ती आपल्या बाळकृष्णाची मनोभावे पूजा करते.

कृष्ण हा भगवान विष्णूचा आठवा अवतार . जेव्हा भगवान विष्णूंना विचारले गेले की तुम्हाला जाई, मोगरा, गुलाब, चंपा, पारिजातक अशी कोणती फुले पाहिजेत ? तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले की मला यातील कोणतेही फूल नको, मला आठ फुले पाहिजेत. ती आठ फुले कोणती याचे सुंदर वर्णन या संस्कृतच्या श्लोकामध्ये आपल्याला पहावयास मिळते .

? अयुसा प्रथमं पुष्पं

पुष्पं इंद्रियनिग्रहं

सर्वभूत दयापुष्पं

क्षमापुष्पं विशेषतः

ध्यानपुष्पं दानपुष्पं

योगपुष्पं तथैवच

सत्यं अष्टोदम पुष्पं

विष्णू प्रसीदं करेत ! ?

अर्थात –

अयुसा हे पहिले पुष्प आहे . म्हणजेच जाणुनबुजून किंवा अजाणतेपणी कोणत्याही प्रकारे हिंसा करू नका.

दुसरे पुष्प आहे इंद्रियनिग्रह.आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवा . मला हे पाहिजे , माझ्या कडे ते नाही असे म्हणू नका.समाधानी रहा.

तिसरे पुष्ष आहे सर्वभूत दया. सर्वांवर प्रेम करा . कोणाचाही तिरस्कार करू नका .

चौथे आणि विशेष पुष्प आहे क्षमा . कोणी आपल्याला चुकीचा म्हणत असेल तरीही त्याला क्षमा करा.

ध्यान पाचवे पुष्प आहे .ध्यान करा ज्यामुळे मन एकाग्र होऊन मनावर ताबा मिळवता येईल.

दान सहावे पुष्प आहे . सढळ हाताने दान करा.

सातवे पुष्प आहे योग. योगा करा.

सर्वात महत्त्वाचे आठवे पुष्प आहे सत्य. नेहमी सत्य बोला .सत्य बोलून एखाद्या वेळी कोणाचे मन दुखले तरी चालेल पण असत्य बोलून एखाद्याच्या मनातून कायमचे उतरु नका.

ही पुष्पे अर्पण करून भगवान विष्णूला प्रसन्न करा.

अधिक मासाच्या भरभरून शुभेच्छा.

 

संग्राहक: सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रमोशन ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ विविधा ☆ प्रमोशन ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

स्त्रीने असिस्टंट म्हणून काम करणं हे सर्वमान्य आणि सर्वसामान्य आहे. पण ती जेव्हा बॉस म्हणून खुर्चीवर बसते तेव्हा तिला अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो. तिची ‘बढती ‘ही व्यक्तिशः मानाची,जबाबदारीची,प्रतिष्ठेची असली तरी बरेच वेळा कुटुंबातल्या इतरांसाठी गैरसोयीची होते. तिच्या रुटीनच्या नोकरीने घराचा जो जम

बसलेला असतो, तो विस्कटतो.प्रमोशनची सुरुवात बहुधा बदलीने होते.

तिथे संघर्ष सुरु होतो. पहिल्याने हा संघर्ष तिच्या मनात होतो.बढतीमुळे दैनंदिनीत बदल,नवीन कामाचा अभ्यास, जबाबदारी, संसार संभाळताना हे जमेल?कशाला सुखाचा जीव दुःखात घाला!अशी द्विधा मनस्थिती होते. अशा वेळी तिला कोणी आधार दिला, प्रोत्साहन दिलं तर ती वरिष्ठ म्हणून उत्तम काम करू शकते

सरिता आकाशवाणीत ड्यूटीऑफिसर होती. तिला प्रमोशन मिळालं. पण बदली होणार होती. तिची दोन्ही मुलं शाळेत जाणारी ,  बऱ्याच अडचणी होणार होत्या.पण सरिताची नवविवाहित जाऊ –ती मदतीला धावली. ती सरिताला म्हणाली,” वहिनी, तुम्ही प्रमोशन घ्या. मी मुलांच अभ्यास घेण्यापासून सर्व करीन, सासुबाईना समजावून सांगेन. मधून मधून या. मुलांना भेटा, इकडची काळजी करू नका.”

सरिताने अशी दोन वर्ष काढली. मग मुलांना तिकडे न्हेलं. आता तिचा नवरा मधून मधून तिच्या गावी येतो. सासूबाई पण चेंज म्हणून येतात. अशी साथ घरातल्यानी दिली तर सरिता प्रमोशनच्या पुढच्या पायऱ्याही चढेल.

