मराठी साहित्य – विविधा ☆ ‘हाव’…एक बांडगूळ..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ ‘हाव’…एक बांडगूळ..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

हाव.दिसायला दोन अक्षरी एक साधा शब्द,पण त्यात नकारात्मक अर्थांचे विविध छटांचे रंग ठासून भरलेले..!कांही हवं असणं आपण समजू शकतो,पण अंत नसलेलं ‘आणखी हवं’ ही उध्वस्ततेची सुरुवात ठरते.आणखी हवं असणं म्हणजे हव्यास.हव्यास म्हणजे विध्वंसाची ठिणगीच जणू.कारण कोणत्याही हव्यासाचं असणं परोपकारासाठी,जनसुखाय -जनहिताय कधीच नसतं.ते तसं असूच शकत नाही.ते असतं स्वत:साठी,..स्वार्थासाठी.!,म्हणूनहव्यासाची परिणती अर्थातच विनाश हेअपरिहार्यच.खरं तर विश्व निर्माण झालं तेव्हाच निसर्गनियमही अस्तित्वात आले.हे नियम निसर्गातले सर्व घटक काटेकोरपणे पाळत असतात.अपवाद फक्त माणसाचा. पैसा,पद,प्रतिष्ठा,सुख यांच्या हव्यासापायी निसर्गाचे सगळे नियम धाब्यावर बसवण्याच्या सुरुवातीचा पहिला क्षणच विनाशकाले विपरीत बुध्दी ठरला. आपलं जगण्याचं निसर्गाला अपेक्षितच नव्हे तर अभिप्रेतही असलेलं प्रयोजनच माणूस विसरुन गेला आणि विनाशाच्या दिशेने त्याचा प्रवास सुरु झाला.

निसर्गाने माणूस निर्माण केला आणि त्याला बुध्दीचं वरदान दिलं.त्या बुध्दीचा  सर्व निसर्गघटकांच्या हितासाठी त्याने योग्य उपयोग करणे अपेक्षित होते.पण हव्यासाच्या अतिरेकामुळे सुखासमाधानाच्या मृगजळामागे धावता धावता निसर्गानेच दिलेलं बुध्दीमत्तेचं कोलीत हातात घेऊन सर्वाना प्रकाश दाखवणे अपेक्षित असताना अतिरेकी हव्यासामुळे माणूस ते क़ोलीत घेऊन सगळा निसर्गच जाळत सुटलाय.

माणसाचं हे अनैसर्गिक जगणंच त्याला आज विनाशाच्या अखेरच्या वाटेवर घेऊन आलंय.

निसर्गाला अपेक्षित असणारं  माणसाचं ‘ जगणं’ हे एका अतिशय सुखी,समाधानी,समृध्द, सुंदर अशा जगाच्या निर्मितीला निमित्त झालं असतं. एरवी अगदी सहज वास्तवात येऊ शकलं असतं असं ते सुंदर जग आज माझ्या मनात मला स्वच्छ दिसतंय,पण..स्वप्नवतच. म्हणूनच ते रुखरूख वाढवणारं ठरतंय.काहीतरी निसटून गेल्याची रुखरुख. निसर्गाला अभिप्रेत असलेल्या त्या सुंदर जगाचं दर्शन   तुमच्याही मनात ती रुखरुख निर्माण करेल आणि कदाचित नव्या वाटा शोधण्याची असोशीही….!

कसं आहे हे हवंहवंस जग? हे जग आणि अर्थातंच इथलं जगणंही अतिशय निरामय आणि  सुंदर आहे. या जगात माणुसकी हा एकच धर्म अस्तित्वात आहे. ॐकार हाच प्रत्येकाचा देव आहे. घरं मंदिरासारखी पवित्र आहेत आणि त्या घरांऐवजी प्रत्येकाच्या मनामधे देव्हारे आहेत. त्या देव्हार्यात ॐकाराची पूजा नित्यनेमाने होते. नीतिनियमांनुसार आचार हे प्रत्येकाचे व्रत,आणि त्यातून मिळणारं समाधान हा पूजेचा प्रसाद..! निसर्गाचे सर्व नियम इथे सर्वानी मनापासून स्विकारलेत. त्यामुळे निसर्गालाही कृतकृत्य वाटतेय.त्यामुळे निसर्ग छान खुललाय. फुललाय. निसर्गचक्राचा स्वत:चा ताल,वेग सर्वांसाठीच हवाहवासा,आनंददायी ठरतो आहे.निसर्ग प्रसन्न आहे,त्यामुळे माणसेच नव्हे,तर मनुष्येतर प्राणीही अतिशय समाधानी आहेत.माणसांनी त्याना अभयारण्यांऐवजी अभयच देऊ केल्यामुळे मानवाचा अधिकार त्यानीही मनापासून स्विकारलाय आणि स्वत:च्या अरण्यकक्षेत ते आनंदाने जगतायत.माणसांचं नागरी जीवन त्यामुळे भयमुक्त आणि श्वासोच्छवासासारखं सहजसुंदर आहे.पृथ्वीच्या अंगाखांद्यावरचं जनसंख्येचं अतिरिक्त ओझं आता कमी झालंय.त्यामुळे पृथ्वीसुध्दा निरोगी आणि नीतिमान माणसांचं आस्तित्व अलंकारांसारखं मिरवतेय…!

या जगात प्रत्येकजण सुखी आहे आणि समाधानीही..!        

प्रत्येकाला स्वत:च्या कुटुंबाचं असं घर आहे.ते एकमजलीच आहे.घरापुढे प्रशस्त अंगण आहे आणि फुललेली हसरी बागही.त्या बागेतल्या गोड, रसाळ फळांसारखाच प्रत्येकाचा संसार आहे.

रस्तेआहेत आणि ते स्वच्छ,चकचकीत आहेत.पादचार्यांसाठी खास अभयरस्ते आहेत.वाहनांसाठी अर्थातच वहातुकीचे वेगळे रस्ते.त्यामुळे रस्त्यातून चालणं आणि वहान चालवणंही आनंददायी आणि निश्चिंत आहे.

एकमजली बैठ्या घरांमुळे सूर्यही प्रसन्न आहे.त्याच्या आनंदप्रकाशी किरणांतून पसरणार्या प्रकाशाची कोणत्याही अडसरावीना आता मुक्त उधळण होऊ शकतेय.त्यामुळे या वातावरणात भरुन राहिलेल्या सौरशक्तीवरच सर्व वाहने चालतायत.त्यामुळे संपूर्ण निसर्गच प्रदूषण,धुराचा वास,आणि सहवास यापासून पूर्णपणे मुक्त आहे.शाळा आहेतच,त्याना प्रशस्त पटांगणेही आहेत.घरांसारख्या शाळाही नैसर्गिक संस्कारकेंद्रे आहेत.मुलं फुलांसारखी सुंदर आहेत.त्याना शाळा घरांइतक्याच प्रिय आहेत..!

कौटुंबिक पार्श्वभूमीवर श्रमविभागणी आहे.नेमून दिलेली सर्व कामे प्रत्येकालाच आळीपाळीने करावी लागतात.तिथे स्त्री,पुरुष,मुलगा,मुलगी याऐवजी प्रत्येकाचा एक व्यक्ती म्हणूनच विचार होत असल्याने सर्वानाच सर्वप्रकारच्या कामांचं कौशल्य अंगी बाणवणं शक्य होतं.या जगात वृध्दांचं वार्धक्य तरुणांच्या निगराणीखाली कृतार्थ आहे..!इथे मरणही आहेच,आणि ते  जगण्याइतकंच सुंदरही आहे.कारण ते भयमुक्त आहे.निसर्गनियमांनुसार योग्यवेळी येणारा हा मृत्यू अट्टाहासाने कांहीही करून जगण्याचा हव्यास नसल्याने कृतार्थही आहे.आणि म्हणूनच पुन्हा सळसळत्या जीवनाचा उपभोग घेण्यासाठी टाकल्या जाणार्या कातीसारखि तो सहजसुंदर आहे.

हे स्वप्नवत वाटेल सगळं,पण हे वास्तवात उतरणं अशक्य नसणारं स्वप्न आहे.मात्र सर्व स्तरांवर फोफावलेल्या हव्यासांची बांडगुऴं हाच यातला एकमेव अडसर आहे..! त्या बांडगुळाचा नाश करायचा की फक्त जिवंत रहाण्यासाठी घुसमटत जगायचं या प्रश्नाचं योग्य उत्तर शोधता आलं, तरच स्वप्न आणि वास्तवातली सीमारेषा पुसली जाईल..!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘जागतिक विद्युत सुरक्षा दिन’ अर्थात ‘दीप अमावस्या‘ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

जागतिक विद्युत सुरक्षा दिन’ अर्थात ‘दीप अमावस्या‘ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

आषाढ महिन्याची अमावस्या !!!  या अमावस्येलाच ‘दिव्याची आवस’ किंवा ‘दीप अमावस्या’ असे म्हटले जाते. या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात. त्याच्याभोवती रांगोळ्या काढतात व ते दिवे प्रज्ज्वलीत करुन त्यांची पूजा केली जाते. पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.

‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌।

गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥”

भावार्थ:-

‘‘हे दीपा, तू सूर्यरुप व अग्निरुप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’ 

कथा कहाण्या नेहमीच रम्य असतात. जनमानस सुद्धा कथा ऐकण्यास उत्सुक असते. *ज्याप्रमाणे मधाचे बोट लावून आई कडू औषध पाजते, अगदी त्याच मायेने आपल्या पूर्वसूरींनी जनमानसाचा अभ्यास करुन प्रत्येक आध्यात्मिक (खरंतर वैज्ञानिक) तत्व सामान्य मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि यातूनच विविध कहाण्यांची निर्मिती झाली. कहाणीच्या पुस्तकात ‘विविध सण’ आणि ‘व्रतवैकल्ये’ यांच्या मनोहर कहाण्या दिलेल्या आहेत. त्या कहाण्या सांगण्याचा मुख्य हेतू श्रद्धा वृद्धिंगत व्हावी आणि समाजाने नियम पाळावेत असा असावा. कारण तत्कालीन समाजपद्धतीत ‘धर्माने’ अथवा ‘शास्त्राने’ सांगितले आहे असे मानून तसे आचरण करणारी मंडळी पुष्कळ होती. 

भारतीय कालमापन पद्धतीप्रमाणे आषाढ महिन्याच्या शेवटी ग्रीष्म ऋतू संपतो. तसेच दुसऱ्या दिवशीपासून वर्षा ऋतूची सुरुवात होते. वर्षा ऋतू स्वाभाविकच जास्त पावसाचा. *पूर्वी विद्युत दिवे नव्हते, त्यामुळे प्रकाशासाठी दिव्यांची गरज होती. दिवा स्वच्छ असेल तर स्वाभाविक त्याचा जास्त प्रकाश पडणार. त्यानिमित्ताने घरातील सर्व दिव्यांची तपासणी (आपण त्यास आजच्या लौकिक भाषेत ‘ऑडिट’ म्हणू शकतो) व्हायची. पूर्वीच्या लोकांना आठवत असेल की कंदील, टूकं ( रॉकेल वर जळणार छोटा दिवा ), बत्ती असे विविध प्रकारचे दिवे असायचे. त्या दिव्यांची खूप निगा राखावी लागत असे, अन्यथा ऐनवेळी ते दिवे पेटत नसतं. यासाठी उजळणी म्हणून घरातील सर्व दिवे उजळले जायचे. श्रावण भाद्रपद हे दोन्ही महिने मुसळधार पावसाचे आणि तुफानी वादळाचे. त्यामुळे हवामान त्यामानाने थंड. अमावस्या म्हणजे काळोखी रात्र. घरात प्रकाश आणि पुरेशी ऊब मिळण्यासाठी दिव्यांची गरज असतेच. त्यामुळे दिव्यांची डागडुजी, स्वच्छता हा त्यामागील तांत्रिक भाग होता. आजच्या आधुनिक युगात संपूर्ण आषाढ महिना ‘विद्युत सुरक्षा मास’ म्हणून पाळावा असे सुचवावेसे वाटते. घरातील, कार्यालयातील सर्व वायरिंग , प्लग , सॉकेट, अर्थींग,  बटन्स, सर्व विद्युत उपकरणे आदि या महित्यात  तपासून  घ्यावीत, दिवे पुसून घ्यावेत. तसेच दुचाकी, चारचाकी वाहनाचे दिवे, इनव्हर्टर, जनरेटर आदींची आवश्यक ती निगा राखावी. या सर्वांचे  मूल्यमापन (तपासणी)  दीपअमावस्येला करावी.     

(कारण अमावस्या ही सर्वात जास्त काळोखी असते). विशेष करून घरातील गॅस शेगडी तसेच गॅसचा पाईप यांचीही तपासणी करावी कारण ‘स्वयंपाकघर सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित !!’ आजच्या भाषेत आपण त्यास जागतिक विद्युत सुरक्षा दिन’ म्हणू शकतो नव्हे तो होताच कारण हा ‘दिन’ संपूर्ण भारतात तितक्याच श्रद्धेने अनेक वर्षे पाळला जायचा आणि आजही पाळला जातो. मधल्या काळात आपण वैज्ञानिक  दृष्टिकोन विसरलो आणि आपल्या बऱ्याचशा सणांचा भावार्थ बदलला, तसेच त्याचा यथोचित अर्थ समाजास समजून सांगण्याची व्यवस्था आपण समाज म्हणून प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलो, खरंतर तसा प्रयत्नच झाला नाही असे खेदाने नमूद करावेसे वाटते. ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून ‘वटपौर्णिमा’, ‘जागतिक विद्युत सुरक्षा दिन’ म्हणून ‘दीप अमावस्या’, ‘जागतिक कृतज्ञता दिन’ म्हणून ‘सर्वपित्री अमावस्या’, जागतिक आरोग्य दिन म्हणून धनत्रयोदशी (धन्वंतरी जयंती), महर्षी नारद जयंतीला ‘जागतिक पत्रकार दिन’ असे बरेच ‘दिन’ आपण साजरे करु शकतो. कारण या सर्व गोष्टींचा उगम भारतात झालेला आहे. गरज आहे ती फक्त इतिहासाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची!!.  आज आपण सर्वांनी प्रण करु की आजपासून ‘दीप अमावस्ये’च्या निमित्ताने घरातील ‘विद्युत सुरक्षा’ आवर्जून पाळली जाईल.   

आपल्या मागील सर्व पीडा (अर्थात गैरसमजुती, कोती वृत्ती) जाऊन जीवनात प्रकाश निर्माण व्हावा म्हणून या अमावस्येच्या दिवशी घरामधील सर्व दिव्यांचे पुजन केले जाते. पंच महाभूतांमधील अग्नि तत्वाची ही पूजा आहे. आपल्या पोटातील वैश्वानर नावाचा अग्नी अन्नपचनाचे काम करतो. शरीरातील अग्नीतत्व मंद झाले तर पोट बिघडते. याचाही विचार इथे होणे गरजेचे आहे. या दिवशी घरातील सर्व  पितळी दिवे, समया, निरांजने, तांब्याचे दिवे, लामणदिवे, कापूरवाती अश्या सर्वांची पूजा केली जाते. संध्याकाळी दिवेलागणीला ओटीवर गाईच्या शेणानं सारवायचे, रांगोळी काढून त्यावर पाट ठेवायचा. त्यावर सर्व दिवे ओळीने मांडून त्यांना हळदकुंकू, अक्षता, फुलं वाहायची. कणकेचे दिवे करायचे आणि मग त्यात साजुक तूप आणि कापसाची वात घालून सर्व दिवे पेटवून त्यांनी दिव्यांची आरती करून देवाला नैवेद्य दाखवयाचा. भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, वात, फुलवात यांना महत्त्वाचे स्थान आहे. प्राणाला प्राणज्योत म्हणले जाते, दिवा व प्रकाश यांचे जीवनाशी नाते मानले जाते. सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मी घरात येते व त्याचवेळी दारिद्र्याची देवता घरातून निघुन जाते अशी श्रद्धा आहे. यासाठीच घराघरात देवापाशी दिवा लावून शुभंकरोति, परवचा म्हणायची पद्धत होती. दिवस मावळतीकडे जातोय आणि रात्रीचा उदय होत असताना, या संधिकालात परमेश्वराचे नाव घेतले तर मनःस्थिती उत्तम राहण्यास मदत होते. मन प्रसन्न असेल तर स्वाभाविक जगही प्रसन्न असते, नाही का?

पूर्वी मुलाला कुळदीपक किंवा वंशाचा दिवा असे संबोधले जायचे किंवा रागाच्या भरात ‘किती दिवे लावलेस ते माहीत आहे’ असेही बोलले जात असे. अर्थात या बोलण्यातील मर्म असे आहे की मुलगा मुलगी कोणीही असो, त्याने घराण्याचे नाव आपल्या शुद्ध आचरणाने आणि कर्तृत्वाने उज्ज्वल करावे. *’उजेडात होते पुण्य, अंधारात पाप’ असे एक गीत आहे. मनुष्याने नेहमी उजेडातील कर्म करावीत असे ही दीप अमावस्या आपल्याला सुचविते असे म्हटले तर वावगे होणार नाही.*

भारतातील अनेक भागांमध्ये मोठमोठ्या गुहांमध्ये सुंदर चित्रकारी, नक्षीकाम पाहावयास मिळते. हे काम दिव्याशिवाय करणे शक्य नव्हते. भारतामध्ये दिव्याचा इतिहास खूप प्राचीन आहे. अग्नीचे प्राचीन काळापासून धर्मकर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. वेदांमध्ये अग्नीला देवतास्वरूप मानण्यात आले आहे. यामुळेच हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी देवासमोर दिवा लावला जातो. त्यामुळे वातावरण प्रसन्न होते. दिवा ज्ञान आणि प्रकाशाचे प्रतिक आहे. पूजेमध्ये दिव्याचे विशेष महत्त्व आहे. सामान्यतः विषम संख्येत दिवा प्रज्वलित करण्याची परंपरा आहे. दीप लावण्यामागचे कारण म्हणजे, आपण अज्ञानाचा अंधकार दूर करून जीवनात ज्ञानाच्या प्रकाशासाठी पुरुषार्थ करावा. हिंदू धर्मशास्त्रानुसार पूजा करताना दिवा लावणे अनिवार्य आहे. गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये सुख-समृद्धी येते. घरामध्ये स्थायी लक्ष्मीचा वास राहतो. गायीच्या तुपामध्ये रोगराई पसरवणारे सूक्ष्म किटाणू मारण्याची क्षमता असते. तूप जेव्हा दिव्यामध्ये अग्नीच्या संपर्कात येते तेव्हा वातावरण पवित्र आणि शुद्ध होते. यामुळे प्रदूषण दूर होते.  गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने याचा संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना फायदा होतो. ‘दीप प्रज्वलन’ हा घराला प्रदूषण मुक्त करण्याचा एक प्राचीन आणि प्रभावी उपाय आहे. 

दिवा लावतानाचा मंत्र:-

“दीपज्योति:परं ब्रह्म

दीपज्योति: जनार्दन:।

दीपो हरति मे पापं

संध्यादीप ! नमोऽस्तु ते।।”

दिवा लावण्याचे नियम: –

    • दिव्याची वात पूर्व दिशेकडे असल्यास आयुष्य वाढते.
    • दिव्याची वात पश्चिम दिशेकडे असल्यास दुःख वाढते.
    • दिव्याची वात उत्तर दिशेकडे असल्यास धनलाभ होतो.
    • दिव्याची वात चुकूनही दक्षिण दिशेकडे करू नये. यामुळे धन आणि जीवित हानी होऊ शकते.

दीप प्रज्वलन करण्यापूर्वी दीपाखाली अक्षता का ठेवाव्यात ? 

अक्षतांमध्ये असलेल्या पृथ्वी आणि आप तत्वाच्या कणांच्या प्राबल्यामुळे दीपाकडून प्रक्षेपित होणाऱ्या लहरी ग्रहण केल्या जातात अन् आवश्यकतेनुसार आपकणांच्या प्राबल्यावर त्या प्रवाही बनवून वातावरणात भूमीच्या दिशेने प्रक्षेपित केल्या जातात. या लहरी अधोगामी असल्याने त्यांची ओढ भूमीकडे असते, तर दीपातून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींची ओढ आकाशाच्या दिशेने असते; कारण त्या ऊर्ध्वगामी दिशेने संचार करत असतात. अशा प्रकारे कार्यस्थळी दीपाच्या माध्यमातून वातावरणाच्या वरील पट्ट्यात सूक्ष्म-छत, तर अक्षतांच्या माध्यमातून भूमीवर सूक्ष्म-आच्छादन निर्माण होण्यास साहाय्य झाल्याने कालांतराने त्याचे रूपांतर घुमटाकार संरक्षक-कवचात होत असते. 

आषाढ महिना संपल्या नंतर श्रावण येतो आणि नंतर भाद्रपद या महिन्यामध्ये मद्यपान व मांसाहार वर्ज्य मानला जातो. म्हणून  यादिवशी काही लोकं अति प्रमाणात मांसाहार करतात. आज समाजात ही अमावस्या आज जरा ‘वेगळ्या’ कारणांसाठी प्रसिद्ध झालेली आहे. आज कोकणात तरी ती ‘गटारी अमावस्या’ म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. सणांचे इतके विडंबन फक्त हिंदू धर्मातच होऊ शकते आणि ते फक्त ‘हिंदूच’ करु शकतात, यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते. धर्मांध असू नये याबाबत सर्वांचे एकमत होऊ शकेल पण धर्माभिमानीही असू नये हा दैवदुर्विलास नव्हे काय? आज आपल्या परंपरा, सण, व्रतवैकल्ये पुन्हा एकदा डोळसपणे समजून घेण्याची आणि समजून देण्याची नितांत गरज आहे अन्यथा पुढील पिढीला आपल्या विज्ञानाधिष्ठित संस्कृतीची माहिती होणार नाही.

उगवत्या सूर्याची पूजा करणारे आपण हिंदू लोकं आहोत. आपल्या  परंपरा, आचारविचार ह्या उजळवलेल्या दिव्यांच्या ज्योतीवर धरुन ‘पारखून’ घेऊ आणि तसे आचरण करण्याचा प्रयत्न करुया. प्रत्येक घरात जर असे ‘ज्ञानदीप’ लावले गेले तर आपला देश नक्कीच उजळून निघेल आणि त्या प्रकाशाने साऱ्या जगाचे डोळे दिपतील यात शंका नाही.*

शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा |

शत्रुबुद्धि विनाशाय दीपत्ज्योति नमोस्तुते ||

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कवितांचा पाऊस…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “कवितांचा पाऊस…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

गॅलरीत बसले होते पावसाची एक सर आली….. ती  ओसरली तोच दुसरी आली….

आणि मला संदीप खरेची कविता आठवली …. 

दूरदूर नभपार डोंगराच्या माथ्यावर

 निळे निळे गार गार पावसाचे घरदार

… त्यांच्या इतरही कविता आठवायला लागल्या.

संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचा ‘ आयुष्यावर बोलू काही ‘ हा कार्यक्रम ऐकायला गेलो होतो. त्यातल्या सगळ्याच  गाण्यांनी तेव्हा वेड लावलं होतं…. असंख्य वेळा ऐकून ती गाणी पाठ झाली होती…त्या कवितांच्या गाण्यांनी तेव्हा  मनावर गारुड केलं होतं….. सहज सोपे शब्द…. चाल …आवाज…. वास्तव सांगणाऱ्या पण गर्भित अर्थाच्या कविता… दोघांचे ट्युनिंग सगळं काही जमून आलं होतं… प्रेक्षागृह गच्च भरलेलं.. त्यांनी सुरुवात केली की सगळ्यांची त्यांना साथ….. एक सुरात सगळे म्हणायला लागत होते…आनंद मजा गम्मत  चालली होती….वातावरण भारलेलं…

आणि अचानक त्यांनी सुरू केलं …… 

नसतेस घरी तू जेव्हा..

