☆ व्रतोपासना – १०. काय काय करावे ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या. त्यात काय करू नये हे विशेषतः सांगितले होते. आज आपण काय करावे यावर लक्ष देऊया. या गोष्टी आपण रोजच आचरणात आणल्या तर त्याचा स्वतः सहित सर्वांनाच फायदा होणार आहे. उपनिषदामध्ये एक थोर वचन आहे. या विश्वातील वस्तुमात्र ईश्वराने व्यापलेले आहे. त्यामुळे त्यागपूर्वक (जीवनावश्यक) भोगाचा स्वीकार करावा. कोणत्याही धनाचा लोभ करू नये हा सिद्धांत म्हणजे भारतीय संस्कृतीचा पाया आहे. त्याग पूर्वक भोग आणि लोभाचा त्याग यामुळे आपले जीवन समृद्ध बनू शकते. त्यासाठी मनाचे सामर्थ्य वाढवावे लागते. आपल्या बलवंत मनाला अंतर्मुख बनवण्यासाठी व्रते फार महत्त्वाची असतात. व्रत म्हणजे निश्चयाने सतत अखंडपणे करायची कृती. त्यासाठी निष्ठा धैर्य सहनशीलता असे गुण असावे लागतात.
आत्ता पर्यंत आपण सोपी व्रते बघितली. आजही सहज अंगीकार करता येतील अशी व्रते बघू या. यात रोज आचरणात आणण्याची व्रते आहेत.
१) रोज व्यायाम करणे. ज्याला जो जमेल त्याने तशा पद्धतीने करणे. रोज प्राणायाम करणे.
२) रोज ध्यान करणे.
३) चेहेऱ्यावर एक स्मितहास्य कायम असावे. त्यामुळे बघणाऱ्या व्यक्तीला आनंद मिळतोच. पण याचा फायदा आपल्याला जास्त होतो. हसण्या मुळे शरीरात एंडॉरफिन नावाचा अंतस्त्राव स्त्रवू लागतो. तो पेनकिलरचे काम करतो.
४) कायम वर्तमानात रहावे. काल काय झाले हे आठवू नये.आणि उद्या काय होणार याचीही चिंता करु नये.
५) प्रत्येक घटना, व्यक्ती यातील सकारात्मकता शोधून त्याकडे लक्ष द्यावे. आणि सकारात्मक बोलावे.
५) जमेल तेवढे कोणत्याही स्क्रीन पासून लांब रहावे. आवश्यक तेवढाच वापर करावा.
६) सामाजिक संपर्क ठेवावा. त्यामुळे आपली मनस्थिती नक्कीच बदलते.
७) तुलना करण्या पासून लांब रहावे. कोणाचीच कोणाशी अगदी स्वतःची सुद्धा इतर कोणा बरोबर तुलना करू नये.
८) अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवावी. साधारणपणे अपेक्षा दुसऱ्या व्यक्ती कडून ठेवली जाते. आणि अपेक्षा या शब्दाला जोडून येणारा शब्द बहुतांशी भंग हा असतो. आणि अपेक्षा भंग झाला की त्याच्या बरोबर दुःख, मानसिक ताण येतोच.
९) शक्य तेवढा आनंद द्यावा. आपण जे जे दुसऱ्याला देतो ते आपल्याकडे कित्येक पटींनी परत येते. आनंद हवा असेल तर तो वाटावा. म्हणजे सगळेच आनंदी राहतील.
१०) महत्त्वाचे म्हणजे यातील जमतील तेवढी व्रते अंगीकारण्याचा प्रयत्न करावा.
व्रते वैकल्ये कायमच असतात. फक्त त्या त्या काळानुसार त्यात बदल होत असतो. त्याप्रमाणे आजच्या काळाला अनुकूल व अनुरूप अशी काही व्रते सांगितली आहेत अर्थात हे माझे विचार आहेत. पण त्याचा फायदा मात्र नक्कीच आहे.
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१७ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
बुधवारातली खाऊगल्ली-
या परिसराचं प्रमुख आकर्षण म्हणजे ‘ बुवा आईस्क्रीमवाले ‘ .. मधुर,मुलायम चवीचं असं सुंदर आईस्क्रीम. आम्हा मुलांचं जीव की प्राण असलेल्या या दुकानाचे नाव ‘बुवा’ का ठेवले असेल? हे कोडं सोडवणं आमच्या बुद्धीपलीकडचं काम होत.आमच्यात तशी खूप चर्चाही व्हायची. शेवटी एकाने दिवे पाजळले, दुकानाच्या मालकांच्या भरगच्च मिश्यांमुळे ते ‘बागूल बुवा’ सारखे दिसतात म्हणून असं नाव ठेवलं असावं. पण काही म्हणा,हे ‘बुवा आईस्क्रीम वाले’ पुण्यात खूप प्रसिद्ध होते. धंदाही दणक्यात चालला होता.
लग्न मुंजीसाठी मुहूर्ताची पहिली अक्षत कसबा गणपती पुढे असायची. नंतर दुसरा मान होता जागृत ग्रामदैवत तांबड्या जोगेश्वरीचा. भर उन्हात कसबा गणपतीनंतर श्री जोगेश्वरीला अक्षत देऊन बाहेर पडल्यावर कोऱ्या साडीला खोचलेल्या चार बोटाच्या टिचभर रुमालाने घाम पुसत, नऊवारीचा बोंगा आंवरत, नथीचा आकडा सावरत वधू माय नवऱ्याला म्हणायची, “ काय बाई हे ऊन ! इश्य ! कित्ती उकडतंय ! अहो आपण आइस्क्रीम खाऊया का गडे ? ” गौरीसारख्या नटून थटून आलेल्या बायकोकडे बघून आणि तिच्या गोड बोलण्याला विरघळून नवऱ्याचं आईस्क्रीमच व्हायचं.आणि मग ती जोडी त्या गारव्यात शिरायची . आम्हाला त्यांच्यामागे दुकानात शिरावंस वाटायचं. पण फ्रॉकचा खिसा रिकामाच असायचा. मन मारून मग आम्ही प्रसादाचा, खडीसाखरेचा खडा मिळवण्यासाठी देवीच्या गाभाऱ्यात शिरायचो. आईस्क्रीमची किंमत चार आणे बाऊल होती. ते आम्हाला परवडणार नव्हतं. त्यापेक्षा फुकटची देवीसमोरची खडीसाखर परवडायची.’– दुधाची तहान ताकावर दुसरं काय ‘—-
टकलेआत्या नावाची आमची एक मानलेली आत्त्या होती.. त्यावेळची गर्भश्रीमंत, दागिन्यांनी नटलेली, आत्त्या कारमधून उतरली की आम्ही विट्टी दांडू फेकून जीव खाऊन पळत सुटायचो. कारचा दरवाजा उघडायला एकमेकांना ढकलत पुढे जायचो. ही आत्त्या आली की आमचा आनंद गगनाला भिडायचा, कारण श्रीमंत माहेरवाशिणीला कान तुटक्या कपातून पांचट दुधाचा चहा कसा काय द्यायचा ? अशा धोरणी विचाराने आमची आई सौ.टकले आत्यांकरिता चक्क आईस्क्रीम मागवायची. आम्ही आशाळभूतपणे गुलाबी थंडगार आईस्क्रीमकडे बघत तिथेच घिरट्या घालायचो. आत्याच्या ते लक्षातच यायचं नाही. आत्याचा बाउल साफ- सूफ व्हायचा. आणि मग तिच्या लक्षात आल्यावर ती म्हणायची ,” हे काय वहिनी मुलांसाठी नाही का आईस्क्रीम मागवलत? “ आईला काय बोलावं काही सुचायचंच नाही कारण तिच्याजवळ इतके पैसेच नसायचे. चाणाक्ष आत्या ‘त ‘ वरून ताकभात ओळखायची. आणि मग हळूवारपणे आपल्या मखमली, चंदेरी टिकल्या लावलेल्या बटव्यातून नाणी काढायची, अलगद आमच्या हातावर ठेवून म्हणायची, ” पळा रे पोरांनो आईस्क्रीम खाऊन या. ” हे वाक्य ऐकण्यासाठीचं तर आम्ही आतुर झालो होतो. पैसे हातात पडताच छताला टाळू लागेल अशी उंच उडी मारावीशी वाटायची. पण मग धाड्दिशी जमिनीवर आदळायचो.कारण आईचे डोळे मोठे झालेले असायचे. आईच्या डोळ्यांकडे नजर गेल्यावर आम्ही चुळबूळ करायचो, आत्या म्हणायची “आईकडे काय बघताय ? मी सांगतेय ना ! हे पैसे घ्या आणि पळा लौकरआणि जा बुवांकडे” .. मग काय आम्ही हावरटासारखे चार आण्याचं नाणं मुठीत पकडून जिन्यावरून एकेक पायरी वगळत उड्या मारत बुवा आईस्क्रीमवाल्यांच्या दुकानात शिरायचो.आणि मग काय बुवांकडे गुलाबी, पोपटी,पिस्ता आईस्क्रीम खाताना मनांत यायचं आपला ढग झालाय आणि आपण हवेत तरंगतोय. अहाहा ! काय तो सुखद गारवा.,काय ती आईस्क्रीमची मिठ्ठास चव, अजूनही जिभेला विसर पडला नाही.आणि मग मनाला सुखावणारा गारवा अंगावर घेता घेता आमची ब्रह्मानंदी टाळी लागायची. स्वर्गच आमच्या हातात आला होता.
