सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ विविधा ☆ वृद्धत्व … ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
‘जगाच्या पाठीवर’ सिनेमातील ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे…’ गाणं ऐकलं की मनुष्याच्या तीन अंकी जीवन नाटयाचा पडदा अलगद डोळ्या समोर उलगडत जातो. बालपणातील निरागसता, तारुण्यात आल्यावर रंगीबेरंगी आयुष्याचा उपभोग घेते आणि तीच वृद्धत्वाकडे झुकू लागली की, आपल्या जीवनाची गत साले उलगडू लागते.मागे वळून पाहताना….. या सदरात पन्नाशी पासूनचा माणूस सतत डोकावू लागतो भूतकाळात!
बालपण, तरुणपण आणि वृद्धत्व या माणसाच्या जीवनातील तीन अवस्था गदिमांनी त्यांच्या काव्यात किती सहजतेने दाखवून दिल्या आहेत!
गदिमांचे अर्थपूर्ण काव्य मनाला भावते. .आज सत्तरीला आलेला मनुष्य ही बरेच सुखाचे आयुष्य उपभोगतोय, पण काही दशकांपूर्वी हे वृद्धत्व इतके सुखाचे नव्हते.मोठा कुटुंबकबिला, आर्थिक अडचणी, आजारांवर फारसे उपचार नाहीत अशा काळात हे वृद्धत्व अतिशय त्रासदायक होत असेल बहुतेक! सध्या माझ्या डोळ्यासमोर माझी आई 92 वर्षाची आहे तिचा जीवनपट येतो, कारण त्यांच्या पिढीने देशाचे पारतंत्र्य, स्वातंत्र्य अनुभवले तसेच कुटुंबासाठी खूप खस्ता खाऊन आता चांगले आयुष्यही उपभोगले, मुले नातवंडे च काय पण पंतवडे बघण्याचे भाग्य ही तिला मिळाले. खरोखरच पिकल्या पानासारखे आयुष्य आहे तिचे आता,पण अजूनही तिच्या चेहऱ्यावर तोच जगण्याचा उत्साह बघते तेव्हा खूप आश्चर्य वाटते ही जगण्याची उमेदच त्यांचे आयुष्य वाढवत असेल! आताच्या काळात छोट्या छोट्या गोष्टींनी ढासळणारी मने आणि आणि त्यामुळे होणाऱ्या आत्महत्या पाहिल्या की वाटते किती कमकुवत झाली आहेत माणसं!
निसर्गाचे एक संकट आलं की आपण कोसळून जातो. मग ते वादळ असो की पूर असो की करोना असो. प्रत्येक संकटाचा मनाला बाऊ वाटतो. त्यातून वर्तमानपत्र, टीव्ही यामुळे तर आपण जगालाच घरात निमंत्रित करून घेतले आहे की ज्यामुळे आपण आपली मनःशांती च घालवतो. काहीवेळा वाटतं अज्ञानात सुख असतं म्हणतात तेच खरं! पूर्वी पंचक्रोशीतील एखादी चांगली वाईट गोष्ट कळायला सुद्धा तीन-चार तास लागत असत आणि आता आपण लांब अंतरावर चा प्रत्येक क्षण सुद्धा त्या क्षणी पाहू शकतो, चांगला किंवा वाईट!राम मंदिराच्या पायाभरणी समारंभ नरेंद्र मोदीजीं चा हस्ते कसा घडत होता ते दृश्य आपण टीव्हीसमोर बसून पाहू शकलो आणि काही काळ आपण आपले काम बाजूला ठेवून राम राज्याची स्वप्ने पाहिली. हे राम मंदिर आपण लवकरच पाहू असा विश्वास वाटला.
वृद्धत्व काहीवेळा मनाचेच जास्त असते. काही अवयव नसलेली माणसे आपल्या आयुष्यात जिद्दीने उभी रहाताना पाहिली की वाटते आपल्याला परमेश्वराने सर्व काही दिले असतानाही आपण मनानेच वृद्ध होतं जातो त्याउलट हात-पाय नसणारी तर कुणी मुकी बहिरी माणसे परमेश्वराला आव्हान देतात आणि स्वतःला काम करायला उद्युक्त करतात.97 वर्षाचे बाबासाहेब पुरंदरे नव्वद वर्षाच्या लतादीदींना म्हणतात की तुमची शंभरी पहायला, तो सोहळा अनुभवायला मी असेन तेव्हा खरोखरच त्यांच्या जिद्दीला आणि आशावादाला सलाम करावा वाटतो!या वयात गड चढणारे मनाने तरुण बाबासाहेब त्यांना वृद्धत्वाचा स्पर्शच झालेला नसतो.!
नकारात्मक किँवा काही प्रमाणात पॅसिव्ह वृत्ती असणाऱ्या व्यक्तींना वृद्धत्व लवकर जाणवायला लागते असे मला वाटते. Positive विचाराचा माणूस जीवनाकडे नेहमी आशावादी वृत्तीने बघतो म्हणूनच तो अधिक उत्साहाने आयुष्य उपभोगतो हेच खरे! निसर्गाचा आपण एक भाग आहोत त्यामुळे निसर्ग क्रमानुसार उत्पत्ती स्थिती लय हे आपल्या साठी आहे च! त्याची जाणीव असावी पण सतत आपण काय जाणारच आहोत या भावनेचे वृद्धत्व मनात ठेवू नये. निसर्गात बी रुजते,रोप येते, त्याचेच पुढे झाड बनते. फुले फळे येतात. हळूहळू पाने पिवळी पडू लागतात आणि गळतात कालांतराने ज्याचे जेवढे आयुष्य त्याप्रमाणे झाडाचे आयुष्य संपते आणि मातीत विलीन होते. तसेच आहे आपलं आयुष्य! वृद्धावस्था ही बिकट असली तरी मनाने तिचा स्वीकार करून आहे ते आयुष्य आनंदात घालवण्याची किमया ज्याला जमली तो वृद्धत्व चांगल्या तर्हेने घालवू शकेल! मागच्या पिढीतील बऱ्याच वृद्धांकडे पहाताना मी अधिक डोळसपणे विचार करते आणि यापुढील आयुष्याचा स्वीकार करण्यासाठी मनाला तयार करते! आई कडील आठ-पंधरा दिवसाच्या या वास्तव्यात त्या लहान झालेल्या देहाच्या कुडीतील ही ऊर्जा पाहून माझ्या मनात वृद्ध त्वाचे असंख्य विचार उमटले त्यातून लिहिलेले हे विचार स्पंदन!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