मराठी साहित्य – मराठी आलेख – ? मोरपीस ? – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

? मोरपीस  ?

(सुश्री ज्योति हसबनीस जी की लेखनी में एक अद्भुत क्षमता है किसी भी वस्तु, शब्द अथवा भावों को परिभाषित करने की अथवा किसी भी विधा में साहित्य रचने की। संभवतः ‘मोरपीस’ अथवा ‘मोरपंख’ अथवा ‘मोर का पंख’ अनायास ही हमारे नेत्रों के समक्ष न केवल मोर के उस कोमल पंख की झलक दिखलाता है अपितु यह आलेख बचपन से लेकर अब तक की हमारी स्मृतियों में विस्मृत करने हेतु पर्याप्त है।)  

एखाद्या शब्दाची कशी आपली एक स्वतंत्र ओळख असते, अस्तित्व असतं. त्याचं दिसणं, असणं, जाणवणं, अगदी रंग, रूप, स्पर्शासकटच अगदी खास त्याचं त्याचंच असतं . गुलाब म्हटला की पाकळ्या पाकळ्यातून डोकावणारा राजबिंडा रूबाब अगदी रूतणाऱ्या काट्यासकट डोळ्यासमोर येतो, तर मोगरा म्हटला की अगदी श्वासा श्वासात भरभरून तनमन धुंद करणारी मोगऱ्याची ओंजळच नजरेसमोर येते, तर प्राजक्त बकुळीचं नाव जरी उच्चारलं तरी नाजुक फुलांचा अंगणभर पडलेला सडा आणि तो नाजूक दिमाख मिरवणारं श्रीमंत अंगणच डोळ्यासमोर साकारतं! रंग रूप स्पर्श गंधाचं अवघं जगच त्या त्या शब्दांमध्ये सामावलेलं असतं.

असाच एक शब्द मोरपीस ! माझ्या फार फार आवडीचा ! कुणी स्तुती केली, जरा शब्दांनी मला कुरवाळलं की अगदी गालावर मोरपीसच फिरवल्याचा भास मला होतो. मोरपीसाचा मुलायम स्पर्श, त्याच्या लोभस रंगछटा, त्याच्या सौंदर्याचं गारूड इतकं आहे ना मनावर की ते सारं मला त्याक्षणी जाणवतं आणि ते शब्द जणू मोरपीसच होऊन माझ्या गालावर आणि नकळत मनातच रूंजी घालू लागतात !!

मोरपीस…बालपणातला अमूल्य खजिना ! पुस्तकात दडवलेलं /दडपलेलं मोरपीस म्हणजे जणू कुबेराची श्रीमंतीच आपली! केवढा तोरा ते ऐश्वर्य मैत्रिणीला दाखवतांना ..बालपणीचा मुलायम स्पर्श ल्यालेलं श्रीमंतीची पहिली ओळख घडवणारं सुंदर मोरपीस …!

मोरपीस ….मेघांनी व्यापलेल्या नभाकडे बधून उत्फुल्लतेने पिसारा फुलवून बेभान नाचणाऱ्या मोराचं पीस ! पावसाची चाहूल लागताक्षणी जलधारांचा उत्सव डोळ्यात जागवत आनंदविभोर होऊन नृत्य करणारा  मोर आणि त्याचा सुंदर पिसारा ..किती मोठा आशावाद सूचित करणारा ..!

मोरपीस …इतिहासातली किती तरी प्रेमपत्रे ह्याने खुलवली असणार, प्रेमाच्या जगातले सारे शब्द आपल्या  स्निग्ध आर्जवासकट ह्याच्याच मदतीने इष्ट स्थळी पोहोचले असणार, प्रेमी जनांच्या विश्वात अनोखे रंग भरणारं मोरपीस …!

‘मोरपीस’ …..चायनाला’ गेले असतांना तिथे ‘Su embroidery’ हा अनोखा प्रकार बघितला . त्यात कलाकुसर करतांना जे धागे वापरले होते ना त्यात एक मोरपीसाचा धागा पण होता. कित्ती नाजूक, सुंदर, रेखीव आणि नीळ्या हिरव्या रंगांची कलाकुसर डोकवत होती मधून मधून …!

आणि हेही ‘मोरपीसच’…. ‘सावळ्याच्या’ दैवी स्पर्शाने पावन झालेलं, अनोख्या ऐटीत त्याच्या मुकुटात विराजमान झालेलं, शतपटीने देखणं दिसणारं, डौलात विहरणारं… परमात्म्याशी नातं जोडणारं अलौकिक मोरपीस..!

 

©  सौ. ज्योति हसबनीस

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – ☆ प्रेमा तुझा रंग कसा? ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ प्रेमा तुझा रंग कसा? ☆

 

या विषयावर विचार प्रकट करताना, आठवतात ओळी, ‘पाण्या तुझा रंग कसा? ‘ एखाद्या व्यक्तीवर जीव जडतो. त्याचं शारीरिक, मानसिक, वैचारिक सौंदर्य मनाला भुरळ घालत.  अशा व्यक्तीच्या सहवासात मन रमत.  आणि सुरू होतो प्रेमाचा प्रवास. प्रेम हे पाण्याइतकच जीवनावश्यक. जीवनदायी. प्रेमाचा अविष्कार नसेल तर,  आयुष्य निरर्थक, निरस, कंटाळवाणे होईल.

प्रेम दिसत नसले तरी,  त्याचे रंग अनुभुतीतून जाणवतात. कुणाच्या नजरेतून, कुणाच्या स्पर्शातून, कुणाच्या काळजीतून,  कुणाच्या आचारातून , कुणाच्या विचारातून, कुणाच्या सेवेतून, कुणाच्या त्यागातून, कुणाच्या आधारातून प्रेमरंगाच्या विविध छटा  अनुभवता येतात. असं हे रंगीबेरंगी प्रेम,  ह्रदयात जाणवत. . . आणि व्यक्त होताना कुणाचं तरी ह्रदय हेलावून टाकत. हा प्रवास  असतो. . सृजनाचा. माणूस माणसाशी जोडला जातो. परस्परात नातं निर्माण होत.  अनेक विध नात्यातून व्यक्त होणारे प्रेम माणसाला पदोपदी एकच संदेश देत. . . तो म्हणजे. . . ”तू माणूस  आहेस. . ”

एकदा का व्यक्तीला स्वत्वाची जाणिव झाली कि तो स्वतःवर, नात्यांवर,  देशावर प्रेम करायला लागतो. प्रेम हे एक रेशमी कुंपण  असते.  आपणच आपल्या आत्मीयतेने हा परीघ स्वतःभोवती निर्माण करतो. नात्यांचे भावबंध गुंफत  असताना, गुणदोषासकट आपण प्रेमाची बांधिलकी स्विकारतो. वेळ, काळ, पद, पत,  पैसा प्रतिष्ठा,  तन, मन, धन,  सारं काही पणाला लावतो. या प्रेमाच्या रंगात आपण स्वतः तर रंगतोच पण  इतरांनाही रंगीत करतो.

एकतर्फी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा,  आदर, यांच्या पलीकडे जाऊन दुसर्‍या वर हक्क प्रस्थापित करू पहात. . . तेव्हा ते घातक ठरत. कुंपण शेत खात या म्हणीनुसार,  एकतर्फी प्रेम  आधी व्यक्ती, मग कुटुंब, मग समाज,  यांना गोत्यात  आणत. प्रेमाचा  उगम हा सरितेसारखा. प्रेम ह्ददयातून उत्पन्न होत असलं तरी त्याचं मूळ नी प्रिती च कूळ शोधायला जाऊ नये. ही सहज सुंदर तरल भावना,  आपले जीवन  उत्तरोत्तर  अधिकाधिक रंगतदार करत असते.

प्रेमाच्या विविध छटा, त्याचे पैलू, नानाविध  अविष्कार हे आपलेच जीवन रंग  असतात. जीवना तू असा रे कसा, याचा शोध घेतला की  आपोआपच या प्रेमरंगाच्या रंगान आपण निथळू लागतो. विविध ऋतूंप्रमाणे हे जीवन स्तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. . फक्त ते अनुभवता  आले पाहिजेत. अडीच अक्षरात सामावलेलं हे प्रेम,  वळल तर सूत, नाही तर भूत. . या  म्हणीचा प्रत्यय देते. प्रेमाचा रंगीत  अविष्कार कुणाला मानव करतो. . तर कुणाला दानव. . . हे प्रेम रंग किती द्यायचे, किती घ्यायचे. . .  अन् कसे किती उधळायचे,  इतकेच फक्त कळले पाहिजे.

स्वतःचे मी पण हिरावून नेणारे हे प्रेम रंग  जात्यातच असतात मनोहारी. . . ! आईचे काळीज म्हणजे प्रेमरंगाचा वात्सल्य भाव.  आठवणींचा पसा पसरून संस्काराचा वसा वेचत माणूस घडविण्याचं कार्य हा प्रेमरंग करतो. बापाचं काळीज म्हणजे फणसाचा गरा. त्याची आठळी म्हणजे  अमृताचा कोष. . पण ती  आठळी सदैव बाजूला पडते. त्याच्या नजरेचा धाक वाटतो पण त्या धाकात त्याच्या लेकराचा घट घडत  असतो. बाप लेकाचे प्रेम हे सुई दोरा  सारखे. . फक्त जोडणीचा होरा चुकायला नको.

बहिण भावंडे यांच रेशमी कुंपण,  प्रेमाच्या गुंफणीत माया ममतेचं अलवार नातं निर्माण करत. ही गुफण मग सुटता सुटत नाही.  आज्जी, आजोबा काका, काकू, मामा, मामी, हे आधाराचे हात बनून जीवनात येतात.  अनेक संकटांवर लिलया मात केली जाते. ती याच हातांकरवी. सारे आप्तेष्ट, मित्र परिवार यांच्या प्रेमरंगाच्या अंतराला जाणवणारा दंगा हा वर्णनातीत आहे. . . तो ज्यान त्यान अनुभवण्यात जास्त रंगत आहे.

गुरू शिष्य नाते स्नेहभावाचे. पैलू विना हिर्‍याला चमक नाही तसे ज्ञानार्जन माणसाला ज्ञानी करते. सारे जग प्रेमाच्या रंगात रंगत जाताना  आपले अंतरंग फुलून येते. जाणिवा नेणिवा,  साद, प्रतिसाद, राग, लोभ, मोह, द्वेष, मत्सर, सारे षड्विकार प्रेमरंगाला आपापल्या जाळ्यात ओढू पहातात. हे जीवनरंग अनुभवताना  काळजाची भाषा  उमजायला हवी.

प्रेमरंगात रंगताना त्यात होणारी देव घेव प्रेमाचं यशापयश ठरवते. फक्त प्रेमात व्यवहार नसावा. रोख ठोक हिशोब नसावा. . . शेवटच्या श्वासापर्यत स्वतःवर आणि प्रिय व्यक्तीवर  विश्वास ठेवला की हे सारे प्रेमरंग अनुभवता येतात. हा जीवन रस,  हे जीवन सौख्य  अखेर पर्यंत  आपल्या सोबत  असत. त्याचा  अविरत प्रवास

सुरू  असतो. . . .  अंतरातून  अंतराकडे . . . !

 

© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे. 

मोबाईल  9371319798

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – ? आनंदाचं फुलपाखरू ?- श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 ? आनंदाचं फुलपाखरू ?

 

(विगत दिवस आदरणीया श्रीमति रंजना जी को मशाल न्यूज़  नेटवर्क स्पर्धा में पुरस्कार के लिए अभिनंदन। आपने इस आलेख में  मेरे लिए सम्मान जाहिर  किया है  उसके लिए मैं आपका हृदय से आभारी हूँ। आप सभी साहित्यकार मित्रगणों  का स्नेह ही मेरी पूंजी है।  पुनः आपका अभिनंदन एवं  लेखनी को सादर नमन)

आज मशाल न्यूज नेटवर्कने घेतलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला  आणि मला या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला . स्पर्धेला जाताना एक सादरीकरणाची संधी म्हणून गेले. प्रचंड तणाव  असताना सादरीकरण केले.  शुभांगी यशस्वी झाले. व्हिडीओ तयार झाला. त्याची  लिंक आली.

सुरुवातीला भीत भीत मित्र मंडळींना फॕमिली मेंबरला ती लिंक  शेअर केली ,हळूहळू शैक्षणिक समुह काव्य समुहात सुद्धा फिरू माझी कविता घराघरात वाजू लागली .भेटणारा प्रत्येकजण आवर्जून त्या बद्दल बोलू लागला , आणि नकळत आयुष्यातील चाळीशीचे वळण आठवले. या वयात जवळपास आपली मुलं साधारणपणे मोठी झालेली असतात . अगदी दहा  पंधरा वर्षे आई आई करत मागेपुढे घुटमळणारी मुलं शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने एकाएकाने दूर जाऊ लागतात.

सुरूवातीला शरीराने आणि हळूहळू मनाने कार्यक्षेत्र  बदलते  चर्चेचे विषय बदलतात. बरेच वेळा आपल्याला  त्यांची चर्चा  समजत ही नाही मग मुलं बाबांशी, मित्रांशी थोडीफार चर्चा करतात, त्यांचा सल्ला घेतात, ही गोष्ट सुद्धा मनाला  नक्कीच खटकत असे .

आज पर्यंत आपल्या आवडीने कपडेलत्ते खाणे पिणे करणारी मुलांना मित्र, मैत्रीणींचा , सल्ले घ्यावे लागतात हे पाहून कुठतरी चुकल्या सारखं वाटे. प्रत्येक बाबींवर मनसोक्त चर्चा करणारी मुलं मित्रांना फोनवर नंतर बाहेर आल्यावर बोलू म्हणतात, पुरणपोळी खीर आवडीने खाणारी मुलं पिझ्झा बरगर आवडीने खातात आणि कुठेतरी नवरा देखील त्यांना साथ देतो  ही  आशा अनेक गोष्टी ज्या    आजवर फक्त आपल्या मनाप्रमाणे चाललेल्या होत्या त्यात बदल झालेला असतो कुठेतरी आपल्या हातातून सत्ता निसटून जात आहे  पेक्षा आता आपली कुणालाही गरज राहिली नाही ही भावना  अंतरंगात डोकावत असते . आपण एकटे पडत चालल्याची जाणीव वाढायला लागते. यातून चिडचिड वाढायला लागते आणि घरातील माणसे  दुरावत जातात . कारण आपल्या चिडण्या पेक्षा आपल्या पासून दूर राहाणेच योग्य असे त्यांना वाटायला लागतं.

अगदी जीवन नकोस वाटायला लागले . रिकामा वेळ खायला ऊठला. ज्या मुलांसाठी घरासाठी आपण रात्रीचा दिवस करतो. स्वतःची प्रकृती, शिक्षण छंद कशाचा ही विचार केला नाही परंतु आज मात्र हळूहळू चित्र बदलताना दिसत होतं मन खट्टू झालं.

थोडंस थांबून  शांतपणे विचार केला. आपलं तरूणपण आठवले. हवेत तरंगणारे दिवस आठवले. आणि आर्धी चिडचिड नक्कीच कमी झाली .  लक्षात आले की या घराला सावरण्यात आपल्याला स्वतःसाठी करावयाच्या कितीतरी गोष्टी राहून गेलेल्या आहेत अनेक छंदांना आपण तिलांजली दिली होती.

आता आपल्याकडे भरपूर वेळ आहे. मग कुरकुरत कशाला बसायचं ऊठा लागा कामाला . मुख्य म्हणजे रडणारी आणि चिडणारी माणसं कुणालाही आवडत नाहीत त्यामुळे आता स्वतःसाठी जगायचं असं मनाशी ठरवलं . अगदी वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी बी.  ए. फायनलचा फॉर्म भरला तेही इंग्रजी ऐच्छिक घेऊन आता आपल्याला झेपेल का भीती होती परंतु जमलं.पुढे बी. एड . सुद्धा केले. गल्लीत महिला बचत गट सुरू केला .यातून बऱ्याच महिलांना शिलाई मशीन मिर्ची पल्वलायझर, शेवयाची मशीन , छोटी गिरणी, छोटे लेडीज एम्पोरियम सुरू करणे अशी अनेक छोटी मोठी कामे यातून सुरू करण्यात आली. मुख्य म्हणजे रिकामा वेळ सार्थकी लागला. नोकरी आणि घर या कसरतीत मैत्री हा प्रकार जीवनातून जणू हद्दपारच झाला होता, तो पुन्हा सापडला .

कामासाठी का असेना पण अनेक जणींशी गप्पागोष्टी वाढल्या आणि एकटेपणा पळून गेला. आठवड्यातून एकदा गुरूवारी व एकादशीला सत्संगाच्या निमित्ताने रात्री एकत्र जमायला लागलो . भजनाच्या निमित्ताने जुना संगिताचा छंद डोकावू लागला वीस वर्षे माळ्यावर ठेवलेली हार्मोनियम खाली आली. नकळत सूर जुळायला लागले. शिक्षणोत्सव सर्व शिक्षा अभियानाच्या निमित्तानं शैक्षणिक साहित्य निर्मिती करणे शैक्षणिक साहित्य जत्रेत स्टॉल लावणे, इत्यादीमुळे बाजुला सारलेली चित्रकला पुन्हा उपयोगात आली . ओळखीच्या मोठ्या मुली शिवण काम शिकवणे, रुखवताचे साहित्य शिकवणे, अशा अनेक गोष्टी त्याही विनामूल्य असल्यामुळे सहाजिकच अनेकजणी जवळ आल्या जगण्याचा सूर कुठेतरी गवसला आनंदाचे वारे पुन्हा वाहू लागले.

यात भर पडली ती स्मार्ट फोनची whats app सुरू झाले सुरूवातीला मैत्रीणींचे समुह नंतर शैक्षणिक समुह जॉईन केले. उत्तम सादरीकरणामुळे अनेक समुहात संचालिका म्हणून कामाची संधी मिळाली. आणि अचानक एक दिवस काव्य समुहाची लिंक मिळाली.समुह जॉईन केला आणि पंचवीस वर्षापूर्वीचं कवी मन नकळत जागे झाले. हा कदाचित दैवयोग असेल परंतु मला या समुहात सुद्धा संचालिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली . आयुष्यात कधी काव्य संमेलन पाहायला जाण्याचं सुद्धा स्वप्न न पाहिलेली मी परंतु नागपूर शिलेदार समुहाच्या संमेलनात कविता सादरीकरणाची संधी मिळाली आणि खूप आनंद झाला . राज्यस्तरीय समुहातून अनेक कवी कवयित्रींची ओळख झाली .आणि स्वतःचे समुह तयार केले . दररोज लेखन वाढले .

अनेक दिग्गज लेखक कवी कवयित्रींच्या ओळखी झाल्या कवी संमेलनातील सहभाग वाढला आणि आत्मविश्वास सुद्धा वाढला . यातच मशाल न्यूज नेटवर्क ने काव्य स्पर्धा ठेवली आणि गुपचूप लिहिणारी मी नकळत घराघरात पोहचले. या स्पर्धेत सुद्धा राज्यात दुसरा नंबर मिळाल्या मुळे झालेला आनंद नक्कीच शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे.

दरम्यानच्या काळात हेमंतजी बावनकर यांच्या वेबसाईटवर ब्लॉक लेखिका म्हणून लेख कथा लेखनाची संधी मिळाली. आयुष्यातील पन्नास वर्षात अनुभवलेले अनेक अनुभव नकळत कागदावर उतरायला लागले.मुख्य म्हणजे हेमंतजींच्या प्रोत्साहनामुळे लेखनास चालना मिळाली.

आज मला प्रश्न पडला की आयुष्यात एवढं भरभरून करण्यासाठी बरच काही असताना आपण म्हातारे झालो . आपली कुणाला गरज नाही या विचाराने कुढत का बसावं आपले ज्ञान अपडेट करा . भरपूर वाचन करा ,जमेल तसे लेखन करा. भरपूर व्यायाम करा. तुमच्याकडे इतरांसाठी वेळ नाही हे लक्षात आल्यानंतर घरातल्यांना सुद्धा तुमची किंमत कळेल . मुख्य म्हणजे हे सर्व हसत खेळत करा.

आयुष्यातील या वळणावर जसा जसा वेळ मिळत जाईल तसे तसे एकेक उपक्रम वाढवत जा म्हणजे आयुष्यातील ही पोकळी जाणवणार नाही . मुख्य म्हणजे रडणारी आणि चिडणारी माणसं कुणालाही आवडत नाहीत त्यामुळे संयमाने वागा. लहानात लहान , तरूणांत तरूण होऊन वागावं आपलीच रट लावून धरता.

आपण इतरांचे जर  ऐकायला शिकलो तर  पाहा जे आनंदाचे फुलपाखरू पकडण्यासाठी तुम्ही अकांड तांडव करत होतात . ते फुलपाखरू नकळत तुमच्या खांद्यावर येऊन बसेल अगदी सहजपपणे . . . . !

एक आनंदी सर्व समावेशक समाजशील प्रौढत्व आकाराला येईल जे अगदी प्रसंन आणि परिपूर्ण असेल.

 

©  रंजना लसणे✍

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – ☆ स्त्री कालची आणि आजची ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ स्त्री कालची आणि आजची ☆

(प्रस्तुत है  कविराज विजय यशवंत सातपुते जी  द्वारा  लिखित मराठी आलेख  ☆ स्त्री कालची आणि आजची ☆  जो आपको  हमारे पुरातन एवं नवीन साहित्य और समाज में वर्णित नारी के विभिन्न रूपों के साथ ही पुरुष प्रधान समाज में  उसके संघर्ष से अवगत कराएगा

रामायण  आणि महाभारत  ही आपली महाकाव्ये.  या दोन पौराणिक कथानकातून स्त्री ची विविध रूपे समोर आली.  अहिल्या,  द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या स्त्रिया महान पतिव्रता म्हणून जनमानसात रूजल्या गेल्या.  यांचे केवळ स्मरण केल्याने महापातकांचा नाश होतो  असे संस्कार या काळात केले गेले.

संत वाङमय,  पंत वाड़मय आणि शाहिरी फड यातून वर्णिलेली स्त्री लोकसाहित्याचा विशेष भाग ठरली. जनमानसात खोलवर रूजलेली ही स्त्री,  समस्त नारीशक्ती समाजाशी संवाद साधत गेली. माया, ममता  आणि करूणा या भावनांच्या मुशीतून घडलेली ही स्त्री  त्याग, समर्पण  आणि विश्वास या  त्रिसूत्रीतून स्वतःला, कुटुंबाला,  समाजाला घडवीत गेली.

पौराणिक  काळातील स्त्री पातिव्रत्य, हे अस्त्र समजून स्वसंरक्षण करीत गेली. सत्यवती, माद्री, कुंती गांधारी, सुनिती, सुरूची, आदिती,  छाया, अनुसया,  लक्ष्मी, सरस्वती, पार्वती, यशोदा, देवकी, रूक्मिणी सुभद्रा  या, सर्व स्त्रियांनी उत्पत्ती,  स्थितीआणि लय  यांचा समतोल राखण्यासाठी वेळीवेळी सत्व परीक्षा दिली.  पुरुष प्रधान संस्कृती चा संघर्ष त्या  काळापासून आज तागायत ही स्त्री करीत आहे.

कालची स्त्री जेव्हा जेव्हा बंड पुकारून जागृत झाली तेव्हा तेव्हा ती समाजासाठी  आदर्श ठरली. पण हे  आदर्श पण टिकवायला तिला स्वतःला  अतोनात कष्ट सहन करावे लागले.  संत मीराबाई, संत जनाबाई, संत सखू, संत कान्होपात्रा, संत मुक्ताबाई यांचा जीवन प्रवास  अत्यंत कष्टमय होता.  यांच्या शब्द सुमनांची वैजयंती माळा विठ्ठलाच्या गळ्यात पडली पण त्यासाठी समाजकंटकाची वासनांध नजर, कर्मठ रूढी परंपरांची  तीक्ष्ण धारधार सुई काळजात आरपार टोचून घ्यावी लागली.

ऐतिहासिक कालखंडात स्त्री ने पौराणिक काळातील शस्त्र विद्येचा अभ्यास करून न्यायासाठी,  संघर्षासाठी रणांगणात उतरली.   छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मदात्री एकमेव ठरली. यानंतर  अशी  स्त्री जन्मली नाही  असे खेदाने म्हणावे लागेल. कारण  आजतागायत प्रति शिवाजी जन्माला  आलेला नाही.  शिवाजी महाराजांनंतर शिवशाहीतील दोन स्त्रीयांनी वर्षानुवर्षे तुरूंग वास भोगला.  महाराणी येसूबाई,  आणि ताराबाई या दोन स्त्रिया होत.  एकीने स्वराज्यासाठी यवनी कैद स्विकारली तर ताराबाई सवती सुभ्यामुळे स्वराज्यातच कैदेत होत्या. महाराणी जोधाबाई,  झाशीची राणी, राणी चन्नमा, चांदबिबी, मुमताज, रमाबाई,  आनंदी बाई या स्त्रिया शेवटपर्यंत लढा देत गेल्या.

या  सर्व इतिहासाचा मागोवा घेत सावित्री, रमाई,अहिल्याबाई,  आनंदी जोशी, रमाबाई रानडे या स्त्रिया स्वतः साक्षर झाल्या. मुलगी शिकली प्रगती झाली हे ब्रीदवाक्य  इतिहासात कोरले गेले ते यांनी केलेल्या समाज कायामुळे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला  अत्यंत विश्वासाने मोठ मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. कला,उद्यम  आणि संस्कृती या  क्षेत्रात महिला  आघाडीवर आहेत. पण चार भिंतीच्या आत  आजची स्त्री  अजूनही  असुरक्षित आहे.  कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणार्‍या स्त्रिया त्यांच्या वेदना  आजही कुठेतरी धुमसत आहेत.

कालची स्त्री आणि आजची स्त्री रूपे आणि स्वरूप बदलले आहे. पण त्याग, समर्पण,  अवहेलना स्री ला आजही चुकलेली नाही.  आजची स्त्री समाजात  अर्थार्जनासाठी बाहेर पडताना  आजही सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून पुरूषी  अहंकाराचा सामना करीत कुटुंबाला सावरीत आहे.  सत्ता, पैसा आणि वासना यांचा उपभोग घेण्यासाठी  आजही स्त्री वापरली जाते, विकली जाते,  रूढी परंपरांच्या नावाखाली नागवली जाते.

विभक्त कुटुंबाची वाढत जाणारी संख्या सासू सून संघर्ष, माहेरचे अती लाड,  इगो प्रोब्लेम,  पैशाची गुर्मी यात अजूनही स्त्री प्रमुख पात्र म्हणून खेळवली जाते.

अनाथ  आश्रम,  वृद्धाश्रम,  पाळणाघर या समस्येला सामोरे जाणारी स्त्री समाजाकडून  आजही दोषी ठरवली जाते. माता, भगिनी, पत्नी,  सखी या रूपात समोर येणारी स्री  आजही पुरूषी अत्याचाराला बळी पडत आहेत.

काळ बदललाय, माणूस बदललाय , जमाना बदललाय. . .असः नेहमी ऐकतो  आपण. कोणी घडवले हे बदल? माणसानच आपली विचारसरणी बदलली  आणि दोष बदलत्या काळाला आणि स्त्री ला पुरूष वर्ग परस्पर देऊन  मोकळा झाला. आपण समाजात रहातो. . . समाजाचे देणे लागतो. . . ही संकल्पना प्रत्येकाने सोइस्कर अर्थ लावून बदलून घेतली. स्वतःची जीवनसंहिता ठरवताना प्रत्येकाने माणसापेक्षा पैशाला  अधिक महत्त्व दिले  अन तिथेच नात्यात परकेपणा आला.

☆ चार पायाच्या प्राण्यांना ☆

☆ हौसेने पाळतात माणसं ☆

☆ दोन पायाच्या  आप्तांना ☆

☆ मोलानं सांभाळतात माणसं ☆

हे आजचं वास्तव आहे.   विभक्त कुटुंब पद्धतीतून जन्माला आलेली ही विचार सरणी. आज ”हम दो हमारा  एक”  चा नारा लावणारे सुशिक्षित पाळीव, मुक्या प्राण्यांवर अतोनात भूतदया दाखवतात.  अन जन्मदात्या आईवडिलांना मात्र वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. मी मी म्हणणारे सुशिक्षित पतीपत्नी दिवसरात्र घराबाहेर रहातात. नवी पिढी सोशल मिडिया नेटवर्किंग मधून स्वतःचे भविष्य साकारताना दिसते. एकविसाव्या शतकातील घर संवाद साधताना कमी पण वाद घालताना जास्त दिसतात.  वाद वाढले की माणस माणसांना टाळायला लागतात. अशी नात्यातली अंतरेच नात्यात विसंवाद  आणि दरी निर्माण करतात.

नवीन पिढीला  आता संस्कारापेक्षा व्यवहार जास्त महत्वाचा वाटतो. पैसा  असेल तर माणूस ताठ मानेने जगू शकतो हा  अनुभव त्याला  आपल्या माणसात दुरावा निर्माण करायला भाग पाडतो. जुन्या पिढीतील नातवंडे सांभाळणारी जुनी पिढी, त्यांचे विचार,  नव्या पिढीला नकोसे वाटतात. ”पैसा फेको तमाशा देखो” हे ब्रीद वाक्य घेऊन नवीन पिढी माणुसकी पेक्षा  मतलबी पणाला प्राधान्य देताना दिसते.

वृद्धापकाळी हवा असलेला मायेचा ओलावा, समदुःखी, समवयस्क व्यक्ती कडून मिळाल्यावर  एकटा जीव वृद्धाश्रमात आपोआप रुळतो. स्वतःच दुःख विसरायला शिकतो.  प्रत्येक व्यक्ती  आपला राग आपल्या व्यक्ती वर किंवा पगारी नोकरावर काढू शकते.  वृद्धाश्रमात या दोन्ही गोष्टी शक्य नसल्याने माणूस नव्याने जगायला शिकतो. स्वतःच्या विश्वात रममाण होण्यासाठी स्वतःच्या भावनांना  आवर घालतो आणि हा नवा घरोबा स्विकारतो.

नवीन पिढीला घडविण्यात आजची स्त्री  कुठेतरी कमी पडत  आहे का? याचा विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

आपण कुणाचा  आदर्श घ्यायचा? कुणाचा आदर्श समोर ठेवायचा?  आपली जबाबदारी,आपली कर्तव्ये हे सारे जर  आपण  आपल्या  आर्थिक परिस्थितीशी निगडीत केले तर हा गुंता सोडवायला  अतिशय कठीण जाईल.

आपण  आणि आपली जबाबदारी यात जोपर्यंत  ”आई बाबा ‘, यांचा समावेश होत नाही तोपर्यंत ही पळवाट आडवाटेन या समाजव्यवस्थेला,  कुटुंब व्यवस्थाला दुर्बल करीत रहाणार यात शंका नाही.

मी माणसाचा आहे, घरातील बाई माणूस माझ्या कुटुंबाचा घटक आहे त्याच मन जपणे ही माझी जबाबदारी  आद्यर्तव्य आहे हे जोपर्यंत पुरुष प्रधान संस्कृती  मान्य करीत नाही तोपर्यंत ही पळवाट अशीच निघत रहाणार. आपण घडायचं की आपण बिघडायचं स्री ला आधार द्यायचा की  भार व्हायचं हे  आता ज्याचं त्यानचं ठरवायचं.

कालची स्त्री आणि आजची स्त्री  हा विचार करताना मन खालील काव्यपंक्तीवर स्थिर होते.

☆ थोर महात्मे होऊन गेले,  चरीत्र त्यांचे पहा जरा ☆

☆ आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध खरा ☆

या नररत्नांना जन्मणारी ही माऊली आज समाजात सुरक्षित आहे का? हा प्रश्न  ऐरणीवर आला आहे.

या देशाच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती पदावर राहण्याचा मान मिळूनही  ☆आजची स्त्री☆ उपभोग्य वस्तू समजली जाते हे आपले  दुर्दैव आहे. विश्वबंधुतेचा आणि समानतेच्या नारा देऊन  आपण ही नारीशक्ती आद्य ईश्वराचे रूप मानून स्त्रीला संघटीत आणि सुरक्षित करण्याची जबाबदारी  आपल्यावर  आली आहे.  तरच  आपण  अभिमानाने म्हणू शकू.

 

© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे. 

मोबाईल  9371319798

विजय यशवंत सातपुते.

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – *माझ्या गावी भेट दिलीच पाहिजे कारण….* – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

माझ्या गावी भेट दिलीच पाहिजे कारण….

(प्रस्तुत है  कविराज विजय यशवंत सातपुते जी  का  मराठी आलेख  “माझ्या गावी भेट दिलीच पाहिजे कारण….” अत्यंत हृदयस्पर्शी  है।  श्री विजय जी को जितना प्रेम अपने साहित्य से है उनके गाँव से उनका प्रेम उनके साहित्य से किसी भी दृष्टि से कम नहीं है। उनके गाँव से जुड़ी स्मृतियों से सजी इतनी भावप्रवण रचना के लिए उनकी लेखनी को नमन।)

गाव बदललं, गावातली माणसं बदलली, पण मनातल गाव, गावातलं घर, ते मात्र जसंच्या तसं राहिलं. आठवण झाली  . . . कुठं काहीही कार्यक्रम नसताना, कविसंमेलनाच कारण सांगून घराबाहेर पडलो, नीट तडक गावची एसटी धरली.

जवळ जवळ दहा वर्षांनंतर गावी येत होतो. गावच्या घरापर्यंत  आता टमटम जात होत्या. मला गाव पहायचा होता. गावातले बदल जवळून पहायचे होते. तेली आळीतला लाकडी घाणा. वेशीवरचा मारूती, शाळेजवळचा पिंपळाचा पार, दत्त मंदिर, राम मंदिर, बाजारपेठ, लालू शेठची पतपढी,कासार आउट, मोमीन  आउट, पोस्ट ऑफीस, ग्रामपंचायत कार्यालय, सार सार नजरेखालून घालायचं होत. गावात उतरलो अन् टवाळ पोरागत भिरभिरत्या नजरेने गाव बघू लागलो.

माणस भेटत होती. ओळखीचं हसत होती. जुजबी चौकश्या करीत  आपापल्या कामाला लागत होती. पारावरचे म्हातारेही हातची तंबाखू,  अन तोंडचा विषय सोडायला तयार नव्हते. .

”एकलाच आलासा जणू? पोराबाळांना तरी  आणायचं,  आरं, आंबे, फणसाचा सिझन हाय. . . गावचा रानमेवा तुमची पोरं खाणार कवा ?घेऊन यायचं त्यानला बी , म्होरल्या बारीला ध्यानी ठेव बर. ” असा जिव्हाळ्याचा संवाद करीत,गावच्या मातीचा सुगंध मनात भरून घेत गावच्या घरात शिरलो.

गावाकडं एक बरं असत. . .  अचानक जाऊन भेटण्याची मजा काही औरच  असते. थोडी गडबड, धावपळ, धांदल  उडते. काहिंची थोडक्यात चुकामूक होते, त्यांना भेटण्या साठी मुक्काम वाढवण्याचा  आग्रह होतो. मी ही मुक्काम वाढवला. कार्यक्रम  उशीरा संपणार असल्याची  आणखी  एक लोणकढी थाप पचवली.अन गावी जाण अपरिहार्य  असल्याचं पटवून दिलं.अन् गावच्या माणसात हरवून गेलो. मनातल्या गावातनं ,प्रत्यक्ष वास्तवात जाताना थोड  अवघड जातं. पण जुन्या आठवणी न भेटलेल्या माणसांची  आठवण भरून काढतात.

माझ्या गावाने. नुकतेच तंटामुक्त गाव म्हणून नावलौकिक प्राप्त केला होता. दारू नको दूध प्या सारखे  उपक्रम गावातली युवक मंडळी पुढाकार घेऊन राबवीत होती. गावात पिढ्यान पिढ्या पैलवानकी करणार्‍या कुटुंबातील नवयुवक सैन्य दलात भरती झाल्याचे कळले. अभिमानाने  उर भरुन  आला. सामुदायिक विवाह, प्रोढ शिक्षण,  बचत गट, बालवाडी, अंगणवाडी अशा उपक्रमातून गावातील महिला मोठय़ा उत्साहात सहभागी झाल्या होत्या.

अरू काकाचा मतीमंद पोरगा, गावातल्या वातावरणात स्थिरावला होता. कोंबड्या पाळायचा,चार म्हशी, दोन दुभत्या गायी, चरायला न्यायचा. त्यांची देखभाल करायचा. धारा काढायचा. चार घरी दूध पोचवायचा. गतीमंद होता पण मतीमंद नव्हता. निसर्गाच्या सानिध्यात, मनसोक्त जगायचा. वेड वाकड का होईना, पोरगं नजरेसमोर हसतयं यात  आई बापाला समाधान वाटत होत.

गावातल्या घरान गावकी, भावकी जीवापाड जपली होती. वाटण्या झाल्या होत्या. वेळप्रसंगी  मन दुखावली तरी  माणस दुरावली नव्हती. माझ जाण नसल तरी भाऊ , पत्नी,  आई , वहिनी, काका, काकी, आज्जी, यांनी घरोबा जपला होता. वाडवडिलांनी राखलेली वाडी,  फुलवलेलं परसदार, आजही  सणावाराला वानवळ्याच्या रूपात भरभरून प्रतिसाद देत होतं.

भावकीतले चार हात शेतीत, फुलमळ्यात,फळबागेत, परसात, राबायचे, त्यांच्या कष्टान काळ्या मातीचं सोनं व्हायचं. ज्या मातीत लहानपणी खेळत लहानाचे मोठे झालो ती माती राबणारा हातांना भरभरून यश देत होती. माझं गावाकडं प्रत्यक्ष येणं नसलं तरी गावची भावकी संपर्कात होती. घरातले कुणी ना कुणी तरी गावाकडे फेरफटका टाकायचे. त्यामुळे ख्याली खुशाली कळायची. पण रानवारा प्रत्यक्ष श्वासात भरून घेण्याचा  आनंद काही औरच  असतो. त्याचा आनंद मी घेत होतो.  जमेल तितके गाव नजरेत साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो.

शहरातील बरीचशी खरेदी माझ्याच सल्ल्याने व्हायची. कथा, कविता, जशी माणसाला जगायला शिकवते ना तसा हा निसर्ग, गावच घर जोडून ठेवण्यात यशस्वी ठरला होता. कुणी फुले, फळे, दूध, दही, ताक, लोणी, तूप, खवा, खरवस,  अंडी ,नारळ ,सुपार्माया मागायला यायचं. बाहेर पेक्षा निम्मा किमतीन परसबागेत फुलवलेलं विकलं जायचं. धार्मिक कार्यात तर सढळ हाताने हा दानधर्म व्हायचा.

साहित्यिक जसा साहित्यात रमतो ना, तसं गावच घर या निसर्गरम्य परिसरात व्यस्त झालं होत. लेखकाने कागदावर लेखणी टेकवावी अन  (मोबाईलची बटणे दाबावीत..) अन प्रतिभा शक्तीने भरभरून दान पदरात घालाव तशी गावच्या घरी चारदोन जण मशागत करायची. घरातली जुनी जाणती परसबाग फुलवायची. कुणाला रोजगार मिळाला होता. कुणाला आधार मिळाला होता. गावचा निसर्ग माझ्या आठवणींशी स्पर्धा करीत मला  एकट पाडीत होता. निसर्ग त्याच काम चोख करीत होता.  करवंद , आंबा, काजू, फणस, केळी, पेरू, नारळ, पोफळी यांची वर्णन मी जितक्या उत्स्फूर्ततेने करायचो, तितक्याच  उत्कटतेने निसर्ग त्या त्या ऋतूत भरभरून फुलायचा.

दोन दिवसांनी जेव्हा भरभरून रानमेवा घेऊन घराकडे निघालो ना, तेव्हा त्या जडावलेल्या पिशव्यां सारखंच मनही भरून  आलेलं. दहा वर्षानंतर अचानक मला पाहिल्यावर आजीच डोळही असंच भरलेलं. निसर्गाच हे देणं, मांगल्याचं समृद्धीचं लेण अजमावून घेण्यासाठी मी ठरवल.  माझ गाव जमेल तस विकसित होत होत. गाव त्याच्या परीने गावातील माणसांना  आपलेपणाने बांधून ठेवत होत.  गावातून शिक्षणासाठी बाहेर पडलेला मी…. माझ्या कडे गाव मोठ्या  आशेने बघते आहे. मायेने साद घालते आहे  असा भास सारखा होत होता.  पाय जडावले होते.

 

आता जास्तीत जास्त वेळा, वेळ काढून गावाकडे यायचंच. माझ्या या गावी भेट दिलीच पाहिजे. . जमेल तेव्हा जमेल तसा वेळ काढलाच पाहिजे. माझ नाव मोठ करताना गावाच नाव देखील मोठ झाल पाहिजे माझा विचार सर्वांना बोलून दाखवला तोच दारातली बकुळीची फुलं अंगावर पडली… परतीचा  अहेर द्यावा  असं सुगंधी लेणं लेवून मी सर्वांचा नाही निरोप घेतला.

अचानक पणे गावात जाण्याचा योग मनात गावासाठी काहीतरी करायला हवे हा विचार मनात दृढ करीत गेला. त्याकरिता काय काय करता येईल याचा विचार करीत शहरातील घरी परत आलो.  परतीचा प्रवास करताना हाच दरवळ मनात ठेवून गावच घर,  आणि बाजूचा निसर्ग यांचे  आभार मानत शहरातल्या प्रापंचिक घरात प्रवेश केला. निसर्गाच हे अविरत देणं मनात साठवीत…. प्रसन्न मनाने माझ्या दुनियेत परतलो. काही जिवंत अनुभूती सोबत घेऊन. . . . !  माझ्या गावात पुन्हा पुन्हा यायला हवं.

 

© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे. 

मोबाईल  9371319798

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – *कवीता माझी, मी कवितेचा. . . !* – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

*कवीता माझी, मी कवितेचा. . . !*

(प्रस्तुत है  कविराज विजय यशवंत सातपुते जी  का  “विश्व कविता दिवस – 21 मार्च” पर उनके कवि-हृदय की विवेचना करता यह आलेख। आप इस आलेख  के माध्यम से जान सकते हैं कि कविता उनके व्यक्तिगत जीवन से कितनी गहराई तक जुड़ी हुई है।)

*कवित्* हा मुळ शब्द. याचा अर्थ गुणगुणणे  असा  आहे.  आशयघन शब्द रचना गुणगुणत  असताना, काव्य गुण, शब्दालंकारांनी ती नटत जाते. मनात  आकारते,  कागदावर साकारते,  ह्रदयसुता म्हणून जन्माला येते. कविता स्वतः जगते, व्यक्त झालेल्या शब्दातून..  आणि जगायला शिकवते मिळालेल्या  अनुभुतीतून. म्हणूनच मी म्हणतो, ”कविता माझी. . . मी कवितेचा” !

कवितेमधून मनोरंजन व्हावे, यापेक्षा प्रत्यक्ष कविता जगताना, घेतलेल्या  अनुभवांच प्रगटीकरण कवितांद्वारे व्हावे  असे मला वाटते. कवितेमधून एक माणूस दुसर्‍याशी जोडला जावा. परस्परांमध्ये विश्वबंधुतेचं नात निर्माण व्हावं,  या  उद्देशाने  कवितेची संवाद साधत गेलो.  आणि या संवादातूनच माझी जडणघडण सुरू झाली.

 

*साहित्यिक म्हणजे मूर्तीमंत प्रतिभा* आणि *रसिक म्हणून मूर्तीमंत अक्षरे* असं मी मानतो.

या रसिकांनी (मूर्तीमंत अक्षरांनी) माझ्या प्रतिभा शक्तीला दिलेल वरदान म्हणजेच ही  *अक्षरलेणी*

 

या कवितेन मला मुलीच प्रेम दिले.  आता ही  ह्रदयसुता रसिक घरी सुखाने नांदते आहे.  एक  ओळख जेव्हा कला कलाकारांना मिळवून देते तेव्हा तो कलाकार सर्वस्वी त्या कलेचा  आणि त्या कलेवर प्रेम करणार्‍या तमाम रसिक मायबापांचा होऊन जातो.

कोरी पाटी जीवनाची. त्यावर कवितेचा श्रीगणेशा केला जातो. माझी कविता साधी सोपी आहे. त्यात  उथळ पणा  नाही. विद्रोहाचा टाळ्यांसाठी घेतलेला जातीवादी तडका नाही. ही कविता सौंदर्य वादी असली तरी  व्याकरण दृष्ट्या सालंकृत आहे.  माझ्या कवितेत स्वप्न रंजन  असले तरी वास्तवाचे भान  आहे.  आशा वादी  असली तरी मर्यादाशील आहे. कविता लाघवी आहे. माझ्या इतकाच रसिकांना ही तिने  लळा लावला आहे.

 

*लेक माझी सासुराला आज  आहे जायची

एक कविता द्यायची अन् एक कविता घ्यायची*

 

रसिकांनी दिलेली प्रतिक्रिया ही देखील एक कविता  असते हे जेव्हा जाणवलं तेव्हा  खर्‍या  अर्थाने कविता जगायला शिकलो. कविता कशी असावी हे कळण्याअगोदर कविता कशी नसावी हे कवितेनच मला शिकवल. अबोल कविता बरच काही सांगून जायची. म्हणून जमेल तेव्हा जमेल तितके तिला तिच व्यासपीठ मिळवून देतो. ते ही कुठलाही  अट्टाहास न करता. कविता  ऐकायला देखील तितकीच  आवडते जितकी सादर करायला  आवडते. माझ्या  इतकच रसिकांच्या मनात ही तीने घर निर्माण केले आहे.

 

”अक्षरांना अक्षरांची आस आहे लागली

काव्यप्रेमी रसिकांची इथेच वृत्ती दंगली.”

 

अशी भूमिका ठेवून, वाचन, लेखन, चिंतन, मनन कलाव्यासंग  जोपासत आहे.  अक्षर अक्षर नेणून निर्मिलेली ही कविता कधी छंद मुक्त तर कधी छंदोबद्ध होऊन समाजात सन्मानाने वावरते आहे.  माझी कविता चारचौघात वावरताना तिच्या नावापुढे माझं नाव लावते याहून दुसरे *सौभाग्य*  (शत जन्माचे भाग्य ) कोणते?

आज पूर्ण तीन दशके कविता माझी  आहे. ती माझी  आहे,  माझी राहिल. माझ्या नंतरही  आमचे नाते रसिक मनात जीवंत ठेवण्याइतकी कार्यप्रवण वाटचाल तिने केलेली आहे. म्हणूनच अभिमानाने सांगावेसे वाटते

 

*कविता म्हणजे पायसदान

कविता म्हणजे एक दुवा

माणूस माणूस जावा जोडत

जगण्यासाठी मंत्र नवा.! *

 

© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे. 

मोबाईल  9371319798

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – * माझ्या अंगणातील पऱ्या * – सुश्री रंजना लसणे

सुश्री रंजना लसणे 

*माझ्या अंगणातील पऱ्या*

(आदरणीया सुश्री रंजना लसणे जी के शिक्षिका/लेखिका हृदय का अभिनंदन।  इस अत्यंत शिक्षाप्रद एवं हृदयस्पर्शी आलेख के लिए सुश्री रंजना जी को सादर नमन)

कन्या अभिमान  दिना निमित्त सर्वांच्या कविता कथा लेख वाचले आणि तीस वर्षा पूर्वीचे दिवस आठवले. पहिल्या मुला नंतर एक गोजिरवाणी परी आयुष्यात यावी आपल्याला अवगत सर्व कलागुणांनांनी एक संपन्न आपली प्रतिकृती निर्माण करावयाची खूप इच्छा होती आपल्याला मुलगी या कारणामुळे ज्या गोष्टी करण्यापासून वंचीत राहावे लागले ते सर्व काही तिला भरभरून द्यायचं होते .परंतु पुन्हा नशीबानं कलाटणी दिली याही वेळी मुलगाच झाला. मन खट्टू झाले परंतु त्याच क्षणी ठरवलं आपल्या भोवती बागडणाऱ्या या सोनपऱ्या आपल्याच समजून वागायचं.

जेव्हा आपण एखाद्याला मनापासून आपलं मानतो तेव्हा त्याची सर्वस्वी जबाबदारी आपलीचं ठरते सातवी पर्यंत आणि तीही कन्या शाळा असल्यामुळे शेकडो चिमण्याची चिवचिव दिवसभर असायची, काहीजणी तर अगदी रात्री अंधार पडे पर्यंत घरीच असायच्या.

लहानपणी आई अनेक गोष्टी साठी का रागवायची हे आता समजायचं. आपल्या चिमणीवर कुणाचीही वाईट नजर पडू नये हा त्या मागचा मुख्य उद्देश तेव्हा कळायचा नाही आईचा रागही यायचा परंतु आता मात्र माझ्यातली आईचं जागी व्हायची. तसं आमचं बालपण लाडात परंतु कडक शिस्तीत गेलेले असल्यामुळे आईची तीच करडी जरब माझ्यात नकळत डोकावत असे. मुलींचा लाड ही खूप करायची परंतु शिस्त मोडली की सगळं बिघडायचं. मुलीही मला राग येणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यायच्या. कधीकधी वाटायचं आपण हुकूमशाही पद्धतीने वागतो का?

एकदा कॉलेजमध्ये असणाऱ्या सहासात मुली कुठल्यातरी कार्यक्रमाला जाण्यासाठी अगदी नटून थटून निघाल्या होत्या. खूप सुंदर दिसत होत्या गप्पांच्या नादात त्यांनी मला जवळ येईपर्यंत पाहिलं नाही अचानक एकीचं लक्ष गेलं आणि सगळ्याजणी चक्क जवळच्या दुकानात शिरल्या लिपस्टिक पुसलं केस आवरले. आणि खाली मान घालून निघून गेल्या त्या दिवशी मला खरंच खूप वाईट वाटलं. आज पासून रागवायचं नाही पक्कं ठरलं. या घटनेने  नकळत सुखावले सुद्धा. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुद्धा आपला शब्द मुलं जपतात यातचं खूप काही जिंकल्यासारखं वाटलं. यापुढे मुलींना रागवायचं नाही असं मनोमन ठरवलं परंतु व्यर्थच माझी छाप ठरली ती ठरली.

आजही लग्न झालेल्या मुली माहेरी आल्या की आवर्जून घरी येतात काही तर घरी बैग टेकली की थेट इकडेच निघतात. काही जावई स्वतःच आणून सोडतात. अगदी धन्य झाल्या सारखं वाटतं. आपल्याला मुलगी नाही ही सलं कुठल्या कुठं पळून जाते. ज्यांना मुली आहेत त्यांना मी तेव्हा का रागवायची ते प्रकर्षाने जाणवतं. त्या जेव्हा मोकळेपणानं हे कबुल करतात तेव्हा आपण हुकुमशाही पद्धतीने वागून चूक केली ही सलं सुद्धा आनंदात बदलते.

माझ्या दोन सुनबाई सोनपावलांनी येतील तेव्हा येतील परंतु आजही मी अनेक सोनपऱ्यांची  परिपूर्ण आई असल्याचे सुख नक्कीच अनुभवत आहे.

आज कन्या अभिमान दिनाच्या माझ्या सर्व कन्यकांना हार्दिक शुभेच्छा 

      कळत नकळत दुखावल्या बद्दल दिलगिरी व्यक्त करते

आपली ….

रंजना मधुकर लसणे

© रंजना लसणे
बाळापूर आखाडा,  हिंगोली मो. -9960128105

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – * सून…? सून…?…..कसमसे ! * – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

* सून…? सून…?…..कसमसे ! *

(ज्येष्ठ मराठी साहित्यकार सुश्री प्रभा सोनवणे जी  का e-abhivyakti में स्वागत है।  सास-बहू के सम्बन्धों पर आधारित सुश्री प्रभा सोनवणे जी का यह  विनोदपूर्ण आलेख निश्चय ही आपका हृदय प्रफुल्लित कर देगा।)  

सासू सुनेचं नातं हे एक अजबच रसायन आहे! दोघींच्या एकमेकींकडून असलेल्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नाहीत!

सगळ्यात प्रथम माझ्या नजरेसमोर येते माझी आजी (आईची आई) कोकणात आजी आजोबा गावाकडे रहायचे आजोबा नोकरी तून सेवानिवृत्त झाल्यावर शेती करायचे. …आजी आजोबा दोघेही सुशिक्षित! अगदी देवमाणसं !

सूना मुंबई ला असायच्या त्या ही सुशिक्षित घरंदाज…पण त्यांच्या मध्ये कधीच सुसंवाद घडलेला मला आठवत नाही…कर्तव्य केली त्यांनी  ..पण खुप सुंदर खेळीमेळीचे संबंध असायला काही हरकत नव्हती…पण एक अंतर जाणवायचंच त्या नात्यात!

एकदा मामांच्या पायाला काहीतरी झालं होतं ते आजी ला दाखवत होते …आजी म्हणाली “रिंग वर्म म्हणतात त्याला!” यावर आजी तिथून उठून गेल्यावर मामी म्हणाल्या,”इंजिनिअर मुलाला आई इंग्रजी शिकवतेय”!

सासू ची टर उडवणं हा सगळ्या सूनांचा आवडता विषय असावा!

दुसरी सासू म्हणजे इकडची आजी वडिलांची आई त्या अशिक्षीत होत्या, पण स्वतःची सही करायला शिकल्या होत्या. त्या अंगठा द्यायच्या नाहीत सही करायच्या “कलावती शंकरराव जगताप” सूनांनाही अहो जाहो म्हणायच्या पण सूनांशी त्यांचंही फारसं पटलं नाही!

एकदा त्या स्वतःशीच बोलत होत्या,” तशाच पडल्या चतुर,एक ही नको आवडायला आणि निवडायला…सगळ्या सारख्याच” हे त्या सुनांविषयी बोलताहेत हे मला समजलं होतं!

माझ्या सासूबाईंशी ही माझं फारसं पटत नव्हतं पण माझ्या विषयी त्यांच्या मनात सॉफ्ट  कोर्नर आहे हे जाणवायचं!

आज समवयस्क मैत्रिणी जमलो की सूनांचा विषय निघतोच!

सून हा प्रत्येकीचा जिव्हाळ्याचा विषय पण त्या नात्यात जिव्हाळा असत नाही ही खंत!

माझी एक मैत्रीण  खुप कामसू, सुगरण, गृहकृत्यदक्ष, आणि कर्तृत्ववानही! सून नोकरी करते, ही घरात चविष्ट स्वयंपाक बनवते, नातवाला सांभाळते!

पण सून कधीच कुठला पदार्थ छान झालाय म्हणत नाही..कृतज्ञता व्यक्त करत नाही!

मी म्हटलं सोडून द्यावं, “ती म्हणो न म्हणो आपल्याला माहित आहे ना आपला स्वयंपाक चांगला होतो ते! आणि नावाजणारे इतर आहेतच की!”

मला आठवलं, आमच्या सरांच्या पत्नी एकदा जोगेश्वरीच्या  देवळात भेटल्या होत्या….खुप वर्षा पूर्वीची गोष्ट आहे! त्या म्हणाल्या, “टीव्ही पहात असले की सून टीव्ही बंद करते. काही बोलायला गेलं की ती बोटांनी ओठ बंद करते, बोलू नका म्हणत!” मग मी दुपारी देवळात येऊन बसते! ऐकावं ते नवलच ना!

असे अनेक किस्से आणि कहाण्या हे नातं इतकं बदनाम झालंय की काही विचारू नका! यात सासवांची काही चूक नसेल असं मला वाटत नाही….पण आजकाल च्या करिअर करणा-या सूनांनी तर हे समजूनच घ्यायला हवं, पाळणाघर तर आहेच पण नातवंडांना आजी ची माया ही हवी असते!

ब-याच सासवा व्यथित असतात आणि सुसरीबाई सुसरीबाई तुझी पाठ मऊ म्हणून साजरं करत असतात. या सर्व चर्चेत असं ही लक्षात आलं की, आपल्या आई पेक्षा सासू कितीही चांगली असली तरी माझी आई किती सुपिरियर आहे (नसताना) हे भासविण्याकडे मुलींचा कल असतो.  आणि हल्ली मुलींच्या हातात कायद्याचं शस्त्र ही आलंय, महिला सुरक्षा कायद्याचा गैरवापरही होतोय.

खरं तर किती सरळ साधं आहे हे नातं पण खुप अवघड होत जातं. वर्षानुवर्षे हे असंच चाललंय !

या मुली नव-या मधल्या शंभर कमतरता दाखवतील पण स्वतःविषयी अवाक्षर ही ऐकून घ्यायला तयार नसतात.

कधी कधी वाटतं हे नातंच असं आहे तर त्याकडून वेगळ्या अपेक्षा का करायच्या? सासू सूनांना एकमेकांविषयी प्रेम नसतं असं नाही….पण नेमकी कुठे माशी शिंकते कळत नाही.

एका मैत्रिणी कडे गेले होते तिची सून नुकतीच वेगळी रहायला लागली आहे. ती त्या  दुःखात मी तिला म्हटलं जाऊ दे…प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं असतं…लांब राहून च चांगले संबंध रहातात! तिचं सून पुराण चालू असतानाच तिची सून दारात हजर!

आल्या आल्या तिनं सासूवर शब्दांचा भडीमार करायला सुरुवात केली. कुठे कुठे. काय काय जाऊन सांगता हो माझ्या विषयी, तुमची काय लायकी आहे मला माहित आहे! अर्धा  तास ती अखंड बोलत होती…सासू गप्प!

मला एक जुनं गाणं वेगळ्या अर्थाने म्हणावंसं वाटत होतं….

सुन… सुन …कसमसे लागू तेरे कदमसे …..तू चली जा…..

      पण आम्ही दोघीही त्या तोफेच्या तोंडी…मूग गिळून गप्प !

ती गेल्यावर मी फक्त एवढंच म्हणून मैत्रीणीचा निरोप घेतला —

सून? सून  ??……आई शप्पथ  !!

त्या नंतर आठच दिवसांनी मी रिक्षाने मसाप त जात असताना मला त्या दोघी पु.ना.गाडगीळ सराफांच्या दुकानात शिरताना दिसल्या!

 

© प्रभा सोनवणे

पुणे

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – * विषवल्ली .. . ! * – डॉ. रवींद्र वेदपाठक

डॉ. रवींद्र वेदपाठक

विषवल्ली .. . !

(डॉ. रवीन्द्र वेदपाठक जी का e-abhivyakti में स्वागत है। डॉ वेदपाठक जी का यह लेख हमें  राष्ट्रीय एवं सामाजिक उत्थान के लिए सकारात्मक दृष्टिकोण से  विचार करने के लिए बाध्य करता है।)

आपल्या भारत देशासारख्या खंडप्राय विकसनशिल देशाला *जात* ही एक लागलेली किड आहे. तीची सुरुवात किंवा आपण त्याला उत्पत्ती म्हणु शकतो, तर ही कशानेही *”न जाणारी जात* कोठुन उत्पन्न झाली त्याचं मुळ शोधणं खुप अवघड आहे. आणी आजच्या लेखाचं ते प्रयोजनही नाही..

आजचा विषय जरा वेगळा आहे, विषय डोक्यात येण्याचं कारण म्हणजे, मी सध्या एक फ्लँट  विकत घेण्याचं नियोजन करतोय, मला हवा तसा तळेगाव मध्ये हवेशीर असावा अशी इच्छा, म्हणुन मग नव्यानेच ओळख झालेल्या एका मित्राने नाव सुचवले म्हणुन मी एके ठिकाणी फ्लँट पहायला गेलो. मित्राने सांगीतलेच होते…. अरे आपलाच आहे, पाहुणाच आहे नात्याने….. जावुन ये.. म्हटलं चला आपला माणुस म्हटलं की कुठेतरी विश्वास असल्यासारखं वाटतं.

मग मी सकाळीच गाडी काढली आणी नविनच सुरु असलेल्या साईटवर गेलो, साईटच्या बाजुलाच एका शेड मध्ये ए.सी. केबीन मध्ये ऑफिस होते.

मित्राने आधीच ओळख करुन दिली असल्याने स्वागत चांगलेच झाले….. या या डॉक्टर साहेब… बसा, असे सगळंच अगत्यपुर्वक चालु होते.

सगळा स्टाफ नविनच दिसत होता, मला त्यांनी त्यांची ओळख पण करुुन दिली, मी पण थोडसं समाजाचं, जातीचंच सामाजिक काम करत असल्याने,  तो सुध्दा मला इंम्प्रेस करण्यासाठी सांगु लागला.

कसं आहे ना, डॉक्टर…. मी माझा सगळा स्टाफ आपल्या जातीतलाच भरलाय, हा बघा माझ्या लांबच्या आत्याचा नातेवाईक, तो मामेबहीणीच्या सासरच्या पाहुण्यांचा, असे आपलेच लोक असले म्हणजे काम विश्वासाने होते, दगाफटका रहात नाही, आणी आपल्याच माणसांनी चार पैसे कमविले तर बिघडले कोठे ?

मला पण ते पटले, पण तरीही एक शंका मनात आली म्हणुन विचारली….

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण सरकारी नियमानुसार जातीनिहाय आरक्षण असावे लागते ना ?

आमची चर्चा जरा वेगळ्याच विषयाकडे वळली…..

हो ना डॉक्टर, पण तुम्ही बघा, सगळेच तर तसे करतात, प्रत्येक जण, प्रत्येक व्यावसायिक आज आपल्याच लोकांना काम देण्याचा विचार करतोय, व देतोय, त्याने दोन फायदे होतात आपल्या जातीत आपल्या समाजात आपल्याला किंमत मिळते, सामाजिक कार्य केल्याचे पुण्य मिळते, आणी मुख्य म्हणजे विश्वासू माणसे मिळतात.,  त्याने त्याचा मुद्दा क्लिअर केला…

मी पण, ते मान्य करुन खरेच यातुन आपल्या जातीची, समाजाची भरभराट होतेय म्हणुन त्यास दुजोरा दिला, व घरी परतलो.

पण हे विचार डोक्यातुन जात नव्हते, हे योग्य कि अयोग्य, सरकारी नियम आहे, नोकरी देताना जातीनिहाय आरक्षण देवुन नोकर भरती करावी, तरीही सरकारी क्षेत्रे सोडली तर आज कित्येक खाजगी कंपन्या किंवा कार्पोरेट जगत आपण म्हणू शकतो अशा ठिकाणी प्रत्येकजण स्वताच्या जातीच्या माणसांना, जवळच्या नातेवाईकांना चिकटविण्याचा प्रयत्न करीत आहे.…

*हे कितपत योग्य आहे….* कार्पोरेट जग जरी सोडून दिले तरी प्रत्येक व्यक्ती आज विचार करतेय कि माझ्यामुळे माझ्याच कुणाचा तरी फायदा व्हावा…..  मला काही खरेदी करायची आहे तर, माझ्याच समाजाच्या व्यक्तीकडुन मी तो व्यवहार पुर्ण करावा…..

आज आपला भारत देश ज्या संक्रमणातुन जात आहे, जिथे आज जातीय दंगली, जातीयवाद, आरक्षण वेगवेगळ्या जातींचे संप व मोर्चे असे प्रकार आहेत, तिथे आता प्रत्येकजण पोटजातींचा विचार करु लागलाय.

असा विचार करणे योग्य कि अयोग्य, मोठमोठ्या कंपनीमध्ये सुध्दा आजकाल सरसकट हा विचार होतो, जो कुणी चेअरपर्सन असेल त्याच्या मर्जीतील लोकांना जातीतील लोकांना काम देण्याचे प्रमाण वाढत चालले आहे….

जर भारत देश सोडला तर इतर कोणत्या विकसीत देशात जातींचे एवढे स्तोम वाढलेले दिसत नाही, जाती आहेत, पण त्या उच्चनिच दाखवण्यासाठी नाहीत, आपल्या देशात मात्र जातीवरुन लायकी ठरवली जाते.

हा जातीवाद एक विष बनुन संपुर्ण देशाला हळुहळु पोखरत आहे.

एक सुभाषित आहे…. *जर तुझे कर्म महान तर तु महान* 

आणी याला इतिहास साक्षी आहे, आजपर्यंत कोणतीही व्यक्ती जात श्रेष्ठ आहे म्हणुन महान बनली नाही…….. शिवाजी राजे मराठे होते म्हणुन राजे नव्हते…. ते त्यांच्या पराक्रमाने राजे होते… महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, विनोबा भावे, सरदार पटेल,  किंवा अगदी कपिल, सचिन, धोनी हे सगळे त्यांच्या जातीमुळे महान न्हवते, तर ते महान झाले कर्तुत्वाने. आणी तरीही आपल्या भारतात जातीच्या धर्माच्या गोष्टी सांगुन  स्वताला श्रेष्ठ समजतात. अरे या लोकांना कळत नाही का? स्वता प्रभु श्रीराम सुर्यवंशी या उच्च जातीचे असुन त्यानी शबरीची उष्टी बोरे खाल्ली., अरे या हिंदू संस्कृतीचे रक्षण कसे करायचे.

नक्कीच मला जो प्रश्न पडलाय, त्याचे उत्तर देणारे मला नक्कीच भेटतील नव्हे अगदी पटवुन देणारे भेटतील. पण यातुन जी विषवल्ली पेरली जातेय, ज्या वाईट चालीरीतींचा उदय होतोय, स्वताची जात व दुसऱ्याची जात असा भेदभाव निर्माण केला जातोय….. त्यातुन आपण कोणत्या अंधाराकडे ढकलले जातोय… याचा विचार कधी करणार, आतापर्यंत दोन चार धर्मांमधील धार्मिक तेढ होती, ती आता अठरापगड जातींच्या उंबऱ्यावर येवुन ठेपली आहे… तिच्याकडे किती दिवस कानाडोळा करायचा. माणुसकी मानवता हे शब्द आता फक्त पुस्तकातच वाचायचे का ?

कुणी असा विचार करु लागला तर त्याला गप्प बसविणारेच खुप भेटतात…..

पण खरेच व्यावायिक जगतात जो जातीवाद चालु झाला आहे त्याला कोण रोखणार.. कसे रोखणार.., आपल्याच जातीच्या लोकांची भरती करायची, फक्त त्यांनाच प्रमोशन मिळाले पाहीजे असा विचार करायचा… हे कुठेतरी थांबले पाहीजे…

अरे नुसतेच म्हणायचे, विविधतेने नटलेल्या,  अनेकात एकता असणारा माझा भारत….. अनेकात एकता नाही…… सात रंगांचे सुध्दा आता पोटरंग झालेत गुलाबी, बेबी गुलाबी,  रोझ गुलाबी…, आणी तसेच जातींचे सुध्दा झालेय…. पोटजाती.

कधी थांबायचं हे सारे, आहे काही उपाय ?

 

© डॉ. रवींद्र वेदपाठक

तळेगाव

Mob. No. :- ९००४३६३८७३

Email :- [email protected]

(इस लेख में उल्लिखित विचार लेखक के व्यक्तिगत विचार हैं। )

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – * अभिव्यक्ती स्वातंत्र्य – गरज व अतिरेक… * – सुश्री आरुशी दाते

सुश्री आरूशी दाते

अभिव्यक्ती स्वातंत्र्य – गरज व अतिरेक…

(e-abhivyakti में सुश्री आरूशी दाते जी का  स्वागत है। ई-अभिव्यक्ति में अभिव्यक्ति की स्वतन्त्रता एवं उससे संबन्धित तथ्यों पर विचारपरक लेख निःसन्देह एक उपहार ही है। इस आलेख के लिए हम सुश्री आरुशी जी के हृदय से आभारी हैं। )

अभिव्यक्ती ही देवाने दिलेली निसर्गदत्त देणगी आहे. प्राण्यांनासुद्धा ही देणगी आहे, पण मनुष्यप्राणी अधिक चांगल्या प्रकारे, वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या मार्गाने अभिव्यक्त होऊ शकतो. त्याच्या बुद्धीची भरारी गगनाचा ठाव घेऊ शकते…

अभिव्यक्त होताना मग ते प्रेमरूपात असो, राग असो, अबोला असो, इतकंच काय गायन, वादन, नृत्य, चित्रकला किंवा शिल्पकला असो, नैसर्गिक असल्यामुळे अभिव्यक्ती थांबवता येणारच नाही, ती फक्त कधी, कशी आणि कुठे करावी हे नक्कीच ठरवू शकतो… हे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तिला मिळणं गरजेचं आहे, त्याला कारणंही तितकीच महत्वाची आहेत…

अभिव्यक्त होणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे, आपल्या विचारांचा मनाशी, भावनांशी झालेला वाद-संवाद अभिव्यक्तीतून प्रगट आणि प्रगत होत असतो. वर म्हटल्याप्रमाणे त्याचे मार्ग अनेक आहेत, पण अभिव्यक्त होण्याची खरंच गरज आहे का? तर निःशंकपणे हो, हेच उत्तर मिळेल…

आपल्या मनातील भाव जर दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर त्यात दोन पायऱ्या आहेत… पहिली म्हणजे स्वतःच्या अंतर्मनात व्यक्त होणे (अंतस्थ अभिव्यक्ती), आपल्याला स्वतःला काय वाटतं, ह्याचा अभ्यास करून बाह्यरूपात व्यक्त होणं गरजेचं आहे… त्यासाठी मनन, चिंतन आवश्यक आहे… ह्यावर आपली क्रिया अवलंबून असते…

उदाहरणार्थ, भूक लागली असेल तर, तसा संदेश मेंदूकडून मिळतो, तो मिळाला कि मनातल्या मनात भुकेची भावना जागृत होते, पोट रिकामं आहे, हा विचार मनात येतो, काही तरी खाल्लं पाहिजे नाहीतर विपरीत परिणाम होऊ शकतो हा संवाद घडतो (अंतस्थ अभिव्यक्ती)… मग खायचं कि नाही किंवा काय खायचं हे ठरवता आलं पाहिजे आणि त्यानुसार क्रिया केली जाते…

म्हणजेच जेव्हा एखादा विचार मनात येतो, तेव्हा तो कदाचित आपल्याला भावतो किंवा भावत नाही. कदाचित विचारातूनच त्याची अनुभूती मिळते… तो AWARENESS आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपयोगी येतं… आपण मनात आलेल्या विचारांना RESPOND करतो कि रिऍक्ट करतो हे ठरवता येते, मात्र अभ्यासपूर्ण सवयीनेच होऊ शकते…ह्याबरोबरच ह्या स्वातंत्र्याची दिशा ठरवणेही गरजेचे आहे. म्हणजे आपला मुद्दा मांडताना, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करत असताना नक्की काय मांडलं पाहिजे हे कळलं पाहिजे आणि ते सर्वस्वी आपल्या हातात आहे…

तुम्हीच बघा ना… एखादी गोष्ट आपल्याला पटत नसेल किंवा एखाद्या माणसाचं मत आपल्याला पटत नसेल तर आपण लगेचच ते बोलून दाखवतो, समोरचा माणूस किती चुकीचा आहे, हे सांगायचा, मी तर म्हणेन ते सिद्ध करायचा आटोकाट प्रयत्न करतो… ह्यातून कदाचित आपला अहंकार नक्कीच सुखावतो, पण असे केल्याने आपण नक्की काय साध्य केलं ह्याचा अभ्यास होणं खूप आवश्यक आहे…. अभिव्यक्त होण्याच्या पद्धतीने माणसे दुरावू शकतात किंवा जवळ येऊ शकतात… ह्याबरोबर समोरच्या व्यक्तीलाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हेच आपण विसरवून जातो, जे अयोग्य आहे….

तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे

१) विचार

२) त्यांच्याशी निगडित भावना (अंतस्थ अभिव्यक्ती)

३) त्यानुसार होणारी क्रिया (बाह्य अभिव्यक्ती)

ह्याचा सतत अभ्यास होणं आवश्यक आहे. नाहीतर अभिव्यक्तीसारख्या सुंदर देणगीचा अतिरेक होऊन अयोग्य गोष्टी घडायला वेळ लागणार नाही… ह्याचा अर्थ स्वत्व पणाला लावणे असा अजिबात होत नाही… पवित्रता, शांतता, सुख, समाधान, प्रेम, ज्ञान, शक्ती, युक्ती, सत्यता ह्यात कुठेच कमी पडणार नाही, ह्याची खात्री आहे आणि अभ्यासाने हे सहज शक्य आहे…

आता ह्यापुढची बाब लक्षात घेऊ या… विचार, भावना, क्रिया ह्या गोष्टी आयुष्याकडे किंवा जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन ठरवतात, आणि मग त्याचेच रूपांतर सवयीमध्ये होऊ शकते, हीच सवय आपली वृत्ती बनते, त्यातूनच मानसिकता घडते आणि आपले व्यक्तिमत्व आकाराला येते… तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्व नाकारून चालणार नाही आणि त्याचप्रमाणे त्याचा गैरवापर करूनही चालणार नाही…

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गरज आपल्याला, आपल्या कुटुंबाला आणि कुटुंब ज्या समाजाचा किंवा देशाचा भाग आहे त्याच्या विकासासाठी, ते सुदृढ बनवण्यासाठी आवश्यक आहे, जीवन सुखकर बनवण्यासाठी, नवनवीन शोध, प्रयोग घडवण्यासाठी मनुष्य वैचारिक दृष्ट्या सशक्त होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याची सृजनशीलतेचा उपयोग नक्कीच होतो… यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खूप हातभार लागतो… पण अति तिथे माती, ह्या नियमानुसार स्वातंत्र्याचा अतिरेक स्वैराचारात बदलून हानी पोहोचवू शकतो किंवा हे स्वातंत्र्य हिरावून घेतले तर विपरीत परिणाम होऊ शकतात… स्वातंत्राबरोबर येणारी जबाबदारी लक्षात ठेवून त्याप्रमाणे क्रिया प्रतिक्रिया झाल्या पाहिजेत… गरजेचं व्यसन आणि त्याचा अतिरेक ह्यातील सीमारेषा ओळखता आल्या की अनेक गोष्टी सुखकर होतील, ह्यात दुमत नाही…

हल्ली आपल्याला मीडियाच्या माध्यमातून होणार अतिरेक नाकारता येणार नाही… आजकाल सोशल मीडियाला प्राधान्य दिलं जातं, त्यावर घडणाऱ्या अभिव्यक्ती कितपत योग्य किंवा अयोग्य असतात हेही किंवा त्याची पद्धत काय आहे ह्यावर अवलंबून आहे… त्यांचा आपल्या जीवनावरील प्रभाव टाळता येईल की नाही ही व्यक्तिगत गोष्ट आहे… त्यामुळे नैसर्गिक गरज भागवण्यासाठी अभिव्यक्तीचं मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगताना त्याचा अतिरेक टाळून आनंदी राहता येते, त्या दृष्टीने अभ्यास सतत चालू ठेवला पाहिजे…

© आरुशी दाते

Please share your Post !

Shares
image_print