स्वाती एक माध्यमिक शिक्षिका. तिच्या पदव्या, लवकर नोकरीला लागल्यामुळे सिनिऑरिटी, त्यामुळे  मुख्याध्यापकाची जागा तिला इतर सहकारी मैत्रीणींच्या आधी मिळाली. शैला स्वातीची जिवलग मैत्रीण.तिला वाटलं चला, आता आपल्याला थोडी मोकळिक मिळेल.कामाच्या बाबतीत ती निष्काळजीच होती. सहामाही जवळ आली तरी तिच्या विषयाचा पोर्शंन पूर्ण नाही. दहावीच्या मुलांनी तक्रार केली. स्वातीने शैलाला ऑफिस मध्ये बोलावल, विचारलं.

“गेल्या महिन्यात आजारी होते तुला माहितच आहे की.”

“पण जादा तास घेऊन अभ्यासक्रम तू पुरा करायला हवा होतास.”

“आता मी असं करते.शिकवलय तेव्हढ्यावरच पेपर काढते. म्हणजे मुलं चिडायची नाहीत.”

“अग, दहावीचा पेपर बोर्डाच्या फॉरमँटप्रमाणे काढायला हवा. मुलांना सराव नको का व्हायला?तू पोर्शंन पुरा कर.”

शैलाने ऐकलं नाही. पालकांनी तक्रारी केल्याच.स्वातीची दोन्हीकडून पंचाईत. मग ती कडकपणे वागू लागली. काही मैत्रिणीनी समजून घेतलं काही तुटल्या.स्वातीने स्टाफ मिटिंगमध्ये सगळं क्लिअर केलं.कारण तिला आपल्या पदाची प्रतिष्ठा राखायची होती.ती म्हणाली, “मी भेदभाव करणार नाही. पुरुष शिक्षकांनी लक्षात घ्यावं, स्टाफमधल्या शिक्षिका तुमच्या इतक्याच कर्तव्यतत्पर आहेत पण काही वेळा त्यांना सवलती द्याव्या लागतात. कारण त्या माता आहेत. तुमच्या घरच्या स्त्रियांकडे बघा. स्त्री म्हणून सवलत नाही, पण सहानुभूती दाखवायला हवी ना! गैरसमज नको. त्यावेळी तरी पुरुष शिक्षकांनी माना डोलावल्या

आपली मैत्रीण  बॉसच्या खुर्चीवर बसली तर तिच्या सहकारी स्त्रियांनी तिला समजून घ्यायला हव.तिला ‘येस बॉस ‘म्हणताना आनंद , अभिमान वाटायला हवा. पण प्रत्यक्षात असं होतं का? की स्त्री स्त्रीची शत्रू ठरते?  तिच्या प्रमोशनवर अशी अनेक प्रश्न चिन्हं आहेत.

 

© श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

मो. – 8806955070.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी ☆ सुश्री स्नेहा दामले

 ☆ विविधा ☆ वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी ☆ सुश्री स्नेहा दामले

आपलं जगणं बऱ्याच अंशी वृक्ष-वनस्पतींवर अवलंबून असतं .. आपल्या तोंडचा घास आणि आपला श्वास सगळी वनस्पतींची देणगी..

तुकाराम महाराजांनी उगीच नाही त्यांना सोयरे म्हटलं.. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी’

आपल्या कुटुंबात,आपण आपल्या सोयरे मंडळींना/पाव्हणे मंडळींना खूप आदराचं, मानाचं स्थान देतो.

तसा आदर आणि मान, आपलं जगणं ज्या सोयर्‍यांवर अवलंबून आहे, त्या या वनस्पतींना आपण देतो का?

उत्तर बहुतेक नाही असंच येतं; आपण अति परिचय झाल्यासारखं फारच गृहीत धरतो त्यांना किंवा चक्क दुर्लक्ष करतो त्यांच्याकडे…

नर्मदालय’ संस्थेच्या माध्यमातून मध्यप्रदेशातील नर्मदा किनारीच्या मागास व वंचित मुलांसाठी शिक्षण विषयक काम करणाऱ्या भारती ठाकूर . त्यांची एक गोष्ट मध्यंतरी वाचली होती.. गोष्टीचं शीर्षक होतं ‘क्षमा..’

शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून एकदा रागाच्या भरात भारती ताईंनी आपल्या बागेतलं १०-११ फुटी जास्वंदीचं झाड  अगदी दोन अडीच फुटांपर्यंत छाटलं..

आपल्या या अविवेकी कृत्याचा त्यांना लगेच पश्चात्तापही झाला.. पावसाळा होता त्यामुळे झाड पुन्हा लगेच वाढलं पण शेजाऱ्यांच्या कंपाउंडमध्ये एकही फांदी वाढली नाही परत! झाड वाढलं पण फुल मात्र एकही येईना; खतपाणी, सगळे प्रयोग करून झाले. मग कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राच्या दीदींच्या सांगण्यावरून भारतीताईंनी त्या झाडाची क्षमा मागितली; त्याच्याशी रोज संवाद करू लागल्या, गप्पा मारू लागल्या.. एक वेगळंच जिव्हाळ्याचं नातं त्यांचं झाडाशी निर्माण झालं आणि मग काही दिवसात झाड कळ्यांनी पुन्हा भरून गेलं . झाडाने त्यांना ‘क्षमा’ केली होती..

ही गोष्ट मी वाचली आणि ती माझ्या अगदी हृदयाला भिडली.. मलाही झाडांची आवड आहे. झाडं आपल्याला प्राणवायू देतात, त्या जीवावर आपण खरं तर जगतो; पण आपण काय करतो त्यांना जगण्यासाठी? या विचाराने मी या मातीतल्या, देशी आणि नर्सरीत सहसा न आढळणाऱ्या झाडांची बियांपासून रोपं बनवते आणि मग कुणाला हवी त्याला देऊन टाकते लावायला. बिया एकत्र रुजत घालते आणि मग रोपांनी डोकं वर काढलं की त्यांना वेगळं काढून वेगवेगळ्या पिशव्यांत लावते. याचं कारण प्रत्येक बी वेगवेगळ्या पिशवीत लावायला आणि त्या पिशव्या ठेवायला माझ्याकडे तेवढी जागा नाही. हे रोप असं काढून पिशवीत लावलं की ते काढताना त्याच्या नाजूक मुळांना थोडी तरी इजा होतेच आणि मग त्या चिमुकल्या रोपाची पाने एक दिवस जरा मलूल असतात.. पुन्हा दुसऱ्या दिवशी नवीन परिस्थितीशी जुळवून घेत टवटवीत होतात. हा माझा नेहमीचा अनुभव..

वरील गोष्ट वाचली तेव्हा मी रुजत घातलेल्या गोकर्णीचं रोप पिशवीत लावण्याजोगं झालं होतं, यावेळी मी जरा अधिक हळुवारपणे ते मातीतून काढायचा प्रयत्न केला पण तरीही त्याला थोडंसं दुखलं असणारच अशा विचाराने सॉरी हं,दुखलं का रे तुला? असं म्हणत त्या पिटुकल्या रोपाशी मी संवाद केला आणि काय सांगू..या एका वाक्याने माझं मलाच केवढं बरं वाटलं..’आता तुला नवीन जागा देते हं’ असं म्हणून मी ते पिशवीत लावलं. थोडी माती दाबली, पाणी घातलं. भारतीताईंसारखा अनुभव यावेळी मलाही आला. यावेळी पिशवीतल्या रोपट्याने दुसऱ्या दिवशी मान टाकली नाही.

वनस्पतींनाही संवेदना असतात, त्या प्रतिक्रिया देतात हे सगळं आपण शिकलेलं असतो. विज्ञानाने  ते सिद्धही केले आहे.. आपल्या ऋषीमुनींना मात्र ही गोष्ट आधीपासून माहित असणार..पद्मपुराणात तो श्लोक आहे. कोणतीही वनस्पती आपल्या उपयोगासाठी तोडण्या आधी तिची प्रार्थना करून हा श्लोक म्हणायचा असतो.

आयुर्बलम यशो वर्च: प्रजा: पशून्वसूनिच |

 ब्रह्म प्रज्ञां च मेधां च तत्वं नो देहि वनस्पते ||

हे वनस्पती तू आम्हाला आयुष्य, उत्तम बल, यश, धन, प्रज्ञा आणि चांगली बुद्धी दे..

हा श्लोक मी वाचला होता आधी; पण त्या मागचा ऋषींचा वनस्पतींबद्दलचा आदर आणि प्रेमभाव या माझ्या अनुभवातून माझ्यासमोर लख्खपणे स्पष्ट झाला होता..

 

सुश्री स्नेहा दामले

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print