मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ इमेज जपताना…  लेखिका : सौ. विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ इमेज जपताना…  लेखिका : सौ. विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

“ ए ये गं, शुक्रवारची सवाष्ण म्हणून जेवायला… किती दिवस झाले आपण रोजच बाहेर भेटतो… घरी कधीतरी तुला घरी बोलवायचे… हे ठरवलंच होतं…. या निमित्ताने येशील तरी…! “ तिचा आर्जवी सूर मोबाईल मधून उमटला.

माॅर्निग वाॅक ला न चुकता भेटणारी ती…! उन असो, थंडी पाऊस असो… तिची वेळ कधीच चुकत नाही… एका ठराविक ठिकाणी तिचे भेटणे ठरलेलेच असते. सडसडीत बांधा आखूड केसांचा वर बांधलेला पोनी… ट्रॅक सूट… निळसर बूट घालून, झपझप तिचं बाजूने पास होणे… ठरलेले असायचे.

एक नेटकं आणि स्वतंत्र विचारांचे व्यक्तिमत्व असणार ही म्हणजे… तिची अशीच इमेज माझ्या मनात दृढ होत गेली…. आम्ही एकमेकींना फक्त अंतरावरुन बघत होतो… रोजच्या भेटण्यातून कधीतरी एक स्मितहास्याची रेष दोघींच्याही चेहऱ्यावर… अशीच कधीतरी विसावून गेली. माझ्यासारखीच मध्यमवयीन… त्यामुळे अर्थातच… स्थिरावलेल्या संसारातील… थोडी निवांत गडबड… जशी मला असते… तशीच तिलाही असणारच…!

थांबून खास गप्पा मारण्याइतका परिचय नसला तरी.. अंतरीक आपलेपण दोघींनाही सारखंच जाणवत असणार… कधी चुकामुक झाली किंवा… कधी फिरण्याची दांडी पडली तर… आज तिची भेट झाली नाही… याची हुरहुर क्षणभर जाणवून जाई… तिलाही आणि मलाही.

मग आपोआप समोर येताच ‘कुठे दोन दिवस ? ‘चे प्रश्नचिन्ह एकमेकींचे डोळे वाचून जात… आणि न विचारताच कारणांचा पाढा वाचला जाई.

परवा मात्र मला थांबवून तिने मोबाईल नंबर घेतला… आणि मी तिचे जेवणाचे आमंत्रण ही सहजच स्विकारले.

आटोपशीर पण निवडक गोष्टींनी सजवलेला तिचा टू बीएचके… इरकलीचे पंचकोनी तोरण सागवानी दारावर उठून दिसत होते…. उंबऱ्याच्या दोन्ही बाजुला छोटीशी रेखीव शुभ्र रांगोळी… फक्त लालचुटुक कुंकवाच्या शिंपणाने पवित्र वाटून गेली. मोकळा… जुजबी फर्निचर मांडलेला हाॅल… समोरच्या काचेच्या काॅर्नर स्टॅण्डमध्ये… ठेवलेल्या ट्राॅफीज… तिच्या लवचिक… देह मनाची साक्ष देणाऱ्या भरतनाट्यम नृत्याविष्काराचा छंदांची जणू पावतीच देत होत्या. ती बॅंकेत सर्व्हिस ला आहे ही जुजबी माहिती तिच्या बोलण्यातून मला समजली होती.

तिच्या दोन मुली आणि सासूबाई… हसत बाहेर येत, वातावरणात मोकळेपणा पसरवून गेल्या. पहिल्यांदाच तिच्याकडे गेल्यावर… तिच्याशिवाय कोणी ओळखीचे नाही… ही माझी थोडी uneasy भावना, त्या आजी नातींनीं सपशेल मोडीत काढली.

थोड्या गप्पा होईपर्यंत… तिने भाजी आमटी गरम करायला ठेवले. ती खासच सुगरण असणार… गरम होत असणारी भाजी आमटी जठराग्नी चेतवून गेली. नैवेद्याच्या ताटासाठी भाताची मूद करण्यासाठी कुकर उघडताच… आंबेमोहोर तांदळाचा वास दरवळून गेला… चांदीच्या ताटवाटीतला तो भरगच्च नैवेद्य तुळशीपत्राने परिपूर्ण होऊन गेला.

सवाष्णीसाठी चे ताट, वाटी तांब्या भांडे, पानं फुलांच्या सुबक रांगोळीत, टेबलावर सजलेले‌ होते. मी मलाच शाबासकी दिली… आपण मनात तिची नेटकी जपलेली इमेज बरोबर आहे.

गरम पोळी करुन वाढण्यासाठी… तांदळाच्या पिठी पासुन… भिजलेली कणिक, पुरणाचे उंडे… तिची किचन ओट्यावरची आटोपशीर तयारी तिच्यातल्या गृहकर्तव्यदक्षतेची साक्ष होती जणू.. !

ती एक उत्तम सून.. उत्तम आई.. उत्तम पत्नी.. उत्तम मुलगी… असणार, हे तिच्या एकंदर वावरातून लक्षात येऊनच गेले होते.

तिची मुलींना सासूबाईंना सोबत घेऊन जिवतीची आरती औक्षण करण्याची लगबग… सारे घर भारल्यासारखे झाले. औक्षणाचे तबक खाली ठेवताना… माझे लक्ष देवघराजवळच लावलेल्या उमद्या चेहऱ्याच्या दोन तसबिरी कडे गेले. तसबिरीस लावलेले गंधटिळे खुप काही बोलून गेले… !

माझी तसबिरीत अडकलेली नजर तिच्या‌ चाणाक्ष नजरेने लगेचच पकडली. माझे धाकटे दिर आणि माझे मिस्टर… तिची फोटोतल्या कुटुंब प्रमुखांची ही अनपेक्षित ओळख… मी क्षणभर सुन्नच होऊन गेले… !

आठ एक वर्षांपूर्वी एका अपघातात दोघेही on the spot गेले, ही माझ्या धाकट्या दिराची मुलगी… आणि ही माझी… !

अवयव दानाचा फाॅर्म केवळ आठ दिवस आधीच दोघा भावांनी भरला होता. तो सर्वांगाने नाही पण काही अंगांनी… अन् कित्येक अर्थाने माझ्यासाठी अजुनही इथे अस्तित्वात आहे… !

या समाजात, कुणाचे डोळे… कुणाची किडनी, कुणाची स्किन होऊन वावरत आहे.

तिच्या कपाळावरची लालचुटुक टिकली आणि गळ्यात पदराआड विसावलेले छोटेसे मंगळसूत्र… क्षणमात्र लखलखीत झाल्याचा भास मला होऊन गेला.

चार वर्षापूर्वी धाकट्या जावेला नव्याने तिचा पार्टनर मिळून गेला. हिला मात्र मी माझ्या जवळच ठेवून घेतले… माझी दुसरी मुलगीच ही पण… तिने तिच्या पुतणीला जवळ ओढले.

तिचे डोळे क्षणभर गढुळल्यासारखे झाले… आणि पुन्हा घरातल्या पवित्र वातावरणात मिसळून नितळ झाले…. !

चला आता जेवायला बसा… मी गरम गरम पोळी करते… तुमचा वरणभात संपेपर्यंत… !

तिच्यातल्या गृहिणींची लगबग सुरु झाली.

… ती ओटी भरताना… तिचे दोन्ही हात माझ्या ओंजळीत भरून घेत मी तिला जवळ ओढलं… हां तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैने सोचता था… !

प्रत्येक नात्यात तू उत्तमच आहेस… पण एक माणुस म्हणुन… तुझ्यातली स्त्री अत्यंत संवेदनशील, कर्तव्य तत्पर आहे. तुझ्या देहबोलीतूनच तुझी इमेज  माझ्या मनात चढत्या आलेखात निर्माण झाली होती, त्याच्या कैकपटीने… तू प्रगल्भ आहेस. सन्मानित होणं आणि सन्मानित करणं.. तुझ्याकडून शिकावं, सलामच तुला!