 जीव तुटका तुटका होतो

जगण्याचे विरती धागे

 संसार फाटका होतो….

.. .. आणि एकदम सगळे स्तब्ध झाले .. तन्मयतेनी शांतपणे ऐकायला लागले.. ती कविता एका वेगळ्याच उंचीवर गेली…..अशीही दाद…

तव मिठीत विरघळणाऱ्या

मज स्मरती लाघव वेळा…..

.. .. .. काय शब्द आहेत ना…..

आज एका  कवितेचं निमित्त झालं आणि अनेक कविता आठवायला लागल्या ….

मला आवडणाऱ्या कवितांची माझी डायरी आहे. ती काढली आणि कितीतरी वेळ त्यातच रमून गेले….

मनाला भिडणाऱ्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कविता….

गालातल्या गालात हसवणाऱ्या…

काही फसव्या…

वरवर साध्या वाटणाऱ्या पण गहन खोल अर्थ असणाऱ्या….

तर काही मनाला अलवार स्पर्शून जाणाऱ्या…

मग .. .. डायरीत न लिहिलेल्या कविताही आठवायला लागल्या…

कवी खरंच मनाचे जादूगारच असतात… भावना ओळखून असं लिहितात की वाटतं यांना कसं आपलं मन कळलं…

म्हणूनच कवी सांगत असावेत…. 

शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणूनी

वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही….

अनेक कविता  वाचत गेले आणि  जीव  वेडावूनच गेला… कोणाकोणाची नावं घेऊ?

या साऱ्या दिग्गजांना माझा मनोमन शिरसाष्टांग नमस्कार….

तुम्ही आमच आयुष्य  फार समृद्ध केलतं…..

झाले हवेचेच दही…

या कवितेत बा. भ.बोरकर म्हणतात .. .. 

 

लक्ष आचळांनी दुभे निळी आकाशाची गाय होतेय 

भिजणाऱ्या तृप्तीवर  दाटे संतोषाची  साय…

तसंच अनेक कवींनी आपल्याला त्यांच्या  कवितांनी  भिजवून तृप्त केलेल आहे….

कवींच्या आठवणींनी  मन भरून आले आहे…

पुलं आणि सुनीताबाई यांचा मुंबईला बघितलेला कवितांचा कार्यक्रम आज आठवतो आहे…..

त्यांच्या शब्दातून कविता साक्षात समोर उभी राहत असे…. तो एक दृकश्राव्य कार्यक्रम होता..

किती आनंद आहे त्या अनमोल क्षणांचा ….

…… कुठल्या कुठल्या आठवणी जाग्या व्हायला लागल्या….

संदीप खरे म्हणतो तसं

आताशा असे हे मला काय होते

कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते

बरा बोलता बोलता स्तब्ध होतो

तशी शांतता शून्य शब्दात येते…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ न वाचलं गेलेलं पत्र ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

न वाचलं गेलेलं पत्र ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

मेजर राजेश सिंग अधिकारी, महावीर चक्र (मरणोपरांत) 

भारत-पाकिस्तान कारगिल युद्ध. ३० मे,१९९९. 

दहाच महिन्यांपूर्वी त्याची अशीच वरात निघाली होती आणि तिच्या दारी आली होती. घोड्यावर बसलेला तो राजबिंडा…रूबाबदार! लष्करात अधिकारी असलेला तो होताच तसा देखणा. आठ वर्षांच्या सेवेत लष्कराने शिस्तीच्या संस्कारात एका कोवळ्या तरूणाचे मजबूत शरीरयष्टीच्या,अदम्य आत्मविश्वास असलेल्या, भेदक नजर असलेल्या एका जवानात रुपांतर केले होते… सैन्याधिकारी… राजेश सिंग धर्माधिकारी! इतक्या वर्षांत त्याने मेजर पदापर्यंत मजल मारली होती…आणि  आता तो बनला होता दीडशे ते दोनशे सैनिकांचे नेतृत्व करणारा लढवय्या. १९९९ वर्ष निम्मे सरत आलेले होते. कारगिल परिसरातून आता मेजर साहेबांची बदली होण्याचे दिवस जवळ आले होते. पण….कारगिलच्या शिखरांवरून अप्रिय बातम्यांचा वारा खाली घोंघावू लागला. 

सुरुवातीला वाटले होते की पाकिस्तानातून भारतात कश्मिरविरोधात भारतीय सैन्याला उपद्र्व देण्यासाठी घुसलेले अतिरेकी असावेत आणि तेही नेहमीप्रमाणे अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच. पण धर्माधिकारी साहेबांनी त्या पर्वतशिखरांवरून आपले हेलिकॉप्टर उडवत नेले आणि टेहळणी केली तर परिस्थिती गंभीर होती. घुसखोरांची संख्या अपेक्षेपेक्षा कित्येकपटींनी जास्त होती. शिवाय त्यांनी शिखरांच्या मोक्याच्या ठिकाणी पक्के आणि सुरक्षित बंकर्स खोदून ठेवलेत…त्यातून त्यांना खाली नेम धरणे सोपे होते. आणि अतिशय कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी त्यांनी अगदी जय्यत तयारी केलेली होती. गरम कपडे,बूट,हवाबंद पौष्टिक अन्नपदार्थ,संपर्क साधने आणि इतक्या उंचीवर आणून ठेवलेला पुरेसा दारूगोळा! 

मेजरसाहेब तळावर परतले ते चेह-यावर काळजीचा रंग घेऊनच. शत्रू आपल्या अत्यंत जवळ आला आहे. त्यांनी सहका-यांना सावध केलं. तोवर कारगिलच्या इतरही शिखरांबाबत हीच परिस्थिती असल्याचं स्पष्ट झालं होतं. कॅप्टन सौरभ कालिया साहेबांचं गस्तीपथक परतलेलं नव्हतं..त्यांना शोधायला गेलेल्या पथकावरही तुफान हल्ला होऊन पथक नेस्तनाबूत झालं होतं. मेजर धर्माधिकारी यांच्या समोर तोलोलिंग नावाचं भारताचं पर्वतशिखर आता शत्रूच्या ताब्यात होतं. आणि हे शिखर पुन्हा हस्तगत करायचं म्हणजे प्रत्यक्ष मरणाला सामोरं जाणं. कारण परिस्थिती शत्रूला शंभर टक्के अनुकूल होती…पण तोलोलिंग परत घेतलं तरच इतर शिखरं पादाक्रांत करता येणार होती. 

योग्य वेळ पाहून शिखरावर चढाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण पहिला प्रयत्न अर्धवट सोडून द्यावा लागला…कारण दाट धुकं,वरून शत्रूचा तुफान आणि अचूक गोळीबार. त्यात शत्रूच्या स्नायपरने आपल्या एका ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर यांना अचूक टिपून धारातीर्थी पाडलं होतं. त्यादिवशी अधिक चढाई करणं अशक्य झाल्यानं खट्टू होऊन माघारी फिरणं भाग पडलं. 

त्यादिवशी पलटणीत सैनिकांच्या कुटुंबियांची पत्रं पोहोचली. जशी चातकाला पावसाच्या पहिल्या थेंबांची प्रतिक्षा तशी जवानांना आपल्या आप्तांची ख्यालीखुशाली समजण्याची उत्कंठा. मेजर धर्माधिकारी तर नवविवाहीत. आणि राजेश आणि किरण…त्यांच्या संसाराच्या वेलीवर उमलू पाहणा-या एका फुलाच्या प्रतीक्षेत आणि स्वप्नात मग्न असलेलं दांपत्य! पण सीमेवर जमा झालेले युद्धाचे ढग आता किरण यांच्या घरापासूनही स्पष्ट दिसत होते. काळजाला लागलेल्या घोर काळजीचे प्रतिबिंब प्रत्येक शब्दात अगदी आरशासारखे स्वच्छ दिसत होते. पण…मेजरसाहेब तर आता मोहिमेवर निघालेले होते. त्यांना सोळा हजार फुट उंचीवर त्यांच्या पत्नीचे पत्र मिळाले! एका हातात पत्नीचे पत्र, एका हातात तोलोलिंगचा नकाशा आणि खांद्यावर रायफल. डोळ्यांनी पहावे तरी काय आणि वाचावे तरी काय? मेजरसाहेब सहका-यांना म्हणत होते… नकाशा वाचला पाहिजे…तेथून परतल्यावर निवांतपणे वाचता येईल की बायकोचं पत्र! असून असून असणार काय पत्रात? काळजी वाटते, काळजी घ्या…वाट पाहतो आहोत…आम्ही…म्हणजे मी आणि आपलं बाळ!  

तोलोलिंगवर चढाई करता येईलच पण जिवंत परतण्याची शक्यता शून्य! लष्करात जिंदगी घालवलेल्या सर्वांना हे दिसत होतं…आणि त्यात हा गडी म्हणतोय…मोहिमेवरून आल्यावर निवांत वाचेन की पत्र! इतर जवानांना मोहिमेवर निघताना आपल्या कुटुंबियांशी बोलता यावं म्हणून अधिका-यांनी खास सॅटेलाईट फोनची व्यवस्था केली होती. मेजर राजेश साहेबांनी आपल्या साथीदारांना आधी बोलू दिलं…साहेबांचा नंबर लागला आणि त्या सॅटेलाईट फोनची बॅटरी संपली…बोलणं झालंच नाही…शेवटपर्यंत. 

मागच्याच आठवड्यात मेजरसाहेबांनी आपल्या अर्धागिंणीला पत्र धाडलं होतं. “मला लढाईला पाठवलं जातंय…आणि मलाही जायचंच आहे खरं तर. सैनिकासाठी लढाई म्हणजे एक तीर्थयात्रा…दोन्ही लोकी आशीर्वाद देणारी. मी परत येण्याची शक्यता धूसर आहे. नाहीच आलो तर आपल्या होणा-या बाळाला कारगिलच्या या शिखरांवर नक्कीच घेऊन ये. दाखव त्याला..त्याचा बाप कुठे लढला ते! देशाचा संसार सावरला तरच मी आपला संसार भोगू शकेन. या पत्राच्या उत्तरात तू काय लिहिणार आहेस हे मला आधीच ठाऊक आहे….!” 

याच पत्राचं उत्तर आलं असावं…आणि त्यात बाईसाहेबांनी काय लिहिलं असावं याची उत्सुकता मेजरसाहेबांना असण स्वाभाविक होतं. पण कर्तव्यापुढे वैय्यक्तिक आयुष्य कवडीमोलाचं असतं सैनिकांसाठी! संसार तर होत राहील….देशाचा संसार राखणं गरजेचं होतं. मेजरसाहेबांनी ते पत्र न उघडताच आपल्या ह्र्दयावरील खिशात अलगद ठेवून दिलं आणि प्लाटून…लेट्स मार्च अहेड! असं खड्या आवाजात म्हणत ते आपल्या सहकारी सैनिकांच्या चार पावलं पुढेच निघाले….नेत्याने अग्रभागी राहायचं असतं…शत्रूला भिडायचं असतं. नव्वद अंशाचा,चढण्यास अशक्य असलेला कोन,पहाटेचा अंधार,जीवघेणी थंडी,वरून होणारा गोळीबार. खरं तर शत्रू इतका आरामशीर बसला होता की त्यांना गोळ्याही झाडण्याची गरज पडली नसती…केवळ एखादा दगड जरी वरून भिरकावला असता खाली तरी वरती चढण्याच्या प्रयत्नात असलेला भारतीय जवान खोल दरीत कोसळून गतप्राण होईल…आणि तसं होतही होतं. 

मेजरसाहेबांना आता थांबायचं नव्हतं. त्यांनी आपल्या तुकड्यांना तोलोलिंगला तिन्ही बाजूने वेढण्याचे आदेश दिले. आणि मधल्या तुकडीच्या अगदी पुढे निघाले सुद्धा…त्यांच्या दिशेने अर्थातच तुफान गोळीबार सुरु झाला….दुश्मनांकडे अत्याधुनिक शस्त्रं होती आग ओकणारी. मेजरसाहेब तशाही स्थितीत मोठमोठे दगद शिताफीने ओलांडत आणि त्याचवेळी आपल्या गनमधून वर फैरी झाडत इंचाइंच करीत वर जात होते. शत्रू लपून बसलेल्या पहिल्या बंकरपर्यंत पोहोचताच त्यांची आणि शत्रूच्या दोन जवानांची समोरासमोर गाठ पडली…मेजरसाहेबांनी त्या दोघांशी हातघाईची लढाई लढली. शत्रू काही अर्धप्रशिक्षित घुसखोर अतिरेकी नव्हता…पाकिस्तानी लष्कराचा नियमित सैनिक होता. पण भारतीय लष्कराचे प्रशिक्षण वरचढ ठरले….आणि भारतीय जवानांचे मनोधैर्यही! मेजरसाहेबांनी दोघांचाही खात्मा केला…हे सगळं करत असताना त्यांच्या देहात गोळ्या घुसलेल्या होत्या. हे सगळं त्यांचा एक सहकारी काही अंतरावरून पहात होता…तेव्हढ्यात त्याच्या संपर्क साधनावर वरीष्ठ अधिका-याने संपर्क साधला….सहकारी म्हणाला…अधिकारी साहब…जांबाजीसे लड रहे है….” तितक्यात एका गोळीने या सहका-याचा वेध घेतला…संपर्क कायमचा समाप्त झाला. 

इकडे मेजरसाहेबांनी पुढे कूच केले…पहिला बंकर जवळ जवळ ताब्यात आलेला असतानाच त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबार झाला….आणि देहाचा आणि जीवाचा संबंध संपुष्टात आला! आता आत्मा मुक्त झाला होता स्वर्गात जाण्यास! मेजरसाहेबांचे सोबतीही या प्रवासात त्यांच्याच सोबत होते! यश थोडे मिळालेले असले तरी त्या यशाने पुढच्या यशाचा पाया रचला होता….ही अशक्यप्राय कामगिरी होती….हे खरं तर आपलंच अपयश होतं….शत्रूच्या कावेबाजपणाचा अंदाज यायला तसा खूप उशीर झाला होता आणि हा डाग धुण्यासाठी रक्तच कामी येणार होतं…आणि सुदैवानं या रक्ताची टंचाई नाही आपल्याकडे. 

छातीत घुसलेल्या गोळ्या… त्यातून रक्ताचे प्रवाह शरीरभर ओघळत असताना त्या रक्ताने मेजरसाहेबांच्या खिशातील पत्रालाही अभिषेक घातला….सौ.किरण अधिकारी यांनी जीवाच्या तळापासून लिहिलेले शब्दांनी लालरंग ल्यायला होता….विरहाची पत्रं प्रेमिकांच्या आसवांनी भिजतात …इथं शेवटचा निरोप रुधिराने ओलाचिंब झालेला होता. 

बारा तेरा दिवस मेजरसाहेब आणि सहका-यांचे निष्प्राण देह तोलोलिंगवर शत्रूच्या बंकर्समध्ये निश्चेष्ट पडून होते……युद्धाच्या धुमश्चक्रीत तिथपर्यंत पोहोचणं अशक्य होतं…आणि ते देह परत मिळवण्याचा वज्रनिर्धार करून पुन्हा तोलोलिंगवर चढाई करण्यास आणखी जवान आणि अधिकारी सज्ज होते! लीव न में बहाईंड. कोई साथी पिछे न छुटे! 

मेजरसाहेबांच्या घरी चौदा दिवस काहीही खबर नव्हती….कलेवरंच नव्हती तर हौतात्म्य जाहीर तरी कसं करायचं? कोण जाणो…चमत्कार झालेलाही असावा! पण असे चमत्कार विरळा! 

आज मेजरसाहेब आपल्या स्वत:च्या घरी आले होते…जसे नव्या नवरीला घरी मिरवणुकीने घेऊन आले होते तसे…पण आज दृश्य वेगळे होते. फुलं होती,हार होते…पण ते सरणावर जाणा-या देहावर पांघरण्यासाठी. हजारो लोक होते सोबत…पण त्यांच्या ओठांवर अमर रहेच्या घोषणा आणि डोळ्यांत आसवं. 

ती अगदी स्तब्ध उभी होती त्याच्या. इतरांच्या शोकाच्या गदरोळात तिचं शांत राहणं भयावह होतं. लोकांना आता तिचीच काळजी वाटू लागली…दु:खानं भरलेलं काळीज मोकळं नाही झालं तर काळीज फाटून जातं…अल्फ्रेड लॉर्ड टेनिसनने लिहून ठेवलंय… Home they brought her warrior dead: She nor swoon’d nor utter’d cry:All her maidens, watching, said, “She must weep or she will die.” त्यांनी त्या हुतात्मा योद्ध्याचा,तिच्या पतीचा मृतदेह तिच्या घराच्या अंगणात आणून ठेवला आहे…पण ती थिजून गेलीये…एकही हुंदका फुटत नाहीये….ती रडली नाही तर ती सुद्धा मरून जाईल…(मग तिच्या नवजात बाळाचं काय होईल?) पण इथं कुणी काहीही बोलायची हिंमत करत नव्हतं! ती बराच वेळ तशीच उभी राहिली त्याच्या कलेवराजवळ…आणि तेवढ्यात पार्थिव घेऊन आलेल्या लष्करी अधिका-याने तिच्या हातात मोठ्या अदबीने एक लिफाफा ठेवला…त्या लिफाफ्यावर ठळक अक्षरात नाव होतं…तिच्याच अक्षरात….मेजर राजेश अधिकारी यांस….! लिफाफा फोडला गेलेला नव्हता..आतलं पत्र तसंच होतं…वाचलं न गेलेलं!  

तो आता ते पत्र कधीही त्याच्या डोळ्यांनी वाचू शकणार नव्हता…मात्र त्याचा आत्मा कदाचित पत्रातील मजकूर ऐकायला आतुर झालेला असेल…तिने आसवांच्या शब्दांनी त्याच्या कानात तिने पत्रात लिहिलेला मजकूर ऐकवला असेल…तिने लिहिले होतं….तुम्ही परत आलात तर मी खूप भाग्यवान समजेन स्वत:ला, पण मातृभूमीच्या रक्षणार्थ तुम्ही प्राणांचं बलिदान दिलंत तर एका योद्ध्याची पत्नी म्हणून मी अभिमानाने जगेन. आपलं होणारं बाळ मुलगा असेल की मुलगी मला माहित नाही…पण मी त्या बाळाला तुम्ही लढलात त्या युद्धभूमीवर निश्चित घेऊन येईन…आणि त्याला किंवा तिला तुमच्यासारखंच शूर योद्धा बनवीन….तुम्ही माझे हे उत्तर तुमच्या डोळ्यांनी वाचलं असतं तर तुम्हांला किती आनंद झाला असता ना…राजेश?  तुम्हांला इन दी हेवन हे गाणं म्हणायला आवडायचं ना!  

Beyond the door There’s peace, I’m sure And I know there’ll be no more Tears in heaven…स्वर्गात आसवांना जागा नाही मुळीच….सुखद शांतता असते तिथे….मला माहित आहे…तुम्ही त्या स्वर्गात सुखनैव रहाल! 

(पंचवीस वर्षांपूर्वी कारगिल युद्धाच्या अगदी आरंभीच्या दिवसांत तोलोलिंग नावाचं महत्त्वाचं शिखर पाकिस्तान्यांकडून ताब्यात घेण्यासाठी तेथील पत्थरांना आपल्या जवानांनी अक्षरश: रक्ताचा अभिषेक घातला. यातीलच एक तरूण रक्त होतं मेजर राजेशसिंह अधिकारी यांचं. मुंबईच्या सैनिकप्रेमी भगिनी उमा कुलकर्णी या रोज एका सैनिकाची माहिती पोस्ट करीत असतात. त्यातूनच अधिकारी साहेबांच्या पराक्रमाविषयी वाचायला मिळालं. आणि महावीर चक्र (मरणोत्तर) विजेते मेजर राजेशजी अधिकारीसाहेब आणि त्यांच्या पत्नीचा,कुटुंबियांचा त्याग प्रखरतेने नजरेसमोर आला. त्या पोस्टवर आधारीत हा लेख आहे.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भाऊ- बहिणी… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ भाऊ- बहिणी… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

भाऊ आणि बहिणी हे आपल्या आई-वडिलांनी म्हातारपणी आपल्यासाठी ठेवलेल्या सर्वांत मौल्यवान ठेवी आहेत, याची आपल्याला फार उशिरा जाणीव होते. फक्त सख्खे नाही तर चुलत, मावस, मामे, आत्ते, सर्व भावंडं.

आम्ही लहान असताना भाऊ-बहिणी आमचे सर्वांत जवळचे सवंगडी होते. दररोज, आम्ही एकत्र खेळत होतो आणि गोंधळ घालत होतो.  आणि बालपणीचा काळ एकत्र घालवत होतो.

मोठे झाल्यावर, आम्ही आमच्या स्वतःच्या कुटुंबात रमलो, स्वतःचे वेगळे जीवन सुरू झाले. आम्ही भाऊ- बहिणी सहसा क्वचितच भेटतो.

आमचे पालक हा एकमेव दुवा होता, ज्याने आम्हा सर्वांना जोडले होते.

आपण हळूहळू म्हातारे होईपर्यंत वाट पाहत राहू. आपले आई-वडील आपल्याला सोडून गेले आहेत आणि आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांची संख्या कमी होत चालली आहे, त्याचवेळी आपल्याला हळूहळू मायेची किंमत कळते.

मी नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये १०१ वर्षांचा मोठा भाऊ त्याच्या ९६ वर्षांच्या धाकट्या बहिणीला भेटायला गेला होता.  थोड्या वेळानंतर जेव्हा दोघे वेगळे होणार होते, तेव्हा धाकट्या बहिणीने त्याच्या कारचा पाठलाग केला.   भावाला २०० युआन दिले आणि त्याला काहीतरी छान खाण्यास सांगितले.  तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच दोघांनाही अश्रू अनावर झाले.

असे काही नेटिझन्स होते, ज्यांनी टिप्पणी केली की एवढ्या मोठ्या वयात भाऊ आणि बहिणी भेटणे खरोखरच खूप भाग्याचे लक्षण आहे.

होय, आपण म्हातारे झाल्यावरच आपल्याला कळते की या जगात आपल्याशी कोणीतरी रक्ताने बांधलेला असणे किती महत्त्वाचे आहे!

जेव्हा तुम्ही म्हातारे असाल आणि तुमचे आई-वडील दोघेही गेले असतील, तेव्हा तुमचे भाऊ आणि बहिणी या जगातील सर्वात जवळचे लोक असतात.

मित्र दूर जाऊ शकतात. मुलं मोठी होतात, ती ही दूर जातात. तुमचा जोडीदार तुमच्या सोबत असेल नसेल, तरीही फक्त तुमचे भाऊ आणि बहिणी आहेत, जे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उत्तरार्ध पूर्ण करण्यासाठी पुरेशी साथ देऊ शकतात.

आपण म्हातारे झालो तरी बंधुभगिनी एकत्र जमू शकणे हा एक मोठा आनंद आहे.

त्यांच्या सहवासात आम्हाला उबदारपणाची कमतरता भासणार नाही.  त्यांच्या सहवासात आम्ही कोणत्याही अडचणींना घाबरणार नाही.  वृद्धापकाळापर्यंत, कृपया आपल्या बंधू आणि बहिणींशी जुळवून घ्या.

भूतकाळात काहीही अप्रिय घडले असले, तरीही भाऊ आणि बहिणींनी एकमेकांशी अधिक सहनशील आणि क्षमाशील असले पाहिजे.

अशी कोणतीही गाठ नाही जी भाऊ-बहिणीमध्ये बांधता येत नाही.  अशी कोणतीही ढाल नाही जी काढली जाऊ शकत नाही.

बंधू-भगिनींनी कधीही जुने हिशेब मांडू नयेत किंवा जुनी नाराजी बाळगू नये.  थोडे अधिक परस्पर अवलंबित्व आणि परस्पर पालनपोषणाने, संबंध अधिक चांगले आणि चांगलेच होतील कारण या जगात आपल्या पालकांनी सोडलेल्या या सर्वांत मौल्यवान भेटवस्तू आहेत.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुरुपौर्णिमा…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 विविधा 🌸 

☆ “गुरुपौर्णिमा” ☆ सुश्री शीला पतकी 

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू यांनी आपल्या भाषणात सांगितलेले हे वाक्य आहे ” शिक्षकानो लक्षात ठेवा कृष्णाला अष्टमी आहे रामाला नवमी आहे पण गुरूला मात्र पौर्णिमा आहे कारण तो पूर्ण आहे” त्याच्यावर समोरच्या विद्यार्थ्यांची अफाट श्रद्धा असते आणि मग भगवंता इतकीच आपल्यावर श्रद्धा असेल तर आपण परिपूर्ण होणे गरजेचे आहे त्यासाठी सर्व शिक्षकांनी गुरु पदापर्यंत पोहोचण्यासाठी ज्ञान वाढवले पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांना विविध प्रकाराने ते दिले पाहिजे त्याचबरोबर त्याची आई होऊन त्याला संस्कार दिला पाहिजे बाप होऊन त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे तर तो खरा परिपूर्ण शिक्षक

मित्र-मैत्रिणींनो परिपूर्ण कोणीच नसतो भगवंता शिवाय ..!आपण परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे काय तर आपल्या जवळ जे काही आहे ते ते समोरच्याला पूर्णत्वाने देणे आणि आपल्याजवळ जर काही कमी असेल तर ते पूर्णत्वाला येण्यासाठी सतत घेत राहणे. खरं तर आपला पहिला गुरु आई असते कारण ती आपल्यावर प्रेम करून प्रेमाने सर्व गोष्टी शिकवत असते आणि आपण त्या शिकत असतो पण ती सहज प्रक्रिया असते गुरुकडे जेव्हा तुम्ही शिकायला येता तेंव्हा जाणीवपूर्वक ज्ञान देण्याची प्रक्रिया सुरू होते त्यामुळे गुरूला वेगवेगळ्या भूमिकेतून जावे लागते अर्थात शिक्षकाला जर आपण  गुरु समजत असू तर त्याला वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात हे आधी जाणून घ्या. त्यानंतर तो ज्ञान देतोच माहिती देतो संस्कार पेरतो प्रोत्साहन देतो  चुका करायची संधी देतो कारण चुकल्याशिवाय चांगलं शिकता येत नाही. त्या चुका दुरुस्त करतो पाठीशी उभा राहतो आधाराचा हात कुठपर्यंत ठेवायचा आहे त्याला बरोबर कळतं तो उत्तमच समुदेशक असतो… अशा अनेक भूमिका शिक्षकाला कराव्या लागतात फक्त शिकवून  चालत नाही प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या असतो त्याला जाणून घेऊन त्याच्यावर काम करावे लागते त्याच्या समग्र कुटुंबाची माहिती घ्यावी लागते त्याची मानसिक अवस्था जाणून घ्यावी लागते त्याची सुख दुःखे जाणून घ्यावी लागतात. त्याच्या कमतरता जाणून घ्याव्या लागतात त्यात नेमकं काय कमी आहे ज्यामुळे तो पुढे जाऊ शकत नाही हे जाणून घ्यावे लागतं इतकं सगळं शिक्षक करत असतो. तो फक्त मराठी हिंदी त्याच भूगोल शिकवत नाही आणि हे सगळं करता आलं तर तुम्हाला गुरुपद मिळतं हे लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही शिक्षक असता फक्त! अभ्यासाच्या गोष्टीचीच दखल घेणे इतकं काम शिक्षकाचा नसतं तर जीवनामध्ये त्याला काय अडचणी येतात आणि त्या त्यांनी कशा सोडवाव्या हे नकळत त्याला सांगावे लागते त्याच्या कमतरतांची जाणीव त्याच्या भावना न दुखावता करून द्यावी लागते हे सगळे शिक्षक का करू शकतो तर विद्यार्थ्याचे त्याच्याकडे शिकण्याचे जे वय असते ते कच्चे असते अद्यात त्याचा स्वतःचा विचार नसतो. जे आवडतं त्याच्यावरती तो भाळतो शिक्षक आवडले की त्याच्यावरती तो प्रेम करायला लागतो ते सांगतील ते त्याला करावसं वाटतं त्यांच्यासाठी काय पण.. ही वृत्ती निर्माण होते …मी असे अनेक विद्यार्थी पाहिलेत जे आपल्या शिक्षकावरती विलक्षण प्रेम करतात. … माझी एक विद्यार्थिनी होती तिला माझ्याबद्दल विलक्षण आकर्षण होतं. बाईने आपल्याला काम सांगावं.. बाईंच्या समोर आपण सतत राहावं.. बाईनी आपल्याला प्रश्न विचारावेत.. असं तिला नेहमी वाटत राहायचं ती आसपास घोटाळत राहायची तीला मी गणित विषय शिकवत होते त्यामध्ये साधारणपणे वर्गात विसाव्या नंबर पर्यंत तिचा नंबर असायचा पण मी जसं तिला वर्गात शिकवायला लागले तसं तिने माझ्यासाठी जोमान अभ्यास सुरू केला आणि मी वर्गात एकदा पेपर वाटण्यापूर्वी मुलींना विचारले होते कोणाला खात्री आहे की या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतील …पाच सहा विद्यार्थ्यांनी हात वर केला त्यात भीत भीत तीने हात वर केला सगळ्या मुली हसल्या कारण तिला आजवर तेवढे मार्क कधी पडले नव्हते आणि मी पेपर वाटले कमाल म्हणजे तिला एकटीला 30 पैकी 30 मार्क पडले होते सगळ्या मुली या चमत्काराने आश्चर्यचकित झाल्या कारण एकच होतं बाईंसाठी केलेला अभ्यास तोपर्यंत मलाही हे ठाऊक नव्हतं की ती माझ्यावरती एवढं प्रेम करते आज ती विद्यार्थिनी साठ वर्षापेक्षा अधिक आहे पण पुढे सातत्याने हा अभ्यास तीने टिकवला आणि मराठी विषयात विद्यापीठात पहिली आली एम ए झाली आपल्या राहत्या गावात संत चिंतन हे एक चॅनेल चालवत आहे आणि ती आजही कृतज्ञतेने मला सांगते बाई मी तुमच्यामुळे एवढी पुढे गेले किंवा तुमच्यामुळे माझ्यात हा बदल घडून आला खर तर मी काहीच केलं नाही फक्त पाठीवरती हात ठेवला…!

विद्यार्थ्यांची तुमच्यावर एवढी श्रद्धा असते की तुम्ही सांगाल ते प्रमाण वाक्य..! माझ्या वर्गातली एक विद्यार्थिनी आठवीमध्ये होती तेव्हा ती घरी जेवत नसे मधल्या सुट्टीत डबा नाही तिचे पालक येऊन मला भेटले आणि म्हणाले बाई खूप अभ्यासू हुशार आहे पण खात पीतच नाही सगळ्या डॉक्टराना दाखवून झाले पण काही उपयोग होत नाही खूप कृश होती मग मी तिला बोलावले आणि चौकशी केली आणि तिला सांगितलं की उद्यापासून डबा आणायचा व्यवस्थित डबा असला पाहिजे तो मैत्रिणींबरोबर बसून खायचा डब्यातला पहिला घास मी घेणार मला रोज डबा दाखवायचा आणि तो संपलेला ही मला दाखवायचा एका ग्रुप वर ही  जबाबदारीच टाकून दिली मी .मुली काय बाईने काम दिले म्हणजे चोख बजावणार दुसऱ्या दिवशीपासून तिने डबा आणायला सुरुवात केली मी एक घास घ्यायचा मग ती मुलींच्या घोळक्यात बसून डबा खायची आणि हळूहळू रोज ती डबा व्यवस्थित खायला लागली. तिची तब्येत पुढे चांगली झाली पुढे ती इंजिनियर झाली

 तिचे लग्न झाले तिच्या लग्नात तिच्या आई-वडिलांनी मला मुद्दाम घरी येऊन निमंत्रण केले होते आणि मी लग्नाला गेल्यानंतर भर मांडवात त्यांनी माझ्या हातात एक चार थाळी भरलेला डबा जावई आणि मुलींच्या हस्ते मला दिला आणि जावईबापूंना सांगितले की बाईंमुळे  आमची मुलगी जेवायला शिकली त्यामुळे आज तुम्हाला सुदृढ पत्नी मिळत आहे …आहे की नाही गंमत किती छोटी गोष्ट ही काय अभ्यासात नाहीये पण तिच्या आयुष्यासाठी ती अतिशय गरजेची होती आणि हे शिक्षकाला करावे लागते!

विद्यार्थ्याला प्रोत्साहन वेळेवर  मिळाले नाही तर त्याचे काय होते याची एक गोष्ट आहे एक मोठा चित्रकार गावात आला आणि त्याने आपला कार्यक्रम मोठ्या हॉलमध्ये भरवला चित्र कलेचे मार्गदर्शन केले त्यांची चित्रे फारच सुंदर होती त्यानंतर एक आजोबा त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी काही चित्र त्यांना दाखवली एक अ संच होता अन एक ब संच होता चित्रकार म्हणाले अ संचातील चित्रे चांगली आहेत हा मुलगा खरं म्हणजे खूप मोठा चित्रकार होईल त्याला जरूर आपण चित्रकलेची जाणीव करून द्या आणि शिकवा ब संचातील चित्र जी आहेत ती मात्र अगदी टुकार आहे त्याने चित्रकला न शिकलेलीच बरी आजोबांना त्यांनी कुतूहल्याने विचारले कोणाची चित्रं आहेत तुमच्या नातवाची आहेत का? आजोबांनी उत्तर दिले नाही नाही अ संच जो आहे तो माझाच आहे पण मला शाळेत प्रोत्साहन मिळाले नाही त्यामुळे माझ्यातली कला वाढली नाही सुधारली नाही आणि ब संच्यातली चित्र आत्ता मी काढतोय ती आहेत तिची अवस्था अशी झाली आहे शाळेत मला वेळेवर प्रोत्साहन मिळाले असते तर कदाचित मीही आज तुमच्या जवळपास असलो असतो आजोबांच्या हातात असलेली चित्रकलेची कला केवळ प्रोत्साहन न मिळाल्यामुळे बहरू शकली नाही तेव्हा केवळ प्रोत्साहनने सुद्धा विद्यार्थी खूप काही काम करतात आणि ही किमया म्हणजेच पाठीवर हात ठेवणे.आदरणीय कुसुमाग्रजानी म्हंटले तेअगदी खरे आहे त्यांचा कणा ताठ  राहील अशी शिकवण देणे हे गुरुचे काम आहे आणि मग विद्यार्थी आपोआपच म्हणतो पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा

विद्यार्थी हा सुरुवातीला गुरुचे अनुकरण करत असतो आणि मग सुरुवात होते अनुकरणापासून अनुसरणापर्यंत! आपल्या पद्धतीने त्यांनी राहावं हा भाग वेगळा पण आपल्या पद्धतीने विचार करून आत्मविश्वासाने जगावे म्हणजे तुमचे अनुसरण करावे असे वाटत असेल तर शिक्षकाला फार सतर्कपणे वागावे लागते आणि आपल्या विद्यार्थ्यांसमोर खऱ्या अर्थाने आदर्श उभे करावे लागतात.आपल्या  वर्तनातून! आत्ताच्या विद्यार्थ्यांना पुस्तकातले शिकवलेले आदर्श फारसे पटत नाहीत पण समोर दिसणाऱ्या गोष्टी वरती मात्र त्याचा खूप विश्वास असतो आणि त्यातली पहिली व्यक्ती असते त्यांचे शिक्षक म्हणून शिक्षकांवर जबाबदारी आहे आपले वर्तन आपले विचार हे कोणीतरी अनुसरणार आहेत हे लक्षात ठेवून समाजात वागत राहा तर तुम्हाला गुरु पद मिळेल ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंतःकरणात असेल त्यासाठी त्यांचे फोन यावे लागतात मेसेजेस यायला लागतात असं अजिबात नाही भेटलेल्या प्रत्येक क्षणाला ते झटकन आपलं मस्तक तुमच्या पायावरती ठेवतात कारण आपण त्यांच श्रद्धास्थान असतो अशा पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना घडवणारे असंख्य शिक्षक महाराष्ट्रात आहेत आम्हालाही ज्यांनी या पद्धतीने घडवलं त्यांचे आदर्श आमच्यासाठी मार्गदर्शक ठरले त्या असंख्य गुरूंना आजच्या दिवशी मनःपूर्वक नमन!

वाचक हो हा लेख वाचल्यानंतर आपल्यालाही आपल्या शिक्षकाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही त्यांनाच मनोमन नमस्कार करा आणि आजची गुरुपौर्णिमा साजरी करा सर्वांना पुनश्च एकदा गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दयाघना आणि रसूल अल्लाह ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ दयाघना आणि रसूल अल्लाह ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

तिच्या देहाची कितीतरी वर्षांपूर्वीच माती झालीये…पण तिचा आत्मा अजूनही अधांतरीच आहे, अडकून पडलाय काळकोठडीत..बंदिवासात ! ती एकटीच आहे इथे…या प्रशस्त राजप्रासादात. अगदी रया गेली आहे या वास्तूची. पडक्या भिंती…दिवाणखान्यातील रंग उडालेली तैलचित्रं आणि भंग झालेली शिल्पं. क्रूर श्वापदांचे अक्राळ विक्राळ मुखवटेही आता केविलवाणे भासताहेत. तिला या बंदिवासात ढकलणारा सुद्धा आता या जगात नाही, आणि तिला सोडवण्याचा प्रयत्न करणाराही कुठं दिसत नाही. आत्म्याला देहाच्या मर्यादा नाहीत आता…पण तरी तिला त्या बेसुमार मरुभूमीच्या पल्याड जाण्याचा मार्ग गवसत नाहीये…ती आजही अशीच मध्यरात्र उलटून गेल्यावर आपल्या कोठडीतून तिच्या उस्तादाच्या कोठडीपर्यंत धावत आलेली आहे….उस्ताद तिचा संगीत शिक्षक…ती आणि तिची थोरली बहिण गाणं-नाचणं शिकायच्या या उस्तादाकडे. राजवाड्यातल्या हुकुमची कामुक नजर पडली होती तिच्या थोरल्या बहिणीवर. पण उस्तादाने डाव ओळखून या दोघींना,त्यांच्या बापाला  सावध केलं…आणि तिथून दूर निघून जा असं बजावलं. पण त्या राजवाड्याच्या भिंतींना भले मोठे कान होते…राजाचे कानही तिखट होते. त्याने पळून जाऊ पाहणा-या बापलेकीला चाबकाने फोडून अर्धमेलं केलं…फेकून दिलं वाळवंटातल्या तापल्या मातीत तडफडून मरण्यासाठी. ही धाकटी..अजून वयात यायची होती आणि फार फार तर चार-पाच वर्षात बाई होणारच होती ! राजाने तिला कैदेतच ठेवलं आणि उस्तादाला सुद्धा. 

मध्ये कित्येक वर्षे उडून गेलीत..एका ठिकाणची वाळू दूर उडून जाऊन तिने भलतीकडेच आपलं बस्तान बसवलं आहे. उस्तादही नाहीत…पण आज तिला ते दिसताहेत…त्यांच्या कोठडीत मंद दिवा मिणमिणतो आहे…त्यांनी राग ‘पूर्वी’ छेडला आहे….स्वर अगतिक आहेत…विदग्ध आहेत ! धर्मानं अल्लाहचा बंदा आहे उस्ताद…त्याच्या रसूल अल्लाहला विनवणी करतो आहे….कर दो कर दो… दूर पीर हमारी ! हे ईश्वरा…हे दु:ख,पीडा दूर कर आमच्या जीवनातली…! 

इथं पंडित ह्रदयनाथ मंगेशकरांचा आर्त स्वर वाळवंटाच्या खोल उरातून उगवतो आहे….त्यांनी केंव्हातरी दीनानाथांच्या मुखातून ऐकलेली एक बंदिश….राग पूर्वी मधली…यावरच पुरिया धनाश्री आधारलेला आहे असे अभ्यासक म्हणतात. दीनानाथांच्याच ‘बाळ’मुखातून ही बंदिश आता  स्रवते आहे. स्वरांच्या लेखी ईश्वर-अल्लाह एकच…स्वर पाण्यासारखे प्रवाही आणि रंगहीन असतात ! संगीत-साधकाला स्वर प्यारे..शब्द केवळ स्वरांची पालखी वाहणारे दास !  

क्षुधित पाषाण (Hungry Stone) या रवीन्द्रनाथ टागोरांच्या कादंबरीवर आधारीत गुलजार यांनी लिहिलेली चित्रकथा म्हणजे हिंदी चित्रपट ‘लेकीन’! डिम्पल कपाडिया..विनोद खन्ना. वर्ष १९९०. लतादीदी निर्मात्या आणि हृदयनाथ मंगेशकर संगीत दिग्दर्शक. ‘यारा सीली सीली (ओलसर) बिऱहा की रात का जलना’…सारखी अनेक मधुर गाणी दिली बाळासाहेबांनी..स्वर अर्थातच थोरल्या बहिणीचा..दीदीचा !  ‘लेकीन’ मधलं ‘सुरमयी शाम जिस तरहा आये..सांस लेते हैं जिस तरहा साये’…आणि मुलायम आवाजाची देणगी लाभलेले सुरेश वाडकर…आठवताहेत का? 

या आधी १९८० मध्ये यशवंत दत्त अभिनित ‘संसार’ नावाचा मराठी चित्रपट आला होता. गीतकार होते सुधीर मोघे नावाचे अमोघ शब्द रचना करणारे कवी. बाळासाहेबांनी त्यांच्या ‘दयाघना..का तुटले चिमणे घरटे…उरलो बंदी असा मी !’ या काव्याला सुंदर चालीत चालवताना ‘पूर्वी’चेच सूर दिलेत..! आणि चित्रीकरणात यशवंत दत्त यांनी गाणे जगून दाखवलं आहे.    

….. हे दयाघना, माझं इवलंसं घरटं मोडून पडलंय आणि उरलो आहे फक्त मी..एकाकी! माणसाचा जन्मच जणू एक कारागृह. इथं मागील जन्मातील कर्मांची फळं रोख भोगायला जन्माला यायचं आणि या जन्मातही कर्मांच्या गाठोड्यात आणखी भर घालत बसायचं..’ पुनरपि जननं…पुनरपि मरणं..पुनरपि जननी जठरे शयनं !’ हा बंदिवास मला चुकणारच नाही…मी तुझा बंदिवान ! या कोठडीला दहा दिशांच्या  मजबूत भिंती आहेत आणि कैद्यांच्या हातात मोहाच्या,मायेच्या अवजड बेड्या….स्वत:हून काढल्या तरच निघणा-या ! पण या बेड्या काढण्याची,फेकून देण्याची इच्छाच होत नाही इथल्या बंदिवानाला..सवयीचं झालेलं असतं…यालाच माया म्हणतात…’मा’…णसाला ‘या’…तना देणारी !  ही माया माझे प्राण व्याकूळ करते आहे…देवा ! जन्माच्या चुलांगणावर बालपणीचं दुधाचं भांडं ठेवलं आहे…आणि त्याकडे खेळण्याच्या नादात ध्यानच नाही गेलं..बालपण उतू गेलं…अग्निच्या मुखात गेलं ! उरलेल्या दुधात वासनांचा मिठाचा खडा पडला नकळत…नासायाला वेळ नाही लागला !… आता देह वार्धक्याच्या वळचणीला येऊन उभा राहिला आहे…श्वास बालपण आठवू देत नाहीत, आणि तारुण्याच्या माजघरात पाय ठेवू देत नाहीत…अंगणात ऊन आहे…याच अंगणात हा देह एके दिवशी आडवा निजलेला दिसणार आहे…शेवटच्या प्रवासाला जाण्यासाठी…दयाघना ! का तुटलं माझं घरटं? हा प्रश्न नाहीये…हा स्वत:शी केलेला वैराण संवाद आहे..बंदिवानाला उत्तर मागण्याचा अधिकार नसतो !      

दयाघना, का तुटले चिमणे घरटे ?

उरलो बंदी असा मी !

अरे, जन्म बंदिवास सजा इथे प्रत्येकास

चुके ना कुणास आता बंदी तुझा मी दयाघना !

 

दहा दिशांची कोठडी मोह-माया झाली वेडी

प्राण माझे ओढी झालो बंदी असा मी दयाघना !

 

बालपण उतू गेले अन्‌ तारुण्य नासले

वार्धक्य साचले उरलो बंदी पुन्हा मी दयाघना !

(आंतरजालावर हृदयनाथ आणि लता दीदी एका जाहीर कार्यक्रमात वर उल्लेख केलेली रसूल अल्लाह ही बंदिश सादर करतानाचा विडीओ आहे. दीदीनी एक स्वर लावलाय…उंच…आणि तो स्वर अपेक्षित ठिकाणी पोहोचल्यावर त्यांच्या चेह-यावरचं हास्य पाहण्यासारखं आहे…बाळासाहेबही आता तीच उंची गाठताहेत..श्रोते क्षणभर स्तब्ध आणि मग टाळ्यांचा गजर…अखंड ! जा जा रे जा पथिकवा….आणि त्यावरून दयाघनाची याद आली ! म्हणून हे लिहिलं…)

(तपशीलात चुका आणि दीर्घ लेखनाचा दोष आहेच…दिलगीर आहे!)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रतिमा-भंजन ::: एक छंद – लेखक : श्री विश्वंभर चौधरी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे  ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

☆ प्रतिमा-भंजन ::: एक छंद – लेखक : श्री विश्वंभर चौधरी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे 

नेमका बाबासाहेबांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी 13 एप्रिलला व्हाट्सअप युनिवर्सिटी आणि फेसबुकवर मेसेज येतो की घटनासमितीत शेकडो लोक होते मग घटनेचे शिल्पकार फक्त बाबासाहेब कसे? 

2 ऑक्टोबर तर सगळ्यांनी मुक्तपणे गांधीजींना शिव्या देण्याचा दिवस, गांधी कसे आणि कुठे चुकले यावर भरभरून लेख येतात.

14 नोव्हेंबर म्हणजे तर सगळ्यात मोठा शिमगा! नेहरूंवर खोटेनाटे आरोप लावण्याचा हक्काचा दिवस! नेहरू हे यात सगळ्यात दुर्दैवी. 

1 ऑगस्ट आला की ‘भटमान्य’ टिळक कसे सनातनी होते, फक्त ब्राह्मणांचे नेते होते… 

आता पहिल्या पिढीचा उद्धार करून संपल्यावर आपली तरुणाई दुसर्या पिढीला सुरूवात करत आहे. साने गुरुजींना काल फटका बसलाच.  पुन्हा, मी मीमवर बोलत नाही, प्रतिक्रियांवर बोलतोय. 

आणि मी सराईत ट्रोलाबद्दल म्हणजे अजेंडे घेऊन आणि त्या अजेंड्यासाठीचा पगार घेऊन लिहीणारांबद्दल बोलत नसून कोरी पाटी घेऊन सोशल मिडीयात आलेल्या आजच्या सर्वसामान्य तरुण पिढीबद्दल बोलत आहे. 

सगळेच तसे नाहीत पण बहुतांश तरूण हे फशी पडत आहेत. राष्ट्रीय नेत्यांबद्दल फेसबुकवरून मत बनवत आहेत. आणि तशा काॅमेंट धडाधड टाकत आहेत जे योग्य नाही.

माझ्या वाॅलवर सेक्युलॅरिझमला पाठिंबा देणारा एखादा तरूण दुसर्या कुठल्यातरी वाॅलवर कट्टर जातीयवादी प्रतिक्रिया लिहितांना मला आढळतो तेव्हा खरंच विश्वास बसत नाही की हा खरा की तो खरा? 

