मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सरणावर टाकलेलं चारित्र्य…. श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? मनमंजुषेतून ?

☆  सरणावर टाकलेलं चारित्र्य… श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

सोमवार संध्याकाळची वेळ होती. पुण्यात पाऊस अगदी व्यवस्थित प्रामाणिकपणे त्याचं कर्तव्य बजावत होता. एक पालक भेटायला येणार होते, पण अजून पोचले नव्हते. मी टेबलाशी बसून स्व. डॉ. स्नेहलता देशमुख यांचं “अरे संस्कार संस्कार” वाचत होतो. तितक्यात माझी पत्नी आतून बाहेर आली आणि काहीही न बोलता तिनं तिच्या स्मार्टफोन वर एक व्हिडिओ मला दाखवला. तरुणांनी खांद्यावर उचलून घेतलेला एक तरुण. मिशा नाहीत अन् दाढी राखलेला. गळ्यात बांगलादेश चा राष्ट्रध्वज आणि दोन्हीं हातात स्त्रीची अंतर्वस्त्रे एखाद्या विजयी वीरासारखी तो नाचवत होता.. ! 

तो व्हिडिओ मेंदूऐवजी आधी मनातच घुसला. काही क्षण तर आपण नेमकं काय पाहतो आहोत, हे समजून घेण्यातच गेले. तो व्हिडिओ मी आठ दहा वेळा वारंवार पाहत राहिलो. जल्लोष करणाऱ्या त्या तरुणाच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत राहिलो.

साधारण पंचविशीचा किंवा त्याहूनही लहान वयाचा तो तरुण असेल. ७६ वर्षं वयाच्या आपल्या देशाच्या महिला पंतप्रधानांच्या घरी घुसतो, घरात नासधूस करतो, महिला पंतप्रधानांच्या कपड्यांचं कपाट उचकतो आणि त्यातून त्यांची अंतर्वस्त्रं काढून घेऊन ती अत्यंत उन्मादानं कॅमेऱ्यासमोर नाचवतो.. ! तो व्हिडिओ पाहताना एका बाजूला लाज वाटत होती, दुःख होत होतं अन् दुसऱ्या बाजूला विलक्षण संताप होत होता.

त्याच लिंकवर आणखी फोटो दिसायला लागले. काही तरुण अत्यंत आनंदानं पंतप्रधानांच्या साड्या गुंडाळून फिरत होते, त्यांचें ब्लाऊजेस दाखवत होते.. ! विशेष म्हणजे, यात बांगलादेशी तरुणीदेखील सहभागी होत्या आणि स्वतः स्त्री असूनही त्यांना ह्या कृत्याची किंचितही लाज वाटली नाही आणि त्यात काही गैर आहे असंही वाटलं नाही.. !

बांगलादेशातली राजकीय धुमश्चक्री मीही इंटरनेटवरुन पाहत होतो, माहिती घेत होतो. भारत-बांगलादेशचं निर्यात धोरण आता धोक्याच्या वळणावर आहे, हे सरळ सरळ दिसत होतं. बांगलादेशातली उद्योगव्यवस्था आणि साहजिकच अर्थव्यवस्था या दोन्हींचा बोजवारा उडाला तर येत्या काळात दयनीय अवस्था निर्माण होणार आणि बांगलादेशातले अल्पसंख्य नागरिक त्यांचं चंबूगबाळं उचलून, बायका-पोरं काखोटीला मारुन जगभर निर्वासित म्हणून फिरणार, हे सगळं कळत होतं. बांगलादेशातले एक कोटी हिंदू रहिवासी नागरिक आता काय करतील, हा प्रश्न गेल्या काही दिवसांत हजारदा मनात येऊन गेला असेल.. ! 

पण हे फोटो पाहिले, व्हिडिओ पाहिले आणि जाणवलं की, या अल्पसंख्य हिंदूंमधल्या स्त्रिया अन् मुलींचं काय होईल ? “जीव वाचवायचा असेल तर शीलाला तिलांजली द्या” असा प्रकार सुरु झाला तर मुळीच आश्चर्य वाटणार नाही, अशी सामाजिक परिस्थिती तिथं नग्नसत्य बनून उभी आहे.. ! सच्चिदानंद शेवडे गुरुजींचं “रक्तलांच्छन” हे पुस्तक तरुणांनी तर वाचावंच, पण त्याहीपेक्षा पालकांनीच वाचणं अधिक गरजेचं झालं आहे.

राजकीय आंदोलनाला एखाद्याची चिथावणी असू शकते, पाठिंबा असू शकतो, कट-कारस्थानं असू शकतात, हे सगळं मान्य. देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणं आणि तिथं धुडगूस घालणं, फर्निचर पळवून नेणं हे खरोखर चुकीचं असलं तरीही त्या वागण्याला अख्ख्या जगात “जनक्षोभ” असं गोड नाव दिलेलं असल्यामुळे त्यातला सामाजिक गुन्हा आता जवळपास नामशेष झाला आहे.

पण देशातल्या तरुणांनी आंदोलन किंवा जनक्षोभाच्या नावाखाली महिला पंतप्रधानांच्या अंतर्वस्त्रांची माध्यमांसमोर जाहीर बीभत्स विटंबना करणं, हे आता काहीतरी भलतंच सांगू पाहतंय.. ! ह्या तरुणांच्या आयांना, बहिणींना, आत्यांना, मावश्यांना, माम्यांना हे फोटो बघून काय वाटलं असेल हो ? धर्म कुठलाही असो, पण स्त्री चारित्र्याची अशा पद्धतीनं जाहीर वासलात लावणं, हे आधुनिक जगाच्या कुठल्या जीवनशैलीत बसणारं आहे ? 

आपल्या देशात हे घडलं असतं आणि अशा तरुणांवर गुन्हा दाखल झाला असता तर काय झालं असतं ? सगळ्यात पहिलं म्हणजे, घटना घडल्यानंतर चार पाच दिवसांनी माध्यमांनी या तरुणांना नराधम वगैरे म्हटलं असतं, दिवसरात्र महाचर्चांची गुऱ्हाळं चालवली गेली असती, शे दोनशे सामाजिक विचारवंत, कलावंत, लेखक, साहित्यिक यांनी सह्यांची मोहीम केली असती आणि आठ दहा नामांकित वकिलांची फौज उभी केली असती. दुसरी एखादी याहून सनसनाटी घटना घडेपर्यंत मीडियाचा तोफखाना सुरु राहिला असता. पंधरा दिवसांनी समाजच हा विषय विसरुन गेला असता. आजवर हे असंच घडत आलेलं आहे. पण आता जनक्षोभाचा नवा पैलू अवतार घेतो आहे.. ! राजकीय किंवा सामाजिक विरोधातून सुरु झालेलं वैमनस्य आता नैतिकतेला अन् महिलांच्या चारित्र्यालासुध्दा पायदळी तुडवत सुटलं आहे.

“पद्धतशीर विसंवेदन” नावाचं एक मानसशास्त्रीय तंत्र आहे. माणसांना भावनिकदृष्ट्या बोथट किंवा संवेदनाशून्य कसं केलं जातं, याचं हे एक प्रमुख तंत्र आहे. ते वैयक्तिक आयुष्यापासून ते समाज, देश, राष्ट्र अशा सगळ्या पातळ्यांवर उपयोगात आणलं जातं. समाजात सर्वदूर सगळीकडे अनैतिक घटनांचा असा महापूर आणायचा की, लोकांच्या त्याविषयीच्या भावना, संवेदना तेच तेच पाहून, ऐकून, वाचून पार बोथट होत जातात. “आता नैतिकता आणि चारित्र्यापेक्षा आमची भावना महत्त्वाची” याच मार्गावर चालण्याचा पायंडा पाडला गेला तर आश्चर्य वाटायला नको.

महाराष्ट्रात तर याची सुरुवात केव्हाच झाली आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं ते आनंदानं स्वीकारलं आहे. मराठी “कॉमेडी शो” ने या प्रकरणाचा शुभारंभ केव्हांच केला आहे. विनोदाच्या नावाखाली पुरुषांनी स्त्री भूमिका करणे हा तर उघड स्वैराचार चालला होता. “ह्याला विनोद म्हणा” असा आग्रह जर शरद तळवलकर, राजा परांजपे, राजा गोसावी, अशा लोकांच्यासमोर धरला असता तर ही माणसं झीट येऊनच पडली असती. समीर चौगुले नामक माणूस विनोद निर्मितीच्या नावाखाली काय काय आचरट चाळे करतो, हे इथे नव्यानं सांगायला नको. पुरुष कर्मचाऱ्याने ऑफिसात परकर परिधान करून जाणे, स्त्री ला जाहीर मुलाखतीत “पावसाळ्यात चड्डी कशी वाळवता” असा प्रश्न विचारणे, असले अनंत आंबट चाळे या माणसाने विनोद या नावाखाली महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले आहेत. त्याची साथ द्यायला बाकीचे तथाकथित कलावंत आहेतच. विनोदाच्या नावाखाली गौरव मोरे “थंडीत तुझी कोळंबी होते” असं म्हणतो, मराठी माणसांना तो विनोद वाटतो. वनिता खरात आणि समीर चौगुले विनोदाच्या नावाखाली एकमेकांना छातीवर धडकतात, त्याचा प्राजक्ता माळी आणि प्रसाद ओक वन्स मोअर देतात, मराठी माणसांना तो विनोद वाटतो. एका स्टॅण्डअप कॉमेडी शो मध्ये अंकिता वालावलकर ” रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर बॉयफ्रेंड अचानक कार थांबवून रस्त्यात उतरला आणि मूत्र विसर्जन करु लागला. “मी प्रकाशात पाहिलं तेव्हा कळलं की केवळ ह्याचा मेंदूच छोटा नाहीय” असं म्हणते, मराठी माणसांना तो विनोद वाटतो… !

आता ‘विनोद असेच असतात’ असा मराठी माणसांचा ठाम समज झाला असेल तर ते स्वाभाविकच आहे. कारण, विनोदाच्या नावाखाली वारंवार त्याचाच मारा करण्यात येतो आहे. समाजमन उथळ आणि आंबट होण्यात या असल्या प्रकरणांचा खारीचा नाही तर सिंहाचा वाटा आहे, हे आपणच लक्षात घेण्याची गरज आहे.

एकही स्त्रीवादी साहित्यिक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ता, विचारवंत या प्रकरणाचा निषेधही करत नाही आणि तक्रारही करत नाही, हे तर त्याहून जास्त धक्कादायक आहे. मग आपण नेमकी कोणती संस्कृती जन्माला घालतो आहोत, ह्याचा विचार कुणी करायचा? 

“सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे” असे समर्थांनी म्हटलेलं आहे. ते आपण नेमक्या कोणत्या बासनात गुंडाळून ठेवलेलं आहे? आणि कशासाठी? 

आज बांगलादेशातल्या तरुण आंदोलकांनी चारित्र्याच्या बाबतीत जी नीच पातळी गाठली आहे, तिचं लोण जगभर पसरणार नाही, ह्याची कुणाला खात्री आहे? राजकीय मतभेद, वैचारिक मतभेद अगदी अवश्य असू शकतात, पण ते महिलांच्या चारित्र्याची विटंबना करण्यापर्यंत यावेत, हा अध्याय गंभीर आहे. केतकी चितळे ला महाराष्ट्रात ज्या भाषेत ट्रोल केलं गेेलं आहे, त्यात हे नैतिकतेचं पारडं पार गंजून खलास होण्याच्या मार्गावर असल्याचं दिसलेलं आहे.

समाजातल्या तरुण वर्गाचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग करून घेण्याचा घाणेरडा डाव महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातही गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरु आहे. त्या धगीचे चटके बसत असतानाच हे सांस्कृतिक प्रदूषणाचं वारं आणखी भर घालत सुटलं आहे, हे काळजीचंच लक्षण आहे.

कुटुंबांचा आपल्या घरातल्या तरुणांवर असलेला प्रभाव नष्ट होत चालला आहे का, असा शोध घ्यायला भरपूर वाव आहे. आपली मुलं मोठी झाली, वयात आली, त्यांना आपण स्वातंत्र्य दिलं, हे सगळं खरं. पण त्यांच्या वैचारिक संतुलनाचं काय, असा प्रश्न आता पालकांना स्पष्टपणे विचारण्याची वेळ आली आहे. आपली मुलं कुठं जातात, काय करतात, कुणासोबत फिरतात, कुणाच्या सहवासात असतात, त्यांची सामाजिक प्रतिमा कशी आहे, या सगळ्यांची जबाबदारी नेमकी कुणाची आहे ? आपली मुलं स्मार्टफोनचा, इंटरनेटचा नेमका कशासाठी उपयोग करतात, हे पालकांना माहित असायला नको का ? आता या प्रश्नांची उत्तरं समाजानं सगळ्या पालकवर्गाला विचारायला हवीत. तरुणांच्या स्वातंत्र्याला, अभिव्यक्तिला, ऊर्जेला नैतिकतेची, विवेकाची आणि तारतम्याची भक्कम चौकट असणं ही केवळ आपलीच नव्हे तर संपूर्ण जगाची गरज आहे. कुटुंबव्यवस्थेनं तरुण वर्गाला स्वैराचारापासून थांबवलं नाही तर, आज बांगलादेशातले फोटो दिसतायत, उद्या आपलीही मुलं त्याच गोष्टी करताना दिसली तर, त्या पापाला कुठल्याच प्रायश्चित्ताचा काहीही उपयोग नसेल…! 

आपल्या भावना योग्य प्रकारे आणि सामाजिक- सांस्कृतिक- नैतिक चौकटीत राहूनच व्यक्त करणं, भावनांवर योग्य पद्धतीनं नियंत्रण मिळवणं आणि स्वतःला इतरांच्या स्वार्थाचा बळी होऊ न देणं ही कौशल्यं केवळ भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या तरुण पिढीला अवगत असणं अत्यंत आवश्यक आहे. नाही तर या सगळ्याचे फार भीषण परिणाम सगळ्यांना भोगावे लागण्याचा दिवस आता फार काही दूर असेल असं वाटत नाही.. !

लेखक :  श्री मयुरेश उमाकांत डंके

मानस तज्ज्ञ, संचालक – प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे. मो 8905199711

प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “मायेचं मोल…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “मायेचं मोल…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

हे हवं तेव्हढं पैकी घ्या तुमास्नी पर माझ्या लेकराला आपल्या मायची माया तेव्हढी तुमच्या देशात इकत घेऊन द्या…. आता तो लै मोठा सायेब झालाय न्हवं..

पार तिकडं सातासमुद्राच्या पल्याड… तिथं त्येला समंधी हायती घरची दारची गोतावळ्याची… घरात लक्ष्मीवानी बायकू दोन पोरं हायती… आनी बाकी मस हायती पैश्याला पासरी असल्यावानी… अन हिकडं म्या त्येची एकच आय हाय… तळहाताच्या फोडावानी जपला, वाढवला मोठा केला… त्यो चार वरसाचा असताना त्येचा बा ॲक्सिडंट मधी खपला.. तवापासून म्या एकटीनचं या माझ्या पोराचं केलं… तो दिसा माजी मोठा बापय गडी होत गेला नि म्या साडेतीन हाताचं मुटकुळं होऊन इथं एकलीच पडलेय… तुमच्या सारखी त्याचे मैतर येत जात असतात घराकडं त्याच्यकडनं सांगावा नि पैक्याची चवड आणून देतात… परं पोरगं एकदा बी नदरंला पडाया न्हाई… आपल्या अडानी, काळ्या रंगाच्या खेडूत आयची त्येला आता लाज वाटतीया… त्या गोऱ्या कातडीच्या बाईनं त्याच्यावर चेटू केलया.. त्यामुळं त्येला आपली आय, आपलं घर, आपलं गावं समध्याचा इसर पडलाया… त्येचा मैतर मला एकदा म्हनला मावशे रघुनाथ आता तिकडं घरजावई झालाय आनि इकडं कंदीच आयेला, गावाला भेटायला जायाचं न्हाई अशी शपथ घातलीया… तवा कुठं त्येला पैश्यापरी महलाची सुखं मिळतात… रघुनाथ सासूला नि सासऱ्यालाच आई बा मानतो… पन तुला अजून इसरला न्हाई म्हनून पैसंं तरी धाडतो… एव्हढी तरी काळजी घेतोय हे काय कमी हाय का… रघुनाथच्या मायन्ं त्या आलेल्या मैतराला त्यानं दिलेल्या पैश्यातलं एक बिंडोळं परत त्याच्या हाती देत म्हटलं तुमच्या तिकडं मायची माया जर इकत मिळत असलं तर तेव्हढी त्येला तुम्हीच इकत घेऊन देयाल का… एक आईचं तुटणारं आतडं तेव्हढ्यानं तरी कायमचं शांत होईल…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग २३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २३ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र – “आणखी एक. मनात आले ते बोललो नाही तर मलाच चैन पडणार नाही म्हणून सांगतो. तुम्ही काल एवढा त्रास सहन करून दत्तदर्शनासाठी वाडीला गेलात तेव्हाच तुमच्या मनातल्या भावना महाराजांपर्यंत पोचल्या आहेत. आणि त्याच महत्त्वाच्या. त्यामुळे आता परत जाऊन दिवसभर काम करून पुन्हा पौर्णिमेच्या दर्शनासाठी आज दुपारच्या बसने नृ. वाडीला यायची धडपड कराल म्हणून मुद्दाम हे सांगतोय. दगदग नका करू. “

 सासरे सांगत होते. मी आज्ञाधारकपणे मान हलवली. निरोप घेऊन पाठ वळवली. पण मन स्वस्थ नव्हतं. नकळत का होईना पण आपल्याकडून घडलेल्या चुकीमुळेच आपला संकल्प सिद्धीस जाण्यात अडथळा निर्माण झाल्याची खंत मनात घर करून राहिली होती. हातातून काहीतरी अलगद निसटून जात असल्याच्या भावनेने मन उदास झाले होते. तीच उदासी सोबत घेऊन माझा परतीचा प्रवास सुरू झाला होता!!)

एरवी सगळ्यांशीच मोजकं बोलणारे माझे सासरे आज भावनेच्या भरात कां होईना अंत:प्रेरणेने जे बोलले ते माझ्या काळजीपोटीच होते. पण त्यातही त्यांच्याही नकळत एक सूचक संदेश दत्तगुरुंनी माझ्यासाठी पेरुन ठेवला असल्याची जाणिव या परतीच्या प्रवासात माझ्या अस्वस्थ मनाला अचानक स्पर्श करुन गेली आणि मी दचकून भानावर आलो. एरवी नंतर मला कदाचित कामांच्या घाईगर्दीत जे जाणवलंही नसतं तेच ही जाणिव नेमकं मला हळूच सुचवून गेली होती!मी अक्षरश: अंतर्बाह्य शहारलो. ‘आज पौर्णिमा आहे. मी मनात आणलं तर आज पुन्हा दुपारच्या बसने नेहमीसारखं निघून नृ. वाडीला जाणं मला अशक्य नाहीय. सासऱ्यांनी जे मी करीन हे गृहित धरलं होतं त्याचा तोवर मी विचारही केला नव्हता. पण आता मात्र मी काय करु शकतो, करायला हवं याची नेमकी दिशा मला मिळाली आणि मनातल्या मनात त्याचं 

नियोजनही सुरू झालं!अर्थात ते जमेल न जमेल हे माझ्या स्वाधीन नव्हतं. जमायचं नसेल तर कांहीही होऊ शकतं. बस चुकणं, ती मिळाली तरी बंद पडणं, वाटेत अपघात होणं किंवा आज बॅंकेत पोचताच अचानक आॅडिट सुरु होणं, ए. जी. एम् अचानक ब्रॅंच व्हिजिटसाठी येणं असं कांहीही. यातल्या कोणत्याच गोष्टी माझ्या हातातल्या नव्हत्या आणि त्यापैकी कांही घडलंच तर त्याला माझा इलाजही नव्हता. अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणं एवढंच मी करू शकत होतो आणि ते मी करायचं असं ठरवून टाकलं!!

त्यामुळे अर्थातच प्रवास संपताना मनातली अस्वस्थताही कमी झाली होती. ब्रॅंचला गेल्यानंतर मात्र असंख्य व्यवधानं तिथं माझीच वाटच पहात होती. त्यामुळे कामाचं चक्र लगेच सुरु झालं न् पुढे बराच वेळ श्वास घ्यायलाही फुरसत मिळाली नाही. रांजणेंच्याजवळ मनातला विचार बोलून ठेवायचंही भान नव्हतं. गर्दीचा भर ओसरला तेव्हा सहज माझं लक्ष भिंतीवरच्या घड्याळाकडे गेलं. दुपारचे दोन वाजून गेले होते. मी रांजणेना नेमक्या परिस्थितीची कल्पना दिली. सहज शक्य झालं तर आज सव्वातीनच्या बसने परत नृ. वाडीला जाऊन यायची इच्छा असल्याचंही त्यांना सांगितलं.

“अजून तुमचं जेवणही झालेलं नाहीय. मेस बंद होण्यापूर्वी तुम्ही लगेच जाऊन जेवून या. तोवर मी आधी कॅश टॅली करून ठेवतो. म्हणजे कॅश चेक करून तुम्हाला निघता येईल. बाकीची माझी कामं तुम्ही गेल्यानंतर मी केली तरी चालू शकेल. ” रांजणेंनी मला आश्वस्त केलं. त्याक्षणानंतर सगळं मार्गी लावून मी स्टॅंण्ड गाठलं. बसमधे मनासारखी जागा मिळाली. मान मागे टेकवून मी शांतपणे डोळे मिटले. आदल्या दिवशी याच बसमधे मी असाच बसलो होतो तेव्हा पुढे काय घडणाराय याबाबतीत मी पूर्णतः अनभिज्ञ होतो. त्यानंतरच्या सगळ्याच घटना माझ्या नजरेसमोरुन सरकत जात असताना मला त्या स्वप्नवतच वाटत राहिल्या.

नृ. वाडीला पोचलो तेव्हा मनातली उत्कट इच्छा फलद्रूप झाल्याचं समाधान मन उल्हसित करीत होतं!दत्तदर्शन घेताना आत्यंतिक आनंदभावनेने मन भरून येत असतानाच माझी मिटली नजर ओलावली होती!

दर्शन झाल्यानंतर हीच कृतार्थ भावना मनात घेऊन मी पायऱ्या चढून वर आलो आणि मला वास्तवाचं भान आलं. रात्रीचे दहा वाजत आले होते. इथेच मुक्काम केला तर पहाटे वेळेत सांगलीला पोचून सहाची बस मिळवणं शक्य होणार नव्हतं. त्यासाठी मुक्कामाला सांगलीला जाणं आवश्यक होतं.

सांगली स्टॅंडला बस येताच मी घाईघाईने बसमधून उतरलो. पावलं नकळत सासुरवाडीच्या घराच्या दिशेने चालू लागताच मी थबकलो. तिथे जाणं मला योग्य वाटेना. काल सासऱ्यांनी पोटतिडकीने मला जे करु नका असं सांगितलं होतं नेमकं तेच मी केलेलं होतं. ‘आता त्यांच्याकडे जायचं तर हे लक्षात येऊन त्यांचं मन दुखावलं जाऊ शकतं. तसं होऊन चालणार नाही’ असा विचार मनात आला. मी परत फिरलो. खिशातल्या पैशांचा अंदाज घेतला. केवळ दोनतीन तास पाठ टेकण्यासाठी लाॅजवर जाणं ही त्याक्षणी गरज नव्हे तर चैन ठरणार होती हे लक्षात आलं आणि पुन्हा स्टॅण्डवर आलो. ती पूर्ण रात्र सांगली स्टँडवर बसून काढली!

स्टॅंडच्या बसून रात्र जागून काढताना सलगच्या धावपळीच्या प्रवासानंतरचा अपरिहार्य असा थकवा होताच पण त्याचा त्रास मात्र जाणवत नव्हता. कारण मनातलं पौर्णिमा अंतरली नसल्याचं समाधान त्यावर फुंकर घालत होतं! त्याच मन:स्थितीत मी कधीकाळी ऐकलेले बाबांचे शब्द मला स्वच्छ आठवले.

‘दत्तसेवा अनेकांना खूप खडतर वाटते. त्यामुळेच ‘मी’ करतो असं म्हणून ती प्रत्येकालाच जमत नाही. निश्चय केला तरी त्या निश्चयापासून परावृत्त करणारे प्रसंग सतत समोर येत रहातात. तेच आपल्या कसोटीचे क्षण!जे त्या कसोटीला खरे उतरतील तेच तरतात…!’

त्या रात्री बाबांच्या या शब्दांचा नेमका अर्थ मला माझ्या त्या दिवशीच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने समजला होता!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पद्मविभूषण शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? इंद्रधनुष्य ?

☆ “पद्मविभूषण शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

जय भवानी •••जय शिवाजी••• म्हणताना उर जसा अभिमानाने भरून येतो ना, शिवाजीचे कर्तृत्व आठवून रक्तामध्ये एक अनोखी शक्ती निर्माण होऊन, एक जोष निर्माण होतो ना••••

तसाच •••किंबहुना त्याहुनही जास्त जोष, किमान सर्व पुरंदरे यांच्या अंगी येतो•••• तो म्हणजे शिवचरित्र, शिवाजी महाराज, घरोघरी पोहोचविणाऱ्या, पद्मविभूषण, शिवशाहीर, श्री बाबासाहेब पुरंदरे हे नाव उच्चारले की••• हे आदरणीय व्यक्तिमत्त्व समोर दिसले की, आत्ताच 98 व्या वर्षी काढलेले उद्गार आठवतात ••• त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगताना ते म्हणतात, मी माझ्या मनात एक आठ – नऊ वर्षाचे मूल जपलेआहे. त्यामुळे त्यांचे भाव हे मला चिरतरुण, दीर्घायू करायला मदत करत आहेत.

असेच छान छान उद्गार, छान छान विचार, आमच्या कानावर सतत पडत असल्याने, एक अभिमान वाटावा, असा आदर्श समोर आला••• अगदी ठरवलेले नसले तरी, त्यांची कृती, विचार, वागणे, बोलणे, रहाणे, हे सगळे नकळत मनावर बिंबवले गेले••• नव्हे मनात रुजले गेले आहे••• आणि हेच बीज अंकुरून आता कुठे तरी त्यांची पाऊलधूळ मला स्पर्श करण्याचे सामर्थ्य आले आहे असे वाटते.

विचारणारे विचारतात श्री बाबासाहेबांकडून तुला हा वारसा मिळाला आहे का? तर नक्कीच, अगदी अभिमानाने, ‘हो’ असे उत्तर येईल••• पण मुळात, पुरंदरे हा इतिहासच एवढा रोमांचक आहे की, त्यातून पुरंदरे नसणाऱ्यांना सुद्धा स्फूर्ती येईल•••

मी आता इतिहास म्हटले तो म्हणजे किती तरी पिढ्यानुपिढ्या आलेले रक्तातून रक्तात आलेले संस्कार हा पुरंदर इतिहास सुद्धा मला वाटतं बाबासाहेब यांच्यात संशोधनातून पुढे आला आहे पुरंदरे दप्तर यामध्ये असलेली रंजक माहिती ती पुन्हा नवीन पुरंदरे दप्तर यामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेली आहे पण म्हणतात ना गेल्या दहा पिढ्या बद्दल जास्त नाही सांगता आले तरी आज श्री बाबासाहेब पासून आमची मुले किंवा त्यांची नातवंडे अशा पिढ्यांमध्ये श्री बाबासाहेबांचा आदर्श घेतला जातो आहे त्यांच्याकडे बघून आम्ही बाबासाहेबांचे पुरंदरे या नात्याने वंशज आहोत आणि त्यांच्या कर्तुत्वाचा बोलण्याचा आणि खाण्याचा प्रचंड प्रभाव पडल्यामुळे आज मी जे काही थोडेफार लिखाण करू शकते ते शक्य झाले.

माझे वडील, सासवडचे श्री नानासाहेब पुरंदरे, एक अनोखे साहित्यप्रेमी, साहित्य रसिक होते••• त्यांनी फार जास्त लिखाण केले नसले तरी, श्री बाबासाहेबांसह अनेक साहित्यिक आमच्या घरी यायचे, राहायचे, साहित्यिक चर्चा व्हायच्या••• हे सगळे संस्कार, मनावर होत गेले••• आणि ज्या मातीत आपण रुजले गेलेलो असतो त्या मातीचे संस्कार, शिकवावे लागत नाहीत•••तर ते आपोआप होतात••• त्याप्रमाणे पुरंदर्‍यांचे संस्कार हे आपोआप झाले.

श्री बाबासाहेबांची चालणारी शिवचरित्र व्याख्यानमाला, ही आठवडाभराची पर्वणी असायची•• ती व्याख्याने प्रत्यक्ष ऐकली जायची, पण त्या काळात घरी असलेला मुक्काम •••त्यात नामवंत लोकांबरोबर झालेल्या चर्चा •••यातून त्यांचे बारकाईने निरीक्षण होत होते •••त्याची छाप कुठेतरी मनावर खोल पडली गेली. •••

त्यामुळे स्वाभिमानी, पण नम्रपणा हा आपोआप गुण आला असावा••• लहानपणी त्यांच्या भाषणातूनच या बाबासाहेबांची ओळख झाली •••हे आपले काका आहेत हे सांगताना होणारा आनंद अवर्णनीय असायचा••• पण त्यांचे लहानपण मात्र आम्ही मोठे झाल्यावरच कळले.

सासवडच्या राहणाऱ्या मोरेश्वर पुरंदरे यांच्या कुटुंबात 29 जुलै 1922 रोजी या सुपुत्राचा जन्म झाला •••आणि हौसेने या बालकाचे नाव, ‘बळवंत’ ठेवले गेले••• तेच हे ब. मो. तथा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे•••

यांना लहानपणापासून त्यांच्या वडिलांमुळे गड किल्ल्याची आवड निर्माण झाली. वडील छान गोष्टी सांगायचे, तशी गोष्टी सांगायची आवड निर्माण झाली; आणि वयाच्या आठव्या वर्षी एक कीर्तनकार न आल्यामुळे, नरसिंह अवताराची गोष्ट त्यांना सांगायला लागली.

निर्भीडपणे सर्व लोकांमध्ये त्यांनी सांगितलेली ही कथा सगळ्या गावकऱ्यांना आवडल्यामुळे हेच त्यांच्या वक्तृत्वाचे मोठे कारण झाले.

याच गोष्टीचे साधर्म्य, शिवबांनी अफजल खानाचे पोट फाडले••• या कथेशी वाटून, त्यांना शिवचरित्राचा ध्यास लागला; आणि याच नादातून, ध्येयातून, त्यांनी शिवचरित्राची निर्मिती केली.

शिवचरित्र लिहून झाल्यावर, ते छापायला पैसे नसल्याने, भाजीपाला विकूनही त्यांनी ही रक्कम जमवली.

याच कथेतून, ध्येयासक्ती कशी असावी •••, पैसे नसले तरी कष्ट करण्याची तयारी असणे•••, आणि त्यासाठी पडतील ते कष्ट घेतले पाहिजेत •••आणि सगळ्यात महत्वाचे मनात जिद्द असावी••• असे अनेक गुण त्याचे महत्त्व हे न सांगता मनावर बिंबले गेले •••आणि यातूनच आपणही काही लिहावे •••कष्टाला डगमगू नये••• जिद्द धरावी हे गुण आले आहेत असे वाटते•••

श्री बाबासाहेबांच्या लिखाणाचा प्रभाव इतका पडला की, अलीकडे मी शिवाजीच्या दहा-बारा कथा पावसाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला आहे •••त्यातील काही कथा मी माझ्या फेसबुक वरूनही प्रसारित केल्या आहेत.

बाबासाहेब हे कधीच प्रसिद्धी, कीर्ती, यांच्या मागे धावले नाहीत••• तर, शिवाजीच्या प्रेमापोटी, इतिहासाच्या ध्येया पोटी, आणि काहीतरी करून दाखवायची जिद्दीपोटी, ते आपले काम निस्वार्थीपणे करत राहिले••• आहेत •••आणि राहतीलही•••यात शंकाच नाही! त्यामुळेच, यातून झालेल्या परिणामामुळे, हा परिणाम फक्त बाबासाहेबां पुरता मर्यादित न राहता, महाराष्ट्रात, भारतात, नव्हे तर••• विदेशातही जाणवू लागला••• आणि मग, त्यांची कृती इतकी सुंदर, ते खरोखर महान आहेत •••हे आपल्या कार्याने दाखवून दिल्यावर, वयाच्या 95 व्या वर्षी, त्यांना ‘पद्मविभूषण’ हा पुरस्कार मिळाला.

यापूर्वी त्यांना असंख्य पुरस्काराने गौरवण्यात आले आहे पण आवर्जून सांगावेसे वाटणारी पुरस्कार म्हणजे, महाराष्ट्रभूषण, पुण्यभूषण, पद्मविभूषण, आणि पुरंदर्‍यांचे भूषण ठरलेले हे पुरंदरे भूषण!!!!!

त्यांचे मोठेपण सांगायचे झाले तर, त्यांचा धाडसी बाणा, लेखन शैली, स्मरणशक्ती, वक्तृत्व, आत्मविश्वास, आणि जिद्द••• हे वैशिष्ट्य, त्यांचे अनुकरण जे करु इच्छीतात, नियमितपणे त्यांचे लेखन वाचतात, ऐकतात, त्यांना आपोआप आशीर्वादाने मिळतोच; नव्हे हे सगळ्यांनी घ्यावे अशी त्यांची इच्छा आहे.

अशा शिवशाहीर बाबासाहेबांची, वारसदार म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहे •••त्यांच्याबद्दल एवढेच म्हणेन•••

श्री मंत सरदार,

बा वन कशी शिवाजी अभ्यासक,

बा णा शिवाजी धारक,

सा धी रहाणी उच्च विचारसरणी अंगीकारक,

हे रंब, भवानी उपासक,

हुमान अनेक संपादक,

पु ण्यनगरी चे रहिवासक,

रं ध्रोरंध्री शिवाजी ठासक,

र महाराष्ट्रीयास प्रेरक,

रे शमी बोलीतून मनोवेधक,

पुरंदरे भूषण, महाराष्ट्रभूषण, पुण्यभूषण, पद्मविभूषण, शिवशाहीर, श्री बाबासाहेब पुरंदरे, आपणास आरोग्यमयी, उमेद देणारे, शांतीचे, समाधानाचे, राजा शिवछत्रपती गुणगौरव करणारे, प्रदीर्घ आयुष्य लाभलेले ••• आपली आशिष छत्रछाया, अशीच सगळ्यावर राहो••• हीच प्रार्थना •••

आणि बाबासाहेबांनी दिला, आत्मविश्वास, जिद्द, अभिमानाचा वसा,

आम्ही चालवू हा पुढे वारसा••• हे मुख वचन•••

 

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एका कथानायिकेचं दुसऱ्या कथानायिकेला पत्र… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?विविधा ?

☆ एका कथानायिकेचं दुसऱ्या कथानायिकेला पत्र… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

(एका पुस्तकातल्या कथानायिकेनं दुसऱ्या पुस्तकातल्या कथानायिकेला लिहिलेलं पत्र…)

‘पारुल‘ या हर्ष देहेजिया यांच्या अनुवादित पुस्तकातली *पारुल* ही कथानायिका आणि पु. शी. रेगे यांच्या ‘ सावित्री ‘ या पुस्तकातली *सावित्री* ही कथानायिका )

प्रिय सावित्री,

जितक्या सहजपणे मी तुला एकेरी प्रिय संबोधते तितक्याच सहजतेनं मी तुला आलिंगनही देते. आश्चर्य वाटलं असेल ना तुला? मी कोण, कुठली, तुला माहितही नाही तरीही तुला पत्र लिहिते, अनोळखी असूनही प्रेमानं आलिंगन देते. खरंय ते! अगं तुलाच काय, मलाही आश्चर्य वाटलं की, मी अशी काय वागतेय. जरी माझा स्वभाव मनमोकळा असला तरीही मी इतकी आपलेपणानं पहिल्यांदा कुणाशीच बोलत नाही. पण ही किमया मात्र तुझी आहे. तुझ्या स्वभावाची, तुझ्या व्यक्तिमत्त्वाची. आता माझी ओळख करून देते हं. अगं ही ओळख म्हणजे तरी काय? निव्वळ आपल्या सगुण अस्तित्वाचे दाखले देणं इतकंच. माणूस माणसाला ओळखायच्या आधी त्याला समजावा लागतो अन मग त्या समजण्याचं सवयीत रूपांतर झालं की तो ओळखता येतो. अशी ओळख आपली बहुदा या पत्र व्यवहारातूनच होईल.

अगं, हे सगळं बोलण्याच्या नादात तुला सांगायला विसरलेच की, मी कोण ते. मी पारुल. उत्तर भारतात राहते. एकटीच असते. हा एकटेपणा हीच खरंतर माझी मोठी ओळख. माझी कथा तुला सांगेनच नंतर कधी पण तुझी कथा जशी मला समजली तसं न राहवून मी तुला हे पत्रं लिहलं. खरंतर तुझं-माझं आयुष्य खूप वेगळं आहे. जणूकाही एका नदीचे आपण दोन काठ आहोत, समांतर असूनही कधीच न भेटणारे. खळाळणारी जीवनदायिनी नदी हीच काय ती आपल्याला जोडणारी आणि म्हणलं तर अलगही करणारी. त्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सुखदुःखात सुद्धा फरक आहे. अगं, इतकंच काय आपल्या विचारांत, जगण्यातदेखील फरक आहे. आपण दोघी वेगवेगळ्या स्वभावधर्माच्या आहोत. तू अत्यंत संयमी, प्रसंगी विरक्त आणि अत्यंत बुद्धिप्रामाण्यवादी आहेस. प्रवाहात ओली झालीस तरी तुझा काठ विरघळू देत नाहीस. तर मी काठाचं भान विसरत अधिकाधिक नदीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. तुझ्या घरात शिक्षणाचा वारसा आहे. वाचन संस्कार आहे. याउलट माझं घर साधं आहे, जीवनही साधं आहे. पतीच्या मृत्यू पश्चातलं एकाकीपण आहे. तुझ्याइतका काही शिक्षणाचा, बुद्धिप्रामाण्यवादाचा माझ्याशी संबंध आला नाही. सावित्री, तू ठरवून एखाद्या दिशेने प्रवास करणारी आहेस, तीरावर येणाऱ्या लाटांना सजगपणे सामोर जाणं तुझं ध्येय आहे. तुझ्या काठांवर उमटणारी पावलं किती खोल उमटु द्यावीत… हे तू ठरवतेस. माझं तसं नाही माझ्या काठावरची पाऊलं पाण्याच्या स्पर्शाने काठोकाठ भरतात आणि धडकणाऱ्या लाटांनी चिंब झाली की त्यातल्या ओलाव्यानं थोडी विरघळतात. माझं अस्तित्व विलीन होण्यात मी धन्यता मानते.

तुझं प्रेम… तुझा त्याग हा खरंच विशाल आहे. तुझ्या विचारांची अमर्याद ताकद हे स्त्रीत्वही जपते. तू निर्गुण निराकार प्रेमाला स्वतःत मुरवून घेतलंस तू अद्वैत साधलंस. मी सगुण प्रेमाच्या सहाय्याने निर्गुणाला शोधलं. जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा उपभाग घेऊन विलासिनी स्वरूपात मी स्वतःला साकारलं. अद्वैत साधण्यासाठी मला संघर्ष करावा लागला. मला बुद्धीशी झगडा करावा लागला. मला स्पर्शाचा आधार घ्यावासा वाटला. जीवनाचं उद्दिष्ट जसं मला कळलं तसं मला निर्गुणाचा महत्त्व कळलं. तू तर हे पहिल्यापासून जाणूनच होतीस. विचारांच्या सहाय्याने तू दोन पावलं पुढं होतीस. तरीही एक जाणवतं… तुझ्या-माझ्यात एकचं साम्य आहे, कदाचित तो जीवनदायीनीचा संगत असर असावा. नितळ, तरलता मिळवण्याची आशा. प्रेम हे जगण्याचं कारण असणं तरीही कर्तव्यपूर्तीची ओढ असणं.

अजून काय सांगू, एकाच भेटीत किती बोलावं. जे बोललेय ते तरी तर्कसंगत आहे की नाही, तेही माहित नाही. पण दोन्ही काठाचं प्रतिबिंब सामावणारी ती जीवनदायीनी आपला संवाद घडवून आणेल हे नक्की. म्हणजे निदान आता एकमेकांवर आदळणाऱ्या लाटा तरी परिचयाच्या असतील.

तुझी पारुल.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गळून पडलेली फुलं – लेखक : अज्ञात – संकलक : प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ गळून पडलेली फुलं – लेखक : अज्ञात – संकलक : प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

चालणे ही एक सामान्य क्रिया आहे. पण चालण्याचं सौंदर्य हे आहे की आपल्या आजूबाजूला घडत असलेले जीवन पाहता येते.

मी रोज सकाळी फिरायला जातो, तेव्हा मला एक वृद्ध गृहस्थ झाडाखाली पडलेली फुले उचलून मंदिरात दर्शनासाठी टोपलीत ठेवताना दिसतात. त्यांचा हा उपक्रम माझ्यात कुतूहल निर्माण करत होता.

एका सकाळी, मी त्यांना पुन्हा तेच करताना पाहिले आणि मी माझी उत्सुकता शांत करण्याचा निर्णय घेतला. मी त्यांना गळून पडलेल्या फुलांच्या ध्यासाबद्दल विचारले की इतर वृद्ध लोक तर ताजी फुले तोडतात.

मी त्याला विचारले, “सर, मी तुम्हाला नेहमी जमिनीवरून ही ताजी पडलेली फुले उचलताना पाहतो. तुम्ही त्यांचे काय करता?”

“मी ही फुले माझ्या पूजेच्या खोलीत देवतांच्या चरणी अर्पण करतो, ” त्याने अतिशय शांतपणे उत्तर दिले.

मी पहिल्यांदाच असं काही ऐकलं होतं. म्हणून, मी त्याला पुन्हा विचारले, “तुमची काही हरकत नसेल, तर मी तुम्हांला विचारू का की, झाडावर सहज तोडता येणारी फुले असताना तूम्ही ही पडलेली फुले देवाला का अर्पण करता ?”

त्याच्या उत्तराने मी थक्क झालो, “मी फुलांना त्यांचा उद्देश पूर्ण करण्यास मदत करतो – त्यांच्या शेवटच्या दिवसात देवासोबत राहण्याचा. त्यांनाही जीवन आहे; आमच्याप्रमाणे त्यांनाही त्यांच्या शेवटच्या दिवसात देवासोबत राहायचे आहे, नाही का? ” त्याने मला विचारले. मी सहमती दर्शविली.

मग तो म्हणाला, “काही लोक ज्या कळ्या अजून फुलल्या नाहीत अशा कळ्या खुडतात आणि काही फक्त नुकत्याच फुललेल्या कळ्या काढतात, त्यांना त्यांचा सुगंधही सोडू देत नाहीत किंवा त्यांचे जीवन जगू देत नाहीत. प्रत्येकजण जे सुंदर आहे ते ओरबाडतो आणि त्यातून वनस्पतीचे सौंदर्य काढून घेतो. मग पहा, ही झाडे कशी दिसतात – रंगहीन आणि निर्जन. “

तो पुढे म्हणाला, “प्रत्येक फुलाचा एक उद्देश असतो, देवासोबत राहण्याचा. प्रत्येकजण झाडांवर असलेली फुले घेतो, पण मी ती निवडत नाही. ती गळून पडणे हा फुलांचा दोष नाही. या म्हातारपणात मी कुणालाही साथ देऊ शकत नाही, पण किमान या फुलांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी मदत करू शकतो. “

मी फक्त होकार दिला, हसलो त्यांना शुभेच्छा दिल्या आणि चालू लागलो. मी चालत होतो तेव्हा माझे मन धावत होते. या नव्या प्रेरणेने आणि कल्पनेने मी निश्चय केला की यापुढे पूजेसाठी फक्त पडलेली फुले गोळा करावयाची.

दुसऱ्या दिवशी सकाळी फिरण्यासाठी गेलो असता एका झाडाखाली पडलेली फुलं मी फुलं उचलून तळहातावर ठेवली. फुले तळहातावर फुले ठेवताच, मला अंगावर रोमांच आले आणि माझे हृदय धडधडू लागले. माझ्या शरीरासाठी या फुलांबद्दल मला वाटणारा तो एक वेगळाच अनुभव होता. मी ती फुले घरी आणली, धुऊन ती कुठे असावीत तिथे म्हणजे परमेश्वराच्या चरणी ठेवली!

हा संपूर्ण अनुभव फक्त अप्रतिम होता. मला आतून खूप छान वाटलं. मला असे वाटले की मी कोणाचा तरी जीव वाचवला आहे किंवा एखाद्याला त्याच्या दुःखातून बाहेर येण्यास मदत केली आहे. फुलांचे असे समाधान मला यापूर्वी कधीच जाणवले नव्हते. आणि मला वाटते की मी असेच करत रहावं.

जे अकाली पडले आहेत त्यांना उचलून योग्य जागी ठेवा.

आयुष्यात आपल्याला नेहमी चांगल्या आणि सुंदर लोकांच्या आसपास राहायचे असते. आपल्या उंचीच्या लोकांबरोबर आपल्याला स्वतःला पहायचे असते आणि जे आपल्या उंचीच्या खाली आहेत, त्यांना आपल्यापेक्षा खाली बघायचे असते. पण, खरे समाधान तेव्हा मिळते जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो, त्यांचे जीवन चांगले बनवतो आणि त्यांना आनंद आणि आनंद साजरा करण्यास मदत करतो. – मग तो माणूस, प्राणी, पक्षी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे जीवन असो. मग फुले का नाहीत? जे पडले आहेत पदभ्रष्ट आहेत त्यांना उचला मार्गी लावा” आणि पहा तुम्हाला स्वतःला उंचावल्यासारखे वाटेल.

लेखक : अज्ञात 

संकलन : प्रा. माधव सावळे 

संग्रहिका – सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा ! – भाग-२ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा ! – भाग-२  ☆ श्री संभाजी बबन गायके 

सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा !

… अर्थात गिरीशिखरांच्या भाळी श्वासगंध रेखताना…! 

श्री. योगेश चिथडे आणि सौ. सुमेधा चिथडे यांनी सियाचीन मधील सैनिकांसाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारून देण्यासाठी केलेल्या भगीरथ प्रयत्नांची कहाणी!

(पण सत्य संकल्पाचा दाता नारायण या उक्तीनुसार जनता-जनार्दनाने मदतीचे अनेक हात पुढे केले. आणि अथक प्रयत्नांतून आवश्यक रक्कम उभी राहिली. ) – इथून पुढे)

या कामासोबतच प्रशासन, सेनादल यांचेशी समन्वय साधणे, विविध परवानग्या मिळवणे इत्यादी कामे अतिशय चिकाटीने आणि ध्यासाने पूर्ण केली! हत्ती जाईल पण शेपूट जाणार नाही अशी लूप-होल्स सर्वच ठिकाणी अनुभवाला येतातच. यावर जिद्द आणि आपल्या कामावरील विश्वास हाच उपाय! 

ऑक्सिजन निर्मिती संयंत्र जर्मनीहून आणले. त्यासाठी सर्व सोपस्कार, औपचारीकता पूर्ण केल्या. यंत्रसामग्री सियाचीन परिसरात पोहोचवणे मोठे कठीण! विमानात चढवलेले साहित्य कैक वेळा खराब हवामानामुळे पुन्हा उतरवून खाली ठेवावे लागत होते. यात चिथडे साहेबांनी सियाचीन परिसरात अनेक वेळा प्रवास आणि मुक्काम केला. तेथील हवामानाचा प्रतिकुल परिणाम चिथडे साहेबांच्या प्रकृतीवर झालाच. पण चिथडे दांमप्त्य आपल्या वीर जवानांसारखे परिस्थितीला तोंड देत राहिले. मध्येच कोरानाचे संकट उभे ठाकले, आर्थिक गणिते जुळेनात, शिवाय देणगीतील रक्कम फक्त आणि फक्त यंत्रणा खरेदीच्याच कामासाठी वापरण्याचे, वेतनावर खर्च होईल म्हणून कोणीही पगारदार साहाय्यक न नेमण्याचे, कार्याची अंमलवजावणी करण्याचा खर्च कटाक्षाने स्वकमाईच्या पैशांनी करण्याचे तत्व अंगिकारलेले असल्याने सियाचीनवरील हवामानासारखीच अनेक आव्हाने चिथडे पती-पत्नी आणि त्यांचे सहकारी यांच्यासमोर होती पण ते डगमगले नाहीत! शिवाय स्वत:वर होणारा खर्च अत्यंत अत्यावश्यक गरजेपुरताच राहील असा यांचा कटाक्ष तर प्रारंभापासूनच आहे.

या त्यागाचे, नियोजनाचे, कार्यक्षमतेचे, चिकाटीचे, ध्यासाचे फळ म्हणूनच सियाचीन मध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट अर्थात प्राणवायू निर्मिती संयंत्र उभारले गेले आणि कार्यांन्वयितही झाले. ही तारीख होती ४ ऑक्टोबर, २०१९! सियाचीन परिसरातील सैनिक, नागरीक, पर्यटक, गिर्यारोहक अशा आजपर्यंत ३५ हजार लोकांसाठी प्राणरक्षक ठरलाय हा ऑक्सिजन प्लांट! हनुमंतरायाने जणू संजीवनी बुटीसाठी सबंध द्रोणागिरी पर्वत उचलून आणण्यासारखा हा प्रकार नव्हे काय? हा प्लांट आतापर्यंत एकदाही बंद पडलेला नाही आणि ऑक्सिजन निर्मिती क्षमता आहे मिनिटाला २२४ लिटर्स! यामुळे कितीतरी जवानांचे, नागरीकांचे प्राण वाचवले जाऊ शकले! कोरोना काळात तर या प्लांटचा सर्वांनाच खूप उपयोग झाला.

दुस-या महायुद्धाच्या काळात, १९४० मध्ये डंकर्क या ठिकाणी इंग्लंड आणि दोस्त राष्ट्रांचे सैन्य शत्रूसैन्याच्या वेढ्यात अडकून पडले असताना इंग्लंडच्या जनतेने सैन्यास उत्स्फूर्त साहाय्य करून सोडवून आणले होते! यापेक्षाही चिथडे दांमप्त्याने लोकसहभाग मिळवून भारतीय सैन्याला दिलेले हे साहाय्य मोठे म्हणावे लागेल! ही तर जनतेचे प्राण वाचवणा-या सैनिकांना जनतेकडून मिळालेली फार मोठी भेट म्हणता येईल. किंबहुना हा जागतिक पातळीवरील अलौकीक विक्रमच असावा! पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी योगेशजी आणि सुमेधाजी चिथडे यांच्या कामाची वैय्यक्तिक पातळीवर दखल घेऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटीत चर्चाही केली आणि कौतुकही केले! सैन्यदल प्रमुख जनरल दिवंगत हुतात्मा बिपिनजी रावतसाहेब, मधुलिका रावत मॅडम यांनी योगेशजी आणि सुमेधाजींच्या कार्याची प्रशंसा केली होती! सेनाध्यक्ष जनरल श्री. मुकुंद नरवणेसाहेब आणि अशा अनेक दिग्गजांनी या कार्याचे कौतुक केले आहे… मुख्य म्हणजे सीमेवर लढणा-या सैनिकांचे, सियाचिन परिसरातील हजारो नागरीकांचे आशीर्वाद या कार्याला लाभले आहेत!

पण एका ऑक्सिजन प्लांटने गरज भागलेली नाही… देशाच्या इतर सीमांवर असे अजून किमान दोन प्लांट उभारण्याची चिथडे दांमप्त्याची योजना आहे कारण तशी गरजही आहे… अर्थातच यासाठी अजून मोठा पैसा लागणार आहे! वैय्यक्तिक समस्या बाजूस सारून योगेशजी आणि सुमेधाजी आता दुसरा ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारून देण्याच्या कामात व्यग्र झालेले आहेत. आता जनतेने मागे राहून चालणार नाही. सुमारे १४० कोटी नागरीकांच्या या महाकाय देशात जनतेला काय अशक्य आहे? फक्त सहृदय लोकांनी पुढे आले पाहिजे. चिथडे साहेब, सुमेधाताई यांच्या मनात आणखी बरेच उपक्रम आहेत. कर्तव्यावर असताना जखमी झाल्याने अपंग झालेले, निवृत्त झालेले सैनिक यांच्यासाठी निवासी संकुल, वीरपत्नींसाठी रोजगाराभिमुख उपक्रम, त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहाय्य इत्यादी खूप योजना आहेत. कामात आर्थिक, प्रशासकीय पारदर्शकता हे चिथडे दांमप्त्याने स्थापन केलेल्या ‘सिर्फ’ संस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे! देणगीतील प्रत्येक पै ज्यासाठी देणगी दिली गेली आहे, त्याच कामासाठी खर्च केली जाते! 

पडद्यामागील हुतात्मे!

देशाचे रक्षण म्हणजे सैनिक, देशरक्षणासाठी युद्धभूमीवर मृत्यू पावणे म्हणजे हौतात्म्य असी सामान्यजनांची समजूत असते. परंतू काही देशप्रेमी नागरीकही आपल्या नागरी जीवनात राहून सैनिकाची भूमिका बजावत असतात आणि प्रसंगी आपल्या कर्तव्यासाठी आपल्या जीवाचीही पर्वा करीत नाहीत! 

पुण्यातील योगेश चिथडे हे असेच एक नागरीक-माजी सैनिक. योगेशजींनी काही वर्षे भारतीय हवाई दलात सेवा बजावली. त्यांना सैनिक जीवनातील समस्या, आव्हाने जवळून पाहता आली. सियाचिनसारख्या जगातील सर्वाधिक उंचावर असलेल्या युद्धभूमीवर लढताना सैनिकांना अक्षरश: श्वास कमी पडतो. या सैनिकांसाठी कृत्रिक श्वास अर्थात ऑक्सिजन प्लांंट उभारण्याची अलौकिक कल्पना योगेशजींना सुचली. यासाठीचा खर्च संपूर्णपणे जनतेतूनच उभारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांच्या पत्नी सुमेधाजींनी आपल्या पतीच्या या भगीरथ प्रयत्नांमध्ये तनमनधनाने साथ दिली. आणि देशात विविध ठिकाणी कोट्यवधी रूपये मूल्य असलेले ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प स्थापित झाले. कोरोनाच्या काळातही काम सुरू होते. निधी संकलनासाठी योगेशजी आणि सुमेधाजी यांनी शेकडो व्याख्याने दिली. आणि विशेष म्हणजे या सर्व कार्यासाठी स्वत:चा पैसा वापरला. जमा झालेल्या पैशांतून एकही पैसा त्यांनी कार्याच्या खर्चसाठी वापरला नाही. योगेशजींनी प्रत्यक्ष सियाचिन परिसरात कित्येक दिवस राहून ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी अभ्यास केला. प्रत्यक्ष प्लांट कार्यान्वित करण्यासाठी विविध संस्थांशी संपर्क साधला. या सर्व खटाटोपात सियाचिनमधील अतिथंड वातावरणाचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झालाच. पण त्याची पर्वा न करता या माजी सैनिकाने आपले कर्तव्य पार पाडले. वयाच्या अवघ्या ६१व्या वर्षी योगेशजींनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या भगीरथ प्रयत्नांची दखल देशाच्या पंतप्रधानांनीही घेतली होती आणि संरक्षणदलांनीही. योगशजींंच्या मनात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठीच्या अनेक योजना होत्या आणि त्यापैकी काही त्यांनी प्रत्यक्षातही आणल्या. पण अजूनही खूप काही करायचे होते. आता यापुढे सुमेधाताईंवर सारा भार असेन. आपणही त्यांच्या कार्यात सहभागी होणे गरजेचे आहे. या पडद्यामागच्या सैनिकाला आणि त्यांच्या त्यागाला शतश: वंदन आणि भावपूर्ण श्रद्धांजली… जय हिंद योगेश साहेब! हा देश आपले योगदान कधीही विसरणार नाही. आपल्या आत्म्यास सद्गती लाभेलच कारण हुतात्मा सैनिकांच्या आत्म्यांना ती लाभतेच.

(… या कार्याला प्रत्येक भारतीय देशप्रेमी नागरीकाचा हातभार लागणे गरजेचे आहे… कारण आपल्या सैनिकांना श्वास देणे म्हणजे आपलेच श्वास जपण्यासारखे आहे ! संपर्कासाठी लॅन्डलाईन टेलिफोन क्रमांक (020-25656831) मोबाईल क्रमांक योगेशजी चिथडे (9764294291) सुमेधाजी चिथडे (9764294292) 

ईमेल:- cyogeshg@rediffmail. com, cnborole@gmail. com 

Bank of Maharashtra A/c 60273878996 (IFSC-MAHA0000243) (MICR:-411014034) 

… देशसेवेचे आव्हान आहे म्हणूनच हे आवाहन आहे. वाचकांनी निश्चितपणे विचार करावा, ही विनंती.) 

– समाप्त –

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला !‘☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला !‘ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

आज श्रीकृष्ण जन्माष्टमी !!! सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी श्रावण वद्य अष्टमीला, रोहिणी नक्षत्र, बुधवार, चंद्र वृषभ राशीला असताना रात्री बारा वाजता कृष्णाचा जन्म झाला. तेव्हापासून संपूर्ण भारतात श्रीकृष्ण जन्म साजरा करण्यात येतो.

‘कर्षति आकर्षति इति कृष्ण:’ ( जो सर्वांना आकर्षून घेतो तो कृष्ण). असे कृष्णाचे वर्णन करता येईल.

आपल्याकडे जरी तेहतीस ‘कोटी’ देव असले तरी त्यातील राम-कृष्ण या प्रमुख अवतारी देवांनी भारतीय जनमानसाला भुरळ पाडली आहे. प्रत्येक मनात रामकृष्णांनी ‘घर’ केले आहे. श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीचा म्हणून त्या दिवशी उपवास करण्याची तसेच त्याच्या दुसऱ्या दिवशी गोपाळ’काला’ करण्याची परंपरा आहे. आज सुद्धा ती परंपरा तितक्याच श्रद्धेनी सर्व ठिकाणी पाळली जाते. फक्त आता काही ठिकाणी गोपाळकाल्याचे रुपांतर ‘दहीहंडी’त झाले आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. दुर्दैवाने आज दहीहंडी ‘पैसाहंडीत’ रुपांतरीत झालेली नाही असे म्हणायचे धाडस कोणी करु शकेल असे वाटत नाही.

‘गोपाळकाला’ ह्या शब्दाचा अर्थ आज पुन्हा एकदा नव्याने समजावून घेण्याची आणि समजावून देण्याची गरज आहे असे वाटते. किती साधा शब्द आहे ‘गोपाळकाला’. ‘गो’ ‘पाळ’ आणि ‘काला’ असे तीनच शब्द आहेत. जसे गो म्हणजे गाय तसे ‘गो’ चा दुसरा अर्थ इंद्रिय असाही आहे. गायींचे पालन करणारा कृष्ण !! इंद्रियांचे पालन करणारा कृष्ण !! इंद्रियांवर जो अंकुश ठेवू शकतो तो कृष्ण!! तसेच त्याचा असाही अर्थ घेता येऊ शकतो जो इंद्रियांवर विजय प्राप्त करतो तो कृष्ण !! कृष्ण म्हणजे काळा. काळ्या रंगात सर्व रंग सामावले जातात. काळा रंग हा उष्णता शोषून घेणारा आहे. ज्याची ‘स्वीकार्यता’ (Acceptance) पराकोटीची आहे तो कृष्ण !! सर्वात कुशल व्यवस्थापक कोण असेल तर कृष्ण !! किंवा आपण त्याला ‘आद्य व्यवस्थापन कौशल्य तज्ञ’ असेही म्हणू शकतो. भगवंताने रणांगणात सांगितलेली ‘गीता’ ही व्यवस्थापन कौशल्याचा विश्वकोश म्हटला पाहिजे.

ज्या कृष्णाला जन्माला येण्याच्या आधीपासून त्याचाच मामा मारायला टपला होता, जन्म झाल्याझाल्या ज्याला आपल्या सख्ख्या आईचा वियोग सहन करावा लागला, पुढे ‘पुतना मावशी’ जीव घेण्यास तयारच होती. नंतर ‘कालियामर्दन’ असो की ‘गोवर्धन’ पूजा असो ), कृष्णाने प्रत्येक गोष्ट सामाजिक बांधिलकी ध्यानात ठेऊन आणि मनाची प्रगल्भता दाखवत केली आहे, त्यामुळे आपण त्याला आद्य समाजसुधारक म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सामान्य मनुष्याचे जीवन सुकर होण्यासाठी वेळ पडल्यास जीव सुद्धा धोक्यात घालायचा असतो तसेच प्रत्येक गोष्ट भगवंत अवतार घेऊन करेल असे न म्हणता आपणही आपल्या काठीला झेपेल इतकी सामाजिक जबाबदारी घेऊन आपले समाजाप्रती, देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडायचे असते ही शिकवण कृष्णाने वरील दोन घटनांतून दाखवून दिली आहे असे म्हणता येईल. कृष्णाचे अवघे जीवन समाजाला समर्पित असेच आहे. अख्ख्या आयुष्यात श्रीकृष्णाने एकही गोष्ट स्वतःसाठी केलेली नाही.

आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट निस्वार्थपणे करणारा कृष्ण !! आपल्या भक्तासाठी आपण दिलेले वचन मोडणारा कृष्ण !! आपल्या गरीब मित्राचाही (सुदामा) सन्मान करणारा कृष्ण !! पीडित मुलींशी विवाह करुन त्यांना प्रतिष्ठा देऊन सन्मानाने जगायला शिकविणारा कृष्णच !! महाभारतातील युद्ध टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारा कृष्ण !! युद्धात अर्जुनाला ‘कर्मयोग’ समजावून सांगणारा आणि त्यास युद्धास तयार करणारा कृष्णच !! स्वतःला बाण मारणाऱ्या व्याधास अभय देऊन कर्मसमाप्ती करणारा कृष्णच !!

श्रीकृष्णाचे जीवन म्हणजे सदैव सत्वपरीक्षा आणि कायम अस्थिरता !! किती प्रसंग सांगावेत ? सर्वच गोड !! कृष्णाचा प्रेम गोड! कृष्णाचे भांडण गोड!, कृष्णाचे मित्रत्व गोड!, कृष्णाचे शत्रुत्व गोड! कृष्णाचे वक्तृत्व गोड! कृष्णाचे कर्तृत्व गोड! कृष्णाचे पलायन गोड! कृष्णाचा पराक्रम गोड! कृष्णाची चोरी गोड! कृष्णाचे शिरजोरी गोड! अवघा कृष्णच गोड! मधुर !!!

कृष्णाचा जन्म हा रात्रीचा म्हणजे स्वाभाविक अंधारातील आहे. आईच्या गर्भात देखील अंधारच असतो. सामान्य मनुष्याला पुढील क्षणी काय घडणार आहे याचे किंचित कल्पना देखील नसते. एका अर्थाने त्याच्या समोर कायम अंधार असतो. या अंधारातून मार्ग कसा काढायचा? हा मनुष्यापुढील मूलभूत प्रश्न आहे. याचे उत्तर आपल्याला भगवान कृष्ण आपल्या चरित्रातून देतात. कृष्णचरित्र म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला / घटनेला ‘प्रतिसाद’ देत ‘आनंदात’ कसे जगायचे ह्याचा वस्तुपाठच ! आज सुद्धा कृष्णासारखे आचरण करुन सामान्य मनुष्य ‘कृष्ण’ होऊ शकतो. कृष्णाला यासाठीच ‘पुरुषोत्तम’ असे म्हटले जाते.

राम-कृष्ण यांना ‘अवतारी’ पुरुष ठरवून, त्यांचे उत्सव साजरे करुन आपले ‘कर्तव्य’ संपणार नाही. मग तो रामाचा जन्म असो की कृष्णाचा. येथील प्रत्येकाने महापुरुषाने मनुष्य म्हणूनच या भरतभूमीत जन्म घेतला आणि आपल्या असामान्य कर्तृत्वाने त्यांनी ‘याची देही याची डोळा’ ‘सामान्य मनुष्य’ ते ‘भगवान रामकृष्ण’ असा दिग्विजयी प्रवास केला असे इतिहास सांगतो. आपला ‘इतिहास’ खरा रामकृष्णांपासून सुरु होतो पण दुर्दैवानेआपण त्याला ‘मिथक’ मानतो. हीच खरी आपली शोकांतिका आहे. ( भारतीय ‘मानचित्रा’तील

(सांस्कृतिक नकाशा) ‘श्रीकृष्णमार्ग’ आणि ‘श्रीराममार्ग’ बघितला तर हे दोन्ही नरोत्तम आपल्या सांस्कृतिक एकतेचे प्रतिक आहेत हे आपल्या सहज लक्षात येईल. ‘द्वारका ते प्रागज्योतिषपूर’ आणि ‘अयोध्या ते रामेश्वरम्’ असे हे भारताच्या चारी कोपऱ्यांना जोडणारे आणि राष्ट्रीय एकात्मता जपणारे पुरातन मार्ग आहेत.

सध्या असे मानले जाते की देवांची षोडशोपचारे पूजा केली, त्यांचे उत्सव धुमधडाक्यात साजरे केले म्हणजे आमची त्यांच्याप्रति असलेली इतिकर्तव्यता संपली. सध्या सर्व देवतांचे उत्सव आपण ‘समारंभ’ (इव्हेंट) म्हणून साजरे करीत आहोत असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सर्व उत्सवातील ‘पावित्र्य’ आणि उत्सव साजरा करण्याच्या पाठीमागील ‘मर्म’ आपण सध्या विसरुन गेलो आहोत की काय? असे वाटावे अशी आजची परिस्थिती आहे. ‘गोपाळकाल्या’ तील कोणत्याच शब्दाला आपण सध्या न्याय देऊ शकत नाही असे वाटते. आधुनिककाळानुसार गोपाळकाला साजरा करताना त्यात योग्य ते बदल नक्कीच करायला हवेत पण त्यातील ‘मर्म’ मात्र विसरता कामा नये. सध्याच्या उत्सवात ना ‘गो’ (गायींचे ना इंद्रियांचे) चे रक्षण होते ना कसला ‘काला’ होतो. सर्वांचे सुखदुःख वाटून घेणे किंवा सर्वांच्या सुखदुःखात नुसते सहभागी न होता समरस होणे म्हणजे ‘काला’. ज्याला ‘श्रीकृष्णाचा काला’ समजला त्याला वेगळा ‘साम्यवाद’ (मार्क्सवाद नव्हे!) शिकायची गरज नाही.

श्रीकृष्णाचा जन्म गोकुळात झाला हे खरेच आहे. ‘गोकुळ’ म्हणजे आपले शरीर ! श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे की मन म्हणजे मीच आहे. ‘त्या’ गोकुळात झालेला श्रीकृष्णाचा जन्म आपण सगळे अनेक वर्षे साजरे करीत आहोत. श्री सदगुरु गोंदवलेकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा प्रत्येकाच्या मनात श्रीकृष्णाचा जन्म होईल तोच खरा सुदिन !!!

राम कृष्ण हरी ।।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्रीखंड, पाडवा आणि फटक्याची गोष्ट… – भाग-२ ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ श्रीखंड, पाडवा आणि फटक्याची गोष्ट… – भाग-१ ☆ सुश्री शीला पतकी 

(शिक्षा सुनावल्यावर हे दोघे मोठ्याने घोषणा देत राहिले, ” वंदे मातरम जय श्रीराम भारतमाता कि जय”त्यांना ओढत शिपायाने बांधण्यासाठी नेले त्यांचे हात बांधून ठेवले आणि पाठीवरती वीस फटके मारायला सुरुवात केली.) – इथून पुढे — 

कोवळी वीस वर्षाची पोरं त्यांच्या उघड्या पाठीवरती फटाफट फटकारे मारले जात होते वेदना होत होत्या पण ओठ दाताखाली दाबून ते घोषणा देत होते, ” वंदे मातरम भारत माता की जय” आणि हा जयघोष त्यांना वेदना सोसण्याचे बळ देत होता… शेवटी पाठीतून रक्त यायला लागले फटके देणारा खाली बसला संध्याकाळी पाच वाजता त्या दोघांना खाली उतरवण्यात आले हात खाली करता येत नव्हते कारण काखेत गोळे आलेले होते चार दिवस त्यांना पडून राहावे लागले वेदनाने जीव कळवळत होता पण चेहऱ्यावर ते दाखवत नव्हते त्यांना आनंद या गोष्टीचा होता की आमचा सण पाडवा वर्षाची सुरुवात आम्ही साजरी केली आणि इंग्रजांना एक प्रकारचा शह दिला

ही गोष्ट सांगताना मी अनेक गोष्टी त्यांना समजून सांगत होते.. की या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अशा छोट्या छोट्या व्यक्तींनीही खूप काम केले आहे श्रीखंड खाऊन दाखवणे हा त्यांच्या त्या वयातला इंग्रजांच्या विरुद्ध करावयाचा कट होता त्या सत्तेला त्यांना डिवचायचे होते पण त्याची त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागली पण देशासाठी ती आनंदाने त्यांनी मोजली

हे सर्व कथन करत असताना मुलीही गंभीर झाल्या होत्या माझे डोळे पाणावले होते मी मुलींना शेवटी एवढेच म्हणाले मुलींनो इतक्या अनेक गोष्टींनी ज्यांनी त्याग केला आहे त्यामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य आज उपभोक्ता येत आहे आपल्याला आपल्या देशाचा अभिमान वाटला पाहिजे की आपल्या देशातली तरुणाई स्वातंत्र्य मिळावे म्हणून किती झटली आहे आपण फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला येऊन त्यांचे स्मरण करतो आणि झेंड्याला मानवंदना देताना त्यांच्या प्रती ही कृतज्ञता व्यक्त करत असतो म्हणून त्या दिवशी सर्वांनी हजर व्हायचे असते अर्थात ज्याना या घटनेशी काही देणंघेणं नाही ती मंडळी ती सुट्टी एन्जॉय करतात हे दुर्दैव आहे आणि मुलींनो तुम्ही तरी सगळ्या हुशार मुलींचा वर्ग डिस्टिंक्शन मध्ये येणारा वर्ग… तुमच्यापुढे अभ्यासाव्यतिरिक्त काही दिसत नाही त्यामुळे तुम्हाला 15 ऑगस्ट ला उपस्थित राहण्याची गरज वाटत नाही कारण देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या अनेक लोकांबरोबर हे चार तरुण जे होते त्यात दोन तरुणातला एक माझा “बाप” होता भगवान मुकुंद पत्की आणि दुसरे होते माझे काका मोहोळचे डॉक्टर श्रीनिवास जोशी! त्यात तुमचे वडिल नव्हते या दोन तरुणांनी हे भोगलं होतं तुम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं? तेव्हा तुम्ही उद्याला येण्याची काहीच गरज वाटत नाही. स्वातंत्र्य दिनाचे नातं माझ्याशी आहे मला त्याची जाण आहे माझ्या वडिलांनी सोसलेल्या हाल अपेष्टा मला ठाऊक आहेत मुलींनो झेंडा जेव्हा वर जातो ना तेव्हा माझे डोळे भरून येतात उर अभिमानाने भरून येतो आणि वाटतं की हा झेंडा फडकवण्याच भाग्य आपल्याला लाभतंय त्याचं कारण अनेकांचा त्याग आणि त्या त्यागामध्ये ज्या व्यक्तीचा सहभाग आहे अशा व्यक्तीची मी मुलगी आहे याचा मला अभिमान वाटतो…. तुम्हाला तसं काही वाटण्याचं कारण नाहीये तेव्हा कोणीही 15 ऑगस्टला उपस्थित राहावयाचे नाही आणि मी वर्गातून धाडकन निघून आले….. ! शेवटचे वाक्य बोलताना मी आवंढे गिळत होते माझे डोळे पाण्याने भरले होते मुली चिडीचूप होत्या त्यांचे डोळे ओलावले होते दुसऱ्या दिवशी आठवीच्या ओळीवर सगळ्या मुली हजर होत्या. वाचक हो हे लिहिताना आजही माझे डोळे भरून येतात मी वर्गातल्या एकाही मुलीशी बोलत नव्हते झेंडावंदन झाल्यावर सगळा वर्ग थांबला मॉनिटर ने मला आजची हजेरी घेतली आहे आणि ती मध्ये सर्व वर्ग हजर आहे असे सांगितले आणि आम्ही जे परवा वागलो त्याबद्दल आम्हाला क्षमा करा असे म्हणत मुली हात जोडून माझ्यासमोर उभ्या होत्या मी मॉनिटरला जवळ घेतल आणि म्हणाले, ” कशा ग तुम्ही अशा.. कस समजत नाही तुम्हाला… तुम्ही वेड्याही आहात आणि शहाण्या हि आहात.. माझे डोळे आनंदाने पाणावले होते माझा राग मावळला हे पाहून सर्वांनी टाळ्या वाजवल्या.. तो 15 ऑगस्ट चा दिवस मी कधीच विसरत नाही पुढे 14 साली आमचा माजी विद्यार्थिनी मेळावा झाला त्यात एका मुलीने उठून आठवण सांगितली बाई तुम्ही तुमच्या बाबांची आम्हाला गोष्ट सांगितली होती.. श्रीखंडाची… आजही मी आमच्या कॉलनीमध्ये झेंडावंदनाला उपस्थित राहणारी पहिली असते आणि मुंबई सारख्या ठिकाणी मी माझ्या मुलांना शाळेत पाठवते त्यांना झेंडावंदन चुकवू देत नाही त्यांनाही मी तुमच्या बाबांची गोष्ट सांगितली आहे हे म्हणजे रुजलेल्या संस्काराची परत पावती होती तरुण पिढीला हे सतत सांगायला हवे… सांगणारी माणसं कमी पडत आहेत.. म्हणून पुढच्या पिढीवर संस्कार कमी झाला आहे हे सगळं समजून सांगणारे भेटले तर आजही आपली येणारी पिढी नक्कीच सुजाण असेल देशभक्ती आणि देश प्रेम हे त्यांच्या नसानसात बिंबवलं पाहिजे सोनार बांगला लिहिणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांच्या मूर्तीचा भंग हे ज्याने पाहिलं आणि बांगलादेशी च्या तरुणाचा नंगानाच ज्यांनी पाहिला त्या सर्वांना या गोष्टीची तीव्रतेने जाणीव होईल कि हे आपल्या मुलांनी असे करायला नको आहे राष्ट्रप्रेम आणि सुसंस्कार हे दोन्ही देण्याची गरज आहे राष्ट्र नुसते समृद्ध असून चालत नाही ते सुसंस्कारित पाहिजे आणि प्रत्येकाचे आपल्या राष्ट्रावर प्रेम पाहिजे… जय हिंद!!!

वंदेमातरम !!!

– समाप्त –

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा ! – भाग-१ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा ! – भाग-१ ☆ श्री संभाजी बबन गायके 

सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा !

… अर्थात गिरीशिखरांच्या भाळी श्वासगंध रेखताना…! 

श्री. योगेश चिथडे आणि सौ. सुमेधा चिथडे यांनी सियाचीन मधील सैनिकांसाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारून देण्यासाठी केलेल्या भगीरथ प्रयत्नांची कहाणी!

सियाचीन या जगातील सर्वाधिक उंचावर असलेल्या युद्धभूमीमध्ये आणि लगतच्या शेकडो किलोमीटर्स परिसरात श्वास दुर्लभ आहे. सपाटीवर मुबलकतेचा अंगरखा पांघरून वा-यासवे पिंगा घालणारा प्राणवायू शिखरावर चढता-चढता अगदी मलूल झालेला असतो. खोल डोहात बुडी मारून तळावर पहुडलेला एखादा शिंपला वर आणावा तसा प्रत्येक श्वास सैनिकांना आसमंतातून कुडीत ओढून घ्यावा लागतो…. शिंपल्यातून मोती मिळवावा तसा! 

सैनिक देहाच्या माळावर श्वासांचं शिंपण करतात ते सीमांचं रक्षण करण्यासाठी…. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत! ह्या श्वासांचं आयुष्य वाढवायला हवं हा विचार छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा पुण्य-प्रभाव असलेल्या एका सहृदय दांमप्त्याच्या हृदयावर कोरला गेला तो परमवीर चक्र विजेते ऑनररी कॅप्टन श्री. बानासिंग यांच्या एका वाक्यामुळे!

श्री. योगेशजी चिथडे भारतीय हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर बँकिंग क्षेत्रात तर सौ. सुमेधाताई चिथडे या त्यांच्या सहधर्मचारीणी पुणे शहरात शिक्षिका म्हणून कार्यरत. चिथडे दांम्पत्याचे एकुलते एक चिरंजीव देशाच्या सीमेवर भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. प्रवाहपतिताप्रमाणे जीवन जगणे योगेशजींना आणि सुमेधाताईंना पसंत नाही. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे ‘देहातून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो आणि आपण या देशाचे काही देणे लागतो’ हे सुमेधाताईंच्या मनात रूजलेले वाक्य! अंगावर लष्करी गणवेश नसला तरी देशसेवा बजावता येते हे सुमेधाताईंनी योगेशरावांच्या साथीने अंगिकारलेल्या कार्यातून दाखवून दिले. हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचे, वीरपत्नींचे अश्रू पुसण्याचा वसा या दोघांनी घेतला आणि प्रत्यक्षात गावा-गावात जाऊन काम सुरू केले. सणावाराला या वीरपत्नींना, वीरमातांना आपल्या घरी माहेरपणाला आणणे, त्यांच्या घरी सणासुदीचे खाद्यपदार्थ पोहोचवणे, आर्थिक नियोजन करण्यात जमेल ते मार्गदर्शन करणे इत्यादी कार्य हे दांमप्त्य केवळ स्वबळावर आणि स्वयंस्फूर्तीने करीत होतेच. यानिमित्ताने त्यांचा सैनिकीसेवेमधील अनेकांशी निकटचा संबंध आला. शूरवीरांचा सन्मान करण्याच्या अशाच एका उपक्रमात परमवीर चक्र विजेते ऑनररी कॅपन बानासिंग साहेब यांचे चिथडे कुटुंबात येणे झाले आणि ‘आम्ही सैनिकांसाठी आणखी काय करू शकतो?’ या सुमेधाताईंच्या प्रश्नावर बानासिंग साहेबांनी उत्तर दिले होते… जवानों की सांसों के लिए कुछ कर सकते है तो किजिए…. सैनिकांच्या श्वासांसाठी काही करता आले तर करा!” 

ह्या एका वाक्याने चिथडे पती-पत्नींना एक वेगळीच दिशा दाखवली. त्यांनी तत्परतेने या दिशेला आपला मोर्चा वळवला. सियाचीन आणि आसपासचा परिसर ऑक्सिजनच्या कमतरतेसाठी कुप्रसिद्ध आहे. सीमांचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैन्याला सियाचीन आणि परिसरात मोठ्या प्रमाणात जवान तैनात ठेवावे लागतातच. एका आकडेवारीनुसार सियाचीन या जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या युद्धभूमीवर आणि परिसरात आज पर्यंत सुमारे अकराशे सैनिक देशरक्षणाच्या कर्तव्यावर असताना हुतात्मा झालेले असून यातील सर्वाधिक बळी हिमप्रपात, हिमस्खलन आणि विशेषत: श्वसनासंबंधींच्या आजारांनी घेतलेले आहेत! म्हणजे येथील सर्वांत मोठा शत्रू म्हणजे हवामान… इथल्या वातावरणातील ऑक्सिजनचा कमालीचा तुटवडा आणि जीवघेणी थंडी! 

High Altitude Pulmonary Oedema, Acute Mountain Sickness, Frost Bite Chilblains, Hypothermia, Snow Blindness हे सियाचीन मध्ये तैनात सैनिकांना आणि परिसरातील नागरीकांना भेडसावणारे जीवघेणे आजार. या आजारांवरील सर्वांत महत्त्वाचा उपचार म्हणजे रूग्णाला कृत्रिम ऑक्सिजन देणे! 

सियाचीन जवळ परतापूर येथे भारतीय लष्कराचे विशेष रूग्णालय कार्यरत आहे… याला सार्थ नाव आहे… Siachen Healer… to heal म्हणजे बरे करणे! या रूग्णालयात केवळ सैनिकच नव्हेत तर आसपासचे नागरीक, पर्यटक, गिर्यारोहक यांनाही आरोग्यसेवा पुरविल्या जातात. इतर ठिकाणांहून ऑक्सिजनचा पुरवठा नियमितपणे करणे सियाचीनमधील लहरी हवामानामुळे कठीण असते. म्हणून या ठिकाणी कृत्रिमरित्या ऑक्सिजन निर्मितीची गरज असते आणि तशी सुविधाही भारतीय लष्कराने उपलब्ध करून दिली आहे. बाणासिंग साहेबांच्या सोबत झालेल्या संभाषणातून ह्या यंत्रणेला अत्याधुनिकतेची जोड देण्याची गरज आहे हे चिथडे दांम्पत्याने ओळखले आणि चिकित्सक अभ्यास सुरू केला. १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सैन्याने मोठा पराक्रम गाजवला होता, पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांना दाती तृण धरून शरण येण्यास भाग पाडले होते. या अलौकीक पराक्रमाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष जवळ येऊन ठेपले होते. यानिमित्त भारतीय सैनिकांना अभिवादन म्हणून भारतीय जनतेच्या स्वयंस्फूर्त आर्थिक सहभागातून ‘ऑक्सिजन निर्मितीचा अत्याधुनिक, सुसज्ज प्लांट भेट म्हणून देण्याची कल्पना श्री. योगेश चिथडे आणि सौ. सुमेधाताई योगेश चिथडे यांना सुचली! ही एक खरोखर अभूतपूर्व कल्पना होती! सरकार, सैन्य तर आपल्या सैनिकांच्या कल्याणाची तजवीज कायमच करीत असते, पण नागरीकांचाही यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा असतो. देश आपल्यासाठी काय करतो, यापेक्षा आपण देशासाठी काय करतो असा प्रश्न प्रत्येकाला खरा तर पडलाच पाहिजे!

 खरं तर हे काम म्हणजे स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणण्यासारखे मोठे काम होते. भरपूर संशोधन केल्यानंतर चिथडे साहेबांनी जर्मनीतील एक कंपनी ऑक्सिजन यंत्रणा पुरवू शकेल हे शोधून काढले. पण ही यंत्रणा विकत घेणे, वाहतूक करणे, यंत्रणा प्रत्यक्ष कार्यांन्वयित करणे यासाठी सुमारे अडीच कोटी इतका मोठा खर्च येणार हेही दिसले! शिवाय विविध प्रशासकीय परवानग्या मिळवणे, विविध यंत्रणांशी संपर्क साधणे, त्यांना योजना समजावणे इत्यादी आव्हाने तर होतीच. पण चिथडे पती-पत्नींनी हे शिवधनुष्य स्वत: पुढाकार घेऊन पेलण्याचा प्रण केला! पैशांचं सोंग आणणे अशक्यच असते. देशप्रेमी लोकांकडून आर्थिक सहाय्य मिळवणे हा एकमेव मार्ग होता. गरज अडीच कोटी रूपयांची होती! सुमेधाताईंनी आपल्या अंगावर असलेले सुवर्णालंकार विकले आणि त्यातून आलेले एक लाख पंचवीस हजार आठशे पंधरा रूपये ‘सिर्फ’ मध्ये जमा केले आणि ऑक्सिजन प्लांट साठी निधी संकलनाच्या कार्याचा सुवर्ण-शुभारंभ केला! ‘सिर्फ’ म्हणजे आकड्यांनंतर लिहिला जाणारा ‘फक्त’ या अर्थाचा शब्द नव्हे! योगेशराव आणि सुमेधाताई खूप आधी पासूनच सैनिकांसाठी, वीरपत्नींसाठी, त्यांच्या मुलांसाठी, वीरमाता-पित्यांसाठी अगदी ग्रामीण भागात जाऊन काम केलेले आहे! त्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन ‘Soldiers’ Independent Rehabilitation Foundation(SIRF) अर्थात ‘सिर्फ’ ही सामाजिक संस्था स्थापन केली आहे. आधी केले आणि मग सांगितले या उक्तीनुसार कार्यास सुरूवात केल्यामुळे योगेशराव आणि सुमेधाताईंना या अभूतपूर्व उपक्रमासाठी निधी देण्याचे आवाहन इतरांना करण्याचे नैतिक बळ प्राप्त झाले. योगेशजी आणि सुमेधाजी आपापल्या नोक-या सांभाळून निधी-संकलनाच्या कार्याला लागले. सियाचीनची, तिथल्या भौगोलीक, हवामान-विषयक, आरोग्यविषयक बाबींची माहिती मिळवली, मूळ समस्या, तिच्यावरील उपाय याचा सविस्तर विचार केला. यावर आधारीत पीपीटी प्रेझेंटेशन तयार केले आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातील हजारो लोकांना दाखवले आणि सैनिकांच्या श्वासांसाठी सामान्य जनतेच्या भावनांना साद घातली. निधी-संकलनाच्या यानिमित्ताने चिथडे पती-पत्नींना आलेल्या ब-या-वाईट अनुभवांचे तर एक पुस्तकच तयार होईल! वृद्धाश्रमात राहणारी आणि तिच्या लेकाने खाऊसाठी दिलेले वीस रूपये सैनिकांसाठी देणारी एक माता, माझा वर्षभराचा पगार घ्या असे म्हणणारी एक मोलकरीण भगिनी, बोहनी झालेली नसतानाही गल्ल्यातील एकावन्न रूपये काढून देणारा गरीब भाजी विक्रेता, आमच्या काही महिन्यांच्या पेन्शनची रक्कम या कार्यासाठी घ्या असे म्हणणा-या वीरपत्नी, आपले खाऊचे पैसे देणारी एक आठ-नऊ वर्षांची बालिका असे ‘नाही रे’ गटातील एका बाजूला आणि ‘आहे रे’ गटातील काही कंजुष श्रीमंत एका बाजूला! आपल्या विचाराच्या प्रचारासाठी सुमेधाताईंनी तेरा दिवस तेरा घरांमध्ये जाऊन प्रबोधन करण्याचे व्रतही पार पाडले! योगेशजींच्या समवेत चार हजारांहून अधिक कुटुंबांशी, अनेक संस्था, व्यक्ती यांचेशी संपर्क साधला. स्वत:चे वैय्यक्तिक आयुष्य, सणसमारंभ, कौटुंबिक समारंभ दूर ठेवले. तरीही पुरेशी रक्कम जमा होत नाहीये असे पाहून स्वत:चे राहते घरही विकण्याची तयारी केली. पण सत्य संकल्पाचा दाता नारायण या उक्तीनुसार जनता-जनार्दनाने मदतीचे अनेक हात पुढे केले. आणि अथक प्रयत्नांतून आवश्यक रक्कम उभी राहिली.

– क्रमशः भाग पहिला.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares