बोलता बोलता 2024 सरल निरोप देतांना आपण या वर्षात काय मिळवलं, काय सोडलं, काय चुकलं आणि काय राहून गेलं हे मनातील विचार मंथन चालू झालं….
” माणुसकी हरवली का, ती जपली का?. हेच प्रश्न मनाला विचारले…
स्वतः साठी किती जगलो, समाजासाठी किती पळालो, दुसऱ्यांना किती उपयोगी आलो…
” मनातील वाईट विचार काढून चांगले विचार आत्मसात केले हे महत्वाचे…
” सकारात्मक विचाराने तर प्रगल्भ विचारांची देवाण घेवाण होते व समाज प्रबोधन होते एक सुंदर संदेश समाजास मिळतो…
” नकारात्मक विचार आनंद मिळू देत नाही, गैरसमज निर्माण करून नाती टिकू देत नाही हे लक्षात घ्यायला हवं…
आपण, समाजाचे काहीतरी देणं लागतो हे लक्षात ठेऊन कार्य केल तर निस्वार्थी समाज सेवा घडली जाते यात शंकाच नाही…
सात्विक विचार दुसऱ्याप्रति आपुलकीची भावना कळकळ हे आदर्श माणुसकीचा ठेवा आहे तो सर्वांना मिळावा थोडं तरी दुःख हलकं होईल…
” एक अशीच पोळीभाजीच कामं करणारी महिला होती, खूप गरीब आणि प्रामाणिक होती…
” बिचारीला पतीदेवांचे सुख अजिबात नव्हते सतत भांडणं तिला मारणे चालू होते…
एक दिवस तिला खूप मारलं रक्त आलं तोंडातून हिरवं निळं अंग झालं…
त्याही परिस्थितीमध्ये ती माझ्याकडे आली बॅग घेऊन म्हणाली “. मी आता इथे राहत नाही मी माहेरी जाते… मी तिला म्हणाले तू आज इथे रहा आपण उद्या बोलू.
” तिला चार दिवस ठेऊन घेतलं, समजून सांगितलं थोडा राग शांत झाला तब्बेत सुधारली… ” तिला म्हणाले तू वेगळी रहा, इथेच कामं करतेस ते कर.. जून वाढव … पण माहेरी जाऊ नको…
जो मान तुला इथे राहून मिळेल तो माहेरी काम करूनही मिळणार नाही ” तिला ते पटलं आणि ती रूम घेऊन राहायला लागली…
” बऱ्याच वर्षांनी मी तिच्याकडे गेले तर चाळीतील घर जाऊन दोन माजली माडी झाली होती. तो एक योग्य सल्ला योग्य निर्णय तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला आणि तीच आयुष्य सुधारलं….
, ” माणुसकी, सकारात्मक विचार योग्य दिशा दाखवतात…
” नवीन वर्ष सुरु झाल्यावर मनाशी संकल्प करावा आणि तो वर्षात पूर्ण करावा…
” मी, स्वतःसाठी जगेनच पण इतरांना वेळेनुसार मदत करेल…
गरिबांना मदत करेल परिस्थिती नुसार गरीब मुलांना शिक्षण देईल…
” निराधारांना आधार अनाथ मुलांना आश्रय देईल, माझ्या कुवतीनुसार मी नक्कीच प्रयत्न करेन….
” आज पैसा, यश, समृद्धी सगळीकडे आहे नाही फक्त ” वेळ “.. तो देता आला पाहिजे…
” आई वडील वयस्कर झाले मुलं परदेशीआहेत, त्यांना सांभाळायला 50 हजार पगार देऊन केअरटेकर ठेवले सर्व सुविधा दिल्या…. तरीही आई वडील नाराज राहू लागले त्यांचं मन उदास असल्याने तब्येत बिघडू लागली…
” त्यांना हे काही नको होत, फक्त मुलांचं प्रेम आणि नातवंडाचं सुख हवं होत…
“मुलांनी आई वडिलांच्या प्रेमाच्या मायेच्या बदल्यात काय दिल तर पैसे फेकून केअरटेकर… हे प्रेम आहे कि उपकाराची परतफेड… तसं असेलतर आई वडिलांचे उपकार कुणीच फेडू शकत नाही.
विचार आला मनात ” आपण माणुसकी जपली ना, काहीतरी कार्य केल ना… तेंव्हा मन म्हणतं हे वर्ष सुंदर गेलं, नवीन वर्षात अजून कामं करेन…
“खूप प्रश्न भेडसावत आहेत समाजात खूप प्रश्न सोडवायचे बाकी आहेत.
“वाढते वृद्धाश्रम, बेकारी, मुलांचे लग्न हा तर फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे…
“समाजात परिवर्तन घडवणं आपलं काम आहे, अपेक्षा करण्यापेक्षा आव्हानाला सामोरं जाऊन स्व कष्टाने मिळवलेलं कधीही चांगलं…
“ज्या आईवडिलांनी घडवलं पायावर उभं केलं याची जाणीव ठेवून दोन शब्द प्रेमाने बोलून त्यांना सांभाळणं हे लक्षात ठेवले तर वृद्धाश्रमाची गरज कशाला लागेल.
“सरते शेवटी काय झालं, काय केलं, हा आनंद मनात ठेवून काय राहिलं, याचा संकल्प करून 2024 ला निरोप देऊन 2025 च स्वागत करूया…
अशोक देशमाने हा एक साधा, पण असामान्य युवक…. तो एका शेतकरी कुटुंबात जन्मला होता. त्याचे आईवडील शेतात काबाडकष्ट करत होते. त्याचे घर आणि शेत कायमच आर्थिक अडचणींचा सामना करत होते. अशोक बालपणापासूनच या कठीण परिस्थितीला सामोरा गेला होता. त्याच्या आईवडिलांचा चेहरा कधीच आनंदाने भरलेला दिसला नाही!कारण प्रत्येक दिवसच एक नवीन संघर्षाचा होता..
गावातील शेतकरी कुटुंबांच्या दुःखाची गोष्ट सर्वांनाच माहिती होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्याच्या कुटुंबातील अनाथ झालेले मुलं, उघड्यावर पडलेले संसार, यामुळे अशोकला तीव्र मानसिक त्रास होऊ लागला. तो रोजच हे दृश्य पाहून हळवा होई. त्याचं हृदय पिळवटून काहीतरी करायला हवं असा आवाज देत होतं.
अशोकने शिक्षणात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला. त्याला अशी आशा होती की, शिक्षणाचं सामर्थ्य त्याला काहीतरी बदल घडवायला मदत करेल. त्याने खूप मेहनत घेतली, आणि आयटी क्षेत्रात नोकरी मिळवली. त्याने आयटी इंजिनियर म्हणून उच्च पगाराची नोकरी केली. पण नोकरी करत असताना, त्याचे मन नेहमी त्या दु:खी मुलांचा, शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा आणि त्यांच्यापासून होणाऱ्या वेदनांचा विचार करत राहायचं.
एका रात्री, कामातून परत येताना अशोक विचार करत होता. ‘काहीतरी करायला हवं… याही मुलांना एक चांगलं भविष्य द्यायचं आहे. ‘ त्याच्या मनात एक विचार आला ‘माझ्या कुटुंबात.. समाजात.. बांधवांत.. जे दुःख होते, ते मी कसे संपवू शकेन? त्यासाठी काहीतरी वेगळं करायला पाहिजे. ‘ त्याने ठरवले की खपण अनाथाश्रम सुरू करूया..
अशोकने सुरुवात केली. दोन छोट्या रूम्स भाड्याने घेतल्या आणि सात ते आठ मुलांना त्यात आश्रय दिला. त्या मुलांचे जीवन अत्यंत हालाखीचे होते. ते सर्व शेतकरी कुटुंबातील होते. शाळेतील शिक्षण आणि एक सुरक्षित आश्रय त्यांच्या जीवनातील पहिला सोनेरी क्षण होता.
अशोकने या मुलांना शाळेत दाखल करून त्यांचे सर्व काही व्यवस्थित सुरु केले. त्यांना एक सुरक्षित आणि प्रेमळ घर दिले. जेथे त्यांना जगण्याची एक नवी दिशा मिळाली. अशोक त्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर जीवनाच्या तत्त्वज्ञानाची शिकवण देत असे. त्याने त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रोत्साहित केले, आणि त्यांना जीवनातील कष्टाचे महत्त्व समजावून सांगितले.
हे सर्व करत असताना अशोकने पाहिलं की, या छोट्या उपाययोजनांनी या मुलांच्या आयुष्यात मोठा बदल घडविला होता. ते शिकत होते, खेळत होते, आणि नवा आत्मविश्वास मिळवत होते. अशोकने त्यांना एक लक्ष्य दिलं ‘कधीही हार मानू नका, कारण तुमच्या जीवनात तुम्हीच सर्वात मोठे हिरो आहात. ‘
जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी अशोकच्या अनाथाश्रमाची वाहवा सुरू झाली. मुलं मोठी होऊ लागली, शाळेत उत्तम गुण मिळवू लागली. काही मुलं तर उच्चशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभी राहिली. गावाच्या इतर मुलांसाठी अशोक एक आदर्श बनला.
अशोकच्या यशाचं गुपित त्याच्या मनाच्या दृढतेत आणि त्या मुलांच्या भविष्यावर त्याने दिलेल्या प्रेमात होतं. त्याच्या आयटी क्षेत्रातील पगाराची नोकरी कधीच त्याच्या हृदयाचा भाग बनली नाही. त्याचे खरे सुख त्याच्या अनाथाश्रमात पाहिलेल्या मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यांत होतं.
अशोकने जेव्हा अनाथाश्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याच्या मनात एक स्पष्ट दृष्टीकोन होता – मुलांना शिक्षण आणि आत्मनिर्भरतेच्या मार्गावर आणणे. त्याने त्यासाठी दोन एकर जमीन घेतली होती, जिथे त्याने एका संपूर्ण आश्रय स्थळाची उभारणी केली. हे आश्रम एक साधे, पण अत्यंत आधुनिक आणि शिक्षणासोबतच जीवन कौशल्यांची शिकवण देणारे केंद्र बनले.
अनाथाश्रमाची इमारत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बांधली गेली. मुख्य इमारतीच्या छतावर सोलर सिस्टिम बसवला गेला होता. ज्यामुळे आश्रमात पूर्णपणे स्वच्छ आणि हरित उर्जेचा वापर होत होता. पाणी व्यवस्थापनासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम स्थापित केली गेली होती. ज्यामुळे पावसाचे पाणी साठवून शौचालय आणि उद्यानासाठी वापरता येत होतं.
आश्रयातील मुलांसाठी गोबर गॅस निर्माण करणारी यंत्रणा ठेवली होती, ज्यामुळे गॅस तयार होतो आणि स्वच्छतेसाठी लागणाऱ्या इतर गोष्टींसाठीही त्याचा वापर केला जातो. इथे गोपालन देखील सुरु होतं, जिथे मुलं दूध, दही, पनीर असे दुग्धजन्य पदार्थ तयार करायचे.. मुलचं गाईंची काळजी घेत होती.
आश्रयाची आणखी एक महत्वाची सुविधा होती ओपन लायब्ररी आणि खेळणी लायब्ररी. ओपन लायब्ररीमध्ये विविध वाचनासाठी पुस्तकांचा खजिना होता, आणि मुलांना प्रत्येक आठवड्यात एक पुस्तक वाचण्याचा नियम लागू केला गेला होता. यामुळे त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण झाली आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊ लागला. खेळणी लायब्ररीमध्ये मुलांना शारीरिक आणि मानसिक विकासासाठी विविध खेळणी मिळत होती.
आश्रयात आणखी एक अद्वितीय सुविधा होती, इलेक्ट्रिकल वर्कशॉप, केमिस्ट्री आणि बॉयोलॉजी लॅब्स. मुलं इथे आधुनिक शास्त्रीय प्रयोग करू शकत होती! आणि विज्ञानात रुची निर्माण करायला शिकत होती. या सर्व कक्षांच्या माध्यमातून मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन आणि व्यावहारिक ज्ञान मिळत होतं.
म्युझिक लॅब हे एक वेगळेच आकर्षण होतं. ह्या लॅबमध्ये सर्व प्रकारची वाद्ये होती. आणि मुलांना वादन शिकवले जात होते. अशोकने मुलांना एक गोष्ट ठरवून दिली होती ‘प्रत्येकाने किमान एक वाद्य वाजवायला शिकले पाहिजे. ‘ यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढत होता, आणि संगीत शिकणे त्यांना मानसिक शांती आणि आनंद देत होतं.
मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी फॅशन डिझाईन आणि शिलाईयंत्र होती. इथे मुलं कपडे डिझाइन करू शकत होती. शिवाय पिठाची गिरणी, ग्रेव्ही मिक्सिंग मशीन, आणि पापड तयार करण्याची मशीन, चपाती मशीन अशा विविध यंत्रांद्वारे कौशल्य शिकवले जात होते. ह्या सुविधांद्वारे मुलं व्यवसायिक कौशल्यांमध्ये पारंगत होऊन स्वतःचे जीवन सुटसुटीत बनवण्याच्या मार्गावर होते.
आश्रयाची आणखी एक महत्वाची गोष्ट होती आध्यात्मिकतेला महत्त्व देणे. रोजचा हरिपाठ, आणि ‘राम कृष्ण हरी’ म्हणून मुलांनी एकत्र केलेला नमस्कार यामुळे वातावरणात एक आध्यात्मिक शांती होती. मुलांच्या हृदयात धर्माची आणि संस्कृतीची शिकवण बसवण्यासाठी, ह्या प्रथांचे पालन करून घेतले जायचे.
अशोकने आश्रमाच्या शिस्तीला देखील महत्त्व दिलं. मुलांना कॉन्व्हेंट स्कूलसारखे ड्रेस दिले.
आश्रमात वेळोवेळी विविध तज्ञ, विचारवंत, समाजसेवक, लेखक, कवी, येऊन मुलांना मार्गदर्शन करत होते. शिक्षण, व्यवसाय, जीवन कौशल्य आणि मानसिक विकासावर भाषणं ईथे चालायची. हे मुलं प्रेरित होऊन आत्मविश्वासाने भरलेले होते, आणि त्यांना जीवनाच्या कठीण परिस्थितीचा सामना कसा करावा. हे इथे शिकवले जात होते.
अशोकच्या या अनाथाश्रमाच्या माध्यमातून, मुलांना एक नवा दृष्टिकोन मिळाला. त्यांचं जीवन आता फक्त भाकर भाजीवर अडकलेलं नव्हतं, किंवा फ्रीज, फियाट, फ्लॅट ह्यातच अडकून नव्हते तर त्यांना एक सुज्ञ, सशक्त आणि आत्मनिर्भर भविष्य मिळवायचं होतं. स्वावलंबन आणि समाजाच्या भल्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा ही त्यांच्यात अशोकने पेरली होती.
अशोकच्या मनानं एक ठरवलेलं होतं – ‘मुलं फक्त शिकली पाहिजेत असं नाही, त्यांना स्वावलंबी आणि समाजासाठी काहीतरी करणारे व्यक्तिमत्त्व बनवले पाहिजे. ‘त्याच्या याच विचारधारेवर आधारित, त्याच्या आश्रमाने नवा आदर्श निर्माण केला.
आश्रमातील प्रत्येक मुलाने त्याच्या आत्मविश्वासाने आणि मेहनतीने आपले स्वप्न साकारले होते. त्यांची जीवनाची दिशा आता स्पष्ट होती, आणि त्यांच्या प्रत्येक पावलावर एक नवा सूर्य उगवत होता. अशोकने जो परिवर्तन आणले, ते यथार्थ झाले होते.
आश्रम एक नवीन जीवनाची सुरुवात बनला होता, जिथे प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर यशाचा उत्सव होता. हेच त्याचं सर्वात मोठं यश होतं – एक दिलदार माणसाने सुरू केलेलं.. पाहिलेलं छोटं स्वप्न, आज एका सशक्त आणि आत्मनिर्भर पिढीचे भविष्य उगमस्थान बनलं होतं.. जे ‘स्नेहवन’ नावाने नावारूपाला आले आहे..
☆ “आली गाडी.. गेली गाडी…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
“सांगितलं कि गं तुला कितीतरी बाऱ्या!… माझ्या गावा कडं येताना तू मोकळीच येऊ नगंस म्हनून!… तिकडनं मंमईहून येताना माझ्या सासुरवाशीण लेकीला संगट घेऊन येशील, चार दिवस आपल्या म्हातारीला भेटायला… पन तू काय मनावर घायचं नावं घेत न्हाईस!… अन फुकाच्या मातूर दिसरातीच्या सतरा बाऱ्या येरझारा घालतीस… तसं तुला काय गं कुणाच्या सुखदुखाचं काय पडलेललं नसतयं म्हना!… तू जोडून घेतलेला हाय नव्हं त्यो चौवीस डब्यांचा बारदाना… आमच्यावानी संसाराचा ओढत जातीस तुझा गाडा…बाया बापड्या, बापयं गडी मानूस, लेकरं बाळं, ट्रंका, बोचकी, पिशव्या नि हबशींनी ओतू जातोय डब्बा डब्बा… जसा जीवनाच्या प्रवासाला निघतातं तसं…कुणी हसतया,कुणी रडतया तर कुणी इवळतया तर कुनाची कुजबूज, शबुद नसलेली धुसफूस तर कुनाची कावाकाव…तुला यातलं काही कळंत नसतया तुझी असती रूळावरून वाघ पाठीमागं लागल्यासारखी धावाधाव…जाशील तिकडं मुलूख तुला थोडा जसा दक्षिणेतलं रामेश्वर अन उत्तरेतलं काशी…सगळीच अनोळखी कुणं कुणाची कशाला करतीय चवकशी… जो तो इथं वागतोय तालेवार असल्यावानी…सगळ्यांना घेतीस सामावून तू आपल्याच पोटात.. अन जो तो असतो आपल्याच नादात.. कुणाचं दुखलं खुफलं… मन फुलून आलं आनंदान.. तुला गं पडाया कशाची फिकीर.. शिटीवर शिटी फुंकत जातीस वरडत नि एकेक स्टेशान मागं सोडंत.. जत्रा भरेली फलाटावरची चढ उतार होतेय तू आल्यावर… वाईच पोट होतयं तुझं ढवळल्यागत… पर तुला काहीच फरक पडतो काय… फलाटाला सोडून गेल्यावर त्या फलाटाचा उसासा तुला कधी कळतो काय?… साधू संतावानी तू अशी कशी गं निर्लेपवानी… अन तुला कसं कळावं एका आईचं आतडं कसं तिळ तिळ तुटतयं लेकीच्या भेटीसाठी.. चार वर्षांमागं लेकीला गं सासरला धाडलं…काळजाचा तुकडाच दूर दूर गेला नि भेटीगाठीला गं आचवला… सांगावा तो तिचा यायचा सठीसाही माहीला सुखी आहे पोरं कानात सांगुन जायचा.. परी पोरीच्या भेटीसाठी जीव तो आसुसलेला असायचा… लिहा वाचायची वानवा हाय माझ्याजवळ..पतुर पाठवाया उभा राहायतयं धरम संकट.. फोनची श्रीमंती आमच्या खेड्यातपतूर पोहचलीच नाही… बोलाचाली चा मायेचा शबुद सांग मंग कानावर कसा पडावा बाई..इकडच्या धबडगा घराचा उंबरठा नि शेताचा बांध कधी मला गावाची वेस वलांडून देईनात खुळे… अन तिकडं पोरीला सासरच्या जोखडात अडकवून टाकतात कारणांचे खिळे… मग तुझा घ्यायचा आधार असं मला लै मनात आलं.. म्हटलं तू सारखी ये जा करतीस लाखावरी माणसांची ने आण करतीस मगं तुला माझ्या पोरीला एकडाव तरी संगट घेऊन यायला जड कशाला जाईल.. अगं चार दिसं नसंना पण उभ्या उभ्या येऊन पोरं जरी येऊन भेटून, नदंरला पडून गेली तरी बी लै जीवाला बरं वाटंल बघ.. सकाळी सकाळी तू तिला इथं सोडायचं अन रातच्याला माघारी घेऊन जायचं… तू म्हनशील मगं तूच तसं का करीनास… न्हाई गं बाई… पोरीची अजून कूस उजवली नाही तवर तिच्याकडं जाता येत न्हाई हि परंपरा हायं आमची… तवा तुझ्याकडं पदर पसरून मागणं केलं… काही बी करं कसं बी जमवं पण एक डाव, या वेड्या आईला तिच्या पोरीची भेट एवढी घडवं… आणि पोरीला आणशील तवा हसऱ्या चेहऱ्याने निळ्या धुराचा पटका हवेत उडवत, आनंदाचा हिरवा बावटा फडकत फलाटावर येशील… गळाभर लेकिला तिचं मी भेटल्यावर मायेच्या पायघड्या घालून तिला माहेराच्या घराकडं नेईन…औटघटकेचं का असंना पण माहेरपण करीन…आणि…रातच्याला पाठवणी करायला येईन तवा तू वेळ झाली निघायची म्हणून शिटीवर शिटी फुंकत…अंधारातल्या आकाशात ताटातुटीचे उमाळाचे काळे सावळे धुराचे सर रेंगाळत सोडशील…अन फलाट सोडून निघशील तेव्हा जड अंतकरणानं पाय टाकत पुढे पुढे जाताना… क्षणभरासाठी का होईना लालबावट्याला बघून थांबशील… वेड्या आईकडं पोरीनं पुन्हा एकदा मान वेळावून खिडकीतून बघितलं का याचा अंदाज घेशील… दोन निरोपाचे आसू गालावर टपकलेले निपटलेले दिसल्यावर तू तिथून हलशील… इतकचं इतकचं माझ्यासाठी करशील… करशील नव्हं… “
☆ “लोकसाहित्य-संशोधनात रमलेली विदुषी” – भाग – २ ☆ डॉ. वि. दा. वासमकर ☆
(विधीनाट्यांमध्ये पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग असतात पूर्वरंग हा परंपरेनुसार धर्मविधीसाठी राखून ठेवलेला असतो त्यात ईश्वरविषयक किंवा तत्त्वज्ञानविषयक तात्विक व गंभीर विवेचनाचा भाग असतो. आणि उत्तररंगात तद्नुषंगिक आख्यानात लोकरंजन आलेले असते, असे त्या स्पष्ट करतात.) इथून पुढे —
‘लोककलांची आवाहकता’ या लेखामध्ये अलीकडच्या काळात मराठी रंगभूमी लोककलांचा आश्रय घेताना दिसते. असे त्या सुरुवातीलाच म्हणतात. ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकापासून दशावतार, गोंधळ, भारूड, जागरण अशा लोकनाट्यविधांचा उपयोग अनेक नवीन नाटकांनी केलेला आहे. याचे कारण सांगताना त्या म्हणतात, -“पश्चिमेचे अनुकरण हे एक कारण आहेच. पण केवळ पश्चिमेच्या एखाद्या नाटकाच्या अनुकरण करणे एवढ्याच एका प्रेरणेने मराठी नागर नाटकात लोकनाट्याचा प्रवेश झाला आहे काय?… आपले एकूणच आधुनिक जीवन हे दिवसेंदिवस तंत्रज्ञानाधीन होत चालले आहे. आधुनिक जीवनाचा निसर्गाशी आणि मातीशी असलेला संबंध तुटत चालला आहे. त्यामुळे भौतिक समृद्धी वाढत असतानाही एका पोकळीची जाणीव होत आहे. अशावेळी मानवी संस्कृती पुन्हा आपली मुळे शोधीत आहे… कलेच्या क्षेत्रातील या प्रेरणेचा आविष्कार पुन्हा नव्याने लोककलांचा शोध घेण्यातून होत आहे. कारण लोककलांमध्ये एक उत्स्फूर्तता असल्याने साक्षात जिवंतपणा असतो… जेथे जेथे समूहमनाशी नाते जोडण्याची तीव्रतेने गरज भासली, तेथे तेथे नागरकलांपेक्षा लोककला प्रभावी ठरलेल्या दिसतात. आजच ब्रेख्टमुळे नागर रंगभूमी लोककलांकडे वळली आहे असे नव्हे”. ताराबाईंच्या या भाष्यातून लोककलांचे महत्त्व आधोरेखित होते. ‘अदाची लावणी आणि नाट्यगीत’ हा आणखी एक महत्त्वाचा लेख या संग्रहात आहे. म्हणजे दरबारातील लावणी किंवा बैठकीची लावणी होय. अदा म्हणजे अभिनय. ही लावणी अभिनयप्रधान असते. तिच्यात अंगप्रत्यंगांचा लयबद्ध अविष्कार असतो. भावनांना चेतवणारे आविष्कार करणे हे या लावणीचे प्राणतत्त्व असते, असे प्रतिपादन करून प्रारंभीच्या सर्व शृंगाररसप्रधान नाट्य गीतांचे स्वरूप पाहिले, अभिनयरूप पाहिले तर बैठकीच्या अदाच्या लावणीचा हा नवा अवतार असल्याचे लक्षात येईल, असे त्या स्पष्ट करतात. अदा करणाऱ्या कलावतीची जागा स्त्रीपार्टी पुरुष नटाने घेतली पण शृंगारप्रधान नाट्यगीताचा आशय, सांगीतिक अविष्कारदृष्ट्या चाली आणि आंगिक अभिनय, मुद्राभिनय हा सर्वच आविष्कार एकसंधपणे पाहिला तर बैठकीच्या लावणीचे हे नवे रूप असल्याचे लक्षात येईल, असे मार्मिक अवलोकन त्या करतात.
तारा भवाळकर या जशा लोकसाहित्यमीमांसक आहेत, तशाच त्या स्त्रीवादी दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या विचारवंतही आहेत. स्त्रीवादाच्या अनुषंगाने त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यातील एक म्हणजे ‘मायवाटेचा मागोवा’ हे पुस्तक. हे पुस्तक श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनने 1998 मध्ये प्रसिद्ध केले. या पुस्तकात दहा लेखांचा समावेश केला आहे. ‘लोक साहित्याचे पुनराकलन’ हा या संग्रहातील दुसरा लेख. हा लेख त्यांनी स्त्रीवादविषयक चर्चासत्रामध्ये वाचला होता. या लेखाच्या सुरुवातीला ताराबाईंनी स्त्रीवाद म्हणजे काय याचे स्पष्टीकरण दिले आहे. ते थोडक्यात असे -आधुनिक जीवनातील अनेक विचारधारांची निर्मिती पाश्चिमात्य जगतात झाली. आणि नंतर त्या जगभर पसरल्या. त्यातीलच एक म्हणजे स्त्रीवाद… स्त्रीकडे पाहण्याचा, तिला वागवण्याचा, तिच्याशी वागण्याचा दृष्टिकोन जगभर एकाच प्रकारचा आहे. आणि तो पुरुषांच्या तुलनेने गौणत्वाचा आहे. विषमतेचा आहे. स्त्री गौण आहे; पुरुषप्रधान आहे; ही भूमिका कुटुंब, समाज, धर्म, राज्य, अर्थ, संस्कृती आदी सर्व क्षेत्रात अनेक वर्षे नांदत आहे. आणि ही विषमता केवळ लिंगाधारित विषमता आहे… स्त्री-पुरुष विषमतेतून खरे तर विषमतेच्या जाणिवेतून, आधुनिक जगात स्त्री विषयक चळवळी सुरू झाल्या. यांतून संघर्षरत असलेल्या स्त्रीच्या जाणिवा अधिक विकसित झाल्यानंतर स्त्रीला स्वतःच्या स्थितीचा आणि म्हणूनच एकूणच मानवी समाजातल्या स्त्री-पुरुष नातेसंबंधाचा पुनर्विचार करण्याची तीव्र गरज भासू लागली… सृजनशील स्त्रीला आपले गौणत्व नेहमीच जाचत होते. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध तिने आवाज उठवायला सुरुवात केली आणि या चळवळीतून सिमॉन द बोव्ह या फ्रान्समधील स्त्रीच्या ‘द सेकंड सेक्स’ या ग्रंथाची निर्मिती झाली 1949 मध्ये प्रकाशित झालेल्या या ग्रंथाचा जगाच्या पाठीवरील सर्व प्रमुख भाषांमध्ये भाषांतर झाले. आणि यातून स्त्रीवादी चळवळीचा उदय झाला. आपल्याकडेही अनेक विचारवंत स्त्रिया या चळवळीशी निगडित झाल्या. त्यातील एक म्हणजे डॉ. तारा भवाळकर. ताराबाईंनी स्त्रियांच्या भावना त्यांच्या गीतातून, कथातून, किंवा म्हणी – उखाण्यातून कशा प्रकट झाल्या आहेत याचे चित्रण अनेक लेखांमध्ये केले आहे. ‘लोकसाहित्याचे पुनराकलन’ या लेखांमध्येही त्याचा प्रत्यय येतो. त्या लिहितात –
देवा नारायणा माझी विनंती फार फार |
जन्म बायकांचा नको घालूस वारंवार ||
अशा स्त्री जन्माला नकार देणाऱ्या ओव्या स्त्रीगीतातून अक्षरशः शेकड्याने सापडतात, असे ताराबाई म्हणतात. त्या पुढे म्हणतात, “लोकगीतातून एरव्ही रामाचे कितीही कौतुक केले असले तरी त्याने गर्भवती सीतेचा परित्याग करणे स्त्री मनाला रुचलेलं नाही. तो लोकगीतातील स्त्री मनाला फार मोठी जखम करून गेलेला दिसतो.
सीता पतिव्रता नाही रामाला कळाली |
वनाच्या वाटेवरी चाके रथाची गळाली ||
असे म्हणून पुरुषसत्तेचा प्रतिनिधी असलेल्या रामाची अन्यायी वृत्ती चव्हाट्यावर मांडली आहे. ‘किती चतुर बायका’ हा लेखही स्त्रीवादी दृष्टिकोनातून लिहिला आहे. या लेखामध्ये शंकर-पार्वतीचा एक संवाद उद्धृत केला आहे. या संवादात शंकर आणि पार्वती एकमेकाला कोडी घालत असतात – ऐका हो शंकरा बोलाचा अर्थ करा असे पार्वतीने म्हटल्यावर संशयग्रस्त शंकर विचारतात – ऐकलं ग पार्वती बोलाचे अर्थ किती? कोणाला हात देत होतीस, कोणाला पाय देत होतीस, कोणाच्या मुखाकडे पाहून तू हसत होतीस या ओळींमध्ये शंकराने एका परीने पार्वतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. यावर पार्वती मिश्किलपणे म्हणते- कासाराला हात देत होते, सोनाराला पाय देत होते, आरशाच्या मुखाकडे पाहून मी हसत होते हे उत्तर ऐकत राहताना पार्वतीच्या ओठाच्या कोपऱ्यात हसू दिसायला लागतं. हे उत्तर देणारी पार्वती नक्कीच चतुर आहे; असे ताराबाई म्हणतात.
सारांश डॉ. तारा भवाळकर यांचे लोकसाहित्य संशोधन विचारात घेतले की, त्यांच्या चिकित्सक, मर्मग्राही दृष्टिकोनाचा सहज प्रत्यय येतो. त्यांच्या विपुल लेखनाचे सार थोडक्यात सांगायचे झाले तर त्या लोक संस्कृतीशी, स्त्रीच्या मानसिकतेशी अंत:करणापासून जोडल्या गेल्या आहेत.
– समाप्त –
लेखक : डॉ. वि. दा. वासमकर
सांगली (महाराष्ट्र)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वत:शीच केलेलं हितगुज किंवा आपणच घेतलेली आपली मुलाखतच म्हणा ना!
डॉ. तारा भावाळकर या लोकसाहित्याच्या आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक समीक्षक आणि संशोधक. या व्यतिरिक्त नाट्य, समाज, शिक्षण इ. अन्य क्षेत्रातही त्यांच्या लेखणीने करामत गाजवली आहे. त्यांनी आपला लेखन प्रवास, कार्यकर्तृत्व, आपले विचार, धारणा याबद्दल जो आत्मसंवाद साधला आहे… चला, वाचकहो… आपण त्याचे साक्षीदार होऊ या. वस्तूत: ही मुलाखत १३ एप्रील १९२१ पासून क्रमश: ई-अभिव्यक्तीवर ५ भागात प्रसारित झाली होती. आज डॉ. तारा भावाळकर विशेषांकाच्या निमित्ताने ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रकाशित करत आहोत.. उज्ज्वला केळकर )
तारा – याशिवाय ताराबाईंनी आणखी काही लिहिलय की नाही?
ताराबाई– लिहिलय….. इथून पुढे )
ताराबाई– ज्याला संकीर्ण स्वरूपाचं म्हणता येईल, असं ताराबाईंनी खूप काही लिहिलय. सुरुवातीच्या काळात हरिवंश राय बच्चन यांच्या कवितांचा… खंडकाव्याचा… ‘मधुशाला’चा अनुवाद त्यांनी केलाय. निरनिराळी व्यक्तिचित्रे असलेले, ‘माझीये जातीचे’ सारखे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. ‘मरणात खरोखर जग जगते’ सारखा एखादा कथासंग्रह आहे. ललित लेखन आहे. समीक्षा लिहिल्या आहेत. काही संपादनं केली आहेत. आचार्य जावडेकर यांच्या जेलमधील पत्रांचे संपादन केलं आहे. रा. रं. बोराडे यांच्या ग्रामीण स्त्रीविषयक कथांचे संपादन केले आहे. त्याला प्रस्तावना लिहिल्या आहेत. ज्याला अवडक-चवडक म्हणता येईल, असं आत्मकथनपर लेखनही त्यांनी बरंच केलं आहे.
तारा– तर ताराबाई, तुमच्या एकंदर लेखनाचा धावता परिचय तुम्ही करून दिलात, आता तुम्हाला मागच्या आयुष्याकडे वळून पहाताना काय वाटत? धन्यता वगैरे… ? आणि ही वाटचाल करताना तुम्हाला मार्गदर्शन कुणाचं मिळालं का? तुम्हाला कुणाचं काही घ्यावसं वाटलं का? किंवा तुमच्यासमोर लेखनाबाबत कुणाचे आदर्श होते, याबद्दल काही सांगाल का?
ताराबाई– त्याचं काय आहे, एकाच एका मार्गदर्शकाची ताराबाईंना कधी गरज वाटली नाही आणि ते शक्यही नव्हतं. कारण त्या महाविद्यालयात गेल्या नाहीत. शिकणं आणि शिकवणं या गोष्टी एकाच वेळी त्या परस्परावलंबी अशा करत गेल्या. पण सुदैवाने प्राथमिक शिक्षणापासून, कुणी ना कुणी तरी, ज्यांना आपण गुणी माणसं म्हणतो, मोठी माणसं म्हणतो, ते पाठीवर हात ठेवणारे लोक मिळत गेले. लोकसाहित्याच्या अभ्यासाला दिशा दाखवणारी, रा. चिं. ढेरे, प्रभाकर मांडे यासारखी जेष्ठ मंडळी, नरहर कुरूंदकर, मुंबई विद्यापीठाच्या उषाताई देशमुख, सरोजिनी वैद्य अशी मंडळी भेटत गेली. सरोजिनी वैद्य यांच्या बरोबर त्या अमेरिकेला एक संशोधनपर निबंध वाचण्यासाठीही जाऊन आल्या. १९९१मध्ये आरीझोना स्टेट युनुव्हर्सिटी, अमेरिका येथील चर्चासत्रात त्यांचा सहभाग होता आणि यावेळी त्यांनी आपला लोकसाहित्यावरील संशोधनपर निबंध वाचला होता.
शांताबाई शेळके यांनी ताराबाईंचे लोकसाहित्यावरचे लेखन वाचल्यानंतर म्हंटले होते, ‘ताराबाई स्त्रीकेन्द्रित लेखन करतात. स्त्रियांविषयी पोटातिडिकेने लिहितात पण स्त्रीमुक्तीवाल्यांच्या लेखनात जी उंच पट्टी जाणवते, ती ताराबाईंच्या लेखनात नाही. त्यांचे लेखन आक्रोशी नाही. ’ कोल्हापूरला ताराबाईंना एक पुरस्कार मिळाला होता. ‘मंगल पुरस्कार’. साहित्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल त्यांना तो दिला गेला होता. हा पुरस्कार शांताबाई शेळके यांच्या हस्ते देण्यात आलेला होता. त्यावेळी बोलताना हे उद्गार त्यांनी काढले होते. हे भाषण चालू असतानाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनासाठी शांताबाईंची एकमताने निवड झाल्याची बातमी आली. त्यामुळे हा प्रसंग ताराबाईंच्या विशेष स्मरणात आहे.
बेळगावच्या इंदिरा संत जवळिकीच्या. कुसुमाग्रज हे नेहमीच पाठीशी होते. ताराबाईंच्या ‘लोकनागर रंगभूमी’ पुस्तकाचं पु. ल. देशपांडे यांनी विशेष कौतुक केलं होतं. पुण्याला किर्लोस्कर शताब्दीच्या निमित्ताने भाषणे करायची संधी, त्यांना पु. ल. देशपांडे यांच्या प्रशस्तीमुळे मिळाली होती. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी पत्र पाठवून विश्वकोशात अतिथी संपादक म्हणून काम करण्याची विनंती केली होती. त्यावेळी विश्वकोशात लोकसाहित्य हा विषय प्रथम समाविष्ट झाला. असे ताराबाईंच्या पाठीवर हात ठेवणारे, प्रोत्साहन देणारे असे अचानक भेटत गेले. जगण्याच्या प्रवाहात, कुणी येतात, भेटतात, कुणी हात सोडून जातात, तसं त्यांच्याबाबतीतही झालं.
अडचणी येतच असतात. एकीकडे नोकरी, घर सांभाळणं, लेखन, भाषण, संशोधन या सगळ्या गोष्टी एकाच वेळी करत असताना, काही बर्या-वाईट गोष्टी घडत असतात. ताराबाई म्हणतात, ‘वाईट ते सोडून द्यायचं!’
तारा– ताराबाईंच्या आयुष्यात अडचणी आल्या, पण त्याचप्रमाणे अचानक आनंद देणार्या घटनाही घडल्या असतीलच ना!
ताराबाई– हो. तर! नशिबाने चांगली माणसंही भेटत गेली. प्रोत्साहन देणारी माणसं भेटत गेली.
क्रमश: भाग ३
डॉ. ताराबाई भावाळकर
संपर्क – ३, ’ स्नेहदीप’, डॉ. आंबेडकर रास्ता, सांगली, ४१६४१६ मो. ९८८१०६३०९९
प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
☆ माझी कामाठीपुर्यातली भिक्षुकी – मी धूपार्तीचा भिक्षुक.. ! – भाग – २ – लेखक : श्री तात्या अभ्यंकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
(साला, मी एक पांढरपेशा उच्चभ्रू? जाऊ दे, तो चर्चेचा विषय आहे! झमझम बारमध्ये महिन्याकाठी सताठशे रुपये पगार मिळणारा मी उच्चभ्रू? ) – इथून पुढे
त्या गल्लीच्या मागल्या बाजूसच एका चाळवजा इमारतीत वेश्यायवसाय चालतो.. मला त्या लहानश्या खुराड्यातील तेवढ्याच लहानश्या मोरीवजा बाथरुमात नेण्यात आले.. त्या घरची मावशी अन् आजूबाजूच्या वेश्या यांनी मला वाट करून दिली.. एरवी बाराही महिने फक्त पोटातल्या भुकेच्या डोंबाचा अन् पर्यायाने केवळ वासनेचाच वावर असणार त्या खोलीत.. परंतु त्या दिवशी मला तसं काही जाणवलं नाही.. सण-उत्सवाचा, गणपतीच्या वातावरणाचा परिणाम? भोवती त्या वेश्यांची दोन-चार कच्चीबच्ची घुटमळत होती. कुणाच्या हातात गणपतीच्या पुढ्यातलं केळं तर कुणाच्या हाताता आराशीमधली चुकून सुटलेली रंगेबेरेंगी नकली फुलांची माळ, कुणाच्या हातात साखरफुटाणे तर कुणाच्या हातात कुठुनशी आलेली एखादी झांज! मला क्षणभर अभिमान वाटला तो माझ्या उत्साही व उत्सवप्रिय मुंबापुरीचा! काय काय दडवते ही नगरी आपल्या पोटात!
सोबत तो टकला हिजडा होता. त्यानं माझ्या हातात एक नवीन साबणाची वडी आणि स्वच्छ टॉवेल ठेवला..
मी स्नान करून, टॉवेल नेसून बाहेर आलो.. आसपासच्या वेश्यांचं तोंड चुकवून अंगात शर्टप्यान्ट चढवली.. त्या टकल्या हिजड्याचं मात्र मला खरंच खूप कौतुक वाटत होतं.. तो मोरीच्या बाहेरच थांबला होता.. ‘हा आज आपला पाहुणा आहे आणि याला काय हवं नको ते आपण पाहिलं पाहिजे. ‘ एवढी एकच तळमळ दिसत होती त्याच्या चेहर्यावर.. ! उच्चभ्रू समजातल्या सो कॉल्ड हॉस्पिटॅलिटीचा त्यानं कोणताही कोर्स केलेला नव्हता.. !
तेवढ्या पाच मिनिटात त्या मावशीने चा करून माझ्या पुढ्यात कप धरला.. कोण ही मावशी? ८-१० वेश्यांचं खुराड सांभाळणारी.. तिनं मी अंघोळीहून येईस्तोवर माझ्याकरता चा देखील टाकाला?!
कपडे घातल्यावर त्या टकल्यानं ते अय्यप्पाचं पवित्र मानलं गेलेलं कुठलंसं वस्त्र उपरण्यासारखं माझ्या खांद्यावर घातलं.. आम्ही त्या खोलीतून बाहेर गणपतीपाशी आलो आणि मी मुख्य गाभार्यात शिरलो..
“तात्यासेठ, ये लक्ष्मी है.. इसको बोलो पूजा कैसे करनेका, क्या करनेका.. !”
त्यांच्यातला एक लक्ष्मी नावाचा एक तरूण रूपवान हिजडा छानशी साडीबिडी नेसून तिथंच पूजा करायला म्हणून उभा होता.. माझं सहजच समोरच्या तयारीकडे लक्ष गेलं.. फुलं, अक्षता, अष्टगंध, समया, उदबत्त्या.. सगळी तयारी अगदी अपटूडेट होती.. ते सगळं पाहिल्यावर मी स्वत:ला विसरलो.. आपण एक सुशिक्षित सुसंस्कृत पांढरपेशे आहोत आणि मुंबैच्या कामाठीपुर्यात उभे आहोत ही गोष्ट मी विसरून गेलो. माझं मन एकदम प्रसन्न झालं..
सुसंस्कृत, सुसंस्कृत म्हणजे तरी काय हो? नस्ता एक बोजड शब्द आहे झा़लं.. त्या क्षणी माझ्या आजुबाजूचे ते सारे हिजडे सुसंस्कुत नव्हते काय?!
“प्रारंभी विनती करू गणपती.. “
दशग्रंथी तात्या अभ्यंकराने पूजा सांगायला सुरवात केली.. तशी त्या पार्थिवाची प्राणप्रतिष्ठा वगैरे पहिल्या दिवशीच झाली असणार.. मी सांगत होतो ती केवळ संध्याकाळची धूपार्ती!
‘प्रणम्य शिरसा देवं’, ‘शांताकारं भुजगशयनं. ‘, गणपती अथर्वशीर्ष… ‘ च्यामारी येत होते नव्हते ते सारे श्लोक तिथे बिनधास्तपणे आणि मोकळ्या मनाने म्हटले! अगदी गेला बाजार शिवमहिन्म स्तोत्रातल्याही सताठ ओळी मला येत होत्या त्याही म्हटल्या –
महिन्मपारंते परमविदुषो यद्यसदृषि
स्तुतिर्ब्रह्मादिनाम् अपितदवसंनास्त्वयिगिरा:
अथावाच्य..
आता आठवत नाही पुढलं काही.. पण कधी काळी ल्हानपणी मामांकडून शिवमहिन्माची संथा घेतली होती ती आता कामी येत होती. आपल्याला काय हो, शंकर तर शंकर.. तो तर बाप्पाचा बापुसच की!
ओल्या बोंबलाच्या कालवणाने चलबिचल होणारा मी, अगदी पूर्णपणे एका भिक्षुकाच्या भूमिकेत शिरलो होतो… सहीसही ती भूमिका वठवत होतो.. ‘काय साला विद्वान दशग्रंथी ब्राह्मण आज आपल्याला लाभला आहे!’ असे भाबडे कृतज्ञतेचे भाव आजुबाजूच्या हिजड्यांच्या चेहर्यावर मला दिसत होते.. त्यांचा तो म्होरक्या टकला हिजडा तर अक्षरश: कृतकृत्य होऊन रडायचाच बाकी होता.. श्रद्धा, श्रद्धा म्हणजे दुसरं तरी काय असतं हो?!
‘गंधाक्षतपुष्पं समर्पयमि.. ‘ असं म्हणून लक्ष्मीला गंध, अक्षता व फुलं वाहायला सांगितलं..
“अबे … उस्मान … वो फुल उधर नजदिक रख ना.. !”
फुलाचं तबक थोडं दूर होतं ते रागारागाने एका हिजड्याने कुणा उस्मानला नीट गणपतीच्या जवळ ठेवायला सांगितलं.. !
गणेशपुजन सुरू असतांनाच, “अबे … उस्मान …”?
पावित्र्याच्या अन् शुचिर्भूततेच्या व्याख्या प्रत्येकाच्या, किंबहुना प्रत्येक समाजाच्या वेगळ्या असतात.. !
“धूपं समर्पयामि, दीपं सर्पमर्पयामि.. ” दशग्रंथी अभ्यंकर सुरूच होते! आणि माझ्या सूचनांनुसार लक्ष्मी सगळं काही अगदी यथासांग, मनोभावे करत होती.. की होता?!
सरते शेवटी पूजा आटपली, आरती झाली.. मला पुन्हा एकदा आतल्या एका खोलीत नेण्यात आलं.. त्या मंडळातले सारे कमिटी हिजडे अगदी कृतकृत्य होऊन माझ्याभोवती जमले होते..
‘अब मुझे जाना होगा.. देर हो गई है.. ‘ असं मी म्हटल्यावर थोडं तरी काही खाऊन गेलंच पाहिजे असा मला त्या टकल्यासकट इतर हिजड्यांनी आग्रह केला.. पाचच मिनिटात कुणीतरी गरमागरम पुर्या, छोले, गाजरहलवा असा मेनू असलेलं ताट माझ्या पुढ्यात घेऊन आला..
अखेर दशग्रंथी विद्वान तात्या अभ्यंकर अल्लाजनसोबत तेथून निघाले.. एक वेगळाच अनुभव घेतला होता मी.. गणपतीकडे त्या यजमान हिजड्यांकरता काय मागणार होतो मी? ‘यांचा शरीरविक्रयाचा धंदा चांगला होऊ दे’ – हे मागणार होतो? आणि मुळात त्यांच्याकरता देवाकडे काही मागणारा मी कोण? माझीच झोळी दुबळी होती.. त्यांच्या झोळीत माप टाकायला गणपती समर्थ होता.. !
निघण्यापूर्वी त्या टकल्या हिजड्यानं माझ्या हातात एक पाकिट आणि हातात एक पिशवी ठेवली आणि मला नमस्कार करू लागला.. वास्तविक मलाच त्याच्या पाया पडावसं वाटत होतं.. वयानं खूप मोठा होता तो माझ्यापेक्षा… !
तेथून निघालो. पाकिटात शंभराची एक कोरी नोट होती.. सोबत ही पिशवी कसली?
‘आमच्याकडे जाताना भिक्षुकाला शिधा द्यायची पद्धत आहे.. ‘ अल्लाजानने माहिती पुरवली..
मी पिशवी उघडून पाहिली तो आतमध्ये एका पुढीत थोडे तांदूळ, दुसर्या पुडीत थोडी तूरडाळ.. आणि दोनचार कांदेबटाटे होते.. डाळ-तांदुळाचा तो शिधा पाहून मला क्षणभर हसूच आलं..
‘अरे हे काय? डाळ-तांदुळाचा शिधा?’ मी अलाजानला विचारलं..
“डालचावल के अलावा इन्सानको जिंदगीमे और क्या लगता है?!”
अल्लाजानच्या तोंडून सहजच निघालेलं ते वाक्य बी ए, एम ए, पीएचडी… सार्या विद्यांना व्यापून त्यांच्या पल्याड जाणारं होतं, गेलं होतं.. !
मला आजही त्या शिध्यातले डाळतांदूळ पुरत आहेत.. !
– समाप्त –
लेखक : श्री तात्या अभ्यंकर
प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
वीजेच्या मीटरचं रिडींग घेण्यासाठी तो दर महिन्याला नियमितपणे येत असतो. मीटरचा फोटो काढायचा.. आणि जायचं.. पुढच्या आठवड्यात वीज बील आणुन द्यायचं.. हे त्यांचं काम.
त्या दिवशी मला जरा रिकामपण होतं.. त्याच्याकडेही वेळ होता. मग बसलो गप्पा मारत. त्याच्या बोलण्यातुन समजलं.. असे रिडींग घेण्याचं काम साधारण दोनशे जण करतात. आणि हे सगळं चालवण्यासाठी जी एजन्सी आहे त्याचा मालक एक मोठा राजकीय पुढारी आहे.
तसं आपण ऐकुन असतोच.. या या पुढार्यांचा हा असा बिझनेस आहे वगैरे.. त्यामुळे मला फारसं आश्चर्य वाटले नाही. हे जगभरच चालतं. अमेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश देखील एका मोठ्य तेल कंपनीचे मालक होतेच. कित्येक क्रिकेटपटू, अभिनेते हॉटेल व्यावसायिक असतात हेही ऐकुन असतो. या एवढ्या पैशाचं ते करतात तरी काय असा सामान्यांना प्रश्न पडतोच. उपजीविकेसाठी काही उद्योग धंदा करणे वेगळे.. आणि हे वेगळे.
या पार्श्वभूमीवर मला आठवले लोकमान्य टिळक.
लोकमान्य टिळक.. त्यांची देशभक्ती.. त्यांचं कार्य याबद्दल आपण सगळेच जण जाणुन आहे. पण टिळक उपजीविकेसाठी नेमकं काय करत होते हे फारसं कोणाला माहित नाही. केसरी हे वर्तमान पत्र ते चालवत.. पण त्याकडे टिळकांनी व्यवसाय म्हणून कधीच बघितले नाही.
काही काळ त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली. पण आगरकरांशी काही वाद झाल्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडली. टिळक घरचे तसे खाऊन पिऊन सुखी होते. पण सार्वजनिक कामांसाठी अतिरिक्त पैसा हा लागतोच. त्यासाठी मग काय करावे असा त्यांना प्रश्न पडला. टिळकांना कायद्याचे ज्ञान उत्तम प्रकारचे होते. त्यांनी ठरवलं.. आपण विद्यार्थ्यांना वकिलीचे शिक्षण द्यायचं.. वकिलीच्या शिक्षणाचे क्लास काढायचे.. त्यातुन पैसा उभा करायचा.
पुण्यातील हा बहुधा पहिला खाजगी कोचिंग क्लास. सुरुवातीला त्यांच्यावर टिकाही झाली.. पण त्यांनी मनाची तयारी केली होतीच. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कायद्याचं शिक्षण घ्यायला मुले येऊ लागली. कायद्याच्या शिक्षणासोबतच टिळक आपल्या विद्यार्थ्यांना अप्रत्यक्षरित्या राजकारणाचे धडेही देऊ लागले. टिळकांच्या तालमीत तयार झालेले ही तरुण मुले आपापल्या गावी जाऊन वकिली करता करता राजकारण पण करु लागले. थोडक्यात काय तर.. टिळकांना त्यांच्या राजकारणासाठी एक भक्कम यंत्रणा क्लासच्या माध्यमातून उभारता आली.. आणि हे सगळं उत्तम प्रकारे अर्थार्जन करता करता.
तशीच गोष्ट महात्मा फुले यांची. फुले यांनी फारसं राजकारण केलं नाही. पण समाजकारण मात्र केलं. सामाजिक कामे करत असताना.. समाजसेवा करत असताना म. फुल्यांनी आपल्या शेतीवाडी कडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही. शेतीत त्यांनी अनेक नवनवीन प्रयोग केले. पुण्यातील मांजरी शिवारात त्यांची जमीन होती. दहा बारा माणसं कायमस्वरूपी कामासाठी होती.. आणि गरज पडली तर अजुनही मजुर रोजंदारी वर असायचे. शेतीच्या कामासाठी १५-२० बैल होते.. झालंच तर २-३ गायी होत्या. दरमहा शेकडो रुपयांची उत्पन्न त्यातुन जोतीरावांना मिळत होतं. पुण्यातुन मोठ्या रुबाबात ते कधी घोड्यावरुन.. तर कधी घोडागाडीतुन शेतीची पाणी करायला येत.
विदेशी भाज्या, फळे लावण्याच्या बाबतीत लोकांमध्ये गैरसमज होते. पण जोतीरावांनी जेव्हा कोबी, फुलकोबी, टॉमेटो, मोसंबी, अंजीर, डाळींब अशी वेगवेगळी पिके घेतली.. त्यातुन चांगला पैसा कमावला.. ते पाहून आजुबाजुचे शेतकरीही त्यांचं अनुकरण करु लागले.
जोतीराव एक बांधकामांचे ठेकेदारी होते येरवडा येथील पुलाच्या बांधकामाचा ठेका त्यांनीच घेतला होता. बांधकाम पुर्ण झाल्यावर त्यांनी सर्व मजुरांना आपल्या मांजरी येथील बागेत मोठ्या थाटात जेवण दिलं होतं.
खडकवासला येथील तलावाच्या बांधकामासाठी दगड पुरवण्याचे कंत्राट जोतीरावांनी घेतले होते. पुण्यातील गंजपेठेतील आपल्या दुकान वजा ऑफिसमध्ये बसून जोतीराव हे सगळे व्यवहार करत.
टिळकांनी काय.. किंवा जोतीरावांनी.. राजकारण, समाजकारण करताना त्यांनी पैसे कमावण्यासाठी जे केलं ते सचोटीने. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांनी मिळवलेला पैसा केवळ लोकांसाठी.. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी वापरला होता.
केवळ स्वतःसाठी.. स्वतःच्या गोतासाठी व्यवसाय.. उद्योगधंदे करणारे.. साम्राज्य उभे करणारे आजचे हे राजकीय पुढारी.. त्यांच्या तुलनेत समाजासाठी आपला पैसा खर्च करणारे पदरमोड करणारे शंभर वर्षापुर्वीचे राजकीय, सामाजिक नेते म्हणुनच महान वाटतात.
☆ “एकमेवाद्वितीय…” – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
लंडनमधे एक चौकात सावरकरांचा अर्धकृति पुतळा आहे. हा तिथे बसवू नये म्हणून Conservative पक्षाने संसदेत वाद घातला होता, पण सरकारने सांगितले…….
…. “इंग्लंडच्या सर्व शत्रुंमध्ये जे सर्वश्रेष्ठ आहेत, सावरकर हे त्यातील एक आहेत. इंग्लंड हे भाग्यवान राष्ट्र आहे, त्याला सावरकर यांच्यासारखा चारित्र्य संपन्न, प्रखर राष्ट्रभक्त आणि कमालीचा बुद्धिमान शत्रु मिळाला.”
सावरकर…. एकमेवाद्वितीय…
१) हिंदुस्तानला संपूर्ण स्वातंत्र्य हवे अशी मागणी करणारे हे पहिलेच पुढारी. सन १९०० मध्ये त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती..
२) १८५७ च्या बंडास “स्वातंत्र्ययुद्ध” म्हणून गौरवणारे पहिलेच इतिहास संशोधक.
३) १८५७ च्या समरानंतर हिंदुस्थानातील जनतेला शमवण्यासाठी व्हिक्टोरिया राणीने काढलेल्या पत्रकाला “एक भिकार चिटोरे” म्हणून झिडकारणारे सावरकर पहिलेच, तेही १९०० साली म्हणजे वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी..
४) देशभक्ती केली म्हणून ज्यांची बी. ए. ची पदवी काढून घेतली असे पहिले विद्यार्थी…
५) परदेशी मालाची होळी करणारे सावरकर हे पहिलेच पुढारी, सन १९०५ मध्येच त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार व स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा संदेश दिला, मात्र कॉंग्रेसच्या गांधींनी १९२१ साली सावरकरांचे हेच तत्व तंतोतंत उचलले आणि लोकप्रिय झाले.
६) परदेशी मालाच्या होळीमुळे देशभक्तीच्या कारणास्तव वसतीगृहातून काढून टाकलेले सावरकर हे पहिलेच विद्यार्थी…..
७) मे, १९०९ मध्ये बॅरिस्टर होऊनही सनद दिली नाही असे सावरकर हे पहिलेच विद्यार्थी…
८) शत्रूच्या राजधानीत जाऊन (लंडन) त्यांच्या विरोधात युद्ध पुकारण्याची हिंमत ठेवणारे सावरकर हे पहिलेच…
९) शत्रूच्या ताब्यातून (मार्सेलिस बंदर) धाडसाने सागरात उडी मारून निसटण्याचा प्रयत्न केलेले सावरकर हे पहिलेच क्रांतीकारी…
१०) प्रसिद्धीपूर्वीच ज्यांचे ग्रंथ जप्त करण्यात आले असे पहिलेच क्रांतीकारक…
११) शत्रूच्या राजधानीत जाऊन लंडनमधील १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा सुवर्णमहोत्सव साजरा करणारे सावरकर हे पहिलेच क्रांतिकारी…
१२) शिखांचा इतिहास लिहिणारे पहिले लेखक हे सावरकरच….
१३) स्वातंत्र्यलढ्याकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याचा पराक्रम करणारे सावरकर हेच पहिले…
१४) भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी सर्व देशातील क्रांतिकारकांची संघटना उभारणारे सावरकर हेच पहिले… त्यासाठी तुर्की, रशियन, आयरिश, इजिप्शियन, फ़्रेंच इ. क्रांतीकारकांशी संपर्क केला होता…
१५) विसाव्या शतकात २ जन्मठेपींची शिक्षा सुनावण्यात आलेले सावरकर हे एकमेव आणि फक्त सावरकरच…
१६) अंदमानच्या कारावासात भिंतींवर काट्याने आणि खिळ्याने महाकाव्य रचणारे महाकवी एकमेव सावरकर…. तसेच सुमारे ६००० पंक्ती कोठडीत लिहिल्या, मुखोद्गत करून बाहेर आल्यावर प्रकाशित करण्याचा महापराक्रम करणारे एकमेव असे सावरकर…
१७) बालपणी वहीनी व बहिणीसोबत ओव्यांच्या भेंड्या खेळताना त्यात नवनवीन ओव्या रचून त्यात स्वातंत्र्याची प्रेरणा गुंफू पहाणारे सावरकर हेच एकमेवाद्वितीय…
१८) तुरुंगात असताना मराठी व्याकरणातील वृत्ते आठवत नाहीत म्हणून नवी वृत्ते रचून मराठी भाषेच्या व्याकरणात भर घालणारे सावरकर हेच एकमेव… व्याकरणात त्या वृत्तांना “वैनायक” म्हणून ओळखले जाते.
१९) अस्पृष्यांना रत्नागिरीत विट्ठल मंदीरात प्रवेश मिळवून देणारे सावरकर हेच पहिले.
२०) एका अस्पृश्याने शंकराचार्यांच्या गळ्यात हार घालण्याची घटना घडविणारे सावरकर हेच पहिले…
२१) अस्पृश्य लोक स्पर्श करू शकतील असे मंदिर स्वखर्चाने बांधवून घेणारे पहिले सावरकरच.. कै. श्री. भागोजी कीर यांनी सावरकरांच्याच प्रेरणेतून रत्नागिरीत “पतितपावन” मंदिर बांधले.
२२) भाषाशुद्धीचे महत्व सांगणारे सावरकरच..
२३) सगळे सुशिक्षित लोक इंग्रजीला वाघिणीचे दूध म्हणून गौरवीत असताना, मातृभाषा व राष्ट्रभाषेचा अभिमान देशात जागवणारे फक्त सावरकरच पहिले…
२४) प्रत्यक्ष साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून, “लेखण्या सोडा, बंदुका हाती घ्या” असा दिव्य दाहक संदेश देणारे पहिले साहित्यिक सावरकरच…
२५) शास्त्रशुद्ध अभ्यास करून देवनागरी लिपी टंकलेखनास (टायपिंगसाठी) सुयोग्य बनवणारे सावरकरच…. लिपीमध्ये सुधारणा करणारा जगातील एकमेव नेता आणि लोकोत्तर पुरूष म्हणजे फक्त सावरकरच……
☆
माहिती संकलक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ताराबाई भवाळकरांची मराठी महामंडळाने दिल्ली येथे भरणाऱ्या आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी केलेली निवड चतुरंग अन्वयसाठी या परिसरातील लेखक, कवींच्यासाठी आणि मुख्य म्हणजे समस्त सांगलीकरांसाठी आनंदाची आणि अभिमानाची घटना वाटणे साहजिकच म्हणता येईल, पण ही बातमी प्रस्तुत झाल्यानंतर बघता बघता समाज माध्यमातून, वृत्तपत्रातून, दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून, दूरध्वनीवरून आणि प्रत्यक्ष भेटून प्रचंड प्रमाणात बाईच्यावर जो अभिनंदनाचा वर्षाव झाला, तो अभूतपूर्व स्वरूपाचा होता. सर्वसाधारणपणे संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या नावांची चर्चा सुरू झाली आणि नंतर प्रत्यक्ष निवड झाली. वादविवाद होतात, उलटसुलट चर्चांना उधाण येते, निवडीमागच्या राजकारणाबद्दल बोलले जाते, खऱ्या खोट्या बातम्या पसरल्या किंवा पसरवल्या जातात, असा आजवरचा अनुभव, पण ताराबाईची निवड असे काहीही न होता झाली आणि तिचे सार्वत्रिक स्वागत झाले. एवढेच नव्हे तर ताराबाईची निवड या अगोदरच व्हायला हवी होती, अशीही प्रतिक्रिया उमटली. ताराबाईच्या ज्ञानसाधनेबद्दल आणि बौद्धिक कर्तृत्वाबद्दल वाटणारा आवर या निमित्ताने प्रकट झाला असे म्हणता येईल.
पुण्यातील शनिवार पेठेच्या सनातनी आणि पारंपारिक, कर्मठ वातावरणात आणि चित्रावशास्त्रीच्या वाड्यात बाईचे बालपण व्यतीत झाले. पुढे त्यांचे कुटुंब नाशिकला गेले आणि तिथे त्यांची वैचारिक जडणघडण होऊ लागली. इथे त्यांना कविवर्य कुसुमाग्रजांचा सहवास लाभला. याच काळात त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशाला या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचा मराठी अनुवाद केला. त्यानंतर नोकरी निमित्ताने सांगलीस आल्या आणि इथे त्यांचे वैचारिक आणि वाड्मयीन कर्तृत्व बहाला आली आणि नामवंत विदूषी म्हणून त्यांचा लौकिक झाला. पंचावन्न वर्षापेक्षा अधिक काळापासून बाईचे सांगलीमध्ये वास्तव्य आहे आणि सर्वत्र संचार करूनही सांगली हीच आपली कर्मभूमी आहे असे त्या अभिमानाने सांगतात.
लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला या बाईच्या विशेष आस्थेचा, अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय राहिला आहे महाराष्ट्रत, महाराष्ट्रबाहेर एकट्याने भ्रमंती करून बाईनी या विषयाचा वेध घेतला, साधनसामग्री गोळा केली, साहित्य गोळा केले, मौखिक संस्कृतीचे स्वरूप समजून घेतले. त्यांच्या आविष्कार पद्धती आणि शैलींचा विचार केला. त्याची चिकित्सा केली आणि या मौल्यवान लोकसंचिताला अभिजनांच्या विचार विश्वात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. बहुजनांचे लोकसाहित्य म्हटले की एकतर भाबड्या श्रद्धेने बघणे (बाई त्याला गहिवर संप्रदाय म्हणतात) किंवा उच्चभ्रू अभिजन त्याकडे अडाण्यांचे साहित्य समजून तुच्छतेने, उपेक्षेने पाहतो. ही दोन्ही टोके बाजूला सारून बाईनी या संस्कृतीकडे चिकित्सेने, डोळसपणे पाहिले, त्यातले हिणकस बाजूला करून सत्व शोधले आणि या विषयाकडे बघण्याची नवी दृष्टी दृष्टी दिली. ४० च्या वर बाईची ग्रंथसंपदा आहे आणि त्यातल्या ‘लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिमा’, ‘यक्षगात आणि मराठी नाट्यपरंपरा’, ‘लोकजागर रंगभूमी’, ‘मिथक आणि नाटक’, ‘लोकसंचित’, मायवाटेचा मागोवा, मातीची रूपे, लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा, महामाया इत्यादी ग्रंथामधून त्यांनी लोकसाहित्य आणि संस्कृतीवर मूलभूत प्रकाश टाकला आहे. या ग्रंथांना लोकसाहित्याच्या अभ्यासात संदर्भ ग्रंथ म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. मराठी विश्वकोशासाठीही त्यांनी या विषयावर लिहिलेल्या नोंदी आणि या विषयांचे केलेले सिद्धांतन महत्वाची मानले जाते.
नाटक आणि स्त्रीवाद हे बाईचे आणखी दोन अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत. ‘मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण प्रारंभ ते १९२०’ या विषयावर त्यांनी पीएच. डी. केली आणि त्यांच्या प्रबंधाला पुणे विद्यापीठाचे सर्वोत्कृष्ट प्रबंधाचे सुवर्णपदक मिळाले अलीकडेच त्यांनी आद्य नाटककार विष्णुदास भावे यांचे चरित्र लिहिले. ‘मराठी नाटक नव्या दिशा, नवी वळणे’ हा त्यांचा नव्या नाटकांवरचा ग्रंथही प्रसिद्ध आहे. पुणे विद्यापीठाच्या ललित कला विभागात त्यांनी वेळोवेळी नाटकावर व्याख्याने दिली आहेत. सांगलीमध्ये तरुण व हौशी रंगकर्मीना घेऊन त्यांनी ए. डी. ए. ही नाट्य संस्था स्थापन केली आणि नवीन नाटके सादर केली. राज्य नाट्य स्पर्धेत सादर केलेल्या नाटकात त्यांनी स्वतः काम केले आणि त्यांना अभिनयाचे रौप्यपदकही मिळाले. मुळातच प्रखर आत्मभान असणाऱ्या बाईनी नव्याने आलेल्या ‘स्त्रीवादाचा’ पुरस्कार केला आणि स्त्रीमुक्ती चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला. याच दृष्टीतून त्यांनी संत स्त्रियांच्या क्रांतिकारकत्वाची नव्याने ओळख करून दिली आणि लोकसाहित्याची स्त्रीवादी दृष्टीतून नवी मांडणी केली. अलीकडेच प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘सीतायन’ या पुस्तकातून त्यांचा हा दृष्टिकोन प्रखरपणे अधोरेखित झाला आहे.
औडक चौडक हा ताराबाईचा शब्द. त्याचा अर्थ ऐसपैस, आडवं तिडवं, वेडंवाकडं, आखीव रेखीव नसलेलं, स्वच्छंदी, मोजून मापून नसलेलं आपलं आजवरच जगणं आणि वाटचाल अशी आहे, असं त्यांना सुचवायचे असते, त्यामुळेच आपलं आयुष्य समृद्ध झालं असं त्या सांगतात. वयाची ८० पार करूनही त्या सदासतेज असतात या मागचं हे रहस्य आहे. बाई एकट्या राहतात, पण एकाकी नसतात. विचारांच्या संगतीत असतात, पुस्तकांच्या संगतीत असतात, लिहिण्याच्या संगतीत असतात, जोडलेल्या असंख्य लहान थोर, तरुण वृद्ध मित्र-मैत्रिणींच्या संगतीत असतात. जे घडले तेची पसंत अशा समाधानतेनं राहतात. अनेकांच्यासाठी आधारवड असतात.
प्रा. अविनाश सप्रे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