फेसबुकचा सगळ्यात वाईट भाग असा आहे की इथं प्रत्येक राष्ट्रीय नेत्याचं फक्त वैगुण्य शोधलं जातं आणि ते तिखट मीठ लावून सांगितलं जातं. 

रात्रीच्या अंधारात एखाद्या राष्ट्रपुरूषाच्या पुतळ्याची विटंबना करणारा आणि दिवसाच्या उजेडात फेसबुकवर राष्ट्रीय नेत्याचं प्रतिमाभंजन करणारा- कसा फरक करायचा दोघात? 

फक्त प्रतिमाभंजन. विधायक काहीच नाही. जणू काही या माणसांना देशानं आत्तापर्यंत डोक्यावर घेतलं ते केवळ  अज्ञानापोटी आणि या नव्या संशोधकांनी फेसबुकवर संशोधन केल्यामुळेच जगाला सत्यस्वरूप कळलं अन्यथा सगळं जग अंधारात होतं.

राष्ट्रीय नेत्यांची चिकित्सा व्हावीच. चिकित्सेला विरोध नाही. 

उद्या बाबासाहेबांच्या ‘प्राॅब्लेम ऑफ रूपी’ या प्रबंधात एखादं गृहीतक कसं चुकलं हे कोणी सप्रमाण मांडलं किंवा महात्मा फुलेंचा शेतीविषयक आर्थिक विचार कोणी खोडून दाखवला किंवा गांधीजींच्या सत्याग्रहातल्या उणीवा दाखवल्या किंवा नेहरूंच्या परराष्ट्र नीतीत चुका काढल्या किंवा टिळकांच्या गीतारहस्यामध्ये त्यांचं गीतेचं आकलनच मुळात कसं चुकलं हे मांडलत तर स्वागत आहे! मराठी समाज बौद्धिकदृष्ट्या जिवंत असल्याचं ते लक्षण असेल. पण भलतीच समीक्षा होतांना दिसतेय.    

काळाच्या मर्यादेत  त्यांनी शक्य तितके बदल घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कामाची चर्चा करा. त्यांच्या योगदानाची चर्चा केली तर आपणही काही करावं असं वाटेल. त्यांचे फक्त तथाकथित दोष चघळत बसलो तर गावच्या पारावर वर्षानुवर्ष त्याच गप्पा मारत बसलेल्यांसारखी तुमची अवस्था होईल. ज्यांच्यावर तुम्ही टीका करता ते कधीच वर गेले. तुमच्या भविष्यात जर कशाचा उपयोग करता येईल तर तो त्यांच्या कामाचा. त्यांच्या चुकांचा काय उपयोग? 

प्रतिमाभंजनाच्या खेळातून बाहेर या, विधायक काम बघा. शक्य झालं तर ते पुढे न्या.   

मी सरसकटीकरण करत नाही. विधायक विचार करणारे पण आहेत पण संख्या अगदी नगण्य. आणि तरूण म्हणून तुमची प्रत्येक अभिव्यक्ती मला मान्य आहे, अभिव्यक्तीच पिढीगणिक बदललेलं वेगळेपणही मान्य आहे. फक्त अभिव्यक्ती हे साध्य नसून साधन आहे एवढंच सांगायचंय.

माझा कदाचित राग येईल तुम्हाला. येऊ द्या. मी कधीच गोड गोड उपदेशासाठी प्रसिद्ध नव्हतो. तुमची उमेदीची वर्ष, अभ्यासाची वर्ष या टिंगलटवाळीत वाया जाऊ नयेत. 

गांधी सनातनी होते, बाबासाहेब अहंकारी होते, नेहरू चारित्र्यहीन होते, टिळक फक्त भटमान्य होते या सगळ्या अफवा आहेत. अभ्यास वाढवला की डोक्यात प्रकाश पडेल.

या सगळ्यांच्या कामाचा अभ्यास करा, सोशल मिडीयानं आकसानं त्यांच्यावर लादलेल्या कथित दुर्गुणांचा अभ्यास करून काय होणार?

स्वातंत्र्यानंतरच्या दोन-तीन पिढ्यांनी चांगलं ते समोर ठेवलं. नव्या पिढीनं फक्त वाईटाचा शोध लावून ते झाकाळून टाकू नये.  ज्ञानात भर पडावी, अज्ञानापुढे ज्ञान संपून जाऊ नये. 

द्वेष हा फक्त राजकीय अजेंडा असतो, अभ्यासात द्वेषाला जागा नाही. द्वेष की अभ्यास यावर एकदा व्यक्तिगत निर्णय करायचा आहे.

लेखक :  विश्वंभर चौधरी

प्रस्तुती : सुनील देशपांडे 

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘मेतकूट भात –’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘मेतकूट भात ’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

…आयुष्याच  गणित सोप्प करणारी माणसं धकाधकीच्या जीवनात आपल्याला जीवनाचं ‘सार ‘ सांगून जातात. 

लग्नानंतर ग्रॅज्युएशन सर्टिफिकीट हातात पडलं आणि आमचं विमान हवेत तरंगायला लागल. त्यातून हरबऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्या  मैत्रिणींची  चढाओढ चालू होती , ” ए बाकी कमाल आहे हं तुझी! कसं गं जमलं तुला.? लग्नानंतर सगळा व्याप सांभाळून कसा केलास गं एवढा अभ्यास ? हरबऱ्याच्या झाडाचा डेरा वाढतच होता. आणि मी वर वर चढतच होते.अहो हो ना! मी म्हणजे खूप शहाणी,संसारातल्या तत्त्वज्ञानात तर एकदम तरबेज.अशी ‘ ग ‘ ची बाधा झाली होती मला. ‘आशाच’ कामवालीच साधसुध  समीकरण ऐकून चक्क खालीच पडले  की हॊ मी!.माझं गर्वाच विमान  दणकन जमिनीवरच आपटल. नुसत्या पदव्या असून काय उपयोग?   व्यवहारी  जगातल्या तत्वज्ञानाच् पारडचं वरचढ ठरत . काय झालं माहिती आहे का  साधी सरळ, भाबडी, अशिक्षित अशी माणसं माझ्या आयुष्यात आली. आनंदी क्षणाचं, सकारात्मक विचा्रांच सोनं करणारी माणस मला भेटली. पांडित्यालाही लाजवेल असं संसाराच साध, सोप्प, गणित त्यांनी माझ्यापुढे मांडलं. आणि ते ऐकून मी अवाक झाले.

 निक्कम्या मारकुट्या नवऱ्याला पोसत,आपल्या अपंग मुलाला सांभाळून कष्टाशी हात मिळवणी करून ,हाता तोंडाशी गांठ  घालणारी खम्बिर ‘आशा ‘ मला भेटली. आशा  म्हणजे आमची कामवाली  हॊ!. माझ्याकडे ती रोज कामाला यायची.एकदा मुलांवरून विषय निघाला. सहज तिच्या बोलण्यात आलं.  “माझ्या मुलाला वरण भात , मेतकूट भात  खूप  खूप आवडतो. पण रोज कसं परवडणार ?  तुम्हीच सांगा  वहिनीबाई  काही वेळेला इतका हटून  बसतो कीं,मलाच  लई वाईट वाटतंया   साधा  भात  तो काय ! हा साधा हट्ट पण मी पुरवू शकत नव्हते त्याचा.आणि मग हा त्याचा  हट्ट पुरवन्यासाठी मी इठुरायाच्या मंदिरात  गेले.” नवल वाटून मी विचारलं. ” काय गं ? विठोबाला साकडं घातलस की काय? परिस्थिती बदलावी म्हणून? “नाही हॊ वहिनीबाय ! त्याला किती संकटात टाकू ?  अंधार झाल्यावर तोच प्रकाश दाखवणार आहे ना मला. दुकानातले महागडे तांदूळ परवडणार नाहीत म्हणून मी गेले पुजारी बाबां कडे त्यांना विनवून म्हणाले,”पुजारी बाबा. देवा पुढ लोकांनी टाकलेले तांदूळ प्रसाद म्हणून द्याल का मला “? ते म्हणाले, ”अगं ने की असेच  घेऊन जा.जाडे भरडे , हलके, भारी, बरेच तांदुळ पडतात ह्या टोपलीत . आमची पोरं नाकं  मुरडतात,अशा सरमिसळ तांदुळाचा भात खायला. तू बेलाशक घेऊन जा ” आशा पुढे सांगत होती “पण असं फुकटचं देवापुढंच  घेनं बरं वाटतं का ? मग मी इचार केला. आपण देवा पुढे पैसे नाही टाकू शकत मग अशा रूपाने पैसे देऊन तांदूळ घेऊन,पुण्य मिळवायला काय हरकत आहे “? मी पुजारी बाबांना विनंती केली, “पुजारी बाबा थोडं तरी पैसे घ्या आणि थोडं तरी पुण्य माझ्या पदरात टाका .नाही म्हणू नका.”अशा प्रकारे  देवा पुढचे प्रसादाचे तांदूळ आणून,भात  कधीतरी व्हायचा तिच्याकडे.   रोज जवळजवळ नाहीच  म्हंटल तरी चालेल.मला कसतरीच झाल. मोठ्या मुदीच्या वरण भातावर साजूक तुपाची धार रोज लागायची माझ्या मुलांना . पोट भरलं तर माजोऱ्या सारखी पानं उष्टावून पळायची मुलं खेळायला . आणि तिच्या मुलाला साधा मेतकूट भात पण मिळत नव्हता.फारच  अपूर्वाई वाटायची त्याला भाताची .. नवरात्राचे दिवस होते,. मी संकल्प केला.आणि  एका मंगळवारी  तिची घसघशित तांदुळाने ओटी भरली. ताज्या,घरगुती मेतकूटाचा डबा तिच्या हातात ठेवला. महिनाभर पुरतील असे आंबे मोहोर तांदूळ,मी तिच्या जीर्ण पदराच्या ओटीत घातले. ती रास बघून तिचे डोळे भरून आले. दोन मुठी  तांदूळ परत तिने माझ्या थाळीत टाकले.तिला थांबवत मी म्हणाले, “अगं अगं ! हे काय? परत काय देतेस ?” ठसठशित कुंकवाची ती सवाष्ण उत्तरली “नाही ताई ही प्रेमाची, बरकतीची परतफेड आहे. तुमचं प्रेमाचं वाण  नाकारून मी उतले नाही की मातले नाही.  अहो दुसऱ्याला दानधर्म देताना तुमची थाळी अशी रिकामी नसते ठेवायची. तुम्ही मला मुठी मुठी ने  धान्य दिलेत. तुमची थाळी रीती नको ठेवायला,म्हणून मी चिमटीभर परत केलं.  अन्नपूर्णेच्या मान असतो हा.डब्यात टाका हे तुमच्या.कायम बरकत  राहील,माझ्या वहिनी बायकडे.तिचं ते तत्त्वज्ञान ऐकून माझ्यातली वहिनी बाई अवाक झाली.आणि कौतुकाने तिला न्याहाळू लागली. एका हाताने घेतांना दुसऱ्या हाताने द्यावे. हे आयुष्याचे तत्वज्ञान त्या अशिक्षित बाईकडून मला समजलं. साधी असणारी ही माणसं  काहीतरी वेगळच ज्ञान आपल्याला सहज  जाता जाता देऊन जातात. त्याकरता त्यांना कुठल्याही शाळेत किंवा कॉलेजमध्ये जायची जरुरी नसते. आणि असे धडे घेतच संसाराच्या कॉलेजमध्ये ग्रॅज्युएट व्हायचं असतं. तेच खरं ग्रॅज्युएशन असं म्हणायला काय हरकत आहे ? तुम्हालाही पटतय ना हे!मनांत असलेली भक्ति,आणि  अगदी गात्रा गात्रातून भरभरून वहाणारी शक्ती घेऊन  ती, सावलीला विसावली. मिटल्या डोळयांपुढे सावळा विठ्ठल नाचत होता.” 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक  !” भाग – २ —लेखक : श्री पार्थ बावसकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

(२३ जुलै १८५६ – १ अगस्त १९२०)

☆ “इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक  !” भाग –२ —लेखक : श्री पार्थ बावसकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

(“आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस! अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा ! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक!”) – इथून पुढे 

धुवाँधार बरसणाऱ्या पावसामुळे लोक ओलेचिंब झाले होते. रस्त्यावर चिखल झाला होता. माणसांची पांढरी धोतरे चिखलाने माखून काळीठिक्कर पडली होती. मुंबईच्या पारशी व्यापाऱ्यांनी विशेष व्यवस्था म्हणून चंदनाची चिता तयार केली होती. त्यावर टिळकांचे कलेवर ठेवण्यात आले, तोच त्या समुद्रकिनाऱ्यावरील लोकसागराला अचानक भरती आली. साखळ्या तोडून लोक टिळकांच्या चितेकडे धावत सुटले.

लोकमान्यांना अग्निडाग दिला आणि एका मुसलमान तरुणाचा धीरच सुटला. लोकमान्य गेले, आता आपण तरी जगून काय करायचे, असे म्हणून त्याने हंबरडा फोडला आणि त्याने चितेमध्ये उडीच घेतली. तो होरपळला गडगडत बाहेर फेकला गेला. त्याला दवाखान्यात नेले, पण काही दिवसांनी तोही लोकमान्यांच्याच वाटेवर निघून गेला.

संध्याकाळचे ७ वाजले तरीही त्याची शुद्ध कुणाला नव्हती. टिळकांच्या महानिर्वाणाचे हे दृश्य ‘याचि डोळा’

अनुभवणारे नाना कुलकर्णी लिहितात, “आम्ही त्या रात्री १० वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पायावर उभेच होतो. अखेर शेवटचा घाला झाला. मन सुन्न झाले. हृदयात काय होत होते, हे सांगताही येईना. पावसाच्या धारा कोणत्या आणि अश्रूच्या धारा कोणत्या, हे समजेना, अग्निसंस्कार झाला, पण चौपाटीवरून पायच निघेना.”

जगभरातल्या अनेक वर्तमानपत्रांनी टिळकांना आदरांजली अर्पण केली. मृत्युलेख लिहिले, पण अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी लिहिलेला अग्रलेख त्यातला सर्वोत्तम. खरे तर टिळक जाण्यापूर्वी त्यांचे आणि टिळकांचे भांडण होते, तरीही टिळकांबद्दल असलेले अपार प्रेम संदेशकारांना अस्वस्थ करत होते. त्यांच्या लेखणीला शब्दांचा महापूर आला होता. या महापुरात ते फक्त टिळकांना शोधत होते आणि म्हणत होते,

” लोकमान्य, तुम्हाला आता कुठे पाहू? तुमची सावळी मूर्ती कुठे अवलोकन करू? तुम्हाला कुठे शोधू? तुम्हाला कुठे धुंडाळू? आमचा जीव तुमच्या जीवाशी गोठलेला होता. आमचा प्राण तुमच्या पंचप्राणांचा भाग होता. आमचे अस्तित्व तुमच्या अस्तित्वात गुरफटून गेले होते. आमचे जीवन तुमच्या जीवनात गुंतलेले होते. लोकमान्य! आता तुम्ही आम्हाला कुठे सापडाल? कुठे दिसाल? तुम्ही जात असताना आमच्या जीवनाला ओढणी लागलेली आहे. आमच्या प्राणांना क्लेष पडत आहेत. काट्याच्या जाळ्यावरून ज्याप्रमाणे रेशमी वस्त्राला फराफरा ओढावे, त्याप्रमाणे आमच्या हृदयाच्या चिरफाळ्या झालेल्या आहेत. लोकमान्य, आमचे प्राण तुमच्या स्वाधीन ! आमचे मन तुमच्या स्वाधीन ! आमचे जीवन तुमच्या स्वाधीन ! “

“ लोकमान्य, आम्ही, तुमचे तुम्ही आमचे आहात ! बोला, काय वाटेल ते सांगा, वाटेल ती आज्ञा करा, वाटेल तो हुकूम फर्मावा, आणि बोला, तुम्हाला कुठे शोधू? लोकमान्य, आम्ही तुम्हाला कुठे शोधू? आमचा वीर, हा आमचा हिरो, हा आमचा प्राण, हा आमचा लोकमान्य ! इतका सर्वव्यापी होता की, त्याने या महाराष्ट्रातील चर आणि अचर, सजीव आणि अजीव, सचेतन आणि अचेतन, इतकेच काय पण या महाराष्ट्रातील मानव, देव, किन्नर, विभूती या महाराष्ट्रातील साधू, संत, योगी, तपस्वी या महाराष्ट्रातील जल, स्थल, पाषाण, तरु, लता, उद्यान, पुरेपूर व्यापून टाकले होते. आमच्या लोकमान्या, लोकांच्या लोकमान्या, महाराष्ट्राच्या लोकमान्या, तुझ्याशिवाय जीवाला ओढणी का रे लागते। लोकमान्या, तुझ्याशिवाय जीव तुटतो रे।”

“ ४० वर्षांपर्यंत इथल्या जनतेला वेड लावणाऱ्या जादुगारा, लोकमान्या, यावेळी आम्हाला सोडून चाललास? जनतेच्या जनतानंदा या शोकसागरात आम्हाला लोटलेस? लोकांच्या प्रेमातील लोकमान्या, अश्रूच्या दर्यात आम्हाला टाकून दिलेस? देशबांधवांच्या कैवल्या, आम्हा सर्वांना विलाप करायला ठेवलेस? भारत देशाच्या कुलदीपक तिलका. आम्हास असाहय्य दीन, अनाथ केलेस? बोला, लोकमान्य बोला! राग टाकून बोला, पूर्वप्रेमाच्या सर्व स्मृतींनी बोला की, तुमच्या विरहावस्थेत या तुमच्या महाराष्ट्राने काळ कंठावा तरी कसा?…

कारण लोकमान्या, तू गेलास आज तुझ्याबरोबर महाराष्ट्राचा शिवाजी गेला आहे! तू गेलास, तुझ्याबरोबर महाराष्ट्राचा अर्जुन गेला आहे! लोकमान्य बाळ गंगाधर, तुम्ही गेलात ते तुमच्याबरोबर महाराष्ट्राची ज्ञानेश्वरी, महाराष्ट्राचे महाभारत, महाराष्ट्राचे रामायण, लुप्त होऊन गेलेले आहे! आम्ही हजारो प्राणी तुमच्या जागी नेण्यास योग्य होतो. पण, तुमचीच निवड करताना परमेश्वराने महाराष्ट्राचे कोणते हित पाहिले? “

त्या रात्री गर्दी ओसरल्यावर अनेकजण पुन्हा टिळकांच्या चितेजवळ गेले. त्यापैकी अनेकांनी टिळकांची ती राख एका पुडीत घेतली. ती पुडी हृदयाशी लावली. काहींनी चांदीच्या, सोन्याच्या डबीत तिला जन्मभर जपून ठेवले. टिळकांवर अंत्यसंस्कार जरी मुंबईत झाले, तरीसुद्धा पुढचे क्रियाकर्माचे संस्कार मात्र पुण्यातच पार पडले. १२ जुलै रोजी टिळक पुण्याहून मुंबईला निघाले होते, ते स्वतःच्या पायावर चालत. पण, आता ३ ऑगस्ट रोजी त्यांच्या अस्थी पुण्यात आणल्या जात होत्या स्पेशल ट्रेनने, फुलांच्या माळांनी सजवलेल्या चंदनाच्या पेटीत, एका चारचाकी रथात टिळकांच्या अस्थी पुण्यात आणल्या गेल्या.

केळकर लिहितात,

” जाताना ते आपल्या साडेतीन हात देहाने बाहेर पडले, पण येताना ते अंगुष्ठमात्र देहाने आले. जाताना त्यांनी अंगात नेहमीचा पोशाख घातला होता, येताना त्यांनी चिताभस्माचे रूप धारण केले होते. जाताना ते आपल्या पायांनी गेले, येताना ते एका वितभर चांदीच्या पेटीत निजून आपल्या परिचारकांच्या खांद्यावर बसून आले. जाताना त्यांचा सर्व ऐहिक व्याप त्यांच्या डोक्यात घोळत होता, येताना त्या सर्व व्यापांचा त्यांनी त्याग केलेला होता. जाताना ते वासनापूर्ण होते, येताना त्यांनी सर्व वासना टाकून दिल्या होत्या. जाताना ते लोकांविषयी बोलत होते, येताना त्यांनी स्वतः शाश्वत मौनव्रत स्वीकारले असून सर्व लोक मात्र त्यांच्याविषयी बोलत होते. जाता जाता त्यांनी टिळकपूर्ण असे पुणे सोडले, येताना त्यांनी टिळकशून्य अशा पुण्यात प्रवेश केला.”

ज्या दिवशी लोकमान्यांना तिलांजली देण्याचा विधी झाला, त्या दिवशी लोकमान्यांच्या पिंडाला कावळा लवकर स्पर्श करेना. पण, यात वेगळे काहीच नाही, असे म्हणत यावर अच्युत बळवंत लिहितात,

” टिळकांच्या पिंडाला स्पर्श कसा होणार? लोकमान्यांनी केलेल्या एवढ्या मोठ्या संकल्पात कोणकोणत्या इच्छा भरलेल्या होत्या? कोणकोणते बेत गूढ स्वरूपात होते? कोणकोणत्या योजना परत राहिलेल्या होत्या व कोणकोणत्या महत्त्वाकांक्षा अपुऱ्या राहिलेल्या होत्या, त्याचा शोध आता कसा लागणार? असा कोणता पराक्रमी पुरुष आहे की ज्याच्या सगळ्या इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील? श्री शिवाजी महाराजांच्या सर्व इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील काय? नर्मदातीरी वारलेल्या बाजीरावांच्या इच्छा परिपूर्ण झाल्या असतील का? सिकंदर किंवा पिटर दि ग्रेट इच्छा परिपूर्ण होऊन मेला असेल काय? आहो, पराक्रमी पुरुषांचे लक्षणच हे आहे की, त्यांच्या इच्छा कधीही पूर्ण झालेल्या नसतात. पराक्रमी लोकांच्या इच्छा भरधाव दौडीने धावत असल्याकारणाने त्या इच्छा परिपूर्ण करणे, हे एका आयुष्याला अशक्यच आहे! एका आयुष्यात इच्छा परिपूर्ण होतील तो कदाचित शहाणा असेल, पण पराक्रमी कधीही असणार नाही. आपल्या राष्ट्राचे अपरिमित वैभव इच्छिणारे जे लोकमान्यांसारखे पराक्रमी पुरुष असतात, त्यांच्या इच्छा अपरिमित असणे हेच त्यांना भूषण! आणि इच्छा अपरिमित असल्या की त्याची तृप्ती कुठून होणार? लोकमान्यांच्या पिंडाला काकस्पर्श लवकर झाला नाही, तो याच कारणामुळे होय.”

” टिळकांवर लोकांचे खरे प्रेम असेल तर ‘लोकमान्य’ ही पदवी त्यांनी अनंत काळापर्यंत अनन्यसामान्यच ठेवली पाहिजे. ‘लोकमान्य’ या शब्दाने यापुढील हिंदुस्तानच्या इतिहासात कोणाही कितीही मोठ्या व्यक्तीचा उल्लेख होता कामा नये.” 

केळकरांनी ही अपेक्षा व्यक्त करून १०० वर्ष झाले. टिळक जाऊन १०० वर्ष झाले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केलेली ती सिंहगर्जना त्यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने पुन्हा एकवार आठवावी, आळवावी या हेतूने केलेले हे टिळकांच्या सिंहगर्जनेचे सिंहावलोकन !

लोकमान्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक हे समीकरण इथून पुढेही जोवर मराठी भाषा जिवंत असेल, तोवर टिकून राहो, लोकमान्यांच्या विचारांना कृतिशीलतेची पावले लाभोत आणि टिळकांचे विचार चिरंजीव होवोत, या चिमण्या प्रार्थनेसह ‘सिंहगर्जनेचे सिंहावलोकन’ इथेच पुरे करतो… 

– समाप्त –

लेखक : श्री पार्थ बावसकर 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares