मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तुळस माझी भाग्याची —” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “तुळस माझी भाग्याची —…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

सखु बरोबर वारीला पंढरपूरला जायची तुळशीबाईची तयारी सुरू झाली होती .

पितळेचे तुळशी वृंदावन लख्ख  घासून घेतलं.  हळदीकुंकू वाहून पूजा केली. हार, फुलं घातली.

 “बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल 

श्री ज्ञानदेव तुकाराम 

पंढरीनाथ महाराज की जय “

अस म्हणून सखुनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेतल.

 हा सोहळा बागेतली सगळी झाडं कौतुकानी बघत होती.

” किती ग भाग्यवान दरवर्षी वारी घडते तुला “.

” ये गं बाई जाऊन…”

” विठुरायाला रुक्मिणी मातेला आमचा नमस्कार सांग”

असं म्हणून सगळ्या झाडांनी तिला हात जोडले. 

” मी कुठली जाते ….सखुबाई दिवसभर मला डोक्यावर घेते म्हणून घडत बघा.येते आता…असं म्हणत  निरोप घेऊन तुळशीबाई निघाली वारीला….

खरंच तिला मनातून फार आनंद व्हायचा .ती या दिवसाची वाट पाहत असायची .दिंडीत चालताना चिपळ्यांचा, टाळांचा, विणेचा नाद ऐकू यायचा…

अभंग ,गौळणी, हरिपाठ,ओव्या कानी पडायच्या.

साध्याभोळ्या फुगड्या खेळणाऱ्या बाया बघून तिला समाधान वाटायचं .आनंदाने ती हरखुन जायची.वरूणराजा बरसायचा..ते पाणी अंगावर पडलं की तिला कृतार्थ झालो अस वाटायच.

दिंडीत चालताना शेजारच्या बाईच्या डोक्यावर पांडुरंग रुक्मिणी होती. तेव्हा तर तिच्या रुक्मिणी मातेबरोबर गप्पा झाल्या होत्या….

त्या दिवशी दिवसभर ती आनंदात होती .

सुरेखसा मोठा हार गळ्यात पडायचा. त्याच ओझ सखुबाईला वाटायचं नाही. ती कौतुकाने तिच्याकडे बघायची. तुळशी बाईच्या डोळ्यातून दोन टिपं गळायची….

” किती प्रेम करतेस ग “..म्हणून सखूची आलाबला घ्यावी असं तिला वाटायचं.

मुक्कामी पोचल्यावर खाली ठेवलं तरी येता जाता वारकरी श्रद्धेनी वाकून नमस्कार करायचे. त्यांच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळा बघून तिला संतोष वाटायचा.

लांबवर पालख्या दिसायच्या….

तो अनुपम  सोहळा किती बघु आणि किती नको अस तीला  वाटायच….. आपल्या भाग्याचा  तीला साक्षात्कार व्हायचा. बाया जाता जाता म्हणत असलेलं  कानी पडायचं.

 “तुळसा बाईचा हिरवा हिरवा पाला

 कसा बाई तिनी गोविंद वश केला”

 तेव्हा  डोळ्यासमोर श्रीकृष्णाच मोहक रूप  दिसायच…

वारी पंढरपूरला चालली आहे …तुळशी बाईला डोक्यावर घेऊन निघालेल्या बाया बापड्यांचे मला अपार कौतुक वाटतं.

 त्यांना माझा साष्टांग दंडवत.

त्यांच्यासाठी देवाला हात जोडून  विनवते…

“वारीत वाहता तुम्ही डोक्यावर तुळस…

 म्हणूनच दिसतो तुम्हा विठुरायाचा कळस…

 रुक्मिणी मातेला करते नवस…

 सुखी ठेव माझ्या या आया बहिणीस…

 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रत्येकाची “ अनंत चतुर्दशी”… लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

??

☆ प्रत्येकाची “ अनंत चतुर्दशी”लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

तुटपुंज्या पगारात पै पै बाजूला काढून गणपतीला गावाला नेणारे वडील आठवतात, जिच्या चपलेचा सोडल्यास इतर कुठलाही कुरकुर आवाज न करणारी आई आठवते, पहाटेच्या अंधारात वडिलांची विहिरीवरची आंघोळ, ते मंत्रपठण आठवतं, आईच्या आवरून घेण्यासाठीच्या हाका आणि आजीनी गोधडी बाजूला करून गालावरून फिरवलेला खरबरीत हात आठवतो, ‘झोपलाय तर झोपू दे गं, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता कळत नाही, अंग दुखत असेल, मुंबैहून यष्टीनी यायचं म्हणजे खायचं काम नाहीये, आरत्या व्हायच्या वेळेस उठेल बरोब्बर आणि मेले सगळे एकदम उठले तर पाणी कशात तापवशील एवढ्या सगळ्यांसाठी’ असं म्हणायची.

मला कायम प्रश्न पडायचा, असल्या खरबरीत हातांनी एवढे सुंदर, मऊसूत, एकसारखे पांढरेशुभ्र मोदक ती कशी काय करते? 

तिला विचारलं तर ती धपाटा घालून म्हणाली होती, ‘रांडेच्या, माया लागते रे त्यासाठी मनात, पारीला चिकटून येते मग ती, पारी हातात फिरते ना तेंव्हा देवाचं म्हणते मी, चिरा सांधतो रे तो सगळ्या, नावं माझं मेलीचं होतं’. 

आता यातलं कुणीही नाही. काय एकेक आठवणी असतात बघा, आईचा मोदक फुटू नये म्हणून मी तिच्याजवळ बसून देवाचं म्हणायचो लहानपणी.

 वेडेपणा नुसता सगळा.   

काय एकातून एक आठवत जातं बघा. आरत्या झाल्यावर आजीला नमस्कार केला की ती दोन तीन मिनिटांचा आशीर्वाद पुटपुटायची.

आजोबा जानव्याची किल्ली दाखवून लपवलेल्या खाऊची, गमतींची लालूच दाखवायचे आणि खुणेने म्हणायचे, ‘ये इकडे, तिचं संपायचं नाही’. 

सात दिवस हा हा म्हणता सरायचे.

विसर्जनाला जाताना आजी आजोबा नि:शब्द रडायचे.

लहानपणी वाटायचं त्यात काय रडण्यासारखं आहे, आता कळतं.

आपलाही काळ आता सरत चाललाय, एक दिवस आपल्यावर हीच वेळ, असंच वाटत असावं का?

आजोबा गणपती उचलताना म्हणायचे, ‘पुढच्या वर्षी मी नसलो तरी चिंतामणी करेल हो तुझं सगळं नीट, पाठीवर हात असू दे तुझा सगळ्यांच्या’. 

मग सगळे भरल्या डोळ्यांनी पाय ओढत नदीकडे जायचे. लहानपणी कळायचं नाही एवढं पण तेंव्हाही नदीवरून परत येताना काहीतरी हरवल्यासारखं, विसरून आल्यासारखं वाटायचं. 

दुसऱ्या दिवशी निघताना आज्जी तोंडावरून हात फिरवायची आणि बोळक्या तोंडानी आवाज करत पापी घ्यायची. 

आमच्या निघायच्या वेळेला आजोबा उगाच लक्षात नसल्यासारखं अंगणात कामं करत रहायचे. आम्हांला सोडायला पुलावर यायचे गड्यासोबत आणि गाडी सुटली की नदीवरून परत चालल्यासारखे हळू हळू परत जायचे. 

घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांचं विसर्जन करून सुद्धा खूप काळ लोटलाय आता.

 त्यांच्यामागे जमेल तेवढा उत्सव केला. पण त्यात मन काही रमलं नाही एवढं खरं. 

आयुष्याचे सरळ सरळ दोन भाग पडले, एक त्यांच्यासह, एक त्यांच्याशिवाय. आता उकडीचा मोदक तोंडात जाताना आजीच्या, आईच्या खरबरीत हाताचा स्पर्श ओठाला व्हावा असं वाटून जातं.

आता तो कितीही चविष्ट असला तरी घशाखाली आवंढ्याची सोबत असल्याशिवाय जात नाही.

माझंही वय विसर्जनाच्या आसपासच आहे म्हणा आता.

पाटावर बसून मीही तयार आहे.

पण विसर्जनाची मिरवणूक बघितली की मला हसू येतं. 

देवाला सुद्धा नंबर लागल्याशिवाय विसर्जन सोहळा नाही तिथे माझ्यासारख्या सामान्याची काय कथा!  

प्रत्येकाची ‘अनंत चतुर्दशी’ ठरलेली आहे…. ”कधी”? एवढाच काय तो जीवघेणा प्रश्नं. 

चला, आता एकूणच सगळं घाईनी आवरायला हवंय नाहीतर विनायकराव उखडायचे उगाच. 

(जवळ आलेल्या चतुर्दशीला नजरेआड करून, नव्हे तिच्या आगमनाची चाहूल टाळून चतुर्थीचा आभास निर्माण करणाऱ्या, आणि स्वतः “अनंत” असल्याची दिशाभूल करून घेणाऱ्या माझ्या पिढीला समर्पित…) 

लेखक : जयंत विद्वांस

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जानुझ कोरझाक – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ जानुझ कोरझाक – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर  ☆

दर शिक्षक दिनाला मला पोलंडमधील जानुझ कोर्झाक या शिक्षकाची आठवण येते. शिक्षणतज्ज्ञ आणि बालमानशास्त्राचा अभ्यास असणारा कोर्झाक मुलांसाठी काम करायचा. आई वडील नसलेली १९२ ज्यू बालकांसाठी त्याने बालगृह काढले. त्या बालगृहात त्याने अनेक उपक्रम केले. तो मुलांना शिकवायचा.

जर्मनी ने पोलंडवर आक्रमण केले. 

त्या ज्यू मुले असलेल्या बालगृहाचा ताबा घेतला व ज्यू साठी असलेल्या छळ छावणीत मुलांना नेले. कोर्झाक ला तिथे न थांबण्याची सवलत दिली. पण माझी मुले जिथे राहतील तिथेच मी राहील अशी भूमिका त्याने घेतली. तिथे अतिशय हाल असूनही तो तिथेच राहिला. शेवटी गॅस चेंबर मध्ये त्या मुलांना पाठवण्याचा दिवस आला. कोर्झाक ने मुलांना नवे कपडे घालायला सांगितले. एका लहान मुलाला त्याने कडेवर घेतले व सर्वांच्या पुढे तो चालत राहिला. त्याला पुन्हा जर्मन सैनिकांनी तुम्ही पळून जा अशी सवलत दिली. यापूर्वीही अशी सूचना अनेकदा दिली. पण माझी मुले तुम्ही मारणार असाल तर मग मलाही मारा असे त्याने सांगितले आणि गॅस चेंबर मध्ये  त्याने मृत्यू पत्करला…

मुलांवर इतके प्रेम करणाऱ्या या शिक्षकाला शिक्षकदिनाच्या दिवशी सर्वांनी आठवायला हवे…….?

लेखक : हेरंब कुलकर्णी

प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “थोरात म्हणजे मराठा का ?…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “थोरात म्हणजे मराठा का ?” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

(हसून हसून रडायचे की रडून रडून हसायचे? हे तुमचं तुम्हीच ठरवा..) 

मित्राच्या गावच्या जत्रे साठी त्याच्या बरोबर त्याच्या गावाकडे गेलो होतो. जत्रा झाल्यावर दोन दिवस थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच दोघांनी त्याच्या शेतावर चक्कर टाकली.

साठी पार केलेला म्हातारा पलीकडच्या ऊसाच्या बांदावर ऊन खात थांबलेला. मित्राकडे पाव्हणे कोण कुठले चौकशी झाली.  पत्रकार होतो, पुस्तकं लिहितो वगैरे सांगितल्यावर त्याला माझ्या बद्दल आदर वाटला असावा. मला साहेब म्हणू लागला. कोरोना, भाजीपाला, महागाई, गुऱ्हाळाच्या आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर लांबवर पाहत त्यानं प्रश्न विचारलाच….. 

जातीचा प्रश्न म्हणजे आपला जिव्हाळ्याचा प्रश्न…. 

” थोरात म्हंजे म्हाराठाच न्हव ?” म्हाताऱ्याने विचारले.

तसा मी हसत हसत  म्हणालो, ‘नाय मराठा नाय आमी’

 तशा त्याच्या पांढऱ्या भुवया आकड्यात फिरल्या… म्हणाला, 

‘मग काय खालचेहेत का तुमी ?’ 

गालातल्या गालात हसत म्हणालो, 

‘हा, खालचे म्हणजे वडिल मांगाचे अन् आई मराठ्याची.’

 तशी त्यानी टोपी नीट केली. अन् विचार करत म्हणाला,

 ‘म्हंजी तुमी मांगाचेच झाले की. पण, दिसायला तर भामणासारखे दिसता.’ 

मी मान डुलवत म्हणालो, 

‘हा… माझी आज्जी भामणाची होती.’ 

तसा तो म्हातारा दोन सेकंदासाठी फ्रीज झाला. त्यानं तोंडात बोट घालत तंबाखुची गुळी बाहेर काढून फेकली. अन् म्हणाला, 

‘आज्जी बामणाची, बाप मांगाचा अन् आई मराठ्याची ? असं कसं ?’ 

तसं मी म्हणालो,

 ‘आजोबांनी पळवून नेऊन आज्जीशी लग्न केलं होतं’.

 तशी डोक्यावरची सरकलेली टोपी नीट करत तो म्हणाला,

 ‘मग आजोबा मांग होते का मराठा ?”

 मी म्हणालो,

 “नाय नाय आजोबा तर रामोशी होते. दरोडे टाकायचे.” 

तसा वैतागत तो म्हणाला,

 “आरं बाबा, तुझे आजोबा जर रामोशी होते तर तुझे वडील मांग कशे झाले ?” 

मी म्हणालो, 

“अहो आजोबा म्हणजे आईचे वडील रामोशी होते. माझ्या वडलांचे वडील तर लव्हार होते.” 

तसा त्याचा पारा सटकला. वैतागत म्हणाला, 

“आरं गयबाण्या तुझा आजोबा लव्हार होता तर तुझा बाप मांगाचा कसा झाला ?”

 हसू लपवत म्हणालो, 

“अहो म्हणजे आजोबानी दोन लग्न केलती. त्यांची एक बायको माळयाची अन् दुसरी बायको मांगाची होती. माझे वडील मांगाच्या बाईच्या पोटी जन्माला आलते ना.” 

तसा डोकं खाजवत तो म्हणाला,

 “आय घातली, कसला गुतूडा करुन ठेवलाय रं ? पण मला एक सांग, तुझ्या आईची आई बामण अन् तिचा बाप रामोशी होता तर तुझी आई मराठ्याची कशी झाली ?”

मी म्हणालो, 

“माझ्या आज्जीला लेकरु होत नव्हतं म्हणून आईला मराठ्याच्या घरातून दत्तक घेतलं होतं.”

म्हाताऱ्याने कसं कोण जाणे शांतपणे ऐकलं अन् म्हणाला,

 “का ? त्या मराठ्यांनी दत्तक कसकाय दिलं पोरीला ?”

 तसं मी दीर्घ उसासा घेत म्हणालो,

 “आवं माझ्या आईची खरी आई धनगराची होती.”

तसं ते म्हातारं रागानं पाहत खेकसलं,

 “अय निघ हितून भाडकाव. डोक्याची पार आयमाय करुन टाकली यड्या …..नी. कशाचा कशाला मेळ लागाना.  कुणाच्या घरात कोण गेलंय अन् कोण कोणाचा बायला अन् कोण कोणाची बायली कायबी समजना.” 

हसलात, की रडलात, का हसून हसून रडलात.

संकल्पना नाही संकल्प करा.  जाती विरहीत भारतीय समाज निर्मिती हीच काळाची गरज! 

जातीपाती विसरून जाऊ…

भारतीय म्हणून एक होऊ !!

*आज देशाला कॅशलेस बरोबरच, “कास्टलेस” इंडिया ची गरज आहे.. 

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हम बोलेगा ईमोजी बेहेतर बोलता है ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

हम बोलेगा ईमोजी बेहेतर बोलता है ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

काय मंडळी खरे आहे ना? माझा तरी अनुभव तसाच आहे. अपना हाल एक ईमोजी सबको बिना बोले बताता है| तर झाले असे,माझी मैत्रीण ( जी सतत ईमोजी मधून बोलत असते ) तिची चूक नाही बरं का.एकदा ती आजारी होती. बरे सांगावे कसे ?ग्रुप वर मेसेज केला तर कोणी विचारपूस करेना मग तिने 🤕 ईमोजी स्टेटसला.आणि घोळच झाला.सगळ्यांना वाटले तिला अपघात झाला किंवा डोके दुखत आहे.मग तशी चौकशी सुरू झाली.आणि सर्दी झाली आहे सांगता सांगता खरेच डोके दुखी झाली.पण इतक्या चौकशा झाल्या म्हंटल्यावर स्वारी ईमोजी माय झाली की.

हे ईमोजी महत्व माझ्या काही डोक्यात बसेना.तरी पण बघू प्रयत्न करून म्हणून तिच्या पावलावर पाऊल प्रमाणे ईमोजी वर ईमोजी ठेवून मी पण ईमोजी धर की टाक करते आणि हसे करून घेते.काय होते कोणी काही म्हंटले की पोस्ट आवडली की मी कोणताही भेद न करता ( स्त्री पुरुष ) दिलून टाकते.सांगायचे इतकेच असते,पोस्ट आवडली.आणि छान वाटले.पण त्यातून नसती आफत ओढवते ना.🫢 आणि काय चुकले कळतच नाही.🤦🏻‍♀️

मग एक समजले ईमोजी जसे शब्दा वाचून बोलतात तसे चुकीचे ईमोजी फार धोकादायक 🫣.एकदा अतीच फजिती केली ना या ईमोजी रावांनी.एकदा गृपवर कोणासाठी तरी श्रद्धांजली अर्पण केली होती.मी पण घाई घाई 😢 हे पोस्टवून टाकले.खूप सारे रिप्लाय आले होते त्यात सर्वांनी माझी चांगलीच खिल्ली उडविली होती.मग लक्षात आले रडक्या 🥲 ईमोजी ऐवजी चुकून 😂 हे साहेब तेथे घाई घाई गेले होते.😭

खरी गंमत येते 🥰😘 💞  हे ईमोजी राव पोस्टल्यावर.प्रेमात बुडालेला 🥰 हा जास्तच डेंजर.😘 (लाल टेंगुळ – एका मैत्रिणीने याचे केलेले नामकरण ) हा लहान मुलांना चालेल,मैत्रिणीला चालेल.पण नको तिथे घाईने/चुकीने गेला तर? जिथे गेला तिथे 🕺🏻आनंदी आनंद.आणि आपली कोंडी. आणि 🥰 (तीन टेंगळे – कोणाला तरी खरीच 🤕 आणेल) हे म्हणजे एकदम चाटून पुसून काम.🫢🤫

हे सोपे कसले हे तर माझ्या सामान्य किंवा बाळ बुध्दीला एकदम अवघड 😇 काम.बरे कतीही काळजी घेतली किंवा उसनी हुशारी आणली तरी ही भाषा काही जमत नाही. कारण भलभलते  गैरअर्थ काढण्यात समोरचे पटाईत (अगदी आपली चूक असली तरी 🙆🏻‍♀️).मग काय 🤦🏻‍♀️पुन्हा चूक आपलीच असल्याचे पुरावे सादर केले जातात.👊🏻

आणि हो हे झुके भाऊ कधी बदल करतील सांगता येत नाही.डोळे झाकून ईमोजी घाई घाई पोस्टावा तर तिथे वेगळाच अपरिचित (अर्थ न कळलेला) ईमोजी राव येऊन बसलेला असतो.आणि आपल्याला फजितून टाकतो.

असे अनुभव जमा करत करत ईमोजीराव पोस्टताना फार काळजी घेते पण तरीही भिक नको पण कुत्रे आवर या प्रमाणे कोणीतरी म्हणतेच, टाईप कर फोन कर पण ईमोजी आवर मग मी जास्तच दक्षता घेते.अगदी गुगल बाबां कडून सगळी माहिती घेते.अर्थ समजून घेते.पण काहीतरी घोळ होतोच आणि शिंगरू मेलं हेलपाट्याने या प्रमाणे मी मरते हे चुकीचे इमुंचे (लाडा चे नाव हो) अर्थ किंवा अनर्थ निस्तरताना.

कदाचित हे चुकीने टाकलेले किंवा घाईने पोस्टलेले मेसेज यातून गैरसमज किंवा गैरअर्थ निघू नयेत या साठीच एडिट किंवा डिलीट चे रबर दिले असावे. व माझ्या सारख्या चुकून पोस्टणाऱ्या लोकांची सोय केली असावी.

पण मी दमून जाते हो हे निस्तरताना.आणि ठरवते काही 🙃🙂 उलट सुलट होण्या पेक्षा 🤫 चूप बसावे.

आता हे शेपूट फारच लांबत चालले.तर सांगायचे इतुकेच की शब्दावाचून बोलणारे ईमोजी चुकले तर शब्दांच्या पलीकडले अनर्थ करतात.त्या मुळे हे भाऊ नीट अर्थ समजल्या बिगर पोस्टू नयेत.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टूडे)

आमचे घर एक मजली होते. ढग्यांचं घर अशी त्या घराला ओळख होती. 

ज. ना. ढगे म्हणजेच जनार्दन नारायण ढगे

उत्तम शिक्षक, प्रसिद्ध लेखक,साहित्यप्रेमी, तत्त्वचिंतक,(फिलॉसॉफर),संत वाङमयाचे गाढे अभ्यासक,प्रवचनकार,व्याख्याते आणि एक यशस्वी बिझनेसमन अशी त्यांची विविध क्षेत्रातील ओळख होती. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची म्हणजेच माझ्या वडिलांविषयी मी लिहीनच पण तत्पूर्वी माझं लहानपण ज्या घरात गेलं, ते घर, परिसर आणि तिथलं वातावरण आणि त्यातून झालेली आयुष्याची मिळकत हीही माझ्यासाठी खूप मोलाची आहे.

आठवणी खूपच आहेत. मनाच्या कॅनव्हासवर अनेक रेघारेघोट्यांचं जाळं चित्रित झालेलं आहे आणि आजही जेव्हा जेव्हा मन उघडं होतं तेव्हा तेव्हा या चित्रांचं पुन्हा एकदा सुरेख प्रदर्शन  मनात मांडलं जातं.

घराच्या खालच्या मजल्यावर दोन दोन खोल्यांचे स्वतंत्र असे खण होते. हल्लीच्या शब्दात म्हणायचे तर ब्लॉक्स होते. फ्लॅट्स हा शब्द या घरांसाठी उचित नाही.  फ्लॅट म्हटलं की एक निराळी संस्कृती, निराळे आकार, निराळी रचना, संपूर्णपणे वेगळीच जीवन पद्धती नकळतच उभी रहाते. फार तर दोन दोन खोल्यांची ती स्वतंत्र घरे होती असं म्हणूया आणि त्यात गद्रे आणि मोहिले हे आमचे दोन भाडोत्री रहात होते. वाचकहो!  भाडोत्री हा शब्दही मला आवडत नाही.  भाडोत्री या शब्दात दडलाय एक तुच्छपणा, काहीसा उपहास अगदीच टाकाऊ आणि नकारात्मक शब्द आहे हा असे मला वाटते. “ ते आमचे भाडोत्री आहेत.” असं म्हणणारा मला उगीचच गर्विष्ठ वाटतो.  कुठेतरी अहंकाराचा  दर्प तिथे येतो. अशावेळी खरोखरच मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान असला तरीही टेनन्ट हा शब्द भावना न दुखावणारा वाटतो. असो. सांगायचं होतं ते इतकंच की त्या खालच्या मजल्यावरच्या दोन स्वतंत्र घरात गद्रे आणि मोहिले यांचे परिवार भाड्याने राहत होते.  महिन्याला पाच रुपये असे भरभक्कम भाडे!  दोन्ही घरांना मागचं दार होतं आणि तिथेच एक मोरी होती. ती त्या दोघांकरिता सामायिक होती. कपडे धुण्यासाठी  एक घडवलेला काळा चौकोनी दगड आणि पाण्यासाठी नळही होता आणि मोरीच्या एका बाजूला कॉमन टॉयलेटही होतं.संडास म्हणण्यापेक्षा टॉयलेट बरं वाटतं.शिवाय त्यावेळी फ्लश नसायचे पण त्या काळात भाड्याने राहण्यासाठी ज्या सोयी सुविधा अपेक्षित होत्या त्या सर्व या घरांसाठी होत्या असं म्हणायला हरकत नाही आणि अशा या घरामध्ये हे दोन परिवार सुखाने राहत होते.

गद्रे होते ब्राह्मण आणि मोहिले होते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू.  गद्रे कट्टर कोकणस्थ  आणि मोहिले पक्के मांस मच्छी खाणारे. मोहिलेंच्या ताईंनी बोंबील तळले की गद्रे वहिनी मागचं दार धाडकन जरा जोरातच आपटून लावायच्या आणि दार आपटल्याचा आवाज आला की माझी आजी वरून गद्रे वहिनींवर रागवायची,” अहो दारं आपटू नका. दार मोडलं ना तर स्वतःच्या खर्चाने नवे दार बसवावे लागेल हे लक्षात ठेवा.”

अखेर  आम्ही घरमालक होतो ना?

पण अशा थोड्याफारच धुसफुसी होत्या बाकी सारी गोडी गुलाबी होती. गद्रे वहिनी त्यांच्या कोकणस्थित माहेराहून येताना फणस घेऊन यायच्या आणि त्याचे गोड,रसाळ गरे सगळ्या गल्लीत वाटायच्या.

पाऊस पडला की पहिल्या आठवड्यात शेवळं ही रानभाजी ठाण्यात मिळायची. अजूनही मिळते. या शेवळाची भाजी अथवा कणी मोहिले ताईंनी केली की त्या वाटीभर घरोघरी पाठवायच्या. वेगळ्या चवीची रुचकर भाजी आणि खूप मेहनतीची पण लहानपणी खाल्लेल्या या रानभाजीची चव आजही माझ्या रसानेवर तशीच्या तशी आहे.  ही अत्यंत गुंतागुंतीची आणि मेहनतीची भाजी करण्याच्या भानगडीत मी कधीच पडले नाही कारण माझ्या डोळ्यासमोर याही भाजीचा एक इतिहासच आहे.

माझे वडील यास्तव खास सायकलवरुन बाजारात जाऊन टोपलीभर शेवळं घेऊन यायचे. बाजारात, ती पाऊस पडल्यावर एक दोनदाच मिळते म्हणून ही बेगमी करून ठेवायची. या भाजीची निवडून साफसफाई माझी आजी अत्यंत मन लावून करायची. ती शास्त्रशुद्ध  चिरून भर तेलात तळून ठेवायची आणि अशी ही चिरलेली तळून ठेवलेल्या शेवळाची भाजी निदान चार-पाच वेळा तरी वेगवेगळ्या प्रकाराने घरात शिजायची. या कामासाठी वडील,आई आणि आजी अत्यंत झटायचे आणि आम्ही ती चाटून पुसून खायचो. त्यावेळी खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी रेफ्रीजरेटर ही संकल्पना इतकी प्रचलित नव्हती. आणि अभावानेच पण ज्यांच्याकडे असायचा त्या ठाण्यातल्या धनवान व्यक्ती होत्या. आणि त्यांची घरे अथवा बंगले जांभळीनाका,नौपाडा,घंटाळी अशा उच्चस्तर वस्तीत असायचे. त्यांचा क्लासच वेगळा होता.   

मात्र अशी ही पारंपरिक आणि गुंतागुंतीची, प्रचंड मेहनतीची शेवळाची भाजी आजही माझी ताई आणि धाकटी बहीण निशा तीच परंपरा सांभाळत तितकीच चविष्ट बनवतात आणि तुम्हाला खरं वाटणार नाही पण आजही मी केवळ ती भाजी खाण्यासाठी पुण्याहून ठाण्याला बहिणीकडे जाते कारण शेवळाची भाजी हा माझ्यासाठी केवळ खाद्यपदार्थच नव्हे तर या चवीभोवती माझ्या बालपणीच्या रम्य आणि खमंग आठवणी आहेत.हे व्यावहारिक नसेल पण भावनिक आहे.आजही शेवळाची भाजी खाणं हा एक सामुहिक आनंद सोहळा आहे.

तर गद्रे आणि मोहिले याविषयी आपण बोलत होतो. 

मोहिल्यांची चारू ही माझी अतिशय जिवलग मैत्रीण. तिचे भाऊ शरद, अरुण शेखर हेही मित्रच होते. शेखर तसा खूप लहान होता आणि तो माझी धाकटी बहिण छुंदा हिचा अत्यंत आवडता मित्र होता याविषयीचा एक गंमतीदार किस्साही आहे. तोही आपण या माझ्या जीवन प्रवासात वाचणार आहोतच.

चारुच्या  वडिलांना भाई आणि आईला ताई असेच सारेजण म्हणायचे. भाई हे अत्यंत श्रद्धाळू आणि धार्मिक होते. साईबाबांवर त्यांची नितांत श्रद्धा आणि भक्ती होती.  ते कोणत्यातरी सरकारी कार्यालयात नोकरीला होते. पगार बेताचाच पण तरी चार मुलांचा प्रपंच ते नेटाने सांभाळत होते.  त्या वयात आम्हा मुलांना त्यांच्या प्रापंचिक समस्या जाणवत नव्हत्या. कधीतरी ताई आणि भाईंची झालेली भांडणं, शब्दांची आणि  भांड्यांची आदळआपट ऐकू यायची त्यावेळी चारू आमच्याकडे किंवा समोरच्या मुल्हेररकरांकडे जाऊन बसायची. गल्लीतली आम्ही सगळीच मुलं अशावेळी एकत्र असायचो. कधी ना कधी हे प्रत्येकाच्या घरी घडायचं आणि त्यावेळी नकळतच आम्ही सारी अजाण,भयभीत झालेली  मुलं अगदी जाणतेपणाने एकमेकांसाठी मानसिक आधार बनायचो.

भांडण मिटायचंच. तो एक तात्पुरताच भडका असायचा.  नंतर ताई निवांतपणे घराच्या पायरीवर येऊन बसायच्या आणि भाई जोरजोरात टाळ्या वाजवत साईबाबांची आरती म्हणायचे

 ।।माझा निजद्रव्य ठेवा 

     तुम्हा चरण रजसेवा 

     मागणे हेचि आता

     तुम्हा देवाधिदेवा।।

आजही ही आरती म्हणताना माझ्या डोळ्यासमोर सहजपणे टाळ्या वाजवणारे भाई येतात.

गल्लीत अण्णा गद्रे आणि गद्रे वहिनी हे जोडपंही  तिथल्या संस्कृतीत सामावलेलं होतं. अण्णांचा दूधाचा व्यवसाय होता. मला आता नक्की आठवत नाही पण त्यांचा आणखी काही जोडधंदाही  होता. अण्णांची मिळकत चांगली होती, काही जण गमतीने अण्णांवर टीका करीत. “गद्र्यांचा काय पाण्याचा पैसा”

दुधात पाणी घालून ते विकायचे म्हणून हा प्रहार असायचा.

वहिनी ही गोऱ्यापान, गुबगुबीत आणि हिरवट घारे डोळे असलेल्या एकदम टिपिकल कोब्रा महिला आणि घट्ट काष्ट्याचे लुगडं नेसलेल्या, ठुमकत चालणाऱ्या आणि आपण कोकणस्थ ब्राह्मण असल्याचा एक गर्व चेहऱ्यावर घेऊन वावरणाऱ्या वहिनी मला आजही आठवतात.  त्यांच्या हातच्या ताकाची चव मी कधीही विसरू शकणार नाही. पण त्यांच्याविषयी आता जेव्हा माझ्या मनात विचार येतो तेव्हा तीव्रतेने एक सलही बोचतो. या गद्रे दांपत्यांना लागोपाठ तीन मुली झालेल्या होत्या.

विजू, लता, रेखा. आम्ही साऱ्या अगदी गाढ  मैत्रिणीच होतो. या तिघींना आण्णांचा अतिशय धाक होता.अण्णांचं  मुलींवर प्रेम नव्हतंच असं काही मी म्हणू शकत नाही पण एक मात्र खरं की त्यांना मुलगा हा हवाच होता. मुली झाल्या म्हणून ते नेहमी दुःखीच असायचे. रेखाच्या पाठीवरही त्यांना एक दोन कन्यारत्नं झाली पण ती काळाने हिरावून नेली. त्यांना मूठमाती देऊन अण्णा जेव्हा घरी येत आणि  डोक्यावरून आंघोळ करत तेव्हा त्यांना कुठेतरी सुटल्याची भावना वाटत असावी. वहिनी काही काळ मुसमुसत कदाचित त्यांच्या मातृत्वाला झालेली जखम थोडी भळभळायची. गल्लीतली मंडळी मात्र म्हणायची “मुलगी जन्माला आली आणि अण्णांनी तिला अफू पाजली”

हे खूप भयंकर होतं पण त्यावेळी याचा अर्थ कळायचा नाही. खरं की खोटं हे ही माहीत नव्हतं पण या सगळ्यांमागे मुलीच्या जन्माचं दुःख होतं हे निश्चित आणि ते मात्र प्रखरतेने जाणवायचं,बोचायचं,प्रश्नांकित करायचं.

अखेर या दांपत्यास एक मुलगा झाला. त्याचे दणक्यात बारसेही झाले. गल्लीत अण्णांनी केशरयुक्त पेढे मन मुराद वाटले. आनंदी आनंद साजरा केला त्या मुलाचे नाव ठेवले मोरेश्वर आणि गल्लीत तो झाला सगळ्यांचा मोरया कधी मोरू, कधी मोर्‍या.

आणि अशा पार्श्वभूमीवर आम्ही पाच बहिणी होतो आणि माझी आजी अभिमानाने म्हणायची “माझ्या पाच नाती म्हणजे माझे पाच पांडव आहेत.”

 – क्रमशः भाग २. 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कापडं वारकऱ्यांची…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “कापडं वारकऱ्यांची…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

वारीचं कुतूहल काही केल्या उलगडतच नाही .प्रत्येक गोष्टीच कौतुक वाटत राहतं .

मला तर ह्या वारकऱ्यांच्या पांढऱ्या कपड्याचा पण वाटतं ….

त्याविषयी  विचारावं असं वाटलं. वारीला गेले होते तेव्हा त्यांच्याशी संवाद साधला .त्यातल्या काही जणांनी जे सांगितलं ते तुम्ही वाचा.

“आम्ही हे कपडे फक्त वारीलाच घालतो इतर वेळेस नाही”

“मला माझी बहीण घेऊन देते. तिच्या घरचं खटलं खूप मोठं आहे. तिला वारीला यायला कधीच जमत नाही. म्हणते…. तुला तरी कपडे घेते रे ….”

“माझी आई माझ्यासाठी शिवते. मशीन काम येत तिला.बघा ना “

असं म्हणून दादांनी उभे राहून पायजमा शर्ट  दाखवला मला…

“हा बघा  सोपाना  याचा भाऊ याचं लय  लाडकोड करतोय.. तोच देतो याला  नवीन कापडं  घेऊन”

“माझी बायको अंगणवाडीत शिक्षिका आहे. आमच्या गावी चांगली कापडं भेटत नाहीत. बायको तालुक्याला जाऊन माझ्यासाठी  घेऊन येते.”

एक एक जण सांगत होते. मी ऐकत होते. एकानी तर सांगितले की …

वारकऱ्यांनी वारीत घातलेले हे कपडे दुसरे लोक आनंदाने मागून नेतात .कौतुकाने घालतात ….

हे ऐकून तर माझं डोळे भरून आले. किती निर्मळ श्रद्धा …त्या कपड्याचं पण अप्रूप असाव… 

किती भक्तीभाव… आपली संस्कृती किती संवेदनशील आहे याचीच यातून आपल्याला प्रचिती येते.

लोकांना वारकऱ्यांच्या साध्या कपड्यातून सुद्धा विठ्ठलाशी जवळीक साधावीशी वाटते..

वारीला निघालेल्या आया बहिणी शेजारीच बसल्या होत्या. त्यांच्याकडे बघितलं सगळ्या जणींचे साधेसुधे कपडे होते. त्या आमचं बोलणं ऐकत होत्या. एकजण म्हणाली 

“पुरुषांची गोष्ट वेगळी असते. त्यांना पाहिजेतच तशी कापडं… आमच्या बायकांचं काय हो ….वारीत यायला मिळालं याचाच आम्हाला आनंद होतो बघा …..इथं आमची कापडं कोण बघतंय?”..

 शांत संयमीत  आवाजात त्या बोलत होत्या. खऱ्याखुऱ्या वारकरणी होत्या.  देहभान विसरून जातात या बायका……

 श्रद्धा ,भक्ती आणि विठूरायावरचं अढळ प्रेम त्यांना चालण्याच बळ देतं.

 त्यांच्या कपड्याकडे लक्ष जाण्यापेक्षा त्यांच्या आतल्या निर्मळ अंतःकरणाचे दर्शन मला झालं .

विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती डोक्यावर घेऊन ती उभी राहिली.

” कसं चालता हो इतकी जड मूर्ती डोक्यावर घेऊन ?मी विचारल

ती पटकन म्हणाली

” देवाचं कुठं ओझं असतय का?

 वारी काय काय शिकवते ना आपल्याला…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डार्क वेब : भाग – 8 ☆ श्री मिलिंद जोशी ☆

श्री मिलिंद जोशी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ डार्क वेब : भाग – 8 ☆ श्री मिलिंद जोशी ☆ 

मागील काही भागातून आपण डार्कवेब बद्दल माहिती घेत आहोत. त्यात आपण याचा वापर कोण करते? सरकारचे त्यावर नियंत्रण का नाही तसेच डार्कवेबचा वापर करणे कायद्याने प्रतिबंधित आहे का याचा मागोवा घेतला. आज आपण त्यातीलच एक गोष्ट बघणार आहोत. 

‘रेड रूम’

डार्कवेबचा विषय निघाला आणि रेडरूम बद्दल चर्चा झाली नाही असे सहसा होत नाही. ज्यांना डार्कवेब ही गोष्ट माहिती आहे त्यांना रेडरूम हेही माहित असते. अनेकदा तर लोकांना आधी रेडरूम बद्दल माहिती मिळते आणि नंतर त्याबद्दल जास्त माहिती घेताना डार्कवेब बद्दल माहिती मिळते. 

सर्वप्रथम ही ‘रेडरूम’ काय भानगड आहे ते पाहू. होय… भानगडच. कारण रेडरूम बद्दल तुम्हाला जी माहिती मिळेल त्यानुसार, रेडरूम म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीवर अत्याचार केले जातात किंवा त्याची हत्या केली जाते आणि ती घटना अनेक जण मनोरंजन म्हणून बघतात. थोडक्यात WWE मध्ये असते ना, दोन, चार जण एकमेकांना हातात येईल त्या गोष्टीने बदडतात आणि लोकांना ते बघण्यात आनंद वाटतो. इथे फक्त दोन गोष्टी बदलतात. पहिली गोष्ट म्हणजे इथे ज्या व्यक्तीवर अत्याचार केले जातात ती व्यक्ती सहन करण्याशिवाय काहीच करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे प्रेक्षक आपल्या घरी डार्कवेब इंटरनेटचा वापर करून आपल्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर हे सगळे बघू शकतात. या साठी ते दिलेल्या लिंकवर बीटकॉईन किंवा इतर एखाद्या डिजिटल करन्सीच्या रुपात पेमेंट करतात.

काही वेळेस तर असेही सांगितले जाते की यात तुम्ही दोन पध्दतीने भाग घेऊ शकतात. एक म्हणजे प्रेक्षक म्हणून. आणि दुसरे म्हणजे कोणत्या पद्धतीचा अत्याचार करायचा हे सांगून. हे सगळे लाइव्ह घडत असते, आणि हे बघण्यासाठी लोक हजारो / लाखो रुपये खर्च करतात. 

आता कुणाला असे वाटेल की एखाद्या निर्बल माणसावर अत्याचार करण्यात किंवा पाहण्यात कुणाला काय मजा येत असेल? आणि त्यासाठी कुणी हजारो, लाखो रुपये कुणाला का देतील? हाच विचार माझ्याही मनात आला होता. पण डार्कवेबवर अशा लिंक दिसतात हे मात्र खरे आहे. 

तुम्हाला आता रेडरूम म्हणजे काय हे थोडक्यात माहिती झाले असेल. आता याच्या पुढील प्रश्न. हे खरंच अस्तित्वात आहे का?

माझ्या मते अशा कोणत्याही रेडरूम डार्कवेबवर अस्तित्वात असणे जवळपास अशक्य आहे. का? कारण डार्कवेबचे काम करण्याची पद्धत. याआधीच्या भागात आपण पाहिले आहे की डार्कवेब क्लाइंट आणि सर्व्हर याची ओळख पटणे अवघड व्हावे यासाठी मास्किंग करत असते. त्यातून काही जण VPN चाही वापर करतात. त्यानुसार data अनेक वेगवेगळ्या आयपीवर पाठवला जातो. अशा अनेक ठिकाणाहून फिरत तो क्लाइंट पर्यंत पोहोचतो. इंटरनेटचा स्पीड लक्षात घेता अशा ठिकाणी लाइव्ह स्ट्रीमिंग कितपत शक्य आहे? म्हणजे टेक्निकली हे शक्य वाटत नाही. मग यात शक्यता कोणती असेल? तिथे एखादी लिंक देऊन झूम किंवा गुगलमिट सारख्या ठिकाणी सहभागी करून घेणे. पण इथे डार्कवेब वापरले जात नाही. डीपवेबचा यात वापर होऊ शकतो. ( गुगलमिट, झूम या गोष्टी डीपवेब प्रकारात मोडतात. कारण त्याचा वापर करण्यासाठी ज्याने अशी मिटिंग अरेंज केली असेल त्याची परवानगी लागते. )

रेडरूम बद्दल जर आपण कोणत्याही तज्ञाला विचारले तर त्याचे उत्तर असते, ‘मी याबद्दल ऐकले आहे पण कधीही रेडरूममध्ये गेलो नाही.’

काही जण आता असेही विचारतील की युट्युबवर तर याबद्दलचे अनेक व्हिडिओ दाखवले जातात. ते काय आहे? ते सगळे व्हिडिओ हे मुद्दाम बनवले जातात. किंवा अनेकदा वेगवेगळ्या चित्रपटातील क्लिपला ग्रेस्केल मध्ये ( म्हणजे black & white बनवून ) बदलून पोस्ट केले जातात. त्यामागे पोस्ट करणाऱ्याची मानसिकता ही थोडीशी मस्करी करण्याची किंवा आपल्याला काहीतरी जास्त माहिती आहे हे इतरांना सांगण्याची असते.   

असे सगळे असूनही मग डार्कवेबवर ‘रेडरूम’ बद्दलच्या लिंक का असतात? किंवा चार दिवसात ‘रेडरूम’ सेशन होणार आहे अशी लिंक का आढळते?

याला दोन कारणे आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे काही जणांच्या मनात अशा विचित्र भावना निर्माण होत असतात. काहीतरी थ्रिल म्हणून ते अशा ठिकाणी रजिस्ट्रेशन करतात. पैसे भरतात आणि फसले जातात. ज्याला पैसे मिळाले तो नंतर गायब होतो. आपण कुणाला पैसे पाठवले हेच माहिती नसेल तर तुम्ही त्याला पकडणार तरी कसे? म्हणजेच फसवणुकीसाठी अशा लिंकचा वापर अनेक hacker करतात.

याचे दुसरे कारण म्हणजे अशा अनेक लिंक काही देशाच्या सुरक्षा यंत्रणाच बनवत असतात. अशा ठिकाणी जे लोक येतात त्यांची माहिती घेऊन त्यांना अटक केली जाते. हा एक प्रकारचा सापळा असतो. अनेक विकृत लोक या सापळ्यात अडकतात आणि त्यांना योग्य ते शासन किंवा समुपदेशन केले जाते.   

अनेकदा डार्कवेब पेक्षाही विचित्र गोष्टी आपल्या सर्फेस वेबवर बघायला मिळतात. त्याचे साधे उदाहरण म्हणजे काही जण आत्महत्या करताना फेसबुक लाइव्ह करतात. काही गेम असे असतात की त्याचा उपयोग लहान मुलांना आत्महत्या करण्यास किंवा कुणाची हत्या करण्यास प्रवृत्त करतात. अनेक खेळांवर तर सरकारने बंदीही घातली आहे. आणि हे सगळे सर्फेस वेबवर चालते.  

थोडक्यात ‘रेडरूम’ ही गोष्ट डार्कवेबवर प्रत्यक्षात अस्तित्वात असणे जवळपास अशक्य आहे. 

मागील आठ भागांच्या लेखमालेतून डार्कवेब बद्दलची माहिती सोपी करून सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. पुढेमागे अशीच एखादी लेखमाला परत घेऊन येईन, तो पर्यंत रामराम… धन्यवाद…

©  श्री मिलिंद जोशी

वेब डेव्हलपर

नाशिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “बाप” एक माणूस….!! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “बाप” एक माणूस….!! –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एकदा “बाप” ही उपाधी मागे लागल्यावर सगळ्या मृदु, कोमल भावनांची मक्तेदारी बायकोच्या नांवावर करून हा माणूस कधी निर्विकार, मख्ख तर कधी कर्तव्य-कठोर  मुखवटा धारण करून बसलेला एक खडक बनतो. 

पोटच्या पोरांसाठी सतत कष्ट करणारा, त्यांच्यासाठी अनेक  गोष्टी चुपचाप सहन करणारा, त्यांची कोड- कौतुकं  पुरविण्यासाठी वेळप्रसंगी  जीवाचा आकांत करणारा बाप, तसा आईच्या थोरवी पुढे दुर्लक्षितच  पण  त्याचे त्याला  कधीच वैषम्य वाटत नाही. जाहीर कौतुकाची तर त्याला  कधी अपेक्षाही नसते. आपली लेकरं आपल्यापेक्षा मोठी व्हावीत  ह्या एकाच ध्यासापोटी  आपला ‘बापा’चा कठोर मुखवटा सांभाळत त्याचे आयुष्य सरत असते….

पण एका समाधानाच्या क्षणी, हा मुखवटा गळून पडतो… अंतरंगामध्ये झुळुझुळु वाहणाऱ्या मायेच्या निखळ पाण्याचा थोपवून   धरलेला झरा,  मुलांच्या कर्तृत्वाची झेप पाहतांना जेंव्हा त्याच्या डोळ्यांचे बांध फुटून वाहू लागतो तेंव्हा त्याच्याच लेकरांना उमगतं की अरे, आपला बाप हाच खरा आपल्या आयुष्यातला “बाप माणूस” आहे ….!

अशा सगळ्या “बाप-माणसांना” त्रिवार  वंदन..!!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रुद्र मंथन… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ रुद्र मंथन…  ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

आयुष्य हे एक, न उलगडणार गुपित! हा कोष्टकाचा खेळ! सारीपाटाचा डाव! प्रत्येकाला खेळ मांडण्याची मुभा आहे. फासे टाकणे त्याच्या हातात असले तरी, नियतीचा डाव वेगळाच असतो. भगवान शंकर पार्वतीने निर्माण केलेला खेळ, आजतागायत चालू आहे. फक्त खेळणारे भिडू  बदलत असतात. सारीपाट तोच आहे. हा खेळ ज्यांना जमला तो आणि ती रंगात गुंग होतात, रमुन जातात आणि येणाऱ्या पिढीला हा डाव सुपूर्द करतात.  प्रारब्धाचे फासे ठरलेले असतात. खेळणाऱ्याला वाटतं आपण चांगल खेळत असतो. सारीपाटाला कट्टी असते (फुली मारलेली जागा ) त्यात एखादी सोंगटी गेली की तिला मारता येत नाही! ती बिनधास्त राहते. तसेच काही खेळाडू,कट्टीत राहून आयुष्याचा खेळ खेळतात. तस नियतीने बुहतेक ठरवलं असावं. काहींना खेळात सुंदर फासे पडतात, तर काहींना उलटे फासे पडतात. काहींचा डाव रडीचा असतो तर, काही जण खिलाडू वृत्तीने घेतात. प्रत्येकाला डाव खेळावाच लागतो. त्याशिवाय सुटका नाही. हे एक प्रकारचे युद्ध कौशल्यच म्हणावे लागेल.

सोंगट्या कोणत्याही रंगाच्या असोत, खेळाचे कौशल्य आणि तंत्र मंत्र अंगी सात करावे लागतात. काहीजण हा खेळ अर्धवट सोडून उठतात! खेळ म्हटल्यावर हार जीत पण स्वीकारवी लागतेच. त्याचे कडू गोड घोट पचवावे लागतात. खेळातील परिस्थिती कशी असेल सांगता येत नाही. त्या परिस्थितीला अनुसरून नाईलाजाने, फासे टाकावे लागतात. खेळात बाहेरचे कमी पण आतलेच शत्रू जास्त असतात. त्यांना सदैव सोबत घेऊनच हा बुद्धिबलाचा डाव आखावा लागतो.

काहीवेळा  आयुष्य हे   “समुद्र मंथन “आहे असच वाटतं! काळाचा वासुकी ( दोरी ) आयुष्याच्या मेरू पर्वताला गुंडाळून समुद्राला ढवळून काढतात. वासुकीच्या तोंडा कडील भाग हा पुरुषाकडे तर, शेपटीचा भाग स्त्रिया कडे! आयुष्याचे रुद्र मंथन करण्यात किती पिढ्या गेल्या हे त्या जगतपित्यालाच माहित! प्रत्येक जण हा सुख दुःखाचा खेळ खेळत जीवनाच सार्थक करून घेत असतात.

पण ह्या समुद्र मन्थनातुन सुख आणि दुःख ह्या खेरीज कोणतेही रत्न सापडत नाही. वेदना व्यथा ह्या सुखातूनच उत्पन्न होत असव्यात का  ? हे न समजणारे कोडेच! प्रत्येक जण ह्या सुख दुःखाच्या विहिरीत उडी मारतोच! रुद्र मन्थनाचा हा खेळ अव्यांहत पणे चालू आहेच.

प्रकृती पुरुष हेच आदम ईव्ह  वाटू लागतात. येथूनच आनंदाचे सफरचंद खाण्यात  मशगुल होतात. भोग आणि उपभोग ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू  ! स्त्री पुरुष  म्हणजेच जग का ?

स्त्रियांच्या वाट्यालाच भोग आणि पुरुषांच्या वाट्याला उपभोग!  हा कसला न्याय!

ही अशीच का सृष्टी रचना.

स्त्रियांचे दुःख स्त्रियानाच माहित. मग तो पुरुष स्त्री रोग तज्ञ डॉक्टर असला तरीही त्याला त्या वेदना कश्या कळणार! भोग उपभोगचे खेळ हे आनादी काळापासून चालू आहेत. वेदना व्यथा आहेत, म्हणून त्याला काळाचे मलम आहेच. प्रकृतीचा सोशिक पणा निसर्ग सृष्टीला मान्य होता, असं म्हणावे लागेल.

आजच्या युगात स्त्री शक्ती जागृत झाली, स्त्री शक्ती खूप पुढे गेली. प्रत्येक क्षेत्रात ह्या शक्तीने आघाडी घेतली व समाजाचा मनाचा केंद्रबिंदू झाली. तरीपण तिच्या वाट्याला आलेल दुःख सहजपणे पचवून पुढे जात राहिली.

असं असलं तरी स्त्री व पुरुष हे घटक एकमेकांना पूरक होत, काळाच्या यज्ञात समिधा अर्पण करीत हा जगण्याचा यज्ञ अखंड सुरूच ठेवला. हाच भातुकलीचा खेळ, सारी पाटात केव्हा रूपांतरीत होऊन,  त्याच रुद्र मंथन कस झालं हे कळत पण नाही. आयुष्य हे असच असत का?  सुख दुःख , हार जीत कुणाचीही होवो. हा जगण्याचा मंत्र सारी पाट डाव असो वा रुद्र मंथन हे कुणास चुकले आहे का ?

भातुकलीचा खेळ कसा  मांडावा, सारी पाटात फासे कसे फेकावे, रुद्र मंथन हा आयुष्याचा आनंदाचा क्षण समुद्र मंथन नाही का वाटतं हा जगण्याचा यज्ञ त्यात पडणाऱ्या अहुत्या कळत न कळत  काळाच्या पडद्या आड होत राहतात! हेच तर समाजाचे जगणे आहे देणे आहे.

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares