मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “अटकेपारचा भगवा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “अटकेपारचा भगवा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

सौरभ तुझं कौतुक करावं तेव्हढं थोडं आहे. नव्हे नव्हे ते शब्दातीत आहे हेच खरं. जगाच्या भुकेला भाकरी देणाऱ्या त्या टोपी करांच्या अमेरिकन देशात शिक्षण घेऊन पुढील नोकरी व्यवसायात भक्कमपणे पाय रोवून राहिलास… आपली बुद्धिमत्ता नि कौशल्य दाखवून त्या गोऱ्या सायेबाला भारतीय काय चीज असते हे दाखवून दिलास.. जिथं शिष्टाचार चा धर्म नि घड्याळाचा पायबंद असतो अशी व्यावसायिकतेच्या मानसिकतेचा आपदधर्म मानला जातो आणि कर्तव्यापुढे बाकी सारी गोष्टी फिजूल मानल्या जातात या तत्त्वनिष्ठेची विचारसरणीचा लोकमानस..अश्या ठिकाणी तू आपल्या कर्मनिष्ठेला एका उंचीवर नेऊन ठेवलसं… हे किती प्रशंसनीय आहे.. तू भारतीय त्यात मुंबई कर  असल्याने आमचा उर अधिक अभिमानाने भरून येतो… या शिवाय तुझा क्रिकेट खेळाची आवड मनापासून जपली नाहीस तर त्यासाठी वेळ देऊन सराव केलास.. जीव तोडून मेहनत घेतलीस… त्या युएसए च्या क्रिकेट संघात प्रमुख गोलंदाज म्हणून निवड झाली.. ती निवड किती सार्थ होती हे त्या ट्वेंटी२० च्या विश्वचषक 2024च्या   पहिल्या प्राथमिक सामन्यात दाखवून दिलसं.. बलाढ्य नि चिवट असलेल्या पाकिस्तानी संघाला धूळ चारलीस.. भारतीय संघातले दोन दिग्गज मोठ्या फलंदाजानां पहिल्या दोन षटकातच तंबूचा रस्ता दाखविलास… तुझी हि देदीप्यमान कामगिरी पाहून आपल्या देशातील क्रिकेट नियामक मंडळाला  खेळात राजकारण आणल्याने किती घोडचूक होऊन बसते याचा न दिसणारा पश्चताप जाणवून गेला…तसा तुमचा युएसए चा संघ सरमिसळ खेळाडूंचा असला तरीही त्यात जबरदस्त बाॅंन्डींग आहे  हे दिसून येत होतं…युएसए मधे आजवर क्रिकेट खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर होत नसे पण तोच आता तुमच्या या संघाची विजयी घौडदौड पाहता हा खेळ लवकरच या देशाच्या मातीवर बहरणार यात शंका नको… सौरभ तुला व्यतिश: आणि तुझ्या संघाला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा… तूझी खेळातली प्रगतीची कमान चढती राहो…  एक मराठी माणूस केवळ आपल्याच भुमीत राहून नव्हे तर साता समुद्राच्या पलीकडे जरी गेला तरी आपल्या कर्तबगारीचा झेंडा फडकवत असतो.. हेच यातून दिसून येतं.. किती लिहू नि किती नको असं वाटून गेलयं.. आमचीच दृष्ट लागू नये म्हणून हा लेखप्रपंच इथेच थांबवतो…

जाता जाता सौरभ आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहून गेला. तो म्हणजे तू  ज्या ऑर्गनायझेशन मधे सेवा देत आहेस तिथल्या तुझे सगळ्या बाॅस ना  माझा मानाचा मुजरा सांग बरं… त्यांनी तूझ्या खेळात यत्किंचितही आडकाठी उभी केली नाही.. उलट जसं जसे  संघाची  एकापाठोपाठ एक विजयी घोडदौड सुरू झाली आणि त्यांनी तुला चक्क हि स्पर्धा पूर्ण होईपर्यंत विशेष रजेची सुट दिली…तिथेच व्यवस्थापन नि एम्पाॅलई यांचं सुंदर निकोप नातं दिसून आलं.. देशाचं नावं, कंपनीचं नावं नि खेळाडूचं नावं याला त्या ऑर्गनायझेशनने प्राधान्य दिलं… नाहीतर आपल्या इकडे साहेब नावाचा खडूस नमुना कायमस्वरूपी एम्पाॅलईजच्या मानगुटीवर बसलेला दशमग्रह… साधी गरजेसाठी घ्यावी लागणारी किरकोळ रजा नामंजूर करण्यात ज्याला आसुरी आनंद घेण्यासाठीच जन्माला आलेला असतो ,तो काय खेळाच्या सरावासाठी अर्ध्या दिवसाची सवलत, सामने खेळायला विशेष रजेची मंजुरी किंवा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा, सामने असले नि आपलाच एम्पाॅलई त्यात एक खेळाडू सहभागी आहे याचं थोडंतरी कौतुक, खिलाडूवृत्ती दाखविण्याची सुतराम शक्यता नाहीच… सांगायचं इतकंच प्रगतीपथावर असलेल्या आमच्या देशाला अजून बऱ्याच गोष्टी प्रगतीशील देशाकडून शिकण्यासाठी बराच वाव आहे… बरं झालं तू युएसए मध्ये   आहेस आणि त्यांच्या संघातून खेळतोस… इथं असतास तर … सौरभ नेत्रावळकर एक इंजिनियर एव्हढीच माफक पुसटशी ओळख मिळाली असती….

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “स्पर्श मायेचा…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “स्पर्श मायेचा…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

एका केअर सेंटरला…..म्हणजे  वृद्धाश्रमाला भेट द्यायला गेले होते.  त्या दिवशी तिथे दोन मुली येऊन खुर्चीवर बसून ..करायचे हातापायाचे व्यायाम शिकवणार होत्या. मी इकडे तिकडे फिरत आश्रम बघत होते.

एक सावळा हसतमुख मुलगा पायाने थोडा लंगडणारा त्याची गप्पा मारत लगबग चालू होती. तो तिथला मदतनीस असावा.  

” ए आजी तुला रोज गाऊन मध्ये बघतो आज साडी नेसलीस तर छान दिसते आहेस . इतकी कशाला नटली आहेस? ….काय दाखवायचा कार्यक्रम आहे का ? “

” हो आता 75  व्या वर्षी करते परत लग्न “ती हसत हसत बोलली.

” ए  आजी चल आटप… तुझे ते दोन घास राहिले आहेत ते खाऊन घे”

” अगं आजे झालं उन्हात बसून… चल आता आत ये .. चक्कर येईल नाहीतर”

ए आजी ….ए आजे…असं म्हणत तो सगळ्यांशी गप्पा मारत होता. इतक्यात एका आजींनी त्याला हाक मारली ..

“अरे जरा इकडे ये. हे बघ आजच सुनबाईनी बेसनाचे लाडू पाठवलेत. खाऊन बघ बरं …”

त्यानी येऊन लाडू हातात घेतला…खात खात म्हणाला

” एकदम बेस्ट झालेत . सुनबाईंना सांगा.”

तो पायाने अधू होता पण चलाख होता .त्याच्या बोलण्यात माया होती.. प्रेम होत… त्यामुळे त्या म्हाताऱ्या माणसांचा काही दिवसातच तो आवडता झालेला होता.

” अगं आजी  टेबलावर  औषधाची गोळी विसरलीस नेहमीसारखी… आधी घे बघ बरं “

” बरं बाबा तुझ्या लक्षात येतं नाही तर माझ्या बीपीचं काही खरं  नव्हतं बघ….”

” चला चला आज व्यायाम शिकायचा आहे ना”..

अस म्हणून त्यानी सगळ्यांना बाहेर आणून खुर्चीवर बसवायला सुरुवात केली. 

एका आजीची ओढणी त्यांच्या पायात येत होती …. “कशाला घेतलीस ती ओढणी? पायात अडकून तूच पडशील बघ.. कोण बघतय तुला ? ” .. अस म्हणून त्यानीच ती काढून आत कॉटवर नेऊन ठेवली.

सगळ्याजणी येऊन बसल्यावर त्या मुली शिकवायला लागल्या .

तो त्यांचा व्हिडिओ काढायला लागला.

” अरे सगळे इतके गंभीर का? जरा हसा की…. ओ ताई तुम्ही त्यांना हसत हसत करायला सांगा बरं…”

 मग त्यानीच हात वर केले की   हा.. हा..  हा  …म्हणून हसायला सांगितलं.

वातावरणच बदललं .त्या मुलींना पण शिकवायला गंमत वाटायला लागली.

इतरांना हसवणाऱ्या त्या मुलाकडे मी बघत होते. त्या लेकराच्या जीवनात कसला आनंद होता? तरी तो इतरांना आनंदी  ठेवत होता …

सगळ्यांचा तो लाडका होता.. ते पण आपुलकीने ,मायेने त्याच्याशी बोलत होते .आज माझे लक्ष त्याच्याकडेच होते.

“इतका वेळ बसलीस तर पाठ दुखेल तुझी “

असं म्हणून एका आजींना आधार देऊन तो रूममध्ये घेऊन जायला लागला.

मी त्याच्याकडे बघत होते .सहजपणे आपुलकीने तो वागत होता.तो तिथेच रहात होता…ह्या वयस्कर लोकांची सेवा करत होता.

आजकाल अस कोणाला बघीतलं की डोळे आपोआप भरून येतात. शिकत राहते त्यांच्याकडून….