ती प्रसन्न हसली… सकाळच्या माॅर्निग वाॅक मध्ये हसते तशी… एकदम ओळखीची… जवळची!

मुठीतून निसटलेल्या वाळूची खंत करत बसण्यापेक्षा मुठीत शिल्लक उरलेल्या वाळुस कसा न्याय द्यायचा… हे ज्यास समजते… तिथे शांती आणि समाधान हात जोडून उभे राहते… इतकंच खरं!!!

लेखिका : सौ. विदुला जोगळेकर

प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ समुद्राशी झुंजलेला ‘स्वर्गीय’ जल-सैनिक ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

समुद्राशी झुंजलेला ‘स्वर्गीय’ जल-सैनिक ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

पंचमहाभूतांपैकी पाणी आणि त्यातून सागराचे पाणी हे प्रचंड शक्तिशाली असते. सागराची भव्यता, त्यात उठणारी वादळे, महाकाय लाटा यांच्याशी मानवाला सामना करता येणे अतिशय कठीण. पण आपल्या सीमांचे रक्षण कायचे असेल तर जमीन, आकाश आणि जल आणि हल्ली अवकाश या चारही ठिकाणी सैनिकांना सज्ज ठेवावे लागते. आपल्याकडे युद्धनौका तर आहेतच पण आपल्या पाणबुड्या आणि त्यातील सैनिक हे जगातल्या नौसैनिकांतले उत्तम नौसैनिक म्हणून गणले जातात. पण पायदळ आणि वायुदल यांमधील सैनिकांच्या शौर्यकथा सामान्य जनतेला ब-यापैकी ठाऊक असतात, पण पाण्यात राहून शत्रूची वैर करणा-या आणि त्या शत्रूंना रोखून धारणा-या नौसैनिक, नाविक अधिकारी यांच्या पराक्रमाची महती काहीशी कमी असते. आज अशाच एका नौदल अधिका-याच्या असीम पराक्रमाची गाथा सादर करतो आहे.

समुद्रात पाणबुडीमध्ये काम करणे हे अत्यंत जिकीरीचे, हिमतीचे आणि धैर्याचे काम. या कामांत शत्रूकडून आणि प्रत्यक्ष समुद्राकडून सैनिकांच्या जीवाला सतत धोका असतोच असतो. १५ ऑक्टोबर, १९७४ रोजी अहमदाबादेत दराबाशा आणि आरमीन मोगल यांच्या पोटी जन्मलेले फिरदौस हे देशसेवेसाठी १९९२ मध्ये खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन. डी. ए. ) मध्ये प्रशिक्षणार्थी सैन्याधिकारी म्हणून दाखल झाले. मूळचे अतिशय धाडसी, बुद्धीमान असलेल्या फिरदौस यांनी पाणबुडी युद्धनौकेवर सेवा करण्याचा मार्ग निवडला. १ जानेवारी १९९८ रोजी त्यांनी नौदलात प्रवेश केला.

स्वयंस्फूर्तीने कार्यरत असलेले फिरदौस यांनी प्रथमपासूनच कामात चमक दाखवली. पाणबुडीत काम करण्यासाठीचा प्रशिक्षण अभ्यासक्रम त्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून पूर्ण केला. आय. एन. एस. (इंडियन नेवल शिप) शाल्की वर त्यांनी पाणबुडी विरोधी युद्ध अधिकारी पद मिळवले. आय. एन. एस. विशाखापट्टनम, आय. एन. एस. सातवाहन यावर त्यांनी सेवा बजावली. आय. एन. एस. शंकुश ते मुख्य अधिकारी बनण्याचा मान मिळवला. त्यांच्या युद्ध कौशल्याचे वरिष्ठ अधिका-यांना मोठे कौतुक असे.

२९ मे, २०१० रोजी लेफ्टनंट कमांडर फिरदौस साहेबांनी आय. एन. एस. शंकुश वर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार सांभाळला. आय. एन. एस. शंकुश ऑगस्ट महिन्यात फ्रेंच नौदल आणि भारतीय नौदल यांच्या संयुक्त विद्यमाने युद्धसराव सत्रात सहभागी होती. २९ ऑगस्ट रोजी या पाणबुडीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने तातडीने दुरुस्ती करणे भाग होते. यासाठी ही पाणबुडी मुंबईच्या समुद्रात पाण्याच्या पृष्ठभागावर आणली गेली. ३० ऑगस्ट, २०१० रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. तीन नौसैनिक आणि एक इंजिनियरिंग अधिकारी असे चार जण या अवघड कामगिरीवर नेमले गेले. पाणबुडीच्या बाह्याभागावर असलेल्या केसिंग वर हे चौघे उतरलेले असतानाच अचानक समुद्रात एक प्रचंड लाट उसळली आणि दोन नौसैनिक आणि इंजिनियरिंग अधिकारी पाण्यात फेकले गेले. तिसरा नौसैनिक पाणबुडीच्या केसिंगवर लटकत राहिलेला होता.. आणि तो कधीही पाण्यात पडू शकत होता. फिरदौस क्षणाचाही विलंब न लावता स्वत: उफाणत्या दर्यात उडी घेतली. लटकत राहिलेल्या नौसैनिकाचा पाय जायबंदी झालेला होता. साहेब केसिंगवर चढले आणि स्वत;च्या जीवाची पर्वा न करता त्या सैनिकाला खालून ढकलून आपल्या खांद्यावर घेतले आणि शिडीवरून चढून जात त्याला पाणबुडीच्या ब्रिज वर चढवले. ही शिडीही पाण्यात निम्मी बुडालेली होती. लाटांचा मारा सुरु होता. समुद्र आणि साहेब यांच्यात वीस मिनिटांचा संघर्ष सुरु होता. यासाठी खूप शारीरिक शक्ती आणि मोठी हिम्मत लागते. पाण्यात पडलेले इतर सैनिक साहेबांकडे आशेने पाहू लागले होते… फिरदौस साहेब पुन्हा पाण्यात झेप घेते झाले. तोपर्यंत नेव्ही डायवर्स (पाणबुडे) समुद्रात उतरले होते. साहेबांनी या डायवर्सना मदत करायला आरंभ केला. सर्वांनी मिळून पाण्यात पडलेल्या सैनिकांना एकत्रितपणे पाणबुडीजवळ ढकलण्यात यश मिळवले. या सर्वांचा एक गट एकत्रितपणे पाणबुडीवर चढण्याचा प्रयत्न करू लागला… तुफानी लाटा होत्याच.. त्यांना समुद्रात ओढणा-या. सर्वजण पाणबुडीवर चढण्याच्या अगदी बेतात असताना एक अजस्र लाट आली आणि साहेब आणि इतर सर्व पुन्हा पाण्यात खेचले गेले. साहेबांनी पुन्हा जोर लावला…. पाणबुडीजवळ पोहोचले… आपल्या खांद्यावर एकेकाला घेतले आणि वर ढकलत राहिले… समुद्र आता पुरता खवळला होता… साहेब म्हणाले… तुम्ही सर्व वर पोहोचल्याशिवाय मी वर येणार नाही…. तसेच झाले… इतर सर्व सुरक्षितरित्या पाणबुडीवर पोहोचले… पण साहेब खालीच राहिले… आणखी एका मोठ्या लाटेने साहेब पाणबुडीवर आदळले.. त्यांच्या डोक्याला जबर मार बसला… तरीही साहेब तरंगत राहिले… पोहत राहिले. तोपर्यंत Helicopter ची मदत बोलावण्यात आली होती. नौसेनेच्या helicopter ने साहेबांना पाण्यातून उचलून घेतले आणि तातडीने आय. एन. एस. अश्विनी जहाजावर वैद्यकीय उपचारास नेले.. पण तो पर्यंत समुद्राने आपला डाव साधला होता…. त्याच्या लाटांशी प्राणपणाने झुंज देणारा हा वीर त्याने पराभूत केला होता… आणि नंतर त्याची त्यालाच शरम वाटली असावी… कारण काहीच वेळात समुद्र गप्प गप्प झाला… जणू काही झालेच नव्हते! सहा सैनिकांचे प्राण वाचवून लेफ्टनंट कमांडर फिरदौस दराबशाह मोगल साहेब स्वर्गात पोहोचले… फिरदौस म्हणजे स्वर्ग! एक स्वर्ग दुस-या स्वर्गात गेला…. सैनिक जिंकले तर भूमीचा भोग घेतात आणि धारातीर्थी पडले तर स्वर्गाची प्राप्ती होते त्यांना! 

हे असामान्य कामगिरी होती. एकवेळ जमीन, आकाश येथे माणसाचा निभाव लागू शकेल.. पण पाण्यात? अतिशय अवघड काम असते. तेच काम साहेबांनी करून दाखवले… आणि हुतात्मा झाले. वादळ प्रभावित जनतेला साहाय्य करण्यात साहेब सतत पुढे असत. माणसातील हिरा असे त्यांचे वर्णन त्यांचे सहकारी करीत.

In grey cold waves, when he went too far…. Strength of his spirit was the weapon of his war! अर्थात त्यांच्या आत्म्याची शक्ती हेच त्यांचे युद्धातील आयुध होते… जे त्यांनी प्राणपणाने चालवले आणि अमर झाले! मरणोत्तर शौर्य चक्राने देशाने साहेबांना सन्मानित केले… आंपण एक रत्न गमावले! ही कथा खरं तर सर्वांना माहीत असायला हवी होती… आता तरी इतरांना सांगा. हे आपले नायक… हे आपले भाग्यविधाते… हे आपले संरक्षक. यांच्या पराक्रमाच्या गाथा सतत गायल्या गेल्या पाहिजेत… जय हिंद. 🇮🇳

अहमदाबाद मधील एक रस्त्याला साहेबांचे नाव दिले गेले आहे.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रोजच असावा ‘मातृदिन’…☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ रोजच असावा ‘मातृदिन’☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

जागतिक मातृदिन दरवर्षी सर्वत्र साजरा होत असतो.. आपण भारतीय उत्सवप्रेमी आहोतच. आपला पारंपरिक मातृदिन म्हणजे बैलपोळ्याचा दिवस अर्थात श्रावण अमावस्या.

आईला कधी वंदन करावे ? आईची आठवण कधी यावी ? याला काही बंधन नाही. प्रत्येक लेकराच्या मनात एक खास कप्पा कायमचा असतो. तो कधीही दुसऱ्या गोष्टींनी भरला जात नाही. जायलाही नको…. !

माझ्या मनात जरा वेगळा विचार आहे. आज समाजात ‘मातां’ची संख्या आणि गुणवत्ता कमी नाही. पण दुर्दैवाने समाजातील मातृत्वभाव मात्र कमी होत चालला आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते.

समाजातील ‘मातृत्व’भाव वृद्धिंगत झाला तर समाजातील एकूण समस्यांपैकी अर्ध्या समस्या तरी लोप पावल्याशिवाय राहणार नाहीत. विश्वाच्या माऊली असलेल्या संत ज्ञानेश्वरांना संत या नात्याने आदराने पाहिले जातेच, परंतु यापेक्षा त्यांचा मोठा आदर आणि सन्मान हा त्यांच्या ‘माऊली’पणात आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.

दरवर्षी जागतिक मातृदिन साजरा करत असतांना त्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्यामधील मातृत्वभाव वाढण्यासाठी कटिबद्ध व्हावे अशी मी आपणांस नम्र विनंती करीत आहे.

आईचे शब्दरूप स्मरण…

१. जी रिती होऊनही भरून पावते ती ‘आई’.

२. चार मातीच्या भिंती।

 त्यात माझी राहे ‘आई’।।

 एवढे पुरेसे होई।

 घरासाठी।।

३. काहीही दुखलं, खुपलं तर तोंडात येणारा पहिला शब्द ‘आई’.

४. आपल्या अश्रूंचे मूल्य जाणणारी, मूल्य जपणारी आणि मूल्य वाढवणारी एकच व्यक्ती ती म्हणजे ‘आई’

५. गोष्ट आनंदाची असो वा दुःखाची, सर्वप्रथम आठवते ती ‘आई’.

६. दाही दिशा अंधारून आल्यावर पाठीवरून हात फिरवून ‘बाळ, मी आहे ना’! असे म्हणून धीर देणारी फक्त ‘आई’.

 ७. अध्यात्माची सर्वात सोपी व्याख्या. ‘आई’

 (एकतर समोरच्याची आई व्हा किंवा समोरच्याला आई माना.)

८. वीट नाही कंटाळा नाही 

 आळस नाही त्रास नाही

 इतुकी माया कोठेचि नाही

 मातेवेगळी।।

(दासबोध १७. २. २७)

आईच्या पावन स्मृतीस त्रिवार वंदन !!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रवींद्रनाथ टागोर आणि ‘वाल्मिकी प्रतिभा’ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

रवींद्रनाथ टागोर आणि ‘वाल्मिकी प्रतिभा’ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

इंग्लंडमधून भारतात परत आल्यावर रवींद्रनाथांनी ‘ वाल्मिकी प्रतिभा ‘ या नावाचे एक नाटक लिहिले. या वेळी त्यांचे वय अवघे वीस वर्षांचे होते. रवींद्रनाथांना नाट्य, संगीत आणि काव्यलेखनाचे बाळकडू त्यांच्या घरातच अगदी लहानपणापासून मिळाले होते. त्यांचे भाऊ ज्योतिरिंद्रनाथ नाटके लिहीत आणि बसवत असत. गुणिंद्रनाथ म्हणून त्यांच्या एका चुलतभावाला पण नाटकांची आवड होती. ज्योतिदांनी रवींद्रनाथांना नेहमीच उत्तेजन दिले. त्यामुळे रवींद्रनाथांची प्रतिभा साहित्यक्षेत्रात मुक्तपणे संचार करू लागली होती.

‘वाल्मिकी प्रतिभा’ हे नाटक अनेक अर्थांनी आगळेवेगळे आहे. वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी होण्याआधी एक दरोडेखोर होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ब्रह्मदेव आणि नारदांच्या आज्ञेनुसार त्यांनी ‘ रामायणाची ‘ रचना केली. परंतु ही रचना करण्याआधी त्यांनी क्रौंच पक्षाचे एक जोडपे एका झाडावर बसलेले पाहिले. त्या आपल्या आनंदात निमग्न असणाऱ्या एका पक्ष्याला एका शिकाऱ्याने बाण मारला. त्यामुळे त्या दुसऱ्या पक्ष्याचा विलाप पाहून वाल्मिकींचे हृदय द्रवले आणि त्यांच्या तोंडून रामायणातील तो प्रसिद्ध श्लोक बाहेर पडला.

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः ।

यत्क्रौंचमिथुनादेकमवधी काममोहितम् ।।

कधी नव्हे तो आपल्या तोंडून अशा प्रकारची सुंदर रचना कशी काय बाहेर पडली याचे त्यांना नवल वाटले. त्यानंतर त्यांनी ब्रम्हदेव आणि नारदांच्या आशीर्वादाने रामायणाची रचना केली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ही जी मूळ घटना आहे, ती रवींद्रनाथांना मान्य होती. पण आपल्या नाटकात त्या घटनेला त्यांनी वेगळीच कलाटणी दिली.

त्यांच्या ‘ वाल्मिकी प्रतिभा ‘ या नाटकात वाल्या आणि त्याचे साथीदार यांची दरोडेखोरांची एक टोळी असते. ही सगळी मंडळी अत्यंत क्रूर आणि आडदांड असतात. ते प्रतिभा नावाच्या एका निरागस मुलीला पकडून आणतात आणि कालीमातेपुढे तिचा बळी देण्याचं ठरवतात. या निष्पाप मुलीचा आक्रोश ऐकून वाल्याचे हृदय द्रवते. तो आपल्या साथीदारांशी वैर पत्करून तिची सुटका करतो. टोळीतील सहकाऱ्यांना सोडून देऊन तिला घेऊन रानोमाळ भटकतो. त्यातूनच त्याचे हृदयपरिवर्तन होते. तो स्वतः विषयी विचार करू लागतो. अंतरात्म्याचा शोध घेतो. त्याची ही तळमळ पाहून ती मुलगी म्हणजे प्रतिभा आपल्या खऱ्या रूपात त्याच्यासमोर प्रकट होते.

ती म्हणजे प्रत्यक्ष साहित्य, कला आणि विद्येची देवता सरस्वती असते. ती त्याला म्हणते, ‘ तुझ्यातील माणुसकी जागृत होते की नाही याची परीक्षा मी पाहिली. त्यासाठी मीच बालिकेचे रूप घेतले होते. तुझ्या पाषाणहृदयाला ज्या आर्त करुणेच्या स्वरांमुळे पाझर फुटला, त्याच तुझ्या हृदयातून आणि वाणीतून आता माणुसकीचे संगीत जन्म घेईल आणि लक्षावधी मनांना कोमल भावनांनी शुद्ध करेल. तुझी वाणी देशोदेशी चिरकाल घुमत राहील आणि त्यातून अनेक कवींना प्रेरणा मिळेल. ‘ 

या नाटकात रवींद्रनाथांनी वाल्या कोळी लुटारूंपासून सरस्वतीला मुक्त करतो हे जे दाखवले आहे, प्रतिकात्मक आणि अतिशय महत्वाचे आहे. त्याचा अर्थ असा की ‘ सरस्वती ‘ आज साहित्यरूपाने लुटारुंच्या, धनदांडग्यांच्या ताब्यात आहे. तिला त्यांच्यापासून मुक्त केले पाहिजे. समाजाला बळ देणारे साहित्य आणि एकूणच साहित्य आणि कलाक्षेत्र हे साहित्यिक आणि कलावंतांच्याच ताब्यात असले पाहिजे. राजकारणी, धनदांडगे यांच्यापासून ते मुक्त असले पाहिजे. तरच ते सर्वसामान्यांना उपयुक्त ठरेल. समाजाच्या प्रगतीची दिशा त्यामुळे सापडू शकेल. साहित्यिकांना मोकळे आकाश मिळेल. रवींद्रनाथांनी त्याकाळी जे प्रतीकात्मक रूपाने सुचवले ते आजदेखील तेवढेच महत्वाचे आहे.

या नाटकाने रवींद्रनाथांनी जणू प्रायोगिक रंगभूमीची पायाभरणी केली. अनेक गोष्टी नवीन आणल्या. नाटकांवर इंग्रजी नाट्यभूमीचा प्रभाव होता, संगीताचा आणि रागदारीचा प्रभाव होता, त्या चौकटीतून नाटकाला बाहेर काढण्याचाच त्यांचा हा प्रयत्न होता. त्यांचे हे नाटक म्हणजे सुरांचा आणि स्वरांचा अविष्कार होता. त्याला एक प्रकारची आंतरिक लय होती. गाण्याच्या आणि रागदारीच्या बंधनांपासून काही अंशी मुक्त होत आपल्याला हवा तसा नाट्याविष्कार सादर करण्याचे आणि स्वरांच्या प्रकटीकरणाचे स्वातंत्र्य त्यांनी घेतले होते. ते नुकतेच इंग्लंडहून परतल्यामुळे या त्यांच्या प्रायोगिक नाटकावर काही अंशी पाश्चात्य संगीत आणि आयरिश संगीताचा प्रभावही होताच. हे नाटक केवळ वाचण्यासाठी नव्हेतच तर ते पाहावे आणि अनुभवावे अशा प्रकारचे होते. या नाटकाने वयाच्या केवळ विसाव्या वर्षी रवींद्रनाथांचे नाटककार म्हणून दमदार पदार्पण झाले.

या नाटकातून साहित्यिक म्हणून आपल्या पुढील प्रवासाची दिशा रवींद्रनाथांना गवसली. आपले पुढील साहित्य कसे असेल याची जणू झलकच त्यांनी या नाटकाद्वारे दाखवली. दरोडेखोरांच्या किंवा धनदांडग्यांच्या तावडीतून सरस्वतीला मुक्त केल्याशिवाय कलावंताला सरस्वती प्रसन्न होत नाही हे त्यांना जाणवले होते. वाल्मीकींच्या अंतःकरणात जो दयेचा, करुणेचा झरा वाहू लागला, त्यामुळे जगाकडे आणि त्यातील क्रौर्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी वाल्मिकींना प्राप्त झाली. बालिकेला दरोडेखोरांच्या तावडीतून सोडवणे म्हणजेच सरस्वतीला नको असलेल्या व्यक्तींच्या ताब्यातून मुक्त करणे आवश्यक आहे हे त्यांच्या लक्षात आले. ‘ वाल्मिकी प्रतिभा ‘ हे नावच खरोखर अगदी सुंदर आहे. त्याच्या नावातच रवींद्रनाथ यांच्या प्रतिभेचाही विलास आपल्याला दिसतो. त्यांच्या प्रतिभेची झेप आपल्याला दिसते.

या नाटकात वाल्मिकींची भूमिका स्वतः रवींद्रनाथांनी केली तर सरस्वतीची भूमिका त्यांची एक भाची प्रतिभा म्हणून होती तिने केली. त्या काळात नाटकात किंवा रंगभूमीवर आपल्या घरातील मुलींना सनातनी विचारांचे लोक पाऊल ठेवू देत नसत. असे करणे म्हणजे प्रतिष्ठेला बाधा आणण्यासारखे होते. पण रवींद्रनाथांनी ही सुरुवात स्वतःच्या घरापासूनच केली. ही एक प्रकारची सामाजिक क्रांतीच होती. त्याची किंमतही टागोर कुटुंबीयांना मोजावी लागली पण त्याची त्यांना पर्वा नव्हती. स्त्रियांना देखील कला, साहित्य, शिक्षण इ. क्षेत्रात मुक्त आकाश मिळाले पाहिजे असेच त्यांना वाटत होते. या नाटकात खरं तर त्यांच्या घरातील बहुतेक सदस्यांचा या ना त्या कारणाने सहभाग होता. हे नाटक पहिल्यांदा सादर झाले ते सुद्धा टागोर कुटुंबियांच्या जोराशंको वाडी इथेच ! कला, साहित्य इ प्रांतात पुढील काळात रवींद्रनाथांची जी वाटचाल होणार होती, त्याची सुरुवात आणि दिशादर्शन करणारे नाटक म्हणजे ‘ वाल्मिकी प्रतिभा ! ‘

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वृद्धत्व… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

वृद्धत्व… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

‘जगाच्या पाठीवर’ सिनेमातील ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे… ‘ गाणं ऐकलं की मनुष्याच्या तीन अंकी जीवन नाटयाचा पडदा अलगद डोळ्या समोर उलगडत जातो. बालपणातील निरागसता, तारुण्यात आल्यावर रंगीबेरंगी आयुष्याचा उपभोग घेते आणि तीच वृद्धत्वाकडे झुकू लागली की, आपल्या जीवनाची गत साले उलगडू लागते. मागे वळून पाहताना….. या सदरात पन्नाशी पासूनचा माणूस सतत डोकावू लागतो भूतकाळात!

बालपण, तरुणपण आणि वृद्धत्व या माणसाच्या जीवनातील तीन अवस्था गदिमांनी त्यांच्या काव्यात किती सहजतेने दाखवून दिल्या आहेत ! गदिमांचे अर्थपूर्ण काव्य मनाला भावते.. आज सत्तरीला आलेला मनुष्य ही बरेच सुखाचे आयुष्य उपभोगतोय, पण काही दशकांपूर्वी हे वृद्धत्व इतके सुखाचे नव्हते. मोठा कुटुंबकबिला, आर्थिक अडचणी, आजारांवर फारसे उपचार नाहीत अशा काळात हे वृद्धत्व अतिशय त्रासदायक होत असेल बहुतेक! सध्या माझ्या डोळ्यासमोर माझी आई 92 वर्षाची आहे तिचा जीवनपट येतो, कारण त्यांच्या पिढीने देशाचे पारतंत्र्य, स्वातंत्र्य अनुभवले तसेच कुटुंबासाठी खूप खस्ता खाऊन आता चांगले आयुष्यही उपभोगले, मुले नातवंडे च काय पण पंतवडे बघण्याचे भाग्य ही तिला मिळाले. खरोखरच पिकल्या पानासारखे आयुष्य आहे तिचे आता, पण अजूनही तिच्या चेहऱ्यावर तोच जगण्याचा उत्साह बघते तेव्हा खूप आश्चर्य वाटते ही जगण्याची उमेदच त्यांचे आयुष्य वाढवत असेल! आताच्या काळात छोट्या छोट्या गोष्टींनी ढासळणारी मने आणि आणि त्यामुळे होणाऱ्या आत्महत्या पाहिल्या की वाटते किती कमकुवत झाली आहेत माणसं!

निसर्गाचे एक संकट आलं की आपण कोसळून जातो. मग ते वादळ असो की पूर असो की करोना असो. प्रत्येक संकटाचा मनाला बाऊ वाटतो. त्यातून वर्तमानपत्र, टीव्ही यामुळे तर आपण जगालाच घरात निमंत्रित करून घेतले आहे की ज्यामुळे आपण आपली मनःशांती च घालवतो. काहीवेळा वाटतं अज्ञानात सुख असतं म्हणतात तेच खरं ! पूर्वी पंचक्रोशीतील एखादी चांगली वाईट गोष्ट कळायला सुद्धा तीन-चार तास लागत असत आणि आता आपण लांब अंतरावर चा प्रत्येक क्षण सुद्धा त्या क्षणी पाहू शकतो, चांगला किंवा वाईट !राम मंदिराच्या पायाभरणी समारंभ नरेंद्र मोदीजीं चा हस्ते कसा घडत होता ते दृश्य आपण टीव्हीसमोर बसून पाहू शकलो आणि काही काळ आपण आपले काम बाजूला ठेवून राम राज्याची स्वप्ने पाहिली. हे राम मंदिर आपण लवकरच पाहू असा विश्वास वाटला.

वृद्धत्व काहीवेळा मनाचेच जास्त असते. काही अवयव नसलेली माणसे आपल्या आयुष्यात जिद्दीने उभी रहाताना पाहिली की वाटते आपल्याला परमेश्वराने सर्व काही दिले असतानाही आपण मनानेच वृद्ध होतं जातो त्याउलट हात-पाय नसणारी तर कुणी मुकी बहिरी माणसे परमेश्वराला आव्हान देतात आणि स्वतःला काम करायला उद्युक्त करतात. 97 वर्षाचे बाबासाहेब पुरंदरे नव्वद वर्षाच्या लतादीदींना म्हणतात की तुमची शंभरी पहायला, तो सोहळा अनुभवायला मी असेन तेव्हा खरोखरच त्यांच्या जिद्दीला आणि आशावादाला सलाम करावा वाटतो!या वयात गड चढणारे मनाने तरुण बाबासाहेब त्यांना वृद्धत्वाचा स्पर्शच झालेला नसतो. !

नकारात्मक किँवा काही प्रमाणात पॅसिव्ह वृत्ती असणाऱ्या व्यक्तींना वृद्धत्व लवकर जाणवायला लागते असे मला वाटते. Positive विचाराचा माणूस जीवनाकडे नेहमी आशावादी वृत्तीने बघतो म्हणूनच तो अधिक उत्साहाने आयुष्य उपभोगतो हेच खरे ! निसर्गाचा आपण एक भाग आहोत त्यामुळे निसर्ग क्रमानुसार उत्पत्ती स्थिती लय हे आपल्या साठी आहे च! त्याची जाणीव असावी पण सतत आपण काय जाणारच आहोत या भावनेचे वृद्धत्व मनात ठेवू नये. निसर्गात बी रुजते, रोप येते, त्याचेच पुढे झाड बनते. फुले फळे येतात. हळूहळू पाने पिवळी पडू लागतात आणि गळतात कालांतराने ज्याचे जेवढे आयुष्य त्याप्रमाणे झाडाचे आयुष्य संपते आणि मातीत विलीन होते. तसेच आहे आपलं आयुष्य! वृद्धावस्था ही बिकट असली तरी मनाने तिचा स्वीकार करून आहे ते आयुष्य आनंदात घालवण्याची किमया ज्याला जमली तो वृद्धत्व चांगल्या तर्हेने घालवू शकेल! मागच्या पिढीतील बऱ्याच वृद्धांकडे पहाताना मी अधिक डोळसपणे विचार करते आणि यापुढील आयुष्याचा स्वीकार करण्यासाठी मनाला तयार करते! आई कडील आठ-पंधरा दिवसाच्या या वास्तव्यात त्या लहान झालेल्या देहाच्या कुडीतील ही ऊर्जा पाहून माझ्या मनात वृद्ध त्वाचे असंख्य विचार उमटले त्यातून लिहिलेले हे विचार स्पंदन !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

मो. 8087974168 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

बुधवारातली खाऊगल्ली-

या परिसराचं प्रमुख आकर्षण म्हणजे ‘ बुवा आईस्क्रीमवाले ‘ मधुर, मुलायम चवीचं असं सुंदर आईस्क्रीम, आम्हा मुलांच जीव की प्राण असलेल्या या दुकानाचे नांव ‘बुवा’ कां ठेवले असेल? हे कोडं सोडवणं आमच्या बुद्धी पलीकडचं काम होत. आमच्यात तशी खूप चर्चाही व्हायची. शेवटी एकाने दिवे पाजळले, दुकानाच्या मालकांच्या भरगच्च मिश्यांमुळे ते ‘बागूल बुवा’ सारखे दिसतात म्हणून असं नाव ठेवलं असावं. पण काही म्हणा, हे ‘बुवा आईस्क्रीमवाले’ पुण्यात खूप प्रसिद्ध होते. धंदाही दणक्यात चालला होता. लग्न मुंजीसाठी मुहूर्ताची पहिली अक्षत कसबा गणपती पुढे असायची. नंतर दुसरा मान होता जागृत ग्रामदैवत तांबड्या जोगेश्वरीचा. भर उन्हांत कसबा गणपती नंतर श्री जोगेश्वरी ला अक्षत देऊन बाहेर पडल्यावर कोऱ्या साडीला खोचलेल्या चार बोटाच्या टिचभर रुमालाने घाम पुसत, नऊवारीचा बोंगा आंवरत, नथीचा आकडा सांवरत वधू माय नवऱ्याला म्हणायची, काय बाई हे ऊन! इश्य! कित्ती उकडतंय ! अहो आपण आइस्क्रीम खाऊया का गडे!” गौरीसारख्या नटून थटून आलेल्या बायकोकडे बघून आणि तिच्या गोड बोलण्याला विरघळून नवऱ्याचं आईस्क्रीमच व्हायच. आणि मग ती जोडी त्या गारव्यात शिरायची. आम्हाला त्यांच्यामागे दुकानात शिरावंस वाटायच. पण फ्रॉकचा खिसा रिकामाच असायचा. मन मारून मग आम्ही प्रसादाचा, खडीसाखरेचा खडा मिळवण्यासाठी देवीच्या गाभाऱ्यात शिरायचो. आईस्क्रीमची किंमत चार आणे बाऊल होती. ते आम्हाला परवडणार नव्हतं त्यापेक्षा फुकटची देवीसमोरची खडीसाखर परवडायची. ‘– दुधाची तहान ताकावर दुसरं काय ‘—- –

टकले आत्या नावाची आमची एक मानलेली आत्त्या होती.. त्यावेळची गर्भ श्रीमंत, दागिन्यांनी नटलेली, आत्त्या कारमधून उतरली की आम्ही विट्टी दांडू फेकून जीव खाऊन पळत सुटायचो. कारचा दरवाजा उघडायला एकमेकांना ढकलत पुढे जायचो. ही आत्त्या आली की आमचा आनंद गगनाला भिडायचा, कारण श्रीमंत माहेरवाशिणीला कान तुटक्या कपातून पांचट दुधाचा चहा कसा काय द्यायचा?अशा धोरणी विचाराने आमची आई सौ. टकले आत्यांकरिता चक्क आईस्क्रीम मागवायची. आम्ही आशाळभूत पणे गुलाबी थंडगार आईस्क्रीम कडे बघत तिथेच घिरट्या घालायचो. आत्याच्या ते लक्षातच यायचं नाही. आत्याचा बाउल साफ- सूफ व्हायचा. आणि मग तिच्या लक्षात आल्यावर ती म्हणायच, ” हे काय वहिनी मुलांसाठी नाही का आईस्क्रीम मागवलत? आईला काय बोलावं काही सुचायचच नाही कारण तिच्याजवळ इतके पैसेच नसायचे. चाणाक्ष आत्या ‘त ‘ वरून ताकभात ओळखायची. आणि मग हळूवारपणे आपल्या मखमली, चंदेरी टिकल्या लावलेल्या बटव्यातून नाणी काढायची, अलगद आमच्या हातावर ठेवून म्हणायची, पळा रे पोरांनो आईस्क्रीम खाऊन या. ” हे वाक्य ऐकण्यासाठी आम्ही आतुर झालो होतो. पैसे हातात पडताच छताला टाळू लागेल अशी उंच उडी मारावीशी वाटायची. पण मग धाड्दिशी जमिनीवर आदळायचो. कारण आईचे डोळे मोठे झालेले असायचे. आईच्या डोळ्यांकडे नजर गेल्यावर आम्ही चुळबूळ करायचो, आत्या म्हणायची “आईकडे काय बघताय ? मी सांगतेय ना! हे पैसे घ्या आणि पळा लौकरआणि जा बुवांकडे” मग काय आम्ही हांवरटासारखे चार आण्याचं नाणं मुठीत पकडून जिन्यावरून एकेक पायरी वगळत उड्या मारत बुवा आईस्क्रीम वाल्यांच्या दुकानात शिरायचो. आणि मग काय बुवांकडे गुलाबी पोपटी, पिस्ता आईस्क्रीम खाताना मनांत यायचं आपला ढग झालाय आणि आपण हवेत तरंगतोय… अहाहा! काय तो सुखद गारवा. , आईस्क्रीमची मिठ्ठास चव, अजूनही जिभेला विसर पडला नाही. आणि मग मनाला सुखावणारा गारवा अंगावर घेता घेता आमची ब्रह्मानंदी टाळी लागायची. स्वर्गच आमच्या हातात आला होता. आईस्क्रीमची चटक लागली होती, पण पैशांचा ताळमेळ जमत नव्हता. अखेर पगार झाल्यानंतर माझ्या वडिलांनी ति. नानांनी आईस्क्रीमचा पॉटच घरी आणला तो फिरवतांना नाकी दम आले. घामाच्या धारा लागल्या, पण नंतर मात्र तीन-तीन वाट्या आईस्क्रीम हादडायला मिळाल.

गेले ते दिवस, गेली ती आईस्क्रीमची तेव्हांची चव, पण अजून रंग उडालेली –‘ बुवा आईस्क्रीमवाले ‘ — ही पाटी डोळ्यासमोरून हालत नाहीय्ये. मनाचे पांखरू अजूनही त्या दुकानाभोवती गिरट्या घालतय.  .

– क्रमशः भाग दुसरा 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महात्मा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? इंद्रधनुष्य ?

☆ महात्मा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

भली मोठी पांढरी शुभ्र मरसिडीज, दूरदृष्टी महाराजांच्या बंड गार्डन रोडवरील राजवाड्या सदृश मठाच्या दारात थांबली. शोफरने धावत येवून दार उघडलं. आतून पांढऱ्या शुभ्र कपड्यातील एक खानदानी व्यक्ती अंगावरच्या श्रीमंतीच्या सगळ्या खुणा दाखवत उतरली. दूरदृष्टी महाराजांचे रोजचे प्रवचन, देशी विदेशी भक्तांच्या भरगच्च दरबारात चालू होते. ती व्यक्ती अदबीनं महाराजांच्या पाया पडली. रोजच्या प्रमाणे खिशातून पाचशेच्या नोटांची दोन कोरी बंडल्स काढली आणि महाराजांच्या पायाशी ठेवली. थोडावेळ खाली बसून प्रवचनाचा लाभ घेऊन, परत नमस्कार करून मठाच्या बाहेर पडून गाडीतून निघून गेली. एक महिनाभर हा प्रकार रोज सलग चालल्यावर, एक दिवस ती व्यक्ती बाहेर पडताच, महाराजांनी त्यांच्या सुखदेव नावाच्या खास शिष्याला खूण केली.

“महाराज त्यांचे नांव अनिरुद्ध महात्मे. पुण्यात ‘पुण्यात्मा’ नावाची त्यांची स्वतःची IT फर्म आहे. ” “अस्स, उद्या त्यांची आणि माझी भेट माझ्या खाजगी दालनात अरेंज करा.”

“नमस्कार महाराज, काय सेवा करू?” “नमस्कार महात्मे! आम्ही बघतोय, गेले महिनाभर तुम्ही आमच्या समोर रोज पाचशेच्या नोटांची कोरी बंडल्स……… ” “महाराज, गत आयुष्यात केलेल्या पापांच थोड तरी परिमार्जन व्हावे या एकाच हेतूने हे मी करतोय!” “नाही पण तुमच्या IT business मध्ये इतका पैसा ?” “महाराज, आपल्या पासून काय लपवणार आपल्याकडची बडी मंडळी आणि अनेक उद्योगपती यांची स्विस बँकेतली खाती मी मेन्टेन करतोय महाराज! तो पण माझा एक business च आहे, पण तो उघडपणे….. ” “समजलं महात्मे ! आमच्याकडे सुद्धा आमच्या फॉरीनच्या शिष्यानी दिलेली अनेक चलनातली अगणित रोख रक्कम…… ” “कळलं महाराज, आपण चिंता करू नका, फक्त आज्ञा द्या !” “महात्मे, उद्या सकाळी मला इथेच भेटा आणि ‘त्या’ सगळ्याची व्यवस्था स्विस बँकेत कशी लावता येईल ते पहा!” “जरूर महाराज ! उद्या सकाळी हा बंदा सेवेला हजर असेल !”

“सुखदेव, गेला आठवडाभर महात्मेची रोजची भेट बंद झाल्ये. ” “होय महाराज” “सुखदेव, त्यांचा काही निरोप ?” “काहीच नाही महाराज. ” “ठीक आहे. उद्या त्यांच्या IT फर्मला भेट द्या. ” “होय महाराज. “

“महाराज त्यांच्या फर्मला टाळं आहे. ” “काय ssss ?” “होय महाराज, अनिरुद्ध महात्मेनी फर्मची ती जागा तीन महिन्यासाठी भाड्याने घेतली होती, असं चौकशी करता कळलं. “

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १४ — गुणत्रयविभागयोग — (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १४ : गुणत्रयविभागयोग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रीभगवानुवाच 

*

परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम्‌ । 

यज्ज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः ॥ १ ॥

*

कथित श्रीभगवान 

समस्त ज्ञानातील उत्तम ज्ञान पुनःपुनः कथितो तुजला 

मुनिवर सारे मुक्त होउनी प्राप्त करित परम सिद्धिला ॥१॥

*

इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः । 

सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च ॥ २ ॥

*

धारण करुनी ज्ञानासी या मजठायी जे समरस झाले

आदिकाळी ना तया जनन ना व्यथा प्रलयकाले ॥२॥

*

मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन्गर्भं दधाम्यहम्‌ । 

सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत ॥ ३ ॥

*

गर्भधारते प्रकृती माझी महद्ब्रह्मरूप भूत योनी

संभव समस्त भूतांचा करितो मी तेथे गांडिवपाणि ॥३॥

*

सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः ॥ 

तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता ॥ ४ ॥

*

विविथ योनीतुनी जीव होताती मूर्त भारता

प्रकृती माता तयांची मी तर बीजद पिता ॥४॥

*

सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसम्भवाः । 

निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्‌ ॥ ५ ॥

*

सत्व रज तम होत प्रकृतीसंभव गुण

देहामध्ये आत्म्यासी ठेविती ते बांधुन ॥५॥

*

तत्र सत्त्वं निर्मलत्वात्प्रकाशकमनामयम्‌ । 

सुखसङ्गेन बध्नाति ज्ञानसङ्गेन चानघ ॥ ६ ॥

*

निर्मल सत्वगुण प्रकाशदायी निर्विकार

सुखासवे बंधन त्याचे तसेच ज्ञानाबरोबर ॥६॥

*

रजो रागात्मकं विद्धि तृष्णासङ्गसमुद्भवम्‌ । 

तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसङ्गेन देहिनम्‌ ॥ ७ ॥

*

वासना आसक्ती पोटी रागरूपी रजोगुण

कर्मफलाने वद्ध करी जीवात्म्या हे अर्जुन ॥७॥

*

तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम्‌ । 

प्रमादालस्यनिद्राभिस्तन्निबध्नाति भारत ॥ ८ ॥

*

अज्ञानज तो तमोगूण देहात गुंतल्या जीवांना

प्रमाद आळस निद्रा यांनी जखडुन टाकी जीवांना ॥८॥

*

सत्त्वं सुखे सञ्जयति रजः कर्मणि भारत । 

ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे सञ्जयत्युत ॥ ९ ॥

*

आच्छादुनिया सुखास सत्वगुण रजोगुण कर्मासी

तमोगुण झाकुनी ज्ञानासी प्रवृत्त करीती प्रमादासी ॥९॥

*

रजस्तमश्चाभिभूय सत्त्वं भवति भारत । 

रजः सत्त्वं तमश्चैव तमः सत्त्वं रजस्तथा ॥ १० ॥

*

रज-तमासी परास्त करुनी वृद्धिंगत हो सत्त्वगुण 

सत्व-तमासी परास्त करुनी वृद्धिंगत हो रजोगुण 

सत्व-रजासी परास्त करुनी वृद्धिंगत हो तमोगुण 

गुणागुणांच्या प्राबल्यासी भरतवंशजा घेई जाणुन ॥१०॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘सोनागाची’मधील दुर्गा – –… लेखक : श्री समीर गायकवाड ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ ‘सोनागाची’मधील दुर्गा – –… लेखक : श्री समीर गायकवाड ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

कोलकता येथील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार हत्या प्रकरणी बंगालमधील वेश्यांनी घेतलेली भूमिका ऐतिहासिक आहे! किंबहुना सामान्यांचे डोळे उघडणारी आहे! कथित सभ्य सामान्य माणसं या स्त्रियांपासून अंतर राखतात मात्र जेव्हाही कुठला महत्वाचा सामाजिक प्रश्न उद्भवतो तेव्हा या स्त्रिया त्यात उडी घेतात हा आजवरचा अनुभव आहे.

पीडितेला न्याय मिळावा म्हणून बंगालमधील वेश्यांनी मोर्चात सहभाग नोंदवला! यावेळी त्यांच्या हातात काही घोषणाफलक होते त्यावर लिहिलं होतं की,

प्रयोजने आमादे काचे आशून, किंतू नारी के धारशन कोरबे ना! 

প্রয়োজনে আমাদের কাছে আসুন, কিন্তু নারীকে ধর্ষণ করবেন না।

.. याचा अर्थ असा आहे – तुम्हाला जर इतकीच गरज पडत असेल तर आमच्याकडे या, परंतु कुठल्या स्त्रीवर बलात्कार करू नका!

याच अनुषंगाने या माता भगिनींनी त्यांच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्याची वंगभूमीमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे! याची माहिती घेण्याआधी दुर्गापूजेचा इतिहास जाणून घेणं अनिवार्य ठरतं!

सोनागाची हा कोलकत्यातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठा रेड लाइट एरिया आहे. या परिसराला इतिहास आहे. याचा एक पैलू धार्मिक आहे जो थेट दुर्गामातेशी संबंधित आहे! कोलकत्यात दुर्गापूजा उत्सवास सुरु होण्याच्या विशिष्ठ तिथी आहेत. त्या त्या दिवशी ते ते विधी पार पाडले जातात, कुंभारवाड्यात (बंगाली भाषेत कुंमारतुली) दुर्गामूर्ती बनवण्यास प्रारंभ करण्याचा दिवस दरसाली जाहीर होतो, त्याच दिवशी मूर्तीच्या निर्मितीस प्रारंभ होतो. मूर्तीसाठी दहा ठिकाणाहुन माती आणली जाते, तिचे पुण्यमाटी आणि निषिद्ध माटी असे दोन भाग पडतात. पुण्यमाटी मध्ये शेण असलेली माती, गोमूत्र असलेली माती, गंगेच्या काठची माती, कुंभाराच्या अंगणातली माती, देवालयातली माती, पर्वतातली माती इत्यादींचा समावेश होतो तर निषिद्ध मातीमध्ये वेश्यांच्या अंगणातल्या मातीचा समावेश होतो. या मातीला निषिद्ध म्हटलं गेलं असलं तरीही जोवर ही माती आणली जात नाही तोवर मूर्तीच्या निर्मितीस प्रारंभ होत नाही. शस्त्रसज्ज दहा भुजा असलेली दुर्गेची मूर्ती वेश्येच्या अंगणातल्या मातीशिवाय बनत नाही हे सत्य आहे आणि तो तिथला रिवाज झाला आहे. या मागची धारणा काय असावी याचं विश्लेषण करताना जाणकारांत मतभेद आहेत. पैकीचे दोनच महत्वाचे मुद्दे येथे मांडतोय.

वेश्यांकडे पुरुष जातात तेंव्हा त्यांच्या मनात नेमकं काय वादळ उठत असावं यावर आधारित पहिला विचार आहे. यानुसार जेंव्हा एखादा पुरुष वेश्येकडे जातो तेंव्हा त्याच्या मनातले सर्व विचार, वलय त्याने बाहेर टाकलेले असतात, वासना आणि देहविचार यांच्या बळावर तो तिच्या घरात शिरतो. म्हणजेच तो जेंव्हा तिच्या घरात शिरतो तेंव्हा त्याच्या मनात शून्य विचार असतात. त्यामुळेच त्याची पावलं पडलेली माती घेतली जाते ज्यात पुरुषाच्या मनात अन्य भावना नसतात. हे मत मला मान्य नाही, पण या मताला दुजोरा देणारे अनेक बंगाली पंडीत आहेत.

दुसरं एक मत आहे त्यानुसार दुर्गा आणि महिषासुर यांचं जेंव्हा युद्ध झालं होतं तेंव्हा त्यानं तिचं चारित्र्यभंग करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात तो यशस्वी ठरला नाही आणि शिवाय तो तिच्याकडून हरला देखील. दुर्गेच्या सर्व रूपांची पूजा होते पण तिच्या मलिन होऊ घातलेल्या रूपाची पूजा होत नाही, भलेही हे स्वरूप निषिद्ध असले तरी त्यातही एक देवांश आहेच हे कसे नाकारता येईल? मग आज ज्या स्त्रियांच्या वाट्यास हे भोग आलेले आहेत त्यांच्या अंगणातली माती आणल्याशिवाय संपूर्णत्व कसे येईल! या धारणांना अनुसरून तिथली माती आणली जाते नि मगच पहिली दुर्गा साकारते मग अन्य मूर्तिकार त्यांच्या प्रांगणात दुर्गा मूर्तीच्या निर्मितीत गुंततात हा तिथला रिवाज आहे!

तर यंदाच्या वर्षी सोनागाचीमधील भगिनींनी दुर्गेच्या निर्मितीसाठी आपल्या अंगणातली माती देण्यास नकार दिला आहे! एकीकडे स्त्रियांचे शोषण होतेय, दुसरीकडे सरकारे आवश्यक ती पावले उचलत नाहीत आणि यांचे शोषण तर अहोरात्र जारी आहे! मग स्त्रियांना न्याय नसेल तर निव्वळ दुर्गापूजा करून काय साध्य होणार आहे हा त्यांचा सवाल आहे!

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवताः हा श्लोक आपल्याकडे लोकप्रिय समजला जातो! स्त्रिया केवळ या श्लोकापुरत्या उरल्या आहेत का? वास्तवात त्या शौकासाठी उरल्यात की काय असे वाटण्याजोगी स्थिती आहे! याच मुद्द्याला अनुसरून सोनागाचीतील स्त्रियांनी हा निर्णय घेतला आहे.

दरबार ही सोनागाचीमधली सर्वात मोठी एनजीओ आहे. वीस हजार वेश्या भगिनी या एनजीओच्या सदस्य आहेत. यांची स्वतंत्र बँक देखील आहे, वैद्यकीय सेवाही आहे. शाळा काढण्याचा त्यांचा मानस आहे. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे वेश्यांनी वेश्यांसाठी चालवलेली एनजीओ अशी याची व्याख्या करता येईल. कालच दरबार’ची बैठक बोलवण्यात आली होती नि त्यात हा निर्णय घेण्यात आलाय. विशेष बाब म्हणजे कालीघाट ते सोनागाची आणि खिदीरपूर या परिसरात अनेक घरगुती नृत्यशाळा आहेत. या पूर्ण परिसरात जितके दुर्गा पंडाल आहेत त्यांना सरकार अनुदान देतं. गतसाली हे अनुदान ७०००० रुपये होतं यंदा सरकारने ८५००० रुपये अनुदान देऊ केलंय. पण या झुंजार स्त्रियांनी ते नाकारले आहे आणि आपला आवाज बुलंद केला आहे!

या स्त्री सोशल मीडियावर नाहीत. यांना समाज तिरस्काराने पाहतो, समाज यांची हेटाळणी करतो! सामाजिक मांडणीच्या उतरंडीत या सर्वात खाली आहेत. यांचं अफाट शोषण होतं! तरीही त्या सामाजिक लढ्यात हिरिरीने उतरतात, त्या बदल्यात समाजाकडून त्यांची एकच अपेक्षा असते ती म्हणजे किमान माणूस म्हणून तरी त्यांच्याकडे पहिले जावे! ही अपेक्षाही त्या कधी समोर येऊन मांडत नाहीत! जिवंत कलेवरं असणाऱ्या शोषित स्त्रिया आपला आवाज बुलंद करतात. त्या उलट आपण काय करतो हा प्रश्न हरेकाने स्वतःला विचारला पाहिजे!

सोनागाचीमधील माता-भगिनींचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो ! 💐

त्यांच्यातल्या दुर्गेला अभिवादन करतो !🙏

लेखक : श्री समीर गायकवाड

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “रबने बना दी जोडी…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “रबने बना दी जोडी…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… हे बघ ना सुधीर ! या पुस्तकातलं ताजमहालाचं चित्र किती भारी वाटतयं.. अगदी खराखरा ताजमहाल दिसतोय… आणि त्याच्या खाली.. शहेनशहा शहाॅंजान ने आपल्या सौंदर्यवती बिवी मुमताजच्या आठवणी प्रित्यर्थ बांधला असं दिलयं… त्या दोघांचं प्रेमाचं प्रतिक चिरकाल तसचं उभं आहे… खरचं दोन प्रेमिकांनी प्रेम करावं तर असं असावं.. मला हा ताजमहाल खुप आवडतो.. हवाहवासा वाटतो.. सुधीर तु एक शिल्पकार आहेस ना मग आपल्यासाठी या ताजमहालाची प्रतिकृती करुन आण की… आपणही प्रेम अगदी तसंच करायचं हं… कधीही एकमेकांशी बिल्कुल भांडण तंडण, राग, रूसवा करायचा नाही… अगदी मी जरी हट्टाला पडले, चिडले तरी तू मात्र मला प्रेमानं समजूत घालायची, माझा हट्ट उशिराने का होईना पण पुरवावास.. म्हणजे आपलं प्रेम अधिक दृढ होईल… तुला संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर स्टेशनवर न्यायला रोज येत जाईन मग फिरत फिरत कधी ड्रेस, टाॅप, जीन, मेक अपचं सामान असं किरकोळ खरेदी करून घरी येऊ.. घरी आल्यावर स्विगीवरून मागवलेलं जेवणं जेऊन घेऊ.. रात्री मग मी माझ्याआईला फोन करेन त्यावेळी तू वाॅशिंग मशीन लाव नि दिवसभराची पडलेली दोन चार भांडी तेव्हढी घासून काढ… आईशी फोन वरचं बोलणं झालं कि मग दोघं मिळून काॅटवरचं बेडशीट बदलुन झोपी जाऊया… जानू तू सकाळी एकदा ऑफिसला गेल्यावर घर मला खायला उठतं बघ… चैन कसली पडत नाही.. इतकं बोर होतं म्हणून सांगू.. टि. व्ही. वरच्या सगळ्या सिरियल्स नि मोबाईल वरचे नेटफ्लिक्स, प्राईम, च्या वेब सिरीज बघून देखील कंटाळा दूर होत नाही.. वेळ जाता जात नाही.. मग घरातलं कुठलचं काम करायचा मुड लागत नाही.. मग तू येण्याची आतुरतेने वाट पाहत बसते… घरातलं पडलेलं काम तसच टाकून देते.. ऑफिसमधून तू घरी आल्यावर तु हि कामं न सांगता करणारच हा माझा विश्वास असतो… कारण आपल्या खऱ्या प्रेमाची तर ती ओळख आहे…

सगळ्यांनीच काही शहाजहानसारखा मुमताजसाठी बांधलेल्या सारखाच ताजमहाल बांधायला हवा असं नाही.. तर अगदी घरची धुणी भांडी, झाडू पोछा आपल्या बायको च्या प्रेमाखातर इतकं केलं तरी पुरेसे आहे… दुसऱ्याला आनंद देण्यात खरा आनंद आपल्यालाच मिळतो.. नाही का?. मग जानू माझ्यासाठी तुझ्या लाडक्या सुधासाठी छोटीशी मदत करणार नाही का… मग मी दरवर्षी वट सावित्रीच्या पूजेच्या वेळी सात जन्मच काय जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून मागून घेईन नि दोन तासाचा उपवास करीन… आपल्या माणसासाठी ईतकं तरी मला करायलाच हवं नाही का. ?.. मगं शेजारचे पाजारचे, सगेसोयरे आपल्यावर जळफळतील.. म्हणतील क्या रब ने बनायी जोडी…! ”

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print