आईस्क्रीमची चटक लागली होती,पण पैशांचा ताळमेळ जमत नव्हता. अखेर पगार झाल्यानंतर माझ्या वडिलांनी ति.नानांनी आईस्क्रीमचा पॉटच घरी आणला. पण तो फिरवतांना नाकी दम आले. घामाच्या धारा लागल्या, पण नंतर मात्र तीन-तीन वाट्या आईस्क्रीम हादडायला मिळालं . अगदी तुडुंब पोटभर.
.. .. पण मंडळी गेले ते दिवस,आणि गेली ती आईस्क्रीमची तेव्हाची चव.
.. .. अजूनही रंग उडालेली –‘ बुवा आईस्क्रीम वाले ‘ — ही पाटी डोळ्यासमोरून हालत नाहीये बघा !
.. मनाचं पाखरू अजूनही त्या दुकानाभोवती घिरट्या घालतंय… त्या जोगेश्वरीच्या परिसरातच घुमतंय .
☆ “स्कूल तो बहुत सीख लिया, अब…”☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
“स्कूल तो बहुत सीख लिया, कुछ दिन तो बिताये इन्सानियत सीखनें के लिए !”
काॅलेजात असताना गाडीची किल्ली हातात असणं म्हणजे चैन वाटायची. खिशात फारसे पैसेही नसायचे. अर्थात, खूप पैसे लागतही नसत. सगळीकडे सायकल दामटत फिरायचं आणि मिळेल ते खायचं, असं खूप भटकलो.
मी सांगतोय तो काळ काही फार जुना नाहीय. पण तेव्हा स्वस्ताई जास्त होती की देणाऱ्यांचे हात मोठे होते, यात उजवं-डावं करणं कठीण आहे.
रोज सकाळी ६ वाजता पर्वतीवर जायचा आमचा शिरस्ता. सदाशिव पेठेत राहत होतो, तिथून चालत निघायचं आणि थेट पर्वतीवरच जाऊन थांबायचं. सकाळच्या गारव्यात दोनदा पर्वती चढायची-उतरायची आणि मग पायथ्याला गरमागरम पोहे किंवा उपीट खाऊन चहा प्यायचा. दहा रूपयांत काम ओके..! एखाद्या दिवशी पैसे विसरले-बिसरले तर कुणी उपाशी जाऊ दिलं नाही आम्हांला. चहा-नाश्ता विकणारी तरी अशी कुठं श्रीमंती ऊतू जाणारी माणसं होती? शाळेत चार बुकं कमी शिकली असतील कदाचित, पण माणूसपणात मात्र तरबेज एकदम.
दर रविवारी सिंहगड ठरलेला. पहाटे अंधारातच सायकलला टांग मारून सुटायचं, खडकवासल्यापाशी अर्धा-अर्धा कप चहा घ्यायचा. आतकरवाडीत सायकली लावून पायवाटेनं गडावर जायचं. एखाद्या मेटीवर थकून थांबलं आणि पाणी मागितलं तर नुसतं पाणी यायचं नाही. चमचाभर साखर यायची. ‘पोरांनो,चहा घ्या घोटभर’ अशी हक्काची ऑर्डर असायची. ‘पैसे किती?’ असं विचारल्यावर ‘मोठा साहेब होशील तेव्हा घेईन पैसे’ असं म्हणणारी माणसं..
गडावर पिठलं-भाकरी खायला बसावं आणि एकाच भाकरीत पान उचलायला जावं तर जमायचंच नाही. ‘एका भाकरीतच पोट कसं काय भरतंय तुमचं? खावा अजून येक भाकर’ असा आग्रह व्हायचा. कांदा बुक्कीनं फोडावा लागायचा. चुकून कच्ची मिरची दाताखाली आली की पाणी-पाणी व्हायचं. चुलीशी बसलेली बायका-माणसं लगोलग दह्याची वाडगी पुढं करायची. थंडगार ताक खरोखरच आत्मा शांत करायचं. पातेल्यात लावलेला भात हे प्रकरण चवीला अफलातूनच असतं, शिवाय पौष्टीकही. तेव्हा दह्या-ताकाचे पैसे मोजून घेत नसत. नेहमी गडावर येणाऱ्यांकडून तर नाहीच.
गडावर सरबत विकणारा एक मित्र होता. दहावीत शाळा सोडलेला. पाच रूपयांना लिंबाचं सरबत विकायचा. चांगला दोस्ताना जमलेला. मग दोन-तीन-चार ग्लास सरबत पोटात गेलं तरी हा मात्र पाच रूपयेच घ्यायचा. का? तर ‘मित्र’ म्हणून..! मी त्याला एकदा विचारलं होतं, ‘किती कमाई होते रोजची?’ २००५ साली त्याचं उत्तर होतं, ‘रोजचे पंचवीस-तीस रूपये सुटत्यात आणि रविवारी चांगली कमाई हुती शंभर-सव्वाशे रूपये..!’ महिन्याकाठी हजार-दीड हजार रूपयांची मिळकत असणारा तो माझा मित्र मला दोन-दोन ग्लास सरबत फुकट का बरं देत असेल?
गडावर एकवेळ मागाल तितकं ताक मिळेल पण पाणी मिळणार नाही अशी स्थिती होती. पाणी मर्यादीतच असायचं. वीजेचा पुरवठा अगदी नियमितपणे अनियमित. अशा स्थितीत पायात प्लास्टीकच्या चपला अडकवून हा दिवसभर गडावर फिरून सरबत विकायचा. संध्याकाळी खाली उतरायचा. कधी कधी त्याचा अंदाज चुकायचा अन् नुकसान व्हायचं. गडावर राबता नसला की, केलेलं सरबत वाया जायचं. दिवसही वाया जायचा, पायपीट व्हायची, पैसेही मिळायचे नाहीत आणि मालाचंही नुकसान ! मग त्याची फार चिडचिड व्हायची. पण, दोन-तीन तासांत गडी नाॅर्मल..! खिशात पैसे नव्हते, पण त्याच्याकडे दानत होती हे निश्चित.
कलावंतीण-प्रबळगड सारख्या ट्रेकमध्ये किंवा वासोट्यासारख्या ट्रेकमध्ये आपले सगळे नखरे अक्षरश: हवेत विरून जातात. ‘कुठलंही द्या, कसलंही द्या, पण पाणी द्या’ अशी स्थिती होते तेव्हा गडावरच्या झोपड्यांचं महत्त्व समजतं. इतक्या दुर्गम ठिकाणी, जिथं दिवसाला पाच-पंचवीस माणसं येण्याचीसुद्धा शाश्वती नाही, अशा ठिकाणी स्टाॅलसदृश दुकान मांडून बसायचं, हा केवळ व्यवसाय असेल असं वाटत नाही. त्याही पलिकडे काहीतरी असणार..! कैऱ्या, जांभळं, करवंदं, बोरं, पेरू, आवळे, काकड्या, दही, ताक, सरबतं,चहा अशा गोष्टी विकून त्यांना श्रीमंती येत असेल का?
महाबळेश्वरमध्ये कुल्फी विकणं वेगळं आणि माहुलीसारख्या गडावर चहा-सरबत विकणं वेगळं.. पाण्याचं महत्व आपल्याला तेव्हाच समजतं जेव्हा घोटभर पाण्यासाठीसुद्धा प्रचंड तंगडतोड करावी लागते. खिशात भरपूर नोटा असूनही उपयोग नसतो, जवळ उरलेली दोन-चार पारले बिस्कीटंसुद्धा सोन्याच्या बिस्कीटांइतकीच मौल्यवान वाटायला लागतात. एरवी आपण या गोष्टींकडे ढुंकूनही पाहणार नाही. तिथं गेल्यावर आपल्याला याची जाणीव आपोआपच होते.
सिंधुदुर्गाला जाण्यासाठी पाॅवर बोटी आहेत. पण जंजिऱ्याला जाण्यासाठी शिडाच्या बोटी आहेत. त्या वल्हवाव्या लागतात. ते शारीरिक कष्टाचं काम आहे. वाऱ्याचा अचूक अंदाज घ्यावा लागतो. ते कौशल्य ही माणसं कुठून आणि कशी शिकत असतील? समुद्रातून वाहतूक करण्याचा व्यवसाय करणं हे मुळीच सोपं काम नाही. पावसाळ्यात चार-पाच महिने जंजिरा पर्यटकांसाठी बंद केला जातो, तेव्हा ही माणसं काय करत असतील? याचा विचार आपण कधी करत नाही. ती माणसं शिकलेली नसतील पण, समुद्राच्या घडण्या-बिघडण्याचा अंदाज घेण्यात मात्र हे बहाद्दर निष्णात असतात.
एखाद्या गडावर आपल्याला चहा २०₹, पोहे ३०₹, भजी ५०₹ असं दिसलं की ते फार महाग वाटतं. पण, जो गड चढताना स्वत:च्या पायातल्या बुटांचंसुद्धा ओझं वाटायला लागतं, तिथं ती माणसं हे खाण्या-पिण्याचं साहित्य किती कष्टानं वर नेत असतील, हे डोळे, बुद्धी आणि मनं उघडी ठेवून पहायला हवं. जिथं घोटभर पाणीसुद्धा पायथ्यापासून घागरी-कळशांतून आणावं लागतं, तिथं लोकं ‘३०-३०₹ घेता आणि पोह्यांवर साधी कोथिंबीर-लिंबाची फोडही देत नाही तुम्ही’ अशी तक्रार करतात, तेव्हा त्यांच्या बौद्धिक पातळीची मला कीव कराविशी वाटते. ‘शी, काय हा चहा.. यात आलं सुद्धा नाही आणि २०₹ घेतात. नुसती लूट आहे ही’ असं म्हणणारी माणसं काही कमी नाहीत. त्यांनी चार दिवस त्याच ठिकाणी राहून चहा विकून दाखवावा आणि मगच असली बडबड करावी, असं मला वाटतं.
आपल्याला तर स्वयंपाकघरातून घराच्या दारापर्यंतसुद्धा सिलिंडर उचलून नेणं जमत नाही आणि ती माणसं सिलिंडर्स डोक्यावर-खांद्यावर वाहून नेतात..! स्त्रीसक्षमीकरण म्हणजे काय असतं ते गडकोटांवर जाऊन पहावं, त्याचा अभ्यास करावा, त्यावर प्रबंध तयार करून परिषदांमध्ये वाचावेत. पद्मपुरस्कारांकरिता गडकोटांवर वर्षानुवर्षं पर्यटक, इतिहासप्रेमींना सेवा देणाऱ्या एकाचंही नाव आपल्यापैकी कुणालाही सुचवावंसं वाटलं नाही. हा आपल्या सगळ्यांच्याच अज्ञानाचा, अपुऱ्या माहितीचा, अक्षम्य दुर्लक्षाचा आणि जगण्यावागण्यातल्या ओतप्रोत भरलेल्या स्वार्थीपणाचाच परिपाक नव्हे का? नारीशक्ती सन्मानाकरिता महाराष्ट्रातल्या शेकडो गडकोटांवर वर्षानुवर्षं भाकरी खाऊ घालणाऱ्या अन् पाणी देणाऱ्या एकाही माऊलीचं नाव आपण सुचवू शकलो नाही, याची आपल्याला खंतच नव्हे तर लाजही वाटली पाहिजे.
ही लोकं गडोगडी दिसतील. या माणसांकडे पहा जरा. व्यावहारिक जगतापासून पूर्ण लांब असलेली आणि जगण्यासाठी रोजची धडपड करणारी ही माणसं.. त्यांचा परिसर सोडून शहरांकडे गेलेली नाहीत. यांची घरंदारं कशी असतील? यांची मुलं-बाळं दिवसभर काय करत असतील? ती कोणत्या शाळेत जात असतील? असे अनेक प्रश्न पडल्यावाचून राहत नाहीत. दिवस उजाडल्यापासून ते मावळेपर्यंत घरापासून दूर डोंगरावर चौदा-पंधरा तास राबायचं, हे काम फार कठीण आहे. पण त्या बदल्यात त्यांना काय मिळतं? किती पैसे मिळतात? याचा जरा शोध घ्यायला हवा. शोधलंत तर निराळ्याच जगाचा शोध तुम्हांला लागेल..
मोबाईल फोन्स, इंटरनेट गेम्स, सोशल मीडीया, फुटकळ टीव्ही सीरीयल्स, रिॲलिटी शोज्, भुक्कड काॅमेडी शोज्, यांच्या विळख्यात अडकून आपण खरंखुरं जग पहायचं विसरूनच गेलो आहोत. त्यामुळेच, आपण कितीही संपन्न असलो तरीही आपल्याला ते कमीच वाटणार. आणखी मिळवण्याची लालसा कमी होणारच नाही. बहुतांश समस्यांचं मूळ हेच आहे.
उन्हाळ्याच्या सुटीचा काळ ह्या निराळ्या जगाचा शोध घेण्यासाठी वापरायला हरकत नाही. बाहेर रखरखीत उन्हाळा पेटलेला असताना आपण घरात मस्त गार हवेत बसून ह्या माणसांविषयी चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. हे जग प्रत्यक्ष जाऊन, जवळून अनुभवायला हवं. जाणून घ्यायला हवं. शक्य तितकी मदत करायला हवी. माणसांमधल्या माणूसपणाचं हे संचित जपलं पाहिजे..!
ते आजोबा नातवाला घेऊन रोज बागेत यायचे. त्याच्यासाठी कायम फिल्डर कम बॉलर बनून तो थकेस्तोवर त्याला बॅटिंग करू द्यायचे.
क्रिकेट खेळून मन भरलं की मग आजोबा घोडा बनणार… आणि त्यांचा पाचेक वर्षाचा नातू त्यांच्या पाठीवर घोडेस्वार बनून त्यांना त्या लॉनमध्ये इकडे तिकडे फिरवणार.
मग दोघेही थकले की आजोबा त्याला जवळ घेऊन कसली तरी गोष्ट ऐकवायचे…
‘मग एवढा मोठ्ठा राक्षस आला…’ आजोबा अगदी राक्षसारखं तोंड वगैरे करून गोष्ट रंगवायचे.
‘…आणि मग त्या राक्षसाला मारून तो राजकुमार राजकुमारीला सुखरूप घेऊन गेला आणि त्यानं खूप वर्षे राज्य केलं…’
रोज एका नव्या गोष्टीचा सुखांत व्हायचा. तृप्त मनानं आजोबा आणि तृप्त कानांनी तो नातू मग चांदणं बघत घरी निघायचे. ठरल्याप्रमाणं तो भेळ-पाणीपुरीवाला बागेच्या दारात वाट पाहत उभा असायचा.
“आजोबा, सुकी पुरी…”
नातवानं फर्माईश केली की आजोबा एक प्लेट तिखट पाणीपुरी आणि त्यांचा नातू एक प्लेट फक्त सुकी पुरी खाणार…
मग आजोबा खिशातून रुमाल काढून त्याचं तोंड पुसणार आणि बॅगेतून छोटीशी बाटली काढून त्याच्या तोंडाला लावणार.
त्यानं पूर्ण पाणी प्याल्यावर शिल्लक राहिलं, तर एखादा घोट आपण पिणार आणि त्याला हाताला धरून पलीकडल्या गल्लीत अंधारात नाहीसे होणार.
त्यांचं ते निर्व्याज प्रेम आणि त्या नातवाच्या बाळलीला बघून बरेच जण तृप्त होत होते… ज्यांना जमेल त्यांनी आपापला नातू आणायला चालूही केलं होतं आणि ज्यांना शक्य नव्हतं ते एखादा जास्तीचा फोन करून नातवाशी गप्पा मारत होते– कुणी शहरातल्या नातवाशी, कुणी गावातल्या, तर कुणी सातासमुद्रापार गेलेल्याशी…
त्या दिवशी आजोबा एकटेच होते. त्यांना एकटं पाहून त्यांच्याहून जास्त बेचैनी रोजच्या बघ्यांना झाली होती. एखादं सुंदर कारंजं अचानक थांबल्यावर किंवा एखादी गार वाऱ्याची झुळूक अचानक थांबल्यावर, एखादी सुरेल लकेर वरच्या पट्टीत गेल्यावर मध्येच रेडिओ खरखरल्यावर हमखास जसं होतं, अगदी तस्सं…
“आजोबा आज एकटेच… नातू नाही?”
आजोबा फक्त हसले. थोडा वेळ बागेत चकरा मारून झाल्यावर झोपाळयावर खेळणाऱ्या मुलांपाशी थोडेसे रेंगाळले. सुरकुतीतल्या मिशा थोड्याशा हलल्या. त्या मुलांना एकदोन चेंडू टाकून निघाले.
दारात नेहमीचा भेळवाला भेटला; पण आज काही त्यांनी तिखट पाणीपुरी घेतली नाही… त्यांची पावलं झपझप पुढच्या काळोखात विरून गेली.
“एक सेवपुरी देना…उसमे शेव कम डालनेका और कांदा थोडा जास्ती. तिखट मिडीयम रखना…” मी त्या भेळवाल्या भय्याला सांगितलं.
“ही घ्या साहेब तुमची कमी शेव, जास्त कांदा आणि मध्यम तिखटाची शेवपुरी…” त्याचं अस्खलित मराठी माझ्या अस्तर लावून बोललेल्या हिंदीची लक्तरं टांगत होतं.
“ते आजोबा थांबले नाहीत आज… छान खेळतात रोज नातवाशी आणि पाणीपुरी खातात तुझ्या गाडीवर… त्यांचा नातू नव्हता नाही का आज सोबत?” माझी अस्वस्थता मी बोलून दाखवली.
“तो त्यांचा नातू नाहीच साहेब… समोरच्या वस्तीतला पोरगा आहे तो… सैनिक स्कूलला गेला काल. एकदा चोरी करताना आजोबांनी त्याच्या बापाला आणि त्याच्या मित्राला पकडलं. प्रकरण पोलिसांत गेलं. घरची गरिबी बघून आजोबांनी केस मागं घेतली. त्याला चार चांगल्या गोष्टी सुनावल्या आणि पदरमोड करून त्याला सैन्यात भरती केलं.
लग्न लावून दिलं त्याचं आणि वर्षाचा पोरगा मागे ठेवून काश्मीरमधून तिरंग्यात गुंडाळून परत आला! सरकारी मदत जी मिळायची ती मिळालीच पण त्याची बायको आणि पोरगं वाऱ्यावर उघडे पडू नयेत म्हणून यांनी त्यांना स्वतःच्या घरात घेतलं. स्वतःच्या नातवासारखं त्याला आणि पोटच्या पोरीसारखं त्याच्या आईला जपतात…”
“मग आजोबांच्या स्वतःच्या घरचं कुणी…?”
“ उभी हयात सीमेवर शत्रूशी लढण्यात गेली, साहेब… शत्रूला डावपेचात मागं टाकण्याच्या विचारात संसाराचा डाव मांडणं जमलंच नाही… अजूनही सगळी पेन्शन आणि वेळ अशा रुळावरून खाली घसरू लागलेल्या पोरांना सावरण्यात घालवतात…”
“तुला इतकं सारं तपशीलवार कसं रे माहीत?”
“साहेब, तो चोरी करताना पकडलेला दुसरा पोरगा मीच होतो. ही भेळेची गाडी त्याच देव माणसानं टाकून दिलीय!”
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला जागं होणारे बेगडी देशप्रेम कुठंतरी डोळे ओले करून गेलं!
लेखक: अज्ञात
प्रस्तुती : सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(पूर्वसूत्र- समीर जिवंत राहिला तरी कधीच बरा होणार नाही हे डॉ.देवधर यांनी मला अतिशय सौम्यपणे समजावून सांगितलेलं होतं. त्यावेळी त्यांच्या केबिनमधे माझ्याबरोबर आलेले माझे ब्रँचमॅनेजर घोरपडे साहेब होते फक्त. ही गोष्ट घरी किंवा इतर कुणालाच मी मुद्दाम सांगितलेली नव्हती. असं असताना हे लिलाताईला कसं समजलं? मला प्रश्न पडला.)
विशेष म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मी कुणाला न विचारताच त्याच दिवशी मला परस्पर मिळणार होतं आणि माझ्या दुःखावर फुंकर घालत मला
दिलासाही देणार होतं हे त्या क्षणी मात्र मला माहित नव्हतं. सगळं घडलं ते योगायोगाने घडावं तसंच.
‘ समीर पृथ्वीवरील औषधाने बरा होण्याच्या पलिकडे गेल्यामुळे तो बरा होण्यासाठी देवाघरी गेलाय आणि बरा होऊन परत येणाराय ‘
हे लिलाताईच्या पत्रातील वाक्य पुत्रवियोगाच्या धक्क्यातून मला अलगद बाहेर घेऊन आल़ं होतं. ही अंतर्ज्ञानाची खूणगाठच होती जशीकांही! एका क्षणार्धात माझं पुत्रवियोगाचं दु:ख विरुनच गेलं एकदम…
“कुणाचं पत्र..?”
“लिलाताईचं. घे. बघ तरी काय लिहलंय? वाच”
ती न बोलता उठली. ‘चहा करते..’ म्हणत आत जाऊ लागली.
“आधी वाच तरी.. मग चहा कर.”
“सांत्वनाचंच पत्र असणार. काय करू वाचून? आपला समीर गेलाय हे कटू सत्य बदलणाराय कां?” तिचा आवाज भरून आला.
“हो बदलणाराय. बघशील तू. आधी वाच..मग तूही कबूल करशील.”
तिने ते पत्र घेतलं. वाचलं. निर्विकारपणे मला परत दिलं.
“तुला हे वाचून खरंच काहीच वेगळं वाटलं नाही?”
“नाही. लिलाताईंचं मराठी भाषेवर प्रभुत्त्व आहे म्हणून त्यांनी चांगल्या भाषेत आपलं सांत्वन केलंय एवढंच. बाकी वेगळं काय आहे त्यात?” ती म्हणाली.
तिचंही बरोबरच होतं. समीरच्या आजारपणाच्या बाबतीतल्या कांही गोष्टी तिला त्रास होऊ नये म्हणून मी त्या त्या वेळी मुद्दामच सांगितल्या नव्हत्या. आता सगळं घडून गेल्यानंतर ते तिला सांगण्यात कशाचाच अडसर नव्हता. ते नाही सांगितलं तर या पत्रातलं मला जाणवलेलं वेगळेपण तिला कसं जाणवावं….? पण ती ते सगळं समजून घेण्याइतकी सावरलेली नाहीय. सगळं ऐकल्यानंतर ती बिथरली तर? नकोच ते. जे सांगायचं ते तिचा मूड पाहून तिच्या कलानेच सांगायला हवं. तरीही ती केव्हा सावरतेय याची वाट पहात आता गप्प राहून चालणार नाही. लवकरात लवकरात लवकर तिला या एकटेपणातून बाहेर काढायलाच हवं….’
कितीतरी वेळ असे उलट सुलट विचार माझ्या मनात गर्दी करत राहिले. तिने चहाचा कप माझ्यापुढे ठेवला आणि मी भानावर आलो. डोळे पुसत ती किचनमधला पसारा आवरु लागली.
“आरती, ऐक माझं. पटकन् जा आणि आवर तुझं. मी तयार होतोय..”
“कां ? कुणी येणार आहे कां?”
“नाही..” मी हसून म्हटलं “कुणीही येणार नाहीय, आपणच जायचंय..”
“आत्ता? कशाला? कुठं जायचंय..?”
मला एकदम लिलाताईच्या माहेरघराची आठवण झाली.ते सर्वजण किर्लोस्करवाडी सोडून कोल्हापूरला आले त्याला दहा वर्षं होत आली होती. सुरुवातीची एक दोन वर्ष कष्टात गेली तरी आता त्यांचं छान बस्तान बसलं होतं.स्वत:चं घर झालं. कोल्हापूरला उद्यमनगरमधे स्वतःचं वर्कशॉप होतं, दोन लेथ होते, मशिनरी स्पेअर पार्टसचं स्वतःचं दुकान होतं. सगळे भाऊ स्वतः राबत होते. दोन वर्षांपूर्वीपासून लिलाताईचे वडिल प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व पसारा मुलांच्या हवाली करून अलिकडे घरी अंथरुणाला खिळून असायचे. क्वचित मधे कधीतरी एक दोनदा कामानिमित्ताने त्या भागात गेल्यानंतर मी उभ्या उभ्या त्यांच्या घरी जाऊन आलो होतो. पण त्यालाही बरेच दिवस गेले होते. शिवाय सगळी हालहवाल लिलाताई वाडीला भेटली की वेळोवेळी तिच्याकडून समजायचीच. माझा लहान भाऊ कोल्हापूरमधेच असल्याने नेहमी त्यांच्या संपर्कात असायचा. त्याच्याकडून चार दिवसांपूर्वीच लिलाताईचे वडील गेल्याचे समजले होते. या रविवारी मी त्यांच्या घरी भेटून यायचे ठरवले होतेच.त्यापेक्षा आरतीलाही बरोबर घेऊन आजच गेलो तर…? हा विचार मनात आला तेव्हाच आरतीने मला पुन्हा विचारले…”सांगा ना, कुठं जायचंय..?”
उद्यमनगरमधे. लिलाताईचे वडील नुकतेच गेलेत. तिच्या आईला भेटून तरी येऊ.” मी म्हणालो.
आरती गप्पच झाली एकदम.
“का गं? काय झालं?”
“नाही… नको.”
“का ?”
“आपला समीर अडीच तीन महिने दवाखान्यात अॅडमिट होता. त्यांच्यापैकी कुणी आलं होतं कां बघायला? तो गेल्याचंही समजलं असेलच ना त्यांना? त्यानंतरही कुणी आलं नाही.आपणच कां जायचं?”
मी निरुत्तर झालो. ती बोलली यात तथ्य होतंच.पण तरीही मला ते स्विकारता येईना.
हे बघ, त्यांनी केलं ते न् तसंच आपणही करायचं कां? लिलाताईचे वडीलही झोपून होते. त्यांचा कांही प्रॉब्लेम असेल. इतर कांही अडचणी असतील. त्यामुळे येणं जमलं नसेल. पण ती अगदी साधी माणसं आहेत गं. माणुसकी सोडून वागणारी तर अजिबातच नाहीयत.आणि आपण रहायला जातोय कां तिकडे? घटकाभर बसून बोलून येऊ. त्यांनाही बर वाटेल.”
ती न बोलता स्वतःचं आवरू लागली. मला तेवढं पुरेसं होतं. ती यायला तयार झालीय
हेच खूप होतं माझ्यासाठी.
त्यांच्या घराचं दार उघडंच होतं. हॉलमधे दारासमोरच्या भिंतीला टेकून लिलाताईच्या आई नेहमीसारख्या बसून होत्या.
मला दारात पहाताच त्यांना गलबलून आलं.
“ये रेss माज्या लेकरा..ये…” रडवेल्या आवाजातच त्यांनी अतीव मायेनं आमचं स्वागत केलं.आम्ही आत जाताच आरतीकडं पाहून त्यांचे डोळे भरुन आले.त्यांनी तिला जवळ बोलावलं..
“तू कां उबी? ये माझ्याजवळ.बैस अशी..” म्हणत तिला जवळ बसवून घेतलं.
” खूप आजारी होते कां हो बाबा?”
” हां तर काय? तरण्या वयापासून घाण्याला बांदलेल्या गुरासारका राबराब राबल्येला जीव त्यो. दोन वर्सं झाली आंथरुन सोडलं नव्हतं बग ल्येका. मी ही अशी.लांबून बघत बसायची निस्ती. पण समद्या पोरांनी लै शेवा केली बग त्येंंची.”
बोलता बोलता आरतीकडं लक्ष जाताच त्या बोलायचं थांबल्या.
” हे बघ बै.झालं गेलं गंगेला अर्पण करुन टाकायचं बग.त्यातच रुतून बसायचं न्है.कळतंय का? यील त्ये पदरात घ्यायचं न् पुढं जात -हायचं बग.” त्यांनी तिला समजावलं. त्यांच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द त्यांच्या अंत:करणातूनच उमटलेला असावा इतका आपुलकीने ओथंबलेला होता.”गप.रडू नको. तुजा इस्वास नाई बसनार,पन इतं गेटभाईर जीप हाय नव्हं , तिची डिलीवरी कवा मिळालीती सांगू?तुजं बाळ देवधर डाकतराकडं अॅडमीट झालंय त्ये आमाला समजलं त्याच दिवशी. मी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दरसन घ्यून लई वर्सं झाली बग.पोरं म्हनत हुती ‘चल.तुला उचलून नव्या जीपमंदी बशीवतो न् अंबाबाईच्या दरसनाला बी तसंच उचलून घ्यून जातो म्हणून.तवा म्या काय म्हनले ठाव हाय? मी म्हनले, त्या म्हाद्वार रस्त्यावरच अरविंदाचं बाळ हाय नव्हं दवाखान्यात? अंबाबाईचं दरसन राहूं दे.. मला उचलून त्या दवाखान्यात नेताय का सांगा.तरच मी जीपमध्ये बशीन. त्येच्या बाळाला बगून तरी येते यकडाव. पन दोन अवगड जिनं चढाय लागत्यात म्हनली पोरं.त्ये कसं जमणार हुतं? म्हनून मग जीपमदे बसनं न् देवीचं दरसन दोनी बी नगंच वाटलं. आज तुमी दोगं आला झ्याक वाटलं बगा…
आरती थक्क होऊन ऐकत होती. तिच्या मनातल्या प्रश्नाचं प्रश्न न विचारताच तिला परस्परच उत्तर मिळालं होतं!
“तुझ्या आईला न् तुला बी माजी लिलाबाई भेटती न्हवं वाडीत न्हेमी? ती सांगत असती मला…”
“हो.बऱ्याचदा भेट होते आमची”
” तिची पन लई सेवा झालीय बग दतम्हाराजांची.तुला म्हनून सांगत्ये..,तुझ्या बाबावानी लिलाबाई बोलती त्ये बी खरं व्हाय लागलंय बग.”
त्या सहज बोलायच्या ओघात बोलून गेल्या न् मग लिलाताईबद्दलच कांहीबाही सांगत राहिल्या.तिच्या वाचासिध्दीबद्दलच्या अनुभवांबद्दलच सगळं. त्यातला प्रत्येक शब्द मला निश्चिंत करणारा होता! सगळं ऐकत असताना लिलाताईच्या पत्रातला मजकूर माझ्या नजरेसमोर तरळत राहिला होता! त्यातला शब्द न् शब्द खरा होणाराय हा विश्वास आरतीपर्यंत कसा पोचवायचा हा प्रश्न मात्र त्याक्षणीतरी अनुत्तरीतच राहिला होता..!!
आतापर्यंत माझ्यासाठी कुंभमेळ्याचा रेफरन्स हा bollywood असल्याने, “कुंभ के मेले मे बिछड गये” हेच माहिती…
पण ह्यावर्षी काहीतरी वेगळे च! 2 /3 मैत्रिणीनी कुंभला जायचे booking केलेले. मला पण विचारलेले पण तसा काही फार इंटरेस्ट येत नव्हता, कारण ” bollywood बॅकग्राऊंड” आणि शिवाय मुलांच्या परीक्षा वगैरे होतेच. आताच भारतात जाऊन आल्याने तसेही काही पुण्याला जायचे वगैरे नव्हते..
पण नाही..कुंभस्नानाचा योग ह्यावर्षी होता..काहीतरी व्हायचे असेल तर “पुरी कायनात” ते पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करते. पुन्हा बॉलीवूड ज्ञान..
Dettol ची ad असते “सगळ्या germs ना संपवते” आणि मग साधारणपणे तो साबण घ्यायला बळी पडायला होते , काहीसे तसेच कुंभस्नानाबाबतीत झाले. कुंभस्नानाने सगळी पापे धुतली जातील, चक्र align होतील, अशा typeचे इतके फॉरवर्ड्स आले आणि त्यातून विशेष म्हणजे योगींनी केलेल्या व्यवस्थेचे videos. एवढ्या प्रचंड area मध्ये सामान्य लोकांसाठी बांधलेले तंबू , संत महंतांचे आखाडे, खाण्यापिण्याची व्यवस्था, सगळ्यांबद्दल बातम्या, forwards यांनी social मीडिया वर कुंभमेला गाजायला लागलेला.. मग एक दिवस मैत्रिणीला म्हणाले ,’जाऊया काय?’ तर ती तर तयारच होती , मग आणि एकीला पण विचारले..झाले .. तिघींचे जायचे तर ठरले..
आधी चर्चा झाली की 28 ला निघायचे , 29 ला शाही स्नान आणि 30 ला परत. मग कळले शाही स्नानासाठी पोचणे मुश्किल आहे, कारण सगळे रस्ते ट्रॅफिक कंट्रोलसाठी ब्लॉक करणार आहेत.
मग शाही स्नानाचा मोह सोडला. मग 31 to 2 फेब जायचे ठरवले. तिघींची सोय बघून ते त्यातल्या त्यात बरे वाटत होते, पण tickets बघितले तर खूप महाग !
मग काय कधी, कसे, असे करताना , 21 ला संध्याकाळी ठरवले, 23 ला निघू. नवऱ्याकडे पण बॉलीवूड ज्ञानच असल्याने त्याने जायला लगेच होकार देऊन तिकीट बुक करून दिले, “बरंय परस्पर काम झाले तर” असाच विचार असणार.. असा माझा दाट संशय आहे. आता घरातल्या विद्यार्थ्यांच्या exam तारखा पण फायनल कळल्या होत्या. ह्या काळात दोघांचेही अभ्यास करायचे प्लॅन नव्हते, कारण 23 ला दोघांच्या परीक्षा संपणार होत्या .
झालं मग, 23 ला वाराणसीला डायरेक्ट जायचे, 24 ला सकाळी अगदी लवकर उठून प्रयागला जायचे, संध्याकाळी परत यायचे आणि 25 ला परत. अगदी आटोपशीर..
पण देवाच्या मनात better प्लॅन होता.
23 ला आम्ही वाराणसीला 5 ला उतरलो, 6-30 ला ड्राइवर अनिल दुबेना भेटलो , तर त्यांनी सुचवले, की तसेही आताची संध्याकाळची गंगा आरती तुम्हाला मिळणार नाही, उद्या सकाळी निघायच्या ऐवजी आत्ता का निघत नाही. ‘तिथे राहायची सोय नाही’ हे कारण सांगितल्यावर , ‘ते मी बघतो’ असा त्यांनी विश्वास दिला, पण रात्रीची मेळ्याची मजा बघा- हा त्यांचा हट्टच होता. मग काय, मी बरं म्हणाले, प्रयागला जाताना वाटेत त्यांचे घर लागते तर त्यांनी घरी नेले, तिथे भरपूर पांघरूण बरोबर घेतली, घर आणि घरातले खूप छान होते. तिथून निघून 10-45 च्या आसपास प्रयाग ला पोचलो.
त्यांनी त्यांचे शब्द खरे केले. एका पुलावर गाडी उभी केली. इतका सुंदर दिसत होता मेळा. सत्य की स्वप्न प्रश्न पडावा. आम्ही आजूबाजूला लोकांना चालताना बघत होतो. लोकं 8 ते 10 किमी चालत होती, मोठ्या बॅग्स, मुलं बाळ सगळे… आम्हाला इतके लाजल्यासारखे झाले की आम्ही गाडीत निवांत बसलो होतो. लोकांच्या श्रद्धेला नमन करून, आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
खूप one ways, exit closed ह्यामधून मार्ग काढत तब्बल 45 मिनिटांनी आमच्या ड्राइवरने कुंभ मेळ्यात प्रवेश मिळवला, आणि गाडी डायरेक्ट संगमपाशी, जिथे पार्किंग होते तिथेच नेली. साधारण 11-30 झालेले , तर झोपायला कुठे जागा शोधायची? ह्यावर ड्राइवर काकांनीच ‘गाडीत झोपा’ असा तोडगा काढला. त्यांनीच अंथरूण घालून सीट फ्लॅट करून दिल्या. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी पाठ टेकली. आम्ही तिघी तशाच झोपलो.
साधारण 3 च्या आसपास जाग आली, बघितले तर एक मैत्रीण जागीच होती, म्हटलं, ‘चल, उठुया’
मग गाडीतून बाहेर आलो, काय व्यवस्था आहे ते बघायला. Lights भरपूर होते. त्यामुळे उजेड होता. Changing रूम्स, पब्लिक temporary टॉयलेट्स भरपूर होते. णी आपले आपण घेऊन जायचे असल्याने आणि आपले महान लोक तेवढे जबाबदार नसल्याने, आत सगळेच toilets स्वच्छ नव्हते , पण सरकारने केलेली व्यवस्था चोख होती. वापर करायची अक्कल नसेल तर सरकार काय करणार ! ते असो..
आम्ही फ्रेश झालो. आता आणि काय करणार असा विचार करून ब्रह्म मुहूर्तावर साधारण 3-45am च्या आसपास सरळ गंगेत डुबकी मारायला गेलो. पाणी खूप थंड होते, मी खूप थडथडत होते, पण मारल्या 4/ 5 डुबक्या. कुंभस्नान मिळेल का नाही असे वाटत असताना, देवाने ब्रह्म मुहूर्तवर स्नान घडवले. योगायोगाने तो सुनीताचा तिथीने वाढदिवस होता. मग जरा आवरून चक्कर मारायला बाहेर पडलो. कुठेतरी आत मनात “ब्रह्म मुहूर्तावर स्नान करायला हवे” ही इच्छा होती ती पूर्ण झालेली. एकदम जी मनात target achieved feeling होते. कोणालाच आम्ही ह्या कुंभमेळ्याला येण्याबद्दल सांगितले नव्हते कारण आम्हालाच खात्री नव्हती की हे घडू शकेल ..
तर अंघोळ झाल्यावर मेळ्यात tea कॉर्नरला मस्त आल्याचा चहा घेतला.
वाटेत एक आयुषवाल्यांचा टेंट दिसला, एक बाई उभी होती, म्हणून तिच्याशी बोलायला मी आत शिरले की चौकशी करावी , तर ती म्हणे, ‘आम्ही इथे फक्त टॉयलेट साठी आलोय’, इथे राहत नाही. त्यांचा उरका पडल्यावर मग आम्ही पण तिथेच नंबर लावला, भरपूर पाणी आणि स्वच्छ टॉयलेट होते. देवाने एकदम रॉयल व्यवस्था केली आमची. Adult diaper वापरावे का की काय करावे ह्या विचारात होतो तर देवाने कोणतीच कसर सोडली नाही.
आता परत किनाऱ्यावर आलो, तर गंगा स्नानासाठी बोटी सुरू झालेल्या . संगमाच्या मध्यात नेऊन स्नान .. मग आम्ही नुसते तरी जाऊ म्हणून गेलो. संगमात नुसते प्रोक्षण केले. अगदी छान वाटली बोट ट्रिप. तिथेच एक जण होती, २५ शी मधलीच असेल , ती म्हणाली, ” कितना अच्छा लग रहा हैं, सब लोग बस एकही सोच रहे है, ऐसा लगता हैं की सब एकही माँ के बच्चे हैं ” ..इतक्या साध्या शब्दात तिने तिथल्या वातावरणाचे यथार्थ वर्णन केले. Vibes का काय ते !!
सूर्योदय बोटीतून पाहिला, परत आलो तर 8-30 होत आलेले. मग एक रामकथा 9-30 ला सुरू होणार होती, तिथ गेलो. वाटेत जाताना आखाडे बघत गेलो, तिथे 2 तास बसलो आणि साधारण 11 ला परत गाडीकडे आलो आणि वाराणसीकडे निघू असे सांगितले फक्त जेवणाचा वेळ सोडला तरी जवळपास वाट काढत वाराणसीत यायला 4 वाजले. तिथे गेलो तर तिथे खूप जास्त ट्रॅफिक, त्यात बुक केलेले हॉटेल जरा आत गल्लीमध्ये. मग गाडी सोडली, चालत हॉटेलवर पोचलो. लगेच ड्रेस change करून गंगा आरतीला गेलो. बोट ride, गंगा आरती सगळं छान झालं..
एकाने अर्ध्या तासात दर्शन करवतो म्हणून गळी उतरवले आणि मी फसले. त्याच्या मागे गेलो. दर्शन होईस्तो 10-15 झाले रात्रीचे !
आधीच्या रात्री अवनीश exam म्हणून लवकर उठलेले, मग संगमावर गाडीत जेमतेम अडीच तीन तास.. त्यामुळे सकाळी 4-30 विश्वेश्वर दर्शनला निघायचं प्लॅन कॅन्सल केला. 11-15 पर्यंत पोचलो हॉटेल वर , 12 च्या आसपास झोपलो.
सकाळी परत 4-15 ला जाग !
5-30 ला आवरून हॉटेल बाहेर आलो तर लगेच समोर रिक्षा. मग संकटमोचन हनुमानला गेलो, झक्कास दर्शन झाले , फार गर्दी नव्हती.
तिथून अस्सी घाटला सूर्योदय बघितला. आदल्या दिवशी आरती घ्यायला मिळाली नव्हती , ती इथे मिळाली. तिथून मग कालभैरवला आलो, 8-30 च्या आसपास तेही झाले. मग विशालाक्षीचे दर्शन घ्यायचे ठरवले.
वाटेत वाराणसीच्या गल्ल्या मधून फिरलो, मग राम मिठाई भांडार लागले, तिथे फेमस कचोरी जिलेबीचा नाश्ता केला. मग भरपूर चालत गल्ली बोळ फिरत विशालाक्षीला आलो. वाटेत बघितलं आज विश्वेश्वराला भूतो न भविष्यती गर्दी होती. मोठ्या line लागल्या होत्या .त्यामुळे मधल्या छोट्या गल्ल्या बंद केलेल्या ..
आदल्या दिवशी दर्शन घेतले ते अगदी योग्य झालेले !
शक्ती पीठ असलेल्या विशालाक्षीचे दर्शन घेतले. मंदिर दक्षिणी पध्द्तीचे आहे पण खूप शांत वाटले. तिथली ऊर्जा जाणवत होती.
मग मात्र लगेच हॉटेल वर आलो. फ्रेश झालो व टॅक्सी बुक केली. ट्रॅफिकमुळे टॅक्सीवाल्याने मेन रोडपर्यंत म्हणजे जवळपास 2 किमी चालत यायला suggest केले , जे आम्ही मान्य केले कारण गाड्या हालतच नव्हत्या , थांबून राहिलो तर आमचीच flight मिस झाली असती.
चालत गेल्यावर लक्षात आले आमच्याकडे 1 तास हातात आहे. मग वाटेत सारनाथला जाऊ ठरले.
तिथे गेल्यावर बरीच निराशाच झाली. एवढी सुंदर मंदिरे, त्यावरचे कोरीव काम आपल्या सनातनी मंदिरांची असताना आमच्या लहानपणी कधीही अभ्यासात त्याबद्दल शिकवले गेले नाही आणि ह्या सारनाथबद्दल मात्र मलाच नव्हे तर माझ्या लेकीच्या अभ्यासात पण अजून त्याबद्दल माहिती आहे. पण काशीबद्दल नाही हे लक्षात आल्यावर चिडचिड झाली. असो .
परमेश्वराचीच इच्छा , त्याला जेव्हा प्रकट व्हायचे असेल तेव्हा तो नक्की होईलच फक्त आपला तो विश्वास कायम हवा.
एक मात्र नक्की ….
होतं ते बऱ्यासाठीच हा माझा विश्वास ह्या ट्रिपनंतर नक्कीच बळावला..
लेखिका : सौ. प्राची सहस्रबुद्धे – वेलणकर
प्रस्तुती : सौ. उज्ज्वला सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ||◆|| नंदकुमार सप्रे ||◆|| – लेखक : श्री सुनील होरणे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
मध्यंतरी एका अंत्यविधीसाठी अमरधाम मध्ये गेलो होतो. जवळचे नातेवाईक आणि
मृताच्या घरचे लोक चितेच्या ओट्याजवळ तयारी करत होते. इतर जे परिचित हजेरी लावण्यासाठी आले होते, ते नेहमी प्रमाणे समोरच्या पायऱ्यांवर एकमेकांची ख्याली खुशाली विचारत हास्य विनोदात दंग होते.
सर्व विधी पूर्ण झाल्यावर एक गृहस्थ तिथे आले. त्यांच्या हातात एक पिशवी होती. त्या पिशवीत दोन तीन पाण्याच्या बाटल्या आणि एक थर्मास होता. मृताच्या घरच्या लोकांना त्याने पाणी पिण्यास दिलं आणि नंतर पेपर कपमध्ये चहा प्यायला दिला. कोणी नातेवाईक असावेत असं मला वाटलं.
या घटनेनंतर बऱ्याच दिवसांनी मी नोबल हॉस्पिटलमध्ये कोणाला तरी भेटायला गेलो होतो. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बरेच लोक बसले होते. बहुधा त्यांच्या कोणा नातेवाईकांचं आत ऑपरेशन चालू असावं. आणि अचानक बघितलं तर त्या दिवशी अमरधाम मध्ये दिसलेले ते गृहस्थ इथं देखील त्या बसलेल्या लोकांना चहा देत होते. आता माझी उत्सुकता वाढली. थोड्या वेळाने सर्वांना चहा देऊन ते थोडे बाजूला आले, मी ताबडतोब त्यांच्या जवळ गेलो…..
” नमस्कार !” मी म्हटलं. त्यांना हे अपेक्षित नसावं… ते कावरे बावरे होऊन माझ्याकडं बघू लागले. मी
पुन्हा नमस्कार केला, या वेळी त्यांनी फक्त मान हलवली.
” आपलं नाव काय? ” मी विचारलं. त्यांचा पुन्हा प्रश्नार्थक चेहरा. यावेळी कपाळावर आठया देखील.
“तुमचं नाव सांगा.” त्यांनी तुटकपणे मलाच उलटा प्रश्न केला. आता मी त्यांच्या जवळ गेलो, त्यांचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणालो,
” अहो महाराज, माझं नाव प्रशांत कदम. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून नाव विचारलं.
आपण दोन मिनिटं बोलू शकता का?”
“नाही.” समोरून फटकन उत्तर आलं. आता मला धक्के पचवायची सवय झाली होती.
“नाही म्हणजे आत्ता नाही कारण आत्ता मला आणखी बऱ्याच ठिकाणी जायचंय. आपण नंतर कधीतरी
भेटू. आणि माझं नाव नंदू… म्हणजे नंदकुमार सप्रे.”
…. एवढं बोलून ते तरा तरा चालायला लागले. मी त्यांच्या पाठमोऱ्या छबी कडे बघतच राहिलो. साधारण साडेपाच फूट उंची, मध्यम किंवा त्यापेक्षा बारीक शरीरयष्टी, अंगात पांढरा शर्ट आणि पायजमा, पायात चपला… अहो हा माणूस बोलायला तयार नाही.
…. पण एक गोष्ट लक्षात आली. याला कुठंतरी काहीतरी दुःख आहे, वेदना आहेत. आणि त्या दिवसापासून
माझा त्याच्यातील इंटरेस्ट वाढू लागला. आता याला पुन्हा एकदा भेटलं पाहिजे.
आणि तो दिवस लवकरच आला. मी कुठंतरी चाललो होतो आणि हे महाराज रस्त्याच्या कडेला सायकल हातात धरून उभे होते. बहुधा कोणाची तरी वाट पहात असावेत. मी ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला सांगितले आणि पटकन खाली उतरून सप्रेच्या समोर जाऊन उभा राहिलो.
“सप्रे कोणाची वाट बघताय?” मी.
“नाही वाट नाही बघत, सायकल पंक्चर झालीय.”
“अरेच्चा, थांबा आपण पंक्चर काढायची व्यवस्था करू.” मी ड्रायव्हरला बोलावून सायकल पंक्चर
काढायला पाठवलं.
“अहो तुम्ही कशाला त्रास घेता, मी आणली असती करून.” सप्रे कसनुसा चेहरा करून म्हणाले.
“असू द्या हो सप्रे, चला आपण तोपर्यंत गाडीत बसून बोलू.” सप्रे अक्षरशः बळजबरीने गाडीत येऊन बसले.
अतिशय अस्वस्थ झाले होते. मी बोलायला सुरुवात केली,
“सप्रे ही चहाची काय भानगड आहे? जरा सांगता का?” सप्रे गप्प. मला कळेना हा माणूस असा का वागतोय, धड बोलत देखील नाही… आणि माझं लक्ष्य त्यांच्या चेहऱ्याकडे गेलं, अहो हा माणूस रडत होता. त्याच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा वहात होत्या. मला एकदम अपराधी असल्यासारखं वाटलं. मी दोन्ही हातांनी सप्रेना धरलं …
“सप्रे मला माफ करा. तुम्हाला दुखवायचा माझा हेतू नव्हता. जाऊ द्या, मला काही सांगू नका पण
कृपा करून तुम्ही शांत व्हा. पुन्हा मी तुम्हाला असले प्रश्न विचारणार नाही. I am sorry.”
दोन तीन मिनिटांनी सप्रे शांत झाले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली….
” प्रशांतजी, आजपर्यंत या विषयावर मी कोणाशी बोललो नाही. पण आज मी तुम्हाला सगळं सांगणार, याचं कारण असं आहे की, फक्त तुम्ही एकट्यानेच हा प्रश्न मला विचारला. मी आणि माझी पत्नी दोघेही सरकारी अधिकारी. मुलगा आणि सून दोघेही अमेरिकेत. तीन वर्षांपूर्वी पत्नीचे कोविडमध्ये निधन झाले. आम्ही दोघेही बाधित होतो. मला हॉस्पिटल मिळालं, तिला खाजगी हॉस्पिटल मिळालं नाही म्हणून सरकारी दवाखान्यात ऍडमिट केलं आणि चौथ्या दिवशी ती गेली. इथं मी कोणालाही दोष देऊ इच्छित नाही, कारण
परमेश्वरावर माझा पूर्ण विश्वास आहे. तिची वेळ भरली होती, त्यामुळे ती गेली, एवढंच सत्य आहे. आणि मुळातच एकदा माणूस गेल्यावर त्याची कारणमीमांसा तपासत बसू नये असं मला वाटतं. तिला चहा फार आवडायचा, दिवसातून चार पाच वेळा तरी ती चहा घेत असे. दुर्दैवाचा भाग असा की तिला हॉस्पिटलमध्ये चार दिवसात एकदाही चहा मिळाला नाही. आणि या गोष्टीचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटलं आणि त्याच वेळी मी ठरवलं की आपण काहीतरी करायचं. माणूस गेल्यानंतर त्याचे जवळचे नातेवाईक जास्त दुःखी असतात. आणि त्यांना काही हवंय का? हे देखील कुणी विचारत नाही. म्हणून मी थेट स्मशानभूमीत जाऊन ही सेवा देतो. त्यांच्या समाधानी चेहऱ्यात मला माझ्या पत्नीचा चेहरा दिसतो. हॉस्पिटलमध्ये गंभीर पेशंटचे नातेवाईक अतिशय तणावात असतात. त्यांना मी जाऊन भेटतो. चहा देतो, चौकशी करतो आणि दिलासा देतो. थोडा वेळ का होईना पण त्यांना बरं वाटतं. मी रिटायर असल्याने माझ्याकडे भरपूर वेळ आहे. सुदैवाने आर्थिक परिस्थिती चांगली आहे. मोठा बंगला आहे आणि मी एकटाच आहे. म्हणून तिथं
पंधरा अनाथ विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केलीय.”
……. मी प्रचंड भारावून गेलो होतो. काय बोलावे हे देखील मला कळत नव्हते…..
“सप्रे तुम्ही फार मोठं काम करताय, You are great.” एवढंच मी बोलू शकलो.
सप्रेची सायकल तयार होऊन आली होती. सप्रे गाडीतून उतरले, मला त्यांचं व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि ते निघून गेले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मी फक्त नतमस्तक झालो.
त्यानंतर सप्रेची आणि माझी गाठ भेट नाही. एक दिवस कोणीतरी सप्रे गेले असं सांगितलं. मी सप्रेच्या घरी गेलो. बंगल्याच्या गेटवर मोठा बोर्ड होता .. “मालती सप्रे मेमोरियल ट्रस्ट” . आत एक जोशी नावाचे मॅनेजर होते. त्यांनी सांगितलं इथं राहणारे विद्यार्थीच आता सप्रेचं काम करतात.
…… मला आनंद चित्रपटातला शेवटचा प्रसंग आठवला.
….. राजेश खन्ना मरतो आणि नंतर अमिताभ तिथं येतो. त्यावेळी तो दोन वाक्य बोलतो.
“आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं।”
लेखक : श्री सुनील होरणे
संग्राहक : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
गौतम बुद्धांकडे एकजण आला आणि त्याने विचारलं, भगवान, आत्मा आहे की नाही?
बुद्ध म्हणाले, स्वत:च्या आत उतरूनच याचा शोध घेता येईल तुला.
तो म्हणाला, ते मी करीनच. पण, मुळात आत्मा आहे की नाही, ते सांगा.
बुद्ध म्हणाले, मी तुला आत्मा आहे, असं सांगितलं तरी ते खोटं आहे आणि आत्मा नाही, असं सांगितलं तरी तेही खोटंच आहे.
तो माणूस म्हणाला, असं कसं होईल? दोन्ही खोटं कसं असेल? एकतर आत्मा आहे हे खोटं असलं पाहिजे किंवा आत्मा नाही हे खोटं असलं पाहिजे.
बुद्ध म्हणाले, मी यातलं काहीही एक खरं आहे, असं सांगितलं तर तीच धारणा घेऊन तू अंतरात्म्यात उतरशील आणि मग आत्मजाणीव झाली तरी नाकारशील किंवा ती झाली नाही, तरी ती खोटी खोटी करून घेशील.
माणसांना हव्या त्या गोष्टी ‘पुराव्याने शाबित’ करता येतात, त्याचं कारण हेच आहे. आपली धारणा हेच अंतिम सत्य आहे, यावर माणसाचा विश्वास पटकन् बसतो आणि तो त्यादृष्टीनेच सगळ्या विचारव्यूहाची मांडणी करतो, तसेच पुरावे त्याला सापडत जातात. तेवढेच ‘दिसतात. ‘ माणसं ध्यानात, अंतरात्म्यापर्यंत उतरतानाही धारणांची ही वस्त्रं त्यागू शकत नाहीत. ती ‘स्व’च्या तळात उतरतानाही हिंदू असतात, मुसलमान असतात, ख्रिस्ती असतात, बौद्ध असतात… मग त्या त्या धारणांनुसार त्यांना ‘स्वरूप’दर्शन घडतं आणि तीच त्यांना आत्मजाणीव वाटू लागते… तो त्यांच्या धारणांनी निर्माण केलेला एक आभास आहे, हे त्यांच्या लक्षातच येत नाही.
☆
लेखक: ओशो
प्रस्तुती: सौ. वर्षा राजाध्यक्ष
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एखादा दिवस असाही असेल… याची कधी कल्पनाही केली नव्हती. असा विचार करताना मन मागच्या 25 वर्षे मागे धावलं. खूप खूप आठवणी ” मी आधी, मी आधी ” करत धावू लागल्या.
आपल्या शिक्षणाचा आणि डिग्रीचा कोट घालून, दर्जेदार पोस्टचा काटेरी मुकुट स्वीकारलेले सर्वेसर्वा ऑफिसर्स.
जबाबदारीची जागा सांभाळताना त्यांची होणारी तारेवरची कसरत त्यांच्या व्यक्तिमत्वातून व्यक्त होत होती. बिनचूकपणा, शिस्त, आणि वक्तशीरपणा यांचा परिपाठ स्वतः कृतीत आणून इतरांना मार्गदर्शन करणारे वरच्या श्रेणीचे ऑफिसर्स ही काॅर्पोरेशनची दर्जेदार संपत्ती होती. तसेच
त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि आदेशाप्रमाणे काम करणारे कर्मचारी ह्या सर्वांचा एकसंध परिवार म्हणजे आपले काॅर्पोरेशन. हा परिवार सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकत्र एका छताखाली नांदत होता.
लहान लहान कामापासून मोठ्या मोठ्या कामात येणा-या अडचणी एकमेकांच्या सहाय्याने, सल्लामसलतीने सोडवल्याही जात होत्या. काम करताना अनेकदा चुकाही होतच होत्या, पण त्यात सुधारणा करून आपला परफाॅर्मन्स चांगला होण्यासाठी धडपडही होती.
व्यक्तिगत आयुष्यातले चढ-उतार, आनंदाचे-दुःखाचे प्रसंग , एकमेकांना मानसिक आधार देणे, अशी वाटचाल चालू होती.
प्रमोशन मिळालेले खुशीत, तर न मिळालेले नाराज! अशा संमिश्र घटना 3-4 वर्षात घडायच्या.
त्यावेळी काम करताना ऑफिस फाईल्स हे महत्वाचं आणि एकमेव माध्यम होतं. जेव्हा आपल्या प्रपोजल नोटवर APPROVED असा शेरा मिळून ठसठशीत, वळणदार सही दिसली की खूप मस्त वाटायचं.
कित्येकदा अनेक शासकीय, बिन शासकीय आस्थापनातून, विभागातून ( गोव्यातच नव्हे तर देशभरात ) लेडीज स्टाफवरती होणारे नकोसे अनुभव कानावर यायचे. त्यावेळी आपल्या ऑफिसमध्ये मिळणारी मानसिक, भावनिक आणि शारिरीक सुरक्षितता प्रकर्षाने जाणवायची.
ऑफिसमधले असलेलं वातावरण अतिशय सौजन्यपूर्ण होतं. साधेपणा, शालीनता , आदर, नम्रता ह्या शब्दांना मान होता. तो प्रत्येकाच्या बोलण्यातून वागण्यातून दिसत होता. माझ्याकडे जर कुणी काही विचारायला आले तर नकळत उभी राहून त्यांचे बोलणे ऐकणे, ही न सांगता होणारी प्रतिक्रिया होती. आवाज मोठा करून बोलणे, मोठमोठ्याने हसणे ह्यावर स्वतःच घातलेली बंधने होती.
हा
ऑफिसमधल्या आधीच्या लोकांनी घालून दिलेला संस्कार- ठेवा होता.
वर्षामागून वर्षे गेली. हळूहळू एक एक जण 58-60 वयाला येवून निवृत्तीला पोचले. आणि गेल्या दहा पंधरा वर्षात बघता बघता एक पिढीच निवृत्त झाली.
काल पहिल्यांदाच कितीतरी वर्षांनी सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाली आणि पूर्वीचे राग-लोभ, रुसवे-फुगवे सर्व विसरून एकमेकांना भेटताना, बोलताना, क्षेमकुशल विचारताना होणारा आनंद प्रत्येकाच्या चेह-यावर ओसंडून वहात होता. जे कुणी हे जग सोडून गेले, त्यांच्या आठवणींनी मन भरून येत होते. कालचा दिवस एक अलौकिक, अकल्पनीय आनंदाने भारलेला होता. . काहीतरी हरवलेलं सापडल्याचा अनुभव होता.
इतक्या वर्षांनी एकत्र भेटून झालेला आनंद एक अनामिक आत्मिक सुखदायी होता. हे मात्र नक्की.
तरूण पिढीच्या शिलेदारांनीही भरभरून , आपुलकीने आणि आतिथ्यपूर्वक सरबराई केली, पाहुणचार केला.