… माझ्याही जीवनात अमलात आणायचा प्रयत्न करते..

त्या दोन मुली शिकवत होत्या .

अर्ध्या तासानी जेवायची वेळ होणार होती. तो  सगळ्यांच्या रूममध्ये जाऊन  जगमध्ये पाणी भरायला लागला होता.

…. प्रत्यक्ष पांडुरंग एकनाथांच्या घरी श्रीखंड्या  बनुन पाणी भरत होता…….

 त्याचीच आठवण आली…

मला आज त्या मुलामध्ये पांडुरंग दिसला .

सोन्याचे दागिने ,झगमग कपडे, हार फुलं नसलेले हेच साधे भोळे लोक साक्षात देव असतात …..

आपल्याच आसपास…..  नीट बघितलं की दिसतात…

 एक विनवणी करते रे ……

 आता त्यांच्यातच  तुला बघायची दृष्टी दे रे पांडुरंगा…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इथे खरोखरंच ओशाळला मृत्यू !… – लेखक : विद्याधर गणेश आठवले ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

? इंद्रधनुष्य ?

☆  इथे खरोखरंच ओशाळला मृत्यू !… – लेखक : विद्याधर गणेश आठवले ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

दोन वर्ष पूर्ण व्हायच्या आतच आमच्या स्क्वाड्रनला पुन्हा हलवण्याचा निर्णय झाला. आम्ही सगळा मांडलेला पसारा आवरून जामनगरला आलो. अजूनही आमच्याकडे तीच जुनीपुराणी हंटर विमानं होती आणि नवीन विमानं मिळण्याची शक्यता दुरापास्त असल्यामुळे आम्ही याचा पार्ट त्याला, त्याचा पार्ट याला करत करत शिळ्या कढीला ऊत आणण्यासाठी झटत होतो ! 

जामनगरला पठाणकोट सारखंच प्रचंड मोठं एअर फोर्स स्टेशन होतं. खूप मोठा टेक्निकल एरिया, खूप मोठा डोमेस्टिक एरिया, सिनेमा थिएटर, स्विमिंग पूल, रिक्रिएशन सेंटर, डार्क रूमसह सर्व सुविधा युक्त हौशी फोटो क्लब, अशा नागरी सुविधा होत्या! सुकाॅय ७, मिग २१ आणि मि ८ हेलिकॉप्टर तसंच बेल  हेलिकॉप्टरच्या स्क्वाॅड्रन होत्या. त्यात आता आमच्या हंटरची भर पडली !

सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे पासष्ट आणि एकाहत्तरच्या युद्धातील वाॅर हिरो, किलर ब्रदर्स पैकी, ग्रुप कॅप्टन डी किलर जामनगरला  आमचे स्टेशन कमांडर होते ! साक्षात किलर सरांना प्रत्यक्ष भेटण्याच्या कल्पनेनेच मी हरखून गेलो होतो ! किलर सर, जठार सर हे म्हणजे साक्षात ‘काळ ‘ असं बरंच काही ऐकलेलं असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली  होती! 

किलर सरांनी आणि जठार सरांनी युद्धांमधे पाकिस्तानी एअर फोर्सच्या धावपट्या उखडून, चहूबाजूंनी गोळ्या लागून चाळण झालेली, पेटती  विमानं आणून आपल्या रनवेवर उतरवली होती! या असामान्य कामगिरी बद्दल त्याना शौर्य पदकं मिळाली होती! कोणत्या मटेरियलचं काळीज बनवलं असेल परमेश्वराने या माणसांचं ! !

विमानाला गोळ्या लागून आग लागलेली असताना, आपला जीव वाचविण्यासाठी, विमान सोडून ‘बेल आऊट’ न करता, त्या विमानाचे काही ना काही पार्टस् वापरता येतील आणि आपल्या देशाचं काही फाॅरेन एक्सचेंज वाचेल या उदात्त हेतूने, स्वतःच्या जीवावर उदार होऊन ते विमान आणून आपल्या विमानतळावर उतरवण्यासाठी आपलं सर्व कौशल्य पणाला लावणारे योद्धे ज्या देशाकडे असतील त्यांना जगातलं कोणतंही आणि कितीही शक्तिमान राष्ट्र पराभूत करू शकणार नाही, प्रत्यक्षात किलर सरांना पाहिल्यावर माझा भलताच भ्रमनिरास झाला! नावच किलर असलेला माणूस भयंकर उग्र व्यक्तिमत्वाचा असणार अशी माझी कल्पना होती! 

हा लाल गोरा अँग्लो इंडियन माणूस अतिशय प्रसन्न आणि गोड चेहर्‍याचा होता! अत्यंत प्रेमळ स्वभाव! सगळ्यांना सांभाळून घेण्याची कामाची आश्वासक पद्धत! सगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीज मधे उत्साहाने सहभागी व्हायची हौस! उतरंडीतल्या शेवटच्या पायरीवरच्या माणसाच्या सुद्धा खांद्यावर हात टाकून, त्याची समस्या स्वतः समजून घेऊन त्यावर उपाय करण्याची धडपड! देवाने हे एक वेगळंच रसायन घडवलं होतं! 

आकाशात जीवघेण्या भराऱ्या मारणाऱ्या, या उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या माणसाकडून मी जमिनीवर रहाणं किती महत्वाचं असतं ते शिकून घेतलं! ‘तुमच्या सहकार्यांच्या कोंदणात तुम्ही किती घट्ट बसला आहात त्यावर तुमचं पद, तुमची प्रतिष्ठा किती अधिकाधिक उजळून निघणार हे अवलंबून असतं ‘ हा एक खूप महत्वाचा धडा, किलर सरांचं प्रशासकीय कौशल्य जवळून निरखताना आपोआप मिळाला, ज्याचा मी पुढे उच्च पदावर काम करताना मला खूप फायदा झाला! यशाची गुरुकिल्लीच किलर सरांनी नकळत माझ्या हाती सोपविली! 

एका रोमहर्षक प्रसंगात ‘किलर’ म्हणजे काय ते प्रत्यक्षच पहायला मिळालं ! एका मिग- २१ चं टेस्ट फ्लाईंग करण्यासाठी किलर सरांनी टेक ऑफ घेतला. आकाशात झेपावल्या क्षणीच, विमानाची कॅनाॅपी (फायटर विमानात पायलटला बाहेरचं पहाता यावं म्हणून ठेवलेलं फायबरचं पारदर्शक कवच) उडून गेली ! हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा अपघात होता! आता कल्पना करा की, डोळ्यावर शील्ड नसली तर ऐंशी किलो मीटर वेगाने मोटर सायकल सुद्धा चालवता येत नाही! हा माणूस बाराशे नॉटिकल माईल्स वेगाने टेक ऑफ घेत असताना याच्या डोळ्यासमोरची विंड शिल्ड नाहीशी झाली! काय करावं या माणसाने? 

विमान सोडून तात्काळ इजेक्ट करायला हवं होतं! नियंत्रण कक्षातून तशा सूचनाही दिल्या होत्या, पण नवं कोरं विमान सोडून देणाऱ्या माणसाचं नांव किलर असूच शकत नाही! त्यांनी नियंत्रण कक्षाला उलट सांगितलं, “क्रॅश लँडिंगची तयारी करा! मी विमान उतरवतोय!”

क्षणात अनेक सिग्नल्सची देवाण घेवाण झाली. किलर सरांच्या वरिष्ठांनी कळकळीची विनंती केली, ” ‘किलर’ या देशासाठी विमानापेक्षा किंमती आहे! विमान सोड!” किलर सरांनी बहुदा सांगितलं असावं, “Don’t worry Sir, you will have both!”

रनवेवर क्रॅश लँडिंगची तयारी झाली. प्रत्येक जण आपापलं कर्तव्य करण्यासाठी सज्ज झालेला होता आणि मनात, “देवा, किलर सरांना वाचव.” अशी तळमळीने प्रार्थना करत होता. डोळ्यांना काहीही दिसत नसताना, केवळ इच्छाशक्ती आणि अनुभवाच्या जोरावर सर्किट मधे फिरून त्यांनी फ्युएल संपवलं आणि आपण लँडिंग करत असल्याची सूचना दिली! नियंत्रण कक्षाकडून आपण परफेक्ट लँडिंग लाईनवर आहोत याची खात्री करून घेतली आणि त्या ऐतिहासिक क्षणाकडे सरकायला सुरुवात झाली. प्रत्येक जण श्वास रोखून, काळजावर दगड ठेवून, आता पुढे काय वाढून ठेवलंय त्याची प्रतिक्षा करत होता! 

विमानाचं अंडर कॅरेज सुरक्षितपणे उघडलं! तीनही चाकं व्यवस्थित बाहेर पडली! विमान उंची कमी करत करत योग्य दिशेने रनवेकडे येऊ लागलं! विमान इतक्या परफेक्ट लाईनवर होतं की पायलटला काही दिसत नाहीये हे खरंच वाटत नव्हतं! प्रत्यक्षात नियंत्रण कक्षातून मिळणाऱ्या फक्त सूचनांच्या बळावर विमान उतरत होतं!

सर्व काही सुरळीत होत आहे असं वाटत असतानाच विमान एका बाजूने कलंडल्या सारखं झालं आणि विमानाच्या मागच्या दोन चाकांपैकी एक चाक बॅरियरच्या सिमेंट पोलला टच झाल्यामुळे तुटून गेलं. आता मागचं एकच चाक उरलं होतं, ते टेकून नीट बॅलन्स झाला तर पुढचं टेकणार! गती आणखी कमी करण्यासाठी, चाक तुटताच किलरसरांनी टेलशूट (मागे उघडणारं पॅराशूट) ओपन केलं होतं ! 

शेवटी विमान एका बाजूला घसरून बाॅडी घासल्यामुळे आग लागणार, हे आता सगळ्यांना कळून चुकलं होतं! क्रॅश व्यवस्थापन पुढच्या भयंकर प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी अति सज्ज झालं होतं !

अति समिप….सावधान…. 

विमानाची गती संपता संपता ते तिरकं तिरकं जात असताना काँक्रिटच्या रनवेवर बाॅडी टेकणार नाही असं दोन चाकांवर बॅलन्स करत ते रनवे सोडून बाजूच्या मातीवर आल्याची खात्री पटल्यावरच किलर सरांनी इंजिन स्विच ऑफ केलं आणि विमानाला आग लागण्यापासूनही वाचवलं! 

डाॅक्टरनी किलर सर कसे आहेत ते पहाण्यासाठी काॅकपिटकडे धाव घेतली. त्यांच्या चेहऱ्यापासून संपूर्ण शरीर इतकं सुजलं होतं की सेफ्टी बेल्ट कापून काढल्यानंतर सुद्धा त्याना काॅकपिटमधून बाहेर काढणं अवघड झालं होतं! चेहर्‍यावर ना नाक दिसत होतं ना डोळे! बेल्ट कापता कापताच ते बेशुद्ध झाले! कसंबसं काॅकपिटमधून बाहेर काढून त्याना आय एन एस वलसुरा ला नेव्हीच्या हाॅस्पिटलमधे दाखल केलं, तेव्हा ते कोमात गेले होते! 

सतरा दिवस मृत्यूशी झुंज देऊन ह्या महारथीने अचाट पराक्रम करून देशाचं एक विमान आणि एक जिगरबाज पायलट वाचवला आणि पुन्हा आकाशात झेप घ्यायला सज्ज झाला ! 

इथे खरोखरंच ओशाळला मृत्यू ! 

लेखक : श्री विद्याधर गणेश आठवले.

प्रस्तुती – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समाधान… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ समाधान… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

नोकरी करणाऱ्याला वाटतं- धंदा बरा.

व्यवसाय करणाऱ्याला वाटतं – नोकरी बरी.

घरी राहणाऱ्याला वाटतं-  काहीतरी करावं पण घराबाहेर पडावं.

 

एकत्र राहणाऱ्याला वाटतं- वेगळा राहण्यात मजाआहे.

वेगळा राहतो त्याला वाटतं- एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नाही.

 

गावात राहणाऱ्याला वाटतं- शहरात मजा आहे.

शहरातला म्हणतो- गावातलं आयुष्य साधं, सरळ,सोपं आहे.

 

देशात राहतात त्यांना वाटतं- परदेशी जावं,

परदेशात राहणाऱ्याना वाटतं – आपण इथे खूप तडजोड करतो.

 

केस सरळ असणारी म्हणते- कुरळे किती छान.

कुरळे केसवाली म्हणते –  किती हा गुंता.

 

प्रेम ज्याला मिळते त्याला किंमत नसते व काही माणसे  प्रेम मिळावे म्हणुन जंग जंग पछाडतात . 

 

एक मूल असतं, त्याला वाटतं- दोन असती तर…

दोन असणाऱ्याला वाटतं – एकवाला मजेत..

 

मुलगी असली की वाटतं-

मुलगा हवा होता,

मुलगा असला की वाटतं-मुलीला माया असते.

ज्याला मूल नसतं तो म्हणतो- काहीही चालेल.

 

नावे ठेवणारे रामातही दोष बघतात,

कौतुक करणारे रावणाचीही स्तुती करतात.

 

मिळून काय ?

नक्की चांगलं काय ते काही केल्या कोणाला कळत नाही.

मी बरोबर आहे, पण सुखी नाही. दुसरा मात्र पक्का आहे,  तरी मजेत आहे.

 

किती गोंधळ रे देवा, हा?

 

म्हणून जे आहे ते स्वीकार करा आणि आयुष्य आनंदात जगा.आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपल्याला जगता आले पाहिजे.

 

म्हणून, तुकाराम महाराज म्हणतात,

ठेविले अनंते तैसेची रहावे

चित्ती असू द्यावे समाधान…!

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- प्रवासाला जाण्यापूर्वी दादरच्या घराला कुलूप लावलं होतं त्याच दिवशी हे पत्र इथं येऊन पडलं होतं. म्हणजे साधारण आठवडा उलटून गेला होता.पण ते आमच्या हातात पडायला मात्र बराच उशीर झाला होता.कारण रिटन-टेस्टची तारीख आदल्या दिवशीची म्हणजेच  शनिवारची होती आणि वेळ दुपारी ११ची. अर्थातच रिटन-टेस्टची तारीख उलटून गेली होती.हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला गेला होता!

मग कोंदट अंधाराने भरून गेलेलं असतानाच पुढचे तीन साडेतीन तास असे झंझावातासारखे आले की अपेक्षितपणे आकारलेल्या सकारात्मक घटनांनी त्या अंधारल्या मनात पुन्हा आशेची ज्योत पल्लवित केली..!)

युनियन बँकेकडून आलेलं ते रिटन टेस्टचं काॅल-लेटर  टेस्टची तारीख उलटून गेल्यामुळे आता मुदत उलटून गेलेल्या चेकसारखं माझ्यासाठी कांहीही उपयोग नसलेला कागदाचा एक तुकडाच होतं फक्त.तेच काॅल लेटर वाचून विचारात पडलेले मेहुणे एखाद्या गूढ विचारात गढल्यासारखे स्वतःतच हरवलेले होते. दुसऱ्याच क्षणी काहीतरी गवसल्याच्या उत्साहात ते झपकन् पुढे आले. ते कॉल लेटर माझ्या हातात देऊन घाईघाईने त्यांनी चप्पल पायात सरकवल्या आणि तडक बाहेर पडले. मी कांहीशा गोंधळल्या अवस्थेत दाराकडे धाव घेतली.

“क..काय झालं? कुठे निघालात?” न रहावून मी विचारलं.

“येतो लगेच.आलोच.

तू थांब..” मागे वळूनही न बघता ते दिसेनासे झाले.

ते परत येईपर्यंतची पंधरा मिनिटं मला तिथंच गोठून गेल्यासारखी वाटत राहिली. सरता न सरणारी!

मला अपराध्यासारखं वाटू लागलं. खरंतर आम्ही घरी येताना वाटेतच ठरवल्यानुसार घरी सामान ठेवून,फ्रेश होऊन लगेच जेवायला बाहेर पडणार होतो. एक तर ते एवढ्या लांबच्या प्रवासातून दमून आलेले होते. त्यांना कडकडून भूकही लागलेली होती. असं असताना हे असं अचानक सगळं विचित्रच घडू लागलंय.कुठे गेलेयत हे?

पंधरा एक मिनिटांनी ते घाईघाईने परत आले.

“हे बघ आता जेवण राहू दे. जेवत बसलो तर फार उशीर होईल. मी प्रवासातच थोडी केळी घेतलेली आहेत.तुझ्या आईनं थोडे लाडूही दिलेत. दोघंही तेच घासभर खाऊन घेऊ न् लगेच बाहेर पडू. आपल्याला आत्ताच्या आत्ता ठाण्याला जायचंय?”

हे सगळं त्या क्षणी माझ्यासाठी अनपेक्षित आणि अनाकलनीयच होतं.

“आत्ता..?इतक्या रात्री..?”

“हो‌..”

“कशासाठी..?”

“जे करायचं ते फार वेळ न दवडता आजच्या आजच करायला हवं म्हणून.हे बघ,मी वरच्या मजल्यावरच्या गोगटे आजोबांच्या घरुन माझ्या ठाण्याच्या मावसबहिणीला फोन करायला गेलो होतो.मी बोललोय तिच्याशी. तिचा इंजिनीयर झालेला धाकटा दीर नुकताच टेक्निकल ऑफिसर म्हणून युनियन बँकेत लागल्याचं मी ऐकून होतो. ते सर्वजण एकत्रच रहातायत.मी ‘त्यांना मला तातडीनं भेटायचंय.महत्त्वाचं काम आहे.लगेच येऊ का?’असं फोनवर बहिणीला विचारलंय. ती ‘ये’ म्हणालीय. आपण आत्ता त्यांना भेटायला जातोय. त्यांच्या ओळखीनं काहीतरी मार्ग निघेल.”

त्यांचा आशावाद जबरदस्त होता. सगळं माझ्यासाठीच तर सुरू होतं. मी ‘नाही-नको’ म्हणायचा प्रश्नच नव्हता.पण तरीही….?

“तुम्ही प्रवासातून दमून आला आहात ना? उद्या सकाळी लवकर गेलो तर नाही का चालणार?”

“कदाचित उशीर होईल. ती ‘ये’ म्हणालीय तर आत्ताच जाऊ. चल. आवर लौकर..”

ठाण्याला जाऊन आम्ही त्यांच्या बहिणीच्या घराची बेल वाजवली तेव्हा रात्रीचे अकरा वाजून गेले होते.मन आशा निराशेच्या हिंदोळ्यावर हेलकावे घेत होतं. अनिश्चिततेच्या भावनेनं ते कातर झालेलं होतं.

दारावरची बेल वाजवताच आमचीच वाट पहात असल्यासारखं दार तत्परतेनं उघडलं गेलं.हे साठे कुटुंबीय. मिसेस साठेंनी आमचं हसतमुखाने स्वागत केलं.

“बराच उशीर झालाय पण अगदी नाईलाज म्हणून तुला त्रास द्यावा लागतोय बघ.”

मेहुणे त्यांच्या मावस बहिणीला.. म्हणजेच मिसेस साठेना म्हणाले.

“त्रास कसलाअरे? मी निरंजन भाऊजींना कल्पना देऊन ठेवलीय.त्यांना बोलावते. तू सांग त्यांना सगळं. तुमच्या गप्पा होईपर्यंत मी गरम काॅफी करते पटकन्.आलेच.”

इथे येताना माझ्या मनात असणारा संकोच या मनमोकळ्या स्वागतानं विरून गेला.

“नमस्कार..”

हसतमुखाने नमस्कार करीत निरंजन साठे आमच्यासमोर उभे होते. त्यांना पाहिलं आणि मन निश्चिंतच झालं एकदम. तो त्यांच्या प्रसन्न,देखण्या,रुबाबदार आणि मुख्य म्हणजे निगर्वी व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव होता की माझ्या मनाला मिळालेला अकल्पित संकेत होता कुणास ठाऊक पण मन निश्चिंत झालं होतं एवढं खरं.

मेहुण्यांनी नेमकी अडचण थोडक्यात सांगितली. मी सोबत आणलेलं कॉल-लेटर संदर्भासाठी त्यांच्या पुढे केलं. त्यांनी ते वाचलं. त्याची अलगद घडी घालून ते मला परत दिलं.

“एक काम करूया. उद्या सकाळी बरोबर दहा वाजता तू चर्नीरोडवरील युनियन बँकेच्या ‘मेहता-महाल’ मधल्या ऑफिसमधे ये. हे माझं कार्ड. लिफ्टने आठव्या मजल्यावर येऊन माझ्या केबिनमधे यायचं.आपण शेजारच्या ‘मेहता चेंबर्स’ बिल्डिंगमधे ग्राउंड फ्लोअरलाच बॅंकेचं रिक्रुटमेंट सेल आहे तिथे जाऊ.तिथेच ही सगळी रिक्रूटमेंट प्रोसेस सुरू आहे. डाॅ.विष्णू कर्डक तिथले सुपरिंटेंडंट आहेत. दोन महिन्यांपूर्वीच माझा इंटरव्यूही त्यांनीच घेतला होता. त्यामुळे ते बहुधा मला ओळखतील. आपण त्यांना भेटून सांगू सगळं.बघू काय होतं ते.एन.आय.बी.एम.च्या सहकार्याने बँकेतर्फे आठएक  दिवसांचे रेक्रूटमेंट प्रोसेस सुरू आहे हे मी ऐकून होतो. तुझी रिटन टेस्ट हा त्याचाच एक भाग असणार आहे. टेस्ट-प्रोग्रॅम शनिवारी संपला असेल तर मात्र प्रॉब्लेम येईल.एरवी काहीतरी मार्ग निघू शकेल”

निरंजन साठे यांनी सर्व परिस्थिती नेमक्या शब्दात समजून सांगितली.आशेचा एक अंधूक किरण दिसू लागला. आम्हाला इथे यायची बुद्धी झाली, प्रयत्नांची दिशा का होईना पण नेमकी सापडली हा दिलासा असला तरी अनिश्चितताही होतीच.

कॉफी घेऊन त्यांचे आभार मानून आम्ही बाहेर पडलो तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली होती!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भेट वाढदिवसाची –  लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ भेट वाढदिवसाची –  लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

चाळीस-पन्नास  वर्षांपूर्वीचा काळ….. शाळकरी  वय…

वाढदिवसाचं  एवढं स्तोम वाढलेलं नव्हतं  तेंव्हा…पण वाढदिवसाची वाट मात्रं पाहिली जायची..

एकाच कारणासाठी… भेटवस्तुंसाठी…

 

शाळेत  एखादी मुलगी गणवेश न घालता  रंगीत कपडे ( तो नवीनच असेल असे नाही ) घालून आली की तिचा वाढदिवस आहे, हे कळायचं..शाळेत स्टेजवरून तिचं नाव पुकारलं जायचं.तिला शुभेच्छा दिल्या जायच्या नि आम्ही  पोरी ” एक दोन तीन…एक दोन तीन..एक — दोन — तीन  ”  अशा  शिस्तबद्ध टाळ्या वाजवायचो…

” आपणही  टाळ्या  वाजवाव्यात की तसच उभं रहावं ”  या संभ्रमात ती वाढदिवसाळु  उत्सवमूर्ती  तोंडावर कसनुसे भाव घेऊन  कानकोंड्या अवस्थेत उभी राहिलेली  असायची!!

घरची जरा बरी  परिस्थिती असली तर शाळेत लिमलेटच्या गोळ्या नाहीतर रावळगाव चॉकलेट  वाटलंं  जाई…. अन् त्यादिवशी  “ती वाटणारी मुलगी” राणीच्या थाटात वावरत असे आणि  तिला मदत करणारी तिची मैत्रीण तिच्या दासीच्या..कारण तिला एक गोळी जास्तीची मिळायची!!

 

ती गोळी किंवा चॉकलेट खिशातून जपून घरी नेलं जाई  नि आम्ही  तीन भावंडे  त्याचे चिमणीच्या दाताने तुकडे करून  पुढचा तासभर ते चघळून चघळून खात असू..

आयुष्यातील आनंद नि त्याचा कालावधी वाढवण्याची सोपी युक्ती आम्हाला त्या गोळीनं 

आम्हाला शिकवली..!!

 

एके दिवशी  एका मैत्रिणीने  साधारण बटाटेवड्याच्या आकाराचा  बसाप्पाचा शिक्का असलेला  पेढा  वर्गातल्या प्रत्येकाला वाढदिवसानिमित्त दिला…आम्हाला  आश्चर्याने चक्कर यायचीच राहिली होती..!!

जेमतेम एखादी गोळी वाटणं सुद्धा परवडणं -नं-  परवडण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या आम्हा पोरींना  प्रत्येकी एक एवढा मोठा  पेढा हा फार मोठा सांस्कृतिक धक्काच होता..

 

” तिचे वडील मोठे डॉक्टर आहेत..तिला न परवडायला काय झालं ?”  या घरातल्या शेरेबाजीनं…

” आपण एकतर डॉक्टर व्हायचं आणि अगदीच नाही जमलं तर किमानपक्षी डॉक्टरशी लग्न तरी करायचं ..आणि होणा-या  पोरांच्या  वाढदिवसाला  शाळेत पेढे वाटायचे ”  हा निश्चय मात्रं त्या नकळत्या वयात मनानं  केला!

 

वाढदिवस जवळ आला की दोन विषय मनात पिंगा घालू लागायचे….. नवीन कपडा मिळणं  नि मैत्रिणींना वाढदिवसासाठी  घरी बोलावणं…

 

तीन  मुलांची जबाबदारी असलेल्या  आमच्या माऊलीनं  घरखर्चातून  थोडे थोडे पैसे बाजूला काढून ठेवलेले असायचे..त्यातून  पुढची किमान तीन वर्षे अंगाला येईल एवढा घळघळीत कपडा शिवला जायचा..नि वर्षभरातील सा-या सणवारांना, लग्नकार्यांना तो  पुरवून पुरवून वापरला जायचा..!!

 

एखादे वर्षी  घरात कुणाचं तरी आजारपण निघायचं नि साठवलेले  सारे पैसे घरच्या डब्यातून डॉक्टरच्या गल्ल्यात जमा व्हायचे… त्यावर्षी  आईची  त्यातल्या त्यात नवी साडी  फ्रॉक नाहीतर  मॅक्सीचं रूप घेऊन वाढदिवसाला  आम्हाला सजवायची…!!

 

” आई, वाढदिवसाला मैत्रिणींना बोलवूया नं गं ”  ही  आईच्या मागची भुणभुण  काही मैत्रिणींच्या प्रेमापोटी नसायची..  तर असायची मैत्रिणींकडून  भेटवस्तू  मिळाव्यात म्हणून…!!

 

बरं त्यावेळच्या भेटवस्तू  तरी काय असायच्या..

एखादी  एक  रुपयाची  वही, पंचवीस पैशाची पेन्सिल, दहा पैशाचं खोडरबर, पंचवीस पैशाचं  ” सोनेरी केसांची राजकन्या ”  वगैरे  पातळ  कागदाचं गोष्टीचं पुस्तक, पन्नास पैशांचं  कानातलं..देणा-याची आर्थिक परिस्थिती  बरी  असेल तर  दीड-दोन रुपयांचं फाऊंटन पेन…

यातल्या ब-याच वस्तू  स्वस्त पडतात म्हणून  वर्षाच्या सुरुवातीलाच  घाऊक आणून ठेवलेल्या..

कानातलं  असंच कुणीतरी  दिलेलं पण न आवडलेलं…

गोष्टीचं पुस्तक घरातल्या सगळ्या मुलांनी  वाचलेलं…त्याचा आता नाहीतरी काय उपयोग म्हणून  त्याचं रुपांतर  भेटवस्तुत झालेलं…

 

बरं ..या वस्तू  देताना  त्याला  गिफ्ट पॅकिंग  वगैरे प्रकार  नाही… त्यांच्या  नैसर्गिक स्वरुपातच अवतरलेल्या… पण तरीही  त्यांचं खूप आकर्षण असायचं… तेवढंही  न मिळण्याचा  तो काळ होता…

म्हणून तर  पावडरचा डबा, टी-कोस्टर्स, कंपासपेटी  असल्या  महागड्या गिफ्ट्स देणाऱ्या  एका मैत्रिणीला  वर्गातल्या  प्रत्येकाच्या  वाढदिवसाला  बोलावलं जायचं…!!

 

भडंग, पातळ पोह्याचा चिवडा, कांदेपोहे , उप्पीट, एखादा लाडू  नाहीतर  डालड्यातला  शिरा…यातल्या दोन पदार्थांवर  वाढदिवस साजरा व्हायचा..!

 

मैत्रिणींकडून  मिळालेली वह्या, पुस्तकं, पेन्सिली, कानातली  वगैरे  अख्ख्या दुनियेतल्या खजिन्याचा आनंद देऊन जायची…. हा खजिना कुशीत घेऊन  निद्रादेवीच्या  सोबत घडणारी   स्वप्नांची  सैर  अद्भुत  आनंद  बहाल  करायची…!!

…. ते  दिवस  कसे भुर्रकन्  उडून  गेले  ते कळलच  नाही…फुलपाखरीच  होते ते..!!

 

आई -वडिलांचेही  दिवस पालटले  होते..केल्या कष्टांचं चीज झालं होतं..चार पैसे गाठीशी  जमले होते..

भाऊ , बहीण  मोठे  झाले..कमावते  झाले..

 

” तुला वाढदिवसाला  फक्त काय पाहिजे ते सांग…”  

जे  पाहिजे  ते  मिळू  लागलं  होतं…पैसा  आड  येतच  नव्हता…

 

पण  लहानपणाची  भेटवस्तूंची  ओढ  मात्र  कुठेतरी  आटली  होती…. वाढदिवसाचं  महत्त्व, लहानपणी  वाटणारं कौतुक  तारुण्याच्या  रेट्यात कुठंतरी  हरवून गेलं होतं..

 

लग्न  झालं  नि  चित्रपटातल्या  नायक-नायिकांच्या  वाढदिवसाच्या  भुताने  झपाटलं..

 वाढदिवसाला ” अलगदपणे  गळ्यात हि-याचा नाजुकसा नेकलेस घालणारा ”  किंवा  ” वाढदिवसाला  अचानक  विमानात बसवून  स्वित्झर्लंडला  नेणारा ”  किंवा  ” शे-दोनशे  लोकांना  भव्य घराच्या  भव्य हॉलमधे  बोलावून  पत्नीच्या वाढदिवसाची  सरप्राईज  पार्टी  करणारा ”  नायक  आणि  त्याने  पत्नीला  दिलेल्या  भेटवस्तू   प्रमाण  होऊ  लागल्या…

…… नि  ”  अगं  हे  सगळं  तुझच  आहे..तुला  पाहिजे  ते  घेऊन  ये  ”  असं  म्हणून  कर्तव्याला  प्राधान्य  देत  कामाला  निघून जाणारा   नवरा …त्या  नायकापुढे  अगदीच फिका  पडू  लागला..

प्रत्यक्षातलं  आयुष्य हे  चित्रपटापेक्षा फार वेगळं असल्याचा  धडा  या वाढदिवसाच्या भेटवस्तुंनी  शिकवला …नि  स्वत:च्या  वाढदिवसाची  खरेदी  स्वत:च  करायची  सवय  लागली…

 

लेकीच्या बालपणाबरोबर  मात्र  बालपणाने  पुन्हा आयुष्यात प्रवेश केला…

तिचा  थाटाने  साजरा केलेला पहिला वाढदिवस…

ती  छान दिसावी  म्हणून  तिला टोचत असतानाही   तिला  घातलेले  महागडे  ड्रेस,

स्वत:च्या  लेकरांच्या  वाढदिवसांना  फारशी हौस न पुरवू  शकलेल्या  आजी-आजोबांनी  दिलेल्या  सोन्या-चांदीच्या  भेटवस्तू , काका, मामा, मावशी, आत्यांनी  दिलेल्या गिफ्ट्स, निमंत्रितांकडून  आलेले  आहेराचे  ढीग….

” सगळं तुझं तर आहे, तुला हवं ते तू जाऊन आण ” असं म्हणणा-या  नव-याने  स्वत: जाऊन  लेकीसाठी  आणलेल्या  भेटवस्तू….. या  सा-यांनी  आयुष्यातल्या  रिकाम्या  जागा  भरून  काढल्या…

 

तिच्या  वाढदिवसाला  शाळेत  वाटलेल्या  भेटवस्तू, अगदी  पेढेसुद्धा…

तिला  पाहिजे तसे घेतलेले कपडे, दागिने, वस्तू..

तिच्या  मित्र-मैत्रिणींना बोलावून  साजरे  केलेले  वाढदिवस…

आणि  दोस्त कंपनीकडून  मिळालेल्या  गिफ्ट्सनी  सुखावलेली  नि  त्यांना  कुशीत घेऊन  स्वप्नांच्या  राज्यात  माझ्यासारखीच सैर  करणारी  माझी  छकुली…!!

 

शिंप्याकडच्या  कपड्यांची जागा  ब्रॅंडेड वस्तुंनी  घेतली…  चिवडा-लाडुच्या जागी इडली, पावभाजी, पिझ्झा-बर्गर  आला.

वही, पेन्सिल, पेनाऐवजी  चकचकीत  कागदात  गुंडाळलेल्या  महागड्या  भेटवस्तू  आल्या…

…. पण  वाढदिवस  नि  भेटवस्तुंच्या  बाबतीतल्या  भावना  मात्रं  तिच्या  नि  माझ्या  अगदी  तशाच  होत्या…तरल..हळव्या..!!

 

दरम्यानच्या  काळात  आई-वडील, सासुसासरे यांचे  साठावे, पंच्याहत्तरावे वाढदिवस  साजरे करून  त्यांच्या  अख्ख्या आयुष्यात  कधीही  साज-या  न केलेल्या  वाढदिवसांचं उट्टं काढण्याचा  नि  त्यांना  मोठाल्या  भेटवस्तू  देऊन  त्यांच्या  ऋणातून मुक्त  होण्याचा  केविलवाणा  प्रयत्न  केला…

पण  त्यांनी  दिलेल्या  “रिटर्न गिफ्टने ”  अक्षरश:  चपराक मिळाली  नि  आमच्याऐवजी त्यांनीच  आमच्या  सा-या वाढदिवसांचं  उट्टं  भरून काढलं!!

 

काळ  फार  वेगाने  सरला..

वाढदिवसाला  भरभरून  आशीर्वाद  देणारे  अनेक  हात  काळाचं बोट  पकडून  दूरवर  निघून  गेले…

” हॅं…वाढदिवस   घरी  कसला  साजरा  करायचा  !! ”   या  वयाला  लेक  पोचलीय…

आता  बहीण -भाऊ, दीर -नणंद  यांच्या  मुलांच्या  मुलांचे म्हणजे नातवंडांचे   वाढदिवस  साजरे होतायत..

मी  आजी  म्हणून  त्यांना  उदंड  आशीर्वाद  देतेय…

 

” थीम  पार्टीज,  डेकोरेशन, चकाकणारे  भव्य हॉल,  “खाता किती खाशील  एका तोंडाने  ”  अशी  अवस्था  करून टाकणारी  विविध  क्युझिन्स… 

मुलांचा आनंद नव्हे तर  स्वत:ची प्रतिष्ठा  दाखवण्यासाठी  दिलेल्या  नि  घेतलेल्या  भेटवस्तू…. 

मुलाचे नि आईचे  वाढदिवसासाठी  घेतलेले  हजारोंच्या किंमतीतील ब्रॅंडेड  कपडे..

 

या  झगमगाटात  मला  मात्रं  दिसते  ती  माझी  माऊली..वर्षभर पैसे साठवून  लेकरांचा वाढदिवस  साजरा  करणारी….. रात्रभर  जागून  मुलांच्या वाढदिवसासाठी  बेसन भाजणारी…

नि  आपल्या  लेकराच्या  आनंदासाठी  भेटवस्तू  म्हणून  स्वत:कडच्या  चारच साड्यातील  एक  साडी  फाडून  कपडे  शिवणारी.. त्यागाची  मूर्ती…!!

 

आता  माझीही  पन्नाशी  सरलीय…

वाढदिवस  येतात  नि  जातात..

भेटवस्तुंचं  आकर्षण  कधीचच  विरलय … आहेत त्याच  वस्तू  अंगावर  येतात..

पण  तरीही   वाढदिवसाची  ओढ  मात्रं  आजही  वाटते…

…. कारण  त्यानिमित्तांने  कितीतरी  जीवलगांचे , सुहृदांचे  फोन  येतात.. शुभेच्छा  मिळतात..

आणि  आपण  आयुष्यात   केवढी माणसं   कमावली  याची  सुखद  जाणीव  होते…!!

 आपण  अंबांनींपेक्षाही  श्रीमंत  असल्याची  भावना  मनाला  शेवरीपेक्षा  तरल  करून  टाकते…

 

दिवसाच्या  शेवटाला  या  शुभेच्छारूपी  भेटवस्तुंना  कुशीत  घेऊन  मी  समाधानाने  पुढच्या  वाढदिवसाची  वाट पहात  झोपी  जाते…!!

 

लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले    

सोलापूर

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ व्याकरणाच्या रुक्षतेतील काव्य :: यास्मिन शेख – लेखक : श्री मुकुंद संगोराम ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ व्याकरणाच्या रुक्षतेतील काव्य :: यास्मिन शेख – लेखक : श्री मुकुंद संगोराम ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

यास्मिन शेख: 

व्याकरण तज्ज्ञ यास्मिन शेख वयाच्या शंभरीत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या सुहृदांचा एक मेळावा येत्या २१ जून रोजी पुण्यात आयोजित केला आहे.

भाषेवर प्रेम असणारे कुणीही व्याकरण या शब्दाभोवती असलेले नियमांचे जंजाळ सोडवण्याच्या फंदात पडत नाही. वयाच्या शंभीरत पदार्पण करत असलेल्या यास्मिन शेख यांच्यासाठी मात्र व्याकरण एखाद्या कवितेइतकं तरल असतं. गेली ७५ वर्षे व्याकरण हाच ध्यास असलेल्या यास्मिनबाईंना अजूनही या कवितेचा सोस आहे आणि तो त्या अगदी मनापासून लुटत असतात. नावामुळे झालेल्या घोटाळ्यांवर मात करत मातृभाषेवरील आपलं प्रेम अध्यापनाच्या क्षेत्रात राहून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यातच धन्यता मानणाऱ्या यास्मिन शेख यांची कहाणी म्हणूनच इतरांहून वेगळी. मूळ नाव जेरुशा. वडील जॉन रोबेन. आई कोकणातली पेणची – पेणकर. म्हणजे जन्माने यहुदी (ज्यू). जन्मगाव नाशिक. वडील पशुवैद्या. सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी; त्यामुळे सतत बदली. घरात पुस्तकांचा पेटारा भरलेला असायचा. सरकारी नोकरीत असल्यानं बदलीच्या प्रत्येक ठिकाणी प्रशस्त घरं. तिथं पुस्तक वाचनाचा लागलेला छंद, आजतागायत टिकून राहिला, याचं खरं कारण त्यांचं भाषेवरलं प्रेम.

वडिलांकडे हट्ट करून पुण्याच्या स. प. महाविद्यालयात बहिणीबरोबर प्रवेश मिळणं हा यास्मिनबाईंसाठी मैलाचा दगड होता. श्री. म. माटे यांच्यासारख्या प्राध्यापकाने त्यांच्यासाठी व्याकरणाचा मार्ग इतका सुकर केला की, व्याकरणाशीच त्यांची गट्टी जमली. इतकी की, बी.ए. ला संपूर्ण महाविद्यालयात सर्वाधिक गुण मिळवण्याचा मान मिळाला. के. ना. वाटवे यांच्यासारख्या गुरूनं भाषाशास्त्राचे धडे दिले आणि आपल्या मातृभाषेच्या व्याकरणाच्या त्या प्रेमात पडल्या. पुढे मुंबईत अध्यापनाला सुरुवात झाल्यावर खरा गोंधळ सुरू झाला, तो नावावरून. दरम्यान नाशिकलाच अझीझ अहमद इब्राहीम शेख यांच्याशी विवाह झाला आणि यास्मिन शेख हे नाव धारण केलं. ज्यू आणि मुस्लीम असा हा आंतरधर्मीय विवाह. पण यास्मिनबाईंशी गप्पा मारताना, या धार्मिकतेचा लवलेशही जाणवत नाही. लहानपणापासून ह. ना. आपटे वाचतच मोठे झाल्याने भाषेचे सगळे संस्कार अस्सल मऱ्हाटी. मुंबईत दरवर्षी महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी वर्गाच्या दिशेने येताना दिसताच दोन-तीन विद्यार्थी वर्गाबाहेर यायचे आणि म्हणायचे… धिस इज नॉट अॅन इंग्लिश क्लास, धिस इज लॉट अ फ्रेंच क्लास… हा मराठीचाच वर्ग आहे ना? असं विचारत जेव्हा त्या वर्गात शिरत, तेव्हा विद्यार्थी चकित होत. मुसलमान बाई शिकवायला येणार म्हणून साशंक झालेले विद्यार्थी शिकवायला सुरुवात करताच एकमेकांकडे आश्चर्यानं बघायचे. यास्मिनबाईंना त्यांचा राग यायचा नाही, पण दु:ख वाटायचं. भाषेला धर्म नसतो. तुम्ही ज्या राष्ट्रात जन्माला येता, वाढता, त्या राष्ट्राची भाषा तुमचीही मातृभाषा असते. त्या म्हणतात : मी एकच धर्म मानते – मानवता… सर्वधर्मसमभाव.

यास्मिनबाई म्हणतात की, कोणतीही भाषा मुळात ध्वनिरूप असते. त्याहीपूर्वी हातवाऱ्यांच्या साह्याने एकमेकांशी संवाद साधला जात असे. ध्वनिरूपातूनच बोली तयार होते आणि बोली तर विरून जाणारी. ती टिकवण्यासाठी लिपीचा जन्म. शब्द, त्यांची रूपं, त्यातून तयार होणारी वाक्यं, त्यांची रचना, यातून एक नियमबद्धता येत गेली. मराठी भाषेत तर ब्रिटिश येईपर्यंत व्याकरणाचा सुस्पष्ट विचार झालेलाच नव्हता. त्या काळातील संस्कृतज्ज्ञ दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना ब्रिटिशांनी मराठी व्याकरणाचं सुसूत्रीकरण करण्याची सूचना केली खरी, पण त्यांचा आदर्श होता, संस्कृत वैय्याकरणी पाणिनी. तर्खडकरांनी संस्कृत वर्णमाला जशीच्या तशी स्वीकारली. त्यामुळे मराठीत ज्याचे उच्चारही होऊ शकत नाहीत, असे वर्ण लिपीत आले. ती केवळ चिन्हंच राहिली. प्रमाण भाषा ही एक संकल्पना आहे. प्रमाण भाषेबद्दल विनाकारण उलटसुलट मतप्रवाह तयार झालेले दिसतात. यास्मिन शेख यांच्या मते औपचारिक, वैज्ञानिक, वैचारिक लेखनासाठी प्रमाण भाषा उपयोगात आणणं आवश्यक आहे. हे लेखन पुढील पिढ्यांसाठी टिकवून ठेवायचे असेल, तर त्यासाठी प्रमाण भाषेचा आग्रह सर्वांनीच धरायला हवा. पण मी जसं बोलतो, तसंच लिहिणार, असा हट्ट चुकीचाच आहे. कथा, कादंबरी यांसारख्या ललित लेखनासाठी प्रमाण भाषेचा आग्रह धरता कामा नये. बोली भाषेचे लिखित स्वरूप धारण करून असे लेखन केले जाते. त्यात त्या भाषेच्या, त्या भाषक समूहाच्या, तेथील व्यक्तींच्या भावभावनांचा उद्गार असतो. त्यामुळे प्रमाण भाषेमध्ये केवळ मराठी शब्दांचाच आग्रह धरायला हवा. इंग्रजी शब्दांचा सोस सोडून आपल्या भाषेतील शब्दांचा उपयोग करण्यावर भर दिला, तरच ती भाषा अधिकाधिक समृद्ध होत जाईल.

१९६० साली महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषा आणि साहित्य यांच्या संदर्भात कार्य करणाऱ्या तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली. ती समिती म्हणजेच मराठी साहित्य महामंडळ. मराठी लेखनात एकसूत्रीपणा यावा, शासकीय लेखन व्यवहारात मराठीचा अचूक वापर व्हावा, यासाठी या समितीला मराठी लेखनविषयक नियम नव्याने निश्चित करण्याचं काम सोपवण्यात आलं. अशा १४ नियमांची यादी १९६२ मध्ये शासनाने स्वीकारली. १९७२ मध्ये त्यात आणखी चार नियमांची भर घालून नवे नियम सिद्ध केले. या नियमांचे स्पष्टीकरण देणारे पुस्तक यास्मिन शेख यांनी सरोजिनी वैद्या यांच्या सांगण्यावरून तयार केले. त्याबरोबरच ‘मराठी शब्दलेखनकोश’ सिद्ध केला. मुद्दा प्रमाण भाषेचा आणि त्याच्या वापराचा आहे. आणि सध्याची भाषेची अवस्था भयानक म्हणावी अशी असल्याचं यास्मिनबाईंचं स्पष्ट मत आहे. इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा ओस पडू लागल्याची खंत व्यक्त करतानाच यास्मिन शेख यांना या परिस्थितीला आपण सारे कारणीभूत आहोत, असं वाटतं. मराठी माणसंच मराठी भाषेची, लिहिताना आणि बोलतानाही दुर्दशा करतात. माहात्म्य ऐवजी ‘महात्म्य’, दुरवस्था ऐवजी ‘दुरावस्था’, घेऊन ऐवजी ‘घेवून’ असं लिहितात. ‘माझी मदत कर’, असं म्हणतात. दूरचित्रवाणीवरील मराठी वाहिन्यांवरचा मराठीचा वापर तर अगणित चुकांनी भरलेला असतो. इंग्रजी भाषेतून जे शब्द मराठीनं स्वीकारले आहेत, त्याला विरोध असण्याचं कारण नाही. मात्र मराठी शब्द उपलब्ध असतानाही इंग्रजीचा अतिरिक्त वापर करणं योग्य नाही… आज जे कुणी ‘मराठी असे आमुची मायबोली’, असा घोष करत असतील, त्यांच्यापर्यंत ही कळकळ पोहोचणं अधिक महत्त्वाचं आणि उपयुक्त आहे.

वयाच्या शंभरीत प्रवेश करतानाही स्मरणशक्ती टवटवीत असलेल्या आणि अजूनही नवं काही करण्याच्या उत्साहात असलेल्या यास्मिन शेख यांनी अनेक विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाची गोडी लावली. ‘बाई, तुम्ही व्याकरण, भाषाशास्त्र आमच्या तळहातावर आणून ठेवलंत’… असं म्हणत यास्मिन शेख यांचे आभार मानणारा विद्यार्थीवर्ग हे त्यांच्या जगण्याचं फलित आणि संचित. शंभराव्या वर्षातही स्वत:च्या हातानं कागदावर लेखन करण्यात त्यांना कमालीचा आनंद मिळतो, जगण्याचं नवं बळ मिळतं. व्याकरणाची कविता करत करत शतायुषी होणाऱ्या यास्मिनबाईंना मनापासून शुभेच्छा ! 

लेखक : मुकुंद संगोराम 

प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ BE PRACTICAL! – लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ BE PRACTICAL! – लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

“चिटी  चावल  ले  चली,

बीच  में  मिल  गई  दाल।

कहे  कबीर  दो  ना  मिले,

इक ले , इक डाल॥”

अर्थात :

मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, ‘क्या बात है  देवा! तू भाताची सोय केलीच होतीस , आता वरणाचीही सोय झाली.’ पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.

तेव्हा कबीर म्हणाले, ‘वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.’

तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान डाळीने हिरावून घेतलं.

माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधान क्षणात हिरावून घेतात.

साधं मोबाईलचं उदाहरण घ्या ना! एखादी व्यक्ती बचत करुन कसाबसा आवडीचा मोबाईल घेते, नि आठवडाभरातच त्याचं लेटेस्ट मॉडेल बाजारात येतं आणि त्याने घेतलेल्या मोबाईलचा आनंद, एका आठवड्यातच संपुष्टात येतो. तो मनाशी म्हणतो, ‘इतके दिवस थांबलो होतोच, आणखी आठवडाभर थांबलो असतो, तर काय बिघडलं असतं!’

विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात. हे मर्म लक्षात घेऊन शोषण,शासन व्यवस्था विकल्पांची लयलूट करतात.

ती बघून, ‘घेशील किती दोन करांनी’  अशी माणसाची अवस्था होते. त्याचं डोकं काम करेनासं होतं. अशी माणसं शोषण,शासन व्यवस्थांसाठी हाकायला खूप सोपी पडतात.

पूर्वी आजोबा-पणजोबांच्या काळातल्या वस्तूही, पुढील पिढ्या आनंदाने वापरत. त्यांना त्या जुन्या वाटत नसत. कारण तेव्हा इतके विकल्प नव्हते. (आणि ऐपतही नव्हती.)

आज असंख्य विकल्पांनी, वस्तूंचा जुन्या होण्याचा कालावधीच क्षणिक करुन टाकला आहे. परिणामी लोक चांगल्या वस्तूही भंगारात टाकू लागले आहेत.

भौतिक वस्तूंचा हा नियम मानवी नातेसंबंधांनाही लागू झाला आहे, कारण माणूसही भौतिकच आहे. नातं, मैत्री यांची नाळही, कधी नव्हे इतकी कमजोर झाली आहे.

देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं, यासाठी आहेत. नुसतंच घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो.

म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे समतोल तर टिकून राहतोच, माणसाचं समाधान आणि आनंदही त्यामुळे टिकाऊ बनतो.

कबीरांच्या या दोह्यात असा मोठा अर्थ दडला आहे.

चला तर मग आनंदी जगूया.  

लेखक :अज्ञात

प्रस्तुती :सौ. शशी नाडकर्णी- नाईक   

फोन  नं. 8425933533

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ असाही एक वड… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

असाही एक वड ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(आणि त्या निमित्ताने वटपौर्णिमे संबंधित विचार..)

वटपौर्णिमेला वडाची पूजा करताना स्त्रिया नवऱ्यासाठी आयुष्याचे आणि स्वतःच्या सौभाग्याचे दान मागत असतात.मी जिथे रहात असे तिथे जवळपास वडाचे झाड नव्हते.म्हणून प्रथम आम्ही वडाची फांदी आणून पूजा करत असू, पण ती गोष्ट मनाला अजिबातच पटत नव्हती!  ज्या झाडाची पूजा करायची त्याचीच फांदी तोडून आणायची! म्हणून ते करणं बंद केलं.. त्यानंतर समोरच्या देवळात एक भटजी  कुंडीमध्ये फांदी घेऊन बसत असे तिथे जाऊन आम्ही पूजा करू लागलो.कुणाकडे तरी बोन्साय वड ही होता.त्या घरची बाई त्याची पूजा कौतुकाने करत असे.आणि आपण कसं घराबाहेर सुध्दा पडत नाही याचंच तिला भारी वाटत असे.ते लोकांना सांगण्यात तिला आनंद मिळे!

नंतर काही दिवसांनी कोपऱ्यावरच्या पानपट्टी जवळ एक वडाचे रोप उगवले होते .पानपट्टी वाल्याने त्याची जोपासना करून ते रोप वाढवले.कारण त्याच्या टपरीवर सावली यावी म्हणून!ते बऱ्यापैकी मोठे झाल्यावर बायका वडाच्या पूजेसाठी तिथे येऊ लागल्या.कारण ते ठिकाण सोयीचे होतं! पानपट्टी वाल्याने स्वतःच्या दुकानात वडाच्या पूजेला लागणारे साहित्य पण ठेवले. त्यात त्याचाही फायदा होता. पहिला जो भटजी होता तो आता तिथे येऊन बसू लागला आणि बायका जे काही वडाजवळ ठेवत ते सगळं तो स्वतःला घेत असे.ते उत्पन्न बऱ्यापैकी वाढल्यावर पानपट्टी वाल्याला थोडा लोभ सुटला. त्यालाही वाटले, हे झाड मी लावले, सावलीसाठी वाढवले आणि आता या झाडाच्या वटपौर्णिमेच्या उत्पन्नात  मला ही  वाटा पाहिजे. दोघांमध्ये छोटंसं भांडण ही झालं! शेवटी काही मोठ्या लोकांनी त्या दोघात कॉम्प्रमाईज केलं आणि त्या दिवशी येणारं सगळं उत्पन्न दोघांनी वाटून घ्यावे असे ठरले. दुसऱ्या वर्षी भटजी आणि पानपट्टी वाला दोघेही त्या वडाजवळ तासन् तास थांबत असत .येणाऱ्या बायका भटजीचे पायावर डोकं ठेवत आणि त्याला फळे,दक्षिणा देत. आणि झाडाजवळ ठेवलेले विडे आणि फळं ,पैसे हे सगळं पानपट्टी वाला घेत असे. दोघांचं भांडण तर मिटलं! पण पुढील विचार मनात आले!

वटपौर्णिमेचा हेतू काय? त्यामुळे मिळणाऱे उत्पन्न असे कितीसे असणार? सत्यवान -सावित्री ची कथा किती जणी वाचतात.त्यातील मूलभूत अर्थ काय! आम्हाला इंग्रजी विषयात SAVITRI हे epic अभ्यासाला होते.तेव्हा योगी अरविंद ह्यांना त्यांत अभिप्रेत असलेला जीवनासाठी चा अर्थ  समजून घेण्याचा प्रयत्न केला.पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराबाहेर पडायला मिळत नसे, त्यामुळे वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी स्त्रिया निसर्गात जात असत. बरेच वेळा वड- पिंपळासारखे वृक्ष गावाबाहेर, रानामध्ये असत. तिथे जाऊन पूजा करून येण्यात मोठा आनंद मिळे. आपल्या हिंदू धर्मामध्ये बऱ्याचशा गोष्टी या धार्मिकतेशी  जोडल्या असल्यामुळे त्या सातत्याने केल्या जात असत. त्यामध्ये धार्मिक, सामाजिक असा सर्व प्रकारचा आनंद घेता येत असे.  आत्ताच्या काळात त्याकडे एक इव्हेंट म्हणून पाहिले जाते. काही का होईना, त्यानिमित्ताने तरुण पिढीला आनंदही मिळतो आणि परंपरा राखण्याचे समाधानही मिळते! स्त्रियांना नटून थटून वडाला जाण्यात तसेच डाएट म्हणून उपवास करण्यातही  वेगळा feel घेता येतो!

शेवटी काय, जीवन आनंदात जगणे हेच सगळ्याचे मूलभूत तत्व आहे. ते सांभाळून आपण आपले सांसारिक जीवन, समाजामधील स्थान या सगळ्या गोष्टी टिकवू शकतो. अलीकडे स्त्रियांना नोकरी, व्यवसाय यामुळे स्वतःच्या आनंदाला बरेच वेळा मुरड घालावी लागते, पण अशा काही परंपरा जोपासताना नकळत हा आनंद त्यांना घेता येतो. मग उगीचच आपल्याला उपास आणि वडपोर्णिमा या अंधश्रद्धा वाटतात असं म्हणण्यात काय बरं अर्थ आहे!

आणि तसेही हे व्रत आपल्या आवडत्या माणसासाठी, नवऱ्यासाठी असेल तर स्त्रियांनी ते जरूर  करावे.

म्हणजे नवराही -सत्यवान ही वडाजवळ चपला सांभाळायला आणि नटलेल्या, सजलेल्या बायकोला पूजा करताना बघायला कौतुकाने येतोच ना!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बोललं पाहिजे…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “बोललं पाहिजे” ☆ श्री मंगेश मधुकर 

घड्याळात रात्रीचे साडे आठ वाजलेले पाहून आशानं ताबडतोब फोन केला पण अंजूनं उचलला नाही.इतक्यात दारावरची बेल वाजली. 

“सकाळी सातला गेलेली आत्ता उगवतेस.”

“आई,रोजचाच प्रश्न विचारून डोकं पिकवू नकोस.महत्वाचं काम होतं म्हणून उशीर झाला.”

“चकाट्या पिटणं हे महत्वाचं काम नाहीये.”सुरेश कडाडल्यावर बापलेकीत जुंपली.

कॉलेजला जायला लागल्यापासून अंजूचं घराबाहेर राहण्याचं प्रमाण वाढलं. सकाळीच जाणारी अंजू रात्री आठ पर्यंत यायची.आल्यावर सुद्धा फोनवर बोलणं चालूच. मैत्रिणी, मित्र आणि मोबाईल यातच गुंग.घरात अजिबात लक्ष नाही.सगळी कामं आशाच करायची.अंजूच्या बेफिकीर वागण्याची आशाला काळजी वाटत होती.खूपदा समजावलं पण काहीही उपयोग नाही.एकीकडे लेकीचं असं वागणं तर नवऱ्याची दुसरीच तऱ्हा. .घरात पैसे देण्याव्यतिरिक्त कोणतीच जबाबदारी घेत नव्हता, मात्र जरा काही मनाविरुद्ध झालं की वाट्टेल ते बोलायचा.चिडचिड करायचा.अंजूच्या वागण्याविषयी दोष द्यायचा.आशा सगळं निमूट सहन करत होती.

सुरेश आणि अंजूमध्ये वाद तर रोजचेच. त्यासाठी कशाचंही निमित्त पुरायचं.घरातल्या कटकटी वाढल्या. दोघंही आपला राग आशावरच काढायचे.नवरा आणि मुलीच्या एककल्ली वागण्याचा प्रचंड ताण आशावर होता.सहन होईना अन सांगता येईना अशी अवस्था. सगळे अपमान,अवहेलना ती आतल्याआत साठवत होती. मनमोकळं बोलावं असं तिच्या आयुष्यात कोणीच नव्हतं. शेजारी राहणाऱ्या मंगलबरोबर आशाची छान गट्टी जमायची, पण सहा महिन्यापूर्वी मंगल दुसरीकडं रहायला गेली अन आशा पुन्हा एकाकी झाली.हळूहळू तिनं बोलणं कमी केलं.फक्त विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं द्यायची.घरात भांडणं सुरु झाली की कोरड्या नजरेनं पाहत बसायची. मनावरच्या ताणाचे परिणाम दिसायला लागले.तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या.निस्तेज चेहरा,डोळ्याखाली काळी वर्तुळ जमा झाली. खाण्या-पिण्यातलं लक्ष उडालं.वजन कमी झालं.खूप दिवसांची आजारी असल्यासारखी दिसायला लागली.आशामधला बदल आपल्याच धुंदीत जगणाऱ्या सुरेश आणि अंजूच्या  लक्षात आला नाही.आशानं सूड म्हणूनच स्वतःकडे दुर्लक्ष केलं.

एके दिवशी नेहमीसारखी बापलेकीत वादावादी चालू असताना किचनमधून ‘धाडकन’ पडल्याचा आवाज आला.अंजून पाहिलं तर जमिनीवर पडलेली आशा अर्धवट शुद्धित अस्पष्ट बोलत होती.लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. सगळ्या तपासण्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले.तीन दिवसांनी घरी सोडलं पण तब्येतीत फारसा फरक नव्हता.डॉक्टरांनी औषधं बदलली पण उपयोग नाही.खरंतर आशाला वैफल्य आलेलं.हताश,निराश मनस्थितीमुळे तब्येत सुधारत नव्हती.नाईलाजाने का होईना सुरेश,अंजू काळजी घेत होते, तरी आपसातली धुसफूस चालूच होती.आशाची ही अवस्था आपल्यामुळेच झालीय याची जाणीव दोघांना नव्हती. मन मारून जगणाऱ्या आशाचा त्रास समजून घेणारं कोणीच नव्हतं.वेदना बाहेर पडायला जागा नसल्यानं दिवसेंदिवस आशाची तब्येत खालावत होती. 

वरील घटनेतील ‘आशा’ हे एक प्रातिनिधिक उदाहरण. तिच्यासारखंच  मानसिक ओझं घेऊन जगणारे अनेकजण आहेत. 

नुकताच पावसाळा सुरू झालाय.धो धो कोसळणारं पाणी वाट मिळेल तिथून पुढे सरकते पण तेच पाणी नुसतंच साठत राहिलं तर ??? अनर्थ होईल –. तोच निकष मनाला लागू पडतो.

रोज अनेक गोष्टींना सामोरं जाताना अनेकदा मनाविरुद्ध वागावं लागतं.अपमान सहन करावे लागतात.राग,संताप गिळून गप्प बसावं लागतं.नोकरदारांना तर हा अनुभव रोजचाच.या सगळ्या तीव्र भावना मनात साठल्या जातात.अशा नकारात्मक भावनांचा साठा वाढत जातो.वेळच्या वेळी निचरा होत नाही.ताणामुळे शारीरिक त्रास सुरू होतात.

पूर्वी मन मोकळं करण्यासाठी नातेवाईक,शेजारी,मित्र-मैत्रिणी अशी जिवाभावाची माणसं होती.एकमेकांवर विश्वास होता.त्यांच्याबरोबर बोलल्यानं मन हलकं व्हायचं.एकमेकांची अनेक गुपितं बोलली जायची.सल्ला दिला घेतला जायचा.थोडक्यात मनातला कचरा वेळच्या वेळी काढला जायचा.आता सगळं काही आहे– फक्त मनातलं बोलायला हक्काचं माणूस नाहीये.सुख-सोयी असूनही मन अस्थिर.आजच्या मॉडर्न लाईफची हीच मोठी शोकांतिका. बदललेली कुटुंबपद्धती,फ्लॅट संस्कृती आणि मी,मला,माझं याला आलेलं महत्त्व .. .यामुळे कोणावर पूर्णपणे  विश्वास ठेवणं अवघड झालंय.मनातलं बिनधास्त बोलावं अशा जागा आता नाहीत.खाजगी गोष्टी सांगितल्यावर त्याचा गैरफायदा तर घेतला जाणार नाही ना?या शंकेनं मनातलं बोललंच जात नाही.मनाची दारं  फ्लॅटप्रमाणे बंद करून मग तकलादू आधार घेऊन जो तो आभासी जगासोबत एकट्यानं राहतोय.खूप काही बोलायचंय पण विश्वासाचा कान मिळत नाही.

— 

रोजचा दिवस हा नवीन,ताजा असतो.आपण मात्र जुनी भांडणं,टेन्शन्स,चिंता,मतभेद यांना सोबत घेऊन दिवसाला सामोरे जातो.शिळं,फ्रीजमधलं दोन-तीन दिवस ठेवलेलं अन्न खात नाही परंतु वर्षानुवर्षे मनात अपमान,राग,वाद जपून ठेवतो.संबधित व्यक्ती अनेक वर्षानंतर जरी भेटली तरी साऱ्या कटू आठवणी लख्खपणे डोळ्यासमोर येतात.भावना तीव्र होतात.राग उफाळून येतो आणि स्वतःलाच त्रास होतो.विचारात लवचिकता आणली तर कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं आणि काय सोडून द्यायचं हे ठरवता येतं.

इतरांच्या वागण्याचा स्वतःला त्रास करून घेणं…. सोडून द्या 

क्षुल्लक गोष्टींचे ताण घेणं…. सोडून द्या 

ऑफिसचं टेंशन घरच्यांवर काढणं….  सोडून द्या 

विनाकारण राग,द्वेष करणं ….  सोडून द्या 

इतरांचं वागणं नियंत्रित करू शकत नाही.तेव्हा….  सोडून द्या 

सगळंच नेहमी मनासारखं होणार नाही तेव्हा….  सोडून द्या. 

सर्वात महत्वाचे,

आजचं जग फार प्रॅक्टिकल आहे.वारंवार इमोशनल होणं… सोडून द्या 

आयुष्यात असं कोणीतरी असलं पाहिजे,ज्याच्याशी मनातलं सगळं बिनधास्त बोलता येतं 

हे वाचताना ज्याची आठवण झाली तोच तुमचा जिवलग.हे नक्की… त्याच्याशी बोला.वेळच्या वेळी भावनांना वाट करून द्या . .साठवण्यापेक्षा बोलून मोकळं व्हा.

पाणी आणि मनभावना वाहत्या असल्या तरच उपयोगी नाहीतर..

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares