(४ डिसेंबर, इ. स. १९४३) नंदाखाल, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र – (२५ जुलै २०२४ राहत्या घरी निधन)
☆ वसई मधील साने गुरुजी… फादर फ्रान्सिस दिब्रिटो ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
हे महाराष्ट्रातल्या वसई येथील कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू व मराठी लेखक होते. ख्रिस्ती व ज्यू धर्म हे त्यांचे प्रमुख अभ्यासविषय असून त्यांविषयी त्यांनी मराठीतून लेखन केले.
इ. स. २००७ या कालखंडात सुवार्ता या प्रामुख्याने मराठी कॅथॉलिक समाजाशी संबंधित असलेल्या वार्तापत्राचे मुख्य संपादक होते. त्यांचे शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कुलात झाले. इ. स. १९७२ साली त्यांनी कॅथॉलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी. ए., तर धर्मशास्त्रात एम. ए. केले.
फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले, तरी त्यांची खरी ओळख ती नाही. दिब्रिटो हे पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरुद्ध आवाज उठविणारे कार्यकर्ते आणि सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व अशी आहे. ’सुवार्ता’ या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले. त्यामुळे हे मासिक केवळ ख्रिस्तीधर्मीयांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाचा स्वतंत्र ठसा उमटला. ’हरित वसई संरक्षण समिती’ च्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली. वसईतील ’राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण’ यांच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेतला आणि मोठी मोहीम राबविली होती. संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची हे पुस्तक लिहिण्यासाठी दिब्रिटो यांनी बराच काळ इस्रायलमध्ये राहून संशोधन केले होते.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचेप्रकाशित साहित्य
आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा
ओअॅसिसच्या शोधात (प्रवासानुभव, मूळ – दैनिकातील सदर). इंग्रजी रूपांतर ‘इन सर्च ऑफ दि ओॲसिस’; अनुवादक – फ्रान्सिस दिब्रिटो+रेमंड मच्याडो)
ख्रिस्ताची गोष्ट (चरित्र)
ख्रिस्ती सण आणि उत्सव
तेजाची पाऊले (ललित)
नाही मी एकला (आत्मकथन)
संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास
सुबोध बायबल – नवा करार (’बायबल दि न्यू टेस्टॅमेंट’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद)(पृष्ठसंख्या – ११२५)
सृजनाचा मळा
सृजनाचा मोहोर
परिवर्तनासाठी धर्म (वैचारिक)
मुलांचे बायबल (चरित्र)
सन्मान
सुबोध बायबल- नवा करार’ या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा २०१३ सालचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार मिळाला आहे.
फ्रान्सिस दिब्रिटो हे पुणे येथे झालेल्या १५व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान (१४-७-२०१७)
उस्मानाबाद येथे जानेवारी २०२०मध्ये ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
जळगावला भरलेल्या अकराव्या राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
माहिती प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
☆ “उपदेश करु नका…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
मी जर महाभारत काळात जन्माला आलो असतो तर माझा समावेश कौरवांच्या पार्टीतच झाला असता.
कारण..
श्रीकृष्णाची कधी प्रत्यक्षात गाठ पडलीच तर मी त्याला एकमेव प्रश्न हा विचारेन की…
” देवाधिदेवा…, भगवतगीता अर्जुनाला सांगण्याऐवजी, दुर्योधनाला आणि दु:शासनाला सांगितली असतीस तर हे महाविनाशी युध्द टाळता आले असते ना ?
इतका मोठा संहार झाला नसता. तू असे का केले नाहीस ?
भगवद्गीतेचे हे दिव्य ज्ञान कौरवांना झाले असते तर महाभारत हे, युद्धाच्या तत्त्वज्ञानाऐवजी बंधुभावाच्या, प्रेमाच्या तत्त्वज्ञानाची शिकवण देणारे झाले नसते का ?”
सध्यातरी कृष्णाने प्रत्यक्ष दर्शन देणे शक्य नव्हते. त्यामुळे इंटरनेटच्या जंजाळात मी हा प्रश्न प्रसृत केला. बघताबघता हा प्रश्न प्रचंड व्हायरल झाला. फेसबुक, whatsapp, quora, युट्युब सगळीकडे या प्रश्नाने धुमाकूळ घातला. आणि अखेरीस इतके ट्रॅफिक ओसंडल्यामुळे प्रत्यक्ष श्रीकृष्णाला त्याची दखल घ्यावी लागली.
आणि… एके दिवशी मला श्रीकृष्णाचा व्हिडीओ कॉल आला.
अक्षयकुमार आणि परेश रावलचा OMG बघितलेला असल्यामुळे, श्रीकृष्ण अगदी साध्या वेशभूषेत येणार, हे मला अगोदरच ठाऊक होते.
थेट स्वर्गातून, पृथ्वीवर कॉल लावलेला असल्यामुळे, खूप डेटा खर्च होत असणार, त्यामुळे श्रीकृष्णाने थेट मुद्द्याला हात घातला.
“ वत्सा, कशाला इतके अवघड प्रश्न नेटवर टाकतोस ? सगळे ट्रॅफिक जाम झाले. ”
“ देवा, हा अखिल मानवजातीच्या मार्गदर्शक धर्मग्रंथाचा प्रश्न आहे. तुम्ही हे युद्ध टाळण्यासाठी हे ज्ञान कौरवांना दिले असते तर युध्दच झाले नसते.. हा प्रश्न इंटरनेटच्या ट्रॅफिकपेक्षा कितीतरी महत्त्वाचा नाही का ?”
“मला उपदेश करू नकोस” ………. श्रीकृष्णांचा एकदम बदललेला स्वर ऐकून मी भांबावलो.
“ देवा, माझी काय बिशाद तुम्हाला उपदेश करण्याची! “…. मी गयावया केली.
“ वत्सा, … अरे तुला नाही म्हणालो. ”
… मला हायसे वाटले.
“ ‘मला उपदेश करू नका’… असे दुर्योधन मला म्हणाला होता.
… तुला काय वाटते ? मी हे युध्द टाळण्यासाठी दुर्योधनाकडे गेलो नसेन ?
भगवद्गीतेमधील न्याय अन्याय, नैतिकतेच्या गोष्टी त्याला सांगितल्या नसतील ?”
“ काय सांगताय देवा ? दुर्योधनाला प्रत्यक्ष तुम्ही गीतेचे ज्ञान सांगूनदेखील त्याला ते कळले नाही ? तो सरळसरळ तुम्हाला ‘उपदेश करू नका’ म्हणाला ?”
“ वत्सा, अगदी असेच घडले बघ.
दुर्योधन म्हणाला….. ‘मला चांगले-वाईट, पाप-पुण्य, नैतिक-अनैतिक या सगळ्याचे ज्ञान आहे. सद्वर्तन आणि दु:वर्तन यातील फरकही मी जाणतो, त्याचा उपदेश मला करू नका ‘.
वत्सा, पाप काय आहे हे दुर्योधनच काय तुम्हीसुद्धा जाणता.. पण त्यापासून दूर रहाणे तुम्हालाही जमत नाही. अनैतिकता म्हणजे काय हे दुर्योधनही अन् तुम्हीही ओळखता, पण टाळत नाही.
तुमच्यासाठी चांगले काय आहे आणि वाईट काय आहे, हे तुम्ही जाणता, पण तुम्ही वाईटाचीच निवड करता. दुर्योधनाने स्वत:च्या वर्तनाची अगतिकता सांगून बदल नाकारला, त्याने स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ ढालीसारखा वापरला”.
आता मात्र मला दुर्योधनाच्या जागी माझा चेहरा दिसायला लागला.
“ मला उपदेश करू नका“…… वडिलांना उद्देशून हे वाक्य मी शंभरवेळा उच्चारले असेन.
मित्रांबरोबर उनाडक्या करणे, चुकीचे होते हे मला माहीत होते, पण मी त्याचीच निवड करीत होतो. आणि वडिलांना, “उपदेश करू नका” असे सांगत होतो.
सकाळी लवकर उठून व्यायामाला जाणे माझ्या फायद्याचे होते हे मला ठाऊक होते. पण अंथरुणात लोळत पडणे हे माझे वर्तन होते, आणि “लवकर उठत जा” असे सांगणाऱ्या आईला, “उपदेश करू नकोस” असे सांगणारा “दुर्योधन” मीच होतो.
“तंबाखू खाऊ नका, दारू पिऊ नका, मांसाहार करू नका “, हे उपदेश आम्हाला ऐकायचे नाहीत. त्यामुळे शरीराचे नुकसान होते, हे आम्हाला ठाऊक आहे. पण त्याची अंमलबजावणी आम्हाला करायची नाही. कारण आम्ही ‘दुर्योधन’ आहोत. आम्ही कौरव आहोत.
अर्जुन आणि दुर्योधनात हाच फरक होता की, दुर्योधनाने समजत असूनही स्वत:चे वर्तन बदलले नाही आणि अर्जुनाने स्वत:चे वर्तन श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून बदलले…
एक मोठ्या मोठ्या उंच इमारतीचं नगर होतं. लोक खूप श्रीमंत होते. आधुनिक घरात रहात होते. आधुनिक तंत्रज्ञान वापरत होते. एका क्लिकवर सगळे पुढ्यात येत होते. भाजीपाला, सामान सगळे क्षणात दारात येत होते. हातात पैसाच पैसा होता. खाण्या पिण्याची चंगळ होती. आलिशान गाड्या होत्या. मुलं उत्तमोत्तम शाळेत जात होती. प्रत्येक हातात मोबाईल होता. टेबलवर संगणक होता. जग जवळ आलेले होते. नेटने जाळ्यात पकडलेले होते. सगळीकडे सुबत्ता होती. पण… कुठेतरी उणीव होती. आरोग्य मात्र बिघडलेले होते. डॉ. कडे मोठ्या रांगा होत्या. औषधांची दुकाने जोरात चालत होती. प्रत्येक माणशी काही ना काही आजार होता. मनस्वास्थ्य हरवले होते.
काय करावे कळेना. आरोग्य पैशाने विकत घेता येईना. सगळे होते चिंतेत. आपापल्या व्यथेत. तेवढ्यात एक माणूस आला. जणू देवदूतच भासला. खूप अनुभव त्याच्या गाठीला. एका मोठ्या कार्यक्रमात दाखल झाला. आनंदी राहण्याचा उपाय सांगतो म्हणाला. फक्त एक अट आहे म्हणाला. सगळे आवाज बंद करा. सर्वांनी जमिनीवर आसन धरा. लोकांनी तसेच केले. कारण सगळे होते शांतीचे आणि आनंदाचे भुकेले.
देवदूत म्हणाला “ खरेच मन:शांती व आनंद हवा असेल, तर माझे ऐकावे लागेल. एक व्रत करावे लागेल. सगळ्यांनी होकार भरला. प्रत्येक जण कान टवकारून ऐकू लागला. देवदूत बोलू लागला. चांगल्या गोष्टीची सुरुवात करायला श्रावण महिना आहे चांगला. फरक पडला तर कायम हे व्रत करा. आता फक्त सुरुवात करा……
या व्रतात काय करावे? सांगतो ऐका लक्ष द्यावे. आठवड्यात एक दिवस हे व्रत करावे. सकाळी लवकर उठावे. प्रथम मोबाईल, इंटरनेट बंद करावे. मोकळ्या हवेत फिरून यावे. फिरता फिरता स्वसंवाद करावे. उत्साहात घरी यावे. आई वडील यांच्या जवळ बसावे. छान छान बोलावे. सर्वांनी एकत्र चहा, नाश्ता घ्यावा. घरात मुलांशी खेळावे. गप्पा गोष्टी कराव्यात. थोडे स्वयंपाक घरात डोकवावे, मदतीसाठी विचारावे. जमेल ते काम करावे. दुपारी निवांत वेळी जुने कपाट आवरायला घ्यावे. त्यातील जुने फोटोंचे अल्बम बघावे. आठवणींना जागवावे. कपाट आवरताना मनही आवरावे. वाटले तर दुपारी आळसावून झोपावे. नाहीतर आवडते संगीत ऐकावे. एक दिवस स्क्रीनचा उपास करावा. आरोग्याचा मार्ग धरावा. आनंदाचा रस्ता शोधावा. रात्री सर्वांनी हसत खेळत, गप्पा मारत सहभोजन करावे. सर्वांनी एक दिवस हॉलमध्ये गाद्या घालून झोपावे. असे व्रत करावे. फायदे अनुभवावे. चांगल्या आरोग्यदायी परिणाम मिळण्यासाठी आठवड्यातून एकदा हे व्रत करावे. पुढच्या वेळी येईन तेव्हा अनुभव सांगावे.” … एवढे सांगून देवदूत निघून गेला. व्रत आचरणात आणण्याचा प्रत्येकाने निश्चय केला.
आपणही असे आचरण करावे. हे आपल्या चार्जिंगचे साधन समजावे. एक दिवस सुट्टी मिळाली म्हणून इकडे तिकडे जाऊन टेन्शन घेण्यापेक्षा हे उपाय करून बघावे. आपणच आपला आनंद शोधावा.
व्रत कसे वाटले सांगावे. आवडले न आवडले जरुर सांगावे. आवडल्यास कृपया नावासहित पुढे पाठवावे.
सकाळी घरातलं आटपून कामावर निघाली आणि तिच्या चप्पलचा अंगठा तुटला. बाहेर पावसाची रीपरीप चालूच होती. खड्ड्यातल्या रस्त्यातून, चिखलातून चालत कामाच्या ठिकाणी पोहोचायचं, म्हणजे एक कसरतच !!
आज थोडा उशीर झालेला, म्हणून ती चप्पल सोडून अनवाणीच झपाझपा चालत सुटली. कामावर तिच्या दोन मैत्रीणी आजारी आणि दोघी घरच्या शेतात भाताची पेरणी या कारणांनी गैरहजर. मग आज आपण वेळेत जायलाच हवं, ही ओढ ! बेफिकिरीने वागू शकली असती, पण स्वभावात ती नव्हती. कामावरची मालकीण खूप चांगली, प्रेमाने, आपुलकीने वागणारी, रागावली तरी तितकीच समजून घेणारी. तिलाही वाटायचं एरवी कधीतरी चालेलं, पण आज कामही खूप आहे, आपण पाच सहा जणीचं आहोत, तर वेळेवर पोहोचायलाच पाहिजे. असा विचार घोळवतचं कामावर येऊन कामाला लागली.
दोन तासांनी तिचे यजमान आले. काय झालं? अचानक का आले?तिलाही घरी न्यायला आले की काय? काय घडलं असेलं?नाना शंका मनात घेऊन, मालकीण सहजचं दरवाज्या जवळ गेली.
ती म्हणत होती, “तुम्ही कशाला घेऊन आलात?”ते म्हणाले, “अग! तुझ्या पाठोपाठ मी बी कामावर निघालो, बगीतलं तर तुज्या चपला दारात पडल्येल्या. पायलं तर अंगठा तुटल्याला. जीव कळवळला माजा. मंग अंगठा शिवून घ्यून आलो. “
☆ ‘तू छुपी है कहाँ, मैं तडपता यहाँ… – लेखिका : सुश्री कल्पना मुळगावकर सबनीस ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
प्रख्यात चित्रकार रघुवीर मुळगावकर हे गिरगावात भाटवडेकर बिल्डिंग मध्ये राहावयास आले, तेथे त्यांनी स्टुडिओ उभारला त्याचे नाव होते.. ‘मुळगावकर आर्ट स्टुडिओ’ मासिके, कॅलेंडर, या वरील देवांची चित्रे यांची मागणी इतकी वाढली की कामे पुरी करायला दिवस अपुरे पडू लागले, मध्यरात्रीपर्यंत ते चित्रात मग्न असायचे.
हातातील कुंचला, व मंगेशाच्या आशीर्वादाने त्यांनी शून्यातून विश्व उभे केले, लक्ष्मी प्रसन्न होत होती. घरात दोन गाड्या दोन नोकर आले. याच सुमारास त्यांनी सी शोअरवर वाळकेश्वरला कमल बिल्डिंग मध्ये सातव्या मजल्यावर ब्लॉक घेतला. वांद्र्याच्या गर्द झाडीत एक छोटासा बंगलाही घेतला..
त्यानंतर आम्ही वाळकेश्वरच्या प्रशस्त, हवेशीर फ्लॅट मध्ये राहण्यास आलो. पप्पा सकाळी गिरगावात स्टुडिओ मध्ये कामास जायचे, व सायं सहा वाजेपर्यंत परत यायचे. पण ते नाराज दिसू लागले. ते आईला म्हणायचे, “आपण सारे गिरगावात परत जाऊ या “.
आता एव्हडा सारा हलवलेला संसार पुन्हा गिरगावात हलवण्यास आई तयार नव्हती. शेवटी त्यांनी आईला मनातील खरे खरे सांगितले.
“त्या स्टुडिओत मी एकटा काम करायला बसलो की, मला काही सुचत नाही. ना काही नव्या कल्पना सुचत,
ना काही स्फूर्ती येत. तू जवळपास असल्याशिवाय, तुझ्या बांगड्यांचा किणकिणाट ऐकल्या शिवाय, तुझ्या केसातल्या मोगऱ्याचा सुगंध दरवळत असल्याशिवाय माझा ब्रश मला साद देत नाही.. “
झालं … आम्ही पुन्हा गिरगावात आलो.
यावरुन एक आठवण आली…..
एकदा निर्माते दिग्दर्शक व्ही शांताराम पप्पांच्या स्टुडिओत काही कामासाठी आले होते. एकापेक्षा एक सुंदर चित्रे पाहून त्यांनी विचारले,
” मुळगावकर, तुम्ही मॉडेल तर घेत नाही, मग इतके सुंदर चेहरे, हा कमनीय बांधा कोणावरून रेखाटता?”
” मी माझ्या बायकोवरुन ही चित्रे काढतो ” पप्पांचे उत्तर..
व्ही शांताराम याना ते पटल्यासारखे दिसले..
मग पुढे कधीतरी त्यांच्या एका चित्रपटाच्या प्रीमियर शो ची आम्हाला चार तिकिटे मिळाली. आम्ही चौघे चित्रपट पाहण्यासाठी गेलो. त्या वेळेस शांतरामानी माझे आईस पाहिले. माझी आई दिसायला छान होती. गोरीपान, नऊवारी साडी, केसांचा अंबाडा, त्यावर फुलांचा गजरा, ठेंगणीच …. पण ती काही मुळगावकरांच्या चित्राइतकी सुंदर नव्हती. मात्र पप्पानी सांगितलेले ऐकून चित्रपटाची कथा-कल्पना शांताराम बापूंच्या मनात रुजली असावी. तो चित्रपट म्हणजे ‘ नवरंग ‘.
या चित्रपटात एका प्रतिभावंत कवीला आपल्या बायकोला पाहुन सुंदर सुंदर कल्पना सुचत असत. तो आपल्या सामान्य रुप रंग असलेल्या बायकोत मोह घालणारी ‘मोहिनी’ पाहतो. त्याच्या सुंदर सुंदर कविता त्याला राजकवी बनवतात, तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचतो. पण त्याचवेळी त्याच्या बायकोला त्याच्या सुंदर कविता वाचून, कोणातरी सुंदरीला पाहूनच या कविता लिहिल्या असव्यात असा संशय येऊन ती त्याला सोडून कायमची माहेरी जाते..
इथे तिच्या विरहाने या कवीचे कविता लिहिणे बंद होते. एकही ओळ त्याला सुचत नसते. राजदरबारात त्याला कविता पेश करण्याची फर्माईश होते. रिकाम्या हाताने रिकाम्या डोक्याने तो राजदरबारात मध्यावर उभा राहतो, वेड्यासारखा डोके हातात धरून. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वहात असतात. सारा दरबार स्तब्ध असतो. पूर्ण शांतता असते. त्या शांततेत त्याला त्याच्या बायकोच्या पैंजणाचा आवाज ऐकू येऊ लागतो. तिला दरबारात आणले गेलेले असते. त्या आवाजाने ती कुठेतरी जवळपास आहे एव्हडे त्याला पुरते.
त्याला पुन्हा स्फूर्ती येते व तो एक सुंदर कविता दरबारात पेश करतो-
” तू छुपी है कहां, मै तडपता यहां.. !”
भारावलेला तो बावरा कवी मूर्च्छित होण्याआधी जाहीरपणे सांगतो की ….
” जमुना तुही है, मेरी मोहिनी.. “
सांगायचे काय तर, त्यांच्या एका साध्या सुध्या बायकोत त्यांना त्यांच्याच चित्रातील सुंदर चेहऱ्याच्या, टपोऱ्या डोळ्यांच्या कमनीय बांध्याच्या, भुरळ घालणारे हास्य असणाऱ्या, ‘ मला बायको हवी तर अशी ‘ अशी तरुण पुरुषांच्या मनाला आस लावणारी स्त्री दिसत होती.
……. ती एका अभिजात कलावंताची अनुभूती होती..
लेखिका – सौ कल्पना मुळगावकर-सबनीस
(रघुवीर मुळगावकर यांच्या कन्या)
प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
☆ फुटलेला थर्मामिटर आणि वारी… लेखक : श्री राजेंद्र वैशंपायन ☆ प्रस्तुती – श्री मंगेश जांबोटकर ☆
आज आमच्याकडे असलेला पाऱ्याचा थर्मामीटर चुकून फुटला. आणि त्यातला पारा जमिनीवर बारीक बारीक थेंब होऊन पसरला. थर्मामीटरच्या काचांचे तुकडे नीट व्यवस्थित गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावल्यानंतर माझा मोर्चा मी पाऱ्याकडे वळवला. मी हळू हळू एकेक थेंब एकत्र करायला लागलो. पाऱ्याची एक विशेषता असते. पाऱ्याचा एक थेंब दुसऱ्याजवळ नेला की क्षणार्धात ते दोन थेंब एकत्र येऊन त्याचा एक मोठा थेंब बनतो. या पद्धतीने मी एकेक थेंब करून सगळा पारा एकत्र केला आणि शेवटी एका कागदाच्या पुडीत हळुवारपणे ठेऊन दिला.
पाऱ्याचा संदर्भात निरीक्षण करताना काही गोष्टी लक्षात आल्या. पहिली गोष्ट म्हणजे पाऱ्याचा एक थेंब दुसया थेंबाव्यतिरिक्त इतर कुठल्याही पदार्थाला चिकटत नाही. दुसरी गोष्ट अशी की दोन थेंब जेव्हा क्षणार्धात एकत्र येतात त्यानंतर त्यांचं वेगळं अस्तित्वच राहात नाही. दोन थेंब मिळून एक मोठा थेंब तयार होतो, पुन्हा त्याच गुणधर्माचा. तिसरी गोष्टअशी की पुन्हा त्या थेंबावर अगदी हलका प्रहार केला तरी त्याचे अनंत थेंब होऊन ते पुन्हा सगळीकडे पसरतात आणि गंमत म्हणजे प्रत्येक पसरलेल्या थेंबाचे गुणधर्म पुन्हा तेच असतात.
मला हा पाऱ्याचा खेळ बघताना पंढरीच्या वारीचं आणि वारकरी मंडळींचं कोड थोडं सुटलं आणि काही गोष्टी लक्षात आल्या.
१. पाऱ्याचा त्या विखुरलेल्या थेंबांसारखे सगळे वारकरी सगळीकडे पसरलेले असतात. छोटे छोटे थेंब असले तरी त्यांचा गुणधर्म सारखा असतो तो म्हणजे विठ्ठलप्रेम.
२. वारीची वेळ झाली की इतर कुठल्याही गोष्टीला न चिकटता ते पंढरीच्या वाटेवर निघतात आणि दुसरा थेंब म्हणजेच दुसरा वारकरी दिसला की क्षणार्धात एक होऊन विठ्ठलभक्तीचा एक मोठा थेंब तयार होतो. वारीच्या वाटेवर असे एकेक थेंब मिळत जाऊन विठ्ठलभक्तांचा इतर कुठेच न लिप्तळणारा एक मोठा थेंब शेवटी पंढरपुरात निर्माण होतो.
३. त्या मोठ्या थेंबात प्रत्येक छोट्या छोट्या थेंबाचे गुणधर्म वेगळे दिसतच नाहीत. तिथे ना जात ना पात. तिथे असतो विठ्ठलनामाचा आणि विठ्ठलप्रेमाचा एकच गुणधर्म.
४. वारी नंतर विठ्ठलभक्तीच्या त्या मोठ्या थेंबातून पुन्हा बारीक बारीक थेंब निर्माण होऊन आपापल्या गावी परतत असले, तरी ते पसरतात त्या विठ्ठलप्रेमाचा एकच गुणधर्म घेऊन.
वारीचं हे कोडं उलगडल्यावर अजून एक गोष्ट लक्षात आली की वारकरी होणं सोपं नाही. कारण त्यासाठी विठ्ठलनामाचा आणि विठ्ठलप्रेमाचा गुणधर्म अंगी बाणायला लागेल आणि अधिक महत्त्वाचं म्हणजे पाऱ्यासारखं विठ्ठलनामाव्यतिरिक्त इतर सगळ्या सांसारिक कचऱ्यापासून पूर्ण अलिप्त व्हावं लागेल. जमेल ते मला?
लेखक :श्री. राजेंद्र वैशंपायन
प्रस्तुती :श्री. मंगेश जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
थैमान या शब्दातच रौद्र रसोत्पत्ती आहे. थैमान निसर्गाचे असो, एखाद्या विषाणूचे असो, सामाजिक राजकीय घडामोडींचे असो किंवा व्यक्तीच्या मनात उसळलेल्या विचारांचे असो पण थैमान या शब्दात एक भयानकता आहे, हिंसाचार आहे. कुठलाही सौम्यपणा अथवा सौंदर्य त्यात जाणवत नाही. तांडव आणि थैमान हे तसे एकाच अर्थाचे दोन शब्द. थैमानात तांडव असते आणि तांडवात थैमान असते. एकच तीव्र सुरावट घेऊन ते अंगावर आढळतात. थैमान बाहेरचे असो किंवा आतले असो ते काहीही करून ओसरावे याची आस लागून राहते. थैमान म्हणजे नको असे काहीतरी आणि त्यापासून दूर जाण्यासाठी चाललेली झुंज म्हणजेच नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्याची धडपड.
सुश्री अरुणा मुल्हेरकर
साधारण अशाच अर्थाची थैमान या शीर्षकांतर्गत, माननीय कवयित्री अरुणा मुल्हेरकर यांची एक गझल वाचण्यात आली आणि त्यातल्या भावभावनांचा मागोवा घ्यावासा वाटला.
अगोदर आपण कविता वाचूया.
☆☆☆☆☆
☆ – थैमान – कवयित्री : सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
☆☆☆☆☆
काळोख दाटलेला काहूर माजलेले
अस्वस्थ का असे मन माझेच जाहलेले
*
नाही कधी सुखाच्या पाठीस धावले मी
सुख नेमके समोरी होतेच ठाकलेले
*
दिन सारखेच सांगा असतात का कधीही
होणार अस्त नक्की ऋतुचक्र चाललेले
*
अर्ध्यावरीच माझा संसार का तुटावा
कोडे कधी न सुटले मज तूचि घातलेले
*
घन दाटतात गगनी दिसते धरा सुहासी
दावानलात एका सर्वत्र जाळलेले
*
आयुष्य शिकविते मज खोटे नि काय असली
पाऊस शांत होतो विश्रांत भागलेले
*
आता मला कळाले हे सार जीवनाचे
सारे पळून गेले थैमान दाटलेले
*
कवयित्री : सुश्री अरूणा मुल्हेरकर
आनंदकंद वृत्तातील ही संपूर्ण गझल वाचताक्षणीच मनात आले की हे कवयित्रीच्या मनात चाललेलं विचारांचं थैमान आहे. विचारांचं ओझं पेलवेनासे झालं की माणूस हतबल होतो आणि नकळतपणे गतायुष्याच्या आठवणीत खेचला जातो आणि त्या क्षणापासून आठवणींशी मनाचा संवाद सुरू होतो.
अरुणाताई गझलेतल्या मतल्यात म्हणतात,
काळोख दाटलेला काहूर माजलेले अस्वस्थ का असे मन माझेच जाहलेले
ही एक मनाची बेचैन स्थिती आहे. काहीशी उदास, निराश. मनातले
विचारांचे काहूर, विचारांचे वादळ अजिबात स्वस्थता मिळू देत नाहीत. वरवर, दर्शनी जरी एखादी व्यक्ती स्थिर आणि शांत भासत असली तरी अंतर्मनातल्या वादळी लाटा धक्के देत असतात आणि मग सहजपणे मनात येतं की का घायाळ माझे मन? कशासाठी मी अस्वस्थ आहे? बेचैन आहे?
एकदा का मनाशी संवाद सुरू झाला की अनेक भेंडोळी उलगडायला लागतात…
नाही कधी सुखाच्या पाठीस धावले मी सुख नेमके समोरी होतेच ठाकलेले
आयुष्यात जपलेल्या सुखाच्या कल्पना काही अवास्तव नव्हत्या आणि विशेष म्हणजे सुख माझ्या दारातच होते. ते शोधण्यासाठी मला कधी धावाधाव करण्याची गरजच पडली नाही. अरुणाताईंनी लिहिलेल्या या पहिल्या शेरातच आनंदी राहण्याची, आहे त्यात समाधान आणि सुख वेचण्याची त्यांची वृत्ती दिसून येते.
नाही कधी सुखाच्या पाठीस धावले मी हा उला फार अर्थपूर्ण आहे. आयुष्यभर माणूस सुख समजून मृगजळापाठीमागे धावत राहतो कारण खरं सुख कशात आहे हेच त्याला उमगलेल नसतं आणि परिणामी त्याच्या पदरी दुःख आणि निराशाच येते पण कवयित्री आपल्या या शेरात स्वतःबद्दल खात्रीपूर्वक सांगतात की “उंबरठ्यावरच्या सुखाला डावलून त्या पळत्याच्यापाठी कधीही गेल्या नाहीत.”
घरात असता तारे हसरे
मी पाहू कशाला नभाकडे?
*
अशीच त्यांची वृत्ती असावी.
*
दिन सारखेच सांगा असतात का कधीही
होणार अस्त नक्की ऋतुचक्र चाललेले
हा तिसरा शेर अरुणाताईंच्या मनाची अध्यात्मिक बैठक दर्शवणारा आहे. काळ स्थिर नसतो, तो बदलत असतो. जे आज आहे ते उद्या नसणार आहे हा निसर्गाचा नियम आहे. बदलणारे ऋतू म्हणजे निसर्गात घडणारी स्थित्यंतरे. मानवी जीवनातही अशी स्थित्यंतरे होत असतात. सुखदुःखाचा लपंडाव चालू असतो. हा शेर वाचताना असे वाटते की यात जीवनाविषयीची स्वीकृती आहे, स्वतःच्या मनाला बजावणं आहे आणि मनाला समजवण्याच्या प्रक्रियेतूनच हे विचारांचं थैमान उठलेलं आहे.
अर्ध्यावरीच माझा संसार का तुटावा कोडे कधी न सुटले मज तू चि घातलेले
मनात प्रचंड दुःख आहे, तीव्र घालमेल आहे.
भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी
या गीताची आठवण करून देणारा आहे. अरुणाताईंचा हा शेर मन कातरून टाकतो.
सुखासमाधानात दिवस चालले होते, खाच— खळगे, काटेकुटे तुडवतही एकमेकांच्या साथीने हसऱ्या सुमनांची ओंजळ भरली होती मग मध्येच हात सोडून माझा जिवलग हे जग सोडून का गेला?
काही प्रश्नांना उत्तरेच नसतात आणि म्हणून ते न सुटणारी कोडी बनून आयुष्य व्यापून टाकतात मग या कोड्याचं उत्तर कोणाला विचारायचं? एका अज्ञात शक्तीला, आकाशातल्या त्या बापाला… “तू मला अनंत सुखं देता देता हे न पेलवणारे दुःख का माझ्या झोळीत टाकलेस? असा मी काय गुन्हा केला होता?”
हा संपूर्ण शेर म्हणजे मनात तुडुंब भरलेल्या वेदनेचीच घागर आहे. कुठल्यातरी अलवार क्षणी ती डचमळते आणि मग मनातलं हे वादळ अधिकच थैमान घालू लागतं.
घन दाटतात गगनी दिसते धरा सुहासी दावानलात एका सर्वत्र जाळलेले
ग्रीष्माने फाटलेली, भेगाळलेली धराही शांत होते जेव्हा आभाळात मेघ दाटतात. एकाच वेळी वादळ आणि सांत्वन, वेदना आणि शमन या भिन्न भावाविष्काराचे सुंदर वर्णन या ओळींमध्ये आहे. हा संपूर्ण शेर रूपकात्मक आहे. सानीमध्ये वापरलेला दावानल हा शब्द मनासाठी रूपक म्हणून वापरला आहे. शांत दिसणाऱ्या अर्णवाच्या उदरात वणवा पेटलेला असतो तसा मनाच्या सागरातही विचारांचा वणवा पेटलेला असतो. भावनांचा उद्रेक झालेला असतो.
घन दाटतात गगनी
दिसते धरा सुहासी
मनात शांत वारे अचानक वाहू लागतात, सकारात्मक विचार येऊ लागतात, हरवलं जरी असलं खूप काही तरी अजूनही बरंच बाकी आहे. आठवणींच्या रूपात, त्याच्या अंशांच्या रूपात.. जे आनंददायी आहे. इथे या विचारांना घन दाटले गगनी ही उत्प्रेक्षा म्हणजेच कवयित्रीची काव्यात्मकता !
मनातला नकोसा कचरा जळत आहे आणि पुन्हा सुखाचा भास होत आहे. नकळत थैमान ओसरत आहे.
आयुष्य शिकविते मज खोटे नि काय असली
पाऊस शांत होतो विश्रांत भागलेले
आयुष्याच्या प्रवासात खूप काही शिकले. खरं काय, खोटं काय, काय अस्सल काय हीणकस याची धक्के खात का होईना ओळख झाली आहे आता.
मनाची अशी एक स्थिती असते की आता साऱ्या लाटा ओसरून गेल्यात, किनाऱ्यावरचा गाळ, कचराही त्या लाटांबरोबर वाहून गेलाय आणि आता किनारा स्वच्छ, सुंदर आणि स्थिर झाला आहे.
सहजच केशवसुतांच्या या ओळी आठवतात.
* शांतच वारे शांतच सारे*
शांतच हृदयी झाले सारे
कवयित्रीचे मनातले वादळ आता असेच शमत आहे. मनातल्या विचारांच्या पावसाचे थैमान आता ओसरत आहे कारण आता गतकाळातल्या सुखी जीवनाच्या आठवणीतच मन रमू लागलं आहे. या शेरात अरुणाताईंनी त्यांच्या हृदयातला एक अव्यक्त सरगम व्यक्त केला आहे.
आता मला कळाले हे सार जीवनाचे
सारे पळून गेले थैमान दाटलेले
या शेवटच्या शेरामध्ये जीवन यांना कळले हो असा एक अध्यात्मिक विचारच जणू मांडला आहे.
जीवन हे एक मंथन आहे. साऱ्या सुखदुःखाची घुसळण होते आणि मग हाती सार लागते. सुखा मागून दुःख आणि दुःखा मागून सुख हा नियतीचा नियमच आहे. दुःखातून सुखाचा मार्ग काढणे म्हणजे जीवन जगणे. विचार करता करता कवयित्री अरुणाताईंना याची जाणीव झाली आहे आणि त्या म्हणतात,
आता मला कळाले हे सार जीवनाचे
“दुःख उगाळत राहण्यापेक्षा सुखाला दार उघडून द्यावे” हे मी जाणते आणि आता हे मनातल्या काळोखातलं थैमान कसं ओसरत आहे याचाही अनुभव घेत आहे.
ही गझल म्हणजे मनाचा एक प्रवास आहे.
अस्वस्थतेकडून स्थैर्याकडे नेणारा.
मिटलेलं दार उघडून देणारा.
अस्तापासून उदयाकडे नेणारा.
अतिशय सुंदर, अर्थपूर्ण, अशी ही गझल. साध्या साध्या पण सुंदर रूपकातून जीवनाविषयीचा एक सखोल संदेश ही गझल वाचत असताना मिळतो. वादळातून शांततेकडे, नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेणारा एक विचार प्रवाह या गझलेत अतिशय नेमकेपणाने, सुटसुटीत शब्दात मांडलेला आहे
माजलेले, जाहलेले, ठाकलेले, चाललेले, घातलेले यासारखे लगावली साधणारे काफीया शेरामधली खयालत आणि राबता यांची खोली दर्शवतात.
थोडक्यात अरुणाताई मुल्हेरकर यांची थैमान म्हणजे एक सुंदर गझल, एक सुंदर खयालत, एक सुंदर संदेश.
☆ त्यांचा पाऊस… आमचा पाऊस… एक वेदना – लेखक : हेरंब कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆
पाऊस धुवांधार कोसळतो आहे. सगळी धरणे वेगाने भरत आहेत. पावसाळी पर्यटनाला उधाण आले आहे. फेसबुकवर या ओल्याचिंब फोटोंचा खच पडलाय. शहरी भागाला पाणीपुरवठा करणारी धरणे तुडुंब भरल्यामुळे शहरी माणसे खुश आहेत.. धरणे भरताना धरणाच्या खालच्या लाभक्षेत्रातील माणसे क्रिकेटचा स्कोर बघावा तसे रोज किती पाणी वाढते ते बघत असतात आणि एकदा धरण भरले की ते सेलिब्रेट करायला धरणाकडे, धबधब्याकडे धाव घेतात… कोसळणारा पाउस, धबधबे आणि हातातील फेसाळती बिअर एकमेकात मिक्स होऊन जाते..
पण ही धरणे अवघ्या पंधरा दिवसात इतकी पटकन भरताना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या पावसात तिथे राहणाऱ्या आदिवासी गरिबांच्या जगण्याचे काय होत असेल ? याचा विचार तरी मनात येतो का ? धरणाच्या फेसाळत्या पाण्याबरोबर वाहत आलेले त्यांचे अश्रू धरणाच्या लाभक्षेत्रात राहणाऱ्या लोकांच्या लक्षात तरी येतात का ?
जवळपास सर्वच धरणाचे पाणलोट क्षेत्र हे दुर्गम भागात असते. तो पहाडी आणि जंगली भाग असतो. त्या परिसरात आदिवासी किंवा शेतकरी कष्टकरी लोक राहत असतात. पाउस जेव्हा नियमित असतो तेव्हा हळूहळू धरण भरते पण जेव्हा एखादे धरण अवघ्या काही दिवसात मुदतीआधी भरते तेव्हा त्या पाणलोट क्षेत्रात किती भयावह स्थिती असते याची कल्पना करता येणार नाही पण तो कधी चर्चेचा विषय होत नाही..
मी ज्या अकोले तालुक्यात राहतो. त्या तालुक्यात भंडारदरा धरण आहे. या धरणाची क्षमता ११ टीएमसी आहे. दरवर्षी हे धरण १५ ऑगस्ट ला भरते पण यावर्षी ते १५ दिवस अगोदर भरले आहे.. ज्या आदिवासी पाड्यातून हे पाणी या धरणात येते त्यांची अवस्था आम्ही बघतो, ती स्थिती जास्त पाऊस झाल्याने अधिकच विदारक होते.
त्यांची घरे काही आपल्यासारखी बंगल्याची सिमेंटची नसतात, त्यामुळे पावसात चहा घेत टीव्ही वर राजकारणाच्या बातम्या बघत निवांत ते राहू शकत नाहीत. आधीच त्यांचे घर झोपडीवजा असते. इतक्या वेगवान आक्रमक पावसात ती घरे नीट टिकाव धरत नाहीत. घरे गळत असतात. जनावरेही सततच्या थंडीत काकडून जातात त्यामुळे कधीकधी थंडीत मरतात. इतक्या पावसात चाराही आणता येत नाही त्यामुळे अनेकदा चांगला गोठा नसेल तर जनावरांना घरात आत घ्यावे लागते. एवढ्या छोट्या जागेत माणसे आणि जनावरे एकत्र राहतात. त्या दाटीत ते कसे राहत असतील ..?
पुन्हा पाउस एकदा सुरु झाला की वादळात वीज खंडित होते. अगदी महिना महिना वीज नसते अशी स्थिती अनेक पाड्यांवर असते. वीज नसल्याने जवळच्या गिरणीत धान्य दळून मिळायला अडचण होते. अंधारात महिनाभर ही माणसे राहतात .. मोबाईल चार्ज होणे तर दूरच.
भात लावणी होते पण या तीव्र पावसात इतर रोजगार बंद होतात.. घरात साठवणूक तरी या गरीब माणसांची किती असणार ? घरातून बाहेर निघणे मुश्कील होते. लाकूडफाटा गोळा करायला ही जाता येत नाही अशी बिकट स्थिती ….
पाऊस जर अतितीव्र असेल तर शेतीची मातीही वाहून जाते. ती थांबवणे हे आव्हान असते. आमच्या तालुक्यात एकदा एका शेतात डोंगर कोसळला आणि ती शेतीच करणे मुश्कील झाले.. दु:खाचा डोंगर कोसळतो म्हणजे काय ? याचा प्रत्यय त्या लोकांना आला असेल..
इकडे धरण भरण्याचा जल्लोष सुरु असताना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील माणसे अशा रोजच्या जगण्याच्या प्रश्नाशी झगडत असतात…
याच माणसांच्या पूर्वजांनी जमिनी या धरणासाठी दिलेल्या असतात, यांचेच पूर्वज मजूर म्हणून या धरणावर मजूर म्हणून राबलेले असतात आणि आज धरण भरताना त्या पावसाची किंमत हीच माणसे चुकवत असतात… या माणसांना धरण काय देते ? पुनर्वसन कायदे आज आले पण फार पूर्वी बांधलेल्या धरणात ज्यांचे सर्वस्व गेले ते सर्वहारा आहेत…. नर्मदा जन आंदोलनात पुनर्वसन कसे होते ते किती फसवे असते आणि सरकार अगदी न्यायालयात सुद्धा किती धडधडीत खोटे बोलते हे आपण बघितले आहे.. मेधा पाटकर सारख्या एका प्रतिभावंत व्यक्तीचे आयुष्य खर्ची पडले तरी अजूनही प्रश्न त्याच गर्तेत फिरताना बघतो आहोत ..
सर्वात विदारक काळा विनोद हा असतो की उन्हाळ्यात यातील अनेक पाड्यावर पाणी टंचाई असते आणि हे लोक पाण्यासाठी वणवण फिरतात.
ही सारी वेदना दया पवार यांच्या कवितेत अगदी तंतोतंत उतरली आहे.. आमच्या तालुक्यात भर पावसात भिजणाऱ्या केविलवाण्या झोपड्या बघितल्या की ही कविता दया यांनी या पाड्यावर लिहिली का ? असे प्रश्न पडतात …
बाई मी धरण धरण बांधते
माझे मरण मरण कांडते
पुढे दया म्हणतात…
वेल मांडवाला चढे
माझ्या घामाचे गं आळे…
माझ्या अंगणी अंगणी पाचोळा ग पडे….
खरेच या माणसांना काय मिळते ?
आज पुणे शहराला १७ टीएमसी पाणी लागते. त्या पाण्यावर ही समृद्धी उभी आहे. त्या पाण्याचा माणसे बेसुमार वापर करतात, स्विमिंग टॅंक पासून सारे काही मनोरंजन उभे राहताना त्या धरणांची आणि पावसाची भयावह किंमत चुकवणाऱ्या माणसांना व्यवस्था म्हणून आपण काय दिले याचा कधीतरी या आनंदात विचार करतो का ? किमान त्याबद्दल आनंद साजरे करताना संवेदना तरी ?
हे दोन जगातील अंतर इतके टोकाचे आहे की या जल्लोषात त्यांचे हुंकार पोहोचत सुद्धा नाहीत.
एकदा मी असाच पावसाळ्यात आमच्या भंडारदरा परिसरात गेलो होतो. पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. पाउस थोडावेळ थांबला होता.. एक मुंबईची पर्यटक महिला वाहणाऱ्या छोट्या धबधब्यात पाय टाकून पाउस कधी सुरु होईल म्हणून आकाशाकडे आशेने बघत होती आणि पाउस थांबला म्हणून एक आदिवासी महिला घाईने लाकडे जळण म्हणून गोळा करत होती.. कडेचा हा जल्लोष तिच्या गावीही नव्हता… माझ्या मनात आले दोघीही महिला, पण दोघीचे भावविश्व किती वेगळे… एक पाउस येण्याची वाट बघणारी आणि दुसरी पाउस थांबण्यासाठी वाट बघणारी.
पावसातही भारत – इंडिया असतो तर ….
धरणे यावर्षी लवकर भरली.. कदाचित त्यात या पाणलोट क्षेत्रातील माणसांचे अश्रू असल्याने तर पाणी वाढले नसेल…?
☆
लेखक : हेरंब कुलकर्णी
प्रस्तुती – मेघःशाम सोनवणे
मो – 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ स्वातंत्र्य दिन 🇮🇳 ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
(१५.०८.२०२४)
आज भारताचा ७८वा स्वातंत्र्य दिवस. 🇮🇳
मागील ७८ वर्षात भारताने लक्षणीय प्रगती केलेली आहे. त्याबद्दल सर्व भारतीयांचे कौतुक करावे तितके थोडे आहे.
शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यात राहूनही काही वर्षात अशी नेत्रदीपक प्रगती करणे हा पराक्रम म्हणावा लागेल….!
अनेक क्षेत्रातील प्रगतीची उंच शिखरे गाठत असताना, आपण माणुसकीच्या शिखरावरून खाली तर येत नाही ना याचाही विचार केला पाहिजे.
आर्य सनातन वैदिक हिंदू संस्कृतीने मागील हजारो वर्षात कोणावरही आक्रमण केले नाही, तर याउलट सर्व विचारधारांना आपल्या मध्ये सामावत माणुसकी धर्म वाढवण्याचा प्रयत्न केला.
*भगवंताने गीतेत सांगितलेला उपदेश प्रत्यक्ष आचरणात/कृतीत आणण्याचा कालावधी सुरू झाला आहे असे म्हणता येईल. देशातंर्गत सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आपल्याला आढळून येईल. भागवतांनी सांगितलेली गीता अर्जुनाने नुसती पाठ केली नाही, तर ती समजून घेऊन अधर्मी लोकांचा नाश केला. हा इतिहास आपण आजच्या पावन दिनी आठवूया.
अर्जुनाने शमी वृक्षावर ठेवलेली शस्त्रे काढून युद्ध केले. आज आमच्या घरात उंदीर मारायला काठी असेल असे सांगता येत नाही. आपल्या सर्व देवी देवतांच्या हातात शस्त्र आहे आणि ते चालवण्याची धमक आणि कुशलता देखील आहे. आपण याचे अनुकरण आणि अनुसरण करण्याची गरज आहे.
अधर्माचा नाश आणि धर्माची प्रतिष्ठापणा करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. भारत विश्विजेतेपदी विराजमान होण्यासाठी दुर्जन सक्रिय आणि सज्जन निष्क्रिय हे समीकरण उलट करावे लागेल.
यासाठी आरक्षणाची नाही तर स्वतः देशाचे, धर्माचे संरक्षण करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.
आजच्या पावनदिनी आपण अशी प्रतिज्ञा करू की भारतमातेच्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत, यापुढे माझी भारतमाता कधीही खंडीत होणार नाही…!!