मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मिले सूर मेरा तुम्हारा…sss… अजरामर गाण्याची अद्भुत कहाणी” – लेखक :  डॉ. धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

? इंद्रधनुष्य 

भारतरत्न पं. भीमसेन जोशी

☆ “मिले सूर मेरा तुम्हारा…sss… अजरामर गाण्याची अद्भुत कहाणी” – लेखक :  डॉ. धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर ☆

मिले सूर मेरा तुम्हारा ssssss हे गाणे माहित नाही असा एकही भारतीय नसेल. इतकं हे गाणं सगळ्यांच्या हृदयात वसलेलं आहे. हे गाणे जितके श्रवणीय तितकीच त्याच्या निर्मितीची कहाणी देखील अद्भुत आहे.

झालं असं की, पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या मनात एक विचार आला की, तरुणांना विशेषतः लहान मुलांना प्रेरित करणारे आणि एकतेचा संदेश देणारे एखादं गाणे तयार करून ते दूरदर्शनवरून सर्वत्र पोचवावे. ज्यातून “मेरा भारत महान” हि संकल्पना तर सर्वत्र जाईलच शिवाय प्रत्येकाला यात आपला प्रांत सामावून घेईल. त्यांच्या इच्छेनुसार मग एक प्रस्ताव तयार करण्यात आला. आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्याकडे हे गाणे कंपोज करण्यासाठी आले.

*

संपूर्ण फिल्म इंडस्ट्री एकत्र :

या एकूणच गाण्याची व ते कसे कसे आणि कुठे कुठं शूट करायचे, यात कुणाकुणाला घ्यायचे इत्यादींची संकल्पना सुरेश मलिक आणि प्रसिद्ध ऍड फिल्ममेकर कैलाश सुरेंद्रनाथ यांची आहे. विशेषतः यातील सिनेकलाकार यांच्या तारखा मिळवताना त्रास होईल असा या जोडगोळीचा अंदाज होता मात्र एकूण एक कलाकारांनी अगदी हव्या त्या तारखा यांना दिल्या त्यामुळे जवळपास पूर्ण फिल्म इंडस्ट्री यात दिसते.

*

विश्वविक्रमी गाणे :

15 ऑगस्ट 1988 रोजी दूरदर्शनवरून हे गाणे प्रथमच रिलीज करण्यात आले. याचे संगीतकार पं. भीमसेन जोशी, भैरवी रागातील या गाण्याचे गीतकार होते प्रसिद्ध कवी पियुष पांडे. भारतातील प्रमुख अशा चौदा भाषेत प्रथमच असं हे गाणं तयार झालं असून तोही एक विश्वविक्रम आहे. हिंदी, काश्मीरी, पंजाबी, सिंधी, उर्दू, तामिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम, बांगला, आसामी, उडिया, गुजराती आणि मराठी भाषेत दोन दोन ओळी रचल्या गेल्यात.

*

लतादीदीची एन्ट्री :

खरेतर सुरुवातीला यातील गायिकेच्या आवाजातील सर्व ओळी भारतरत्न लता मंगेशकर गाणार असं ठरलं होत. मात्र जेव्हा गाणे रेकॉर्डिंग करण्यासाठी स्टुडिओ बुक करण्यात आला, तेव्हा नेमक्या लतादीदी परदेशात होत्या. त्यामुळे मग कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात ते गाणे सुरुवातीला रेकॉर्ड करण्यात आले. मात्र गाणे रिलीज होण्याच्या दोन दिवस आधी लता दीदी भारतात परतल्या. त्यांना हे गाणे रेकॉर्ड झाल्याचे कळले. त्यांनी स्टुडिओत जाऊन ते गाणे ऐकले आणि म्हणाल्या, “पंडितजी…. मला हि संधी सोडायची नाहीय. काहीतरी जुळवून आणा. मी आजच रेकॉर्डिंगसाठी वेळ देते”

आता पंचाईत झाली. कारण त्यामुळे कविताजीचे नाव आणि गायन वगळून तिथं दीदीचे बसवायचे…. कविताजी नाराज झाल्या खऱ्या पण मन मोठं करून त्यांनी यासाठी आनंदाने होकार दिला याबद्दल दीदी इतक्या ज्येष्ठ असूनही त्यांनी कविताजी यांचे आभार मानले. आणि मग लता दीदी तिरंगी ध्वज रंगाचा पदर असलेली पांढरी साडी परिधान करून स्टुडिओत आल्या आणि त्यांच्या स्वरात हे गाणे रेकॉर्ड झाले. मात्र परस्पर सामंजस्याने नंतर असं ठरलं की कविताजी यांनीही मेहनत घेतलेली आहे तर किमान एक दोन ओळी त्यांच्या पण असूद्यात ! त्याप्रमाणे मग गाण्यात शबाना आझमीच्या तोंडी असलेल्या ओळी या कविता यांच्या आहेत तशाच ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते.

*

प्रसिद्ध धबधबा :

या गाण्यात सुरुवातीला पं. भीमसेनजी ज्या धबधब्याजवळ उभे राहून गाणे गाताना दिसतात तो कोडईकनाल पम्बर फॉल्स आहे ! हाच तो धबधबा आहे जिथं लिरिल साबणाची त्या काळात सुपर हिट झालेली जाहिरात शूट करण्यात आली होती. त्यामुळे त्याला नंतर “लिरिल फॉल्स” असेच नाव पडले !

*

ताजमहाल शूटिंग किस्सा :

या गाण्यातील एका कडव्यात ताजमहाल दिसतोय जो एरियल व्ह्यू स्टाईलने शूट करण्यात आला आहे. खरेतर वर्ल्ड हेरिटेज जाहीर झालेल्या वास्तूच्या भोवती असं एरियल शूट करण्याची परवानगी नसते. मात्र कैलाशजी याना तसेच शूट हवे होते मग प्रॉडक्शन टीमसह भीमेसनजी यांनी थेट एयर मार्शल यांची भेट घेऊन इच्छा सांगितली. शिवाय हा प्रोजेक्ट खुद्द पंतप्रधान यांच्या मनातला आहे हेही सांगितलं आणि त्यानंतर परमिशन मिळाली. इतकंच नव्हे तर भारतीय सेनेच्या हेलिकॉप्टरमधून ते एरियल व्ह्यू शूट घेण्यात आलं.

*

गाण्यातील एका कडव्यात पाण्यात हत्ती खेळताना दिसतात, ते शूटिंग केरळ येथील पेरियार नॅशनल पार्कमधील असून हत्तीही तिथलेच आहेत. यासाठीही वन विभागाने तातडीने हालचाल करून सर्व त्या परवानग्या दिल्या. नाहीतर अशा रिजर्व पार्क मध्ये शूटिंगला परवानगी नसते.

*

दोन महत्वाच्या रेल्वे :

या गाण्यात दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या रेल्वे दिसतात. त्या दोन्ही पूर्ण देशभरात प्रसिद्ध अशा रेल्वे आहेत. पहिली आहे ती कलकत्याची मेट्रो रेल्वे आणि दुसरी आहे आपल्या महाराष्ट्राची शान असलेली डेक्कन क्वीन ! तनुजा जेव्हा मराठी ओळी गाताना दिसतात त्यावेळी हि रेल्वे येते !

आहे न अभिमानाची गोष्ट !

*

कोरस मंडळींचा मोठेपणा :

या गाण्यात सर्वात शेवटी भारताच्या नकाशाच्या आकारात अनेक माणसे उभी असलेली दिसतात न ते सगळं शूटिंग मुंबईच्या फिल्मसिटीत करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा कोरस शॉटसाठी माणसे पुरवणारी एजंसी असते त्यांनी नेहमीप्रमाणे पैसे ठरवून माणसे बोलावली. शूटिंग झालं आणि शूट झाल्यावर लोकांना कळलं की ते किती मोठ्या प्रोजेक्ट मध्ये सहभागी आहेत आणि देशासाठीचे हे गीत आहे म्हटल्यावर त्यातल्या एकानेही एक रुपयाही मानधन घेतलं नाही. तसेच यातील एका ओळीत शाळेतील लहान मुले तिरंगी गणवेशात एकत्र धावत येतात त्याचे शूटिंग उटी येथील बोर्डिंग स्कुल मध्ये झाले आहे.

*

स्वतःचे कपडे वापरणारे कलाकार :

गाण्यात एका सीनमध्ये अमिताभ, जितेंद्र आणि मिथुन चक्रवर्ती आहेत. या तिघांचे शूटिंग भल्या सकाळी एका बंगल्याच्या खाजगी बागेत करण्यात आले. आणि अवघ्या दहा मिनिटात तो सिन वन टेक शूट झाला. विशेष म्हणजे यात त्यांच्या अंगावर जे कपडे आहेत ते त्यांचे त्यांचे स्वतःचे आहेत. अन्यथा इतरवेळी शुटिंगवाल्याकडून कपडे पुरवले जातात. ज्याला बऱ्यापैकी खर्च येतो मात्र या तिघांनी त्याला नम्र नकार देऊन स्वतःचे कपडे आणले होते.

*

कमल हसन यांची ऐनवेळी एंट्री

दाक्षिणात्य प्रसिद्ध गायक एम. बालमुरलीकृष्ण यांचे या गाण्यातील दोन ओळीचे रेकॉर्डिंग होते. त्यावेळी स्टुडिओत अचानक कमल हसन आले. ते कसे काय आले इथं ? असं विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, “माझे गुरु आहेत बालमुरलीकृष्ण…. त्यामुळे त्यांचे गाणे रेकॉर्ड होताना पाहावे म्हणून आलोय”

यावर कैलाशजी म्हणाले की, ” संध्याकाळी या ओळीचे शूटिंग आहे समुद्र किनारी तर वेळ असेल तर या की तिथेही “

आणि कमल हसन तिथं नंतर पोचले आणि चक्क त्यांनाच शूटिंग मध्ये सहभागी करून घेण्यात आले आणि अशारितीने ऐनवेळी त्यांची एंट्री यात झाली.

*

जगाच्या पाठीवर प्रथमच असे काहीतरी :

एकतेचा संदेश देणाऱ्या या गाण्यात जवळपास सर्वच क्षेत्रातील दिग्गज मंडळी दिसतात. जगाच्या पाठीवर प्रथमच एका गाण्यासाठी हे घडलं आहे. फिल्म लाईन, क्रीडा, गायक, वादक, चित्रकार, कार्टूनिस्ट, फिल्म निर्माता, आर्किटेक्ट, टेलिव्हिजन होस्ट असं सगळं सुंदर मिश्रण यात जुळून आले आहे. एखादं गाणं इतकं अजरामर का होतं…. त्या मागे किती काय काय घडत असत अन किती जणांचे कष्ट असतात हे आपल्यापैकी अनेकांना माहित नसतं. ते माहित असावं म्हणून हा पोस्ट प्रपंच !

थोडक्यात सांगायचं तर… 

… असं गाणं पुन्हा होणे नाही !!!

*

लेखक :  डॉ. धनंजय देशपांडे 

प्रस्तुती : सुलभा तेरणीकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “ज्योत ज्योतीने जागवा…” – लेखिका: श्रीमती संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “ज्योत ज्योतीने जागवा…” – लेखिका: श्रीमती संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

काही घटना, काही शब्द, काही ओळी काळजावर छिन्नीने अशा कोरल्या जातात की सदैव दिसत राहतात. काळाची धूळ बसली तरी तो झिरझिरीत पडदा त्यांचे अस्तित्व पुसू शकत नाही. कधीतरी आनुषंगिक संदर्भ ती धूळ पुसतात आणि मग ते कोरीव काम लख्ख दिसू लागते.

गेली अनेक वर्षे अशी अनेक कोरीव लेणी मनात टिकून राहिली आहेत.

काल आपटे हायस्कूलच्या एका माजी विद्यार्थ्याने एक जुना फोटो पाठवला. त्याच्या खाली त्याने लिहिले होते, ” बाई, सततआठवते का?”

ही आव्हाने जितकी नाजूक असतात, तितकीच मुश्किलही असतात. पण एखाद्या लहान मुलीने स्वतःच डोक्यावर चादर घ्यावी आणि काही क्षणात स्वतःच ती दूर करून बोळके पसरून हसावे तशी त्यांच्यावरची अनेक आवरणं झुगारून ती कधीकधी स्वतःच उघड होतात.

तसेच झाले आणि त्या फोटोतला काळ दूर गेलाच नसल्यासारखा समोर येऊन उलगडला.

परमवीरचक्र विजेत्या पैगंबरवासी अब्दुल हमीदच्या वीरपत्नीला शिवणकाम करून पोट भरावे लागते, अशा बातमीने व्यथित होऊन ती मी माझ्या ९ वी ब च्या वर्गात वाचून दाखवली. त्या व्यथेतून एक मोठा उपक्रम आकाराला आला-‘ पै. अब्दुल हमीद कृतज्ञता निधी. ‘७८ मुलांच्या वर्गानं स्वकमाईने ‘कृतज्ञता निधी’ उभारला. त्यात नंतर ९वी क देखील सामील झाला व समाजातल्या काही संवेदनशील व्यक्तींनीही थोडी भर घातली.

पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात, एका भव्य कार्यक्रमात, ल. आपटे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पु. ग. वैद्य, श्री. शशिकांत सुतार, विक्रम बोके, पुण्यात स्थायिक झालेल्या परमवीरचक्र विजेत्या श्री. रामराव राणे यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती राजेश्वरी राणे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत दै. सकाळचे तत्कालीन व्यवस्थापक श्री. के मो. भिडे यांच्याकडे तो निधी जाहीरपणे सुपूर्त केला गेला.

याची दोन कारणे होती. एक म्हणजे तो उपक्रम दै. सकाळमधील बातमीमुळेच आकाराला आला होता आणि दुसरे म्हणजे हा निधी सार्वजनिक कामातून उभा राहिला होता म्हणून तो सार्वजनिक रूपातच जाहीरपणे हस्तांतरित होणे गरजेचे होते.

राखीपौर्णिमेचा दिवस यासाठी निवडला होता कारण ती भावनाही या कार्यक्रमाच्या मागे होती. मुलांच्या तुडुंब उत्साही गर्दीत कार्यक्रम शानदारपणे पार पडला. पाटेकरांनीही या निधीत मोलाची भर घातली. व्यासपीठावरच्या संपूर्ण कार्यक्रमातल्या सर्व भूमिका मुलांनी जबाबदारीने अचूक पार पाडल्या. कार्यक्रम संपल्यावर व्यासपीठावरच्या सन्माननीय व्यक्तींना भेटण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. त्यांच्यासाठी चहा-बिस्किटे सतत मागवली जात होती. टिळक स्मारकच्या खालच्या कँटिनमधून भरलेले ट्रे वर येत होते. माझ्याही भोवती गर्दी असल्याने मला याचा कोणताही हिशेब ठेवता येत नव्हता….

हळूहळू हॉल रिकामा होऊ लागला आणि कँटिनचे मालक श्री. भागवत माझ्याजवळ आले. त्यांच्या हातात झालेल्या चहापाण्याचे बिल होते. माझ्या पोटात गोळा आला. स्टेजवर जाणारे ते भरलेले ट्रे दिसू लागले. किती रक्कम मांडली असेल कोणास ठाऊक अशा विचारातच मी ते बिल हातात घेतले.

बिलातल्या रकमेच्या खालच्या जागेत लिहिले होते- ‘ही रक्कम आमच्यातर्फे आपल्या ‘कृतज्ञता निधी’त जमा करावी. ‘ उपक्रमाचे कौतुक करून, नमस्कार करून ते शांतपणे निघून गेले. शाळेत शिकवत असलेल्या कवितेच्या कोरीव ओळी माझ्या डोळ्यासमोर नाचू लागल्या-

‘ज्योत ज्योतीने जागवा

करा प्रकाश सोहळा

इवल्याश्या पणतीने

होई काळोख पांगळा. ‘

 * * *

आपटे प्रशालेच्या नववी ब व ९ वी क च्या मुलांनी हा ‘कृतज्ञता निधी’ जिच्या पाठीशी उभे राहण्यासाठी उभारला होता त्या वीरपत्नीला – श्रीमती रसूलन बेगम यांना उत्तर प्रदेशातील गाझियाबादपासून ८० किलो मीटर दूर असलेल्या धामुपूर येथे प्रत्यक्ष जाऊन तो देण्याची खूप इच्छा होती पण ते शक्य नव्हते.

दै. सकाळने मुलांचे कष्ट, त्यांच्या भावना व त्यांच्यातील सामाजिक कर्तव्यांचे भान यांचे मोल जाणून त्यांचे लखनौ येथील प्रतिनिधी श्री. शरद प्रधान यांच्याकडे हे काम सोपवले. मुलांनी वीरपत्नीसाठी हिंदी व उर्दूमध्ये लिहिलेले प्रातिनिधिक, हृदयस्पर्शी पत्रही त्यांच्याकडे दिले होते.

गाझियाबादपासून धामुपूर येथे जाण्यासाठी वेळेवर काही वाहन न मिळाल्याने श्री. प्रधान यांनी एका ट्रकचालकाला विनंती केली. त्यासाठी शंभर रुपये आकार मान्य करून प्रधान ट्रकमध्ये चालकाशेजारी बसले. वाटेत गप्पा सुरू झाल्या. इतक्या आडगावात हा सुशिक्षित माणूस कशासाठी चालला आहे, अशी उत्सुकता त्याला वाटणे स्वाभाविक होते. दूरवरच्या महाराष्ट्रातल्या एका पुणे नावाच्या गावातल्या शाळकरी मुलांनी स्वतः कष्ट करून हा निधी उभा केला आहे, हे कळताच त्याचे डोळे विस्फारले. “साब, इतने साल यहाँ से आते-जाते हॆं, कभी उनसे मिलने की भी बात हमारे दिमाग में नहीं आई और इतनी बड़ी बात इतनी दूर के छोटे बच्चों ने सोची?”

बोलता बोलता धामुपूर गाव दिसू लागलं. प्रधानांनी आपल्या पाकिटातून शंभराची नोट काढून चालकापुढे धरली. त्यांचे हात हातात धरीत चालक डोळ्यात पाणी आणून म्हणाला, ” नहीं, नहीं साहब! ये पॆसे लूँगा तो अपने आपको आइने में नहीं देख पाऊँगा! शरमिंदा मत कीजिए। चलो, इस बहाने हमसे भी देश की थोड़ी-सी सेवा हो गई।”

प्रधान खाली उतरले आणि ती नोट त्यांनी मुलांनी दिलेल्या मखमली बटव्यात सरकवून दिली. नंतर फोन करून त्यांनी ही गोष्ट मला कळवली व फोटो पाठवले.

एक शाळकरी ज्योत किती ज्योती लावत गेली…. गोष्ट जुनी पण आज आठवली.. !

(‘आत्मचित्र’ मधून) 

लेखिका: श्रीमती संजीवनी बोकील

संग्राहक  : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘जग’ ‘जग’… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ ‘जग’ ‘जग’ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

शीर्षक वाचल्यावर वाचकांना एक प्रश्न नक्कीच पडला असेल की कोणाला ‘जग’ ‘जग’ म्हणून सांगितले जातेय. अहो, आपल्यालाच. आता दुसरा प्रश्न पडला असेल की आम्ही जगतोय आहोत मग आणखी कसे जगायचे ? हा प्रश्न मात्र अधिक खरा आणि आपल्या विषयाशी निगडित आहे असे मला वाटते. या जगात अनेक जीवजंतू, पशुपक्षी, प्राणी, वनस्पती आणि स्वाभाविक मनुष्य जगत असतात. यातील मनुष्य वगळता इतर सर्व योनीतील जीव प्रारब्धक्रमाने लाभलेला जीवनक्रम नैसर्गिकरित्या जगत असतात. मनुष्य मात्र या सर्वांस अपवाद आहे. त्यालाही प्रारब्धक्रमाने लाभलेला जीवनक्रम असतोच परंतु मनुष्याला बुद्धीचे/ विचार करण्याचे विशेष वरदान लाभल्यामुळे मनुष्य कधी सुखी तर कधी दुःखी होताना आपण पाहतो.

हे जग (सृष्टि) भगवंताने निर्माण केली आहे असे आपण मानतो. जर ती भगवंताने निर्माण केली असेल तर ती नक्कीच आनंददायी असली पाहिजे. पण दैनंदिन जीवनात मनुष्य आनंदी असल्याचे आपल्या दृष्टीस पडतेच असे नाही. असे का होत असावे ? आपल्याला कोणी विचारले की तुम्हाला सुखात जगायला आवडेल की दुःखात ? तर माझ्यामते येथील प्रत्येक जण सुखात जगायला आवडेल असेच सांगेल. मग तरीही बरीचशी माणसे दुःखात असल्याचे आपल्या निदर्शनास येते, असे का व्हावे ? जग भगवंताने निर्माण केलेले असूनही बरीचशी माणसे दुःखात आहेत याचा अर्थ कोणीतरी नक्की चुकत असलेच पाहिजे. एकतर भगवंत किंवा मनुष्य. भगवंत चुकणे शक्यच नाही म्हणजे जर चुकी असेलच तर ती फक्त मनुष्याची असली पाहिजे.

शिर्षकातील पहिला ‘जग’ हा सृष्टी (जगाचा) दर्शक आहे. म्हणून आपण त्या ‘जगा’बद्दल चिंतन करू. दैनंदिन जीवनात ‘जग काय म्हणेल’?, जगाची चिंता करू नये ? अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न एकतर आपल्याला पडतात किंवा कोणीतरी असे प्रश्न विचारेल याची आपल्याला सतत भीती वाटत असते. आणि विशेष म्हणजे आपल्या कसोटीच्या क्षणी, आपल्या पडत्या काळात या ‘जगा’तील फार थोडी मंडळी आपल्याला मदत करायला पुढे येतात आणि तरीही मनुष्याला ‘जग काय म्हणेल याची चिंता असते हे नवल नव्हे काय ?

‘जिवो जीवस्य जीवनम्’ असा निसर्गाचा नियम आहे आणि तो स्वाभाविकपणे प्रत्येक मनुष्यास लागू पडतो. याचा सरळ अर्थ असा आहे की या जगातील प्रत्येक प्राणी कोणत्या न कोणत्या स्वरूपात एकमेकांवर अवलंबून आहे. बाकीच्या प्राण्यांचे सोडून दिले आणि आपण फक्त मनुष्याचा विचार केला तरी मनुष्य ‘सामाजिक’ प्राणी असल्यामुळे तो एकटा राहू शकत नाही. त्यामुळे जगण्यासाठी त्याला अनेकांची मदत घ्यावी लागते. आदिम काळापासून तो समूहानेच राहत आलेला आहे.

आधी सांगितल्याप्रमाणे मनुष्याला ‘विचार’ करण्याची विशेष देणगी प्राप्त आहे. त्यामुळे मनुष्याने आपली सर्वच क्षेत्रात प्रगती करून घेतली आहे आणि स्वतःची सर्वांगीण उन्नत्ती करून घेतली आहे. समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रात मनुष्याने उत्तुंग आदर्श निर्माण करून ठेवले आहेत. इतके सारे असूनही मनुष्य खऱ्या अर्थाने ने आनंदी झाला, ‘जगायला’ शिकला असे मात्र आपण छातीठोकपणे म्हणू शकत नाही. आता ‘जगणे’ आणि ‘जगणे’ यात काय फरक असा प्रश्न आपल्याला पडू शकतो.

एकदा शांत बसून मनाला प्रश्न विचारला की आपण आज खरंच जगलो की नाईलाजाने दिवस ढकलला ? उत्तर आपल्यापाशीच आहे. सर्वसामान्य मनुष्य रोजच्या धकाधकीमुळे गांजून गेला आहे असे आपल्याला जाणवेल. श्रीराम

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “प्रेम कसंही करता येतं…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “प्रेम कसंही करता येतं…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

” नीता तुझ्याशी जरा महत्वाचे बोलायचे आहे. माझ्याकडे येशील का?” पाटणकर आजींचा फोन.

” येईन की… हल्ली तुमचे पाय दुखतात म्हणून तुम्ही फिरायला येत नाही. त्यामुळे बरेच दिवसात आपली भेटही झालेली नाही. येते मग उद्या. तुमच्याकडे “

तेवढ्यात त्या घाईघाईने म्हणाल्या,

” पण एक कर.. सकाळी साडेसातला हे फिरायला जातात ना तेव्हाच ये.. यांच्यासमोर बोलता येणार नाही. “

” का बरं ?

“ अग अस फोनवर सांगता येणार नाही… घरी ये मग उद्या सांगते “

“बरं बरं “

असं म्हणून मी फोन ठेवला. काय झालं कळेना… आजोबांसमोर न सांगण्यासारख एवढं काय असेल?

दुसरे दिवशी गेले. आजी वाटच पहात होत्या. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. म्हणजे मामला जरा गंभीरच होता तर….. त्या सांगायला लागल्या…

” अगं काय आणि कसं सांगू काही कळत नाही बघ…. यांच्या माघारी असं यांच्या तक्रारी करणं प्रशस्त वाटत नाही. पण सांगते…. हल्ली यांना निरनिराळे घरचे पदार्थ खावेसे वाटत आहेत”

” अहो मग त्यात काय झालं ?”

“तसं नाही ग.. कसं सांगू ?

“म्हणजे खूप खातात का ?”

“नाही ग.. मोजकचं खातात. पण रोज नवीन फर्माईश असते. सकाळचे सकाळी… रात्री परत वेगळं करायला सांगतात. घारगे कर, डाळ फळं कर, परवा तर मोठा नारळ आणला आणि म्हणाले आज ओल्या नारळाच्या करंज्या कर. मग दोन दिवसांनी उकडीचे मोदक करायला लावले…. “

” हो का?” मलाही जरा आश्चर्यच वाटलं.

“अग विशेष म्हणजे हल्ली घरी मदत पण करत नाहीत. कधी कधी तर चादरीची घडी पण करत नाहीत.

हे ऐकून मात्र मी चाटच पडले. कारण आजोबा घरात सतत काहीतरी काम करत असायचे.

“नीता तुला एक आतलं सांगु का? मला असा संशय येतो की हे काही डॉक्टरांना दाखवण्यासारखे वाटत नाही. हे काहीतरी वेगळेच….. मनाचे दुखणे यांना झाले आहे असे मला वाटते. तुझा आनंद सायकॉलॉजिस्ट आहे तर त्याला विचारशील का?”

” हो हो चालेल चालेल… त्यालाच विचारू तुम्ही म्हणताय तसच मला पण वाटतय… बोलते मी आनंदशी “

“आणि खरंच एक मात्र सांगते बाई… कोणाला काही सांगू नकोस. “

“नाही नाही… आजी नाही कुठे बोलणार नाही. “

“अग.. तू काही कोणाला सांगणार नाहीस हे मला माहित आहे. म्हणून तर तुझ्याशी मनमोकळे बोलले ग.. यांना काय झालं असेल याची मनाला फार चिंता लागुन राहिली आहे बघ.. ” 

” घाबरू नका असेल काहीतरी उपाय”

आजींना कराव्या लागणाऱ्या कामापेक्षा आजोबांची काळजी वाटत होती. त्यांचे डोळे भरून आले होते…. अगदी रडवेला झाला होता त्यांचा स्वर…..

आजींचा निरोप घेऊन घरी आले.

नंतर विचार केला आणि ठरवलं की आधी आजोबांशी बोलावे. दुसरे दिवशी सकाळीच बागेत फिरायला गेले पण ते आलेच नव्हते.

तिसऱ्या दिवशी पण आले नाहीत. मग त्यांच्या ग्रुप मधल्या लोकांना विचारलं तर ते म्हणाले…

” आजोबा आज लवकर घरी गेले. साने डेअरीत चिकाच दूध आणायला जायचं आहे असं म्हणत होते. “

– – म्हणजे आज आजोबांना खरवस खावासा वाटत होता… म्हणजे आजी सांगत होत्या ते खरंच होतं तर…

आजींचा सकाळी फोन आला.

” अगं नीता आनंदशी बोलणं झालं का?”

“नाही हो तो जरा गडबडीतच आहे. जरा शांतपणे बोलायला हव…. म्हणून… आज उद्या बोलते”

” बरं बरं असू दे असू दे… अग यांनी काल गुळाचा खरवस करायला सांगितला. दोन मोठ्या कैऱ्या आणल्या आहेत. गोड आणि तिखट लोणचं करायला सांगितलेलं आहे. तुला बोलले ना तसं अजून चालूच आहे बघ… “

” हो का ? बोलते आनंदशी. बघू तो काय म्हणतो.. “

“हो चालेल.. जसं जमेल तसा कर फोन “त्या म्हणाल्या.

सहज विचारलं..

“आजोबा कुठे आहेत?”

” आता हे रोजच्यासारखे फिरायला गेले आहेत. ” त्या म्हणाल्या.

मग मी पटकन आजोबांना भेटायला बागेत गेले. ते होतेच तिथे.

म्हणाले ” काय म्हणतेस नीता ? कशी आहेस ?”

“आजोबा आज तुमच्याशीच बोलायला आले आहे. या बसू इथे बाकावर. “

आणि मग सरळ सरळ त्यांना आजींनी जे सांगितलं ते सांगायला लागले. तसं ठरवूनच गेले होते.

ऐकताना आजोबा गंभीर झाले. शांत आवाजात म्हणाले…

” सांगतो तुला… तिने सांगितलेलं सगळं खरं आहे. “

” खरं…. अस वागताय तुम्ही आजींशी ? आणि हे नवीन पदार्थ रोज करायला सांगताय त्याचे काय?”

मी विचारलं.

” हो…. मला वाटलच होत ती तुझ्याशी बोलेल… अग ऐक… झालंय काय तिचे हातपाय हल्ली दुखतात. तिचं फिरणं बंद झालं आहे. त्यामुळे संपर्क कमी. नुसती घरी बसून कंटाळायला लागली आहे. फोन तरी किती करणार ? कुणाला करणार? मग मी ही युक्ती केली. अॅण्ड् इट्स वर्क्स… “

“म्हणजे काय?” 

“आता रोज असं नवीन काही काही बनवायला सांगितलं की तिची भरपूर हालचाल होते. भूक लागते. डॉक्टर म्हणाले व्यायाम करू दे. पण ह्या वयात कसं जमणार तिला? आजपर्यंत तिने कधी काही व्यायाम केलाच नाही…. “

” हो तुम्ही म्हणताय ते पटलं मला. अचानक व्यायाम करणे कठीणच असते. “

” म्हणूनच…. नाहीतर मी तिच्याशी असं वागेन का कधी ? पण हे काही तिला सांगु नकोस “

असं म्हणेपर्यंत त्यांचे डोळे भरूनच आले होते.

खोलवर मुरलेले स्वाभाविक, निर्मळ, प्रगल्भ, बायकोचे अंतरंग जाणणारे निर्व्याज्य प्रेम त्यांच्या डोळ्यात मला दिसत होते. दोघेही या वयात एकमेकांची मनं सांभाळत होते. एकमेकांना समजून घेत होते.

आजोबांचा निरोप घेऊन निघाले.

 शांतपणे विचार केला. खरंतर अशावेळी मला फार विचार करावा लागत नाही. पण ही नाजूक अशी गोष्ट होती.

दूसरे दिवशी सकाळीच आजींकडे गेले. मला बघताच त्या म्हणाल्या..

“अग ये ये “

म्हटलं,

“आनंदशी बोलले “

त्यांनी अगदी उत्सुकतेने विचारले..

“मग तो काय म्हणाला ग ?काय सांगितलं आनंदनी?” 

” आधी शांतपणे बसा इथं. सगळं सांगते.. “

मग त्यांना सांगितलं…

” तो म्हणाला हे विशेष काळजी करण्यासारखं काही नाही. माणसांना या वयात जुनं फार आठवतं. अगदी पदार्थ सुद्धा आणि ते खावेसे वाटतात म्हणजे उलट आजोबा ठणठणीत आहेत. “

” खरंच असं म्हणाला आनंद ?”

 ” हो… खूप वर्ष काम केले शरीर दमलं की आता थोडा आराम करावा असं वाटतं शरीराला… करू दे त्यांना आराम. “

” हो ग.. खरचं.. घरची परिस्थिती यथातथाच होती. वडिलांची साधी नोकरी त्यात दोन बहिणी… त्यांची लग्नं… फार लहानपणापासूनच नोकरीला लागले हे. शिवाय संध्याकाळी एका ऑफिसात हिशोब लिहायला जायचे “

” आनंदनी असं सुचवलं आहे की तुम्ही कामासाठी कोणाची वाटलं तर मदत घ्या. तुम्हाला त्रास होत असेल तर काही कामं बाईकडून करून घ्या. तुम्ही स्वतः घरी न करता काही गोष्टी विकत आणा. “

आजींनी पटकन माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या..

“अग ह्यांना विशेष काही झालं नाही. हे कळलं आता मला चिंता नाही. मी करीन उठत बसत काम. त्यात काय ग आपल्याला सवयच असते… “

आजींचा चेहरा खुलला होता.

“नीता माझ फार मोठं काम केलस बघ. माझ्या जीवाला फार घोरं लागला होता ग…. “

“आता आजोबांची काही काळजी करू नका.. आणि मस्त काहीतरी त्यांच्यासाठी बनवा.. खुष होतील… “

आजी खुद्कन हसल्या..

” बैस ग… आता आधी आपल्या दोघींसाठी कॉफी करून आणते”

अस म्हणून आजी आत गेल्या…

त्यांचा चेहरा एकदम बदलला होता.

खरं सांगू ?….

असा निरपेक्ष निर्मळ आनंद कुणाच्या चेहऱ्यावर बघायला मिळाला की मला फार फार समाधान होते.

आता या वयात जगायला यासारखं दुसरं काही नको….

आजींना म्हटलं होतं कोणाला सांगणार नाही पण मुद्दाम हा लेख लिहिला… आपणही शिकू आजी आजोबांकडुन…. प्रेम कसंही करता येतं ते……

हो की नाही…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ योजकस्तत्र दुर्लभ:! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

योजकस्तत्र दुर्लभ:! ☆ श्री संभाजी बबन गायके 

कै. संतोष नरहर काळे

योजकस्तत्र दुर्लभ:! 

अयोग्य: पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभ:! 

अर्थात कोणतीही व्यक्ती (पूर्णांशाने) अयोग्य नसतेच. फक्त त्या व्यक्तीचा योग्य त्या कार्यात उपयोग करणारे दुर्लभ असतात. हे आठवायचं कारण म्हणजे अशा एका योजक व्यक्तीचं तसं अकाली निघून जाणं होय. कदाचित या योजकाची जगाच्या योजकाला आवश्यकता काहीशी तातडीने भासली असावी. अन्यथा धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सेवा कार्यात अग्रेसर राहून अगणित लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण करीत पूजनीय स्थान प्राप्त करण्याच्या मार्गावर खूप पुढे गेलेल्या माणसाचं, अर्थात संतोष नरहर काळे गुरुजी यांचे वयाच्या पासष्टीमध्ये निधन होणं मनाला पटणारं नाही. त्याचं जाणं अकाली म्हणता येत नसलं तरी अशा माणसाची समाजाला आणखी गरज होती, हे मात्र त्या दिवशी अंत्यसंस्काराला उपस्थित असलेला विविध क्षेत्रांमधील समुदाय पाहून दिसले. असो.

पुण्याच्या जवळच्या निगडीच्या काहीशा ओबडधोबड माळरानामध्ये प्राधिकरण नावाची एक सुनियोजित वस्ती उभारण्यात आली. नियोजनानुसार ही वस्ती चहूबाजूंनी फुलली सुद्धा. येथे समान शील… सख्यम न्यायाने एकसमान विचारधारेची माणसं एकत्रित येणंही साहजिकच आणि त्यांच्या नेतृत्वाची गरजही तितकीच नैसर्गिक.

नेमक्या याच पोकळीत बी. एस्सी. पदवी प्राप्त एक तरुण, अक्षरश: हरहुन्नरी कार्यकर्ता येऊन स्थिरावला आणि त्याने माणसं जमवायला सुरुवात केली. नोकरी हा त्याच्या पत्रिकेत अजिबात नसलेला ग्रह. त्यामुळे नोकरीच्या फंदात सहसा न पडता त्याने आपला बराचसा वेळ ज्योतिषाचा अभ्यास, गड-किल्ल्यांचा अभ्यास, पोवाडे गायन, इतिहास संशोधन आणि या क्षेत्रातील दिग्गज मंडळींच्या सहवासात आणि चौफेर भ्रमंती यात व्यतीत करायला आरंभ केला आणि हाच क्रम शेवटपर्यंत राहिला. नाही म्हणायला दहावीपर्यंतचे गणित-शास्राच्या शिकवण्या घेणे, किल्ल्यांची स्वत: काढलेली छायाचित्रे ग्रीटींग कार्ड स्वरुपात छापून त्यांची विक्री करणे, वैशिष्ट्यपूर्ण दैनंदिनी छापून घेणे, मसाला-लोणची घाऊक विक्री अशा अनेक उद्योगांतून त्याने पैसे वगळता अनेक गोष्टी कमावल्या! यातील अनेक उद्योग तर त्याने संपर्कातील तरुणांना चांगल्या अर्थाने ‘चांगलेच कामाला’ लावण्यासाठीच केले असावेत! 

पण यातील शिकवणी घेणे या एका गृहोद्योगातून त्याच्या प्रभावक्षेत्रात कित्येक युवक युवती आले. मग हीच लहान मोठी मुले-मुली त्याच्यासोबत किल्यावर बागडताना दिसू लागली. काहीजण त्याच्या सोबत पोवाड्यात साथ करायला जाऊ लागली. हे कार्य करता करता अनेक मुलांच्यात असलेला कार्यकर्ता तो विकसित करूही शकला.

छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळी मुक्कामी राहून तेथे त्यांचा पोवाडा सादर करण्याची कल्पनाही त्याचीच. त्या कार्यक्रमासाठी साठी दरवेळी नवनवीन मुलांना तेथे घेऊन जाणे याकडे त्याचा कटाक्ष असे.

आपल्या भाग्यात काय लिहिले आहे किंबहुना आपल्या भाग्यरेषा आपल्या जीवनाला कुठे घेऊन जाताहेत, हे समजून घेण्याची सामान्यजणांची ओढ आणि निकड त्याने खूप आधी ओळखली होती. पत्रिका दाखवायला आलेल्या माणसांच्या पत्रिकेत समाजसेवेचा अगदी सामान्यातला सामान्य ग्रह जरी याला दिसला… की त्या माणसाच्या सामाजिक पत्रिकेतील भाग्यस्थानी एखादा तरी चांगला कर्मग्रह अलगद येऊन बसायचा. व्यक्तीची एकूण सर्वसाधारण मनोवृत्ती लक्षात घेऊन, त्या व्यक्तीला बिलकुल घाबरवून न ठेवता त्याचे भविष्य तो अचूक वर्तवायाचा. त्यामुळे त्याच्या घरी विद्यार्थ्यांचा, पालकांचा, राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा सतत राबता असायचा. जोडीला अनेक व्याधींवरील देशी उपचार ज्ञात असलेल्या या माणसाकडे औषधीविषयक सल्लाही उत्तम मिळायचा! 

निगडी प्राधिकरणात महामार्ग ते रेल्वे रूळ असा श्री संत ज्ञानेश्वर महाराज चौक असा एक भाळा मोठा, रुंद रस्ता आहे. या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक आहेत. या दुभाजकाच्या मधल्या जागेत कचरा टाकावा असे कुणाला कधी सांगावे लागले नाही. ही समस्या लक्षात घेऊन आपल्या या लेख नायकाने या जागेत शोभेची झाडे, वनस्पती लावाव्यात अशी कल्पना मांडली. ज्यांनी या कल्पनेला अनुमोदन दिले ते लोक ही बाब काही गांभीर्याने घेत बसले नाहीत. पण या महाशयांनी मात्र संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करीत राहून ते काम सुरु होईल असे पाहिले. आणि आरंभी स्वत: त्या कामाचा ठेका घेतला… अर्थात केवळ ठेका. अर्थप्राप्ती आणि हा माणूस यांत आधीपासून होता तो दुभाजक कायमच राहिला. आज हा दोन तीन किलोमीटर्सचा रस्ता वाहतुकीतला एक प्रेक्षणीय भाग आहे.

हा माणूस बहुदा जन्मत:च ज्येष्ठ वगैरे असावा. कारण तो तरुण कधी दिसलाच नाही, पण कायम तरुणांमध्ये दिसला, लहान मुलांमध्ये दिसला. पोरांना किल्ले दाखवायचे आणि मग ते दिवाळीत करायला लावायचे त्याला जमायचे. लहान मुलांचा काका व्हायला तर त्याने अजिबात वेळ लावला नाही. इतरांसाठी दादा तर तो होताच पण त्याच्यापेक्षा वयाने बरीच लहान पोरं त्याला एकेरीत सुद्धा हाक मारू शकायची, यातच त्यांचं सामाजिक यश सामावलेलं होतं.

डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा. त्यातून दिसणारे चमकदार डोळे. आणि त्या डोळ्यांतून त्याचं ते माणसांकडे पाहणे… एकदम स्पष्ट असे. बोलता बोलता उजवा हात नाकावरून घासत थेट कपाळापर्यंत नेणे, ही लकब. आणि हसणं अगदी खळखळून. सर्व वयाच्या लोकांसाठी त्याच्याकडे स्वतंत्र किस्से आणि विनोद होते.

त्याचे बाबा सुद्धा अगदी लहान मुलांची इंग्लिशची शिकवणी घेत असत. त्यामुळे हे लहानगेच पुढे बढती मिळून याचे विद्यार्थी बनत.

ज्योतिषाचा पसारा वाढत गेल्यावर हे मग गुरुजी म्हणून जास्त ओळखले जाऊ लागले. पत्रिका दाखवायला येणारा माणूस सुरुवातीला क्लाएन्ट असायचा आणि थोड्याच वेळात त्याचे स्नेह्यात रुपांतर व्हायचे.

एक अफाट उपक्रम काळे गुरुजींनी हाती आणि डोक्यात घेतला होता. आणि तो म्हणजे वेदअध्ययन आणि अध्यापन. त्यासाठी या आधुनिक काळात किती साधना करावी लागत असेल याची कल्पना आपल्यासारख्या सामान्य लोकांना येणार नाही.

पुण्याजवळच्या ग्रामीण भागात त्यांनी एक रीतसर आश्रमसुद्धा उभारला होता. यासाठीची आर्थिक तरतूद ही केवळ त्यांचे समाजाशी असलेले आणि जोपासलेले वैय्यक्तिक संबंध आणि प्रामाणिक हेतू यांमुळेच होत असावी. अन्यथा अर्थप्राप्तीचा कुठलाही मोठा स्रोत नसताना अशी मोठी कामे उभी राहणे, केवळ अशक्य. आणि एवढं सगळं होत असताना संसारिक माणूस सुख-दुखा:चे, वैद्यकीय समस्यांचे प्रसंग जे अपरिहार्यपणे भोगतो… ते त्यांनाही चुकले नाहीत. पण एक मोठा माणूस होण्याच्या त्यांच्या अखंड प्रवासात हे भोग त्यांनी शांतपणे पचवले! त्यांच्या निधनाची वार्ता कानी येताच त्यांच्या घराकडे लागलेली रीघ पाहून सौर्हादाची श्रीमंती कमावलेला मनुष्य समाजाने गमावला आहे, ही जाणीव गडद होत होती!

पण गेली काही वर्षे ते त्यांच्या संपर्कात येणा-या प्रत्येकाला एक स्वप्नवत योजना सांगत असतच… भव्य चौसष्ठ योगिनी मंदिर! या मंदिराची सर्व योजना, आराखडा, रेखाटने त्यांच्या खिशात कायम असत. या कामासाठी त्यांनी अनेक माणसं योजून ठेवली होती. ही भव्य योजना ऐकून ही योजना यशस्वी होईल किंवा कशी होईल, अशी काळजी ऐकणा-याच्या चेहर-यावर दिसू लागली की काळे त्याच्याकडे पाहून फक्त गूढ हसत… जणू म्हणत…. बरंचसं काम झालंय रे… तू फक्त तुझा वाटा उचल! आणि खरोखरच मागील काही दिवसांत चौसष्ठ योगिनीच्या मूर्ती तयार झाल्याही होत्या. आता योजनेचा पुढील अध्याय सुरु व्हायचा होता… पण संतोष काळे गुरुजींच्या श्वासांचा अध्याय समाप्त झाला !

असे योजक दुर्लभ असतात हे खरे ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “क्रोधाचे पिशाच्च” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “क्रोधाचे पिशाच्च” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम, आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना, रात्रीच्या वेळी अंधारामुळे त्यांना रस्ता सापडला नाही.

जंगल घनदाट होते. तिथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता, न मागे फिरण्याचा.

तेव्हा तिघांनी ठरवले की, एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी मार्गस्थ व्हायचे.

तिघेही दमलेले होते, पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले.

पहिली पाळी सात्यकीची होती. सात्यकी पहारा करत असताना, झाडावरून एका पिशाच्चाने पाहिले की एक माणूस पहारा देतो आहे, आणि दोनजण झोपले आहेत.

पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी आव्हान देऊ लागले.

पिशाच्चाचे बोलणे ऐकून सात्यकी संतापला आणि क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला.

तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले.

परंतु जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई, तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार आणखीनच मोठा होई आणि तो सात्यकीला जास्त जखमा करू लागे.

एका प्रहरानंतर बलराम जागे झाले. त्यांनी सात्यकीला झोपायला सांगितले.

सात्यकीने पिशाच्चाबद्दल काहीच सांगितले नाही.

बलराम पहारा देऊ लागले. पिशाच्चाने त्यांनाही मल्लयुद्धासाठी बोलावले.

बलराम क्रोधाने त्याच्यावर धावून गेले, तेव्हा पिशाच्चाचा आकार अजून मोठा झाला.

ते जितक्या रागाने लढत, तितकाच तो अधिक बलवान होत असे.

प्रहर संपला, आणि पहारा देण्याची वेळ भगवान श्रीकृष्णांची आली.

 पिशाच्चाने मोठ्या रागाने श्रीकृष्णांना बोलावले.

परंतु श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले.

पिशाच्च अधिकच संतापले आणि मोठमोठ्याने ओरडू लागले, पण श्रीकृष्ण मात्र शांत भाव जपत राहिले.

आश्चर्य असे झाले की, जसे जसे पिशाच्चाचा राग वाढला, तसे तसे त्याचा आकार छोटा होत गेला.

रात्र संपता संपता पिशाच्चाचा आकार इतका लहान झाला की तो शेवटी एक छोटासा किडा झाला.

श्रीकृष्णांनी तो किडा अलगद त्यांच्या उपरण्यात बांधला.

 सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी श्रीकृष्णांना सांगितली.

तेव्हा श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखवत सांगितले:

“हे क्रोधाचे पिशाच्च होते. याला शांती हेच औषध आहे.

क्रोधाने क्रोध वाढतो, पण त्याचा प्रतिकार फक्त शांततेने होतो.

मी शांत राहिलो, म्हणून हे पिशाच्च आता किड्यासारखे लहान झाले आहे. ”

तात्पर्य:

क्रोधावर संयमानेच विजय मिळवता येतो.

क्रोधाला क्रोधाने मारता येत नाही; तो शांतपणे आणि प्रेमानेच कमी करता येतो, नष्ट करता येतो.

क्रोधाचे हे पिशाच्च बाहेर कोठे नसून, आपल्या विचारांमध्येच असते.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती: सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नेत्रदान.. एक राष्ट्रीय गरज… लेखक : श्री. वि. आगाशे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

?  विविधा ?

☆ नेत्रदान–एक राष्ट्रीय गरज :👁️👁️ – लेखक : श्री. वि. आगाशे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

जगातील एकूण नेत्रहीन व्यक्तिंपैकी २० टक्के म्हणजे सव्वा कोटी नेत्रहीन भारतात असून त्यातील ३० लाख नेत्रहीन व्यक्तिंना नेत्ररोपणाने दृष्टी प्राप्त होऊ शकते. सगळ्याच नेत्रहीनांना नेत्ररोपणाने दृष्टी मिळू शकत नाही. ज्यांची पारपटले निकामी झाली आहेत, परंतु बाकीचा डोळा चांगल्या स्थितीत आहे, त्यांनाच दृष्टी प्राप्त होऊ शकते कारण नेत्ररोपण म्हणजे संपूर्ण डोळ्याचे रोपण नव्हे तर फक्त ह्या पटलाचेच रोपण होय. ह्यालाच सर्वसाधारणपणे आपण नेत्ररोपण म्हणतो. मृत व्यक्तींच्या नेत्रदानामुळेच हे नेत्ररोपण करणे शक्य होते. नेत्रदान हे रक्तदानाप्रमाणे जिवंतपणी नव्हे तर ते मरणोत्तरच करावयाचे असते. कुठल्याही जिवंत व्यक्तीस नेत्रदान करता येत नाही.

तीस लाखांना दृष्टी देणे आपल्याला सोपे वाटेल, पण तसे नाही, कारण आपली भयानक, तिडीक आणणारी निंद्य अनास्था आणि मला काय त्याचे ही वृत्ती!😪

दरवर्षी भारतात सुमारे ८० लाख मृत्यु होतात. परंतु ह्यातील फक्त सुमारे ३० हजार व्यक्तींचेच नेत्रदान होते. भारतात जी नेत्ररोपणे होतात त्यासाठी मोठ्या प्रमाणात दान केलेले नेत्र हे श्रीलंकेसारख्या आपल्या छोट्याशा शेजारी राष्ट्राकडून आलेले असतात. भुवया उंचावल्या ना? ही भयानक वस्तुस्थिती आपल्यासारख्या १४० कोटी लोकसंख्येच्या मोठ्या राष्ट्राला आत्यंतिक लाजिरवाणीच नव्हे काय?

आपला देश विविध आघाड्यांवर स्वयंपूर्ण होत आहे. तो ह्या आघाडीवरही स्वयंपूर्ण व्हावा असे आपल्यासही नक्कीच वाटेल. म्हणूनच ही एक राष्ट्रीय गरज ठरते.

नेत्रदान कोण करू शकते?

* जन्मजात बालकापासून अगदी १०० वर्षांच्या स्त्री-पुरुषांपर्यंत कोणाचेही नेत्रदान होऊ शकते.

* कोठल्याही प्रकारचा चष्मा लावणारे, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेले, मधुमेही आणि रक्तदाब पिडीतही नेत्रदान करू शकतात.

* मृत व्यक्तिस एड्स, अलार्क (रेबीज), कावीळ, कर्करोग, सिफीलीस, धनुर्वात किंवा विषाणूंपासून होणारे रोग, तसेच नेत्रपटलाचे रोग असल्यास अशा व्यक्तिंचे नेत्र रोपणासाठी निरुपयोगी ठरतात. परंतु ही नेत्रपटले सराव आणि संशोधनासाठी वापरतात. तेव्हा अशा व्यक्तिंचे नेत्रदान व्हावे की नाही हे कृपया नेत्रपेढीच्या डॉक्टरांनाच ठरवू द्यावे. आपणच काहीतरी ठरवू नये.

* अपघातात मृत झालेल्या व्यक्तिंचे डोळे, म्हणजेच नेत्रपटल चांगल्या स्थितीत असल्यास स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने नेत्रदान होऊ शकते.

* ज्यांचे पारपटल चांगले आहे, परंतु इतर काही दोषांमुळे अंधत्व आलेले आहे अशा अंधांचेही नेत्रदान होऊ शकते. म्हणजेच अशा अंध व्यक्तीही नेत्रदान करू शकतात.

* *मृत्युनंतर लवकरात लवकर, ३ ते ४ तासांपर्यंत (अपवादात्मक स्थितीत ६ तासांपर्यंत) नेत्रदान होणे आवश्यक असते. म्हणूनच नेत्रदानाची इच्छा मृत्युपत्रांत व्यक्त करु नये. ते निरर्थक असते. कारण मृत्युपत्र काही दिवसांनंतरही उघडले जाते.

* नेत्रदानासाठी जवळच्या नेत्रपेढीचे प्रतिज्ञापत्र मात्र जरुर भरावे. त्यातून आपली इच्छा लेखी स्वरुपात व्यक्त होऊन ती साक्षीदार म्हणून सही करणाऱ्या जवळच्या नातलगांना वारसांना माहीत होते. आपली इच्छा जवळचे नातलग, शेजारी, मित्र-मैत्रिणी ह्यांनाही आवर्जून सांगावी, किंबहुना प्रतिज्ञापत्र भरताना ते सामूहिकपणे, एकत्र बसून चर्चा करून भरणे सर्वोत्तम होय! त्यातून आपली इच्छा आणि ह्या कार्यासही एक सामूहिक बळ प्राप्त होते. तसेच आपली इच्छा फलद्रुप होण्याची शक्यता वाढते.

* नेत्रपेढीकडून आपल्यास डोनर कार्ड मिळते. आपण नेत्रदान केलेले असल्याचे दर्शविणारे हे कार्ड कायम आपल्यासोबत बाळगावे.

* आपल्या डायरीत आसपासच्या सर्व नेत्रपेढ्यांचे दूरध्वनी क्रमांक ठळकपणे नोंदवून ठेवावेत तसेच भिंतीवरही लावावेत.

* नेत्रदात्याच्या मृत्युनंतर नेत्रपेढीला लगेच नेत्रदानाविषयी कळविणे महत्त्वाचे असून हे काम नातलग, शेजारी, मित्र-मैत्रिणी करु शकतात. त्या वेळेच्या भावनात्मक स्थितीचे कारण काही जण सांगतात परंतु ते लटके आहे. अशा स्थितीतच जेव्हा आपण नातलग, ओळखीच्यांना वगैरे दूरध्वनीवरून कळवितो तसेच नेत्रपेढीलाही दूरध्वनीवरुन कळवायचे एवढेच!

* मृत व्यक्तिने ज्या नेत्रपेढीचे प्रतिज्ञापत्र भरले आहे त्याच नेत्रपेढीला कळविणे आवश्यक नाही. त्या ठिकाणच्या जवळच्या नेत्रपेढीला कळविणे वेळेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

* मृत व्यक्तिने प्रतिज्ञापत्र भरलेले नसतानाही वारसदार व्यक्ती मृत व्यक्तिचे नेत्रदान नेत्रपेढीला कळवून करु शकतात. ह्या दृष्टिने नेत्रदानाचे महत्त्व, राष्ट्रीय आवश्यकता पाहता कळकळीचे आवाहन करावेसे वाटते की आपल्या परिसरात, नात्यात कुणाचा मृत्यू झाल्यास मृत व्यक्तिच्या नातलगांना नेत्रदानाविषयी जरुर सुचवावे, त्यासाठी प्रवृत्त करण्याचे प्रयत्न करावेत. अशा प्रकारे जिवंतपणीच आपण नेत्रदानविषयक मोठे काम करु शकाल.

* नेत्रदानास धार्मिक बंधन नाही. कोठला धर्म अशा महान कार्यास विरोध करेल ?

नेत्रपेढीला कळवितानाच खालील बाबी पार पाडाव्यात –

* डॉक्टरांकडून मृत्यू प्रमाणपत्र त्वरित मिळवावे. शक्यतो त्यांनाच १० सी. सी. रक्ताचा नमुना घेऊन ठेवण्यास सांगावे.

* मृताचे डोळे व्यवस्थित बंद करुन पापण्यांवर बर्फ अथवा ओल्या कापसाच्या/कापडाच्या घड्या ठेवाव्यात. शक्य असल्यास डोळ्यात जरुर आयड्रॉप्स टाकावेत.

* पंखे बंद करावेत तसेच वातानुकुलन यंत्र असल्यास ते जरुर चालू ठेवावे. जवळ प्रखर दिवे नसावेत.

* मृत व्यक्तिस शक्यतो कॉटवर ठेवावे आणि मृत व्यक्तिचे डोके २ उशांवर ठेवावे.

* नेत्रपेढीला कळविल्यावर नेत्रपेढीचे डॉक्टर मृत व्यक्ती जेथे असेल तेथे येऊन अर्ध्या तासात नेत्र काढून नेतात, त्यासाठी जंतुविरहित खोलीची आवश्यकता नसते. नेत्र काढल्यावर कृत्रिम नेत्र किंवा कापसाचे बोळे ठेवून पापण्या व्यवस्थितपणे बंद केल्या जातात त्यामुळे मृत व्यक्तिचा चेहरा विद्रूप दिसत नाही.

* हे नेत्र खास फ्लास्कमधून नेत्रपेढीत नेले जातात. त्यावर काही प्रक्रिया करून ४८ तासांच्या आत नेत्रपेढीच्या प्रतीक्षा यादीप्रमाणे दोन ते सहा नेत्रहीन व्यक्तींना बसविले जाऊन त्यांना नवजीवनच देण्याचे महान कार्य करतात.

* आपणही हे अमूल्य दान करु शकतो. कदाचित जीवनभर समाजाच्या उपयोगी पडलो नाही तरी मरणोत्तर नेत्रदानाने दोन ते सहा दृष्टिहिनांच्या रंगहीन जीवनात अमूल्य दृष्टिचे रंग भरु शकतो, त्यांना नवजीवनच देऊ शकतो.

 

लेखक… श्री. वि. आगाशे

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – २८ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

 

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – २८ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

 ताई आणि संध्या

ताई आणि संध्याचं लहानपणापासूनच अगदी मेतकूट होतं. त्या समान वयाच्या म्हणूनही असेल कदाचित. बहिणी पण आणि जिवाभावाच्या मैत्रिणी पण असं संमिश्र नातं होतं त्यांचं. म्हणजे ते तसंच अजूनही आहे वयाची ऐंशी उलटून गेली तरीही.

ताई म्हणजे माझी सख्खी मोठी बहीण आणि संध्या आमची मावस बहीण पण ती जणू काही आमची सहावी बहीणच आहे इतकी आमची नाती प्रेमाची आहेत.

अकरावी झाल्यानंतर ताई भाईंकडे म्हणजे आजोबांकडे (आईचे वडील) राहायला गेली. संध्या तर जन्मापासूनच भाईंकडे राहत होती. तेव्हा मम्मी (आजी) होती आणि भाईंची बहीण जिला आम्ही आत्या म्हणत असू तीही त्यांच्या समवेत राहायची. आत्या हे एक वैशिष्ट्यपूर्ण असं व्यक्तिमत्त्व होतं जिच्या विषयी मी नंतर लिहिणार आहेच.

संध्या या तिघांसमवेत अत्यंत लाडाकोडात वाढत होती यात शंकाच नाही पण माझ्या मनात मात्र आजही तो प्रश्न आहेच की मावशी बंधूंचं (म्हणजेच संध्याचे आई-वडील..) संध्या हे पहिलं कन्यारत्न. पहिलं मूल म्हणजे आयुष्यात किती महत्त्वाचं असतं! याचा अर्थ नंतरची मुलं नसतात असं नव्हे पण कुठेही कधीही पहिल्याचं महत्व वेगळंच असतं की नाही? मग संध्याला आजी आजोबांकडे जन्मापासून ठेवण्यामागचं नक्की कारण काय असेल? कदाचित आजीचाच आग्रह असेल का? आजी ही आजोबांची तिसरी पत्नी होती. अतिशय प्रेमळ आणि नात्यांत गुंतणारी होती. तिने आई -मावशींना कधीही सापत्न भाव दाखवलाच नाही पण तरीही तिला स्वत:चं मातृत्व म्हणजे काय हे अनुभवता आलं नाही आणि लहान मुलांची तिला अतिशय आवड होती म्हणून असेल कदाचित.. तिने जन्मापासूनच संध्याला आजी या नात्याने मांडीवर घेतले आणि तिच्यावर आजी आणि आई बनून मायेचा वर्षाव केला. अर्थात हा माझा तर्क आहे प्रत्यक्ष परिस्थितीचे आकलन मला आजपर्यंत झालेलं नाही आणि या घटनेमागची मावशीची भूमिका ही मला कळलेली नाही.

हे लिहीत असताना मला एक सहज आठवलं तेही सांगते. आम्हा तीन बहिणींच्या नंतर जेव्हा उषा निशा या जुळ्या बहिणींचा जन्म झाला तेव्हा दोन पैकी एकीला आजोबांकडे काही वर्षं ठेवावं असा एक विचार प्रवाह चालू होता. त्याला दोन कारणे होती. एकाच वेळी दोन बाळं कशी वाढवणार आणि दुसरं म्हणजे आमचं घर लहान होतं, फारसं सोयीचं नव्हतं, आठ माणसांना सामावून घेण्याची एक कसरतच होती पण त्याचवेळी हाही एक अनुभव आला की रक्ताची नाती ही एक शक्ती असते. अरुंद भिंतींनाही रुंद करून त्यात सामावून घेण्याचं एक दिव्य मानसिक बळ त्यात असतं. काही काळ आमचं कुटुंब काहीसं हादरलं असेलही पण आम्हाला बांधून ठेवणारा एक पक्का, चिवट धागा होता. जीजीने विरोध दर्शविला म्हणण्यापेक्षा जबाबदारीच्या जाणिवेनं डळमळणाऱ्या मानसिक प्रवाहाला धीर देत सांगितलं, ” कशासाठी? माझ्या नाती याच घरात मोठ्या होतील. छान वाढतील. ”

आणि त्याच आभाळमायेच्या छताखाली आम्ही साऱ्या आनंदाने वाढत होतो.

मात्र मॅट्रिक झाल्यानंतर ताई भाईंकडे कायमची राहायला गेली. त्यावेळी भाईंच्या घरात आजी नव्हती. ती देवाघरी निघून गेली होती.

संध्या आणि ताई दोघीही उच्च गुण मिळवून मॅट्रिक झाल्या. आमच्या घरात या दोघींच्या मॅट्रिकच्या यशाचा एक सोहळा साजरा झाला. आजोबांनी टोपल्या भरून पेढे गणगोतात वाटले होते.

ताईने आणि संध्याने एकत्र मुंबईच्या त्या वेळच्या नामांकित म्हणून गाजलेल्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला होता आणि ठाण्याहून ताई इतक्या लांब फोर्टस्थित कॉलेजात कशी जाणार म्हणून तिने भाईंकडेच राहावे हा प्रस्ताव बिनविरोधात मंजूर झाला होता.

ताई आणि संध्याच्या जोडगोळीत तेव्हापासून वेगळेच रंग भरले गेले. आजोबांच्या शिस्तप्रिय, पाश्चात्य जीवन पद्धतीचा संध्याला अनुभव होताच किंबहुना ती त्याच संस्कृतीत वाढली होती. आम्ही आई बरोबर भाईंकडे फक्त शाळांना सुट्टी लागली की जायचो. दिवाळीत, नवरात्रीत जायचो. पण आम्ही मुळचे धोबीगल्लीवासीयच. ईश्वरदास मॅन्शन, नाना चौक ग्रँड रोड मुंबई. इथे आम्ही तसे उपरेच होतो. सुट्टी पुरतं सर्व काही छान वाटायचं पण ताई मात्र कायमस्वरूपी या वातावरणात रुळली आणि रुजली.

आता ती ठाण्याच्या आमच्या बाळबोध घरातली पाहुणी झाली होती जणू! 

एकूण नऊ नातवंडांमध्ये संध्या आणि अरुणा म्हणजे आजोबांसाठी दोन मौल्यवान रत्नं होती. त्या तिघांचं एक निराळंच विश्व होतं. आजोबांच्या रोव्हर गाडीतून आजोबा ऑफिसात जाता जाता त्यांना कॉलेजमध्ये सोडत. अगदी रुबाबात दोघी काॅलेजात जायच्या. त्या दोघींच्या साड्या, केशरचना, केसात माळलेली फुले रोजच एकसारखी असत. एलफिन्स्टन कॉलेजच्या प्रांगणात संध्या- अरुणाची ही जोडी या एका कारणामुळे अतिशय प्रसिद्ध झाली होती. शिवाय दोघीही सुंदर, आकर्षक आणि हुशार.

दोघींच्या स्वभावात मात्र तसा खूप फरक होता. पायाभूत पहिला अधोरेखित फरक हा होता की ताई मराठी मीडीअममधली आणि संध्या सेंट कोलंबस या कान्व्हेंट स्कूल मधली. सरळ केसांची संध्या तशी शांत, मितभाषी, फारशी कोणात चटकन् मिसळणारी नव्हती. तिचं सगळंच वागणं बोलणं एका ठराविक मीटर मध्ये असायचं आणि या विरुद्ध कुरळ्या केसांची ताई! ताई म्हणजे एक तुफान, गडगडाट. कुणाशीही तिची पटकन मैत्री व्हायची. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा तिला प्रचंड उत्साह असायचा. मला आजही आश्चर्य वाटतं की संध्याच्या पचनी ताई कशी काय पडायची? त्या दोघींची आपसातल्या या विरोधाभासातही इतकी मैत्री कशी? इतकं प्रेम कसं? 

एखाद्या बस स्टॉप वर दोघी उभ्या असल्या आणि बसला येण्यास वेळ झाला की ताईची अस्वस्थतेत अखंड बडबड चालायची. त्याचवेळी संध्या मात्र शांतपणे बसच्या लाईनीत उभी असायची. बसची प्रतीक्षा करत. कधीतरी ताईला ती म्हणायची!” थांब ना अरू! येईल नं बस. ”

पण ताईचं तरी म्हणणं असायचं, ” “आपण चालत गेलो असतो तर आतापर्यंत पोहोचलोही असतो. ”“ जा मग चालत. ” कधीतरी संध्याही बोलायची.

पण त्या दोघींचं खरोखरच एक जग होतं. आणि भाईंच्या सधन सहवासात अनेक बाजूने ते बहरत होतं हे नक्कीच. शिस्त होती, धाक होता पण वाढलेल्या गवताला मॅनिक्युरिंग केल्यानंतर जे वेगळंच सौंदर्य लाभतं तशा पद्धतीने या दोघींची जीवनं फुलत होती.

कॉलेजच्या आंतरमहाविद्यालयीन नाट्यमहोत्सवात त्या दोघी भाग घेत. संध्याची एकच प्याला मधील सिंधूची भूमिका खूप गाजली. ताईने ही प्रेमा तुझा रंग कसा मध्ये बल्लाळच्या पत्नीची भूमिका फार सुंदर वठवली होती. दोघींनाही पुरस्कार मिळाले होते. दोघींमध्ये अप्रतिम नाट्यगुण होते आणि त्यांना चांगला भावही या माध्यमातून मिळत होता.

आमच्या ज्ञातीच्या इमारतीसाठी निधी गोळा करण्याच्या निमित्ताने एक व्यावसायिक पद्धतीने नाटक बसवण्यात आलं होतं. मला नाटकाचे नाव आता आठवत नाही पण या नाटकातही ताई आणि संध्याच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या आणि या नाटकाच्या तालमी भाईंच्याच घरी होत. सुप्रसिद्ध अभिनेते रामचंद्र वर्दे यांच्या दिग्दर्शनाखाली हे नाटक बसवले जात होते. भारतीय विद्या भवनात या नाटकाचा प्रयोग झाला. शंभर टक्के तिकीट विक्री झाली होती आणि प्रयोग अतिशय सुंदर झाला होता. इतका की भविष्यात ताई आणि संध्या मराठी रंगभूमी गाजवणार असेच सर्वांना वाटले. मात्र या नाटकाच्या निमित्ताने “विलास गुर्जर” नावाचा एक उत्तम अभिनेता मात्र रंगभूमीला मिळाला होता.

ताई आणि संध्या यांचं बहरणं असं वलयांकित होतं. आमच्या परिवारात या दोघी म्हणजे नक्कीच आकर्षक केंद्रं होती. तारुण्याच्या उंबरठ्यावर त्यांचं हे असं मैत्रीपूर्ण बहिणीचं नातं सुंदरच होतं. एकमेकींची गुपितं एकमेकीत सांगणं, आवडीनिवडी जपणं, कधी स्वभाव दोषांवर बोलणं, थोडंसं रुसणं, रागावणं पण तरी एकमेकींना सतत सांभाळून घेणं समजावणं, एकत्र अभ्यास करणं मैत्रिणींच्या घोळक्यात असणं वगैरे वगैरे अशा अनेक आघाड्यांवर या दोघींचं हे नातं खरोखरच आदर्शवत आणि सुंदर होतं.

आम्ही जेव्हा सुट्टीत भाईंकडे जायचो तेव्हा मला प्रकर्षाने जाणवायचं ते म्हणजे संध्या, ताई, आजोबा आणि आत्या यांचा एक वेगळा ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये आम्ही नव्हतो. कारण बऱ्याच वेळा संध्या, ताई आणि आजोबा हे तिघंच खरेदीला जात, नाटकांना जात, आजोबांच्या ऑफिसमधल्या पार्ट्यांनाही जात. व्ही शांताराम च्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रीमियर शोचे भाईंना पास मिळत. बहुतेक हे चित्रपट ऑपेरा हाऊसला लागत आणि या प्रीमियर शोजनाही भाई फक्त ताई आणि संध्यालाच बरोबर नेत. म्हणजे तसे भाई आम्हालाही कुठे कुठे न्यायचे पण त्या नेण्यात ही “स्पेशॅलिटी” नव्हती. खास शिक्का नसायचा. ते सारं सामुदायिक असायचं, सर्वांसाठी असायचं. ”सगळीकडे सगळे” हा साम्यवाद भाईंच्या शिस्तीत नव्हता.

एकदा भाईंनी घरातच, वामन हरी पेठे यांच्या एका कुशल जवाहिर्‍याला बसवून ताई आणि संध्यासाठी अस्सल हिरे आणि माणकांची कर्णफुले विशिष्ट घडणावळीत करवून घेतली होती. कर्णभूषणाचा तो एक अलौकिक सौंदर्याचा नमुना होता. आणि एक मोठा इव्हेंटच होता आमच्या अनुभवातला. नातेवाईकांच्या लग्नसमारंभात त्या दोघी ही सुंदर कर्णफुले घालून मानाने मिरवायच्या फार सुरेख दिसायच्या दोघीही!

माझ्या मनात कुठलीच आणि कोणाशीही स्पर्धा नव्हती. जितकं प्रेम ताई वर होतं तितकंच संध्यावरही होतं. संध्या आजही आवडते आणि तेव्हाही आवडायची. कुणाही बद्दल द्वेष, मत्सर, आकस काही नव्हतं पण त्या त्या वेळी आजोबांच्या सहवासात हटकून एक उपरेपणा मात्र कुठेतरी जाणवायचा आणि तो माझा बाल अभिमान कुरतडायचा. डावललं गेल्याची भावना जाणवायची. अशावेळी मला माझी आई, आजी, पप्पा आणि धाकट्या बहिणी रहात असलेलं धोबी गल्लीतलं ते लहानसं, मायेची ऊब असलेलं, समान हक्क असलेलं घरच हवं असायचं. माझ्यासाठी ते आनंदघर होतं.

खरं म्हणजे “भाई” आजोबा म्हणूनही आणि एक स्वतंत्र व्यक्ती म्हणूनही त्यांचा प्रचंड प्रभाव माझ्या जडणघडणीवर आहेच. त्यांनी दिलेल्या आयुष्याच्या अनेक व्यावहारिक टिप्स मला जगताना कायम उपयोगी पडल्यात. मी त्यांच्याबद्दल नकारात्मक विचार करूच शकत नाही पण त्या बालवयात मी प्रचंड मानसिक गोंधळ त्यांच्या पक्षपाती वागण्यामुळे अनुभवलेला आहे हे खरं.

आजोबांकडच्या वास्तव्यात मला आणखी एक जाणवायचं की आत्याचा संध्याकडे जास्त ओढा आहे. ते स्वाभाविकही होतं. ताई ही कितीतरी नंतर त्यांच्यात आली होती. आत्याला ताई पेक्षा संध्याचं अधिक कौतुक होतं आणि कित्येकवेळा ती ते चारचौघात उघडपणे दाखवत असे. “असले उपद्व्याप अरुच करू शकते.. संध्या नाही करणार. ” यात एकप्रकारचा उपहास असायचा. पण तो फक्त मलाच जाणवत होता का? ताईच्या मनात असे विचार येतच नव्हते का? एक मात्र होतं यामुळे ताईच्या आणि संध्याच्या नात्यात कधीच दरी पडली नाही हेही विशेष. त्यावेळी मला मात्र वाटायचं.. “का आली ताई इथे? का राहते इथे? कशाचं नक्की आकर्षण तिला इथे वाटतं. ? आपल्या घरातल्या सुखाची चव हिला कळत नाही का?

 मी माझ्या मनातले प्रश्न ताईला कधीही विचारले नाहीत. मी तेव्हढी मोठी नव्हते ना! आणि हे प्रश्न कदाचित गैरसमज निर्माण करू शकले असते. त्यातील अर्थांची, भावनांची चुकीच्या पद्धतीने उकल झाली असती. पण आज जेव्हा मागे वळून मी त्या वेळच्या माझ्या मनातल्या गोंधळांना तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न करते तेव्हा एकच जाणवते.. मला माझी स्वतंत्र विचारशक्ती होती. मी कधीही कुणालाही “का?” ” कशाला?” विचारू शकत होते जर कोणी माझ्या वैयक्तिक बाबतीत ढवळाढवळ केली तर. मला माझ्यातला एक गुण म्हणा किंवा अवगुणही असू शकेल पण मी कधीही कुणाची संपूर्णपणे फॉलोअर किंवा अनुयायी नाही होऊ शकणार.. माझ्यातल्या विरोधी तत्त्वाची मला तेव्हा जाणीव होत होती आणि त्याला कदाचित माझ्या आयुष्यातल्या या दोन सुंदर व्यक्तीच कारणीभूत असतील. केवळ संदर्भ म्हणून.. ताई आणि संध्या..

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हे आपल्याला माहीत आहे का ? ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

हे आपल्याला माहीत आहे का ? ☆ सुश्री प्रभा हर्षे  ☆

हे आपल्याला माहीत आहे का ?

डेक्कन क्विन express कल्याणला का थांबत नाहीं?

कल्याण ! मध्य रेल्वेवरील एक अतिशय महत्वाचे जंक्शन ! मुंबईला उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारे एक महत्वाचे स्थानक ! कोणतीही लांब पल्ल्याची गाडी सामान्यपणे कल्याणला थांबतेच थांबते ! पण कल्याणला एक गाडी अजिबात थांबत नाही, ती म्हणजे ‘ दक्षिणेची राणी ‘ ‘ डेक्कन क्वीन ‘ ! मुंबईहून पुण्याला धावणारी ही गाडी कल्याणला थांबत नाही ह्याचे नवल वाटतेय ना ! बरोबर !!

त्याचे कारण असे आहे की कल्याण नगरपालिकेच्या हद्दीतून रेल्वे धावत होती ह्याबद्दल रेल्वे काही कर कल्याण नगरपालिकेला देऊ लागत असे. पण पुढे काही वर्षे रेल्वेने तो कर नगरपालिकेला दिला नाही. त्यामुळे संतापलेल्या कल्याण नगरपालिकेने रेल्वेला कोर्टात खेचले. कोर्टाने कल्याण नगरपालिकेच्या बाजूने निकाल दिला आणि कल्याण नगरपालिकेने डेक्कन क्वीन ह्या गाडीचे इंजिन जप्त केले. रेल्वेचे अधिकारी दुसऱ्या दिवशी आले, त्यांनी तो कर भरला आणि मग कल्याण नगरपालिकेने ते जप्त करून एक रात्र स्वतःच्या ताब्यात ठेवलेले डेक्कन क्वीनचे इंजिन रेल्वेला परत केले.

आपला हा अपमान आणि नामुष्की रेल्वे विसरली नाही आणि तिने कल्याणला डेक्कन क्वीन ही गाडी कधीच न थांबवण्याचा निर्णय घेतला ! 

ह्या खटल्यात कल्याण नगरपालिकेची बाजू समर्थपणे मांडणारे वकील होते डॉ बाबासाहेब आंबेडकर !!

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “जागा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “जागा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

 जागा हि प्रत्येक गोष्टींची आणि आपलीच असते. शब्द एक आणि रुप अनेक.

राहण्याची असते. राबण्याची असते.

प्रवासात बसण्याची असते.

बाहेर गेल्यावर दुचाकी किंवा चारचाकी लावायची असते.

राजकारणात तर असतेच असते. पण. . . . कार्यक्रमात सुध्दा असते.

 जागा. . . . . . .

सर्वसामान्य लोकांसाठी यात जिव्हाळा आहे.

मित्र, नातेवाईक यांच्यासाठी आपुलकी आहे. तर. . . . . .

राजकारणात प्रतिष्ठा आहे.

राजकारणात मिळाली तर टिकवायची, आणि नाही मिळाली तर बळकवायची असा दोनसुत्री कार्यक्रम असतो. मग ती जागा मोक्याची किंवा धोक्याची कोणतीही असो.

राजकारणात जागेसाठी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर सहज होतो. तर नात्यांमध्ये यांचा विचार गौण असतो. किंबहुना नसतोच.

जागा घेण्यासाठी संघर्ष असतो. तर  जागा सोडण्यासाठी तडजोड असते.

व्यक्तीचे वय, वागणं, विचार, आणि ज्ञान यानुसार तो जागा मिळवत असतो.

काही वेळा जागेमुळे माणसाला किंमत असते. तर काही वेळा माणसाला आपली जागा कोणती?. . . . याची किंमतच नसते.

आदराने आणि सन्मानाने बोलवून दिली जाते ती जागा. तर अपमान करुन दाखवली जाते ती सुद्धा जागाच.

गाण्यात असते, नाटकात असते. या जागा बरोबर घेतल्या तर दाद सुद्धा मिळते.

जागा, प्रेक्षणीय असते, पवित्र असते, शांत असते, आणि भयावह सुध्दा असते.

सुपीक असते, नापीक, आणि पडीक सुध्दा असते.

लहानपणी लपंडाव खेळताना आपण सापडूनये म्हणून, आणि आता बऱ्याच ठिकाणी अपराध केल्यावर पोलीसांनी पकडूनये म्हणून शोधली जाते ती जागा.

काही सुरक्षित असतात. तर काही आरक्षित. काही अतिक्रमण केलेल्या असतात, तर काही पुनर्वसन करण्यासाठी देऊ असं आश्वासन असतं. पण असतात जागा.

इतकच काय. . . . मेल्यानंतर सुध्दा नेतात ती सुध्दा एक ठराविक जागाच असते.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares