मराठी साहित्य – विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-5 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-5 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आता आमच्या ट्रिपचा शेवटचा टप्पा होता. सकाळी साॅ मिल बघायला गेलो. जंगलातील सांगवान सारखे पालव लाकूड तोडून त्याच्या फळ्या समुद्रावरील जहाजातून इंग्लंडला  नेण्याच्या दृष्टीने ब्रिटिशांनी ही मिल उभारली होती.तिथे रेल्वे मार्ग ही ब्रिटिशांनी केला होता. अजूनही ती मिल चालू आहे. पाल्लव लाकूड खूप टिकाऊ आणि वाळवी न लागणारे असल्याने त्याला खूप किंमत आहे. आम्ही मिल पाहिली आणि बाहेर असलेल्या लाकडी वस्तूंच्या दुकानात थोडीफार खरेदी केली. आत्तापर्यंतचा प्रवास समुद्रावर झाला होता.इतका समुद्रप्रवास मी तर प्रथमच केला होता. मन सतत समुद्रावर तरंगतच होतं जणू! प्रसन्न हवा होती, त्यामुळे फिरणे कंटाळवाणे वाटले नाही.

परतीच्या प्रवासात पाॅंडेचरी बीचवर राहायला मिळाले. तेथेही पोंगल सणाच्या सुट्टी मुळे माणसांचा समुद्र च होता! उत्साही तरुणाई येथे एन्जॉय करत होती.. ऑरोव्हिलाची छोटीशी ट्रीप करून आम्ही चेन्नई ला जाण्यासाठी निघालो.

वाटेत महाबलीपुरम चे मंदिर आणि इतर मंदिराचे भग्नावशेष पाहून भारतीय संस्कृती किती प्राचीन आहे हे दिसून येत होते. तिथून चेन्नई ला आलो. एक दिवस चेन्नई मुक्काम होता.

या दहा-बारा दिवसात समुद्राची किती रुपे डोळ्यासमोर येत होती!  कॅमेरात स्वतःला बंदिस्त करून त्या प्रत्येक ठिकाणाची साक्ष आम्ही इथे आल्यावर पाहू शकत होतो.

अंदमानच्या ट्रीपचे ध्येय जरी ‘सावरकरांचा सेल्युलर जेल’ बघण्याचे असले तरी निसर्गाचा हा समुद्रावरचा नजारा बघणे हे सुद्धा अवर्णनीय सुख होते. रोज बघितलेल्या त्या समुद्राच्या  लाटा माझ्या मनात विचारांच्या असंख्य लाटा उमटवत असत! त्या लाटा मनाच्या किनार्या वर आपल्या पाऊलखुणा उमटवत होत्या, त्यांना थोडं कोरीव रुप देण्याचा हा माझा प्रयत्न!

समाप्त

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नाते- इंद्रधनुष्यी बंध ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ. ज्योत्स्ना तानवडे

 ☆ मनमंजुषेतून ☆ नाते- इंद्रधनुष्यी बंध ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ 

जे मनामनाला जोडते ते नाते

जे चराचराला जोडते ते नाते !!

असंख्य वेगवेगळी नाती जन्मापासून आपल्याला अवघ्या विश्वाशी बांधून टाकतात. या प्रत्येक नात्याचे

रूप वेगळे,भाव वेगळा,

रीत वेगळी प्रीत वेगळी !

आपण आयुष्यात असंख्य नात्यांनी एकमेकांशी बांधले गेलेलो असतो. या प्रत्येक नात्याचे स्थान, त्याचे महत्व, त्याची गरज, त्याचे निभावणे हे वेगवेगळे असते.

सर्वात प्रथम आपण ईश्वरीतत्त्वाशी बांधले गेलेलो असतो. त्यानंतर आयुष्यात महत्त्वाचे असते ते आई-वडिलांचे श्रेष्ठ आणि पवित्र नाते.

 माय-बाप असती

 सर्वस्व या जन्माचे

 त्यांच्यामुळेच होई

 सार्थक या जीवनाचे !!

आई-वडील आपल्याला उत्तम आरोग्य, उत्तम संस्कार, उत्तम विचार, उत्तम शिक्षण यांची मौल्यवान शिदोरी देऊन या विश्वाच्या प्रवासाला सोडतात. त्यामधे आपल्या आयुष्याची भावनिक बाजू ही आईने तर व्यावहारिक बाजू वडिलांनी व्यापलेली असते. व्यवहार म्हटले की रूक्षपणा आलाच. पण सर्वच गोष्टी नुसत्या भावनेवर चालत नाहीत तर व्यवहार हा पहायलाच लागतो. त्यामुळेच वडील थोडे कठोर वाटतात. पण नारळातले पाणी किंवा फणसातल्या गऱ्यांप्रमाणे त्यांचे मन असते.

‘दुधावरची साय’ म्हणजे तर संसाराचे संचित असते. नातवंडे ही आजी-आजोबांचे सुख निधान असतात, तर नातवंडांना आजी-आजोबा अतिशय प्रिय असतात. आजच्या बदलत्या वातावरणात नातवंडे पाळणाघरात तर आजोबा वृद्धाश्रमात हे दुर्दैवी वास्तव आहे.तरीही दोघांना एकमेकांची ओढ असते म्हणूनच ते एकमेकांना भेटायची कारणेही हुडकत असतात.

आपल्या आयुष्यातले आणखी एक लोभस नाते आहे मैत्रीचे. मैत्री अखंड विश्वासाची साथ देते, कायम मदतीचा आधाराचा हात देते, निरपेक्ष प्रेम देते. असे मैत्र  ज्यांना लाभते ते खरच भाग्यवंत असतात. मैत्रिणीने,’ मी आहे ना? काळजी करू नको,’ असे नुसते म्हटले तरी हे शब्द आपल्याला संजीवनी सारखेच वाटतात.

आपल्या वाटचालीत आपल्या मदतीला येते ती आपली कामवाली सखी. अनेक वर्षांच्या सहवासाने आपणही तिच्याशी एखाद्या मैत्रिणी सारखे वागू लागतो.तिच्याजवळ मन मोकळे करू लागतो. ती पण स्वत:ची सुखदुःखे आपल्याशी वाटून घेते आणि कामाबरोबरच जीवाला विसावा शोधत रहाते.

अशी असंख्य नाती आपण रोजच्या जगण्यात निभावत असतो.

निसर्गाशी आपले नाते हे तर जिवाभावाचे असते. निसर्ग आपला माय बापच आहे. तो आपले पालनपोषण करतो, रक्षण करतो. त्यामुळे त्याचेही संवर्धन, रक्षण करणे हे आपले महत्त्वाचे  कर्तव्य ठरते.

आपण अशा रीतीने आपल्या आयुष्यात घरातल्या, घराबाहेरच्या,निसर्गातल्या घटकांशी वेगवेगळ्या नात्यांनी बांधले गेलेले असतो. या प्रत्येक नात्याचा रंग वेगळा, गंध वेगळा, प्रत्येकाची नजाकत वेगळी आणि त्यामुळेच त्यातून मिळणारी अनुभूती पण वेगळीच असते.

“पैशाने श्रीमंत होणे खूप सोपे असते.

नात्यांनी समृद्ध होणे तितकेच कठीण असते.”

म्हणूनच आपल्याला लाभलेल्या नात्यांची समृद्धी आपण जपली पाहिजे. एकमेकांना वेळ देणे, एकमेकांचे ऐकून घेणे, मदत करणे, एकमेकांचे विचार नाही पटले तर सोडून देणे, माफ करणे अशा अनेक गोष्टींनी ही नाती जपणे शक्य आहे. असे म्हणतात ज्यांना आयुष्यात शांती हवी असेल  त्यांनी वादविवादात एक पाऊल मागे घ्यावे. पण इतरांकडून ती अपेक्षा करू नये. त्यामुळे आपण नात्यांचा आनंद घेऊ शकतो आणि इतरांच्याही आनंदात भर घालू शकतो.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘रथसप्तमी’ धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी

डॉ. व्यंकटेश जंबगी

संक्षिप्त परिचय

शिक्षा – बी.ए.एम्.एस्. एम्.ए.(संस्कृत), आयुर्वेदाचार्य, पी.जी.डी.एच्.ए., निवृत्त प्राध्यापक

प्रकाशित साहित्य –
पावसाचं वय..काव्यसंग्रह, तुझं घर माझं घर..कथासंग्रह, व्रात्यकथा….विनोदी कथासंग्रह, पाच प्रयोगक्षम एकांकिका, बालमंच..बाल एकांकिका, विषय विविधा(निबंध), बीसीजीपासून इसीजीपर्यंत…आरोग्य लेखसंग्रह.

पुरस्कार – 1. उत्कृष्ट वाड्मय निर्मिती..महाराष्ट्र शासन 2018. 2. बाल साहित्य परिषद,कोल्हापूर. 3. उत्कृष्ट एकांकिका लेखन..नाट्यदर्पण,मुंबई. 4. उत्कृष्ट नाट्यछटा लेखन.. नाट्यसंस्कार,पुणे. 5 . आरोग्य लेख..शतायुषी,पुणे. 6. कविभूषण..फ्रेंडस् सर्कल,पुणे. 7. जीवन गौरव..ज्येष्ठ नागरिक वाचनालय,जयसिंगपुरस्कार

अन्य – 
माजी अध्यक्ष..चंद्रकिरण काव्यमंडळ,तळेगाव दाभाडे / माजी अध्यक्ष..संस्कार भारती,सांगली
शिवाजी विद्यापीठ युवक महोत्सवात एकांकिका स्पर्धा परिक्षक / आकाशवाणी, सांगली, विविध साहित्यिक सादरीकरण.

 ☆ विविधा ☆ ‘रथसप्तमी’ धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी ☆ 

* धार्मिक महत्त्व *

“यद्यज्जन्यकृतं पापं मया सप्तसु जन्मसु ।
तन्मे रोगं च शोक॑ च मा करी हन्तु सप्तमी ।।”

अर्थात “गेल्या सात जन्मात मी जे काही पाप केले असेल, त्याचे फळ (परिणाम) म्हणून रोग, दुःख इत्यादि काहीही होऊ नये, माझ्या पापाचा नाश व्हावा” अशी सूर्याला
प्रार्थना करतात, तो दिवस म्हणजे माघ शु. सप्तमी म्हणजेच ‘रथसप्तमी’ !

मकरसंक्रांतीनंतर उत्तरायण सुरु होते. सूर्य आपल्या सात घोडे जोडलेल्या रथाने ‘अरुण’ या सारथ्यासह उत्तरेकडे प्रयाण करु लागतो. हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. आदिती आणि काश्यप ऋषी यांचा पुत्र असलेला हा सूर्य …. याचा जन्मदिवस म्हणजे रथसप्तमी ! या दिवशी सूर्याला अर्ध्य देतात. सूर्योदयापूर्वी उठून फुले, चंदन, कापूर इ. अर्पण करतात. कोणी सूर्याची प्रतिमा रथात ठेवतात. कोणी सूर्याच्या रथाची रांगोळीकाढतात. पूजा करुन खिरीचा नैवेद्य दाखवितात. मकरसंक्रांतीपासून सुरु झालेले कार्यक्रम हळदी कुंकू, लुटणे इ. रथसप्तमीला समाप्त होतात. रथसप्तमी दिवशी व्रत म्हणून काहीजण उपवासही करतात. सूर्य ही तेज, उर्जा देणारी देवता आहे. सूर्यदेवता
वर्षमर आपल्याला प्रकाश देते. वनस्पती, अन्नधान्य, फुले, फळे उत्पन्न करण्यास सहायभूत ठरते. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. ”गायत्री मंत्र” हा सूर्याला उद्देशून असलेला प्रार्थनास्वरुप मंत्र आहे. बुध्दीला प्रेरणा देण्याची त्यात प्रार्थना आहे.

* वैज्ञानिक महत्व *

‘आरोग्य’ हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वैज्ञानिकदृष्ट्या आहे. कारण सूर्याची सकाळची कोवळी उन्हे (Ultraviolet rays) ‘ड’ (D) जीवनसत्व देणारी आहेत. हे सर्वपरिचित आहे. उत्तरायणात सूर्यापासून निघणारी लंबरुप किरणे हवेतील व मातीतील जंतूंचा नाश करतात. वनस्पतीमध्ये जी कर्बग्रहण (Photosynthesis) ही अन्न निर्माण करण्याची क्रिया असते. त्यामध्ये सूर्याची मदत मोठ्या प्रमाणात होते. सर्व ग्रह परप्रकाशी असून त्याना प्रकाश देणारा सूर्यच आहे. आजकाल ‘सोलर’ सिस्टीम भरपूर प्रमाणात वापरली जाते. ती उर्जा सूर्याचीच ! आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सूर्याचेच स्थान अग्रगण्य आहे. एका संस्कृत सुभाषितकाराने म्हटले आहे –

“आदित्यस्य नमस्कारान्‌ ये कुर्वन्ति दिने दिने ।
जन्मान्तरसहस्रेशु दारिद्र्यं नोऽपजायते ।।”   

अर्थ – “जो नित्यनेमाने रोज सूर्यनमस्कार घालतो त्याला सहस्र जन्मापर्य॑त दारिद्र्य येत नाही.” याचा मतितार्थ असा की सूर्यनमस्काराने बुध्दी, बल, क्रीयाशक्ती (Stamina) वाढतात. मग अर्थातच मनुष्य कष्ट करतो .. मग तो दरिद्रि कसा राहील ? थोडक्यात वैज्ञानिकदृष्ट्या सूर्य ही जीवसृष्टीची उर्जा आहे. सूर्य प्रकाश देतो. (पण कघीही ‘लाईट
बिल’ पाठवीत नाही.) त्याला कृतज्ञता म्हणून रथसप्तमी साजरी करावी. कोणी नुसता चहा पाजला तरी आपण Thanks म्हणतो.. हा सूर्यनारायण वर्षभर इतके काही करतो
मग एक दिवस कृतज्ञता व्यक्त करायला नको ? म्हणून रथसप्तमीलाच “आरोग्यसप्तमी” असेही म्हणतात.

जाता जाता भगिनींसाठी एक ‘टीप’ देतो. जर रथसप्तमीदिवशी नवी साडी मिळली, तर सात साड्या मिळतात म्हणे … !

© डॉ. व्यंकटेश जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-4 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-4 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

या ट्रीप मधील पुढील आकर्षण राॅस आयलंड हे होते. तिथे अनुराधा राव मॅडम ना भेटायचे होते. निसर्गाच्या सान्निध्यात पशू-पक्षी आणि प्राण्यांबरोबर संवाद साधून जीवन आनंदात व्यतीत करणारी अनुराधा कशी असेल ते बघण्याची उत्सुकता होती. या आयलंडवर ब्रिटिशांनी उभारलेल्या बऱ्याच इमारतींचे भग्नावशेष पहायला मिळाले. बेकरी, प्रिंटिंग प्रेस,पाॅवर हाऊस, चर्च, बरॅक्स अशा विविध इमारती होत्या.

युध्दाच्या  काळात त्यातील काही  नामशेष झाल्या तर काही त्सुनामी, वादळे यामुळे नाश पावल्या.  हे आयलँड बरेच खचल्यासारखे झाले आहे. तिथे फारसे लोक राहात नाहीत. मोर, हरणे, ससे, खारी या सुद्धा अनुराधा मॅडमच्या हाकेला ओ देतात ही गोष्ट विशेष वाटली. त्या प्राण्यांना खाऊ घालण्यासाठी मोठ्या पिशवीत खाऊ घेऊन फिरत असतात. खरं निसर्गप्रेम त्यांच्यामध्ये दिसून येते.अनुराधा मॅडम नी आम्हाला तेथील खूप छान माहिती दिली. तिथे आम्ही भरपूर फोटो काढले.

पोर्ट ब्लेअर सोडण्यापूर्वी आम्ही एक संध्याकाळ वांडूर बीचवर गेलो होतो. येथील किनारा खूप मोठा, शुभ्र पांढरी वाळू असलेला होता.आम्ही शंख, शिंपले वेचत फिरलो. खुप फोटो काढले. समुद्रकिनारी उंच उंच झाडे होती.

समुद्रावर गेलं की सूर्यास्त होईपर्यंत हलायचंच नाही हे ठरलेले असे.

तो सूर्याचा गोळा अस्ताला गेला की परतायचं ! बीच वर शहाळ्याचे पाणी, खोबरे याचा मनसोक्त आस्वाद घेतला!

                      क्रमशः….

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ रिडेव्हलेपमेंट.. ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

सौ. गौरी सुभाष गाडेकर

 ☆ क्षण सृजनचा ☆ रिडेव्हलेपमेंट.. ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

गेल्या काही वर्षांपासून मुंबईत इमारतींच्या रिडेव्हलपमेंटची लाट आली आहे.

जुन्या इमारती बिल्डर ताब्यात घेतात. त्या पाडून त्याजागी उंच इमारती  बांधतात. जुन्या रहिवाशांना पूर्वीपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा फ्लॅट दिला जातो. उरलेले फ्लॅट बाहेरच्या माणसांना विकतात.

इमारत तयार होईपर्यंत तीन-चार वर्षं तरी जातात. तेवढ्या अवधीतील तात्पुरत्या निवासासाठी, जुन्या रहिवाशांना भाड्याची रक्कम दिली जाते.

आमच्या जवळची एक इमारत रिडेव्हलपमेंटला गेली. जुने रहिवासी मिळाला तो फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे राहू लागले. नवीन इमारत तयार होण्याची वाट बघत.

इमारत पाडली. नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. आणि अचानक बांधकाम बंद  पडलं. कोर्टकचेऱ्या, स्टे वगैरेंच्या भोवऱ्यात सापडून सगळं काही ठप्प झालं. हळूहळू बिल्डरकडून भाड्याचे चेक मिळणंही बंद झालं.

आठ-दहा वर्षं अशीच गेली. भाड्याच्या फ्लॅटचं नूतनीकरणही कठीण  होऊ लागलं. एकाच फ्लॅटमध्ये दोन-तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राहायला द्यायला फ्लॅटचे मालक का-कू करू लागले. मग पुन्हा नवीन फ्लॅट शोधणं, सामानाची हलवाहलव वगैरे  व्याप.

या सर्व घडामोडींवरून मला ही गझल सुचली. एका स्ट्रक्चरल विषयावरील कविता स्ट्रक्चर्ड फॉर्म असलेल्या गझलमध्ये सुचावी, हा एक योगायोग.

कविता सुचली अशी :

 ☆ रिडेव्हलपमेंट ☆

एक होती कॉलनी ती, नांदती तेथे घरे

लिंबलोणही झुलत होता,गात होती पाखरे

 

दाखवी आमिष कोणी, खैरातली आश्वासने

कित्येक होते फायदे, फसवे किती काही खरे

 

झाला विरोधही तिडकीने संख्याच जिंके शेवटी

लोकशाहीचा नियम हा सत्य ते नेहमी हरे

 

गुंडाळूनी संसार सारे घेतले पाठीवरी

पांगले दाही दिशांना,सोडून गेले आसरे

 

कोण जाणे काय झाले ठप्प झाले बांधणे

गगन चुंबाया निघाले -स्वप्न होई  लत्करे

 

भोवताली पूर्ण झाली गगनचुंबी ती घरे

भोग भाळी आमुच्या का, का प्रतीक्षा सांग रे

 

लोटली कित्येक वर्षे फक्त सांगाडा उभा

एक सांगाडा उभा अन सोबतीला चौथरे

 

लागला डोळा दिसू अंत आता जीवनाचा

श्वास सरू दे ‘त्या’ घरी हीच आता आस रे

 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ काय हरकत आहे…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

 ☆ विविधा ☆ काय हरकत आहे…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

विश्वविधात्याने विश्वाच्या पसा-यातील अनुरेणू एवढा नगन्य तुकडा आपल्या हाती सुपूर्द करून आपल्याला या धरेवर जीवन व्यथीत करायला या मोहमयी धरेवर धाडले आहे. याची आपणास जाणीव असायलाच हवी. इथे धाडतानाही त्याने आपल्याला रिक्त हातानेच पाठवले आणि इथून निघताना ही रिक्त हातानेच परतण्याची सक्त ताकीद देऊन ठेवली आहे. ती मोडण्याचे धाडस आपण करूच शकत नाही. कारण त्याने आपल्या आयुष्याची दोरी त्याच्या हातातच ठेवली आहे. इथे येतानाही विधात्याने आपल्याकडून आयुष्याच्या मर्यादेचा करार करून परतीची आपणास माहीत नसणारी तारीख  नोंदवून ठेवली आहे. तिचेही आपण उल्लघण करू शकत नाही. आपण इतके दुबळे आहोत हे माहिती असूनही माणूस किती तोरा मिरवतो यांचा आपल्या सहीत सर्वांचं अनुभव आहे.आध्यामवाद्यानी याचीअनेक वेळा जाणीव करून देवून ही कोणीच फारसा जागा होताना दिसत नाही. करण माणूस हा शेवटी माणूस च आहे. चतूर आहे. कर्तृत्व संपन्न आहे.सगळे मान्यकरूनही तो आपणच आपली तयार केलेली “प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे” ही म्हण विसरायला तयार नाही. कारण तो सातत्याने प्रयत्नवादीच राहीला आहे.पुढेही अनेक पिढ्या तो तसाच रहाणार आहे.त्याला माहीत आहे.आपल्या हाती ” काळ थोडा आणि सौंगे फार” आहेत. सामर्थ्याची दारू ठासून भरलेल्या शिवाय आयुष्याच्या रणांगणावर कर्तव्याच्या तोफा विजयी उन्मादाने धडाडत नाहीत.

इवल्याशा कर्तव्याचा साकव बांधून संकटाचा महासागर पार करायला निघालेलो आम्ही लोक आहोत.सामना महाबलीशी आहे.जिंकण्याची आशा तर

मूळीच नाही.पण जन्मताच मरण पदराशी बांधून घेतल्याने विजय पराजयाची तमा बाळगून लढण्याने काय हाशील होणार आहे.मग आहे ते कर्तव्य सोडून कशाला पळ काढायचा? लढा,कटा,मरा.  निदान त्या मुळे तरी संघर्ष करणा-यांच्या यादीत तुमचे नाव नोंदवले जाईल.तुमची पुढची पिढी ठरवेल ते योग्य की आरोग्य ते.फक्त एक लक्षात ठेवा तुमची लढाई लोक कल्याणासाठीच असायला हवी.देह तुमचाच आहे.तो असातसा खर्ची पडणारच आहे.पण जाता जाता काळाने दिलेली भेट स्विकारताना आनंदी व्हायला आणि समाधानाने जयला काय हरकत आहे.

 

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-3 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 

☆ विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-3 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

छोट्या बोटीतून जाताना आम्हाला भीती वाटत होती,पण त्या बोटीवर काम करणारे लोक मात्र लीलया या होडीतून त्या होडीत जा -ये करत होते.

दूरवर दिसणारी छोटी छोटी बेटं हिरवीगार दिसत होती. त्या हिरवाईचे प्रतिबिंबच जणू पाण्यात दिसत होते! या बीच वर काचेच्या बोटीतून समुद्रात खोलवर घेऊन जातात, तेव्हा पायाशी असलेल्या काचेतून समुद्राच्या तळाशी असलेले तर्हेतर्‍हेचे रंगीबेरंगी मासे, कोरल्स, कासवं आणि खूप रंगीत रंगाचे दगड-गोटे आणि काय काय पहात होतो ते सांगता येत नाही. त्या बोटीतून बाहेर पडल्यावर आम्ही तिथे स्नाॅर्केलिंगही केले. समुद्राच्या तळातील दौलत बघता-बघता चार पाच तास कसे गेले कळलंच नाही.

या नंतर पोर्टब्लेअर चा मुक्काम संपवून आम्ही दुसऱ्या दिवशी राॅस आयलंड बघण्यासाठी निघालो.

क्रमशः…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग १०-२) – राग~मारवा, पूरिया, सोहोनी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग १०-२) – राग~मारवा, पूरिया, सोहोनी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

मारवा~पूरिया या प्रसिद्ध जोडीतील पूरिया या रागाविषयी आपण आज विचार करू या.

मागील लेखांत आपण पाहीले आहे की मारवा पूरिया सोहोनी ही एकाच कुटुंबातील सख्खी भावंडे! परंतु वादी~ संवादी स्वरांच्या भिन्नतेमुळे प्रत्येकाचे चलन स्वतंत्र, अस्त्तित्व स्वतंत्र! पूरियांत गंधार व निषाद ह्या स्वरांना अधिक महत्व आहे. रात्रीच्या प्रथम प्रहरी हा राग सादर केला जातो. मध्यम जरी तीव्र असला तरी मारव्याची उदासीनता पूरियांत नाही. मात्र ह्याची प्रकृती काहीशी गंभीरच! अधिकतर पूरिया मंद्र व मध्य सप्तकात गायिला वाजविला जातो, म्हणजेच हा पूर्वांगप्रधान राग आहे. स्वरांच्या वक्रतेमुळे हा राग मनाला मोहवितो. जसे~”नी (रे)ग, (म)ध ग(म)ग, ध नी  (म)ध ग(म)ग,” अशा प्रकारे वक्र स्वररचना आढळते. नि (रे)सा, ग(म)ध नी (रे)सा/सा नी ध (म)ग (रे)सा असे याचे आरोह/अवरोह आहेत. ‘ग, नी (रे)सा, नि ध नि (म)ध (रे) सा’ या स्वरसूमूहावरून पूरियाची तात्काळ ओळख पटते. या रागाचे पूर्ण चलनच वक्र आहे.

प्रसिद्ध शास्त्रीय गायक बडे गुलाम अली खाॅं यांच्याविषयी असे सांगितले जाते की मुंबईत विक्रमादित्य संगीत परिषदेत बडे गुलाम अली यांनी अल्लादिया खाॅं, फैय्याज खाॅं, हाफीज अली खाॅं यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत मारवा आणि पूरिया हे दोन राग एकापाठोपाठ गायले होते, आणि त्यांचे गायन ऐकून बूजूर्ग मंडळी अगदी अवाक झाली. एका रात्रीतच बडे गुलाम अलीना मुंबईत प्रसिद्धी मिळाली.

वियोग,शृंगाररसोपयुक्त असा हा पूरिया,कारूण्यपूर्ण श्रृंगार हाच या रागाचा स्थायीभाव!

शूद्ध पूरियांतील गाणी सहसा सांपडत नाहीत, परंतु ‘सांज ये गोकुळी सावळी सावळी’, ‘मुरलीधर शाम हे नंदलाला’, ‘क्षणभर उघड नयन देवा’ ही काही भावगीते, भक्तीगीते पूरिया रागावर आधारित  म्हणून उदाहरणादाखल देता येतील. “जिवलगा राहीले दूर घर माझे” ह्या भावगीतांत पूरियाचे स्वर असले तरी त्याबरोबर धनाश्री येऊन तो पूरिया धनाश्री झाला आहे. पूरियांत नसलेला पंचम ह्यांत आहे. सूरत और सीरत या चित्रपटांतील ‘प्रेम लगन’, आई मिलनकी रात मधील कितने दिनो की बात आई सजना रात मिलनकी, ‘रंगीला मधील ‘समा ये क्या हुआ, रुत आ गयी रे रुत छा गई रे’ ही काही बाॅलीवूड गाणी पूरिया धनाश्रीची उदाहरणे सांगता येतील ह्या गाण्यांकडे पाहीले असता पूरिया हा करूणरसप्रधान शृंगार वर्णन करणारा राग असल्याचे सर्वसामान्यांच्याही लक्षात येते.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-2 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ☆ विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-2 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

 अंदमानची उर्वरित सफर…

हॅवलॉक आयलंड..

पोर्ट ब्लेअर च्या सावरकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सेलर जेलच्या दर्शनाने भारावून गेलो होतो. पण आता निसर्गाच्या सानिध्यात समुद्रावर फिरून काही दिवस तोही अनुभव घ्यायचा होता. पोर्ट ब्लेअरच्या आसपास समुद्रात बरीच बेटे आहेत. त्यापैकी हॅवलॉक आयलंड  या ठिकाणी आम्ही जाणार होतो. एक दिवस माउंट हॅरियट येथे जाऊन आसपासचा अप्रतिम सुंदर निसर्ग पाहिला. गन पॉईंटवर फोटो काढले. ‘सागरिका’ म्युझियम पाहिले आणि हॅवलॉक आयलँड ला जाण्यासाठी तयार झालो.

हाय लॉक आयलँड ला जाण्यासाठी प्रथम समुद्रातून बोटीने साधारणपणे दीड तास प्रवास केला व पुढे कारने काही अंतर जाऊन ब्ल्यू रिझाॅर्ट या ठिकाणी पोहोचलो. इथून अगदी जवळ होता. त्यामुळे संध्याकाळी साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बीचवर आम्ही चालत गेलो. सेल्युलर जेल पाहून आलेला गंभीरपणा नकळत जाऊन  निसर्गाच्या या रम्य रूपात रमून गेलो. समुद्रकिनाऱ्यावर बरीच गर्दी होती. पाण्यात खूप वेळ खेळायला मिळाले. सूर्यास्त होत आल्यावर  दिसणारे सागराचे घनगंभीर रूप डोळ्यात साठवले गेले. सूर्यास्त लवकर म्हणजे साडेपाच वाजता  सूर्यास्त झाला की बीच बंद होत असल्याने पोलीस गाडी घेऊन सर्वांना बाहेर काढले जाते! आम्ही येताना गोड पाणी आणि खोबरे खाऊन रेसोर्ट वर आलो. त्या दिवशीचा मुक्काम तिथेच होता. सकाळी  लवकर उठून पुन्हा एकदा समुद्राला भेटायला जाऊन आलो. सकाळी नाश्ता करून एलिफंटा बीचवर जाण्यासाठी प्रथम कारने आणि पुढे छोट्या बोटी ने एक दीड तास प्रवास करायचा होता. समुद्राचे रूप कितीदा आणि कितीही पाहिले तरी मनोहारी वाटते. इथे तर पाण्याचा रंगही बदलताना दिसत होता. कुठे पाचू सारखा हिरवा रंग तर कुठे निळा, ग्रे कलर दिसत होता.

क्रमशः…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दृष्टीकोन ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

 ☆ विविधा ☆ दृष्टीकोन ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

दृष्टिकोन ही एक अशी गोष्ट आहे की, जी प्रत्येक माणसागणिक बदलत जाते. पण ती सकारात्मक असण फार आवश्यक आहे. मग ती एखाद्या माणसाकडे बघण्याची असो किंवा घटनेकडे. प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघण्याचा दृष्टीकोन असला पाहिजे. एखादे संकट जरी आले, तरी तेही आपल्याला खूप काही शिकवून गेले असा दृष्टीकोन पाहिजे, नाहीतर त्यावर रडत कुढत बसुन काहीच साध्य होत नाही. काहीजण प्रत्येक गोष्ट सकारात्मकपणे घेऊन पुढे जातात तर काही प्रत्येक गोष्टीतच रडत बसतात. काहीजणांना अर्धा ग्लास भरलेला दिसेतो तर तोच काहींना अर्धा रिकामा.

तिर्‍हाईत माणसांकडे बघण्याचा दृष्टीकोन सुद्धा प्रत्येकाचा वेगवेगळा. एखाद्याला एखादी व्यक्ति खूप आवडते, दुसर्‍याला तीच व्यक्ति आजिबात आवडत नसते. मला एक कळत नाही की, एखाद्याशी चार वाक्य बोलली की लगेच आपण त्याच्या बद्दल मनात एक चित्र म्हणजेच आपला त्याच्याकडे बघण्याचा एक दृष्टीकोन तयार करून टाकतो. आपल्याला सर्वसाधारण पणे अस वाटत असत की I’m  the best judge आणि आपण कोणत्याही व्यक्तीला आगदी पंधरा वीस मिनटात पूर्ण ओळखू शकू. पंधरा वीस वर्ष संसार करूनही जिथे आपण आपल्या जोडीदारला ओळखू शकत नाही तिथे तिर्‍हाईत माणसाला आपण पंधरा मिनटात ओळखू शकतो असं आपण ठामपणे कसं काय सांगू शकतो ह्याच मला नवल वाटते.

मी एवढेच म्हणेन की पटकन कोणाबद्दल दृष्टिकोन बनवू नका मग तो चांगला असेल किंवा वाईट त्याच्या मनात खोल शिरा, काही वेळा जे वर दिसत नाही, ते खोल दडलेले असते. जिभेवर साखर पेरून बोलणारा माणूस आतून कारल्या सारख्या कडू असू शकतो किंवा तलवारी सारखी जिभेला धार असणारा माणूस आतून मृदू.

माणूस सोडा एखाद्या निर्जीव वस्तूकडे बघण्याचा दृष्टीकोन सुद्धा वेगवेगळा असतो. एकच वस्तू एखाद्याला विलक्षण आवडते, मोहून जाते हवीहवीशी वाटते तर तीच वस्तू दुसर्‍याला नको नकोशी, कुरूप तिटकारा आणणारी वाटू शकते.

एखाद्या फुलाची सुंदरता एखाद्याला मोहरून टाकेल तर दुसर्‍याला नाही. पहाटेच्या रम्य वेळी पक्ष्यांची किलबिलाट काहीजणांचा सुखकर वाटेल तर काहींना त्याच किलबिलाटीची कटकट वाटेल.

दृष्टिकोन दृष्टीकोन म्हणजे काय हो? आपणच आपल्या विचारांना दाखवलेली दिशा. आपल्याच मनाचे विचार एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे. काही वेळा आपण ज्याचा वेग इतका ठेवतो की आपल्या नकळत समोरच्या बद्दल, एक आपले मत बनवून बसतो.

प्रेक्षकांना सर्कशीत काम करणारा जोकर हा केवळ विदुषक असतो, सगळ्यांना हसवणारा पण त्याच्या दृष्टीकोनातून मात्र तो एक कलाकार असतो आणि आपला प्रत्येक कार्यक्रम उत्तम झाला पाहिजे असा असतो त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. लोक तुमच्या बद्दल काय विचार करतात याचा विचार करू नका सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे जात रहा.

शेवटी एवढचं म्हणेन की कदाचित माझा हा लेख वाचून तुमचा प्रत्येकाचा माझ्याकडे बघण्याचा किंवा माझ्या लिखाण बद्दलचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो हे नक्की?

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print