मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “तळ्यातला गणपती” – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “तळ्यातला गणपती” – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

सारसबागेतील गणपती मंदिराला आज २४० वर्षे पूर्ण झाली. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात बांधलेले हे मंदिराला तळ्यातला गणपती या नावाने प्रसिद्ध आहे. सारस बागेतील…. ‘तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ आहे. 

नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे ‘विद्येचे माहेरघर’ मानले जाते. परंतु नवसाला पावणाऱ्या ‘तळ्यातला गणपती’ ने पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अगदी आत्तापर्यंत हे ठिकाण “तळ्यातला गणपती” याच नावाने ओळखले जायचे. 

पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेतील गणपती पेशव्यांचे पूजास्थान होते. पुण्याची वाढती पाण्याची गरज पाहून श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी १७५४ साली आंबील ओढ्याच्या प्रवाह बदलून मोठे तळे बांधले. या तलावाचे काम १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. या तलावात ‘सारस पक्षी’ सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग – बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्या नंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेचे काव्यात्मक ‘सारस बाग’ असे नामकरण केले. 

हैदरअली वर स्वारी करायला जाण्यापूर्वी येथील तळ्यात श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. साहजिकच पर्वती, सारस बाग आणि तलाव ही पुणेकरांची फिरावयास येण्याची व देवदर्शनाची ठिकाणे झाली. 

स्वातंत्र्यपूर्व काळात १८६१ च्या सुमारास शहरातील अनेक जागा पुणे नगरपालिकेकडे देण्यात आल्या. त्यावेळी गणपती मंदिराचे बेट सोडून तलावाची जागा मुंबई सरकारने पुणे नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. मंदिराची सर्व व्यवस्था देवदेवेश्वर संस्थान पाहते. सारसबाग हे उद्यान व तेथील गणपती पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण आहे.

माहिती संकलक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘अनासायेन मरणं’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘अनासायेन मरणं’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्।

देहांते तव सान्निध्यम् , देहि मे परमेश्वर:।।

माझे सासरे रोज पुजा झाल्यावर हा श्लोक म्हणतात. कधीकधी त्यांचा गळासुद्धा भरून येतो हे म्हणताना.

त्यांची पूजेची वेळ आणि माझी स्वयंपाकाची वेळ बहुधा एकच असते. मला पण छान वाटतं. असं वाटतं की माझ्या स्वयंपाकावर अनायासे संस्कार होत आहेत.

पूर्ण पूजा झाल्यावर जेव्हा ते हात जोडून हा आशीर्वाद देवाकडे मागतात, तेव्हा तो क्षण मी माझ्या मनात फार जपून ठेवते.

त्यांची पाठमोरी आकृती, देवाजवळ तेवणारी शांत समई आणि निरांजन, उदबत्तीचा सुवास आणि नुकतेच चंदनाच्या उटीने आणि झेंडूच्या किंवा तत्सम फुलांनी सजलेले माझे छोटेसे देवघर.

शुद्ध अंतःकरणाने देवाला काय मागायचे तर,

अनायासेन मरणं :

मृत्यू तर आहेच पण तो कसा हवा तर अनायासेन – सहज.

विनादैन्येन जीवनं :

जीवन असं असावं जिथे आपण कुणावर अवलंबून नको, उलट कोणाचातरी आसरा बनता यावे.

देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:

मृत्यूनंतर कोणाचं सानिध्य लाभावे तर ‘हे परमेश्वरा तुझेच’.

पण हे सगळं व्हायला आपलं जीवनक्रमण तसेच झालेले हवे, तरच हे शेवटचे दिवस समाधानाचे जातील.

इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले

गोविन्द नाम लेकर, फिर प्राण तन से निकले

 

हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा

न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा

काय मागणे आहे ना. रोज जर तुमच्या घरात ह्या सगळ्याचा गजर झाला, तर कुठल्या दुसऱ्या संस्कारवर्गाची गरज भासेल का?

परवा एका मैत्रिणीशी गप्पा मारत होते. दोन नवतरुणांच्या आयांची जी ओरड तोच विषय आमचापण होता.

हल्ली संस्कार कमी पडतात. बोलता बोलता ती म्हणाली, “आता काय गं आपली मुलं मोठी झाली. संस्कार वगैरे ह्या सगळ्याच्या पलीकडे, आता ती घडली. आता परिवर्तन होणार नाही.”

मला तेव्हा सांगावंस वाटलं तिला, ‘संस्कार काय १०वी-१२वी किंवा पदवीधर असं नाही गं.

आता १३ वर्षाचा कोर्स पूर्ण झाला, आता काही होणार नाही, असं नसतं.

संस्कार तुमच्या मनाची जडण-घडण आहे. ती एकदा करून चालत नाही, सतत मनाची मशागत करत राहावी लागते. ‘

माझीपण मुलगी आता मोठीच झाली आहे. पण जोपर्यंत ती घरात रोज हे बघेल, ऐकेल, तिच्या मनावर त्याचे संस्कार होतच राहतील.

आज कदाचित त्याचं महत्त्व तिला कळणार नाही. पण जेव्हा ती तिच्या आयुष्याची सुरुवात करेल, आपलं विश्व निर्माण करेल, त्यावेळी ही ‘संस्कार शिदोरी’ तिला उपयोगी पडेल.

देवासमोर हात जोडताना ‘नवस’ बोलण्यापेक्षा ‘दिलेल्या जीवनाबद्दल आभार’ मानणे, ह्यावर विश्वास ठेवणारी आपली संस्कृती. 

आपल्या जीवनाची  ‘जबाबदारी’ जोपर्यंत आपण घेत नाही, तोपर्यंत ‘ती अगाध शक्ती’सुद्धा आपल्याला मदत करणार नाही आणि ज्या क्षणी आपण आपल्या जीवनाची जबाबदारी घेतो त्याक्षणी आपले ‘मागणेच बदलते’.

अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्।

देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:।।

लेखक  :अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- हा आशानिराशेचा खेळ पुढे अनेक महिने असाच सुरू राहिला. खूप प्रयत्न करूनही हाती काही न लागताच अखेर  हातातून सगळं निसटून गेलंच.स्टेट बॅंकेची पूर्वीची वेटिंग लिस्ट रद्द होऊन नवीन भरतीसाठी पेपरमधे पानभर जाहिरातही झळकली. केवळ भावाच्या आग्रहाखातर त्या जाहिरातीस प्रतिसाद म्हणून मी पुन्हा नव्याने अर्ज केला. त्याच दरम्यान माझ्या मेहुण्यांच्या ओळखीने शिवडीतल्या ‘स्वान मिल’च्या  पीडीएफ् डिपार्टमेंटला मला दिवसभर चरकातून पिळून काढणारी तुटपूंज्या पगाराची नोकरी मिळाली आणि नव्या खेळाला नव्याने सुरुवात झाली!

पुढे जे घडत गेलं ते सगळं योगायोग वाटावेत असंच, पण ते योगायोग मात्र अघटीत म्हणावेत असेच होते!

‘क्वचित कधी अपयश आलंच तरी ते आपल्या हितासाठीच होतं हे कालांतरानं जाणवतंच’ हे कधीकाळी ऐकलेले बाबांचे शब्द मी त्या संघर्षकाळात घट्ट धरून ठेवले होते आणि पुढे ते आश्चर्यकारकरीत्या शब्दशः खरेही ठरले.)

मिलमधल्या कामाचा ताण दिवसेंदिवस वाढतच होता.त्याच धकाधकीत स्टेट बॅंकेचा नव्याने केलेल्या अर्जामुळे पुन्हा रिटनटेस्टसाठी काॅल आला.ती टेस्ट होऊनही महिनाभर उलटून गेला.रोजचं रुटीन अक्षरश: कसंबसं रेटणं सुरु होतं. मिलमधली नोकरी एक तर खाजगी. मिलमजुरांची आणि इतर स्टाफची पीएफ् खाती वर्षानुवर्षे अपडेटच केलेली नव्हती. त्यामुळे ऑडिटर्सनी घेतलेल्या स्ट्रीक्ट ॲक्शनमुळे ते प्रदीर्घकाळ पेंडिंग असलेले काम शिकून घेऊन ठराविक मुदतीत पूर्ण करण्याचं प्रचंड दडपण माझ्यावर असायचं.आमचे मॅनेजर शास्त्रीसाहेब तर कायम कातावलेलेच असायचे. कामासंदर्भातल्या काही शंका असतील तर त्यांच्याकडे जाऊन सांगण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. मी अदबीने त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो की मला पाहून त्यांचं कपाळ आठ्यांनी भरून जायचं. ते कामच अतिशय एकसूरी आणि किचकट असल्यामुळे खूप कंटाळवाणं वाटायचं न् तिथं माझ्या शंकांचं निरसन करुन कामाला गती देणारं कुणीही नव्हतं. तरीही ती नोकरी माझी गरज म्हणून मला टिकवणं भागच होतं. कामासाठी रोज रात्री उशीरपर्यंत बसायला लागायचं. खूप उशीर झाला की बस नसल्याने भुकेल्यापोटी शिवडीहून दादरपर्यंत चालत यावे लागे.या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत बहिणीच्या घरी मिळणारं घरपण हाच एकमेव दिलासा होता.

बहिणीचं मूळ सासरघर कोल्हापूरला होतं. तिथं घरी सर्वांना आणि इस्लामपूरला आमच्या आईबाबांनाही भेटण्यासाठी म्हणून बहिणीने रजा घेऊन थोडे दिवस तिकडं जाऊन यायचं ठरवलं.तिला पोचवायला मेहुणेही जाणार होते.दोन चार दिवस राहून ते परत येणार होते. त्या दरम्यान दादरला एकट्यानंच रहाणं माझ्या जीवावर आलं होतं. ते न सांगताच समजल्यासारखं माझी डोंबिवलीची मावशी एकदा दादरला बहिणीकडे आली होती, तेव्हा ती ‘तुम्ही जाऊन परत येईपर्यंत याचे इथे जेवणाचे हाल कशाला?थोडे दिवस बदल म्हणून मी याला डोंबिवलीला घेऊन जाते’ म्हणाली.मी चार दिवस मावशीकडे रहायचं आणि मेहुणे परत येतील तेव्हा मी त्यांना दादर स्टॅंडवर उतरवून घ्यायला यायचं न् मग दोघांनी दादरच्या त्यांच्या घरी जायचं असं सगळं आमचं  निघतानाच ठरलं. हे सगळं मला त्यावेळी सोईचं वाटलं खरं, पण तेच पुढं माझ्या आयुष्यात मात्र प्रचंड उलथापालथ करणार होतं याची तेव्हा आम्हा कुणालाच कल्पना नव्हती ! आज इतक्या वर्षानंतर ते सगळं आठवतं तेव्हा या सगळ्या घटनाक्रमात लपलेल्या अघटीत योगायोगाचं आश्चर्य वाटतं एवढं खरं!

ठरल्याप्रमाणे मी त्या रविवारी डोंबिवलीहून माझी बॅग घेऊन मेहुण्याना उतरवून घ्यायला निघालो. त्यांची बस रात्री साडेआठला येणार होती. उशीर व्हायला नको म्हणून मी आठ वाजताच तिथे जाऊन बसची वाट पहात थांबलो.बस अनपेक्षितपणे तासभर उशिरा आली. तिथून चित्रा टॉकीजसमोरच्या इस्माईल बिल्डिंगमधल्या घरी पोहोचेपर्यंत रात्रीचे साडेनऊ वाजून गेले होते. सामान घरी ठेवून,फ्रेश होऊन लगेच बाहेर जेवायला जायचं ठरलं होतं. आम्ही गडबडीने कुलूप काढून दार ढकललं तर समोरच शटरमधून आत टाकलेली दोन तीन पत्रे पडलेली होती. पुढे होऊन मी ती उचलली आणि पाहिलं तर त्यात एक लिफाफा चक्क माझ्या नावाचा होता ! इथे या पत्त्यावर आणि माझं पत्र? उत्सुकतेपोटी तो लिफाफा उचलला आणि घाईघाईने उघडून पाहिला तर आत ‘युनियन बॅंक आॅफ इंडिया’ कडून आलेलं एक पत्र होतं. मुंबईत आल्याबरोबर मी मेहुण्यांच्या सल्ल्याने माझ्या मनात नसतानाही इथल्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मधे नाव नोंदवलं होतं त्याची आठवण करुन देणारं ते पत्र होतं! कारण ते पत्र म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजद्वारे मागवलेल्या यादीनुसार नुकत्याच राष्ट्रीयीकरण झालेल्या युनियन बँक ऑफ इंडियाने मला पाठवलेलं ते रिटन टेस्टचं कॉल लेटर होतं! जीवघेण्या उकाड्यांत अनपेक्षितपणे मनाला स्पर्शून गेलेली ती गार वाऱ्याची झुळूकच होती जशीकांही! हे अनपेक्षित पत्र म्हणजे ‘स्वान मिल’ मधल्या रुक्ष,कोंदट वातावरणातून मला तात्काळ बाहेर पडणं सहजसुलभ  करणारी एक संधीच होती.त्या अनपेक्षित आनंदाच्या भरात क्षणाचाही विलंब न लावता मी ते कॉललेटर झरझर वाचून पूर्ण केलं आणि त्याचक्षणी सगळी शक्तीच कुणीतरी काढून घेतल्यासारखा मटकन् खुर्चीत बसलो. पत्र धरलेला माझा हात थरथरु लागला. डोळे नकळत भरून आले.

फ्रेश होऊन जेवायला जायच्या तयारीने मेहुणे बाहेर आले आणि मला पहाताच थबकले.

“काय रे? काय झालं? कुणाचं..कसलं पत्र आहे ते?”

मी सून्न होऊन गप्प बसलो.आता बोलण्यासारखं कांही शिल्लक होतंच कुठं? मी न बोलता ते पत्र त्यांच्या हातात दिलं.

“ओह्…” तो धक्का त्यांनाही अनपेक्षित होता. कारण प्रवासाला जाण्यापूर्वी दादरच्या घराला कुलूप लावलं होतं त्याच दिवशी हे पत्र इथं येऊन पडलं होतं,म्हणजे साधारण आठवडा होऊन गेला होता.पण ते आमच्या हातात पडायला मात्र बराच उशीर झाला होता. कारण रिटन-टेस्टची तारीख आदल्या दिवशीची म्हणजे शनिवारची आणि वेळ दुपारी अकराची होती. अर्थातच रिटर्न टेस्ट कालच होऊन गेलेली होती!

हातातोंडाशी आलेला सुग्रास घास पुन्हा एकदा हिरावला गेला होता!

मन कोंदट अंधाराने भरुन गेलेलं असतानाच पुढचे तीन साडेतीन तास असे झंझावातासारखे आले की अनपेक्षितपणे आकारलेल्या सकारात्मक घटनांनी त्या अंधारल्या मनात पुन्हा आशेची ज्योत पल्लवित झाली!

क्रमश:..  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जांभळीचे झाड – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

??

☆ जांभळीचे झाड – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(घराच्या मागच्या बाजूला तयार केलेल्या खड्यात जांभळीचे झाड उभे केले आणि त्यात माती भरली, शेणखत भरले वर पाणी ओतले.) – इथून पुढे — 

आता ते रस्त्यावरचे माझे लाडके जांभळीचे झाड माझ्या घराच्या आवरात उभे होते. माझ्या बायकोला हें काही पसंत नव्हते.ती झाड उभ करताना तिकडे फिरकली ही नव्हती.

आता झाड जगवणे हें महत्वाचे होते, आमच्या घरी कामाला येणारी शांता कडे मी या झाडाला रोज पाणी घालायची जबाबदारी सोपवली.

दुसऱ्या दिवशी मी पाहिले झाडाची पाने हिरवीगार होती, सायंकाळी घरी आल्यावर पाहिले, शांता ने पाणी घातले होते पण झाडें मलुल दिसत होती. मी रात्री उठून झाडाकडे गेलो, पाने आणि देठ पिवळे होतं होते. सकाळी पाहिले काही पाने गळून पडली होती, बरीच पाने पिवळी झाली होती. मी कॉलेजच्या वर्देसरांना फोन लावला, त्याचे म्हणणे, जुनी पाने गळून पडत असावीत, त्याची काळजी करू नका, नवीन कोंब येतात का पहा.

मी सकाळ दुपारी सायंकाळी मध्यरात्री झाडाकडे पहात होतो. पाणी शेणखत घालत होतो, पण काहीच प्रगती नव्हती.

मी निराश झालो. बायको म्हणत होते ते खरेच उगाचच रस्त्यावरचे झाड घरी आणले होते. मग आजूबाजूच्या लोकांचे सल्ले ऐकले, कोणी म्हणाले “असे झाड पावसाळ्यात लावायला हवे होते, या दिवसात जगणे कठीण,’.दुसऱ्याचे म्हणणे “रोज पाणी घालू नका, त्यामुळे मुळे कुजतात ‘.

एकांदरीत सर्व मला हसत होते, चेष्ठा करत होते.

मी दुःखी होतं होतो. एवढ्या अपेक्षेने आणि कोर्टात जाऊन या जांभळीच्या झाडाला मी घरी घेऊन आलो होतो, त्या करिता किती पैसे गेले होते? माझी किती मेहनत? आणि सर्वांनी माझी चेष्ठा करावी? बायकोने जाता येता टोमणे मारावे?

आज सहा दिवस झाले, जांभळीच्या झाडावरील सर्व पाने झडून गेली होती. त्यावर कोठेही नवीन कोंब येत नव्हते. माझा पराभव झाला होता, आता बायको काय बोलेल ते ऐकून घ्यावे लागणार होते. आजूबाजूची लोक, शेजारी यांना फुकटची करमणूक झाली होती.

माझे कशातच लक्ष नव्हते. अजूनही शांता पाणी घालतंच होती.

एका मलुल संध्याकाळी मी पुन्हा एकदा वर्दे सरांकडे गेलो. सरांकडे माझा पराभव मान्य केला. सरांनी शिवाजी विदयापीठतील biology चे प्रमुख डॉ सामंत यांचा नंबर दिला आणि त्यांचेशी बोलायला सांगितले.    

मी रात्री डॉ सामंत यांना फोन लाऊन सर्व हकीगत सांगितली. सामंत यांनी सर्व व्यवस्थित ऐकून घेतले, मग ते बोलू लागले 

डॉ सामंत -वकीलसाहेब, तुमच म्हणणं मी ऐकलं, तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेले जांभळीचे झाड उपटून काढलंत आणि तुमच्या घराच्या आवारात लावलत.

पण तुम्ही विचार केला काय त्या झाडाला किती वेदना झाल्या असतील? तुम्हाला जर तुमच्या घरातून ओढून बाहेर काढलं आणि दुसऱ्या घरात नेलं, तर तुम्हाला राग नाही का येणार?

मी -येणार सर, निश्चित येणार, पण मी माणूस आहे आणि ते तर झाड..

डॉ सामंत -इथेच आपली गफलत होते. तुम्हाला काय वाटते, झाडाला संवेदना नाहीत? राग नाही? दुःख नाही? आनंद नाही? झाडांना सहवास, प्रेम नको असत?

मी -सर, मला काहीच माहित नाही याबद्दल..

डॉ सामंत -तुम्ही कोकणात राहता, तुमच्या घरा शेजारी एक नारळीच झाड बागेतील झाडापेक्षा पाचपट उत्पन्न देत, बरोबर..

मी विचार केला, डॉ बरोबर आहे. आमच्या घरच्या बाथरूम चे पाणी घरा शेजारील माडा ला जाते त्याला बागेतील झाडापेक्षा कितीतरी जास्त नारळ धरतात.

मी -हो डॉ साहेब, बरोबर.

डॉ सामंत -याचे कारण घराशेजारील झाडाला तुमच्या घरचंचा सहवास मिळतो.

भारतीय शस्त्रज्ञ् डॉ जगदीश्चंद्र बोस यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे, वनस्पतीना सुद्धा राग, दुःख, वेदना, आनंद असतो. त्याना सहवास हवा असतो.

मी -मग डॉ माझे काही चुकलं का?

डॉ सामंत -खूपच चुकलं. रस्त्यावर एवढी वर्षे वाढलेलंय झाडाला उपटून काढतांना तुम्ही त्या झाडाची परवानगी घेतली होती का?

मी -नाही.. नाही.. मला याची काही कल्पना नव्हती.

डॉ सामंत,-ते झाड दुःखी झालाय. तुम्ही त्या झाडाची क्षमा मांगा. त्याला जाता येता गोंजारा. त्याच्या बुंध्यवर डोकं टेकवा, सतत त्याच्या सानिध्यात राहा आणि एक महिन्या नंतर मला फोन करा.

डॉ नी फोन ठेवला.

मी हडबडलो. मला वनस्पतीच्या  सवेंदना, भावना या विषयी काही कल्पनाच नव्हती, शाळेत असताना जगदीशचंद्र बोस यांच विषयी धडा होता पण तो पाच मार्कचा एव्हडाच इंटरेस्ट.

मी घरामागे आलो, चांदण्यात जांभळीचे झाड निश्चिल उभे होते. त्याचावर नाही फादी नाही पान. मी त्याच्या बुंध्यावर डोकं टेकले आणि रडू लागलो “क्षमा कर मला, क्षमा कर, तुला न विचारता तुला उपटून काढलं मी. दुष्ठ माणूस आहे मी. माझ चुकलं… कितीतरी वेळ मी रडत होतो.

दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या मी झाडाकडे गेलो, आज मी स्वतः विहिरीतील पाणी काढून मुळाभोवती शिंपले. अर्धातास मी झाडासोबत होतो.मग मी कोर्टात गेलो, रोजची कामे करताना सुद्धा माझ्या डोळ्यसमोर ते जांभळीचे झाड होते. रात्री घरी आलो, हातपाय धुतले आणि झाडाकडे गेलो. परत परत त्याची क्षमा मागितली. झाडाला गोंजारले, त्याचाशी गप्पा मारल्या.

माझ्या बायकोने माझ्याशी बोलणे सोडल होते. माझे जे काय चाळे चालले होते, त्याची मनातल्या मनात ती चेष्ठा करत असणार.

शांता मात्र माझ्या सूचनेनुसार रोज झाडाकडे जात होती, परत एकदा पाणी घालत होती.

दहा दिवस झाले असतील, मी सकाळी उठून झाडाला पाणी देत होतो, एव्हड्यात शांता आली आल्या आल्या ती झाडाकडे आली, आणि मोठ्याने ओरडली “भाऊंनू, ह्या बघा, झाडाक कोंब येता.. हेकाच पुढे फादी येतली आणि पाना पण येतली ‘.

मी धावलो, खरंच झाडाला दोन कोंब फुटत होते.

मी झाडाच्या बुंध्यवर डोकं टेकले आणि रडू लागलो. शांता चे ओरडणे ऐकून बायको बाहेर आली, तिने पण ते दोन कोंब पाहिले आणि ती प्रथमच हसली.

माझे रोज सकाळी उठून झाडाला गोंजारणे, झाडाशी गप्पा मारणे पाणी घालणे सुरूच होते.

ते दोन कोंब हळूहळू मोठे होतं गेले. आणखी कोंब आले, आणखी कोंब आले… लालचुतुक पाने आली..

पाने जून झाली.. फाद्या मोठया झाल्या.. संपूर्ण जांभळाचे झाड पानांनी भरून गेले.

— समाप्त — 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हर्क्युलस विमानाचा पराक्रम… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हर्क्युलस विमानाचा पराक्रम… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

भारतीय सैन्याने आपल्या दोन दिवसांच्या धाडसी  कामगिरीमुळे  आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविली,  युगांडामध्ये इस्रायलने पूर्वी केलेला पराक्रम व भारताने आता केलेला पराक्रम हा सारखाच आहे.  

 भारतीय वायुसेनेच्या या कृतीने जग आश्चर्यचकित झाले आहे आणि भारताच्या उदयाचे कौतुक करत आहे.  भारतीय युगाची ही सुरुवात आहे असे जग  म्हणू लागले आहे.

सुदान मध्ये घडलेली ही घटना खूप धक्कादायक आणि थरारक होती .  भारतीय हवाई दलाच्या विमानांनी युक्रेन आणि काबूलमधील भारतीयांची सुटका करणे ही फार मोठी गोष्ट नव्हती कारण ते नेहमीच्या औपचारिकतेसह योग्य विमानतळांवर दिवसा उजेडी घडलेल्या होत्या.  

सुदानमध्ये तसे झाले नाही,  सुदानची हवाई हद्द बंद आहे आणि कोणत्याही विमानाला उड्डाण करण्याची परवानगी नाही, फक्त अमेरिकेने आपल्या राजदूतांना वाचवण्यासाठी आपले हेलिकॉप्टर धाडसाने पाठवले आहेत. इतर सर्व देश तेथे ठप्प आहेत, विमानतळावरील लढाईमुळे उड्डाणे अशक्य होतात आणि इतर अनेक मार्गक्रमण  अशक्य होते.    

121 भारतीय देखील असेच अडकले होते आणि त्यांना वाचवणे हे मोठे आव्हान होते

पंतप्रधान मोदींनी भारतीय हवाई दलाला पूर्ण अधिकार दिले आणि भारतीय गुप्तचर सेवा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयासहीत  भारतीय हवाई दल उत्साहाने मैदानात उतरले.

विदेशी विमाने सुदानमध्ये उडू शकत नाहीत आणि उड्डाण केल्यास दोन्ही बाजूंनी भीतीपोटी हल्ला होऊ शकतो, याशिवाय मुख्य विमानतळ जीर्ण आहे, अशा परिस्थितीत सुदानच्या परवानगीशिवाय भारतीयांची सुटका करावी लागणार आहे. हे आव्हान त्यांच्यासमोर होते. 

भारतीय गुप्तचरांनी सुदानची चौकशी केली आणि राजधानीच्या पलीकडे 50 किमी अंतरावर एक मानवरहित, बंद विमानतळ शोधला. तेथे विमान उतरविता येईल पण अनेक अडचणी आहेत.  

सर्व प्रथम, त्या विमानतळावर  कोणीही नाही, वीज नाही, दिवे नाहीत, हवाई वाहतूक नावाचे कोणतेही मार्गदर्शन नाही, येथे विमान लँडिंग किंवा टेक ऑफ करणे असो, धोका जास्त आहे.

विमान आले तरी  सुदानुना  चुकवून येणे अवघड आहे.   तसे पाहिले तर भारतीय विमानांना उड्डाणासाठी पेट्रोलमुक्त मार्ग नाही.  त्यामुळे अनेक समस्या या कार्यात आहेत. 

प्रथम, भारतीय हवाई दलाने आपल्या कमांडोसह एक मोठे विमान सौदी जेद्दाहला पाठवले, तेथून ते सुदानच्या बाजूने होते, जेणेकरून एकच इंधन भरणे पुरेसे होते.

भारतीय हवाई दलाने अत्यंत गुप्ततेत सनसनाटी कामगिरी  पार पाडली  १२१ लोकांना  संध्याकाळी शांतपणे  मानवरहित विमानतळाजवळ गुपचुप आणून लपवून ठेवले.  

त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या हर्क्युलस विमानाचा पराक्रम सुरू झाला. 

विमानात दिवे न लावता  अंधारात उड्डाण केले त्यामुळे कोणाच्याही नजरेस न पडता विमान ईप्सित स्थळी पोहोचले . हे उड्डाण करताना त्यांनी  नाईट व्हिजन अटॅक उपकरणे वापरली आणि उपग्रहाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विमानाने अंधारात उत्तम प्रकारे उड्डाण केले.

वैमानिकांनी रात्री विमान सुरक्षितपणे उतरवले आणि इंजिन चालूच ठेवले.  

विमानाचा दरवाजा उघडला आणि भारतीय कमांडो धावत आले आणि विजेच्या वेगाने विमानात १२१   जणांना घेऊन गेले. या गोष्टीस सात मिनिटे लागली.   सौदी अरेबियातील जेद्दाह येथे विजेच्या वेगाने जाणारे विमान उतरल्यानंतर भारतीय मायदेशी परतले. 

या घटनेचे जागतिक स्तरावर तीव्र पडसाद उमटत आहेत.  इस्त्राईल वगळता इतर कोणत्याही देशाने असे आव्हान स्वीकारले नाही आणि भारताने ते यशस्वी केले आहे.  हे ऑपरेशन खूप आव्हानात्मक होते , जर विमान अडकले किंवा लढाऊ विमानांनी  घेरले गेले असते  तर फार मोठा धोका होता. शनिवार २९.४.२०२३ रोजी हे घडले. 7 मिनिटांत सुदानमधून भारतीयांची सुटका झाली. 

प्रत्येक प्रकल्प सावधपणे परंतु धैर्याने संकल्पित केला जातो आणि आव्हान असतानाही तो कार्यान्वयीत केला जातो.  हा पराक्रम करणाऱ्या पायलट आणि क्रू चीफचे तपशील अद्याप जाहीर झालेले नाहीत. 

त्यांच्या नावांची पुरस्कारांसाठी घोषणा केव्हा होईल हे नक्की कळेल. 

भारतीय हवाई दलाने मोठी कामगिरी केली असून प्रत्येक भारतीयाने छाती उंच करून अभिमानाने अभिवादन करण्याची वेळ आली आहे.

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : अमोल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “चहा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “चहा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

चहाला सोडा लागत नाही..

Tonic water लागत नाही..

प्रिंगल्स , खारवलेले काजू  , शेजवान , चकल्या लागत नाहीत…

साध्या चिनीमातीच्या कपात काम होतं !

crystal glass चे फालतु खर्च नाहीत..

गरमच प्यावा लागतो त्यामुळे सर्दी, घसादुखी होत नाही…

आबालवृद्धांसमोर बसून आबालवृद्ध पिऊ शकतात..

देव्हाऱ्यासमोर / देवळासमोर / देवळामागे / मार्गशीर्षात / गुरुवारी / शनिवारी / तीर्थक्षेत्री / चतुर्थी कधीही , कुठेही पिऊ शकतो..

कितीही महागाचा घेतलात तरी ६० ml चा जास्तीत जास्त खर्च ३०-४० रुपयेसुद्धा होणार नाही. 

” आत्ताच पिऊन आलो, ” असं न घाबरता तोंड वर करून सांगता येतं.

perfume मारावा लागत नाही.

centre fresh खावा लागत नाही.

१२० ml पिऊनसुद्धा कप खाली ठेवल्या ठेवल्या स्टिअरिंग हातात घेऊन बेफाम गाडी चालवू शकता.

Traffic police अडवत नाही.

चार मित्र मिळून प्यायला बसलात, तर मधेच उठून कुणी कुणाला मिठ्या मारत नाही, किंवा एकाएकी इंग्लिशही बोलत नाही.

चहामुळे कुणाला अद्याप जुन्या खटल्यांची आठवण येऊन, धाय मोकलून रडत, गजल आणि breakup songs लावल्याचं पहाण्यात नाही…

चहाचा कच्चा माल टेनेसी किंवा स्कॉटलंड किंवा रशियावरून यायची गरज नसते…

आसाम, दार्जिलिंग, केरळ वगैरे देशी ठिकाणी तयार होतो.

देशसेवासुद्धा होते.

काळ्या पिशव्यांची गरज नसते.

लाकूड तोडून त्याचे बॅरल्स लागत नाही..

गॅसशेगडी, म्हशीचं  ताजं दूध, चहाची पत्ती नि साखर एवढंच पुरतं.

असा हा निरागस, पण तितकाच चैतन्यदायी चहा, तुम्हाला आजन्म मिळत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.

सोबत उत्तम गरम गरम चहा करून, हातात आणून देणारा/देणारी मिळाली तर चहात वेलची !

कवी :अज्ञात

संग्राहक  : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राम आणि सीता ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ राम आणि सीता ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

रामायणातील अनेक महत्त्वाच्या पात्रांबद्दल आपण आजवर चर्चा केली. राम आणि सीता यांच्या जीवन  चरित्रावर पण आपण बोललो. पण या दोघांचे पती पत्नी म्हणून सहजीवन कसे होते ते आज पाहू या.

राम आणि सीता हे एकमेकांवर निस्सीम प्रेम असणारे एक असे अलौकिक जोडपे आहे की ज्यांची कीर्ती युगानुयुगे अमर राहील. राम आणि सीता यांना नियतीने एकत्र आणले होते. त्यांनी कधी एकमेकांना पाहिले नव्हते किंवा एकमेकांबद्दल ऐकले देखील नव्हते. विश्वामित्र ऋषी यज्ञाच्या रक्षणासाठी राम लक्ष्मणाला घेऊन जातात. रामलक्ष्मण  राक्षसांचा नायनाट करतात. अशा वेळी जनक राजाकडून सीतेच्या स्वयंवरासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण जनकाकडून विश्वामित्रांना येते आणि ते आपल्यासोबत राम लक्ष्मणाला घेऊन जातात.

जनकाने त्या विवाहासाठी एक पण ठेवलेला असतो, तो म्हणजे शिवधनुष्य उचलण्याचा. जेव्हा तेथे उपस्थित सगळे राजे ते उचलण्यात अयशस्वी होतात, तेव्हा विश्वामित्राच्या आदेशानुसार राम ते शिवधनुष्य उचलतो. ते त्याच्या हातून भंग होते. आणि मग सीता रामाला वरमाला घालते. मात्र विवाहापूर्वी सीता रामलक्ष्मणाला पुष्पवाटिकेत पाहते ,त्याचवेळा हा लावण्यमूर्ती असलेला राम तिच्या मनात भरतो. आणि त्याच्याशीच आपला विवाह व्हावा ही इच्छा तिच्या मनात निर्माण होते. सीता ही भूमीकन्या तर राम हा विष्णूचा अंश. त्यांच्या विवाहाने जणू भूमी आणि आकाश एकत्र येतात.

आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे,

स्वयंवर झाले सीतेचे.

लग्नानंतर जेव्हा श्रीराम पित्याला दिलेल्या वचनानुसार वनवासाला निघतात, तेव्हा ते सीतेचा निरोप घ्यायला येतात. रामाशिवाय राहायचे ही कल्पना देखील सीता सहन करू शकत नाही. म्हणून राम जेव्हा तिला समजावतात की वनवासातले जीवन अत्यंत कठीण आणि दुःखदायक आहे. तेव्हा तू अयोध्येतच राहा. त्या प्रसंगी क्षणाचाही विचार न करता सीता म्हणते निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता.

इतकी ती राममय झाली आहे. राम आणि सीता यांची शरीरे फक्त वेगळी आहेत. आत्मा एकच आहे. ते एकजीव झालेले आहेत. एवढेच नाही तर सीता ही रामाची शक्ती देखील आहे. सीतेशिवाय राम अपूर्ण आहे. म्हणून तो सीताराम आहे. त्यामुळे श्रीराम आपल्यासोबत वनवासात सीतेला घेऊन जातात. जसा राम हा सर्व बाबतीत आदर्श आहे तशीच सीता सुद्धा. ती आदर्श पत्नी, आदर्श माता, आदर्श सून, आणि आपल्या दिरांवर पुत्रवत प्रेम करणारी वहिनी आहे.

सीतेला रामाच्या पराक्रमावर कधीही न ढळणारा विश्वास आहे. म्हणून वनवासात जेथे हिंस्त्र प्राणी आहेत, राक्षसांची भीती आहे अशा ठिकाणी सुद्धा रामाच्या पराक्रमावर श्रद्धा असणारी सीता त्याच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवून निर्धास्त आहे. निर्भय आहे. एवढेच नाही तर वनवासातील हा रामासोबतचा काल तिच्या जीवनातला आनंददायक आणि सुखकारक असा काल आहे कारण या काळात आपल्या प्रिय राघवाबरोबर तिला राहायला मिळते.  त्यापुढे राजप्रासादातील आणि स्वर्गातील सुखे देखील तिला तुच्छ आहेत.

रामाच्या पराक्रमावर तिचा किती विश्वास असावा, आणि रामावर तिचे किती प्रेम असावे याची साक्ष देणारा एक प्रसंग रामायणात आहे. रावण तिला पळवून घेऊन जाताना आपल्या शौर्याचे वर्णन तिच्यापुढे करतो. तो म्हणतो की मी देवांना सुद्धा बंदी बनवले आहे. तेव्हा सीतेने त्याला दिलेले उत्तर अतिशय सुंदर आहे. ती म्हणते, ‘ तू कसला शूर आणि पराक्रमी ? तू तर सिंहीणीचे हरण केले आहेस. एखाद्या कोल्ह्याप्रमाणे . माझे पती राम म्हणजे नरसिंह आहेत. आणि कोल्हा कधीही सिंहाची बरोबरी करू शकत नाही. ‘ किती सुंदर आणि बाणेदार उत्तर आहे. तेही रावणासारख्या महापराक्रमी पुरुषाला न घाबरता धिटाईने दिलेले.

आता तिला रावणाने पळवून नेल्यानंतर रामाची काय अवस्था होते ? तर तो प्रचंड शोकविव्हल होतो. सीतेचा विरह त्याला सहन होत नाही. जणू रामाची शक्तीच हरवते. असे त्या दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम असते.  रावणाच्या लंकेत काही काळ काढला म्हणून ती अपवित्र झाली असे लोकांनी म्हणू नये म्हणून सीता अग्निपरीक्षा देते. तिच्या मनात एका रामाशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार नसतो. म्हणून तर अमर अशा पाच पतिव्रतांमध्ये सीतेचे नाव घेतले जाते. अर्थात रामाच्या मनात तिच्याबद्दल कोणतीही शंका नसते. ती पवित्र आहे हे राम जाणून होता. लोकांना असे वाटते की राम जर आदर्श पती असेल तर त्याने सीतेचा त्याग का केला ?

त्याचे उत्तर असे देता येईल की रामायण काळात राजघराण्यातील व्यक्तींबद्दल, त्यांच्या चारित्र्याबद्दल आपली मते व्यक्त करण्याची लोकांना मुभा होती. आताही आपण जी रामायण मालिका पाहतो आहोत, त्यातही दशरथ, कैकयी, भरत इ बद्दल चर्चा करताना लोकांना वेळोवेळी दाखवले आहे. अशाच पद्धतीने सीता परत आल्यानंतर नगरवासी तिच्याबद्दल चर्चा करत होते. रामाच्या कानावर ही वार्ता येते. कोणा एका व्यक्तीच्या सांगण्यावरून रामाने सीतेचा त्याग केलेला नाही तर अयोध्यानगरीतील अनेक पौरजनांच्या मनात ही शंका होती.

या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की त्यावेळी राम हा केवळ पती नव्हता. तो राजा देखील होता. या प्रसंगाच्या निमित्ताने त्याचा पतिधर्म आणि राजधर्म यात संघर्ष निर्माण झाला आहे. आणि आपल्याला हे माहिती आहे की राम कधीही भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेत नाही. रामायणातले अनेक प्रसंग त्याची साक्ष देतात. तो आधी प्रजाहितदक्ष आणि कर्तव्यकठोर राजा आहे आणि बाकीच्या सगळ्या भूमिका नंतर. जेव्हा कुटुंब आणि राष्ट्र यांच्यात निर्णय घेण्याचा प्रश्न येतो, तेव्हा कुटुंबाच्या स्वार्थाचा त्याग करून राष्ट्रभावनेला परमोच्च महत्व दिले पाहिजे. ‘ ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत ‘ रामाने तेच केले. आपल्या राज्यासाठी त्याने हा सर्वोच्च त्याग केला. रामाने पत्नीचा नव्हे तर राजाने राणीचा त्याग केला आहे. रामाच्या मनात पत्नी म्हणून सीतेचे स्थान कायमच आहे. रामाच्या या स्वभावाची सीतेला देखील कल्पना होती. म्हणून तिला आपल्यावर हा झालेला अन्याय आहे अशी तिची तक्रार नव्हती.

रामाने तिचा त्याग केला असता तर त्याला दुसरे लग्न करता आले असते. यज्ञाच्या वेळी दुसरी पत्नी करता येते असे रामाला सांगितले गेल्यावर सुद्धा राम त्या गोष्टीला स्पष्टपणे नकार देतो. तो म्हणतो की रामाच्या हृदयसिंहासनावर एकाच व्यक्ती पत्नी म्हणून विराजमान आहे. आणि ती म्हणजे फक्त सीता. म्हणून दुसरे लग्न न करता सीतेची सोन्याची मूर्ती तयार करून यज्ञाला बसतो. इतके प्रेम रामाचे सीतेवर आहे. त्यामुळे तो जेव्हा राजाच्या भूमिकेत होता, तेव्हा राजाचे कर्तव्य त्याने पार पडले. आणि पतीच्या भूमिकेत होता, तेव्हा एका सीतेशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार त्याच्या मनात नव्हता. म्हणून तो आदर्श पती सुद्धा आहेच. राम आणि सीता यांचे सहजीवन आदर्श सहजीवनाचा एक सुंदर नमुना आहे. आणि राम सीता ही  एक अलौकिक प्रेमकथा सुद्धा.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जांभळीचे झाड – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

??

☆ जांभळीचे झाड – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

मी गेली अंदाजे तीस वर्षे याच रस्त्यावरून जातो आहे. शाळेत असताना याच रस्त्यावरून सुरवातीला चालत, मग सायकलवरुन आणि हल्ली काही वर्षे स्कुटर वरुन किंवा गाडीतून.

शाळेत असताना मी आणि माझे मित्र आमच्या घरापासून अंदाजे दिढ किलोमीटर अंतरावर थोडी विश्रांती घयायचो.रस्त्याच्या आजूबाजूला काही आंब्याची, रतांब्याची, फणसाची झाडें होती, या ठिकाणी एक जांभळीचे झाड होते. माझे मित्र मोठया आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घ्यायचे पण मी मात्र या जांभळी खाली थांबायचो. त्या झाडाच्या सावलीखली दोन मिनिटे थांबून आम्ही पुन्हा चालू लागायचो किंवा सायकलवर पुन्हा बसायचो.

जाता येता त्या जांभळीच्या झाडाकडे का कोण जाणे पण माझे लक्ष असायचेच. जानेवारी महिना आला की झाडाला पालवी फुटायची, हिरवीचुटुक पालवी, मग हळूहळू लहान लहान हिरवी फळे मग ती तांबळी होतं, जासजस उन्हाळा वाढू लागला की तांबडी जांभळे काळी होतं.

या झाडाला घोसाने जांभळे लागत. जांभळे पिकली की काळिभोर जांभळे टपटप खाली पडत, मग खाली भटकी कुत्री जमत आणि जांभळे खात आणि मे अखेर पर्यत धस्थपूष्ठ होतं.

आम्ही मित्र पण जांभळी खाली जमायचो, आमच्यातील माझ्यासकट सर्व झाडावर चढायचे.पिशवीभर जांभळे काढायचो आणि घरी नेऊन घरच्याना दयायचो. जांभळीचे झाड अत्यन्त कोरम असते, त्याच्या फानदी वरुन आम्ही कधी ना कधी पडून हात, ढोपरे मोडून घेतली आहेत.

मी वकिली शिक्षण मुंबईमध्ये घेतले आणि पुन्हा आमच्याच या तालुक्याच्या गावी प्रॅक्टिस करू लागलो. पुन्हा घरून याच रस्त्यावरून जाऊ येऊ लागलो जातायेता या झाडावर माझे लक्ष असेच.

गाव वाढले, वस्ती वाढली, लोकांनी लांब घरे घेतली. त्या झाडाखाली आता भाजीवाली, फळवली बायका बसू लागल्या.मी मुद्दाम जांभळीखाली बसणाऱ्या मावशीकडून कधी भाजी, कधी शेंगा, कधी आंबे घेऊ लागलो. माझ्या बरोबर कधी कधी बायको असायची ती पण भाजीवल्या मावशीच्या ओळखीची झाली.

एक दिवस चांगल्या शेवग्याच्या शेंगा दिसल्या म्हणून मी थांबलो, तशी भाजीवाली मावशी मला सांगायला लागली 

“भाऊंनू, आमका आता दुसरी जागा बघूची लकतली ‘

“कशाक?

“ह्या जागेची मोजणी सुरु आसा दोन दिवस, रस्त्याच्या रुंदीकरण सुरु होतला. ही झाडा पण तोडतले म्हणतात ‘.

“काय, झाडा तोडतले? म्हणजे ही जांभळी पण..

“होय तर, ह्या जांभळीवर पट्टे मारलेत ते काय, सरकारचे म्हणून ‘.

मला एकदम टेन्शन आले, गेली कित्येक वर्षे या इथे जांभळीला पहायची सवय, ते झाड तोडणार? मग या झाडावरची जांभळे खाणाऱ्या पक्षी, कावळे, कुत्री, आम्ही माणसे यांनी काय करावे? या झाडा पासून मिळणारी सावली, आमच्यापासून हिरावून नेणार?

मी दुसऱ्या दिवशी रस्ते बांधकाम विभागात गेलो आणि चौकशी केली. तेथल्या अधिकाऱ्याने मला तेंच उत्तर दिले

“वाहने खुप वाढली आहेत, सध्याचा रस्ता पुरा पडत नाही, रुंदीकरण करायला हवे, असे सरकारचे म्हणणे, मोजणी झाली आहे. पुढील महिन्यात काम सुरु होईल, त्यामुळे झाडें तोंडावीच लागतील,’.

मी दोन दिवसांनी जिल्हा कलेक्टरना भेटलो आणि या रस्त्याच्या रुंदीकरणाला विरोध करणारे पत्र त्यांच्या हवाली केले. कलेक्टरसाहेबांचे तेंच म्हणणे. त्या भागात आता वस्ती वाढली आहे. याच  रस्त्यावरून हायवे कडे जाता येते, त्यामुळे रुंदीकरण करावेच लागेल.’.

कोणीच दिलासा देत नाही हें पाहून मी कोर्टात सरकार विरुद्ध दावा ठोकला. मी स्वतः वकील होतोच.कोर्टाचा निकाल लागेपर्यत रुंदीकरण थांबले.

शेवटी कोर्टात केस उभी राहिली. सरकारच्या वकिलांनी आपली बाजू मांडल्या नंतर मी कोर्टाला म्हणालो “रस्ता रुंदीकरण करणे आवश्यकच असेल तर करा पण झाडें का तोडता?

माननीय कोर्टाने मला विचारले “वाटेल आलेली झाडें तोडल्याशिवाय रुंदीकरण करणे शक्य आहे काय? तुम्हाला झाडें तोडू नये असे वाटतं असेल तर झाडें उचलून दुसरीकडे लावा’.

“हें कसे शक्य आहे? मी विचारले.

कोर्ट म्हणाले “शक्य आहे. काही देशात झाडें कुपळून दुसरीकडे लावतात आणि ती जगतात, तुम्ही हवे असल्यास माहिती घ्या ‘.

मी विचार केला आणि कोर्टाला विचारले “मला या रस्त्यावरील जांभळीचे झाड मिळाले तर मी ते माझ्या बागेत लावू इच्छितो, त्याची परवानगी द्यावी ‘.

कोर्टाने मला जांभळीचे झाड न तोडता दुसरीकडे लावायची परवानगी दिली.

 मी कोर्टाचा निकाल हातात घेतला आणि आमच्या शहरातील कॉलेज मधील biology चे प्रोफेसर वर्दे यांना भेटायला गेलो.

वर्दे यांना विचारले “असे झाड जमिनीतून कुपळून काढून दुसऱ्या ठिकाणी लावणे शक्य होते काय?

“होय, हल्ली परदेशात मोठमोठे वृक्ष कुपळून ते दुसऱयाठिकाणी लावली गेली आणि ती जगली, अशी उदाहरणे आहेत.’

वर्देनी मला या संबधी माहिती असलेली पुस्तके दिली.

मी घरी आलो आणि बायकोला मी जांभळीचे झाड रस्त्यावरून काढून आपल्या आवारात लावतो आहे, असे सांगितले.

बायको माझ्यावर चिडली. असले नको ते धंदे का करता, अशी झाडें कधी जगत नाहीत ‘असे सांगून माझा हिरेमोड करू लागली. मी तिला सांगितले “लहानपणा पासून त्या जांभळीच्या झाडाला मोठे होताना, त्याला जांभळे लागताना, त्या झाडाची जांभळे खाताना मी पाहिले आहे. ते झाड तोडून त्याचे सरपण करावे, हें मला पाहवणार नाही.

माझा हा कदाचित वेडेपणा असेल कदाचित पण माणसाने कधीतरी वेडेपणा करायला हवा. मी तो करणार आहे. तुला पटत नसेल तर मला साथ देऊ नकोस पण मला या वेडापासून दूर नेऊ नकोस ‘

माझा स्वभाव माहित असल्याने बायकोने बडबड केली आणि ती गप्प बसली.

मग मी कामाला लागलो. माझ्या ओळखीच्या शिवा लमाणीला बोलावले आणि त्याला माझ्या घराच्या मागील जागा दाखवली. त्याच्या माणसानी जागा साफ केली आणि चार बाय चार खड्डा खणला. त्यात जुना पालापाचोळा, शेणखत आणि मुंगीची पावडर टाकली. सतत दोन दिवस पाणी त्या खड्ड्यात ओतले आणि माती भुसभूशीत केली. 

मग आमचा मोर्चा रस्त्यावरील जांभळीच्या झाडाकडे वळवला. कुदली फवडीने झाडाभोवती खणत आणि कमीत कमी पाळे तोडून दहा कामगारांनी झाड बाहेर काढले आणि ट्रॉली मध्ये ठेवले.मग ट्रॉली आमच्या घराकडे निघाली.

घराच्या मागच्या बाजूला तयार केलेल्या खड्यात जांभळीचे झाड उभे केले आणि त्यात माती भरली, शेणखत भरले वर पाणी ओतले.

– क्रमशः : भाग पहिला

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हा माणूस परका ? – लेखक – श्री महेश कुलकर्णी ☆ संग्रहिका – सुश्री सुलु साबणेजोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ हा माणूस परका ? – लेखक – श्री महेश कुलकर्णी ☆ संग्रहिका – सुश्री सुलु साबणेजोशी ☆

सिगफ्रीड वुल्फ

हा माणूस परका ?

तर लेखासमवेत असेलला फोटो पाहून तुम्ही म्हणाल, “काय हे, आजच्या दिवशी परक्या माणसाचा फोटो टाकतोय?” पण त्यामागे कारणच तसे आहे. फोटोमधील माणसाचे नाव आहे Mr. Siegfried Wolf. Mr.Wolf हे Universität Heidelberg मध्ये प्राध्यापक आहेत. तर त्यांच्याबद्दल लिहिण्याचे कारण असे की, २०१४ मध्ये आम्ही German भाषा शिकत होतो. भाषेवर बऱ्यापैकी प्रभुत्व मिळवले होते. वीर सावरकर ह्यांच्या ऐतिहासिक उडीबद्दल काही जुने लेख आणि छायाचित्र त्या काळी German वृत्तपत्रांमध्ये झळकली होती, असे आमच्या ऐकिवात होते. ती इंटरनेटवर मी German भाषेत शोधत होतो आणि ते शोधत असताना मला एक  PDF मिळाली. तर ती pdf होती वीर सावरकर ह्यांच्यावर लिहिलेली जवळ जवळ ७०० German पाने आणि लेखक होते हे Mr.Wolf.  Mr.Wolf ह्यांच्या पुस्तकाचे PHD च्या विषयाचे नाव खालीलप्रमाणे: Thesis:  ‘The Construction of a Collective Identity in India: Vinayak Damodar Savarkar and his Hindutva-Concept’, final grade : Magna Cum Laude.

त्यांचा PHD चा विषय पाहून आणि ७०० German पानांचे पुस्तक पाहून मी थक्क झालो. मी त्यांना लगेच ईमेल पाठवून धन्यवाद दिले.

एखादा परकीय माणूस आयुष्याची ६ वर्षं वीर सावरकर ह्यांच्यावर PHD करण्यात घालवतो आणि आपण साधे त्यांचे विचार on to the last man पोहोचवू शकत नाही, ह्याची मला तर शरम वाटते. आम्ही Germany मध्ये असताना ह्या सदगृहस्थांना भेटता आले नाही, पण भविष्यात त्यांना आम्ही नक्की भेटू. वीर सावरकर ह्यांना ‘भारतरत्न’ सन्मान मिळावा म्हणून Germany मधून काही हालचाली करता येतील का? अशा आशयाचे पत्र मी त्यांना आता पाठवणार आहे.

वीर सावरकर अमर रहे… अखंड भारत अमर रहे.!! 

लेखक : श्री महेश कुलकर्णी

प्रस्तुती : सुश्री सुलु साबणे-जोशी.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दासबोधातील समर्थ बोध… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

दासबोधातील समर्थ बोध… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

दासबोधातील समर्थ बोध

मुख्य हरिकथा निरूपण । दुसरें तें राजकरण । तिसरें तें सावधपण । सर्वविषईं ॥ ४ ॥

सरळ अर्थ :- 

लोकसंग्रह करणाऱ्याच्या अंगी कोणती लक्षणे हवीत, ते येथे सांगत आहेत. त्याला उत्तम प्रकारे हरिकथा आणि अध्यात्मनिरूपण करता आले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अंगी मुसद्दीपणा हवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वच बाबतीत सावधपणा हवा. 

विवेचन:-

समर्थांचे जीवन चरित्र या ओवीत सामावले असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. समर्थांच्या चरित्राचा ढोबळमानाने अभ्यास केला तर आपल्या असे लक्षात येईल की पहिली बारा वर्षे ते घरी होते, नंतरची बारा वर्षे टाकळी येथे त्यांनी साधना केली. त्यानंतर बारा वर्षे देशाटन करून त्यांनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला. त्यानंतर पुढील ३६ वर्षे त्यांनी राष्ट्राचे पूनरूत्थान करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.  

उदंड जाहालें पाणी । स्‍नान संध्‍या करावया । जप तप अनुष्‍ठानें । आनंदवनभुवनीं ।।३६।।

(आनंद वनभुवनी)

वरील ओवी त्याच्या राजकीय आणि धार्मिक कार्यातील यशस्वीतेची ग्वाही देते असे म्हणता येईल.

समर्थ एका ठिकाणी म्हणतात,

“अखंड सावधान असावे | दुश्चित कदापी नसावे | तजविजा करीत बैसावे | येकान्त स्थळी||”

आज आपण जे सुरक्षितता (safety) या विषयाबद्दल बोलतो, लिहितो त्याबद्दल हा विलक्षण आगळावेगळा संत सुमारे चारशे वर्षांपूर्वी लिहून गेला आहे, असे आपल्या लक्षात येईल.

समर्थांनी आधी हरिकथा केली, अर्थात स्वतःला सिद्ध केले. त्यानंतर मिळवलेली विद्या, ज्ञान देशभर भ्रमंती करून तपासून पाहिले आणि त्यानंतर महाराष्ट्रात त्याचा यशस्वी प्रयोग केला…!

समर्थांचे काही आवडते शब्द आहेत. त्यामध्ये विवेक, प्रयत्न आणि सावधान किंवा सावधानता यांचा क्रम खूप वरचा आहे. 

मनुष्याने कोणतेही कार्य करताना आपले विहित कार्य ( अर्थात हरिकथा)  सोडू नये असे समर्थ आपल्याला सांगत आहेत. व्यवहारात असो परमार्थात मनुष्याने अत्यंत सावधान असले  पाहिजे. अन्यथा त्याला कोणीही लुबाडेल.

मनुष्य प्रापंचिक असो किंवा पारमार्थिक त्याने वरील ओवी कायम लक्षात ठेवावी आणि तसे आचरण करण्याचा प्रयत्न करावा असे समर्थ आपल्याला सांगत असावेत.

जय जय रघुवीर समर्थ 

(तळटीप :  या निमित्ताने समर्थांचे चरित्र प्रत्येक वाचकाने वाचावे असे मी आपल्याला सुचवीत आहे.) 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares