सुश्री आरूशी दाते
(प्रस्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की दसवीं कड़ी व्यक्ती पूजा… । सुश्री आरूशी दाते जी ने व्यक्ति पूजा की अत्यन्त सुंदर रूप से विवेचना की है। किसी व्यक्ति विशेष के विचारों से सहमत होना या उसका सम्मान व्यक्ति पूजा की श्रेणी में नहीं आता है, यह अत्यन्त स्पष्ट है। किन्तु, कई बार इस भावना को न समझने से दोनों पक्ष असहज स्थिति में आ जाते हैं। हमारा आत्मसम्मान हमें समय समय पर सचेत भी करता रहता है। आवश्यक है हम अपने हृदय की सुनें। सुश्री आरूशी जी के आलेख मानवीय रिश्तों को भावनात्मक रूप से जोड़ते हैं। इस शृंखला की क ड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। )
साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #10
☆ व्यक्ती पूजा… ☆
ती कधी फारशी जमली नाही… (खरंच का?)
का?
कदाचित आपले विचार कोणावर लादायचे नाहीत, ही शिकवण जोपासलेली आहे.. आणि विचार कोणावर लादता येतील ह्यावर विश्वास नाही… एखादी गोष्ट दुसऱ्याला पटवून देऊ शकतो कदाचित, आणि पटवून दिले तर त्याचाच ध्यास असावा हे ही अयोग्य आहे, नाही का?
काही लोकांना हे जमतं बाई… कसं ना म्हणजे… जाऊ दे, आपण विचार कशाला करायचा, ह्या भावनेतून गप्प बसते…
पण खरंच मी कधी व्यक्ती पूजा केली नाही का? हा प्रश्न मनात येतो आणि मन वेगवेगळ्या दिशांवर आरूढ होते… जे काही चांगलं आहे, किंवा जे चांगलं नाही, ते ठरवताना आपण नक्की काय करतो… त्यात कधी स्वतः विचार असतो तर कधी दुसऱ्यांनी दिलेले सल्ले असतात… सल्ले अनेकांकडून मिळत असले तरी ठराविक लोकांचेच सल्ले आपण आचरणात आणतो… मग ही व्यक्तीपूजा झाली का?
नाही नाही, असं स्वतःला सांगत पुन्हा त्या विचार चक्रात अडकून जाते… नक्की कोण – व्यक्ती की विचार ? हे द्वंद्व दूर होत नाही… कधी कधी असं वाटतं की ती व्यक्ती आवडते, जवळची वाटते किंवा विश्वासक वाटते म्हणून आपण तिचे विचार, सल्ले मान्य करतो, म्हणजे व्यक्ती पुज़ाच झाली की !
स्वतःचं समाधान व्हावं म्हणून मग मी स्वतःलाच समजावते, ही व्यक्ती पूजा नाही गं, फक्त त्या व्यक्तीचे विचार घेतेस तू !
तुम्हालाही असंच वाटतं का?
पुन्हा एक गोंधळ सुरू होतो… व्यक्ती, माणूस म्हणजे तरी नक्की काय?
विचारांचे मूर्त रूप… हो ना! मग विचारांची स्वीकृतता म्हणजे त्या व्यक्तीचाही स्वीकार !
असो, खूप गुंतागुंतीचा विषय आहे… पण आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती (जरी आपण तिचे पूजक नसलो तरी) आपल्याला काही तरी देऊन जाते ह्याची जाणीव जिवंत राहिली पाहिजे… !
© आरुशी दाते, पुणे